“महान संत या जगातून निघून गेले, त्यांचे जीवन थोडे समजून घ्या, त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा, हाच खरा संदेश आत्मसात करा,” असे संतांबद्दल नेहमीच म्हटले जाते. श्री संत नाना महाराज यांच्या कार्याबद्दल मी बरेच वर्षे फक्त ऐकत आलो होतो. बाळ सामंत यांनी ऑगस्ट १९५९ मध्ये प्रकाशित केलेले चरित्र मी वाचले, तसेच सौ. आशा गडकरी यांनी लिहिलेल्या श्री संत राम मारुती महाराज यांच्या जीवनकथेतून नाना महाराजांबद्दलची माहिती मिळाली.

त्याचप्रमाणे प्र. ल. मोकाशी यांच्या “चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास” या पुस्तकात नाना महाराज आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांविषयी माहिती वाचनात आली. २० जुलै १९५२ रोजी नाना महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. त्यापूर्वी दहा वर्षे त्यांनी उभारलेल्या संस्थेचे कार्य थांबले होते. तरीही, त्यांची महती आणि कार्याची ओळख अनेकांना नाही. २०२६ मध्ये नाना महाराजांची १५० वी जयंती आणि २०२७ मध्ये ७५ वी पुण्यतिथी आहे.

या काळापूर्वी त्यांचे जीवन आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी पुढे यावे, या हेतूने मी हे अल्प चरित्र लिहिण्याचा संकल्प केला आहे. हे चरित्र अनेकांपर्यंत पोहोचेल आणि पुढील पाच वर्षांत महाराजांचे कार्य पूर्णत्वास जाईल, अशी माझी आशा आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड गावात बळवंतराव नाचणे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा विवाह मुरुड येथील आत्माराम सबनीस यांच्या कन्या सुंदराबाई यांच्याशी झाला. सुंदराबाई या धार्मिक स्वभावाच्या होत्या आणि त्यांची श्रद्धा प्रामुख्याने अध्यात्माकडे झुकलेली होती. बळवंतराव हेही भक्तीप्रवण होते आणि नांदगावच्या गजानन महाराजांवर त्यांची गाढ निष्ठा होती. काही काळानंतर त्यांनी संसाराचा त्याग करून अक्कलकोट येथील स्वामींच्या सेवेसाठी आश्रमात वास्तव्याला जाण्याचा निर्णय घेतला.

shri-sant-narayan-maharaj-shrigondekar

दीड वर्षे तिथे राहिल्यानंतर अक्कलकोट स्वामींनीच त्यांना आशीर्वाद देऊन घरी परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर बळवंतराव घरी परतले आणि पुन्हा संसारात रमले. शके १७९८, भाद्रपद शुक्ल दशमी, म्हणजेच १० सप्टेंबर १८७६ रोजी त्यांना पुत्ररत्न झाले. या मुलाचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. हेच नारायण पुढे श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर उर्फ नाना महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.

नाना महाराज अवघे आठ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि काही वर्षांतच आजोबाही गेले. या कठीण काळात त्यांच्या आत्याने कुटुंबाला आधार दिला. मुरुड येथील शाळेत नाना महाराजांचे शिक्षण सुरू झाले. ते अत्यंत हुशार आणि बुद्धिमान होते. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी सातवी उत्तीर्ण केली. त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला जायचे होते, पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.

त्यामुळे मुरुडमध्येच त्यांनी इंग्रजीच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले. अधिक शिकण्याची तीव्र इच्छा असूनही, वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. १८९१ मध्ये नोकरीच्या शोधात ते दोन धाकट्या भावंडांसह मुरुडहून मुंबईला मामाकडे गेले. वयाच्या पंचविशीत त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते धाकटे भाऊ केशव आणि शंकर यांच्यासह ठाण्यात महागिरी परिसरात राहू लागले. ठाण्यात स्थिरस्थावर होत असतानाच प्लेगच्या साथीमुळे त्यांना पुन्हा मुरुडला परतावे लागले.

१९०२ मध्ये ठाण्यातील राजारामभाऊ वासकर गुप्ते यांच्या मुलीशी नाना महाराजांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्यांचे मन संसारात रमले नाही. नोकरीनिमित्त ते प्रथम मद्रासला आणि नंतर पुण्याला गेले. तिथे त्यांचा कल अध्यात्म आणि देवधर्माकडे वळला. त्यांनी ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केला. दरम्यान, त्यांचा भाऊ केशव याचे निधन झाल्याने त्याची पत्नी आणि लहान मुलीची जबाबदारी महाराजांवर पडली. ज्योतिषात पारंगत झाल्याने अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले. पण केशवच्या निधनाने व्यथित झालेल्या महाराजांनी ज्योतिष सोडले आणि दुसरा भाऊ शंकरराव यांच्यासह तीर्थयात्रेला निघाले.

तीर्थयात्रेदरम्यान पुण्यात नाना महाराजांची आणि श्रीकृष्णानंद महाराजांची भेट झाली. काही काळ एकत्र घालवल्यानंतर नाना महाराजांनी श्रीकृष्णानंद महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले. श्रीकृष्णानंद महाराज हे ज्ञानेश्वरीवरील प्रवचनांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्याकडून नाना महाराजांनी ज्ञानेश्वरीचे सखोल अध्ययन केले आणि संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. उदरनिर्वाहासाठी ते शिंपीकाम करत असत. श्रीकृष्णानंद महाराजांच्या निधनानंतर नाना महाराज त्यांचे आध्यात्मिक वारस बनले.

१९१४ मध्ये दादर येथे नाना महाराज आणि श्री राम मारुती महाराज यांची पहिली भेट झाली. कालांतराने त्यांच्यात मैत्री आणि विचारांचे आदान-प्रदान वाढले. श्री राम मारुती महाराजांनी समाज सुधारणा आणि शिक्षणाविषयीचे आपले विचार नाना महाराजांसमोर मांडले. त्यांना वाटत होते की, समाजाची प्रगती आणि देशाची उन्नती साधण्यासाठी तरुण पिढी सुशिक्षित, स्वावलंबी आणि सुसंस्कृत असावी. यासाठी सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहाव्यात, अशी त्यांची तळमळ होती. त्यांनी हे कार्य नाना महाराजांच्या खांद्यावर सोपवले आणि नाना महाराजांनी ही जबाबदारी स्वीकारली.

श्री राम मारुती महाराजांच्या निधनानंतर १९३१ मध्ये नाना महाराजांनी अथक परिश्रम, सत्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या प्रेमाच्या जोरावर मुंबईत “कृष्णानंद प्रासादिक चां. का. प्र. शिक्षणोत्तेजक परस्पर सहाय्यक शिक्षण संस्था” आणि महिलांसाठी “मातृवात्सल्य सेवा मंडळ” या संस्थांची स्थापना केली. तसेच विठ्ठल नगर येथे “कृष्णानंद राम मारुती विद्याश्रम” नावाची संस्था उभारली. या संस्था कालांतराने सर्व समाजासाठी खुल्या करण्यात आल्या. अशा रीतीने त्यांनी श्री राम मारुती महाराजांचे शिक्षणाद्वारे समाज सुधारण्याचे स्वप्न साकार करण्याचा पाया घातला.

श्री राम मारुती महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नाना महाराजांनी फक्त योजना आखल्या नाहीत, तर त्या कार्यान्वितही केल्या. २० मार्च १९३१ रोजी त्यांनी “श्री कृष्णानंद राम मारुती विद्याश्रम” या संस्थेची स्थापना केली. भीमा नदीच्या काठावर, दौंड-सोलापूर रेल्वे मार्गावरील मलठण स्टेशनपासून दोन मैल अंतरावर ३५० एकर जमीन खरेदी केली. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी दहा खोल्या बांधल्या, ७५ गुरे ठेवून दुधाची सोय केली आणि शेतीसाठी बैल आणले. इंग्रजी पाचवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था केली.

दरवर्षी ८० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत, त्यापैकी ३५ जण गरीब कुटुंबातील असत. १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिश सरकारला या शाळेत क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिले जाते, असा संशय आला आणि त्यांनी संस्था बंद केली. स्वातंत्र्यानंतर ही संस्था पुन्हा सुरू व्हावी म्हणून महाराजांनी प्रयत्न केले, पण निधीअभावी ते अयशस्वी ठरले. या अपयशाने महाराज खचले. त्यांनी मेहनतीने उभारलेले स्वप्न आर्थिक अडचणींमुळे कोसळले.

समाजाला त्यांच्या त्यागाची आणि कष्टाची कदर नव्हती. शिक्षणाची गरज आणि संस्कृतीची जपणूक याबद्दल उदासीनता होती. त्यामुळे हे विद्यामंदिर बंद पडले. महाराजांनी अनेकांचे पाय धरले, दारोदारी गेले, पण समाजाला स्वतःच्या उन्नतीची तळमळ नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. श्री राम मारुती महाराजांना दिलेले वचन पूर्ण न झाल्याचे दुःख त्यांना आयुष्यभर सतावत राहिले. २० जुलै १९५२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

नाना महाराजांच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. समाजातील उदासीनतेमुळे त्यांचे प्रयत्न फसले. दुसरीकडे, खासगी शैक्षणिक संस्थांनी गेल्या काही दशकांत शेकडो एकर जमिनी घेऊन आपले साम्राज्य उभे केले आहे. नाना महाराजांचे स्वप्न साकारणे म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे आहे. श्रीकृष्णाने एकट्याने पर्वत उचलला होता, पण इथे एकट्याची ताकद पुरणार नाही. उद्योगपती, राजकारणी, समाजसेवक आणि अध्यात्मिक व्यक्तींनी एकत्र येऊन हातभार लावला, तरच हे स्वप्न पूर्ण होईल.

सध्या संस्थेचे पदाधिकारी दर दोन वर्षांनी निवडणुका घेतात, पण नव्या उत्साही व्यक्तींना संधी मिळत नाही. जुन्या सभासदांचा गट आपल्या मर्जीतील लोकांनाच पुढे आणतो. अनेक पदाधिकारी वृद्ध असल्याने ते फक्त मतदानासाठी येतात आणि नंतर विश्रांती घेतात. अशा परिस्थितीत नाना महाराज आणि त्यांच्या संस्थेची माहिती फारच थोड्यांना आहे. हीच स्थिती राहिली, तर ३५० एकर जमिनीवर अतिक्रमण होण्याचा धोका आहे आणि महाराजांचे स्वप्न कायमचे भंगेल.

२०२६ मध्ये नाना महाराजांची १५० वी जयंती आणि २०२७ मध्ये ७५ वी पुण्यतिथी आहे. या पाच वर्षांत ठोस पावले उचलून त्यांचे स्वप्न साकारले पाहिजे. त्यांच्या भक्तांनी आणि शिष्यांनी एकत्र येऊन ३५० एकर जमिनीवर भव्य शैक्षणिक संस्था आणि लहान-मोठे उद्योग उभे करावेत. यासाठी नुसते नावापुरते पदाधिकारी नकोत, तर मनापासून कार्य करणाऱ्या, वेळ देणाऱ्या, चांगल्या आरोग्याच्या आणि जनसंपर्क असलेल्या व्यक्तींनी पुढे यावे.

सध्याच्या पदाधिकाऱ्यांची मुदत ९ सप्टेंबर २०२५ ला संपत आहे. लवकर निवडणुका घेऊन योग्य व्यक्तींना संधी मिळाली, तरच हे स्वप्न पूर्ण होईल. सर्व सभासदांनी जागरूक राहून नाना महाराज आणि श्री राम मारुती महाराज यांचे चरित्र अभ्यासावे आणि योग्य व्यक्तींना पाठिंबा द्यावा. महाराजांचे स्वप्न सत्यात उतरावे, हीच प्रार्थना!