अभंग – १०१

भावार्थ –

भक्त आपल्या मनात आवडणाऱ्या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच कल्पनेतल्या देवाची षोडशोपचारे पूजा करतो.प्रत्यक्षात देव व भक्त दोन्हीही आढळत नाही कल्पनेशिवाय काहीच घडत नाही.संत रामदास म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.


sant-ramdas-sartha-abhang-dona

अभंग – १०२

भावार्थ –

देशत्याग करुन विदेशात जाण्याचे ठरवले तर पुढेही आपलाच देश लागला.आणखी मार्गक्रमणा केले तरी आपलेच मायबाप आढळले. विचार केला तर सर्व देश सारखेच आहेत हे लक्षात आल.सगळीकडे एकच तत्व व्यापून आहे हा विचार या अभंगात संत रामदास साधकांचे.


अभंग – १०३

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात की समाधी लक्षण मनासारखेच विलक्षण आहे.समाधी साधताना साधकाला पुरुन घ्यावे लागत नाही की जिवंतपणी मरावे लागत नाही.

वायूचा निरोध करून ब्रह्मांडात न्यावा लागत नाही त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या साधना व त्यासाठी नाना प्रयत्न करताना मनाच्या चंचलपणा पुढे काही उपाय सापडत नाही. जीव कासाविस होतो. चंचलता हे मनाचे वर्म समजून घेतले पाहिजे तरच साधकाची साधना सफल होऊ शकते.


अभंग – १०४

भावार्थ –

या अभंगात संत रामदास साधकाचे अनुसंधान म्हणजे मनाची एकाग्रता साधली असता कोणते अनुभव येतात याचे मार्गदर्शन करतात ते म्हणतात साधनेत दृढ एकाग्रता साधली तर मनाचे उन्मन होते म्हणजे मन विचारांच्या उच्च पातळीवर जाते.मनाला झालेला बोध केवळ शाब्दिक न राहता त्याचा प्रबोध होतो म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर येतो. तेथे शब्दाचे काही प्रयोजन रहात नाही मन निशब्द बनते.

ज्ञानाचे विज्ञान म्हणजे ते शाब्दिक न राहता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवता येते. साधकाच्या सहजप्रवृत्ती निवृत्तीत बदलतात. मन समाधी अवस्थेपर्यंत पोचते जेथे स्वतःचा व जगाचा विसर पडतो अपूर्व शांतता अनुभवास येते.संत रामदास म्हणतात मन रामरुपाशी एकरुप झाले की,तो अनुभव शब्दात सांगता येत नाही,मन शब्दातित होते. संत रामदास म्हणतात ram रूपाशी एकरूप झाले की तो अनुभव शब्दात सांगा सांगता येत नाही मन शब्दातीत होते मनाचे मनाशी संत रामदासांच्या मनात विलसू लागला.


अभंग – १०५

भावार्थ –

ज्ञानाशिवाय माणसाचे सर्व प्रयत्न ,सर्व कला केवळ अवकळा आहेत असे प्रत्यक्ष भगवंताने सांगितले आह, त्याचा विचार करावा असे संत रामदास म्हणतात. ज्ञान हेच जीवनाचे सार्थक असून त्याशिवाय सर्व कर्म निरर्थक ठरते.संत रामदास म्हणतात, ज्ञाना शिवाय मनुष्य हा केवळ दगड होय.


अभंग – १०६

भावार्थ –

अनंत ब्रम्हांडाच्या मालिका ज्याने निर्माण केल्या, ब्रह्मादिक देवांचा jजो निर्माता आहे ,ज्याच्या पेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही ,ज्याने या संसारात प्राणी सृष्टी उत्पन्न केली व त्यांचे प्रारब्ध निर्माण केले .या सर्व लीला एका भगवंताच्या आहेत. संत रामदास सांगतात अनंत प्राण्यांच्या देहात एकच परमात्मा विलसत आहे हे समजून घेणे हाच खरा विवेक आहे.


अभंग – १०७

भावार्थ –

जो स्वरुपापासून वेगळा झाला तो पतित व जो स्वरुपाशी एकरुप झाला तो पावन असे संत रामदास म्हणतात.स्वरुपाशी पूर्पपणे एकरुप झाल्यास तेथे मी तू पणाचा भेद राहत नाही मुळांत आपण अमृताचे पुत्र आहोत. एकाच आत्मतत्वातून जन्माला आलो आहोत आणि ते आत्मत्त्व अमर आहे.असा विचार करण्यात फार सुख आहे.संत रामदास म्हणतात,हाच बोध मनाने स्विकारला पाहिजे.


अभंग – १०८

भावार्थ –

म्हणूस स्वतः करता किंवा करविता नाही ही गोष्ट निश्चयपूर्वक जाणून घ्यावी असे संत रामदास म्हणतात. चंद्र – सूर्य ,मेघ मालिका पृथ्वी हे सर्व ईश्वरानें निर्माण केले आहे. जीवनास आवश्यक असलेले, पंचप्राण स्थिर करणारे अन्न व पाणी हे सर्व देवाने निर्माण केले आह.

एवढेच नव्हे तर असा विचार करणारे मन ही देवाचीच देणगी आहे. त्यामुळेच आपण सर्व काही समजून घेऊ शकतो असे रामदास म्हणतात.


अभंग – १०९

भावार्थ –  

स्वतः सर्व काही करूनही स्वतःकडे कर्ते पणा घेणारे अनेक अकर्ते होऊन गेले आहेत ते लोक समुदायात असोत अथवा वनात एकांतात असोत पूर्ण समाधानात राहातात .संत रामदास म्हणतात अशा लोकांचे अंतरंग ,त्यांचे विचार समजून घेऊन त्या पासून योग्य तो बोध घ्यावा.


अभंग – ११०

भावार्थ –

आपण आकाशाला चिखल लावायला लागलो तर आपलेच हात चिखलाने माखून निघतात. वर तोंड करून आकाशावर थुंकलो तर ते परत आपल्याच तोंडावर पडते.

आपल्या ह्रदयांत वास करणाय्राला अभद्र शब्द वापरले तर ते परतून आपल्याच मनाला दुःख देतात .रामदास म्हणतात जशी आपली बुद्धी तशी सिद्धी आपणास प्राप्त होत.


अभंग – १११

भावार्थ –

राघवाच्या घरी धार्मिक ग्रंथांचे सतत श्रवण मनन व निरुपण अखंड चालू असते.हाच केवळ एकच ध्यास असतो. सारासार विचारांचे मंथन सुरू असते असे सांगून संत रामदास म्हणतात याचा अनुभव स्वतः साधकाने घ्यावा. साधकाच्या जीवनाचे सार्थक हेच साध्य मानले जाते.त्यातच खरे समाधान मिळते असे संत रामदास सांगतात.


अभंग – ११२

भावार्थ

आपल्याच सावलीच्या खांद्यावर बसता येणे ही गोष्ट अशक्य असते.असे कधी घडले नाही.दुसरा कोणी नसताना स्वरूपाविषयी सुखाने संवाद होऊ शकत नाही. तेथ द्वैत निर्माण होते व त्यामुळे अद्वैताला कमीपणा येतो.सुखव दुःख हे दोन्ही आपल्या वृक्तिशी संबंधित आहेत. जेथे सुखदुःखाची जाणीवच नाही तेथे द्वंद्व संपूर्ण जाते.

सुखाच्या अतीत असलेला अनंत परमेश्वराचे दर्शन घ्यावे.तो निराकार निरंजन आहे. संत रामदास म्हणतात संत वृत्तिशुन्य असतात. त्यांच्ये मन शांत सरोवरा सारखे असते.त्यांच्या मनात वृत्ति उठत नाहीत तरीही त्यांना देवदर्शनाची, रामरूपाची अत्यंत गोडी वाटते.अनुभवाशिवाय हे जाणता येणार नाही असे संत रामदास म्हणतात.


अभंग – ११३

भावार्थ –

जे बोलता येणार नाही ते बोलावे करता येण्याजोगे नाही ते करण्याचा प्रयत्न करावा.जेथ पर्यंत चालत जाता येत नाही तेथे जावे.अशा ठिकाणी नवलाईच्या गोष्टींचा योग येतो. तेथे जीवपणा संपूर्ण जातो.जीवा शिवाचे मिलन होते.जे आपल्या हातात येत नाही ते घेण्याचा प्रयत्न करावा.संत रामदास म्हणतात सहज समाधीच्या अवस्थेत बुद्धी दृढ होत.


अभंग – ११४

भावार्थ –

मी तूंपणाचे द्वैत विवेकामुळे नाहिसे झाले. आपल्या सुखाचा वाटा देऊन देवाने सुखी केले.देवाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात खूप दिवस निघून गेले पण जीवनाचे सार्थक होण्याची वेळ अकस्मात आली .आणि वैकुंठीच्या वाटा सापडल्या.तेथे एकाएकी देव सापडला मोठा लाभ झाला याचे वर्णन करून सांगता येणार नाही.


अभंग – ११५

भावार्थ –

संत रामदास म्हणतात यगेश्वर एकाएकी डोळ्यासमोर प्रगट झाला आणि आश्चर्य असे की योगेश्वराचे रूप चारी बाजूंनी नित्य निरंतर दिसू लागले.रामरुपाने देव भक्तामधील सर्व अंतर व्यापून टाकले आणि समागमाचे सुख मिळाले.

रामाचा समागम झाल्यामुळे वियोगाचं दुःख संपले. विवेकाने वियोगाचे दु:ख लयाला जावून श्रीरामाचा कायमचा सर्वकाळ योग प्राप्त झाला.


अभंग – ११६

भावार्थ –

या अभंगाचा प्रारंभी संत रामदासांनी राघवाचा धर्म गाजत राहो राघवाची कीर्ती दुमदुमत राहो ठिकठिकाणी राममंदिरांची स्थापना केली जावो अनेक भक्तांमुळे ती मंदिरे शोभायमान होवोत अशी मंगल प्राथना करीत आहेत.

आपण बलोपासना करावी ,सर्व शत्रूंना शक्तीच्या प्रभावाने रोखावे ,व अशाप्रकारे इहलोक व परलोक साधावे असा उपदेश रामदास करतात.अगणित दुखे भोगावी लागली रामा शिवाय जन्म गेला हे आपण कुणाला सांगू शकत नाही. आणि समर्थचा दास असल्याने कुणाला काही मागू शकत नाही असे रामदास म्हणतात.


अभंग – ११७

भावार्थ –

या अभंगात संत रामदास रामाचे रसाळ वर्णन करीत आहेत रामाच्या वदनावर सुहास्यअसून तो लावण्याची खाणी आहें. राघवाच्या कपाळावर टिळा लावला आहे .

मस्तकावर सुवासिक फुलांच्या माळा आहेत.गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे.पाया मध्ये तोड गाजताहेत.हातामध्ये कोदंड धारण केला आहे. राघव जीवांचे जीवन आहे आणि विशेष म्हणजे राघव रामदासांवर प्रसन्न आहे.


अभंग – ११८

भावार्थ –

संत रामदास म्हणतात हनुमंताचे कुळ प्रसिद्ध आहे त्यांच्या भुभुकाराने,किलबिलाटाने सर्व परिसर व्यापून राहिला आह.असे वाटते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांचे सांगाती व्हावे.त्यांना डोळे भरून पाहावे.हे ऐकून कुणाला हसायला येईल परंतु त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही कारण प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्याशी विचारविनिमय करत असत.

श्रीरामा सभोवती ती वानरसेना वेढा घालीत अस. आपल्या शक्तीने या भूगोलोकाला पालथा घालू शकतील एवढी त्यांची शक्ती होती. केवळ झाडाचा पाला खाऊन त्यांनी राघवाची सेवा केली ही त्यांची करणी आपल्याला आपले जीवन व्यर्थ ,लाजिरवाणें आहे असे वाटायला लावते. ते रामाचे दास असून वृत्तीने अत्यंत उदासीन आहेत. शिवाय त्यांना कसलीच अपेक्षा नाही. रामावर त्यांचा दृढ विश्वास आहे.त्यांच्या भक्तीची सर कुणालाच येणार नाही. असा आपला स्वामी हनुमंत आहे असे रामदास म्हणतात.


अभंग – ११९

भावार्थ –

श्रीराम हा वैकुंठीचा देव असून देवांचा कैवारी आहे तो सर्वांचा आत्मा असून धरणीचा भार हलका करण्यासाठी सूर्यवंशात अवतार धारण केला आहे.प्रजेचा पालनकर्ता असून योग्यामधील सर्वश्रेष्ठ योगी आहे .श्री राम अयोध्येचा राजा असून अत्यंत सामर्थ्यवान आहे .आपल्या प्रजेला न्याय नीती व सुख देणारा मेघ च आहे.

अहिल्येचा उद्धारकर्ता ,एकपत्नी ,सत्यवादी आहे .रामनामाचा जप स्वतः शिवशंकर करतात.प्रभू रामचंद्र अनाथांचे नाथ असून हनुमंताचे स्वामी आहेत. संत रामदास म्हणतात श्रीराम हा अंतकाळी सुटका करणारा मोक्षदाता आहे.


अभंग – 120

भावार्थ –

संत रामदास या अभंगात हनुमानाचा महिमा सांगत आहेत. ते म्हणतात हनुमान निरंतर रक्षण करणारा आपला कैवारी आहे .लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तो द्रोणागिरी सारखा पर्वत तळहातावर घेऊन आला.

संत रामदास म्हणतात हनुमंता सारखा जगाचे रक्षण करणारा जगजेठी पाठीशी असताना आणखी कशाचीच अपेक्षा करण्याचे कारण नाही.त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा.


अभंग – १२१

संदर्भ –

या अभंगात संत रामदास ममतेचा घात करा असे सांगत आहेत .ममता म्हणजे माझे पणा किंवा ममत्व त्यामुळे माझे व दुसऱ्याचे असा दुजाभाव वाढीस लागतो .त्यामुळे क्रोध आवरणे कठीण होते.

मनात ममत्व निर्माण झाले की संतांचा उपदेश आवडेनासा होतो परिणामी संतजन दुरावतात. संत रामदास म्हणतात बुद्धी हरण करणारी ममता मनातून काढून टाकावी तिला देशोधडीला लावावें.


अभंग – १२२

भावार्थ –

या अभंगात रामदास संतांचा महिमा सांगत आहे .ज्यांना रामभक्तीचे उदंड वेड लागले आहे असे सज्जन अगदीच थोडे असतात. मोठ्या भाग्याने त्यांच्या संगतीचा लाभ होतो. ते सर्वांच्या अंतकरणातील विचार जाणतात. अहंकाराने कधीच गुरगुरत नाहीत .अशा संत – सज्जनां वरुन आपले प्राण ओवाळून टाकावेत असे संत रामदास म्हणतात .अज्ञानी लोकांचे कठोर भाषण सहन करतात. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करीत नाहीत.

कुणीही विचारल्याशिवाय समजुतीच्या गोष्टी सांगतात .ते सर्वांना समभावाने वागवतात। जे दीनदुबळे आहेत त्यांच्याकडे धाव घेतात .अभिमान ,गर्विष्ठपणा त्यांना अजिबात आवडत नाही .सज्जन कधी आपला व परका असा दुजाभाव करीत नाहीत .भाविक लोक संतांचा उपदेश ऐकताच त्यांच्या विचारात बदल घडून येतो .संत रामदास म्हणतात आपण रात्रंदिवस या संतांची वाट पाहतो व त्यांची संगती घडवून आणावी अशी राघवाला प्रार्थना करतो.


अभंग – १२३

भावार्थ –

संत रामदास म्हणतात जगात अनेक थोर माणसे आहेत पण अत्यंत चतुर,विवेकी,समाधानी व सद्‍गुणी सज्जन मात्र नित्य,निरंतर शोधूनही सापडत नाहीत.असें सज्जन ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ धन्य होय.अशा संत सज्जनांचा शोध घेताना आपले मन उदासीन झाले आहे.


अभंग – १२४

भावार्थ –

या अभंगात रामदास साधुसंतांकडे एक मागणे मागत आहेत .त्यांनी आपल्या मनामध्ये गोविंदाचे गुण गाण्यासाठी प्रेम निर्माण करावे .सांसारिक सुखदुःखा मुळे वृत्ती शून्य झाल्याने मनातील आसक्ती ,आशा ,तृष्णा यांचा लोप झाला आहे .आता देहबुद्धीमुळे भोगायला लागणारे प्रारब्धाचे भोग राहिले नाही .

उदासीन वृत्ती निर्माण झाल्याने संतपदी आश्रय घेऊन गोविंदाचे गुण आठवून त्याचे कीर्तन करावे व त्याविषयी अंतरात निरंतर प्रेम असावे एवढी एकच इच्छा उरली आहे, ती साधुसंतांनी पूर्ण करावी अशी याचना संत रामदास करतात.


अभंग – १२६

भावार्थ –

या अभंगात रामदास श्रीरामा जवळ पावन भिक्षा मागताहेत कोणताही संदेह नसलेली भक्ती ,नवविधा भक्तीमध्ये अगदी शेवटची आत्मनिवेदन भक्ती ,कोणत्याही विषयाशी एकरूप होऊन त्यातील अर्थ ग्रहण करण्याची शक्ती, सज्जनांची संगती ,केवळ साक्षीभावाने अलिप्तपणे येणारा ब्रह्मानुभव, स्वामींची अनन्य भावाने सेवा करण्याची वृत्ती श्री रामाने आपणांस द्यावी अशी प्रार्थना करून शेवटी संत रामदास म्हणतात ,माझ्या मीपणाचे, अहंकाराचे विसर्जन करून श्रीरामाने आपल्याला भेट द्यावी.


अभंग – १२६

भावार्थ –

या अभंगात संत रामदास जे लोकांसाठी हितकारक, सुखकर ,सुखदायक आहे अशा गोष्टींची रघुनायका कडे मागणी करीत आहेत.आपली वाणी कोमल व कृती निर्मळ असावी असे ते म्हणतात.

आपल्याला इतरांचे अंतरंग जाणून घेण्याची कला द्यावी त्यामुळे लोकांची अतूट मैत्री मिळवता येईल असे संत रामदास म्हणतात.वैभवा बरोबरच ते अंतकरणाची उदासीनता मागताहेत.अभंगाचे शेवटी रामदास म्हणतात की आपल्याला काय मागावे हे कळत नाही पण तेच रामाने आपल्याला द्यावें आणि रामाचे प्रेम सतत हृदयात रहावें अशी मागणीही ते करतात.


अभंग – १२७

भावार्थ –

या अभंगात रामदास गुंणधाम रामाकडे उत्तमगुणांची मागणी करीत आहेत. मधुर संगीत ,गायन करताना मुद्रेवर दिसणारे रसाळ भाव ,मनोहर शब्दांनी सजवलेली आकर्षक कथा याबरोबरच व्यवहारातील नित्य सावधपणा व विपुल पाठांतर हे सर्व गुण आपल्याला द्यावेत असे संत रामदास म्हणतात.


अभंग – १२८

भावार्थ –

संत रामदासांच्या हा अभंग धावा या स्वरूपाचा आहे. माणसाला दुर्लभ मनुष्य देह मिळूनही विषय वासनेमुळे श्रीरामाच्या प्रेमाला आपण पारखे झालो आहोत.मनुष्य जन्माला येऊन आयुष्य व्यर्थ घालविले असा पश्चात्ताप संत रामदास व्यक्त करतात.नयना सारखी दिव्य देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणाऱ्या मेघश्याम राम दर्शनाचे सुख आपणास लाभले नाही याबद्दल ते खंत व्यक्त करतात.

सावध कर्णेंद्रिय मिळूनही रामगुण कीर्तनाचा लाभ झाला नाही.सहा प्रकारच्या रसांनी युक्त असलेल्या भोजनासाठी लंपट असलेली जीभ रामनामाचा जप करण्यास मात्र विसरली. सुवासिक फुलांचा ,फळांचा सुगंध घेण्यास चटावलेली श्रवणेंद्रिय श्रीरामाच्या पदकमली वाहिलेल्या निर्माल्याचा सुगंध चाखू शकली नाही.सुवर्ण भुषणांनी सुखावलेल्या हातांनी कधी रामाची पूजा केली नाही.सर्वश्रेष्ठ अशा मस्तकाने कधी रामाचा पदकमलांना वंदन केले नाही.अशा असंख्य अपराधांना दयाघन श्रीरामानें क्षमा करावी असे संत रामदास विनवणी करून अत्यंत कृपाळूपणे ही आस पुरवावी असे सांगतात.


अभंग – १२९

भावार्थ –  

अत्यंत कृपाळू उदार गुणगंभीर अशा श्री रामाला शरण जाऊन संत रामदास म्हणतात की ,जन्माला येण्याचे दुःख वर्णन करून सांगण्यासारखे नाही परंतु श्रीरामाने त्यातील उणिवा काढून उपाय केले आहेत.बाळपणापासून वेड्या मनाने श्रीरामाला अनेक वेळा सांकडे घातले ते इतके झाले आहे की कुणाला सांगता येत नाही.

आपल्या जीवनाच्या सर्व मागण्या श्रीरामांनी पूर्ण करून जीवन साजरे बनवले.श्रीराम त्रैलोक्याचे स्वामी असून आपल्यासारख्या अनाथांला नाथ बनून सनाथ केले, समर्थ बनवले. संत रामदास शेवटी म्हणतात श्रीरामाने अन्न देऊन या देहाचे पोषण केले. येथे आपले काही नसून सर्व संसार देवाचा आहे.


अभंग – १३०

भावार्थ –

या अभंगात रामदास आपले स्वामी राघव अत्यंत दयाळू असून आपल्या अंतःकरणाची स्थिती ते जाणतात.त्यामुळे त्यांना विनंती करून सांगण्याची जरूर नाही पण प्रथम श्रीरामाने दयाळूपणे कोड पुरवून तशी सवय लावली आहे,तेव्हा त्यांनी अशी उपेक्षा करणे योग्य नाही.

आतुरतेने वाट बघणाऱ्या या दासाला त्यांनी भेट द्यावी.कंठ दाटून आल्याने अधिक बोलता येत नाही असे संत रामदास म्हणतात.


अभंग – १३१

भावार्थ –

कमळासारखे मुख असलेला ,राक्षसांचा विनाश करणाय्रा श्रीरामांना दीनबंधू ,दयासिंधु असे संबोधून संत रामदास श्रीरामाची महती सांगत आहेत .शबरीची उष्टी फळे ,दासा वर प्रेम करणाऱ्या भक्तवत्सल श्रीरामाने सेवन केली. आपल्या चरणस्पर्शाने अत्यंत सुंदर अशा अहिल्येचा गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता करून उद्धार केला.

रामचरणांचे नित्य चिंतन करतात अशा वानरसेनेशी श्रीराम हितगुज करतात.रावणबंधू बिभिषणावर कृपा करून श्री रामाने त्याला आपण जिंकलेले लंकेचे राज्य देऊन उपकृत केले. असे विश्वाला मोहिनी घालणारे श्रीराम, दासांचे पालन करतात असे रामदास म्हणतात.


अभंग – १३२

भावार्थ –

या अभंगात रामदास श्रीरामाला दयाळा, दीनबंधो भक्तवत्सला असे संबोधून धाव रे रामराया अशी विनवणी करीत आहेत .मीपणाच्या अहंकाराने मनामध्ये गर्व निर्माण झाला ,देहबुद्धीने विषयाच्या चिखलात लोळत असताना त्याची किळस वाटेनाशी झाली आहे.या संसारात अनेक व्यथा भोगाव्या लागत आहे.प्राणांतांच्या वेदना सहन कराव्या लागताहेत.वाट बघून नयन थकून गेले आहेत.

आपली हाक ऐकून करुणाघन राघवानें मारुतीच्या खांद्यावर बसून व त्वरेनें दर्शन द्यावे अशी विनंती करून संत रामदास म्हणतात की त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण धरणी वर लोळण घेऊन आपल्या केसांनी राम चरणधूळ झाडू.वैद्यराजे राघवाने दयेचा कमलकर मस्तकावर ठेवून कृपा औषध द्यावे व दासाला भव रोगातून मुक्त करावे.


अभंग – १३३

भावार्थ –

संत रामदास म्हणतात की, दुःखकारी अहंमन्यता व अनावर लोभ याने आपण पराधीन बनलो आहोत .ही पराधीनता सहन करवत नाही ,सरत नाही व धीर धरवत नाही.केवळ दुःखाचे अपहरण करणारा राघवच यांतून सुटका करू शकतो.


अभंग – १३४

भावार्थ –

या अभंगात रामदास रामरायाला जनहिताचा विचार करून त्यांचे कल्याण करण्यासाठी आळवीत आहेत.सतत चुकत जाणार्‍या अपराधी लोकांना मदत करण्याची विनंती करीत आहेत.

संत रामदास म्हणतात परिस्थिती अधिकाधिक कठीण बनत आहे. कोठे जावे काय करावे हे कळेनासे झाले आहे. जीवाची तळमळ होत आहे.म्हणून मदतीसाठी याचना करीत आहेत.राघवाने अज्ञानी लोकांना सावराव योग्य मार्ग दाखवावा कारण रामाच्या दयेची सर कशालाच येणार नाही.


अभंग – १३५

भावार्थ –

श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे पतितपावन आहेत. ते दिनानाथ असून त्यांच्या पायावर आपण माथा ठेवत आहोत. ते दीनबंधू, दया सिंधू आहेत. त्यांचा जयजयकार असो. अशी रामस्तुती संत रामदासांनी या अभंगात केली आहे.


अभंग – १३६

भावार्थ –

परमात्म्याशी एकरूप होण्याची कला शिकलेला भक्त गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून भक्तीचे खोटे प्रदर्शन करीत नाही. नाद बिंदु कला लोकांच्या दुःखाचा अग्नी शांतवून दीनांचे रक्षण करते व भक्तांचा भ्रम घालूवून आत्मरुपाचा सुख सोहळा दाखवते. त्याता एकपणा साधता न आल्यास योग्यांची माऊली वेगळी रहाते.

योग्यांची माऊली सगळीकडे भरून राहिली आहे असा बोध होताच देहबुध्दी वेगळी होते या अनुभवाचे वर्णन केवळ परावाणीतच करणे शक्य आहे. आत्म भावाने एकरूप झालेल्या रामदासांना रामरूप नयना शिवाय केवळ अंतर्दृष्टीने बघता आले असे रामदास म्हणतात.


अभंग – १३७

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात की नरापेक्षा वानर चांगले ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी रामाचे दर्शन घेतले ज्या वासरांवर श्रीरामाने विश्वास ठेवून त्यांच्याशी हितगुज केल, युद्धाच्या योजना आखल्या.कोणत्या भाग्याने त्यांना भगवंताच्या भेटीचा लाभ झाला असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात परमात्म्याशी भक्तिभावाने एकरूप झालेले वानर निच योनीतले असले तरी आपण त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून वंदन करू.

त्यांची स्तुती पर गीते गात राहू की ज्यामुळे रघुनाथाचे भक्तिप्रेम उपजेल. रामदास शेवटी म्हणतात आपणही त्या वानरासारखा भक्तिभाव धरून भक्तिप्रेमाचा निर्धार करूं की ज्यामुळे आपल्याला श्रीरामाच्या भेटीचा प्रसाद मिळेल.


अभंग – १३८

भावार्थ –

जो केवळ पूर्णब्रह्म म्हणून ओळखला जातो त्याचे वर्णन शब्दांनी करणे शक्य नाही.नंदराजा त्याचे पिता आणि यशोदा माता आहे तो क्षीरसागरात रहात असून प्रत्यक्ष लक्ष्मीच्या स्वामी असूनही अर्जुनाचा सारथी बनून त्याच्या घोड्यांचा खरारा करतो त्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.जातीपातीचा कोणताही भेद भाव न करता तो केवळ अनाथांचा नाथ आहे.

तो चोखामेळ्या सारख्या आपल्या आवडत्या भक्ताबरोबर दही दूध भाताचे जेवण करतो. नंदाचा नंदन असून त्याच्या सर्व सुखाचा कंद आहे.संत रामदास म्हणतात आपणास त्याचा नित्य छंद असून त्याचे नाव आपण प्रेमाने गात असतो.


अभंग – १३९

भावार्थ –

या अभंगात संत रामदास सांगतात की ,भक्तिभावाने नारायणाचे भजन करावे त्यामुळे जीवनाचे सार्थक करणारा क्षण सहज येतो.भजन पंथ हा आचरणास अगदी सोपा आहे.या मार्गाने गेल्यास यथावकाश मुक्ती सहज प्राप्त होते. असे म्हणतात बालवयात तीर्थयात्रा करणे शक्य नाही बुद्धी अल्प असल्याने धार्मिक ग्रंथांची पारायणे होऊ शकत नाहीत.या गोष्टींसाठी कष्ट करून मन व बुद्धी थकवण्यापेक्षा भजन मार्गाने गेल्यास राम कृपेचा सहजच अनुभव येतो.


अभंग – १४०

रामाची करणी ।
अशी ही पहा दशगुणें आवरणोदकीं ।
तारियली धरणी सुरवर पन्नग निर्मुनियां जग ।
नांदवी लोक तिन्ही रात्रीं सुधाकर तारा उगवती ।
दिवसां तो तरणी सत्तामात्रें वर्षति जलधर ।
पीक पिके धरणी रामदास म्हणे आपण निर्गुण ।
नांदे ह्रदयभुवनीं

भावार्थ –

या अभंगात संत रामदास श्रीरामाचे महात्म्य वर्णन करीत आहेत. समुद्राने वेढलेली धरणी श्रीरामाने तारली आहे. देव, मानव , पन्नग यांची निर्मिती करून स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांचे पालन करीत आहेत.

रात्री चंद्र तारे व दिवसा सूर्य आपल्या तेजाने प्रकट करीत आहेत. श्रीरामाच्या सत्तेने मेघ वर्षाव करतात व धरतीवर पिके पिकतात. संत रामदास म्हणतात असा हा निर्गुण परमात्मा सर्वांच्या ह्रदयांत नांदत आहे.


अभंग – १४१

भावार्थ –

या अभंगात संत रामदास राघवाची कृपा पाहिजे असे म्हणतात.मनातील विषय वासनांचा निरास होऊन मन उदासीन होण्यासाठी, इंद्रियांवर संयम ठेवून त्यांचे दमन करण्याची शक्ती येण्यासाठी,निंदा करणाऱ्या लोकांमध्ये राहून सुद्धा समाधानी वृत्तीने जगण्यासाठी, लोकांनी केलेली निंदा हेटाळणी सहन करण्याची सहनशीलता येण्यासाठी ,रामाची कृपा पाहिजे असे संत रामदास सांगतात.


अभंग – १४२

भावार्थ –

संत रामदासांनी या अभंगात नामाचा महिमा सांगितला आहे. मृत्युचें महाभय निवारण करण्यासाठी,चित्त शुद्ध होऊन बुद्धी दृढ होण्यासाठी, संतांची संगती मिळवून महा दोषांचे निवारण होण्यासाठी नाम हेच एकमेव साधन आहे संत रामदास सांगतात की,रामनाम हे सिद्धांचे साधन आहे. अखंड रामनामाचा जप ही सिध्दांची खूण आहे.


अभंग – १४३

भावार्थ –

या अभंगात संत रामदास गुरु भक्तीचा महिमा सांगताहेत. वेद ,वेदांत ,योग ,याग या कठीण मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा अत्यंत सहज सोपा असा गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवून,गुरु चरणांचा आश्रय घ्यावा.

संसारसागर तरून जाण्यासाठी नरदेहाची बळकट नौका लाभली असताना मूर्खपणाने तिला विषय वासनेत बुडवून नीच योनींत जाण्याचा धोका पत्करू नये.संत रामदास विनंती करीत आहे की आपण हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे.


अभंग – १४४

भावार्थ –

आध्यात्मिक ,आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापां पासून सुटका करणारे ,संसार सागरातून तारून नेणारे हे गुरुचरण आहेत.गुरु चरण हे आत्मसुखाचे बीज असून ज्ञानाचे भांडार आहे.साधकांना भक्ती पंथाला लावणारे, डोळ्यांना श्रीरामाचा साक्षात्कार घडवणारें गुरुचरण शांतीचे आगर व कृपेचे सागर आहेत.सकल जीवांना पावन करणारे गुरुचरण रामदासांचे जीवन आहे ,असे संत रामदास म्हणतात.


अभंग – १४५

भावार्थ –

ज्यांच्या मुखात राघवाच्या नामाचा जप नाही त्याचे जीवन व्यर्थ होय.मानव जन्म हा परत परत मिळणार नाही तो दुर्लभ आहे. या जन्मात आत्मा व अनात्मा अविनाशी व विनाशी यांचा विचार केला नाही तर हा जन्म मातेला कष्ट देणारा, व्यर्थ ठरतो. साधकाचे हजार अपराधांना गुरुमाऊली क्षमा करते व त्याच्यावर कृपा करते.

नामस्मरण करून भिक्षा मागून खाल्याने सुद्धा जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास सांगतात. आत्‍ताच बोध घेऊन मनातील सर्व भेदाभेद ,संशय ,संकल्प – विकल्प यांचा त्याग करून गुरुंना शरण जावे, त्यांचे पाय धरावे


अभंग – १४६

भावार्थ –

या अभंगात रामदास सितारामशी सख्य म्हणजे मैत्री जोडण्यास सांगत आहेत .त्यामुळे साधकाचा देह पवित्र होईल असे ते म्हणतात.बाह्यजगातील कल्पनेच्या चित्रांना भुलून निश्चल बसणे हे अनर्थाचे मूळ आहे.

रामचरण हे अंतिम विश्रांतीचे ठिकाण आहे.धन संपत्तीचा मोह सोडून देऊन कुणाशीही वैरभाव न ठेवता दया पूर्ण व्यवहार असावा, नाहीतर या सर्व गोष्टी वाया जातील. श्रीराम हे रामदासांचे जीवन आहे त्यासाठी साधना केल्यास श्रीराम हे संसाराचे बंधन तोडून टाकतील.


अभंग – १४७

भावार्थ –

सुरेल सुखदायक गायन करणारा गायक , अखंडपणे साधना करणारा साधक, विवेक आणि वैराग्य असलेला हरिभक्त यांचे भजनी लागावे असे संत रामदास या अभंगात सांगतात.


अभंग – १४८

भावार्थ –

प्रपंच हा दुःखाचा झपाट्याने वाढणारा गगनचुंबी वृक्ष आहे. त्याला सुखाची फळे लागतील हा केवळ भ्रम आह. त्यावर फळे आल्याचा भास निर्माण होतो ती पाडाला लागली आहेत असेही वाटते.

परंतु मुळात बघितले तर तो निष्फळ आह. या झाडावर दोन पक्षी वस्ती करून आहेत. एक अत्यंत उदासीन असून पूर्णपणे निरपेक्ष आहे. दुसरा पक्षी कडू – गोड सर्वच फळे सेवन करतो व त्याचे कशानेच समाधान होत नाही. या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घेणारे दुःखाने होरपळून निघतात. तरीही आत्मरूप प्राणी त्याचा निवारा शोधतात.संत रामदास म्हणतात या वृक्ष संत जणांसाठी तो कल्पवृक्ष होतो व त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळतो.


अभंग – १४९

भावार्थ –

अज्ञान हे आकाशासारखे असीम ,अनंत आहे.मुक्ती अतिशय बळकट आहे पण भक्ति ही मुक्तीपेक्षा गोड आहे. अत्यंत सहज साध्य व सर्व अपेक्षा पूर्ण करणारी आहे संत रामदास म्हणतात ,श्री रामाचे दास्यत्व करावे आणि भक्ती भावाने लोकांचा उद्धार करावा.देवाची दया सर्वांना मिळावी कुणीही उपेक्षित राहू नये.


अभंग – १५०

भावार्थ –

पीक येण्यासाठी बी पेरले पण त्याची योग्य निगराणी केली नाही तर सर्व काही व्यर्थ जाते. रोग निवारण्यासाठी अनेक औषधे घेतली परंतु पथ्य सांभाळले नाही त्याप्रमाणेच स्वतःच्या वैभवाच्या गोष्टी बोलणारा भीक मागून जगू लागला. संत रामदास म्हणतात प्रत्यक्ष करणे शिवाय बोलणे व्यर्थ आहे. उपाय शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न वाया जातात.


अभंग – १५१

भावार्थ –

या अभंगात संत रामदास जगरहाटी बद्दल बोलत आहेत. जीवनात वार्धक्यामुळे शक्तीचा ह्रास होतो व त्यांना बालकासारखे काहीसे परावलंबित्व येते.बालपणातून तारुण्यात कडे जाताना शक्तीची वृद्धी होते व पुढे परत वृद्धपण.अशाप्रकारे श्रेष्ठाला कनिष्ठ पणा व कनिष्ठाला श्रेष्ठपणा प्राप्त होतो.


अभंग – १५२

भावार्थ –

या दृश्य जगाच्या सोहळा पहाताना वाटते की,राम याहून वेगळा आहे.असे ज्ञान झाल्यानंतर विचारांती ज्ञानाचे विज्ञान झाले पण तेही पंचभौतिक विश्वांत विलीन झाले. संत रामदास म्हणतात आता श्री रामांनी कृपा करावी व आपणांस सगुण रूपात दर्शन द्यावे.


अभंग – १५३

भावार्थ –

या अभंगात संत रामदास निरंजनाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत.न चालणारा, न बोलणारा ,न हलणारा, डोळ्यांना न दिसणारे असे निरंजनाचे स्वरूप आहे.ज्याला नाम नाही जो निराकार आहे निर्मळ असून तो निश्चळ आहे.

जो सर्व काही करीत असूनही अकर्ता आहे. सर्वसत्ताधीश असूनही केवळ साक्षीरूपाने आहे असे सर्वस्वी निरपेक्ष उदासीन वृत्तीने रामरुपाशीं एकरूप झालेले रामाचे दास हे निरंजनाचे स्वरूप आहे.


अभंग – १५४

भावार्थ –

संत रामदास म्हणतात आज ज्ञानाने भक्तीचा रस चाखला कारण देव भक्तांच्या भक्तीभावाला पावला व विश्वातील सर्व ठिकाणी स्वरूपानें विलसू लागला. भक्तिप्रेमामुळे वेडा होऊन त्याने स्वपद भक्तांना अर्पण केले.जगात राहणारा ईश म्हणजे जगदीश. या देवानें अनेक रूपे, अनेक वेष धारण केले.

जनांमध्ये बसून ऐकणारा श्रोता तोच असतो आणि बोलणारा वक्ता ही त्याचेच रूप.तो अनेक गोष्टी बघतो आणि अनेकविध पदार्थांचा रस चाखतो. सर्वांच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या वृत्तींशी एकरूप होतो . स्वतःच ज्ञानेश्वर बनून ज्ञानाचे विवरण करतो.एकटा असूनही सर्व देहांना आत्मरूपाने चालवतो.सर्व काही करीत असूनही एका स्थळी दिसत नाही रामदास म्हणतात तोच तो आज देवरुपाने आपल्याला दिसला.


अभंग – १५५

भावार्थ –

सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम हा सर्व जीवांचे विश्रांतीचे स्थान आहे असे असूनही देहबुद्धी मुळे मनामध्ये संशय विकल्प निर्माण होऊन या विश्वासाला तडा जातो.

माणूस यम,नियम प्राणायाम या साधनेच्या मागे लागतो. वेद,पुराणे ,संतवचने यातून वर्म शोधण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा कर्मकांडांचा आश्रय घेतो.अनेक प्रकारच्या उपासना ,उपास – तापास ,व्रते करतो विष्णुसहस्त्रनाम तर कोणी शिवलीलामृताची पारायणे करतो.संत रामदास म्हणतात श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.


अभंग – १५६

भावार्थ –

या अभंगात रामदास म्हणतात भक्ताला देव दर्शनाचा लाभ झाला.त्याला ज्ञानाचा लाभ झाला. कामना पूर्ण झाली. गुरू वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला. आत्माराम अंतर्यामी राहून हा देह चालवतो असा दृढ निश्चय झाला. जीवा शिवाची अखंड भेट झाली.त्याचा वियोग कधीच संभवत नाही.

संत रामदास म्हणतात देव भेटल्यामुळे मनाला संतोष वाटला. दुःख पूर्णपणे विलयास गेले.आनंद सुख सागर उचंबळून आला.आत्तापर्यंतच्या सेवेचे उत्तम फळ मिळाले. आत्मज्ञाना मुळे जन्माचे सार्थक झाल. इहलकी व परलोकी कल्याण झाले.


अभंग – १५७

भावार्थ –

वैकुंठवासी विष्णूंनी त्रेतायुगात श्री रामाचा अवतार घेतला. कौसल्या राणीच्या पोटी राम जन्म झाला. विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून ताटकेचा त्याने वध केला.वनामध्ये मार्गक्रमण करताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिचा उद्धार केला.जनक राजाच्या नगरीत शिवधनुष्याचा भंग करून जानकीला स्वयंवरात वरले. पराक्रमी परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला पण श्रीरामाला घाबरून धनुष्य देऊन आपल्या प्राणांचे रक्षण केले. आपला पिता ,राजा दशरथाला कैकयीच्या वचनातून मुक्त करण्यासाठी वनवास पत्करला.

14 वर्षे शेषावतार लक्ष्मणाबरोबर वनवास भोगला.सुग्रीवाला न्याय देण्यासाठी वालीचा वध केला. सागरावर पाषाण टाकून सेतू बांधून लंकेत प्रवेश करून,रावण, कुंभकर्णाला मारून देवांना बंधनातून मुक्त केले बिभिषणाचे रक्षण करून लंकेचे राज्य त्याला परत दिले.अयोध्येस परत येऊन भरताला भेटले.रामायणातील या सर्व घटनांचा उल्लेख करून संत रामदास म्हणतात सर्व प्राण्यांचे हृदय त्याचे नाव रामराव. म्हणजेच रामदासांचा स्वामी आत्माराम.


अभंग – १५८

भावार्थ –

देवळाचे घुमट, किल्ल्याचे तट येथे पिंपळाचे रोपटे उगवतात.तेथे पाण्याची विहीर मोट नसताना त्यांना पाणी मिळते.खडक फोडताना आत मध्ये जिवंत बेडकी दिसते. तिच्या मुखात पाणी कोण घालतो.आकाशात पाण्याचे बुडबुडे कधी दिसत नाही ते कोरडे असूनही चहूंकडे पाण्याचे सडे घालून पिक उगवतं.संत रामदास म्हणतात ही सगळी रामाची किमया आहे. श्रीराम सर्वांना अन्नपाणी पुरवतो.


अभंग – १५९

भावार्थ –

संत रामदास म्हणतात देव भक्तांची कधी ताटातूट होत नाही तेव्हां भेट होण्याचा प्रश्नच नाही. सर्वकाळ देव आणि भक्त एकाच ठिकाणी असताना भेटीसाठी तळमळणे म्हणजे मृगजळाच्या पाण्यात बुडण्याची कल्पना करण्यासारखे आहे. भक्ताच्या मनात आणि जनात देवच भरून राहिलेला आहे देवाने आपल्याला दूर करू नये अशी विनंती संत रामदास आपल्या स्वामीला करतात.


अभंग – १६०

भावार्थ –

आपण देहाने जरी हे जग सोडून गेलो तरी सर्वांच्या अंतरात राहून हिताचे बोल सांगत राहीन असा दिलासा संत रामदास आपल्या शिष्यांना देत आहेत. देहबुद्धी सोडून देऊन आत्म बुद्धीने वागावे त्यामुळे भक्ती मुक्तीची दारे उघडतात.बुद्धी जेव्हा स्वाधीन होते तेव्हा मन बुद्धीची चाकरी करू लागते. हे साधन करावे असे संत रामदास म्हणतात.


अभंग – १६१

भावार्थ –

हा शेवटचा अभंग म्हणजे संत रामदासांनी केलेली रघुनायका ची प्रार्थना आहे. चारच छोट्या ओळींची ही प्रार्थना मन आकर्षित करते. सदा सर्वदा आपणांस रामाचा योग घडावा ,रामाचा कार्यासाठी हा देह कारणी लागावा, गुणवंत अनंत राधवानें आपली उपेक्षा करू नये हे एकच मागणे ते रघुनायका कडे मागतात.


अभंग – १६२

भावार्थ –

रामचरणाशी मन एकाग्र होतांच मनाचे उन्मन होते म्हणजेमन अधिक उन्नत होते .मी तू पणा विलयास जातो.संसाररुपी माया विरून जाते. मनाला झालेल्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होते पण त्या अनुभवाचे वर्णन करण्यास शब्दच सापडत नाही.ज्ञानाचे विज्ञान होऊन वृत्तिची निवृत्ति होते.ध्यानधारणेची पुढील पायरी म्हणजे सहज समाधी अवस्था प्राप्त होते.संत रामदास म्हणतात कीं, जे बोलून व्यक्त करायचे ते पुढे अनिर्वाच्य होते.रामरुपाशी एकरूप होण्याचा हा अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही.


अभंग – १६३

भावार्थ –

या अभंगात संत रामदास ज्ञानाची महती सांगत आहेत.ज्ञानाशिवाय जे जे प्रयत्न ते सर्व विफल होत,असे प्रत्यक्षभगवंतांनी सांगितले आहे आणि हे बोल चित्तात धारण केलेपाहिजे.ज्ञानामुळे सर्व कर्माचे सार्थक होते, त्या शिवाय सर्वनिरर्थक होय.संत रामदास म्हणतात ज्ञानविहीन प्राणी म्हणजे केवळ पाषाण होय.


अभंग – १६४

भावार्थ –

रामापासून जो अलग झाला तो पतित व परमात्याशी जो एकरूप झाला तो पावन झाला.म्हणुनच परमात्म्याला पतितपावन म्हणतात.देव आणि भक्त जेव्हां एकरूप होताततेव्हां तेथे दुजेपणाचा लोप होतो.देव हे भक्ताचे मूळ स्वरूपआहे या विचारांत सतत रममाण होऊन राहणे यातच खरे सख आहे.आपण कोठून आलो व आपल्या जीवनाचे प्रयोजनकाय याचा बोध करुन घेण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे संत रामदास स्वप्रचिती घेऊन सांगत आहेत.


अभंग – १६५

भावार्थ –

संत रामदास या अभंगात सद्गुरूचा महिमा वर्णन करीतआहेत.ज्याच्यामुळे हा जीवन प्रवाह सुरळीत चालला आहे त्याचेच स्मरण करायला विसरणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.भूमिभार होऊन जगणे आहे.गुरूकृपेशिवायजीवन निरर्थक आहे हे वचन प्रमाणभूत आहे.सद्गुरूशिवायजीवनाला गती नाही कारण संसाराच्या मायारूपी बंधनापासून सुटण्याचा गुरूकृपा हाच एक मार्ग आहे.याचाविचार न करता आपण अविचाराने या मायाजाळांत गुंतून पडतो आणि सगळा जन्म ओढाताणित व्यर्थ घालवतो.कांहीकाळ संसारातिल कर्तव्य व कांही वेळ रामभजनी लावावाव मानव जन्माचे सार्थक करावें असे संत रामदास सांगतात.


अभंग – १६६

भावार्थ –

इंद्रियांवर निग्रहाने संयम मिळवून त्यांना विषयांपासून विरक्त करणे,मनाचा चंचलपणावर मात करून त्याला विषयाचे ध्यान करण्यापासून परावृत्त करणे,बुध्दी परमात्मस्वरुपाचा बोध करवणारी असून तिच्या सहाय्याने परब्रह्माचा अनुभव घेणे,सप्रेम भक्ति,ज्ञान,वैराग्य या सर्वांचा पारमार्थिक लाभ होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचीनितांत गरज असते.संत रामदास म्हणतात सत्व,रज,तम या त्रिगुणांच्या पलिकडे जाऊन निर्गुणसुख लाभणे केवळ गुरूकृपेनेच शक्य होईल.


अभंग – १६७

भावार्थ –

या अभंगात संत रामदास साधकाच्या मनातिल संदेह वत्यावरील उपाय सांगत आहेत. सगुणाची उपासना करावी असा निश्चय साधक मनोमन करतो परंतू परमेश्वराचे सगुणरूप नाशवंत असून त्याची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचीउपासना करावी,त्याचे भजन करावे असे मत लोक बोलून दाखवतात त्या मुळे साधक द्विधा मनस्थितीत सापडतो.

निर्गुणाचे भजन करावे तर ते रूप डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही आणि सगुणरूपही सदासर्वकाळ दिसत नाही तरकाय करावे या संभ्रमात सर्वकाळ निघून जातो आणि आतां केव्हां मोक्ष मिळेल अशी विवंचना मनाला ग्रासून टाकते.संतरामदास म्हणतात एका सद्गुरूवचनावर पूर्ण विश्वास ठेवून,संपूर्ण शरणागती पत्करून आत्मनिवेदन भक्तीने परमेश्वरचरणी लीन होऊन मोक्ष मिळवावा.


अभंग – १६८

भावार्थ –

संत रामदास या अभंगात प्रतिज्ञेवर सांगतात की, गुरूशिवाय कोणत्याही माणसाला यमयातना चुकवता येणार नाहीत.निरंजन परमेश्वराची प्राप्ती सद्गरूशिवाय शक्य नाही . यासाठी तनमनधनाने सद्गुरूची उपासना केली पाहिजे.सद्गुरूकृपेने यमयातनेची चिंता तात्काळ निरसून जाईल यासाठी संत रामदास लवकरात लवकर गुरूचरणांचा आश्रय घेण्यास सांगत आहेत।


अभंग – १६९

भावार्थ –

या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू श्री रामाचा महिमासांगत आहेत.आपले सद्गुरू श्रीराम हे एकमेव अद्वितियअसून तेथे द्वैताला जागाच नाही.त्यांनी सर्व चराचर व्यापले असून त्यांत ते निर्विकारपणे सामावले आहेत.संत रामदासम्हणतात आपण श्रीरामांच्या निराकार स्वरूपाशी एकरूपझाले आहोत.


अभंग – १७०

भावार्थ –  

संत रामदास म्हणतात, श्रीकृपेची ज्योती माझ्या लोचनांत अचानक प्रकाशित झाली.कापूस,वाती आणि तेलाशिवायतेवणारी ही असामान्य ज्योती आहे.दिवा व अग्नीशिवाय प्रकाश देणारी ही कृपेची ज्योत म्हणजे दैवी अनुभवाची खूण आहे.


अभंग – १७१

भावार्थ –  

संत रामदास म्हणतात स्वर्ग,पृथ्वी,नरक या तिनही भुवनांना क्षयरोगाची बाधा आहे.हे सर्व विश्व नाशवंत आहे.केवळ आपले सद्गुरू हे परमेश्वरी तत्व अविनाशी आहे.जे जे या अविनाशी तत्वाला शरण गेले त्या परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालें तेच केवळ शाश्वत झाले.राम चरणाशी शरण जाऊन रामदास क्षयातीत झाले.


अभंग – १७२

भावार्थ –  

संत रामदास म्हणतात,ज्याच्या केवळ एका वचनाने सर्व ब्रम्हांडाचे तीर्थक्षेत्र बनले त्या आपल्या सद्गुरूचा चरणस्पर्श सकळ तीर्थाचा मुकुटमणी आहे.जो साधक त्यांचा महिमा जाणून घेईल त्यालाच हे समजून येईल.


अभंग – १७३

भावार्थ –

हे अनेकरुपी विश्व एकाच चैतन्य तत्वातून साकारले आहे.विश्वाचे हे अनेकत्व एकाच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे.ही आत्मप्रचितिची ,स्वानुभवाची गोष्ट आहे.हे आत्मतत्व कोठून व कसे आकारास आले याचे वर्णन वेदांच्या ज्ञानकांडात केलेले आहे संत रामदास म्हणतात, हे रहस्य सद्गुरूकृपेमुळे समजून येते.


अभंग – १७४

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,गुरू अनेक प्रकारचे असतात पण सद्गुरू एखादाच असतो.सद्गुरूवाचुन ज्ञानविचार समजत नाही.ज्या प्रमाणे खरा रत्नपारखीच रत्नाची खरी पारख करू शकतो त्या प्रमाणे गुरू केला म्हणजे आत्मप्रचिति येत नाही.लक्ष साधुंमध्ये एखादाच सद्गुरू असतो जो आत्मप्रचिति देऊ शकतो.आत्मप्रचिति नसलेला साधक संकटांत सापडतो.त्याला सद्गती म्हणजे मोक्षलाभ होऊ शकत नाही.


अभंग – १७५

भावार्थ –

हा संसार सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे.या भव सागरांत मद,मोह,लोभ,मत्सर या सारखे अत्यंत दुष्ट असे भयानक मासे आहेत,ते अनिवार त्रास देणारे आहेत.त्या षड्ररिपुंना मोक्षाची ईच्छा करणारा साधक अतिशय घाबरून सद्गुरूंची वारंवार प्रार्थना करु लागतो.अशा वेळीं सद्गुरू साधकाला मदत करून भवसिंधुपार नेतात.अनन्यशरण अशा दासाला दीनजनांचा आधार असलेले करुणामय सद्गुरूच वाट दाखवतात.


अभंग – १७६

भावार्थ –  

या अभंगात संत रामदास सद्गुरूचा धावा करीत आहेत.ते म्हणतात,अंतकाळीं जन्मदाते मायबाप कामास येत नाहीत.त्या वेळी सद्गुरू सारखा कोणी सांभाळ करणारा नाही.कोरड्या डोहांत पडलेला मासा जसा पाण्याविणा तळमळतो तशी आपली अवस्था झाली आहे.चकोर पक्षी जशी चंद्रोदयाची,गाय वासराची,आई लेकराची,हरिणी पाडसाची आतुरतेने वाट पहाते त्या प्रमाणे संत रामदास आपल्या कृपाळु सद्गुरूची आळवणी करीत आहेत.काळाचा ग्रास होण्यापूर्वी श्री रामाने आपणास दर्शन द्यावे असा धावा ते करीत आहेत.


अभंग – १७७

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,आपल्या सद्गुरूंनी अभिनव करणी केली.एकही शब्द न बोलतां त्यांनी केवळ दर्शनाने या चंचल मनाचे हरण करुन ते विलयास नेल,पंचमहाभूतांचा हा नाशवंत पसारा निजबोधाने क्षणांत नाहिसा झाला.मीपणाच्या अहंकाराचे ओझे उतरवून चरण कमलांशी शाश्वत स्थान प्रदान केलें.


अभंग – १७८

भावार्थ –

सद्गुरू हे आनंदाचे कंद असून त्यांचा आपल्याला छंद लागला आहे,त्यांच्या चरणाशी बांधला गेल्यामुळे आपण पुर्णपणे निंद्य बनलो आहे.सद्गुरूंचे पाय काशी गयेसारखे तीर्थस्थाने असल्याने आपली आधिभौतिक,आधिदैविक,आध्यात्मिक या तिनही तापांपासून सुटका करावी अशी विनवणी करून संत रामदास परत परत सद्गुरू चरणांना वंदन करतात.


अभंग – १७९

भावार्थ –

तिनही तापांचे हरण करणारे,संसारसागर तारून नेणारे,आत्मसुख देणारे,ज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवणारे,भक्तिपंथास लावून श्रीरामाचे दर्शन घडवणारे सद्गुरूचे हे चरणकमल शांतीचे आगर असून पूर्णकृपेचे सागर आहेत.हे गुरुपद सर्व जीवांना पावन करणारे आहेत असे संतरामदास या अभंगात सांगतात.


अभंग – १८०

भावार्थ –

या अभंगात संत रामदास संत – सज्जनांची महती सांगत आहेत.सगुण व निर्गुणाची उपासना या विषयीं अनेक मत – मतांतरे आहेत, यातून सत्य काय आहे हे समजून घ्यावे निर्गुण हेंच अंतिम सत्य मानावे. या ज्ञानातूनच भक्तीचा उगम होऊन साधक प्रेमळ भक्त बनतो.यासाठी संत – सज्जनांना शरण जावे,सदा सर्वकाळ संतांच्या संगतीत राहावें.


अभंग – १८१

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,साधकाने प्रपंच सुखाने यथासांग करावा पण मनाने मात्र संतसंगतीची आस धरावी.या संसार सागरातून तरून जाण्याचा संतसंग हा एकच मार्ग आहे,याच अनुभव घ्यावा.परमेश्वराच्या रम्य कथांच्या निरूपणांचा अतिप्रीतीने अस्वाद घ्यावा आणि संसारांत राहून स्वता:चा उध्दार करून घ्यावा.माया असूनही सर्वकाही नाही ही क्षणभंगूरता विचाराने समजून घ्यावी.


अभंग – १८२

भावार्थ –

ज्याची संगत जशी असेल त्या प्रमाणेच तो वागत असतो,त्या प्रमाणेच त्याची कर्म गती ठरते.सर्वकांही जे चांगले,वाईट घडते ते संगतीच्या गुणांमुळेच घडत असते.साधूंच्या संगतीने साधक साधू बनतो असे संत रामदास स्वप्रचितीने सांगतात.


अभंग – १८३

भावार्थ –

दुर्जनांचा संग मनोभंग करणारा असतो तर सज्जनांचा सहवास सुखकारी आहे कारण त्या मुळे मनाचा संताप नाहिसा होतो,दु:ख दूर होते,शोक नाहीसा होतो.संत सहवासात मन लोभातीत होते आणि निर्लोभी मन क्षोभापासून मुक्त होते.संताप ,दु:ख, लोभ व क्षोभ नाहिसे करून निरामय शांती सुखाचा अलभ्य लाभ संतसंगामुळे घडून येतो.त्या मुळे देहबुध्दी विलयास जावून आत्मसुखाचा लाभ होतो असे श्रीरामी मन गुंतलेले संत रामदास आत्मप्रचीतीने सांगत आहेत.


अभंग – १८४

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,साधकाच्या जिवनांत सासर हे प्रवृत्तिसारखे असून माहेर हे निवृत्ति प्रमाणे आहे.नववधूला माहेरची ओढ अनिवार असते कारण तेथें संसारातिल दु:ख काळजी ,चिंता या पासून मुक्तता असते तर सासर हें प्रवृत्तिसारखे आहे,सासरच्या जबाबदार्यां पासून सुटका नाही.संसारांत राहून सतत लौकिकाचा विचार करावा लागतो त्यामुळे निवृत्तिचा विवेक दूर जातो,जसे स्त्री ला माहेर पारखे होते ,प्रयत्न करुनही विवेकाचा मार्ग सापडत नाही हा विवेकाचा मार्ग केवळ संताच्या संगतिनेच सापडू शकेल असे संत रामदास अनुभवाने सांगतात,


अभंग – १८६

भावार्थ –

पूर्ण बोध असलेला साधू कसा ओळखावा याची लक्षणे संत रामदास या अभंगात सांगत आहेत, सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेमभाव असणें, कोणताही वैरभाव नसणे हे साधूचे प्रथम लक्षण आहे.तो पूर्णपणें नि:संदेह , संशयातित असतो तसेच त्याची देहबुध्दी संपूर्ण नाहीशी झालेली असते,खेद आणि राग या पासून मुक्त असून कांचनाचा (पैशाचा) अजिबात मोह नसतो. या सुलक्षणावरुन खरा साधू आओळखावा.


अभंग – १८७

भावार्थ –

या अभंगात संत रामदास म्हणतात, आपले संत हे सज्जन असे साधुजन आहेत, त्यांच्या सहवासाने मनाचे समाधान होते, मनाला शांतता लाभते.संत सदासर्वकाळ सारखेच समाधानी असतात त्यां मुळे ते जिवलग मित्रा प्रमाणे आवडतात,त्यांचा सहवास सुखदायी असतो.संताचा सहवास पापनाशक असतो म्हणून आपल्याला तो आवडतो असे संत रामदास म्हणतात.


अभंग – १८८

भावार्थ –

साधक परमेश्वर प्राप्तीसाठी पर्वतांची शिखरे, कडेकपारी धुंडाळतात,नाना शास्त्रांचा अभ्यास करतात त्या साठी खूप कष्ट करतात. संत रामदास सांगतात,आपल्याला संतसंगती मुळेच परमेश्वर प्राप्ती झाली.पूर्ण भक्तिभावाने संतांना शरण जाणे हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे ,


अभंग – १८९

भावार्थ –

ब्रह्मा, विष्णु,महेश या देवांना मिळण्यास कठिण असलेला परमात्मा साध्याभोळ्या प्रेमळ भक्तांना मात्र सुलभ असतो कारण मोठेपणाचा अहंकार व ज्ञानाचा गर्व नसतो.भक्तांना योग,याग ,यज्ञ ,तप तीर्थयात्रा यांपैकी कोणतेही साधन आवश्यक वाटत नाही. संत रामदास म्हणतात,संत सज्जनांच्या कृपेशिवाय हा सर्व साधनांचा आटापिटा व्यर्थ आहे.


अभंग – १९०

भावार्थ –

संतांच्या संगतित असतांना देव सतत भक्तांचा पाठिराखा असतो,त्याला पाठिमागे सोडून जाऊ म्हटले तरी सोडवत नाही. देव सतत बाहेर व अंतरंगात सामावलेला असतो.पर्वताच्या शिखरावर, कडे व कपारिमध्ये ,वनांत व घरांत तो नेहमीच सोबतिला असतो.दिवस रात्री, तीर्थक्षेत्रीं हा परमेश्वर संतांच्या संगतीत असलेल्या भक्तांची साथ सोडत नाहीं.


अभंग – १९१

भावार्थ –

जेथे संत सज्जनांचा समुदाय असेल तेथें जाऊन उभे राहावें श्रीरामाचे गुण गाणाय्रा,रामकथा आवडीने ऐकणाय्रा त्या रामदासांना डोळ्यांनी प्रत्यक्ष बघावें आणि त्यांना लोटांगण घालावें कारण तेथें स्वता: श्रीराम भक्तांच्या कथा ऐकण्यासाठीं आलेला असतो. जेथें राम तेथें दास असणारचया विषयीं दृढ विश्वास असावा.


अभंग – १९२

भावार्थ –

शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरींत निवास करणाय्रा, सावळ्या सुंदर रामरूपाचे मनामध्यें ध्यान करावें कानामध्ये रत्नजडित कुंडले असलेला श्रीराम लावण्याची खाण असून सूर्यवंशाचे भुषण आहे.संत रामदास म्हणतात,श्रीराम रामदासांचे जीवन आहेत.


अभंग – १९३

भावार्थ –

संत रामदास म्हणातात,आपल्या स्वामींचे स्थान अत्यंत शोभायमान आहे.तेथें कमला सारखे लोचन असलेल्या श्रीरामांची सुंदर मूर्ती शोभून दिसत आहे जो हनुमंताचा स्वामी आहे.सूर्यवंशाचे भूषण असलेला हा श्रीराम एकवचनी एकबाणी असून भक्तांचा विसावा व रामदासांचे भूषण आहे.


अभंग – १९४

भावार्थ –

श्री रामाचे सतत स्मरण करावे ,रामाचे रूप व गुण अंतरात साठवावे .रामचरणाचे तीर्थ गंगोदका प्रमाणे पवित्र असून महापातकांचा नाश करणारें आहे.रामचरणांचा दास मारुती चिरंजीव झाला अशी त्याची किर्ति आहे.रामचरणांना वंदन करणारा बिभीषण लंकेचा राजा बनला.शबरीची बोरे चाखून श्री रामाने तिला मोक्षाची अधिकारी बनवलें अशा कृपाळू रामाच्या कथांचे कीर्तन करावें असे या अभंगात संत रामदास सांगतात.


अभंग – १९५

भावार्थ –

या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू कसे नाहीत हें सांगत आहेत.श्रीराम हे गणांधिपती गणेशा सारखे लाडु, मोदक खाणारे नाहीत किंवा चंडी,मुंडी या शक्तिदेवतां प्रमाणें मद्यमांसाचा नैवेद्य मागणारे नाही.श्रीराम भैरव खंडेराया सारखे भरित रोटी घेऊन प्रसन्न होणारे नाहीत ,जोखाई सारखे रागावून पीडा देणारे नाहीत तसेच भूताखेतांची बाधा टळावी म्हणुन लिंबू,नारळ मागत नाहीत.सद्गुरू श्रीराम सर्व प्राणिमांत्रांच्या सगळ्या कामना पुर्ण करणारे – असून सर्व जीवांना विश्राम देणारे सर्वोत्तम देवाधिदेव आहेत.


अभंग – १९६

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,जो जीवन मरणाच्या चक्रातून सोडवतो तो सर्वश्रेष्ठ देव होय,बाकी सगळे नाथिलें म्हणजे लटके किंवा खोटे आहे.पुण्यप्रतापी असा श्रीराम सर्व लोकांमध्ये प्रसिध्द असून प्रतापी हे नांव केवळ राघवालाच शोभून दिसतें.तो श्रीराम रामदासाचा स्वामी आहे.


अभंग – १९७

भावार्थ –

अणुपासून जगातील सर्व ठिकाणी रघुवीर व्यापून राहिला आहे,एकदां वृत्ती राम स्वरुपांत विलीन झाली कीं,दिसणारें आणि न दिसणारें सर्व विश्व हरपून जाते,केवळ रामरूपच अंतर – बाह्य व्यापून उरतें..


अभंग – १९८

भावार्थ –

श्रीराम हे ईच्छीलें फळ देणारा कल्पतरु ,चिंतामणी किंवा कामधेनू असून रघुनाथाचे राज्य येतांच भक्तांचे भाग्य उदयास आले.रामराज्यांत सर्वच पाषाणांचे परिस बनले असतां ,त्यांचा लोभ कोणाला वाटणार?रामराज्यांत सर्वच डोंगर रत्नांचे बनले आणि सरोवरे अमृताची बनली,अवघी पृथ्वी सुवर्णमय झाली.अशा समृध्द रामराज्यांत कुणालाही काहिही कोठेही नेण्याची अभिलाषाच राहिली नाही .असा हा ब्रह्मदेवापासून सामान्य जनांच्या कामना पूर्ण करणारा श्री राम आपल्या अंतरंगांत वास करतो असे संत रामदास या अभंगात म्हणतात.


अभंग – १९९

भावार्थ –

हा संत रामदासांचा आपले स्वामी श्री मारुती यांच्यावर लिहिलेला अभंग आहे. या अभंगांत ते म्हणतात आपले स्वामी ब्रह्मचारी असून सर्व स्रिया त्यांना मातेसमान आहेत. जन्म होतांच जेव्हां श्री मारुतीने आकाशातील लालभडक सूर्यबिंब पाहिलें आणि हे फळच आहे असे समजून ते खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली.संत रामदास म्हणतात,श्री मारुतीरायांनी अंगावर शेंदुराची उटी लावली असून सोन्याची स्वयंभू लंगोटी परिधान केली आहे.त्यांच्या कानांत कुंडलें झळकत असून गळ्यामध्यें मोत्याच्या माळा शोभून दिसत आहेत.संत रामदास म्हणतात,श्रीमारुती आपली माउली असून त्यांच्या कृपेची साउली आपल्यावर आहे.


अभंग – २००

भावार्थ –

संत रामदासांची मारुतीराया वरील उत्कट भक्ती या अभंगांत दिसून येते.ते म्हणतात जीवावर बेतलेले कोणतेही मोठे संकट आले असतां बलभीमाचे स्मरण करावे .बलभीम आपला सखा ,सहोदर म्हणजे बंधू असून तापदायक अशा कठिण संकटांचे निवारण करतो.बलभीम आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तापत्रयापासून मुक्तता करतो.मारुतीच्या चरणाशीं चित्त जडले असतां तिनही तापांची बाधा होत नाही.ढभहनुमंता सारखा कैवारी जोडल्यामुळे आपणास संचिताचा ठेवा सांपडला असून हनुमंताच्या कृपेचे कवच लाभल्यामुळें कसलेही भय उरले नाही असे संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात.


अभंग – २०१

भावार्थ –

मनामध्ये मारुतीचे सतत ध्यान लागलेलें असेल तर शुभभशुभ शकून पाहाण्याची गरजच नाही. मारुतीचे नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरवात करण्यासाठी पाऊल पुढे टाकावें कारण हनुमंताचे भक्त जेथेजेथे जातात तेथेतेथे हनुमंत पाठिराखा असतो.रामाची उपासना करणार्या भक्तांच्या घरी मारुतीरायाचा सतत वास असतो.संत रामदास भक्तांना अत्यंत कळकळीने उपदेश करीत आहेत की,त्यांनी सतत मारुतीचे ध्यान करावें.


अभंग – २०२

भावार्थ –

संत रामदास अत्यंत चिंतातुर मनाने हनुमंताची वाट बघत आहेत.आपण संकटांत सापडलो असून दसरा कोणिही रक्षण करणारा नाही,अशा वेळीं उशीर न करतां अंजनीसुताने धाऊन यावे आणि आपला प्राणसखा असलेल्या हनुमंतांनी आपणास तातडीने भेटावें अशी कळकळीची विनंती संत रामदास करीत आहेत.


अभंग – २०३

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात,जीव कष्टी झाल्यानें मारुतीची आठवण झाली आणि आनंदाची गोष्ट अशी की, आठवण होतांच मारुतीनें उड्डाण केले. संसारसागरांत माजलेला आकांत पाहून मारुतीने मुखानें प्रचंड आवाज केला.आपणास मारुती शिवाय कोणी तारणारा नाही, निर्वाणिच्या (संकटाच्या अंतिम क्षणीं )मारुतिचे स्मरण करतांच तो धावत येऊन रक्षण करतो.आपले सारे जीवन मारुतिला अर्पण केले की,मन निश्चिंत होऊन मनाचे समाधान होते.राघवाच्या दासाचे स्वरूप पाहून मन उल्हसित( आनंदित )होते.


अभंग – २०४

भावार्थ –

मेरू पर्वताच्या शिखरावर निवास करणारा शिवशंकर(कैलासींचा राणा ) अत्यंत क्रोधायमान झाला.हा अकरावा रूद्र मारूतिच्या रुपानें प्रकट झाला आणि त्याने लंकानाथ रावणाला देशोधडीला लावलें.त्याने लंकेमध्यें उघडपणे खेळ मांडला,घरोघरी अग्नीच्या ज्वाळांनी कहर केला.घरें सुंदर मंदिरें जळून खाक झाली.जानकीचा कैवारी बनून त्याने जानकीचा शोक दूर केला.रामाचा दास हनुमान यशवंत झाला.


अभंग – २०५

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,ज्यांच्या मनामध्ये रामभेटीची उत्कट आर्तता असेल त्यांनी रघुनाथाची कृपा होण्यसाठी हनुमंताची उपासना करावी.आपण हनुमंताची विनवणी केली आणि हनुमंतांनी रामाची भेट घडवली,त्या मध्ये आलेली सर्व विघ्ने निवारून हनुमंतांनी रामभेट घडवून आणली.राम उपासकांवरील अतिप्रेमामुळे त्यांचा कैवारी बनून हनुमंत त्यांची दु:खे निवारण करतो.रामदासांमधील सर्वश्रेष्ठ आणि सिध्दांमध्ये वरिष्ठ सिध्द अशा हनुमंताचे केवळ स्मरण केल्यानें संसार तापापासून सुटका होते.


अभंग – २०६

भावार्थ –

मारुती हा रामाचा मुख्य प्राण असून त्याची पूजा करतांच रामदर्शन घडलें .संत रामदास म्हणतात, भाविकांनी मारुतीचे दर्शन घ्यावे कारण तो रामभक्तांचा सारथी आहे.त्या अंजनीनंदन मारुतीचे आपण सतत ध्यान करतो .


अभंग – २०७

भावार्थ –

वानरकुळाचे भूषण असलेल्या हनुमन्ताचे चित्त सतत श्रीरामाला प्रसन्न करण्यांत मग्न असते.ज्ञान, वैराग्य आणि सुबुध्दी असलेला हा हनुमंत एक साधुपुरुष आहे.तो सतत सावधान राहून आपले चित्त जराही विचलित होऊं न देता रामभजनांत रंगून जातो.संत रामदास म्हणतात, आपण हनुमंताचे लेकरु असून त्यांच्या उपदेशाचा विस्तार (प्रसार ) करतो.


अभंग – २०८

भावार्थ –

पंढरीसारखे तीर्थक्षेत्र आकाश, पृथ्वी,पाताळ या तिन्ही लोकांत ,सर्व भूमंडळावर शोधूनही सापडणार नाही.विठ्ठल मंदिराचा कळस दूरून बघितला तरी भाविकाच्या अहंकाराचा संपूर्ण नाश होतो.येथील संतांच्या भेटी होतांच जन्ममरणाची बंधने तुटून पडतात.चंद्रभागेमध्यें स्नान करतांच भाविकांना सायुज्य मुक्तीचा(पांडुरंगाच्या निकट सानिध्याचा )लाभ होतो.ब्रह्मादिदेवांच्या दृष्टीसुध्दा पडणे कठिण अशा वैकुंठपदाची प्राप्ती होते.संत रामदास म्हणतात,आपली पंढरीच्या पांडुरंगाची भेट झाली आणि त्याच्या पायाला मिठीच घातली.


अभंग – २०९

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,पंढरी एकदेशी नाही कारण विठ्ठ्लाचा सर्वत्र निवास आहे.पाडुरंगाला स्थळ काळाची बंधन नाही.आनंदाने विटेवर उभा असलेल्या विठोबाचे दर्शन आपल्याला झाले.विठोबाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे,रुक्मिणीदेवीचे दर्शन घडते.पंढरीमध्यें आत्मविठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडलें.


अभंग – २१०

भावार्थ –

श्रीराम भक्तांवर कृपा करणारा असून विठ्ठ्ल भक्तांच्या हाकेला धावून जाऊन प्रत्यक्ष मदत करणारा आहे.दोघांचेही स्वरूप एकरूप म्हणजे निराकार आहे.ते हृदयांत एकाकार होऊन राहिले आहेत.त्यांची हृदयातिल वस्ती नरंतर आहे,असे सांगून संत रामदास म्हणतात भाविकांनी मनांत भक्तिभाव धरला तर राघव व पांडुरंग दोघेही कृपेचे सागर आहेत.


अभंग – २११

भावार्थ –

विठ्ठलाचे विटेवरील रूप पाहून वाटते कीं, प्रत्यक्ष चैतन्य मुशीमध्ये ओतून हे रुपडे साकार झाले आहे.विटेवर समचरणीं उभा असलेला पांडुरंग शोभून दिसत आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, विठ्ठलाच्या स्वरूपांत प्रत्यक्ष आत्मरूपच पाहिलें.


अभंग – २१२

भावार्थ –

विटेवरील विठ्ठलाच्या चरणांशीं आपले मन सदा सर्वकाळ गुंतून राहिलें आहे.पंढरपुरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ज्याला आस लागली आहे तो दैवी भक्त असून धन्य होय,जो भक्त पंढरीची वारी करतो त्याला कळिकाळाचे भय नाही,त्याची जन्म – मरणाची वारी चुकते. संत रामदास म्हणतात, कोणत्याही साधनेशिवाय पंढरीची वारी भाविकांना तारून नेते.


अभंग – २१३

भावार्थ –

भक्तांच्या भक्तिप्रमासाठीं वेडा झालेला पांडुरंग चंद्रभागेच्या वाळवंटांत उभा आहे.पांडुरंगाच्या गळ्यामधील वैजयंती माळेच्या पदकाच्या निळसर प्रभेच्या तेजानें सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत.भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने पांडुरंग बंधनांत पडला आहे. विटेवर समचरणांत उभाआहे,हे भक्तिप्रेम डावलून जाऊ शकत नाही.भक्त पुंडलिकाचे भाग्य एव्हढें मोठे आहे की,त्रिलोकेचे दैवत त्याच्यासाठी तिष्ठत उभे आहे.संत रामदास म्हणतात, संसारसागर तारून नेणारे पांडुरंग रुपी तारू भीमेतिरी शोभून दिसत आहे.पुंडलिकाच्या भाग्यामुळे आपल्याला पांडुरंगाच्या कृपा प्रसादाचा चिरंतन लाभ झाला आहे आणि संसार बंधनाची साखळी तुटून पडली आहे.


अभंग – २१४

भावार्थ –

संत रामदास या अभंगात विठ्ठलाला आळवित आहेत. विठुराया आपल्याशी बोलत नाही, मौनरुप धारण केले असून मुखांत गुळणी धरली आहे. आपण विठुरायाकडे मौल्यवान धनाचे गाठोड , वैभव, पत्नी यापैकीं कांहीच मागत नाही. तेव्हां न घाबरता त्यांनी आपले डोळे उघडून कृपादृष्टीने पहावें , एकदां तरी भेटावे अशी कळकळीची विनंती संत रामदास विठ्ठलाला करीत आहेत.


अभंग – २१५

भावार्थ –

आज सोनियाचा दिवस आला आहे कारण आज पांडुरंग रिंगणांत आले असून भक्तां सोबत रंगात आले आहेत.आतां सावध चित्ताने या प्रेमरंगात रंगून जावे,विठ्ठलाच्या पायीं सारे लक्ष केंद्रीत करुन एकाग्रतेनें लीन होऊन रहावें संत रामदास सागतात , देवाचे चिंतन करण्याची ही एकच युक्ती आहे.


अभंग – २१६

भावार्थ –

या अभंगांत संत रामदास आपणास पंढरीच्या आत्मारुप विठ्ठलाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन करीत आहेत.चिच्छत्ति धर्मनदी तरून जाण्यासाठी अहंम् ब्ह्मास्मि या वचनाचा उपयोग करावा लागला.त्यासाठी भावपुर्ण भक्तिची,श्रवण मननाची आणि निदिध्यास यांची कास धरावी लागली.या उपासनेनंतर साक्षात्काराचे वरदान मिळाले. या साक्षात्कारीपणामुळे निर्माण झालेला अहंकार म्हणजे या धर्मनदीतील मोल्यवान पोवळी ,त्यांचा त्याग करुन पैलतीरावरील मंदिरांत प्रवेश केला आणि सच्चिदानंद परमेश्वराचे दर्शन घडलें.प्रत्यक्ष आत्मरूप विठोबा डोळ्यांनी बघावयास मिळाला.


अभंग – २१७

भावार्थ –

श्रीराम अयोध्येचा राजा,त्याने आपला परमभक्त मारुतिला आपले धनुष्यबाणधारी रुप दाखवलें.तोच द्वापारयुगांत कृष्ण हे नाम धारण करून द्वारकेंत नांदत होता. पृथ्वीवरील दुष्ट,पापी राक्षसांचा संहार करून भूभार हलका केला,पांडवांचे राज्य कपटाने हरण करणार्या कौरवांचा संहार करण्यासाठी त्यांचा साह्यकर्ता झाला.आणि आतां कलियुगांत भोळ्याभाविक भक्तांसाठी चंद्रभागेतटी कर कटीवर ठेवून उभा आहे .संत रामदास म्हणतात श्रीराम हाच विठ्ठल होऊन आपणास भेटला ,


अभंग – २१८

भावार्थ –

सावळ्यारंगाचा , दिशा हेंच वस्त्र ज्याने परिधान केले आहे असा आपला विठोबा दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सहजपणे उभा आहे. श्रीरामाचे दास रामदासस्वामी म्हणतात,सहजपणे आपोआप येणाऱ्या अनुभूती फक्त तोच विठोबा जाणू शकतो.


अभंग – २१९

भावार्थ –

मस्त्कावर जटांचा भार असलेला,गळ्यामध्यें वासुकी नावाच्या सापाचा हार घातलेला,अंगाला राख फासून सदासर्वकाळ रामनामाचा जप करणारा,भोळ्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या मस्तकावर आपला अभंयंकर कर ठेऊन आशिर्वाद देणारा अशा गिरिजापती सदा पवित्र ,महादेवाला नमन करून संत रामदास शिवशंकराला आपल्यासारख्या दुबळ्या भक्तावर कृपा करावी अशी विनंती करीत आहेत.


अभंग – २२०

भावार्थ –

आपल्या कुळाचा स्वामी कैलासीचा राजा शिवशंकर याचा महिमा या अभंगांत संत रामदासांनी वर्णन केला आहे.पंचानन (पाच मुखे असलेला )शंकर आपल्या दहा भुजा उचलून भक्तांचे रक्षण करून त्यांचे मनोरथ पूर्ण करतो.तो भक्तांचा कैवारी असून वाघाच्या स्वरूपांत सर्व भूमंडळ केवळ एका द दृष्टीक्षेपात जाळू शकतो,सर्व सृष्टी डोळे उघडतांच जाळून राख करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे.शिवशंकराच्या सामर्थ्याची तुलना इतर कोणत्याही देवदेवतांशी होऊ शकणार नाही.पृथ्वीचे पालन करणारे श्री विष्णुं सुध्दा महादेवाची बरोबरी करु शकणार नाही असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात.


अभंग – २२१

भावार्थ –

संत रामदास म्हणतात, ही सर्व पृथ्वी लिंगाचा विस्तार असल्याने लिंगाकार आहे.सर्व स्थळे महादेवाने व्यापलेली आहेत, एकच रूद्र सगळीकडे व्यापून राहिला आहे ,पाय ठेवायला देखील जागा नाही.हे देवाचे वचन आहे असे जाणून आपण आपला देह त्या सर्वव्यापी परमेश्वराला अर्पण केला.


अभंग – २२२

भावार्थ –

देव खंडोबा शिवाचा अवतार असून तो जेजुरीच्या गडावर वास्तव्य करुन आहे,खंडोबा एका निळ्या घोड्यावर स्वार झाले आहेत तर शिवशंकर धवल नंदीवर विराजमान झाले आहेत.एक महान विभूतीचे लेणे असून भंडारा हे भूषण मानतात.संत रामदास भेदभाव विसरून त्यांच्याशी एकरूप झाले आहेत.


अभंग – २२३

भावार्थ –

सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ भाविकांच्या भक्तिप्रेमामुळे महाराष्ट्रातिल माणदेशी आला आणि सावकाश भक्तांना पावन केले.जे एकाग्रचित्तानें सावकाशपणे यात्रेला जातात ते मनातिल भक्तिभावामुळे पुण्यराशी बनतात.संत रामदास म्हणतात भक्तांनी आपल्या प्रेमभावाने देवाला संतुष्ट ,प्रसन्न करावे आणि हा संसार सागर तरून जावा, जन्म मरणाच्या वारीतून आपली सुटका करून घ्यावी .


अभंग – २२४

भावार्थ –

श्रीरामाला वर देणारी तुळजापूरची भवानी अनंत युगाची माता आहे. तुळजाभवानीचे खरे स्वरूप जो जाणून घेतो आणि सतत लक्ष्यांत ठेवतो तो खरा जाणकार (ज्ञाता ) समजावा, या जगांत कोणती गोष्ट शक्तिशिवाय राहू शकते असा विचार केल्यास यश, किर्ति ,पराक्रम या पैकी एकही गोष्ट शक्तिशिवाय राहू शकत नाही असे ल्क्ष्यांत येते. शिव आणि शक्ति म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय.हे विश्व शिवशक्तिचाच विस्तार आहे हे तत्वज्ञानी लोक जाणतात असे संत रामदास या अभंगात स्पष्ट करतात .


अभंग – २२५

भावार्थ –

संत रामदास साधकाने निर्गृण भक्ती कशी साध्य करावी या विषयी सांगत आहेत .सोहं म्हणजे मी परमात्म्याचा अंश असून तो म्हणजेच मी व मी म्हणजेच तो या वाक्याचा खोलवर विचार करून चिंतन करावे .सनातन (अनंत काळापासून चालत आलेले) ब्रह्म तूच आहेस हे महावाक्य असून आत्मा परमात्मा एकरूप आहेत हाच अर्थबोध होतो ,संत रामदासांना हा अर्थबोध झाला आणि ते निर्गुणासी जोडले गेले.


अभंग – २२६

भावार्थ –

संत रामदास साधकांना सांगतात, आपण मायेभोवती फेर धरला तरच ती आपल्याला कुरवाळून बंधनांत पाडते ,संत मायेच्या बंधनापासून अलग एकटे असतात म्हणून परमेश्वराशी एकरूप होतात व त्यांच्या एकांताचा सुध्दा अंत होतो ,त्यांच्या दृष्टीने माया असून नसल्या सारखीच असते .हे स्पष्ट करण्यासाठी संत रामदासांनी एक अगदी समर्पक उदाहरण दिले आहे ,रामदासी माय जर व्यालीच नाही तर वासराला चाटण्याचा मोहच नाही .संसारापासून मुक्त असलेले संत संसाराच्या मोह बंधनात अडकत नाहीत हेच ते स्पष्ट करतात .


अभंग – २२७

भावार्थ –

या अभंगात संत रामदास वृत्तिची निवृत्ति कशी होते या विषयी बोलत आहेत . संसाराचा दृश्य पसारा सोडून वृत्ति वेगानें नघून जाते तेव्हा साधक चंचळ माया सोडून ईश्वर स्वरुपाशी स्थीर होतो ,सारे भास विरून जातात आणि वृत्ति निर्गुणामध्ये मिसळून जाते .मायेचे सर्व पाश ओलांडून,चराचर सृष्टीच्या पलिकडील निर्गुणाशी एकरुप होते . साधक केवळ वृत्तिरुपाने उरतो, हिच तुर्यावस्था होय असे संत रामदास म्हणतात ,


अभंग – २२८

भावार्थ –

साधक स्वता:चा शोध घेत असतांना त्याला मी पणा कोठे सापडतच नाही,मी पणाचे मूळ न सापडल्याने मी पणाच नाही अशी त्याची धारणा होऊन आपण सर्व ठिकाणी व्यापलेले आत्मतत्व आहोत याचा साक्षात्कार होतो .सर्वत्र व्यापून असलेला आत्मा हाच परमात्मा असून तोच तूं आहेस असे संत रामदास सांगतात .मी देह नसून अविनाशी आत्मतत्व आहोत हे जाणून घेतले पाहिजे .


अभंग – २२९

भावार्थ –

जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत आहे हे सर्वजण जाणतात ,त्या साठी विशेष व्याकरण पटुत्वाची गरज नाही .प्रत्येक घटनेला कांहीतरी कारण असते तसेच घडणाय्रा प्रत्येक घटनेचा परिणाम अटळ असतो हे जाणून घेतले तरच शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींचा उलगडा होतो.संत रामदास म्हणतात,आकाराला आलेली प्रत्येक वस्तु बदलत असते,नाश पावते आणि परत वेगळ्या स्वरूपांत निर्माण होते .शाश्वतासी बदल किंवा विनाश संभवत नाही.


अभंग – २३०

भावार्थ –

जन्म मरण हा केवळ मनाचा खेळ किंवा भ्रम आहे हे पटवून देण्यासाठी संत रामदास अत्यंत समर्पक उदाहरणे देतात .ज्या प्रमाणे सावली हा छाया प्रकाशाचा खेळ आहे,त्या प्रमाणे जन्म मृत्यू हा मनाचा खेळ आहे .रंगभुमीवर काम करणारा नट नाटकातील कथेप्रमाणे हरपला तरी तो नट मरण पावला असे होत नाही.देहाचा लोप झाला तरी मरण आले असे नाही कारण मी देह नसून आत्मस्वरुप आहे हे ज्याने जाणले तो अमर झाला .


अभंग – २३१

भावार्थ –

साधक स्व – स्वरुपाचा शोध घेण्यास निघाला तेव्हां तो एकीकडे ब्रह्म आणि दुसरीकडे माया असा दोन्हीमध्यें सापडला आणि आपणच ब्रह्म आहोत अशी कल्पना केली.ब्रह्म निर्मळ ,निराकार आणि निश्चळ(चंचल नसणारे)तर माया चंचळ आणि चपळ ,पुढे ब्रह्म ,मागे माया त्यामध्ये साधक सापडून त्याच्या मनांत संदेह़ निर्माण होतो . संत रामदास म्हणतात, या सगळ्या मानसिक क्रिया आहेत.


अभंग – २३२

भावार्थ –

या अभंगांत संत रामदास माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत ,ब्रह्म हे आकाशासारखे निश्चळ, निराकार असून माया वायूसारखी अतिशय चपळ आणि चंचल आहे.ब्रह्म निराकार आहे म्हणजे त्याला कोणताही आकार नाही या उलट मायादेवी विविध नावांनी आणि रुपांनी खूप विस्तार पावली आहे .ब्रह्माचे स्वरुप अत्यंत शुध्द व सर्व वस्तुजातापेक्षा निराळे असूनही ते सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला व्यापून राहिलें आहे,ब्रह्मतत्वाशिवाय अणूमात्रसुध्दां जागा रिकामी नाही.ब्रह्म म्हणजे परिपूर्ण ज्ञान असून त्या शिवाय ज्ञान म्हणजे अज्ञान होय .ब्रह्मतत्व जाणून घेतल्याशिवाय भक्ति ही केवळ अभक्ति आहे असे सांगून संत रामदास स्वप्रचितिने सांगतात की, आपणास ब्रह्मज्ञानानेच मुक्ति प्राप्त झाली .


अभंग – २३३

भावार्थ –

या अभगांत संत रामदास एका अनिर्वचनीय अनुभवाचे वर्णन करीत आहेत.अनंत ब्रह्मरुप परमात्म्याचे अंतिम स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना आपण आपले स्वरुपच विसरुन गेलो आहोत ,त्या अनंतरुपांत स्वता:चे रुपच सापडेनासे झालें. आपले स्वरुप ब्रह्म स्वरुपाशी एकरुप झाले आहे असा अनुभव येऊन आपण नि:संग झालो ,आपल्या अस्तित्वाचा भार आपल्यालाच सोसवेनासा झाला आणि सारासार विचार करतांना आपण आणि हे अनंत स्वरुप वेगळे नाही याची जाणिव झाल्याने आपण नि:संग बनलो मुक्तीची उपेक्षा करुन मोक्ष या कल्पनेपासून मुक्त झालो,सर्व अपेक्षा अनंत स्वरुपांत विलीन झाल्या.


अभंग – २३४

भावार्थ –

संत रामदास म्हणतात, जेव्हां चित्तात निखळ ज्ञानाचा झरा उगम पावला तेव्हां अज्ञान आपोआपच दूर झालें ,खूप दिवसांनी श्री रामाची भेट झाली आणि मीपणाच्या अहंकाराचा पडदा सहजपणें गळून पडला.श्रीरामा वरील अतूट भक्तिभावामुळे मी पणाचा भाव खोटा ठरला , श्री राम ज्ञानरूपाने प्रगट झाले.


अभंग – २३५

भावार्थ –

मी म्हणजेच ब्रह्म असे जाणून घेऊन जो त्या बद्दल अभिमान बाळगतो तोच चौथा देह आहे,हे चतुराईने समजून घ्यावे असे संत रामदास म्हणतात.मन, बुध्दी ,अहंकार व चित्त हा चौथा देह असून ही सर्वसाक्षिणी, (विश्वातील सर्व घटनांचे अवलोकन करून त्यांची संगती लावू शकणारी असामान्य क्षमता )या अवस्थेला संत तुर्या अवस्था मानतात.जागृती, स्वप्न, सुषुप्ती (गाढ झोप)व चौथी तुर्या अवस्था मानली जाते.या अवस्थेत साधक गाढ झोपेतही नसतो आणि पूर्ण जाग्रतावस्थेतही नसतो ,या अवस्थेत प्रज्ञा जाग्रुत असून साधकाची अलौकिक प्रतिभा ,विचार शक्ती जाग्रुत होते .या अवस्थेत चौदेहाची गाठी सुटून देहबुध्दी विवेकाने लोप पावतें.अहंकार म्हणजेच मी पणाचा भाव लुप्त होऊन अहंब्रह्म म्हणजेच मी च ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होतो.संत रामदास स्वप्रचितीने सागंतात की या अवस्थेत साधक देहांत असूनही देहातीत अवस्थेंत पोचतो, परब्रह्म स्वरूपाशी एकरुप होतो.


अभंग – २३६

भावार्थ –

या अभंगात संत रामदास सृष्टी कशी निर्माण झाली या विषयी सांगत आहेत . मायेचे स्वरूप ब्रह्मरूपात प्रकट झाले आणि तिच्या पोटी महतत्वाचा जन्म झाला.महतत्वातून सत्वगुण व सत्वगुणांतून रजोगुण निर्माण झाला,रजोगुणातून तमोगुणाचा उदय झाला.तमोगुणातून पंचमहाभूते प्रगट झाली आणि पंचमहाभूतातून सर्व सृष्टी निर्माण झाली .


अभंग – २३७

भावार्थ –

स्वप्न हा मनातील कल्पनांचा खेळ ,केवळ आभास असतो तसा संसार आहे ,विचाराअंती हे कळून येते.स्वप्न जसे दिसते आणि वेगाने दिसेनासे होते ,तसाच संसार दिसतो आणि नासतो.मन मात्र लालचावल्या सारखे होते.संत रामदास म्हणतात निद्राकाळी स्वप्न खरें वाटते म्हणून भ्रम झालेल्या माणसाला निद्रासुख बरेंवाटतें.


अभंग – २३८

भावार्थ –

जीव हे शिवाचे स्वरूप असे सर्वजण म्हणतात परंतू हे रुप प्रत्यक्ष कसे आहे हे कोणीच जाणत नाही,स्वयंभू लिंग समजून पाषाणाची पूजा करतात ,त्याचाच लोभ धरतात. संत रामदास म्हणतात,स्वयंभू लिंग आणि पाषाण यांतील भेद फक्त शहाणे लोकच जाणतात .


अभंग – २३९

भावार्थ –

दोरी बघून भ्रांती पडल्यामुळे दोरीलाच साप समजतो व भितीने गर्भगळित होतो ,अज्ञानामुळे सामान्य माणुस असे वर्तन करतो त्या मुळे त्याला संसार सागर तरून जाणे अवघड जाते असे सांगून संत रामदास म्हणतात की,देव सर्व सृष्टीत,अणुरेणूत व्यापून राहिलेला असूनही आपण त्याला स्थळ कांळाच्या बंधनांत अडकवतो .अनंत परमेश्वराची मूर्ती बनवून त्याची पूजा करतो.जो पूर्ण आहे त्याला अपूर्ण ,जो अविनाशी आहे त्याचे आवाहन व विसर्जन करतो.


अभंग – 240

भावार्थ –

संत रामदास म्हणतात, माणुस आयुष्यभर घरसंसार ,धनधान्य, सगेसोयरे,इष्टमित्र यांच्यासाठी कष्ट घेतो परंतू अंत:काळी सर्व व्यर्थ जाते .घरदार, धनधान्य सगळं सोडून प्राणी चरफडत एकटाच निघून जातो.देह स्मशानांत ठेवून सर्व सांगाती,मित्र, कन्यापुत्र तेथून निघून आप आपल्या घरी जातात .कोणतंही पुण्य त्याच्या कामी येत नाही.


अभंग – २४१

भावार्थ –

माणसाचे मन सतत कल्पनांच्या भरारी घेण्यांत रममाण होत असते ,स्वप्न हेच सत्य समजून तो त्याला घट्ट कवटाळून धरतो . हा सगळा मायेचा खेळ तो खरा आहे असे समजतो.अनेक भव्य,दिव्य ,सुंदर मंदिरें त्याच्या मनाला मोह घालतात ,जीवाला सुखावतात,खूप आनंद देतात.संत रामदास म्हणतात,हा केवळ देहाचा आनंद असून तो नश्वर आहे,स्वप्ना सारखा काल्पनिक आहे.


अभंग – २४२

भावार्थ –

सर्वसामान्यपणे माणुस सतत प्रपंचाची चिंता करीत असतो,प्रपंच्याच्या काळजीने त्याचा जीव कासाविस होतो.त्या मुळे तो देवाला पुजून नवस बोलतो.देव नवसाला पावावा या लोभामुळे काकुळतिला येतो आणि प्रपंचाची चिंता करता करता मरून जातो,शेवटी तो प्रपंचाला व परमार्थाला दोन्हीला पारखा होतो .संत रामदास म्हणतात, प्रपंचाचा लोभ सोडून सर्वभावे देवाची भक्ती करून ,सर्व भाव देवावर सोपवल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतां येईल.


अभंग – २४३

भावार्थ –

देव सर्व घटनांचा कर्ता असून त्यानेच हा सर्व विश्व पसारा निर्माण केला आहे तेव्हां आपण गर्व करणे योग्य नाही.आपला देह देवाचा असून धनसंपत्ती कुबेराची आहे .देव सारे देणारा, नेणारा आणि करविणारा आहे.मनुष्य प्राणी केवळ निमित्तमात्र आहे .लक्षुमी व सर्व सत्ता देवाची असून देवाशिवाय जीवाचे कांहीं नाही या साठी संत रामदास सांगतात कीं,आपण केव्हांही मनाने खिन्न न होतां सावधचित्त असावें .


अभंग – २४४

भावार्थ –

संत रामदास सांगतात, भविष्यातील सर्व घटना दैवाधीन आहेत .त्यांचा अभिमान धरु नये .खूप धन संपत्तीने धनिक भुलून जातात परंतू ती नश्वर असल्याने कालांतराने विनाश पावते .जे स्वता:ला शक्तीशाली समजतात ते शक्तीहीन होऊन लयास जातात ,


अभंग – २४५

भावार्थ –

पसंत रामदास सांगतात ,अभंगातिल शब्दांचे अर्थ समजून न घेतां केवळ घोकून पाठांतर करण्याचे सारे श्रम फुकट जातात .कवनातील अर्थाशी एकरूप होऊन पाठ केले तर त्याचे सार्थक होते ,त्यात सांगितलेला भाव जीवनांत उतरतो आणि जीवाचे कल्याण होते .


अभंग – २४६

भावार्थ –

पाण्यामध्ये पोहतांना भोपळा बांधून पाण्यांत उतरल्यास बुडण्याची भिती नसते ,पण त्या ऐवजी शिळा बांधली तर पोहणारा शिळेसह पाण्यांत बुडून जाणार या साठी ज्या कामासाठी ज्या गोष्टीचा उपयोग करणे योग्य त्यांचाच उपयोग करावा ,अयोग्य गोष्टींचा त्याग करावा.विषवल्ली (जी सेवन केल्यानंतर तात्काळ मृत्यु येतो)व अमरवल्ली ( जिच्यामुळे अमरत्व प्राप्त होते) या दोन्हीही निसर्गनिर्मित आहेत परंतू त्यांचा उपयोग सरसकट करता येत नाही.जे आपल्याला मानवेल तेच स्विकारावे असे सांगून संत रामदास म्हणतात, संत सज्जन धन्य होत ते आपल्या हिताचे असेल ते च करायला सांगतात.


अभंग – २४७

भावार्थ –

त्रिभुवन(स्वर्ग ,पृथ्वी ,पाताळ ) या तिन्ही भुवनांचे सार जे वेदामध्ये स्पष्ट केले आहे ते संत सामान्य लोकांना सांगतात, आपण ते खोटे आहे असे मानू नये कारण ते ज्ञान विश्वतील अनेक लोकांना उपयोगी आले आहे,त्या मुळे अनेकांचे समाधान झाले आहे.संत रामदास म्हणतात,आपला राघवावर दृढ विश्वास आहे कारण श्री रामाच्या कृपाप्रसादामुळेच आपली जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली .


अभंग – २४८

भावार्थ –

संत रामदास या अभंगात लोकनेत्याने कसे आचरण ठेवावे या विषयी मार्गदर्शन करीत आहेत .अनेक लोकांचे अंतरंग समजून घ्यावे,त्या नंतर लोक भक्तिमार्गाला लागतात.लोकांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे,त्यांच्या मनाप्रमाणे वागावे.लोकांना प्रिय असलेले नेतेच लोक संत सज्जन म्हणून स्विकारतात.सरसकट सर्व माणसे सारखी नसतात तेव्हां लोकांना समजून घेऊन योग्य माणसांची निवड करावी.


अभंग – २४९

भावार्थ –

या अभंगात संत रामदास साधकांना मार्गदर्शन करीत आहेत .आपले एक उपास्य दैवत ठरवून भक्तिभावाने त्याची उपासना करावी .त्या मुळे मनातिल सर्व संशयाचे निरसन होते आणि आपले पूर्वगुण पालटतात .केवळ ईश्वर हीच सत्य वस्तू असून बाकी सर्व विनाशी आहे ,याचा विचार करून आपली वृत्ति उदासीन करावी (मोह, माया,राग,लोभ यांचा त्याग करावा .)समाजांत अमान्य असलेल्या (अनर्गळ ) गोष्टींचा त्याग करावा ,मनानें निर्मळ असावे .इंद्रिये ताब्यांत ठेवून ध्यानमार्गाने मनावर ताबा मिळवावा .स्नानसंध्या नित्यनेमाने करावी आणि वाचेने अखंड रामनामाचा जप करावा .जेथें भक्तिभाव तेथे देव असून बाकी सर्व फापट पसारा आहे असे समजून त्याचा त्याग करावा .


अभंग – २५०

भावार्थ –

चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट असते हा कर्मफळाचा सनातन सिध्दांत सागून संत रामदास म्हणतात, दु:खानें दु:ख आणि सुख दिल्यानें सुख वाढते .दुष्ट लोकांकडून दुष्टांना वठणीवर आणावें आणि चांगल्या लोकांना सुशब्दांनी आपलेसे करावें .प्रेमळपणे प्रेमळांना जिंकावें .संशयामुळे मने दुखावली जातात म्हणुन मनामध्यें विकल्प नसावा .श्रीरामाचा दास बनून राघवाचे दास्य करावें आणि राघवाने प्रसन्न होऊन कृपा करावी .


अभंग – २५१

भावार्थ –

आई,वडील,नातेवाईक, सगेसोयरे,प्रिय पत्नी,मुलेबाळे यांच्यामध्यें मन अडकवू नकोस .समाजांत राहातांना लोकमताचा विचार करावा लागतो परंतू त्या गोष्टीचा फार विचार न करतां स्वता:च्या हिताचा विचार करून रामभक्ति करण्यांत आपला वेळ सार्थकी लावावा. आयुष्याच्या शेवटी सर्व सोडून एकट्याला मृत्युला सामोरे जावेंलागते.अंतकाळी एका राघवाचा आसरा लाभतो,तोच जीवन मरणाच्या चक्रातून सोडवणारा आहे. श्री रामाचे सतत स्मरण ठेवून निरंतर रामाचे ध्यान करणे या शिवाय दुसरे सुलक्षण नाही हे समजून घेऊन रामभजनी लागावें असे संत रामदास या अभंगात सांगत आहेत .


अभंग – २५२

भावार्थ –

पाषाणाची (दगडाची ) मुर्ती करून तोच देव आहे असा भाव अंतरात निर्माण केला तर तीच प्रतिमा मनांत ठसतें.जसा भाव तसाच देव दिसतो.विश्वाचा पसारा निर्माण करून परमेश्वर त्या पासून निराळा झाला .संत रामदास म्हणतात , इंद्रियांना दिसणार्या दृष्य विश्वापासून दूर (भावातीत ) झाल्याशिवाय अनंत परमेश्वराचे दर्शन घडणार नाही .


अभंग – २५३

भावार्थ –

आपण परमेश्वराचा अंश आहोत असा अद्वैत भाव मनामध्यें स्नानिर्माण होऊन अहंम ब्रह्मास्मी असा मनाचा निश्चय होतो,तरी भयाची भावना निर्माण होते कारण आपल्या मूळ स्वरुपाचा आपल्याला विसर पडतो.हेच भ्रमाचे लक्षण आहे .एका क्षणी सर्व संशयाचा निरास होऊन मन नराभास होते,आपल्या स्वरुपाशी एकरूप होते तर दुसऱ्या क्षणी आपण व सत्स्वरुप भिन्न असून ,आपण अविनाशी आत्मतत्व नसून मर्त्य मानव आहोत अशी धारणा होते हे देहबुध्दी मुळे घडते असे संत रामदास म्हणतात.


अभंग – २५४

भावार्थ –

कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करून रोज नियमाने स्नान संध्या करुनही मनामध्ये कामक्रोधाची भावना असेल तर हा व्यर्थ खटाटोप आहे .देहदंड करून उपासना केली तर मनाची झळफळ शांत होत नसेल तर हा केवळ बाह्य देखावा ठरतो .त्यामुळे सोवळे, ओवळे हे संदेह मिटत नसतील मनातील नाना कामना,वासना नाहिशा होत नसतील तर हा केवळ देहबुध्दीचा विटाळ समजावा.संत रामदास म्हणतात,राम चरणी दृढ विश्वास असल्याशिवाय या सर्व गोष्टी मातीमोलाच्या आहेत .


अभंग – २५५

भावार्थ –

झाडापासून कापसाचे वस्त्र (सुडकें ) मिळते तर हाडापासून रेशमी वस्त्र (पटकर) ,या वर सखोल विचार केला तर समजते कीं, सोवळे कोणते.घरोघर जाऊन पाहिले तर हे लक्ष्यांत येते कीं, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे (कढीची धार एकच आहे ) संत रामदास म्हणतात,सोवळे ओवळे ,न्यायनिती यांचा निवाडा हिंगावाचुन चालत नाही म्हणजे जिवनावश्यक गोष्टींशिवाय होत नाही तेव्हा न्याय,निती,सोवळें , ओवळे यांचा सतत विचार करु नये.


अभंग – २५६

भावार्थ –

जीवनांत सीतापतीचा (श्रीरामभक्तीचा ) लाभ होणे हा सर्वात मोठा लाभ आहे या शिवाय संतांची संगती लाभणे हा दुसरा महत्त्वाचा लाभ होय .भक्तिचा जिव्हाळा हा सर्वात थोर लाभ आहे असे सांगून संत रामदास म्हणतात कीं,हरिकथेचे सतत श्रवण , मनन आणि निरुपण तसेच दानधर्म आणि परोपकार हे जीवनाचे सार आहे ,


अभंग – २५७

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।।
याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।।
बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ।।
रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ।।

भावार्थ –

संत रामदास म्हणतात कीं, जेव्हां साधकाच्या जीवनांत पाप पुण्याचे माप सारखे होते,समानता घडते तेव्हांच नरदेहाची प्राप्ती होते. पुष्कळ जन्मांचे शेवटी हा योग घडून येतो आणि त्यानंतर परत पुण्कोटी नरदेहाचा लाभ मिळत नाही या साठी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व आपला उद्धार करून घ्यावा.


अभंग – २५८

भावार्थ –

साधकानें पवित्र तिर्थस्थाने बघण्यासाठी तेथे जाऊन त्याच्या देहमनाची शुध्दता कशी होते , पाप धुऊन जावून पुण्य कसे झाले याचा प्रत्यय (अनुभव )कसा आला,दोषापासून सुटून प्राणी मुक्त कसा झाला हे कसे समजून घ्यावे यानंतर वैकुंठाची प्राप्ती होणार हा विश्वास कसा निर्माण झाला .संत रामदास म्हणतात, केवळ देवावरील अढळ विश्वासामुळें हिताचे स्वहित झालें.


अभंग – २५९

भावार्थ –

साधक पवित्र तिर्थस्थानी जाऊन तेथील पावन नदीच्या जलांत (मनकर्णिका)स्नान करण्याचा संकल्प पुर्ण करतो या पुण्याने त्याचे अंतरंग अमल होते.या शुध्द अंतकरणाने साधक आपल्या गुरु चरणांशी प्रेमाने शरणागत होतो.संत रामदास म्हणतात,रामकृपेच्या पवित्र जलांत रामाचे दास अंतरंगाने मलीन राहूच शकणार नाही .कारण हा त्रिवेणी संगम आहे।


अभंग – २६०

भावार्थ –

संत रामदास म्हणतात , आत्माराम सर्व अणुरेणुमध्ये व्यापून राहिला आहे .असे एकही ठिकाण नाही कीं,तेथे आत्माराम नाही. मन, बुध्दी आणि लोचन यापैकीं कोणत्याही आंतर किंवा बाह्य ज्ञानेंद्रियांनी पाहिले तरी रामाशिवाय अन्य कांही दिसत नाही.रामाने हे त्रिभुवन व्यापून टाकले आहे त्या मुळे तीर्थाटना साठी स्थानच उरले नाही.जेथे जावे तेथे श्री रामच भरून राहिला आहे.


अभंग – २६१

भावार्थ –

सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म तोच आपला आत्माराम आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,संध्यासमयी सुर्याला केलेले वंदन म्हणजे विश्वातील सर्व प्राणिमात्रास केलेले नमन होय.येथे संध्या करतांना आचमनास देखील ठिकाण नाही. ज्या वेळी भूत, भविष्य ,वर्तमान हे तिन्ही काळ एकमेकांत मिसळून जातात अशी संध्याकाळची वेळ साधून कळिकाळाला तीन वेळा पाणी देवून संत रामदास आपली संध्या करतात.


अभंग – २६२

भावार्थ –

ॐ काराचे म्हणजे प्रणवाचे मूळबीज श्री रघुवीर असून त्याचा उच्चार मंत्राच्या प्रारंभी केला जातो .अखिल विश्व ब्रह्मरुप असून सतत ब्रह्मयज्ञ चालू असतो.देव, ऋषी ,पितृगण केवळ श्रीरामांच्या नामस्मरणाने प्रसन्न होतात.ब्रह्म हे कोणत्याही संदेहा पलिकडील स्थिति असून मंत्रोपचारा पूर्वी – करावयाचे सव्य, अपसव्य (डावे,उजवे ) हे केवळ उपचार आहेत असे सांगून संत रामदास म्हणतात,श्रीराम या विश्वाला आतून बाहेरुन व्यापून राहिला आहे .संसाराला तिलांजली देऊन संत रामदासांनी हा ब्रह्मयज्ञ सफळ संपूर्ण केला आहे .


अभंग – २६३

भावार्थ –

संत रामदास म्हणतात,रामनाम जपाचा शुध्द नित्यनेम केल्यानंतर मनातील अनित्य (सतत बदलणार्या )नाशवंत गोष्टींचा भ्रम दूर झाला .नित्य,अनित्याचा विचार जावून स्वधर्माचा आचार सुरु झाला ,मी आत्मा नसून देह आहे ही खोटी देहबुध्दी लोप पावून मनाची मलीनता दूर झाली .शुध्द ज्ञानाचा उगम झाला आणि स्वधर्माचे रक्षण झाले .


अभंग – २६४

भावार्थ –

एकादशी हे केवळ एक व्रत नसून वैकुंठाला जाण्याचा तो महान पंथ आहे .रखुमाईपतीला भेटण्याचा मनाचा निश्चय करून एकादशीचे उपोषण करावे आणि विष्णुलोकी निवास करावा. एकादशी उपोषणाचे पुण्य महान आहे. संत रामदास म्हणतात, प्रत्यक्ष दिसणार्या गोष्टींना प्रमाणाची जरुरी नसते .


अभंग – २६५

भावार्थ –

या अभंगांत संत रामदास एकांत स्थळी डोंगरावर निवास करुन तेथून देवाची यात्रा पाहून यात्रेचे वर्णन करीत आहेत.यात्रेमध्ये भक्तांची एव्हढी गर्दी दाटली आहे की,कोणाला पाय ठेवायला देखील जागा नाही .पताका,दिव्यांची रोषणाईयांत माणसांची मने रंगून गेली आहेत .दिवसा उमलणार्या फुलांप्रमाणे मने मोहरून आली. देवाचा रथ ओढण्यासाठी निरोप येतांच पुढे जाण्याची एकच गडबड उडाली. भक्तजन देवाची आळवणी करतात की,खूप पुण्याचाठेवा म्हणजेच देवाची भक्ति ,आता भक्तांवर असाच लोभ ठेवावा .ही नितांत भक्ती पाहून देव भुलतो आणि ध्यानमार्गाने भक्तांच्या मनांत शिरून त्यांच्या बरोबर जातो .


अभंग – २६६

भावार्थ –

ज्या साधकाला प्रपंच सावधपणे करतां येत नाही त्याला परमार्थही साधतां येणार नाही असे सांगून संत रामदास म्हणतात , असा साधक दोन्ही गोष्टींना पारखा होतो.त्याची निस्पृहता (कोणतिही गोष्ट मिळवण्याची ईच्छा) लयाला जाते.पण मनामध्ये स्वार्थ ही नसतो.अहंकाराने क्रोध निर्माण होतो आणि तो सत्संगाला मुकतो.लोभामुळे रंगाचा बेरंग होतो.त्या साधकाच्या आशा,आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही,निराशेमुळे साधनेमध्यें खंड पडतो.प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बुडतो, त्याचे जीवन लाजिरवाणे होते.


अभंग – २६७

भावार्थ –

मनामध्यें क्रोध शिरला की, अंतकरणांत रागाचा अग्नी भडकतो ,मग कथा निरुपणाला बसला तरी त्या पासून काहीं बोध मिळत नाही आणि अवगुण सरत नाहीत ,त्यांत मनांत लोभ शिरला तर रुपयासाठी प्राण देखिल देण्यास तयार होतो.त्यातच दंभ वाढीस लागतो अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात.या कामनांमुळे अहंकार (गर्विष्ठपणा) वाढून अनेकांचा द्वेष ,मत्सर करु लागतो ,संत रामदास म्हणतात, काम, क्रोध,लोभ, मद, मत्सर, दंभ, हे सहा साधकाचे शत्रु आहेत असे समजावें ,या कथनाचा राग मानू नये ,


अभंग – २६८

भावार्थ –

मोक्षाची ईच्छा करणारा साधक असो किंवा मुक्त साधक असो तो इंद्रियजन्य विषयांत आसक्त होण्याची शक्यता असते.यासाठी जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत विवेक आणि वैराग्य या साठी प्रयत्न करणे जरुर आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,विवेक आणि वैराग्य ज्यांच्या मनांत पूर्णपणे रुजला आहे तेथे मनःशांती द्रुढपणे विराजमान असते.


अभंग – २६९

भावार्थ –

काहीं वृध्द अनुभवी लोक म्हणतात की,संसाराचा त्याग करु नये कारण त्यांमुळे जनसंपर्क वाढतो,वैश्वदेव व दानधर्म घडून पुण्यसंचय घडतो तसेच अतिथींचा आदरसत्कार करण्याची संधी मिळते त्यामुळे सर्व दोषांचे निराकरण होते.या वर उत्तरा दाखल संत रामदास विचारतात, सर्वस्वाचा त्याग करून मुक्ती मिळवणारा वाल्मिकी ऋषींना मूर्ख कसे ठरवतां येईल? वेदांनी जे सांगितलें आहे ते प्रमाण मानून थोर लोक वेदांना वंदन करतात.


अभंग – २७०

भावार्थ –

संसाराचा त्याग करून परमार्थाला लागलेल्या साधकांचे सर्वस्व बुडते असे मानणाऱ्या लोकांना संत रामदास सांगतात की,साधकांनी असा विचार करणे योग्य नाही.श्री रामाच्या भक्तीसाठी भरताने आपल्या मातेचा त्याग केला. पित्याने त्याग केलेल्या भक्त प्रल्हादाने गोविंदासी स्नेह जोडला,रावणाचा बंधु बिभिषण याने रावणाचा त्याग करून रामाशी संबध जोडला,शुक्राच्यार्या सारखे गुरु असतांना बळीने वामनाला तीनपाद भूमी दान करून श्रेष्ठ दाता ठरला.हे सर्व भक्त धन्य होत.


अभंग – २७१

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात कीं, हा ब्रंमांडनायक देव अनन्य भक्ती करणार्या भक्तांचे अनेक हट्ट पुरवतो. त्याने पायांत ब्रीदाचे तोडर बांधले आहे,तुकारामांचे इंद्रायणीत बुडवलेलें अभंग या देवाने जसेच्यातसे वर काढलें.प्रेमळ भक्तांच्या हाकेला धावून जाणार्या देवाला संत रामदास कृष्णातिरी उभे राहून भेट देण्यासाठी आळवित आहेत.