sant-tukdoji-kavita
||या झोपडीत माझ्या||
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥
||कशाला पंढरी जातो||
कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो ?
संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो
कीर्तनी मान डोलतो परि कोंबडी-बकरी खातो ||
वडीलजनाचे श्राध्द कराया, गंगेमाजी पिंड देतो
खोटा व्यापार जरा ना सोडी, तो देव कसा पावतो ||
झालेले मागे पाप धुवाया देवापुढे नवस देतो
तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी, कोणीच ना मुक्त होतो ||