संत ज्ञानेश्व


sarth-dnyaneshwari-adhyay-tisara

मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका. देवा, तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले. ॥ १ ॥


श्रीअनंता श्रीकृष्णा, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असतां त्या ठिकाणी कर्म व त्याचा कर्ता हे उरतच नाहीत व हेच जर तुझे निश्चित मत असेल ॥ २ ॥


तर मग श्रीकृष्णा ‘अर्जुना, तू युद्ध कर; असे मला कसे सांगतोस ? ह्या मोठ्या घोर कर्मामधे मला घालतांना तुला काही लाज वाटत नाही काय ? ॥ ३ ॥


अरे तूच जर सर्व कर्मांचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोस ? ॥ ४ ॥


तर हृषीकेशा, याचा तू विचार करून पहा. की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस. (याचा मेळ कसा घालावा ?) ॥ ५ ॥


श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्या सारख्या अजाण माणसांनी काय करावे ? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे, असे म्हणेनास. ॥ ६ ॥


अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले ? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची ॥ ७ ॥


वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर मग तो रोगी कसा वाचावा ? हे मला सांग बरे. ॥ ८ ॥


आंधळ्याला जसे मुद्दाम आशामार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे. ॥ ९ ॥


मला अगोदरच काही समजत नाही, शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे, म्हणून कृष्णा, तुला सारासार विचार पुसला. ॥ १० ॥


पण तुझे एकेक पहावे तो सर्व आश्चर्यच आहे. इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस. तर तुझ्या उपदेशप्रमाणे चालावयाचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावेस ? ॥ ११ ॥


आम्ही शरीराने, मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून रहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर मग सर्व संपले म्हणावयाचे. ॥ १२ ॥


आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळाण्याची आशा कशाची ? ॥ १३ ॥


ज्ञान मिळाविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यात आणखी एक असे झाले की माझे निश्चित असलेले विचार यामुळे गडबडले. ॥ १४ ॥


त्याचप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे हे चरित्र काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पहातोस की काय ? (ते न कळे). ॥ १५ ॥


अथवा तू आम्हाला फसवीत आहेस ? किंवा गूढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. ॥ १६ ॥


एवढ्याकरता देवा ऐक. हा उपदेश गूढार्थाने आम्हाला सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा. ॥ १७ ॥


मी अतिशय मंद आहे. परंतु कृष्णा, अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. ॥ १८ ॥


हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे, पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे ॥ १९ ॥


त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला नि:संशय कळेल ॥ २० ॥


देवा, तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये ? तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची ? ॥ २१ ॥


अहो, दैववशात कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे ? ॥ २२ ॥


चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तु मागण्याची अडचण का वाटावी ? आपल्याला हवे तसे का इच्छू नये ? ॥ २३ ॥


पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत रहावयाचे तर मग तेथेपर्यंत येण्याकरता केलेले श्रम कशाकरता करावयाचे ? ॥ २४ ॥


त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे, तू आज दैववशात जर हातात आला आहेस ॥ २५ ॥


तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्णा, आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून मागून का घेऊ नये ? देवा, माझ्या मनातील हेतु पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे. ॥ २६ ॥


पहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीस गेले. ॥ २७ ॥


कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा, तू आमच्या ताब्यात आला आहेस, म्हणून ॥ २८ ॥


पहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते, ॥ २९ ॥


तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल ते विचारीत आहे. ॥ ३० ॥


तर मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे एक असेल ते एक मला निश्चित करून सांग. असे अर्जुन म्हणाला ॥ ३१ ॥


अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला. ॥ ३२ ॥


कारण की निष्काम कर्मयोग सांगत असतांना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली ॥ ३३ ॥


तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाहीस. म्हणून उगीचच रागावला आहेस. तर आता ध्यानात ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. ॥ ३४ ॥


हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक, या लोकामधे हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रगट झालेले आहेत. व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. ॥ ३५ ॥


त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणातात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. आणि त्याने ओळखीबरोबर परमात्मरूपाशी तन्मयता प्राप्त होते. ॥ ३६ ॥


दुसरा तो कर्ममार्ग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालाने पावतात. ॥ ३७ ॥


हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते. ॥ ३८ ॥


किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वहाणार्‍या नद्या पाहिल्या तर वहातांना वेगवेगळ्या दिसतात. मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. ॥ ३९ ॥


त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवतात. परंतु त्यांचे आचरण करणे आचरणार्‍याच्या योग्यतेवर अवलंबून असते. ॥ ४० ॥


हे पहा, पक्षी उड्डाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलगतो, परंतु त्याप्रमाणे मनुष्याला त्यावेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल ? सांग बरे. ॥ ४१ ॥


तो हलके हलके एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फलापर्यंत खात्रीने पोचतो. ॥ ४२ ॥


पहा तसे विहंगम मार्गाने ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात. ॥ ४३ ॥


दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालाने पूर्णतेस पोचतात. ॥ ४४ ॥


शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही. ॥ ४५ ॥


किंवा अधिकारपरत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. ॥ ४६ ॥


जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे, तेथे होडीचा त्याग करून कसे चालेले बरे ? ॥ ४७ ॥


अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करावयाची तर स्वयंपाक न करता कसे चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन काता कसे चालेल ? सांग बरे. ॥ ४८ ॥


जोपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे रहाणारच, असे समज. व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते. ॥ ४९ ॥


म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. ॥ ५० ॥


आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो, असे आहे काय ? ॥ ५१ ॥


हे (कर्माचा इच्छेनुरूप त्याग करता येतो) उगाचच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करुन पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही हे तू नि:संशय समज. ॥ ५२ ॥


जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावत: गुणांच्या स्वाधीन आहे. ॥ ५३ ॥


पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय ? ॥ ५४ ॥


सांग. कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय ? अथवा डोळ्यातील पाहाण्याचे सामर्थ्य गेले आहे काय ? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय ? ॥ ५५ ॥


अथवा प्राण व अपान, या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का ? किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का ? किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे काय ? ॥ ५६ ॥


जागृति व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय ? अथवा पाय चालायचे विसरले आहेत का ? हे सर्व असू दे, जन्म व मरण संपली आहेत काय ? ॥ ५७ ॥


हे जर काही रहात नाही तर मग त्याग तो काय केला ? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणारांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. ॥ ५८ ॥


कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन, असा अंत:करणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. ॥ ५९ ॥


पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणारा रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो. ॥ ६० ॥


अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वत: हालचाल न करता वायुवेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत रहाते, ॥ ६१ ॥


त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या अश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या द्वारा, नेहेमी कर्मे करीत असतो. ॥ ६२ ॥


म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही, असे असूनही ‘त्याग करू’ असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल. ॥ ६३ ॥


जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पहातात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध करूनच. ॥ ६४ ॥


त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्यबुद्धी असते, असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात, ते खरोखर दैन्य आहे असे समज. ॥ ६५ ॥


अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत, असे नि:संशय समज. ॥ ६६ ॥


अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. ॥ ६७ ॥


जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात गढलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, ॥ ६८ ॥


तो इंद्रियांना हुकुम करत नाही, आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते, तो अधिकारपरत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म, त्याचा अनादर करत नाही. ॥ ६९ ॥


तो पुरुष कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी त्यांना आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणार्‍या विकारांनी तो लिप्त होत नाही. ॥ ७० ॥


ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलीन होत नाही. ॥ ७१ ॥


त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये रहातो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही (प्रतिबिंबामुळे) पाण्याच्या संगतीत रहातांना दिसते ॥ ७२ ॥


त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थितीसंबंधी काहीच कल्पना करता येत नाही ॥ ७३ ॥


अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाशरहित व मुक्त आहे, असे तू ओळख. ॥ ७४ ॥


अर्जुना, जगामधे ज्याचे विशेष वर्णन केले जाते, असा तोच योगी होय. याकरता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. ॥ ७५ ॥


तू मनाला आवरून धर. व अंत:करणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत. ॥ ७६ ॥


कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देहधार्‍यास संभवत नाही. असे आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे, याचा तू विचार कर. ॥ ७७ ॥


म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे, ते तू फलाशा सोडून करीत जा. ॥ ७८ ॥


अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक आश्चर्य आहे, ते तुला ठाऊक नाही. ते हे की असे (अहंकाररहित व निष्कामबुद्धीने केलेले विहित व नित्यनैमित्तिक) कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. ॥ ७९ ॥


पहा वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने खचितच मोक्षाची प्राप्ती होते. ॥ ८० ॥


अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्ययज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करत असतांना त्यात पापाचा प्रवेश होत नाही. ॥ ८१ ॥


हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ति उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणार्‍या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो. ॥ ८२ ॥


म्हणून स्वधर्माचे आचरण करणे, हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हाच बंधनात पडत नाही. ॥ ८३ ॥


हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्ययज्ञाला चुकले, म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले. ॥ ८४ ॥


अर्जुना, याच संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली ॥ ८५ ॥


तेव्हा नित्ययज्ञासहित (कर्मासहित) सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले, परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते. ॥ ८६ ॥


त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय ? तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, – ॥ ८७ ॥


तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे, त्याचे आचरण करा. म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. ॥ ८८ ॥


याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही, शारीराला पीडा देण्याची जरुरी नाही. व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही. ॥ ८९ ॥


योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रयंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका. ॥ ९० ॥


स्वधर्मे सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. ॥ ९१ ॥


ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. ॥ ९२ ॥


अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, असे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलला. ॥ ९३ ॥


पहा स्वधर्माचे आचरण जर कराल, तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. मग लोकहो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहेमी सोडणार नाही. ॥ ९४ ॥


कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. ॥ ९५ ॥


या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता, त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. ॥ ९६ ॥


तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील, त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल ॥ ९७ ॥


तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. ॥ ९८ ॥


तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला ‘आपली काय आज्ञा आहे’ म्हणून महाऋद्धी विचारतील. ॥ ९९ ॥


ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते ॥ १०० ॥


पहा, त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्यामागे शोध काढीत येईल. ॥ १०१ ॥


अशारीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. ॥ १०२ ॥


अथवा (उलटपक्षी) सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांचे गोडीला लालचावून उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो ॥ १०३ ॥


यज्ञाने संतुष्ट होणार्‍या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने (स्वधर्मरूप) मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, ॥ १०४ ॥


जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही ॥ १०५ ॥


जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही ॥ १०६ ॥


अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उनत्त होऊन केवळ भोगामधे गढून जाईल, ॥ १०७ ॥


त्याला पुढे मोठा धोका आहे. तो असा की त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळाणार नाहीत. ॥ १०८ ॥


जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण रहात नाहीत किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी रहात नाही ॥ १०९ ॥


जसा दिवा मालवल्या बरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लोपून गेला, तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. ॥ ११० ॥


वरीलप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य रहात नाही. प्रजाहो, हे नीट ऐका असे ब्रह्मदेव म्हणाला ॥ १११ ॥


म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याची मालमत्ता हिरावून घेईल. ॥ ११२ ॥


रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान वेढून टाकतात त्याप्रमाणे मग त्याला सर्व पापे घेरतात. ॥ ११३ ॥


त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दु::खे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्याच जवळ रहातात. ॥ ११४ ॥


त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते, आणि मग प्रजाहो, रडले तरी मग कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही ॥ ११५ ॥


म्हणून स्वधर्माचरण सोडू नये. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये. असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. ॥ ११६ ॥


ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते (म्हणून माशाने पाण्याचा त्याग करू नये), त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने ह्या स्वधर्माचरणाला विसरू नये. ॥ ११७ ॥


म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामधे तत्पर असावे हेच आमचे वारंवार सांगणे आहे, ॥ ११८ ॥


पहा निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो ॥ ११९ ॥


गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो ॥ १२० ॥


वर सांगितलेल्या विहितकर्माचरणारूप यज्ञाने यज्ञपुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील ॥ १२१ ॥


त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ॥ १२२ ॥


ते यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग रोग्याला सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. ॥ १२३ ॥


अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला (देहतादात्म्याला) यत्किंचितही वश होत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. ॥ १२४ ॥


म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे. व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. ॥ १२५ ॥


अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसर्‍या रीतीने वागू नये. अशी ही सृष्टीआरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. ॥ १२६ ॥


आपण देहच आहोत, असे मानून जे लोक विषय हे भोग्यवस्तु आहेत असे समजतात आणि ज्यास या पलिकडे दुसरी काहीच कल्पना नसते ॥ १२७ ॥


ते भ्रमिष्ट लोक आपल्या जवळ असलेली संपत्ति वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात. ॥ १२८ ॥


इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात, ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुत: पापच सेवन करतात असे समज. ॥ १२९ ॥


वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ति आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. ॥ १३० ॥


अशा रीतीने वागायचे टाकून, पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वत:करता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात. ॥ १३१ ॥


ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही ॥ १३२ ॥


ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ॥ १३३ ॥


ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. ॥ १३४ ॥


तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. ॥ १३५ ॥


दूर व जवळ असणारे (सर्वत्र असणारे) जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. ॥ १३६ ॥


अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदाचे निरंतर रहाणे आहे. ॥ १३७ ॥


अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली कार्यकारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. ॥ १३८ ॥


म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्मरूप यज्ञाचे साद्यंत आचरण करणार नाही ॥ १३९ ॥


जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे. असे समज. ॥ १४० ॥


जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना, त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत ॥ १४१ ॥


किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. ॥ १४२ ॥


म्हणून अर्जुना ऐक. आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया-वाचा-मने करून ह्या एकाचेच आचरण करावे. ॥ १४३ ॥


अरे, हे जे शरीर प्राप्त झाले आहे, ते तरी पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे ? ॥ १४४ ॥


अर्जुना, ऐक, मनुष्यशरीर मिळाले असता जे कर्मांचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. ॥ १४५ ॥


पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात गढलेला आसतो, तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. ॥ १४६ ॥


कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. ॥ १४७ ॥


पहा, ज्याप्रमाणे पोट भारल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. ॥ १४८ ॥


अर्जुना जोपर्यंत अंत:करणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. ॥ १४९ ॥


म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाग. ॥ १५० ॥


अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. ॥ १५१ ॥


पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. ॥ १५२ ॥


अर्जुना यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल. ॥ १५३ ॥


कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल. आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. ॥ १५४ ॥


पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळावले व म्हणून जे निरिच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता, कर्म करणे प्राप्त आहे. ॥ १५५ ॥


रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, आंधळ्यास सांभाळून घेऊन, त्याचे बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञान्याने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. ॥ १५६ ॥


असे जर (ज्ञानी पुरुषाने ) केले नाही तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल ? ॥ १५७ ॥


या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात, आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. ॥ १५८ ॥


अशी ही स्थिती असल्यामुळे (ज्ञानी पुरुषाने) कर्म सोडणे बरोबर नाही. (इतकेच काय पण) संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. ॥ १५९ ॥


अर्जुना, आता दुसर्‍याच्या गोष्टी कशाला सांगू ? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. ॥ १६० ॥


मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील ॥ १६१ ॥


तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तर्‍हेचे सामर्थ्य माझा अंगात आहे, हे तुला माहीत आहे. ॥ १६२ ॥


मी आपल्या गुरूचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. असा मी देखिल निपूटपणे कर्मे करत असतो. ॥ १६३ ॥


परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील, तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की – ॥ १६४ ॥


सर्व प्राणिसमूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे. तेव्हा तो भडकू नये म्हणून ॥ १६५ ॥


आम्ही निरीच्छ होऊन आपल्या स्वरूपस्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तर्‍हेने भवसागरातून पार पडेल ? ॥ १६६ ॥


यांनी आमच्या मार्गाकडे पहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे (आम्ही कर्म सोडून राहिलो तर) ती लोकांची रहाणीच बिघडेल. ॥ १६७ ॥


म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल, त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. ॥ १६८ ॥


पहा फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. ॥ १६९ ॥


कारण अर्जुना, लोकांचीही वागणूकीची रीत सर्व प्रकारे नेहेमी कायम ठेवणे योग्य आहे. म्हणून ॥ १७० ॥


शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य वागू नये. ॥ १७१ ॥


जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥


त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तर्‍हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही, त्यांना लीलेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. ॥ १७३ ॥


त्यास योग्य कर्माची वागणूक लाऊन द्यावी हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. ॥ १७४ ॥


लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही. ॥ १७५ ॥


बहुरूपी जेव्हा राजाराणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्रीपुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची यथास्थितपणे लोकात बतावणी करतात. (त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही.) ॥ १-१७६ ॥


अर्जुना, पहा, दुसर्‍याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का ? सांग बरं ॥ १७७ ॥


तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. ॥ १७८ ॥


अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वत:स मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्य़ास हे गूढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये. ॥ १७९ ॥


हे राहू दे, अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. ॥ १८० ॥


ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ॥ १८१ ॥


ते देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे, त्यांचे उल्लंघन करून, देहामध्ये उदासीनतेने रहातात. ॥ १८२ ॥


म्हणून सूर्याच्या प्रकशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात, तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्माने लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. ॥ १८३ ॥


या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मानी बद्ध होतो. ॥ १८४ ॥


गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसर्‍यांनी (गुणांनी) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो (तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो.) ॥ १८५ ॥


सर्व विहित कर्मे करून, ती तू मला अर्पण कर. परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. ॥ १८६ ॥


हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता, अथवा अमूक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस. ॥ १८७ ॥


तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. ॥ १८८ ॥


आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. ॥ १८९ ॥


या जगात तू आपली कीर्ती वाढव व आपल्या धर्माचा मान वाढव. आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. ॥ १९० ॥


आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस ॥ १९१ ॥


अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ॥ १९२ ॥


ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना, तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ॥ १९३ ॥


नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून, ते टाकून देतात ॥ १९४ ॥


जे याला एक साधारण गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पहातात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पितवाणी म्हणतात ॥ १९५ ॥


ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामधे फसलेले आहेत असे नि:संसय समज. ॥ १९६ ॥


पहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही ॥ १९७ ॥


किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. ॥ १९८ ॥


अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ॥ १९९ ॥


ते या उपदेशाला मानीत नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात. म्हणून त्यांना न सांगणेच बरे. सांग बरं, पतंग प्रकाशाला सहन करू श्कतील का ? ॥ २०० ॥


ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. ॥ २०१ ॥


म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियाचे लीलेने देखील लाड करू नयेत. ॥ २०२ ॥


अरे सापाबरोबर खेळता येईल काय ? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल काय ? सांग बरं. हालाहल विष प्याले तर पचेल काय ? ॥ २०३ ॥


पहा खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. ॥ २०४ ॥


अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या आधीन असणार्‍या शरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत ? ॥ २०५ ॥


आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूणएक खर्चून, रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी ? ॥ २०६ ॥


या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाचे पालनपोषण करावे, हे योग्य आहे काय ? ॥ २०७ ॥


मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत ? (म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा ?) ॥ २०८ ॥


म्हणून देहाचे पोषण करणे, हा उघड उघड घात आहे. याकरता तू देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस. ॥ २०९ ॥


एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल ॥ २१० ॥


परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणार्‍या चोराच्या संगतीप्रमाणे आहे, सभ्य दिसणारा चोर गावची शीव ओलांडली नाही तेथेपर्यंतच क्षणभर स्वस्थ असतो. (पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो). ॥ २११ ॥


बाबा, बचनागादि विषे गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंत:करणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल, तरीपण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस. कारण त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती घातक आहेत. ॥ २१२ ॥


पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते. ॥ २१३ ॥


परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, हे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे माशाला कळत नाही ॥ २१४ ॥


त्या विषयांच्या लालसेने तशीच स्थिती होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. ॥ २१५ ॥


जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहूकडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो ॥ २१६ ॥


येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत, असे समज. ॥ २१७ ॥


म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये. या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नासू देऊ नकोस. ॥ २१८ ॥


पहा, अरे आपला स्वत:चा धर्म आचरण्यास कठिण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. ॥ २१९ ॥


याहून दुसरा जो परकीयांचा आचार, तो खरोखर दिसावयास जरी चांगला असला तरी आचरण करणार्‍याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. ॥ २२० ॥


शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वान्ने आहेत, ती ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत ? सांग बरं ॥ २२१ ॥


अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी ? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी ? अथवा विचार कर, इच्छा जरी झाली, तरी त्याचे सेवन करावे काय ? ॥ २२२ ॥


दुसर्‍यांची सुंदर चुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात ? ॥ २२३ ॥


हे असू दे. आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाने तिच्याबरोबर संसार करावा हे चांगले. ॥ २२४ ॥


त्याप्रमाणे वाटेल तसा अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे. ॥ २२५ ॥


बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत. हे उघड आहे. पण जंताच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत ? ॥ २२६ ॥


असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाराचा तो आग्रहच उरेल. कारण अर्जुना, त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. ॥ २२७ ॥


म्हणून दुसर्‍यांना जे विहित, पण आपणास जे अकरणीय म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हे बरे. ॥ २२८ ॥


(फार काय?) या आपल्या धर्माचे आचरण करीत असता करी प्राण खर्ची पडले तरी तरीही इहपरलोकीच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. ॥ २२९ ॥


सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, माझी एक विनंती ऐका. ॥ २३० ॥


तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले. परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो. ॥ २३१ ॥


तर देवा, हे असे कसे की ज्ञान्यांचीही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. ॥ २३२ ॥


ज्यांना सर्व कळते व ज्याना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात ? ॥ २३३ ॥


आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी डोळासालाही कळात नाही, असे का व्हावे ? ॥ २३४ ॥


जे असलेल्या सर्व संगाचा त्याग करतात, तेच परत कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकात येऊन रहातात. ॥ २३५ ॥


आपण स्वत: पापांना चुकवण्याकरता लपून बसतात. तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा पयत्न करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. ॥ २३६ ॥


ज्यांचा मनापासून कंटाळा येतो, तेच अंत:करणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. ॥ २३७ ॥


अशी एक बळजबरी दिसून येते. हा येथे कोणाचा बलात्कार आहे ? हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. ॥ २३८ ॥


तेव्हा हृदयरूपी कमलामधे विश्रांती घेणारा व निरिच्छ झालेले योगी जेथे विश्रांती घेतात असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ऐक. ॥ २३९ ॥


तर बाबा (बलात्कार करणारे) हे काम व क्रोध आहेत. असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा अजिबात नाही. हे काम व क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत. असे समजले जाते. ॥ २४० ॥


हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत, हे विषयरूपी दर्‍यांमधे रहाणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे करणारे मांग आहेत. ॥ २४१ ॥


हे देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे कोठे मोठे दगड आहेत. हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत. यांचे अविवेकादिकाच्या रूपाने यांचे जगावर मोठे बंड आहे. ॥ २४२ ॥


हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालन पोषण अविचाराने केलेले आहे. ॥ २४३ ॥


हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केलेली आहे. ॥ २४४ ॥


ह्यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे. कारण की हे जीविताचे शत्रु आहेत. ॥ २४५ ॥


भूक लागली असता खाण्यास हे जग ज्यांना एका घासासही पुरत नाही अशा या कामक्रोधांचा जो (नशाकारक) व्यापार आहे त्या व्यापारावर देखरेख आशा करते. ॥ २४६ ॥


सहज मुठीत धरण्यास जिला चौदाही भुवने थोडी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची धाकटी बहीण आहे. ॥ २४७ ॥


जी खेळत असता त्रैलोक्यरूपी खाऊ सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे. ॥ २४८ ॥


हे असो. या कामक्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो तो अहंकार या कामक्रोधांपाशी देवघेव करतो. ॥ २४९ ॥


ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्या ऐवजी अकृत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात प्रसिद्धीस आणला. ॥ २५० ॥


या काम-क्रोधांनी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगीण सजवली. नंतर मग या अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट करवले. ॥ २५१ ॥


यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगाळून टाकली. ॥ २५२ ॥


यांनी संतोषरूपी अरण्य तोडून टाकले, व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. ॥ २५३ ॥


यांनी बोधरूपी रोपे उपटली, आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरवले. ॥ २५४ ॥


हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. व अंत:करणाला सारखे चिकटून राहिले आहेत. परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत, ॥ २५५ ॥


हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्तिज्ञानाच्या पंक्तीला रहातात, म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. ॥ २५६ ॥


हे पाण्यावाचून बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात. ॥ २५७ ॥


हे शस्त्रावाचून ठार करतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्यांची तर प्रतिज्ञापूर्वक मान कापतात. ॥ २५८ ॥


हे चिखलावाचून रोवतात व जाळ्यावाचून अडकवतात, हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाहीत. ॥ २५९ ॥


जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात, किंवा पोटात असणार्‍या गर्भाला वेष्टणाची गवसणी असते ॥ २६० ॥


अथवा प्रकाशावाचून सूर्य, धुरावाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो ॥ २६१ ॥


तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते ॥ २६२ ॥


तसे ज्ञान स्वभावत: निर्लेप आहे. परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले असते. म्हणून ते मिळण्यास कठिण झाले आहे. ॥ २६३ ॥


अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. ॥ २६४ ॥


उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सर्पण त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते. ॥ २६५ ॥


अशारीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्यात त्या सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात. ॥ २६६ ॥


असे हे काम व क्रोध जिंकण्याला कठिण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे. जर तो तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. ॥ २६७ ॥


तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिये आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर त्या इंद्रियांचेच पूर्णापणे दमन कर. ॥ २६८ ॥


मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. ॥ २६९ ॥


हे कामक्रोध अंत:करणातून पार गेले की ते नि:संशय नाहीसे झाले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ रहात नाही ॥ २७० ॥


तसे कामक्रोध जर नि:शेष गेले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो. ॥ २७१ ॥


गुरुशिष्यांच्या संवादात येणार्‍या विचाराने प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस. ॥ २७२ ॥


सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला, ‘हे राजा धृतराष्ट्रा ऐक; (असे संजय म्हणाला. ॥ २७३ ॥


आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करील, ॥ २७४ ॥


त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यांना ऐकण्याच्या सुखाची रेलचेल होईल. ॥ २७५ ॥


निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो, या कृष्णार्जुनांचा संवाद ऐका. ॥ २७६ ॥


ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगोनाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ॥