संत ज्ञानेश्वर


ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे.) हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असाणार्‍या ॐकारा, तुला नमस्कार असो. व स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणार्‍या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो. ॥१-१॥


sarth-dnyaneshwari-adhyay-pahila

वरील विशेषणांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, महाराज ऐका. ॥१-२॥


संपूर्ण वेद हीच त्या (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. ॥१-३॥


आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. (मन्वादिकांच्या स्मृति हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने (ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥१-४॥


अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत. ॥१-५॥


उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकित तलम तंतु आहेत. ॥१-६॥


पहा, कौतुकाने काव्य-नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागर्‍या असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. ॥१-७॥


कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामधेही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. ॥१-८॥


येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी (त्या गणपतीच्या) कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. ॥१-९॥


पहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. ॥१-१०॥


तरी कणादशास्त्ररूपी हातामधे अनुमानरूपी परशु आहे. गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाण-प्रमेयादि षोडष पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्र्ह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. ॥१-११॥


बौद्धमताचे निदर्शन करणार्‍या बौद्धवार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित झालेला दात तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे. ॥१-१२॥


मग (बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर) सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. ॥१-१३॥


पहा. त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बरेवाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे ॥१-१४॥


तर प्रश्नोत्ताररूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ॥१-१५॥


(ज्ञानदेव म्हणतात) पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनि हे भ्रमर त्याचे सेवन करतात. ॥१-१६॥


वर संगितलेल्या श्रुति-स्मृति वगैरेत प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहेत. ॥१-१७॥


ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद्रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात ॥१-१८॥


ॐकाराची प्रथम अकारमात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. ॥१-१९॥


ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो. ॥१-२०॥


आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे. व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो. ॥१-२१॥


ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत. म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. ॥१-२२॥


ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग (भूमिगत) द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. ॥१-२३॥


किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहेमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तिनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत. असे ज्ञानदेव म्हणतात. ॥१-२४॥


एवढ्यासाठी अहो ज्ञातेपुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते ॥१-२५॥


अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, ॥१-२६॥


त्याप्रमाणे (श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे) मी त्याच श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले. (कारण की) तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. ॥१-२७॥


(श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर) आता (ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची) खोल विचारांनी भरलेली कथा. तिचे माहात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे. किंवा विचाररूपी वृक्षांचा बगिचा आहे. ॥१-२८॥


अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. ॥१-२९॥


किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमधे ही श्रेष्ठ आहे. ॥१-३०॥


किंवा ही (कथा) सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. ॥१-३१॥


अथवा व्यासांच्या विशाल बुद्धिमध्ये स्फुरूण पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. ॥१-३२॥


म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥१-३३॥


त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. ॥१-३४॥


येथे (या महाभारतग्रंथात) चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. ॥१-३५॥


गोडीचा गोडपणा, श्रृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. ॥१-३६॥


येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच (महाभारताच्या पठणाने) जनमेजयाचे दोष हरले. ॥१-३७॥


आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमधे सुरंगतेची वाढ झाली आहे. (आनंदाला विशेष मनोहरता आली आहे). त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. ॥१-३८॥


सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. ॥१-३९॥


किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामधे चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ॥१-४०॥


अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्वल (स्पष्ट) झाल्या आहेत. ॥१-४१॥


किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो ॥१-४२॥


किंवा बगिच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते ॥१-४३॥


अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते (डोळ्यात भरत नाही) पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते ॥१-४४॥


त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. ॥१-४५॥


अथवा जगामधे पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वत:च्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला. ॥१-४६॥


एवढ्याकरता महाभारतामधे जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. (म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसन्या घेतल्या आहेत.) ॥१-४७॥


अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. ॥१-४८॥


ऐका हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. ॥१-४९॥


जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. ॥१-५०॥


अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. ॥१-५१॥


मग ते (भारतरूप) लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवले. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला. (त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले.) ॥१-५२॥


वैराग्यशील लोक ज्या (गीतारूपी तुपाची) इच्छा करतात, संत जे नेहेमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी ‘तेच मी आहे’ (म्हणजे सोऽहंभावाने) जेथे रममाण होतात ॥१-५३॥


भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. ॥१-५४॥


जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात, व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात, ॥१-५५॥


ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदु मनाने वेचतात, ॥१-५६॥


त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून (वासनांचा जडपणा टाकून) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. ॥१-५७॥


हिची चर्चा शब्दावाचून करावी. (मनातल्या मनात हिचा विचार करावा.) इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. ॥१-५८॥


कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते त्याप्रमाणेच या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. ॥१-५९॥


किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते, हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते. ॥१-६०॥


त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंत:करणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. ॥१-६१॥


अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. ॥१-६२॥


(ज्ञानदेव म्हणतात) अहो महाराज, आपले अंत:करण गंभीर आहे. म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी लडिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. ॥१-६३॥


लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो ॥१-६४॥


त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगिकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू ? ॥१-६५॥


परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. ॥१-६६॥


हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे ? ॥१-६७॥


किंवा टिटवीने समुद्र आटावण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे.॥१-६८॥


हे पाहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. ॥१-६९॥


या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वत: शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने ‘आपण एकसारखा विचार कशाचा करता’ असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. ॥१-७०॥


त्यावर शंकर म्हणाले, “हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीतातत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. ॥१-७१॥


वेदार्थरूपी समुद्र हा योग

निद्रेत असलेल्या सर्वश्वराचे घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वत: प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ॥१-७२॥


असे हे गीतार्थाचे काम गहन आ

हे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तेथे माझा पाड कसा लगणार ? ॥१-७३॥


या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार ? सूर्याला कोणी उजळावे ? चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे ? ॥१-७४॥


असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तिराय यांची अनुकूलता आहे त्याअर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. ॥१-७५॥


एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे. व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी संतकृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखीत तेवत आहे. ॥१-७६॥


लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परीसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. ॥१-७७॥


जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ति आहे, यात आश्चर्य ते काय ?॥१-७८॥


कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे ? आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. ॥१-७९॥


तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे. ॥१-८०॥


आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत अहात) म्हणून मी बोलतो. (गीतेचे व्याख्यान करतो.) ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते ॥१-८१॥


त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. (ते सांगतील ते काम करणारा आहे.). आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. ॥१-८२॥


श्रीगुरु म्हणाले थांब. हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. (लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर,) ॥१-८३॥


श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तिनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले ते मी सांगतो. मोकळ्या मनाने ऐका. ॥१-८४॥


तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकिकत काय आहे ती मला सांग. ॥१-८५॥


ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. ॥१-८६॥


तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लौकर सांग ॥१-८७॥


त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडवसैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. ॥१-८८॥


अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला (तेव्हा त्याला कोण आवरणार ?) जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे ? ॥१-८९॥


अथवा वडवानल (समुद्राच्या पोटातील अग्नी) एकदा पेटला तशात त्याला वार्‍याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो ॥१-९०॥


त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ॥१-९१॥


ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. ॥१-९२॥


नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. ॥१-९३॥


हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्यद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत. जसे काय डोंगरी किल्लेच. ॥१-९४॥


ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने (धृष्टद्युम्नाने) हा सैन्यसिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खर. ॥१-९५॥


आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. ॥१-९६॥


जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. ॥१-९७॥


येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. ॥१-९८॥


चेकितान, धृष्टकेतु, पराक्रमी असा काशिराजा. नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. ॥१-९९॥


हा कुंतिभोज पहा. येथे हा युधामन्यु आला आहे. आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत, ते पहा ॥१-१००॥


दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंत:करणाला आनंद देणारा व प्रतिअर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यु हा पहा. ॥१-१०१॥


आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही. पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. ॥१-१०२॥


आता आमच्या सैन्यामधे प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका. ॥१-१०३॥


तुम्ही आदिकरून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ (आपल्या माहिती करता) सांगतो. ॥१-१०४॥


प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. ॥१-१०५॥


या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला ? हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का ? ॥१-१०६॥


येथे विकर्ण वीर आहे. तो पलिकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहेमी बाळगीत असतो. ॥१-१०७॥


समितिंजय आणि सौमदत्ति असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ॥१-१०८॥


ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे ? जेवढी म्हणून अस्त्रे आहेत, तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. ॥१-१०९॥


हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जिवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. ॥१-११०॥


ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पतीवाचून इतराला स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. ॥१-१११॥


आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामिभक्त आहेत. ॥१-११२॥


हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे ? क्षात्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ॥१-११३॥


याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू ? हे अपार आहेत. ॥१-११४॥


आणखी क्षत्रियांमधे श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. ॥१-११५॥


आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही क:पदार्थ आहे. ॥१-११६॥


आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही ? तशात ज्याप्रमाणे वडवानल साह्यकारी व्हावा, ॥१-११७॥


किंवा प्रलयकाळचा अग्नि व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. ॥१-११८॥


आता या सैन्याबरोबर कोण झगडेल ? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. ॥१-११९॥


आणि त्यात भीमसेन (अगोदरच) आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे (मग काय?) असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. ॥१-१२०॥


मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा. ॥१-१२१॥


ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. ॥१-१२२॥


त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे. आणि भीष्मांच्या आज्ञेत रहावे. (नंतर) दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. ॥१-१२३॥


या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. (आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे.) ॥१-१२४॥


राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. ॥।१-१२५॥


ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तर्‍हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. ॥१-१२६॥


तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ॥१ -१२७॥


ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. ॥१-१२८॥


त्यामुळे आकाश घडाडले, सागर उसळला, आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. ॥१-१२९॥


त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्‍या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणावाद्ये वाजू लागली. ॥१-१३०॥


नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली मी मी म्हणणारांनाही तो महाप्रलय वाटला. ॥१-१३१॥


नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना (या सर्वांची एकच गर्दी झाली.) ॥१-१३२॥


ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागेले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. ॥१-१३३॥


तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे ? कच्चे लोक तर कस्पटासमान उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळित होऊन पायच धरीना. ॥१-१३४॥


त्यापैकी कित्येकांचे तर उभ्याउभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दांतखिळी बसली आणि मी मी म्हणाणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. ॥१-१३५॥


असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. ॥१-१३६॥


तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ॥१-१३७॥


जो रथ विजयाचा गाभा, किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते ॥१-१३८॥


व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणु काय पंख असलेला मेरु पर्वतच. ॥१-१३९॥


ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत ? ॥१-१४०॥


रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. ॥१-१४१॥


पहा त्या प्रभूचे नवल ! त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे. कारण ( तो सर्वशक्तिमान परमेश्वर, पण) अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. ॥१-१४२॥


आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वत: युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला ॥१-१४३॥


परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, ॥१-१४४॥


त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. ॥१-४५॥


त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ॥१-१४६॥


ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. ॥१-१४७॥


इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. ॥१-१४८॥


त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला. ॥१-१४९॥


नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवजाने कालही गडबडून गेला. ॥१-१५०॥


त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र. इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. ॥१-१५१॥


तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी ॥१-१५२॥


विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. ॥१-१५३॥


त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. ॥१-१५४॥


त्य़ामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरु व मंदार पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले. व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. ॥१-१५५॥


जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले. ॥१-१५६॥


सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. ॥१-१५७॥


दिवसाच सूर्य थांबला व प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ॥१-१५८॥


ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो, सृष्टीचा अंत होईल. (तो चुकवावा म्हणून) मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. ॥१-१५९॥


त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती. ॥१-१६०॥


तो घोष तर शांत झाला. पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्ल्क राहिला होता त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. ॥१-१६१॥


हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी फाकाफाक करतो, तशी कौरवांची अंत:करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. ॥१-१६२॥


तो प्रतिध्वनी दुमदुमत असतांना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळाजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना ‘अरे सावध रे सावध’ म्हणू लागले; ॥१-१६३॥


त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. ॥१-१६४॥


मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. ॥१-१६५॥


त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. ॥१-१६६॥


अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. ॥१-१६७॥


तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. ॥१-१६८॥


त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता चटकन रथ हाकावा व तो तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥१-१६९॥


जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन (तोपर्यंत रथ उभा कर). ॥१-१७०॥


येथे सर्व आले आहेत. पण मी रणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरुर आहे. (म्हणून मी पहातो). ॥१-१७१॥


फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. ॥१-१७२


ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ॥१-१७३॥


आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ १७४ ॥

ऐका. अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमधे उभा केला. ॥१-१७४॥


ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते ॥१-१७५॥


त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. ॥१-१७६॥


मग म्हणाला, देवा पहा, पहा. हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. ॥१-१७७॥


तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, ह्याने ह्या वेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक ? पण काहीतरी विलक्षणच असावे. ॥१-१७८॥


याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात रहाणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. ॥१-१७९॥


तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा यासर्वांसच अर्जुनाने पाहिले. ॥१-१८०॥


आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. ॥१-१८१॥


जिवलग मित्र, सासरे, आणखी सगेसोयरे, पुत्र, नातु, असे अर्जुनाने तेथे पाहिले. ॥१-१८२॥


ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहानमोठे आदिकरून – ॥१-१८३॥


असे हे सर्व कूळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ॥१-१८४॥


त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥१-१८५॥


ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणिदारपणामुळे दुसर्‍या स्त्रीचे (सवतीचे) वर्चस्व सहन होत नाही. ॥१-१८६॥


नवीन स्त्रीच्या (जारिणीच्या) आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा (तिची) योग्यता न पहाता तिच्या नादी लागतो ॥१-१८७॥


किंवा तपोबलाने ऋद्धी (ऐश्वर्य) प्राप्त झाली असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते आणी मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवण रहात नाही ॥१-१८८॥


त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली. कारण त्याने आपले अंत:करण करुणेला वाहिले. ॥१-१८९॥


पहा, मांत्रिक चाचरला (मंत्रोच्चारात चुकला) असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. ॥१-१९०॥


म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांतमणी पाझरू लागतो ॥१-१९१॥


त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला. आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला ॥१-१९२॥


तो म्हणाला देवा, ऐका. मी हा सर्व जमाव पाहिला. इथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात. ॥१-१९३॥


हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत, हे खरे. पण ते (त्यांच्याशी लढणे) आपल्याला योग्य कसे होईल ? ॥१-१९४॥


या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिले नाही. ते नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी सुद्धा स्थिर नाही. ॥१-१९५॥


पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. ॥१-१९६॥


सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत. आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लुळा पडला आहे. ॥१-१९७॥


ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मलाच दाद नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥१-१९८॥


(हे अर्जुनाचे अंत:करण) व्रज्राहूनही कठिण, दुसर्‍यास दाद न देणारे अति खंबीर आहे; पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ॥१-१९९॥


ज्याने युद्धात शंकरास जिंकले, व निवात-कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. ॥१-२००॥


ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो ॥१-२०१॥


तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह (करुणा) जात्या कोवळा खरा पण महा कठिण आहे. ॥१-२०२॥


संजय म्हणाला, राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही. म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. ॥१-२०३॥


असो, राजा ऐक. मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥१-२०४॥


तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे !मग तो म्हणाला कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. ॥१-२०५॥


ह्या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकूळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते.॥१-२०६॥


या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजादिकांना मारण्याला काय हरकत आहे ? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. ॥१-२०७॥


याकरता, आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे ॥१-२०८॥


देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता (असे वाटते की) या वेळी युद्ध केले तर (त्याचा परिणाम) वाईट होईल पण ते जर टाळले तर काही लाभ (कल्याण) होईल. ॥१-२०९॥


या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे ? ॥१-२१०॥


अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. ॥१-२११॥


त्या भोगापांसून मिळणार्‍या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल. इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. ॥१-२१२॥


पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. ॥१-२१३॥


जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग ? व आम्ही जगावे तरी कोणासाठी ? ॥१-२१४॥


कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. ॥१-२१५॥


हे (मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे) आपण मनात तरी कसे आणावे ? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे ? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. ॥१-२१६॥


आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी (वास्तविक) भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. ॥१-२१७॥


आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे. ॥१-२१८॥


तेच हे आमचे सर्व कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा, ते सर्व आपापसात लढावयास तयार झाले आहेत. ॥१-२१९॥


बायका, मुले, आपले खाजिने, ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे लढाईस तयार झाले आहेत ॥१-२२०॥


अशांना मी मारू तरी कसा ? मी कोणावर शस्त्र धरू ? (हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी) आपला काळजाचा घात कसा करू ? ॥१-२२१॥


हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का ? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. ॥१-२२२॥


येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ॥१-२२३॥


ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत. आणि म्हणूनच (यांना मारावे असे) वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. ॥१-२२४॥


उलटपक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही. ॥१-२२५॥


त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. ॥१-२२६॥


जर आज आम्ही येथे असे (यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले) युद्धे केले तर मग आमच्या विषयी कोणाच्या मनात आदर राहील ? आणि मग कृष्णा, सांग तुझे मुख आम्हाला कसे दिसेल ? (तू आम्हाला अंतरशील). ॥१-२२७॥


जर मी गोत्रजांचा वध केला, तर सर्व दोषांचे मी वसतीस्थान होईन. आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील. ॥१-२२८॥


कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पहावे ? ॥१-२२९॥


ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. ॥१-२३०॥


चिखलाने भरलेले सरोवर पाहून (कमलपत्रावर वसून चंद्रामृत सेवन करणारा) चकोर त्यात न रहाता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, ॥१-२३१॥


त्याप्रमाणे हे देवा, जर (माझ्या ठिकाणचा) पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझे कडे येणार नाहीस. ॥१-२३२॥


म्हणून मी युद्ध हे करणार नाही. या लढाईमधे हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निंद्य दिसत आहे. ॥१-२३३॥


तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग कृष्णा, तुझ्यावाचून त्या दु:खाने (वियोगाने) आमचे हृदय दुभंग होईल. ॥१-२३४॥


एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला. ॥१-२३५॥


हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. ॥१-२३६॥


आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे ? जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे ? ॥१-२३७॥


अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित आहे. ॥१-२३८॥


असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय हित आहे ? सांग बरे ? ॥१-२३९॥


किंवा समोर अग्नि पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. ॥१-२४०॥


त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पहात आहेत. हे समजत असताही, या कामी कसे प्रवृत्त व्हावे ? ॥१-२४१॥


त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा, ऐक. मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. ॥१-२४२॥


ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, ॥१-२४३॥


त्याप्रमाणे कुळामधे मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कूळच नाशाला पावते. ॥१-२४४॥


म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल, आणि मग कुळामधे अधर्मच माजेल. ॥१-२४५॥


तेथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध (कर्तव्य काय व अकर्तव्य काय) या सगळ्या गोष्टी बंद पडतात. ॥१-२४६॥


जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो, ॥१-२४७॥


त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार ? ॥१-२४८॥


ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. ॥१-२४९॥


उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात. (वर्णसंकर होतो) व त्यामुळॆ जातिधर्म मुळापासून उखडले जातात. ॥२५०॥


ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. ॥१-२५१॥


मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते. ॥१-२५२॥


पहा, ह्याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ॥१-२५३॥


ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार ? ॥१-२५४॥


असे झाल्यावर पितर काय करणार ? स्वर्गात कसे रहाणार ? म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात. ॥१-२५५॥


ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हांहां म्हणता पसरते त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते ॥१-२५६॥


देवा, ऐका. येथे आणखी एक महापातक होते. ते हे की त्या पतितांच्या संसर्गदोषाने लोकांचे आचारविचार चळतात (भ्रष्ट होतात). ॥१-२५७॥


ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसर्‍या घरांनाही जाळून टाकतो ॥१-२५८॥


त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात, ते ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात. ॥१-२५९॥


तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. ॥१-२६०॥


त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते. ॥१-२६१॥


देवा, ऐक. ही नानाप्रकारची (दोषांविषयीची) बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस ? ॥१-२६२॥


ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे. असे कळत असताही अशा ह्या घडणार्‍या महापातकांचा त्याग करू नये काय ? ॥१-२६३॥


हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे अशा बुद्धीने त्याजकडे पाहिले ही काय लहानसहान गोष्ट (पातक) आमच्या हातून घडली का ? तूच सांग. ॥१-२६४॥


आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. ॥१-२६५॥


असे केल्याने जितके दु:ख भोगावे लागेल (तितके सहन करावे, इतकेच काय, पण अशा करण्याने) मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही. ॥१-२६६॥


याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कूळ पाहून म्हटले की (यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥१-२६७॥


संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. ॥१-२६८॥


मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला. व त्याला गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥१-२६९॥


ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो ॥१-२७०॥


अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात पडून दीन होतो ॥१-२७१॥


त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दु:खाने पीडलेला दिसला. ॥१-२७२॥


मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी आले. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे अशी गोष्ट घडली. ॥१-२७३॥


आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ॥१-२७४॥


ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥२७५॥


इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥