तीर्थक्षेत्र
yeleshwar-mandir-yeli
|| तीर्थक्षेत्र ||
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात, नगर-बीड महामार्गावरून साधारणत: २० किलोमीटर अंतरावर असलेले येळी हे छोटेसे, सुमारे ५००० लोकसंख्या असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे.
प्रत्येक गावाची काहीतरी विशेष ओळख असते, आणि येळी गावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव “शिक्षकांचे गाव” म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील जवळपास प्रत्येक घरात एक शिक्षक आहे, जे केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अध्यापनाचे कार्य पार पाडत आहेत.
येळी गावातील प्रमुख आकर्षण म्हणजे येळेश्वर मंदिर, जे या गावाचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या स्थापनेबद्दल श्री. बाळासाहेब फुंदे सांगतात की, अनेक वर्षांपूर्वी एका तपस्वी ऋषींनी येळूच्या बेटात शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर या देवतेला येळेश्वर असे नाव देण्यात आले, आणि या नावावरूनच गावाचे नाव येळी असे झाले.
अलीकडच्या काळात गावातील लोकांनी व संस्थानाने या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला, परंतु जीर्णोद्धार करताना मंदिराच्या मूळ संरचनेला कुठलाही धक्का न लावता संवर्धनाचे काम उत्कृष्टरीत्या पूर्ण केले गेले आहे.

हे मंदिर यादव काळातील असून, साधारणतः १४व्या शतकाच्या अखेरीस बांधले गेले असावे. मंदिर पूर्वाभिमुख आहे, आणि त्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन मुख्य भागांत विभागलेली आहे.
मंदिरासमोरील नवी नंदी मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून अत्यंत सुबक आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर चामुंडा, नटराज शिव, व भैरव यांची शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराचा सभामंडप चार मजबूत स्तंभांवर उभा आहे. सभामंडपातील दोन स्तंभांवर वाद्य वाजवणारे भारवाहक पक्ष दाखवलेले आहेत, तर उर्वरित दोन स्तंभांवर उलटा नाग शिल्पित केलेला आहे. या स्तंभांच्या तळाशी महिषासुर मर्दिनी व मातृकांचे देखील शिल्पांकन आढळते. गर्भगृहाची द्वारशाखा विविध सुंदर शिल्पांनी सजवलेली आहे. त्यावर गंगा, यमुना, द्वारपाल आणि द्वारशक्तिक यांचे देखील शिल्पांकन दिसून येते.
द्वारशाखेच्या ललाट बिंबावर गणपतीची प्रतिमा कोरलेली आहे. शिवाय, द्वारशाखेच्या उत्तरंगावर नवग्रहांचे प्रतीक म्हणून नऊ मुखवटे कोरलेले आढळतात. गर्भगृह चौरस आकाराचे असून मध्यभागी शिवलिंग स्थापित आहे.
मंदिराच्या आवारात उभी असलेली विष्णूची सुबक मूर्ती ही विष्णूच्या चोवीस व्यूहांपैकी ‘केशव’ रूपातील आहे. याशिवाय, परिसरात गणपती, श्री संत भगवान बाबा, आणि श्री संत वामनभाऊ यांच्या मूर्तीही आहेत. मंदिराच्या आवारात इतर काही भग्नावशेषही विखुरलेले दिसतात.
गावाच्या ईशान्य दिशेला एका टेकडीवर श्री रेणुका मातेचे मंदिर आहे, आणि ही देवी येळी गावाची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. या मंदिरासमोर एक भव्य दीपमाळ उभी आहे. गर्भगृहात देवीची स्वयंभू तांदळाची मूर्ती आहे.
हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येळेश्वराचा उत्सव, तसेच शारदीय नवरात्रोत्सवात श्री रेणुका मातेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवांना गावातील व पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती असते. येळेश्वर व रेणुका देवीची मंदिरे गावाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा असून, गावकऱ्यांनी हा ठेवा जपला आहे.