sant-tukaram-gath-Akarā
फ
६३०
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥
४२३
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका म्हणे अवघें फटकाळ हें जिनें । अनुभविये खूण जाणतील ॥३॥
१५२२
फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
१८६४
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥
म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥
पुढें चढे हात । त्याग मागिलां उचित ॥२॥
तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥
१८६६
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥
तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥
२००८
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥
करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥
चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा॥३॥
२३२५
फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥
आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥
घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥
तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देई देवा ॥३॥
२७२
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥
पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥
तुका म्हणे तैसा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥
३२७०
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
मिराबाईंसाठी प्याला तो विषाचा । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥
आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळा ॥४॥
११५१
फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥
तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥
गोकुळासी आलें । ब्रम्ह अव्यक्त चांगलें ॥३॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
२२७४
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥
नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥
उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥
तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥
३६८०
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥
फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥
मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥
त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥
आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥
तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥
३६८१
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥
फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥
हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥
सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥
सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥
तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥
२५८१
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥
केली हरीनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥
देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥
घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लहान थोरीं ॥३॥
५८१
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥
आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपला चि घात करूं पाहे ॥२॥
तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥
ब बं
१४४३
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥
नाहीं तें च घेतां शिरीं । होईल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥
नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥
तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥
४८५
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥३॥
१२१३
बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥
ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥
सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥
तुका म्हणे अंतीं । ठाव मागितला संतीं ॥३॥
४०१६
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दर्शन । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥
बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥२॥
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ती मधुसूदन। सम चरण देखियेले ॥३॥
जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥
आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका म्हणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुर्याची ॥५॥
३२१
बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥
अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥
मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥
७३४
बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥
जालें आम्हांसी जीवन । धणीवरी हें सेवन ॥ध्रु.॥
सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥
तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥३॥
३०१४
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥
येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण झालें संतां पायीं ॥ध्रु.॥
त्रासिलें दरिद्रें दोषा झाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत झाला ॥२॥
तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
२५८६
बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥
देव आह्मा प्राणसखा । झालें दुःखा खंडण ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥
तुका म्हणे निजठेवा । होईल देवा लाधलों ॥३॥
४८०
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥१॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥२॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
२९४०
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥
अभयाचे जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥
साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥
तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
३४४८
बरवें बरवें । केलें विठोबा बरवें ॥१॥
पाहोनि आंत क्षमा । अंगी कांटीवरी मारविलें ॥ध्रु.॥
शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥
तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥
२६४१
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी तें ॥१॥
तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥
भागलिया पेणें पावे । विसांवे तें टाकणीं ॥२॥
तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥
२१६२
बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥
मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥
जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥
निलाजरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा मज ॥३॥
खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥
गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बाईल तूं देवा भारवाही ॥५॥
लटिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥
तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥
४०४३
बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥
दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥
बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥२॥
तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥
रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥४॥
आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥५॥
४०३८
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥
दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥
तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥
ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥
फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥
नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥५॥
५२१
बरें झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पान्हेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥
त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥२॥
नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥
वेगळाल्या खोडी केली तडातोडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥
निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥
४०४५
बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥
न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । झालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥
जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥
जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥
अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपें आप एकाएकीं ॥५॥
७६९
बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥
बरें जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥
बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥
बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥
१७८
बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥
सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥
२१५४
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥
नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥
लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥
तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥
८३४
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥
तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥
ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥
नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥
तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥
३७००
बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥
नाहीं विट देत भात । जेऊं बेसवु सांगातें ॥ध्रु.॥
बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥
तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥
२७८१
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥
संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥
आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥
तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमुचीया आसे उद्वेग त्या ॥३॥
२५७८
बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥
आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥
वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥
तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥
१०९८
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥
जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥
गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥
तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥
२६४२
बहुजन्में सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥१॥
विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥
येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥
११२७
बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी ॥१॥
बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥
अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥
३९९९
बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥
घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥
तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥
३००७
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥
माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥ विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्याप्य कोणी ॥३॥
म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥
तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
४०५५
बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौयाशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥
न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥२॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥३॥
ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥४॥
आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥
२४६५
बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी॥१॥
सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥
घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥
तुका म्हणे रस राहिला वचनीं । पडताळूनि तोचि सेवी ॥३॥
८९१
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥
एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥ध्रु.॥
कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणें चि हाके देईल हाके ॥२॥
तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥
१४२४
बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥
लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥
दुजियाचा तंव तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥
३७६८
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥
बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥
माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥
तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥
३४४३
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ध्रु.॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥२॥
३४०६
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥
सुखाची समाधी हरीकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
८५७
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥
बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥
तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥३॥
३२६६
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥
करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं परतां ॥ध्रु.॥
सांडि कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥
पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरी ॥३॥
विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंदे नामघोषें ॥४॥
१०५२
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरीभक्ती । कृपावंत मानसीं ॥१॥
म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥
असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥
तुका म्हणे निर्वीकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥
१४१४
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥१॥
सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ्य ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥
लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥
तुका म्हणे केला होय ठाकीऐसा । पुरवावी इच्छा धरली ते ॥३॥
२५०५
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥
येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥
बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमेंश्रम होता ॥२॥
बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि झाला ॥३॥
बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥
तुका म्हणे येथें झालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥
१३०८
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥
घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥
ऐका निवळल्या मनें । बरव्या कानें सादर ॥२॥
तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥
५९४
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥
आतां काशासाठी देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥
तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥३॥
३४६९
बहुत गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥
करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥
अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥
तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥
३५९२
बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥
आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥
तोडिले तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥
बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥
काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥
६६७
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥
आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥
बहु काकुलती । आसे मागें किती ॥२॥
तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥
१३२६
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥
धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥
गादल्याचा जाला झाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥
तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
२८८९
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥
आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥
झालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥
तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
२३०३
बहु नांवें ठेविलीं स्तुतीची आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥
बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमटयाचा ॥ध्रु.॥
बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥
बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥
२९२६
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥
समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरी ॥ध्रु.॥
घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥
तुका म्हणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥
३७०१
बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥१॥
म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥
बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥
पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥
२१६१
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥
ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥
सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥
तुका म्हणे निघे आगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥
१९२२
बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा ।
घेइन प्रेमपान्हा । भक्तीसुख निवाडें ॥१॥
यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं ।
काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥
निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं ।
मोक्षपदें येती । ते विश्रांति बापुडी ॥२॥
तुका म्हणे हें चि देई । मीतूंपणा खंड नाहीं ।
बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥
३०२१
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । ठाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥
आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥
बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥
तुका म्हणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप झाला तुझा ॥३॥
२१४९
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥
फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥
कुंटित चि युक्ती । माझ्या जाल्या सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥
१५५०
बहु होता भला । परि या रांडेनें नासिला ॥१॥
बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥
नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥
ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥३॥
१८९६
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥१॥
नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥
पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥
बीज ज्यासी घ्यावें । तुका म्हणे तैसें व्हावें ॥३॥
२३७
बळियाचे अंकित । आम्ही झालों बळिवंत ॥१॥
लाता हाणोनि संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥ध्रु.॥
जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
१७९५
बळीवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
१६०७
बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥
पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥
आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥
तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥
३६९७
बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥
मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥
येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥
तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥
५००
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥२॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥३॥
तुका म्हणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥
बा बी
१२८३
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥१॥
घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥
आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥
तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥
१२८४
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥
कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥ध्रु.॥
बाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥
तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतऱ्याचें खाणें लगबगा ॥३॥
५८
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥
१८४६
बांधी सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥
भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतऱ्यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥
घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥२॥
तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥
२५९८
बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली कुरवंडी वाळवूनी ॥१॥
एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥
घालुऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥
तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
४१७
बाप मेला न कलता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्याचेचें काज ॥ध्रु.॥
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥
३५०७
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥
ये हि तन करते क्या होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥
रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥
कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
३७०९
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥
सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा नेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥
आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे ।
आंधळ्यासि डोळे पांगुळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥३॥
३२०
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥
जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे दाखविली मुक्ताफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥
३३०४
बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥
आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥३॥
३७८६
बाळपणीं हरी । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥
बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ।
जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥
मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।
विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तहान भूक नाहीं ॥२॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळती अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥
वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।
तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकी । बाळवेषें खेळे ॥५॥
९८७
बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥
विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाळी धोंडी अंगबळें ॥३॥
तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥
१०९
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध परिखा ॥१॥
जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥
साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥
तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
२२८६
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥
तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥
जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥
तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों द्यावी ॥५॥
२५५३
बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥
सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥
भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥
तुका म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळांसी ॥३॥
३१०४
बाळ माते निष्ठुर होय । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥
तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥
नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥
भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥
त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥
नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥
२४८५
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तहान ॥१॥
काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥
ठेविलिये ठायीं । चित्त ठेवुनि असें पायीं ॥२॥
करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा॥३॥
न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥
तुका म्हणे बुद्धी । अल्प असे अपराधी ॥५॥
२०२६
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रत्यया येती कण ॥२॥
तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
३३४८
बीज जाळुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥
आकारासी कैंचा ठाव । देहप्रत्यय झाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नोहे उस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥
तुका म्हणे अवघा जोग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥
७७८
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥
दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥
२८६१
बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥
हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥
तुका म्हणे दिशाभुली । झाल्या उफराटी चाली । निवाड्याची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
बै बु बो
३७६
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥
नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥
तुका म्हणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥
२३०१
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचना ॥२॥
तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥
२०३१
बुद्धीमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥
जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंके जन ॥ध्रु.॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥
तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥
१५०१
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥
हुंगों नये गोऱ्हावाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥
अळसियाचे अंतर कुडें । जैसें मढें निष्काम ॥२॥
तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥
८४६
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥
आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥
गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥
अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥
लटिका हा केला संवसारसिंधु ॥ मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥
तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निंश्चित त्याच्या बळें ॥५॥
६६८
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥
अवचितें निधान लागलें से हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥
यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥
तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥
२१०६
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां ॥१॥
माझें चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥
दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥
तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईल कळों ॥३॥
३५८४
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ ॥१॥
घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥
नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥
इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥३॥
एकसरें सोस माहेरासी जावें । तुका म्हणे जीवें घेतलासे ॥४॥
३२३०
बैसता चोरापाशीं तैसी होय बुद्धी । देखताची चिंधी मन धावे ॥१॥
व्याभिचाऱ्यापासी बैसता क्षणभरी । देखताची नारी मन धावे ॥धृ ॥.
प्रपंचाचा छंद टाकुनिया गोवा । धरावे केशवा हृदयात ॥२॥
सांडुनीया देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥३॥
तुका म्हणे तुला सांगतो मी एक । रुक्मीणीनायक मुखी गावा ॥४॥
२४९०
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥
घडलें हें बहुता दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥
बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥
दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥
पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥
तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥
२००६
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥
आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥
माझें मज नारायणा । देतां का रे नये मना॥३॥
भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
३६७५
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥
पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥
बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥२॥
तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥३॥
४०७८
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥
मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥
बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥
तुका म्हणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥
३७१
बैसो खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥
रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥
विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥३॥
१७५१
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरी मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥३॥
८११
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥
काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥
न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥
२६३३
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥
ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥
घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥
तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥
२३१७
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥
परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥
आपुलाल्या इच्छा। मागों जया व्हावें जैशा ॥२॥
तुका म्हणे आई । नव्हसी उदास विठाई ॥३॥
९२५
बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥
एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥
पाहेन ते पाय । जोंवरी हे दृष्टि धाय ॥२॥
तुका म्हणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥३॥
२६७५
बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥
जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥
करणें तें आम्ही करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥२॥
तुका म्हणे असों आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें बोले सारूं ॥३॥
३५२१
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥
मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥
समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥
तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥
८४५
बोलतों निकुरें । नव्हती सलगीचीं उत्तरें ॥१॥
मागे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥
अंगावरी आलें । तोंवरी जाईल सोसिलें ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥
२९८४
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥
दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ध्रु.॥
चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व । किती करू गर्व आता पुढे ॥२॥
तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
३४९
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥२॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥
३९२९
बोल अबोलणे बोले । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥
वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातों माघार गा ॥ध्रु.॥
हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥
मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥
काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी वसवसी। भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥
ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥
२६३७
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥१॥
कांहीं कोड कवतुकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥
बोलविसी तैसें । करीन सेवक सरिसें ॥२॥
तुका म्हणे देवा । माझें चळण तुज सेवा ॥३॥
३३४०
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥
मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥
संपादणीविण मिटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥
कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥
१७७१
बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥
तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥
१२८०
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥
माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥
व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥
दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥
विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥
तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥
६४
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
२३३९
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥
झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥
७७०
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
१७९१
बोलविले जेणें । तोचि याचें गुह्य जाणे ॥१॥
मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥
मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥
त्याच्या साच गाई ह्मैसी । येणें खेळावें मातीसी ॥६॥
तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
२४३३
बोलावें तें आम्ही आतां अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥
मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥ध्रु.॥
तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥२॥
१७७
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥
१३८८
बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥
मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांड असुकानें ॥२॥
तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
२८०७
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥
कवतुक तुझें नवल यापरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥
नाहीं मिळे येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥
तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
३३९९
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥ध्रु.॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥
७०९
बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥
बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥
बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥
३५९८
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥
ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥
पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥
तुका म्हणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥
३१८४
बोलिलों उत्कर्षे । प्रेमरस दासत्वें ॥१॥
साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥
तुका म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥
१९५५
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥
करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ध्रु.॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥
तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
३६२५
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥
जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥
न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥२॥
हाती धरोनियां देवे नेला तुका । जेथे नाही लोकां पराश्रम ॥३॥
३५७५
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥
स्तुती निंदा केली। लागे पाहिजे साहिली ॥२॥
तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥
१०६
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरी आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ॥३॥
१९४७
बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥
सर्व सिद्धी पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥
संतसमागमें अळंकारू वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजे ॥२॥
तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओवू ॥३॥
२५३
बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जने आम्हां ॥१॥
भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥
११७
बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥
हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥
विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥
तुका म्हणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥
३४७१
बोलोनियां दाऊंकां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥
पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥
त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥
तुका म्हणे माता बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥
१४५९
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीस ॥१॥
एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥
अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥
अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नाही ॥४॥
तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥
ब्र ब्रा ब्री
९८१
ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥
वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥
बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥
तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥
३४६
ब्रम्ह न लिंपे त्या मळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥
तोचि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥
शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥२॥
पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥
१३०
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥
सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥२॥
भूतांच्या मत्सरें । ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥
निंदा स्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥
१६५७
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥
तोचि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥
तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥४॥
२०१५
ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥
भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥
तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
१०२२
ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥
तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥
१४७
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥२॥
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिलाषिलें ॥३॥
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥५॥
१११४
ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥
शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटणें । पुरींचें भ्रमण याच साठी ॥ध्रु.॥
याचसाठी जप याचसाठी तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥
या च साठी संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥
२३७३
ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥
जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥
खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥
जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही ॥४॥
१६२८
ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं॥१॥
रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥
तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥
२७२६
ब्रम्हज्ञानाची भरोवरी । सांगे आपण न करी ॥१॥
थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ शिणवीली वैखरी ॥ध्रु.॥
कथा करी वरीवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥
तुका म्हणे कवित्व करी । मान लोभ हे आदरी ॥३॥
१९
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥
बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥
हरी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥४॥
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥
३७१३
ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥१॥
मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥
उच्छिष्ट जे न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली । ते हे माउली आमुची ॥३॥
८४८
ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥
जयासी नावडे हरीनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥
सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥
तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥
८४९
ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥
रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥
तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्राह्मण तो ॥३॥
२७९४
ब्रीद ज्याचें जगदानी । तोचि मनीं स्मरावा ॥१॥
सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥
तुका म्हणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥
३९०५
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥
याचसाठी धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥