ग्रंथ ,संत शेख महंमद-योगसंग्राम

ॐ नमोजी श्रीअव्यक्तरामा । परात्‍पर तूं मेघःशामा ।
ब्रह्मादिकां न कळे महिमा । अविनाश म्‍हणोनियां ॥१॥
वोंवियां साक्षें निज कल्‍पतरु । कोटि मयंकांहूनि प्रकाश थोरु ।
तेथें वेदशास्त्रांचा विचारु । पावो न शके ॥२॥
वोरस मन वाचे अगोचर । ज्‍याचें प्रेम त्‍यासी साक्षात्‍कार ।
येरा टकमक विचार । सर्‌गुरुविण ॥३॥
‘ॐ’कार मूळ रचना प्रबंध । जो वेदशास्त्राचा आधारकंद ।
तेथूनि गुण साहाकारिला त्रिविध । शून्याकार पर-वस्‍तु ॥४॥
ॐकाराहूनि ‘अ’कार उद्भोवोनी । स्‍तवन केलें बोबडिया वचनीं ।
तें ऐकावें संतश्रोतेजनीं । भाव धरोनियां ॥५॥

ॐकार सत्‍य क्षर अक्षर । पाहे पां अर्ध मातृकेचा पसर ।
तेथूनि वोळखा हें चराचर । साहाकारिलें पैं ॥६॥
वोंविली विवेकरत्‍नांची माळ । चर्चितां वाढेल पाल्‍हाळ ।
सकळ तोडोनियां विव्हळ । हरिसी स्‍तविलें ॥७॥
ॐ नमोजी परम दीनोद्धारणा । मज लावावें कृपेचिया स्‍तना ।
मग तो द्रव पैं पान्हा । परावाचेचा ॥८॥
मग तें परेच्यानी वचन । तीव्र होय तूयेंचें कथन ।
तेव्हां हरिनाम स्‍मरण । हृदयीं सिद्ध वसे ॥९॥
ॐ राहिलिया माघार । ‘न’ आरंभिला तो अवधारा ।

sant-sheikh-muhammad-yogasangram

संतीं चित्त द्यावें या उत्तरा । शेख महंमद म्‍हणे ॥१०॥
‘न’ अक्षरीं नवलाव जाणा । पातलों सरस्‍वतीच्या स्‍तवना ।
चित्त द्यावें किंकराच्या वचना । लडिवाळ म्‍हणवूनियां ॥११॥
नवलाव धरूनियां ज्ञानी । नमिली मूळ माया विरोचिनी ।
विज्ञानसिंधूची मांडणी । रचिती जाली ॥१२॥
नमिली ती पवित्र कृपा शक्ति । जी करी ईश्र्वराची प्रेमभक्ति ।
सोऽहं प्रेम लावी निगुती । बोधी बोधाचें पैं ॥१३॥
नमिली अवो कृपे साजणी । नित्‍य तुवां वसावें माझ्या वदनीं ।
मग मी प्रवततेंन अनुसंधानीं । स्‍वानुभवालागी ॥१४॥
नमिली अवो कृपे वेल्‍हाळे । मज द्यावे अमृताचे गराळे ।
मग शब्‍द उमटती सोंवळे । शुद्ध ब्रह्मानंदे ॥१५॥

नरासुरांची प्रसवणी । तरी तूं आदिशक्ति भवानी ।
अखंड ईश्र्वराचें ध्यानीं । प्रकाश असें तुझा ॥१६॥

नाम रूप ठसा तुजपासुनी । जैसे वडवानळें द्रवलें पाणी ।
नाहीं तरी निराकार निरशुन्यीं । ईश्र्वर होता ॥१७॥
नमन करितां रसाळ वैखरी । नाना परी उमटे हेरी ।
तों तों कृपा प्रतिपाळ करी । धृति पान्हा घाली ॥१८॥
न कळे म्‍हणवूनि सरस्‍वति । नमस्‍कारुनि मागतो मति ।
मग ते बोलिली विशाळ शक्ति । ते परियेसा पैं ॥१९॥
नवल बोलियली कृपा वचनीं । तुज मी प्रसन्न मुळापासूनी ।
एकविध होऊनियां विज्ञानीं । स्‍तवी सद्‌गुरु ॥२०॥

राहिलो मागें ‘ॐ’कार ‘न’कार । पुढें आरंभिला तो ‘म’ कार ।
सद्‌गुरु वर्णावयाचा विचार । परिसा संत हो ॥२१॥
सद्‌गुरु नाम गुणातीत । ‘रु’ म्‍हणिजे रूपाविरहित ।
म्‍हणोनि शेख महंमद मात । वर्णिते जाले ॥२२॥
वर्णना कर जोडुनी । सद्भाव धरूनियां मनीं ।
प्रेम दुणावलं तत्त्व धरुनी । बोधी बोधाचें परियेसा ॥२३॥
‘म’ मार्गे मार्ग दाविला मज । यालागीं वंदिला सद्‌गुरुराज ।
संतीं निरोपिलें ब्रह्मबीज । श्रवणीं माझे ॥२४॥
महद माया निरसिली जेणें । दाविलें निराभास ठेवणें ।
मग तीं लोपली दर्शनें । द्वैतपणाचीं ॥२५॥

जैसें सन्मुख पाहातं दर्पण । सन्मुख देखिजे आपण ।
तैसें सद्‌गुरु पाहाणेपण । पाठ पोट नाहीं ॥२६॥
आतां माझें नमन जीं सद्‌गुरु । करावा पतितांचा अंगिकारु ।
तुम्‍ही महा वरिष्‍ठ दिगंबरु । दीन तारक दुजे ॥२७॥
मानापमानावेगळे केलें । शिष्‍यत्‍व लोपवूनि गुरुत्‍व दीधलें।
परि म्‍यां पाहिजे जतन केलें । कृपेनें तुमचिये ॥२८॥
मायबापांचा अठवितां उपकार । त्‍यांनी हा वाढविला संसार ।
परि भवमोचकाचा विचार । नेणतीच कांहीं ॥२९॥
ममता धरूनियां विस्‍तार । केला लक्ष चौर्‍यांशी कारभार ।
तितुके ठायीं विषय विष अपार । मज भोवणें लागलें ॥३०॥

‘म’ अक्षर केवळ जाणा । त्‍यांत वर्णिला सद्‌गुरुराणा ।
पुढें योगेश्र्वरांच्या स्‍तवना । आरंभ केला ॥३१॥
मग सद्‌गुरु म्‍हणे शेख महंमद । तुंवा माता पिता वंदिजे शुद्ध ।
हा ऐके पां माझा शब्‍द । सगुण सुता ॥३२॥

मायबापें प्रतिपाळिलें तुज । महा सायासें आरंभिलें काज ।
सायासीं केली शरीराची वोज । नव मास जठरीं ॥३३॥
सद्‌गुरु बोले दृष्‍टांत उत्तर । पाहे पां पुडलीक सत्त्वधीर ।
मायबापाची सेवा करी साचार । सद्भाव धरूनियां ॥३४॥
पूर्वीं लोहदंड क्षेत्र पंढरी । होती महाविष्‍णूची नगरी ।
तेथें पुंडलीक राज्‍य करी । सत्त्वधीरपणें ॥३५॥

ऐकोनि भक्तीचा निर्धार । कौतुक पहाती ईश्र्वर ।
वरुनी घातली भीमेची धार । सत्त्व पहावया ॥३६॥
दुभाग झाले असे भीमातीर । द्वारकेहूनि आले शारङ्गधर ।
उभे ठाकले पुंडलिकासमोर । चरित्र पहावया ॥३७॥
पितृसेवा करी पुंडलीकरावो । उजवा धरोनि हृदयीं पावो ।
वाम करें वीट टाकिली बैसा वो । स्‍वामी महा श्रीपति ॥३८॥
पुंडलीक म्‍हणे श्रीरंग । पित्‍याचा होईल निद्रा भंग ।
म्‍हणवूनि न घडेचि प्रसंग । बोलावयालागीं ॥३९॥
पुंडलिकें विनविलें विश्र्वनायका । भाक मागितली सांगेन टीका ।
तुम्‍ही माझें गांवीहूनि जाऊं नका । सेवा घेतल्‍याविण ॥४०॥

विठ्ठलें विटेचा आदर घेतला । अठ्ठाविस युगें तो उभा ठाकला ।
परी व्रत भंग नाहीं केला । पुंडलिकें पित्‍याचा ॥४१॥
पुत्रभावें करी मायबापाची भक्ति । सत्‍य लाधेल त्‍या सायोज्‍यता मुक्ति ।
स्त्रीसहि भ्रताराविण भक्ति । असेचि ना ॥४२॥
ऐसी सांगोनि निबंध वार्ता । निवांत केला शेख महंमद श्रोता ।
आतां भावें वंदी माता पिता । सद्‌गुरु म्‍हणत असे ॥४३॥

नमस्‍कारिला तो माता पिता । ज्‍याचेनि जोडिला सद्‌गुरु दाता ।
तेव्हां आत्‍मज्ञानें कथा वार्ता । चर्चित जालों ते अवधारा ॥४४॥
मग नमस्‍कारिला मातापिता । तिहीं आशिर्वाद दिधला पुरता ।
जयवंत होई सूरिजनसुता । सद्‌गुरुचरणीं ॥४५॥

आतां इतुका घेऊनियां ‘ना-भी’ कार । पुढें नमीन ते योगेश्र्वर ।
मग त्‍यांचे कृपेचे अंकुर । फुटती मज दीनाला ॥४६॥
‘म’ अक्षर मागें सरल्‍याउपर । पुन्हां ‘सि’ आरंभिली साचार ।
वर्णावया साधकेश्र्वर । आरंभ केला आतां ॥४७॥
शीघ्र सिद्धांत ते साधक । ज्‍याच्यानें तरे हा विश्र्वलोक ।
भावभक्तीचा होय अभिषेक । चरणीं जयाचे ॥४८॥
सीमा त्‍याची थोर असे जाणा । कथितां नयेचि या वदना ।
ते खांब या त्रिभुवना । धीर मेरु जैसे ॥४९॥
‘सि’ न जेथें कांही न उमटे । दर्शन जालिया भवबंधन तुटे ।
सेवा घडल्‍या त्रिगुण फाटे । शीघ्र हेळमात्रें ॥५०॥

सिंधु तुका न येचि अवधारा । बहु थोर परी उदकें असे खारा ।
रवि शशि नव लक्ष तारा । तेहि फेरे खाती ॥५१॥
‘श्री’कारी ॐ नमोजी नारायण । ‘या अल्‍ला’ म्‍हणती यवन ।
यावेगळें अनेक स्‍तवन । साही दर्शनांची ॥५२॥
‘सि’ शिरोनि शून्यीं मीनमार्गें । घेतलीं सिद्धसाधुसंतांचीं अंगें ।
रुसल्‍याविण समजाविली भिंगें । विपरितांचीं सुपरितें ॥५३॥
यालागीं स्‍वयें शरण आलों तुम्‍हांस । बोले शेख महंमद उदास ।
कृपा करूनियां सेवकास । ग्रंथासि आज्ञा द्यावी ॥५४॥

मग अभिवादती ते साधकेश्र्वर । तुंवा पुर्वीच पूजिला ईश्र्वर ।
म्‍हणोनि फुटती अंकुर । सोंवळे हृदयी तुझे ॥५५॥
मग ॠषीस केल नमस्‍कार । पुढें आरंभिला तो ‘ध’ कार ।
माघार सांडिला ‘सि’ कार । अक्षरबंधेसी ॥५६॥
‘ध’ कारीं नमिले ते श्रोते । आणि महा कुशल वक्ते ।
यावेगळे ते बावळे नेणते । नमस्‍कारिले ॥५७॥
शाहाण्णव कुळींचें कवीश्र्वर । आणिक निज भक्त उदार ।
तितुकियांस माझा नमस्‍कार । साष्‍टांगें पैं ॥५८॥
नमस्‍कार करूनियां वचन । बोले शेख महंमद विज्ञापन ।
लडिवाळ असे तुमचें दीन । आशिर्वादावें ॥५९॥

धर्मनिष्‍ठ पुण्यार्थी भले । आत्‍मत्‍वें सत्‍संगतीं निवाले ।
मनुष्‍यदेहीं देवपणें मिरविले । त्‍यांस माझा नमस्‍कार ॥६०॥
धरुनी परमार्थ प्रबोध करिती । अष्‍टहि अंगें बाणली श्रद्धा शांति ।
आसनीं भोजनीं शयनी मती । परमेश्र्वरीं शुची ॥६१॥
साही दर्शनांचे साधक । यावेगळे सम विषम लोक ।
नमस्‍कारूनि मागितली भीक । ब्रह्मविद्येची ॥६२॥
मातें भिक्षा दिधली सद्‌गुरूनें । मग हें सद्‌गुरूची आज्ञा-लेखन उथळ असत्‍य नसावें
त्रिभुवन दिसें ठेंगणें । लक्ष चौर्‍यांशींचें भ्रमणें दृष्‍टि भासे ॥६३॥
आतां सद्‌गुरु बोलिले निज गुह्य । ब्रह्मविद्या निरोपिली तुज ।
तुंवा लीन व्हावें सहज । अनुवाद देखोनियां ॥६४॥
पाहे जे जे आनुवादा पातले । थितें कर्मजंजाळा गुंतले ।
ते न होती सद्‌गुरुचे अंकिले । बरळती बाष्‍कळ ॥६५॥

सरज्‍या अंकुश डफावरी लावून । हाटोंहाट उमगती भांडण ।
जैसें पिसाळलें श्र्वान । किंवोन झडा घालित असे ॥६६॥
दांडाईत डफगण्याची एकचि मती । दाटून खवळून कळी करिती ।
परी ते नेणती ब्रह्मस्‍थिती । स्‍वयें अनुभवें ॥६७॥
दृष्‍टांत डांकुलता हिंसा करी । शब्‍दज्ञानें ठकी नरनारी ।
तैसी कीर्तनाची भरउभरी । किरवें वधूनियां ॥६८॥
जैसे थोडें क्षीर डेरां ताविलें । उतों आल्‍या बहुतसें देखिलें ।
तैसें शब्‍दज्ञात्‍यांस जालें । भीतरी रितें राहिलेंसें ॥६९॥
रितां कुंभ मस्‍तकीं घेतला । तो पवनें वाजत नदीस गेला ।
जळ भरिल्‍या धरिला अबोला । तैसें बोधाचें चिन्ह ॥७०॥

थोडें जळ कुंभ शीरावरी । चालतां हिंदोळा हिंदोळ करी ।
तैसें अघोर्‍यासी बोलतां विचारी । कष्‍टी होईजेल ॥७१॥
जो व्याधिग्रस्‍त तिडकाळू केला देवें । त्‍यास जरी आपण भेटिजे स्‍वभावें ।
तरी शीघ्र पीडा भरेल वोळखावें । ठायींचेंचि भल्‍यांनी ॥७२॥

क्षेम देतां बुके फरासास । लाविल्‍याविण सुगंध लागे अंगास ।
तैसें आळविलें पाहिजे गुणवंतांस । लक्षण वोळखोनियां ॥७३॥
पवित्र पवित्रासी भेटतेवेळे । होती प्रेमसुखाचे सोहोळे ।
त्‍यासी देखोनि चांडाळ तळमळे । अभाग्‍यपणें ॥७४॥
साधूस जाल्‍या साधूचें दर्शन । बीजरत्‍नें द्रवती मुखामधुन ।
तेणें पुनित होय त्रिभुवन । चांडाळ देखील ॥७५॥

ज्‍यासी पडेल गुरुत्‍व ठावें । तेणें मौन्य धरूनियां राहावें ।
गंभीरत्‍वें आचरण आचरावें । या जनांमध्यें ॥७६॥
केळीजवळी लाविल्‍या बोरी । वारियानें हालवितां सर्वांग चिरी ।
तैसी या जनाची संगती बरी नव्हे । साधुजनांलागी ॥७७॥
नेणतेपणें अविद्या उपधि । जाणतपणें होय वेवादी ।
म्‍हणऊनि हे दोन्ही पण छेदी । सज्ञानपणें ॥७८॥
नेणतपण खैराचा शूळ । जाणतपण चंदनाचा केवळ ।
टोचितां फुटतां न लगे वेळ । जाणीव नेणीस तैसी असे ॥७९॥
खैर जळोनि होय निमग्‍न । झिजल्‍या श्रीखंड होय केवळ चंदन ।
तैसे गळित जाल्‍या साधुसज्‍जन । शीतळ मिरविती जनांभीतरी ॥८०॥

हें सद्‌गुरुनें सांगितलें उपलक्षण । पुन्हांहि सांगती कुशळपण ।
तें ऐकावें विवेकीं विवरोन । ज्ञान विज्ञान गोडी ॥८१॥
पाहे रुचि जाणे रुचिलागुन । तेथें मनाचें होय अमनपण ।
तें विकारारहित बरर्वपण । पंचमा वागवितील ॥८२॥
त्‍या पंचमा सांगेन वेगळाल्‍या । ज्‍या या सर्वत्रातें प्रसवल्‍या ।
नांवें नातलग होऊनि पिशुना जाल्‍या । ज्‍याच्या त्‍यामध्यें ॥८३॥
सद्‌गुरु म्‍हणे शेख महंमद । आणिक एक ऐके पां शब्‍द ।
प्रारब्‍ध संचित क्रिया वेवाद । ज्‍याच्यानि गुणें ॥८४॥

कृपा चैतन्या महदा शक्ति । अविद्या निद्रा उघडी प्रचीति ।
त्‍या दोघीजणी प्रसिद्ध भांडती । जनांत निर्लज्‍जपणें ॥८५॥
वेगळालीं लक्षणें सांगेन नांवें । तीं अंतरीं वोळखोनि निवांत राहावें ।
द्वैती अद्वैत पडेल ठावें । केल्‍याविण जालें ॥८६॥
कृपेसंगें जो असे अवतरला । तो स्‍वतः सिद्ध साधकेश्र्वर जाला ।
पवित्रपणें ईश्र्वरास आवडला । स्‍वयाति म्‍हणोनियां ॥८७॥
तो मूळ वंश ईश्र्वराचा । प्रेमें घोष करी हरिनामाचा ।
कांटाळा वाटेल इतर गोष्‍टींचा । दुर्गम म्‍हणोनियां ॥८८॥
चैत्‍न्‍यासवें जो अवतरला । तो पाखांड अनुवादा पातला ।
निमालियां देवतांसी आवडला । भूतपणें असे ॥८९॥
तो ब्रह्मराक्षस अवधारा । छळितां न म्‍हणे भला बुरा ।
मढें स्‍मशानीं धरूनि थारा । झडपणी करित असे ॥९०॥

जे जे वासना धरूनि निमाले । ते पुन्हां तैसेच पावले ।
यालागीं न करणें बरळे । मन कल्‍पनेचें ॥९१॥
महदेसंगें जो अवतरला । तो असुरक्षेत्रीं असे जाला ।
ईश्र्वरभजनीं कंटाळला । अखंड उग्र असे ॥९२॥
बाष्‍कळ कारभारी हेतु मोठी । ऐके न पवित्रांच्या गोष्‍टी ।
वावगीच करी तोंडपिटी । हागवण जैसी ॥९३॥
अविद्येसंगे जो अवतरला । तो महा प्रचंड हिंसक जाला ।
कंटाळा न ये त्‍या दृष्‍टाला । विश्र्वासघात करितां ॥९४॥
अष्‍ट अंगीं क्रियानष्‍ट दोषी । जेथें जाय तेथें चांडाळ अपेशी ।
धिगू जालें आवडे ना जनासी । फटमर म्‍हणती ॥९५॥

ऐसी ही चहूं शक्तीचीं लक्षणें । वेगळालीं सांगितलीं सद्‌गुरूनें ।
आणिकहि गुह्यार्थ पुसणें । तोहि पुसे बापा ॥९६॥
हा ऐकोनि भेदाकार । मग शेख महंमद पुसे उत्तर ।
तें सांगावें जी दीनोद्धार । दया करूनियां ॥९७॥

घडिक भला घडिक फुंदे अनाचारें । हें सांग स्‍वामी कवणिया विचारें ।
सद्‌गुरु म्‍हणती ऐक उत्तरें । विश्र्वास धरूनियां ॥९८॥
तुमच्या ज्ञानविवेकाची गोडी । ते मज कळे ना मति असे थोडी ।
पिता घांस चाऊनियां आवडी । बालकामुखीं घालितसे ॥९९॥
तैसे निज विवेकाचे घांस । तुम्‍ही आवडी घालावे मुखास ।
तेणें प्रेमबोध उल्‍हास । होईल मातें ॥१००॥
सत्‍वर प्रसंग पहिला संपला । पुन्हां भावें दुसरा आरंभिला ।
सावध व्हावें अनुभवाला शेख महंमद म्‍हणे ॥१०१॥


पंच महाभूतें-शक्ति ॐ अर्ध दीर्घ नासिका सद्‌गुरु।
अग्र चरणीं तीर्थ गोदानीरु। तेहतीस कोटि देवतांचा भारु ।
दास्‍यत्‍व करी ॥१॥
या चहूं शक्तींची भेसळणी जाण । येरयेरांत मिश्रितपण ।
म्‍हणोनि अष्‍टधा लक्षण । संकल्‍प विकल्‍पें ॥२॥

पंच महाभूतें सबळ सगुण । त्‍यांचे हे पंचविस गुण विकारण ।
त्‍यामाजी शक्ती घेती अवतरण । कल्‍पनेसंगें ॥३॥
पंच महदूभूतांचें लक्षण । कवणकवणापासूनि निर्माण ।
कैसे जोडले पंचविस गुण । स्‍थूलकारीं मन ॥४॥
हें सांगावें जी सद्‌गुरुबाबा । तत्त्वीं कैसा शक्तींचा मेळावा ।
कोणतीचा कोण बोलावा । होय स्‍वामिया ॥५॥

अहिक्‍य इच्छा धरूनी ईश्र्वरें । नृपासनीं होता उदार धीरें ।
घाम आला थेंबाकार एकसरें । त्‍या नांव जोहार ठेविले ॥६॥
तो जहूंर रातला सोऽहं घोषें । स्‍तवी सहस्त्र हजार वर्षें ।
ईश्र्वर म्‍हणजे मज प्रकट केलें कैसे । म्‍हणऊनि रोखें पाहिलें ॥७॥
तो जहूंर गळोनि जाला पाणी । फेंस जमावला त्‍याचिये धरणीं ।
धूम्र जाला नभाची मांडणी । शेंडा खोड ना दिसे ॥८॥
ऐसें इच्छूनि वायु आकाश । वायूपोटीं तेजाचा प्रकाश ।
तेजापोटीं आपतेज पृथ्‍वीचा स्‍पर्श । तळीं शेष स्‍थापला ॥९॥
सप्त पाताळ भुवन । सप्त सागर पृथ्‍वी बैसली घेऊन ।
अंडें तैसें शोभे मद्‌भुवन । दृष्‍टांत दृष्‍टीं ॥१०॥

उत्तर दक्षिण पूर्व पश्र्चिम । आग्‍नेय नैॠत्‍य वायव्य ईशान सम ।
या अष्‍टहि दिशा तमाम । रविशशि भ्रमयंती ॥११॥
पळें व तिस घटकांचा नेम । शुद्ध प्रशुद्ध राम विराम ।
या चहूं प्रहरांत मेघःश्याम । सेवादान मागे ॥१२॥
एका राहाट चातीचें (चक्राचे) आणीवरी । एकचि तंतु कांतनारी ।
तिरीख मोजूनियां पुंजे करी । चिवट म्‍हणोनि मिरवी ॥१३॥
चिवट तंतु सुताचा गुंडाळा । आडवा उभा विणला परकळा ।
तैसा पांचा शक्तींचा एकवळा । महद्‌भूतें देखिला ॥१४॥
शक्ती पांच महद्‌भूतें जाण । ऐसी जाली ईश्र्वरापासून ।
खेळ आरंभावयालागून ।इच्छा इच्छियेली ॥१५॥

नरा-पद्मिनीचें अवतरण । ते कृपा प्रसवली जाण ।
तेथें अविद्या अवलक्षण । कदा न संचरे ॥१६॥
नरा पद्मिनीचा एक बोध । तेथें कदा न घडे वादवेवाद ।
घरा आलया सुख पावती सिद्ध । भाव देखोनियां ॥१७॥
पद्मिनी करी नराची सेवा । तंव नर स्‍मरे अव्यक्त देवा ।
तेथें कदा न पडेचि हेवा । द्वैताचा परियेसा ॥१८॥
पद्मिनी नराचें एक लक्षण । त्‍यापासूनि घडे ना अवगुण ।
पतिव्रता धर्म सगुण । त्‍या दोहींचा असे ॥१९॥
कृपेसंगें साधूचा अवतार । तो हृदयीं वागवी ईश्र्वर ।
कदां पडों नेंदी विसर । सोऽहं बोधाचा पैं ॥२०॥

तो साधु भजनीं निराशें भजे । म्‍हणे हे विश्र्वलोक मजचि साजे ।
ते तारावे गा ईश्र्वरा वोजें । यालागीं  ग्रंथ करी ॥२१॥
कृपा धरूनी अवतरे जे स्‍थूळ । तें बत्तीस लक्षणीं केवळ ।
अपवित्र नष्‍ट देहढाळ । उमटेच ना तेथें ॥२२॥
तो पुण्यात्‍मा असे पवित्र । हृदयीं निज नामाचा गजर ।
जिकडे जाय तिकडे सारंगधर । मागें पुढें डुल्‍लतसे ॥२३॥
साधु फिरे सहज समाधाना । ते ईश्र्वरासी पावली प्रदक्षिणा ।
शयन करी तो नमस्‍कार जाणा । श्र्वासोश्र्वास जप त्‍याचा ॥२४॥
शेख महंमद म्‍हणे सद्‌गुरु भूषण । स्‍वामी बोलिले जें वचन ।
तेणें निवालें माझें अंतःकरण । अष्‍टहि भावें ॥२५॥

असत्‍य पवित्राचें पोटी पवित्र । हें तंव तुम्‍ही बोलिलेती उत्तर।
त्‍यांत आडताळा देखिला जाहिर । तो परियेसा पैं ॥२६॥
पाप न करावें ही भल्‍यांचीं उत्तरें । प्रत्‍यक्ष शिंदळकी केली पाराशरें ।
तेथें व्यास कवणिया विचारें । अवतरले स्‍वामी ॥२७॥
आणिक दासीचे पोटी विदुर । अशुभापासूनि शुभ पवित्र ।
प्रत्‍यक्ष चोखामेळा महार । नामघोष करी ॥२८॥
हिरण्यकश्यप महा दुष्‍ट सृष्‍टीं । करूं नेदी हरिनामाच्या गोष्‍टी ।
देवांदानवांसी खटपटी । दावा धरूनियां ॥२९॥

कटकामाजी पिटवी धांडोरा । म्‍हणे कोणी आठवूं नका ईश्र्वरा ।
हिरण्यकश्यप हरिभक्तां दरारा । म्‍हणवित असे ॥३०॥
कोणी चोरोनियां हरिभजन करी । त्‍याचा उमगूनि शिरच्छेद करी ।
अति नष्‍ट दुराचारी । पापपणें फुंदत असे ॥३१॥
प्रल्‍हाद निज भक्त उदार धीरें । प्रेमघोषें डुल्‍ले नामगजरें ।
तो हिरण्यकश्यपास कवण्या विचारें । जाला असें तें सांगा ॥३२॥
हिरण्यकश्यपे नानापरिचीं विदानें । रचविली त्‍या प्रल्‍हादाकारणें ।
कयाधूनें विष घातलें निष्‍ठुरपणें । हिरण्यकश्यपाच्या धाकें ॥३३॥
अग्‍निदहनीं घातला प्रल्‍हाद । पर्जन्यवेषें द्रवला गोविंद ।
हस्‍तिखालीं लोटला हांसे गदगद । नामघोषें गर्जून ॥३४॥
मग प्रल्‍हाद रोविला क्षितीं । तीरातुबकांचे भडिमार करिती ।
जवळ जाऊनियां भोंसकती । प्रल्‍हाद आनंदमय ॥३५॥

प्रल्‍हाद बत्तिस लक्षणीं पुतळा । महा सुंदर गोजिरा कोंवळा ।
सिंधूत लोटला एक वेळा । हरि मच्छरूपें अवतरला ॥३६॥
हातीं टाळ चिपळ्या घागरिया चरणीं । प्रल्‍हाद घोष करी नगरभुवनीं ।
तें हिरण्यकश्यपें ऐकोनि कानी । धरा धरा म्‍हणतसे ॥३७॥
मग धरोनी आणिले प्रल्‍हादाप्रती । हिरण्यकश्यप म्‍हणे सांग तुझा सारथ्‍ज्ञी ।
येरें दावूं आरंभिली प्रचीति । खांबाकडें पाहिलें ॥३८॥
हिरण्यकश्यपें खांबावरी घातली गदा । मग बाहेर नरसिंह निघाला सुधा ।
सायंकाळी नखें विदारिलें गोविंदा । जांधेवरी घेऊनियां ॥३९॥
हिरण्यकश्यपाच्या काढूनि अंत्रमाळा । नरसिंह घातल्‍या आपुल्‍या गळां ।
प्रल्‍हादासारिखा आणिक पुतळा । हृदयीं पाहे हिरण्यकश्यपाचे ॥४०॥
ऐसा दृष्‍टाचे पोटीं सृष्‍ट निपजला । तेणें बेताळिसां मोक्ष मागितला ।
हें कवणिया गुणें सद्‌गुरु बोला शेख महंमद म्‍हणे ॥४१॥

तेव्हां सद्‌गुरु उदार बोलते जाले । तुवां मागें दुष्‍ट सुष्‍ट पुसिलें ।
या प्रल्‍हादान्यायें पाहिजे वोळखिले । सेव सांगतो जालो ॥४२॥
ऐक कोणे एकें अवसरीं । इंद्र क्रोधायमान जाला हिरण्यकश्यपावरी ।
धरोनी आणिली त्‍याची स्त्री । दूत पाठवूनियां ॥४३॥
धरोनि आणिली हिरण्यकश्यपाची राणी । तेथें कथा करितां नारदमुनि ।
ते तिने ऐकिलें श्रवणीं । सहजें सहज ॥४४॥
गरोदर होती ते वेल्‍हाळा । नामश्रवण ऐकिलें गर्भगोळां ।
प्रसूत जालियां प्रल्‍हाद बाळा । नाम ठेविलें असे ॥४५॥

कथा विसर्जून बोलती नारद । हे स्त्री धाडा नाहीं तरी लागले बाध ।
मग ते धाडिली शीघ्र सिद्ध । हिरण्यकश्यपाजवळी ॥४६॥
प्रल्‍हाद बोलता चालता जाला । पंडितांपाशी पढों घातला ।
तेणें ॐ धरूनि ‘म’कार सांडिला । नामघोषी नाचे ॥४७॥
ऐसा हरिनामाचा महिमा थोर । तीर्थांव्रतांसी न कळे पार ।
ते निज सांडूनियां गव्हार । अनेक भ्रमतील ॥४८॥
स्‍वामी आणिक एक पुसतों वचनीं । तुम्‍ही सांगावें मजलागुनी ।
बोलिले ते चहूं खाणींची मांडणी । तयांत सज्‍जन असती ॥४९॥
कवण ते सज्‍जन तुज कळलें । तें तूं मज सांग पां वहिले ।
आतां ऐके सद्‌गुरु बोले । शेख महंमदास ॥५०॥

दृष्‍टांत चावटी करूनियां पुससी । तूं बहु निःसंग जालासी ।
सांग कवणें चिथावलासी । सत्‌शिष्‍या सगुणा ॥५१॥
स्‍वामी चिथावलों तुमच्या कृपादृष्‍टीं । म्‍हणोनि जाली आगमेसी भेटी ।
आणि दुजा कोण असे सृष्‍टीं । चिथाविता मजला ॥५२॥
मह तुम्‍हांवाचूनि नेणें दुसरा जैसी कन्या ध्यातसे माहेरा ।
आणि वत्‍स हुंबरें धेनुक्षीरा । तैसा मी तुम्‍हांप्रती ॥५३॥
जैसें कोरड्या काष्‍टाचें बाहुलें । खांब सूत्रानें बोलुन बोलाविलें ।
तैसें तुम्‍ही मला चेतविलें । आपुल्‍या सामर्थ्ये ॥५४॥
नाना नग घडे मोडे भूषण सोनारा । तैसें भूषण दिधलें दातारा ।
कवित्‍व रस बंदिस्‍त अक्षरां । तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥

बंदिस्‍त अक्षरां तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥
सुतार नाचवी भूषण घोड्याचें । तैसें मज गुरूनें केले साचें ।
परि चालकपण असे तुमचें मी अहं मिथ्‍या असें ॥५६॥
स्‍वामी जें जें द्याल भूषण । तेणें सत्‍य र्होल माझा अपमान ।
पहा द्रोणागिरीलागून । कैसें जाले असें ॥५७॥
भूषण सकळ विंझळाचा सांठा । धरूनी द्रोणागिरी म्‍हणवी मोठा ।
शक्ति लागतां लक्ष्मण बरवंटा । हनुमंते उपडिला ॥५८॥
तेज भूषण दिधलें रवि शशि । ते भ्रमण करिती दिननिशीं ।
भूषण कस्‍तुरी दिधली मृगासी । तो सायासें वधियेला ॥५९॥
यालागीं जनीं भूषणांचा डांगोरा । तो जाणिजे कर्मखोडा बेडा ।
भावभक्तीचा बोध निवाडा । होऊं नेदी कांहीं ॥६०॥

या नाशिवंत शरीराचीं भूषणें । तीं महा दुःखाचीं कारणें ।
परी ते उंच लाधेच ना ठाणे । नीर मधुर मधुर जैसें ॥६१॥
ध्रुवाहूनि उंच पद तुमचें सद्‌गुरु। ते मज लाधावें जी विघ्‍नहरु ।
लोकत्रयीं मानितील जाहीरु । मग ईश्र्वर जैसा अविनाश ॥६२॥

जैसा चंद्र द्रवे चकोर वदनीं । तैसें तुम्‍ही केलें मजलागुनी ।
आतां कां दूर धरितां दाटोनी । सेवकालागीं स्‍वामिया ॥६३॥
आठवला शब्‍द तुम्‍हांसी ना पुसों । तरी कवणासी मी विश्र्वासों ।
तरी काय परदेशीपणीं असों । सांगावें स्‍वामी मज ॥६४॥
मातेनें बाळकासी हेडावलें । तें अंगसेंगेंचि लगटलें ।
तैसें मज अनुसंधान लागलें । तुमच्या चरणांचें ॥६५॥

जेवितां मांजर हेडावलें । तें ठायां भोंवतेंच भोंवों लागले ।
तैसें माझे चित्त गुंतलें । तुमच्या ध्यानीं ॥६६॥
महंमद निष्‍ठुरपणाची टीका । सांगतों तें स्‍वामी ऐका ।
मांजरी पीडली असे भुका । तरी पिलें भक्षण करी ॥६७॥
दांतीं पिलें धरूनि मांजरी पळे । अंतरीं कांहीं घात ना कळवळे ।
तैसें निष्‍ठुरीं ममतेचे सोहोळे । तुमचे मजलागी ॥६८॥
नदीधारे नीट मीन चढे । मागें अंडियांचें सांकडें पडे ।
परतोनि पहातां मच्छ धडफुडे । होऊनि मागें लागती ॥६९॥
ऐसा असे तुमचा अनुसंधानी । म्‍हणोनि पर्वतलों निज नयनीं ।
ज्ञानविज्ञानत्‍वाची मांडणी । दिसे भासे लक्षण ॥७०॥

मग सद्‌गुरु बोलते जाले मात । ती तंव पहात होतों तुझें चित्त ।
हृदयीं आलंगिलें त्‍वरित । काय पुसरणार तें पूस ॥७१॥
या चहूं शक्तींचीं मांडणी । तुम्‍ही सांगितली जी कृपावचनी ।
आणिक एक आठवलें ज्ञानीं । पुसावयालागीं ॥७२॥
मनुष्‍यांमध्यें सिद्ध सुधारणा । धेनूंमध्यें कपिला पवित्र जाणा ।
कस्‍तुर्‍या मृग अखंडपणा । कवणे गति स्‍वामी ॥७३॥
गरुड ऐरावत वासुकी नाग । शहामृग अरबी वाघ ।
हीन यातीस ऐका पैं दीर्घ । जवादि पुरतकाळीं ॥७४॥
अंडज खाणीमध्यें राजहंस । त्‍यांस मोत्‍याचा असे स्‍फुरस ।
हनुमंतासहि नित्‍य निज ध्याय । कवण्या गुणें ॥७५॥

रावा देखा रामनाम पावला । हुमा पक्षी पवित्र जन्मला ।
मयूर ईश्र्वरासी आवडला । कवणियास गुणें ॥७६॥
उद्भिज खाणीं वनस्‍थळीं । त्‍यामाजी तो चंदन परिमळी ।
वाळा वेळा पुष्‍पें नव्हाळी । कवणेपरी असे ॥७७॥
तुळसी बेल आघाडा । उत्तम औषधि पवित्र झाडा ।
अमृतफळ तांदुळ निवाडा । भक्ष पूजेलागीं ॥७८॥
खारिक खोबरें अग्रचंदन । यावेगळें आणिक पवित्रपण ।
चहूं खाणी वर्णिता महिमान । व्युत्‍पत्ती वाढेल ग्रंथीं ॥७९॥
आतां स्‍वेदज खाणीं माझारीं । हिरे माणिकें रत्‍नें नानापरी ।
अनेक ठीक ढऊळ परोपरी । साहाकारिलें असें ॥८०॥

पांच परिस पाषाण प्रतिमा । या वेगळ्या अनेक याति महिमा ।
हें सांग पां कवणियां कामा । सुफळ वचनें ॥८१॥
सद्‌गुरु म्‍हणती बरवी दृष्‍टि केली । तुवां साखरेची साल काढिली ।
माझी चिंता समाधान पावली । चर्चितां गुह्य गुण ॥८२॥

लक्षण आतां तूं ऐके हो श्रोता । वोळखे शब्‍दांची व्यवस्‍था ।
कोठें फांको देऊं नको चित्ता । अंतर उल्‍हासें ॥८३॥
शिष्‍यां ऐसेंच होतें माझ्या मनीं । जे तुवां पुसावी ज्ञानविज्ञानाची मांडणी ।
सर्व मेदिनींत असे पाणी । खोदल्‍याविण न लागे ॥८४॥
मेदिनीसारिखा सद्‌गुरु दाता । कुदळीसारिखा सवें शिष्‍य खोदिता ।
तेथें निज नीराची पूर्णता । उचंबळे हृदयीं ॥८५॥

या चहूं शक्तीच्या चार खाणी । त्‍यामाजी सगुण अवतरे कूपाराणी ।
तिहीं खाणींवरी एके वचनी । सांवली कृपेची ॥८६॥
स्‍वप्न सुषुप्ति तुरिया जाण । जागृति सावध करी निजलेपण ।
हें तंव कृपेचें लक्षण । परियेसी बापा ॥८७॥
जागृति आणि तुरियापण । हे तंव कृपेचें महिमान ।
तिहीं शक्तींवरी अवलोकन । मोह पान्हा घाली ॥८८॥
जो मोहाचा येतसे उमाळा । तो जाणिजे कृपेचा कळवळा ।
पहा चराचरी वेळोवेळां । कुरवाळित असे ॥८९॥
राग हा अविद्येचा असे जाणें । मोहें धांवें ते कृपें ठाणें ।
हांसे वाटै ते महदेचे कारणें । अनेक अनेक भासे ॥९०॥

शक्ति चैतन्या चेतना करी । महदा ते जाणिजे कारभारी ।
अविद्या निजवितसे अघोरी ।निद्रेच्या अंगसंगें ॥९१॥

वोळखे निद्राशक्ति महाकाळी । या तिही शक्तींवरी जयेची धुमाळी ।
सुषुप्तींत गोजिरी होऊनि छळी । लिंगदेहसंगे ॥९२॥
निद्राशक्ति महा प्रचंड जाणा । तियेचा धाक साही दर्शनां ।
अनेक चराचर स्‍थापुनी भ्रमणा । अकळ लोपी ॥९३॥
सांगतों निद्रा शक्तीचें घर । त्रिकुटातळीचें असें विवर ।
तेथूनि लढती किन्नर । मदन चैतन्याचे ॥९४॥
ज्‍यास असे कृपाशक्तीचा पान्हा । त्‍यास निद्रा लागे ना सत्‍य जाणा ।
अखंड उन्मयी मैदाना । प्रेमें डुल्‍लतसे ॥९५॥

ते सदा सावधपणें निजेले । आपण आपणातें विसरले ।
मरणास मारूनियां मेले । शूरत्‍व साजे तया ॥९६॥
ते जनासी दिसती वेडे बावळे । अंतरीं भोगिती ब्रह्मसुखाचे सोहोळे ।
जन विजन त्‍यासी न्याहाळे । परमात्‍मा जैसा ॥९७॥
ते सर्व भोगूनियां अभोक्‍ते । विटाळी असोनि विटाळा नेणते ।
जैसें दर्पणावरी श्र्वान मुतें । भास अतीतपणें ॥९८॥
निद्रा मुरोनि उन्मनि प्रकाश । स्‍वरूपीं लय लागे सावकाश ।
ब्रह्मानंदें प्रेमबोध उल्‍हास । तें पूस पैं शिष्‍या मज ॥९९॥
हें इतुकें ऐकोनि गुह्य गुज । शेख महंमद म्‍हणजे गुरुराज ।
स्‍वामी निज कळा सांगावी मज । जीव निद्रा पळेसी ॥१००॥

जीव निद्रा पळोन जाय तत्त्वतां । प्रेमें लागे उन्मनी अवस्‍था ।
तें मज सांगावें जीं प्रेम महंता । गुह्य मायबापा ॥१०१॥
आतां ऐक पां एकांतीचा उद्गार । बोले सद्‌गुरु होऊनि उदार ।
प्रकट न करावें जनाभितर । संत कोपतील तूंतें ॥१०२॥
प्रसंग पहिल्‍यापासूनि दुसरा । समाप्त आरंभिला तिसरा ।
सावध अनुभवी अनुसरा । शेख महंमद म्‍हणे ॥१०३॥
सद्‌गुरु म्‍हणजे शेख महंमदास । तिसरे प्रसंगीं होऊनियां उदास ।
काय पुसणार तें मज पूस । ‘ना-भी’कार दिधला ॥१०४॥