संत तुकाराम


sant-tukaram-gath-nau


धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥
प्रारब्धाचि गति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे॥ध्रु.॥


आणीक रोगांचीं नांवें सांगो किती । अखंड असती जडोनियां ॥२॥
तुका म्हणे नष्ट संचिताचे दान खाता पावे सुख नेंदी ॥३॥




धन वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥


अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त॥३॥



धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥


धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥



धन्य तें गोधने कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य झाल्या ॥ध्रु.॥


धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य झालें ॥२॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य झालें ॥३॥
धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥



धन्य दिवस आजि दर्शन संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥
धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्ती दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥


धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥
तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥


२२५२


धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥
चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥


दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥
तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥


१७१७


धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥


ब्रम्हरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥


१४४०


धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥


नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥
तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३


२८२७


धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥


पायांवरी ठेविन भाळ । येणें समुळ पावलो ॥२॥
तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥


३०३७


धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
अंबॠषीसाठी जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥


धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥
तुका म्हणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥


२०७६


धर्माचे पाळण । करणें पाखांड खंडण ॥१॥
हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥


तिक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥
नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर॥३॥


धा धां
११८


धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥


खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥
तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥


८६


धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥
धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥


करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥३॥


१४८६


धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥
न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥


धि धी धे धों
१८६८

४९४


धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥१॥
ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥


देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥२॥
तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥



१४४८


धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥


याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥



ध्या
२२
ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥
तेथें बोला कैची उरी । माझें मीपण झाला हरी ॥ध्रु.॥


चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरीरूप अवघी सृष्टि ॥२॥
तुका म्हणे सांगों काय । एकाएकीं हरीवृत्तिमय ॥३॥


२१२


ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥
तहान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥


कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥


२६११


न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥
दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥


न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥
न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥३॥


१४६९


न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥


मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करील हित ॥३॥


८७


न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥


इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥


२९८७


न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥
न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥


तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥


२४६०


नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथें पाहिजे साचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥
वर कोणी मानी रसाळ बोलणें । नाही झाली मने ओळखितो ॥२॥


निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥३॥
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम॥४॥


३३१३


नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥
आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥
येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥


मागे आजिवरी । झालें माप नेलें चोरी॥३॥
सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकने ॥४॥
पडों नेदी तुका । आड गुंफूं कांहीं चुका ॥५॥


४५४

नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥


जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥
तुका म्हणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥


१६८९


नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥


जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥
तुका म्हणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥


२०४७


नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें॥३॥


तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥
काय करूं एका। मुखें सांग म्हणे तुका ॥५॥


१७३६


नको बोलों भांडा । खीळ घालून बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥


प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥
तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥


१३४९


नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥
काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥


लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥
तुका म्हणे माझी येथें चि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥


२१०९


न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि न बोलवें ॥१॥
रुचिविण काय शब्द वाऱ्या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥


आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें॥२॥
तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥


३९३५


नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥
काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥
दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये ॥३॥


कहे तुका उस असाके संग फिरफिर गोते खाये ॥४॥


२७४


न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥
काय तुम्ही येथें नसालसें झालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥


परचक्र कोठें हरीदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥३॥


३६२८
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥
कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥


वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥२॥
तुका म्हणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥


२६२५


न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥
सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥


कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
तुका म्हणे हित तों म्हणा विठ्ठल । न म्हणेल तो भोगील कळेल तें ॥३॥


२५१३


न पालटे जाती जीवाचिये साठी । वाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥
अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥


घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥


३४४६


न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज साडियेली ॥१॥
आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥


तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥


१८७२


न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥
लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥
निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥


कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥३॥
तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥


११४१


न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥ध्रु.॥


न मनीं ते योगी न मनी ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥


१०८२


नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥
परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥
द्वैतांद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥


जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥


३७८


न मानावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥
ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥


माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥
सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥


३२४५


न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईंल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥


भल्या बुऱ्या मारी । होतां कणी न विचारी ॥४॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥
तुका म्हणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥


९७८


नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥
अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळपणे तळा आणि ॥३॥


२७३२


नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥
अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥


धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥
तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥३॥


५७


न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥


न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥



३००६


नये माझा तुम्हां होऊं शब्दस्पर्श । विप्रवृंदा तुम्हां ब्राम्हणांसी ॥१॥
म्हणोनियां तुम्हां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥
वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥


२१२३


नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि॥१॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥


कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥
तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३


३४४५


न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥
तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती झाली आतां ॥३॥


३३२८


न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥


सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हूण ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३


१२३४

न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥


१५१७


न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥
म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥


मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥
तुका म्हणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥


१२२८


न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥


करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥
न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥


२१४०


न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥
आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥


संनिधा चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥
आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे॥३॥


२३७


नसतां अधिकार उपदेशासी बलात्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥


नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव॥२॥
उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥


३०११


न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥


पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥
तुका म्हणे येथें होतों मी दुबळा । आलें या कपाळा थोडें बहु ॥३॥


८७२


न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥
उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥


शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥२॥
तुका म्हणे सीण । होईल अनुभवाविण ॥३॥



नसे तरी मनी नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥


दंभिस्फोट भलत्या भावें । मज हरीजन म्हणावें ॥२॥
तुका म्हणे काळांतरी । मज सांभाळील हरी ॥


१५१२


नहोय निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥
तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान भिन्न असों द्यावा ॥ध्रु.॥


नाहीं विटाळिलें काया वाचा मन । संकल्पाणे भिन्न आशेचि या ॥२॥
तुका म्हणे भवसागरीं उतार । करावया आधार इच्छीतसें ॥३॥


९१५


नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥
देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥


लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥
तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥


५८६


नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ध्रु.॥


खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥
ज्याचें तोचि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥


२६९७


नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥
तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥


आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥
तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥


४७


नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥


९६७


नव्हे खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥


नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥
तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥


८२५


नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥
कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥


न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे। विठ्ठलनामें आटलें ॥३॥


२३९३


नव्हे परी म्हणवी दास । कांही निमित्तास मूळ केलें ॥१॥
तुमचा तो धर्मं कोण । हा आपण विचार ॥ध्रु.॥


नाही शुद्ध आचरण । परी चरण चिंतितो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे कां गा नेणा हे ॥३॥


१५४९


नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥
जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥
चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥
तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी गरज ॥३॥

२७७१


नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
तुम्हां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥


३३०


नव्हे शब्द एक देशी । सांडी दीवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाहिलें ॥२॥
आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३


८६६


नव्हों आम्ही आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥


तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥


ना

२२


४५२


नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥


सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाई ॥३॥


१५८२


१५६९


नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३


८८४


नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥
जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें। अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥


२२६३


नामदुषीं त्याचे नको दरुषण । विष ते वचनवाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाईकावी कानी । निंदेची पोहणी उठे तेंथे ॥ध्रु.॥
काय साच लभ्य त्याचिये वचनी । कोण त्या पुराणी दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावू त्याचिया तोंडासी । आतां या जिभेंसी काय करू ॥३॥
तुकाम्हणे संत न मानिती त्यास । घेउं पाही ग्रास यमदूत ॥४॥


७५३


नामदेवें केलें स्वप्नमाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३


३३६०


नाम वाचे श्रवणीं कीर्ती । पाउलें चित्तीं समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनी विठ्ठल ॥ध्रु.॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
निळा म्हणे स्वरूपसिद्धी । नित्य समाधी हरिनामीं ॥३


८२०


नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह कांहीं मनीं ॥१॥
ऐसें मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥
नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलो नये ॥२॥
तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥


१९५३


नामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥
तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥



२२०७


नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥१॥
सोडवूनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे॥ध्रु.॥
नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥


४७०


नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥


१९८८


नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥
तुका म्हणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥


२४१५


नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥
जन वन आम्हां समान चि झालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥
म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥
म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥


१६७०


नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥
तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं ठाई होईल ते ॥३॥


३४७९


नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥
क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥
आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥


१६८२


नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥
म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥


३१५


नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥
भोगी भोगविता। बाळासवें तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥


३३९


नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनियां मन । निविऩषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥
उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥


आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥



२०५६


नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥
तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥


२६६४


नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जविळकें ॥१॥
सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥


नवनीतासाठी खादला हा जीव । थोड्यासाठी कीव कोण करी ॥२॥
तुका म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥


८४३


नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥


नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवाणांत ॥३॥



७७४


नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥


एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥



१३८५


नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥
न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥


सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥
तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥


३२७४


नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥
हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥


न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥२॥
तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥



नाहीं सरों येत कोरड्या उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साह्य असो ॥ध्रु.॥


निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥
तुका म्हणे नेम न टळतां बरें । खऱ्यासी चि खरें ऐसें नांव ॥३॥


३५५


नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असें तुमचा रजरेण । संतां पायीं वाहाण ॥ध्रु.॥
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तीभाव करीं देखीं ॥२॥


नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥
नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥
कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥


नि नी नु
३४४


निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥
तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥


१४०८


निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥


धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥
अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥


३०३३


नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥
चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥


पक्षी वनचरें आहेत भूमीवरी । तयांलागीं हरी उपेक्षीना ॥३॥
तुका म्हणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥


२७८६


निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥


दुसऱ्याच्या मता । मिळेनासें झालें चित्ता ॥२॥
तुका झाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥


२३


निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥


देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥
अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥३॥


२४९४


निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥
पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥


लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥
तुका म्हणे नव्हतें ठावें । झालें भावें वाटोळें ॥३॥


३५५५


निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥
परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥


सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥
न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥


६१४


निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥


स्वामी कळे सामाधान। तरि मन उल्हासे ॥२॥
तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥


२२९४


निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक॥१॥
तरीच अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥


सोइरें पिशुन समान चि घडे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥


२३१


निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥


संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥


९४०


निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥


२६८२


निष्ठुर यासाठी करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥
ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥


बैसलासी केणें करुनिया धीर । नाहीं येथें उरी दुसऱ्याची ॥२॥
तुका म्हणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥


३६७२


नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥
आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥


कमाईस मोल येथें नका रीस मानू । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥
तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥


३९३


नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥१॥
रूप आवडे आम्हांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥


आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥२॥
तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥


३९८६


नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥
करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥


नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाय । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥


१५६३


नेणें फुंको कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥१॥
तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥


नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥२॥
चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखें ॥३॥


१२४३


नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥
धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥


क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥२॥
तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी॥३॥


२१३०


नेणों काय नाड । आला उचित काळ आड ॥१॥
नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥


सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥
चुकी जाली आतां काय। तुका काय म्हणे उरली हाय ॥३॥


११०९


नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेम भाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥


यंत्र मंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥


४२४


नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥
करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥
भेटावें पंढरिराया। हें चि इिच्छताती बाह्या ॥२॥


जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥
चित्त म्हणे पायीं तुझे राहीन निश्चयीं ॥४॥
म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥


१२३२


नेसणें आलें होतें गळ्या । लोक रळ्या करिती॥१॥
आपणियां सावरीलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥
संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥


भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥
सावरीलें नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥
बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥
तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥


१९३३


न्यावयासी मूळ पाठवील कधी । मज कृपानिधी पांडुरंग ॥१॥
प्राण फुठे माझा त्याचिये वियोगे । घडी जाय युगे येकी येकी ॥ध्रु.॥


त्याचिये गांवीची आवड ती जीवा । जीव हा सांडावा वोवाळूनी ॥२॥
दिनो दिन चिंता वाढते बहुत । नावडे संचित करावेसे ॥३॥
तुका म्हणे आतां आहे तोची सरो । कोण करी भरोवरी मग ॥४॥