तीर्थक्षेत्र

श्रीगोंदा हे अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. हे शहर सरस्वती नदीच्या किनारी वसलेले असून, प्राचीन काळात याला ‘श्रीपूर’ असे नाव होते. मध्ययुगात या श्रीपूरचे नाव ‘चाम्भारगोंदे’ असे झाले आणि तेच आता श्रीगोंदा म्हणून ओळखले जाते.

या नगरीला दक्षिण काशी असेही संबोधले जाते कारण येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जी श्रीगोंदा शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. श्रीगोंद्याचे खास आकर्षण म्हणजे मराठा काळातील आणि शिंद्यांच्या राजवटीतील भव्य वाडे आणि ऐतिहासिक वास्तू. या मंदिरांबरोबरच संत महात्म्यांच्या वास्तव्यानेही हे नगर पवित्र झाले आहे.

srigonda-ek-adhyatmik-nagari

श्रीगोंद्याचे प्राचीन नाव ‘श्रीपूर’ हे लक्ष्मीदेवीच्या येथे वास्तव्यामुळे पडले असल्याचे ‘श्रीपूर महात्म्य’ या ग्रंथात नमूद केले आहे. या नगरीत पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्रीविष्णूंनी बालरूपात अवतार घेतला होता, ज्यामुळे येथे श्री लक्ष्मी आणि श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे उभी आहेत.

पंढरपूरच्या श्री विठोबापेक्षा श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग वेगळे दैवत आहेत, अशीही माहिती या ग्रंथात आढळते. या श्रीपूर नगरीचे वर्णन ‘स्कंद पुराणात’ देखील आढळते. लक्ष्मी-पांडुरंग मंदिरे व्यतिरिक्त, श्रीगोंद्यामध्ये अनेक प्राचीन देवतांची मंदिरे आहेत, ज्यात १२ महादेव, ८ विनायक, ८ भैरव, ९ दुर्गा, ११ मारुती यांचा समावेश आहे. तसेच श्री बालाजी, लक्ष्मी-नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनिमहाराज, श्री भगवान कार्तिकेय आणि खंडोबा यांचीही मंदिरे या नगरीत पाहायला मिळतात.

भारतात अत्यंत कमी ठिकाणी असणाऱ्या सूर्य मंदिराचे अस्तित्वही पूर्वी येथे होते, मात्र ते आता दिसत नाही. तसेच, येथे विविध जाती-धर्मांतील संतांची मंदिरेही आहेत. संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज चांभार, संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज तेली, संत वामनराव पै यांचे गुरु आणि अलिकडील संत तात्या महाराज महापुरुष यांच्यासह अनेक संत या भूमीत होऊन गेले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचाही या नगरीला पदस्पर्श झाला आहे, आणि दांडेकर मळा येथे त्यांचे एक मंदिर आहे. परंतु श्रीगोंदा सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे ते संत शेख महम्मद महाराजांच्या संजीवन समाधीसाठी.

संत शेख महम्मद महाराज यांचा जन्म बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे झाला होता. त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय खाटकाचा होता, मात्र त्यांनी ईश्वरभक्तीकडे वळून वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, मालोजीराजे, यांनी त्यांना गुरु मानले होते आणि त्यांनीच श्रीगोंदा येथे मकरंद पेठ वसवून महाराजांसाठी मठ बांधला.

संत शेख महम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते आणि त्यांच्या संदर्भात सांगितले जाते की त्यांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तनावेळी लागलेली आग आपल्या हातांनी येथूनच विझवली होती.

संत शेख महम्मद महाराज यांनी आपले जीवन भक्ती आणि आध्यात्मिक साधनेत घालवले आणि त्यांनी विपुल लेखन करून समाजाला मार्गदर्शन केले. त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृतींमध्ये ‘योगसंग्राम’ आणि ‘पवन विजय’ हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या अभंगांतून ते सांगतात, “शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद.” त्यांच्या शिकवणुकीतून सर्वत्र ईश्वर एकच असल्याचा संदेश त्यांनी दिला.

श्रीगोंदा शहराशी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, मालोजीराजे यांचे घनिष्ठ नाते होते. मालोजीराजे यांनी येथे ‘मकरंदपूर’ नावाची एक पेठ उभारून, संत शेख महम्मद महाराजांसाठी मठाची स्थापना केली. तसेच, मालोजीराजे देऊळगावहून श्रीगोंद्यात स्थायिक झाले, हे ऐतिहासिक पुरावे सापडतात.

त्याकाळी श्रीगोंदा हे व्यापारी आणि सराफी पेठांसाठी प्रसिद्ध होते. इतकेच नव्हे, तर वेरुळच्या घ्रुश्नेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा निधी येथील शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून मिळवला जात होता, असेही ऐतिहासिक दस्तऐवज आढळतात.

मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे, आणि राणोजी शिंदे यांचे वास्तव्य श्रीगोंद्यातील इतिहासाची साक्ष देते. शिंदे घराण्याच्या किल्ल्यातील काही वास्तू आजही भग्नावस्थेत उभ्या आहेत, ज्या शिंदेकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. मैनाबाईचा माळावर शिंदे घराण्यातील सती गेलेल्या स्त्रियांच्या छत्र्या आहेत, तसेच महादजी शिंदे यांच्या पादुका देखील येथे पाहावयास मिळतात. खर्ड्याच्या लढाईतील विजयाचे स्मारक म्हणून भगवा ध्वज फडकवण्यात आलेले स्थान ‘विजय चौक झेंडा’ म्हणून ओळखले जाते.

श्रीगोंद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध असला तरी, पूर्वी हा प्रदेश दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा. मात्र, १९५२-५३ मध्ये शिवाजीबाप्पू नागवडे यांच्या नेतृत्वाखाली कुकडी पाण्याच्या प्रश्नासाठी मोठा लढा उभारला गेला. या संघर्षातून श्रीगोंद्यात पाण्याची समस्या सोडवण्यात यश आले. घोडच्या पाण्यामुळे या नगरीत समृद्धीची नवीन पर्वणी सुरू झाली आहे, ज्यामुळे श्रीगोंदा आता समृद्धतेच्या मार्गावर आहे.