vitthal-mandir-vitthalwadi
|| तीर्थक्षेत्र ||
पुणे हे ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर, त्यात पुण्याची ओळख म्हणजेच तिथली जुनी वाडे आणि प्राचीन मंदिरं. यापैकी बरीचशी मंदिरं पेशवाई काळातील आहेत, आणि आज आपण जाणून घेणार आहोत सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठल मंदिराबद्दल, ज्याला “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते. सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर, राजाराम पुलावरून थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विठ्ठलवाडीची कमान दिसते. हाच तो विठ्ठलवाडी परिसर, ज्यात हे विठ्ठल मंदिर वसलेले आहे.
सुमारे १७५ वर्षे जुने असलेले हे मंदिर, मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिराच्या परिसरात अत्यंत शांत आणि सुंदर वातावरण आहे. मंदिराच्या इतिहासाच्या कहाणीप्रमाणे, संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त, जे शेतकरी होते, येथे शेती करत असत.
ते नियमितपणे पंढरपूरला वारीला जात असत, परंतु वयोमानानुसार त्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नव्हते. एका दिवस त्यांनी शेतात काम करत असताना, त्यांचा नांगर अचानक अडकला. खोदकाम करत असताना, त्यांना विठ्ठलाची मूर्ती सापडली, जीच आज गाभाऱ्यात विराजमान आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराच्या देखभालीसाठी काही जमीन इनाम स्वरूपात दिली होती. मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर हा सनदपत्र ठळकपणे संगमरवरी फलकावर कोरलेले आहे. या सनदपत्राच्या आधारे असे कळते की या मंदिराचे बांधकाम इ.स. १७३२ पूर्वी झालेले आहे. १७३२ साली निजामाने पुण्यावर हल्ला केला होता, ज्यात या मंदिराचे नुकसान झाले होते. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पेशवाई शैलीत भव्य दगडी विठ्ठल मंदिर बांधले.
मंदिराचा परिसर मुठा नदीच्या अगदी जवळ आहे आणि मंदिर उंच दगडी जोत्यावर उभे आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे आणि मंदिराच्या वास्तुशिल्पात ओवऱ्या आणि भक्कम तटबंदी आहे. गाभाऱ्यात अजूनही मूर्तीच्या कपाळावर नांगर लागल्याची खाच स्पष्टपणे दिसते. गाभाऱ्याच्या बाहेरच्या मंडपात जयपूर पद्धतीचे सुंदर आरसेकाम केलेले आहे.
मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर आहे, ज्यात वर्षभर पाणी असते. १८४२ साली मिळालेल्या ताम्रपटानुसार, या मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबीयांकडे आली. आजही गोसावी कुटुंबीय हे विठ्ठलाची पूजाअर्चा आणि व्यवस्थापन करतात. याच कुटुंबाने मंदिराच्या परिसरात दशावतार, महादेव मंदिर आणि हरिदास वेस बांधली आहे.
तसेच, मंदिराच्या आवारात मारुती, गरुड आणि शनिदेव यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात मावळी पगडीधारी एक प्रतिमा आहे, जी संभाजी गोसावी यांच्या स्मारकाचे प्रतीक आहे.