sant-tukaram-gath-saha
|| संत तुकाराम ||
३४८८
छोडे धन बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥
तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥
तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥
कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥३॥
२५३०
जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥
धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥
नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥
तुका म्हणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥
७७१
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥
ब्रम्हज्ञानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥२॥
तुका म्हणे ते उन्मनी । नास कारय कारणीं ॥३॥
१४०७
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥१॥
पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥
कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥२॥
तुका म्हणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥
३४९८
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥
नहिं एकदो सब संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥
उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥२॥
देख हि डर फेर बैठा तुका । जोवर मारग राम हि एका ॥३॥
३९३१
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥
पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥
बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥
नका घेऊं भार । धर्म तोचि सार ॥५॥
तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥
७३७
जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥
येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हणूनी काळा ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सखा । आम्हां निपराघ पारिखा ॥२॥
उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥
४०८०
जगदिश जगदिश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ती ।
पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ध्रु.॥
आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ती जवळी च दोन्ही ।
नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रम्हांडीं संपुष्टशयनीं ॥२॥
असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें ।
भक्त शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥
एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तोचि कवतुकें।
तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥
सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख ।
जाणों म्हणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥५॥
२०१४
जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥१॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥
हरीच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥
तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
३८२०
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तियेपुढे ॥३॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे देवा बाळ ॥५॥
बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
३१८२
जगीं कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी ॥१॥
बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥
चित्तीं नाहीं अनुताप । लटिकें भगवें स्वरूप ॥२॥
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥
१२८५
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥
करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥
तोंवरी हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥
तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥
६०५
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचे ठायीं । निवाड तो तई । अवकळा केलिया ॥२॥
तुका म्हणे ठावे । तुम्ही असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥
२८८६
जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा ॥१॥
तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥
सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥
वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥
१८५९
जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥१॥
अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ध्रु.॥
सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥
तुका म्हणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां घावें उघडा रे कान ॥३॥
५७३
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांठवूं ॥३॥
७१४
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥
म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥
तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥
६७३
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
१६०८
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥
निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥
खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥२॥
संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरी थोरपुण्यें बहुतीं ॥३॥
खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥
खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक। भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख। आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥५॥
सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥
बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी। घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥
धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥
ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास तो घात ॥९॥
४५३
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥
अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ध्रु.॥
शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥
तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥४॥
३८५५
जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥
काय काज आतां हरीविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥
हें दुःख न सरे हरी न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥
करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
१८७८
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥
पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळें ॥ध्रु.॥
मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥
आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आम्हां दीनां पीडा करूं ॥३॥
आपुलिया हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा तोचि आम्हां ॥४॥
६६४
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥
म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
संतां ब्रम्हरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥
तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥
२४
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
१२७६
जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥
तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
८०२
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥
आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥
तुका म्हणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥४॥
१४३४
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥
होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥
लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । ज्याचें त्या पुरतें विभागिलें ॥२॥
तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंग ॥३॥
३११२
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥
वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय काय ॥ध्रु.॥
हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥
तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असतां कळिकाळ पायां तळीं ॥३॥
३०८३
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥
सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥
तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा शीण जन्मांतर ॥३॥
१३५०
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥
म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥
बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥
कोण्या उपाये हे घडे । भव आंगडे सुटकेचे ॥४॥
तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥५॥
१०१५
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥
तुम्ही सांभाळिलों संतीं । भय निरसली खंती ॥ध्रु.॥
कृतकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥
तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥
२२६२
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें॥१॥
वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥
पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥
तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥
२५३५
जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥
वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रिद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥
अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥
कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें झालें देवा ॥४॥
हा ना तोसा ठाव झाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥
आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका म्हणे ॥६॥
१७६३
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥
उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥३॥
पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी आला ॥४॥
दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । म्हणे आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥५॥
तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर म्हणे ओस ॥६॥
माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती म्हणोनि । तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी ॥७॥
२१८५
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥
पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥
संतमहंतसिद्धहरीदासदाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं॥२॥
तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥३॥
२१६८
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥१॥
कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥
केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥
तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ॥३॥
२६२२
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥
संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥
धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला ॥२॥
प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषन होय त्याला ॥३॥
पावटणि पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥
प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥५॥
तें दुर्लभ संसारासी । जडजीव उद्धारलोकासी ॥६॥
तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥७॥
११९२
जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥
मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥
ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥
तुका म्हणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥
२६७
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥
नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥
कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥
तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥
१२३९
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी उभा ॥१॥
राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥
तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥
२५४१
जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥
ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥
सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥
तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥
९४५
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥
शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥
जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥
१९०
जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥
सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥२॥
नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥
उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥
तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । तोअधम जन्मांतरिचा । जया पंढरी नावडे ॥७॥
३४०५
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥
जया हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥३॥
३४
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
१२४४
जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥
तो एक पंढरीचा राणा । नये अनुमाना श्रुतीसी ॥ध्रु.॥
विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥२॥
तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥३॥
१५२०
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥
वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥
आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥
तुका म्हणे शूर राखे । गांडया वाखे सांगातें ॥३॥
३०१६
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥
मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥२॥
तुका म्हणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
२४९६
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे॥१॥
पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥
आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥
तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥
१४७५
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥
शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥
३१६५
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥
कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥
जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥२॥
तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥३॥
२५८७
जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥
कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥
समर्पीला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥
तुका म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥
१४०२
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥
वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥
तुका म्हणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥
२६१
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥
सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥
चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥
चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबासी ॥४॥
तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥
३९७
जरी मी नव्हतों पतित देवा । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥
म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका म्हणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥
४४६
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥
मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रम्ह तें केवळ नांदतसे ॥४॥
तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरी ॥५॥
४०५६
जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरीगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥
जोडोनि धन न घलीं माती । ब्रम्हवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥
मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥५॥
१९८५
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥१॥
कैसा पाहे चंद्रिदृष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
४७९
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहनिऩशीं ॥१॥
भवनिदाऩळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥
सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥
तुका म्हणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥३॥
२२४८
जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें ॥१॥
हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥
कली पापाची हे मूर्ती। नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥
तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥
८५२
जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥
माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥
नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥२॥
तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥
७५२
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥
घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥३॥
तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥
१४७८
जळों अगी पडो खान । नारायण भोगिता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥
भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा गोविंदा पावलें ॥२॥
तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥
१६३९
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥
सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥
फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥
तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
३४७६
जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आतां मज साह्य येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥
भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥
तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥
२९६५
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥
जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥
तुका म्हणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥
२४६८
जळो ते बाह्य सोंग । पडिलिया अंतर व्यंग ॥१॥
कारण ते अंतरलें । म्हणविता वाईट भले ॥ध्रु.॥
तांतडीनें नासी । तांतडींनेचि संतोषी ॥२॥
तुका म्हणे धीर नाही । बुद्धी एकी स्थिर ॥३॥
६२५
जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥
मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥२॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥३॥
बक ध्यान धरी । दावी सोंग मस्य मारी ॥४॥
तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
६३१
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींचि चांगली ॥१॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥
उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥
तुका म्हणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥
३४७४
जळो माझें कर्म वायां केली कटकट । झालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥
आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥
९१०
जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥
संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥
लटिक्यांचा अभिमान । होता सीण पावविते ॥२॥
तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥
१८८९
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥
देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥
घालूं देवासी च भार। देव सुखाचा सागर ॥२॥
राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥
तुका म्हणे आम्हीं बाळें । या देवाचीं लडिवाळें॥४॥
१७५०
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
वृंदावन फळ घोळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥२॥
तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कसाय फुंदा तुम्ही ॥३॥
२३६१
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥
तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥
नाहीं मुक्तफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥
तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि॥३॥
२४८६
जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥
तुम्ही सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥
फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥
तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
७६५
जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥
देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥
आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरी खेळा समबुद्धी ॥२॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव झाला ॥३॥
३८६४
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥
नेदाविया गाईं म्हसी वांचों लोक । पुरावे सकळिक सिळाधारीं ॥३॥
धाक नाहीं माझा गौळियां पोरां । सकळिक मारा म्हणे मेघां ॥४॥
म्हणविती देव आपणां तोंवरी । नाहीं जंव वरी कोपलों मी ॥५॥
मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानी राखी गर्वाचिया ॥६॥
१२५१
अभिमानराशी जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥
तरि म्यां बोलावें तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥
पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥२॥
तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता॥३॥
२२७७
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥२॥
जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥३॥
तुका म्हणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥४॥
२०२७
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
बहु थोडया आड । निवारितां लाभें जाड ॥२॥
तुका म्हणे खरें । नेलें हातींचे अंधारें॥३॥
२६५५
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥
किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥
तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥३॥
२०४४
जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥
न लगें सांगावें मांगावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
१२७०
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥
मैथुनाचें सुख सांगितल्या खून । अनुभवाविण कळो नये ॥२॥
तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
३७४
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥
नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका म्हणे नवविध । भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥
१७६४
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥
तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ध्रु.॥
वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥
तुका म्हणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥३॥
१२७७
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥
मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥
देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नाचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥
तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥४॥
३४१५
जाणोनी अंतरी । ताळीसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंग बहु कुडी ॥२॥
उठविसी दारी । धरणे एखादिये परि ॥३॥
तुका म्हणे पाय । कैसे सोडी न ते पाहें ॥४॥
३१००
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥
आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥
कासया सांडूं मांडूं । भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥
तुका म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा ॥३॥
८७३
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मीलें तें ॥ध्रु.॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥
३६३९
जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥२॥
तुका म्हणे नमूं देव ह्मुण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥३॥
११७२
जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥
आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥
सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥
तुका म्हणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥
१०७०
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरां । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥२॥
तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नव्हती त्या नारी ॥३॥
१६३०
जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस ॥१॥
तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥
चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥
५३१
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥
पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥
बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥
अझुन तरि मुका । कां रे झालासि म्हणे तुका ॥५॥
२३४
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥
गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥
नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥
भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥
सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥
वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥
तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा माझे लोणी ॥६॥
नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥
तुका म्हणे नष्ट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥
११२५
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥
सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥
खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥
साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥
१६७९
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥
हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
दावूनियां रूप डोळां । मन चाळा लावियेलें ॥२॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥
तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥
१८६१
जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥
कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥
भाग्यवंता त्यांसी सांगितल्या गोष्टी । ते नाहीं अदृष्ष्टी आमुचिया ॥२॥
तुका म्हणे तुम्हापासूनि अंतर । न पडे नाहीं स्थिर बुध्दी माझी ॥३॥
३८३३
जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥
गोविंदे वेधिलें तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥
१८७१
जयांचें अंगलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥
गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥
तुका म्हणे नाहीं स्व:ता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥३॥
३४८१
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥
त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥ध्रु.॥
अभिळाषाच्या सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥२॥
तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
३०५२
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥
तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥
अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥
तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥
१६२१
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड॥३॥
१४५७
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥१॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां ब्रम्हत्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । माहावाक्य ध्वनि बोंब जाली ॥३॥
दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पीलें ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
६१५
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥
नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥२॥
आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥
३३१७
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥
केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥
हातां चढलें धन। नेणं रचिलें कारण ॥२॥
तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥३॥
१६६६
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥
ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥
तुका म्हणे भय । करा जवळी तें नये ॥३॥
१९२८
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥
जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥
अवघा जाला आम्हां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥२॥
अवघे चि आह्मी ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥३॥
तुका म्हणे आह्मी सदेवांचे दास । करणें न लगे आस आणिकांची ॥४॥
१२०९
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥
आतां वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥
आपुल्या संकोचें । म्हणऊनि तेथें टांचे ॥२॥
घेतों खऱ्या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥
१३०२
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥
हें कां मिळतें उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥
सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥२॥
तुका म्हणे नास । आम्हां म्हणविल्या दास॥३॥
२००७
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥
नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥
करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥२॥
हातीं दंड काठी । उभा जिवाचिये साठी ॥३॥
बळ बुद्धी युक्ती । तुज दिल्या सर्व शक्ती ॥४॥
तुका म्हणे खरा । आतां घेईन मुशारा ॥५॥
११९०
जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥
शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥
तापलिया तेला बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥२॥
पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥
तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥
२०४६
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥
तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥
तुका म्हणे तेणें सुखें । निरसली जन्मदुःखे ॥४॥
३८८६
जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥
कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठीं क्त देहावरी । आणिताहे हरी बोलावया ॥३॥
यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥
मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥
करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥
८३२
जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥
खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥
तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥
तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥३॥
१०७४
जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे ॥१॥
ऐसे कळले आम्हां एक । झालो नामाचे धारक ॥ध्रु.॥
तपाचे सायास । न लगे घेणे वनवास ॥२॥
तुका म्हणे येणे । कळीकाळ हे ठेंगणे ॥३॥
३१०१
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥
गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥
प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥
१९४३
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावे यावरी ॥१॥
माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजे धरा झणी । पायां हुनी वेगळे ॥२॥
तुका म्हणे आतां देवा । नका गोवायावरी ॥३॥
२४४४
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥१॥
काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥
पडें तेथें तुझ्या पायां। करीं वायां न वजतें ॥२॥
तुका म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥३॥
९२१
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥
येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥
पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥
तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें ॥३॥
१७५७
जिचें पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥१॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥३॥
३८२७
जीयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥
लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय झाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा झाला ॥३॥
झाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥
मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकीं ॥५॥
ब्रम्हांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥
लाघव कळलें ब्रम्हयासी याचें । परब्रम्ह साचें अवतरलें ॥८॥
तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥
भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेंची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥
लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥
हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघीं झालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होईल पाप ॥१८॥
पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझें काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हाचि देव ॥२१॥
देव चि अवगा झाला से सकळ । गाईं हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥
तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥
दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
१२३३
जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥
देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥
परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥
एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥३॥
तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥
११२८
जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥
हें चि वोसनावोनी उठी । देव सांठविला पोटीं ॥ध्रु.॥
नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥
तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥
६५३
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु.॥
बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हाचित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥२॥
भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥
नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥
तुम्हां आम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाठी । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥
६०९
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥
२२६०
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥१॥
जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥
सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
९४७
जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥
पिंडाच्या पोषके नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥
मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हा ॥२॥
तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारीती ॥३॥
१४७०
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवीं घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥
तुटे भवरोग । जेथें सर्व सुख भोग ॥२॥
तुका म्हणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥
५४१
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणें आपुलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥
२२८७
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥
न सापडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥
मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥
सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥३॥
ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥४॥
तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरी कृपाळ होई देवा ॥५॥
३८८९
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥
जन वन हरी झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥
बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झाले स्वयें रूप ॥५॥
रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव झाला ॥६॥
१७०९
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥
गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥
भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥
तुका म्हणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥
७८५
जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥१॥
संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥
विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥
तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥३॥
६५२
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥३॥
२४४०
जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥१॥
वाढवावें हें उत्तर । कांहीं लाड करकर ॥ध्रु.॥
कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥
तुका म्हणे बाळा । असता तात्पर्य खेळा॥३॥
४७३
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥
चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तोचि ॥ध्रु.॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥
तुका म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥
३२१६
जीवें जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥
आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥
देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥२॥
तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥३॥
३९७९
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥
विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
१८३४
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥
ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥
नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥२॥
ठाव पुसी सेणें । तुका म्हणे खुंटी येणें ॥३॥
३०१८
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां देह दुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरीभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥
पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥
तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥३॥
१००४
झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥
गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
ऊर्ध पुंड्र भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥
२०४
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
२२३४
जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥
आभास ही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥२॥
आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥
तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
२४७३
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥
जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥
जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥
विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं जीव ठेवीन मी ॥३॥
तुका म्हणे रज होईन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरीचे दास ॥४॥
३३६
जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥
आम्ही दुजें नेणों कोणा । हें चि मना मन साक्ष ॥२॥
तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥३॥
३०६८
जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥
काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींचे ॥ध्रु.॥
तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥
अवघें पिशुन झालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥
तुका म्हणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥
२८०४
जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥१॥
ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥
काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥२॥
तुका म्हणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥३॥
३५९
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥
सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥
अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥२॥
तुका म्हणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥
२०३८
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥
आतां तूं चि बाह्यात्कारी । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
३१२८
जें जें वहावे संकल्प । तें चि पुण्य तें चि पाप ॥१॥
कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥
सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥
तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥
२६१४
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥
आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥
होतीं धालीं पोटें । मागें उरलीं उच्छिष्टें ॥२॥
तुका म्हणे धांव । पुढें खुंटईल हांव ॥३॥
८३
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
४२५
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥
नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥२॥
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥३॥
अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेलें ॥५॥
१००५
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥
संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥
बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥२॥
तुका म्हणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥३॥
२८१३
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥
देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥
द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥
तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥
तुका म्हणे तुझे जडोनियां पायीं । झालों उतराईं पांडुरंगा ॥४॥
३०६१
जेणें माझें हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥
मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥
तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥
तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥
१५२
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥
ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥
विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥
१३५१
जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थी तें वर्जावें ॥१॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥
होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥
तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
१६८९
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥
कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥
तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥
४०२२
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥
जो या असुरांचा काळ । भक्तभजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥२॥
जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥३॥
जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥४॥
जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥५॥
२९५०
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥
मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥
चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया ॥३॥
११०३
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥
११३०
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
१९२६
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥
चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥
बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥
अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥
२७८४
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥
नव्हे चि तुम्हांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तंव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥४॥
५७१
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥
तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥
१६८४
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥
तुका म्हणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥३॥
१०३२
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥
डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥
तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥
१८४८
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥
अवघा आम्हां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं५७१
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥
तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥
च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥
वाचा बोले ते तुझे चि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ती ॥२॥
जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें । महाल मंदिरें माड्या तनघरें । झोपड्या अवघीं देव देवाइलें। ऐकें कानीं त्या हरीनाम ध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले रे ॥३॥
२६५४
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥
काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥
वैकुंठीचे मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥
तुका म्हणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥३॥
२७५८
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें ॥१॥
टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥
तुम्हांसी कां कोडें कोणी ये विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥२॥
तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईन ॥३॥
२०३९
जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन ॥१॥
असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका म्हणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥
२३५९
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥
तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥ध्रु.॥
ठाव धरिला संतजनीं। सुखें राहिले लोपोनि ॥२॥
तुका म्हणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥
५०६
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
१८४९
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥
माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥
यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥
तुका म्हणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥
८०
जेवितांही धरी । नाक हागतिया परी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥
सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥
तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥
९
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुसर्यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥५॥
४५०
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
२३४०
जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥
नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥
अवघा हाचि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥
तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥
५९३
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥
उदास तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्ही च ॥ध्रु.॥
ठका महाठका जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥
एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥
२७०५
जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥१॥
पायां पडणें न सोडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥
एका भावें चाड । आदी तेचि अंतीं गोड ॥२॥
तुका म्हणे आम्हां । टळणें चि नाहीं नेमा ॥३॥
२०७५
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥
आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥
२७१५
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरीं ॥१॥
प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रम्हरसीं भोजन ॥ध्रु.॥
तृप्तीवरी आवडी उरे। ऐसे बरे प्रकार ॥२॥
तुका म्हणे पाख मन । नारायण तें भोगी ॥३॥
३२८४
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥
लेकरांच्या स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ॥ध्रु.॥
मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करी तें ॥२॥
तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हे ॥३॥
११११
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणा संत ॥३॥
९९३
जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥१॥
आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥
शुद्ध नाहीं चित्त । परी म्हणवितों भक्त ॥२॥
मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझे तुका ॥३॥
२०५५
जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥
अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया शुद्धी ॥३॥
१६५८
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥
तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥
१०२०
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरी ॥२॥
तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥
२८७६
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥
आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढेंचि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥
जागा झालेपणें । काय असावें स्वप्नें । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥
छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोईं गुडघे कोंपर ॥३॥
३३२४
जोडिले अंजुळ । असें दानउताविळ ॥१॥
पाहा पाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥
तूं स्वामी मी सेवक । आइक्य तो एका एक ॥२॥
करितों विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
१९३८
जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥
संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षेपे हें ॥ध्रु.॥
शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥२॥
बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥३॥
तुका म्हणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥
३५५९
जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥१॥
जरी हें आम्हां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥
करूनि जतन। कोणा देसील हें धन ॥२॥
आमचे तळमळे । तुझें होइऩल वाटोळें ॥३॥
घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥४॥
तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥५॥
३५५६
जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥१॥
मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥
पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥२॥
तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥३॥
२०००
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥
तुका म्हणे डोइऩ । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
११७८
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥
तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥
६७०
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥ध्रु.॥
भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि
थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥२॥
तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥३॥
६८६
जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥१॥
आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥
आधीन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥
वंदी निंदी तुज तो गा। तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
३२४४
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनीं तो ॥१॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरीची ॥२॥
बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥
दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥
मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥
तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
१०२
जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥
फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥
आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥
तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥
१५७२
जोवरी तोंवरी जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥
तोंवरी तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
तोंवरी तोंवरी वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥
तोंवरी तोंवरी शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥
तोंवरी तोंवरी माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥
१५७३
जोवरी तोंवरी शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥
तोंवरी तोंवरी शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥
तोंवरी तोंवरी सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुकयासवें ॥३॥
२८४१
जो वितो तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥
जनार्दनीं सरती कर्में । बाधा भ्रमे अन्यत्र ॥ध्रु.॥
अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥
तुका म्हणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी ॥३॥
३०४
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥
करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥
. असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
३१६३
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥
येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥
गोडी प्रियापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥
तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥
१६३२
ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥
चिंतितां जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावें । तुका म्हणे ज्याच्या नांवें ॥३॥
१९०९
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास ॥१॥
तरीच जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥
वाढवावी थोरी । मुखें म्हणे तुझे हरी ॥२॥
तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥
३३९३
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥
म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥
सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥
१९४८
ज्याचे माथा जो जो भार । तोची फार त्यासी ॥१॥
मागें पुढे अवघे रिते । कळो येते अनुभवे ॥ध्रु.॥
परिसा अंगी अमूप सोने । पोटी हीन धातूचे ॥२॥
आपुला तों करी धर्म । जाणें वर्म तुका ते ॥३॥
१४३०
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥
आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ध्रु.॥
प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अविचित ॥२॥
तुका म्हणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥
७८१
ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥
अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥
ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥
तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥३॥
१३६४
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥
मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥
चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥
तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥
९५६
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥
सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥
अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥२॥
तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥३॥
२५९६
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥
प्रारब्धीं संसार । बरी हिंमतीची थार ॥ध्रु.॥
होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥
१०६२
ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥
जपतो हरीनामें बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥
तुका म्हणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रम्ह ॥३॥
२५४०
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥
भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाड निश्चयेसी ॥ध्रु.॥
आणिकां उपायां अनुपान कठिण । भोगे बरें सीण शीघ्रवत ॥२॥
तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥