sant-namdev-gatha-updesh
sant-namdev-gatha-two
|| संत नामदेव ||
||१.||
जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥
संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥
तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥
यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥
आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥
सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥
||२.||
बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥
ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥
तुज भरलीं अठरा । मग तूं होसी निमासुरा । पहिले पंच-विसीच्या भरा । झणें गव्हारा भुललासी ॥३॥
आणिक भरलिया सात पांचा । मग होसी महिमेचा । गर्वें खिळेल तुझी वाचा । देवा ब्राह्मणांतें न भजसी ॥४॥
त्वचा मांस शिरा जाळी। बांधोनि हाडांची मोळी । लेखि-तोसि सदाकाळी । देहचि रत्न आहे माझें ॥५॥
बहु भ्रम या शिराचा रे । ह्मणे मी मी तारुण्याच्या भरें । ऐसा संशय मनाचा रे । तूं संडीं रे अज्ञाणा ॥६॥
माथवीय पडे मासोळी । ते म्हणे मी आहे प्रबळ जळीं । तैसी विषयाच्या पाल्हाळीं । भूललसिरे ग-व्हारा ॥७॥
तुज भरलिया सांठीं । मग तुझ्या हातीं येईल काठीं । मग ती अडोरे लागती । म्हणती बागुल आलारे ॥८॥
म्हणती थोररे म्हातारा । कानीं झालसि बहिरा । कैसें न ऐकसी परिकरा । नाम हरिहरांचें ॥९॥
दांतांची पाथीं उठी । मग चाववेना भाकर रोटी । नाक लागलें हनुवटी । नाम होटीं न उच्चारवे ॥१०॥
बैसोनि उंबरवटिया तळवटी । आया बाया सांगती गोष्टी । म्हणती म्हातारा बैल दृष्टी । कैसा अक्षयीं झाला गे ॥११॥
खोकलिया येतसे खंकारा । म्हणती रांडेचा म्हातारा । अझूनि न जाय मरण द्वारां । किती दिवस चालेल ॥१२॥
ऐसा जाणोनि अवसर । वोळगा वेगें सारंगधर । विष्णुदास नामया दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥१३॥
||३.||
बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥
विटु दांडु चेंडु लगोर्या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥
सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥
कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥
नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥
||४.||
संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥
कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥
भ्रम हा भोंवरा फिरबी गरगरा । एक प-डिले धरा चौर्यांशींच्या ॥३॥
नावाडया विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरीतो ॥४॥
नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचें । भय कळिकाळाचें नाहीं तुह्मां ॥५॥
संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक ॥१॥
संसारीं असतां जरी भेटता । शुकदेव कासया जाता तयालागीं ॥२॥
घराश्रमीं जरी जोडे परब्रम्ह । तरि कां घराश्रम त्याग केला ॥३॥
ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार । तरि कां निरहंकार झाले साधु ॥४॥
नामा म्हणे आतां सकळ सांडोन । आलोंसे शरण विठोबासी ॥५॥
||६.||
परब्रह्मींची गोडी नेणतीं तीं बापुडीं । संसार सांकडीं विषयभरित ॥१॥
तूंतें चुकलीरे जगजीवन रक्षा । अनुभवाविण लक्षा नयेचिरे कोणा ॥२॥
जवळीं अलतांचि क्षीर नव्हेसि वरपडा । रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला ॥३॥
दुर्दुरा कमळिणी एके ठायीं बिढार । वास तो मधुकर घेवोनि गेला ॥४॥
मधुमक्षिया मोहोळ रचितां रात्रंदिवरा । भाग्यवंत रस घेऊनि गेला ॥५॥
शेळीस घात-ली उसांची वैरणी । घेऊं नेणे धणी त्या रसाची ॥६॥
नामा म्हणे ऐसीं चुकलीं बापुडीं । अमृत सेवितां पुढीं चवी नेणे ॥७॥
||७.||
मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥
आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥
बंधनापासूनि बांधलासे पायीं । बुडतों मी डोहीं निर्जळा ये ॥३॥
कोण भरंवसा धरिलासे जिवीं । बळीया सोडवी कदा काळीं ॥४॥
पुत्रपत्नी बंधु म्हणसील झणी । धांवोनि निर्वाणीं पाव आतां ॥५॥
नामा ह्मणे वेगीं सावधान व्हावें । शरणही जावें पांडुरंगा ॥६॥
||८.||
आलेनो संसारा सोडवणें करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
प्रपंच न सरे कदा कल्पकोडी । वासनेचि बेडी पडे पायीं ॥२॥
व्यर्थ मायादेवी गर्भवास गोची । नश्वर भोगाची नाना-योनी ॥३॥
नामा म्हणे पहा विचारूनि मनीं । स्मरावा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥
||९.||
आळेनो संसारा उठा वेगें चला । जिवलग विठ्ठला मे-ठीलागीं ॥१॥
दुर्लभ मनुष्य जन्म व लभेरे मागुता । लाहो घ्या स-र्वथा पंढरीचा ॥२॥
भावें लोटांगण पाला महाद्वारीं । होईल बो-हरी त्रिविध तापा ॥३॥
श्रीमुखाची वास पहा घणीवरी । आठवी अंतरीं घडिये घडिये ॥४॥
शुद्ध सुमनें कंठीं घाला तुळशीमाळा । तनमन ओवाळा चरणांवरूनि ॥५॥
नामा ह्मणे विठो अनाथा को-वसा । पुढती गर्भवासा येऊं नेदी ॥६॥
||१०.||
अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥
अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥
अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥
अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥
अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥
नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥
||११.||
अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची ॥१॥
अवघा काळ वाचे ह्मणा नारायण वांयां एक क्षण जाऊं नेदी ॥२॥
अवघें हें आयुष्य सरोनि जाईल । मग कोण होईल साह्य तुह्मां ॥३॥
अवघा प्रपंच जाणोनि लटिका । शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥
अवघे मायामोह गुंतलेति पहा । अवघे स-हज आहां जीवन्मुक्त ॥५॥
नामा म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल । जरी मन ठेवाल विठ्ठलापायीं ॥६॥
||१२.||
जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥
तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥
गारुडयाचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संप्तार दिसे खरा ॥३॥
नामा म्हणे तेथें कांहीं नसे बरें । क्षणाचें हें सर्व खरें आहे ॥४॥
||१३.||
संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार ॥१॥
तया दु:खा नाही अतपार जाणा । काळाची यातना बहुतांपरी ॥२॥
संसाराची चिता वाहतं जन्म गेला । सोस हा वाढला बहुतांपरी ॥३॥
हित ही बुडालें परत्र दुणावलें । नरदेह बुडविलें भजनाविण ॥४॥
भजनाचा प्रताप दु:ख दुरी जाय । जैसें आश्र होय देशधडी ॥५॥
वायूच्या झुंझाटें वृक्ष उन्मळती । परी माना गति तैसें दु:ख ॥६॥
नामा म्हणे नाम दु:खाचा परिहार । सुखाचा अनिवार पार नाहीं ॥७॥
||१४.||
प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी । वासनेची बेडी पडाली पाथीं ॥१॥
सोडवण करा आलेनो संसारा । शरण जा उदारा विछोबासी ॥२॥
लटकी माया देवी गर्भवासीं गोंवी । नरक भोगवी नानायोनी ॥३॥
नामा ह्मणे तुह्मी विचारावें मनीं । सोयरा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥
||१५.||
प्रपंच स्वार्थासि साधावया चांग । वैराग्याचें अंग दाविसी जना ॥१॥
अनुताप नित्य नाहीं कदाकाळीं । मग संचि-ताची होळी कैसी होय ॥२॥
पवित्र ते वाचा कांरे गमाविसी । रामनाम न ह्मणसी अरे मूढा ॥३॥
नामा ह्मणे जीव कासया ठेवावा । न भजतां केशवा मायबापा ॥४॥
||१६.||
स्वयें घरदार प्रपंच मांडिला । जोडूनियां दिला बाळा हातीं ॥१॥
तैसें सर्वांभूतीं असावें संसारी । प्राचीनाची दोरी साक्ष आहे ॥२॥
नामा ह्मणे आह्मां नाहीं प्रापंचिक । पंढरिनायक साह्य झाला ॥३॥
||१७.||
फुटल्या घडयाचें नाहीं नागवणें । संसार भोगणें तेनें न्यायें ॥१॥
स्वप्नींची मात जागृतीस सांगे । तैसा भवरोग प्रारब्धाचा ॥२॥
नामा ह्मणे आतां जाणा तो संसार । वाउगा पसार जाय जाणा ॥३॥
||१८.||
जाय जणा देह जाईल नेणसी । लैकिक मिरविसी लाजसी ना ॥१॥
माझें माझें माझें मानिसी निभ्रांत । करिसी अपघात रात्रंदिवस ॥२॥
सांग तूं कोणाचा आलसि कोठोनि । दृष बुद्धि मनीं विचारी पां ॥३॥
धन संपत्ति करोनि मदें मातलासी । पुढत पुढती पडसी गर्भवासीं ॥४॥
पुत्र कलत्र दारा यांचा झालासी ह्मणियारा । यांच्या पातकाचा भारा वाहशील ॥५॥
अंतीं यमापाशीं बांधो-नियां नेति । कवतुक पाहती सकळ जन ॥६॥
नानापरी तुज क-रिती यातना । सांग तेथें कोणा बोभाशील ॥७॥
धन पुत्र दारा तुज नये कामा । एका मेघश्यामा वांचोनियां ॥८॥
विषयाचेनि संगें भुलशील झणें । भोगीसी पतन रात्रंदिवस ॥९॥
नामा ह्मणे ऐक ध्यायीं कमळापति । निजाचा सांगाति केशिराज ॥१०॥
||१९.||
शरीर काळाचें भातुकें । तुह्मीं नेणां कां इतुकें ॥१॥
माझा जन्म गेला वांयां । तुजविण पंढरिराया ॥२॥
अझूनि तूं कां रे निचिंत । काळ जवळीं हटकीत ॥३॥
नामा ह्मणे अवघे चोर । शेखीं हरिनाम सोयरे ॥४॥
||२०.||
क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी ॥१॥
माझें मी ह्मणतो गेले नेणों किती । र्मक चक्रवर्ति असं-ख्यात ॥२॥
देह जाय तोंवरी अभिमान । न करीं अज्ञान आत्म-हित ॥३॥
मोहाचीं सोयरीं मिळोनि चोरटीं । खाऊनि करंटीं घेती घर ॥४॥
जोंवरी संपत्ति तोंवरी हा निके । धनासवें भुंके तयांमागें ॥५॥
नामा ह्मणे झालों केशवाचा दास । दाखवी वोरस तुझ्या नामीं ॥६॥
||२१.||
औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे ॥१॥
कवणाचें घर कवणाचें दारा । भावें नरहरि ओळंगारे ॥२॥
आडें मोडलें घर झांजर झालें । वारा आला तेणें मोडोनि गेलें ॥३॥
खचला पाया पडली भिंती । नामा ह्मणे घर नलगे चित्तीं ॥४॥
||२२.||
देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥
येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥
लावूनि मोहातें दास्यत्व करविती । अंतकाळीं होती पाठि-मोरे ॥३॥
मायेचे भूलीनें भुललीं सकळें । हें तुज न कळे कटकट ॥४॥
यापरी आयुष्य वेंचेलरे जना । पुढें यमयातना न चुकती ॥५॥
धोतरा देऊनि चोर सर्व हरीती । नामा ह्मणे गति तेचि झाली ॥६॥
||२३.||
यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥
तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥
ज्याचें विषयावर ध्यान । परद्रव्य परस्त्री गमन । धर्मासी विन्मुखपणा । तें कुळ आपुलें ॥३॥
भावेंविण भक्ति करिती । भक्तिविणें भाव दाविती । त्यांची तुह्मीं फजिती । बहुतां प्रकारें करावी ॥४॥
मंत्रसंचारी जे लोक । देव सांडून देवताउपासक । झोटिंग वेताल खेताल देख । ते सखे बाप तुमचे ॥५॥
लटिके वासनेच्या नवसा । करिती करविती पशुहिंसा । त्यानें बहुत दिवस भरंवसा । दिला आहे ॥६॥
धातकी पातकी गुरुद्रोही । हित सांगतां गुरूसी हेडवी । विष्णुदासावेगळें करून पाहीं । सांगितले तितुके आणावे ॥७॥
नामा ह्मणे एक्या पातकीयाम दंडिताती । नाना विपत्ति काय सांगूं किती । विष्णुसासाचे वंदिती । चरणरज ते यम ॥८॥
||२४.||
दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतीं ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥३॥
एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ॥४॥
घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥
नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥
||२५.||
नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥
यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥
शरीराची आशा बाळ हें तारुण्य । अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥
लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार । नेतां यमर्किकर न सोडिती ॥४॥
मायबाप सखी न येती सांगातें । जंव शरीरीं पुरतें बळ आहे ॥५॥
न येती सांगातें सज्जन सोयरीं । वानप्रस्थ ब्रह्मचारी श्रेष्ठ झाले ॥६॥
घेशील तूं सोंग संन्यास आश्रम । सांडोनि घराश्रम न सुटसी ॥७॥
नामा ह्मणे नाम नित्य नरहरी । म्हणतां श्रीहरी तरशील ॥८॥
||२६.||
बाल वृद्ध तरुण काया हे जर्जर । वेगीं हा पामर आळशी झाला ॥१॥
काय करूं देवा नाहीं यासि भावो । न करी हा उपावो तुझ्या भजनीं ॥२॥
मन ठेवीं ठायीं रंगेम तूं श्रीरंगीं । गोष्टी त्या वाउगी बोलूम नको ॥३॥
नामा म्हणे श्रीरंगु चित्तीं पां चोखडा । उघडा पवाडा सांगितला ॥४॥
||२७.||
धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड बैसतील माथां । तेव्हां तुज रक्षिता कोण आहे ॥२॥
मायबापबंधु तोंवरी सोयरीं । इंद्रियें जोंवरी वाह-ताती ॥३॥
सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता । तेहि केश देतां रडतसे ॥४॥
विष्णुदास नामा जातांचि शरण । स्वप्नीं जन्म-मरण नाहीं नाहीं ॥५॥
||२८.||
भुक्ति मुक्ति सिद्धि यावया कारणें । सेवकासी देणें पांडुरंगा ॥१॥
ऐसिया तुज सांगणें आपणातें म्हणक्ति । तया अधोगति कल्पकोडी ॥२॥
देहो सरल्या मिळे ज्योतीस ज्योति । ऐसें ह्मणतां किती सिंतरिले ॥३॥
नामा ह्मणे ऐसें नाशिवंत शरीर । पूजा हरिहर एक वेळां ॥४॥
||२९.||
विषयाचा आंदण दिसे केविलवाणा । करीतसे कल्पना नानाविध ॥१॥
कुटुंब पाईकं ह्मणवी हरिचा दास । मागे ग्रासोग्रास दारोदारीं ॥२॥
जळो त्याचें कर्म जळो त्याचा धर्म । जळो तो आश्रम जाणीवेचा ॥३॥
कल्पद्रुमातळीं काखे घेऊनि-झोळी । बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥
अधम पोटभरी विचार तो न करी । पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥
पोटालागीं करी नाना विटंबना । संतोषवी मना दुर्जनांच्या ॥६॥
न करी हरीचें ध्यान बैसोनि एकांतीं । जन्माची विश्रांति जेणें होय ॥७॥
द्रव्याच्या अभिलाषें जागे सटवीपाशीं । नवजे एकादशी जागरणा ॥८॥
उत्तम मध्यम अधम न बिचारी । स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥
वैराग्याची वार्ता कैची दैवहता । नुपजे सर्वथा प्रेमभाव ॥१०॥
नामा ह्मणे ऐसें तारी एक्या गुणें । अजा आरोहण गजस्कंधीं ॥११॥
||३०.||
पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥
सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वा-उगाची ॥२॥
पेरि कडु जीरें इच्छी अमृतफळ । अर्किवृक्षा केळीं येती ॥३॥
मुसळाचें धनु न होय सर्वथा । पाषान पिळितां रस कैंचा ॥४॥
नामदेव म्हणे देवा कां रुसावें । मनाला पुसावें आपुलीया ॥५॥
||३१.||
देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥
तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥
मीच एक भक्त मीच एक मुक्ता । म्हणती पतित दुराचारी ॥३॥
नामा म्हणे तुझे कृपेविण देवा । केंवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥४॥
||३२.||
भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप ॥१॥
एक एक योनि कोटि कोटि फेरा । मनुष्य देहवारा मग लागे ॥२॥
वीस लक्ष योनि वृक्षामध्यें ध्याव्या । जळचरीं भोगाव्या मव लक्ष ॥३॥
अकरा लक्ष योनी किरडामध्यें घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्यें ॥४॥
तीस लक्ष योनि पशूंचिये घरीं । मानवाभीत्तरीं चारी लक्ष ॥५॥
नामा ह्मणे तेव्हां नरदेह या नरा । तयानें मातेरा केला मूढें ॥६॥
||३३.||
शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥
संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा ह्मणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊ-नियां करीं सुदर्शन ॥४॥
||३४.||
वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥
दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥
व्यभिच्यारी नारी परपु-रुष जिव्हारी । वर्ते घरोचारीं परि लक्ष तेथें ॥३॥
तस्कर नगरीं परद्रव्य जिव्हारी । वर्ते घरोघरीं परि लक्ष तेथें ॥४॥
धन लो-भ्यानें धन ठेवियलें दुरी । वर्ते चराचरीं परि लक्ष तेथें ॥५॥
नामा ह्मणे असावें भलतियां व्यापारीम । लक्ष सर्वेश्वरीं ठेऊनियां ॥६॥
||३५.||
भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥१॥
तरी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि । संतां वोळगोनि वश्य किजे ॥२॥
प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला । पाहिजे साक्षिला सद्गुरु तो ॥३॥
नामा म्हणे सेवा घडावी संतांची । घ्यावी कृपा त्याची तेंचि ज्ञान ॥४॥
||३६.||
हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत ॥१॥
देवाविण शब्द लटकें करणें । भांडा रंजविणें सभे-माजी ॥२॥
आचार करणेम देवावीन जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥
नामा म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभागी तो ॥४॥
खलदुर्जनांस अभंग–
||१.||
दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी ॥१॥
माशी जातां पोटीं मेली तेचि क्षणीं । प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥
दीपकाची ज्योति पतंग नासला । अंधार पडिला जनामध्यें ॥३॥
तैसा नैसर्गिक स्वभाव दुष्टांचा । शेखीं ज्याचा त्यासी फळां येतो ॥४॥
झाली सज्जनाची संगति कदापि । जाईना तथापि त्याची क्रिया ॥५॥
सहज मळलें धुतां शुद्ध होय । बिब-याचा काय डाग जातो ॥६॥
वज्रहि फुटेल नभहि तुटेल । भला तो होईल ऐसा जाणा ॥७॥
नामा म्हणे कुंभपाकींचा तो धनी । त-यासी भल्यांनीं बोलूं नये ॥८॥
||२.||
दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा ॥१॥
सर्पाचें पिलें सानें ह्मणऊनि पोशिलें । त्यासी पान दिधलें अमृताचें ॥२॥
नव्हे तें निर्विष न संडी स्वभावगुण । घेऊं पाहे प्राण पोसित्याचे ॥३॥
विष्णुदास नामा सांगतसे युक्ति । विवेक हा चित्तीं दृढ धरा ॥४॥
||३.||
समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा ॥१॥
आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुति । वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥
वमन झालीया सांचितसे अन्न । काय तो दुर्जन भाग्यहीन ॥३॥
नामा ह्मणे जाण असतां शरीरीं । जातो यमपुरीं भोगावया ॥४॥
||४.||
कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या ॥१॥
दुर्जनासी तैसा बोध परमार्थ । नवजायचि स्वार्थ कांहीं केल्या ॥२॥
सूकराचे परी नेणती मिष्टान्न । विष्टा ते भक्षण करीतती ॥३॥
मोहियले प्राणी पाहतां पाहतां । काय सांगूं आतां नवलावो ॥४॥
नामा ह्मणे तया न होयचि मोक्ष । येवोनि पद्माक्ष केविं भेटे ॥५॥
||५.||
वेडिया उपचार गाढवा गुर्हाळ । ह्मैसिया बिर्हाड पुष्पवनीं ॥१॥
पद्मासनीं केंवि कुंजर हा बैसे । कोडिया न दिसे चंदन बरवा ॥२॥
तैसा नव्हे देव मूर्ख जनांच्या भक्ति । भल्याचा विरक्ति ज्ञानवांटा ॥३॥
शेळीस ऊंस कळकटीया सुदिवस । सूकराप्रित रस आंबियाचा ॥४॥
दर्दुरा क्षीरपान त्रिदोषिया मौन । मद्यपिया मन स्थिर नव्हे ॥५॥
नामा ह्मणे हरि सबाह्य भरला । भरोनि उरला दाही दिशा ॥६॥
||६.||
थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं ॥१॥
श्वान काय जाणे मेरूचें प्रमाण । कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥
अंध काय जाणे कैसा उगवे दीन । पाषाणा पर्जन्य नकळे जेंवी ॥३॥
देहवंत जीव काय जाणे देव । नामा ह्मणे भाव काय तेथें ॥४॥
||७.||
जाळें टाकिलें सागरीं । उदक नयेची चुळभरी ॥१॥
तैसें पापियाचें मन । ज्या नावडे हरिकीर्तन ॥२॥
सावजीं केला कोल्हा राव । तो न संडी आपुला भाव ॥३॥
गाढव गंगेसि न्हा- णीले । पुढती लोळूं ते लागले ॥४॥
श्र्वान बैसविलें पालखीं । वरती मान करूनि भुंकी ॥५॥
नगर नावडे विखारा । दर्पण नावडे नकठ्या नरा ॥६॥
पति नावडे शिंदळी । जाय परपुरुषाजवळी ॥७॥
नामा ह्मणे बा श्रीहरि । कोडय नावडे कस्तुरी ॥८॥
||८.||
जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ ॥१॥
मानिली अंतरीं सखी जीवनलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥
मानीना तो भक्ति भ्रष्ट आचरण । दोषी नारायण सदोदित ॥३॥
नामा म्हने ऐसे पातकी चांडाळ । बुडविलें कुळ बेचाळिस ॥४॥
||९.||
अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥
नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥
हरिचिया दासा करिती मत्सर । करी निरतर द्वेषबुद्धि ॥३॥
नामा ह्मणे व्यर्थ पेटला पर्वत । नेणे अपघात स्वयें पावें ॥४॥
||१०.||
विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे ॥१॥
काय करूं या मनासी । नाठवेचि ह्लषिकेशी ॥२॥
दिवसा व्यापार चावटी । रात्रीं कुटुंबचिंता मोठी ॥३॥
नामा म्हणे कां आलासी । भूमिभार जन्मलासी ॥४॥
||११.||
मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥
घुबड पाहे भलतीकडे । नाइके नामा चे पवाडे ॥२॥
पाहूं इच्छी पर-नारी । चित्त पादरक्षावरी ॥३॥
नामा म्हणे सांगूं किती । मूढ सां-गितलें नाइकती ॥४॥
||१२.||
कथे बैसोनि उठोनी जाती । खर होऊनि फिरती ॥१॥
नाम नावडे नावडे । संग वैष्णवांचा न घडे ॥२॥
नामा ह्मणे सांगों किती । पूर्ण जांसहित नरका जाती ॥३॥
||१३.||
करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥
जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥
आपण नवजे दुजिया जावों नेदी । ऐसा तो कुबुद्धि नागवितो ॥३॥
नामा ह्मणे नाम गर्जे वारकरी । वैकुंठ पंढरी देशोदेशीं ॥४॥
वेषधार्यांस उपदेश –
||१.||
एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं ॥१॥
एक ह्मणती आह्मीम देवासमान । तरी घासील वदन यमराम ॥२॥
एक ह्मणती आह्मी देवाचींच रूपें । तुमच्यानि बापें संसार न तुटे ॥३॥
देवें वघियेलें दानवां दैत्यां । आह्मां आड जातां तृण न मोडे ॥४॥
देवें उचलिल्या शिळा मेदिनी । तुमचेनी एक गोणी नुचले देखा ॥५॥
विठ्ठलाचे पद जो कोणी अभि-लाषी । तो महा पातकी ह्मणे नामा ॥६॥
||२.||
त्यागेंवीण विरक्ति । प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां ज्ञप्ति । शोभा न पवे ॥१॥
दमनेंवाचूनि यति । मानाविण भूमि-पति । योगि नसतां युक्ति । शोभा न पवे ॥२॥
बहिर्मुख लवि-मति । नेमावांचूनियां वृत्ति । बोधेंविण महंती । शोभा न पषे ॥३॥
अनधिकारीं व्युत्पत्ति । गुरु तो कनिष्ठ पाति । माता नीच शिश्र वृत्ति । शोभा न पवे ॥४॥
हेतुबांचूनि प्रीति । गुणरहित स्तुति । करणीवांचूनि कीर्ति । शोभा न पवे ॥५॥
सत्यमागमसंगती । बाणली नसतां चित्तीं । नामा ह्मणे क्षिति । शोभा न पवे सवर्था ॥६॥
||३.||
निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण ॥१॥
शब्द चित्रकथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं निश्चळ हरिच्या पायीं ॥२॥
अणूच्या प्रमाण होतां दुजेपण । मेरूच्या स-मान भार देवा ॥३॥
नामा ह्मणे ब्रह्म सर्वांभूतीं पाहीं । तरींच ठायींच्या ठायीं निवसी बापा ॥४॥
||४.||
सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥
अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥
राजस तामस करोनियां गोळे । होताति आंधळे दाटोनियां ॥३॥
नामा ह्मणे ऐशा उदंड उपायें । विठोबाचे पाय अंतरिती ॥४॥
||५.||
युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें ॥१॥
ऐसीं पापियांचीं मनें । स्थिर न होतीं कीर्तनें ॥२॥
श्वान घा-तलें पालखीं । वरतीं मान करूनि भुंकी ॥३॥
सूकर चंदनें चर्चिला । पुढती गवसी चिखला ॥४॥
गाढव न्हाणियला तीर्थी । लोळे उकर-डियाप्रती ॥५॥
नामा ह्मणे युगें गेलीं । खोडी न संडिती आपुली ॥६॥
||६.||
मुखीं नाहीं नाम । काय जपतो श्रीराम ॥१॥
काय आसन घालून । मुखीं नाहीं नारायण ॥२॥
टिळे टोपी माळा दावी । भोळ्या भाविकांसी गोवी ॥३॥
नामा ह्मणे त्याचा संग । नको चिंता होय भंग ॥४॥
||७.||
गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥
नामसंकीर्तनें जळतील पापें । चुकतील खेपा चौर्यांशींच्या ॥२॥
उपवास करी उग्र अनुष्ठानी । तया चक्रपाणी अंतरतो ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बहुतेक प्राणी । पचतील खाणी भ्रष्टलोक ॥४॥
||८.||
कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥
लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥
असंतोषी सदां अतितासी जाळी । सुक्रुताची होळी स्वयें केली ॥३॥
वेदमर्यादा सांडूनि चालती । हुंबतें घेती वार्यासवें ॥४॥
नामा ह्मणे आतां असो याचि मात । सुख नेणें हित कदा काळीं ॥५॥
||९.||
हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची ॥१॥
काय करूं देवा जळो याची बुद्धि । जोंवरी नाहीम शुद्धि परलोकाची ॥२॥
मुद्रा धरूनि गळां घाली तुळसीमाळा । परि नाहीं जिव्हाळा स्वहिताचा ॥३॥
धरी बहु वेष वृथा करी दोष । नाम ब्रह्मरस अंगीं नाहीं ॥४॥
दुसरा हरिदास देखूनियां रंगीं । धांवो-निमां वेगीं ग्रासों पाहे ॥५॥
दुसरियाचें पद ऐकोनियां कानीं । क्रोधें पेटे वन्हि पर्वतींचा ॥६॥
दुर्जनाचे भये पळती साधुवृंदें । जैसीं तीं श्वापदें व्याघ्रा भेणेम ॥७॥
बोले नानायुक्ति वश करे सभा । दुसरा रंगीं उभा राहों नेदी ॥८॥
राजमानें श्रेष्ठ मोठे अधिकारी । त्यांपुढें कुसरी करिताती ॥९॥
घातमात करी नटे नानापरी । चं-चळ परनारी भुलवितो ॥१०॥
ऐसें नाम विटंबूनि करील जो हरि-कथा । तेणें परमार्था विघ्न केलें ॥११॥
जाई जुई उत्तम सुगंध क-स्तुरी । विष्टेच्या उदरीं आंथुरिला ॥१२॥
साडेपंधरा सोनें होतें पालवण्या । परि झालें हीण डीक लागें ॥१३॥
द्यावें दिव्यौषध रोगियाचें हित । केलिया कुपथ्य वांयां जाय ॥१४॥
चतुर्विध अन्न षड्रस पक्कान्नें । विटाळलें जाण श्वानमुखें ॥१५॥
ऐसें ह्मणतां माझी मळेल पैं वाचा । परि या वैष्णवांचा धर्म नव्हे ॥१६॥
संसारसागरु हरिकथा तारूं । तरिजे विचारू दुरी ठेला ॥१७॥
जे कथा ऐकती पसरोनी बाह्या । शांति क्षमा दया येती तेथें ॥१८॥
शांति क्षमा दया येती भेटावया । तेथें मोक्ष व्हावया विलंब काय ॥१९॥
आ-नंद नामाचा ऐकूनि गजर । ब्रह्मादिक हरिहर येती तेथें ॥२०॥
खुंटला अनुवाद मावळला शब्द । अनिर्वाच्य बोध प्रगटला ॥२१॥
वैकुंठ पांडून धांवें चक्रपाणि । कीर्तनाचा ध्वनि ऐकूनियां ॥२२॥
तेथें श्रोते वक्ते होतील नि:शाय । ऐशी पुण्यरूप हरिकथा ॥२३॥
शून्याचें नि:शून्य जेथें हरपलें । एकात्र मन झाले ध्यान तेथें ॥२४॥
नामा म्हणे माझी हरिकथा माउली । मोक्षपान्हा घाली भक्ता लागीं ॥२५॥
||१०.||
गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥
वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी । दावावया जगीं योग करी ॥२॥
आकर्ण लोचन हातीं चापबाण । वल्कलें भूषणें नेसोनियां ॥३॥
पितृवचनालागीं मानोनि साचारी । झाला पादचारी वनीं हिंडे ॥४॥
देवंचिया काजीं ठेवोनियां निज । सर्वांपरी सज्ज झाला अंगें ॥५॥
नामा म्हणे त्याचें न कळे कौतुक । आपु-लिया सुख वाढावया ॥६॥
||११.||
सिबुर दावूनि बैसलें हातीं । सांगतांहे गोष्टी जाणी-वेच्चा ॥१॥
कापियेलें नाक झाले ते नि:शंक । वारे भुरभुरां देख वाजतसे ॥२॥
दवडा दवडा परतें करील निंदा । ध्यावा कां कांदा मुळींहुनी ॥३॥
नामा विनवीतसे केशवातें सत्ता । उरलें सुरले आतां अवघे तासां ॥४॥
||१२.||
यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां ॥१॥
लोकांसी दाविती मीच कर्मनिष्थ । अभिमान खोटा वागविती ॥२॥
वागविती वाक्य जाण ऋषेश्वर । नको येरझार नामामतें ॥३॥
नानामतें अधोऊर्ध्वसात जावीं । नको गोवागोवीं नामा ह्मणे ॥४॥
||१३.||
नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान ॥१॥
दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठ । पुढिलांसी वाटा यम-पंथें ॥२॥
पंथ न चुकती संतांवीण कधीं । संसारसंबंधीं तया नरा ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बहू अभाविक । संतसंगसुख काय जाणे ॥४॥
||१४.||
गोसावीपणाचा दाखविती वेष । नाहीं निदिध्यास हरिनामीं ॥१॥
वरी वरी आर्त दाविती झगमग । अंतरीं तो संग विषयाचा ॥२॥
व्यर्थ लोकांपुढें हालविती मान । विटंबन केली संसाराची ॥३॥
नामा ह्मणे मन गुंतेल पांडुरंगा । आतां ऐशा सांगा कोण रीती ॥४॥
||१५.||
गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी ॥१॥
काय हे नगरी पांचही तराळ । निद्नेनें भ्रमले व्याकुळ झाले ॥२॥
गेला मागून दिसे कवणिये वाटे । नवही द्वारें सपाट पडलीं ओस ॥३॥
नामा ह्मणे चोरी एके अंगणांत । दिवसा रात्रीं पडत खाण तेथें ॥४॥
||१६.||
विष्णूसी भजला शिव दूराविला । अध:पात झाला तया नरा ॥१॥
शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी । तया-चिये घरीं यम नांदे ॥२॥
विष्णुकथा ऐके शिवासी जो निंदी । त-यासी गोविंदा ठाव नाहीं ॥३॥
नामा ह्मणे असती शिवविष्णु एक । वेदाचा विवेक आत्माराम ॥४॥
||१७.||
डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी ॥१॥
ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥२॥
मांजराचे गेले डोळे । उंदीर देखोनि तळमळे ॥३॥
वेश्या झाली पाटाची राणी । तिला आठवे मागील करणी ॥४॥
नामा म्हणे वेष पालटे । परी तिला अंतरीचें ओसपण न तुटे ॥५॥
||१८.||
तोंवरी रे तोंवरी वैराग्याचें ठाण । जंव कामिनी कटाक्ष बाण लागले नाहीं ॥१॥
तोंवरी रे तोंवरी आत्मज्ञान बोध । जोंवरी अंतरीं कामक्रोध उठले नाहीं ॥२॥
तोंवरी रे तोंवरी निरभिमान । जंव देहीं अपमान झाला नाहीं ॥३॥
नामा ह्मणे अवघी बचबच गाळी । विरळा तो जाळी द्वैत बुद्धि ॥४॥
||१९.||
चंद्र सूर्यादि बिंबें लिहिताती सांग । परि प्रकाशाचें अंग लिहितां नये ॥१॥
संन्यासाचीं सोंगें आणिताति सांग । परि वैराग्याचें अंग आणितां नये ॥२॥
नामा म्हणे कीर्तन करिताति सांग । प्रेंमाचें तें अंग आणितां नये ॥३॥
||२०.||
पोटासाठीं जरी करी हरीकथा । जन रंजविता फिर-तसे ॥१॥
तेणें घात केला एकोत्तरशत कुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥२॥
द्रव्याचिये आशें हरिकथा करी । तया यमपुरीं नित्य वास ॥३॥
नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी । ते नर नयनीं पाहूं नये ॥४॥
||२१.||
हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा ॥१॥
पतिव्रता म्हणविणें आणि परपुरुषीं विचारणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥२॥
क्षत्रिय म्हण-विणें आअणि पाठिशीं घाय साहणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥३॥
पितृभक्त म्हणविणें आणि पितृआज्ञा न करणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥४॥
ऐसे भक्त किती गेले अधोगति । नामा ह्मणे श्रीपति दास तुझा ॥४॥
||२२.||
कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥
तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥
बचनाग रवा दुग्धीं शिजविला । तरी काय गेलेआ त्याचा गुण ॥३॥
नामा म्हणे संत सज्जन संगतीं । ऐशासही गति कळांतरीं ॥४॥
||२३.||
दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥
दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥
काय काज तरी होसील फसीत । स्मरोर अनंता सर्व-काळ ॥३॥
नामा म्हणे नव्हे उदंड उपाय । घरीं आधीं पाय विठोबाचे ॥४॥
||२४.||
लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान ॥१॥
मी तूं पण जंव दंभ गेला नाहीं । साधिलें त्वां न कांहीं तत्त्वसार ॥२॥
अहंभाव देहीं प्रपंचाचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ॥३॥
नामा ह्मणे ऐसें नेणती विचार । जाती निरंतर यमपंथें ॥४॥
||२५.||
वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥१॥
पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
गायन करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
तीर्थ करिसी तरी कापडीच होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥६॥
नामा ह्मणे नाम केशवांचे घेसी । परीच वैष्णच होसी अरे जना ॥७॥
||२६.||
मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी ॥१॥
ऐसें कांहीं सांग जेणें फिटे पांग । नित्य पांडुरंग-भजन सोपें ॥२॥
मी आणि तूं हें वचन हो खोटें । विठ्ठलीं विनटे दिननिशीं ॥३॥
नामा ह्मणे भाव ऐसा धरीं सकळ । तुष्टेल गोपाळ न विसंबितां ॥४॥
||२७.||
मुखीं नाम हातीं टाळी । दया नुपजे कोणे काळीं ॥१॥
काय करावें तें गाणें । धिक् धिक् तें लजिरवाणे ॥२॥
हरिदास म्हणोनि हालवी मान । कवडीसाठीं घेतो प्राण ॥३॥
हरिदासा़चे पायीं लोळे । केशीं धरोनि कापी गळे ॥४॥
नामा म्हणे अवघे चोर । एक हरिनाम हें थोर ॥५॥
||२८.||
ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते ॥१॥
केळाच्या पाठीवर ठेविला दोडका । तोहि ह्मणे विका तेणें मोलें ॥२॥
ढोर ह्मणती आह्माम हाकारे लास । वारुवा सरसे खाऊं द्या घांस ॥३॥
मंदल्याजेती घरोघरीं गाती । धृपदासाठीं ताक मागती ॥४॥
नामा म्हणे सोपीं कवित्वें झालीं फुका । हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥५॥
||२९.||
शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला ॥१॥
येरां माझें नमन सर्व साधारण । ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥२॥
वेद पारायण मानीं तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥३॥
पुराणिक तो होऊनि कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ॥४॥
मानीं तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देहभावा ॥५॥
नामा ह्मणे ऐसे भेटवीं विठ्ठल । त्यालागीं फुटला कंठ माझा ॥६॥
||३०.||
योग याग यज्ञ इच्छिसी कामना । परि केशव निधाना विसरसी ॥१॥
नेणेचि हें मन भुललें अज्ञानें । यातायाति पतनें भोगूं पाहे ॥२॥
ज्याचेनि जाहलें तुझें हें शरीर । त्याचा नामो-चार नये वाचे ॥३॥
नामा म्हणे कांरे नेणसी अझुनी । केशवचरणीं अनुसरे कां ॥४॥
||३१.||
हरिभक्ति आथिले तेचि उत्तम । येर ते अधम अध-मांहुनी ॥१॥
हरिभक्तीं सप्रेम तेंचि तैसें नाम । येर ते अधम अना-मिक ॥२॥
नामा म्हणे जया नाहीं हरिसेवा । ते जितची केशवा प्रेत जाणा ॥३॥
||३२.||
भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥१॥
पवनाच्या अभ्यासें काया पालटी । परि तो वैकुंठीं सरता नहे ॥२॥
शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे ॥३॥
पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचें ॥४॥
अवचिता हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळीं तीर्थो-दकें ॥५॥
घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रीस व्याघ्र ॥६॥
काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनीं कोण काज ॥७॥
बहुरुप्याचा नटा माथां भार जटा । भस्म राख सोटा हातीं दंड ॥८॥
धोति पोति कर्मावेगळा आदेसें । हुंबरत असे अंगबळें ॥९॥
त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी । घालेनियां कंठीं तुळसी-माळा ॥१०॥
व्यापक हा हरि न धरिती चित्तीं । लटिकीयाची गति गातु असे ॥११॥
मीतूंपण जरी हीं दोन्हीं सांडी । राखिसी तरी शेंडी हेंचि कर्म ॥१२॥
मानसी तूं मुंडीं देहभाव सांडी । वासनेसी दंडी आत्ममयें ॥१३॥
मन हें दर्पण करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मास्वयें ॥१४॥
तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं । नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥१५॥
||३३.||
सात्विक हें वैराग्य अर्थाचें हें मूल । आशा हें केवळ अनर्थ जाणा ॥१॥
अंतरापासोनी नसतां विवेक । निभ्रांताचे टक आशेवरी ॥२॥
राजस तामस करोनियां गोळा । होतसे अंधळा दाटोनियां ॥३॥
नामा म्हणे ऐसे उदंड उपाय । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥
||३४.||
अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें ॥१॥
आपुलिया मुखें सांगे पंढरिनाथ । नव्हेचि तो भक्त सत्य जाणा ॥२॥
नाम विठंविती संतांचि हांसती । ते मूर्ख ह्मणि-जेती सर्पपिलीं ॥३॥
तयांसि लक्ष्मीवल्लभ सांगे उपदेश । नामा विष्णुदास विनवीतसे ॥४॥
||३५.||
काय करूनि तीर्थाटणें । मन भरिलें अवगुणें ॥१॥
काय करावें तें तप । चित्तीं नाहीं अनुताप ॥२॥
मन:संकल्पाचीं पापें । न जाती तीर्थाचेनि बापें ॥३॥
नामा म्हणे सर्व सोपें । पाप जाय अनुतापें ॥४॥
||३६.||
करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥
करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥
नित्यानित्य करी विवेक आपण । तेणें अभि-मान वाढतसे ॥३॥
नामा ह्मणे जन्म विसरोनियां गेलों । मरोनि राहिलों देहातीत ॥४॥
||३७.||
शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥
भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥
बोबडिया बोलीं जे कोणी हांसती । ते पचिजेती रौरवीं ॥३॥
नामा म्हणे बहुत बोलों आतां कांई । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥
||३८.||
सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥
देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥
धनवंत आणि दयाळु । व्याघ्र आणि कृपाळु । अग्नि आणि सीतळु । हें दुर्लभ जी दातारा ॥३॥
सुंदर आणि पतिव्रता । साव-धान होय श्रोता । पुराणिक तरी ज्ञाता । हें दुर्लभ जी दातारा ॥४॥
क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुलीं फुलला । स्वरूपीं गुण व्यापिला । हे दुर्लभ जी दातारा ॥५॥
ऐसा संपूर्ण सर्व गुणीं । केवी पाविजे शारंगपाणी । विष्णुदास नामा करी विनवणी । मुक्ति चरणीं त्याचिया ॥६॥
||३९.||
शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥
मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥
मशका ओढी मेरू हाले बुडीं । जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥
उदकीं जरी मासोळी सूर्यासी भेटे । वारियाचे कोठें दृष्टि पडे ॥४॥
चंद्राचें चांदणें घेती जे पालवी । मिथ्या माया देवी नामा म्हणे ॥५॥
||४०.||
नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥
विंचू ह्मणतसे मी उदार दाता । उचित हें देतां नलगे वेळ ॥२॥
सूकर ह्मणे गृहस्थ भला । शेखीं तयाचा डोळा विष्ठेवरी ॥३॥
नापिक ह्मणे माझी । नांदणूक मोठी । धोकटिं मा-झारीं जन्म गेला ॥४॥
नामा ह्मणे माझी वासना हे खोती । विठ्ठल चरणीं मिठी पडली असे ॥५॥
||४१.||
ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल ॥१॥
देव खादलें ते काय करी जाणा । सर्व अवगुण तयापासीं ॥२॥
अवघीं संतति कावळे पोशिले । जावोनि बैसले विष्टेवरी ॥३॥
भुजंगाचे मुखीं अमृत घातलें । फिरोनि पाहिलें विषयम ॥४॥
नामा ह्मणे ऐसे अभक्त निर्लज्ज । त्यांसि केशिराज उपेक्षील ॥५॥
||४२.||
कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें ॥१॥
कण्हेरीच्या मूळा सुगंध तो नाहीं । कसाबाची गाई जिणें कैचें ॥२॥
रुईदूध जरी येईल । भोजना । लेभियाच्या धना वेंच नाहीं ॥३॥
निर्फळ हें जिणें भक्ताविण मन । नामा म्हणे जाण नये कामा ॥४॥
||४३.||
बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥
हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥
अनामिकासंगें पाठवितां पंडिता । तो तयातें तत्वतां काय जाणे ॥३॥
नामा म्हणे बापा करूं नको तैसें । विचार कायसे पाहसील ॥४॥
||४४.||
बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥
जयाची वासना तयासीच गोड । प्रेमसुखचाड नाहीं तया ॥२॥
वांझ ह्मणे मी वाढवितेम जौंझार । उघडावया कैवाड नाहीं कोणी ॥३॥
अस्वलाचें तेल माखियलें कानीं । तें ह्मणे रानीं थोर सुख ॥४॥
स्वामीचिया कानी खोविली लेखणी । ते घेत असे धणी घरोघर ॥५॥
गाढवासी लविली तूप पोळी डाज । भुंके आळोआळ लाज नाहीं ॥६॥
सूफरा कस्तूरी चंदन लविला । तो तेथोनि पळाला विष्टा खाया ॥७॥
नामा ह्मणे माझें मन हें वोळलें । धरिलासे गोपाळ सोडीचिना ॥८॥
||४५.||
भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । तैसे आचार गौरब । सुकुलिन जनाचे ॥१॥
झाड जाणावें फूलें । मानस जाणावें बोलें । भोगें जाण्याबेम केलें । जन्मांतरींचें ॥२॥
लोभ जाणावा उभय दृष्टी । क्रोध जाणाव भोवया गांठीं । लटिका जाणावा बहु गोष्टी । नष्त प्रकृति ओळखावा ॥३॥
द्वाही घातलिया जाणावा खरा । ढोकळ जाणावा कली अबसरा । परद्बारिणी जाणावी उण्या उत्तरा । कुश्चळी घरोघरीं हिंडतसे ॥४॥
मृदंग जाणावा गंभीर नांदे । गाणें जाणावें सुस्वर शब्दें । ओंकार जाणावा अक्षरभेदें । शाहाणा शब्दें ओळखावा ॥५॥
विष्णुदास नामा करी विनंती । या उत्तराची न मानाची खंती । केशवाचा प्रसाद आहे माझे चित्तीं । देवा काय करिसी तें न कळे ॥६॥
||४६.||
मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु ॥१॥
लांडगा वै-सला ध्यानस्थ । तोंवरी असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥२॥
श्वान गेले मलकार्जुना । देह कर्वतीं घातलें जाणा । आलें मनुष्यदेहपणा । परि खोदी न संडी आपुली ॥३॥
श्वानें देखिला स्वयंपाक । जोंवरि जागे होते लोक । मग नि-जलिया नि:शंक । चारी मडकीं फोडिलीं ॥४॥
वेश्या झाली पति-व्रता । तिचा भाव असे दुश्रिता । तिसी नाहीं आणिक चिंता । परद्वारावांचुनि ॥५॥
दात्यानें केली समाराधना । बहुत लोक जे-विले जाणा । परि न संडी वोखटी वासना । खटनट चाळितसे ॥६॥
ऐशा प्रकारच्या भक्ति । असती त्या नेणों किती । एक ओळंगा लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥७॥
||४७.||
अंतरीं आवेश धरूनि कामाचा । लटकी जल्पे वाचा शब्द ज्ञानें ॥१॥
बोलाचे पैं मांडे क्षीर घारी अन्न । तेणें समाधान केविं होय ॥२॥
बोलिल्यासारिखें न करी पाम र । वृथाचि कुरकुर वाढविली ॥३॥
नाहीं जीव तया प्रेता आलिंगन । तैसें तें श्रवण केल्या होय ॥४॥
नामा ह्मणे त्याच्या संगे स्थिति दुषे । झाला लाभ नासे तेथें आतां ॥५॥
||४८.||
सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी ॥१॥
कासया केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥
कावळा प्रात:स्नान करी । जितें मेलें तें न विचारी ॥३॥
मैदें लावूनि द्बादश टिळे । तो फांसा घालूनि निवटी गळे ॥४॥
सुसरी गंगे रहिवासु । बहुतां जीवांते करी ग्रासु ॥५॥
गंगे गेल्य ज्ञान सांगे । मांजर मारिलें तें न सांगे ॥६॥
बक ध्यान लावूनि टाळी । मौन धरूनियां मासा गिळी ॥७॥
नामा ह्मणे केशिराजा । ऐशिया जीवा लावी वोजा ॥८॥
||४९.||
आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥
नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥
जीव आणि शीव एकरूप ह्मणती । सेवेसी अंतरती केशवाचे ॥३॥
नामा ह्मणे तोचि केशवातें जाणतां । केशव ह्मणतां मुक्त होय ॥४॥
||५०.||
उपाप असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती ॥१॥
मनुष्या माझारी तो एक गाढव । तया अनुभव काय करी ॥२॥
नामा ह्मणे देव ऐसियासी कैसा । काया मनें वाचा भेदवादी ॥३॥
||५१.||
जो कां करी संतनिंदा । त्यासि दंडावें गोविंदा ॥१॥
करी संतासीम पाखंड । त्याचें करावें त्रिखंड ॥२॥
निंदक दंडावे दंडावे । नेऊनि अंधारीं कोंडावे ॥३॥
नामा म्हणे सांगेन एक । निंदक श्वानाचे ते लोक ॥४॥
||५२.||
संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें ॥१॥
पैल संत म्हणोनि जवळी गेलें । तेणें अमृत म्हणोनि विष पाजिलें । जीवासि घेतलें जालें तैसें ॥२॥
संसारेम गांजिलें गुरु गिरवसितीं । भगवे देखोनि तारावें ह्मणती । तंव ते नेणोनि उपदेशाची रीति । कुकर्मी घालिती तैसेम झालें ॥३॥
कोणी एक प्राणी सागरा पातले । पैल तारूं म्हणोनि जवळी गेले । तंव तारूं नव्हेती तेथिंचे हेर । बुडविती शरीर तैसें झालें ॥४॥
कोणी प्राणी हिंवें पीडिलें । पैम झाडी म्हणोनि जवळी गेलें । तंव अस्वल खिंखाळत उठिलें । नाक कान तोडिलेम तैसें झालें ॥५॥
कोणी एक अंधारी पडिला प्राणी । जवळी गेला पैल दीप म्हणोनि । दीप नव्हे सर्प माथींचा मणि । डंखिला प्राणि तैसें झालें ॥६॥
केशव म्हणे नामयातें । जे सर्वांभूर्ती भजती मातें । ऐसें हें वर्म सांगतसे तूतें । ऐसिया संतांतें म्हणिजे संत ॥७॥
||५३.||
हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची ॥१॥
काय करूं देवा जळो त्याची बुद्धी । जया नाहीं शुद्धि परलोकींची ॥२॥
मुद्रा धारण अंगीं तुळशीच्या माळा । परि नाहीं कळवळा खहिताचा ॥३॥
बहुरुपी वेष मिरविताती देहीं । पर-मार्थाची नाहीं आठवण ॥४॥
उपजीविकेलागीं घालिती पसारा । ज्ञान ते चौबारा विकीतसे ॥५॥
राजमान्य व्यापारी मोठे अधि-कारी । पुढें दावी कुसरी संगीताची ॥६॥
घातमात करी नटे ना-नापरी । चंचळ परनारी भुलवी तो ॥७॥
आपुलें लाघव दाऊनि वाडें कोडें । दुसर्याची पुढें होऊं नेदी ॥८॥
लटकें पैशून्य बोले दोष गुण । तेणें भयें कोण राहों शके ॥९॥
ऐसें नाम विटंबूनि करी हरीकथा । तेणें परमार्था विघ्न झालें ॥१०॥
सुगंध चंदन जवादि कस्तुरी । विष्टेचेचि थडी पडिली जैसी ॥११॥
नामा ह्मणे माझी हरिकथा माउली । विश्रांति साउली शिणलियाची ॥१२॥
||५४.||
काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें ॥१॥
भीतरी पालट जंव नाहीं झाला । तोंवरी न बोल जाणपणें ॥२॥
चंदनाचे संगतीं नीच महत्त्वा पावलीं । नांवें परि उरलीं पालट देहीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसें सांगा मज कोणी । जेणें केशव येऊनि ह्लदयीं राहे ॥४॥
||५५.||
अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥
शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥
अणुचें प्रमाण असतां दुजेपण । मेरुतें समान देईल दु:ख ॥३॥
नामा ह्मणे सर्व आत्मरूप पाहीं । तरीच ठायींच्या ठायीं निवशील ॥४॥
||५६.||
एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥
ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥
मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाचि स्वार्थ वेगीं करीं ॥३॥
नामा ह्मने समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥
उपासकांस उपदेश
||१.||
जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥
अंतकाळीं तुज सोडविना कोणी । एक्या चक्र-पाणी वांचोनियां ॥२॥
मागें थोर थोर कोणें केलें तप । उद्धरीलें अमूप नारायणें ॥३॥
नामा म्हणे ऐसे बहु झाले भांड । न उच्चारी लंड नाम वाचे ॥४॥
||२.||
नानापरिचीं दैवतें । बहुत असती असंख्यातें ॥१॥
सेंदुर शेरणी जीं इच्छितीं । तीं काय आर्त पुरविती ॥।२॥
अंध नको होऊं आलीया । भज भज पंढरिराया ॥३॥
सोडूं नको विष्णु त्रिपार-णिया । तोडी कुलूप पाठी गळ टोचोनियां ॥४॥
बाळा अबळा मुकी मौळी । क्षुद्र देवता जीवदान बळी । तेणें न पावती सुख कल्लोंळी । एक विठ्ठलावांचूनियां ॥५॥
नाना धातूची प्रतीमा केली । षोडशोपचारें पूजा केली । दुकळी विकूनि खादळी । तें काय आर्त पुरविती ॥६॥
आतां दृढ धरोनियां भाव । वोळगा वोळगा पंढ-रिराव । आपुले चरणीं देईल ठाव । विष्णुदास नामा ह्मणे ॥७॥
||३.||
खाटिकाप्रमाणें करिसी व्यापार । मनीं निरंतर धरो नियां ॥१॥
दुष्ट दुचाचारी दुर्बळ घातकी । परम नाशकी पापिष्ट तो ॥२॥
अपमानीं आशा धन मेळविसी । अंतीं नरकासि जासी जाण सत्य ॥३॥
नामा म्हणे जाण करूं मोटयाळें । जाऊनियां लोळे विष्टेमाजी ॥४॥
||४.||
आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥
खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥
मेलों मेलों ह्मणूनि गडबडां लोळे । परि कापी गळे आठवीना ॥३॥
आपुलें ह्मणवूनि विव्हळतसे । खदखदां हांसे दुस-र्यासी ॥४॥
वाटपाडयानें घर खाणोनि घेतलें । जितुकें मेळविलें तितुकें नेलें ॥५॥
आपुलें नेलें म्हणऊनि खलखळां रडे । परि घेतां दरवडे आठवीना ॥६॥
सोनाराचे घरीं पडिलेसें खाण । चोरिलें सुवर्ण तेंहि नेलें ॥७॥
आपुलें नेलें म्हणऊनि मोकलितो धाया । ठक-विल्या आयाबाया तें आठवीन ॥८॥
तराळा़चे घरीं आला असे जेव्हां । ह्मणतसे देवा काय करूम ॥९॥
दुसर्यासी मागतां परम सुख वाटे । आपण देतां फुटे काळीज तें ॥१०॥
जन्मवरी पोशिलें लेंकुराचे परि । हातीं घेऊनि सुरी उभा राहे ॥११॥
गर्दन सुळीं देतां म्हणे काय केलें । पुढिल्यासि मारिलें आठ-वीना ॥१२॥
नामा ह्मणे विष्णुदास ऐसे जे निर्लज्ज । त्यांसी पंढरि-राज केंवि भेटे ॥१३॥
||५.||
अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम ॥१॥
ह-रीचे वांचोनि सुकृत करी । तया नांव पुण्य ठेविजे जरी । तुटोनि पडो त्यांची वैखरी । अंतीं महा अघोरीं वास तया ॥२॥
समारंभ करिती आणिक देवाचा । ह्मणती येणें विष्णु तृप्त होय साचा । धिग् धिग् आचार जळो त्यांचा । वांयांवीण वाचा विटाळली ॥३॥
पहा हो नवही द्बारें एकचि देहीं । रसस्वाद कान देतील कांहीं । जयाचा मान तयाच्या ठायीं । येतसे पाहीं सेवितां ॥४॥
जो देवदेवतां शिरोमणि । असुर रुळती जयाच्या चरणीं । तो सांडिती चकपाणी । भजना हातीं होईल तुझिया ॥५॥
विष्णुदास नामा विनवी जगा । अझूनि तरी हरीसि शरण रिघा । जे जे अपराध केले असतील मागा । ते ते नेईल भंगा स्वामि माझा ॥६॥
||६.||
पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥
भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥
सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥
सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥
वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥
तोंड धरून मेंढा तारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥
सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥
अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८।
एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥
नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमर्टे ॥१०॥
||७.||
व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥
मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥
टाकीं टाकीं असत्य विठ्ठल हेंचि सत्य । होईल सर्व कृत्य एका नामें ॥३॥
नामा म्हणे दैवत एक तो अच्युत । सांगितलें हित खेचर विसें ॥४॥
||८.||
या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥
पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥
तोहि जरी म्हणेल अहं-ब्रह्मास । तरी न पहावी वास येहीं नयनीं ॥३॥
कोटि कोटी ब्रह्मांडें एक एक्या रोमीं । व्यापोनियां व्योमीं वर्ततसे ॥४॥
ऐसा माझा विठो सर्वां घटीं सम । न संडावें वर्म नामा म्हणे ॥५॥
||९.||
केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील ॥१॥
तरी ते शब्द झणीं कानीं हो पडती । पाखांडी ह्मणती सहावें तें ॥२॥
इमद्रियांसि तुह्मी करा रे जतन । भजावा निधान श्रीविठ्ठल ॥३॥
छेदावया शिर हस्त सहस्रांचें । जरी बहूतांचे उगा-रिले ॥४॥
परि तूतें नाम आन न देवाचें । केशवापरतें कैंचें असे ब्रह्म ॥५॥
अंगें चतुरानना झालिया हो भेटी । तोहि जरी गोष्टी ऐसी करी ॥६॥
तरी तो चळला पोटीं ऐसें जाण । एकीं दुजेपण दावी तरी ॥७॥
ब्रह्मकटाह एक उल्लंघों शके ऐसा । वर्तोनि दाही दिशा वर्ते जरी ॥८॥
केशव नव्हे तो हो कां अनारिसा । म्हणोनियां वासा पाहों नक ॥९॥
व्यसन भक्ति विरक्ति प्रौढी पुरुषार्थ पांचवा । जीवा-चिया सेवा ना कां ॥१०॥
सर्वाभूतीं आहे केशव परमात्मा । न विसंबावें वर्मां नामा ह्मणे ॥११॥
जनांस उपदेश-
||१.||
देवा धर्मीं नाहीं चाड । त्यासि पुढें आली नाड ॥१॥
जैसें डोंगरींचें झाड । त्याचें जन्म झालें । वाड ॥२॥
नामा म्हणे भक्ति गोड । स्वानंद नेणती ते मूढ ॥३॥
||२.||
पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण ॥१॥
सर्वांभूतीं समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ॥२॥
यावेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाहीं ॥३॥
येणें संसार सुखाचा । ह्मणे नामा शिंपीयाचा ॥४॥
||३.||
ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥
तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥
चिरीरी घेतो सांपडलिया हातीं । अवधी त्याची पळती टाकोनियां ॥३॥
संतीं न म्हणावें वचन निषुर । वेगीं ठाका द्बार केशवाचें ॥४॥
नामा म्हणे शरन रिघा हरि पायीं । तया शेषशायी न विसंबे ॥५॥
||४.||
विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्व हें लटिकें जाणूनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळमोहो इद्रियांचा रोहो । परि न धरिसी भावो भजनपंथें ॥३॥
नामा ह्मणे देवा करी तूं लवलाहो । मयूरचा टाहो घन गर्जे ॥४॥
||५.||
लव निमिष म्हणतां आहे नाहीं पाहतां । क्षण एक संपादितां विषयो हा ॥१॥
स्वहित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीचे बळें एक जहाले आंधळे । वेढिलें कळिकाळें स्मरण नाहीं ॥३॥
एक विद्यावंत जातीचा अभि-मान । ते नेले तमोगुणें रसातळां ॥४॥
मिथ्या मायामोह करूनि हव्यास । वेंचिलें आयुष्य वांयांविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा । सोडवीं केशवा मायबापा ॥६॥
||६.||
चांदणें नावडे चोरा । सद्बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥
चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥
लांव जाणावी उफराटिये दृष्टी । क्रोधी जाणावा भोंवयांसीं गांठी । लटिक्या जाणा बहुता गोष्टी । नष्ट कुचेष्ठी ओळखावा ॥३॥
नारी जाणावी भ्रतारभक्ति । आचारें जाणावी महा सति । धनुर्धर जाणावा संधान युक्ति । संत तापसीं ओळखावा ॥४॥
जयीं घातलिया निघे खरा । ज्ञान जाणे तोचि च-तुरा । शिंदळी जाणावी नीच उत्तरा । कुसळी घरोघरा फिरतसे ॥५॥
इतुकिया बोलाची न मानावी खंति । विठ्ठलचरणीं ठेवूनियां मति । प्रसन्न होईल लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥६॥
||७.||
देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥
मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥
क्षणक्षणा देह आयुष्य पैं काटे । वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥
मोहाचीं सोयरीं मिळालीं चोरटीं । खाऊनि शेवटीं घर घेती ॥४॥
जोंवरी संपत्ति तंववरी हे सखें । गेलीया तें भुंके सुणें जैसें ॥५॥
नामा म्हणे केशवा मी तों तुझा दास । मज आहे विश्वास तुझ्या नामीं ॥६॥
||८.||
भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥
देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥
माझें घरदार माझा संसार । मी मोठा चतुर ह्मणोनियां ॥३॥
आपणा देखतां जाती तें पाहती । मीपणाची भ्रांति सुटों नेणे ॥४॥
नामा ह्मणे आतां काय म्यां बोलावें । भोंवत असावें चौर्यांशीला ॥५॥
||९.||
विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥
काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥
सुट-केचें मूळ जाण । रामकृष्ण नारायण । येणें तुटेल भवबंधन । जन्मा न येसी सर्वथा ॥३॥
साधन इतुकेंचि पुरे । न लगती मंत्रांचे भार । ते बुडविती साचार । परि तरों न देती ॥४॥
नामा म्हणे ते पामर । नेणतीच हा मार्ग सार । परि वाचे नाहीं उच्चार । तो जाणावा महादोषी ॥५॥
||१०.||
मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥
नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥
होतील त्यां मुक्ती पुरतील त्यां आर्ती । चरण हे चिंतीं विठ्ठलाचे ॥३॥
नामा ह्मणे केशव सर्वांभूतीं देव । ऐसा धरीं भाव भजनशीळ ॥४॥
||११.||
कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥
भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥
सर्वभावें हरिभजन तूं करी । भक्ति दे पुढारी तारीक सत्य ॥३॥
नामा ह्मणे दया मांडी सोडीं माया । भजन लवलाह्या हरीचें करीं ॥४॥
||१२.||
वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥
कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥
भक्ताचा पाळक अनाथाचा कैवारी । ब्रिदें चराचरीं वर्णि-ताती ॥३॥
शरीरसंपत्तीचा सोडा अभिमान । मन करा लीन कृष्ण-रूपीं ॥४॥
आसनीं शयनीं चिंतितां गोविंदु । तेणें तुटे कंदु भव-व्याधि ॥५॥
परदारा परदासांचे पीडन । सांडूनि भजन करा त्याचें ॥६॥
करा सर्वभावें संतांची संगति । नाहीं अर्थाअर्थीं जन्मा येणें ॥७॥
शुकसनकादिक प्रल्हाद जनक । परीक्षिती मुख्य बिभिषण ॥८॥
भीष्म रुक्मांगद नारद उद्धव । शिबि कवि देव इत्यादिक ॥९॥
शास्त्रांचें हें सार वेदां गव्हार । नाम परिकर कलियुगीं ॥१०॥
नामा म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पुंडलिकें ॥११॥
||१३.||
पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥
निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥
ऐसें दृढ मनीं धरूनि राहसी । तरी माझें पावसी निजपद ॥३॥
पराकारणें प्राण वेंचि जो सर्वथा । जाणे परव्यथा कळवळोनि ॥४॥
परसुख संतोष धरी जो मानसीं । जरी परलो-कासी जाणें आहे ॥५॥
देहाचा अभिमान न धरावा चित्तीं । धरावी उपरति उपशमु ॥६॥
सर्वकाल प्रीति संतांचि संगति । गावीं अनु-रागें प्रीति नामें माझीं ॥७॥
सर्वांभूतीं सर्वदा ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥
सर्वकाळ परमात्मा आहे सर्वदेशीं । हे भावना अहर्निशीं दृढ धरीं ॥९॥
संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जावें तेथें तेथें लोटांगणीं ॥१०॥
चिंता न करीं नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥११॥
||१४.||
संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥१॥
रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म झाला ॥२॥
गुरुपत्नीशीम रतला । क्षयरोय त्या चंद्राला ॥३॥
इंद्रा अंगीं सहस्र भगें । नामा म्हणे विषयासंगें ॥४॥
||१५.||
लावण्य सुंदर रूपानें बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥१॥
देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥२॥
ऐसी जे घातकी जन्म कासयाची । चांडाळीन तिसी नरकप्राप्त ॥३॥
नामा म्हणे तिचें पाहूं नये तोंड । पापीण ते रांड बुडवी नरा ॥४॥
||१६.||
कायारूप जिचें हिनवट अती । माउली धन्य ती आहे नारी ॥१॥
तियेवरी मन कदापी नव जाये । भजना न होये कदाचळ ॥२॥
ऐसिये माउली परउपकारी । घात हा न करी भज-नाचा ॥३॥
नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावें माउलीचें ॥४॥
||१७.||
परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा ॥१॥
सर्वांभूती कृपा संतांची संगति । मग नाहीं पुन-रावृत्ति जन्ममरण ॥२॥
शास्त्रांचें हें सार वेदांचें गव्हार । तें नाम परिकर विठोबाचें ॥३॥
नामा ह्मणे नलगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥४॥
||१८.||
धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥
लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥
दंभ अभिमान सर्व त्यजोनियां । शरण त्या स-खीया जावें आतां ॥३॥
निंदा करिती तो मानावा आदर । स्तुति तें उत्तर नायकावें ॥४॥
न धरावी चाड मानासन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ॥५॥
नामा ह्मणे हेंचि रूढवावें मानसीं । क्षण एक नामासी विसंबूं नये ॥६॥
||१९.||
अंतींचा लाभु आधींच साधिजे । देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥
आदि मध्य अंतु तोचि हा व्यापकु । विश्वप्रतिपा-ळकु नारायण ॥२॥
विषय महापुरीं पतीत जीव भारी । तैशापरीहि हरिनाम ध्यावें ॥३॥
नामा ह्मणे हा दुर्लभ नरजन्मु । केशव मे-घश्यामु अनुसरा वेगीं ॥४॥
||२०.||
जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥
अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥
राहें निरंतर राघवाचे द्वारीं । तेणें भवसागरीं तरसी बापा ॥३॥
नवमास मायें वाहिलसि उदरीं । आस केली थोरी होशी ह्मणोनी ॥४॥
स्तनपान देऊनि मोहें प्रतिपाळीं । तेहि अंतकाळीं दूर ठाके ॥५॥
सर्वस्व स्वामिणी ह्मणवीतसे कांता । तेहि केश देतां रडतसे ॥६॥
ह्मणे म्यां मेल्याचें सुख नाहीं देखिलें । तेणे तंव पाळिलें अर्थें प्राणें ॥७॥
गाई घोडे ह्मैसी आणिक त्या दासी । धन त्वां सा-यासीं मेळविलें ॥८॥
तुझिया धनाला नाही पार लेखा । एकलचि मूर्खा जासी अंतीं ॥९॥
हातींच्या मुद्रिका कानींचे ते नग । करोनि लगबग काढिती वेगीं ॥१०॥
अंगींचीं लुगडीं फेडोनियां घेतीं । तुज बांधोनियां नेती यमदूत ॥११॥
भूमिभार झाला ह्मणती वेग करा । नातळती श-रीरा इष्ट मित्र ॥१२॥
स्मशाना नेऊनि भडाग्नि देऊनि । येती परतोनी सकळ जन ॥१३॥
एकलेंचि येणें एकलेंचि जाणें । पहा दृढ ज्ञानें विचारोनी ॥१४॥
पापपुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती । येरें तीं राहती जेथिंचीं तेथें ॥१५॥
ऐसा हा संसार माया वेष्टियला । ह्मणोनि दुर्हाविला योगीजनीं ॥१६॥
विष्णुदास नामा विनवीतसे तुह्मां । झणीं परब्रह्मा विसरूं नका ॥१७॥
||२१.||
अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण ॥१॥
धिक् त्याचें जिणें जन्मला कासया । जरी पंढरिराया विसरला ॥२॥
रामनामीं रत नव्हेचि बापुडें । जननिये सांकडें घातलें तेणें ॥३॥
ऐसा जन्म नको नको गा श्रीरामा । ह्मने तुझा नामा विष्णुदास ॥४॥
||२२.||
जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥
माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥
मनोमय साक्ष माणिकाप्रमाणें । तूंचि नारायण काळ खंडी ॥३॥
नामा ह्मणे जावें शरण केशवा । सळेचा जो ठेवा न पवसी ॥४॥
||२३.||
अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं ॥१॥
तोचि एक नर श्रीहरिसमान । करी दुजा कोण नाहीं ऐसा ॥२॥
दीनासी समान करितां आदर । त्याच्या उपकारा पार नाहीं ॥३॥
नामा ह्मणे असे खूण हे भाविकां । सर्वामभूतीं देखा पाहे ऐक्य ॥४॥
||२४.||
भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु । चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया ॥१॥
अन्नदाने दृढा-युषी । उदकदानें सदासुखीं । मंदिरदानें भुवनपालखी । सुपरिमळू उपचारां ॥२॥
वस्त्रदानें सुंदरपण । तांबूलदानें मनुष्यपण । गोपी-चंदनें ब्राह्मणपण । अतिलावण्य सुंदरता ॥३॥
जे वृक्ष लविती सर्वकाळ । तयावरी छत्रांचें झल्लळ । जे ईश्वरीं अर्पिती फळ । नाना-विध निर्मळ ॥४॥
ऐशा दानाचिया पंक्ति । वेगळाल्या सांगों किती । एका ध्यारे लक्ष्मीपति । विष्णुदास ह्मणे नामा ॥५॥
||२५.||
एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥
एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥
तुज जागरणा जाणां काय वेंचे । हरिहरि ह्मणती काय वेंचे ॥३॥
संतसमागमा जातां काय वेचें । चरणरज वंदितां काय वेंचे ॥४॥
एक दंडवत करितां काय वेंचे । अपराधी ह्मण-वितां काय वेंचे ॥५॥
एक प्रदक्षिणा करितां काय वेंचे । तीर्थया- येसी जातां काय वेंचे ॥६॥
ऐसी निमाली भक्ति कां न करिसी निर्दैवा । नामा ह्मणे केशवा अनुसर पां ॥७॥
||२६.||
एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा ॥१॥
एकादशी दिनीं करील जो भोग । त्यासी माता संग घडतसे ॥२॥
एकादशी दिनीं खेळेळ सोंगटी । काळ हाणील खुंटी गुदस्थानीं ॥३॥
रजस्त्री शोणीत सेविल्या समान । तांबुल चर्वण करील जो ॥४॥
नामा ह्मणे नाहीं माझ्याकडे दोष । पुराणीं हें व्यासवाक्य आहे ॥५॥
||२७.||
निंदील हें जन सुखें निंदू द्यावें । सज्जनीं क्षोभावें नये बापा ॥१॥
निंदा स्तुति ज्याला समान पैं झाली । त्याची स्थिति आली समाधीला ॥२॥
शत्रुमित्र ज्याला समसमानत्वें । तोचि पैं देवातें आवडला ॥३॥
माती आणि सोनें ज्या भासे समान । तो एक निधान योगीराज ॥४॥
नामा ह्मणे ऐसे भक्त जे असती । तेणें पावन होती लोक तिन्ही ॥५॥
||२८.||
भवसागर तोडितं कं रे करितसां चिंता । पैल उभ दाता पांडुरंग ॥१॥
निजाचें जें पीठ सोडूनि वैकुंठ । येथें वाळवंट आवडलें ॥२॥
देव गुज सांगे पंढरीसि यारे । प्रेमसुख घ्यारे नाम माझें ॥३॥
तारीन भवसिंधु घ्यारे माझी भाक । साक्ष पुंडलीक करूनि सांगे ॥४॥
काया वाचा मनें दृढ धरा जीवीं । मी त्याचा चालवीं भार सर्व ॥५॥
हें जरी लटिकें नामया पुसा । आहे त्या भरंवसा नामीं माझे ॥६॥
||२९.||
एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं ॥१॥
म्हणे कां नरहरी नारायण । मग तुज गांजील कोण ॥२॥
दोन मनीं जरी तूं धरिसी । तरी वांयां दंडिला जासी ॥३॥
त्रिविध भक्ति चराचरीं । तयामाजिल एक तूम करीं ॥४॥
चहूंवेदीं जें बोलिलें । तें तूं करीं बा उगलें ॥५॥
पंचइंद्रियांचा संग । त्यांचा नको करूं पांग ॥६॥
साहि चक्रीं मन पवन । तेथें नव्हे आत्मनिधान ॥७॥
सप्तस्वरीं करीं कीर्तन । आणिक न लगेरे साधन ॥८॥
अष्टहि गुणीं सात्विक पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥९॥
नवहि द्वारें दंडिती । पुनरपि कोठें कैंचि भक्ती ॥१०॥
दाही दिशा अवलेकितां । दिवस गेले मोजितां ॥११॥
अकरा रुद्र जाले जरी । तरी एकचि श्रीहरि ॥१२॥
बारा मास आणि पक्ष । व्यर्थ जाती दे तूं लक्ष ॥१३॥
तेरा गुणांचे तांबूल । समर्पावें पूगीफळ ॥१४॥
चौदा भुवनें ज्याचे पोटीं । त्याचें नाम विचरा कंठीं ॥१५॥
पंधरा दिवसां एकादशी । करा जागर उपवासी ॥१६॥
षोडश उपचारें पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥१७॥
सत्रावी जीवनकळा । तिचा घे कां रे सोहळा ॥१८॥
अठरा पुराणें वाणिती । निरंतर कृष्ण कीर्ति ॥१९॥
म्हणे विष्णुदास नामा । शरण जावें पुरुषोत्तमा ॥२०॥
||३०.||
हरिनामीं उदास तो पतित निष्ठुर । तया यमकिंकर गांजितील ॥१॥
तोचि हरिचा दासु नामीं । ज्या विश्वासु । तया गर्भवासु नाहीं नाहीं ॥२॥
मार्ग सांडोनियां आडमार्गें जाती । ते व्याघ्रा वरपडे होती क्षणामाजी ॥३॥
नामा म्हणे जिंहीं नामीं आ-ळस केला । तो येवोनि गेला व्यर्थ एक ॥४॥
||३१.||
रामनाम म्हणतां संसाराचें भय । म्हणती त्याच्या होय जिव्हे कुष्ट ॥१॥
अमृत सेवितां कैंचेम ये मरन । जाणती हे खूण अनुभवी ॥२॥
ज्याची एकवृत्ति रामनामीं प्रीति । असतां कैसे होती गर्भवास ॥३॥
नामा म्हणे नामीं दृढ भाव धरा । आत्म-हित करा जाणते हो ॥४॥
||३२.||
दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥
विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥
भक्ति भक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिती निरंतर वोळगण ॥३॥
नामा म्हणे जना मानी पैं विश्वास । मग तुज गर्भ-वास नव्हे नव्हे ॥४॥
||३३.||
सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं ॥१॥
होईल तुझें हित होसिल पूर्ण भरित । सर्वांभूतीं हित हेचि दया ॥२॥
वोळंगे विठ्ठलरूपा मार्ग हाचि सोपा । विष-याच्या खेपा तुटतील ॥३॥
नामा म्हणे केवळ आह्मां नित्य काळ । दिननिशीं पळ विठ्ठल देव ॥४॥
||३४.||
व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे ॥१॥
आयुष्य जाईल क्षणांत सरोन । पावसी पतन कुंभिपाकीं ॥२॥
नाम संकीर्तन नाइके स्वभावें । प्रत्यक्ष तें शव ज-गामाजीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसे गेले बहुतेक । सांगें सकळिकां हेंचि आतां ॥४॥
||३५.||
भूषक हव्यासें चालूनि भूमीतेम । मांजर तयातें टप-तसे ॥१॥
तसा तुज काळ टपे वेळोवेळां । वेगीं त्या गोपाळा भजावें बापा ॥२॥
भानुचेनि माप आयुष्य वो सरे । अवचितां कांरे डोळा झांकी ॥३॥
नामा म्हणे अरे निश्चिती हे मूढा । हरी नाम दृढा सेवीसीना ॥४॥
||३६.||
पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दीपेंविण मनोहर । शोभा व पवे ॥१॥
श्यामअंगीं तरुणी । सुंदर होय रम-णी । पुरुषाविण कामिनी । शोभा न पवे ॥२॥
द्रव्यावि ण नर । जरी जाहला सुंदर । तो त्यावीण चतुर । शोभा न पवे ॥३॥
गिया आणि कठीन । इंद्रिया नाहीं दमन । षट्कर्मेंविण ब्रह्मज्ञान शोभा न पवे ॥४॥
नामा ह्मणे सुंदरा । रखुमादेवीवरा । तुजविण दातारा । शोभा न पवे ॥५॥
||३७.||
निरंतर तुह्मीं करावा विचार । भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेलें वांयां विषयाचे संगें । भुलले वाउगे माया मोहें ॥२॥
अवघा करितां संसाराचा धंदा । वाचे वदा सदा हरि-नाम ॥३॥
सर्वभावें एका विठोबातें भजा । आर्ते करा पूजा हरि भक्त ॥४॥
सर्व सुख होई तुह्मांला आपैतें । न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा ह्मणे तुह्मीं विचारूनि पहा । सर्वकाळ रहा सतसंगें ॥६॥
||३८.||
न फिटे हें ओझें मायेचा गुंडाळा । एका तूं गोपाळा शरण जाईं ॥१॥
तुटेल बिरडें सुटेल हा मोह । केशवींच भाव असों देणें ॥२॥
कईंचे हे क्लेश उदासीन वांया । भजणें यादवराया हेंचि सत्य ॥३॥
नामा ह्मणे सुफळ भजनचि करीं । सर्वांभूतीं हरि भजनभावो ॥४॥
||३९.||
कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें ॥१॥
संसारतारक विसांवा हरि । गर्भवास चुकवी तो मुरारि ॥२॥
बाह्या उभारोनि घेतां राम नामा । वैकुंठींचा देव केशव परमात्मा ॥३॥
||४०.||
उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम ॥१॥
कामसंदीपन दोषआचरण । त्याचें परिहरण रामनास ॥२॥
दुर्वासना गहन दुर्बुद्धि आचरण । त्याचें परिहरण रामनाम ॥३॥
नामा ह्मणे कारण संसारतारण । जरी मनीं निधान रामनाम ॥४॥
||४१.||
देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥
तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥
उपावो न लगे दया ते धरावी । आपुली ह्मणावी माय जगीं ॥३॥
नामा ह्मणे बाप विठ्ठल तो आमुचा । कुळदेव साचा पुरातन ॥४॥
||४२.||
विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥
संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
निरंतर वसे हरि भक्तापासीं । विसंबेना त्यासी कदाकाळीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसा विठ्ठल सोडोनी । व्यर्थ काय जनीं शिणताती
||४३.||
स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥१॥
वांझेचिया स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥२॥
तरी प्रेमावीण फळती क्रियाकर्म । हातां येतीं वर्में विठोबाचीं ॥३॥
दृष्टीतें देखणें श्रवणीं ऐकणें । मनाचें बैसणें एक होय ॥४॥
नामा ह्मणे तरीच विठो येऊन भेटे । कावळ पालटे कैवल्य होय ॥५॥
||४४.||
गौळियाचे घरीं कैवल्याचे दानी । परब्रह्म अंगणीं कीडतसे ॥१॥
ऐसें कांहीं करा आलेनो संसारा । जेणें जोडे सोईरा पांडुरंग ॥२॥
करितां त्याचें काज मनीं न धरीं लाज । ह्मणे हे शरण मज सर्वभावें ॥३॥
राखे बळिचें द्वार पाहे त्याची वास । ह्मणे हा माझा दास अंतरंगु ॥४॥
गौळियांचें उच्छिष्ट मनीं न धरि वीट । आवडी निकट गोपाळांची ॥५॥
तरी क्रिया कर्म केलें होय सफळ । जरी ह्लदयीं गोपाळ येऊनि राहे ॥६॥
येरी ते मायावी जग भुलवणीं । नित्य विभांडणी सर्वभावें ॥७॥
नाभा ह्मणे ऐसे संतांचिये सोई । विठोबाचे पायीं मन ठेवीं ॥८॥
||४५.||
सर्व जिवां करी कारुण्य । वाचे सत्य उच्चारण । नित्य नामस्मरण । तोचि दास भगवंताचा ॥१॥
धन्य धन्य भूमंडळीं । धन्य धन्य साधुवचन पाळी । वेदमर्यादा वेगळी । कार्येम न करी सर्वथा ॥२॥
प्रात:काळीं उठुनी । नरहरिनाम उच्चारूनि । उभा राहूनि कीर्तनीं । जय जय नामें गर्जतसे ॥३॥
देवभक्ति आवडे ज्यासी । पुण्यप्रारब्ध ह्मणती त्यासी । जो उपजोनि आपुले बंशीं । पूर्वजांसि उद्धरितो ॥४॥
तीर्थें एक भावभजन । नित्य नित्य तें पिंड-दान । भूतदया तें भागीरथी स्नान । तेथ जनार्दन उभा असे ॥५॥
देखिलिया ब्राह्मण । वेदांसमान देत मान । यथाशक्ति करूनि दान । अतिथिपूजन जो करी ॥६॥
नामा म्हणे तोचि तरे । वैकुंठ तेथें उतरे । तीर्थें ह्मणती तो त्वरें । पाहों दृष्टी एकवेळा ॥७॥
||४६.||
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥
चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥
हेळसुनी निंदी दुरावी ब्राह्मणा । सभेमाजी जाणा दुर्हा-विती ॥३॥
त्याचें पाप नाहीं खंडण सर्वथा । म्हणोनि अनंता भय वाटे ॥४॥
कोपला प्रहर ब्राह्मणा मारिला । लक्ष वेडावलीं भूषण-त्या ॥५॥
क्रोध अग्नि ज्वाळा झगटती जेथें । न उरती तेथें काडि-मात्रें ॥६॥
उगेंच ब्राह्मणा सांबें छळियेलें । सर्व शांत झाले आपो-आप ॥७॥
अपेक्षिती कोण्ही तेंचि तें होतें । न बोलावे येथें बोल कांहीं ॥८॥
अग्नीसी लहान थोर न ह्मणावा । पडे परिस्वाहा सर्व कांहीं ॥९॥
मार्कंडेय बुद्धि छळूनि ब्राह्मन । आयुश्य तें उणें होय माझें ॥१०॥
ब्राह्मणाचें वीर्य मातंगीचे पोटीं । त्याचि एका गोष्टी आशिर्वाद ॥११॥
आयुष्याचे कल्प सात चौदा होती । ऐ-कोनि विश्रांति कीर्तनानें ॥१२॥
धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र । सर्व व्हावें हित ब्राह्मणातें ॥१३॥
कुळक्षयो व्हावे ऐसें वाटे जीवा । ब्राह्मणासीं दावा नको बापा ॥१४॥
नामा म्हणे ऐके धन्य ते ब्राह्मण । धरिले चरण माथां त्यांचे ॥१५॥
||४७.||
भक्त विठोबाचे भोळे । त्याचे पायीं ज्ञान लोळे ॥१॥
भक्तिवीण शब्दज्ञान । व्यर्थ अवघें तें जाण ॥२॥
नाहीं ज्याचे चित्तीं भक्ति । जळो तयाची व्युत्पत्ति ॥३॥
नामा ह्मणे ऐसें जाण । नाहीं भक्तासी बंधन ॥४॥
||४८.||
ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ ॥१॥
सर्वभावें करूनि सर्वभूतीं करुणा । जेथें मीतूंपणा ठाव नाहीं ॥२॥
भजन तया नांव निर्विकार निकें । विश्र्वीं माझ्या देखे विठोबासी ॥३॥
अखंड ह्लदयीं तेचि आठवण । साजिरे सम-चरण विटेवरी ॥४॥
नादलुब्ध जैसा आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥५॥
यापरी तल्लीन दृढ राखें मन । तयापरी श्रवण आव-डीचें ॥६॥
व्यवसायीं मन ठेवूनि कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥७॥
यापरी स्वहित अखंड विचारणें । करीं तें मनन सत्त्वशील ॥८॥
परपुरुषीं आसक्त जैसी व्यभिचारिणी । न लगे तिच्या मनीं घराचार ॥९॥
कीटकी भृंगीं जेंवि ऐसें अनुसंधान । निकें निज- ध्यासन दृढ होय ॥१०॥
सर्वभावें एक विठठलचि ध्यायीं । सर्वभूर्तीं पाही रूप त्याचें ॥११॥
सर्वांहूनि निराळा रजतमाहूनि वेगळा । भोगी प्रेमकळा तोचि भक्त ॥१२॥
सत्याचा सुभट नि:संगें एकट । वैराग्य उद्भट एकनिष्ट ॥१३॥
प्रारब्धाचे भागीं नेणें देहस्फुर्ति । अखंड ते धृति निरूपम ॥१४॥
निर्वासना मन निर्लोभ संपूर्ण । नेणें स्वरूपज्ञान संकल्पाचें ॥१५॥
अनुरागीं गोविंद गाईजे एकांतीं । या-परी विश्रांति आणिक नाहीं ॥१६॥
काया वाचा मन हा माझा अनु-भव । सांगितला सर्व आवडीचा ॥१७॥
नामा ह्मणे हेंहि बोलविले जेणें । उदार सर्वज्ञ पांडुरंग ॥१८॥
||४९.||
पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥
तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा । कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥
नको जाऊं बापा तेथें । मागुता न येशीं रे येथें । जे जे पाहूं गेले तियेतें । ते आले नाहीं मागुते ॥३॥
चंद्र पाहों गेला तियेसी । ओढूनि बांधिला भाळेसी । तैसा पडसी अभरंवशीं । मग मुकशी संसारासी बापा ॥४॥
वारितां वारितां ध्रुव गेला । तो नेऊनि अढळपदीं घातला । बळीस देश-वटा दिधला । तो घातला पाताळीं ॥५॥
नारदा दिधली कांसवटी । हनुमान केला हिंपुटी । रुक्मांगदाची वैकुंठी । नगरी नेऊनि घातली ॥६॥
तिचें वैष्णव लहाणें । कळों नेदिती आपुलीं विंदानें । हरि-कथांरंगीं नाचणें । नामकल्लोळीं ॥७॥
तीस दहा हात अकरा डोळे । ती किती काळाची न कळे । भयानक श्रीमुख कमळें । हातीं घे-ऊनि हिंडतसे ॥८॥
भस्म डौर त्रिशूल हातीं । ते न वर्णवे वेदश्रुतीं । तीसी नाहीं कुळ याती । आपपर ते कैचें ॥९॥
ते वेदशास्त्रां अगो-चर । ती सवें असे एक ढोर । कोठें न मिळेचि बिढार । ह्मणोनि स्मशांनीं वसतसे ॥१०॥
ऐसी ती थोर लांव । तिसी गांव ना शीव । कोठेंचि न मिळे ठाव । म्हणोनि समुद्रीं ॥११॥
तेथें सर्पाचें अंथरूण करी । निद्रा उदका भीतरीं । तया वैष्णवा माझारीं । निरंतरी वर्ततसे ॥१२॥
सांगेन ते परियेसीं । आहे ती संत मह-तापाशीं । आणि हरिकथेसी । बैसली असे ॥१३॥
ह्मणवोनी विश्वासें तूं जासी । मुकसी आपल्या संसारासी । नामा विनवी श्रोतयांसी । हें बोलणें वेदांचें ॥१४॥
||५०.||
ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा ॥१॥
जाणावें प्रत्यक्ष स्वरूप सगुण । सर्व नारायण तोचि दिसे ॥२॥
दिसे गोपाळांसी गोपिकांसहित । आनंदें डल्लत ह्मणे नामा ॥३॥
||५१.||
सांडूनि पंढरिची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ॥१॥
ताट वोघरिलें निकें । सांडूनि कवण जाय भिके ॥२॥
जो नेणे नामगोडी । तोचि मुक्तितेम चरफडी ॥३॥
आह्मीम पंढरीचे लाटे । नवजों वैकुंठीचे वाटे ॥४॥
झणीं भ्याल गर्भवासा । नामा म्हणे विष्णुदासा ॥५॥
||५२.||
पढंरिची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागें पुढें ॥१॥
लोखंड असतां सोनें झालें कैसें । सभागम मिषें गुणें त्याच्या ॥२॥
तैसेम एक वेळ करीं मायबापा । चुकवीं या खेपा चौर्यांशींच्या ॥३॥
नामा ह्मणे असो प्रारब्ध सरे । होई कृपण नीकुरे चरणाचे ॥४॥
||५३.||
पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा ॥१॥
कायावाचामन चरणीं ठेवावें । प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ ॥२॥
सुखाचें साजिरें श्रीमुख पहावें । जीवें उतरावें निंबलोण ॥३॥
बाहेरी भीतरीं कैवल्य आघवें । वाचे न बोलावें ब्रह्मानंदु ॥४॥
चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण । करी तुझें ध्यान रात्रंदिवस ॥५॥
||५४.||
विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू ॥१॥
सांडूनि वैकुंठ आले जगजेठी । वस्ती वाळवंटीं केली जाण ॥२॥
भक्त सहाकारी ब्रीदें बडिवार । सेवा सुखसार पांडुरंग ॥३॥
जीवींचे सोयरे न मिळे वैकुंठीं । हरिदासा भेटी आडलिया ॥४॥
प्रीतीचे वोरस उभा मागें पुढें । जीवासी आवडे भक्त राणा ॥५॥
लक्ष्मीचा विलासी न वाटे विश्रांती । आवडे श्रीपति भक्तभावा ॥६॥
सगें सर्वकाळ धांवे पाटो वाटी । घाली कृपादृष्टी तयावरी ॥७॥
अमृत सुरस नव्हेति पैं गोडी । ह्मणोनि आवडी कालयाची ॥८॥
ह-रुषें निर्भर सुरवरा खेळे । वाळवंटी लोळे संतसंगेम ॥९॥
अठ्ठावीस युगें उभा विटेवरी । भक्तप्रीय हरि स्वामि माझा ॥१०॥
नामा ह्मणे त्याचे सुखरूप पाय । क्षणेक न होय जीवाहुनी ॥११॥
||५५.||
पुंडलिकें रचिली पेंठ । संत ग्राहिक चोखट ॥१॥
प्रेम साखरा वांटिती । नेघे त्यांचे तोंडीं माती ॥२॥
समतेचे फ-णस गरे । आंबे पिकले पडिभरें ॥३॥
नामद्राक्षाचे घड । अपार रस आले गोड ॥४॥
नामा म्हणे भावें घ्यावें । अभक्तांचें मढें जावें ॥५॥
||५६.||
कर्मजड मूढ पतीत पामर । भवसिंधु पार नटके जया ॥१॥
यालागीं पंढरी केली मुक्ति पेंठ । भक्तें भूवैकुंठ वसविलें ॥२॥
हेंचि पुंडलिकें मागितलें निक्रें । जें सर्वथा परलोकें चाड नाहीं ॥३॥
भक्ति मुक्ति सिद्धि जें जया आवडे । तें तया पवादे विठ्ठलनामें ॥४॥
न लगती सायास करणेम कायाक्लेश । ना-साचा विश्वास दृढ धरा ॥५॥
नामा ह्मणे अवघे चला पंढरीये । भेटों बापमाय पांडुरंगा ॥६॥
||५७.||
अठ्ठावीस युगें उभा ठेला द्बारीं । पुंडलीकावरी ठेवुनि लक्ष ॥१॥
कृपेचा सागर भक्तजनवत्सल । आमुचा विठ्ठल माय- बाप ॥२॥
भक्तीसि भाळला अरूप रूपा आला । वेळाईंत झाला भक्तांलागीं ॥३॥
भक्तीचिया रूपें न घडे तें केलें । वैकुंठा आ-णिलें भूमंडळीं ॥४॥
भक्ति मुक्ति सिद्धि त्यापायीं लागती । उ-द्धट गर्जती विठ्ठलनामें ॥५॥
नामा ह्मणे केशव उदाराचा राव । सेवा चरणीं ठाव देईं आह्मां ॥६॥
||५८.||
विठ्ठलाचे पाय मनीं धरोनि राहे । मग संसार तें काय करील तुझें ॥१॥
संसाराचें भय नाहीं हरिच्या दासा । विठो आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
निरंतर वसे हरि भक्तांपाशीं । विसं-वेना त्यासी कदाकाळीं ॥३॥
नामा म्हणे ऐसा विठ्ठल सांडोनि । व्यर्थ काय जनीं शिणताती ॥४॥
||५९.||
शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥१॥
स्पर्शाचें सुख त्वचेचेनि द्वारे । माझिया दातारें ऐसें केलें ॥२॥
रूपाचें सुख नेत्राचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥३॥
रसाचें तें सुख रसनेचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥४॥
गधाचें सुख नाकाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥५॥
नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार । तयासी गव्हार विसरले ॥६॥
||६०.||
आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥
त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥
काय सांगों तुझी करणी नारायणा । वेदपारायणा केशिराजा ॥३॥
पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परि पंढरीची सर एका नाहीं ॥४॥
जन्मोजन्मींच्या पातका दरारा । चुके येरझारा एके खेपे ॥५॥
ब्रह्म-ज्ञानेंवीन मोक्ष आहे भूतीं । वाचेसि ह्मणती विठ्ठलनाम ॥६॥
बेचाळी-सांसहित जातीत वैकुंठा । नामा ह्मणे भेटा विठ्ठलदेवा ॥७॥
मुमुक्षूंस –
||१.||
तुह्मां हित करणें आहे । सेवा राघोबाचे पाय ॥१॥
दुष्टबुद्धि दुरी करा । तोडा अविद्येचा थारा ॥२॥
करा तुमचें मन । तुह्मां जवळी नारायण ॥३॥
नामा ह्मणे दृढ धरा । तारी निर्वाणीं चाकरा ॥४॥
||२.||
मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें ॥१॥
भजे तूं विठ्ठला सर्वांभूतीं भावें । न लगती नांवें आणिकांचीं ॥२॥
होईल सुटका घडेल भजन । नाम जनार्दन येईल वाचे ॥३॥
नामा ह्मणे घडे भजन विठ्ठलीं । ऐसीये निमोली भक्ती करी ॥४॥
||३.||
हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें ॥१॥
खंडलें एका बोलें । विठ्ठल समर्थें अंगिकारिलें ॥२॥
नामयानें संसारा जिंकिलें । केशव चरणीम मन ठेविलें ॥३॥
||४.||
न लगती डोंगर चढावे । हळुच पाऊल धरावें ॥१॥
विठ्ठलाचे पाय बरवे । गंगा विनविते स्वभावें ॥२॥
नामा ह्मणे तीर्थ बरवें । मुकुटीं धरिलें सदाशिवें ॥३॥
||५.||
आतां पांडुरंग स्मरा । जन्ममृत्यु चुकवी फेरा ॥१॥
ऐसा कांहीं करा नेम । मुखीं स्मरा कृष्णराम ॥२॥
चिंता ऐसें ध्यान । तेणें असा समाधान ॥३॥
न:मा ह्मणे हरिदास । त्यासि असावा अभ्यास ॥४॥
||६.||
हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें ॥१॥
घडी घडी प्रेम अंतरूम न द्यावें । सावधान व्हावें रामनामीं ॥२॥
यापरी स्वहितीं ठेवियलें लक्ष । ते पावती मोक्ष म्हणे नामा ॥३॥
||७.||
कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी ॥१॥
तैसें हें भजन श्रीरामा वें ध्यान । वाचे नारायण अमृत-मय ॥२॥
धन्य त्यावें कुळ सदां पैं सुफळ । दिननिशीं फळ रामनाम ॥३॥
नामा ह्मणे चोखट भक्त तो उत्तमू । वाचेसी सुगमु रामनाम ॥४॥
||८.||
कृष्णकथा सांग जेणें तुटे पांग । न लगें तुज-उद्वेग करणें कांहीं ॥१॥
समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दन एक ध्याईं ॥२॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । तराल निर्धार श्रुति सांगे ॥३॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥४॥
||९.||
एकवेळ नयनीं पहावा । मग जाईजे भलत्या गांवा ॥१॥
आठवाल वेळोवेळां । विठोबा आहेरे जवळां ॥२॥
ह्लदयीं मांडू-नियां ठसा । नामा म्हणे केशव असा ॥३॥
||१०.||
रामनाम वाचे बोल । तया पुरुषा नाहीं मोल ॥१॥
धन्य तयाचें शरीर । बरे जना उपकार ॥२॥
ऋणियां तो तारी । विश्व व्यापक तो हरि ॥३॥
नामा म्हणे स्वामी । सुखें वसे अंतर्यामीं ॥४॥
||११.||
राम म्हणतां रामचि होसी । भाक घेईं मजपाशीं ॥१॥
लवण समुद्रीं जागा मागे । तेंहि समुद्र झालें अंगें ॥२॥
वात दीपासंगें गेली । तेहि दीप अंगें झाली ॥३॥
नामा सांगे भाविक लोकां । नाम घेतां राहूं नका ॥४॥
||१२.||
केशव ह्मणतां जासी केशवपंथें । त्यांहूनि सरतें आ-णिक नाहीं ॥१॥
वेद कां पढसी शास्त्र कां सांगसी । उदंड वा-चसी हरी ह्मणतां ॥२॥
पहा याहूनियां आन नाहीं दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥
नामा ह्मणे धरीं केशवीं विश्वास । तरसी गर्भवास नामें एका ॥४॥
||१३.||
गुळ गोड व लगे ह्मणावा । तैसा देव न लगे वानवा ॥१॥
सेवी तोचि चवी जाणें । येरा सागतां लजिरवाणें ॥२॥
नामा ह्मणे या खुणा । तुह्मी ओंळखा पंढरिराणा ॥३॥
||१४.||
मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण ॥१॥
हरि बा हरि हरि मुकुंद मुरारी । माधव नरहरि केशिराज ॥२॥
ऐसा छंद वाचे सर्वकाळ जयां । नामा ह्मणे तयां दोष कैंचे ॥३॥
||१५.||
देवा सन्मुख दीपमाळा । कोणी भक्त हो उजळा ॥१॥
तेल घालारे फारसें । नामा ह्मणे रे उल्हासें ॥२॥
नामा दीपमाळ पाजळी । तेणें भक्ति त्यास झाली ॥३॥
||१६.||
तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ । दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल ॥१॥
आकांतीं द्रौपदीयें स्मरिला । तिचीं वस्त्रें आपणचि झाला । सभेमाजी मान रक्षिला । काळ पैं झाला कौरवांचा ॥२॥
विमळार्जून उन्मळिला । जरासंध तोही मारिला । कंसासूर निर्दाळिला । कान्हया झाला गोकुळींचा ॥३॥
ध्रुव जेणें अढळपदीं बैसविला । नामें एके अजामिळ उद्ध-रिला । उत्तरेचा गर्भ रक्षिला । तैं सोडविला परीक्षिती ॥४॥
जाति कुळ न पाहसी । नामें एकें उद्धरिलें गणिकेसी । त्या गोपाळाचें उच्छिष्ट खासी । गज सोडविसी पाणियाडें ॥५॥
ऐसा तूं कृपाळु गा देवा । प्रसन्न झालसि पांडवा । विष्णुदास नामा विनवी केशवा । प्रेमभाव द्यावा मजलागीं ॥६॥
||१७.||
भक्त प्रल्हादाकारणें । त्या वैकुंठींहूनि धांवणें ॥१॥
नरहरी पातला पातला । महा दोषा पळ सुटला ॥२॥
शंख चक्र पद्म गदा नाभीं नाभींरे प्रल्हादा ॥३॥
दैत्य धरी मांडीवरी । नखें विदारी नरहरी ॥४॥
पावला गरुडध्वज । नामया स्वामी केशवराज ॥५॥
||१८.||
जागारे गोपाळांनो रामनामीं जागा । कळीकाळा आ-कळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्रदळ समान अनुहात ध्वनी उठी । नामाचेनि बळें पातकें रिघालीं कपाटीं ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन । एकादशी उपवास तुह्मी जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोठीकुलें उद्धरती । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥
||१९.||
निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥
वेद शास्त्र स्मृति वदती पुराणें । पाहूनि जाणणें हेंचि सत्य ॥२॥
क्रिया कर्म धर्म ज्यालगिं करणें । ते खूण निर्वाण हेंचि असे ॥३॥
जप तप अनुष्ठान कां करिजे साधन । तेंचि प्रत्यक्ष निधान हेंचि असे ॥४॥
नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न सोडीं हे जीवें चरण तुझे ॥५॥
||२०.||
नामामृत सरिता चरणामृत माता । पवित्र हरिकथा मुगुट आणि ॥१॥
तेथें माझें मन होकां क्षेत्रवासी । राहेम संतांपाशीं सुख घेतां ॥२॥
अहिक्य परत्रें समतीरें साजि रीं । परमानंद लहरी हेलावत ॥३॥
मुक्तीची माउली मोक्षाची गाउली । शीणलिया सा-उली विषयताप ॥४॥
तेथें सनकादिक प्रेमळ सकळ । राहिले नि-श्चळ करोनि चित्त ॥५॥
नामा ह्मणे माझे सखे हरीजन । तारूं त्याचे चरण दृढ धरा ॥६॥
||२१.||
नित्य नेम आह्मां चिंतन श्रीरामा । आणिक उपमा नेघों नेघों ॥१॥
वळघलों हरि भूत भाव निर्धारी । दिसे चरा-चरीं हरिरूप ॥२॥
जें जें पडे दृष्टी आणिक नाहीं सृष्टी । हरिरूपीं भेटी हेंचि दिसे ॥३॥
नामा ह्मणे विठ्ठल सर्वभूतीं आहे । आणिक उपाय न लगती ॥४॥
||२२.||
एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम ॥१॥
श्रीहरीसारिखा गोसांवी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा ॥२॥
ऐसें नृत्य करी वेडें बागडें । वदन वांकुडें करू-नियां ॥३॥
चुकलें पाडस कुरंगिणी गिवसिती । तैसा ह्लषिकेशी न्या-हाळी तुतें ॥४॥
धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें । तैसा वोरस तूं तें केशिराज ॥५॥
नाभा ह्मणे इतुकें न करवे निर्दैवा । तरी वाचेसि केशवा उच्चारी पां ॥६॥
||२३.||
क्रिया कर्म धर्म तिहीं केलें सांग । जिहीं पांडुरंग दाख-येला ॥१॥
ओळखोनि मनें धरिला मानसीं । उभा अहर्निशीं ह्लदय-कमळीं ॥२॥
निजानंदबोधें नामाचेनि छंद्रें । डोलती आनंदें वोसं-डत ॥३॥
नाहीं देहस्मृति निमली वासना । मावळली कल्पना भा-वाभाव ॥४॥
अखंड विदेही रजतमावेगळे । भोगिती सोहळे प्रेम-सुख ॥५॥
त्याचिय द्वारींचा झालोंसे सांडोबा । म्हणोनि केशवा प-ढिये नामा ॥६॥
||२४.||
गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं ॥१॥
गाऊं नाचूं आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही नको देवा ॥२॥
मनाची पैं वृत्ति बुडे प्रेमडोहीं । नाठवती देहीं दुजा भाव ॥३॥
सगुणीं निर्गुणीम एकचि आवडी । चित्तीं दिली बुडी चिदानंदीं ॥४॥
नामा म्हणे देवा मागणें ऐसी सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥५॥
||२५.||
तुमचें तीर्थ आम्हीम आदरें सेवावें । तेणें तें पावावेम परब्रह्म ॥१॥
विश्वाकरवीं ब्रह्म ह्मणवितां तुह्मीं । म्हणों जी माय आम्ही पिता तुझी ॥२॥
जो तुमचे चरणीमचा तो नाहीं आम्हां । विष्णुदास नामा न तेथें ॥३॥
||२६.||
उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥
म्हणे ध्यारे सुख प्रेम अलेकिक । साधन आणिक न लगे कांहीं ॥२॥
मनाचेनि मानें ह्लदयीं मज धरा । वाचेसि उ-च्चारा नाम माझें ॥३॥
जेणें कर्में मज साधिलें पुंडलीकें । तेंचि तुह्मां नि कें सांगितलें ॥४॥
अनुदिनीं आवडी करूनि नित्य नवी । मज धरा जिवीं सर्वभावें ॥५॥
म्हणोनि पांडुरंग उभा भीमातीरीं । नामा निरंतरीं वोळंगे चरण ॥६॥
||२७.||
देवराज आले मंचकीं बैसले । भक्तांसि दिधलें अभय-दान ॥१॥
दासहो तुह्मी सकळ सुखी रहा । सुखी राहोनियां आनंद करा ॥२॥
रात्रंदिवस माझें करारे चिंतन । यमाचें बंधन नाहीं तुह्मां ॥३॥
विष्णुदास नामा गाऊनियां गेला । शेजे पहुडला देवराणा ॥४॥
||२८.||
अवघे हो ऐका अवघे श्रवणीं । अवघेचि होऊनि एकचित ॥१॥
विठोबाचें नाम अवघेंचि गोमटें । विचारीम नेटेंपाटें आपुल्या मनीं ॥२॥
अवघी हेचि क्रिया अवघें हेंचि कर्म । अवघा हा स्वधर्म सत्य जाणा ॥३॥
अवघें हें सगुण अवघें हें निर्गुण । अवघें हें परिपूर्ण शुद्ध बुद्ध ॥४॥
अवघा हा आचार अवघा हा विचार । अवघा हा संसार सर्व काळ ॥५॥
अवघा जेणें दुरी ठाके भावभ्रम । निरंतर नाम गाय नामा ॥६॥
||२९.||
अवघी चित्तवृत्ति एकवटोनि जेणें । अवघा धरिला मनें पांडुरंग ॥१॥
अवघें सुख एक तयासि फावलें । अवघें सफळ झालेम जन्म त्याचें ॥२॥
अवघीं व्रतेम दानेम केलीं पैं तयानें । ज्याचें विठ्ठलीं ध्यान मन जडलें ॥३॥
नित्य विठ्ठल नाम गर्जती सप्रेमें । अवघे नित्य नेम झाले त्यांचे ॥४॥
अवघा इष्ट मित्र बंधु माता-पिता । केला आवडता पांडुरंग ॥५॥
नामा म्हणे ऐसे अवघे सं-प्रदाय । मिळोनि धरा पाय विठोबाचे ॥६॥
||३०.||
तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद ॥१॥
नवमापासूनि दशमाचे अंतीं । बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥
प्रथम अक्षरीं मध्यमा सूचना । नाम नारा-यणा अंतकाळीं ॥३॥
नामा म्हणे तुह्मी नाम स्मरा मनीं । वैकुंठ-भुवनीं वास होय ॥४॥
||३१.||
अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहे अंगसंगें समागमें ॥१॥
समागमें असे सर्व साक्षी देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥
सदा मुखीं नाम आळस न उच्चारी । प्रीति मानी हरि हास्यमुखें ॥३॥
फळपाकीं सर्व देतील प्राणीया । नामा धरी पाया बळकट ॥४॥
||३२.||
नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु ॥१॥
स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग । नाहीं तया मग जन्ममरण ॥२॥
आपणचि नांदे भक्तांचिया घरीं । आपणचि करी सर्व कृत्य ॥३॥
नामा ह्मणे तो देव पंढरीनिवास । कळिका-ळासी वास पाहों नेदी ॥४॥
||३३.||
भीष्मासी आपण पाडियलें रणीं । गोविंदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥१॥
हरिश्वंद्र वाहे डोंबाघरीं पाणी । गोविदें नि-र्वाणीं भेटी दिल्ही ॥२॥
परीक्षिती बैसे मरण आसनीं । गोविदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥३॥
नामा ह्मणे तुह्मी देव धरा मनीं । गोविंद निर्वाणीं भेटे तुम्हां ॥४॥
||३४.||
हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं ॥१॥
नयनीं सखा पहा कृष्ण न्याहाळुनी । प्रकाशलें तेज रवि गेला लपोनी ॥२॥
हरिचरणीं लावी मन दर्शन । झालीया जाती त्रिविधताप हरपोन ॥३॥
तुळसीचा सुंगध मस्तकीं धरा । नामा म्हणे चरण दृढ धरा ॥४॥
||३५.||
जिव्हे केशवाचें करितां कीर्तन । मिथ्या वदूं नको एक रामाविण ॥१॥
म्हणऊनि हरिरंगीं रंगा । नाम घेतां महा पातकें जाती भंगा ॥२॥
चित्तीं चिंतितां होई तद्रूप । मिथ्या विषयीं लुब्ध झालिया काय सुख ॥३॥
पूजन करा तुह्मी अच्युताचें । नामा ह्मणे एकचित्तें साचें ॥४॥
||३६.||
संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥
मायबाप सखा विठ्ठल विसांवा । त्याचे पायीं ठेवा सदा मन ॥२॥
निजरूपबोध तोचि ज्ञानदीप । आन्मदस्वरूप बाप माझा ॥३॥
नामा ह्मणे त्याच्या संगतीचा वारा । पावे पैल पारा हेळामात्रें ॥४॥
||३७.||
आगमीं नाम निगमीं नाम । पुराणीं नाम केशवाचें ॥१॥
अर्थी नाम पदीं नाम । धृपदीं नाम त्या केशवाचें ॥२॥
अनु-भवे भावें कपटें प्रपंचें । परि हरीचें नाम देऊं दे वाचे ॥३॥
नाम व्हावें नाम व्हावें । नाम व्हावें त्या केशवाचें ॥४॥
ऐसें नाम बहु सुंदर । मानीं तरले लहान थोर ॥५॥
नामा म्हणे अंतर । पडों नेदीं याउपर ॥६॥
||३८.||
जें जें पुण्य जोडे हरिनाम गजरीं । त्याचे वांटेकरी दोघेजण ॥१॥
सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता । जो भजे अनंता निर्विकल्प ॥२॥
तेणें सुखें सुख चढे नित्य नवें । जाणती अनुभवें संतजन ॥३॥
हातीं सुदर्शन आनंदें कीर्तनीं । उभा चक्रपाणी मागें पुढे ॥४॥
प्रीतीच्या वोरसें अभयदान देत । ह्लदयीं आलिंगित आपुल्या दासां ॥५॥
धर्म अर्थ काम मोक्ष आणि मुक्ति । टाकोनियां येती विश्रांतीसी ॥६॥
नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं । न संडिती वारी पंढरीची ॥७॥
||३९.||
अवघे ते संसारीं जाणावे ते धन्य । ज्यांचें प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥१॥
अवघे ते दैवाचे विठ्ठल ह्मणती वाचे । अवघें कुळ त्याचें पुण्यरूप ॥२॥
अवध्यारूपीं एक विठ्ठल भाविती । अवघ्या मनें भजती अवघेपणें ॥३॥
अवघे मिथ्या जाणोनि अवघिया वि-ठ्ठले । अवघे विनटले विठ्ठलपायीं ॥४॥
अवघे पूर्ण बोधें भावें प्रेमें प्रीती । ध्यानीं गीतीं केशिराज ॥५॥
अवघा हा विठ्ठलु भोगूं दिनराती । वोळंगें किंकरवृत्ति नामा त्यासी ॥६॥
||४०.||
साठी घडीमाजी । एक वेचीं देवकाजीं ॥१॥
आरा-णूक सारूनि काजीं । सर्वभावें केशव पूजीं ॥२॥
हेंचि भक्तीचें ल-क्षन । संतोषला नारायण ॥३॥
कोटिकुळें पावन तुझीं । नामा ह्मणे भाक माझी ॥४॥
||४१.||
तुह्मी आह्मी जाऊं चला । भेटूम जीवलगा विठ्ठला ॥१॥
विठो सांपडला फुका । जो दुर्लभ तिहीं लोकां ॥२॥
वेदपुराणासी वाड । तो हा भाविकांसी भ्याड ॥३॥
नामा ह्मणे वंदूं चरण । कांही पुसूं जिवींची खूण ॥४॥
||४२.||
पैल दक्षिणेचा वारा । येतां देखिला समोरा ॥१॥
चला चला पंढरपुरा । विठोबारायाच्या नगरा ॥२॥
पायीं संतांच्या लागत । पाचारितो पंढरिनाथ ॥३॥
नामा ह्मणे वेग करा । विठ्ठल भक्तांचा सोइरा ॥४॥
||४३.||
पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥
ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा । विठ्ठल अपारा जप करा ॥२॥
करितां साधन नागवी अहंकार । विठ्ठल उच्चार पुण्य ओघें ॥३॥
नामा म्हणे घेईं विठ्ठल कुलदेवो । सर्व हाचि भावो केशव ऐसा ॥४॥
||४४.||
न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥१॥
नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य । साधा भक्तिभाग्य संत-संगें ॥२॥
येर क्रियाकर्म करितां हो कलीं । माजि कोण बळि त-रले सांगा ॥३॥
नामा म्हणे मज सांगितलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥४॥
||४५.||
विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु ॥१॥
घरीं वृंदावन नित्य अन्नदान । श्रीकृष्ण आपण तेथें असे ॥२॥
ऐसी ध्यानगती विष्णूचें पूजन । तयासि पतन नाहीं नाहीं ॥३॥
नाम म्हणे करा विष्णुकथा नित्य । रामनाम सत्य वचन धरा ॥४॥
||४६.||
संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला ॥१॥
घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी । जेवा पोटभरी रामनाम ॥२॥
पायरव होईल दुर्जना न सांगावें । एकांतीं सेवावें म्हणे नामा ॥३॥
||४७.||
तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें ॥१॥
तीर्थाचें हें तीर्थ नाम हें समर्थ । होइल कृतार्थ रामनामीं ॥२॥
साधेल साधन तुटेल बंधन । वाचे नारायण सुफल सदा ॥३॥
नामा म्हणे हरिनाम तें उच्चारी । तरीच उद्धारी इह लोकीं ॥४॥
||४८.||
व्रत तप न लगे करणें सर्वथा । न लगे तुह्मां तीर्था जाणे तया ॥१॥
आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरि-कीर्तन सर्वकाळ ॥२॥
न लगे तें कांहीं वर्जावें अन्न जीवन । लावा अनुसंधान हरीचे पायीं ॥३॥
न लगे योग याग न लगे संतत्याग । असों द्या अनुराग हरीचे पायीं ॥४॥
न लगे निरंजनीं करणें वास तुह्मां । दृढ धरा प्रेमा हरीचे नामीं ॥५॥
नामा म्हणे नाम दृढ धरा कंठीं । तेणें देईल भेटी पांडुरंग ॥६॥
||४९.||
तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥
राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥
सागरीं ह्या शिळा तारिल्या अवलीळा । ब्रह्मयाची बाला उद्धरिली ॥३॥
रावण कुंभकर्ण विदारिले बाणीं । दिधली राजधानी शरणागता ॥४॥
वाल्मिक भविष्य कथूनियां गेला । रामें पवाडा केला तिहीं लोकीं ॥५॥
नामा म्हणे रामनाम हें दुर्लभ । शिव स्वयंभ हेंचि जपे ॥६॥
||५०.||
तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी । त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो ॥१॥
धन्य धन्य विष्णुदास । ऐसा हरिनामीं सौरस । ते पितरांसहित वैकुंठ । सर्वकाळ क्रमिती ॥२॥
जप तप ज्ञान विठ्ठल । तयासी नाहीं काळवेळ । टाळी वाजवितांचि निर्मळ । महादोष हरतील ॥३॥
जेथें रामकृष्ण उच्चार । सकळ मंत्रांत मंत्रसार । पांचांही वदनीं शंकर । नित्य रामनाम जपतसे ॥४॥
तो हा पुंडलीकें उभा केला । आपण दृष्टिसमोर बैसला । कीर्तनें त्रैलोक्य तारिला । स्नानदानें पितरांसहित ॥५॥
न लगे करावे यज्ञ-भाग । न लगो आणिक मंत्रलाग । एक सेविलिया पांडुरंग । अनंत तीर्थें घडतील ॥६॥
पंचक्रोशी प्रदक्षिणा । नित्य नमस्कारीं विठ्ठल चरणां । तरी घडेल पृथ्वीप्रदक्षिण । कोटिच्या कोटी अनंत ॥७॥
सप्तपुरीं द्वादश लिंगे । कीर्तनें डोलती लागवेगें । ऐसे भक्त तारिले पांडुरंगें । विटेवरी उभा नीट राहोनी ॥८॥
नामा सांगे गुह्य गोष्टी । विठ्ठल तारक एक सृष्टी । पंढरी देखिलिया दृष्टी । वैकुंठपद पाविजे ॥९॥
||५१.||
गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥
वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥
साधकासी सिद्धि होईल पैं प्राप्ति । न कळे निरूति प्रेम खूण ॥३॥
नामा म्हणे सोडा जाणीवेचा सीण । संतांची हे खून जाणे संत ॥४॥
||५२.||
कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥
सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥
भवसिंधूचा पार उतरोनि निर्धारी । त्या-परती सोयरीं नाहीं सृष्टीं ॥३॥
अंतरींचें गुज सांगती श्रवणीं । अमृत संजीवनीं रामनाम ॥४॥
तेणें त्रिविधताप हरती मनींचे । जाणती जीवींचे झाले कष्टे ॥५॥
तो जीवलग जननी परिस लोभा-परु । सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥
नामा त्याचे बळें झेलतु यमासी । रिघोनि पाठींसी केशवाच्या ॥७॥
||५३.||
प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥
रायाचा तो पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥३॥
बहात्तर खोडी देवगण कंठीं । आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥४॥
||५४.||
बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥
तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥
एक जाणीव खटपट । करिसी ते सैराट । हरि पाविजे ती वाट । वेगळी असे ॥३॥
एक आहेत तार्किक । चार्वाकादी बादक । हरि पाविजे तें सुख । वेगळें असे ॥४॥
एक चातुर्यवक्ते । व्युत्पन्न कवित्वें । संत रंजविते । लोका-चारी ॥५॥
जिहीं तुज जाणितलें । तिहीं मौन धरिलें । नामा म्हणे ते पावले । भक्तियोगें ॥६॥
||५५.||
आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥
आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥
स्नान केलें गंगा-तीरीं । गंध लविलें पंढरपुरीं । संध्या केली कृष्णातिरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥३॥
भिक्षा केली कोल्हापुरीं । भोजन केलें महाद्वारीं । निद्रा केली माहुरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥४॥
ऐसियाची संगत करीं । त्याचे चरण ह्लदयीं धरीं । नामा ह्मणे या संसारीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥५॥
||५६.||
कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥
वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥
प्रे-मभातें भरलें अंगीं । तेणें छंदें नाचें रंगीं ॥३॥
घातमात नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥
||५७.||
भक्तिप्रतापें पावलों मी सुपंथ । सफळ निश्चित पर-मार्थ ॥१॥
देवा सर्वांभूतीं असतां प्रगट । निर्वाणीं चोखट भक्ति जाण ॥२॥
धरूनियां मनीं जपसील नाम । तेणें निजधाम पावसील ॥३॥
जप तप ध्यान न लंग साधन । भक्ति ते कारण नामा ह्मणे ॥४॥
||५८.||
माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥
निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥
वेदशास्त्र श्रुति आणीक पुराणें । पढोनि जाणणें हेंचि सत्य ॥३॥
क्रिय कर्म धर्म करणें ज्या कारणें । ते खूण निर्वाण चरण हेचि ॥४॥
जप तप अनुष्ठान करोनि साधन । प्रत्यक्ष निधान चरण हेचि ॥५॥
नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न विसंबें चरण जीवें तुझे ॥६॥
||५९.||
धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥
दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल । बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥
धाकटीकडे पाहतां कोडें । वडील धडधडा रडे । मेल्या तुझें गेलें मढें । तिकडे कांरे पहातोसी ॥३॥
वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल केली सुण्या । लाज नाहीं तुझ्या जिण्या । काळतोंड्या बैसलासी ॥४॥
वडील बाईल धरी दाढी । धा-कटी ओढून धरी शेंडी । सांपडलासी यमझाडी । लाशीपरी पड-लाशी ॥५॥
सवती सबतीचा करकरा । उभा शिणलों दातारा । भेटी करी बनींच्या व्याघ्रा । परी संसारा उबगलों ॥६॥
सवती सबतीचा कैशी धरणी। कौतुक पहाती शेजारिणी । तया पुरुषाची विटंबनी । थोर जाचणी तयाशी ॥७॥
नामा ह्मणे गा श्रीहरी । दोघी बायका ज्याचे घरीं । त्याचे नसावें शेजारीं । थोर दु:ख तयाशी ॥८॥
||६०.||
संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥
पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥ सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥
सुख दु:ख कवणा सांगूं । माझें माहेर पंढरपुरीं ॥ध्रु०॥
भ्रतार निष्ठुर बो । काम क्रोध दोघे दीर ॥ आशा हे सासू माझी । ते मज गांजितसे थोर ॥३॥
तृष्णा हे नणंद सखी । तिनें व्यापियेले घरीं ॥ भक्ति हे माझी बहिणी । ते मज होईल निर्धारीं ॥४॥
वर्ष महिने दिवस घडिया । बाट पाहे अझुमी ॥ देहामाजी करिती देखा । न्यावया न पवे कोणी ॥५॥
गजेंद्र हरिश्चंद्र त्यासी । सोडावया आला । प्र-र्हाद अंबऋषि । तिहीं तुझा धांवा केला ॥६॥
उपमन्यु दूध मागतां । क्षीरसागरु दिल्हा ॥ गजेंद्र अजामेळ । त्यांच्या सत्वा तूं पावला ॥ नामया विष्णुदास गीतीं गोविंदु गाइला ॥७॥
||६१.||
मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले । नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले । कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले । कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे ॥१॥
संसार स्वप्र जाणूनियां शरण रिघे पंढरीरायारेरे ॥ध्रु०॥
दुंदुभिरायें धर्म चालविला तेणें शांतीचा सागर ह्मणविलें । अजपाळ जैपाळ राजा दशरथ सूर्यवंशीं ते जन्मले । जळींचे तरंग जळींच निमाले नेणो तेथें काय झालें । राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सांगपां ते काय झालेरेरे ॥३॥
सूर्यवंशीं राजा हरिचन्द्र जन्मला स्वप्न तेणें काय साच केलें । स्त्रीपुत्रातें विकूनियां तेणें ब्राह्मणा सुखीया पैं केलें । शिभ्री चक्रवर्तीनें आपुलें प्राण देउनी जीव ते भक्तराज काय झालेरेरे ॥४॥
शरीराचें मुद्नलें सामास कवण वेंचि ऋषि भोजनासी आले । स्त्रीपुत्रातें वं-चूनियां तेणें अतीता सुखे केलें । सत्व पहावया कैलासींचा राणा कां-तीपूरनगरी उजू ठेले । श्रीयाळें पोटींचें बाळक दिधलें सांगपां तें काय झालेरेरे ॥५॥
कौरवां पांडवां अति दळ संग्राम अठरा अक्षौहिणी रणासी आले । नव वेळ नारायण आले गेले परी अकरा रुद्न गणतीसी आले । छपन्नकोटी यादवेंतीं कृष्ण भालुका तीर्थीं निमाले । नामा ह्मणे ऐसे कल्पनेचे अवघे परंपरी भजिन्नले ॥६॥
||६२.||
तत्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अझून धरिसी दुर ॥ध्रु०॥
त्रिभुवनापरता धांवतोसी दुरी । आधीं तूं आपुली शुद्धि करी । उदय अस्तु झाला कवणीये घरीं । पिंडा माझारीं पोहेपां ॥१॥
जागृतीमध्यें कवण जागतें । दोहीं माजीं स्वप्न कोण देखतें । सुषुप्तीमध्यें कोण नांदतें । मग अनुवादतें तें कवण ॥२॥
जागृती वरोनी करीं चिंतन । सुषुप्तीमाजीं रीघे ज्ञान । दोन्हीं माजीं स्वप्न देखे कवण । जीव कीं मन सांगपां ॥३॥
निद्रा मरण हें एक स्थान । दोहींचा देखणा जाणें आपण । लहान सुईंच्या इंधनाहून । आढळले मन पांचासीं ॥४॥
इंद्रियें चपळ चेइलीं । जागत होती ती कां परतलीं । जाऊनियां कवणा घरीं लपालीं । मना मिळालीं कवणें गुणें ॥५॥
सांगतां तेथें अनुवाद कैंचा । नाहीं तूं पण खुंटली वाचा । विष्णुदास नामा बोलिला साचा । परम पदीं बैसलासे ॥६॥
||६३.||
चेईला तो जाणरे सद्गुरुवचनीं निर्धारें । विपरीत भावना विसर पडिला कंठीं जया परिहाररे ॥१॥
आपणा पैं पहा- वया कवण लावूं दिवारे । चंद्र सूर्य जेणें प्रकाशें तो मीं कैसा पाहूं येईं रे ॥२॥
अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे । चेईला तेणें ओळखीला येरासी अगम्य भाईरे ॥३॥
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे । महाप्रळयीं सप्त सागर एक होती अनुभविया तो तैसारे ॥४॥
दाही दिशा व्यापूनियां तो अंधकार महारे । रवि प्रकाश जाहल्या आपेआप निरसलारे ॥५॥
काष्ठीं पावक उपजला तोही तया समरे । नामा ह्मणे केशी-राजा चेईल्या आह्मां तुझीरे ॥६॥
||६४.||
गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु । योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु०॥
चिदानंदधनु तनु सांवळावो हरि पाहातां निवती लोचन । तनु मन चरणीं वो गुंतलीं नाम गोपा-ळाचें अमृत समान ॥१॥
पितांबरशोला माळ कंठीं या रावो गो-पाळा । मुगुटीं झळाळ सर्वांगीं कस्तुरीचेम विलेपन कटीं रुळे वनमाळा ॥२॥
येणोंचि जन्में पाविजे गोपाळासी आनु सार । श्रीवत्सलांछन हेचि खुण विष्णुदास नामयादातार ॥३॥
मनास उपदेश –
||१.||
अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥
विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥
क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥३॥
संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥४॥
आपुलें निजहित जाणतूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥५॥
नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥६॥
||२.||
दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥
भुक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरं-तर वळगणें ॥३॥
नामा ह्मणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥
||३.||
अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥
अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी । तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥
अरे तूं अभिलषिसी परमारी । तेणें सिद्ध-पंठ राहेल दुरी । जवळी येईल यमपुरी । आपदा पावसील ॥३॥
आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळी जाईल जड । महादोष येति सुखा आड । करितील कईवाड यमदूत ॥४॥
माझें शिकविलें नाइ-कसी । आतां सांगेम बळिया केशवासी । धरूनि नेईल वैकुंठासी । चरणीं जडसी ह्मणे नामा ॥५॥
||४.||
हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥
कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥
कांरे तुज भ्रांति पडलीसे मूढा । वेढी चहूंकडा काळ सैन्य ॥३॥
नानारोगें तुझी काया वेधियेली । नरकाचीं भरलीं नवही द्वारें ॥४॥
पाळलीं पोशिलीं आप्त माझीं सखीं । अंतीं तुज पारखी होती जाण ॥५॥
नामा ह्मणे तुज ह्मणे तुज येतों लोटांगण । तारील नारायण भरंशानें ॥६॥
||५.||
उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥
राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥
संतसमागमें साथीं हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा ह्मणे तूं सहज सुखरूप । होऊनि निर्विकल्प विचारी पां ॥४॥
||६.||
क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे ॥१॥
लक्षचौर्यांशींच्या करितां येरझारा । शिणलसि गव्हारा वेळोवेळां ॥२॥
अझूनितुज लाज न वाट पैं कैसी । नर-काचे द्वारांसि जावें किती ॥३॥
दुर्लभ आयुष्य मनुष्य देहिंचें । जातसे मोलाचें वांयांविण ॥४॥
खापराचे साठीं सांडिला परिस । गहिंवरें फुटतसे ह्लदय माझें ॥५॥
पुत्रकलत्रादिक सुखाचीं सोयरीं । त्यांची ममता थोरी धरिली तुबां ॥६॥
अनुदिनीं पाळितां अनुभवेंचि पाहे । कोण सुख आहे तयाजवळीं ॥७॥
जगाचा जीवलग मायबाप आपुला । तो तुवां दुराविला कोशिराज ॥८॥
स्वप्रींचिया धना लुब्ध-लसि काय । आलें काळभय हाकित तुज ॥९॥
संतापाचें सदन शोकाचे पुतळे । ते त्वां मानियले हितकारी ॥१०॥
कैंची सुख निद्रा इंगळचि शेजे । प्रत्यया आणूनि तुझें तूंचि पाहीं ॥११॥
तुज राखेल कोण येवढिये संकटीं । रिघसी ज्याचे पोटीं मरणाभेणें ॥१२॥
आ-दिमध्य अवसानीं सोडविल निर्वाणीं । तया चक्रपाणी सेविं वेगीं ॥१३॥
जो जो क्षण लविसी हरिभजनाकडे । तो तो गांठीं पडे सार्थकीं रे ॥१४॥
नामा ह्मणे तुजचि येतों कत्कुळती । सोडिंरे संगती वासनेची ॥१५॥
||७.||
वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥
निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्यांशीं लक्ष सोंगें ॥२॥
ऐसो हे लाघवी खेळे नाना खेळ । तेथें तूं दुर्बळ काय करिसी ॥३॥
क्षण एक चंचळ क्षण एक निश्चळ । क्षण एक विफळ सावध करी ॥४॥
क्षण एक कृपाळ क्षण एक निष्ठुर । क्षण एक उदार कृपण करी ॥५॥
क्षण एक सात्विक क्षण एक राजस । क्षण एक तामस करोनि सांडीं ॥६॥
क्षण एक प्रवृत्ति क्षण एक निवृत्ति । क्षण एक विश्रांति तप्त कर ॥७॥
क्षण एक आवडे क्षण एक नावडे । क्षण एक विघडे घडलें सुख ॥८॥
ऐसी हे लाघवी पा-हतां क्षणभंगुर । ब्रह्मादि हरिहर ठकिले जेणें ॥९॥
नामा म्हणे तरीच इचा संग तुटे । दैवयोगें भेते संतसंग ॥१०॥
||८.||
वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥
नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥
नामा म्हणे देह नाहीं पुनरुपें । केशवनाम सोपें उच्चारीं बापा ॥३॥
||९.||
धरींरे मना तूं विश्वास या नामीं । अखंड रामनामीं ओळखी धरीं ॥१॥
जप करीं अखंद खंडेना । निशिदिनीं मना होय जागा ॥२॥
नामा म्हणे मना होईं रामरूप । अखंडित जप सोहं सोहं ॥३॥
||१०.||
प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि ॥१॥
तेथें माझ्या मना होईं क्षेत्रवासी । राहें संतांपाशीं सुख घेतां ॥२॥
ऐहिक्य परत्र दोन्हीं समतीरीं । परमानंदलहरी झेंपावत ॥३॥
मुक्तांचें जीवन मुमुक्षा माउली । शिणल्या साउली विषयासक्तीं ॥४॥
परमहंसकुळ सनकादिक सकळ । राहिले निश्चळ करोनि नित्त ॥५॥
नामा म्हणे मना सोइरे हरिजन । तारक त्याचें चरण दृढ घरीं ॥६॥
||११.||
अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें ॥१॥
एक अर्बुद साठीं कोटि देखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥
चौदा चौकडय लंकानाथा । नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा । तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥
चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे । बकदालभ्याचे पुरे निमिषें मोडे । गेले येवढे अरे मना ॥४॥
बकदालभ्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचें उपडे पिच्छ । तयासि होता मत्युप्रवेश । तो एक श्वास भृंशुडीचा ॥५॥
मरणांत पुरे भृंशुडीचा । तैं एक दिवस कूर्माचा । नामा वि-नवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धर ।|६॥
||१२.||
गणपति पूजिली ते दोंदिल भले । वैष्णव न भले अरे मनी ॥१॥
सीतळा पूजिली ते ह्मइसे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥२॥
मैराळ पूजिले ते वाघे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥३॥
सूर्य पूजिले ते घोडे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥४॥
नामा ह्मणे जे कां विठ्ठलीं भजिले । ते वैष्णव भले सत्य मना ॥५॥
||१३.||
धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥
अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥
पीतांबर छाया करूनि भक्तांसी । सांगेन मी खती तयापुढें ॥३॥
संतसमागमें दावीं कवतुकें । पाठवी भातुकें देऊनियां ॥४॥
नामा म्हणे मज आहे भरंवसा । मना तूं विश्वास दृढ धरीं ॥५॥
||१४.||
नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण ॥१॥
कल्पना सांडोनि संतासंगें राहीं । सर्व त्यांचे पायीं सुख आहे ॥२॥
ज्याचिया दर्शनें शोक मोह जळे । पाप ताप पळे कळभय ॥३॥
जवळीच देखती पायाळावांचून । तें सुख निधान वैकुंठींचें ॥४॥
नामा ह्मणे आली शेवटील घडी । तों वईं आवडी हाचि एक ॥५॥
||१५.||
धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥
पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥
श्रीमुख साजिरें पाहीं दृष्टिभरी । जीवित्वाचें करीं निंबलोण ॥३॥
जेणें लक्ष धरोनि आहे पुंडलीक । तोचि भाव एक दृढ धरीं ॥४॥
नलगे गुरुमंत्र नलगे जप तप । उघडें स्वरूप विटेवरी ॥५॥
नामा ह्मणे जरी निकत संतचरन । तरीच प्रेमखून पावसील ॥६॥
||१६.||
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसि अरे मना ॥१॥
आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसि अरे मना ॥२॥
वायु ध्यासि तरी वायुचि होसी । परी के शव न होसि अरे मना ॥३॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी । परी केशव न होसि अरे मना ॥४॥
नामा ह्मणे जरी केशवासी ध्यासी । तरी केशवचि होसी अरे मना ॥५॥
||१७.||
संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥
कोव वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपट रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरी ॥४॥
||१८.||
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥
कोण वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपत रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरीं ॥४॥
||१९.||
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी । आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥
मुदल पुसतसे वेळोवेळां । हा मनारे पापी चांडाळा । सांग चोविसां आगळा । कवणेपरी न धाय ॥३॥
वासना मागतसे तुज । हे द्यावी जी मज । दाटणी होतसे सहज । ह्मणवोनि मज अंकी-तसे ॥४॥नामा म्हणे जी दातारा । तुझिये भेटी सारंगधरा । लाभ होतसे अपारा । घडी घडीये विठ्ठला ॥५||
||२०.||
शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद ॥१॥
मना जाण जाण जाण । विठोबाची प्रेमखुण ॥२॥
साहि शास्त्रांचें संमत । मंथूनि काढिलें यथार्थ ॥३॥
याज्ञिकांची जीवनकळा । जन्मनीचा जो जिव्हाळा ॥४॥
नामा म्हणे माझे बापें । साधि-यलें संतकृपें ॥५॥
||२१.||
लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥
कंठीं नाहीं आइती ह्मणोनि सांडूं नको ज्योति । इतुकिये प्रांती पडूं नको ॥२॥
बाळकाचे बोल माउली प्रीति करी । तैसी कीर्ति हरी परिसे चित्तें ॥३॥
भलतिया परी बोले बा श्रीहरी । तो भवसागरीं तारील जाणा ॥४॥
येणें तारुण्यपणें भ्रमलसि झणीं । भोगिसी पतनी जन्मतरीं ॥५॥
तूं होय मागता हरि होय दाता । शरण जांई अनंता ह्मणे नामा ॥६॥
||२२.||
बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥
तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥
माझा मायबापें सोडवूनि गळा । केशवीं बांधला बोला बोल ॥३॥
नामा ह्मणे बोल बोलतांहि बोल । खेचरें दाविला प्रेमभक्ति ॥४॥
||२३.||
मन धांवे सौरावैरा । मन मारूनि केलें एकमोरा ॥१॥
मन केलें तैसें होय । मन धांवडिलें तेथें जाय ॥२॥
मन लांचावलें न राहे । तत्त्वीं बैसलें कधिं नव जाये ॥३॥
नामा म्हणे सोहं-शुद्धि । मन वेधलें गोविंदीं ॥४॥
||२४.||
सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥
धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥
संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥
अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥
नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥
||२५.||
परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥
गोविंदारे तुझें ध्यान लागो मना । पाहिजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञान ॥२॥
मन हें वोवरी असे सुमनाचे चित्रशाळी । दोन्ही चरण सुकुमारे वरीं अष्टदळ क-मळी ॥३॥
संध्याराग रातले सुनीळ दिशातळवटीं । ध्वज वज्रांकुश चिन्हें साजती गोमटीं ॥४॥
इंदिरा तिथें थोकली तिच्या सुखा नाहीं पारु । ते चरणीं स्थिर झाली ह्मणोनि ह्मणती लक्ष्मीवरु ॥५॥
घवघवीत वांकी चरणीं ब्रिदाचा तोडरु । नखप्रभा फांकली तिनें लोपला दिनकरु ॥६॥
सृष्टि घडीत मोडीत उत्पत्ति स्थिति प्रळय अवघें नवें । तो चतुर्मुख ब्रह्मा चरण पूजितो स्वभावें ॥७॥
देवा धिदेव शंभू कैलासींचा राणा । गंगा मुगुटीं धरिला तिचा जन्म अं-गुळीं चरणा ॥८॥
दैत्यकुळीं जन्मला देव पळती ज्याचेनि धाकें । पावो पाठीसी लागला ह्मणऊनि दारवंटा राखे ॥९॥
शेष वर्णितां श्रमला वेद परतले माघारीं । नामा ह्मणे अरे मना याचे चरण धरीं झडकरी ॥१०॥
||२६.||
मनाचें मनपण सांडितां रोकडें । अंतरींचें जोडे परब्रह्म ॥१॥
नाथिला प्रपंच धरोनियां जीवीं । सत्य तें नाठवीं कदाकाळीं ॥२॥
अझूनि तरी सांडीं नाथिलें लटिकें । तरसील कव-तुकें ह्मणे नामा ॥३॥