Sphut Abhang
संत रामदास
स्फुट अभंग – बाळक्रीडा
नमस्कार माझा हा विघ्ननाशना । शारदा आंननाभाजीं राहो ॥१॥
राहोर्वकाळ गोविंदाचें नाम । कीर्तन उत्तम यादवाचें ॥२॥
यादवाचे कुळीं गोकुळीं गोविंद । आनंदाचा अवतरला ॥३॥
अवतरला पूर्ण अवतारी अच्युत । आयुधें मंडित चतुर्भुज ॥४॥
चतुर्भुज हरी डोळस सांवळा । वैजयंतीमाळा पीतांबर ॥५॥
पीतांबरधारी प्रकटे मुरारी । मथुरेमाझारीं कारागृहीं ॥६॥
कारागृहीं माता पिता वसुदेव । तेथें आले देव सोडवणें ॥७॥
सोडवणें आला वैकुंठींचा राव । येतांचि लाघव थोर केलें ॥८॥
थोर केलें कर्म सर्वां भुलवीलें । स्वयें आच्छादीलें निजरूप ॥९॥
निजरूप देवें सोडुनी कौतुक । जहाला बाळक नंदजीचें ॥१०॥
नंदजीचें बाळ करि पंथ मोकळा । जावया गोकुळा विश्रांतीसी ॥११॥
विश्रांतीसी आलें स्थळ पालटलें । नवल जाणवलें कंसराया ॥१२॥
कंसराया जाय मारूं आपटोनी । मन गडबडोनी उसळली ॥१३॥
उसळली म्हणे कंसा तुझा वैरी । गोकुळा-माझारीं वाढतसे ॥१४॥
वाढतसे तैरी नंदाची कुमारी । बोलोनी अंबरीं गुप्त झाली ॥१५॥
झाली तळमळ ऐकतां कंसासी । लागली मानसीं थोर चिंता ॥१६॥
थोर चिंता करी म्हणे माझा वैरी । वाढतसे मारी कोण आतां ॥१७॥
कोण आतां तरी करावा उपाय । वैरीया अपाय होय जेणें ॥१८॥
होय जेणें मृत्यु तया बाळकासी । तंव आले जोशी म्हाबळभट ॥१९॥
म्हाबळभट आले रायें सन्मानीले । तयाप्रति बोले कांहीं एक ॥२०॥
कांहीं एक भटो मांडिलें संकट । तंव येरें पॅट उकलीला ॥२१॥
उकलीला पट पाहिला मुहूर्त । म्हणे चिंता व्यर्थ कां करिता ॥२२॥
कां करिता चिंता तया बाळकाची । बधूनि शीघ्रचि येतों आताम ॥२३॥
येतों आतां ऐसें बोलेनि वचन । शीघ्रचि गमन आरंभीलें ॥२४॥
आरंभीलें तेणें ब्रह्मांडगभन। पावला भुवन नंदजीचें ॥२५॥
नंदजीचें बाळ आलें मुळावरी । बैसऊनि नारी सांगतसे ॥२६॥
सांगतसे म्हणे हें तुम्हां वाईट । कुळाचा शेवट करूं आलें ॥२७॥
करूं आलें घात सर्वांचें अनहित । वोखटें बहुत दिसतसे ॥२८॥
दिसतसे दुष्ट सांगतों मी स्पष्ट । बुद्धीनें वरिष्ठ आहों आम्ही ॥२९॥
आम्हां तुम्ही माझे कीं हो यजमान । म्हणोनि सांगणें लागे आम्हां ॥३०॥
लागे आम्हां शब्द ऐसें न करावें । सत्वर वधावें लेंकुरासी ॥३१॥
लेंकुरासि क्रोध ऐकूनि वचन । मग पीडेंदान आरंभीलें ॥३२॥
आरंभीलें थोर कठिण द्विजासी। उठोनि त्वरेसीं पळतसे ॥३३॥
पळतसे पुढें मागें पीडेंदान । पृष्ठीचें कंदन तें होतसे ॥३४॥
होतसे ताडन काष्ठाचें चहुंकडून । कष्टला ब्राह्मण पळतसे ॥३५॥
पळतसे भय भरलें अंतरीं । म्हणे हरी हरी नारायण ॥३६॥
नारायणें मज रक्षीलें जीवेसीं । दावी रायापासीं पृष्ठभाग ॥३७॥
पृष्ठभागीं थोर झालेंसे ताडण । भटो बहु शीण पावलेती ॥३८॥
पावली ती पूतना म्हणे काय झालें । बाळकें मारिलें ब्राह्मणासी ॥३९॥
ब्राह्मणासी जेणें दिल्हें पीडेंदान । तयासी मारीन शीघ्रकाळें ॥४०॥
शीघ्रकाळें विषें भरी पयोर्धर । पावली मंदिर पूतना ते ॥४१॥
पूतना मावशी होय गोविंदासी ॥ म्हणोनी वेगेंसी पाहों आली ॥४२॥
पाहों आली परी कपट अंतरीं । भाव वरीवरी दावीतसे ॥४३॥
दावीतसे भाव शब्दाचें लाघव । जाणीयेली भाव बालकाने ॥४४॥
बाळकासी पुढें घेऊनि चुंबन । देत स्तनपान आदरेंसी ॥४५॥
आदरेंसी हरी स्तनपान करी । पूतना अंतरीं जाजावली ॥४६॥
जाजावली म्हणे पुरे बापा आतां । जाऊं दे अनंता सोड वेगीं ॥४७॥
सोड वेगीं होतें लोटिलें श्रीमुख । निघेना बाळक शोषीतसे ॥४८॥
शोषिली पूतना आकंदे मानसीं । मुकली प्राणासी कृष्णमुखें ॥४९॥
कृष्णमुखें रिठासूर रगडीला । लातीं विदारीला शकटासुर ॥५०॥
शकटासुर लातीं हाणे बाळपणीं । वृक्ष जन्मळोनी सांगतसे ॥५१॥
सांगतां सांगतां देवें गिळियेला । उदरीं दाविला विश्वलोक ॥५२॥
विश्वलोक नांदे जयाचे अंतरीं । गाई राखे हरी गौळियांच्या ॥५३॥
गौळियांच्या गाई राखी तये वेळीं । खेळे चेंडूफळी गोपाळांसीं ॥५४॥
गोपाळांसीं चेंडू खेळतां उडाला । जाउनी बुडाळा डोहामध्यें ॥५५॥
डोहामध्यें कृष्णें टाकियेली उडी । पहाताती थडीं सवंगढे ॥५६॥
सांगताती कृष्ण बुडाला तुमचा । जेथें काळीयाचा डोहो आहे ॥५७॥
डोहो आहे तेथें दाविती गोपाळ । मिळाले सकळ विश्वजन ॥५८॥
विश्वजन सर्व पहाती गोविंदा । आक्रंदे यशोदा दीनरूप ॥५९॥
दीनरूप माता करीते रोदन । संबोखिती जन यशोदेसी ॥६०॥
यशोदेसी ठाव दाविला गोपाळीं । मोडली डाहाळी कळंबाची ॥६१॥
कळंबाची छाया दिसे जळावरी । बुडाला श्रीहरी तये ठाईं ॥६२॥
तयेठाईं माता घालूं पाहे उडी । धरिती देवगडी नगरलोक ॥६३॥
नगरलोक सर्व गोपाळ रुदती । गाई हंबरती कृष्णालागीं ॥६४॥
कृष्णालागीं सर्व जन आक्रंदती । मग संबोखिती येरयेरां ॥६५॥
येरयेरां संबोखूनियां निघाले । कृष्णें काय केलें डोहामाजीं ॥६६॥
डोहामाजीं क्तूर काळिया विखार । परस्परें थोर युद्ध झालें ॥६७॥
युद्ध झालें थोर काळिया नाथिला । गोकुळासी आला कृष्णनाथ ॥६८॥
कृष्णनाथें अघबक विभांडिले । घेनुका मारिलें आपटूनी ॥६९॥
आपटूनी मांडी खेळती गोपाळ । घूमरी कल्लोळ पावयांचे ॥७०॥
पावयांचे नाद वाजती मोहरी । तेणें नगरनारी लुब्ध होती ॥७१॥
लुब्ध होती पक्षी नर वनचर । यमुनेचें नीर तुंबळलें ॥७२॥
तुंबळले गोप लागला वणवा । गिळूनियां अश्र्वा वधीयेले ॥७३॥
वधीयेलें कृष्णें पन्नग आवर्ता । दुष्ट तृणावर्णा मारियेलें ॥७४॥
मारियेला गर्व थोर ब्राह्मणाचा । जाहाला सर्वांचा समुदाय ॥७५॥
समुदाय सर्व गोपाळ स्वजन । बळें गोवर्धन उचलीला ॥७६॥
उचलीला तळीं राखिलें गोकुळ । इंद्राचा सकळ गर्व नेला ॥७७॥
नेलें मथुरेसी अक्तूरें कृष्णासी । मल्ल चाणूरासी वधीयेलें ॥७८॥
वधीयेला कंस घातलें आसन । तेथें उग्रसेन बैसवीला ॥७९॥
वैसवीला उग्रसेन नृपासनीं । चद्यासी त्रासुनी मारियेलें ॥८०॥
मारी शिशुपाळ आणि भौमासुर । वधीला असुर जरासंध ॥८१॥
जरासंध काळयवन मह्कासुर । मारीले असुर थोर थोर ॥८२॥
थोर ख्याती केली अर्जुना रक्षीलें । सर्व साह्य केलें पांडवांचें ॥८३॥
पांडवांचा सखा सर्व साहाकारी । संकटीं कैवारी द्रौपदीचा ॥८४॥
द्रौपदीचा सखा द्वारकेभीतरीं । सोळा सहस्र नारी गोपांगना ॥८५॥
गोपांगना राधा रुक्मिणी सुंदरी । सुखें राज्य करी यादवांसीं ॥८६॥
यादवांसी शाप दिल्हा ऋषीश्वरीं । मांडिली बोहरी तेणें मिसें ॥८७॥
तेणें भिसें सर्व आटले यादव । ते काळीं उद्धव उपदेशिला ॥८८॥
उपदेशिला दास श्रीकृष्णें आपुला । 3अवतार झाला पूर्ण आतां ॥८९॥
स्फुट अभंग- वैराग्यशतक
नमन योगिया स्वामी दत्तात्रया । गाईन ओविया संसारींच्या ॥१॥
संसारींचें दु:ख आठविलें मनीं । मागें नाना योनी भोगियेल्या ॥२॥
भोगयिएल्या परी नाहीं आठवण । दु:ख नें कठीण विसरलों ॥३॥
विसरलों राम चित्ती दृढ काम । तेणें गुणें श्रम थोर झाला ॥४॥
झालो कासावीस थोर गर्भवासीं । नको त्या दु:खासी सांगवेना ॥५॥
सांगेवना शीण अत्यंत कठीण । रामा तुजवीण दु:ख झालें ॥६॥
दु:ख झाले भारी मातेच्या उदरीं । नवमास वरी कोंडीयेलें ॥७॥
कोडीयेलें मज अत्यंत सांकडी । रामा कोण सोडी तुजवीण ॥८॥
तुजवीण मज जाहलें बंधन । जठरीं शयन जननीचे ॥९॥
जननीचें जठर संकोचित थोर । विष्ठा आणि मूत्र नाकीं तोंडी ॥१०॥
नाकीं तोंडीं जंत वांति आणि पित्त । निर्बुजल चित्त वायु नाहीं ॥११॥
वायु नाहीं जेथें वन्हीचा उबारा । तेणें या शरीरा दु:ख होय ॥१२॥
दु:ख होय थोर सर्वांग आहाळे । तेणे गुणें पोळे अस्थिमात्र ॥१३॥
अस्थिमात्र पंजर शिरीं वेटाळिला । नाहीं गुंडाळीला मेदमांसें ॥१४॥
मेदमांस कृमी कुत्सित कातडी । गलती आंतडीं लवथवीत ॥१५॥
ऐसें अमंगळ अत्यंत कुश्चीळ । प्राण हा व्याकूळ होय दु:खें ॥१६॥
दु:खें आला त्रास तेणें कोढे श्वास । कोंडिलें उबेस घेतां नये ॥१७॥
नये नये येताम सर्वथा बाहेरीं । ऐसी दाटी थोरी उकडीलों ॥१८॥
उकडीतां प्राणी करी तळमळ । तवं जन्मकाळ आला पुढें ॥१९॥
आलें पुढें अंत काळीचें संकट । कष्टावरी कष्ट थोर झाले ॥२०॥
थोर झाले नष्ट मातेच्या उदरीं । शीणलों श्रीहरी दास तुझा ॥२१॥
दास्य मी करीन ऐसें होतें ध्यान। जन्मकाळीं प्राण गेला माझा ॥२२॥
गेला माझा प्राण झाले विस्मरण । स्वामीचे चरण विसरलों ॥२३॥
विसरलों सोऽहं मग म्हणे कोऽहं । जन्मकाळीं बहू दु:ख झाल ॥२४॥
दु:खें दुखावलों म्हणे आहा आहा । जन म्हणे टाहा फोडीयेला ॥२५॥
फोडीयेला टाहो पडतां भूमीवरी । दिवसेंदिवस हरी विसरलों ॥२६॥
विसरलों बुद्धि स्वहिताची शुद्धि । अज्ञानाची वृद्धि होत असे ॥२७॥
होत असे वृद्धि दृढ देहबुद्धि । तुज कृपानिधि अंतरलों ॥२८॥
अंतरलों सुख तुज विसंबतां । विषय भोगितां दु:ख झालें ॥२९॥
दु:ख झालें फार ऐसा हा संसार । पुढें षड्विकार उद्भवले ॥३०॥
उद्भवले तेणें सुख दु:ख कळे । प्राण हा आंदोळे दु:ख होतां ॥३१॥
दु:ख होय देहीं माता नेणे कांहीं । मज वाचा नाहीं काय करूं ॥३२॥
काय करूं दु:खें पोळे अभ्यंतर । मातेसी अंतर जाणवेना ॥३३॥
जाणवेना माझें दु:ख मी अज्ञान । मग मी रोदन करीं देवा ॥३४॥
करी देवा आतां माझी सोडवण । दु:ख हें दारुण भोगवेना ॥३५॥
भागेवेना दु:ख संसारीचें आतां । धांव बा अनंता पाव वेगीं ॥३६॥
पाव वेगीं दास सोडवी आपुले । लोभोचि वाहिले माया जाळीं ॥३७॥
मायाजाळीं झालें दृढ माझें मन । रामा तुझें नाम आठवेना ॥३८॥
आठ-वेना चित्तीं स्वहिताचें ज्ञान । मायबापें लग्र केलें लोभें ॥३९॥
लोभें लग्र केलें मानीली आवडी । पायीं ओविली बेडी बंधनाची ॥४०॥
बंधनाची बेडी प्रबळला काम । मग कैंचा राम आठवेना ॥४१॥
आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा । झालों कुटुंबाचा भारवाही ॥४२॥
भारवाही झालों रामा अंतरलों । बंधनीं पडलो काय करू ॥४३॥
काय करूं मज कामाचें सांकडें । संसाराचें कोडें उगवेना ॥४४॥
उगवेना मन आठवे कांचन । सर्वकाळ ध्यान प्रपंचाचें ॥४५॥
प्रपंचाचें ध्यान लागलें मानसीं । चिंता अहर्निशीं दुश्चंचळ ॥४६॥
चंचळ मानस संसारउद्बेगें । क्षणक्षणीं भंगे चित्तवृत्ति ॥४७॥
वृत्ति कांता धन पाहे जनमान । इच्छेनें बंधन दृढावलें ॥४८॥
दृढावलें वोस प्रपंचाच्या माथा । तेणें गुणें व्यथा थोर झाली ॥४९॥
थोर होय व्यथा तारुण्याच्या भरें । कामाचे कावरें आवरेना ॥५०॥
आवरेना क्तोध तेणें होय खेद । वृत्तीचा उच्छेद करूं पाहे ॥५१॥
करूं पाहे घात थोर पुढीलाचा । मार्ग स्वहिताचा अंतरलों ॥५२॥
अंतरलों भक्ति ठाकेना विरक्ति । देवा तुझी प्राप्ति केवीं घडे ॥५३॥
केवीं घडे प्राप्ति मज पतितासी । झाल्या पापराशी सांगूं किती ॥५४॥
सांगूं किती दोष झाले लक्ष कोटी । पुण्य माझे गांठीं आढळेना ॥५५॥
आढळेना पुण्य पापाचे डोंगर । करितां संसार माझें माझें ॥५६॥
माझी माता पिता माझे बंधू जन । कन्या पुत्र धन सर्व माझे ॥५७॥
सर्व माझें ऐसा मानिला भरंवसा । तुज जगदीशा वीसरलों ॥५८॥
वसि-रलों तूज वैभवाकरितां । शेखीं माता पिता राम जालीं ॥५९॥
राम जाली माता देखत देखतां । तरी म्हणे कांता पुत्र माझे ॥६०॥
माझे पुत्र माझे स्वजन सोयरे । दृढ देही भरे अहंभाव ॥६१॥
अहंभावें मनीं दु:ख आच्छादूनी । वर्ततसें जनीं अभिमानें ॥६२॥
अभि मान माथां वाहे कुटुंबाचा । अंतरी सुखाचा लेश नाहीं ॥६३॥
नाहीं नाहीं सुख संसारीं पहातां । पुरे देवा आतां जन्म नको ॥६४॥
नको नको आतां घालूं या संसारीं । पोळलों अतंरीं काय करूं ॥६५॥
काय करूं माझें नेणती स्वहित । आपुलालें हित पहातात ॥६६॥
पहातात सुख वैभवाचीं सखीं । कोणी मज शेखीं कामा नये ॥६७॥
कामा नये कोणी तुजवणि रामा । नेई निजधामा माहीयेरा ॥६८॥
माहेरही माझें अंतरलें दुरी । लोभें दुरा-चारीं गोवीयेलं ॥६९॥
गोवीयेलें मज आपुलीया हिता । माझी कोणी चिंता केली नाहीं ॥७०॥
केली नाहीं चिंता लोभें गुंडाळीलें । पिळूनी घेतलें सर्व माझे ॥७१॥
सर्व माझें गेले झालें नि:कारण । स्वामीचे चरण अंतरलों ॥७२॥
अंतरलों देवा आयुष्य वेचलें । अंतर पडलें काय करूं ॥७३॥
काय करूं आतां शरीरही गेलें । मज वोसंडिलें जीवालागीं ॥७४॥
जीवालागीं मज मोकळीक देवा । काय करूं ठेवा प्रारब्धाचा ॥७५॥
प्रारब्धाचा ठेवा प्रपंचीं रंगला । देहांतीं खंगला वृद्धपणीं ॥७६॥
वृद्धपणीं माझें चळलें शरीर । श्रवण अधिर नेत्र गेले ॥७७॥
नेत्र गेले मज पहातां दिसेना । स्वयें उठवेना पाय गेले ॥७८॥
पाय गेले तेणें दु:ख होय भारी । तेथेंचि बाहेरीं जाववेना ॥७९॥
जाववेना तेणें झालें अमंगळ । अत्यंत कुश्चीळ वातपित्त ॥८०॥द
वात पित्त जन देखोनी पळती । दुर्गंधि गळती नवनाळीं ॥८१
नवनाळीं वाहे दुर्गंधि न साहे । वांति होऊं पाहे देखतांची ॥८२॥
देखतां सकळ सुटले पाझर । मळ मूत्र धीर धरवेना ॥८३॥
धरवेना क्षुधा निद्रा आणि तृषा । परधनीं आशा प्रबळली ॥८४॥
प्रबळली आशा झाली अनावर । चिंता तृष्णातुर सर्वकाळ ॥८५॥
सर्वकाळ चित्तीं थोर लोलंगता । खायासी मागतां नेदी कोणी ॥८६॥
नेदी कोणी कांही क्षीण झालों देहीं । जीवलग तेहीं वोसंडीले ॥८७॥
वोसंडलिं मज वैभव गेलीया । देह खंगलिया दु:ख झालें ॥८८॥
दु:ख झालें थोर क्षुधा आवरेना । अन्नही जिरेना वांति होय ॥८९॥
वांति होय तेणें निर्बुजे वासना । स्वादिष्ट चावेना दांत गेले ॥९०॥
दांत गेले तेणें जिव्हेसी बोबडी । कंठ गडगडी बोलवेना ॥९१॥
बोलवेना अंतकाळींच्या विपत्ति । सर्वही म्हणती मरेना कां ॥९२॥
मरेना कां आतां कासया वांचला । देवा वीसरला नेणोनियां ॥९३॥
नेणोनियां याची मर्यादा खुंटली । सकळां लागली चिंता मनीं ॥९४॥
चिंता मनीं वाटे कृत्याची सकळां । सर्वांसी कंटाळा आला थोर ॥९५॥
आला थोर त्रास जिवलग बोलती । देवा याची माती उचलावी ॥९६॥
उचलावी माती सर्वांचे अंतरीं । सुखाचीं सोयरीं दुरी ठेलीं ॥९७॥
दुरी ठेले सर्व दु:खाचीं चोरटीं । कोणीच संकटीं सोडवीना ॥९८॥
सोडवीना कोणी श्रीरामावांचूनी । संकटीं धांवणी राम करी ॥९९॥
राम करीतसे दासाचा सांभाळ । भक्तांचा स्नेहाळ राम माझा ॥१००॥
स्फुट अभंग – ज्ञानशतक
संतांचे संगतीं काय प्राप्त होतें । तें आम्हाम निरुतें सांगईन ॥१॥
सांगईन परी मानसीं धरावें । मग उद्धरावें या संसारीं ॥२॥
संसारीचें सार जया नाश नाहीं । तेंचि पडे ठाईं संतसंगें ॥३॥
संतसंगें चुके जननीजठर । दुस्तर संसार मायाजाळ ॥४॥
मायाजाळ तुटे तरी देव भेटे ।संतसंगें आटे भवसिंधू ॥५॥
भव भयानक बुडवी सकळां । त्याहूनि वेगळा साधुसंग ॥६॥
साधुसंग साधी असाध्य वस्तूसी । जेथें आहे त्यासी वाट नाहीं ॥७॥
वाट नाहीं जेथें जावया इतरा । अभाविक नरा पापबुद्धी ॥८॥
पापबुद्धि झडे संतांचे संगतीं । नाही अधोगाति गर्भवास ॥९॥
गर्भवास संतसंगें मुक्त होय । वेगीं धरी सोय आलीया रे ॥१०॥
आलीया संसारीं स्वहित विचारी । एके भावें धरीं संतसंग ॥११॥
संतसंग धरीं धन्य तो संसारीं । बोलिलें श्रीहरीं भागवतीं ॥१२॥
भागवत गीता सार निरूपण । त्याचें विवरण संतसंगें ॥१३॥
संतसंगें कळे सर्व शास्रभाग । आणि ज्ञानयोग अप्रयासें ॥१४॥
प्रयासें साधितां कधीं नये हाता । तें लाभे तत्त्वतां साधुसंगें ॥१५॥
साधूचेनी संगें अलभ्याचा लाभ । मुक्ति हे सुलभ होत आहे ॥१६॥
आहे एक देव परी तो वळेना । जयासी मिळेना संतसंग ॥१७॥
संतसंग नाहीं जयालागीं जनीं । जया कां जननी प्रसवली ॥१८॥
प्रसवली माता शीणचि उरला । पुत्र नाहीं झाला हरिभक्त ॥१९॥
हरिभक्त नर वंशाचें मंडण । दोषाचें खंडण करीतसे ॥२०॥
करीतसे भक्ति संताचेसंगतीं । सायुज्यतामुक्ति पावावया ॥२१॥
पावावया मुक्ति हरीचें भजन । श्रवन मनन सर्वकाळ ॥२२॥
सर्वकाळ होय सार्थक श्रवणें । ब्रह्मनिरूपणें संतसंगें ॥२३॥
संतसगें ब्रह्मपद ओळखावें । विवेकें पावावें निरंजन ॥२४॥
निरंजना आतां नाहीं जन वन । अंत्राळीं गमन एकाएकीं ॥२५॥
एकाएकी देव निर्भळ निश्चळ । आतुडे प्रांजळ दुजेवीण ॥२६॥
दुजेवीण देव एकला एकट । उभा घनदाट मागें पुढें ॥२७॥
मागें सर्व देवांचा नायक । सांपडे विवेक झालीयानें ॥२८॥
झालीयानें कृपा संतसज्जनांची । मग विवेकाची वाट फुटे ॥२९॥
वाट अवघड पाहातां दिसेना । जेथें नाहीम मना समागम ॥३०॥
समागमें जातां वाटचि फुटेना । संशय तुटेना बहुविध ॥३१॥
बहुविध पंथ कोणें तो धरावा । दुजेपणीं देवा पावीजेना ॥३२॥
पावीजेना देव संतसंगावीन । मार्ग हा कठीण विवेकचा ॥३३॥
विवेकाचा मार्ग विवेकें चालावा । मनाचा त्यागावा संग सर्व ॥३४॥
सर्व त्याग करी पावसी श्रीहरी । परी एक धरीं संतसंग ॥३५॥
संतसंगावीण त्याग हा घडेना । श्रीहरी पडेना कदा ठायीं ॥३६॥
ठाव सज्जनाचा सज्जन जाणती । तेथें नाहीं गति मीपणाची ॥३७॥
मीपणाची गति संगाचेम लक्षण । ठाउकी ही खूण सज्जनाची ॥३८॥
सज्जनाचें वर्म सज्जनाला तुटे । उतारा कुवाटे मायाजाळ ॥३९॥
मायाजाळ पाहों जातां आढळेना । सर्वथा कळेना न पाहतां ॥४०॥
पाहतां संसार माईक वेव्हार । परी निरंतर लागलासे ॥४१॥
लागला दिसेना परी निरसेना । माईक वासना सत्य झाली ॥४२॥
सत्य झाली असे विवेकें निरसे । निरसोनी वसे जवळींच ॥४३॥
जवळींच आहे अंतरीं चोरटा । आतां कोण्या वाटा धांवसील ॥४४॥
धांवसील परी वासना सरेना । सर्वथा मरेना साधुवीण ॥४५॥
साधुवीण प्राणी पडती आटणीं । तप तीर्थाटणीं नाना कर्मी ॥४६॥
नाना कर्मी देव चुकोनी राहिला । सज्जनीं पाहिला अनुभवें ॥४७॥
अनुभव सर्व देहीं वेगळाले । कोण झाले भले संतजन ॥४८॥
संतजन परी कोण ओळखावे । कैसे ते जाणावे साधूजन ॥४९॥
साधुची वोळखीं साधु वोळखीला । येर भांबावला माया धरी ॥५०॥
माया धरी प्राणी जवळी चूकलें । नाहीं वोळखीले साधुजन ॥५१॥
साधुजन कोण कसें वोळखण । तेंचि निरूपणा सांगितलें ॥५२॥
सांगितलें आहे मागे थोरथोरीं । तेंचि अवधारी आलीया रे ॥५३॥
आलीया रे साधू जाणावा कवणें । तयाचीं लक्षणें असंख्यात ॥५४॥
असंख्यात परी ओळखीकारणें । साधू पूर्णपणें सारिखाची ॥५५॥
सारिखाची दिसे जनाचीयापरी । परी तो अंतरीं वेगळाची ॥५६॥
वेगळाची ज्ञानें पूर्ण समाधानें । स्वस्वरूपीं मनें वस्ति केली ॥५७॥
वरित केली मनें निर्गुणीं सर्वदा । मीपणें आपदा तया नाहीं ॥५८॥
तया नाहीं काम तया नाहीं क्रोध । तया नाहीं खेद स्वार्थबुद्धि ॥५९॥
बुद्धी निश्चयाची स्वरूपीं तयाची । कल्पना ठाईंची निर्विकल्प ॥६०॥
निर्विकल्प मद मत्सर सारीला । आणि संहारीला लोभ दंभ ॥६१॥
दंभ हा लौकिक विवेकें सांडीला । दुरी वोसंडला अहंकार ॥६२॥
अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता ही दोरी मोकळली ॥६३॥
मोकळली भ्रांति शरीरसंपत्ति । वैभवसंगतीं लोलंगता ॥६४॥
लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनांचीं ॥६५॥
सज्जनलक्षणें सांगेन पुढतीं । आर्त चित्तवृत्ति लांचावली ॥६६॥
लांचावली वृत्ति सज्जन सांगतां । होय सार्थकता जयांचेनी ॥६७॥
जयांचेनी ज्ञानें तरती अज्ञान । साधुसंगतीनें समाधान ॥६८॥
समाधानें शांति क्षमा आणि दया । रंक आणि रम्या सारिखाची ॥६९॥
सारिखाची शोध तेथें नाहीं भेद । सर्वांसी अभेद सर्व काळ ॥७०॥
सर्व काळ गेला श्रवनें मननें । सक्तिया साधनें हरिभक्ति ॥७१॥
हरिभक्ति करी जन तारावया । स्वधर्मा विलया जाऊं नेदी ॥७२॥
जाऊं नेदी भक्ति जाऊं नेदी ज्ञान । अनुतापीं मन निरंतर ॥७३॥
निरंतर भाव सगुणीं भजन । येणें बहुजन उद्धरती ॥७४॥
उद्धरती जन करितां साधन । क्रियेचें बंधन आचरतां ॥७५॥
आचरतां साधुजना होय बोधू । लागतसे वेधू भक्तिभावें ॥६७॥
भक्तिभावें देवप्रतिष्ठा पूजन । कथा निरूपण महोत्सव ॥७७॥
महोत्सव साधुभक्तीचें लक्षण । करी तीर्थाटण आदरेंसी ॥७८॥
आदरेंसी विधी करणें उपाधी । लोकांतें सद्बुद्धि लागावया ॥७९॥
लागावया बुद्धि सत्क्रिया भजन । करितो सज्जन मुक्तिदाता ॥८०॥
मुक्तिदाता साधु तोचि तो जाणावा । जेणें संपादावा लोकाचार ॥८१॥
लोकाचार करी तो जना उद्धरी । ज्ञाता अनाचारी कामा नये ॥८२॥
नये नये निंदूं जनीं जनार्दन । म्हणोनि सज्जन क्रियावंत ॥८३॥
क्रियावंत साधु विरक्त विवेकी । तोचि तो लौकिकीं मान्य आहे ॥८४॥
मान्यता सक्तिया लौकिक सोडिला । तोचि उद्धरिला जनीं नाहीं ॥८५॥
जनीं नाहीं मान्य तो सर्व अमान्य । म्हणोनियां धन्य क्रियावंत ॥८६॥
क्तियावंत तेणें लौकिक सोडावें । आणि वसवावें ब्रह्मारण्य ॥८७॥
ब्रह्मारण्य सेवी साधु तो एकला । जना नाहीं आला उपेगासी ॥८८॥
उपेगासी येणें जना पूर्णपणें । तयाचीं लक्षणें निरूपीलीं ॥८९॥
निरूपीलीं येणें लक्षणें जाणावा । साधू वोळखावा मुमुक्षू नें ॥९०॥
मुमुक्षूनें गुरू क्तियाभ्रष्ट केला । तरी अंतरला दोहीं पक्षी ॥९१॥
दोहीं पक्षीं शुद्ध तया ज्ञानबोध । येर तें अबद्ध अनाचार ॥९२॥
अनाचार करिसा कोण आहे जनीं । परी निरूपणीं बोलिजेतें ॥९३॥
बोलीजे साचार सत्य निरूपणीं । घडे ते करणी सुखें करूं ॥९४॥
करूं नये कदा मिथ्या निरूपण । करितां दूषण लागों पाहे ॥९५॥
पाहें पाहें बापा साधी ते सोधुनी । ठाकेना म्हणोनी निंदूं नको ॥९६॥
निंदूं नको शस्र निंदूं नको वेद । तरीच स्वानंद पावसील ॥९७॥
पावसील राम जीवाचा विश्राम । अहंतेचा श्रम सांडितांचि ॥९८॥
सांडितां विवेक मिथ्या अभिमान । तरी समाधान पावसील ॥९९॥
पावसील गति शुद्ध निरूपणें । रामदास म्हणे क्षमा करी ॥१००॥
स्फुट अभंग – सगुणनिर्गुणसंवादशतक
करीं चाप बाण माहेश्वरीं ठाण । रूप हें सगुण राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप निर्गुण जाणावें । सगुण स्वभावे नाशवंत ॥२॥
नाशवंत देव कदा म्हणों नये । निर्गुणासि काये पहाशील ॥३॥
पाहतां निर्गुण देवासी दुर्लभ । त्याचा होय लाभ पूर्वपुण्यें ॥४॥
पूर्वपुण्यें लाभ ब्रह्मादिकां झाला । कैवारी जोडला रामचंद्र ॥५॥
रामचंद्र नाम रूप हें माईक । बोलिला विवेक वेदशास्त्रीम ॥६॥
वेदशास्रीं भक्ति राघवाची सार । तेणें पैलपार पाविजेतो ॥७॥
पाविजेतो पार आत्मनिवेदनें । भक्तीचीं लक्षणें नवविध ॥८॥
नवविध भक्ति करितां तरले । जीव उद्धरले नेणों किती ॥९॥
नेणोनियां देव माईक भजतां । मुक्ति सायुज्य ता अंतरली ॥१०॥
अंतरली मुक्ति भक्ति मागें धांवे । राघवाचीं नांवें निरंतर ॥११॥
निरंतर देव अंतरों न द्यावा । विवेक पहावा सज्जनाचा ॥१२॥
सज्जनासंगतीं चुके अधोगति । राम सीतापति ज्याचें नाम ॥१३॥
नाम ज्याचें ध्यावें त्यास ओळखावें । देवासी धुंडावें आदरेंसी ॥१४॥
आदरेंसी जपे रामनाम वाणी । स्वयें शूळपाणी महादेव ॥१५॥
महादेवें गुरुगीता निरूपिली । तेथें मन घाली आलीयारे ॥१६॥
आलीया संसारीं रामनाम तरी । दुजें पृथ्वीवरी आढळेना ॥१७॥
आढळेना परी संतसंग धरीं । तेणें तूं अंतरीं निवसील ॥१८॥
निवालें अंतर रामासी भजतां । दुजें कांहीं आतां आवडेना ॥१९॥
आवडेना जया संतांचीं संगति । तया अधोगति गर्भवास ॥२०॥
गर्भवास माझे राम चुकवील । मज सोडवील अनाथासी ॥२१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । तया संतजन दाखविली ॥२२॥
दाखविती संत वाटे निजधामीं । माझें मन रामीं विश्वासलें ॥२३॥
विश्वासलें परी रामासी नेणवे । तो राम जाणवे संतसंगें ॥२४॥
संतसंग करी निसंग होइजे । मग तो जाणिजे राम केवीं ॥२५॥
रामासी मिळतां संतांचे मिळणीं । मग दुजेपणीं उरी नाहीं ॥२६॥
उरी त्या रामाची रान्मोजन्मीं असे । मन हें विश्वासे रामा पायीं ॥२७॥
रामापायीं मन होतसे उन्मन । तेथें भिन्नाभिन्न ऐक्यरूप ॥२८॥
ऐक्यरूप ज्ञान तें मज नावडे । गाईन पवाडे राघवाचे ॥२९॥
राघवासी गुण नाहीं तो निर्गुण । ठाईं पडे खूण संतसंगें ॥३०॥
संतसंगतीचा निर्गुण पवाड । मज वाटे गोड रामकथा ॥३१॥
कथा निरूपण श्रवण मनन । होय समाधान संतसंगें ॥३२॥
संतसंगें बोध होय निर्गुणाचा । मोडे सगुणाचा भक्तिभाव ॥३३॥
भक्तिभाव करीं निर्गुण पावावें । मग काय व्हावें सांग बापा ॥३४॥
बाप माय राम विश्वाचा आधार ॥ भक्ता निरंतर सांभाळी तो ॥३५॥
सांभाळीतो काय प्रारब्धावेगळें । होणार न टळे ब्रह्यादिकां ॥३६॥
ब्रह्मादिकां मान्य तो नव्हे सामान्य । असावें अनन्य सगुणाची ॥३७॥
सगुणासी ठाव उदेना कल्पांतीं । म्हणोनि सांगती संतजन ॥३८॥
संतजन ज्ञानी पूर्ण समाधानी । तेही जपध्यानीं सर्वकाळ ॥३९॥
सर्वकाळ ध्यान करीती सज्जन । परी तें निर्गुण ध्यान त्यांचें ॥४०॥
ध्यानीं आकळेना मनासी कळेना । तयासी कल्पना केवीं धरी ॥४१॥
धरीला विश्वास साधूचे वचनीं । अवस्था जन्मनी तेणें गुणें ॥४२॥
गुणेंचि निर्गुळ कळे सर्व खूण । म्हणोनी सगूण देव धरीं ॥४३॥
धरावा सगुण निर्गुणाकारणें । तयाविण येणें चाड नाहीं ॥४४॥
चाड नाहीं ऐसें कासया म्हणावें । सगुणें पावावें निर्गुणासी ॥४५॥
निर्गुणासी पावे निर्गुणाकरितां । सगुण पाहतां तेथें नाहीं ॥४६॥
नाहीं कां म्हणसी सद्रुरु सगुण । आणि निरूपण बहुविध ॥४७॥
बहुविध रूप नव्हे सद्रुरूचें । निर्गुण बा याचें जाण बाप्पा ॥४८॥
जाण आतां बापा तूं तरी सगुण । झालासी शरण सद्नुरूसी ॥४९॥
सद्नुरूसी गेला जो कोणी शरण । सयासी सगुण कोण म्हणे ॥५०॥
म्हणशील काय सगुणावांचोनी । सर्वही करणी सगुणाची ॥५१॥
सगुणाची नव्हे निर्गुणा़ची सत्ता । निर्गुण करितां सर्व झालें ॥५२॥
सर्व झालें जेव्हाम निर्गुणाकरितां । तेव्हां सगुणता निर्गुणाची ॥५३॥
निर्गुणाची लीला वांझेची कुमारी । बोलतां अंतरीं मानीजेना ॥५४॥
मानीजेना तरी सृष्टीस रचीलें । सर्व कोणें केलें तयावीणें ॥५५॥
तयावीनें दुजें काय सत्य आहे । अनुभवें पाहें आपुलीया ॥५६॥
आपुला विचार निर्गुणीं सर्वदा । निर्गुणासी कदा विसंबेना ॥५७॥
विसंबेना घडे सत्संग नसतां । संग विचारितां सगुण की ॥५८॥
सगुणांचा संग ज्ञानीयासी नाहीं । ज्ञानीया विदेही पुरातन ॥५९॥
पुरातन देही तरीच विदेही । देहावीण नाहीं विदेहता ॥६०॥
विदेहता बोले स्वभावें लागली । निर्गुणाची खोली कोण जाणे ॥६१॥
जाणे सुख दु:ख जाणे गुणागुण । तयासी निर्गुण बोलवेना ॥६२॥
बोलवेना परी निर्गुण कळावें । विवेकें मिळावें निर्गुणासी ॥६३॥
निर्गुणी सगुणीं मिळतां संकट । व्यर्थ खटपट कां करिसी ॥६४॥
कां करिसी भक्ति सगुणदेवाची । तुज निर्गुणाची शुद्धि नाहीं ॥६५॥
शुद्धि नाहीं झाली जया आनंदाची । तयां विवादाची उरी नाहीं ॥६६॥
उरी नाहीं कदा निर्गुणीं भजतां । निर्गुण तत्त्वतां सार आहे ॥६७॥
सार तें साकार भक्तीचा निर्धार । भक्ति पूर्वापार सगुणाची ॥६८॥
सगुणाची भक्ति धरावी । सज्ञानें करावी निर्गुणाची ॥६९॥
निर्गुणाची भक्ति या नांव अभक्ति । अव्यक्तासी व्यक्ति लावूं नये ॥७०॥
लावूं नये भाव सगुण देवासी । व्यर्थ पाषा-णासी काय काज ॥७१॥
काय कारण हा विवेकें पाहिजे । भावार्थे लाहीजे सर्व कांहीं ॥७२॥
सर्व कांहीं नाहीं जैसें मृगजळ । वायां खळबळ कां करिसी ॥७३॥
कां करिसी सर्व देहाचा संबंध । जरी झाला बोध निर्गुणाचा ॥७४॥
निर्गुणाचा बोध संसार निरसी । तेथें अज्ञा-नासी रीघ नाहीं ॥७५॥
रीघ नाहीं जया भावार्थ भजनीं । तया हदयधूनीं शून्याकार ॥७६॥
शून्याकार होय विवेकवासना । मग समाधाना काय उणें ॥७७॥
उणें झालें दुणें निर्गुणाच्या गुणें । अभाविकां कोणें उद्धरावें ॥७८॥
उद्धरावें एका सज्जनसंगतीं । ऐसें वेदश्रति बोल-ताती ॥७९॥
बोलताती परी नाहीं आठवण । म्हणोन सगुण आवडेना ॥८०॥
आवडेना मिथ्या मायिक भजन । असत्यासी मन विश्वासेना ॥८१॥
विश्वासेना मन सगुणासी जरी । तयासी कैवारी देव कैंचा ॥८२॥
कैंचा देवभक्त कल्पना आपुली । ते सर्व नाथिली ज्ञानी-यांसी ॥८३॥
ज्ञानीयांसी देव दुरी अंतरला । संदेहीं पडला अंतकाळीं ॥८४॥
अंतकाळ कैंचा अनंत ठाईंचा । संदेह देहाचा मिथ्याभूत ॥८५॥
मिथ्याभूत शब्दज्ञानें माया जाणा । अभक्त तरेना मायापूरीं ॥८६॥
मायामोहपूर दुस्तर संसार । अद्वैत विचार जंव नाहीं ॥८७॥
जंव नाहीं भावें श्रीहरी अर्चिला । तंव नव्हे भला ज्ञानगर्वीं ॥८८॥
ज्ञानगर्वी नव्हे ज्ञान त्या दुर्लभ । जयाचेनी लाभ स्वरूपाचा ॥८९॥
स्वरूप रामाचें मनीं आठवावें । नाम उच्चारावें रात्रंदिवस ॥९०॥
दिवस ना रजनी मनीं ना जन्मनीं । ज्ञाता जनीं वनीं सारि-खाचि ॥९१॥
सारिखाचि भाव तया भेटे देव । येर सर्व वाव शब्दज्ञान ॥९२॥
ज्ञाना-वीण सर्व व्यर्थचि जाणावें । जंव नाही ठावें आत्मज्ञान ॥९३॥
ज्ञाता दाता हरी मनीं दृढ धरी ॥ तोचि यमपुरी चुकवील ॥९४॥
चुकवील ज्ञान सर्वही अज्ञान । पाविजे विज्ञान संतसंगें ॥९५॥
संतसंगें जरी सगुणीं भजन । स्वधर्मसाधन क्रिया कर्म ॥९६॥
क्तिया कर्म कैंचें ज्ञानियाचे अंगीं । मुक्त ज्ञानी जनीं विचरती ॥९७॥
विचरी जे देही तो कीजे सर्वही । क्रिया कर्म कांहीं सोडूं नये ॥९८॥
सोडूं नये भक्ति स्वधर्मविरक्ति । ब्रह्मज्ञानप्राप्ति रामदासीं ॥९९॥
रामदास म्हणे रामउपासकां । भक्ति सोडूं नका राघवाची ॥१००॥
स्फुट अभंग – १
त्याचे पाय हो नमावे । त्याचें कीर्तन हो ऐकवें ॥१॥
दुजियासी सांगे कथा । आपण वर्ते त्याचि पथा ॥२॥
कीर्तनाचें न करी मोल । जैसे अमृताचे बोल ॥३॥
सन्मानितां नाहीं सुख । अपमानितां नाहीं दुःख ॥४॥
किंचित दिलें दातयानें । तेंहि घेत आनंदानें ॥५॥
ऐसा आहे हरिदास । लटकें न वदे रामदास ॥६॥
स्फुट अभंग – २
वाणी शुद्ध करीं नामीं । चित्त शुद्ध होय प्रेमीं ॥१॥
नित्य शुद्ध होय नामीं । वसतांहि कामींधामीं ॥२॥
कर्ण शुद्ध करी कीर्तनीं । प्राण शुद्ध करी सुमनीं ॥३॥
त्वचा शुद्ध करी रज । मस्तक नमितां पदांबुज ॥४॥
करशुद्धी राम पूजितां । पादशुद्धी देउळीं जातां ॥५॥
नेमें लिंग करी शुद्ध । अंतर निर्मळ करी गुद ॥६॥
रामपायी राहतां बुद्धी । रामदासा सकळ शुद्धी ॥७॥
स्फुट अभंग – ३
माझें सर्व जावें देवानें राहावें । देवासी पाहावें भक्तपणें ॥१॥
भक्तपनें मज देवचि जोडला । अभ्यास मोडला सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांहीं जावो एक देव राहो । माझा आर्तभावो ऐसा आहे ॥३॥
जो हेत अंतरीं देव तैसा झाला । हा दिन पाहिला कोणी एक ॥४॥
कोणी एक पुण्य जें होतें संचलें । दास म्हणे झालें समाधान ॥५॥
स्फुट अभंग – ४
दीनाचा दयाळु कीर्ति ऐकियेली । म्हणूनि पाहिली वाट तुझी ॥१॥
अनाथाचा नाथ होशील कैवारी । म्हणोनियां हरी बोभाईलें ॥२॥
तुजविण कोण जाणे हें अंतर । कोणासी जोजार घालूं माजा ॥३॥
दास म्हने आम्ही दीनाहुनी दीन । करावें पालन दुर्बळाचें ॥४॥
स्फुट अभंग – ५
आम्हां पतितांची सांड की जरी । आमुचा कैवारी कोण आहे ॥१॥
आम्ही भरवंसा कोणाचा धरावा । सांगावें केशवा दयानिधे ॥२॥
तुजविण आम्हीं नाहीं त्रिभुवनीं । धांवें चक्रपाणी दीनबंधो ॥३॥
पतितपावन ब्रीद हें बांधिलें । तारावें वहिलें दासालागीं ॥४॥
स्फुट अभंग – ६
पळशी तूं तरी नाम कोठें नेशी । आम्हीं अहर्निशीं नाम घोकूं ॥१॥
आम्हांपासोनियां जातां न ये तुज । तें हें वर्म बीज नाम जपूं ॥२॥
देवा आम्हां तुझें नाम हो पाहिजे । मग भेटी सहजें देणें लागे ॥३॥
भोळे भक्त आम्ही चुकलोंचि कर्म । सांपडलें वर्म रामदासा ॥४॥
स्फुट अभंग – ७
गजेंद्र सावज पडला पानवडी । रामें तेथें उडी टाकियेली ॥१॥
प्रल्हाद गांजितां कोण सहाकारी । स्वयेंचि मुरारी प्रकटला ॥२॥
क्षत्रियें ब्राह्मणें गांजिलीं बापुडीं । रामें तेथें उडी घातियेली ॥३॥
तेहतीस कोटि देव पडिले बांदोडीं । रामें तेथें उडी टाकियेली ॥४॥
दासापायीं पडली देहबुद्धीबेडी । रामें तेथें उडी टाकियेली ॥५॥
रामदास म्हणे नका करूं शीण । रामें भक्त कोण उपेक्षिले ॥६॥
स्फुट अभंग – ८
तुजविण देव मज कोणी नाहीं । मझी चिंता कांहीं असों द्यावी ॥१॥
वैराग्यें कनिष्ठ अभावें वरिष्ठ माझे मनीं नष्ट संदेहता ॥२॥
विवेकें सांडिलें ज्ञानें वोसंडिलें । चित्त हें लागलें तुझे पायीं ॥३॥
तुझे नाम वाचे उच्चारीत असें । अंतरीं विश्वास धरियेला ॥४॥
रामदास म्हणे मी तुझें अज्ञान । माझें समाधान करीं देवा ॥५॥
स्फुट अभंग – ९
श्वानचिया पुत्रें कल्होळ मांडिला । कलहो लागला एकसरा ॥१॥
भुंकिता गुरगरी वासितोचि तोंड । वरती थोबाड करूनियां ॥२॥
एक ते भुंकती एक ते रडती । दास म्हणे गती निंदकांची ॥३॥
स्फुट अभंग – १०
मेरूचिया माथां ठेवुनीयां पाव । जात असे राव कैलासींचा ॥१॥
कैलासींचा राव एक देव क्षोभला । देशधडी केला लंकानाथ ॥२॥
लंकेच्या चोहटीं मांडियेला खेळ । अग्नीचा कल्होळ घरोघरीं ॥३॥
जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या ॥४॥
जानकीचा शोक दुरी दुरविला । यशवंत झाला रामदास ॥५॥
स्फुट अभंग – ११
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर राम नाम ॥१॥
सगुणीं सद्भाव नाहीं ज्ञानगर्व । तयालागीं सर्व सारखेचि ॥२॥
निंदकांवंदकां सगट सांभाळीं । मन सर्वकाळीं पालटेना ॥३॥
पालटेना मन परस्त्रीकांचनीं । निववी वचनीं पुढिल्यांसी ॥४॥
पुढिल्यांसि तोचि सुख देत आहे । उपकारीं देव लावीतसे ॥५॥
लावीतसे देह राजभजनास । रामीरामदास हरिभक्त ॥६॥
स्फुट अभंग -१२
भक्तपनें रामानाचा अव्हेर । करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥१॥
मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणी । रामनाम वाणी उच्चारितो ॥२॥
राम म्हणे शिव तेथें किती देव । बापुडें मानव देहधारी ॥३॥
नर देहधारी धन्य ते संसारीं । वाचे निरंतरीं रामनाम ॥४॥
रामनाम वाचे स्वरूप अभ्यंतरीं । धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥
स्फुट अभंग – १३
मी खरा पतित तूं खरा पावन । आतां अनमान करूं नको ॥१॥
आतां कांहीं मज चिंता तीहि नसे । तुझें नाक कैसें वाचे येई ॥२॥
समर्थें घेतला नामासाठीं भार । मज उपकार कासयाचा ॥३॥
रामदास म्हणे तुझें तुज उणें । सोयरीं पिशुनें हांसतील ॥४॥
स्फुट अभंग – १४
पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥१॥
मिथ्या शब्दज्ञानें तुज अंतरलों । संदेहीं पडलों मीपणाच्या ॥२॥
सदा खळबळ निर्गुणाची घडे । सगुण नातुडे ज्ञानगवें ॥३॥
रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणे अनंत आतुडेना ॥४॥
स्फुट अभंग – १५
टाळ धरूं कथा करूं । रामालागीं हाका मारूं ॥१॥
ये रे रामा ये रे रामा । तुझी आवडी लागो आम्हां ॥२॥
तुजविण गाईल कोण । ऊठ सांडिलें मीतूंपण ॥३॥
रामदास पाहे वास । भेटी द्यावी सावकाश ॥४॥
स्फुट अभंग – १६
रामभक्तीविण आन नाहीं सार । साराचें हें सार राम एक ॥१॥
कल्पनाविस्तारू होतसे सत्वरू । आम्हां कल्पतरू चाड नाहीं ॥२॥
कामनेलागोन विटलेंसे मन । तेथें चाड कोण कामधेनू ॥३॥
चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं । तेथें चिंतामणी कोण पुसे ॥४॥
कदा नाहीं नाश स्वरूप सुंदर । तेथें आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तीविने । जाणावें तें उणें सर्व कांहीं ॥६॥
स्फुट अभंग – १७
सीतापति राम पतितपावन । गाती भक्तजन आवडीनें ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासींचा राणा लांचावला ॥२॥
देवाचें मंडण भक्तांचें भूषण । धर्मसंरक्षण राम एक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्याचें जिणें । कथानिरूपणें जन्म गेला ॥४॥
स्फुट अभंग – १८
आम्हीं देखिला विठोबा । आनंदें विटेवरी उभा ॥१॥
तेथें दृश्याची जे दाटी । तेचि रूक्मिणी गोमटी ॥२॥
रामीरामदास म्हणे । जो ओळखे तोचि धन्य ॥३॥
स्फुट अभंग – १९
लांचावोनी भक्तिलोभा । असे वाळवंटी उभा ॥१॥
पदकीं इंद्रनीलशोभा । प्रभे उजळती शोभा ॥२॥
भक्त पुंडलिकें गोंविला । जाऊं नेदी भांबाविला ॥३॥
भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें ॥४॥
कीजें तारूं भवसागरीं । विनटलें भीमातीरीं ॥५॥
पुंडलिकें करूनी जोडी । आम्हां दिधली कल्पकोडी ॥६॥
तुटली संसारसांकडीं । रामदास म्हणतसे ॥७॥
स्फुट अभंग – २०
जीवन्मुक्त प्राणी होउनीयां गेले । तेणें पतें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्णसमाधानी । निःसंदे मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्यादेहभान प्रारब्धाआधीन । राखे समाधान पूर्णपणें ॥३॥
आवडीनें करी कर्म उपासना । सर्वकाळ ध्यानारूढ मन ॥४॥
पदार्थाची हाणीं हाता न ये कोणी । जयाची करणी बोला ऐसी ॥५॥
धन्य धन्य ते पैंदास संसारीं उदास । तयां रामदास नमस्कारी ॥६॥
स्फुट अभंग – २१
संसार देखिला तरी पाहे सार । वाया येरझार पाडूं नको ॥१॥
पाडूं नको दुःखसागरीं आपणा । म्हणे नारायणा वोळखावें ॥२॥
वोळखावें वेगीं आपआपणासी । संसारीं सुटसी दास म्हणे ॥३॥
स्फुट अभंग – २२
विचारें संसार होतो देशधडी । सोनियची धडी जात आहे ॥१॥
डावा तास गेला मोक्षपंथा जातां । विवेक तत्वता याचि नांव ॥२॥
सदा श्रीरामाचे भजन करितां । दास म्हणे चिंता दूर होय ॥३॥
स्फुट अभंग – २३
राम माझा स्वामी राव अयोध्येचा । त्रिदश देवांचा कैवारी ॥१॥
कैवारी थोर सामर्थें आगळा । तारिलें चांडाळ वाल्मीकासी ॥२॥
वाल्मीकासी फळ जाहालें नामाचें । चरित्र रामाचें शतकोटी ॥३॥
शतकोटी रामचरित्र बोलिला । अवतार जाला नाहीं तोंचि ॥४॥
नाहीं तोंचि रामचरित्र बोलिला । श्रावण वधिला दशरथें ॥५॥
दशरथ राजा तया पुत्र नाहीं । पुत्रशोक पाहीं शाप त्यासी ॥६॥
श्रापाचा आनंद थोर तया जाला । तेणें पोटा आला रामचंद्र ॥७॥
रामचंद्रें वनीं ताटीका वधीली । सर्व सुखी केलीं ऋषिकुळें ॥८॥
ऋषी संतोषले कर्य सिद्धी जालें । तंव पत्र आलें जनकाचें ॥९॥
जनकाचे घरीं मांडलें सैंवर । तेथें ऋषीश्वर पाचारिले ॥१०॥
पाचारिले तेथें मार्गीं अवलीळा । रामें चंडशीळा उद्धरीली ॥११॥
उद्धरीली रामें गौतमाची वधू । पुढे कृपासिंधु स्वयेंवर ॥१२॥
स्वयंवर पण त्र्यबक कठक्षर । राम सुलक्षण सकुमार ॥१३॥
सकुमार बाळा जनकनंदिनी । राम चिंतीं मनीं अहर्निशी ॥१४॥
अहर्निशी पाहेराम जगजेठी । राजे लक्ष कोटी सांडूनीयां ॥१५॥
सांडूनी विक्रम सर्वहि निवांत । धनुष्य अद्भुत देखीयेलें ॥१६॥
देखीयेलें कोण्ही कोण्हासी न बोले । तंव राव बोले धिक्कारूनी ॥१७॥
धिक्कारूनी बोले जनक सर्वांसी । म्हणे ‘ पृथ्वीयेसी वीर नाहीं ’ ॥१८॥
वीर नाही ऐसें विदेही बोलीला । ऐकोनी उठिला लक्षुमण ॥१९॥
लक्षुमण उभा सर्वांगे वीरश्री । तंव ऋषेश्वरीं वारीयेलें ॥२०॥
वारीयेलें मग दैत्य क्रूरबुद्धी । क्रोधें गर्वनिधी उकावला ॥२१॥
उकावला थोर गर्वें लंकापती । भ्रष्टला हांसती सर्व राजे ॥२२॥
राजे राजेश्वर पाहाती समस्त । रावणा देहांत काळ आला ॥२३॥
काळ आला थोर धनुष्य वाहातां । मग कृपावंता उठविलें ॥२४॥
उठविती ऋषी ते काळीं रामासी । देईं रावणासी जीवदान ॥२५॥
दान देईं ऐसे ऋषी बोलीयेलें । मग उचलीलें वामांगुष्ठीं ॥२६॥
वासांगुष्ठें धनुष्य काढुनी टाकीलें । मग चढउनी वाईयेले ॥२७॥
वाईयेलें बळें वोढितां कडाडी । पर्वत घडाडी मेरूशृंग ॥२८॥
मेरूशृंगीं थोर कडक विझाला । सैंवरीं जिंकीला पण रामें ॥२९॥
रामें भग्न केलें धनुष्य कठोर । सर्व ऋषीश्वर संतोषले ॥३०॥
संतोषला राव मांडिला उत्साव । सर्व समुदाय आनंदला ॥३१॥
आनंदले सर्व वाद्य येकवेळां । माळ घाली बाळा जनकाची ॥३२॥
जनकाची बाळा सैंवर सोहळा । शीघ्र रघुकुळा मूळ गेलें ॥३३॥
मूळ गेलें शीघ्र पाचारूं विवाहा । लगबग राया जनकासी ॥३४॥
जनकासी थोर आनंद जाहाला । जावई जोडला रामराणा ॥३५॥
रामराणा शोभे सर्वांगें सुंदर । वामे सकुमार भूमीबाळा ॥३६॥
भूमीबाळा राम शोभे सिंहासनीं । विप्र वेदध्वनी गर्जताती ॥३७॥
गर्जताती भाट ब्रीदें वाखणीती । बासींगी फांकतीं रत्नकीळा ॥३८॥
रत्नकीळा बहू भूषणें सुंदरें । दिव्य मकराकारें तळपताती ॥३९॥
तळपताती माळा पदकीं रत्नकीळा । कासे सोनेसळा कासीयेला ॥४०॥
कासीयेली कोस कींकीणी वाजटा । वरी क्षुद्र घटा झणत्कार ॥४१॥
झणत्कार वांकी मुर्डीव नेंपुरें । गर्जती गजरें आंदु पाई ॥४२॥
पांई चंडशीळा जाली दिव्य नारी । जानकी न करी दंडवत ॥४३॥
दंडवंती होती बहुसाल बाळा । म्हणोनी भांगटीळा काढीयेला ॥४४॥
काढीयेला मग केला नमस्कार । लावण्य वोहर रम्य शोभा ॥४५॥
रम्य शोभा आली मंडपीं वोहरें । चारी मनाहरें शोभताती ॥४६॥
शोभती मंडपीं मुक्ताफळ घोष । माळा बहुवस कुसुमाच्या ॥४७॥
कुसुमाचो हार शोभती अपार । परिमळ धुसर पुष्ययाती ॥४८॥
पुष्पयाती दिव्य पंचक मालती । जाई जुई सेवंती पारीजात ॥४९॥
पारिजात गभ केतकी कोंवळें । मोगरे नव्हाळे बकुळ पुष्पें ॥५०॥
पुष्पें सुवर्णाचीं करवीर कमळांची । परिमळ द्रव्यांची दिव्य गंधें ॥५१॥
दिव्य गंधें माळा सर्वांस सोहळा । सुरंग आगळा तुषाराचा ॥५२॥
दिव्यानें भोजनें तृप्त सर्वां जना । सर्वांसी पूजन उपचार ॥५३॥
उपचार जाले अंबरीं पूजीले । रायें नीरवीले दुहितेसी ॥५४॥
सर्व एकसरें निघाले गजरें । अंबरें धूसरें पूर्ण झाले ॥५५॥
पूर्ण चंद्राकारें त्राहाटीलीं छत्रें । थरकती अपारें मेघड्म्ब्रें ॥५६॥
मेघडंब्रें माही निशाणें थरकती । रोमांच फरकती देखतांची ॥५७॥
देखतांची मार्गें जातां गजभार । निशाणीं अंबर आछ्यादीलें ॥५८॥
आछ्यादिलें मार्गें जातां भूमंडळ । रथवरूदळभार चाले ॥५९॥
भार चाले पुढें दिव्य सुखासनें । शिबिका आंदणें चौर डोल ॥६०॥
चौर डाल जाती मालती कुंजरें । हिंसती गजरें तुरंगम ॥६१॥
तुरंग उसाळें जाती अंतराळें । उफाळती बळे दोंचि पांई ॥६२॥
दोनी दळें मार्गें जातांई थोकलीं । तेथें आज्ञा जाली विदेहासी ॥६३॥
रायें लोटांगण घालुनी समस्तां । म्हणे माझी सीता तुम्हापासीं ॥६४॥
ऐसें बोलोनीयां उद्वेगला चित्तीं । वियोगें गळती अश्रुपात ॥६५॥
स्फुट अभंग – २४
काया माया छ्याया हे कांहिं तगेना । वैभव जगेना जन्मवरी ॥१॥
जन्मवरी लोक देखत आहेती । किती येक जाती सांडुनीयां ॥२॥
सांडुनीयां जाती कन्या पुत्र धन । सर्व साभिमान लोकिकांचा ॥३॥
लोकिकांचा भाव लोकिकीं राहिला । प्राणीमात्र गेला येकलाची ॥४॥
येकलाची येता येकलाची जातो । मध्येंची भुलतो मायाजाळें ॥५॥
मायजाळ माया हें कांहीं सुटेना । नाचतीं वासना अनावर ॥६॥
अनावर मन कदा आवरेना । धरितां धरेना अनुमानें ॥७॥
अनुमानें कांहिं नव्हे समाधान । जंव आत्मज्ञान पाविजेना ॥८॥
पाविजेना मोक्षा तुटेना बंधन । श्रवण मनन जेथें नाहिं ॥९॥
जेथें नाहिं सारासार विचारणा । या जन्म मरणा ठाव तेथें ॥१०॥
तेथें ठाव जाला देहे संदेहासी । होती पापराशी अनुमानें ॥११॥
अनुमानें पाप अनुमानें पुण्य । अनुमाने धन्य होईजेना ॥१२॥
होईजेना धन्य विचारणेवीण । लोकिकाचा शीण वेर्थ जातो ॥१३॥
वेर्थ जातो शीण देखता देखतां । लोकिक तत्त्वता राखवेना ॥१४॥
राखवेना परी राखीला पाहिजे । मनामधें कीजे विचारणा ॥१५॥
वीचारणा कीजे या देवांभक्तांची । कर्ता कोण तोची वोळखावा ॥१६॥
वोळखावा कर्ता सर्वत्र सृष्टीचा । मी तो कोण कैचा धुंडाळावें ॥१७॥
धुंडाळावें महावाक्यपंचीकरण । तत्वांचें विवरण यथासांग ॥१८॥
यथासांग व्यंग पडोंची नेंदावें । अत्यंतची व्हावें सावधान ॥१९॥
सावधानपणें देवासी पाहाणें । नासीवंत जाणें सांडूनीयां ॥२०॥
सांडुनीया सव अष्टधा प्रकृती । विवेकाची गती वोळखावी ॥२१॥
वोळखावी मुख्य सज्जनाची कृपा । तेणें पुण्यपापा नातळावें ॥२२॥
नातळावें कदा दृश्य पदार्थासी । असोनी देहासी लिंपों नये ॥२३॥
लिंपों नये जैसें पद्मिणीचें पत्र । देहे डिंबमात्र चालतसे ॥२४॥
चालतसे सर्व तत्वांचें गांठोडें । तेतें काय वेडें गुंडाळतें ॥२५॥
गुंडाळतें वेडे देहसंबंधासी । भ्रमें विवेकासी सांडुनीयां ॥२६॥
सांडुनीयां सार घेईल असार । ऐसा अनावर भ्रम आहे ॥२७॥
भ्रम आहे जय अंतरीं माजला । तोचि तो गांजला संवसारीं ॥२८॥
संवसारी येक सुटोनीयां गेले । येक ते बांधलें संकल्पानें ॥२९॥
संकल्पानें सुटे ऐसा कोण आहे । ईश्वरासी पाहे शोधुनीया ॥३०॥
शोधुनीयां पाहे तोची देव लाहे । येर तो न राहे देवापासीं ॥३१॥
देवापासीं राहे बहुतां सुकृतें । लोकिकांसेसे भूतें झडपीती ॥३२॥
झडपीती भूतें सत्यची मानीतां । देव पाहों जातां भूतें मिथ्या ॥३३॥
भूतें मिथ्या ऐसें हृदई बिंबलें । तेव्हांची जाहलें समाधान ॥३४॥
समाधान आहे मायातीत होतां । नाथिली अहंता घेऊं नये ॥३५॥
घेऊं नये पक्ष कदा असत्याचा । वेगीं या सत्याचा पंथ धरा ॥३६॥
पंथ धरा जेणें परत्र पाविजें । देवासीं लाविजे संनिधान ॥३७॥
संनिधानेमात्रें तरे बहुजन । पावनें पावन होईजेतें ॥३८॥
होईजे पावन तेंची तें स्वहीत । सोडीतां पतीत होईजेतें ॥३९॥
होईजेतें कष्टी तेंचि कां धरावें । वेगीं उद्धारावें आपणासी ॥४०॥
आपणासीं वैर कदा धरूं नये । अंतीं सर्व जाये निघोनीयां ॥४१॥
निघोनियां जाये त्याचें घेसी काये । वेगीं धरीं सोये शाश्वताची ॥४२॥
शाश्वताची सोये सांडुनी करंटा । वेर्थ बारा वाटा धांवतसे ॥४३॥
धांवतसे चहूंकडे अनुमानें । तया समाधानें मोकलीलें ॥४४॥
मोकलीलें मन ऐसें हीं कळेना । मातला वळेना मनासंगें ॥४५॥
मनासंगें कदा निःसंगता नये । अपाये उपाये मानीतसे ॥४६॥
मानीतसे मनें जें जें वोळखीलें । स्वरूप राहिलें मनातीत ॥४७॥
मनातीत होतां होये सार्थकता । मनासवें जातां अधोगती ॥४८॥
अधोगती चुके तें कांहि करावें । मनासवें व्हावें कासावीस ॥४९॥
कासावीस पंचभौतिकीं राहातां । भूतांसी पाहतां भूतलोक ॥५०॥
भूतलोक वेगीं सांडुनीयां जावें । विचारें पाहावें परब्रह्म ॥५१॥
परब्रह्म तेंचि आपणची आहे । दास म्हणे पाहें अनुभवें ॥५२॥
स्फुट अभंग – २५
अज्ञानजनांचे देव नानापरी । त्यांची संख्या करी कोण आतां ॥१॥
कोण आतां देव पावेल तयासी । जन्ममरणासी चुकवीता ॥२॥
चुकविला देव पाहतां दिसेना । निश्चयो असेना येके ठाई ॥३॥
येके ठाईं भाव येके ठांई देव । चुकला उपाव सार्थकाचा ॥४॥
सार्थकाचा देव तरीच सांपडे । जरी कांहिं घडे संतसेवा ॥५॥
संतसेवा भाव करितां तरले । जन उद्धरलें नेणों किती ॥६॥
जन साधूचे संगती । आपुले प्रचीती मुक्त जाले ॥७॥
मुक्त जालें ज्ञानें विचारें पाहाता । स्वरूपीं राहतां निरंतर ॥८॥
निरंतर देव फुटेना तुटेना । चळेना ढळेना कदा काळीं ॥९॥
कदा काळीं देव रचेना खचेना । येईना जाईना निरंजन ॥१०॥
निरंजन देव पाहातां दिसेना । परी तो नासेना कल्पकोटी ॥११॥
कल्पकोडी गेले देवासी नेणतां । यातना भोगितां जन्मोजन्मीं ॥१२॥
जन्मोंजन्मीं देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळीं ॥१३॥
मायाजाळें कांहिं उमजत नाहीं । देव ठांई कल्पनेचे ॥१४॥
कल्पनचे देव कल्पांतीं नासती । ऐसें वेदश्रुती बोलतसे ॥१५॥
बोलतसे श्रुती दृश्य नासिवंत । जाणिजे शाश्वत परब्रह्म ॥१६॥
परब्रह्म आहे सर्वत्र व्यापक । तेंचि पाहें येक गुरूमुखें ॥१७॥
गुरूमुखें ब्रह्मविचार पाहावा । निश्चयो राहावा निर्गुणाचा ॥१८॥
निर्गुणाचा ध्यास निर्गुण करील । मग उद्धरील आपणासी ॥१९॥
आपणासी पाहे जो कोण्ही शोधूनी । तो जन्मापासुनी मुक्त जाला ॥२०॥
मुक्त जाला देहेसमंध सोडीतां । निर्गुण धुंडीतां निर्गुणची ॥२१॥
निर्गुणची स्वयें जो कोण्ही जाहला । तोचि येक भला समाधानी ॥२२॥
समाधनी साधु जोडतां संकट । मिथ्या खटपट जेथें तेथें ॥२३॥
जेथें नाहिं माया जो मायेवेगळा । ऐसा तो विरळा संतजन ॥२४॥
संतजन तोचि जो स्वयें देवची । तेथें ये मायेची वार्ता नाहीं ॥२५॥
वार्ता नाहिं ऐसें सज्ञान जाणती । अज्ञान नेणती कांहिं केल्यां ॥२६॥
कांहिं केल्यां पापरी पुण्य आचरेना । संसार सरेना दुःखमूळ ॥२७॥
दुःखमूळ जन्म ज्ञानें निरसावा । विवेकें पाहावा सारासार ॥२८॥
सार निराकार असार आकार । निकारें पार पाविजेतो ॥२९॥
पाविजेतो परी अर्थीं विवरावें । विवेकें विरावें स्वस्वरूपीं ॥३०॥
स्वस्वरूपीं ज्ञाते जे कोण्ही विरले । स्वरूपची जाले आत्मबोधें ॥३१॥
आत्मबोधस्थिति बाणलीसे जया । मज तया माया आतळेना ॥३२॥
आतळेना मायाममता अंतरीं । नित्य निरंतरीं निरंतर ॥३३॥
निरंतर असे परी तो न दिसे । गुप्त जाला भासे भासमात्र ॥३४॥
भासमात्र देहे तया ज्ञानियांचा । अंतरीं सुखाचा सुखमूर्ती ॥३५॥
सुखमूर्ती सुखदुःखाविरहित । बोलियेलों हेत कळावया ॥३६॥
कळावया हेतु शब्द निःशब्दाची । लक्षें अलक्षाची सोय लाये ॥३७॥
सोय लागे तेथें लक्ष ना अलक्ष । देहें पूर्वपक्ष बोलियेला ॥३८॥
बोलियेलों शब्द अनिर्वाच्या वाचे । जाणती मुक्तीचे वांटेकरी ॥३९॥
वांटेकरी जाले अवस्थेवेगळे । श्रुतीसी ना कळे पार ज्यांचा ॥४०॥
पार ज्याचा नाहीं अपार विदेही । देहातीत पाहीं समाधान ॥४१॥
समाधान राहे निःसंग राहतां । संग पाहों जातां कासावीस ॥४२॥
कासावीस जाले संगाचेनी गुणे । निःसंगची होणें सर्वकाळ ॥४३॥
सर्वकाळ संग सोडावा आपुला । मीपणाच्या बोला लागों नये ॥४४॥
लागों नये कदा मनामागेंमागें । कल्पनेंच्या त्यागें समाधान ॥४५॥
समाधान राहे संतांचे संगती । वस्तुची प्रचीती वस्तुरूप ॥४६॥
वस्तुरूप जाला जो कोण्ही साधक । धन्य तोचि येक लोकांमध्यें ॥४७॥
लोकांमधें परलोकचि साधावा । भगवंत शोधावा नानापरी ॥४८॥
नानापरी सांगें रामीरामदास । भाविकें विश्वास सोडूं नये ॥४९॥
स्फुट अभंग – २६
संसार करितां होय सायुज्यता । ऐसें कांहीं आतां सांगा स्वामी ॥१॥
सांगा स्वामी कोण स्थिती जनकाची । राज्य करितांची मुक्त कैसा ॥२॥
मुक्त कैसा होता देहींच विदेही । कैसा लिप्त नाहीं करूनीयां ॥३॥
करूनीयां सर्व आपण वेगळा । सांगा तेचि कळा आम्हांलागी ॥४॥
आम्हांलागी सांगा त्याचें समाधान । रामदास खूण पुसतसे ॥५॥
पुसतसे आतां पाहिजे बोलिलें । कैसें राज्य केलें विदेहानें ॥६॥
विदेहानें सत्य स्वामीचें वचन । थेथें विश्वासोन वर्ततसे ॥७॥
वर्ततसे जनीं अहंता सांडुनी । आदीकारणी प्रकृती हें ॥८॥
प्रकृतीचा प्रांत आद्य मद्य अंत । तेंचि तें निवांत रूप तुझें ॥९॥
रूप तुझे सदा सर्वदा संचले । वेदाचेनि बोलें महावाक्य ॥१०॥
महावाक्य तें तू स्वरूप आहेसी । जाण निश्चयेंसीं आपणासे ॥११॥
आपणा पाहातां जाली तन्मयता । सोहं हें तत्वता मनीं धरीं ॥१२॥
मनीं धरीं साहं आत्मा हें वचन । तेणें समाधान पावसील ॥१३॥
पावसील निज स्वरूप आपुलें । जरी विश्वासलें मन तेथें ॥१४॥
मन तेथें जाये वचनासरिसें । तवं मनीं नसे मनपण ॥१५॥
मनपण गेलें स्वरूप पाहातां । तैसेंची राहातां समाधान ॥१६॥
समाधान बाणे त्यगितां संगासी । जनकें शुकासी सांगितलें ॥१७॥
सांगितलें ‘ संगंत्यक्त्वा सुखी भव ’ । मग अनुभव शुक पाहे ॥१८॥
शुक पाहे संग काय म्यां धरीला । विवरों लागला स्वस्वरूपीं ॥१९॥
स्वस्वरूपीं शुक नामरूप नाहीं । जनक विदेही आडळेना ॥२०॥
आडळेना तुटी तेथें कैची भेटी । आठवण पोटीं स्वरूपाची ॥२१॥
स्वरूपीं आठविं आपुला विसरू । शुग योगेश्वरू संगातीत ॥२२॥
संगातीत जाला निःसंगा पाहतां । येणें रीती आतां समाधान ॥२३॥
समाधान बाणे सज्जनसंगती । तिन्हीहि प्रचीती ऐक्यरूप ॥२४॥
ऐक्यरूप वेद स्वामीचें वचन । आपुलेंहि मन सत्य मानी ॥२५॥
सत्य मानी ब्रह्म येर सर्व भ्रम । अहंतेची सीम वोलाडिली ॥२६॥
वोलांडिली सीमा देहेसमंधाची । जालें असतांचि स्वप्न जैसें ॥२७॥
स्वप्न जैसें मनीं जागृती आत्ते । परी ते जाणावें मिथ्याभूत ॥२८॥
मिथ्याभूत माया सद्गुरूवचनें । देह प्रारब्धानें वर्ततसे ॥२९॥
वर्ततसे परी देह तूं नव्हेसी । विश्वास मानसीं दृढ धरीं ॥३०॥
दृढ धरीं अहं ब्रह्म ऐसी खुण । देहाचें करण प्रकृतीचें ॥३१॥
प्रकृतीचें रूप नव्हे तूं स्वरूप । पुण्य आणि पाप देहसंगें ॥३२॥
देहसंग बापा निःसंगासी कैचा । वृतीनिवृत्तीचा शून्याकार ॥३३॥
शून्याकार देहो काईसा संदेहो । वृतीशून्य पाहो संतजन ॥३४॥
संतजन तेणें सुखें सुखावले । तेंचि हें बोलीलें वोवीमीसें ॥३५॥
वोवीमीसें गुप्त पंथ हा सांपडे । गुज ठाईं पडे योगियांचें ॥३६॥
योगियांचें गुज योगीच जाणती । जेथें नेति नेति वेद बोले ॥३७॥
वेद बोलियेला त्रिविध वचन । कर्म उपासना आणि ज्ञान ॥३८॥
ज्ञानाचा निश्चयो बोलीला वेदांतीं । आणि शास्त्रमतीं बहुसाल ॥३९॥
बहुसाल शास्त्रें पाहातां सरेना । आयुष्य पुरेना जन्मवरी ॥४०॥
जन्मवरी वाया संदेहीं पडावें । केधबांघडावें समाधान ॥४१॥
समाधान घडे साधूचे संगती । गीताभगवतीं हेंची आहे ॥४२॥
हेंचि आहे सार जाणावें साचार । करावा विचार शाश्वताचा ॥४३॥
शाश्वताचा भाव सर्व ठाईं पडे । जरी भावें घडे संतसंग ॥४४॥
संतसंगें देव पाविजे तत्वता । शास्त्रें धांडोळितां आडळेना ॥४५॥
आडळेना जनीं दिसेना लोचनीं । तें या साधुचेनी पाविजेतें ॥४६॥
पाविजेतें निज स्वरूप आपुलें । मन भांबावलें जये ठाईं ॥४७॥
जये ठाईं तुटे सर्वहि आशंका । तेंचि लाभे येका गुरूमुखें ॥४८॥
गुरूमुखें सत्य मानावें अंतरीं । वेगीं सोय धरीं आलया रे ॥४९॥
आलया रे संग साधूचा धरावा । संसार तरावा साधुसंगें ॥५०॥
साधुसंगें ज्ञान रामदासीं जालें । शरीर लागलें भक्तीमार्गें ॥५१॥
स्फुट अभंग – २७
गणेश नमावा आणि सरस्वती । मारूती गभस्ती चंद्रमौळी ॥१॥
विष्णु खंडेराव भगवती । भैरव । पांडुरंगीं भाव शामराज ॥२॥
हरिदिनीं निर्हार पापाचा संव्हार । व्रतें सोमवार थोर आहे ॥३॥
गोमुख गोकर्ण गोमय गोमुत्र । गोशृंग पवित्र तर्पणासी ॥४॥
तुळसी काळोत्री बेल गंगावती । रूद्राक्ष विभूती पापनाशी ॥५॥
विष्णु द्वारावती तुळसीच्या माळा । पाहिजे गोपाळा दहिंभात ॥६॥
आषाढी कार्तिकीं आंवळीचीं बनें । घालावीं भोजनें ब्राह्मणांसीं ॥७॥
ब्राह्मणांच्या तीर्थें पापक्षय होतो । जन उद्धरतो विप्रवाक्यें ॥८॥
लिंगाची लाखोली लिंगा अभिषेक । येणेंही विवेक पाविजेतो ॥९॥
अश्वत्थाची पूजा आणि प्रदक्षणा । ध्यावा क्षणक्षणा नारायण ॥१०॥
शालीग्रामीं पुण्य बहुतची जोडे । नर्मदे रोकडे हनुमंत ॥११॥
बाण चक्रांकित सोमसूर्यकांत । तांदळे दुरित नाशिताती ॥१२॥
अन्न ब्रह्म आहे विचारूनि पाहे । शरीर हें राहे तयाचेनी ॥१३॥
आपोनारायण सकळांचें जीवन । कारण पर्जन्य पाहिजे तो ॥१४॥
चंदनाचीं काष्टें आणी बेलकाष्टें । थोर दंड काष्टें पळसांची ॥१५॥
मृगाचें कातडें डुकराचे केश । कमळाक्ष भद्राक्ष पुण्यमाळा ॥१६॥
भूमंडळीं तीर्थे तें किती सांगावीं । सर्वहि फिरावीं कोण्ही येकें ॥१७॥
आघाडा दुरूवा कोमळा अपूर्वा । तेणेंचि पूजावा लंबोदर ॥१८॥
रूई मांदादाचीं फुलें कन्हेराचीं । आणि जास्विनची आरंगुंद ॥१९॥
भूमंडळावरी थोर शिलोदकें । नासती पातकें ततक्षणीं ॥२०॥
कांउंजी भींउजी पाठोरेपीठोरे । हतीगा पुजा रे येक भावें ॥२१॥
डाउते आनंत थोर शाकाव्रत । द्विदळे नेमस्त सेऊं नये ॥२२॥
भोजनाचे वेळे येकवाढी करा । आणी मौन्य धरा स्वपाकी हो ॥२३॥
स्नानसंध्या प्रदक्षिणा नमस्कार । श्राद्ध पक्ष थोर सांडूं नये ॥२४॥
ब्राह्मणांसी वैश्वदेवे उपासना । करावें तर्पण आदरेंसी ॥२५॥
करावीं आलोढ्यें वेद आणी शास्त्रें । मंत्र स्तुतिस्तोत्रें नानापरी ॥२६॥
तपें पुरश्चण ध्यानस्त बैसावें । सांग संपादावें देवार्चनें ॥२७॥
धरणीं पारणी नित्य उपोषणें । तेणें होती क्षीण महा दोष ॥२८॥
काव्यें अभ्यासावीं पुराणें सांगावीं । कवित्वें करावीं सावकास ॥२९॥
फाल्गुनमाहात्में तेंहि संपादावीं । देवकें पुजावीं वीलगटें ॥३०॥
मांगिणी जोगिणी राहाण गोंधळ । डांकाचे कुल्लाळ जेऊं घालावे ॥३१॥
बुलगावा मुंज्या नरसीयां झोटिंग । पूजा कीजे सांग देवतांची ॥३२॥
देवतें तें भूतें सिद्धशिवकाळा । पुजावा आगळा पंचाक्षरी ॥३३॥
नाना तीर्थें व्रतें सांग संपादवीं । अघोरें करावीं नाना कर्में ॥३४॥
बगाडें कुलुपें राडी आणि बेडी । कामना रोकडी पुरतसे ॥३५॥
गळहिं टोंचावें निंबही नेसावे । खोडेही घालावें हातीं पांई ॥३६॥
गुगुळ जाळावे पोतही खेळावे । जोगी ते पुजावे भैरवांचें ॥३७॥
दया दानधर्म करावा स्वधर्म । चुकवावें वर्म संसाराचें ॥३८॥
संसाराचें वर्म तोडितां तुटेना । मार्गची फुटेना विवेकाचा ॥३९॥
विवेकाचा मार्ग संतसंगें कळे । उदंड निवळे विवेकानें ॥४०॥
भ्रष्ट शाक्त मुक्त अविवेकी नसाव । केवळ दंडावा अनाचारू ॥४१॥
अनाचारें ज्ञान कदा निवळेना । इहलोक कळेना परलोक ॥४२॥
परलोक माया सांडूनी पाहावा । अष्टदेचा गोव घालूं नये ॥४३॥
घालूं नये वाद वाउगा वेवाद । तेणों गुणें खेद होत आहे ॥४४॥
होत आहे पुढे जयास कल्पांत । सर्वनाशिवंत सांडा मागें ॥४५॥
सांडा मागें बंड पाषांड थोतांड । चिंतावा अखंड गुणातीत ॥४६॥
गुणातीत देव त्रिगुणापरता । तेथें तूं सरता होई बापा ॥४७॥
बापमाये सखे कोण्ही कामा नये । धुंडाळावी सोये मूळाकडे ॥४८॥
मुळाकडे फळ फळाकडे मूळ । मूळचि निर्मूळ भक्तियोगें ॥४९॥
बापमाये सखे कोण्ही कामा नये । धुंडाळावी सोये लाहिजे दास म्हणे ॥५०॥
स्फुट अभंग – २८
पहिले प्रथम मुळीं परब्रह्म । व्यापक सूक्ष्म जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें वस्तु आहे निराकार । शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥
प्रगटित आहे दिसेना ना नासे । विचारें विलसे ज्ञानियांसी ॥३॥
ज्ञानियांसी मान न कळे निरंजन । आणी जन वन सारिखेंचीं ॥४॥
सारिखेंची आहे देवा वोळखतां । जेथें तेथें जातां देव भासे ॥५॥
देव भासे मनीं नित्य निरंतर । बाह्याभ्ययांतर व्यापूनीयां ॥६॥
व्यापूनीयां आहे सर्वाचें अंतरीं । अनुभवें हरी वोळखावा ॥७॥
वोळखावा परी वोळखतां नये । म्हणानी उपाये साधुसंग ॥८॥
साधुसंग धरी श्रवण विवरी । सारासार करी विचारणा ॥९॥
विचारणा करी देवाब्राह्मणांची । आणी सगुणाची उपासना ॥१०॥
उपासना कर्म हें आधीं पाळावें । मग सांभाळावें ब्रह्मज्ञान ॥११॥
ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे । सन्मार्गीं पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥
क्रियाभ्रष्ट कर्म उपासनेवीण । नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥
मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाहीं । क्रिया कर्म कांहीं सोडवीना ॥१४॥
सोडवीना कर्म या कर्मापासूनी । भगवंतांवांचुनी तारांबळी ॥१५॥
तारांबळी जाली देवासी नेणतां । कर्मीं गुंडाळतां देव कैचा ॥१६॥
देव कैचा भेटे कर्म उफराटें । संशयोची वाटे सर्वकाळ ॥१७॥
सर्व काळ गेला संशईं पडतां । नित्य चोखाळितां कळेवर ॥१८॥
कळेवर काये नित्य धूत गेला । लावितो कोणाला उपकार ॥१९॥
उपकार कैचा सेवक देहाचा । आणि कुटुंबाचा भारवाही ॥२०॥
भारवाही जाला देवासी चुकला । लोकिकची केला जन्मवरी ॥२१॥
जन्मवरी केलें अंतीं व्यर्थ गेलें । कासावीस जालें वांयांवीण ॥२२॥
वायांवीण काळ गेला कीं निर्फळ । कर्म हें सबळ सुटेना कीं ॥२३॥
सुटेना कीं कर्म कोण सोडविता । सांडुनी अनंता कर्म केलें ॥२४॥
कर्म केलें देह चालतां निर्मळ । खंगतां वोंगळ देह जालें ॥२५॥
देह जाला क्षीण सदा हागवण । मृत्तिकेचा सीण कोण करी ॥२६॥
कोण करी तेव्हां कर्मांचे पालण । जाली भणभण शरीराची ॥२७॥
शरीराची जाली जेव्हां भणभण । तेव्हां नारायण भजों पाहे ॥२८॥
भजों पाहे तेव्हां नारायण कैचा । गेला अभाग्याचा सर्व काळ ॥२९॥
सर्व काळ गेला देवा न भजतां । देहे चोखाळीतां चोखाळेना ॥३०॥
चोखाळेना देहे वाढवी संदेहे । अंतकाळीं पाहे दैन्यवाणा ॥३१॥
दैन्यवाणा देह देवा न भजतां । लेटतुला आतां कोण सोडी ॥३२॥
कोण सोडी देव धुंडिल्यावांचुनी । म्हणोनी भजनीं सावधान ॥३३॥
सावधानपणें देवासी शोधावें । तेणेंची साधावें परलोक ॥३४॥
परलोक साधे संतांचे संगती । चुके अधोगती गर्भवास ॥३५॥
गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां । वस्तुसी पाहतां वस्तुरूप ॥३६॥
वस्तुरूप होणें विवेकाच्या गुणें । नित्यनिरूपणें सारासार ॥३७॥
सारासारें घडे असाराचा त्याग । योगिये निःसंग सहजची ॥३८॥
सहजचि कर्मापासुनी सुटला । बोध निवटला परब्रह्मीं ॥३९॥
परब्रह्मीं हेतु लागतां अहेतु । दहीं देहातीतु रामदास ॥४०॥
स्फुट अभंग – २९
देव निराकार त्या नाहीं आकार । आकारा संव्हार होत आहे ॥१॥
होत आहे जें जें तें सर्व जाणार । जाणार होणार सर्व माया ॥२॥
सर्व माया दिसे हें पंचभौतिक । आत्मा आहे येक निरंजन ॥३॥
निरंजनीं जन वन कांहिं नसे । दृश्यभास भासे कल्पनेसी ॥४॥
कल्पनसी भासे तें सर्व कल्पितां । कल्पनेरहित परब्रह्म ॥५॥
परब्रह्म नाहीं ऐसा ठाव कैंचा । धन्य तो दैवाचा आत्मज्ञानी ॥६॥
आत्मज्ञानी नर पाहे सारासार । पुढें तदाकार होत आहे ॥७॥
होत असेजन्म सार्थक तयाचा । जेथे सज्जनाचा अनुग्रहो ॥८॥
अनुग्रह घडे बहुतां सुकृतें । साक्षात्कार जेथें रोकडाची ॥९॥
रोकडाची मोक्ष साधूचे संगती । चुके अधोगती आत्मज्ञानें ॥१०॥
आत्मज्ञानें होतें आत्मनिवेदन । भक्तीचें लक्षण नवविधा ॥११॥
नवविधा भक्ति श्रवणीं करावी । धारणा दरावी श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची स्थिती ब्रह्मनिरूपण । श्रवण मनन निजध्यास ॥१३॥
निजध्यास जनीं वस्तूचा धरावा । विचार करावा आपुलाची ॥१४॥
आपुलाची ठाव ज्ञानें होतो वाव । जाणीजे उपाव श्रवणाचा ॥१५॥
श्रवणाचा भाव जाणते जाणती । तिन्हीहि प्रचीती ऐक्यरूप ॥१६॥
ऐक्यरूप देवी भक्त नामांकित । अनन्या अनंत जैसा तैसा ॥१७॥
तैसा आहे लाभ श्रवणभक्तीचा । जेथें विभक्तीचा ठाव नाहीं ॥१८॥
ठाव नाहीं ऐसें श्रवणें जाणावें । कीर्तण करावें हेंचि आतां ॥१९॥
हेंचि हें कीर्तन नित्य निरंतर । ग्रंथाचें अंतर विवरावें ॥२०॥
विवरावें जेणे तोचि जो जाहाला । रंक तो पावला राज्यपद ॥२१॥
पदीं पद प्राप्त जालेम संतसंगें । सद्य अंतरंगें समाधान ॥२२॥
समाधान जालेम श्रवणकीर्तनें । रामाच्या स्मरणें चित्तशुद्धी ॥२३॥
चित्तशुद्धी जाली तेणें तें धरावें । सेवन करावें सद्गुरूचें ॥२४॥
सद्गुरू करावा तें पादसेवन । सद्गुरूनें ज्ञान होत आहे ॥२५॥
होत आहे ज्ञान सद्गुरू करितां । होये सार्थकता गुरूचेनी ॥२६॥
सद्गुरू करावा तें पादसेवन । सद्गुरूनें तें निवडे प्रत्ययेंसीं ॥२७॥
प्रत्ययेंसीं बोले तेंचि ते बोलणें । अचर्न करणें गुरूदेवा ॥२८॥
गुरूदेवालागी करीं नमस्कार । साहावा विचार भक्ति ऐसी ॥२९॥
सर्व दास्य कीजे ते भक्ति सातवी । सख्य ते आठवी भक्ति जाण ॥३०॥
नौमीचें लक्षण आत्मनिवेदन । सर्वदा अभिन्न परब्रह्मीं ॥३१॥
परब्रह्म स्वयें आपणची होणें । ऐसीं हें लक्षणें सार्थकाचीं ॥३२॥
सार्थक भजन आत्मनिवेदन । विवेकें अभिन्न देव भक्त ॥३३॥
देव भक्त कैसे हें आधीं पाहावें । स्थितीनें राहावें सर्व काळ ॥३४॥
सर्व काळ वस्तु आहे जैसी तैसी । देह प्रारब्धासी समर्पिला ॥३५॥
समर्पिला त्यासी होणार होईल । जाणार जाईल पंचभूत ॥३६॥
पंचभूत माया माईक दिसते । होते आणि जाते स्वप्नाकार ॥३७॥
स्वप्नाकार माया आपण वेगळा । असोनि निराळा सर्वांमध्यें ॥३८॥
सर्वांमध्ये आहे त्यासी सर्व पाहे । आहे तैसा आहे सदोदित ॥३९॥
सदोदित वस्तु तेचि ते आपण । रामदास खूण सांगतसे ॥४०॥
स्फुट अभंग – ३०
सप्रचीत वली मिथ्या कोण करी । धन्य तो विवरी विवेकानें ॥१॥
विवेकाचे जन भेटतां संकट । ज्याची खटपट सुखरूप ॥२॥
सुखरूप संत सत्य साभिमानी । तयासीच मानी येरां नाहीं ॥३॥
येरां नाहीं गती सत्यावांचूनीयां । असत्याचा पायां कोण पडे ॥४॥
कोण पडे आतां संदेहाचें डोहीं । कोणावीण नाहीं चाड आम्हां ॥५॥
आम्हां नाहीं चाड ते कोणीं येकाची । दृढ राघवाची कास धरूं ॥६॥
कास धरूं जेणें पावनची केलें । तेथें माझें जालें समाधान ॥७॥
समाधान जालें प्रत्ययासी आलें । धन्य तें पाउलें राघवाचीं ॥८॥
राघवाचीं पदें मानसीं धरीन । विश्व उद्धरीन हेळामात्रें ॥९॥
हेळामात्रें मुक्त करीन या जना । तरीच पावना राघवाचा ॥१०॥
राघवाचा दास मी जालों पावन । पतीत तो कोण उरों शके ॥११॥
उरों शके ऐसें कल्पांतीं घडेना । जो कोण्ही पुसेना त्यासी उणें ॥१२॥
उणें न सगतां माझ्या सूर्यवंशा । कोण्हाची दुराशा नाहीं आम्हां ॥१३॥
आम्हीं नाहीं उणें राघवाच्या गुणें । ब्रीदची राखणें पावनाचें ॥१४॥
पावनाचें ब्रीद आम्हां प्राप्त जालें । प्रचीतीस आलें कितीयेकां ॥१५॥
कितीयेक जन ज्ञानें उद्धरीले । कृतकृत्य जाले तत्काळची ॥१६॥
तत्काळची मोक्ष हें ब्रीद रामाचें । होत आहे साचें येणें काळें ॥१७॥
येणें काळें मोक्ष जरी मी देईना । दास म्हणवीना राघवाचा ॥१८॥
राघवाचा वर पावलों सत्वर । जनाचा उद्धार करावया ॥१९॥
कराया समर्थ राम सूर्यवंसी । मज कासयासी रागेजता ॥२०॥
रागेजतां राग येईल समर्थां । हे तों कांहिं सत्ता माझी नव्हे ॥२१॥
माझी सर्व चिंता जानकीजीवना । आतां मी लेखीना ब्रह्मादिकां ॥२२॥
ब्रह्मादिक माये जानकीपासूनी । तयासी व्यापूनी राम आहे ॥२३॥
राम आहे जनीं राम आहे वनीं । राम निरंजनीं सारिखाची ॥२४॥
सारिखाचि राम सृष्टी पाहों जातां । तोची पाहा आतां निरंतर ॥२५॥
निरंतर राम कांहो अंतरीतां । सोडूनीयां जाता येकेकडे ॥२६॥
येकीकडे जातां तेथेंहि तो राम । सांडुनीयां भ्रम बरें पाहा ॥२७॥
बरें पाहा तुम्ही आतांची पावाल । पावनची व्हाल रामरूप ॥२८॥
राम रूपें सर्व रूपें निवारलीं । आसतची जालीं नाही ऐसी ॥२९॥
नाहीं ऐसीं रूपें भित्ती चित्रकार । तैसा हा आकार स्वप्न जैसें ॥३०॥
स्वप्नीचा आकार कल्पनेसी भासे । रामरूप असे निर्विकल्प ॥३१॥
निर्विकल्प राम कल्पितां होईजे । मिळोनी जाईजे रामरूपीं ॥३२॥
रामरूपीं सर्व समाधान जालें । पावनचीं केलें पावनानें ॥३३॥
पावन हा राम जो कोण्ही पावेल । रामची होईल निजध्यासें ॥३४॥
निजध्यास नीज वस्तूचा धरावा । श्रवणें करावा साक्षात्कार ॥३५॥
साक्षात्कार होतां सत्य निर्गुणाचा । मग या गुणाचा पांग नाहीं ॥३६॥
पांग नाहीं ऐसें नेमस्त जाणीजे । शीघ्रची सुटीजे संवसारीं ॥३७॥
संवसारीं सुटिजे संसार करितां । सर्वही भागीतां भोगातीत ॥३८॥
भोगातीत जैसा श्रीकृष्ण दुर्वास । आत्मज्ञानी तैसा सर्वकाळ ॥३९॥
सर्वकाळ देहीं असतां विदेही । रामदासीं नाहीं जन्ममृत्यु ॥४०॥
स्फुट अभंग – ३१
सर्वांगें सुंदरू कासे पीतांबरू । विद्येचा सागरू वंदियेला ॥१॥
वंदियेली मनीं सरस्वती माता । सद्गुरू समर्था दंडवत ॥२॥
दंडवत माझें संतसज्जनांसी । भाविक जनांसी आळिंगन ॥३॥
आलिंगन माझे निवालें सर्वांग । भाविकाम्चा संग देईं देवा ॥४॥
देई देवा तुझें नाम अहर्निशी । आठवे मानसीं रूप तुझें ॥५॥
तुझाची आधार मन अनाथासी । झणी अव्हेरीसी मायबापा ॥६॥
मायबाप बंधु स्वजन सांगाती । तूंची आदि अंतीं माहियेर ॥७॥
माहियेर माझें पुण्यपरायेण । योगीयांचा मंडण स्वामी माझा ॥८॥
स्वामी माझा राम अंतरला दुरी । अवस्था अंतरीं वाटतसे ॥९॥
वाटतसे खंती सर्वकाळ चिंतीं । केव्हां कृपामूर्ति भेटईल ॥१०॥
भेटईल केव्हां राम माझी माता । जीव हा दुश्चीता सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ माझे मनीं आठवण । युगांसम क्षण जात आहे ॥१२॥
जात आहे वय वेचोनीयां माझें । रूप रामा तुझें दिसेना कीं ॥१३॥
दिसेना कीं रूप सांवळें सुंदर । कासे पीतांबर कासियेला ॥१४॥
कासियेली आंगीं चंदनाची उटी । मुक्तमाळा कंठीं डोल देती ॥१५॥
डोल देती माळा पदकीं रत्नकीळा । मृग नाभीं टीळा रेखियेला ॥१६॥
रेखीयेलें भाळीं सुगंध परीमळ । लोधले अळिकुळ झुंकारती ॥१७॥
झुंकारती वास घेती अवकाश । राम राजाधीश शोभतसे ॥१८॥
शोभतसे माथां मुगट रतनकीळ । कीरीटी तेजाळ रम्य शोभा ॥१९॥
रम्य नीमासुर श्रीमुख साजिरें । दिव्य मकराकारें तळपताती ॥२०॥
तळपती कुंडलें बाहीं बाहुंवटे । दोर्दंड गोमटे चाप बाण ॥२१॥
चाप बाण करीं नवरत्नें भूषण । आणी वीरकंकण कीर्तिमुखें ॥२२॥
मुख मुरडुनी सिंह जाती वनीं । जघन देखोनी संकोचले ॥२३॥
संकोचले दैत्य पुतळे तोडरीं । गर्जती गजरीं अंदू वांकीं ॥२४॥
आंदु वांकीं पाईं शोभे वीरासन । माझे मनीं ध्यान आठवलें ॥२५॥
आठवलें रामचंद्रध्यान चित्तीं । सन्मुख मारूती उभा असे ॥२६॥
उभा असे सर्व बंधु समुदाव । त्रिकुटीचा राव बिभीषण ॥२७॥
बिभीषण आणी किष्किंधेचा राव । सर्व समुदाव वानरांचा ॥२८॥
वानरांसहीत राम अयोध्येसी । आनंद जनांसी थोर जाला ॥२९॥
जाला यशवंत राम सूर्यवंसी । रामी रामदासीं भेटी जाली ॥३०॥
स्फुट अभंग – ३२
काय सांगो मी या मारूतीचें बाळ । गिळिलें मंडळ मार्तंडाचें ॥१॥
मार्तंड गिळिला येणें बाळपणीं । देवादिकां रणीं पिटियेलें ॥२॥
पिटीले राक्षस विंध्वंसिलें बन । लंकेचे दहन क्षणमात्रें ॥३॥
क्षणमात्रें आला जानकी शोधुनी । सिंधु वोलांडुनी अवळीला ॥४॥
अवलीळा जेणे द्रोणाद्री आणीला । राक्ष वधिला काळनेमी ॥५॥
काळनेमी आणी मारिली विवसी । उद्धार तयेसी दिवदान ॥६॥
जीवदान दिल्हें तया लक्षुमणा । आणी कपीगणा सकळीकां ॥७॥
सकळीकां कपीकुळांचें मंडण । वांचविले प्राण बहुतांचे ॥८॥
बहुतां मधुनी तया राघवासी । नेलें पाताळासी निशाचरीं ॥९॥
निशाचरीं रम पाताळासी नेला । मागे धाविन्नला हनुमत ॥१०॥
हनुमंते उडी घातली संकटीं । सोडिलें सेवटी स्वामीयांसी ॥११॥
स्वामीयासी सोडी धन्य तो सेवक । अलोलीक मारूतीची ॥१२॥
मारूतीनें तये जानकीकारणें । नगरची नेणें उचलूनि ॥१३॥
उचलूनी माथां तये जानकीसी । वाटे कुंभकासीं वधावया ॥१४॥
वधूनिया कुंभकर्णाचा नंदनु । पुन्हा बिभीषणू राज्यीं बैसे ॥१५॥
बैसला मारूती तये सिंधुतीरीं । हुंडारीलें दुरी गुरूडासी ॥१६॥
गरूडाची हांव सर्वही यादव । फेडियेला गर्व येकसरा ॥१७॥
येकसरा नामें रूपें पालटीला । मग रक्षियेला कृष्णनाथ ॥१८॥
कृष्णनाथ रूपें जाहला ब्राह्मण । वांचविले प्राण अर्जुनाचे ॥१९॥
अर्जुनाचें सैन्य रोमावळीअंत । महानदीप्रांत उतरिलें ॥२०॥
उतरीलें येणें आर्जुनादिकांतें । गेलें दुंदुभीतें वधावया ॥२१॥
वधावया गेले तेणे हुंडारीलें । सागरीं राखिले मरूतीनें ॥२२॥
मारूतीचें बळ वर्णितां सबळ । वाचा हे विबळ होत आहे ॥२३॥
होत आहे साना होत आहे थोर । कोण जाणे पार स्वरूपाचा ॥२४॥
रूप वज्रदेही पुछ्य वज्र ते हिं । रामदासीं नाहीं जन्म मृत्यु ॥२५॥
स्फुट अभंग – ३३
नमस्कार आतां देवा गणनाथा । चरणकमळीं माथा ठेउनीयां ॥१॥
शारदा सुंदरी ते ब्रह्मकुमरी । राजहंसावरी शोभतसे ॥२॥
उभ्या महेश्वर शंभूचें शिखर । येती निरंतर विश्वजन ॥३॥
विश्वासी आधार सुर्यनारायण । तया पंचप्राण ओवाळीन ॥४॥
स्तंभ फोडुनीयां आला गडगडीत । भक्तांसी रक्षीत नरहरी ॥५॥
नाना पूजा नाना नैवेद्य विळास । नांदे त्रिमलेश वेंकटेश ॥६॥
कटावरी कर उभा निरंतर । भक्तांसी आधार पांडुरंग ॥७॥
तुळजापुरीं माझें कुळीचें दैवत । तुळजा विख्यात भूमंडळीं ॥८॥
काशीपुरीमध्यें विश्वनाथ राजा । अंतकाळीं वोजा रक्षितसे ॥९॥
न करी अव्हेरू कृपेचा सागरू । जानकीचा वरू रामराजा ॥१०॥
द्वारकेचा कृष्ण पांडवांचा सखा । बंधु पाठीराखा द्रौपदीचा ॥११॥
उधळलें भंडार पाली पेंबरीस । नित्य मल्हारीस । हळदी लागे ॥१२॥
साटी पत्रशाखा होय शाखांबरी । ते बनशंकरी भक्तमाता ॥१३॥
आउदीये माई मातापुरी गेली । चंडिका देखिली सप्तशृंगीं ॥१४॥
रासीनीरासाई आंबा जोगेश्वरी । नांदे कोल्हापुरीं महालक्ष्मी ॥१५॥
स्वामीयाचे यात्रे विश्वजन जाती । सप्त जन्म होती भाग्यवंत ॥१६॥
पंचवटीकेसी रामसीतापती । देव हा मारूती जेथें तेथें ॥१७॥
कावेरीचें तीरीं नांदे रंगनाथ । वोड्य़ा जगन्नाथ पूर्वभागीं ॥१८॥
उडुपेचा कृष्ण बद्रीनारायण । भगवंत आपण बारसीचा ॥१९॥
वैकुंठीचा विष्णू कैलासी शंकर । मुख्य निराकार परब्रह्म ॥२०॥