ग्रंथ : संत तुकडोजी आनंदामृत
sant-tukdoji-anandamrut
|| संत तुकडोजी आनंदामृत ||
प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा-
॥ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । ।
ॐनमोजी विनायका । स्वरूपसुंदरा सुखदायका !
सकळ विघ्न निवारका । मूळपुरुषा गजानना !।। १ ।।
सरळ सोंड नासिक । लंबायमान लवचिक ।
दंती तेजाची झुळुक । दीप्ति पड़े मुखावरी । । २ । ।
मस्तकी मुकुट रत्नांकित । कंकण मुद्रिका मंडित हस्त ।
उदरी त्रिवळी शोभत । त्रैलोक्य संपूर्ण भरले असे ।।३।।
तू सिद्धिबुद्धीचा दाता । सकळ विद्यांचा भर्ता ।
सकळ कलांचा अधिष्ठाता । सबल मायाभंजना ! । । ४ । ।
तूचि सर्व सृष्टीचा कर्ता । मायातीत गुणभरिता !
तू ब्रह्म सनातन अव्यक्ता ! निर्विकारा जगद्वंद्या ! । । ५ । ।
तुझे वर्णू जाता गुण । वेडावला चतुरानन । ।
वासुकी पावोनिया शीन । जिव्हा चिरोन बैसला ॥ ६ ॥
श्रुतिस्मृतीचे भांडार । उकलिता सापडे सार ।
ऐसा अगम्य अगोचर । लंबोदर मूर्ति तू । । ७ । ।
तुझा ऐसा गुणार्णव । वर्णावया न चले वाव।।
तेथे मी अल्पमति मानव । काय वर्णं शके? ॥८॥
ग्रंथरचनेची आर्त । मने घेतली स्फूर्त ।
निर्विघ्न करी सावचित्त। विनवणी हेचि असे ।।९।।
आता नमूं शारदा सुंदरी। हंसवाहिनी बीणा करी।
शुभ्रवसन, कंचुकी वरी। शोभे सुंदर मौक्तिकांनी ।।१०।।
कपाळी कुंकुमतिलक। वाटे के वळ माणिक ।
नासिकेचे झळक ती मौक्तिक । प्रभा पडे मुखावरी ।।११।।
रत्नखचित किरीट । मस्त की शोभे लखलखाट ।
पदी जोडवे अनुवट। काय वर्ण शोभा ती ।।१२।।
मस्तकी कुरळ केशकलाप। जण दिसे षट्पदांचा गुंफ।
सुगंध देखोनिया अमूप। भ्रमर घालिती रुंजीते ।।१३।।
आदिमाया मूळप्रकृति । चहू वाचांची जन्मदाती।
सकळ विद्यांची स्फूर्ति । देशी भक्तां लागुनी ।।१४ ।।
तरि या ग्रंथाचिये अवधाने । रस भरी वो रसने ।
दास- इच्छा कृपादाने। पूर्ण करी कृपावं ते! ॥१५॥
आता मागणे यापरी। मम रसनेवरी वास करी।
रंग कला नाना कुसरी। ग्रंथामाजी ओवी वो ।।१६।।
यथामति तुझे स्तवन । केले असे अल्प जाण।
प्रेमभरे करी ग्रहण। हीच सेवा दासाची ॥१७॥
गंगोदके गंगापूजन। जेवि करिती सज्जन ।
तेवि वागीश्वरी तू असोन । तुझी वाणी तूज ओपिली ॥१८॥
लोकसेवेचे निमित्त करून । मने घेतली धाव जाण।
म्हणोनि आनंदामृत गंथ प्रमाण । निरूपणार्थ घेतला ।।१९।।
महाराज आडकोजी समर्थ । तुकड्यादास तयाचा अंकित ।
सेवूनि तयांचे पदामृत। चरणी लीन जाहला ।।२०।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे।वेदान्तसार संमते ।।
तुकड्यादास विरचिते । प्रथम प्रकरण संपूर्णम् ।।१ ॥
प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप-
नमो आता सद्गुरुनाथा! कर द्वय जोडूनि नमितो त्राता!
मज लाविले नाथपंथा। त्वांचि येवोनिया ॥१॥
तुझे नवल वर्णावया। वेदहि शिणले वाया।
ऐसा तू कृपाळू गुरुराया ! धन्य लीला तुझी ।।२।।
त्वाचि उपजविला भक्ति भाव । तूचि जगाचा उद्घारिता राव।
निर्मिले ब्रह्मा विष्णु महादेव । तुझेचि शक्तियोगे ।।३।।
तव स्वरूप वाटे सत्य सुंदर। मुळी असशी निर्विकार।
निरंजना! तुज नसोनि आकार। दाविशी लीला जगी पै ॥४॥
वाढविले देव- महिमान । जगी प्रगटला भक्तिकारण।
असोनिया स्वयेचि पूर्ण । पूर्णात्मा चितूनि दाविशी।।५॥
पाहोनिया तुझे स्वरूप। उद्धरलो वाटे आपोआप।
सुटे कामक्रोधासी कंप। वास करी क्षमाशांति॥|६॥
उडता धूळ तव चरणांची। कायावाचा साची।
तुटे बाधा द्वैताची। अद्वैत जोडी लाभूनि ।।७।।
आता नमस्कार तुजलागूनि। अन्य दुजा कवणा न मानी।
तूंचि मूळ कर्ता जाणोनि । शरण आलो तवपायी ॥४॥
प्रेमे गाता तव महिमा। तन्मय होई अंतरात्मा।
चालविणे नलगे इसर नेमा । गुण जो नित्य गाई तुझे ॥९॥
तूचि केला देश समोर। इतरांचा न लागे थार।
जेथे शिणला धराधर। तूचि आधार गुरुराया! ॥१०॥
त्वाचि वाढविला भक्ति-पंथ । बहुत उद्धरिले पापी अनाथ ।
न पाहशी शुद्ध शेत। कृपा करिशी दीनावरी ।।११।।
तूंचि प्रेमानंद सदोदित । राहशी सर्वांशीहि अलिप्त ।
तुझिया नामाचा पंथ । वाढू लागला जगामाजी ॥१२॥
काय उतराई होऊ संता। लाविले जेणे भक्तिपंथा।
परमहंस कृपानाथा। वरदान देई दासासी ।।१३।।
तूचि सद्गुरु रूपे येऊनि । उत्पत्ति स्थिति लया दावूनि ।
कर्ता-कारण-करणी। घेतली हाती तुवा ।।१४।।
विधिरूपे उत्पत्र करिशी। विष्णुरूपे प्रतिपाळिशी।
महेशांगे संहारिशी। सूत्रधारी तूचि एक ॥१५॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या । साक्षि तूचि गुरुवर्या !।
उपजोनि सृष्टि जाई विलया। नित्य तुझ्या दृष्टिपातें ॥१६॥
सकळ सूत्रे तुझ्या हाती। अभक्ता लाविशी भक्तिपंथी।
रिद्धि सिद्धि लोळती। चरणी तुझे ॥१७॥
तूंचि चराचरांचा कर्ता। सर्व जग हे तुझीच वार्ता । ।
इच्छेनुरूप केली समर्था ! फार काय बोलू? ॥१८॥
पूर्ण ईश्वर गमसी मजला। शरण जाऊ मी कवणाला?।
जैसा देही स्वर्ग उतरला। दुमदुमोनिया ॥१९॥
गुरुराया! तुझे आसन । दशव्यावरी करिशी शयन ।
जेथे नलगे मानपान। वासना आदि ॥२०॥
आता तन मन धनदि करून। तुला अर्पिला हा प्राण।
मज देई देई ज्ञान । ग्रंथवचन वदावया ॥२१॥
माझिया सद्गुरो मुरारी! धाव धाव गा जिव्हाग्री।
बैसवोनिया सत्रावी-तिरी। लोटवी पाझर प्रेमाचा ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । द्वितीय प्रकरण संपूर्णम् ॥२॥
प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग-
श्रोती व्हावे सावधान । लक्षी घ्यावे बोबडे वचन ।
सर्व तुम्ही साधुजन। म्हणोनि तुम्हां विनवीत ॥१॥
प्रथम करा सोपा उपाय । जेणे प्रपंचातचि मुक्त होय ।
फिटे चौयांशीचे भय। ग्रहण करिता अर्थ याचा ॥२॥
नको नकोत काही साधने। नको नको पहाडी राहणे ।
नको संसार तोहि सोडणे । भक्तिरूप उपाय तो ।।३।।
असोनि खुळा पांगळा । जो का उपाधी वेगळा।
असेल प्रपंचहि आगळा। तरी चालतले यालागी ।।४।।
कित्येक बोलती ब्रह्मज्ञान । शास्त्रपुराणे पठन करून ।
म्हणती पाहू पाहू ब्रह्मखूण। दावू लोका सर्वहि ।।५।।
रश्मीची ज्योति लावा। मग तिकडे दृष्टि फिरवा।
बह्ममणि दिसतो रे हिरवा। पाहा पहले एक दृष्टी ।।६।
ज्यासी आहे स्पष्ट दृष्टि । तो पाही दीप्ति गोमटी।
बिचारा आंधळा अंधदृष्टी। काय जाणे? ||७||
तयाने काय साधने करावी? ब्रह्मज्योति कैसी पाहावी?
म्हणोनि सर्वचि खरी मानावी। करावे दृढ ते एकचि ॥८॥
ब्रह्म काय दृष्टीने दिसे? आणि दिसे तितुके नाशे ।
ब्रह्म काय अंधाजवळी नसे? चराचरी व्यापक जे ।।९।।
जंव शुद्ध ज्ञानमार्ग न जाणला। कि भक्तिपंथे न गेला।
तोंवरी तया प्राण्याला। मुक्ति मिळेल कैंची? ।।१०।।
तो प्राणी जन्ममरण-शोक । सोडील केवि? ||११ ।।
जंव *तत्पद* पाहोनि *त्वंपद* शोधील। *असि* पदाचा मार्ग साधील ।
तंवचि मोक्षमार्ग लाभेल । हे तू सत्य जाण पा ।।१२ ।।
नेम धर्म अनुष्ठान । यांनी होशील जरी पावन ।
तरी मोक्षास आत्मज्ञान। पाहिजे गड्या! ।।१३ ।।
जंव सोडूनिया प्रवृत्ति। धरिशी दृढ भावे निवृत्ति ।
जरी होशील लीन संती। तरी ज्ञानदृष्टि देई तो ॥१४ ।।
श्रवण मननाचेनि योगे। निजध्यास लागे वेगे।
मग साक्षात्कार भोगे । तंववरी मुक्ति मिळेना ।।१५।।
वैखरी मध्यमा पश्यंति पर। हे वेदांचे जाण घर ।
चार वाचा तीच नार। वरी प्रेमनिर्झर सत्रावी ।।१६।।
पडे शुद्ध प्रेमकिरण जयावरी। अमृत वाचा पाझरी।
प्रगट ती वेदशब्द सत्य अवधारी। न ढळती बापारे! ।।१७।।
तया शब्दे जीव-शिव होती एक। मुळीचे ठावे पडे देख।
गंगाजळी टाकिता मलीनोदक । गंगारूप होतसे ।।१८ ।।
जरी करिशी यज्ञ अन्नदान । तरी मिळती स्वर्गादि भोग पूर्ण।
पुण्य सरलिया तेथून। उतरे भोगाया मृत्युलोकी ॥१९॥
म्हणू नि तूं ऐसे न करी। सांगती संत ते अवधारी।
लक्ष ठेवी पुरा-पुरी। माझिया बोला ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । तृतीय प्रकरण संपूर्णम् ॥३॥
प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन-
बहुत ग्रंथ जरी करिशी पठण। तरी चंचल होय मन जाण।
आता संख्या! निवांतपण। करी येथे ॥१॥
नाना साधने नाना सुविद्या। नाना पंथ, नाना कुविद्या ।
ही सर्वही जगद्वंद्या- I साठी करिजेत॥२॥
जोवरी न होय एकाग्र मन । तोवरी करिशी यांत भ्रमण।
जेथे सद्गुरुचे चरण। न आढळती॥३॥
बोलणे तुला सत्य खास । होई स्वदेहावरी उदास
लागे त्वरित सद्गुरुपदास। यापरता मार्ग नाही ॥४॥
सेवा करी रे लक्ष लावूनि। तेणे होशील आत्मज्ञानी ।
मुक्ति लाभेल तुजलागूनि। तत्त्वविचारे वागता॥५॥
पुढे जरी करिशी श्रवण। तरी अल्प सांगेन साधन ।।
पंचमुद्रा त्या कवण। परियेसी गड्या। तूं ।।६।।
भूवरी चाचरी अगोचरी। खेचरी घेऊनि अलक्ष्य अवधारी।
सांगेन परोपरी। उकलोनिया ।।७।।
ठेवोनि दृष्टि नासिकाग्री। लक्ष देइजे पृथ्वीभीतरी ।
तंव ती झाली भूचरी। मुद्रा पहा ।।८।।
दृष्टि असता सम। होईल अगोचरीचे काम ।
तीक्ष्णपणे पाहता प्रेम। देईल चाचरी ।।९।।
जरी पाहशी ऊर्ध्वीकडे । खेचरी मुद्रा सहज घडे ।
आता अलक्ष्याचे पवाडे । सांगतो ऐक ॥१०॥
दृष्टि ठेवोनि ऊर्ध्व जाण । नेत्र दुखावती क्षणोक्षण ।
वामभागी लक्ष पुरवून । अलक्ष्य मुद्रा साधीरे ।।११।।
जंव दष्टि फिरविशी आप। तंव चक्राकार दिसे कंप।
पढे नीलवर्ण दिसे चाप। तीच खूण तूर्येची ॥१२ ।।
श्रवण मनन निजध्यास । एकाग्र करिशी सावकाश ।
तंव तूर्येचा आभास । दिसो लागे ॥१३ ।।
रंग तूर्येचा श्यामता। वारंवार पाहो जाता।
पीत रंग दिसे त्राता। अद्वैतपणे ॥१४॥
पाहणे दिसणे एक होता । लागे उन्मनि अवस्था ।
नाभी-कुंडलिनी निगुता। चढे ब्रह्मरंध्री ॥१५ ।।
ऐक राया! सांगू वचन । मुद्रेमध्ये रे खंडणI
समाधीचे उत्थान । पावोनि हळू चालावे ॥१६॥
प्रथम करोनि पद्मासन । नासिकाग्री नेत्र फिरवून ।
दोन्ही अंगुष्ठे श्रवण। बंद करी तत्काळ ॥१७॥
नेत्री ठेवोनि तर्जनी। मध्यमा ती नासिक स्थानी
मुख अनामिके रोधोनी। श्वास बंद करी तो ॥१८॥
ऐसे कीजे दोन्ही करे। लक्ष देइजे सामोरे ।
गुरु घेवोनि हाते रे। तदनंतरे पाहावे ॥१९॥
शंख मृदंग आवाज। स्पष्ट ओळखो ये सहज।
प्रभा फाके गगन-शेज। दंग वृत्ति राहतसे ॥२०॥
वृत्तिसाठी ही साधने । रंगरूप सकळ मिथ्या ज्ञाने।
ध्वनि मुद्रांची मायिक भूषणे । ब्रह्मरूपी न उरती ॥२१॥
झालिया एकाग्र साधन । अलक्ष्य लक्षावे विंदाण ।
लक्ष ठेविता अलक्ष्य जाण । होशील पूर्ण गुरुकृपे ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । चतुर्थ प्रकरणम् ॥४॥
प्रकरण पाचवे – हठयोग-साधन-
जरी साधू म्हणती हठयोग। तरी महाकठिण असे सोंग ।
प्रपंचाअंगी तैसा भोग। घडे केवि? ॥१॥
जो नर सोडी प्रपंचभान। तयाने करावा हठयोग जाण ।
ब्रह्मचर्य राहोन। मानापमान सांडावा ।।२।।
जयाने हठयोग घ्यावा। तयाने अहंभाव सोडावा ।
स्वदेहाची पर्वा । न करावी किमपिही ।। ३ ।।
विहंगम मार्ग हठयोग। तेथे भोग तितुका रोग ।
॥ इतर सोडोनिया उद्योग। होई सादर नेमेसी ।। ४ ।।
सर्वहि मार्ग एक होत। पाहता दिसती जरी अनेक पंथ ।
परंतु सर्वातहि एकांत। साधला पाहिजे ।।५।।
करोनिया पाया मजबूत । मग घ्यावा कुणीहि पंथ ।
पाहावा तयाचाहि अंत । सुलभ मार्ग अंगीकारूनि ।।६।।
असोनिया एका पंथे। मग पडताळी विभिन्न मते ।
इकडे तिकडे पाहोनि जाते। राहते वृत्ति अढळचि ।।७।।
बोलावयासी वाटे गोड। पंच उचलिता न पुरती कोड ।
तो बोलायाची चाड। व्यर्थचि करी ।।८।।
मागे सांगितले साधन । पंचमुगायोग पर्ण ।
आता हठ योग जाण। वर्णीतसे अल्पमती॥९॥
प्रथम पाहोनि एकांत स्थान । जेथे कोणी नसे वास्तव्य करोन।
आधी करोनि एकाग्र मन। तेथे जावोन राही तू ॥१०॥
ठेवोनिया दक्षिण चरणासी। जाई मणिपूर स्वाधिष्ठानासी।
ओढोनिया मूलाधारेसी। स्वस्थ उगा राही की ॥११॥
मग सोडी वर प्राण। दोन्ही मिळवी प्राण अपान ।
अनाहती विश्वघ्न । दैवत वसे असे जाणबा ।।१२।।
गुरु असावा सामोरी। मेरूची गाठ उठते वरी।
श्वास रोधी रे निर्धारी। हठयोग असा स्वानुभूत ।।१३।।
क्षणोक्षणी चक्रे दिसती। नित्यनियमे जप चालती।
षड्चक्रांचे भंवती। अनुभव ऐसा ॥१४॥
त्रिकुटी मिळती मुद्रा तीन । भ्रमरगुंफेसी जाती दोन ।
पश्चिमेसी तिसरा जाण। एक मार्ग जात असे ॥१५॥
पुढे दिसे वैकं ठनगर। अनंत रंगाचे माहेर।
उभी असे द्वारी नार। माया राणी ॥१६॥
पुढे तया नगरा आंत । कोटि सूर्यप्रकाश दिसत ।
गुरूदर्शनाचा एकांत । लाभे तया स्थळी ॥१७॥
पाहणे अधिक दिसणे। होती एक अद्वैतपणे।।
समाधी राही तयागुणे। अखंडित ॥१८॥
मार्गक्रमण कीजे हळूहळू । जैसे तीन महिन्याचे बाळू ।
जेवि पिपिलिकेचा खेळू । चालतसे ॥१९ ।।
जरी हठयोग केला। हट्टानेचि पुढे गेला।
तरी तो हट्ट पाहिजे मुरविला। प्रेमामध्ये ॥२०॥
ब्रह्मानंदी उठती लहरी। न चाले द्वैताची फेरी।
राहोनि निवांत जैसे तैशापरी। आनंद करी परिपूर्ण ।।२१।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । पंचम प्रकरण संपूर्णम् ।।५।।
प्रकरण सहावे – अजपाजप-
श्रवण करी माझिया राया! तुज सांगेन सुगम उपाया।
जये श्रीकृष्णे व्यवसाया। लाविले उद्धवासी ॥१॥
तोचि शुकाने परीक्षितासी। आणिक नारदे वाल्मीकासी।
वशिष्ठे सांगितला रामासी। तोचि सांगेन उपाय आता ॥२॥
जैसा सांगेन तुज उपाय । श्रद्धा ठेवोनि करीतु जाय ।
जेवि मातेचे गोड गोड पेय। पीतसे तान्हुला ॥३॥
तुज फारचि आहे गोडी। तरि हा उपाय करी तातडी।
चालता पायाचेनि जोडीI वाट लाघे साधनाची ।।४।।
उत्तम मार्ग हा सोडून । कासया फिरसी रानोरान?
या प्राणियांसी सांगे कवण? करिती मना आले ते ॥५॥
खरोखरी ज्या मानवाची। इच्छा असेल गा तरावयाची ।
तेणे सावकाश हाचि । उपाय करावा ॥६॥
म्हणती देव पहाडी लपला। तो एका साधूने पाहिला |
कैसा मिळेल आम्हाला। ओरडती ऐसे ॥७॥
मागे तरले बहुत जन । तिथे उपाय केला कवण? ।
याच उपाये करून । सर्वहि तरले जाणपा ॥८॥
किती सांगू त्यांची नावे। नामा धृव प्रल्हाद बरवे।
संदीपने कृष्णासी सांगावे। आदिनाथे मच्छेंद्रा ।।९।
कोणी सांगती बाहा नाम। म्हणती म्हणा राम-राम।
त्या नामें चि कल्प-द्रुम। फळे म्हणती ॥१०॥
जेथे न उरे कल्पना। तोचि राम तुझिया नयना।
परंतु तू अज्ञाना?। भुललासी अंतरंग ।।११।
अज्ञानत्व ठेवोनिया अंगी। अहंकारे राहिले जगी।
या बुडाले याने कितीक जोगी। विचार करी रे । ॥१२॥
सत्य न अनुभविता मनी । बहु बोलले असत्य भाषणी।
सत्य-असत्य विचार जनी। पाहा पाहा बापा रे! ।।१३।
सत्य टाकोनि असत्य धरी। तो नर जाईल यमपुरी।
यांत काही कलाकुसरी। नलगे सांगावी ।।१४
अरे। ठेवी सत्यपण । असत्य सांडी सांडी जाण ।
सत्य ईश्वरा प्रमाण । संत वदती निश्चये ॥१५ ।।
तरी आता बा साधक! प्रथम सांगेन ते ऐक ।
सदगुरु-चरण धरोनि घोक । अजपा सदा अंतरी ।।१६ ।।
हिला अजपा का म्हणती। ते सांगो पुढत पुढती ।
जप हृदयांतरी चालती। आपोआप, न जपता ।।१७ ।।
म्हणती यास निरंजनमाळ। भजेल जो त्यास कांपे काळ ।
जरी प्रपंचाची हळहळ। तरी दूर होय ।।१८।।
ओहं-सोहं-नाम असे। ओहं (ॐ) नाभीपासोन प्रकाशे।
उमटती तयाचे ठसे। कंठावरी ॥१९।।
सोहं नासिकेशी वसत। श्वासरूपे उंच जात ।
हा दोन्हीचा एकांत। अंत विशुद्ध चक्री ॥२० ।।
जप चाले आपणाआपण । करोनि थोर एकाग्र मन ।
ओळखोनि परिपूर्ण । लक्ष ठेवी अधर कंठी ।।२१ ।।
यापुढे गड्या! काही। शुद्ध नाम दुजे नाही।
याचि नामे जाशील पाही। पैल पंथा अभ्यासे ।।२२ ।।
येणे होईल आत्मशोधन। पुढे षड्चक्रदर्शन ।
जप एकवीस हजार सहाशे जाण। अहोरात्री ।।२३ ।।
टाकोनिया मार्ग खरा। मारता उगाचि येरझारा ।
तेणे के वि चौयांशी-फेरा। चुकेल तुमचा? ॥२४ ।।
आता करी नामोच्चार । पाहोनिया एकांत सुंदर ।
तेथे बैसे सविस्तर। पद्मासन घालोनि ।।२५।।
जप चालतसे अपार। ओळखी, करोनिया मन एकाग्र ।
उन्मेष वृत्तीचा सार। लाभेल तेथे ॥२६॥
लागे तेथे सहज समाधी। स्मरता अजपा तुटे उपाधि ।
प्रपंचातहि विघ्न न बाधी। ऐसे नाम सुंदर सोहं-हंसा ॥२७॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षष्ठम प्रकरण संपूर्णम् ॥६॥
प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन-
पुसे एक श्रोता साचार। तया लागी ग्रंथ-विस्तार ।
कथन करावे सविस्तर। षड्चक्रांचे वर्णन ते ॥१॥
चक्री दळे ती कवण। किती दळे कोणता वर्ण ।
जप किती कवण स्थान । नेमस्त सांगेन मी ॥२॥
घेवोनि रिद्धिसिद्धीसही। देव गणेश कोठे राही।
स्थान किती दळी पाही। जप किती चाले हो ॥३॥
ऐसी ती सहा स्थाने। ओळखोनि घ्यावी साधारणे ।
पढे बोलेन अल्पवचने। श्रोती सावधान व्हावे ॥४॥
प्रथम चक्र मूलाधार। वर्ण तयाचा रक्ताकार ।।
बसे गुदस्थानावर। तोचि देव गणेश ॥५॥
चतुर्दक कमळ, ईश्वर देव। जप सहाशे पहा हो!
तेथे कल्पनेची वाव। वाढू न शके सर्वथा ॥६॥
ब्रम्हा लिंगस्वानो वसे। पीतवर्ण तयाचा दिसे ।
स्वाधिष्ठान* म्हणतो खासे । देव अग्नि राही तो ।।७।।
शक्ति सावित्री तो जाण। करोनि षड्दळी शयन ।
जप सहाशे प्रमाण। चालतसे नेमे ।।८।।
दश दळांवरी येवोनि। वास करी कमलाराणी।
जर्ण निळा, नाभिस्थानी। वास करी विष्णु हो! ।।९।।
नाम चक्र मणिपूर*। ऋषि वायु तो सुंदर।
जप चाले सहा सहस्त्र । नेमे सदैव त्या ठायी ।।१०।।
अनुहात* चक्राचे वर्णन। हृदयी असे परिपूर्ण ।
वास करी उमारमण । देवि पार्वती त्या ठायी ॥११ ।।
सहा सहस्त्र चाले जप । सूर्य ऋषि शोभे अमूप ।
द्वादशदली आपोआप। जप चाले नेमेसी ॥१२॥
शुभ्र वर्ण, जीव देव। चंद्र असे ऋषि-नांव ।
षोडश दळे पहा हो! तये स्थानी ॥१३॥
विशुद्ध* चक्र कंठस्थान । शक्ति अविद्या तेथे जाण ।
जप सहस्त्र एक प्रमाण। अनुभव ऐसा असे ॥१४॥
अग्निचक्र* भृवांतरी। वर्ण पीत, ज्योति बरी।
माया शोभतसे सुंदरी। हंसऋषी बसतसे ॥१५॥
देवता ती परमहंस । जप एक सहस्त्र खास।
आज्ञाचक्री या द्विदल आभास । पाही प्राणिया! की ॥१६॥
पुढे सहस्त्रदळ सुंदर। नाम तयाचे ब्रम्हरंध्र ।
तेथे गुरुदेव करूणाकर। वसतसे सर्वदा।।१७॥
परम देवता ऋषि । ज्ञानशक्ति बसे खासी।
ऊर्ध्वद्वारे संचार त्यासी। होऊ लागे सत्वरी॥१८
सहस्त्रदल मुख्य स्थान । नाना ध्वनी अनेक वर्ण ।
जप सहस्त्र प्रमाण । सोहंबीज तेथचि ॥१९॥
सोहंबीज अजपा। एकाग्रतेचा मार्ग सोपा।
जेणे केले शुद्ध मापा। तोचि दृष्टी पाही की॥२०॥
नसता देही लक्ष्य-भान। जाणेना तेचि अज्ञान ।
म्हणे दिसावे चक्र वर्ण । केवी घडे तयासी? ॥२१ ।।
प्राणी असे अहंकारी । परीक्षेसी बोले परी।
तेथे षड्चक्रांची थोरी। न वर्णवे कदापि ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । सप्तम प्रकरण संपूर्णम ॥७॥
प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा-
श्रोती व्हावे सावधान । प्रेमे बोलेन काही खूण ।
जरी सद्गुरुकृपा जाण। पाहिजे तुम्हां ॥१।।
जरी जिज्ञासू शिष्य झाला। हदये इच्छी उद्धरण्याला ।
तयाने वैराग्यदृष्टी सद्गुरूला। शरण जावे ।। २ ।।
जाणावे सद्गुरुचे लक्षण । पुढे कळेल त्याची खूण।।
सद्गुरुपासोनि आत्मज्ञान। प्राप्त करावे ।।३।।
ज्ञान झालिया मागुती। बोधे बाणे सहजस्थिति ।
श्रद्धा ठेविता अपरोक्षप्राप्ति । ज्ञाने अद्वैती वृत्ति रमे ।। ४ ।।
प्रथम घ्यावं वैराग्यज्ञान । तेचि करावे शुद्ध वैराग्य जाण ।
गुरुपासोनि माहिती पूर्ण । घ्यावी अनासक्तीची ।। ५ ।।
जरी म्हणशी प्रपंची बुडतो। तरी परमार्थ न साधे तो।
दोन्ही मार्ग चालू म्हणतो। तो पार कैसा पावेल? ।।६।।
संती निर्णित केले होते। सहजासमाधी कवण्या पंथे।
पाणियांत असोनि कमळ ते । निर्लेप राही जयापरी ।।७।।
पाणी असे पुरुष दोन । पुष्प राही वरीचि जाण ।
प्रपंची वासनाक्षयाचे प्रमाण । सद्गुरुलागी पुसावे ।।८ ।।
त्या मार्गे शुद्ध वैराग्यी बनशी। मग निजगुह्याचा बोध घेशी।
तया बोधास्तव श्रवणेसी। सादर होई आवडी ।।९।।
या करिता पुढे श्रवण मनन । त्याचेनि घडे निजध्यास जाण।
तेणे होईल स्वानुभव पूर्ण । तुझिये दृष्टी ।।१०॥
या सर्व साधन-मिळणी। ग्रंथ वाचावे एकान्त स्थानी।
परोक्ष होता निरूपणी। गुरुमुखे रंगोनि जावे ॥११॥
ऐकोनिया श्रीगुरुचा बोध । तुज विराले दिसती जगबंध।
बनेल विदेहस्थिति अगाध । परमानंदे डुलशी तू ।।१२।।
अनंत पुण्याने लाभला। नरदेह हिरा हाता आला।
नराचा नारायण झाला । तो ऐसिया कृती निर्भयपणे ॥१३॥
सांगू केवी गुरु-महिमान। सद्गुरू तोचि देव जाण ।
धरी धरी रे तयाचे चरण । आण माझ्या गळ्याची ॥१४॥
चित्त-एकाग्रते कारणे । साधावी अजपादि साधने ।
परी अंती आत्मज्ञाने । अद्वैत व्हावे गुरुबोधे ॥१५॥
कवण चक्र कैसे पाहावे । ते गुरु योगेश्वरमुखे ऐकावे ।
मग अनुसंधान लावावे । तया चक्राचे ॥१६॥
श्रीगुरुच्या बोधे करून । जंव पाहशी सात रत्न ।
तव साधूनिया आत्मज्ञान । ब्रम्हानंदी डुलशी तू ।।१७।।
आता फार बोलू काय । धरी रे आत्मज्ञानाची सोय ।
तया वाचोनिया उपाय । ते अपाय होती सर्वहि ।।१८ ।।
इतिश्री आनंदामृत गंधे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । अष्टम प्रकरण संपूर्णम् ॥८॥
प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान)-
मागे कथिली बहु साधने । अनेक पंथ अनेक ज्ञाने ।
परि ती सद्गुरुवाचूनि कवणे। न साधती ॥१।।
जरी साधका व्हावा देव । तरी हाचि सोपा उपाव ।
लीनपणे धरी दृढ भाव। एका सदगुरुचे पायी ।।२।।
सांडी सांडी सर्व पंथ । सद्गुरुवाचोनि होती व्यर्थ ।
म्हणोनि सद्गुरुचा भक्त । पूर्ण होई तत्त्वतः ।।३।।
नम्रतेने करी सेवा। पश्चात्तापे करी धावा ।
ठेवोनिया शुद्ध भावा। शरण जाई सुविचारे ॥४।।
एसे जाण सद्गुरुरूप। जे ब्रम्ह-सोहं-स्वरूप ।
हृदयी जयाचे ज्ञानदीप। उजळले असती ॥५॥
जरी असे नसे सद्गुरु जवळी। नामे राख लावी भाळी।
शीतल तो चंद्रमौळी। करी कृपा हदयीच ॥६॥
असे सांगतो सेवासाधन । करी नीट एकाग्र मन ।
ठेवी स्थिर करोनि आसन । एकांत स्थानी ।।७।।
नासाग्री ठेवी लक्ष। सर्व मनाचीच साक्ष ।
हृदयी धरोनि भावपक्ष । सद्गुरुमूर्ति सन्मुख स्थापी॥८॥
रत्नखचित चौरंग जाण | सुवर्णाचे गंगाळ घेऊन ।
महागंगेचे पाणी आणून । घालो स्नान तयासी ।।९॥
नेसवी जरीकाठी धोतर। अंगी चोळावं सुगंध अत्तर।
बैसवावे दिव्यासनावर । गुरुमूर्तीसी सद्भावे ॥१०॥
सद्गुरु पूजावा आदरेसी। मनसुमने वाहू नि त्यासी।
बिल्वदले पुष्पाक्षतांसी। चंदनासह अर्पावे ॥११॥
गळा घालावा सुंदर हार । शिरी मुकुटाचा संभार ।
अंगी अंगरखा जरीदार । पायी खडावा रत्नजडित ।।१२।।
मग न्याहाळावे पूर्ण स्वरूप। धरोनि चरण आपेआप ।
सदगुरु-नेत्री ज्ञानदीप। सुहास्य वदन अवलोकावे ॥१३॥
द्यावा नैवेद्य पक्वान्नांचा। हा सर्वहि भाव प्रेमाचा।
समर्पावा गुरुचरणी साचा । भक्तिपूर्वक चिंतूनि ॥१४॥
करोनि नैवेद्य अर्पण । तांबूल द्यावा प्रेमे करून ।
पंचारती ओवाळून । चरणी मस्तक ठेवावे ।।१५।।
करावी नम्रपणे प्रार्थना। स्वरूपसिद्धीची याचना।
ध्यानी रंगवावे मना। जेणे ज्ञाना तेज चढे ।।१६।।
ऐसे करिता बहुत दिनी। चित्त एकाग्र होऊनि ।
ध्यानसमाधी लागेल जनी। सद्गुरू कृपे ।।१७।।
ऐसा चाले निशिदिनी नेम । तंव होईल पूर्ण काम।
हृदयीच भेटे आत्माराम। तया नरा शुद्ध ज्ञाने॥१८॥
शुध्द राहवे अंतरी। वैराग्यतेज शरीरावरी।
कृपा करील तंव श्रीहरी। उद्धरावया निधारे ।।१९।।
प्रथम करिता भासेभास । उघडेल कपाट अनायास ।
मोकलेल षड्विकार त्रास । तया नराचा येणे पंथे ।।२०।।
न धरी काही योग-पंच। सोपे सुंदर हेचि मत ।
सद्गुरुवाचोनि ज्ञान-ज्योत। कैसी प्रकटे ? ॥२१ ।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते। नवम प्रकरण संपूर्णम् ॥२१॥
प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे-
सद्गुरु कैसा करावा हा प्रश्न । याचे सांगतो गा निरूपण।
कवणा गेलिया शरण। मुक्ति लाभे? ॥१।।
कवण सद्गुरु कैसा करावा? कवणापायी भाव ठेवावा?
की जो तया अन भवा। पाववील ॥
जगी बहुविध संतजन । कित्येक ते पोटाकारण।
कित्येक ध्यानस्थ मौन धरून। बसती पहाडी ।।३।।
कित्येक भजनी संत होती। कित्येक नवविधा पंथ धरिती।
कित्येक योगरूपे राहती। जगामाजी॥४॥
कित्येक मचविती ढोंग। कित्येक घेती स्वामी- सोंग।
कित्येक औदासीन्याचा रोग। शिरी धरिती ।।५।
कित्येक दाविती चमत्कार । भूत – भविष्याचे आडंबर।।
कित्येक परोक्षी निर्भर। जगामाजी ॥६॥
कित्येक नारळ दुपट्टा घेती। जनी बहूत शिष्य करिती।
शिष्यास सेवे राबविती। मी गुरु* म्हणवोनिया ।।७।।
कित्येक विदेहरूपे राहती। कित्येक कोणासहि न कळती।
कित्येकांची सिद्ध स्थिति। अबाधित राहे ॥८॥
गुरु शोधावा यामधून । सत्य मत तयाचे जाण ।
नित्यानित्य-विवेक करून । पाहील जो सत्यवस्तु ॥९॥
न घे जो शिष्याची सेवा। शिष्य गुरुत्वे मानावा ।
सत्य – स्वरूपी मेळवावा। ऐसे मत ॥१०॥
शमदमादि साधने । ठेवियली स्वाधीन जेणे।
स्वरूपावाचून अन्य नेणे। सोहं तोचि सद्गुरु ॥११॥
ऐसा करावा सद्गुरुराव । तेथे वसावा शुद्ध भाव ।
करील जो पार नाव। सत् शिष्याची ॥१२॥
जी जी निघेल परमार्थ शंका। सदगुरु फेडोल ती कुशंका।
सत् शिष्याचा मान राखा। असे म्हणोनिया ॥१३॥
ज्याचा असेल शुध्दभाव । तया नलगे काही उपाव ।
कोणताहि फळे त्या गुरुदेव । सुदृढतेने ॥१४॥
शद्ध भाव व्हावयासी। जावे लागे संतापाशी।
या कारणेच मानसी। गुरु भजावा ।।१५।।
जयाची फिटे अज्ञानदृष्टि । लागे चित्तशद्धीचिये पाठी ।
तये स्वरूप-ज्ञानासाठी। सद्गुरु करावा ।।१६ ।।
अद्वैत करील जो वृत्ति । षविकारांतुनि फिरवी मति
सदा नामस्मरण-पंक्ति । घोषवी जो ॥१७ ।।
ऐसा काढावा शोधून । सिद्धस्थिति ज्याची जाण ।
तया साष्टांगे नमन। करावे वेगी ।।१८ ।।
करावे आज्ञेचे पालन। वेचूनि घ्यावे ज्ञानकण ।
तत्त्वनिष्ठेने सेवा पूर्ण । शंका-समाधान निश्चये ।।१९।।
यास्तव शिष्य कैसा असावा? जेणे परमार्थ साधावा।
जयास मोक्षचि व्हावा । यमनियमी बरबा तोचि तो ॥२०॥
अपरोक्ष नाही मज ज्ञान । मी तो बालक अज्ञान ।
परी सद्गुरुकृपे करून । वदलो असे ॥२१॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । दशम प्रकरण संपूर्णम् ।।११।।
प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन-
झाले होते आधी कर्म। पुढे कर्म-फळाचा नियम।
कैसे तुटे मायिक प्रेम। कर्माचेनि योगे? ॥१॥
मागे संस्कार झाले फार । तेणे बासना लालचे सुंदर ।
करीतसे तैसाचि व्यवहार। रात्रंदिनी ॥२॥
केवी तुटावे हे कर्म। न कळे जीवा याचे वर्म ।
म्हणोनि फलभोगाचा अनुक्रम। सांगिजेल ॥३॥
घडते होते जे जे काही। नको अहंभाव पाही।
कृष्णार्पण करी त्याहि। सत्य-असत्यासी ।।४।।
पुढे जे ठाकेल पापकर्म । न घेई ओढोनि आत्माराम ।
परी अहंतागुणे सर्व नेम। वाया गेला ।।५।।
नकळे अंत जया नरा। तो शाश्वत मानील पसारा।
म्हणोनि ज्ञाने पूर्वीच दोरा। तोडावा आसक्तीचा ॥६॥
जरी योगी असेल दूर। तरी तये शोधावे घर ।
कोण गेले, कोण जाणार । आहेत ते ॥७॥
शुक्लपक्षी चंद्रछाया। तये वेळी वनी जावे फिराया।
एकांतस्थान पाहोनिया। स्थिर व्हावे ॥८॥
आपुली छाया पडे पृथ्वीवरी। तेथे लक्ष कंठी धरी।
ऊर्ध्व पाहता अवधारी। छायापुरुष उमटे तत्काळ ।।९।।
तया विराटावरी भविष्यखूण । खुलासेवार आता सांगेन ।
कोण चिन्ह पाहता कवण। हानि-लाभ होय ।। १०।।
जरी नाही शिर दिसले । धड पूर्ण सर्व असले ।
तरी जाणा मरण आले। सहा मासी ॥११॥
सर्व स्वरूप असोनि पूर्ण। हस्त डावा नसे जाण।
तरी स्त्रीशोक दारुण। घडे तयासी ॥१२ ।।
सर्व असोनि नसे उदर । तरी पुत्र मरे हा निर्धार ।
षण्मासाचे असे अंतर। तया दुर्घटनेसी ।।१३।।
रक्तवर्ण दिसला दृष्टी। तरी निजदेह होईल कष्टी।
स्वरूपी स्पष्टता दिसे गोमटी । तरी लाभ तया असे ।।१४ ।।
दृष्टी पडता श्याम-वर्ण। तरी होय मानखंडण ।
हे सत्य भविष्य जाण। न चुके सर्वथा ॥१५॥
तरी यालागी शोक तो काय? धरा धरा सद्गुरुचे पाय ।
नसे काळापुढे उपाय । दृढ धरोनि नेईल तो ॥१६॥
मायाडंबर लागे गोड । सदगुरुचि याचा करील मोड ।
मोडील जन्ममरणाचे बंड l सत्य जाणा सर्वस्वी ।।१७।।
बहुत काय बोलू आता। सद्गुरु-अंगी सर्वज्ञता।
त्याचिये चरणी ठेवोनि माथा। सुखदुःखचिंता निवारी ॥१८॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
बादास विरचिते । एकादश प्रकरण संपूर्णम् ॥११॥
प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन-
आता सांगेन मुख्य साधन। घेवोनिया शास्त्रार्थ प्रमाण ।
वासनेचे करी हनन । विशेषत: ॥१॥
जयाची खुंटली वासना। संकल्प मुरले जाणा।
तया प्राणियांच्या यातना। चुकल्या सर्वथा ।।२।।
नित्यानित्य-विचारावीण। वासना न खुंटेचि जाण ।
शोधू जाता नित्य निधान । अनित्य उडेल निश्चये ॥३॥
प्रथम आत्मा-अनात्मा कोण। हेचि काढावे निवडोन ।
तयासीच आत्मविचार जाण। म्हणती संतयोगी ते ।।४।।
जंव तू आत्मविचार करिशी। तवं ते अनात्म सर्व सांडिशी।
तीन देहांविरहित होशी । सत्य जाण बापा रे! ॥५॥
देह द्वयाचे चळण। वर्तती इंद्रिये आणि प्राण।
सप्तधातूंचे प्रमाण । त्याहि वेगळा जाण तू॥६॥
अष्टधा प्रकृति म्हणती जे । तिये तुजपाशी न लागिजे।
सर्वा विरहित राहिजे। साक्षिभूत अखंडित ॥७॥
ऐसा हा करिता आत्मविवेक। अनात्म-वासना मुरेल देख।
वृक्ष सर्वहि काल्पनिक। अंत होई तयाचा ॥८॥
जगी सर्व विद्याकला असती। अध्यात्म त्याहुनि श्रेष्ठ निगुती।
योगीहि तयासी मान देती। प्रेमादरे करुनिया ।।९।।
असोनिया श्रेष्ठ अध्यात्म । त्यांतहि गहन आत्म-वर्म।
जयासी ज्ञान ऐसे नाम। देती ज्ञानी यथार्थ ।।१०।।
ज्ञान झालिया गोमटे। मग ज्ञेय ज्ञाताचि उमटे ।
कोणी ब्रह्मचि चोखटे। म्हणती तथा ।।११।।
शब्दाचे पोटी लक्षार्थ । तो दाविती ज्ञानीसंत समर्थ ।
तया वाचूनिया भ्रांत। न फिटे मनाची ।।१२।।
सर्व इंद्रिया मना वळण। देई कोण तोचि जाण ।
अष्टधा प्रकृतीचे संचालन। करी साक्षिरूप तो ।।१३।।
सुखदुःख खेळ जाणे तोचि। मुळी वार्ता नसे द्वैताची।
करी सर्व लीला अद्वैतचि । साक्षि आत्मा जाणावा ।।१४ ।।
आत्मसाक्षात्कार झाला। न भासे गुणधर्म तयाला ।
स्थूल सूक्ष्म कारणाला। विसरोनि जाय ॥१५॥
ऐसी जयाची होय स्थिति । तया दृश्य-भेद न भासती।
वासना जिथल्या तिथेचि मुरती। तया नराच्या ।।१६।।
जयाची होय अद्वैत वृत्ति । तया ब्रह्मात्मा दिसे सर्वांभूती।
तेथे अज्ञानाची न चले गति । वासना उरती मग कैच्या ।।१७।।
स्वप्नातूनि ठायी आला। स्वप्नसुख दुःखे कैसी त्याला?
तैसेचि मिळता ब्रह्मस्थितीला । अज्ञानजन्य जग गेले ॥१८॥
पाप-पुण्य यांच्या नेम । तेथे न राहे सुखसंभ्रम ।
हे तो देहभिमाचे काम । भौतिक वासना उपजविण॥१९॥
ऐसे करावे साजन अनात्म जाणूनी आत्मदर्षण ।
भ्रांती फिटलिया होईल जाण । वासनाक्षय पूर्णपणे ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकडयादास विचचिते । द्वादश प्रकरण संपूर्णम् ॥१३॥
प्रकरण तेरावे – आत्म दर्शन-
कितीही सांगेन गा परोक्ष । तरी केलीयावीण नव्हे अपरोक्ष ।
तया अपरोक्षाचा पक्ष। घेवोनि वदेन गुरुकृपे॥१॥
लावावया आत्मशोध । केवी भरला सर्वी शुद्ध ।
तयाचा व्हावया बोध । आत्मनिरुपण सांगेन हो॥२॥
आत्मा कोण हे ओळखण । जो देतसे स्वयंस्फुरण ।
तयास आत्मा ऐसे अभिधान । देती योगी ॥३॥
देहाभिमाने साचला मळ । काढून टाकी जो सकळ ।
तयास आत्मा आहे निर्मळ । हे कळोनि येई॥४॥
आत्मा स्वयंज्योती असोनि एक ।भरला कैसा हो सकळीक ।
तयाची व्हावया ओळखI सांगेन थोडे पुढे ते ॥५॥
संपूर्ण काचियाचा महाल । तेथे जाहले एक नवल ।
आत श्वान ते शबल। शिरले असे ।।६॥
तया श्वानाची दृष्टि । जिकडे जाय उठाउठी।
तया सर्वत्र पाठी पोटी। स्वरूपचि दिसे ।।७।।
परि त्या ऐसे न गमेचि। की हे मम स्वरूप निश्चयेसी ।
तो ओरडू लागला मानसी। दुजे म्हणोनि ते वेळा ।।८।।
तयाचे प्रेमे कवटाळणे। आणि क्रोधे चवताळणे ।
देहा कष्टवी द्वैतपणे। दु:खा कारण स्वरूपभ्रांति ।।९।।
तैसेचि बुद्धीचिया गुणे। भ्रमी पडले शहाणे ।
व्यापक आत्मा कोण त्या जाणे । बुद्धिहीन? ।।१०।।
जयाची बुद्धि सरसावली । तयासी एकात्मता दिसली।
वासना वैरवृति निमाली। एक सरे तयाची ॥११ ।।
सर्वथा द्वैतबुद्धीचिया योगे। वासना अहंकारादि वाढ घे।
म्हणोनि आत्मतत्त्वचि वावुगे। दिसते तया ॥१२॥
जेवि आकाशी वायु उठला। सर्व धुळीने धुम्रावला।।
तैसाचि आत्मा बुद्धीने झाकोळला। ऐसे जाण बापारे ! ॥१३॥
सत्य असोनि ठायीच शुद्ध। देहाभिमाने वाटे बद्ध ।
अष्टधा प्रकृतीचे युद्ध। दिसो लागे त्याच्याचि सत्ते ।।१४।।
जयासी असे जनन-मरण। तो समजावा अनात्मा जाण ।
तेथे आत्म्याचे प्रमाण । न लागे की॥१५ ।।
अंध दृष्टीचे जे जन । तयांची दृष्टी ऐसी आहे म्हण ।
प्राण गेलिया म्हणती जाण। देहासहित मेला आत्मा ।।१६।।
सत्य करोनि शोध पाहता। आत्मा जर नसे तत्त्वता।
चालवी देहेंद्रियसंघाता। म्हणोनि दिसे जड विकारी ॥१७॥
सूर्या झाकोळती ढग। वाटे सूर्यचि झाला अपंग।
परि तो अलिप्तचि, दावी रंग। ढगाचेहि स्वतेजे ।।१८॥
जेवि सत्याचिया योगे। असत्य दिसते त्यातचि जागे ।
की बुद्धीने निर्मिले द्वैतधागे। त्या सर्वा आत्मा प्रकाशक ॥१९॥
परि या जडाचिया आधारे । चेतनहि जणू गुदमरे।
जाणूनि गुणावगुण लावूनि घे तुरे । जडचि दिसे ॥२०॥
पाहता पुढे सूक्ष्म दृष्टी। आत्मज्ञाने लाभे तुष्टी।
जड निवडोनि वारिता सृष्टि । चैतन्य दिसे स्वयंप्रभ ॥२१॥
तयास्तव सांगितला मी नेम। मुख्य सत्संगतीचे काम
उकलोनिया आत्म-अनात्म । स्वानुभव घ्यावा चातुर्ये ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । त्रयोदश प्रकरण संपूर्णम् ॥१३॥
प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव-
नित्य सावध राही नरा ! नित्यानित्य विवेक पाही बरा।
सत्य असत्याचिये विचारा। लागे वेगी ॥१॥
जरी ख्यातिच व्हावी जगी। तरी मायिक प्रेम धरी वेगी।
अनुभवणे असे स्वरूपालागी। तरी सत्संग धरावा ।। २ ।।
जाऊनि गुरूसी शरण। पुसावे स्वामी मी कोण? ।
आलो कासया कारण? जगामाजी कोण माझे? ।।३।।
जरी धरिशी फार हट्ट। की सांगावी इतुकी गोष्ट ।
तेणे कळेल स्पष्ट स्पष्ट। स्वरूप तुझे ।।४।।
भक्त कोण, देव कोण । हेचि पाहावे आधी जाण ।
मग शास्त्रांची गुंतवण। न लागेचि ॥५॥
विवेके शोधावे अंतरी । त्या महावाक्याचा अर्थ धरी।
स्वतः बह्म कैसिया परी। आहे मी हो! ॥६॥
स्वरूप शाश्वत पाहावया। अशाश्वत सोड माझे सखया!।
लक्ष लावी सत्य ठाया। शुद्ध जीवन करोनि ।।७।।
पाहावया भगवंताकारण । क्षणिक नको वैराग्य
ज्ञान । अष्टधा प्रकृतीचे महिमान । दुर सारी ॥८॥
दृष्टी दिसे जे जे काही। विवेके सांडी सर्व पाही।
मायिकांचे सूक्ष्म लक्षण तेहि। दूर करी ।।९।।
जेथे नसे पंचभूत । कल्पनातीत तत्त्व अद्भुत ।
निर्विकार स्वसंवित। तेचि जाण स्वठायी ।।१०।।
सत्य काय आहे बापा! त्वरित पाही, घेई मापा ।
असत्याच्या निवारी पापा। स्वस्वरूपा जाण सख्या! ॥११॥
बोधरहित बुद्धीने घुसती। अंधारी अद्वैत न होती।
ते जरी स्वरूप शोधती। तरी होती तेचि ते ॥१२।।
जरी गड्या! घेशील शोधा। तरी न लगे द्वैतबाधा।
फोडीत सर्व अंध बंधा। प्रकाश पडे सर्वत्र ॥१३ ।।
जे जे असत्य अनात्म बंध। तेहि चैतन्यचि नटले विशद्ध।
अन्य भासे हा कल्पना-बाध । स्वयंसिद्ध नातरी तू ॥१४ ।।
येथे दुजे कोठूनि आले? जे बंधासि कारण झाले।
ही तो स्वरूपसागरावरी फुले । फुलली जणु गारांची ॥१५॥
हे अनुभवी तोचि मुक्त। देही असोनि देहातीत ।
जन्मोनीहि अजन्मा निश्चित। आत्मदृष्टी ॥१६॥
लक्ष चौऱ्यांशी जाण योनि । मुक्त होशील त्यांतूनि।
बोलणे सत्य घे जाणूनि । गुरुकृपे ॥१७।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार
तुकड्यादास विरचिते । चतुर्दश प्रकरण संपूर्णम् ॥१४॥
प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन-
देखोनिया जगाची कुमति । खेद होई माझिये चित्ती।
वाटे जन्म नको मागुती। श्रीगुरुराया । ॥१।।
ऐसाचि करावा प्रश्न । तरी नसे पूर्ण ज्ञान ।
मनी वसे मानापमान। माझियाचि ।।२।।
क्षणोक्षणी वृत्ति फिरे। काम क्रोधाचे बसती मारे ।
तेणे जीव अति घाबरे। सद्गुरुराया! ||३||
न करी नेम न करी धर्म। केले नसे पुण्यकर्म ।
पदरी खावोनिया संभ्रम। पडलो क्षितीवरी ।।४।।
न आवडे मजला काही। सद्गुरु केवि भजावा पाही।
जन्ममरण तूटावे तेहि। न साधवे साधन ।।५।।
दुर्व्यसनी बहुत झालो। मायामोहे भ्रमूनि गेलो।
ऐसिया स्थिती लाथलो। चरणावर विंद गुरूचे ।।६।।
सोडले घरदार सर्वहि। फिरलो पोटाकारणे पाही।
मन जिकडे तिकडे जाई। फार पीडिलो तेणेचि ।।७।।
न कळे कर्म रेषा काय। दुष्ट ग्रहांनी शिणविले वाय।
नाठवे दासांची जी माय। तोवरी मजला ।।८।।
अनुदिनी जाहलो उदास । नेणवेचि सत्य सायास।
अति पडले जी प्रयास। सद्गुरुराया ! ॥९॥
ऐसे करिता बहु जन्म गेले। दुर्गुण न साहवेसे झाले ।
सर्वस्वी मन भांबावले। एकाएकी ॥१०॥
वाटे देह त्यागावा जाण । जरी ऐसे स्थितीचे प्रमाण ।
तरी न सुटे मानपान । म्हणोनिया ॥११॥
असो वरखेड नाम नगरी। तेथे वसे संतमुरारी।
नाम आडकोजी अवधारी। दर्शन झाले सुदैवे ।।१२।।
जन्मस्थान आर्वी गावी। स्थिति नग्न दिगंबर बरवी।
श्यामसुंदर रूप दावी। लोकांलागी ।।१३।।
बहुत दिन ऐसे जाता। अडथळा करूनि अनुभव घेता।
वाटे चमत्कार जना तत्त्वता। आडकोजीस पाहोनि ।।१४।।
पुढे जनी एकमते करूनि । स्थापित केले समर्था निशिदिनी।
उत्साह नामसंकीर्तनी। प्रेमादरे सेविती ।।१५।।
जैसी गोकुळी मूर्ति अवतरली। भक्तमंडळी आनंदली।
की स्वर्गी दुमदुमली। सेना इंद्रदेवतेची ।।१६ ।।
इकडे झालो मी फजीत । देखिले देवधर्म अनंत ।
न मिळेचि कोणी संत। सद्गुरुराया! ॥१७॥
अनुतापस्थिति हदयी धरोनि । गेलो मी आडकोजी चरणी।
नमन केले लीन होऊनि। तया समर्था ॥१८॥
म्हणे काय रे करिशी? संत-चरणी न राहशी।
भ्रमोनि उगाचि फिरशी। आजवरी ||१९ ।।
गुप्त दावियली खूण। झालो तेथेचि तल्लीन ।
भानरूपि मंत्र जाण। स्मरण करी नेमेसि ।।२०।।
शिरी ठेवतांचि हस्त। झालो चरणकमली मस्त ।
मन न मानेचि अन्यस्त। श्री आडकोजी-कृपेने ।।२१ ।।
करूनि सदगुरुचे स्मरण । कथिले जना सन्मार्गज्ञान ।
जेणे होती चढे निधान। आनंदामृत ।।२२ ।।
आदरे वदलो जे सर्वहि। मते माझी नव्हती पाही।
संती कथिले जे जे काही। तेचि वदलो सर्वथा ।।२३ ।।
कृपा करा स्वामिराया! पदरी धरा दीनासि या।
आवरोनि अपुली माया। द्या सर्वांसी निजानंद ।।२४॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । पंचदश प्रकरण संपूर्णम् ॥१५॥
प्रकरण सोळावे – अंतिम-कथन-
थोडे करीन अंतिम कथन । साधु नसे म्हणती जन।
सर्व भोंदूचे थैमान। जगी चाले॥१॥
एक म्हणती देव नाही। सर्व माया-लेख पाही।
आपण करू जे लवलाही । तेचि होय पैं ॥२॥
तरी हा विकल्प सांडोन। करा स्वयेचि साधन ।
मुमुक्षूसी सद्गुरुचरण। लाभतील आपसया ॥३॥
दांभिकांच्या जाळी न पडा। कानफुकणी दूर सांडा।
साधा सत्संग चोखटा। निवडोनिया विवेके ।।४।।
अंतःकरण होता शुद्ध। लाभे आपेआप सद् बोध ।
ज्ञानतत्त्वचि गुरुदेव सिद्ध। कृपा लाभे साधनी ।।५।।
दूर होता जिवीचे मळ । प्रगटे परमात्मरूप सोज्ज्वळ ।
आत्मसुख लाभता जंजाळ। दूर होय भोगांचे ।।६।।
अरे! जाणा आता खरे। काय भ्रमता जगतांत रे!
करा पांडुरंगा सोयरे। माझिया बापा! ॥७॥
लोकी सत्य पाहाल काही। तरी ते न दिसे सर्वथाहि ।
म्हणोनि स्वये सत्कर्म पाही। केलेचि करा ॥८॥
सत्कर्मासाठी ईश्वरी सत्ता। देव देईल सुफळ तत्त्वता।
की जेणे स्ववेचि देव होता। वेळ न लागे ।।९।।
एक म्हणती हेचि कथन । महाग्रंथी झाले जाण ।
यांत काय हो प्रमाण। विशेष ते? ||१०।।
अरे! जन्मापासूनि कर्म करणे। तेच ते वेळोवेळा अनुसरणे।
तैसे केले तुकारामाने । जे ज्ञानदेवे हि संपादिले ।।११।।
ऐसे नवीन झाले जे काही। अंधश्रद्धा सांडोनि पाही।
जुने चि रूपांतर तेहि। धरा वेगी प्रसंगोचित ।। १२ ।।
प्रथम बीज मध्ये बीज । फळी पुष्पी गुप्त सहज ।
अहो! शेवटीहि बीज। तेचि तेचि ।।१३ ।।
परी पुरातन बीजाहूनि। नसे नव्यामाजी उणी।
हदयभूमीमाजी पेरूनि। सुखी व्हा रे! ॥१४ ।।
अधिक न कळे फार मज। थोर ग्रंथांचे ते गुज ।
स्वामीकृपे सत्य ते सहज। बोलिलो मी ।।१५।।
सहज पावलो चिमूर ग्रामी। विठ्ठल गुरुमूर्ति-प्रेमी।
फाल्गुन वद्य द्वितीयेसि नेमी। तेथे केला ग्रंथारंभ ।।१६।।
विचारणा झाली जी खचित । ते ते वदलो प्रमाणभूत ।
घेऊनि बहुतांचे संमत । अनुभवयुक्त जुनेहि जे ॥१७॥
स्वानंदाचे अमृत । जे आत्ममंथने होय प्राप्त ।
जयाचेनि जीव प्रशांत । सुखदुःखातीत होतसे ॥१८॥
ते लाभावे सकळासी। याची पात्रता मनबद्धीसी।
म्हणोनि दाविले बहु साधनांसी। प्रकृतिभेदा जाणोनि ॥१९॥
करोनि सुगम साधन-निश्चय। साधूनि सत्संगाची सोय
आत्मरंगी व्हा हो निर्भय । सद्गुरुकृपे निजाभ्यासे॥२०॥
हाचि असे येथीचा सार । करा पावन हा संसार।
आपण तारोनि व्हा सादर । तारावया सर्व जीवा ।।२१ ॥
आता अधिक सांगो काय। धरा आपुली आपण सोय।
संती कथिला हाचि उपाय । माझिया बापा! ॥२२ ।।
संवत् एकोणवीसशे त्र्यांशी। प्रभव नाम संवत्सरासी।
आषाढ शुक्लपक्षेसी। तिथि असे द्वितीया ॥२३॥
भृगुवासरी शुभ योगी। हरिस्मरणी लागवेगी।
सद्गुरु-चरण शिरोभागी। वंदोनि ग्रंथ संपविला ||२४ ।।
इति श्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षोडश प्रकरण संपूर्णम् ॥१५॥
उद्धव-बोध–
जणे होय मोक्षप्राप्ति । ते प्राणी चुकले नेणती।
स्वतः सिद्ध व्यापक। सोऽहं नाम सम्यक ।
ते जाणूनि न जपती कोणी देख। पडले भ्रांति-पाशी ॥२॥
प्रथम गति हेचि देखा। जेणे चौयांशीतूनि सुटका।
सोऽहं नाम अजपा-शिखा। निरंतर घ्याइजे ।।३।।
पूर्वपार सहजाक्षरी। हाचि मंत्र योगी उच्चारी।
धृव प्रल्हादादिका-अंतरी। निश्चय हाचि ।।४।।
श्रीरामाते उपदेशी। गुरु वशिष्टि तत्त्वमसि।
संदीपने हि कृष्णासी। हाचि योग निवेदिला ।।५।।
आता कलिमाजी जाण । तेथे न विश्वासे मन ।
करोनि कल्पित साधन। यमसदन भोगिती ॥६॥
कोठवरी सांगू आता। पाही प्रचीत तत्त्वता।
देही कोणी आहे नांदता। स्वतःसिद्ध जाण तो ॥७॥
महावाक्याचा उपदेश। हाचि वेदाचा सारांश।
भलते मंत्र जपता बहुवस । काय हातास येतसे? ॥८॥
सोऽहं म्हणजे ब्रह्म ते मी। तत्त्वमसि ची हीच ऊर्मि।
महावाक्यार्थ हा तत्त्वप्रेमी। अनुभविती ॥९॥
सोऽहं-अर्थ ऐसा गहन । लक्षिता प्रगटे आत्मज्ञान ।
आणि श्वासोश्वासी जपता जाण। चित्तनिरोधन होतसे ॥१०॥
शिव तो भकुटिस्थानी। सोहं शब्द लक्ष तयालागूनि।
श्वास प्रत्यक्ष नासिकेकडोनि । नित्य घेती प्राणी की॥११॥
जीव तो नाभिकमळी। हं शब्दनाद भूमंडळी।
उछ्वासांतूनि घेत उफाळी। हंकार तो जगांत ।।१२।।
तो कंठापर्यत येत । मिळवी कोण त्या शिवाप्रत?।
सत्य सोडूनि पाषाण पजीत । हेचि खोटेपण ।।१३।।
आता याची हातवटी। सांगती बरे पाहे दृष्टी।
लक्ष ठेवी, अधर कंठी। नाभिस्थानापर्यंत ।।१४।।
तेथूनि उठे जो गद् गद । सोहं शब्दाचा नाद।
ज्याचे अंत:करण शुद्ध। त्यासीचि कळे ॥१५॥
तो शब्द येत कंठावरी। उगेच बैसता अंतरी ।
मग दुमदुमे नासिके द्वारी। सोहं शब्द की ॥१६॥
सो शब्द शिववाचक । वृत्तीसि करी अंतर्मुख ।
हं शब्द जीवास दावी झुळुक । बाहेरीची ॥१७॥
दोघाचिये एकांती। जीव-शिव-ऐक्य उन्मेश वृत्ती।
जैसी सुषुप्ति लागिजति। तैसेचि होय ।।१८।।
मोठे सौख्य आहे बापा!। मार्गहि स्वाधीन आणि सोपा।
कोणी न करिती मापा। बुडविले आळसे ।।१९।।।
अंगे नाही होत कसवटी। गोष्टी करिती चावटी।
ते गेले गेले निरयकपाटी। सत्य जाण उद्धवा! ।।२०।।
म्हणोनि घरी शद्ध भावे । सोहं समाधीतचि राहावे ।
त्यातचि आहे बरवे । नाहीतरी फजीत होशी ।।२१।।
आता कोणीकडे न घाली मन । कुणाची गोष्ट न एके जाण।
निश्चये लावी अनुसंधान । सोहं नामाशी ।। २२ ।।
उगीच कवणा सांगो नये। ना तरी अहंकारे हानि होय ।
याचा एकांतचि राहे । न बोलावे पाखांड्याशी ॥२३ ।।
पाखांड्यासी निजगुंज। सांगता न होय त्याचे चीज ।
म्हणोनि सद्गुरुचेचि काज । नित्य करी उचित ।।२४ ।।
सदा सत्पदी भाव ठेवी। काय सांगो सद्गुरुची पदवी
ज्याने सत्यरूप दर्शविले। सोहंतत्त्वी रंगविले ।
त्या सद्गुरूसी विसरता भले । पावशील पतन ॥२६॥
मग उद्धव उगाचि बैसोन। बीजमंत्र हा उच्चारून ।
श्वासोछवासी ठेवोनि मन । पाही बरवे अंतरी ।।२७ ।।
सोहं नामाचा गजर। चालतसे जो वारंवार ।
नाभीपासून कंठावर । ध्वनि उमटती सूक्ष्मसे ।।२८॥
आधीच शुद्ध अंतःकरण । त्यावरी कृष्णे बोधिले जाण ।
त्या सुखासी मग काय उणे। उद्धवाचिया? ॥२९ ।।
श्वासोछ्वासी चाले पाठ । इडापिंगला दुहेरी वाट ।
सत्रावीचा घडघडाट। कंठी शब्द झंकारी ॥३०॥
त्याचा न घेता अनुभव। अवघे सोंगाचेचि नांव।
तैसा नोहे की उद्धव । जया मनी निस्सीमता ॥३१॥
वृत्ति शुद्ध एकाकार । सोहंनामी जाहलो स्थिर।।
वृत्तिसाक्षी शिव साचार। होऊनि राहिला आत्मबोधे ॥३२॥
झाला समाधिस्थ पूर्ण । सोहं-स्वरूपी जाहला लीन ।
समाधिसुख जिरवून । आला देहावरी प्रारब्धे॥३३ ॥
अष्ट सात्विक भावे दाटला। कंठ-शब्द सद् गत झाला।
नेत्री अश्रु ढाळु लागला । नमस्कार केला निजभावे ।।३४ ।।
सर्व लज्जादिक सोडून । उद्धवे साधले ब्रह्मनिधान ।
जो घेणारा असे जाण । तोचि घेतसे तत्त्वार्थ ॥३५ ।।
आता कैसा होईन उतराई? काय अर्पावे सदगुरुपायी?
तन मन धन अर्पूनि ही। संपवितो बोधकता ॥३६॥
इति श्री उद्धवबोध संपूर्णम् ।