sarth-dnyaneshwari-adhyay-terava
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण ।
तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥ १ ॥
सर्व विद्यांचे अश्रयस्थन जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरूचे चरण होत. त्यांना नमस्कार करू. ॥१॥
जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे ।
सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ २ ॥
ज्या श्रीगुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टि स्वाधीन होते (म्हणजे शब्दमात्रावर प्रभुत्व येऊन, मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते) व सकल विद्या जिव्हेवर येतात. ॥२॥
वक्तृत्वा गोडपणें । अमृतातें पारुखें म्हणे ।
रस होती वोळंगणें । अक्शरांसी ॥ ३ ॥
वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात ॥३॥
भावाचें अवतरण । अवतरविती खूण ।
हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद ॥ ४ ॥
निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते. ॥४॥
श्रीगुरूंचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय ।
तैं येवढें भाग्य होय । उन्मेखासी ॥ ५ ॥
जेव्हा हृदय श्रीगुरूचे पाय धरून रहाते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. ॥५॥
ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता ।
लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥ ६ ॥
त्या श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करून (मी ज्ञानेश्वर, ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो ते असे) तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला. ॥६॥
श्रीभगवानुवाच
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला शरीराला ‘क्षेत्र’ असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला ‘क्षेत्रज्ञ’ असे क्षेत्रक्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात. ॥१॥
तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे ।
जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥
अर्जुना ऐक. या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. ॥७॥
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥ २ ॥
हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. ॥२॥
तरि क्षेत्रज्ञु जो एथें । तो मीचि जाण निरुतें ।
जो सर्व क्षेत्रांतें । संगोपोनि असे ॥ ८ ॥
तरी सर्व क्षेत्रांचे पालन असतो असा तो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज. ॥८॥
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणें जें निरुतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ॥ ९ ॥
क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. ॥९॥
तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे शृणु ॥ ३ ॥
ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर. ॥३॥
तरि क्षेत्र येणें नावें । हें शरीर जेणें भावें ।
म्हणितलें तें आघवें । सांगों अतां ॥ १० ॥
तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला, तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो. ॥१०॥
हें क्षेत्र का म्हणिजे । कैसें कें उपजे ।
कवणाकवणीं वाढविजे । विकारीं एथ॥ ११ ॥
याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते, ॥११॥
हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।
बरड कीं पिके । कोणाचें हें॥ १२ ॥
हे मोजके साडेतीन हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे ? हे क्षेत्र माळजमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे ? व कोणाच्या मालकीचे आहे ? ॥१२॥
इत्यादि सर्व । जे जे याचे भाव ।
ते बोलिजती सावेव । अवधान दें ॥ १३ ॥
इत्यादि जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील, तिकडे लक्ष दे. ॥१३॥
पैं याचि स्थळाकारणें । श्रुति सदा बोबाणे ।
तर्कु येणेंचि ठिकाणें । तोंडाळु केला ॥ १४ ॥
याच ठिकाणाकरता (क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता) वेदाची नेहेमी बडबड सुरू आहे व याच ठिकाणाने तर्काला वाटाघाट करावयास लावले. ॥१४॥
चाळिता हेचि बोली । दर्शनें शेवटा आलीं ।
तेवींचि नाहीं बुझविली । अझुनि द्वंद्वें ॥ १५ ॥
हीच (क्षेत्रनिर्णयाची) वाटाघाट करतांना सहा दर्शने हातटेकीस आली, तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत. ॥१५॥
शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें ।
याचेनि एकवंकें । जगासि वादु ॥ १६ ॥
शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एकनिश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहेत. ॥१६॥
तोंडेसीं तोंडा न पडे । बोलेंसीं बोला न घडे ।
इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥ १७ ॥
एकाचा निर्णय दुसर्याचे निर्णयाशी जुळता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसर्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. (उलट) त्या युक्तीने बडबडीला जोर आला आहे ॥१७॥
नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ ।
जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥ १८ ॥
हे क्षेत्र कोणाचे आहे, हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे, त्यास आपापल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे (माझाच निर्णय बरोबर आहे असा) त्याचे बल कसे आहे पहा, की या निर्णयासंबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतो. ॥१८॥
नास्तिका द्यावया तोंड । वेदांचें गाढें बंड ।
दे देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥ १९ ॥
नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करावयास लागले. ॥१९॥
म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिकें हें वाग्जाळ ।
ना म्हणसी तरी पोफळ । घातलें आहे ॥ २० ॥
तो पाखंडी वेदास असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ अहात व तुमवे शब्दपांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी (वेदानुयायी) म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी ठेवली आहे. (आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा). ॥२०॥
पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे ।
नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥ २१ ॥
पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा विधी करतात (व वेदोक्त कर्म मात्र निंदतात). त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात. ॥२१॥
मृत्युबळाचेनि माजें । हें जाल वीण काजें ।
तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥ २२ ॥
मृत्यूच्या तडाक्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. ॥२२॥
मृत्यूनि आधाधिले । तिहीं निरंजन सेविलें ।
यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥ २३ ॥
मृत्यूच्या योगाने भ्यायलेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे (वनात) यम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. ॥२३॥
येणेंचि क्षेत्राभिमानें । राज्य त्यजिलें ईशानें ।
गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला ॥ २४ ॥
या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू, या अभिमानाने व क्षेत्रनिर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. ॥२४॥
ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा ।
लांचकरू म्हणोनि कोळसा । कामु केला ॥ २५ ॥
या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास दाही दिशा पांघराव्या लागल्या (सर्व संग सोडावा लागला). व त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा (क्षेत्रनिर्णयाच्या आड पडणारा) लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकला. ॥२५॥
पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था ।
तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥ २६ ॥
ब्रह्मदेवाला असलेली चार मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याच्या जोरावर आली तरी त्यास क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. ॥२६॥
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४ ॥
हे (क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान) ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे. वेदातील बृहत्सामसूत्रांनी (ब्रह्मसूत्रांनी) व हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. ॥४॥
एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ ।
मग प्राण हें कूळ । तयाचें एथ ॥ २७ ॥
(येथून क्षेत्रासंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात). कित्येक जीववादी असे म्हणतात की ‘क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे. मग प्राण हे त्याचे कूळ आहे (जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना बैल, नांगर गडी वगैरे नसल्यामुळे त्याने क्षेत्र म्हणजे हे शेत प्राण या वाईट कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना आहे, तो पुढे सांगतात). ॥२७॥
जे प्राणाचे घरीं । अंगें राबती भाऊ चारी ।
आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकरु ॥ २८ ॥
कारण प्राणाच्या घरि अंगाने मेहनत करणारे चार भाऊ (अपान, व्यान, उदान व समान हे चार वायु) आहेत आणि मनासारखा (चपल कारभारी) शेतीचा कारभार करणारा आहे. ॥२८॥
तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अंवसीं पाहाटीं ।
विषयक्षेत्रीं आटी । काढी भली ॥ २९ ॥
त्या प्राणाकवळ इंद्रियरूपी बैलांचा समुदाय आहे. तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही, आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. ॥२९॥
मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बीज वाफवी ।
कुकर्माचा करवी । राबु जरी ॥ ३० ॥
मग कर्तव्याची वाफ चुकवून (विहित कर्माची संधी सोडून) आणि अन्यायाचे बीज पेरवून (श्रुति आज्ञेचे उल्लंघन करून, न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून) कुकर्मरूपी सर्व (पेरणीपासून तो मळणीपर्यंत) आटोकाट मेहनत जर त्याने करवली ॥३०॥
तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके ।
मग जन्मकोटी दुःखें । भोगी जीवु ॥ ३१ ॥
तर तो बीज पेरतो, त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म-दु:खे भोगतो. ॥३१॥
नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे ।
तरी जन्मशताचीं मापें । सुखचि मवीजे ॥ ३२ ॥
अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडो जन्मांच्या मापाने सुखच मोजावे. (म्हणजे शेकडों जन्म सुख भोगावे. एवढे अचाट पीक येते). ॥३२॥
तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें ।
आमुतें पुसा आघवें । क्शेत्राचें या ॥ ३३ ॥
(येथून प्रकृतिवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात) त्यावर कित्येक (प्रकृतिवादी) म्हणतात की “तुम्ही (जीववादी) म्हणता ते बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा. ॥३३॥
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां ।
आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
अहो, जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो. (क्षेत्राचे संरक्षण करतो). ॥३४॥
अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती ।
क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ॥ ३५ ॥
अनादि जी प्रकृति जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज. ॥३५॥
आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा ।
म्हणौनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥ ३६ ॥
आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे. म्हणून (शेत बटाईने न देता) ही शेत घरीच वाहाते. ॥३६॥
वाह्याचिये रहाटी । जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं ।
ते इयेच्याचि पोटीं । जहाले गुण ॥ ३७ ॥
या जगात हे क्षेत्र वाहण्याचे कामी मुख्य खटपट करणारे जे तीन गुण (सत्व, रज व तम) हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. ॥३७॥
रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी ।
मग एकलें तम करी । संवगणी ॥ ३८ ॥
(प्रकृतीने तीन कामे या तिघांकडे नेमून दिली आहेत. ती येणे प्रमाणे) – रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो व एकटा तमोगुण काढणी करतो. (कापणी करतो) ॥३८॥
रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें ।
तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥ ३९ ॥
(आणि मग हा तमोगुण) महत्तत्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. तेव्हा तेथे (त्या महतत्वाचे खळ्यात) सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. (याप्रमाणे प्रकृति ही क्षेत्राचा उपभोग घेते. ॥३९॥
तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं ।
म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना ॥ ४० ॥
(येथून संकल्पवादी मताचा अनुवाद करतात). तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी (संकल्पवाद्यांनी) या प्रकृतिवाद्यांच्या बोलण्याचे दु:ख वाटून म्हटले की, “हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. ॥४०॥
हां हो परतत्त्वाआंतु । कें प्रकृतीची मातु ।
हा क्षेत्र वृत्तांतु । उगेंचि आइका ॥ ४१ ॥
अहो, परब्रह्म स्वरूपाचे ठिकाणी (तुमच्या) या प्रकृतीची गोष्ट कोठे आहे ? तर या क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो. ती तुम्ही निवांतपणे ऐका. ॥४१॥
शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये ।
निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें ॥ ४२ ॥
शून्य जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामधे पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. ॥४२॥
तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला ।
म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशें ॥ ४३ ॥
तो (संकल्प) एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामधे चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास (त्रिभुवनरूपी) ठेवा प्राप्त झाला. ॥४३॥
निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी ।
हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥ ४४ ॥
निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवनाएवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दशेला आला. ॥४४॥
मग महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट ।
भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥ ४५ ॥
जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली (अपंचीकृत) महाभूतरूपी पडजमीन (पंचीकरणरूप) मशागतीने सारखी करून स्वेदजादि प्राणिवर्गाच्या चार हद्दी कायम केल्या. ॥४५॥
यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी ।
बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ॥ ४६ ॥
या नंतर प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीरे तयार केली. ॥४६॥
कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे ।
नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥ ४७ ॥
मनुष्य शरीररूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर्कांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळजमिनीची राने (सुपीक जमीन) तयार केली. ॥४७॥
तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी ।
सुहाविली निलागी । संकल्पें येणें ॥ ४८ ॥
त्या रानात येण्या-जाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे जाणार नाही, असे जन्म-मृत्युरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले. ॥४८॥
मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी ।
वहाविलें बुद्धि । चराचर ॥ ४९ ॥
मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथेपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करविली. ॥४९॥
यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी ।
म्हणौनि तो मुळीं । प्रपंचा यया ॥ ५० ॥
याप्रमाणे निराळी (परब्रह्मस्वरूपी) संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे”. ॥५०॥
यापरी मत्तमुगुतकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं ।
म्हणती हां हो विवेकीं । कैसें तुम्ही ॥ ५१ ॥
याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे हे स्वभाववादी, त्यांनी दाबले. ते म्हणाले, ‘अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. ॥५१॥
परतत्त्वाचिया गांवीं । संकल्पसेज देखावी ।
तरी कां पां न मनावी । प्रकृति तयाची ? ॥ ५२ ॥
परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज (लीन-अवस्था) जर मानावयाची, तर प्रकृतिवाद्यांची प्रकृति ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये ? ॥५२॥
परि असो हें नव्हे । तुम्ही या न लगावें ।
आतांचि हें आघवें । सांगिजैल ॥ ५३ ॥
पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्रनिर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व (आमच्याकडून) सांगण्यात येईल. ॥५३॥
तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें ।
अंतरिक्ष तारांगणें । धरी कवण ? ॥ ५४ ॥
तर आकाशामधे मेघात पाणी कोणी भरले ? पोकळीत तार्यांचे समूह कोणी धारण केले ? ॥५४॥
गगनाचा तडावा । कोणें वेढिला केधवां ।
पवनु हिंडतु असावा । हें कवणाचें मत ? ॥ ५५ ॥
आकाशाचे छत कोणी व कधी उभविले ? वार्याने नेहेमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा ? ॥५५॥
रोमां कवण पेरी । सिंधू कवण भरी ।
पर्जन्याचिया करी । धारा कवण ? ॥ ५६ ॥
(शरीरावरील) केसांची पेरणी कोण करतो ? समुद्र कोण भरतो ? पावसाच्या धारा कोण करतो ? ॥५६॥
तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे ।
हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥ ५७ ॥
त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावत:च झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील (त्याला जो नीटनेटके जपेल) त्यासच हे उपभोगास मिळते. व इतरांना मिळत नाही. ॥५७॥
तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें ।
तरी भोगिजे एकें । काळें केवीं हें ? ॥ ५८ ॥
असे स्वभाववादी बोलले, तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले, “हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा ! तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो ? ॥५८॥
तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु ।
परी स्वमतीं भरु । अभिमानियां ॥ ५९ ॥
मृत्युरूपी रागीट सिंहाची (क्षेत्र हे) दरी आहे असे आम्हास वाटते. पण या निराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल काय ? ॥५९॥
हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा ।
परी काय वांजटा । पूरिजत असे ? ॥ ६० ॥
तर या कुळाचा अनिवार तडाखा पहातात, परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो. ॥६०॥
महाकल्पापरौतीं । कव घालूनि अवचितीं ।
सत्यलोकभद्रजाती । आंगीं वाजे ॥ ६१ ॥
या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा रहाण्याचा जो सत्यलोक त्या सत्यलोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेट घात वाजतो. ॥६१॥
लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे ।
स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी ॥ ६२ ॥
हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे नवे लोकपाल व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. ॥६२॥
येर ययाचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्तें ।
निर्जिवें होऊनि भ्रमतें । जीवमृगें ॥ ६३ ॥
या काळरूपी सिंहाच्या आंगच्या वार्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन (नि:सत्व होऊन) जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत रहातात. ॥६३॥
न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा ।
जो करूनियां माजिवडा । आकारगजु ॥ ६४ ॥
सर्व आकारमात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामधे धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे ? पहा. ॥६४॥
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता ।
ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥
म्हणून कालाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे.” (असे काळवादी म्हणतात). अर्जुना असे हे क्षेत्राविषयीचे वाद आहेत. ॥६५॥
हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं ।
पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ॥ ६६ ॥
नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्रसंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. या विषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत. ॥६६॥
अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जें विविधें ।
ते पत्रावलंबन मदें । करिती अझुनी ॥ ६७ ॥
अनुष्टुप् छंदादि जी निरनिराळ्या प्रकारची (या क्षेत्रासंबंधी) काव्यरचना आहे, ती ज्या ग्रंथात आहे, त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात. ॥६७॥
वेदींचें बृहत्सामसूत्र । जें देखणेपणें पवित्र ।
परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि ॥ ६८ ॥
ऋग्वेदातील जे बृहत्सामसूक्त आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे. (त्यामधे पुष्कळ ज्ञान भरलेले आहे). तथापि ह्या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही. ॥६८॥
आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं ।
ययालागीं मती । वेंचिलिया ॥ ६९ ॥
आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी (मोठ्या ज्ञात्यांनी) या क्षेत्रनिर्णयाकरता आपल्या बुद्धि खर्च केल्या. ॥६९॥
परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें ।
हें कोणाही वरपडें । होयचिना ॥ ७० ॥
परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा हे अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळलेले नाही. ॥७०॥
आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे ।
तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥ ७१ ॥
आता अर्जुना यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो. ॥७१॥
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥
पाच महाभूते, अहंकार, बुद्धि, अव्यक्त (मूलप्रकृति) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादि दहा विषय, ॥५॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥
इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. ॥६॥
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु ।
बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥ ७२ ॥
तर पाचमहाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धि, अव्यक्त, दहा इंद्रियांचा समुदाय ॥७२॥
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु ।
सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥ ७३ ॥
आणखी एक मन, दहा विषयांचा समुदाय, सुख, दु:ख, द्वेष, संघात, इच्छा ॥७३॥
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती ।
सांगितली तुजप्रती । आघवीची ॥ ७४ ॥
याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले. ॥७४॥
आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे ।
हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥ ७५ ॥
आता महाभूते कोणती व विषय कोणते ते एकेक निरनिराळे सांगतो. ॥७५॥
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज ।
सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥ ७६ ॥
तर पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज. ॥७६॥
आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे ।
नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥ ७७ ॥
आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावास्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो ॥७७॥
नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं ।
कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥ ७८ ॥
अथवा लहान बालकांमधे तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो ॥७८॥
किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी ।
तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥ ७९ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, लाकडामधे अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार गुप्त असतो ॥७९॥
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु ।
मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥ ८० ॥
ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमधे गुप्त असलेला ज्वर (हाडी ज्वर) प्रगट होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पहात बसतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो ॥८०॥
तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे ।
तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर (पंचीकरण झाल्यावर) ज्यावेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्या वेळेस देहाला चोहोकडे नाचवतो (कर्म करण्यास लावतो) तो अहंकार होय. ॥८१॥
नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।
सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥
अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. ती अशी की अहंकार हा विशेषे करून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. ॥८२॥
आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशियां चिन्हीं जाणिजे ।
बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥ ८३ ॥
आता बुद्धि जी म्हणावयाची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी. ती सांगतो ऐक. असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. ॥८३॥
तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें ।
विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥ ८४ ॥
तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात. ॥८४॥
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणों लागे जीवा ।
तेथ दोहींसी बरवा । पाडु जे धरी ॥ ८५ ॥
त्या सुख-दु:खांच्या लुटीचा अंत:करण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते, तेव्हा सुख व दु:ख या दोहोंविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते ॥८५॥
हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष ।
कां हें मैळ हें चोख । ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥
हे सुख, हे दु:ख, हे पुण्य, हे पाप अथवा हे शुद्ध, हे अशुद्ध याप्रमाणे जी निवड करते, ॥८६॥
जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे ।
जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥ ८७ ॥
जिला निंद्य व उत्तम कळते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, ॥८७॥
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी ।
जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥ ८८ ॥
जी ज्ञान या पदार्थाचे उत्पत्तिस्थान आहे, जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत रहाते ॥८८॥
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण ।
आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥ ८९ ॥
अर्जुना, ती सर्व बुद्धि होय असे तू समज. आता अव्यक्ताचे चिन्ह ऐक. ॥८९॥
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती ।
तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥ ९० ॥
हे महामते अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतांमधे जी प्रकृति म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. ॥९०॥
आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें ।
ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥ ९१ ॥
आणि संख्यानामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृति ऐकवली. (तेव्हा) परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे (अध्याय ७ श्लोक ४ व ५) तुला प्रकृतीची फोड करून सांगितली ॥९१॥
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा ।
येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥ ९२ ॥
तेथे त्या पैकी दुसरी परा म्हणजे जीवदशानामक प्रकृति आहे, अर्जुना तिला अव्यक्त असे नाव आहे. ॥९२॥
तर्हीव पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं ।
कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया ॥ ९३ ॥
(जीवरूपा प्रकृतीला अव्यक्त का म्हणावयाचे ते इथे स्पष्ट करून सांगतात) तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे जसे व्यवहार थांबतात ॥९३॥
नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी ।
उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या ॥ ९४ ॥
अथवा अर्जुना देह गेल्यावर देहादिक उपाधी केलेल्या कर्मांच्या पोटात लीन होऊन असते ॥९४॥
कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु ।
कां वस्त्रपणे तंतु- । दशे राहे ॥ ९५ ॥
अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीनरूपाने असते, किंवा वस्त्रपण तंतुरूपाने रहाते ॥९५॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम ।
लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥ ९६ ॥
त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात ॥९६॥
अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें ।
आतां आइकें आघवें । इंद्रियभेद ॥ ९७ ॥
अर्जुना, ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक. ॥९७॥
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन ।
इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥ ९८ ॥
तर कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत असे समज. ॥९८॥
इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखांची उखिविखी ।
बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥ ९९ ॥
या छत्तीस तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या पाच इंद्रियांच्या द्वाराने सुखादु:खाची वाटाघाट करते. ॥९९॥
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार ।
पायु हे प्रकार । पांच आणिक ॥ १०० ॥
नंतर वाचा (जीभ), हात, पाय, उपस्थ व गुद हे आणखी पाच इंद्रियांचे प्रकार आहेत. ॥१००॥
कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती ।
आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥ १०१ ॥
कर्मेंद्रिये ज्यास म्हणतात ती ही समज. असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना, ऐक. ॥१०१॥
पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं ।
तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥ १०२ ॥
शरीरामधे क्रियाशक्ति म्हणून जी प्राणाची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे या पाच द्वारांनी होते. याप्रमाणे दहाही इंद्रिये सांगितली, असे देव म्हणतात.
एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे ।
परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥ १०३ ॥
आता मन हे अशा प्रकारचे आहे. ते निश्चयाने ऐक. ॥१०२॥
जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं ।
रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ॥ १०४ ॥
जे मन इंद्रिये आणि बुद्धि यांच्या मधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर (आश्रयावर) चंचलपणे असते, ॥१०४॥
नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी ।
तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ॥ १०५ ॥
आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळातील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो, ॥१०५॥
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा ।
वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ १०६ ॥
आणखी रेत व रक्त यांचा मिलाफ झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे (त्या शरीरात) एकच वायुतत्व स्थानभेदेकरून (पंचप्राण व पंच उपप्राण असे) दहा प्रकारचे झाले. ॥१०६॥
मग तिहीं दाहे भागीं । देहधर्माच्या खैवंगीं ।
अधिष्ठिलें आंगीं । आपुलाल्या ॥ १०७ ॥
मग त्या दहा भागांनी (दहा प्रकारच्या वायूंनी) देहधर्माच्या बळकटीने (त्या त्या प्राण्याच्या) शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या, त्या जागांचा आश्रय केला. ॥१०७॥
तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ ।
म्हणौनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥ १०८ ॥
त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे (आश्रयरहित) राहिले, म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बल धरले. (आश्रय केला). ॥१०८॥
तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी ।
ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥ १०९ ॥
ते (चांचल्य) बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धि व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले. ॥१०९॥
वायां मन हें नांव । एर्हवीं कल्पनाचि सावेव ।
जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥ ११० ॥
त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व ज्या मनाच्या संगतीने वस्तूला (ब्रह्माला) जीवदशा प्राप्त झाली आहे. ॥११०॥
जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ ।
जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥ १११ ॥
जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बल आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवते ॥१११॥
जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी ।
जें पाठी पुरवी । भयासि गा ॥ ११२ ॥
जे इच्छेला वाढवते, आशेला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते ॥११२॥
द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी ।
जें इंद्रियांतें लोटी । विषयांमजी ॥ ११३ ॥
जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे, ज्यायोगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलते ॥११३॥
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी ।
मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ११४ ॥
जे आपल्या संकल्पाने सृष्टि बनवते व लागलीच विकल्पाने मोडते, आणि मनोरहांच्या उतरंडी उतरते व रचते ॥११४॥
जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर ।
बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
जे भ्रांतीचे कोठार आहे व जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे, ॥११५॥
तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन ।
आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥ ११६ ॥
अर्जुना, ते मन होय. यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक. ॥११६॥
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु ।
हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥
तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत. ॥११७॥
इहीं पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु ॥ ११८ ॥
या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे ? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामधे जनावरे भांबावतात (तसे ज्ञान भांबावते). ॥११८॥
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु ।
संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥ ११९ ॥
मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मुत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे ॥११९॥
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच ।
जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥ १२० ॥
हे पाच कर्मेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत. व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू रहातो. ॥१२०॥
ऐसे हे दाही । विषय गा इये देहीं ।
आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥ १२१ ॥
याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. व आता इच्छा काय, तेही सांगण्यात येईल. ॥१२१॥
तरि भूतलें आठवे । कां बोलें कान झांकवे ।
ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती ॥ १२२ ॥
तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसर्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ति जागी होते ॥१२२॥
इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच जे गा उठी ।
कामाची बाहुटी । धरूनियां ॥ १२३ ॥
इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते ॥१२३॥
जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें ।
न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥ १२४ ॥
जी वृत्ति उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात, ॥१२४॥
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी ।
विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥ १२५ ॥
ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा (असे तू समज). ॥१२५॥
आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे ।
तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥ १२६ ॥
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ति, तिला द्वेष असे म्हणतात. ॥१२६॥
आतां यावरी सुख । तें एवंविध देख ।
जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु ॥ १२७ ॥
आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो, ॥१२७॥
मना वाचे काये । जें आपुली आण वाये ।
देहस्मृतीची त्राये । मोडित जें ये ॥ १२८ ॥
जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, (व्यापार बंद करते) आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते, ॥१२८॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें ।
सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥ १२९ ॥
जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा (शांत) होतो व सात्विकवृत्ति पूर्वीपेक्षा दुपटीचे वर चढत जाते, ॥१२९॥
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांतीं ।
थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ॥ १३० ॥
आणि अर्जुना, जे सर्व इंद्रियवृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून निद्रा आणते ॥१३०॥
किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे ।
तेथ जें होये । तया नाम सुख ॥ १३१ ॥
फार काय सांगावे ? जीवाला आत्म्याचा लाभ (ऐक्य) जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते त्य़ा स्थितीला सुख हे नाव आहे. ॥१३१॥
आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था ।
जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥ १३२ ॥
आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज. ॥१३२॥
तें मनोरथसंगें नव्हे । एर्हणवीं सिद्धी गेलेंचि आहे ।
हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥ १३३ ॥
ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी (मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की) ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय (मनाची स्थिरता व मनाची चंचलता) सुखदुखाला कारणीभूत आहेत. ॥१३३॥
आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता ।
तिये नाम पंडुसुता । चेतना येथें ॥ १३४ ॥
अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामधे जी सत्ता आहे, तिला येथे चेतना हे नाव आहे. ॥१३४॥
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं ।
जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥ १३५ ॥
जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहेमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही, ॥१३५॥
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं ।
प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥ १३६ ॥
मन व बुद्धि जिच्या योगाने प्रसन्न असतात. व जी नेहेमी प्रकृति – (शरीर) रूपी वनाचा वसंतऋतु आहे, ॥१३६॥
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी ।
ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही. ॥१३७॥
पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे ।
कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥ १३८ ॥
आपला लवाजमा वगैरे किती आहे जे राजास ठाऊक नसताही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण कराते, अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते) ॥१३८॥
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन ।
कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ १३९ ॥
अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते (हालचाल करावयास लावते) अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते, ॥१३९॥
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण ।
करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥ १४० ॥
अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते ॥१४०॥
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं ।
सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥ ४१ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगति ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, (म्हणजे जडाला चेतनदशेला आणते). ॥१४१॥
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना ।
आतां धृतिविवंचना । भेदु आइक ॥ १४२ ॥
याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशेला आणल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना’ असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक. ॥१४२॥
तरी भूतां परस्परें । उघड जाति स्वभाववैरें ।
नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ? ॥ १४३ ॥
तर पंचमहाभूतांमधे एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय ? ॥१४३॥
नीरातें आटी तेज । तेजा वायूसि झुंज ।
आणि गगन तंव सहज । वायू भक्षी ॥ १४४ ॥
पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज (स्वभावत:च) वायूला नाहीसा करते. ॥१४४॥
तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे ।
आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें ॥ १४५ ॥
त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमधे शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपत: अलग असते ते हे आकाश होय. ॥१४५॥
ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें ।
कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती ॥ १४६ ॥
अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत, असे त्यांचे स्वभावत: वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात. ॥१४६॥
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं ।
एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥ १४७ ॥
म्हणजे द्वंद्वाची उखीविखी (वैराविषयी वादविवाद) सोडून एकोप्याने रहातात. इतकेच नाही तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्याला पोषित असतो. ॥१४७॥
ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें ।
तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥ १४८ ॥
याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति असे मी म्हणतो. ॥१४८॥
आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा ।
तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥ १४९ ॥
आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तिसावे संघात नावाचे तत्व जाणावे. ॥१४९॥
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद ।
यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥
याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात हे प्रसिद्ध आहे. ॥१५०॥
रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा ।
कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥ १५१ ॥
चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते, ॥१५१॥
करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे ।
कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥ १५२ ॥
हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात ॥१५२॥
कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा ।
नाना लोकां सकळां । नाम जग ॥ १५३ ॥
अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते, ॥१५३॥
कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४ ॥
अथवा तेल, वात व अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो, ॥१५४॥
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें ।
तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥
त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. ॥१५५॥
आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके ।
म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो. ॥१५६॥
आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें ।
परी असो हें अनंतें । नामें यया ॥ १५७ ॥
कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत. ॥१५७॥
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।
जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय. ॥१५८॥
परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं ।
तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें ॥ १५९ ॥
परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. ॥१५९॥
हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना ।
प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥ १६० ॥
अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे (अध्याय १४ मधे) सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो. ॥१६०॥
क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार ।
म्हणौनि आतां उदार । ज्ञान आइकें ॥ १६१ ॥
क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक. ॥१६१॥
जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी ।
स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥ १६२ ॥
ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात. (म्हणजे मूर्ध्निआकाशाचा लय करतात). ॥१६२॥
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड ।
योगा{ऐ}सें दुवाड । हेळसिती ॥ १६३ ॥
(ज्या ज्ञानाकरता योगी) सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची परवा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. ॥१६३॥
तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित ।
उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥ १६४ ॥
(ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक) तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यावधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापलथ करून (आचरण करून) त्याचा त्याग करतात. ॥१६४॥
नाना भजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं ।
एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥
अथवा (ज्या ज्ञानाकरता) कित्येक उघड्या अंगांनी (अंतर्बाह्य अंतर्बाह्य परिग्रह टाकून) भजनमार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात. ॥१६५॥
ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही ।
वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥ १६६ ॥
याप्रमाणे मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात (म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात) ॥१६६॥
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा ।
जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥ १६७ ॥
अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, (जन्मभर गुरुसेवा करतात). ॥१६७॥
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी ।
जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥ १६८ ॥
ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो, ॥१६८॥
जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी ।
जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥ १६९ ॥
जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते ॥१६९॥
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये ।
जया ज्ञानाची सोये । ऐसें करी ॥ १७० ॥
द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते ॥१७०॥
मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी ।
नेदी आपपरु ऐसी । भाष उरों ॥ १७१ ॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) आपले आणि दुसर्याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही, ॥१७१॥
जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी ।
अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥
अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठिण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टकते. ॥१७२॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें ।
जयाचेनि विंदाणें । जग हें चेष्टें ॥ १७३ ॥
जे प्राप्त झाले असतां प्राण पांगुळा होतो (इंद्रियांकडून विषयभोग मिळविण्याची त्याची हांव बंद होते) व ज्याच्या सत्तेनें सर्व जगांतील व्यापार चालत असतात. ॥१७३॥
जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे ।
जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥ १७४ ॥
ज्या ज्ञानाच्या प्रकशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो ॥१७४
ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान ।
जेथ विटाळलें मन । चोख कीजे ॥ १७५ ॥
असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे, व जेथे (जे प्राप्त झाले असता) (विषयाने) विटाळलेले मन शुद्ध करता येते ॥१७५॥
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी ।
ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥ १७६ ॥
देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो ॥१७६॥
तें अनिरूप्य कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे ।
वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥ १७७ ॥
ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर (ज्ञान बुद्धीला जाणता येईल. त्याशिवाय डोळ्यांनी पहाता येईल असे ते ज्ञान नाही. ॥१७७॥
मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी ।
तैं इंद्रियांचिया व्यापारीं । डोळांहि दिसे ॥ १७८ ॥
मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ति प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. ॥१७८॥
पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें ।
जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात. ॥१७९॥
अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं ।
तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १८० ॥
अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमधे पाणी सापडते. (ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही) तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते. ॥१८०॥
कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव ।
नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥ १८१ ॥
अथवा अंकुराचा लुसलुशितपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो. ॥१८१॥
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्तिइ ।
कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष ॥ १८२ ॥
अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणार्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो. ॥१८२॥
नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला ।
कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके ॥ १८३ ॥
अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो ॥१८३॥
तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें ।
तियें सांगों आतां अवधानें । चागें आइक ॥ १८४ ॥
त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक. ॥१८४॥
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥
अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धि, स्थैर्य, अंत:करणनिग्रह – ॥७॥
तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे ।
संभावितपणाचें । वोझे जया ॥ १८५ ॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी न करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते ॥१८५॥
आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां ।
योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥ १८६ ॥
त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर, ॥१८६॥
तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा ।
कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं ॥ १८७ ॥
त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता, तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्यात सापडावा ॥१८७॥
पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे ।
गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥ १८८ ॥
अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही ॥१८८॥
पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।
हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥ १८९ ॥
आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ति आपण कानांनी ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये ॥१८९॥
तेथ सत्काराची कें गोठी । कें आदरा देईल भेटी ।
मरणेंसीं साटी । नमस्कारितां ॥ १९० ॥
असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे ? (म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल ?) असा मनुष्य आदराला भेट कशी देईल ? (म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल ? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. ॥१९०॥
वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे ।
परी वेडिवेमाजीं दडे । महमेभेणें ॥ १९१ ॥
बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो. ॥१९१॥
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी ।
पिसेपण मिरवी । आवडोनि ॥ १९२ ॥
आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो. व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो. ॥१९२॥
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु ।
उगेपणीं चांगु । आथी भरु ॥ १९३ ॥
लोकात होणार्या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो ॥१९३॥
जगें अवज्ञाचि करावी । संबंधीं सोयचि न धरावी ।
ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥ १९४ ॥
लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये (आपल्या नादी लागू नये) अशा प्रकारची ज्याच्या जीवामधे फार इच्छा असते ॥१९४॥
तळौटेपण बाणे । आंगीं हिणावो खेवणें ।
तें तेंचि करणें । बहुतकरुनी ॥ १९५ ॥
ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्या त्याच गोष्टी बहुतेक तो करतो. ॥१९५॥
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें ।
तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥ १९६ ॥
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. ॥१९६॥
पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे ।
जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥ १९७ ॥
पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते. ॥१९७॥
माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो ।
मज झणें वासिपो । भूतजात ॥ १९८ ॥
माझ्या असतेपणाचा लोप व्हावा (म्हणजे मी एक अमूक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये). माझे नाव व रूप नाहीसे व्हावे (म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्य़ासमोर येऊ नये), कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील तर तसे होऊ नये ॥१९८॥
ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये ।
नामेंचि जो जिये । विजनाचेनि ॥ १९९ ॥
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो (म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो). ॥१९९॥
वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे ।
जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥ २०० ॥
वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो). व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात. ॥२००॥
किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी ।
जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥ २०१ ॥
फार काय सांगावे ? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरुण झाले आहे असे तू समज. ॥२०१॥
पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं ।
आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥ २०२ ॥
साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो. ॥२०२॥
तरी अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें ।
जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥ २०३ ॥
तर ऐक. अदंभित्व असे आहे. ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला अरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही. ॥२०३॥
तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं ।
तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें ॥ २०४ ॥
अर्जुना त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही. ॥२०४॥
खडाणें आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना ।
कां लपवी पण्यांगना । वडिलपण ॥ २०५ ॥
खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने रहाते काय ? (तर नाही, मग ती आपले उतार वय झाकते). ॥२०५॥
आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता जेवीं हारवी ।
नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें ॥ २०६ ॥
श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते, ॥२०६॥
नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।
तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥ २०७ ॥
अथवा शेतकरी पेरलेले बीज (जसे माती टाकून झाकतो ॥२०७॥
वरिवरी देहो न पूजी । लोकांतें न रंजी ।
स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे ॥ २०८ ॥
वरवर देहाची पूजा करत नाही, (लोकांना फासवणारा बाह्यवेष धारण करून देहाला सजवीत नाही), व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. (आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही). ॥२०८॥
परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥ २०९ ॥
आपण दुसर्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही (वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही, ॥२०९॥
शरीर भोगाकडे । पाहतां कृपणु आवडे ।
एर्हवीं धर्मविषयीं थोडें । बहु न म्हणे ॥ २१० ॥
तो आपल्या शरीराला जे (विषय) भोग देतो त्यावरून (त्याच्या उदारपणाचा) अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. याशिवाय धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही. ॥२१०॥
घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड ।
परी दानीं जया होड । सुरतरूसीं ॥ २११ ॥
घरामधे सर्व गोष्टींची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. ॥२११॥
किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु ।
आत्मचर्चे चतुरु । एर्हुवी वेडा ॥ २१२ ॥
फार काय सांगावे ? स्वधर्मामधे तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. एरवी (इतर गोष्टीत तो वेडा असतो. ॥२१२॥
केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे ।
परी फळोनियां गाढें । रसाळ जैसें ॥ २१३ ॥
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते. ॥२१३॥
कां मेघांचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल ।
परी वर्षती नवल । घनवट तें ॥ २१४ ॥
अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात. ॥२१४॥
तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी ।
एर्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥ २१५ ॥
त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, (त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे. ॥२१५॥
हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या ।
जाण ज्ञान तयाच्या । हातां चढें ॥ २१६ ॥
हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याचे ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. ॥२१६॥
पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण ।
आतां आईक खूण । अहिंसेची ॥ २१७ ॥
अर्जुना अदंभपण ते हे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक. ॥२१७॥
तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं ।
आपुलालिया मतांतरीं । निरूपिली ॥ २१८ ॥
आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करतांना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. ऐक. ॥२१८॥
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा ।
मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥ २१९ ॥
परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी (त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे. ॥२१९॥
कां बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे ।
नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥ २२० ॥
किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी, अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी. ॥२२०॥
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा ।
पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥ २२१ ॥
त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने केला आहे. ॥२२१॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें ।
म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥ २२२ ॥
पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्येष्टी यज्ञ करावेत ॥२२२॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी ।
मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ? ॥२२३॥
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? ।
परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥ २२४ ॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय ? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे. ॥२२४॥
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥ २२५ ॥
आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो. ॥२२५॥
नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं ।
ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥ २२६ ॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली. ॥२२६॥
तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले ।
एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥ २२७ ॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडांचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले. ॥२२७॥
एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली ।
एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं ॥ २२८ ॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला.) काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्य़ाच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या ॥२२८॥
अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा ।
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥ २२९ ॥
(ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्या झाडांना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले. ॥२२९॥
आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त ।
मग राखिले शिणत । आणिक जीव ॥ २३० ॥
आणि हालचाल करणार्या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्या जीवांचे रक्षण केले. ॥२३०॥
अहो वसतीं धवळारें । मोडूनि केलीं देव्हारें ।
नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ॥ २३१ ॥
अहो रहाती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून, लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले. ॥२३१॥
मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें ।
घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥ २३२ ॥
डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले ॥२३२॥
नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें ।
जालें आंगधुणें । कुंजराचें ॥ २३३ ॥
अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंगधुणे झाले (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो) ॥२३३॥
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा ।
इया करणी कीं चेष्टा ? । काइ हसों ॥ २३४ ॥
बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात ? का याला हसावे ? ॥२३४॥
एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी ।
तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥ २३५॥
कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले. ॥२३५॥
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण ।
तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥ २३६ ॥
कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय. ॥२३६॥
एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडीं हा ऐसा ।
सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥ २३७ ॥
याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव. ॥२३७॥
पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव ।
तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥ २३८ ॥
जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली, ॥२३८॥
तरि कैसेनि इयेतें गाळावें । म्हणौनि पडिलें बोलावें ।
तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥ २३९ ॥
तर या मतांना कसे गाळावे ? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याच प्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतु होता. ॥२३९॥
बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी ।
एर्हवी कां आडवाटीं । धाविजैल गा ? ॥ २४० ॥
अर्जुना, बहुतकरून या अहिंसे संबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच (वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा) विषय आढळतो. (म्हणून आम्ही त्याची चर्चा केली). नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते ? ॥२४०॥
आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा ।
प्राप्तां मतांतरां । निर्वेचु कीजे ॥ २४१ ॥
आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे. ॥२४१॥
ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी ।
आतां ययावरी । मुख्य जें गा ॥ २४२ ॥
याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धति आहे असे समज. आता अर्जुना, यानंतर मुख्य जे ॥२४२॥
तें स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल ।
जेणें उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥ २४३ ॥
ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता त्या ज्ञान आहे असे दिसेल. ॥२४३॥
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें । जाणिजे आचरतेनि बगें ।
जैसी कसवटी सांगे । वानियातें ॥ २४४ ॥
पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा रहात आहे असे जाणले जाते. ॥२४४॥
तैसें ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी ।
तेंचि ऐसें किरीटी । परिस आतां ॥ २४४ ॥
त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच (मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर) अहिंसेचे चित्र उमटते, ते चित्र असे असते. अर्जुना, ऐक. ॥२४५॥
तरी तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु ।
सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥ २४६ ॥
तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज (खळखळ) न मोडू देता ॥२४६॥
वेगें आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा ।
जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥ २४७ ॥
वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टि ठेऊन बगळा जसा पाण्यात पाय घालतो, ॥२४७॥
कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचुंबैल केसर । इया शंका ॥ २४८ ॥
अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात, ॥२४८॥
तैसे परमाणु पां गुंतले । जाणूनि जीव सानुले ।
कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥ २४९ ॥
त्याप्रमाणे परमाणूंमधे लहान जीव आहेत असे जाणून दयेमधे आपली पाऊले लपवून चालतो. ॥२४९॥
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु ।
जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥ २५० ॥
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो (मग त्यावर चालतो). ॥२५०॥
ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना ।
हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥ २५१ ॥
अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही. ॥२५१॥
पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें ।
तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥ २५२ ॥
जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात (मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते, त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दाताची टोके लागत नाहीत) ॥२५२॥
कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे ।
तिये दिठी आहे । हळुवार जें ॥ २५३ ॥
अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पहाते, त्या दृष्टीमधे जो नाजुकपणा असतो, ॥२५३॥
नाना कमळदळें । डोलविजती ढाळें ।
तो जेणें पाडें बुबुळें । वारा घेपे ॥ २५४ ॥
अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळू हळू हलवले असता, त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो (बुबुळास खुपत नाही) ॥२५४॥
तैसेनि मार्दवें पाय । भूमीवरी न्यसीतु जाय ।
लागती तेथ होय । जीवां सुख ॥ २५५ ॥
तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते. ॥२५५॥
ऐसिया लघिमा चालतां । कृमि कीटक पंडुसुता ।
देखे तरी माघौता । हळूचि निघे ॥ २५६ ॥
अर्जुना, अशा हळूवारपणाने चालत असतांना कृमीकीटक पाहिले तर, हळूच माघारा फिरतो. ॥२५६॥
म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल ।
रचलेपणा पडैल । झोती हन ॥ २५७ ॥
तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर (सर्व भूतांना व्यापून असलेल्या) प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल. ॥२५७॥
इया काकुळती । वाहणी घे माघौती ।
कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥ २५८ ॥
या करुणेने मागे परततो व कोणत्याही व्यक्तीवर (प्राण्यावर) पाय ठेवीत नाही. ॥२५८॥
जीवाचेनि नांवें । तृणातेंही नोलांडवे ।
मग न लेखितां जावें । हे कें गोठी ?॥ २५९ ॥
गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती ओलांडीत नाही (तुडवून जात नाही). मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कोठली ? ॥२५९॥
मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे ।
तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥ २६० ॥
मुंगीला ज्याप्रमाणे मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही. ॥२६०॥
ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली ।
देखसी जियाली । दया वाचे ॥ २६१ ॥
अहिंसकाचे बोलणे = याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फाळांनी फाळाला आली व जेथे वाचेमधे दया जगलेली तू पहाशील. ॥२६१॥
स्वयें श्वसणेंचि सुकुमार । मुख मोहाचें माहेर ।
माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥ २६२ ॥
स्वत: श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणुकाय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत ! ॥२६२॥
पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें ।
शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥ २६३ ॥
(तो कोणाशी बोलत असता) पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात. ॥२६३॥
तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं ।
तरी बोल कोणाही । खुपेल कां ॥ २६४ ॥
अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल (बोलण्याचे मनात आणेल) तर आपले बोलणे कोणाला खुपेल का (लागेल का) (अशी त्याच्या मनात शंका येते). ॥२६४॥
बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं न लगे ।
आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं ॥ २६५ ॥
(त्याला असे वाटत असते की) यदा कदाचित बोलतांना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना ? आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना ? ॥२६५॥
मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल ।
आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी ॥ २६६ ॥
कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्ष करील ॥२६६॥
तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी ।
ऐसा भावो जीवीं । म्हणौनि उगा ॥ २६७ ॥
तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नयेत (अथ्यवा रागाने) कोणाची भिवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो, ॥२६७॥
मग प्रार्थिला विपायें । जरी लोभें बोलों जाये ।
तरी परिसतया होये । मायबापु ॥ २६८ ॥
मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना कोणी केल्यास तो प्रेमाने बोलायला लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात, त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते. ॥२६८॥
कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें ।
पतिव्रते आलें । वार्धक्य जैसे ॥ २६९ ॥
त्याचे बोलणे म्हणजे जणु काय नादब्रह्मच आकार धरून आले (असे मधुर) किंवा गंगेचे पाणीच उसळले (असे पवित्र) अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे ॥२६९॥
तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ २७० ॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ (कोणास न खुपणारे) मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. ॥२७०॥
विरोधुवादुबळु । प्राणितापढाळु ।
उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥ २७१ ॥
उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे, ॥२७१॥
आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु ।
हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥ २७२ ॥
हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी (वगैरे) हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो. ॥२७२॥
आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी ।
सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥ २७३ ॥
अहिंसकाची दृष्टी = आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत (म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवल्या नाहीत) ॥२७३॥
कां जे भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें ।
म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी ॥ २७४ ॥
प्राणिमात्रामधे वस्तु (परब्रह्म) आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पहात नाही ॥२७४॥
ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळें ।
उघडोनियां डोळे । दृष्टी घाली ॥ २७५ ॥
असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली ॥२७५॥
तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा ।
परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥ २७६ ॥
तर चंद्रबिंबातून निघणार्या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात). ॥२७६॥
तैसें प्राणियांसि होये । जरी तो कहींवासु पाहे ।
तया अवलोकनाची सोये । कूर्मींही नेणे ॥ २७७ ॥
त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकदे पाहिले तर तसे होते. त्या पहाण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही. ॥२७७॥
किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी ।
करही देखसी । तैसेचि ते ॥ २७८ ॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल ॥२७८॥
तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ ।
तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥ २७९ ॥
अहिंसकाची कृती = सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन रहातात. (म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते) त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात. (व्यापाररहित असतात). ॥२७९॥
अक्षमें आणि संन्यासिलें । कीं निरिंधन आणि विझालें ।
मुकेनि घेतलें । मौन जैसें ॥ २८० ॥
अगोदरच आंधळा, आणखी त्याने पहाण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नि, आणि पुन्हा तो विझलेला किंवा मुळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले ॥२८०॥
तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं ।
जे अकर्तयाच्या ठायीं । बैसों येती ॥ २८१ ॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात. ॥२८१॥
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा ।
इया बुद्धी करां । चळों नेदी ॥ २८२ ॥
वार्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही ॥२८२॥
तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं ।
पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा ॥ २८३ ॥
(अशी जेथे स्थिती आहे) तेथे अंगावर बसलेले (माशा, डास वगैरे प्राणी) उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा ॥२८३॥
इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी ।
मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें ? ॥ २८४ ॥
या गोष्टी कोठल्या ? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे, तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कोठले ? ॥२८४॥
लीलाकमळें खेळणें । कांपुष्पमाळा झेलणें ।
न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ॥ २८५ ॥
सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या (हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना) गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही ॥२८५॥
हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी ।
नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥ २८६ ॥
अंगावर केसांच्या रांगा हलतील (व त्यायोगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल) याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात ॥२८६॥
तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो ।
तरी हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥ २८७ ॥
आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत. ॥२८७॥
कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलियां देइजे ।
नातरी आर्तातें स्पर्शिजे । अळुमाळु ॥ २८८ ॥
अथवा ‘भिऊ नकोस’ असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. ॥२८८॥
हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें ।
नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥ २८९ ॥
तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलुमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. ॥२८९॥
पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु ।
तेणें मानें पशु । कुरवाळणें ॥ २९० ॥
त्याच्या ह्स्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणार्या वार्याचा स्पर्श कडक भासेल. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते. ॥२९०॥
जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगें निसळें ।
न फळतांही निर्फळें । होतीचिना ॥ २९१ ॥
जे हात नेहेमी रिकामे व मोकळे असतात (परंतु) ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही. ॥२९१॥
आतां असो हें वाग्जाळ । जाणें तें करतळ ।
सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥ २९२ ॥
आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज. ॥२९२॥
आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें ।
तरी सांगितले कोणाचे । विलास हे ? ॥ २९३ ॥
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे ? ॥२९३॥
काइ शाखा नव्हे तरु ? । जळेंवीण असे सागरु ? ।
तेज आणि तेजाकारु । आन काई ? ॥ २९४ ॥
फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय ? समुद्र हा जलाशिवाय आहे काय ? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय ? ॥२९४॥
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर ? ।
कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी ? ॥ २९५ ॥
शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय ? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय ? ॥२९५॥
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव ।
ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥ २९६ ॥
म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत). ॥२९६॥
जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें ।
तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि कीं ॥ २९७ ॥
ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे. ॥२९७॥
पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ? ॥ २९८ ॥
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल ? ॥२९८॥
आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनीचि उठी ।
मग ते वाचे दिठी । करांसि ये ॥ २९९ ॥
अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते. ॥२९९॥
वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई ? ।
बींवीण भुईं । अंकुर असे ? ॥ ३०० ॥
याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय ? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय ? ॥३००॥
म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें ।
सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥ ३०१ ॥
हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामधे कोठून वाहील ? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय ? ॥३०१॥
उगमींचि वाळूनि जाये । तें वोघीं कैचें वाहे ।
जीवु गेलिया आहे । चेष्टा देहीं ? ॥ ३०२ ॥
म्हणून (ज्यावेळी) मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे रहातात. (म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते). ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते ॥३०२॥
तैसें मन हें पांडवा । मूळ या इंद्रियभावा ।
हेंचि राहटे आघवां । द्वारीं इहीं ॥ ३०३ ॥
अर्जुना त्याप्रमाने मन हे सर्व या इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. ॥३०३॥
परी जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे ।
बाहेरी ये तैसें । व्यापाररूपें ॥ ३०४ ॥
परंतु ज्यावेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आंत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते ॥३०४॥
यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें ।
पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥ ३०५ ॥
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारातून दिसून येते. ॥३०५॥
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितां हीं उदावादा ।
अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥ ३०६ ॥
म्हणून (ही सर्व) इंद्रिये (मनात) असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात. (म्हणजे अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही). ॥३०६॥
समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते ।
तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥ ३०७ ॥
समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे (चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे) चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. ॥३०७॥
हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु ।
वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥ ३०८ ॥
फार बोलणे राहू दे. पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो ॥३०८॥
तैसें दयाळुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें ।
मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥ ३०९ ॥
त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणिले व मग तेथे (म्हणजे हातापायांचे ठिकाणी) मनानेच अहिंसेला उत्पन्न केले. ॥३०९॥
याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी ।
मनाचिये राहाटी । रूप केलें ॥ ३१० ॥
म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणूकीचे स्पष्ट वर्णन केले. ॥३१०॥
ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।
जाहला ठायीं जयाचा । देखशील ॥ ३११ ॥
याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल ॥३११॥
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचें वेळाउळ ।
हें असो निखळ । ज्ञानचि तो ॥ ३१२ ॥
तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय. ॥३१२॥
जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे ।
ते पाहावी हें उपजे । तैं तोचि पाहावा ॥ ३१३ ॥
जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण (वर्णन) करतो, ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पहावे. ॥३१३॥
ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें ।
परी फांकला हें उपसाहावें । तुम्हीं मज ॥ ३१४ ॥
(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात) असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. ॥३१४॥
म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं ।
कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥ ३१५ ॥
कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चार्यात (गाय, म्हैस वगैरे) जनावर सुटले असता ते जसे चार्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो ॥३१५॥
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्तीं ।
वाहविला मती । आकळेना ॥ ३१६ ॥
त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही. ॥३१६॥
तरि तैसें नोहे अवधारा । कारण असें विस्तारा ।
एर्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥ ३१७ ॥
तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे. ॥३१७॥
अहिंसा म्हणतां थोडी । परि ते तैंचि होय उघडी ।
जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥ ३१८ ॥
अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. ॥३१८॥
एर्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।
बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥ ३१९ ॥
एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. ॥३१९॥
रत्नजपारखियांच्या गांवीं । जाईल गंडकी तरी सोडावी ।
काश्मीरीं न करावी । मिडगण जेवीं ॥ ३२० ॥
रत्न पारखणार्या लोकांच्या गावात (गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये. ॥३२०॥
काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा ।
पिठाचा विकरा । तिये सातें ? ॥ ३२१ ॥
ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात (कापूर म्हणूण) पिठाची विक्री कशी होईल ? ॥३२१॥
म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें ।
लाग सरूं न लभे । बोला प्रभु ॥ ३२२ ॥
म्हणून महाराज या सभेमधे (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही. ॥३२२॥
सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा ।
तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही ॥ ३२३ ॥
सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही ॥३२३॥
शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे ।
तैं मागुतिया पाउलीं पळे । अवधान येतें ॥ ३२४ ॥
शंकारूपी कचर्याने जेव्हा स्चच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाऊलीच पळेल. ॥३२४॥
कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती ।
तयांची वास पाहाती । हंसु काई ? ॥ ३२५ ॥
गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकाची हंस वाट पहातात काय ? ॥३२५॥
कां अभ्रापैलीकडे । जैं येत चांदिणें कोडें ।
तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥ ३२६ ॥
किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. ॥३२६॥
तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल ।
जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥ ३२७ ॥
त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद (शंकारहित) होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागावाल. ॥३२७॥
न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें ।
तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥ ३२८ ॥
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा रहातील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. ॥३२८॥
आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें ।
जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥ ३२९ ॥
आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहेमी प्रसन्न असावे. ॥३२९॥
एर्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे ।
जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥ ३३० ॥
सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे अहाते अहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जिवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. ॥३३०॥
जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवूनि न्याल ।
म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे ॥ ३३१ ॥
जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे. ॥३३१॥
कां सर्स्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा ।
तरी गीते मज अवधारा । एकचि गती ॥ ३३२ ॥
अथवा तुम्ही आपाल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल तर गीतेची व माझी एकच गति आहे असे समजा. ॥३३२॥
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज ।
तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥ ३३३ ॥
फार काय सांगावे ? मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले. ॥३३३॥
तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।
म्हणौनि जी मतांगें । बोलों गेलों ॥ ३३४ ॥
तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. ॥३३४॥
तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला ।
कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥ ३३५ ॥
तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. ॥३३५॥
आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु ।
ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥ ३३६ ॥
आणि (जेवीत असतांना) घासातील खडा काढतांना वेळ लागतो, तर जेवणाराला तो घासातील कडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्य़ास उशीर केला तर त्यात जेवणाराचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. ॥३३६॥
कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता ।
कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे ? ॥ ३३७ ॥
अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्य़ास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठमोहर्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी ! ॥३३७॥
परी यावरील हें नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें ।
आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥ ३३८ ॥
परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. ” तर आता महाराज, ऐका. देव असे बोलले. ॥३३८॥
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना ।
करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥ ३३९ ॥
भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे. ॥३३९॥
तरी ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें ।
आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे ॥ ३४० ॥
तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख. ॥३४०॥
अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी ।
कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी ॥ ३४१ ॥
फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल (विपुल वाढतात) अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ति (अलोट येत असते), ॥३४१॥
पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे ।
तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥ ३४२ ॥
अर्जुना त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. ॥३४२॥
तरी पढियंते लेणें । आंगीं भावें जेणें ।
धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥ ३४३ ॥
ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो ॥३४३॥
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे ।
वरी पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥ ३४४ ॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही ॥३४४॥
अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें ।
अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥ ३४५ ॥
इच्छा असलेली एखादी वस्तु मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तु प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. ॥३४५॥
जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये ।
निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥ ३४६ ॥
जो मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात, (सारखी मानली जातात) व निंदा आणि स्तुतीने ज्याचे मनाची स्थिती दोन प्रकारची (सुखाची व दु:खाची) होत नाही ॥३४६॥
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे ।
कायसेनिही न वासिपे । पातलेया ॥ ३४७ ॥
उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही ॥३४७॥
स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु ।
कीं धरा यज्ञसूकरु । वोझें न म्हणे ॥ ३४८ ॥
मेरु पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही, ॥३४८॥
नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती ।
तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना ॥ ३४९ ॥
ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही. ॥३४९॥
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट ।
करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥ ३५० ॥
पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करुन घेतो, ॥३५०॥
तैसें जयाचिया ठायीं । न साहणें काहींचि नाहीं ।
आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे ॥ ३५१ ॥
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही, ॥३५१॥
आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें ।
येथ साहतेनि नवलें । घेपिजेना ॥ ३५२ ॥
जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याचेवर बसत नाही. ॥३५२॥
हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ॥ ३५३ ॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, दात, ओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज. ॥३५३॥
तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा ।
आतां परिस आर्जवा । रूप करूं ॥ ३५४ ॥
अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जुवाचे स्वरूप तुला सांगतो ऐक. ॥३५४॥
तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें ।
आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥ ३५५ ॥
अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे की ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असेना का ? ते सर्वांवर एकसारखेच असते. ॥३५५॥
कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु ।
जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥ ३५६ ॥
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते. ॥३५६॥
तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन ।
नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥ ३५७ ॥
त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते ॥३५७॥
जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक ।
आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥ ३५८ ॥
की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही ॥३५८॥
भलतेणेंसीं मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।
कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥ ३५९ ॥
त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्याच्या सारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही ॥३५९॥
वारियाची धांव । तैसे सरळ भाव ।
शंका आणि हांव । नाहीं जया ॥ ३६० ॥
वार्याचे वहाणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात, ॥३६०॥
मायेपुढें बाळका । रिगतां न पडे शंका ।
तैसें मन देतां लोकां । नालोची जो ॥ ३६१ ॥
आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगतांना तो मागेपुढे पहात नाही. ॥३६१॥
फांकलिया इंदीवरा । परिवारु नाहीं धनुर्धरा ।
तैसा कोनकोंपरा । नेणेचि जो ॥ ३६२ ॥
ज्याप्रमाणे उमलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही. (म्हणजे ज्याच्या अंत:करणाला गुप्त जागा माहीत नसते) ॥३६२॥
चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें ।
तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं ॥ ३६३ ॥
रत्नाचा निर्मळपण असतो, (पण) त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते. ॥३६३॥
आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें ।
धरी मोकळी अंतःकरणें । नव्हेचि जया ॥ ३६४ ॥
जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभावात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही ॥३६४॥
दिठी नोहे मिणधी । बोलणें नाहीं संदिग्धी ।
कवणेंसीं हीनबुद्धी । राहाटीजे ना ॥ ३६५ ॥
ज्याची दृष्टी कपटी (अथवा ओशाळी) नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही ॥३६५॥
दाही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें ।
पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥ ३६६ ॥
ज्याची दहाही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात ॥३६६॥
अमृताची धार । तैसें उजूं अंतर ।
किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें ॥ ३६७ ॥
अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंत:करण सरळ असते. फार काय सांगावे ? जो या चिन्हाचे माहेर असतो ॥३६७॥
तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा ।
जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला ॥ ३६८ ॥
अर्जुना तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले रहावयाचे ठिकाण केले आहे असे समज. ॥३६८॥
आतां ययावरी । गुरुभक्तीची परी ।
सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥ ३६९ ॥
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा तो तू ऐक. ॥३६९॥
आघवियाचि दैवां । जन्मभूमि हे सेवा ।
जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेंहि ॥ ३७० ॥
ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते ॥३७०॥
हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती ।
बैसों दे एकपांती । अवधानाची ॥ ३७१ ॥
ती गुरुभक्ति आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे. ॥३७१॥
तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी ।
कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥ ३७२ ॥
तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, ॥३७२॥
नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें ।
प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥ ३७३ ॥
अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले, ॥३७३॥
तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें ।
आपणपें केलें । भक्तीचें घर ॥ ३७४ ॥
त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे, ॥३७४॥
गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं ।
विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥ ३७५ ॥
ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो ॥३७५॥
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा ।
आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥ ३७६ ॥
गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे”. ॥३७६॥
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली ।
जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥ ३७७ ॥
सद्गुरूविषयीच्या खर्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते, व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो. ॥३७७॥
परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें ।
वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥ ३७८ ॥
परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहाणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही. ॥३७८॥
म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल ।
युगाहूनि वडील । निमिष मानी ॥ ३७९ ॥
जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल ? तो (गुरूच्या वियोगात जाणार्या) निमिषाला युगाहून मोठे मानतो. ॥३७९॥
ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें ।
तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥ ३८० ॥
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले अथवा स्वत: गुरूनेच पाठवले तर जसे मरावयास तेकलेल्या पुरूषास आयुष्य प्राप्त व्हावे ॥३८०॥
कां सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा ।
नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥ ३८१ ॥
अथवा सुकणार्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा थोडा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा ॥३८१॥
नातरी रंकें निधान देखिलें । कां आंधळिया डोळे उघडले ।
भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥ ३८२ ॥
अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टि यावी, अथवा भिकार्याला जसे इंद्रपद मिळावे ॥३८२॥
तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे ।
जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥ ३८३ ॥
त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू. ॥३८३॥
पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी ।
जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥ ३८४ ॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पहाशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज. ॥३८४॥
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे ।
श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
आणि आतल्या बाजूकडे (अंत:करणात) प्रेमाच्या जोराने श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो ॥३८५॥
हृदयशुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी ।
मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥ ३८६ ॥
अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरु, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा, मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो. ॥३८६॥
कां चैतन्यांचिये पोवळी- । माजीं आनंदाचिया राउळीं ।
श्रिइगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥ ३८७ ॥
अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो ॥३८७॥
उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका ।
भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे ॥ ३८८ ॥
बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वहातो. ॥३८८॥
काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं ।
न्यानदीपें वोंवाळी । निरंतर ॥ ३८९ ॥
पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. ॥३८९॥
सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय ।
आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥ ३९० ॥
गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहेमी अर्पित रहातो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरूला शंकराची पिंडी करतो. ॥३९०॥
नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे ।
ऐसीं प्रेमाचेनि भोजें । बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पति करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धि बाळगते. ॥३९१॥
कोणे एके अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं ।
कीं तया नाम करी । क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला (त्या प्रेमाला) क्षीरसमुद्र असे नाव देतो. ॥३९२॥
तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख ।
वरी जलशयन देख । भावी गुरु ॥ ३९३ ॥
त्या प्रेमरूपी क्षीरसागरामधे ध्येय जे गुरु, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते (सुखच) शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर (श्रीविष्णुप्रमाणे) जलशयन करणारे श्रीगुरु आहेत असे समजतो. ॥३९३॥
मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय ।
गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥ ३९४ ॥
श्रीगुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा रहातो. ॥३९४॥
नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें ।
अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥ ३९५ ॥
आपणाच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभीकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंत:करणात अनुभवतो. ॥३९५॥
एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें ।
मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥ ३९६ ॥
एखादेवेळी आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो. ॥३९६॥
नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं ।
गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥ ३९७ ॥
अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. ॥३९७॥
गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी ।
कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥ ३९८ ॥
गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो. ॥३९८॥
गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप ।
ऐसेसे संकल्प । विये मन ॥ ३९९ ॥
गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवावृत्तीरूपी रोपाची कल्पना करतो. असे असे संकल्प त्याचे मन करते. ॥३९९॥
चक्षुपक्षेवीण । पिलूं होय आपण ।
कैसें पैं अपारपण । आवडीचें ॥ ४०० ॥
डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे (पक्ष्याचे) पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे ॥४००॥
गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी ।
गुरु तारू धरी । आपण कांस ॥ ४०१ ॥
गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो. ॥४०१॥
ऐसें प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे ।
पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥ ४०२ ॥
ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. ॥४०२॥
किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं ।
भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा ॥ ४०३ ॥
फार काय सांगावे ? याप्रमाने तो गुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील (शरीरिक) सेवा ऐक. ॥४०३॥
तरी जिवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें ।
जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥ ४०४ ॥
तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने ‘माग’ म्हणून म्हणतील. ॥४०४॥
तैसिया साचा उपास्ती । गोसावी प्रसन्न होती ।
तेथ मी विनंती । ऐसी करीन ॥ ४०५ ॥
तशा खर्या उपासनेने प्रभु सुप्रसन्न होतील, त्या वेळी मी अशी विनंती करीन. ॥४०५॥
म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा ।
तेतुलें रूपें होआवा । मीचि एकु ॥ ४०६ ॥
मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे ॥४०६॥
आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं ।
माझीं रूपें तेतुलीं । होआवीं स्वामी ॥ ४०७ ॥
आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे (पूजेची भांडी वगैरे वस्तु) आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे. ॥४०७॥
ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु ।
मग तो परिवारु । मीचि होईन ॥ ४०८ ॥
असा मी (श्रीगुरूला) वर मागेन, तेव्हां गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन. ॥४०८॥
उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक ।
तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजैल ॥ ४०९ ॥
गुरुंच्या उपयोगी पडणार्या जेवढ्या म्हणून वस्तुमात्र आहेत, त्यापैकी प्रत्येक जेव्हां मी होईन, तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. ॥४०९॥
गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये ।
तैसें करूनि आण वायें । कृपे तिये ॥ ४१० ॥
श्रीगुरु हे पुष्कळांची आई होऊन रहातील असे करून (म्हणजे अनन्यभावाने त्यांची सेवा करून) त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन ॥४१०॥
तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं ।
क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरवीं ॥ ४११ ॥
श्रीगुरूच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नीव्रत घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन, (म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन), ॥४११॥
चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघों बाहिरा ।
तैसा गुरुकृपें पांजिरा । मीचि होईन ॥ ४१२ ॥
वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन. ॥४१२॥
आपुलिया गुणांचीं लेणीं । करीन गुरुसेवे स्वामिणी ।
हें असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी ॥ ४१३ ॥
गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो. (एवढेच काय पण) गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. ॥४१३॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥ ४१४ ॥
गुरूच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टि तयार करतो. ॥४१४॥
म्हणे श्रीगुरूंचें भुवन । आपण मी होईन ।
आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥ ४१५ ॥
तो म्हणतो, गुरूचे रहाते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन. ॥४१५॥
निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे ।
ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाळु ॥ ४१६ ॥
श्रीगुरु बाहेर जाते वेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मीच होईन. आणि घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईन. ॥४१६॥
पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन ।
छत्र मी आणि करीन । बारीपण ॥ ४१७ ॥
श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन. ॥४१७॥
मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता ।
स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥ ४१८ ॥
श्रीगुरूला खालीवर जाणवणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. ॥४१८॥
मीचि होईन सागळा । करूं सुईन गुरुळां ।
सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥ ४१९ ॥
श्रीगुरूंचा झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. ॥४१९॥
हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन ।
उळिग मी करीन । आंघोळीचें ॥ ४२० ॥
श्रीगुरूला विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. ॥४२०॥
होईन गुरूंचें आसन । अलंकार परिधान ।
चंदनादि होईन । उपचार ते ॥ ४२१ ॥
गुरूंचे आसन मी होईन, त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन. ॥४२१॥
मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु ।
आपणपें श्रीगुरु । वोंवाळीन ॥ ४२२ ॥
श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूस ओवाळीन. ॥४२२॥
जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं ।
मीचि होईन पुढती । देईन विडा ॥ ४२३ ॥
श्रीगुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांना) मीच पुढे होईन आणि विडा देईन. ॥४२३॥
ताट मी काढीन । सेज मी झाडीन ।
चरणसंवाहन । मीचि करीन ॥ ४२४ ॥
श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन. ॥४२४॥
सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण ।
होईन पुरेपण । वोळगेचें ॥ ४२५ ॥
मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर श्रीगुरु बसतील व सेवेचे पुरेपण होईन (म्हणजे संपूर्ण सेवा करीन). ॥४२५॥
श्रीगुरूंचें मन । जया देईल अवधान ।
तें मी पुढां होईन । चमत्कारु ॥ ४२६ ॥
श्रीगुरूचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तु मीच होईन, असा चमत्कार करीन. ॥४२६॥
तया श्रवणाचे आंगणीं । होईन शब्दांचिया अक्षौहिणी ।
स्पर्श होईन घसणी । आंगाचिया ॥ ४२७ ॥
श्रीगुरूच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन. ॥४२७॥
श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें ।
पाहाती तियें सकळें । होईन रूपें ॥ ४२८ ॥
श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तु पहातील त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन. ॥४२८॥
तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजैल ।
गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥ ४२९ ॥
त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल् तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. ॥११-४२९॥
एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त ।
वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां ॥ ४३० ॥
याप्रमाणे सर्व वस्तुमात्र मी होऊन श्रीगुरूची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते. ॥४३०॥
जंव देह हें असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल ।
मग देहांतीं नवल । बुद्धि आहे ॥ ४३१ ॥
हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमधे धरीन. (ती अशी) ॥४३१॥
इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती ।
जेथ श्रीचरण उभे ठाती । श्रीगुरूंचे ॥ ४३२ ॥
जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन. ॥४३२॥
माझा स्वामी कवतिकें । स्पर्शीजति जियें उदकें ।
तेथ लया नेईन निकें । आपीं आप ॥ ४३३ ॥
माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन. ॥४३३॥
श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिजती ।
तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
ज्या दिव्यांनी गुरूस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन. ॥४३४॥
चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा ।
मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ॥ ४३५ ॥
श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. ॥४३५॥
जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं ।
आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥ ४३६ ॥
ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. ॥४३६॥
परी जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धाडीं ।
ऐसेनि गणावया कोडी । कल्पांचिया ॥ ४३७ ॥
परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिष (एक निमिषभर गुरूंची सेवा) लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील. ॥४३७॥
येतुलेंवरी धिंवसा । जयाचिया मानसा ।
आणि करूनियांहि तैसा । अपारु जो ॥ ४३८ ॥
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो. (म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते). ॥४३८॥
रात्र दिवस नेणे । थोडें बहु न म्हणें ।
म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय ॥ ४३९ ॥
(गुरुसेवेपुढे) तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. ॥४३९॥
तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे ।
एकला करी आघवें । एकेचि काळीं ॥ ४४० ॥
गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूची सर्व सेवा एकाच काळी करतो. ॥४४०॥
हृदयवृत्ती पुढां । आंगचि घे दवडा ।
काज करी होडा । मानसेंशीं ॥ ४४१ ॥
त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृति मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते. ॥४४१॥
एकादियां वेळा । श्रीगुरुचिया खेळा ।
लोण करी सकळा । जीविताचें ॥ ४४२ ॥
श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो (म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो). ॥४४२॥
जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु ।
गुरुआज्ञे निवासु । आपणचि जो ॥ ४४३ ॥
जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: श्रीगुरूच्या आज्ञेचे स्वत:च्या रहाण्याचे ठिकाण असतो, ॥४४३॥
जो गुरु कुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु ।
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर ॥ ४४४ ॥
जो श्रीगुरूच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहेमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो ॥४४४॥
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम ।
गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचें गा ॥ ४४५ ॥
गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ते ज्याचे वर्णाश्रम विहितकर्मे असतात, अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्यकर्म असते ॥४४५॥
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता ।
जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणें ॥ ४४६ ॥
गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरूच माता, गुरूच पिता, तो गुरुपूजेपलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही. ॥४४६॥
श्रीगुरूचे द्वार । तें जयाचें सर्वस्व सार ।
गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥ ४४७ ॥
श्रीगुरूचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने भजतो ॥४४७॥
जयाचें वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र ।
गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे ॥ ४४८ ॥
ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते, व गुरुवाक्यावाचून दुसर्या शास्त्राला हात लावत नाही, ॥४४८॥
शिवतलें गुरुचरणीं । भलतैसें हो पाणी ।
तया सकळ तीर्थें आणी । त्रैलोक्यींचीं ॥ ४४९ ॥
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थे समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो (म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो). ॥४४९॥
श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें ।
तैं तेणें लाभें विटे । समाधीसी ॥ ४५० ॥
त्याला जेव्हा श्रीगुरूचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस विटतो. ॥४५०॥
कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी ।
उधळती पायांपाठीं । चालतां जे ॥ ४५१ ॥
अर्जुना, श्रीगुरु चालत असतांना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किंमतीचे समजतो. ॥४५१॥
हें असो सांगावें किती । नाहीं पारु गुरुभक्ती ।
परी गा उत्क्रांतमती । कारण हें ॥ ४५२ ॥
हे राहू दे, मी गुरुभक्तिसंबंधाने किती सांगू ? गुरूवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ति झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे. ॥४५२॥
जया इये भक्तीची चाड । जया इये विषयींचें कोड ।
जो हे सेवेवांचून गोड । न मनी कांहीं ॥ ४५३ ॥
ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला याविषयी कौतुक आहे व जो या सेवेवाचून दुसरे काही चांगले मानत नाही, ॥४५३॥
तो तत्त्वज्ञाचा ठावो । ज्ञाना तेणेंचि आवो ।
हें असो तो देवो । ज्ञान भक्तु ॥ ४५४ ॥
तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते. हे वर्णन पुरे. अशी गुरूची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे. ॥४५४॥
हें जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि द्वारें ।
नांदत असे जगा पुरे । इया रीती ॥ ४५५ ॥
ह्या रीतीने खरोखर तेथे (त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी) जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज. ॥४५५॥
जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखी ।
म्हणौनि सोयचुकी । बोली केली ॥ ४५६ ॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंत:करणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले. ॥४५६॥
एर्हवीं असतां हातीं खुळा । भजनावधानीं आंधळा ।
परिचर्येलागीं पांगुळा- । पासूनि मंदु ॥ ४५७ ॥
नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे. ॥४५७॥
गुरुवर्णनीं मुका । आळशी पोशिजे फुका ।
परी मनीं आथि निका । सानुरागु ॥ ४५८ ॥
वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामधे गुरुभक्तिविषयी चांगले प्रेम आहे. ॥४५८॥
तेणेंचि पैं कारणें । हें स्थूळ पोसणें ।
पडलें मज म्हणे । ज्ञानदेवो ॥ ४५९ ॥
त्याच कारणामुळे ह्या (आचार्योपास्ति) पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात. ॥४५९॥
परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा ।
आतां म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि ॥ ४६० ॥
तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन. ॥४६०॥
परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु ।
तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥ ४६१ ॥
ऐका ! ऐका ! भूतांचे ओझे सहन करणारा विष्णु जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे. ॥४६१॥
म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे ।
आंग मन जैसें । कापुराचें ॥ ४६२ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंत:करण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते ॥४६२॥
बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला ।
इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका ॥ ४६४ ॥
तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून तो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे. ॥४६४॥
मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें ।
निर्मळु होय बोलें । वेदाचेनी ॥ ४६५ ॥
वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी, ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते. ॥४६५॥
भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी ।
सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥ ४६६ ॥
बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने (मातीने) स्वच्छ करता येतो व परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. ॥४६६॥
किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारीं ।
आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध ॥ ४६७ ॥
फार काय सांगावे ? ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञारूपी दिवा असतो. म्हणून अंतर शुद्ध असते असे समज. ॥४६७॥
एर्हवीं तरी पंडुसुता । आंत शुद्ध नसतां ।
बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥ ४६८ ॥
अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसतांना बाहेर केवळ शरीराने कर्मे करणे, ही विटंबना होय. ॥४६८॥
मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थीं न्हाणिला ।
कडुदुधिया माखिला । गुळें जैसा ॥ ४६९ ॥
प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला ॥४६९॥
वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें ।
कुंकुमसेंदुर केलें । कांतहीनेनें ॥ ४७० ॥
ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकु व शेंदूर लावला ॥४७०॥
कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील तें झळाळ ।
काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ॥ ४७१ ॥
आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचे आहे ? कारण त्यांच्या आत शेण आहे ॥४७१॥
तैसें कर्मवरिचिलेंकडां । न सरे थोर मोलें कुडा ।
नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥ ४७२ ॥
आत शुद्ध नसून केवल बाह्यात्कारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्यायोगाने ती घागर पवित्र होत नाही. ॥४७२॥
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग बाह्य लाभेल स्वभावें ।
वरी ज्ञान कर्में संभवे । ऐसें कें जोडे ? ॥ ४७३ ॥
म्हणून मनामधे ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धि सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान व कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल ? ॥४७३॥
यालागी बाह्य विभागु । कर्में धुतला चांगु ।
आणि ज्ञानें फिटला वंगु । अंतरींचा ॥ ४७४ ॥
याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला (शुद्ध केलेला) आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकेला आहे ॥४७४॥
तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें ।
किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥ ४७५ ॥
त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे ? केवल एक शुचित्व मात्र राहिले. ॥४७५॥
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥ ४७६ ॥
म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात. ॥४७६॥
विकल्प जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे ।
अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥ ४७७ ॥
ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ति होते) ॥४७७॥
तें आइके देखे अथवा भेटे । परी मनीं कांहींचि नुमटे ।
मेघरंगें न कांटे । व्योम जैसें ॥ ४७८ ॥
अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत. ॥४७८॥
एर्हवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे ।
परी विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ॥ ४७९ ॥
एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही. ॥४७९॥
भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी ।
तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें ॥ ४८० ॥
वाटेवरून ब्राह्मण स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही वा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोहोंपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते. ॥४८०॥
कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी ।
तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे कामु ॥ ४८१ ॥
एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते. परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. ॥४८१॥
तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख ।
कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणें ॥ ४८२ ॥
त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंत:करण पक्के जाणते. ॥४८२॥
पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे ।
तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती ॥ ४८३ ॥
जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ति लिप्त होत नाही. ॥४८३॥
तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण ।
हें देखसी तेथ जाण । ज्ञान असे ॥ ४८४ ॥
अर्जुना यास पुरे शुचित्व असे म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील तेथे ज्ञान आहे असे समज. ॥४८४॥
आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें ।
तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ॥ ४८५ ॥
आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे. ॥४८५॥
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे ।
परी बैसका न मोडे । मानसींची ॥ ४८६ ॥
त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विसकत नाही. ॥४८६॥
वत्सावरूनि धेनूचें । स्नेह राना न वचे ।
नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥ ४८७ ॥
गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही (वासरावरून हलत नाही), सती जाणार्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्रालंकारादि उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगांकडे येत नाही. ॥४८७॥
कां लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये ।
तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता ॥ ४८८ ॥
अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी रहातो. त्याप्रमाणे त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते. ॥४८८॥
जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवे ।
भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८९ ॥
इकडून तिकडे फिरणार्या मेघाबरोबर आकाश धावत नाही, अथवा गति असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही, ॥४८९॥
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा ।
कां नाहीं जेवीं तरुवरा । येणें जाणें ॥ ४९० ॥
अर्जुना, वाटसरूंच्या येण्या-जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही, ॥४९०॥
तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं ।
भूतोर्मी एकी । चळिजेना ॥ ४९१ ॥
त्याप्रमाणे चलन वलन करणार्या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणार्या क्षुधादि षडूर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. ॥४९१॥
वाहुटळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे ।
तैसा उपद्रव उमाळें । न लोटे जो ॥ ४९२ ॥
वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही. ॥४९२॥
दैन्यदुःखीं न तपे । भवशोकीं न कंपे ।
देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ॥ ४९३ ॥
दारिद्र्यापासून होणार्या त्रासामुळे दु:खी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यु आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही. ॥४९३॥
आर्ति आशा पडिभरें । वय व्याधी गजरें ।
उजू असतां पाठिमोरें । नव्हे चित्त ॥ ४९४ ॥
कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांचे भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. ॥४९४॥
निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी ।
परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥ ४९५ ॥
निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. ॥४९५॥
आकाश हें वोसरो । पृथ्वी वरि विरो ।
परि नेणे मोहरों । चित्तवृत्ती ॥ ४९६ ॥
आकाश नाहीसे होवो आथवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते. ॥४९६॥
हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली ।
तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं । शेलिला सांता ॥ ४९७ ॥
हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही ॥४९७॥
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं ।
कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥ ४९८ ॥
क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही ॥४९८॥
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं ।
किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही ॥ ४९९ ॥
त्याप्रमाणे शोकमोहादि षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामधे (चित्तस्थिरतेमधे) गडबड उडत नाही. फार काय सांगावे ? कल्पांतसमय आला तरि तो धैर्यवान सहनशील असतो. ॥४९९॥
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष ।
ते हे दशा गा देख । देखणया ॥ ५०० ॥
हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज. ॥५००॥
हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे ।
तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥ ५०१ ॥
हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे. ॥५०१॥
आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हतियेरा ।
न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥ ५०२ ॥
आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही ॥५०२॥
कां एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका ।
मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥ ५०३ ॥
एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून रहाते (म्हणजे त्याला कधी विसंबत नाही) अथवा जशी मधमशी लोभी असते ॥५०३॥
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी ।
नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या ॥ ५०४ ॥
अर्जुना याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही ॥५०४॥
म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल ।
तरि जीवा टेंकैल । म्हणौनि बिहे ॥ ५०५ ॥
तो म्हणतो की माझे अंत:करण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठिण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण, ही अंत:करणाला इंद्रियांच्या स्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील. मग जिवावरच येऊन बेतेल, म्हणून तो पुरुष भितो. ॥५०५॥
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी ।
करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥ ५०६ ॥
ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा (ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून) बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो ॥५०६॥
सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें ।
संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥ ५०७ ॥
चित्ताचा संकोच होण्याकरता देहसुद्धा झिजतो. व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो ॥५०७॥
मनाच्या महाद्वारीं । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं ।
जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥ ५०८ ॥
या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो ॥५०८॥
आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं ।
चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ॥ ५०९ ॥
गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो (अथवा घर करतो). आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. ॥५०९॥
समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी ।
चित्त चैतन्य समरसीं । आंतु रते ॥ ५१० ॥
समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधि लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. ॥५१०॥
अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो ।
हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥ ५११ ॥
अर्जुना अंत:करण-निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व हेथे हा (अंत:करण-निग्रह) आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे. ॥५११॥
जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण ।
मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥
ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज. ॥५१२॥
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥
इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माचे विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यु-जरा, व्याधि यांच्या ठिकाणी दु:खाचे व दोषाचे अनिदर्शन ॥८॥
आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी ।
पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥ ५१३ ॥
आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैर चांगला जिवंत पुरवठा असतो, ॥५१३॥
वमिलिया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना ।
कां आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥ ५१४ ॥
ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता कोणीही अंग पुढे करत नाही ॥५१४॥
विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे ।
व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं ॥ ५१५ ॥
जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही. ॥५१५॥
धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी ।
न करवे उशी । अजगराची ॥ ५१६ ॥
रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, ॥५१६॥
अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे ।
नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ॥ ५१७ ॥
अर्जुना तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. ॥५१७॥
जयाचे मनीं आलस्य । देही अतिकार्श्य ।
शमदमीं सौरस्य । जयासि गा ॥ ५१८ ॥
ज्याच्या मनात विषयवासनेचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो (म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो). ॥५१८॥
तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायीं पांडवा ।
युगांत जया गांवा- । आंतु येतां ॥ ५१९ ॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येतांना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते. ॥५१९॥
बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव ।
न साहे जो नांव । संघाताचें ॥ ५२० ॥
योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात रहाण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते, व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही ॥५२०॥
नाराचांचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें ।
तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें ॥ ५२१ ॥
बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. ॥५२१॥
आणि स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें ।
कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां ॥ ५२२ ॥
स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे मांस आहेत. ॥५२२॥
तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें सभाग्य ।
येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥ ५२३ ॥
वर सांगितलेले विषयां विषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. ॥५२३॥
ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु ।
तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं ॥ ५२४ ॥
जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. ॥५२४॥
आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्तें करी ।
परी केलेंपण शरीरीं । वसों नेदी ॥ ५२५ ॥
आणि सकाम पुरूषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही. ॥५२५॥
वर्णाश्रमपोषकें । कर्में नित्यनैमित्तिकें ।
तयामाजीं कांहीं न ठके । आचरतां ॥ ५२६ ॥
वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही रहात नाही ॥५२६॥
परि हें मियां केलें । कीं हें माझेनि सिद्धी गेलें ।
ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं ॥ ५२७ ॥
परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमधे ठेवला नाही. ॥५२७॥
जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें ।
कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥ ५२८ ॥
ज्याप्रमाणे अहंकारावाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे हे जसे निरभिमान असते; ॥५२८॥
कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले ।
तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें ॥ ५२९ ॥
अथवा वेद जसे स्वभावत: बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतूवाचून वहाते त्याप्रमाणे अहंकारावाचून ज्याचे चांगले वागणे असते ॥५२९॥
ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती ।
तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥ ५३० ॥
वृक्षास तर योग्य ऋतुकाळात फळे येतात परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमधे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहेमी असते. ॥५३०॥
एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली ।
एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥ ५३१ ॥
ज्याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. ॥५३१॥
संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं ।
देहीं कर्में तैसीं । जयासि गा ॥ ५३२ ॥
ज्याप्रमाणे आकशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्यशिवाय ती कर्मे असतात. ॥५३२॥
मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र ।
बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ॥ ५३३ ॥
मद्यापान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते ॥५३३॥
तया पाडें देहीं । जया मी आहे हे सेचि नाहीं ।
निरहंकारता पाहीं । तया नांव ॥ ५३४ ॥
त्याप्रमाणे ज्याला आपण देहामधे आहो अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारिता हे नाव आहे. असे समज. ॥५३४॥
हें संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे ।
इयेविषीं अनारिसें । बोलों नये ॥ ५३५ ॥
ही निरहंकारिता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. ॥५३५॥
आणि जन्ममृत्युजरादुःखें । व्याधिवार्धक्यकलुषें ।
तियें आंगा न येतां देखे । दुरूनि जो ॥ ५३६ ॥
आणि जन्म, मृत्यु, दु:ख, रोग जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून (प्राप्त होण्य़ाच्या आधीपासूनच) पहातो. ॥५३६॥
साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया ।
पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥
जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक (मांत्रिक किंवा ठेवा काढणारा मनुष्य) जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यास येणार्या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो ॥५३७॥
वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि न वचे ।
तेवीं अतीता जन्माचें । उणें जो वाहे ॥ ५३८ ॥
जसे सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो. ॥५३८॥
डोळां हरळ न विरे । घाईं कोत न जिरे ।
तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख ॥ ५३९ ॥
डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही (म्हणजे सारखा खुपत रहातो), अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही (तर एकसारखे खुपत रहाते), त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दु:ख विसरत नाही ॥५३९॥
म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रें निघाला ।
कटा रे मियां चाटिला । कुचस्वेदु ॥ ५४० ॥
तो म्हणतो, हाय, हाय, मी कसा या (जन्मामुळे) पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मुत्रद्वाराने बाहेर निघालो. अरेरे स्तनावरील घाम मी चाटला. ॥५४०॥
ऐसऐसिया परी । जन्माचा कांटाळा धरी ।
म्हणे आतां तें मी न करीं । जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥
याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो. व म्हणतो की ज्या योगाने असे होईल (जन्म घ्यावा लागेल) ते मी यापुढे करणार नाही. ॥५४१॥
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया ।
कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥ ५४२ ॥
पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो ॥५४२॥
मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें ।
तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥ ५४३ ॥
(वडील भावाला) मारल्याचे रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो (सूड घेण्यास खटपट करतो) तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. ॥५४३॥
परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज ।
संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥
परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याची लाज केव्हाही सोडित नाही ॥५४४॥
आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे ।
परी आजीचि होये । सावधु जो ॥ ५४५ ॥
मृत्यु = आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यु असला तथापि तो आजच आला आहे असे समजून तो सावध असतो. ॥५४५॥
माजीं अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता ।
पोहणारा आइता । कासे जेवीं ॥ ५४६ ॥
नदीमधे अथांग पाणी आहे असे म्हणतात, अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो. ॥५४६॥
कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो ।
वोडण सुइजे घावो । न लागतांचि ॥ ५४७ ॥
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी, ॥५४७॥
पाहेचा पेणा वाटवधा । तंव आजीचि होईजे सावधा ।
जीवु न वचतां औषधा । धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥
उद्याचा मुक्काम वाटमार्याचा आहे, म्हणून जसे आजच साध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषेधाकरिता धावाधाव करावी; ॥५४८॥
येर्हवीं ऐसें घडे । जो जळतां घरीं सांपडे ।
तो मग न पवाडे । कुहा खणों ॥ ५४९ ॥
(पुढे येणार्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही) तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने विहिर खणू शकत नाही, तसे होते. ॥५४९॥
चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला ।
तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥ ५५० ॥
खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो ‘मी बुडतो’ अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे तो मेला असे कोण सांगेल ? ॥५५०॥
म्हणौनि समर्थेंसीं वैर । जया पडिलें हाडखाइर ।
तो जैसा आठही पाहर । परजून असे ॥ ५५१ ॥
म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो ॥५५१॥
नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी ।
तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना ॥ ५५२ ॥
अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याचे अगोदरच तो पुढे येणार्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. ॥५५२॥
पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी ।
मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥ ५५३ ॥
अर्जुना याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यु नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो ॥५५३॥
तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें ।
जया जन्ममृत्युचें । निमालें शल्य ॥ ५५४ ॥
अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यु हे काट्यासारखे सलत रहातात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. ॥५५४॥
आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा ।
तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥ ५५५ ॥
आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदित असतांनाच जो पुढे येणार्या म्हातारपणाबद्दल विचार करतो. ॥५५५॥
म्हणे आजिच्या अवसरीं । पुष्टि जे शरीरीं ।
ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥ ५५६ ॥
तो म्हणतो, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. ॥५५६॥
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय ।
अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥ ५५७ ॥
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातपायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. ॥५५७॥
फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा ।
तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥ ५५८ ॥
फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल. ॥५५८॥
वोढाळाच्या खुरीं । आखरुआतें बुरी ।
ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा ॥ ५५९ ॥
ओढाळ गुरांच्या खुरांनी जसी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते (म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही) त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. ॥५५९॥
पद्मदळेंसी इसाळे । भांडताति हे डोळे ।
ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील. ॥५६०॥
भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे ।
उरु कुहिजैल जळें । आंसुवांचेनि ॥ ५६१ ॥
भिवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ॥५६१॥
जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड ।
तैसें पिचडीं तोंड । सरकटिजैल ॥ ५६२ ॥
ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरड गिरबिडून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. ॥५६२॥
रांधवणी चुलीपुढें । पर्हे उन्मादती खातवडे ।
तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती ॥ ५६३ ॥
स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी साचून) जसे दुर्गंधियुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ॥५६३॥
तांबुलें वोंठ राऊं । हांसतां दांत दाऊं ।
सनागर मिरऊं । बोल जेणें ॥ ५६४ ॥
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने (तारुण्यावस्थेत रंगवतो) व ज्यातील दात हसतांना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो, ॥५६४॥
तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा ।
इया उमळती दाढा । दातांसहित ॥ ५६५ ॥
त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील. ॥५६५॥
कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं ।
तैसी नुठी कांहीं केली । जीभचि हे ॥ ५६६ ॥
शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने (झडीच्या पावसाने) जशी एकदा गुरे बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही. ॥५६६॥
कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं ।
तैसा आपदा तोंडीं । दाढियेसी ॥ ५६७ ॥
माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. ॥५६७॥
आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें ।
तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥ ५६८ ॥
आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वहातील. ॥५६८॥
वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु ।
पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥ ५६९ ॥
वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य रहाणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हातार्या माकडासारखे बेडौल होईल. ॥५६९॥
तृणाचें बुझवणें । आंदोळे वारेनगुणें ।
तैसें येईल कांपणें । सर्वांगासी ॥ ५७० ॥
गवताचे बुजगावणे जसे वार्याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगात कापरे भरेल. ॥५७०॥
पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी ।
बरवपणा बागडी । नाचविजैल ॥ ५७१ ॥
पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल. (म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन) देहाची आकृति सोंगासारखी होईल. ॥५७१॥
मळमूत्रद्वारें । होऊनि ठाती खोंकरें ।
नवसियें होती इतरें । माझियां निधनीं ॥ ५७२ ॥
मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. ॥५७२॥
देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु ।
सोइरियां उबगु । येईल माझा ॥ ५७३ ॥
अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्या-धायर्या लोकांना माझा कंटाळा येईल. ॥५७३॥
स्त्रियां म्हणती विवसी । बाळें जाती मूर्छी ।
किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥ ५७४ ॥
बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिऊन मूर्छित होतील. फार काय सांगावे ? मी सर्वांच्या किळासेला पात्र होईन. ॥५७४॥
उभळीचा उजगरा । सेजारियां साइलिया घरा ।
शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांतें हा ॥ ५७५ ॥
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्या जागरणामुळे (हा म्हातारा पुष्कळांना शिणवील’ असे ते म्हणतील. ॥५७५॥
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं ।
देखे मग मनीं । विटे जो गा ॥ ५७६ ॥
असा पुढे येणार्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पहातो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो ॥५७६॥
म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल ।
मग काय उरेल । हितालागीं ? ॥ ५७७ ॥
तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे ? ॥५७७॥
म्हणौनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें ।
पंगु न होता जावें । तेथ जाय ॥ ५७८ ॥
म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो, आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थान, तीर्थ वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो ॥५७८॥
दृष्टी जंव आहे । तंव पाहावें तेतुलें पाहे ।
मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥ ५७९ ॥
जेथपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे ते बोलून घेतो. ॥५७९॥
हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे ।
आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥ ५८० ॥
हात लुळे होतील, ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो. ॥५८०॥
ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें ।
तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥ ५८१ ॥
अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. ॥५८१॥
जैं चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती ।
का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे ॥ ५८२ ॥
जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी, ॥५८२॥
तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें ।
तें आतांचि आघवें । सवतें करीं ॥ ५८३ ॥
त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच (तारुण्यातच) त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. (जे करावयाचे ते सर्व केले). ॥५८३॥
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें ।
तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥
आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय ? (तो नागवला जात नाही.) ॥५८४॥
तैसें वृद्धाप्य होये । आलेपण तें वायां जाये ।
जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥ ५८५ ॥
तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण (शंभर वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे काय ? (की नाही) कोणास ठाऊक ? ॥५८५॥
झाडिलींचि कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं ।
जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई ? ॥ ५८६ ॥
तिळाचे कोळ ( तिळाचे उपटलेले झाड) एकदा झाडून त्यातील सगले तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नि जरी असला, पण तो एकदा राखोंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय ? ॥५८६॥
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें । वार्धक्या जो नागवे ।
तयाच्या ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥ ५८७ ॥
(त्याप्रमाणे तारुण्यात शक्ति व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील ?) असे वृद्धावस्थेत होणार्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. ॥५८७॥
तैसेंचि नाना रोग । पडिघाती ना जंव पुढां आंग ।
तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥ ५८८ ॥
व्याधि = त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. ॥५८८॥
सापाच्या तोंडी । पडली जे उंडी ।
ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥
सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, ॥५८९॥
तैसा वियोगें जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे ।
तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥ ५९० ॥
त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ति ठेऊन उदास होऊन रहातो, ॥५९०॥
आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें ।
तयां कर्मरंध्री गुंडे । नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥
आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो ॥५९१॥
ऐसऐसिया आइती । जयाची परी असती ।
तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥ ५९२ ॥
अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. ॥५९२॥
आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक ।
सांगेन आइक । धनंजया ॥ ५९३ ॥
आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक. ॥५९३॥
असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥
(देहासंबधी) अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह इत्यादिकांविषयी अलोलूपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे ॥९॥
तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी ।
उखिता जैसा बिढारीं । बैसला आहे ॥ ५९४ ॥
तर बिर्हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिर्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरिराविषयी उदास असतो ॥५९४॥
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।
घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥ ५९५ ॥
अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते ॥५९५॥
साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें ।
स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥
आपली सावली आपल्याबरोबरच नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते, ॥५९६॥
आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं ।
कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥ ५९७ ॥
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो) ॥५९७॥
जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पंडुसुता ।
जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥ ५९८ ॥
अर्जुना वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो, तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते. ॥५९८॥
किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा ।
वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥ ५९९ ॥
फार काय सांगावे ? राघू जसा पिंजर्यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो. ॥५९९॥
एर्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री ।
तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥ ६०० ॥
एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. ॥६००॥
महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे ।
इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं ॥ ६०१ ॥
आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात (म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही ॥६०१॥
कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता ।
तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥ ६०२ ॥
अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दु:खाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दुखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही ॥६०२॥
जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे ।
तेथ ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥ ६०३ ॥
कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या हानि अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. ॥६०३॥
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥
माझ्या ठिकाणी अन्वयपूर्वक अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात रहाणे व जनांच्या समुदायाची खंती ॥१०॥
आणि मीवांचूनि कांहीं । आणिक गोमटें नाहीं ।
ऐसा निश्चयोचि तिहीं । जयाचा केला ॥ ६०४ ॥
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे ॥६०४॥
शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश ।
एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥ ६०५ ॥
ज्याचे शरीर वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे (प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे) आणि एक माझ्यावाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत ॥६०५॥
किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज ।
तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥ ६०६ ॥
फार काय सांगावे ! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे). ॥६०६॥
रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें ।
तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥ ६०७ ॥
पतीकडे जातांना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे ॥६०७॥
मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें ।
मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥ ६०८ ॥
गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात. ॥६०८॥
सूर्याच्या होण्यां होईजे । कां सूर्यासवेंचि जाइजे ।
हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥ ६०९ ॥
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो ॥६०९॥
पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें ।
ते लहरी म्हणती लौकिकें । एर्हवीं तें पाणी ॥ ६१० ॥
पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे. ॥६१०॥
जो अनन्यु यापरी । मी जाहलाहि मातें वरी ।
तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥ ६११ ॥
जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच तो मूर्तिमंत ज्ञान होय. ॥६११॥
आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया ॥ ६१२ ॥
आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास रहावयास आवडते, ॥६१२॥
शैलकक्षांचीं कुहरें । जळाशय परिसरें ।
अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥ ६१३ ॥
डोंगराच्या बगलेतील गुहामधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने रहातो आणि शहरात येत नाही, ॥६१३॥
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती ।
जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥ ६१४ ॥
ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज. ॥६१४॥
आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती ।
ज्ञानाचिये निरुती- । लागीं सांगों ॥ ६१५ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो. ॥६१५॥
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञा नमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥ ११ ॥
अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. ॥११॥
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें जया दिसें । ज्ञानास्तव ॥ ६१६ ॥
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तु आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, ॥६१६॥
तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें ।
तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला ॥ ६१७ ॥
त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, ॥६१७॥
स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।
दे अध्यात्मज्ञानीं बुडी । सद्भावाची ॥ ६१८ ॥
स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेऊन त्यात रममाण होतो. ॥६१८॥
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे ।
निघिजे जेवीं नीटें । राजपंथें ॥ ६१९ ॥
(जसे एखाद्या प्रवाशाने जेथे) वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने निघावे, ॥६१९॥
तैसें ज्ञानजातां करी । आघवेंचि एकीकडे सारी ।
मग मन बुद्धि मोहरी । अध्यात्मज्ञानीं ॥ ६२० ॥
त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धि यांस अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो. ॥६२०॥
म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती ।
ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥ ६२१ ॥
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांति होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धि मेरु (आधार) होते. ॥६२१॥
एवं निश्चयो जयाचा । द्वारीं आध्यात्मज्ञानाचा ।
ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥ ६२२ ॥
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव तार्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो ॥६२२॥
तयाच्या ठायीं ज्ञान । या बोला नाहीं आन ।
जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो मी ॥ ६२३ ॥
त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या (भगवंताच्या) बोलण्यात आडपडदा आहे असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला. ॥६२३॥
तरी बैसलेपणें जें होये । बैसतांचि बोलें न होये ।
तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥ ६२४ ॥
तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्य़ास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. ॥६२४॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ ।
तें ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥ ६२५ ॥
आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टि नीट जाऊन भिडते ॥६२५॥
एर्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें ।
तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥ ६२६ ॥
वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. ॥६२६॥
आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ? ।
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायांचि जाय ॥ ६२७ ॥
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा ? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. ॥६२७॥
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे ।
ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी ॥ ६२८ ॥
जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. ॥६२८॥
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली वस्तुचि आघवी ।
तें देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख ॥ ६२९ ॥
म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तु पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. ॥६२९॥
यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे ।
तैसेनि उन्मेखें । आथिला जो ॥ ६३० ॥
याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पहाते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे ॥६३०॥
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी ।
तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे ॥ ६३१ ॥
जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको. ॥६३१॥
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे ।
तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥ ६३२ ॥
(एवढेच काय) परंतु (ज्याच्या बुद्धीत) ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धि ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. ॥६३२॥
तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मो कवण पंडुसुता ? ।
काय सवितयातें सविता । म्हणावें असें ? ॥ ६३३ ॥
अर्जुना तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे ? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय ? ॥६३३॥
तंव श्रोतें म्हणती असो । न सांगें तयाचा अतिसो ।
ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी कां ? ॥ ६३४ ॥
तेव्हा श्रोते म्हणाले, ‘ते राहू दे, त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस ? ॥६३४॥
तुझा हाचि आम्हां थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु ।
जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥ ६३५ ॥
आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. ॥६३५॥
रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु ।
तरी अवंतूनि शत्रु । करितोसि कां गा ? ॥ ६३६ ॥
आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करतांना त्याचे पाल्हाळ अतिशय रसभरित करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्ति तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रु केल्याचा दोष केला असतास. ॥६३६॥
ठायीं बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे ।
तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ? ॥ ६३७ ॥
भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदरसत्काराचा काय उपयोग ? ॥६३७॥
आघवाचि विषयीं भादी । परी सांजवणीं टेंकों नेदी ।
ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ? ॥ ६३८ ॥
इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढण्याच्यावेळी जी कासेखाली बसू देत नाही (खाली बसल्याबरोबर लाथेचा फटाकारा मारते), तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील ? ॥६३८॥
तैसी ज्ञानीं मती न फांके । येर जल्पती नेणों केतुकें ।
परि तें असो निकें । केलें तुवां ॥ ६३९ ॥
त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावतांना (इतर कवि) ज्ञानावाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात, ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू चांगले केलेस. ॥६३९॥
जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें ।
तें धणीचें आथी तुझिया ऐसें । निरूपण ॥ ६४० ॥
ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्य़ासारखे रसाळ व्याख्यान (आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल ?) ॥६४०॥
अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी ।
सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु कां ॥ ६४१ ॥
अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का (तिचा कंटाळा यावयाचा नाही. (दु:खाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही, इतका मोठा वाटतो तसे) सुखाचे दिवस कोट्यावधि गेले तरी त्यांना कोणी मोजतो का ? ॥६४१॥
पूर्णचंद्रेंसीं राती । युग एक असोनि पहाती ।
तरी काय पाहात आहाती । चकोर ते ? ॥ ६४२ ॥
पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय ? ॥६४२॥
तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें ।
आतां पुरे कोण म्हणे ? । आकर्णितां ॥ ६४३ ॥
त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकतांना कोण पुरे म्हणेल ? ॥६४३॥
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये ।
तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी ॥ ६४४ ॥
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते. (म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीचे मनात येतच नाही अशी स्थिती असते). ॥६४४॥
तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांसि लागु ।
आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥ ६४५ ॥
तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीति आहे आणि तुलाही येथे (ज्ञानाचे ठिकाणी) प्रीति आहे. ॥६४५॥
म्हणौनि यया वाखाणा- । पासीं से आली चौगुणा ।
ना म्हणों नयेसि देखणा ? । होसी ज्ञानी ॥ ६४६ ॥
म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ति आली. तू ज्ञानामधे डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही, ॥६४६॥
तरी आतां ययावरी । प्रज्ञेच्या माजघरीं ।
पदें साच करीं । निरूपणीं ॥ ६४७ ॥
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. ॥६४७॥
या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें ।
माझेंही जी ऐसें । मनोगत ॥ ६४८ ॥
या संतांच्या आज्ञेबरोबर ‘महाराज, माझाही हेतु असाच आहे’ असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. ॥६४८॥
यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी ।
तरी वायां वागू मी । वाढों नेदी ॥ ६४९ ॥
(माझाही मूळ हेतु असाच होता) यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकुम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. ॥६४९॥
एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा ।
श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली ॥ ६५० ॥
याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली, ऐका. ॥६५०॥
मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें ।
हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥६५१॥
करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा ।
तैसें ज्ञान आम्हीं डोळां । दाविलें तुज ॥ ६५२ ॥
तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले. ॥६५२॥
आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती ।
तेंही सांगों व्यक्ती । लक्षणेंसीं ॥ ६५३ ॥
यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. ॥६५३॥
एर्हवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान जाणवे धनंजया ।
जें ज्ञान नव्हे तें अपैसया । अज्ञानचि ॥ ६५४ ॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप (कोणी न सांगता) अज्ञानच आहे. ॥६५४॥
पाहें पां दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे ।
वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं ॥ ६५५ ॥
अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते. ॥६५५॥
तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं ।
तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥ ६५६ ॥
त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक. ॥६५६॥
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे ।
सत्कारें होये । तोषु जया ॥ ६५७ ॥
तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पहातो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो. ॥६५७॥
गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे ।
तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥ ६५८ ॥
पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. ॥६५८॥
आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं ।
उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥ ६५९ ॥
आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, (म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो) अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते ॥६५९॥
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा ।
करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥ ६६० ॥
विद्येचा पसारा (दुकान) घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटावतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. ॥६६०॥
आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची ।
तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥ ६६१ ॥
स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्य़ास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज. ॥६६१॥
आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।
तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥ ६६२ ॥
आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते, ॥६६२॥
कौतुकें जें जें जल्पे । तें साबळाहूनि तीख रुपे ।
विषाहूनि संकल्पें । मारकु जो ॥ ६६३ ॥
आणि जो सहज जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो ॥६६३॥
तयातें बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचें निधान ।
हिंसेसि आयतन । जयाचें जिणें ॥ ६६४ ॥
आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे (इतकेच नव्हे) तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. ॥६६४॥
आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे ।
तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे ॥ ६६५ ॥
जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो (संकोचित होतो) त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दु:खी होतो ॥६६५॥
पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा ।
हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥ ६६६ ॥
वार्याच्या भोवर्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो. ॥६६६॥
निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके ।
थेंबें विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा ॥ ६६७ ॥
जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून रहातो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्याने तो वाळतो; ॥६६७॥
तैसा मानापमानीं होये । जो कोण्हीचि उर्मी न साहे ।
तयाच्या ठायीं आहे । अज्ञान पुरें ॥ ६६८ ॥
त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणात्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. ॥६६८॥
आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी ।
आंगें मिळे जीवें पाठीं । भलतया दे ॥ ६६९ ॥
आणि ज्याच्या मनामधे गाठ असते (आपल्या मनातील गोष्ट दुसर्यास कधीही कळू देत नाही) ज्याचे बोलणे व पहाणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पाडतो ॥६६९॥
व्याधाचे चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें ।
चांगाचीं अंतःकरणें । विरु करी ॥ ६७० ॥
पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते (वरून पहाणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो), त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसर्यास पोसणे अथवा सांभाळणे असते (पण ते केवळ त्या पोसले जाणार्या माणसाच्या घाताकरताच असते) व जो चांगल्या माणसाची अंत:करणे विरुद्ध करतो ॥६७०॥
गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली ।
तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥ ६७१ ॥
शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, (परंतु आत कडू असते) तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते, ॥६७१॥
अज्ञान तयाचिया ठायीं । ठेविलें असे पाहीं ।
याबोला आन नाहीं । सत्य मानीं ॥ ६७२ ॥
त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे मान. ॥६७२॥
आणि गुरुकुळीं लाजे । जो गुरुभक्ती उभजे ।
विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि जो ॥ ६७३ ॥
आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो, ॥६७३॥
तयाचें नाम घेणें । तें वाचे शूद्रान्न होणें ।
परी घडलें लक्षणें । बोलतां इयें ॥ ६७४ ॥
त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शुद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावे ? अज्ञानाची लक्षणे सांगतांना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. ॥६७४॥
आता गुरुभक्तांचें नांव घेवों । तेणें वाचेसि प्रायश्चित देवों ।
गुरुसेवका नांव पावों । सूर्यु जैसा ॥ ६७५ ॥
म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्यायोगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणूकाय सूर्यच आहे असे समजा. ॥६७५॥
येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा ।
जो गुरुतल्पगाचा । नामीं आला ॥ ६७६ ॥
एवढ्याने (गुरुभक्ताचे नाव घेतल्याने) ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील, ॥६७६॥
हा ठायवरी । तया नामाचें भय हरी ।
मग म्हणे अवधारीं । आणिकें चिन्हें ॥ ६७७ ॥
गुरुभक्ताच्या नावाच्या उच्चार) येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय (दोष) हरण करतो, मग आणखी (अज्ञानाची) चिन्हे ऐक, असे देव म्हणाले. ॥६७७॥
तरि आंगें कर्में ढिला । जो मनें विकल्पें भरला ।
अडवींचा अवगळला । कुहा जैसा ॥ ६७८ ॥
तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. ॥६७८॥
तया तोंडीं कांटिवडे । आंतु नुसधीं हाडें ।
अशुचि तेणें पाडें । सबाह्य जो ॥ ६७९ ॥
त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात (पाणी नसते). त्या आडाप्रमाणे जो आतबाहेर अमंगल असतो. ॥६७९॥
जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे ।
तैसें आपलें परावें नेणे । द्रव्यालागीं ॥ ६८० ॥
ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही, ॥६८०॥
इया ग्रामसिंहाचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं ।
तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना ॥ ६८१ ॥
या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करत नाही ॥६८१॥
कर्माचा वेळु चुके । कां नित्य नैमित्तिक ठाके ।
तें जया न दुखे । जीवामाजीं ॥ ६८२ ॥
विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही, ॥६८२॥
पापी जो निसुगु । पुण्याविषयीं अतिनिलागु ।
जयाचिया मनीं वेगु । विकल्पाचा ॥ ६८३ ॥
पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय नि:संग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते ॥६८३॥
तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा ।
जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें ॥ ६८४ ॥
जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज. ॥६८४॥
आणि स्वार्थें अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे ।
जैसें तृणबीज ढळे । मुंगियेचेनी ॥ ६८५ ॥
आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो, ॥६८५॥
पावो सूदलिया सवें । जैसें थिल्लर कालवे ।
तैसा भयाचेनि नांवें । गजबजे जो ॥ ६८६ ॥
डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो ॥६८६॥
मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ॥ ६८७ ॥
वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते, ॥६८७॥
वायूचेनि सावायें । धू दिगंतरा जाये ।
दुःखवार्ता होये । तसें जया ॥ ६८८ ॥
पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज. ॥६८८॥
वाउधणाचिया परी । जो आश्रो कहींचि न धरी ।
क्षेत्रीं तीर्थीं पुरीं । थारों नेणे ॥ ६८९ ॥
वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर रहात नाही व जो क्षेत्रात तीर्थांचे ठिकाणी अथवा सप्तपुर्यांपकी कोण्या एका पुरीत कायम रहाण्याचे जाणत नाही ॥६८९॥
कां मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा ।
हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥ ६९० ॥
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते. ॥६९०॥
जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे ।
तैसा पडे तैं राहणें । एर्हवीं हिंडे ॥ ६९१ ॥
ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल, तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो. ॥६९१॥
तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड ।
जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें ॥ ६९२ ॥
जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे. ॥६९२॥
आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा ।
नाहीं वोढावारा । संयमाचा ॥ ६९३ ॥
आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही ॥६९३॥
लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरवंडा ।
तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥ ६९४ ॥
ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्माला तोंड देण्य़ास भीत नाही, ॥६९४॥
व्रतातें आड मोडी । स्वधर्मु पायें वोलांडी ।
नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥ ६९५ ॥
व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच रहात नाही ॥६९५॥
नाहीं पापाचा कंटाळा । नेणें पुण्याचा जिव्हाळा ।
लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥ ६९६ ॥
ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो ॥६९६॥
कुळेंसीं जो पाठमोरा । वेदाज्ञेसीं दुर्हा ।
कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥ ६९७ ॥
जो आपल्या कुळातील आचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास कर्म कोणते, यातील निवड जो जाणत नाही, ॥६९७॥
वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु ।
फुटला जैसा पाटु । निर्जनीं ॥ ६९८ ॥
सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट (पाहिजे तिकडे वहात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वहात असतो ॥६९८॥
आंधळें हातिरूं मातलें । कां डोंगरीं जैसें पेटलें ।
तैसें विषयीं सुटलें । चित्त जयाचें ॥ ६९९ ॥
आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते ॥६९९॥
पैं उबधडां काय न पडे । मोकाटु कोणां नातुडे ।
ग्रामद्वारींचे आडें । नोलांडी कोण ॥ ७०० ॥
पण उघड्यावर काय काय पडत नाही ? मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही ? गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडत नाही ? ॥७००॥
जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें ।
वाणसियेचें उभलें । कोण न रिगे ? ॥ ७०१ ॥
ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, (ते वाटेल त्याला मिळते) किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही ? अथवा वेश्येच्या उंबर्याचे आत कोण प्रवेश करणार नाही ? ॥७०१॥
तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण ।
अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥ ७०२ ॥
त्याचप्रमाणे ज्याचे अंत:करण असते (म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बर्या-वाईट कल्पनांनी व्यापले जाते) त्या पुरुषाचे ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे ॥७०२॥
आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी ।
स्वर्गींही खावया जोडी । येथूनिची ॥ ७०३ ॥
आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडीत नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास (भोगावयास) मिळावे म्हणून जो येथूनच सामुग्री (सकाम कर्मे) करून ठेवतो ॥७०३॥
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें ।
मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी ॥ ७०४ ॥
जो भोगाकरता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्यकर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो, ॥७०४॥
विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे ।
कुहीला हातीं खाये । कोढी जैसा ॥ ७०५ ॥
विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर जसा कोडी पुरूष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही ॥७०५॥
खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें ।
तर्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥ ७०६ ॥
ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या आंगास स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो गाढव मागे हटत नाही. ॥७०६॥
तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं ।
व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥
जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो. ॥७०७॥
फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव ।
परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥ ७०८ ॥
हरण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की तो मृगजळाच्या मागे लागून उर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही व असे म्हणत नाही की मृगजल ही जलाची भ्रांती आहे. ॥७०८॥
तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयीं त्रासितां बहुतीं परीं ।
तर्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥ ७०९ ॥
त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, तर उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. ॥७०९॥
पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें ।
तें सरे मग स्त्रीमांसें । भुलोनि ठाके ॥ ७१० ॥
पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई, बाबा असे आईबापाचे वेड असते, ते संपते, मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होतो. ॥७१०॥
मग स्त्री भोगितां थावों । वृद्धाप्य लागे येवों ।
तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकांसि आणी ॥ ७११ ॥
मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असतांना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो. ॥७११॥
आंधळें व्यालें जैसें । तैसा बाळें परिवसे ।
परि जीवें मरे तों न त्रासे । विषयांसि जो ॥ ७१२ ॥
एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून रहातो आणि महाराज, मरतो परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही, ॥७१२॥
जाण तयाच्या ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं ।
आतां आणीक कांहीं । चिन्हें सांगों ॥ ७१३ ॥
त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज. आता (अज्ञानाची) आणखी काही लक्षणे सांगतो. ॥७१३॥
तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा ।
वळघोनियां कर्मा । आरंभु करी ॥ ७१४ ॥
तर देह हाच आत्मा आहे. (देहच मी आहे) अशा मानाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्य़ास प्रारंभ करतो ॥७१४॥
आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे ।
तयाचेनि आविष्करें । कुंथों लागे ॥ ७१५ ॥
आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामधे तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्माने खंती करतो. ॥७१५॥
डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे ।
तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥ ७१६ ॥
बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाराच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणाराच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो ॥७१६॥
म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरीं संपत्ती ।
माझी आचरती रीती । कोणा आहे ॥ ७१७ ॥
तो म्हणतो, जगात काय तो एक मीच (महत्वाचा मनुष्य) आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ति आहे व माझी वागण्याची पद्धत दुसर्या कोणाला आहे ? ॥७१७॥
नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु ।
ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥ ७१८ ॥
माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन रहातो. ॥७१८॥
व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाऊं जैसा ।
निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें ॥ ७१९ ॥
रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत (दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते) त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही ॥७१९॥
पैं गुण तेतुला खाय । स्नेह कीं जाळितु जाय ।
जेथ ठेविजे तेथ होय । मसी ऐसें ॥ ७२० ॥
परंतु (जसा एखादा दिवा) वात तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो. ॥७२०॥
जीवनें शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडीं ।
लागला तरी काडी । उरों नेदी ॥ ७२१ ॥
पाणी शिंपडल्याने तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही. ॥७२१॥
आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उबारा धरी ।
तैसिया दीपाचि परी । सुविद्यु जो ॥ ७२२ ॥
थोडकासा प्रकश करतो व तेवढ्याने उष्णता वाढवतो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो (म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात) ॥७२२॥
औषधाचेनि नांवें अमृतें । जैसा नवज्वरु आंबुथे ।
कां विषचि होऊनि परतें । सर्पा दूध ॥ ७२३ ॥
नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते ॥७२३॥
तैसा सद्गुणीं मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु ।
तपोज्ञानें अपारु । ताठा चढे ॥ ७२४ ॥
त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, ॥७२४॥
अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला ।
तैसा गर्वें फुगला । देखसी जो ॥ ७२५ ॥
अत्यंजाला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो. त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल ॥७२५॥
जो लाटणें ऐसा न लवे । पाथरु तेवीं न द्रवे ।
गुणियासि नागवे । फोडसें जैसें ॥ ७२६ ॥
जो लाटण्यासारखा लवत नाही, (जसा) दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, (त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही). ॥७२६॥
किंबहुना तयापाशी । अज्ञान आहे वाढीसीं ।
हें निकरें गा तुजसीं । बोलत असों ॥ ७२७ ॥
फार काय सांगावे ? त्याच्याजवळ अर्जुना, अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निक्षून सांगतो. ॥७२७॥
आणीकही धनंजया । जो गृहदेह सामग्रिया ।
न देखे कालचेया । जन्मातें गा ॥ ७२८ ॥
अर्जुना आणखी असे पहा की जो घर, शरीर सामग्रीच्या योगाने (घर, वगैरे पसार्यात गुंतल्याने) मागील जन्माची आठवण ठेवीत नाही ॥७२८॥
कृतघ्ना उपकारु केला । कां चोरा व्यवहारु दिधला ।
निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥ ७२९ ॥
(मागील जन्माला कसा विसरतो हे दृष्टांताने सांगतात) कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले (ते जसे तो विसरतो) अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो ॥७२९॥
वोढाळितां लाविलें । तें तैसेंच कान पूंस वोलें ।
कीं पुढती वोढाळुं आलें । सुणें जैसें ॥ ७३० ॥
कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतांनाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते ॥७३०॥
बेडूक सापाचिया तोंडीं । जातसे सबुडबुडीं ।
तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ? ॥ ७३१ ॥
बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतांनाही माशांचे समुदाय गिळतो पण ‘आपण मरतो’ ही आठवण ठेवीत नाही ॥७३१॥
तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती ।
जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥ ७३२ ॥
त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे ही नऊ द्वारे (मळाने) पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या (जन्माच्या) योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंत:करणात सलत नाही, ॥७३२॥
मातेच्या उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।
जठरीं नवमासवरी । उकडला जो ॥ ७३३ ॥
आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमधे घालून, त्या पोटात नऊ महिने पर्यंत ज्यावेळी शिजला ॥७३३॥
तें गर्भींची जे व्यथा । कां जें जालें उपजतां ।
तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो ॥ ७३४ ॥
ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट, ते काहीच जो मुळी आठवत नाही ॥७३४॥
मलमूत्रपंकीं । जे लोळतें बाळ अंकीं ।
तें देखोनि जो न थुंकीं । त्रासु नेघे ॥ ७३५ ॥
विष्ठा व मुत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो चिळस घेत नाही व कंटाळत नाही ॥७३५॥
कालचि ना जन्म गेलें । पाहेचि पुढती आलें ।
ऐसें हें कांहीं वाटलें । नाहीं जया ॥ ७३६ ॥
(मागला) जन्म नुकताच संपला नाही काय ? व लागलीच पुन: उद्या दुसरा जन्म मिळाणार असे हे काही ज्याला वाटले नाही ॥७३६॥
आणि पैं तयाची परी । जीविताची फरारी ।
देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥ ७३७ ॥
आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, ॥७३७॥
जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे ।
हें जयाचेनि मानसें । मानिजेना ॥ ७३८ ॥
जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की, येथे एक मृत्यु आहे, हे ज्याच्या मनाला पटत नाही ॥७३८॥
अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा ।
न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥ ७३९ ॥
थोडक्यात मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही ॥७३९॥
कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली ।
गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें ॥ ७४० ॥
अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पहाता, गळास लावलेले आमीष माशाने गिळावे ॥७४०॥
दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा ।
नेणवेचि पैं गा । जयापरी ॥ ७४१ ॥
दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही. ॥७४१॥
गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे ।
नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न ॥ ७४२ ॥
जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो ॥७४२॥
तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे ।
हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥ ७४३ ॥
त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणार्या सुखामुळे जाणतच नाही. ॥७४३॥
शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी ।
विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥ ७४४ ॥
शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्याच मानतो. ॥७४४॥
परी बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें ।
तेंचि तें नागवणें । रूप एथ ॥ ७४५ ॥
वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय (त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे). पण त्या बिचार्याच्या हे काहीच लक्षात येत नाही. ॥७४५॥
संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें ।
लेपा स्नपन करणें । तोचि नाशु ॥ ७४६ ॥
आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश होय. ॥७४६॥
पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें ।
तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा ॥ ७४७ ॥
पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीत खरी वृद्धी नसून खरखरा नाशच आहे हे जाणत नाहीत ॥७४७॥
सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा ।
प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥ ७४८ ॥
समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यु जवळ येतो; ॥७४८॥
तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु ।
जंव जंव सुरवाडु । भोगांचा या ॥ ७४९ ॥
त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल, ॥७४९॥
तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके ।
मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे ॥ ७५० ॥
तसतसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जस
तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे ।
हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥ ७५१ ॥
त्याप्रमाणे (वरील मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते (म्हणजे मरण जवळ येते). ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही ॥७५१॥
किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा ।
न देखे जो मावा। विषयांचिया ॥ ७५२ ॥
अर्जुना, फार काय सांगावे ? हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही ॥७५२॥
तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो।
न पडे गा ठावो । आणिकांचा ॥ ७५३ ॥
हे महाबाहो अर्जुना, तो (पुरुष) अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही (तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले. ॥७५३॥
पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे ।
तैसाचि तारुण्ये पोखें । जरा न गणी ॥ ७५४ ॥
जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो ॥७५४॥
कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा ।
तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ॥ ७५५ ॥
डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा (जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पहात नाही) ॥७५५॥
कां आडवोहळा पाणी आलें । कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें ।
तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥ ७५६ ॥
अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते ॥७५६॥
पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों ।
मस्तक आदरीं शिरों- । भागीं कंप ॥ ७५७ ॥
शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्य़ास लागतो व शरीरातील तेज कमी होण्यास लागते व मस्तकास कापरे सुटते ॥७५७॥
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी ।
तरी जो करी । मायेचा पैसु ॥ ७५८ ॥
दाढी पांढरी होते, मान हलून नाही नाही अशी निवारण्याची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवीत रहातो, ॥७५८॥
पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें ।
कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें ॥ ७५९ ॥
पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पहात नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाडाच्या योगाने (डोळे उघडत नाहीत या सबबीवर अधिकच झोप घेण्यास संधि सापदते म्हणून) आळशी मनुष्य (चिळस घेण्याऐवजी अधिकच) संतुष्ट होतो ॥७५९॥
तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें ।
न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥ ७६० ॥
अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पहात नाही, तोच खरोखर अज्ञान आहे ॥७६०॥
देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें ।
परी न म्हणे पाहे माझें । ऐसेंचि भवे ॥ ७६१ ॥
आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कुबड्या माणसांकडे पाहून त्यास गर्वाने वेडावू लागतो पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल. ॥७६१॥
आणि आंगीं वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची ।
परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥ ७६२ ॥
आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, ॥७६२॥
तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर ।
तेवींचि परियेसीं थोर । चिन्हें आणिक ॥ ७६३ ॥
तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक. ॥७६३॥
तरि वाघाचिये अडवे । एक वेळ आला चरोनि दैवें ।
तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा ॥ ७६४ ॥
तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा (सुरक्षितपणे) पोळ (बैल) चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्याकडे धावतो ॥७६४॥
कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु ।
येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय ॥ ७६५ ॥
(ज्या जागेत) पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो (म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो). ॥७६५॥
तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे ।
एथ रोग एक आहे । हें मानीना जो ॥ ७६६ ॥
त्याप्रमाणे आरोग्य, हे एखादे दुसरे वेळी चुकून मिळालेले असले, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानीतच नाही. ॥७६६॥
वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं ।
हें मानी तो सपिली । मुकला जेवीं ॥ ७६७ ॥
शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडणतंटे संपले (असे मानून जो स्वस्थ रहातो), तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो ॥७६७॥
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी ।
तंव जो न करी । व्याधी चिंता ॥ ७६८ ॥
त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही ॥७६८॥
आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे ।
तेणें रजें डोळे । जाती जयाचे ॥ ७६९ ॥
आणि स्त्री पुत्रादिकांच्या संगतित जसजशी संपत्ति अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो, ॥७६९॥
सवेंचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल ।
हें दुःख पुढील । देखेना जो ॥ ७७० ॥
या स्त्रीपुत्रादि व संपति यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढले दु:ख जो आगाऊ जाणत नाही ॥७७०॥
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा ।
जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥ ७७१ ॥
अर्जुना, तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवे ते (बरे वाईट न पहाता) विषय देतो, तो देखील तोच (अज्ञानीच) समजावा. ॥७७१॥
वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें ।
सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥ ७७२ ॥
तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्य़ास योग्य-अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो ॥७७२॥
न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी ।
चिंतू नये तें विचारी । जयाची मती ॥ ७७३ ॥
जे करू नये ते करतो व न होणार्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते ॥७७३॥
रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें ।
स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥ ७७४ ॥
जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो ॥७७४॥
न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे ।
न खावें तें खाये । तेवींचि तोषे ॥ ७७५ ॥
जेथे जाऊ नये, तेथे जातो, जे पाहू नये ते पहातो व खाऊ नये ते खातो व (ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता) त्याविषयी आनंद मानतो ॥७७५॥
न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु ।
नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥ ७७६ ॥
ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो. ॥७७६॥
नायकावें तें आइके । न बोलावें तें बके ।
परी दोष होतील हें न देखे । प्रवर्ततां ॥ ७७७ ॥
जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पहात नाही. ॥७७७॥
आंगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें ।
जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥ ७७८ ॥
शरीरास व मनास आवडेल एवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य असो वा नसो, याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो ॥७७८॥
परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल ।
हें कांहींचि पुढील । देखेना जो ॥ ७७९ ॥
परंतु (यापासून) मला पाप लागेल अथवा (या योगाने) नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील होणार्या गोष्टी जो काहीच पहात नाही. ॥७७९॥
तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें ।
जें सज्ञानाही संगें । झोंबों सके ॥ ७८० ॥
त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. ॥७८०॥
परी असो हें आइक । अज्ञान चिन्हें आणिक ।
जेणें तुज सम्यक् । जाणवे तें ॥ ७८१ ॥
परंतु ते राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षने सांगतो ती ऐक. ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल. ॥७८१॥
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं ।
नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥ ७८२ ॥
तर ताज्या, सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून रहाते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पहाशील ॥७८२॥
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी ।
तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥ ७८३ ॥
साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही (अथवा) त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, (तेथून हलत नाही), ॥७८३॥
ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं ।
जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥ ७८४ ॥
बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा गुरूं जसे चिखलात पूर्णपणे फसते, ॥७८४॥
तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें ।
जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥ ७८५ ॥
त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व मेल्यावर तो त्या जागेत सर्प होऊन बसतो ॥७८५॥
प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी ।
तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥ ७८६ ॥
नवर्याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून रहातो ॥७८६॥
मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें ।
गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥ ७८७ ॥
पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो. ॥७८७॥
म्हातारपणीं जालें । मा आणिक एक विपाईलें ।
तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥ ७८८ ॥
म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न, त्याचे आईबापास जितके प्रेम असते, ॥७८८॥
तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था ।
आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो ॥ ७८९ ॥
अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्रिवाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही ॥७८९॥
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।
कोण मी काय करावें । कांहीं नेणे ॥ ७९० ॥
ब्रह्मनिष्ठांचे अंत:करण, ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असतांना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात, ॥७९०॥
महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।
ठाके व्यवहारजात । जयापरी ॥ ७९१ ॥
त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय, हे काही जो समजत नाही ॥७९१॥
हानि लाज न देखे । परापवादु नाइके ।
जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं ॥ ७९२ ॥
जो नुकसान, लाज पहात नाही, दुसर्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते ॥७९२॥
चित्त आराधी स्त्रीयेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे ।
माकड गारुडियाचें । जैसें होय ॥ ७९३ ॥
ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, ॥७९३॥
आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुखवी ।
मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥ ७९४ ॥
ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्ट मित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो ॥७९४॥
तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची ।
परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥ ७९५ ॥
त्याप्रमाणे (स्त्रीची भर करण्याकरता) दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, तिची खाच भरण्याला कमी पडू देत नाही. ॥७९५॥
पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी ।
मायबापां दावी । निदारपण ॥ ७९६ ॥
पुजल्या जाणार्या देवतांची बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरूला ठकवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो. ॥७९६॥
स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं ।
आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥ ७९७ ॥
तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये (साधने) व जी जी म्हणून चांगली वस्तु दिसेल ती ती आणतो ॥७९७॥
प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें ।
तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी ॥ ७९८ ॥
प्रेमल भक्ताने जसे कुलदेवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्रचित्ताने करतो ॥७९८॥
साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख ।
येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं ॥ ७९९ ॥
जे खरे चांगले असेल, ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक(देहरक्षण) देखील करीत नाही, ॥७९९॥
इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल ।
तरी युगचि बुडैल । ऐसें जया ॥ ८०० ॥
हिला कोणी (वाकड्या दृष्टीने) पाहील हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल, तर युगांतच होईल असे ज्याला वाटते, ॥८००॥
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण ।
तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥ ८०१ ॥
ज्याप्रमाणे नायट्यांच्या भितीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो ॥८०१॥
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया ।
आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥ ८०२ ॥
अर्जुना, फार काय सांगावे ! ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते ॥८०२॥
आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात ।
तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां ॥ ८०३ ॥
अरे तिची जी आणखीही चीजवस्तु असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो ॥८०३॥
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ ।
हें असो केवळ । तेंचि रूप ॥ ८०४ ॥
तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. (फार काय सांगावे) तो अज्ञानाची मूर्तीच आहे ॥८०४॥
आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी ।
लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥ ८०५ ॥
आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या-जाण्याने झोके खाते ॥८०५॥
तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे ।
तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥ ८०६ ॥
त्याप्रमाणे आवडती वस्तु प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तु प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो ॥८०६॥
ऐसेनि जयाचे चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती ।
वाहे तो महामती । अज्ञान गा ॥ ८०७ ॥
याप्रमाणे ज्याच्या अंत:करणात (अप्रिय वस्तुप्राप्तीने) दु:ख व (प्रिय वस्तुप्राप्तीने) सुख याची चिंता असते, तो हे महामति अर्जुना अज्ञान आहे. ॥८०७॥
आणि माझ्या ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती ।
धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥ ८०८ ॥
आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे, ॥८०८॥
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी ।
राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥ ८०९ ॥
अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवर्याच्या अंत:करणात शिरून वागते ॥८०९॥
तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी ।
करूनि जो दिठी । विषो सूये ॥ ८१० ॥
अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमधे विषय ठेवतो (म्हणजे जो विषयप्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो) ॥८१०॥
आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पावे ।
तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥ ८११ ॥
आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो, ॥८११॥
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी ।
आदिलाची परवडी । करी तया ॥ ८१२ ॥
अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्याप्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो, तितक्या जोराने पुन्हा दुसर्या देवाचीही करतो. ॥८१२॥
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे ।
तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥ ८१३ ॥
ज्या गुरूचा जास्त थाटमाट पहातो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्याचा घेत नाही. ॥८१३॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु ।
तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, ॥८१४॥
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी ।
आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ ८१५ ॥
माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपर्यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो. ॥८१५॥
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे ।
पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥ ८१६ ॥
दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसर्याच देवतेची पूजा करतो. ॥८१६॥
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी ।
पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ ८१७ ॥
घरात माझी स्थापना असतांनाच दुसर्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्यावेळी (श्राद्ध, पक्ष वगैरे काळी) पितरांचा भक्त होतो. ॥८१७॥
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी ।
तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. ॥८१८॥
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये ।
चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे (देवी) मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. ॥८१९॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी ।
आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
नित्य कर्मे व नैमित्तिक (श्राद्धादिक) कर्मे टकतो आणि मग नवचंडीच्या (नवरात्रातील देवीच्या) अनुष्ठानास बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो. ॥८२०॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे ।
ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ ८२१ ॥
नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. ॥८२१॥
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।
अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥
वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच रहाते, त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा रहात नाही (म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो) ॥८२२॥
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु ।
जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥ ८२३ ॥
त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पहाशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज. ॥८२३॥
आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें ।
देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥ ८२४ ॥
आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थांची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो, तो देखील अज्ञानीच आहे. ॥८२४॥
जया जनपदीं सुख । गजबजेचें कवतिक ।
वानूं आवडे लौकिक । तोहि तोची ॥ ८२५ ॥
ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते, तोही तोच अज्ञानी आहे. ॥८२५॥
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे ।
ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥ ८२६ ॥
आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या (ब्रह्मविद्या) आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो ॥८२६॥
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे ।
अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥ ८२७ ॥
जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, आणि अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही ॥८२७॥
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती ।
पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥ ८२८ ॥
आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत (मर्यादा) पाडून ज्याची बुद्धि स्वैर भटकणारी झाली आहे, ॥८२८॥
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें ।
ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥ ८२९ ॥
तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते. ॥८२९॥
शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण ।
विधि आथर्वण । हातीं आथी ॥ ८३० ॥
कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो, व अथर्वन वेदाचे विधि (मंत्रशास्त्राचे जारण-मारण-उच्चाटान वगैरे विधी) त्याला हस्तगत झालेले असतात. ॥८३०॥
कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें ।
आगम आफाविले । मूर्त होतीं ॥ ८३१ ॥
कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे शिल्लक राहिलेले नाही, भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. ॥८३१॥
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे ।
काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥ ८३२ ॥
नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात, वैद्यकशास्त्र जो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. ॥८३२॥
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा ।
निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥ ८३३ ॥
स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो. ॥८३३॥
पैं व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा ।
परी एक आत्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो ॥ ८३४ ॥
तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांध आहे, ॥८३४॥
तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री ।
परी जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा ॥ ८३५ ॥
त्या एका अध्यात्मज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे, (असा जरी तो असला) तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये, तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. ॥८३५॥
मोराआंगीं अशेषें । पिसें असतीं डोळसें ।
परी एकली दृष्टि नसे । तैसें तें गा ॥ ८३६ ॥
मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पहातो ती एकटी दृष्टि त्या मोरास जर नसली तर त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना, एका अध्यात्मज्ञानावाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही. ॥८३६॥
जरी परमाणू एवढें । संजीवनीमूळ जोडे ।
तरी बहु काय गाडे । भरणें येरें ? ॥ ८३७ ॥
परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत ? ॥८३७॥
आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें ।
वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा ॥ ८३८ ॥
ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरानवरिशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे ॥८३८॥
तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण ।
अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥ ८३९ ॥
त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. ॥८३९॥
यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं ।
जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥ ८४० ॥
याकरता अर्जुना, असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी नित्य जागृति नाही ॥८४०॥
तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें ।
तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं ॥ ८४१ ॥
त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकूरच होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल (विस्तार) आहे. ॥८४१॥
तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें ।
तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा ॥ ८४२ ॥
तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व अरे, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे. ॥८४२॥
आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं ।
तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ? ॥ ८४३ ॥
आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय ? ॥८४३॥
ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता ।
तया पैलद्वीपींची वार्ता । काय होय ? ॥ ८४४ ॥
नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार ? ॥८४४॥
कां दारवंठाचि जयाचें । शीर रोंविलें खांचे ।
तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ? ॥ ८४५ ॥
अथवा घराच्या दाराच्या उंबर्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील ? ॥८४५॥
तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया ।
तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ? ॥ ८४६ ॥
त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल काय ? ॥८४६॥
म्हणौनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे ।
हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥ ८४७ ॥
म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. ॥८४७॥
जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें ।
तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय ॥ ८४८ ॥
जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. (त्या मुलास निराळे वाढणे नको). त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले गेले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. ॥८४८॥
वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे ।
जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥ ८४९ ॥
वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे वर्णन करावयास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलावला असता तो दुसर्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा तसेच हेही आहे असे समज. ॥८४९॥
एवं इये उपरतीं । अज्ञानचिन्हें मागुतीं ।
अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥ ८५० ॥
याप्रमाणे ही अमानित्वादि ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली. ॥८५०॥
जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां ।
अज्ञान या आकारा । सहजें येती ॥ ८५१ ॥
कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली (उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे) असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. ॥८५१॥
मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें ।
ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥ ८५२ ॥
मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने (श्रीकृष्णाने) असे संगितले की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय. ॥८५२॥
म्हणौनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी ।
वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ? ॥ ८५३ ॥
म्हणून अशा रीतीने (अज्ञानं यदतोऽन्यथा या पदाचे) मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही, तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढावयाचे ॥८५३॥
तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी ।
परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों ॥ ८५४ ॥
महाराज, त्याप्रमाणे (पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे) मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडीत नाही. परंतु मूळश्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. ॥८५४॥
तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे ? ।
बिहिसी कां वायें । कविपोषका ? ॥ ८५५ ॥
तेव्हा श्रवणास बसलेली संतमंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे रा
हिली आहे ? हे कविपोषका, तू व्यर्थ का भितोस ? ॥८५५॥
तूतें श्रीमुरारी । म्हणितलें आम्ही प्रकट करीं ।
जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥ ८५६ ॥
‘जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर’ असे तुला श्रीमुरारींनी (श्रीकृष्णाने) सांगितले. ॥८५६॥
तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त ।
हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥ ८५७ ॥
देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस हे जे देवाचे मनोगत, ते तू आपल्या वक्तृत्वाने (अज्ञानाची लक्षणे सांगण्याने) स्पष्ट दाखवीत आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त (संतमंडळी माझी स्तुति करीत आहेत असे तुला वाटून) त्या भाराने दडपून जाईल. ॥८५७॥
म्हणौनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों ।
जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवण सुखाचिये ॥ ८५८ ॥
म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हास सहज संतोष झाला आहे. कारण की श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा (होडीचा) तू आम्हास योग करून दिला आहेस. ॥८५८॥
आतां इयावरी । जे तो श्रीहरी ।
बोलिला तें करीं । कथन वेगां ॥ ८५९ ॥
तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला, ते लवकर सांग. ॥८५९॥
इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें ।
जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें ॥ ८६० ॥
असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तिदास (ज्ञानेश्वरमहाराज) म्हणाले की तर महाराज, ऐका, असे म्हणाले. ॥८६०॥
म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा ।
आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥ ८६१ ॥
देव म्हणतात अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज. ॥८६१॥
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा ।
ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे ॥ ८६२ ॥
अर्जुना, या अज्ञानभागाकडे पाठ करून (या अज्ञानभागाचा त्याग करून) ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. ॥८६२॥
मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेटेल मनें ।
तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥ ८६३ ॥
मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात (ब्रह्मवस्तूत) प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. ॥८६३॥
तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो ।
परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥ ८६४ ॥
तेव्हा सर्वज्ञांचे राजे, जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो. ॥८६४॥
तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें ।
जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥ ८६५ ॥
तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावयाचे, ते एवढ्याकरता की ते (ब्रह्म) ज्ञानावाचून दुसर्या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही. ॥८६५॥
आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें ।
जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥ ८६६ ॥
आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे रहात नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते. ॥८६६॥
जें जाणितलेयासाठीं । संसार काढूनियां कांठीं ।
जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥ ८६७ ॥
जे ज्ञेयस्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून (संसाराचा निरास करून) नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे (म्हणजे नित्यानंदरूप व्हावे) ॥८६७॥
तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे ।
परब्रह्म आपैसें । नाम जया ॥ ८६८ ॥
अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावत:च नाव आहे. ॥८६८॥
जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे ।
आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥ ८६९ ॥
जे नाही म्हणायला जावे, तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे, असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. ॥८६९॥
रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य दृष्टा स्थिती ।
तरी कोणें कैसें आथी । म्हणावें पां ॥ ८७० ॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाहीत व दृश्य (पहाण्याचा विषय) व द्रष्टा (पहाणारा) ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे, हे कोणी व कसे म्हणावे ? ॥८७०॥
आणि साचचि जरी नाहीं । तरी महदादि कोणें ठाईं ।
स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे ? ॥ ८७१ ॥
आणि (असे आहे म्हणून) जर ते खरोखरच नाही असे म्हणावे, तर महतत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात ? व त्याच्यावाचून कोठले काय आहे ? (त्याच्यावाचून दुसरे काहीच नाही). ॥८७१॥
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली ।
विचारेंसीं मोडली । वाट जेथें ॥ ८७२ ॥
म्हणून जे ब्रह्म पाहून ‘आहे, नाही’ ही भाषा मुकी झाली (जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही) व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे (ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही) ॥८७२॥
जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी ।
तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु ॥ ८७३ ॥
डेरा, घागर व परळ यामधे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाने जी वस्तु (ब्रह्मवस्तु) सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे ॥८७३॥
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥
त्याचे हस्तपाद सर्वत्र आहेत (ते विश्वबाहू किंवा विश्वांघि आहे). त्याचे नेत्र-शिर-मुख सर्वत्र आहेत. त्याचे कान सर्वत्र आहेत, ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे आहे. ॥१३॥
आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी ।
जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥ ८७४ ॥
सर्व देशांमधे व सर्व कालांमधे देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत. ॥८७४॥
तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें ।
जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥ ८७५ ॥
या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहु असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते. ॥८७५॥
आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया ।
आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम ॥ ८७६ ॥
आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते (ब्रह्म) आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रि) (ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा) हे नाव आहे. ॥८७६॥
पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे ।
तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥ ८७७ ॥
जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पहाणारी आहे. ॥८७७॥
म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायीं पक्षु ।
बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥ ८७८ ॥
म्हणून ‘विश्वतचक्षु’ (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्य़ास वेद तयार झाला. ॥८७८॥
जें सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी ।
ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥ ८७९ ॥
जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा’ म्हटले जाते ॥८७९॥
पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख ।
तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥ ८८० ॥
अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे, ॥८८०॥
यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था ।
आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥ ८८१ ॥
या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख’ (म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा) हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. ॥८८१॥
आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न ।
तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥ ८८२ ॥
आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत ॥८८२॥
म्हणौनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें ।
एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥ ८८३ ॥
म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे’ असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे ॥८८३॥
एर्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती ।
तयाचिया व्याप्ती । रूप केलें ॥ ८८४ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु’ या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. ॥८८४॥
वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे ? ।
सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जें ॥ ८८५ ॥
एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ठिकाणी (ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी) हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे ? ॥८८५॥
पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे ।
परी ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई ? ॥ ८८६ ॥
एका लाटेने दुसर्या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणार्याहून वेगळे आहे काय ? ॥८८६॥
तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक ? ।
परी बोलावया नावेक । करावें लागे ॥ ८८७ ॥
त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तेथे व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. ॥८८७॥
पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें ।
तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥ ८८८ ॥
शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवायचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृति) करावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. ॥८८८॥
एर्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा ।
आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥ ८८९ ॥
अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले, नाही तर गुरुशिष्यांच्या सन्मार्गाला (संप्रदायाला) पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. ॥८८९॥
निरूपणाची वाहती । वाट केली ॥ ८९० ॥
अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ॥८९०॥
तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं ।
तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥ ८९१ ॥
ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामधे व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक. ॥८९१॥
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥
सर्व चक्षु आदि इंद्रिये व सत्वादि गुण यांच्या आकाराने ते भासते (असे दिसते), पण ते स्वत: सर्व इंद्रियानी विरहित आहे. ते (सर्वत्र) असक्त आहे, तथापि सर्वभृत् आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. ॥१४॥
तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें ।
पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥ ८९२ ॥
तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामधे तंतू जसा वस्त्र होऊन आहे. ॥८९२॥
उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं ।
दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥ ८९३ ॥
पहा की पाण्यामधे रस, जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामधे दिवा होऊन जसे तेज असते, ॥८९३॥
कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी ।
शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥ ८९४ ॥
ज्याप्रमाणे कापुरामधे सुगंध, कापूर होऊन असतो अथवा शरीरामधे जसे कर्म शरीर होऊन असते. ॥८९४॥
किंबहुना पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा ।
तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥ ८९५ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे ॥८९५॥
परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे ।
वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥ ८९६ ॥
(येथून ब्रह्माची व्याप्ती जगामधे कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात). परंतु ते सोने तुकडेपणामधे असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर (तुकड्याच्या आकाराने असणारे) सोने हे सोन्यासारखेच आहे ॥८९६॥
पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा ।
वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥ ८९७ ॥
हे मित्रा अर्जुना. पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नि जसा लोखंड होत नाही. ॥८९७॥
घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें ।
मठीं तरी चौफळें । आये दिसे ॥ ८९८ ॥
घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामधे जसे वाटोळे आहे, असे वाटते व मठामधे सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते ॥८९८॥
तरि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें ।
जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे ॥ ८९९ ॥
परंतु आकाश हे जसे ते अवकाश (घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी) झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार (मनादि इंद्रिये अथवा सत्वादि गुणादिक) होऊन, जे विकारवान् झाले नाही ॥८९९॥
मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- ।
सारिखें ऐसें धनंजया । आवडे कीर ॥ ९०० ॥
अर्जुना ते ब्रह्म, मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजा
पैं गुळाची गोडी । नोहे बां
धया सांगडी ।
तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥ ९०१ ॥
परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी) ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत. ॥९०१॥
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे ।
परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥ ९०२ ॥
हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमधे तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते ॥९०२॥
तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं ।
पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें ॥ ९०३ ॥
त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. (ते कसे तर) ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे. ॥९०३॥
इया उघड मर्हाटिया । तें वेगळेपण धनंजया ।
जाण गुण इंद्रियां- । पासोनियां ॥ ९०४ ॥
अर्जुना, या उघड उघड मराठी (सोप्या) भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे, तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज. ॥९०४॥
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु ।
हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥ ९०५ ॥
नाम रूप, संबंध, जाति, क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ॥९०५॥
तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं ।
परी तयाच्याचि ठायीं । आभासती ॥ ९०६ ॥
ते ब्रह्म कधीही गुण होत नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. ॥९०६॥
येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं ।
ऐसें जाय किरीटी । जे हेंचि धरी ॥ ९०७ ॥
अर्जुना, एवढ्या मुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात (मनात) असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. ॥९०७॥
तरी तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें ।
कां प्रतिवदन जैसें । आरसेनी ॥ ९०८ ॥
पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. ॥९०८॥
नातरी सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल ।
कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥ ९०९ ॥
पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात ॥९०९॥
तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण ।
परी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी ॥ ९१० ॥
अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधावाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे, हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. ॥९१०॥
आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें ।
रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥ ९११ ॥
आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. ॥९११॥
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु ।
हा निर्गुणीं लागु । बोलों नये ॥ ९१२ ॥
म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग, यांचा निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी संबंध आहे हे बोलू नये. ॥९१२॥
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५ ॥
ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे, चर आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, ते दूर आहे, समीप आहे. ॥१५॥
जें चराचर भूतां- । माजीं असे पंडुसुता ।
नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥ ९१३ ॥
अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, ॥९१३॥
तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें ।
व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥ ९१४ ॥
त्या प्रकारच्या (वरील दृष्टांताप्रमाणे) अविनाशरूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे. असे समजावे. ॥९१४॥
जें एक आंतुबाहेरी । जें एक जवळ दुरी ।
जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥ ९१५ ॥
जे एक (चराचरांच्या) आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्या एकावाचून दुसरा प्रकार मुळीच नाही, ॥९१५॥
क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी ।
हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥ ९१६ ॥
अर्जुना क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्यां भूतीं ।
जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥ ९१७ ॥
स्वेदजादिकरून वेगळाल्या प्राण्यात, ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही ॥९१७॥
पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- ।
माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥ ९१८ ॥
हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमधे चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही, चंद्रबिंबास अनेकता येत नाही, ॥९१८॥
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी ।
कां कोडी एकीं ऊसीं । एकचि गोडी ॥ ९१९ ॥
मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते ॥९१९॥
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं ।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६ ॥
ते तत्वत: अविभक्त आहे, तरी भूतांचे ठिकाणी (नाना प्रकारच्या रूपांनी) विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे. संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माण काली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे. ॥१६॥
तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती ।
विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥ ९२० ॥
त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमधे जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. ॥९२०॥
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेंचि तया आधारु ।
कल्लोळा सागरु । जियापरी ॥ ९२१ ॥
म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म, त्या भूताकाराला आधार आहे. ॥९२१॥
बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी ।
तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥ ९२२ ॥
बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ति, स्थिति व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड (एकसारखे) असते. ॥९२२॥
सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान ।
जैसें कां गगन । पालटेना ॥ ९२३ ॥
सायंकाल, प्रात:काल व मध्यान्हकाल, या क्रमाने सबंध दिवसही होत जात असतांना जसे आकाश बदलत नाही. ॥९२३॥
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा ।
व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥ ९२४ ॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली जे विष्णु या नावाला प्राप्त झाले, ॥९२४॥
मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे ।
तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥ ९२५ ॥
मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्वतमादि तीन गुण (उत्पत्ति, स्थिति व लय) ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य (निर्धर्म) होऊन रहाते ॥९२५॥
नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन ।
तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥ ९२६ ॥
आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे. ॥९२६॥
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विस्ठितम् ॥ १७ ॥
(त्यालाच) तेजाचेही तेज व अंधाराच्या पलिकडील आहे असे (ज्ञाते म्हणतात). ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे, सर्व भूतमात्रांचे हृदयामधे तेच स्थित आहे. ॥१७॥
जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन ।
सूर्याचे नयन । देखती जेणें ॥ ९२७ ॥
जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन (चंद्राला अमृत देणारे) आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात. ॥९२७॥
जयाचेनि उजियेडें । तारांगण उभडें ।
महातेज सुरवाडें । राहाटे जेणें ॥ ९२८ ॥
ज्याच्या उजेडाने तारे (तार्यांचे समुदाय) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो, ॥९२८॥
जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी ।
बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥ ९२९ ॥
जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे, ॥९२९॥
जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन ।
कानाचे कान । वाचेची वाचा ॥ ९३० ॥
जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे. ॥९३०॥
जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण ।
क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥ ९३१ ॥
जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीची पाय आहे, व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते ॥९३१॥
आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे ।
संहारु जेणें संहारे । पंडुकुमरा ॥ ९३२ ॥
अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो. ॥९३२॥
जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी ।
तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥ ९३३ ॥
जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो. ॥९३३॥
जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु ।
हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें ॥ ९३४ ॥
जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे. हे राहू दे, हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो ॥९३४॥
किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा ।
जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी ॥ ९३५ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे, व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही ॥९३५॥
जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें ।
एकवाट कालवे । सामरस्यें ॥ ९३६ ॥
हे पाहिल्याबरोबर दृश्य (ज्गत्) आणि पाहणारा (द्रष्टा) हे सर्व ऐक्य भावाने एक होऊन जातात. ॥९३६॥
मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन ।
ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची ॥ ९३७ ॥
मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणही तेच (ब्रह्म) आहे. ॥९३७॥
जैसें सरलियां लेख । आंख होती एक ।
तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥ ९३८ ॥
ज्याप्रमाण हिशोब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनादिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात. ॥९३८॥
अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही ।
हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे ॥ ९३९ ॥
अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे ब्रह्म सर्वांच्या अंत:करणात असते. ॥९३९॥
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥
याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली, हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूप होतो. ॥१८॥
एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा ।
दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥ ९४० ॥
हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले. ॥९४०॥
तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी ।
तें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥ ९४१ ॥
त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. ॥९४१॥
अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें ।
जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥ ९४२ ॥
तुझी बुद्धी ‘पुरे’ म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले. ॥९४२॥
आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें ।
निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥ ९४३ ॥
आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. ॥९४३॥
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना ।
मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥ ९४४ ॥
अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात ॥९४४॥
देहादि परिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं ।
जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥ ९४५ ॥
ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला ॥९४५॥
ते मातें किरीटी । हेंचि जाणौनियां शेवटीं ।
आपणपयां साटोवाटीं । मीचि होती ॥ ९४६ ॥
अर्जुना, (असे जे माझे भक्त) ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन, मद्रूपच होतात. ॥९४६॥
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं ।
सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं ॥ ९४७ ॥
अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे. ॥९४७॥
कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे ।
अथावीं सुइजे । तरी जैसी ॥ ९४८ ॥
डोंगराच्या कड्याला (वर जाण्याकरता) जशा पायर्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव (होडी) घालावी. ॥९४८॥
एर्हवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा ।
परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥ ९४९ ॥
सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे, हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता. (म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता). ॥९४९॥
म्हणौनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें ।
जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥ ९५० ॥
तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्याकारणाने एकच सभराभरित भरलेले जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचे केले. ॥९५०॥
पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे ।
तैसें एकचि हें चतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥ ९५१ ॥
मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले. ॥९५१॥
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान ।
हे भाग केले अवधान । जाणौनि तुझें ॥ ९५२ ॥
तुझे लक्ष पाहून (तुझी ग्रहणशक्ती पाहून) (एकाच ब्रह्माचे) एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले. ॥९५२॥
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता ।
नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥ ९५३ ॥
आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. ॥९५३॥
आतां चौठायीं न करूं । एकही म्हणौनि न सरूं ।
आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥ ९५४ ॥
आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही. व सर्व एका ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही. तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. (एकाच ब्रह्माचे आत्मा (पुरुष) व अनात्मा (प्रकृति) असे भाग सारखे करून सांगू. ॥९५४॥
परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देआवें ।
जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ॥ ९५५ ॥
परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हास दिले पाहिजे. ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वत:स कानाचे नाव ठेव. (इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेऊन फक्त ऐकण्याचे काम चालू दे. ॥९५५॥
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला ।
तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥ ९५६ ॥
या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस . ॥९५६॥
ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु ।
प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों ॥ ९५७ ॥
अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून, श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृतिपुरुषाचा विभाग सांगतो ऐक. ॥९५७॥
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९ ॥
प्रकृति व पुरुष ही दोन्हीही अनादि आहेत, असे जाण. (देहेंद्रियादि) विकार आणि (सत्व इत्यादि) गुण हे प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. ॥१९॥
जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी ।
जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥ ९५८ ॥
या मार्गाला जगामधे योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्यमार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो ॥९५८॥
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु ।
म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥ ९५९ ॥
तो प्रकृतिपुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. ॥९५९॥
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति ।
संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥ ९६० ॥
तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी (चिकटलेली) आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे व प्रकृति ही त्यावेळेपासून (अनादि) आहे. ॥९६०॥
कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया ।
निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥ ९६१ ॥
किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खर्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहेमी जडवलेलीच असते किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यांसह वाढते ॥९६१॥
तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे ।
प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें ॥ ९६२ ॥
त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृति-पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. ॥९६२॥
पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें ।
तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥ ९६३ ॥
अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृति होय असे समजावे. ॥९६३॥
आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे ।
तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥ ९६४ ॥
आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ॥९६४॥
हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती ॥ ९६५ ॥
ह्यास ही निरनिराळी नावे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. ॥९६५॥
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता ।
प्रकृतीतें समस्तां । क्रिया नाम ॥ ९६६ ॥
अर्जुना, केवळ सत्ता (सदत्व) तिला पुरुष असे नाव आहे. आणि (संपूर्ण) क्रियेस प्रकृति हे नाव आहे. ॥९६६॥
बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण ।
आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥ ९६७ ॥
बुद्धि, इंद्रिये, अंत:करण इत्यादि विकारांचा समुदाय सत्वादि (सत्व, रज व तम) तिन्ही गुण ॥९६७॥
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा ।
हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥ ९६८ ॥
हा सर्व समुदाय प्रकृतिपासून झाला आहे असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतु (कारण) आहे. ॥९६८॥
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २० ॥
कार्य (मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तु मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया) कारण (ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ, इच्छित वस्तु) कर्तृत्व (इच्छित वस्तुच्या प्रप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया) या सर्वास मूळ प्रकृति आहे असे म्हणतात. आणि सुखदु:खांच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात. ॥२०॥
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं ।
मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ॥ ९६९ ॥
तेथे (प्रकृतीच्या ठिकाणी) अगोदर इच्छा आणि बुद्धि ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग (इच्छा व बुद्धि) जीवाला कारणाच्या म्हणाजे इच्छित वस्तु (मिळवण्याच्या) नादी लावतात. ॥९६९॥
तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया ।
तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥ ९७० ॥
ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शरीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हालवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास ‘कार्य’ असे म्हणतात. ॥९७०॥
आणि इच्छा मदाच्या थावीं । लागली मनातें उठवी ।
तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा ॥ ९७१ ॥
आणि मदाच्या (धुंदीच्या) आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणार्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना, कर्तृत्व असे म्हणतात. ॥९७१॥
म्हणौनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा ।
प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥ ९७२ ॥
आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृति ही मूळ आहे असे समज. असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. ॥९७२॥
एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये ।
परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥ ९७३ ॥
याप्रमाणे या तिघांच्या समुदायास प्रकृति कर्मरूप होते. परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, त्यासारखी ती बनते. ॥९७३॥
जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे ।
रजोगुणें निफजे । मध्यम तें ॥ ९७४ ॥
ज्या कर्माचा सत्वगुण अंगिकार करतो, त्याला सत्कर्म म्हणावे, व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे. ॥९७४॥
जें कां केवळ तमें । होती जियें कर्में ।
निषिद्धें अधमें । जाण तियें ॥ ९७५ ॥
व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत. ॥९७५॥
ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें ।
तयापासोनि निर्वाळतें । सुखदुःख गा ॥ ९७६ ॥
अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदु:ख होय. ॥९७६॥
असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे ।
तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥ ९७७ ॥
वाईट कर्मापासून दु:ख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहींचा (सुखदु:खाचा) भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. ॥९७७॥
सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं ।
तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥ ९७८ ॥
सुख दु:ख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात, तोपर्यंत प्रकृति व्यापार करते व व पुरुष भोगतो. ॥९७८॥
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी ।
जे आंबुली जोडी । आंबुला खाय ॥ ९७९ ॥
प्रकृतिपुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे. कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा खातो. ॥९७९॥
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये ।
कीं आंबुली जग विये । चोज ऐका ॥ ९८० ॥
या प्रकृति-पुरुषरूप नवराबायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको (प्रकृति) जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. ॥९८०॥
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥
प्रकृतीचे ठिकाणी स्थित असलेला (प्रकृतिपरतंत्र झालेला) पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या वाईट जन्मांना कारण होय. ॥२१॥
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा ।
जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥ ९८१ ॥
कारण की तो पुरुष अंगहीन (निराकार), पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुनापुराणा, अति म्हातार्यांपेक्षा म्हातारा आहे. ॥९८१॥
तया आडनांव पुरुषु । एर्हवीं स्त्री ना नपुंसकु ।
किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥ ९८२ ॥
त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नंपुसकही नाही. फार काय सांगावे ? अमूक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. ॥९८२॥
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु ।
रूप ना वर्णु । नाम आथी ॥ ९८३ ॥
त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काही नाही. ॥९८३॥
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं ।
कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥ ९८४ ॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे, असे समज. पण अशा नवर्यास (पुरुषासही) सुखदु:खे भोगावी लागतात. ॥९८४॥
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता ।
परी इया पतिव्रता । भोगविजे ॥ ९८५ ॥
तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृति त्याला भोगावयाला लावते. ॥९८५॥
जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु ।
ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥ ९८६ ॥
ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते (आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते) ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणार्या गोष्टी घडविते. ॥९८६॥
मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव ।
किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥ ९८७ ॥
मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे ? प्रकृति म्हणाजे मूर्तिमंत गुणच होत. ॥९८७॥
हे प्रतिक्षणीं नीत्य नवी । रूपा गुणाचीच आघवी ।
जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥ ९८८ ॥
ही प्रकृति क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो. (म्हणजे जडाला हालचाल करावयास लावतो). ॥९८८॥
नामें इयें प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें ।
इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि ॥ ९८९ ॥
हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. ॥९८९॥
कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक ।
ऐसें ऐसें अलौकिक । करणें इयेचें ॥ ९९० ॥
मन हे नंपुसक नाही काय ? पण ही प्रकृति त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृति चमत्कारिक आहे. ॥९९०॥
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप ।
विकार उमप । इया केले ॥ ९९१ ॥
ही प्रकृति भ्रमाचे मोठे बेट आहे व मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत. ॥९९१॥
हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी ।
इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥ ९९२ ॥
ही प्रकृति कामरूपी वेलाचा मांडव (आधार) आहे व ही मोहरूपी वनातील वसंतऋतु आहे व हिला दैवीमाया हे नाव प्रसिद्धच आहे. ॥९९२॥
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी ।
प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥ ९९३ ॥
ही शब्दसृष्टीची वृद्धि आहे, ही साकारपणाची प्राप्ति आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी (हल्ला) आहे. ॥९९३॥
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया ।
इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥ ९९४ ॥
सर्व कला येथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे. ॥९९४॥
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ ।
किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥ ९९५ ॥
ही नादाची टांकसाळ आहे (म्हणाजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहे) ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे ? सर्व खेळ हिचा आहे. ॥९९५॥
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात ।
हें असो अद्भु्त । मोहन हे ॥ ९९६ ॥
जे उत्पत्ति व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ, संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृति अद्भुत भुरळ आहे. ॥९९६॥
हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे ।
निराळेंसि घरें । नांदत असे ॥ ९९७ ॥
ही प्रकृति एकाकी असणार्या पुरुषची जोडिदारीण आहे व संग नसणार्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृति निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. ॥९९७॥
इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी ।
म्हणौनि तया आवरी । अनावरातें ॥ ९९८ ॥
हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे म्हणून ही त्या अनावराला (पुरुषाला) आपल्या आटोक्यात आणते. ॥९९८॥
तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं ।
कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥ ९९९ ॥
त्याच्या (पुरुषाच्या) ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. (हेच पुढे सांगतात). ॥९९९॥
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती ।
आपण होय स्थिती । ठावो तया ॥ १००० ॥
त्या स्वत:सिद्ध असणार्या पुरुषाची उत्पत्ति आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे रहाणे व रहाण्याचे ठिकाण आपणच होते. ॥१०००॥
तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती ।
तया अकुळाची जाती- । गोत होय ॥ १००१ ॥
त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृति होते. ॥१००१॥
तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान ।
तया अमनस्काचें मन । बुद्धीही होय ॥ १००२ ॥
त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन रहाते. ॥१००२॥
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु ।
निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥ १००३ ॥
ज्याच्या विषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचे ही लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धि ही प्रकृति होते. ॥१००३॥
तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म ।
आपण होय कर्म- । क्रिया तया ॥ १००४ ॥
त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म आपण होते. ॥१००४॥
तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण ।
तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥ १००५ ॥
त्या निर्गुणाचे गुण ही होते, त्या पायरहिताचे पाय ही होते. त्या कानरहिताचे कान ही होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही ही होते. ॥१००५॥
तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव ।
किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे ॥ १००६ ॥
त्या भावातीताचे (जन्मादि सहा) भाव (विकार) ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे ? ही प्रकृति त्या पुरुषाचे सर्व काही होते. ॥१००६॥
ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती ।
तया अविकारातें विकृती- । माजीं कीजे ॥ १००७ ॥
याप्रमाणे प्रकृति ही आपल्या सर्वव्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते. ॥१००७॥
तेथ पुरुषत्व जें असे । तें ये इये प्रकृतिदशे ।
चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥ १००८ ॥
तेथे (त्या पुरुषाचे ठिकाणी) जे पुरुषपणा आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. (प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात). ज्याप्रमाणे चंद्र अवसेस पडतो म्हणजे तेजोहीन होतो ॥१००८॥
विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका ।
कसु होय पांचका । जयापरी ॥ १००९ ॥
अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातु मिसळली तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो, ॥१००९॥
कां साधूतें गोंधळी । संचारोनि सुये मैळी ।
नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे ॥ १०१० ॥
अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात, ॥१०१०॥
जेवीं पय पशूच्या पोटीं । कां वन्हि जैसा काष्ठीं ।
गुंडूनि घेतला पटीं । रत्नकदीपु ॥ १०११ ॥
गाईच्या पोटात दूध असतांना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही. ॥१०११॥
राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला ।
तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥ १०१२ ॥
राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वत:च्या तेजाला मुकतो. ॥१०१२॥
जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा ।
स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ॥ १०१३ ॥
जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पाडला असता (झोपेच्या स्वाधीन झाला असता) तो स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदु:खभोगास पात्र केला जातो. ॥१०१३॥
तैसें प्रकृति जालेपणें । पुरुषा गुण भोगणें ।
उदास अंतुरीगुणें । आतुडे जेवीं ॥ १०१४ ॥
त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाने विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने (सुखदु:खाच्या फेर्यात) सापडला जातो ॥१०१४॥
तैसें अजा नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये ।
वाजती जैं लाहे । गुणसंगातें ॥ १०१५ ॥
जेव्हा पुरुषास गुणांची संगति घडते, तेव्हा तो स्वभावत: जन्मशून्य व नित्य असूनही, त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाखे बसतात. ॥१०१५॥
परि तें ऐसें पंडुसुता । तातलें लोह पिटितां ।
जेवीं वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥ १०१६ ॥
परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, ॥१०१६॥
कां आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक ।
तें नानात्व म्हणती लोक । चंद्रीं जेवीं ॥ १०१७ ॥
अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी (अज्ञानी) लोक चंद्राचे ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात, ॥१०१७॥
दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा ।
कां कुंकुमें स्फटिका । लोहितत्व ये ॥ १०१८ ॥
आरशाच्या जवळपणामुळे पहाणार्याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सांनिध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो ॥१०१८॥
तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे ।
पावतु ऐसा गमे । एर्हवीं नाहीं ॥ १०१९ ॥
त्याप्रमाणे हा पुरुष स्वत: अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी (गुणांचा संबंध टाकून पाहिले तर) तो जन्म पावत नाही. ॥१०१९॥
अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी ।
जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यजादि जाती ॥ १०२० ॥
ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामधे अंत्यजादि होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. ॥१०२०॥
म्हणौनि केवळा पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा ।
येथ गुणसंगुचि अशेखा- । लागीं मूळ ॥ १०२१ ॥
म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगति ही होय. ॥१०२१॥
उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२ ॥
प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृतिकार्याहून आपणास वेगळा पहाणारा, अनुमोदन देणारा (शास्ता) भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर, या शरीरामधे परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्यासंबंधी वदंता आहे (तो हाच). ॥२२॥
हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा ।
इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥ १०२२ ॥
हा पुरुष प्रकृतिमधे उभा आहे खरा परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृरीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामधे जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृति व पुरुष यामधे आहे. ॥१०२२॥
प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी ।
माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥ १०२३ ॥
अर्जुना, प्रकृतिरूप नदीच्या तीरावर मेरुपर्वतासारखा हा असून तिच्यामधे याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वहात जात नाही. ॥१०२३॥
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे ।
म्हणौनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥ १०२४ ॥
प्रकृति होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. ॥१०२४॥
प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये ।
इयालागीं इये । वरयेतु हा ॥ १०२५ ॥
प्रकृति याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिला हा नवरा आहे. ॥१०२५॥
अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी ।
तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥ १०२६ ॥
अर्जुना, अनंतकालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. ॥१०२६॥
हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी ।
अपारपणें मवी । प्रपंचातें ॥ १०२७ ॥
हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो, (म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो). ॥१०२७॥
पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी ।
बोलिजे तें अवधारीं । ययातेंचि ॥ १०२८ ॥
आणि या देहामधे परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. ॥१०२८॥
अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता ।
ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पैं ॥ १०२९ ॥
अरे अर्जुना, प्रकृतिपलिकडे कोणी एक आहे, अशी जी वदंता आहे (असे जे लोक म्हणतात) तो वस्तुत: हाच पुरुष आहे. ॥१०२९॥
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३ ॥
पुरुष आणि प्रकृति, यांना जो जो (या त्यांच्या) गुणांसह याप्रमाणे (म्हणजे पुरुष हा प्रकृति व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे) जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. ॥२३॥
जो निखळपणें येणें । पुरुषा यया जाणे ।
आणि गुणांचें करणें । प्रकृतीचें तें ॥ १०३० ॥
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो ॥१०३०॥
हें रूप हे छाया । पैल जळ हे माया ।
ऐसा निवाडु धनंजया । जेवीं कीजे ॥ १०३१ ॥
हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे (मृगजल) आहे, अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी ॥१०३१॥
तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना ।
जयाचिया मना । गोचर जाहली ॥ १०३२ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृति-पुरुषांतील भेद स्पष्टपणे कळला; ॥१०३२॥
तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें ।
परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥ १०३३ ॥
तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का ? परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. (सर्व कर्मे करीत असतांना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही). ॥१०३३॥
आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें ।
देह गेलिया नोहे । पुनरपि तो ॥ १०३४ ॥
देह असतांना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन: जन्म पावत नाही. ॥१०३४॥
ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु ।
उपकारु अलौकिकु । करी पैं गा ॥ १०३५ ॥
हा प्रकृतिपुरुषविचार, त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. ॥१०३५॥
परी हाचि अंतरीं । विवेक भानूचिया परी ।
उदैजे तें अवधारीं । उपाय बहुत ॥ १०३६ ॥
परंतु हाच विचार अंत:करणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक. ॥१०३६॥
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४ ॥
कित्येक आपल्या ठिकाणी (आत्मानात्म्याच्या सरभेसळीत) आपणास (आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास) आत्मध्यानाच्या योगाने (आत्मानात्मविचाराने निवडून) पहातात. दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. ॥२४॥
कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां ।
आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥ १०३७ ॥
हे चांगल्या योद्ध्या, अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्ममिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन ॥१०३७॥
छत्तीसही वानी भेद । तोडोनियां निर्विवाद ।
निवडिती शुद्ध । आपणपें ॥ १०३८ ॥
छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद नि:संशय जाळून (म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून) आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. ॥१०३८॥
तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी ।
देखती गा किरीटी । आपणपेंचि ॥ १०३९ ॥
त्या आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना, ते आपण आपल्यालाच पहातात. ॥१०३९॥
आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें ।
एक ते अंगलगें । कर्माचेनी ॥ १०४० ॥
आणि कित्येक लोक दैववशात् सांख्ययोगाच्या द्वारे (आत्म्याकडे) चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून (आत्म्यास) पहातात. ॥१०४०॥
अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणः ॥ २५ ॥
दुसरे कोणी याप्रमाणे (आत्म्याला) न जाणणारे दुसर्यांपासून (म्हणजे आचार्यादिकांपासून) श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात. ॥२५॥
येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें ।
हें भवा भेउरें । आघवेंचि ॥ १०४१ ॥
याहून कित्येक दुसरे – स्वत: आत्म्याला न जाणणारे – या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात. (चांगल्या तर्हेने तरून जातात). ॥१०४१॥
परी ते करिती ऐसें । अभिमानु दवडूनि देशें ।
एकाचिया विश्वासें । टेंकती बोला ॥ १०४२ ॥
परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या (गुरूच्या) उपदेशावर विश्वासाने अवलंबून रहातात. ॥१०४२॥
जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती ।
पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥ १०४३ ॥
जे गुरु हिताहित पहातात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दु:ख कशाने होते हे विचारून त्याचे दु:ख हरण करतात आणि सुख देतात, ॥१०४३॥
तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें ।
ऐकोनियां आंगें । मनें होती ॥ १०४४ ॥
त्यांच्या (गुरूंच्या) मुखातून जेवढे निघेल, तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. ॥१०४४॥
तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें ।
तया अक्षरांसीं जीवें । लोण करिती ॥ १०४५ ॥
आपल्या सर्व कर्तव्यास, ऐकण्याचेच नाव ठेवतात. (ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात). आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. ॥१०४५॥
तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- ।
पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥ १०४६ ॥
हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून (जन्ममरणपरंपरेपासून) चांगल्या रीतीने बाहेर पडतात. ॥१०४६॥
ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें ।
जाणावया होये । एकी वस्तु ॥ १०४७ ॥
एक परमात्मा जाणावयाला येथे असे हे पुष्कळ उपाय आहेत, पहा. ॥१०४७॥
आतां पुरे हे बहुत । पैं सर्वार्थाचें मथित ।
सिद्धांतनवनीत । देऊं तुज ॥ १०४८ ॥
आता याविषयी बोलणे पुरे. (आतापर्यंत सांगितलेले) सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. (आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो). ॥१०४८॥
येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता ।
येर तंव तुज होतां । सायास नाहीं ॥ १०४९ ॥
अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर (म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांति वगैरे) होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. ॥१०४९॥
म्हणौनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं ।
सोलीव निर्वचूं । फलितार्थुची ॥ १०५० ॥
म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू ॥१०५०॥
यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६ ॥
हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण. ॥२६॥
तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें ।
आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥ १०५१ ॥
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले ॥१०५१॥
तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं ।
अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥ १०५२ ॥
वार्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात (संबंधात) सर्व प्राणी उत्पन्न होतात. ॥१०५२॥
कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा ।
मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥ १०५३ ॥
अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो ॥१०५३॥
नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी ।
उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥ १०५४ ॥
अथवा पर्जन्याचा धारांनी वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमधे जसे नाना प्रकारचे अंकूर उगवतात ॥१०५४॥
तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें ।
तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥ १०५५ ॥
त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभयतांच्या (क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या) मिलाफाने उत्पन्न होते असे समज. ॥१०५५॥
इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- ।
पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥ १०५६ ॥
अर्जुना या करता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृति यांच्या पासून भिन्न नाहीत ॥१०५६॥
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥
सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच असणार्या व नाश पावणार्या भूतांमधे अविनाश असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो, तोच ज्ञान्यांतील डोळस होय. ॥२७॥
पैं पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि तें आहे ।
ऐसां खोलीं डोळां पाहें । ऐक्य हें गा ॥ १०५७ ॥
वस्त्रपणा जे जरी सूत नाही, तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. ॥१०५७॥
भूतें आघवींचि होती । एकाचीं एक आहाती ।
परी तूं प्रतीती । यांची घे पां ॥ १०५८ ॥
सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पहाणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. ॥१०५८॥
यांचीं नामेंही आनानें । अनारिसीं वर्तनें ।
वेषही सिनाने । आघवेयांचे ॥ १०५९ ॥
या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेषही भिन्न आहेत. ॥१०५९॥
ऐसें देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं ।
तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥ १०६० ॥
अर्जुना, असे पाहून तू जर आपल्या पोटात (मनात) द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही ॥१०६०॥
पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घें वक्रें वर्तुळें ।
होती एकाचींच फळें । तुंबिणीयेचीं ॥ १०६१ ॥
अनेक कारणांमुळे लांब व वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. ॥१०६१॥
होतु कां उजू वांकुडें । परी बोरीचे हें न मोडे ।
तैसी भूतें अवघडें । परी वस्तु उजू ॥ १०६२ ॥
बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असेना का ? पण बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी (त्यात व्यापून असणारी) ब्रह्मवस्तु सरळ आहे. ॥१०६२॥
अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैशी ।
तैसा नाना जीवराशीं । परेशु असे ॥ १०६३ ॥
निखार्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. ॥१०६३॥
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥
ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वत:चा घात करत नाही. (देह मी आहे असे समजत नाही). नंतर (म्हणजे असे जाणल्यानंतर) तो श्रेष्ठ गति (परब्रह्मस्वरूप) पावतो. ॥२८॥
गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा ।
तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥ १०६४ ॥
अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वांगात तो परमात्मा आहे. ॥१०६४॥
हें भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम ।
घटमठीं व्योम । जिंयापरी ॥ १०६५ ॥
ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तु, ती एकसारखीच आहे. ॥१०६५॥
हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु ।
जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥ १०६६ ॥
ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे. ॥१०६६॥
एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसीं अभिन्नु ।
देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजीं ॥ १०६७ ॥
याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञान्यांमधे चांगला डोळस आहे. ॥१०६७॥
ज्ञानाचा डोळा डोळसां- । माजीं डोळसु तो वीरेशा ।
हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥ १०६८ ॥
अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत, त्यामधे तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे. ॥१०६८॥
जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी ।
पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥ १०६९ ॥
कारण की देह हा गुण व इंद्रिये यांची रहाण्याची धोकटी आहे, देह हा (कफ, वात व पित्त) या तीन धातूंपासून बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे व भयंकर आहे. ॥१०६९॥
हें उघड पांचवेउली । पंचधां आगी लागली ।
जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥ १०७० ॥
हा देह म्हणजे उघड पांच नाग्यांची इंगळी आहे (अथवा) वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचे (रहाण्याचे) घरच सापडले आहे. ॥१०७०॥
ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी ।
अनित्यभावाच्या उदरीं । दाटीचिना ॥ १०७१ ॥
त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही ? (आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही ? हे एक आश्चर्य आहे). ॥१०७१॥
परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता ।
आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥ १०७२ ॥
(येथेपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणार्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपसून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात). परंतु ज्ञानी पुरुष या देहात असतांना (देहतादात्म्याने) आपल्या घातावर येत नाही. (म्हणजे आपला घात करून घेत नाही). आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे (ब्रह्मस्वरूपात मिळतो). ॥१०७२॥
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी ।
न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥ १०७३ ॥
कोट्यावधी जन्म ओलांडून, योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने, ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन रहातात ॥१०७३॥
जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर ।
तुर्येचें माजघर । परब्रह्म जें ॥ १०७४ ॥
जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे, (निराकार आहे) व जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे (शब्दातीत आहे) व जे परब्रह्म तूर्याअवस्थेचे मध्यघर (गाभा) आहे, ॥१०७४॥
मोक्षासकट गती । जेथें येती विश्रांती ।
गंगादि आपांपती । सरिता जेवीं ॥ १०७५ ॥
ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये, जेथे (ब्रह्माच्या ठिकाणी) विश्रांतीला येतात. ॥१०७५॥
तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे ।
जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥ १०७६ ॥
भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धि भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते). ॥१०७६॥
दीपांचिया कोडी जैसें । एकचि तेज सरिसें ।
तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
कोट्यावधि दिव्यात जसे एका तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र (चराचरात) भरलेला आहे ॥१०७७॥
ऐसेनि समत्वें पंडुसुता । जिये जो देखत साता ।
तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥ १०७८ ॥
अर्जुना, अशा समत्वाने (चराचराकडे) पहात असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या स्वाधीन होत नाही. ॥१०७८॥
म्हणौनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां ।
जे साम्यसेजे डोळां । लागला तया ॥ १०७९ ॥
म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याला अभेदभावरूपी बिछान्यावर डोळा लागला आहे. (तो अभेदभावात स्थिर झाला आहे). ॥१०७९॥
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथाऽऽत्मानंअकर्तारं स पश्यति ॥ २९ ॥
सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय. ॥२९॥
आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें ।
करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥ १०८० ॥
आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते. असे जो खरोखर जाणतो ॥१०८०॥
घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी ।
अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥ १०८१ ॥
घरातील माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही व आकशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते. ॥१०८१॥
तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा ।
येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥ १०८२ ॥
याप्रमाणे प्रकृति ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे (सर्व कर्मात) आत्मा हा खांबासारखा (केवल आधारभूत) असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. ॥१०८२॥
ऐसेनि येणें निवाडें । जयाच्या जीवीं उजिवडें ।
अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥ १०८३ ॥
अशा या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. ॥१०८३॥
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३० ॥
भूतांचा पृथग्भाव (निरनिराळेपणा) एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच (आत्म्याचाच हा) विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते. ॥३०॥
एर्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥ १०८४ ॥
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. ॥१०८४॥
लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं ।
रश्मीकरमंडळीं । सूर्याच्या जेवीं ? ॥ १०८५ ॥
लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर ॥१०८५॥
नातरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव ।
विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं ॥ १०८६ ॥
अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या ॥१०८६॥
तैसे भूताकार एकाचे । हें दिठी रिगे जैं साचें ।
तैंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे ॥ १०८७ ॥
त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील (खरोखर अनुभवाला येईल) त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज (होडी) मिळेल. ॥१०८७॥
मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे ।
किंबहुना जोडे । अपार सुख ॥ १०८८ ॥
मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे ? त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. ॥१०८८॥
येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था ।
ठायें ठावो प्रतीतिपथा- । माजीं जाहली ? ॥ १०८९ ॥
अर्जुना, एवढ्याने प्रकृति-पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभावाच्या मार्गात आला. (तुला पूर्णपणे कळला). ॥१०८९॥
अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां ।
तेतुला जिव्हाळा । मानावा हा ॥ १०९० ॥
अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पहावा, त्याप्रमाणे हा प्रकृतिपुरुषविचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्ततेचा समजावा. ॥१०९०॥
जी जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं ।
तें आतां ना सुभद्रापती । इयावरी ॥ १०९१ ॥
बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असतांना त्या अनुभावाचे चित्तात घर बांधावयाचे (म्हणाजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा) ते आताच नाही तर यानंतर ॥१०९१॥
तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल ।
देईं मनातें वोल । मग ते घेईं ॥ १०९२ ॥
आता या एकदोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे. आणि मग त्या घे. (म्हणजे ऐक). ॥१०९२॥
ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें ।
तेथें अवधानाचेचि केलें । सर्वांग येरें ॥ १०९३ ॥
असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले. ॥१०९३॥
अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१ ॥
कौंतेया अनादि व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराचे ठिकाणी स्थित असला तरी (काही कर्म) करीत नाही. (सर्व कर्मांपासून) अलिप्त असतो. ॥३१॥
तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें ।
जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥ १०९४ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला, तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीत असूनही, प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, (तो शुद्धच रहातो). अशा स्वरूपाचा तो आहे असे समज. ॥१०९४॥
कां जे जळा आदीं पाठीं । तो असतुचि असे किरीटी ।
माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥ १०९५ ॥
कारण की अर्जुना, जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे. पण्यामधे तो प्रतिबिंबित होतो. ते दुसर्याच्या दृष्टीने. (वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही). ॥१०९५॥
तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं ।
साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥ १०९६ ॥
त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, असे जे म्हटले जाते, ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. ॥१०९६॥
आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे ।
देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥ १०९७ ॥
आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामधे आत्मतत्वाचे राहणे आहे. (देहात आत्मतत्व प्रतिबिंबरूपाने असते). ॥१०९७॥
तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी ।
वारिया वाळुवे गांठी । केंही आहे ? ॥ १०९८ ॥
त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वार्याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय ? ॥१०९८॥
आगी आणि कापुसा । दोरा सुवावा कैसा ।
केउता सांदा आकाशा । पाषाणेंसी ? ॥ १०९९ ॥
अग्नि व पीस यांना दोरा कसा घालायचा ? (म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा ?) आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडयचा ? ॥१०९९॥
एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे ।
तिये भेटीचेनि पाडें । संबंधु हा ॥ ११०० ॥
एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. ॥११००॥
उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेयां ।
तोचि गा आत्मया । देहा जाण ॥ ११०१ ॥
उजेड व अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामधे आहे असे समज. ॥११०१॥
रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा ।
अपाडु कां जैसा । तैसाचि यासी ॥ ११०२ ॥
रात्र व दिवस, सोने व कापूस, यामधे जितके असादृश्य आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामधे आहे. ॥११०२॥
देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचें गुणीं गुंथले ।
भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ॥ ११०३ ॥
हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. ॥११०३॥
हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी ।
माशी पांखु पाखडी । तंव हें सरे ॥ ११०४ ॥
कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. व माशी आपले पंख फडकावते तोच (तितक्या कालातच) हा देह नाश पावतो. ॥११०४॥
हें विपायें आगींत पडे । तरी भस्म होऊनि उडे ।
जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्ठा ॥ ११०५ ॥
हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. ॥११०५॥
या चुके दोहीं काजा । तरी होय कृमींचा पुंजा ।
हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥ ११०६ ॥
वरील या दोन परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. ॥११०६॥
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ॥ ११०७ ॥
या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत: नित्य व सिद्ध आहे. ॥११०७॥
सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु ।
कृश ना स्थुळु । निर्गुणपणें ॥ ११०८ ॥
तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही वा लठ्ठही नाही. ॥११०८॥
आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु ।
अल्प ना बहुवसु । अरूपपणें ॥ ११०९ ॥
तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही, तो प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. ॥११०९॥
रिता ना भरितु । रहितु ना सहितु ।
मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणें ॥ १११० ॥
तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने युक्त नाही. तो प्रगट नाही अथवा अप्रकट नाही. ॥१११०॥
आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु ।
मुक्त ना बद्धु । आत्मपणें ॥ ११११ ॥
तो आत्मा असल्यामुळे आनंद (सुख) नाही अथवा आनंदरहित (दु:ख) नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही अथवा बद्ध नाही. ॥११११॥
येतुला ना तेतुला । आइता ना रचिला ।
बोलता ना उगला । अलक्षपणें ॥ १११२ ॥
तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, तितका नाही, स्वत:सिद्ध नाही, अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही. ॥१११२॥
सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारें न वेंचे ।
आथी नाथी या दोहींचें । पंचत्व तो ॥ १११३ ॥
सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. ॥१११३॥
मवे ना चर्चे । वाढे ना खांचे ।
विटे ना वेंचे । अव्ययपणें ॥ १११४ ॥
तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही. ॥१११४॥
एवं रूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा ।
तें मठाकारें व्योमा । नाम जैसें ॥ १११५ ॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणाण्यासारखे आहे. ॥१११५॥
तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती ।
तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥ १११६ ॥
त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, पण अर्जुना, तो आत्मा देहाकृति घेत नाही व टाकीतही नाही, तर जशाचा तसाच असतो. ॥१११६॥
अहोरात्रें जैशी । येती जाती आकाशीं ।
आत्मसत्तें तैसीं । देहें जाण ॥ १११७ ॥
आकाशामधे जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवेर देह येतात व जातात असे समज. ॥१११७॥
म्हणौनि इयें शरीरीं । कांहीं करवीं ना करी ।
आयताही व्यापारीं । सज्ज न होय ॥ १११८ ॥
म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीत नाही व सहज घडून येणार्या व्यापाराचे ठिकाणी ‘तो व्यापार मी केला’ असे म्हणत नाही. ॥१११८॥
यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे ।
हें असो तो न लिंपे । देहीं देहा ॥ १११९ ॥
याकरता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही. हे असो. तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. ॥१११९॥
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामधे स्थित असला तरी लिप्त होत नाही. ॥३२॥
अगा आकाश कें नाहीं ? । हें न रिघेचि कवणे ठायीं ? ।
परी कायिसेनि कहीं । गादिजेना ॥ ११२० ॥
अर्जुना, आकाश कोठे नाही ? व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही ? परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही ॥११२०॥
तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं ।
संगदोषें एकेंही । लिप्त नोहे ॥ ११२१ ॥
तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे. (परंतु) पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. ॥११२१॥
पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें ।
जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥ ११२२ ॥
वारंवार येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे, ते हे की शररीस्थ आत्म्याला देहादिसंघातरहित असा ओळखावा. ॥११२२॥
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे ।
क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥ ११२३ ॥
लोहचुंबक हा आपल्या संबंधाने लोखंडाला हलवतो पण लोहचुंबक लोखंड नाही, तसे क्षेत्र (देह) व क्षेत्रज्ञ (आत्मा) यामधे अंतर आहे. ॥११२३॥
दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची ।
परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते परंतु दिवा व घर यात स्वभावत: अतिशय अंतर आहे. ॥११२४॥
पैं काष्ठाच्या पोटीं । वन्हि असे किरीटी ।
परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥ ११२५ ॥
अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नि आहे पण अग्नि हा काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. ॥११२५॥
अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा ।
तैसाचि हाही डोळां । देखसी जरी ॥ ११२६ ॥
आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पहाशील ॥११२६॥
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नंम प्रकाशयति भारत ॥ ३३ ॥
हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो त्याप्रमाणे सर्व क्षेत्रांना (देहांना) एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो. ॥३३॥
हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु ।
प्रगटवी लोकु । नांवें नांवें ॥ ११२७ ॥
हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी (दररोज) त्रैलोक्य प्रकाशित करतो ॥११२७॥
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा ।
यावरुतें हें न पुसा । शंका नेघा ॥ ११२८ ॥
त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला (प्रतीतीला) प्रकाशक आहे. याउपर आता यासंबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका. ॥११२८॥
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगोनाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणार्या प्रकृतीचा मोक्ष (म्हणजे
तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व) जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. ॥३४॥
शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणें तेचि प्रज्ञा ।
जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥ ११२९ ॥
हे शब्दांच्या खर्या खर्या स्वरूपाचे मर्म जाणणार्या अर्जुना, तीच बुद्धि डोळस, की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पहाते. ॥११२९॥
इया दोहींचें अंतर । देखावया चतुर ।
ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥ ११३० ॥
या दोहींचे अंतर समजण्याकरता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. ॥११३०॥
याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती ।
शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥ ११३१ ॥
चांगल्या बुद्धीचे लोक याचकरता शांतिरूप संपत्ति मिळवतात व शास्त्ररूपी दुभत्या गाई घरी पोसतात. ॥११३१॥
योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा ।
याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥ ११३२ ॥
योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच (क्षेत्र-क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या) आशेने करावे लागते. ॥११३२॥
शरीरादि समस्त । मानिताति तृणवत ।
जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥ ११३३ ॥
शरीरादि सर्व गोष्टी तृणवत् मानतात व जीवभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. ॥११३३॥
ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी ।
करूनियां अंतरीं । निरुतें होती ॥ ११३४ ॥
मग अशा अशा प्रकारांनी ज्ञानाचे सायास करून अंत:करणात निश्चित होतात. ॥११३४॥
मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें । जें अंतर देखती साचें ।
ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही ॥ ११३५ ॥
मग देह व आत्मा यातील फरक जे खरोखर पहातात, त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू. ॥११३५॥
आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं ।
पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥ ११३६ ॥
आणि पंचमहाभूतादि अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृति पसरली आहे ॥११३६॥
जे शुकनळिकान्यायें । न लगती लागली आहे ।
हें जैसें तैसें होये । ठाउवें जयां ॥ ११३७ ॥
ती प्रकृति शुकनलिकान्यायाप्रमाणे वास्तविक (जीवात्म्याला) चिकटलेली नसतांनाही चिकटल्यासारखी आहे, हे तत्व जसे आहे, तसेच ज्याला ठाऊक आहे, ॥११३७॥
जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां ।
सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनी ॥ ११३८ ॥
ज्याप्रमाणे (माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी) मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पहातो ॥११३८॥
कां शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती ।
रुपेयाची भ्रांती । जाऊनियां ॥ ११३९ ॥
अथवा शिंपेवर भासलेल्या रूप्याची भ्रांति जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा ॥११३९॥
तैसी वेगळी वेगळेपणें । प्रकृति जे अंतःकरणें ।
देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती ॥ ११४० ॥
त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृति तिला वेगळेपणाने अंत:करणाने जे पहातात ते ब्रह्म होतात, असे मी (श्रीकृष्ण) म्हणतो. ॥११४०॥
जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड ।
जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी ॥ ११४१ ॥
जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृतिरूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यासाम्य उरू देत नाही ॥११४१॥
आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे ।
द्वैत जेथ नुरे । अद्वय जें ॥ ११४२ ॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे, ॥११४२॥
तें परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ॥ ११४३ ॥
अर्जुना असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात. ॥११४३॥
ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा ।
उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥ ११४४ ॥
(संजय धृतराष्ट्रास म्हणतो) महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा असा प्रकृति-पुरुष-विचाराचा सर्व हिशोब दिला. ॥११४४॥
येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी ।
आपणपें तया श्रीहरी । दिधलें तैसें ॥ ११४५ ॥
ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसर्या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वत:ला (आपल्या बोधाला) त्या अर्जुनाला दिले. (आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला). ॥११४५॥
आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण ।
वरी अर्जुनातें श्रीकृष्ण । हा मी म्हणे ॥ ११४६ ॥
आणि कोण कोणाला देणारा आहे ? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा (अर्जुन) मी (श्रीकृष्ण) आहे असे
परी असो तें नाथिलें । न पुस
तां कां मी बोलें ।
किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें ॥ ११४७ ॥
परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलत आहे ? फार काय सांगावे ? श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले. ॥११४७॥
कीं तो पार्थु जी मनीं । अझुनी तृप्ती न मनी ।
अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥ ११४८ ॥
तथापि तो अर्जुन मनामधे अजून तृप्ति मानीत नव्हता, (तर उलट) अधिकाधिकच (ज्ञानश्रवणाची) इच्छा वाढवीत होता. ॥११४८॥
स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी ।
चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी ॥ ११४९ ॥
भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी (अधिक वाढलेली) इच्छा झाली. ॥११४९॥
तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥ ११५० ॥
जेथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोक्तेही मिळाले आहेत तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, ॥११५०॥
तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा ।
पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥ ११५१ ॥
महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. ॥११५१॥
सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे ।
तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि ॥ ११५२ ॥
अनुकूल वार्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या (अर्जुनाच्या) ऐकण्य़ाच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरितपणास भरते आले आहे. ॥११५२॥
आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें ।
तें रायें परिसावें । संजयो म्हणे ॥ ११५३ ॥
संजय म्हणतो, आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी (धृतराष्ट्राने) ऐकावे. ॥११५३॥
एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती ।
भीष्मपर्वसंगतीं । म्हणितली कथा ॥ ११५४ ॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे विशालबुद्धि व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतरसाने भरलेली कथा सांगितली ॥११५४॥
तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु ।
सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ॥ ११५५ ॥
तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू. ॥११५५॥
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा ।
जे शृंगाराच्या माथां । पाय ठेवी ॥ ११५६ ॥
केवळ शांतरसाची कथा वाणीच्या मार्गास आणली जाईल, (म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल) परतु ती शृंगाररसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी (शृंगाररसावर ताण करणारी) अशी सांगितली जाईल. ॥११५६॥
दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी ।
अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ॥ ११५७ ॥
ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला (अलंकाराला) सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व व सुंदर देशी भाषा (मराठी भाषा) उपयोगात आणू. ॥११५७॥
बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे ।
रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ॥ ११५८ ॥
माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ति पाहिली तर, चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील ॥११५८॥
खेचरांचियाही मना । आणीन सात्त्विकाचा पान्हा ।
श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ॥ ११५९ ॥
पिशाचादि अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल. ॥११५९॥
तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं ।
आनंदाचें आवारूं । मांडूं जगा ॥ ११६० ॥
(वरीलप्रमाणे परिणाम घडतील). तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू. व गीतार्थाने विश्व भरून टाकू. व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. ॥११६०॥
फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी ।
देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥ ११६१ ॥
आत्मानात्मविवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. ॥११६१॥
दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा ।
रिघो महाबोध सुकाळा- । माजीं विश्व ॥ ११६२ ॥
परब्रह्म (सर्वांच्या) डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. ॥११६२॥
हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें ।
जें अधिष्ठिला असें परमदेवें । श्रीनिवृत्तीं मी ॥ ११६३ ॥
श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे, हे (वर सांगितलेले) सर्व आता घडून येईल. असे मी चांगले बोलेन. ॥११६३॥
म्हणौनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी ।
झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी ॥ ११६४ ॥
एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी, उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. ॥११६४॥
हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें ।
केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें ॥ ११६५ ॥
माझ्या श्रीमंत श्रीगुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. ॥११६५॥
तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये ।
आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों ॥ ११६६ ॥
महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. ॥११६६॥
वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलों आहें ।
म्हणौनि जी नोहे । अटकु काहीं ॥ ११६७ ॥
शिवाय तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. ॥११६७॥
प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें काय कौतुकें ।
नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी ॥ ११६८ ॥
महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही, (व तसेच) लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. ॥११६८॥
तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी ।
यालागीं नवरसीं । वरुषेन मी ॥ ११६९ ॥
त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली ? म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. ॥११६९ ॥
किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा ।
ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥ ११७० ॥
फार काय सांगावे ! देवा (श्रीगुरुराया), मला बोलण्याला आता संधि द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्यारीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥११७०॥