sant-namdev-gatha-srinamdev-charitrav
|| संत नामदेव ||
||१||
सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥१॥
रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवि । आराणूक जीवीं नोव्हे कदा ॥२॥
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥३॥
नामा म्हणे सिवीं विठोबाची अंगीं । म्हणोनियां जगीं धन्य जालों ॥४॥
||२||
कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा । त्याची कांता उमा नरहरिभजनीं ॥१॥
सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न । जाली संबोधन गोणाबाई ॥२॥
गोणाई दामासेठी जालें पाणिग्रहण । संसारीं असोन नरसी गांवीं ॥३॥
गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज । गाधिज भारद्वाज दोनीं कुळें ॥४॥
आऊबाई कन्या जाली गोणाईसी । पुढें देवा नवसी पुत्रासाठीं ॥५॥
नामा म्हणे होतें विठोबाचे मनीं । तेंचि नित्य जननी नवस करी ॥६॥
||३||
केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा ॥१॥
अच्युता वामना दशरथनंदना । जेवी तूं गा कृष्णा पांडुरंगा ॥२॥
कृष्णा विष्णु हरि मधुसूदन मुरारी । जेवी तूं नरहरी पांडुरंगा ॥३॥
ऐसी ग्लानि करितां विठ्ठल पावला । नैवेद्य जेविला नामयाचा ॥४॥
||४||
जेऊनियां हातीं देवें दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा ॥१॥
गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा । नैवेद्य आणावा माझे हातीं ॥२॥
तेव्हां नामदेवें हातीं दिधली वाटी । पाहूं गेली दृष्टी रिकामी ते ॥३॥
काय तुज घरीं उणें होतें अन्न । नैवेद्य आपण तेथें खावा ॥४॥
ते दोघे बोलतां दामासेठी आला । पुसे त्या दोघांलाअ काय गुह्य ॥५॥
देखियेलें नाहीं नाहीं ऐकियेलें । ऐसेंअ सांगितलें नामदेवें ॥६॥
दामासेठी म्हणे आतां असों द्यावें । सकाळीं पहावें प्रचीतीस ॥७॥
||५||
आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं ॥१॥
दुसर्या दिवशीं नैवेद्य धाडिला । दामसेठी गेला त्याच्या मागें ॥२॥
जाऊनियां नामा उभा राहे सन्मुख । म्हणे विठोबास जेवी बापा ॥३॥
देव म्हणे नाम्या बैसावें दारांत । लवकरी जेवितों पाहे आतां ॥४॥
जेऊनियां देवें हातीं दिधली वाटी । तेव्हां दामसेठी काय बोले ॥५॥
बारा वर्षें तुज उपवासी मारिलें । आजि जेवविलें नामदेवें ॥६॥
देव म्हणे आतां ऐका दामसेठी । हे तों गुह्य गोष्टी बोलूं नका ॥७॥
आम्ही न बोलतां आम्ही न सांगतां । कळे अवचिता आपणांसी ॥८॥
करसी चोरी तूं गुप्त गोकुळांत । पृथ्वींत मात कोणी नेली ॥९॥
गोकुळींच्या गोष्टीं येथें बोलू नये । मौन पंढरिये धरिलें आहे ॥१०॥
मौन धरियेलें सांगसी आम्हासी । तरी कां जेवशी पांडुरंगा ॥११॥
काय तुझें घर पडियेलें ओस । चोख्यासंगें कैसा जेवलासी ॥१२॥
चोखियाचें अन्न मिष्टान्न भोजन । मिळाया कारण तेथें नाहीं ॥१३॥
राम अवतारी वान्नरगणें लंकेसी झोबणें सीतेसाठीं ॥१४॥
पाला खाऊनियां वाहिले पर्वत । बांधियेला सेतु सिंधूवरी ॥१५॥
कृष्णा अवतारीं गोपाळ साचारा । वळूं गायी फार देवासवें ॥१६॥
यमुनेचे तारीं खेळूं चेंडूफळी । आपण दिधली नाहीं डावि ॥१७॥
पसरितों पदर धरितों हनुवटी । अन्याय हा पोटीं घालीं नाम्या ॥१८॥
तेव्हां दामसेठी धरूनि हातासी । म्हणे नामयासी चाल घरा ॥१९॥
धन्य माझें भाग्य धन्य माझा वंश । परब्रह्म वेष प्रगटलें ॥२०॥
बौद्ध अवतारीं आम्हीं जालों संत । वर्णावया मात नामाअ म्हणे ॥२१॥
||६||
नामा सिंपे नामा सिंपे । रोप लाविलें केशवबापें ॥१॥
येक उगवली आरडी दरडी । येक वाळुनी जाली कोरडी ॥२॥
येक पुष्प फळासि आली । येक कळींच निर्फळ जाली ॥३॥
नामा पुष्प केशव द्वारीं । न माये आंत बाहेरी ॥४॥
||७||
लोखंडाचा विळा परिसासी लाविला । मागिलिया मोला मागूं नये ॥१॥
दासी होती परि रायासी रतली । मागील ते बोली बोलें नये ॥२॥
वेश्या होती तेचि पतिव्रता जाली । मागील ते बोली बोलीं नये ॥३॥
विष्णुदास नामा विठ्ठलीं रंगला । तो शिंपी वहिला म्हणों नये ॥४॥
||८||
कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी । अपवित्र तियेसी म्हणों नये ॥१॥
काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥२॥
दासीचिया पुत्रा राज्यपद आलें । उपमा मागील देऊं नये ॥३॥
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी । उपमा जातीची देऊं नये ॥४॥
||९||
माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिलें त्याची खूण सारू ऐका ॥१॥
अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवतां आदित्य रोहिणीसी ॥२॥
शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्छर शालिवाहन शके ॥३॥
प्रसवली माताअ मज मळ्मूत्रीं । तेव्हां जिव्हेवरी लिहिलें देवें ॥४॥
शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे ॥५॥
ऐशीं वर्षें आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धी ॥६॥
||१०||
आम्हां कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥
वाचा पिकली पिकली । हरिनामाची वरो जाली ॥२॥
एकादशीचे दिवशीं । जाल्या कैवल्याच्या राशी ॥३॥
संत म्हणती नामयाला । हरिनामाचा सुकाळ जाला ॥४॥
||११||
केशवाचें प्रेम नामयाचि जाणें । नाम्या ह्रदयीं असणें केशवातें ॥१॥
नामा तो केशव केशव तो नामा । अभिन्नत्व आम्हां केशवासी ॥२॥
नामा म्हणे केशवा दुजेपण नाहीं । परि प्रेम तुझ्या ठायीं ठेवियेलें ॥३॥
||१२||
सुख दुःख दोन्ही आम्हासीं सारिखीं । प्रतीति पारखी मना आली ॥१॥
अंतर्बाह्म एक ब्रह्मचि कोंदलें । दुजेपण नेलें निपटोनि ॥२॥
त्वचा टाकुनियां सर्प गेला बिळीं । मग तो सांभाळी कोण सांगा ॥३॥
ओघ सोडूनियां गंगा सिंधू ठाये । विस्तराळीं धाये खळाळाची ॥४॥
नामा म्हणे रात्र जैसी कां पाहाळे । धरणीतें जालें तैसें आम्हां ॥५॥
||१३||
भक्ताचिया भावा होऊनि ऋणायितु । उभा असे तिष्ठतु पंढरिये ॥१॥
महाद्वारींची हे तळींची पायरी । तो वैकुठावरी कळस केला ॥२॥
भूतळींचे वैभव कायसें बापुडें । बोलतां लाज पडे देवराया ॥३॥
त्या सुखाची नव्हाळी कैंची रसातळीं । बोलतां बोबडी जिव्हा पडे ॥४॥
म्हणोनि पांडुरंग मौनचि राहिला । नाम्यानें धरिला दोन्हीं चरणीं ॥५॥
||१४||
उठोनि प्रातःकाळीं ओढितां काचोळीं । जातो वेळोवेळीं महाद्वारीं ॥१॥
अहो जी दातारा विनवी अवधारा । तुम्हीं यावें घरां भोजनासी ॥२॥
रखुमाई सांगाते तुम्ही यावें तेथें । सामोग्री सांगातें चालावावी ॥३॥
सडा संमार्जन हें माझें करणें । उदका भरणें सुगंधेंसी ॥४॥
शेणपत्रावळी काढीन उष्टावळी । नित्य वेळोवेळीं हाचि धंदा ॥५॥
नामा म्हणे देवा तुमचें तुम्ही जेवा । प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥
||१५||
आजि आवतणें संतांचें । भोजन जालें हरिनामाचें ॥१॥
आम्ही जेविलोंज जेविलों । नामामृतें पूर्ण धालों ॥२॥
बरवी परावडी वैष्णवांची । आवडी पुरली हरिनामाची ॥३॥
नामा केशवाचा म्हणे । माझे ह्रदयीं नारायण ॥४॥
||१६||
अगाध महिमा यात्रा कार्तिकिये । आला पंढरीये नामदेव ॥१॥
भक्तां शिरोमणी श्रीपंढरिनाथाअ । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥
धन्य नाचदेव धन्य नामदेव । ह्रदयीं पंढरीराव न विसंबे ॥३॥
प्रेमळ भक्त विळोन अपार । करिताती गजर हरिनामाचाअ ॥४॥
नटयाटय कीर्तन झळकती गरुडटके । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥
नामघोष श्रवण सकळां समाधान । चुकले जन्म-मरण कल्पकोटी ॥६॥
नामा म्हणे जीव निवाला बा तेथें । पाहातां विठोबातें श्रम गेला ॥७॥
||१७||
गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥
मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । तें ध्यान ह्रदयकमळीं धरोनि ठेला ॥२॥
धन्य नामदेव भक्त शिरोमणि । ज्याचा चक्रपाणि वेळाइतू ॥३॥
पूर्ण सहज स्छिती जाला सुखाचा अनुभव । सकळ देहभाव पारूषले ॥४॥
मन पांगुळलें स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटलें प्रीतिमौन ॥५॥
सबाह्म अभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसलें दृश्याकार ॥६॥
निजरूप निर्धारितां नयन सोज्वळ जाले । रोमांच दाटले खरबरीत ॥७॥
आनंदाचा घन वोळला अंबरीं । वृष्टीस चराचेरीं होत असे ॥८॥
तें क्षीर सेवितां जालें समाधान । चुकलें जन्ममरण कल्पकोटी ॥९॥
सहज सुखें निवाला भवदुःख विसरला । विसावा भेटला पांडुरंग ॥१०॥
नामा म्हणे दृष्टी लागेल पां झणीं । धन्य पुंडलिकाचेनि जोडलें सुख ॥११॥
||१८||
दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे । तंव पुढें माय देखियेली ॥१॥
म्हणे मजशीं नाम्या वैर कां साधिलें । बहुत दुःख जालें कोणा सांगों ॥२॥
भक्तजनवत्सला परियेसी केशवा । भेटवी केधवां पूर्वस्थिती ॥३॥
भोजना बैसले जेवीं क्षुधाक्रांत । न कोणाशीं माता न बोले कांहीं ॥४॥
तें बळें उठविलें नव्हतां पैं तृप्ती । तैसी दुःखप्राप्ति जाली मज ॥५॥
पूर्ण पान्हा धेनु यांतला वोरसे । वत्स थोर हर्षें पान करी ॥६॥
तें धनियें देखोनि बळें आसुंडलें । तळमळित ठेले थोर आशा ॥७॥
कृपणें संपत्ति जोडिली सायासें । तळमळी ते कैसें नेलियातें ॥८॥
तैसी परी मज जाहली गा देवा । परियेसी केशवा मायबापा ॥९॥
दुःखाचे सागरी पडिलों गा श्रीहरि । सुखरूप मुरारी निववी मातें ॥१०॥
नामा म्हणे विठो कृपेचा सागरु । करावा अंगिकार अनाथाचा ॥११॥
||१९||
माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें ॥१॥
ऐसें मज पाहतां हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचें गुंतलें असे ॥२॥
काय सांगों माय जाल देवळासी । जपतो अहर्निशीं विठ्ठ्ल नामाअ ॥३॥
तहान भूक कांहीं आथीचना मनीं । विठ्ठल विठ्ठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥
नेणो कवण्या गुणें भुलविलें यातें । विंदान आमुतें न कळे कांहीं ॥५॥
दिशा अवलोकितां प्राण नव्हे निश्चित । बहुत क्षुधाक्रांत जाली असे ॥६॥
तेथून लवलाहे धांवत निघाली । महाद्वारा आली पहावया ॥७॥
तो तंव पांडुरंगा सन्मुख देखिला । चित्रींचा लिहिला पुतळा जैसा ॥८॥
नाहीं चळणवळण तटस्थ नयन । केलें निंबलोण योगिजनीं ॥९॥
ते देखोनि मातेसी थोर द्वेष आला । क्रोधें आसुंडिला करीं धरुनि ॥१०॥
तंव प्रेताचियेपरी पडिला भूमीवरी । देखोनि सुंदरी रुदना करी ॥११॥
मग उचलोनि ओसंगा धरिला पोटासी । म्हणे कांरे रुसलासि सांग नाम्या ॥१२॥
निढळासी निढळ निळवुनि ते रडे । माझिया कानाडे काय जालें ॥१३॥
दृष्टि उघडुनी नामा भोंवतें जंव पाहे । तंअव सन्मुख माय देखियेली ॥१४॥
येरी उचलोनि दिधलें आलिंगन । जालें समाधान तयेवेळीं ॥१५॥
सुह्रदें सोयरीं सकळिकें मिळोनि । करिती झाडणी नानारपरी ॥१६॥
माउली नव्हेसि तूं वैरिणी जाण । माझ्या केशवाची खूण अंतरली ॥१७॥
शस्त्रेंविण वध केला अवचिता । जीव तळमळतां जाऊं पाहे ॥१८॥
आतांअ परतोनी माझी वाट पाह्सी । साच रिपु होसी तरी जाणा ॥१९॥
नामा म्हणे माते जाई हो येथुनी । मज जाई निरवूनि विठोबासी ॥२०॥
||२०||
नवमासवारी म्यां वाहिलासि उदरीं । आस केली थोरीं होसी म्हणोनी ॥१॥
शेखीं त्यां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ॥२॥
कांरे नामदेवा जालासी निष्ठुर । न बोलसी उत्तर कांहीं ॥३॥
सज्जन सोजरीं सांडियेली लाज । जालासि निर्लज्ज एकसरा ॥४॥
प्रेमपिसें तुज लाविलें विठ्ठ्लें । रूप दावुनि केलें तद्रूप तुज ॥५॥
यासि सेविलिया कैंची बाप माय । सर्व हाचि होय सर्वांठायीं ॥६॥
ऐसियाचा संग धरियला तुवां । परिणामीं अनुभवा जाणशील ॥७॥
संत सनकादिकां लावियेलें वेधीं । तींहीं संसार उपाधि सांडियेली ॥८॥
विठ्ठल विठ्ठल हेंचि पैं चिंतन । विटेसहित चरण धरियेले ॥९॥
ऐसें शिकवितां नाम्याचें न मोहरे चित्त । पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥१०॥
नामा म्हणे माते वायां कां कष्टसी । विठोबा जीवेंसि जडला जाण ॥११॥
||२१||
माता म्हणे नामा राऊळाशीं खेळतां । तुज कोण्या दैवता ओढियलें ॥१॥
लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें । हांसती पिशुनें देशोदेशीं ॥२॥
सांडि देवपिसें नको करुं ऐसें । बळें घर कैसें बुडविसी ॥३॥
जन्मा येऊनियां पराक्रम करीं । काम होसी संसारीं भूमिभारा ॥४॥
सुदैवाची लेंकरें वर्तताति कैसीं । तूं मज जालसि कुळक्षय ॥५॥
कैसी तुज नाहीं कौकिकाची लाज । हेंचि थोर मज नवल वाटे ॥६॥
अभिमान अहंता सांडुनियां जगीं । नाचतोसि रंगीं गीत गातां ॥७॥
तुजविण लोक अज्ञान नसती । क्षण न विसंबती मायबापाअ ॥८॥
पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति । तुज अभाग्याचे चित्तीं पंढरीनाथ ॥९॥
यातें भजतीं त्याचें न उरेचि कांहीं । हाचि देव पाहीं घरघेणा ॥१०॥
जयाचें खुंटे तो लागे याच्या पंथें । तुजसि शिकवितें म्हणोनियां ॥११॥
गोणाई म्हणे नाम्या हें नव्हे पैं भलें । विठोबाणें केलें आपणा ऐसें ॥१२॥
||२२||
कापड घेऊनी जाय बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती केली नाम्या ॥२॥
नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा । मैंद हा खरा गळाकाटू ॥३॥
याचे संगतीनें संसार जाळावा । भोपळा हा घ्यावा भीक मागूं ॥४॥
नको संग धरूं नाम्या ऐक गोष्टी । गोणाई हनुवटी धरूनी सांगे ॥५॥
||२३||
नामा म्हणे माते ऐक वो वचना । मी गेलों दर्शाना नागनाथा ॥१॥
आंवढया देउळीं जाहला संचार । पारुषला धीर या देहाचा ॥२॥
तैंहूनि तुज मज तुटला संबंधु । विठ्ठलाचा छंदु घेतला जीवीं ॥३॥
लौकिक व्यवहार नाठवेचि कांहीं । कल्पना ते देहीं आथीचना ॥४॥
टाळ दिंडी घेऊनि नाचतो रंगणीं । तेणें माझ्या मनीं सुख वाटे ॥५॥
या देहघरसंसाराचा आलासे कंटाळा । म्हणोनि गोपाळा शरण आलों ॥६॥
पुत्र कलत्र येथें कायसी बापुडीं । जेणें रौरव कुंडीं वासा घडे ॥७॥
तूं जरी म्हणसी हें सत्य संसारसुख । तरी हें केवळ विख विस्तारलें ॥८॥
तेचि हें जाण महणोनि टाकियलें दुरी । तैं सेवितां उरीं कैंची माते ॥९॥
म्हाणोनि मी जालों या संतांचा दीन । तेणें हरिला सीण जन्मांतरीचा ॥१०॥
नामा म्हणे आतां मी-तूंपण कैंचें । मी या विठोबाचें शरणागत ॥११॥
||२४||
जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता । आडणी सांभाळितां चराचरीं ॥१॥
एक पांडुरंग दुजा नाहीं चांग । म्हणुनि याचा संगा धरिला माते ॥२॥
माझी तुज कांहीं करणें नलगे चिंता । मज आहे पोसिता पांडुरंग ॥३॥
हा शराणागतांचा जाणे कळवळा । हा पैं कळिकाळा पाहों नेदी ॥४॥
केले कोटिवरी न मानी अपराध । हें पैं साजे ब्रीद पांडुरंगा ॥५॥
आम्ही आपुल्या सुखें असो भलत्या ठायीं । प्रीति तया पाय़ीं जडली असे ॥६॥
तेणें उपकारें न विसंबे क्षण । हातीं सुदर्शन घेऊनि उभा ॥७॥
जाणतां नेणतां राम गावों गीतीं । जन्माची विश्रांति होय जेणें ॥८॥
ऐसी जिवलग होईल कैंचें आन । संचला परिपूर्ण सर्वांठायीं ॥९॥
इष्टमित्र बंधु सज्जन सोयरा । माझिया संसारा हाचि एक ॥१०॥
नामा म्हणे माते मज न चले मोहोपिसें । तुम्हांसि मज ऐसें होईल काई ॥११॥
||२५||
साधावया आत्मसुख । तें हे विटेवरी देख ॥१॥
नको जाऊं परदेशीं । वास करी पंढरीसी ॥२॥
भाव धरी बळकट । मुखीं नाम येकनिष्ठ ॥३॥
नामा म्हणे गोणाबाई । सर्व सुख याचे पायीं ॥४॥
||२६||
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तैहुनि मी करीं आस तुझी ॥१॥
उपजलासि तैं मज जाला संतोष । आनंद उल्हास वाटे जीवां ॥२॥
गणगोतामाजीं केलें बारे नांव । पंढरीचा देव प्रसन्न केला ॥३॥
रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी । तूं मज संसारीं होसी म्हणोनि ॥४॥
तंव तुज अवचित्तीं उपजली बुद्धी । भोपळा हा खांदीं आवडता ॥५॥
हातीं टाळ घेऊनी करिसी आळवणी । घागरिया चरणीं बांधोनियां ॥६॥
सांडोनि घर-दार आपुला संसार । नाचतां विचार न धरिसी ॥७॥
नव्हें तें करितां कोण असे वारिता । परी त्वां आपुल्या हिता प्रवर्तावें ॥८॥
मी एक आहें तंव करीन तळमळ । मग तुझा सांभाळ करील कोण ॥९॥
या विठ्ठलावांचुनी तुज नाहीं संसार । हा बोल विर्धार सत्य माझा ॥१०॥
कोण्या गुणें तुवां घेतलें धरणें । गोणाई म्हणे करणें फळा आलें ॥११॥
||२७||
आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या ॥१॥
बरवें पुत्रपण जालासी उत्तीर्ण । आतां अभिमान पाहें माझाअ ॥२॥
तुज नेल्यावीण नवजाय येथून । पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥
माझेंसी लेकरूं मज आहे वेव्हारू । मज आहे निर्धारू विठोबासी ॥४॥
हा दानवांतें छळी आपणा म्हणवी बळी । तें मजजवळी न चले कांहीं ॥५॥
विटेसहित चरणीं बांधिन आपुला गळा । क्षण जीवा वेगळा जाऊं नेदी ॥६॥
आसनीं शयनीं न विसंबे भोजनीं । घालिन मुरडोनि ह्रदयामाजीं ॥७॥
या देहाचा संकल्प आलेसें करोन । घाललेंसे पाणी घरादारां ॥८॥
हा त्रिभुवनीं समर्थ मी असें जाणत । पाहेन पुरुषार्थ आजी याचा ॥९॥
अठ्ठाविस युगें भरलीं तया बोला । धरोनि उभा केला पुंडलिकें ॥१०॥
गोणाई म्हणे देवा होई कां शहाणा । वायां कां परधना धरिसी लोभु ॥११॥
||२८||
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी । परी तुज ऐसा सृष्टीं देव नाहीं ॥१॥
दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा । मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ॥२॥
ऐसा कैसा कोणें केलासिंरे देव । आमुच्या जाणिया खेंच आणियेला ॥३॥
माझेंज बाळ तुझ्या दर्शनासीं आलें । तें त्वां भुलविलें केशिराजा ॥४॥
रात्रिदिवसा तुझ्या नामाचा रे छंदु । गोविंद गोविंदे म्हणतसे ॥५॥
तान्ह भूक विसरला पिसाट पैं जाला । नोळखे मजला काय करूं ॥६॥
परतोनि संसाराची सांडियेली आसा । दिसतो उदास सर्वांपरी ॥७॥
लोकांचीं लेंकुरें कां गा चाळविसी । आपणया ऐसें करसी भलत्यासी ॥८॥
आणिक असतां नाश वेगळा थोर । मग माझा विचार कळतां तुज ॥९॥
तुज एक वर्म पुंडलिक आहे । जेणें जडविले पाय विटेवरी ॥१०॥
याहुनी आणिक अधिक पावसी । आम्हां दुबळयासी कष्टवितां ॥११॥
मागें पुढें तुज ऐसेंचि फावलें । तें तंव न चले मजसी कांहीं ॥१२॥
जीव मी देईन कां नामा नेईन । नांव मी करिन गोतामाजीं ॥१३॥
आतां बरवें विचारी अगा ये श्रीहरी । माझा नामा करीं मज आधीन ॥१४॥
नाहीं तरी जीवित्व वेंचिन तुझ्या पायीं । विनविते गोणाई केशिराजा ॥१५॥
||२९||
अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ॥१॥
तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥
आम्हीं म्हणूं तूं ते कृपाळू अससी । आतां तूं कळलासि पंढरिराया ॥३॥
कां देवपण आपुलें भोगूं पैं जाणावें । भक्तां सुख द्यावें हेळामात्र ॥४॥
देव देव होऊनियां अपेश कां घ्यावें । माझें कां बिघडावें एकुलतें बाळ ॥५॥
तूं कैसारे देव या देशावेगळा । बांधितें तुझा गळा परि संतां भ्यालें ॥६॥
तुझी करणी अवघी आम्हां ठाउकीच आहे । बोलोनियां काय हलकट व्हावें ॥७॥
जाणोनि पुंडलिक तुझी न पाहेचि वास । तूं भला नव्हेस घरघेणा ॥८॥
तो बैस पैं न म्हणे तुज याचकाकरणें । जडसी जीवेंप्राणें सात्विकभावें ॥९॥
झणीं तूं आपुला करिसी बोभाट । मग येईल वीट लोकाचारी ॥१०॥
थोरपणें नामा करीं मज आधीन । गोणाई म्हणे चरण धरिन तुझे ॥११॥
||३०||
तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मीं । काय यासी आम्ही करूं शकों ॥१॥
मर्यादाअ सांडोनि बोलसी कठिण । करिसी वायांविण इष्ट तुटी ॥२॥
ऐसें कांहीं सुखा अनुपम्य दाखवीं । जया ओळखी जीवीं निजरूपाअ ॥३॥
जेणें लोभें त्याचेंज मन मागें मोहरे । वृत्तिसहित विरे ठाईं ॥४॥
तेणें या जन्माचे विसरोनि संताप । सोय आपेंआप धरिल तुझी ॥५॥
जरी तूं देखतीस स्वहित पूर्वीं याचें । तरी कां चित्त त्याचें त्रास घेतें ॥६॥
संसार करितां कांहीं न देखेचि सुख । म्हणोनि विन्मुख जाला तुज ॥७॥
वरपंगाचें पेहें पाजिसिल काय । हा निजमुखीं धाय ऐसें करी ॥८॥
तरीच तूं निजाची लोभापर माता । म्हणोनि श्लघ्यता जगामाजीं ॥९॥
आतां असो सहज येणेंविण काय काज । मी बोलिलों तुज कळेल तें करीं ॥१०॥
नामा म्हणे देवा ऐसें काय केलें । काय तुजवेगळें जीवन माझें ॥११॥
||३१||
माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥
तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥
सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां भुलविलें कवण्या गुणें ॥३॥
आम्ही गा सिंपिये अनाथें पैं दीनें । करूं सिवने टिपणें पोट भरूं ॥४॥
त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो । कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥
असतां चराचर न बुडतां हे सृष्टी । कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥
एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ॥७॥
दिसां मासां गर्भ जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक ॥८॥
एवढा माझा नामा कैसेन विसरेन । देई कृपादान दुर्बळासी ॥९॥
तूं अनाथा गोसावी दिनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ॥१०॥
बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ॥११॥
||३२||
तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज ॥१॥
इष्ट मित्र बंधु जननी जनक । सर्वव मीच एक करूनि ठेला ॥२॥
ऐसी याची करणी अजोनि नेणसी । बाळ माझे म्हणसी चाळविलें ॥३॥
प्रेमाचें लाघव लाउनि माझ्या पायीं । बांधलें ह्रदयीं धरोनियां ॥४॥
वृत्तिसहित मन लाविलें राखण । केलें जीवें जतन मजलागीं ॥५॥
उचंबळले नयन अंतरींच्या अनुरगें । रात्रंदिवस जागे मन माझ्या ठायीं ॥६॥
बोले चाले परी लक्ष मजवरी । बाहेरी भीतरीं मज देखें ॥७॥
सर्व सुख गुणा रूपा देउनि मिठी । आणि निर्गुंणीं हिंपुटी होऊं नेदीं ॥८॥
न मागे न घे न धरी सोय संसाराची । कल्पना देहींची मावळली ॥९॥
ऐसें येणें मज विश्वासी गोंविलें । सर्वत्र लाविलें मजचिकडे ॥१०॥
निर्गुणीं हा नामा न सोडी सर्वथा । सांपडला आतां एकरूपा ॥११॥
||३३||
बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥
तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥
नेणों काय कळे तुवां वागविला । संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥
बुडविला आचार बुडविला विचार । बुडविडा संसार कुळासहित ॥४॥
आपुलें पारिखें सर्वथा सारिखें । नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥
बुडविला मोहों बुडविली ममता । बुडविली अहंता मीतूंपण ॥६॥
हा नेणें वेव्हार कां इंद्र्यांचें सुख । अखंड याचें लक्ष तुझे पायीं ॥७॥
बुडविली कल्पना समूळीं वासना । बुडविली सेवाअ त्रिविध कैसी ॥८॥
हांसे नाचे प्रेमें फुंदतु डुल्लतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ॥९॥
असोनि नसता केला ये संसारीं । म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ॥१०॥
गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास । चाळविलें उदास बाळ माझें ॥११॥
||३४||
ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा ॥१॥
संसारादि यासी नावडेचि कांहीं । मिठीच वो पायीं घातलीसे ॥२॥
नेणों याच्या जीवें घेतलेसें कांहीं । लोळणींच पायीं घातलिसे ॥३॥
पुसे वो जीवीचें काय काय आवडे । उमगोनि कोडें नेई यासी ॥४॥
देतां कांहीं न मागे नसतां कांहीं नेघे । गुज पैं न सांगें अंतरीचें ॥५॥
जन्मोनि सांकडें घातलें वो कैसें । गिळिल मज ऐसें वाटतसे ॥६॥
मी भावासि भुललों सांपडलों याचे हातीं । करिल काय अंतीं न कळे कांहीं ॥७॥
एक वेळ मज सोडवीं या पासोनी । दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥
माझिये पैं बोले मजचि गोविलें । यातें आपंगिलें अनाथ म्हणोनि ॥९॥
अंगोळिये धरितां खांदा वोळंगिये । आतां माझें केलें न चले कांहीं ॥१०॥
तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ॥११॥
माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ॥१२॥
कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले । नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढें ॥१३॥
आतां तुझी कैसी झांकोळिली माया । मज करिसी वायां इष्ट तूं गे ॥१४॥
ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ॥१५॥
नामा म्हणे देवा ऐसें कैसें घडे । सृष्टीहि पैं बुडे तरी न सोडी तुज ॥१६॥
||३५||
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥
दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥
या विश्वावेगळें नवल तुझें करणें । सांगावें गार्हाणें कवणालागीं ॥३॥
सर्वांगें सुंदर परी ह्रदयें कठोर । नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ॥४॥
मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें । बहुत दुःख जालें सांगों कोणा ॥५॥
कासया पितृभक्ति पुंडलिकें केली । विवसी आणिली पंढरीसी ॥६॥
माय दुखवुनी मोहिसी बाळकें । देवपण निकें कैसें तुझें ॥७॥
यातें अनुसरल्या कैंची बाप माय । नाठवेची सोय संसाराची ॥८॥
ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ॥९॥
आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज । तरी काई तुज उणें होतें ॥१०॥
माझा नामा लावीं संसाराचे सोई । विनविते गोणाई केशवातें ॥११॥
||३६||
बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥
नामा माझा वेगीं देई माझ्या हातीं । जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥
खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥
तुज काय जाणें ब्रह्मांडनायका । नव्हेसी मजसारिखा एकदेशी ॥४॥
अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी । कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ॥५॥
तुज दुजेपणाचा सहज आला वीट । तूं तंव एकट एकालची ॥६॥
ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ॥७॥
तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥८॥
मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ॥९॥
आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा । झणें माझ्या विर्वाणा पहासी देवा ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारीं कीर्ति पंढरिराया ॥११॥
||३७||
थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥
जीवें भावें सर्वस्वें घेतलें धरणें । म्यां काय करणें ऐशियासी ॥२॥
कासया अपराध ठेविशिल मज । शिकवितें तुज नाहीं कोणी ॥३॥
संसारा गांजले जन्ममरणा उबगले । म्हणोनी शरणा आले भयाभीत ॥४॥
कृपा उपजली जीवें अनुसरला । जीव गुंतला माझे ठायीं ॥५॥
दवडितां वेगळे वोसंगा रिघालें बळें । बोलताहे साळे भोळे करुणावाचनीं ॥६॥
तेणें माझें ह्रदय कळवळलें । म्हणोनि देखतां डोळे निवती माझे ॥७॥
शरणा आलिया ते म्यां जरि अव्हेरावें । कोण कोणें आपंगावें सांग सत्य ॥८॥
शत्रुमित्र आदि करूनी सकळ । दुःख अळुमाळ पडों नेदी ॥९॥
संसाराची येणें सांडियेली सोयी । प्राणें माझ्या ठायीं अनुसरला ॥१०॥
आतां याची लटिकी करी दूर आस । नामा म्हणे उदास सर्वस्वासी ॥११॥
||३८||
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ॥१॥
कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरीराया ॥२॥
ठकुनी पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी । या बुद्धी आलासी पंढरिये ॥३॥
तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ॥४॥
अठ्ठावीस युगें गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवाअ ॥५॥
मग कटावरी कर धरोनियां धीर । उभा निरंतर राहिलासी ॥६॥
सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोणें कोणा ॥७॥
द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित । सांग बुद्धिमंत कोण ऐसा ॥८॥
नाथिलेनि करिसी आपणा गोंविसी । बोल कां ठेविसी नामयातें ॥९॥
गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान । देईं कृपादान बाळ माझें ॥१०॥
||३९||
माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥
नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥
लौकिक परिहार देसील कासया । मी तुज ऐसिया बरबें जाणें ॥३॥
कटीं ठेउनि कर उभा गरुडपारीं । हें तंव अंतरीं हारपला ॥४॥
नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें । लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥
तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥
सांडियेली येणें लौकिकाची लाज । नव्हे माझा मज कांहीं केल्या ॥७॥
तुझेंनि सुखें धाला आनारिसा जाला । अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥
देहीं पैंज असोनी विदेही दिसत । प्रेमें वोसंडत ह्रदयकमळीं ॥९॥
तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी । परी कां नये अजोनी कणव तुज ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देईं हातीं । लागेन पुढता-पुढती तुझे पायीं ॥११॥
||४०||
वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण ॥१॥
भ्रमलिस आरजे न पाह्सी आपणाकडे । धारिष्ट केवढें पाहें तुझें ॥२॥
नेईं आपला नामा काय चाड आम्हां । जरी आहे तुज भ्रम ममत्वाचा ॥३॥
पाहे पां पूर्वींचा कवणिये जन्मींचा । नकळे तुझा याचा ऋणानुबंध ॥४॥
तो सरला कींज उरला विचारी आपुला । हा तुज अंतरला कवण्या गुणें ॥५॥
येणें सांडिला संसार वेव्हार लौकिक । अविद्या अहंभाविक दोन्ही नाहीं ॥६॥
हा प्रपंचावेगळा नकळे याची लीला । लागालसे डोळा प्रेममुद्रा ॥७॥
ऐसी याची स्थिति देखोनियां डोळां । मज कां वेळोवेळां छळितेसी ॥८॥
जाणसी त्या परी बझावी वो यातें । जेणें सुखें तूंतें ओळखिला ॥९॥
याचेनि संसार चालविन म्हणोनी । ऐसी भ्रांती मनीं धरिलीं वायां ॥१०॥
नामा अंतरीं निमाला आत्मा असे उरला । तरंग निमाला जेवीं जळीं ॥११॥
||४१||
लावोनि भवभयें तुवां केलेंज साचें । देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥
सुखभोग सर्व दिला टाकोनियां । नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥२॥
ऐसें काय केलें नामया चाळविलें । समूळ बुडविलें अपणांमाजीं ॥३॥
आम्हां दुर्बळांचा करोनियां घात । केला वाताहात घराचार ॥४॥
आतां तुजविण कोणाचें साउली । पाळली पोसिली तुझी देवा ॥५॥
संकटीं उदरीं वाहिली म्यां आशा । होता भरंवसा थोर याचा ॥६॥
तंव तुवां लाविला आपुलिया सवें । नव्हे मज कांहीं ऐसा केला ॥७॥
काया वाचा मनें सांडोनियां मज । अनुसरला तुज मनोभावें ॥८॥
नकळे तुझी माव काय या दाविलें । परतेनासें केलें चित्त याचें ॥९॥
आतां माझा शीण निवारिल कोण । एका तुजविण पांडुरंगा ॥१०॥
गोणाई म्हणे देवा देई जीवदान । सुखाचें निधान नामा माझा ॥११॥
||४२||
राही रखुमाई सत्यभामा माता । सिकवा वो कांता बहुतां परी ॥१॥
संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥
हा काय आमुचा धनी कीं गोसावी । नाहीं तें शिकवी लेंकुरासी ॥३॥
जाला देव तरी पडों याच्या पायां । मैंदावें केलिया भलें नव्हे ॥४॥
भीड तुटलिया नेईन चोघां चारीं होईल समसरीं याची मज ॥५॥
देव कांहीं आम्ही नसति ऐकिले । परी नाहीं देखिले ऐसे कोठें ॥६॥
दर्शनेंचि जेथें जीवित्वाची हानी । नाठवे परतोनि घराचारा ॥७॥
कैंची वो पंढरी मी वो काय जाणे । याच्या पुत्रपणें देखियेलीं ॥८॥
याअ देवासी भेटी जन्ममरण तुटी । मावळली गोष्टी संसराची ॥९॥
तुम्ही अवघ्याजणी जीवाच्या सांगातिणी । पुसा याचे मनीं काय आहे ॥१०॥
देऊनियां नामा मज लावा वाटे । गोणाई म्हणे वोखटें न करा देवा ॥११॥
||४३||
अरे विठोबा आतां पाहे मजकडे । कांज्रे केलें वेडें बाळ माझें ॥१॥
तुझें उच्छिष्ट खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥
आधीं त्वां तयाचें भोगूं पैं जाणावें । भक्ता सुख द्यावें आनंदाचें ॥३॥
गोणाई म्हणे देवा तुज बांधलें दावें । तरी तुज भ्यावें संतां ॥४॥
||४४||
हरी त्वां कोणाचें बरवें केलेंज । पूर्ण आम्हां कळों आलें ॥१॥
नारदा वैष्णव जगजेठी । त्यासी लाविली लंगोटी ॥२॥
मयुरध्वज राजा भला । त्यासि करवतीं घातला ॥३॥
बळी दानशीळ भला । तुवां पाताळीं घातला ॥४॥
भीष्म वैष्णवांचा राव । त्याचा बाणें पूजिला ठाव ॥५॥
रूक्मांगद हरिचा दास । त्याचा गांवच केला वोस ॥६॥
बाळ एकुलतें एक । तें त्वां ज्ञानीच केला शुक ॥७॥
उपमन्यु बाळक पाहें । क्षीरसागरीं कोंडिलें आहे ॥८॥
धुरू बाळक गोजिरवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें ॥९॥
हरिश्चंद्र ताराराणी । डोंबा घरीं वाहे पाणी ॥१०॥
प्रल्हाद भक्तीचा भुकेला । त्याचा बाप त्वां वधिला ॥११॥
हनुमंत भक्त निकट । त्यासी केलें तूं मर्कट ॥१२॥
पुण्यवंत राजा नळ । त्याचा केला तुवां छळ ॥१३॥
श्रियाळ राजा भला । त्याचा बाळ त्वां खादलाअ ॥१४॥
तुज कोणी न म्हणे भलें । बाळ पोटीचें कोवळें ॥१५॥
जिकडे तिकडे तुम्ही दोघें । तिकडे तिसरा नामा मागें ॥१६॥
तुज नाहीं जाती कुळ । जेऊनि भ्रष्टविलें बाळ ॥१७॥
जेणें तुझें नाम घेतलें । तें संसारावेगळें केलें ॥१८॥
आतां जेविसी तरी तुज आण । ऐकोनि हांसे जगज्जीवन ॥१९॥
नामा दिला माते हातीं । नयन भरले अश्रुपातीं ॥२०॥
माय पाहे नामदेव । तंव्व तो जालाअ केशवराव ॥२१॥
माय म्हणे नये कामा । तुझा ओपिला तुज नामा ॥२२॥
गोणाई म्हणे हरी । तुझी करणी तुजचि बरी ॥२३॥
||४५||
गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक । पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ॥१॥
महिमेचा संसार सांडोनि आपुला । संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥
या काय मागसी तो काय देईल । शीघ्रची नेईल वैकुंठासी ॥३॥
सविल्याचीं लेंकुरें वर्तताती कैसीं । तूं मज जालासी कुळक्षय ॥४॥
धनधान्य पुत्र कलत्रें नांदती । तुज अभाग्याचे चित्तीं पांडुरंग ॥५॥
शिवण्या टिपण्या घातलेंसें पाणी । न पाहासी परतोनि घराकडे ॥६॥
कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी । संसाराची होळी केली नाम्या ॥७॥
याची तुवां कैसी धरियेली कांस । हा तंव कवणास जालाअ नाहीं ॥८॥
त्यातें जे अनुसरती त्याचें नुरे कांहीं । देव नव्हे पाही हा घरघेणा ॥९॥
गोकुळीं करी चोरी आपुलें पोट भरी । यो तुज निर्धारीं देईल काई ॥१०॥
लक्षुमीसारिखी सुंदर टाकोनी । ताटिका गौळणी गौळीयांच्या ॥११॥
अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी । कल्पवृक्ष द्वारीं कामधेनु ॥१२॥
बळीच्याचि घरा भीक मागूं गेला । धरूनी बांधिला दारवंटा ॥१३॥
कुबज्या कुरूप कंसाचिया दासी । जीवें भावें तिसी रतलासे ॥१४॥
यातें भजती त्याच्या संसाराची नासी । जडला जीवेंसी नवजाय ॥१५॥
ठकोनियां येणें बहु नाडियेलें । तैसें तुज जालें सत्य जाण ॥१६॥
गोणाई म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । घर बुडविलें कुळासहित ॥१७॥
||४६||
नामा म्हणे माते परियेसी वचन । गुज मी सांगेन अंतरीचें ॥१॥
धरोनि माझी वृत्ति पाहें माझें सुख । मी सांगतों तें ऐक जननिये ॥२॥
कायावाचामनें ममत्व माझ्या ठायीं । तें तूं ठेवीं पाई विठोबाचे ॥३॥
मग हा कृपासिंधु न विसंबेल तुज । अनाथाची लाज हाचि राखे ॥४॥
पाहे पां पशु जळचरें गांजिले । सकळीं सांडिले जिवलगीं ॥५॥
पितांबरासहित घालोनियां उडी । सोडविला पानेडी अनाथ म्हणोनी ॥६॥
प्रल्हादाकारणें जाला पैं पिसाट । धरिले विकट रूप देवें ॥७॥
विदारुनी दैत्य आवेशें बहुत । यानें माझा भक्त गांजियेला ॥८॥
पांडवांचें काज करितां नाहीं लाज । म्हणे शरण मज अनन्य भावें ॥९॥
पाडसाकारणें जैसी कुरंगिणी । तैसा रानींवनीं सांभाळित ॥१०॥
जन्मोनियां माझे बहु लळे केले । अडचणी सांभाळिलें अनाथनाथें ॥११॥
नामा म्हणे याचे दृढ धरिले चरण । कळिकाळापासोन सोडविलें ॥१२॥
||४७||
लाभाचिया लोभें मज म्हणसी आपुलें । परी नेणसी तापलें चित्त माझें ॥१॥
जन्म मरण दुःखें शिणलों यातायाती । ऐसी माझी खंती न विचारिसी ॥२॥
म्हणोनि विठोबाचा जालों शरणागत । तेणें माझें हित ऐसें केलें ॥३॥
पुत्र कलत्र सकळ भजती हितालागीं । दुःखाचे विभागीं नव्हती कोणी ॥४॥
जन्मोनि भजतांज उचित एक चुके । तें होय पारिखे क्षणामाजीं ॥५॥
नाना योनीं हिंडतां आपुलें निज कर्म । मज होय श्रम तें तूं देई ॥६॥
परी माझ्या विठोबाची सेवा सुख गोडी । नाहीं एक घडी न देखों कोठें ॥७॥
जाती कुळ माझें नाहीं विचारिलें । नेणों अंगिकारिलें कवण्या गुणें ॥८॥
तुजविण त्याचें ह्रदय कोवळें । पाळी माझे लळे नानापरी ॥९॥
शिणलिया बोभाय मग मी वाट पाहें । ये वो माझे माये पांडुरंगे ॥१०॥
शब्दा माझ्या कानीं पडतां तत्क्षणीं । येतसे टाकोनि झेंपावता ॥११॥
न सांगतां कांहीं सर्व जाणें जिवींचें । आणिक ऐसें कैंचें लोभापर ॥१२॥
देऊनि अभयदान करें कुरवाळी । करितसे साउली पीतांबरें ॥१३॥
मायबाप सखा जिवलग सोईरा । माझिया संसारा हाचि एक ॥१४॥
नामा म्हणे माझ्या ह्रदयींचा विसावा । गीतीं गातां जीवा गोडा वाटे ॥१५॥
||४८||
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ॥१॥
लाजिरवाणें तुवां केलें रे हें जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं ॥२॥
सांडीं सांडी नाम्या तूं हें देवपिसें । बळें घरा कैसें बुडवितोसी ॥३॥
नवमास उदराभीतरीं वाहिला । माझ्या नेणत्या बाळा चाळविलें ॥४॥
तुझे द्वारीं वैसोनि उपवास करिन । नामा घेऊन जाईन गुणराशी ॥५॥
तेथें ते होईल लटिकेंचि भांडण । नामा द्यावा म्हणे गोणाई माझा ॥६॥
गोणाई म्हणे नाम्या कळेल तें करी । स्वहित विचारी सांगो किती ॥७॥
||४९||
पोर निर्दय जालें देवपिसेंज लागलें । लोकाचें गोविलें तेंहिअ पोर ॥१॥
नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिलीं । कळी मांडियेली याही पोरें ॥२॥
गांवींचे महाजन करिती गुडघे स्नान । या पोरां व्यसन अंघोळीचें ॥३॥
जन्मोजन्मीं नेणों आम्ही ह्या तुळसी । ये पोरें विवसी मांडियेली ॥४॥
गोणाई म्हणे नाम्या तुवां भलें केलें । जया वस्य केलें विठोबासी ॥५॥
||५०||
ज्याचें दैव त्या सांगातें । मला नवल वाटतें ॥१॥
एक बैसती अश्वावरी । एक चालती चरणचाली ॥२॥
एक जेविती मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न ॥३॥
गोणाई म्हणे धन्य देवा । नामयाचा संचित ठेवा ॥४॥
||५१||
सोये सांडिली सर्वांची । जोडी केली विठोबाची ॥१॥
मायबापासी टाकिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥
स्त्री पुत्र बंधु बहिणी । केली सर्वांची सांडणी ॥३॥
गणगोत इष्टमित्र । सर्व जोडिलें विठ्ठलपात्र ॥४॥
गोणाई म्हणे नामा । भली केली बारे सीमा ॥५॥
||५२||
नामयाची माता विनवितसे संता । म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥
नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठलीं मीनला नामदेव ॥२॥
नेणें अन्नपाणी शिवणीं टिपणीं । अखंड चक्रपाणि ह्रदयीं वसे ॥३॥
संत म्हणती गोणाई विपरीत अवधारीं । नामा पंढरपुरीं वैष्णवांमाजीं ॥४॥
||५३||
नामयासारिखें निधान तुझिये कुसीं । धन्य तूं वो होसी जगामाजीं ॥१॥
धन्य याचें सुख देखियेलें डोळां । प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक ॥२॥
धन्य तुझें कुळ धन्य तुझा वंश । दीपासवें प्रकाश दिसे जेवीं ॥३॥
धन्य तुझी काया धन्य वाचा मन । करविलें स्तनपान नामयासी ॥४॥
धन्य हा दिवस तुवां केलें सार्थक । खेळविलें कौतुकें नामयासी ॥५॥
धन्य तुझें भोजन नाहीं नाम्याविण । धन्य उदकपान केलें तुवां ॥६॥
धन्य विश्रांतीसी केलें त्वां शयन । वोसंगा घेऊन नामयासी ॥७॥
धन्य तुझे कर कुरवाळिला नामा । धन्य तो संभ्रमा स्नेह तुझा ॥८॥
धन्य कृपदृष्टीं नाम्यातें पाहिलें । केस कुर्वाळिले बाळपणीं ॥९॥
ऐसी तूं वो धन्य जन्मोनियां धन्य । तुझें नाम धन्य मिरवत ॥१०॥
धन्य तुझा नामा ज्याची भेटी आम्हां । धन्य त्याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥
||५४||
मग पंढरीनाथ म्हणे नामयासी । तूं जाई गोणाईसी घेऊनियां ॥१॥
अतिशय कांज इणें मांडिलासे फार । मातेसि निष्ठुर होऊं नये ॥२॥
स्तनपान देऊनि मोहें पाळिलासी । अंतर तियेसी देऊं नये ॥३॥
नामा म्हणे शरण आलों जिच्या भेणें । तिचे हातीं देणें उचित नव्हे ॥४॥
||५५||
देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया ॥१॥
हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
हातीं धरोनियां घेऊनी चालिली । फिरूनी पाहती जाली तंव तो देव ॥३॥
अगा माझ्या बापा तूं कोणा हवासी हवासी । मज दुर्बळासी काय होय ॥४॥
सोळा सहस्त्र मुख्य अष्ट तुझ्या कांताआ । त्या माझिया घाता प्रवर्ततील ॥५॥
पुंडलिकासी तुवां दिधली आहे भाक । गोणाई म्हणे ठक बहु होसी ॥६॥
||५६||
माझा नामा मज देई । जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझें बाळ केलें ॥२॥
तें गा न चले मजपासीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुज संगतीं जे लागले । ते त्वां जितेंचि मारिले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाई । आपुला नामा घेऊनी जाई ॥५॥
हातीं धरोनियां गेली । गोणाई तेव्हां आनंदली ॥६॥
||५७||
शिवणें टिपणें करोनि आपुलें । नित्य चालवणें संसारिक ॥१॥
गणगोतांमाजीं बरें केलेंज नांव । माझें सत्त्व सर्व बुडविलें ॥२॥
कवणें गुणें तुज पडिली बा भुली । सुख या विठ्ठलीं देखिलें काय ॥३॥
तूं भक्त निधडा हा देव धडफुडा । मेळविला जोडा येरवेरां ॥४॥
यासी नाहीं आप तुज नाहीं पर । आमुचा संसार विभांडिला ॥५॥
सरलें आयुष्य उरले थोडे दिस । थोर केली आस होती जीवीं ॥६॥
आमच्या माघारें राखिसी वो नांव । त्वां तंव बरावें दैवा काढियेलेंज ॥७॥
खांदिये भोपळा गळां तुळसीमाळा । जपसी वेळोवेळां रामकृष्णा ॥८॥
तेणें छंद नयनीं अश्रूंचिया धारा । केली ख्याति गव्हारा जनांमाजीं ॥९॥
अरे ऐसें तुवांज बुडविलें कुळ । सांडिली सकळ लोकलाज ॥१०॥
बरवी धरिली दृढ सत्वाची पाउटी । शिकवी दामशेठी नामयासी ॥११॥
||५८||
बोले दामसेठी । नाम्या ऐकावी हे गोष्टी ॥१॥
पाहे संसाराची सोये । हाटा बाजारासी जाये ॥२॥
कुटुंब चालवणें तुज । वृद्धपण आलें मज ॥३॥
तुजसाठीं नवस केलाअ । सेखीं हाचि कामा आला ॥४॥
दामा म्हणे नामयासी । किती शिकवावें तुजसी ॥५॥
||५९||
केशवासी नामा सांगतसे भावें । नफा वेवसाव जाला तैसा ॥१॥
मालिक गणोबा धोंडोबा जामीन । घेतलीसे पूर्ण निशाणचिठी ॥२॥
आठवडयाची बोली करूनियां आलों । नामा म्हणे धालों तुज पाहतां ॥३॥
||६०||
दामाशेठी म्हणे वेव्हार कोणासी । केला तो आम्हांसी सांग नाम्या ॥१॥
गणोबा नाईक नाम हें जयाचें । सावकार साचे पुरातन ॥२॥
तयांचे दुकानीं वेंचिलें कापडा । आठांवारीं तोड ऐवजासी ॥३॥
दामाशेठी म्हणे नामया सुजाणा । वेगीं द्रव्य आणा जाऊनियां ॥४॥
||६१||
जावोनियां नामदेव । बोले गणोबासी भाव ॥१॥
द्र्व्य द्यावें हो सत्वरीं । आम्हीं जातों आपुल्या घरीं ॥२॥
मग म्हणे धोंडोबासी । तुम्ही जामीन ऐवजासी ॥३॥
द्र्व्य द्यावें हो लवकरीं । नाहीं तरी चलावें घरीं ॥४॥
ऐसें बोलोनि धोंडोबासी । पुढें लोटिलें तयासी ॥५॥
नामा पंढरिसी आला । संगें धोंडोबा आणिला ॥६॥
||६२||
कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं ॥१॥
गोणाई दामासेठी नव्हती तेव्हां घरीं । गेली भीमातीरीं स्नानालागीं ॥२॥
नामदेव गेले राउळा त्वरित । सांगतसे मात केशवासी ॥३॥
दामासेठी आले स्नान करूनियां । राजाई त्यां पायां लागुनि बोले ॥४॥
ऐका हो मामाजी पुत्राची हे मात । धोंडयाशीं घरांत कोंडियलें ॥५॥
दामासेठी बोले नामा कोठें गेला । बोलवा तयाला झडकरी ॥६॥
नारा महादा दोघे जाती राऊळासी । बोलाविती नाम्यासी चला घरीं ॥७॥
मुखाकडे पाहे केशवाच्या नामा । घरीं जातां दामा मारिल तो ॥८॥
देव म्हणे नाम्या भिऊं नको मनीं । नाम हें निर्वाणीं तारिल तुज ॥९॥
नामा घरां आला दामासेठीपायीं । नमस्कारूनि त्यांही उभा पुढें ॥१०॥
दामासेठी म्हणे नाम्या काय केलें । धोंडयाशीं कोंडिलें घरामध्यें ॥११॥
||६३||
अरे नाम्या काये केलें । कासया धोंडयाशीं कोंडिलें ॥१॥
उदीम बरावा फळा आला । हरविलें भांडवला ॥२॥
संसारिक चतुर बहु । मातीसमान घेसी गहूं ॥३॥
नामा म्हणे दामासेठी । माझी ऐकावी हे गोष्टी ॥४॥
||६४||
ऐका दामासेठी सांगतों तुम्हासी । द्रव्यही कुळासी मागुन घ्यावें ॥१॥
मालधनी आलों घेऊनियां घरा । तुम्ही कां दातारा गांजितसां ॥२॥
नामदेव म्हणे धोंडोबा नाईका । मिती आणि पैका द्यावा वेगीं ॥३॥
||६५||
धोंडोबा नामदेवें काढिला बाहेरी । अंतर्बाह्याक्तारीं सोनें जालें जालें ॥१॥
दामासेठी पाहुनी नामयासी बोले । वेर्थ म्यां छळिलें तुज बाळा ॥२॥
राजाई गोणाई धांवोनियां आली । विनीत होऊनि बोली बोलताती ॥३॥
आम्ही हे कुटुंबी द्र्व्या नाहीं घरीं । म्हणोनि श्रीहरी पावलासी ॥४॥
गोणाई दामासेठी सांगे नामदेवा । न बोलावें भावा जनीं बापा ॥५॥
जगा मात कळलियावरी । नेतील हिरोनि धोंडोबासी ॥६॥
नामदेव म्हणे आपुलें द्र्व्य घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥७॥
||६६||
क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥
धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानीं । ते आले धांवोनि मागावया ॥२॥
आपुलें द्र्व्य घ्यावें धोंडोबशीं द्यावें । नाहीं तरी चलावें पंचाइती ॥३॥
नामदेव म्हणे द्र्व्य तुम्ही द्यावें । आपुले घेवोनि जावें धोंडोबासी ॥४॥
||६७||
सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं ॥१॥
धोंडोबाशीं सकळिके ग्रामस्थीं आणिले । पूर्ववत जाले दगडची ॥२॥
नामा म्हणे विठो पावला निर्वाणीं । भक्तां चक्रपाणि रक्षितसे ॥३॥
||६८||
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥
लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥
ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि । पडिलें चिंतवनीं काय करूं ॥३॥
धडचि कांटीये घातलें हो कैसें । बळेंचि आपणा पिसें लावियेलें ॥४॥
सुखाचा संसार करोनि बारा वाटे । नांव केलें मोठें जगामाजीं ॥५॥
तोडियेला मोह सांडियेली माया । भुलविले तुमचिया चित्ता कोणें ॥६॥
कवणें पुण्य ऐसी जोडियेली जोडी । केली बिघडाबिघडी आम्हां तुम्हां ॥७॥
तुमचि हे गति लेकुरें नेणति । कोण चालविती घराचार ॥८॥
म्हणोनि माझें चित्त आपुलेनि उद्वेगें । कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ॥९॥
सर्वस्वें सांडोनि धरिला तुम्ही देव । येणें पुसिला ठाव संसारींचा ॥१०॥
आमची कणव न वाटेचि कांहीं । विनविते राजाई नामदेवा ॥११॥
||६९||
घरधनि याणीं केला गुरु । बाई मी आतां काय करूं ।
असोनि नाहींसा संसारू । चमत्कार कृपेचा ॥१॥
धांवे पावे गे मेसाई । येथें कोणाचें न चाले कांहीं ।
सत्यपण तुझे ठायीं । तरी हें नाहिसें करी गे ॥२॥
मंत्र घेतला जैसा । घरीं संताचा वोळसा ।
वोस पडो हरिदासा । गेले नमत मागुते ॥३॥
काय सांगों याची रीती । सोसे सोसे पाये चरणाप्रती ।
अवघे भांबडभूत होती । नाचताती आनंद ॥४॥
लौकिकांत गेलीं वायां । एकाच्या एक पडती पायां ।
म्हणती ये गा पंढरिराया । ब्रह्मानंदें डुल्लतां ॥५॥
भोळी सासू गोणाबाई । पांढरा स्फटिक व्याली पाही ।
त्यानें जोडिल शेषशायी । काय राजाई करूं म्हणे ॥६॥
||७०||
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥
अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥
वस्त्र पात्र नाहीं खाया जेवयासी । नाचे अहर्निशीं निर्लज्जसा ॥३॥
चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं । हिंडती दारोदारीं अन्नासाठीं ॥४॥
बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा । नामयाची राजा भली नव्हे ॥५॥
||७१||
सावध सावध राजाई हो सुखें । नामयानें दुःख निरसिलें ॥१॥
संसार सांतें या येऊनि भाग्याचा । छंद विठ्ठलाचा लागला यासी ॥२॥
याचें नाम ऐसें न दिसे त्रिभुवनीं । नायकों दुजें कर्णीं नाम्या ऐसें ॥३॥
वैष्णवांचे गजर टाळघोष दिंडी । उभयतां ब्रह्मांडीं घोष गेला ॥४॥
तयाच्या दर्शनें कलिमाजीं तारिलीं । भाग्यें विनटलीं विठठलेंसी ॥५॥
राजाई म्हणे माते रखुमाई बुद्धिवंते । आमुच्या अदृष्टातें लिहिलें कैसें ॥६॥
||७२||
परियेसी रुक्माई जैसा बैसला पाटीं । दैन्य पैं न सोडी काय करूं ॥१॥
सदैवाच्या स्त्रिया अलंकारमंडित । मजवरी नाहीं प्रीत काय करूं ॥२॥
दरिद्रें विश्रांति घातली वो कैसी । सांगो कोणपाशीं माउलिये ॥३॥
एकी दिव्य वस्त्रें नेसल्या परिकरा । मज खंडें जर्जर मिळालेसें ॥४॥
मोडकें खोंपट वारा येतो भराभराट । बहु होती कष्ट कोणा सांगों ॥५॥
कैंची कुसुमसेज कैंचे पटकुळ । फाटकी वाकळ अंथरूणा ॥६॥
कन्या आणि पुत्र जाली उपवरी । अजोनि न धरी घर प्राणनाय ॥७॥
जनलोकांमाजीं केलें येणें हासें । म्हणती लागलें पिसें नामयासी ॥८॥
जन्मीं न देखे उपाय येणें केले अपाये । कोणा सांगो माये सुखदुःख ॥९॥
आमुच्या वडिलां शस्त्र सुई आणि कातरी । हा बाण आणि सुरी वागवितसे ॥१०॥
एकांतें भाकिलें रुदना करि त्याची नारी । वाहियेली सुरी नागनाथीं ॥११॥
लज्जेचा हा गांव सांडियेला येणें । शिकवावें कोणें माउलिये ॥१२॥
संसाराचा येणें सांडिला पसारा । कणव स्त्री बाळा न ये कैसी ॥१३॥
नसतां विठोबा नसतां पंढरी । तरी हा सुखें घरीं नांदतां कीं ॥१४॥
होणार होऊन गेले शिकवूं आतां काई । विनविते राजाई रखुमाईसी ॥१५॥
||७३||
शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ॥१॥
जन्मोनियां आमुची पुरविली पाठी । मोडिली राहाटी संसाराची ॥२॥
आतां आम्ही काय करणें माउलिये । बैसूं सावलिये कवणाचिये ॥३॥
माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा । श्रण जी वेगळा न करी त्यासी ॥४॥
आमुचा वेव्हार विध्वंसिला पाहींज । करुणा माझी कांहीं न ये त्यासी ॥५॥
सकळाचें मूळ आपणा आधीन । केलें येणें जाणें पांडुरंगें ॥६॥
आपुलें परावें मोहो हा सांडिला । आंगोठा मोडिला उपाधीचा ॥७॥
उघडें घरदार लौकिक वेव्हार । धरिला निर्धार याचे नामीं ॥८॥
रात्रंदिवस जपे गोविंद ह्रदयीं । आमुची चिंता कांहीं नलगे त्यासी ॥९॥
तुमचे सन्निधानें जालों आम्ही दीन । न वाटे विर्वाण कैसें तुम्हां ॥१०॥
संसाराचि व्यथा नेणवे सर्वथा । होय तें उचिता करणें आम्हां ॥११॥
धरी निरंतर एकचि उत्तर । परि ह तुम्ही विचार काय केलाअ ॥१२॥
अनुभव अनुभवीं जाणें तुम्हीं समर्थपणें । सदासुखीं म्हणे नामीं तुझ्या ॥१३॥
जन्मोनि अवघी तुमचीं पोसणीं । नेणो तुम्हांवांचोनि कोणी दुजें ॥१४॥
कायावाचामनें तुमचिये पाईं । विनविते राजाई जिवलगा ॥१५॥
||७४||
अंगोळिये विठा कडियेसी नारा । राजाई पंढरपुरा चालियेली ॥१॥
भिवरा संपूर्ण जातसे भरयेली । राजाई बोलली कैसें जालें ॥२॥
एकली मी बाळें काय करूं आतां । आहा पंढरिनाथा काय केलें ॥३॥
एक बांधिलें पाठीसी दुजें बांधिलें पोटासी । वेणुनादापाशीं वाहावत गेली ॥४॥
हंबरडा हाणोनि बोभाये नामया । आवर्तीं पडोनियां तळास गेली ॥५॥
योगनिद्रा सारोनि देव जागा जाला । त्वरित पावला काढिलीं तिघें ॥६॥
नारा विठा दोघे कडियेसी घेतले । राजाईस धरिलें दक्षिण करीं ॥७॥
आणिलीं महाद्वारा पुढें दे लेकुरां । विठोबा सामोरा नामा आला ॥८॥
बाबा बाबा म्हणोनि नारा धाविन्नला । नामा त्या बोलिला परतें होई ॥९॥
देखोनि राजाईसी गहिंवरू पैं आला । अरे बा विठ्ठला काय केलें ॥१०॥
बाळेसहित विख घेईन मी आतां । पाहे पंढरिनाथा बुडवीन घर ॥११॥
मेला सर्प होतां तो ओटिये घेतला । खांडोनि घातला डेर्यामाजीं ॥१२॥
खालीं ज्वाळ घाली उकळी फुटली । पोटासी धरिलीं दोघें बाळें ॥१३॥
देह विठोबासी समर्पण करूं । ऐसा पैं निर्धारू धरियेला ॥१४॥
रुक्मिणी म्हणे देवा अनर्थ मांडिला । नामा बाहेर गेला निश्चयेंसी ॥१५॥
डेरा उघ्डोनि राजाई जंवा पाहे । तोंडभरीं भरलाहे अवघें सोनें ॥१६॥
राजाईनें धरिले नामयाचे चरण । कृपादृष्टीं पाहणें आम्हांकडे ॥१७॥
विठ्ठल विठ्ठल ऐसें बोलियेला । निवांत राहिला घटका चारी ॥१८॥
कांपत कांपत महाद्वारीं आला । तुझी माव विठ्ठला नकळे कांहीं ॥१९॥
अष्ट दिशा देवा वरूता आणि खालुता । तुजविण सर्वथा ठाव नाहीं ॥२०॥
तंव नामदेव निजला देखिला । अंतरीं उठिला विठ्ठल ध्वनी ॥२१॥
राजाई म्हणे प्रयत्न न चले तेथें आतां । प्रार्थूं पंढरिनाथा बहुतांपरी ॥२२॥
राजाईनें धरिले विठोबाचे पाय । कृपादृष्टिं पाहे आम्हांकडे ॥२३॥
||७५||
नामदेव घरीं पाहुणे मेहुणे । आले दोघेजण पंढरिसी ॥१॥
राजाईनें बंधु देखुनि दृष्टिसी । उल्हास मानसीं थोर जाला ॥२॥
कडकडूनि भेटि लोभाची आवडी । टाकली घोंगडी बैसावया ॥३॥
भ्रतार लागले विठोबाचे ध्यानीं । संसाराची मनीं आस्थ नाहीं ॥४॥
नाचतो निर्जज्ज होऊनि निःशंक । सांडिला लौकिक देहभाव ॥५॥
ऐसें जंव सांगे राजाई बंधुसी । तंव आले घरासी नामदेव ॥६॥
तयासी सोयरे अभ्युत्थान देती । न भेटे तयासी विष्णुदास ॥७॥
देखुनी कांतेसी क्रोध आला फार । असोनि संसार नाहीं आम्हां ॥८॥
अगडधूत येती घेऊनि टाळविणा । लागे त्यांचे चरणा वेळोवेळां ॥९॥
जन्मामध्यें आले माझे सहोदर । न बोले उत्तर त्यांसी कांहीं ॥१०॥
भोंदु घरीं येती हरिनामें गर्जती । धुवुनि त्यांचें पिती पायावणी ॥११॥
माझे सखे बंधु घरा आले बाई । रामराम तोहि न घे त्यांचा ॥१२॥
नामा म्हणे कांते राम ह्रदयांत । सांठवुनी तृप्त जालों आम्ही ॥१३॥
||७६||
राजाई तें पुसे अहो नामयाला । करा जेवायला कांहीं यासीं ॥१॥
प्रातःकाळीं घरीं सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥
नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति । भोजन निश्चिती करुं नये ॥३॥
उदईक हरिदिनीं उपवास जागरण । ऐकावें कीर्तन चार प्रहर ॥४॥
द्वादशीं पारणें जालिया भोजन । ऐकोनी पाहुणे चिंतातुर ॥५॥
क्षुधातुर पोटीं निद्रा नलगे कांहीं । वर्षाएवढी पाही रात्र जाली ॥६॥
||७७||
ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बापें दिधलें ऐशियासी ॥१॥
खाया ना जेवाया लेया ना नेसाया । दैन्य भोगावया आलें जन्मा ॥२॥
जयाचि करीं भक्ति त्याचेंचि करणें । घरोघरीं हिंडणें न चुके माझें ॥३॥
लाज सांडुनियां निलाजरा जाला । सूड पडसूड मारिला जोग ज्याणें ॥४॥
देवासुरींज वाहिली तेचि दैना आली । उचितें राहिलीं तैंहूनि ॥५॥
ऐसी भक्तकांता मनीं वाहे चिंता । काय जाला करिता पंढरिराव ॥६॥
वेष वाणियाचा सवें बैल द्वयाचा । म्हणे नामा आमुचा केउतां गेला ॥७॥
बिदीं उभा राहिला घर पुसों लागला । म्हणे नामा राहिला कोणें ठायीं ॥८॥
सांगितलें बिराड तुळसीवन अपार । तेंचि जाणा घर नामयाचें ॥९॥
बाहेर तरी कोणी वैसलासे द्वारीं । बोलविली नारी नामयाची ॥१०॥
अहो घ्यहो बाई हे ठेवावी गोणी । नामा येतो परतोनी येईन मी ॥११॥
येरी म्हणे तुम्ही त्याचें काय जाणा । आपुली नाम खुणा सांगा तुम्ही ॥१२॥
नाम पुसेल तरी केशवशेटी सांगावें । लागेल तितुकें वेचावें हें द्रव्य ॥१३॥
आणिक मज मागावें कांहीं न ठेवावें । माझें क्षेम सांगावें सखा म्हणोनि ॥१४॥
इतुकें बोलुनि देव पाठमोरा जाला । सवेंचि घरा आला विष्णुदास ॥१५॥
म्हणे कैंची गोणी टाकुन गेला वाणी । परि आम्हीं कोणी ओळखूं ना ॥१६॥
त्यानें नांव केशवशेटी म्हणितलें । तंव येरें जाणिलें माझा देव ॥१७॥
कां गे धांवा केला देव माझा कष्टला । अपराध जाला तुजपाशीं ॥१८॥
राजाई म्हणे आम्हां थोर लाभ जाला । बिडवई भेटला केशवशेठी ॥१९॥
||७८||
वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥
इतक्यामध्यें होन मडकेंभर काढिले । गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥
द्विज मेळवुनि आला नामदेव । वांटियेलें सर्व द्र्व्य त्यानें ॥३॥
नामा म्हणे द्वव्य ज्याचेंज त्या दिधलें । ऋण तें ठेविलें नाहीं कांहीं ॥४॥
राजाई ते होन राखावया गेली । हातां राख आली कोळशांची ॥५॥
कोळसे देखोनि खोंचियली मनीं । धन्य तुझी करणी पांडुरंगा ॥६॥
नामदेवापुढें सांगे वर्तमान । चोरून म्यां होन ठेविले होते ॥७॥
पाहातां होनांचे जाले हो कोळसे । नामा पाहतां ते जाले सोनें ॥८॥
वांटिले ब्राह्मणां ते होन तयानें । फेडियेलें ऋण गोविंदाचें ॥९॥
||७९||
नामा म्हणे स्त्रिये अनुचित केलें । कां माझ्या शिणविलें विठोबाशी ॥१॥
निंदेच्याअ उत्तरीं निषेधिलें मज । वाटली त्या लाज मायबापा ॥२॥
मग तो माझा स्वामी जाला वेषधारी । तुजलागीं सुंदरी पुढारला ॥३॥
रत्नजडित मुगुट सत्वर फेडोनि । आलासे वेढोनी शुभ्र शेला ॥४॥
तेणें भारें त्याचा धवधगिला मस्तक । म्हणोनि मज शोक वाटतसे ॥५॥
कस्तुरी मळवट सुरेख पुसोनि । आलासे लावूनि विभुति भाळीं ॥६॥
रूद्राक्षाचे मणि लेऊनि कर्णपुटीं । कुंडलें गोमटीं लपविलीं ॥७॥
कौस्तुभ वैजयंति काढिली परती । बांधलेंसे प्रीतिं शिवलिंग ॥८॥
देखूनि रखुमाईस वाटलें उदास । हंसती उपहास केले त्याचे ॥९॥
रमा शरणागतें आलिंगिलीं बाहीं । कैसी गोणी तिहीं कवळिली ॥१०॥
सर्वांगीं साजिरी चंदनाची उटी । भ्रंशली गोमटी श्रमु जाला ॥११॥
सोनसळापटा फेडोनि गोमटा । नेसला धुवटा वोटधारी ॥१२॥
इंद्रनीळ तनु रूळली असेल रजें । श्रीमुख रवितेजें कोमाइलें ॥१३॥
धन्य तुझे नयन देखिले श्रीचरण । परी जीवें निंबलोण नाहीं केलें ॥१४॥
द्रव्याचेनि लोभें भ्रांत जालें मन । हातींचें निधान हारपलें ॥१५॥
आतां आदिअंतीं पाहतां केवळ । मूळा आणि फळ दुःखरूप ॥१६॥
जाणोनि निवृत्ति धरिली सज्जनीं । सांडिलें निर्वाणीं वमन जैसें ॥१७॥
जाणसी तें करीं आपुलें तूं हित । म्यां ठेविलें चित्त त्याचे पायीं ॥१८॥
नामा म्हणे केशव न पाहे निर्वाण । माझा अभिमान आहे त्यासी ॥१९॥
||८०||
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥
मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा । अपराध क्षमा करा माझा ॥२॥
अंतरींची खूण कांहीं सांगा मज । जें तुम्ही ह्रदयीं बीज धरूनि असां ॥३॥
जेणें सुखें तुमचें चित्त निरंतर । आनंदें निर्भर सदा असां ॥४॥
इच्छा तृष्णा देहीं मानवली कल्पना । सदा समाधाना इंद्रियासी ॥५॥
मायबापें मज दिधलें तुमच्या हातीं । जन्मोनि सांगाति लावियेलें ॥६॥
देव द्विज गुरु साक्ष हे करुनी । स्वामीचे चरणीं जोडियलें ॥७॥
तुमची चित्तवृत्ति उदास देखोनी । पडिलें चिंतावनीं काय करूं ॥८॥
मग तुमचा स्वामी कृपेचा कोंवळा । न धरत पातला अनाथबंधु ॥९॥
मग त्या विश्वंभरें कृपेच्या सागरें । पुसिली आदरें तुमची गोष्टी ॥१०॥
तंव मी दुराचारें निर्भत्सिलें तुम्हां । ऐकोनि मेघःश्यामा करुणा आली ॥११॥
तंव तो जगज्जीवन बोले अमृतवाणी । लोटोनियां गोणी दाखंटा ॥१२॥
म्हणोनि हें द्रव्य तुम्ही सर्वहि वेंचावें । आणिक मागावें लागेल तें ॥१३॥
सद्गदित कंठें सांगितलें तुम्हां । परि न कळे मज महिमा दैवहीना ॥१४॥
लोभाचा वोरसु कोणिये जन्मींचा । नकळे तुमचा ऋणानुबंधु ॥१५॥
पाहतां श्रीमुख निवालें माझें चित्त । मग हे मनोरथ विसरले ॥१६॥
क्षण एक आनंद जाला माझे जिवीं । उपमा कवणे द्यावी तया सुखा ॥१७॥
आतां ये संसारीं मीच धन्य जगीं । जें तुम्हां अर्धांगीं विनटले ॥१८॥
परि मला एक वेळ घाला विठोबाचे पायीं । विनविते राजाई नामदेवा ॥१९॥
||८१||
युक्तायुक्त ज्ञान वैराग्यसाधन । महातपोधन वरद योग्य ॥१॥
आनंदाचा ओघ भक्तीचा सोहळा । हरि वेळोवेळां जपत वाचे ॥२॥
नित्य हें पूजन करी नामदेव । विठ्ठलीं हा भाव ठेवूनियां ॥३॥
नामयाची कांता क्रोधयुक्त बोले । भजन सोहळे तुम्हां गोड ॥४॥
परी हा नावडे संसाराचा संग । अखंड पांडुरंग चिंतितसां ॥५॥
तुमची हे गति लेकुरें नेणती । धान्य नाहीं नित्य भक्षावया ॥६॥
ऐसा हा वेव्हार तुमचा जी स्वामी । आतां पुसेन मी पांडुरंगा ॥७॥
माझिया संसारा घातलेंसे पाणी । नाचतो रंगणीं विठ्ठलाच्या ॥८॥
ऐसें देव तुझें अघटित मत । म्हणोनि रडत देवापुढें ॥९॥
देव म्हणे नाम्या अंगिकार इचा । करुनि देवाचा होईं सुखी ॥१०॥
नामा म्हणे देवा ऐका जी वचना । उबग कोण्या गुणें आला असे ॥११॥
राहो हे पंढरी सुखें नांद देवा । मज नाहीं हेव उणें कांहीं ॥१२॥
तुझिया कृपेचा अंकित मी होये । तुजविण आहे मज कोण ॥१३॥
माझिया संसारा पाडियेलें पाणी । काय आहे वाणी गति कोण ॥१४॥
ऐसें असुनियां उबग केशवा । माझ्या आला दैवा कोण्या गुणें ॥१५॥
जन्मापासोनियां सेवेसी लाविलें । निःसंतान केलें पांडुरंगा ॥१६॥
आतां मजलागीं लावियतां उद्वेगा । अगा पांडुरंगा मायबापा ॥१७॥
आतां मज म्हणसी संसार करावा । काय मी केशवा करुं आतां ॥१८॥
देवा ऐसी युक्ति उगा राहे आतां । समर्था केशिनाथा देवराया ॥१९॥
मागुनि अंतरीं विचार पैं केला । चित्तीं पैं सांचला क्रोध फार ॥२०॥
म्हणोनियां आतां विठो सुखें राहें । मुख तुज पाहे दाखविना ॥२१॥
देवाने चरण पहावयासाठीं । संसाराची तुटी करावया ॥२२॥
ऐसें मी करीन जाण विठ्ठोराया । पंढरिचे ठाया मोडवीन ॥२३॥
राहें नामीं आतां जाईन दूर देशा । भक्तीची हे आशा सोडोनियां ॥२४॥
जाईल भिंवरा जाईल पुंडलिक । जाईल सकळिक महिमा तुझी ॥२५॥
ऐसें बा विठ्ठला त्वां दुखविलें मज । सोडिना सहज पंढरितें ॥२६॥
उदास हें चित्त माझें जालें देवा । जाईन केशवा मायबापा ॥२७॥
आतां असों द्यावा लोभ हाचि देवा । समर्था केशवा मायबापा ॥२८॥
आपुल्या सांगातें नेईन पंढरी । नेईन संत नगरीं भीवराजन ॥२९॥
नेईन सांगातेंज महिमा येथिंची । मागें हेत हाचि धरुनि राहे ॥३०॥
चक्रतीर्थ आणि पद्माळें हें जाण । सर्वहि करीन आपणासी ॥३१॥
आपणचि तीर्थ आपणचि व्रत । आपण दीनानाथ होईन मी ॥३२॥
येथें हे पंढरी होती ऐसें लोक । म्हणतील देख पुढें देवा ॥३३॥
बोलोनियां ऐसें पुढें चाले नामा । मग आला प्रेमा पांडुरंगा ॥३४॥
पळतां पळतां नाटोपे जाणा । मागें देवराणा धांवतसे ॥३५॥
धांवतां धांवतां भागला केशव । उभा राहे तंव हात कटीं ॥३६॥
जें कां पंढरपूर वस्तीचें असणें । धरियेलें तेणें ठाणें पांडुरंगें ॥३७॥
तंव तो पळत लोळणीं घातली । त्या क्षणीं न बोले देवाशीं जो ॥३८॥
देव म्हणे नाम्या पाहे परतोन । तुज मी शरण आलों असे ॥३९॥
न करी उदास चाल तूं पंढरी । ऐसें बोले हरि नामयासी ॥४०॥
तंव नामा म्हणे ऐसें मी करीन । पंढरी नेईन भिवरें सहित ॥४१॥
मोडीन महिमा तीर्थींचा केशवा । कळे तुज तेव्हां भक्त ऐसा ॥४२॥
मग म्हणे विठ्ठल पुंडलिकासाठीं । चाल उठाउठीं पंढरिसी ॥४३॥
पितृभक्त पाहीं तोचि पुंडलिक । ऐसा भाव देख जाणिवेचा ॥४४॥
मग धरुनि मनगटीं चालविला नामा । मोठा आला प्रेमा विठोबासी ॥४५॥
ऐसें हें आख्यान सारुनियां देवें । मग आले भावें पंढरिसी ॥४६॥
||८२||
उठले निवृति संतांच्या दरुशना । पंढरीचा प्रेमा घरा आला ॥१॥
केली प्रदक्षिणा वंदिले चरण । जाला अभिमान नामयासी ॥२॥
देवाचे जवळी आम्ही निरंतर । यासी अधिकार नमस्कारा ॥३॥
नित्य समागम हरिच्या चरणीं । हे आणि आम्हीं देवभक्त ॥४॥
नामा म्हणे कांये वंदू यांचे चरण । अंगें परब्रह्म मजपाशीं ॥५॥
||८३||
आले ते सोपान वंदिले या पायीं । पांडुरंगा ठायीं मानियेला ॥१॥
रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार । संतामाया थोर अनाथांची ॥२॥
आमुचे मायबाप भेटलेति आज । समाधान सहज आलिंगितां ॥३॥
नामा म्हणे मज कळलें याचें प्रेम । देव केले श्रम काय गुणें ॥४॥
||८४||
अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥
मान अपमान वाढविसी हेवा । दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ । आंधळे पां डोळे कां बा जाले ॥३॥
कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥
घरीं कामधेनु ताक मागूं जाय । ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥
म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा । आधीं अभिमाना दूर करा ॥६॥
||८५||
जालासी हरिभक्त तरी आम्हां काय । आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥
घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥
गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष । होशिल मुमुक्षु साधक तूं ॥३॥
आत्मतत्त्वीं दृष्टी नाहींच पां केली । तंववरी ब्रह्मबोली बोलुनि काय ॥४॥
तुझें जरी रूप तुवां नाहीं ओळखिलें । अहंतेतें धरिलें कासयासी ॥५॥
आमुचें तूं मूळ जरी पुसतोसी । तुझें तूं अपेशी पाहुनि घेई ॥६॥
ऐक रे नामयाअ होई आत्मनिष्ठ । तरीच तूं श्रेष्ठ ज्ञानी म्हणे ॥७॥
||८६||
बोलोनियां येणें वाढविला डांगोरा । अंतरींचा केरा गुरुविण ॥१॥
संतांचा सन्मान कळेना जयासी । राहुनि देवापाशीं काय केलें ॥२॥
परिसा झांकण घातलें खापर । नाहींज जाले अंतर बावनकस ॥३॥
खदिरांगारीं श्रृंगारी हिलाल । अंतरींचें काळें गेलें नाहीं ॥४॥
म्हणे मुक्ताबाई अभिमानें नेलें । सर्पा पाजियेलें विष तेंचि ॥५॥
||८७||
अमृत टाकुन कांजीची आवडी । साजेना झोपडी काय त्याला ॥१॥
खरासी अखंड गंगेचें हो स्नान । गेलें वायांविण जिणें त्याचें ॥२॥
पोवळयापरिस दिसती रानगुंजा । श्रृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥
आनारा परिस चोखट इंद्रावन । चवी कडुपण हीन त्याचें ॥४॥
रंगाची बाहुली दिसती साजिरी । बेगडाचे परी नग ल्याली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई पुरे तें दर्शन । गुरुविण संतपण आहे कोठें ॥६॥
||८८||
उंसाचे सेजारीं येरंडाचें झाड । नाहीं त्याचा पाड गोडी आली ॥१॥
कर्पुरासी जाला दीपाचा शेजार । काय गुणें सार राहिल त्याचा ॥२॥
सागरीं लवण टाकिलें नेऊन । काय गुण खडेपण उरलें त्याचें ॥३॥
तैसा नामदेव विठोबाच्या जागा । काय गुणें या गा कोरेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चंदनाचें झाड । अहंतासर्प वेढे गुंडाळिले ॥५॥
||८९||
संत पाहुणेरा सज्जनाचे घरीं । पूजा करितां वरी डोईं काढी ॥१॥
करितां सन्मान अंगीं भरे ताठा । देवा पैं करंटा असुनी काय ॥२॥
अहंता हा खुंट वाढविला चित्तीं । न साहे संगती सज्जनाची ॥३॥
पंढरीचें भूषण सांगतो जनांसी । नाहीं या मनासी तीळ बोध ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणीअ । भजावा सज्जनीं नामदेव ॥५॥
||९०||
चौदाशें वरुषें शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥
नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासि दोष लावियेला ॥२॥
स्वहिताचें कारण पडियेलेंज जेव्हां । शरण आला तेव्हाम आळंकापुरीं ॥३॥
गैनीनाथें गुज दिलें निवृत्तीला । निवृत्तीचा जाला ज्ञानदेव ॥४॥
ज्ञानदेवें बीज वाढविलें जनीं । तेंचि आम्हीं तुम्हीं संपादिलें ॥५॥
म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकीं ठसा । नामदेव ऐसा राहिला कां ॥६॥
||९१||
निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥
आपुलेंज स्वहित करावें आपण । संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥
धन्य हो ते नर राहाती पंढरीं । श्वान त्यांचे घरीं सुखें व्हावें ॥३॥
नामदेवा संगें देवाचा हो वोढा । प्रेमें केला वेडा पांडुरंग ॥४॥
निवृत्ति म्हणे त्यासी न म्हणे आरे तुरे । बाई ठेवितां बरें डोई माते ॥५॥
म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणां दर्शन नलगे त्याचें ॥६॥
||९२||
कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची ॥१॥
मेणाची पुतळी घेतां करीं बरी । अग्निचे शेजारीं राहे कैशी ॥२॥
तैसा अधिरासी काय संतसंग । मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥
तें आजि नवल देखियेलें डोळां । दगड जैसा जळां वेगळेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई जाऊं देऊं नये । ऐसें सरिसें काय भांडें करा ॥५॥
||९३||
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥
हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥
तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ । नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥
राखावें तें ब्रीद करावें पावन । धान बोलावणें गोरोबाला ॥४॥
म्हणे मुक्ताबाई भाजलें कीं कोरें । काकाचें उत्तर सत्य मानूं ॥५॥
||९४||
गोरा जुनाट पैं जुनें । हातीं थापटणें अनुभवाचें ॥१॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं । वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥
सोहं शब्द विरक्ति डवरली आंतरीं । पाहातां आंबरी अनुभव ॥३॥
म्हणे मुक्ताबाई घालूं द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥४॥
||९५||
मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें ॥१॥
जरी पितांबरें नेसविलीं नभा । चैतन्याचा गाभा नीलबिंदू ॥२॥
तळीपरि पसरली शून्याकार जाली । सर्पाचिये पिली नाचूं लागे ॥३॥
कडकडोनि वीज निमाली ठायिंचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥
ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट । ओळखिलें अविट आपुलेंपण ॥५॥
||९६||
निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥
सद्गुरुप्रसादें बोधिली नेटकी । गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥
दंड चक्राकार बांधिली चौकुन । आंत संतजन करिती वासा ॥३॥
ऐसे गुंफेमध्यें नाहीं नामदेव । म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥
गैनीची मिरास घेतला प्रमाण । पूर्वभूमि जतन करित आस ॥५॥
निवृत्तिदेव म्हणे मुक्ताईच्या उत्तरें । भाजलें कीं कोरें कळों येईल ॥६॥
||९७||
परस्परें गुह्य करिती भाषण । म्हणती महाधन गांवा आला ॥१॥
रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥
प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणें । दीप त्रिभुवनीं एक जाला ॥३॥
निवृत्तिदेव म्हणे कुलालाचें चक्र । अंतर बाहेर एक ऐसें जालें ॥४॥
||९८||
हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे ॥१॥
तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥
मुक्तिकेचे पाराखी तुम्ही आहां देवा । भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥
आनंदें डुल्लती करावरी कर । नेणों राहिलें कोरें कोण्या गुणें ॥४॥
निर्गुणापासोनी सगुणाची संगती । नाहीं स्वरूपस्थिति अंगा आली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई हेरोनियां हेरा । हिरा किंवा गारा नेणों बापा ॥६॥
||९९||
जोहारियाचे पुढें मांडियेलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥
तैसें थापटणें पारखियाचा हात । वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥
प्रथम थापटणें निवृत्तीच्या माथा । डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥
तेंचि थापटणें ज्ञानेश्वरावर । आतां कैंचें कोरें उरे येथें ॥४॥
तेंचि थापटणें सोपानाचे डोईं । यांत लेश नाहीं कोरें कोठें ॥५॥
तेंचि थापटणें मुक्ताबाईला हाणी । अमृत संजिवनी उतूं आली ॥६॥
तेंचि थापटणें नामदेवावर । डोई चोळूं मोहरे रडों लागे ॥७॥
गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई । सुन्नेभरि नाहीं भाजियेला ॥८॥
||१००||
संतसमागम फळला रे मला । सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥
अतीथि आदर केला मुक्ताबाई । लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥
देवानें गोंधळ घातला गरुडपारीं । भिजली पितांबरी अश्रुपातीं ॥३॥
माझें माझें म्हणोनि गाईलेंज गार्हाणें । कळलें संतपण हेंचि तुमचें ॥
भरी भरोनियां आलों तुम्हांज जवळी । कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥
नामा म्हणे सन्मान पावलों भरून । करितां गमन बरें दिसे ॥६॥
||१०१|||
उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥
वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी ॥२॥
जाले चाळाचूळ मनांत चंचळ । युगा ऐसें पळ वाटतसे ॥३॥
नामा म्हणे जावें पळोनियां आतां । संतसंग होतां भाजतील ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा केर । ब्रह्म अग्नीवर चेतवावा ॥५॥
||१०२||
अंतर बाहेर भाजूं आम्ही कुंभ । भरू निरालंब सगळेची ॥१॥
अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी । नेत्रद्वारें फुंकुनी जाळ करूं ॥२॥
जीवित्व काढुनि शिव घडूं अंगा । प्रिय पांडुरंग आवडेला ॥३॥
म्हणे मुक्ताबाई पळायाचें पाही । आसन स्थिर नाहीं नामयाचें ॥४॥
||१०३||
न पुसतां संतां निघालाअ तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥
मागें पुढें पाहे पळत तांतडी । आला उठाउठी पंढरिसी ॥२॥
कळवळोनि कंठी धरिली विठल मूर्ती । नको देऊं हातीं निवृत्तीच्या ॥३॥
ज्ञानदेव सोपान बोलाविला गोरा । जुनाट म्हातारा जाळूं आला ॥४॥
मुक्ताईनें तेथें माजविली कळी । हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥
नामा म्हणे देव आणिलें पूर्व दैवें । गेलों असतों जीवें सगळाची ॥६॥
||१०४||
पूर्वीं तुझी कांहीं केली होती सेवा । उपयोगा देवा आली आजी ॥१॥
अनंता जन्मींचें फळलें अनुष्ठान । पाहिले चरण विठो तुझे ॥२॥
न जाणों माझ्या येतील पाठोपाठीं । घालतील मोठी भीड तुज ॥३॥
त्यासी द्याल तुम्ही अगत्य उदारा । मातें कां न मारा आपुले हातें ॥४॥
नामा म्हणे तुझे न सोडी चरण । युगायुगींज धरणें घेतलें असे ॥५॥
||१०५||
हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥
परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥
भणंगाचे घरां नित्यची राजपट । सांगसी अचाट ब्रीद त्यांचें ॥३॥
कैकाडयाचे वानी करिती गुडगुड । मजाला हें गूढ उमजेना ॥४॥
नामा म्हणे गाती प्रकाशाचें गाणें । आम्हां अघोरवाणें दिसतसे ॥५॥
||१०६||
म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥
रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥
काय गुणें देव रिझाला त्यावरी । नेसाया फटकुरीं जन्म गेला ॥३॥
पाहोन दरिद्र जालोंज कासाविस । केवळ परीस ते पांढरेच ॥४॥
लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी । केले देशोधडीं महान संत ॥५॥
सगळेंची काखेसी घेई ब्रह्मांड । नामाअ म्हणे पाखांड दिसतें मज ॥६॥
||१०७||
पांचा सातांचा आहे येक जागां मेळा । देताती कवळा येकयेकां ॥१॥
करू पाहातां मज जिताची विटंबना । म्हाणोनी नारायेणा पळोनी आलों ॥२॥
पाहिला तयाचा मानस आदर । जमा केला केर जाळावयाअ ॥३॥
त्यांच्या धाकें मागें आलों रे अनंता । येत तुझ्या चित्ता बरें त्यांचें ॥४॥
नामा म्हणे जीवें आलों वांचवोनी । अझुनि तरी चक्रपाणि वांचवी मज ॥५॥
||१०८||
आहे त्यांचे मनीं करावें आगमन । घेतील मागुन तुजपाशीं ॥१॥
त्यावेळीं तुम्ही व्हाल जी बेभान । द्याल जी काढोन संतापासीं ॥२॥
खादल्या जेविल्याचें राखावें स्मरण । तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥
चालविला लळा पुरविली आवडा । आतां कां दगडा जड जालों ॥४॥
कां माझी चिंता सांडिली अनंता । संताहातीं देतां हरुष वाटे ॥५॥
नामा म्हणे काये करिसी अमंगळ । अडचणी राउळामाजीं जाली ॥६॥
||१०९||
वटारोनि डोळे पाहती आकाश । मज त्याचा भासा कळों नेदी ॥१॥
भाजा भाजा म्हणोनि उठली एकसरांज । मग म्यां बाहेरां गमन केलें ॥२॥
आतां यांजवरी द्याल त्यांचे हातीं । होऊं पाहाती माती जीवित्वाची ॥३॥
अभयाचें दान द्यावें बा श्रीहरी । दुर्बळ बाहेरी घालूं नये ॥४॥
समर्था लांच्छान लागतें नांवाचें । न जाणों देवाचें असेल कांहीं ॥५॥
नामा म्हणे नांव पतितपावन । तेया बोला उणें आणूं नये ॥६॥
||११०||
संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं ॥१॥
नाहीं वेडया संतांचा अंगवळा । झोंप बैसली डोळां अज्ञानाची ॥२॥
भ्रांतीनें तुझी पुरविली पाठी । सज्जनाच्या गोष्टी कडू जाल्या ॥३॥
हाता आला लाभ गमाविला सारा । भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥
मोह सर्पें तुझें व्यापियेलें अंग । म्हणे पांडुरंग काय आतां ॥५॥
||१११||
श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन ।
होवोनि दीनाचें अति दीन । सद्गुरूसी शरन रिघावें ॥१॥
जोडल्या सद्गुरुकृपालेश । मग सर्वत्र माझाचि प्रकाश ।
तुज मज भेदाचा भासज । तो निरसोन जाईल ॥२॥
नामा म्हणे तुजसी । पावावया सेविजे सद्गुरूसी ।
तो तूं रोकडा जोडिलासी । आतां सद्गुरुसी काय काम ॥३॥
फळ तरूवर शिखरींज । म्हणोनि आरोहण कीजे त्यावरी ।
तें फळ अवचिता जोडिलें करीं । मग तयावरी कासया चढावें ॥४॥
मगा श्रीहरी म्हणे अज्ञान । सांडून सेविजे गुरुचरण ।
तुझ्या प्रेमें माया सोंग धरून । लटिका तुजपाशीं मी खेळें ॥५॥
जंव सद्गुरूचें नाहीं सेवन । तंव मी जैसें स्वप्नीचें धन ।
माझें न तुटे भवबंधन । सद्गुरुआज्ञेवांचूनी ॥६॥
तेणें नामा सद्गदित जाला । विठोबाच्या चरणीं लागला ।
कोण गुरु पाहिजे केला । तें सांगिजे स्वामिया ॥७॥
मग श्रीविठ्ठल म्हणे ऐक आतां । सांगेन सद्गुरुची वार्ता ।
त्वां पाहोनि तत्त्वतां । शरण तात्काळ रिघावें ॥८॥
भक्तीचें नेणें लक्षण । कृपामंद दयाहीन ।
इतरांचे अवगुण । अखंड मुखीं जल्पती ॥९॥
मी एक जाणता सर्वांठायीं । सर्व शिकविलें म्यांचि पाही ।
ऐसें बोलती जनप्रवाही । महंतीलागीं ॥१०॥
देखिलिया सज्जन । त्यासी करी सन्मान ।
सभा देखोनियां छळण । करी करवी तयाचें ॥११॥
लांडें लटिकें गद्य पद्य । पुसोनी होती श्लघ्य ।
नेणें तरी हांसोनि निंद्य । बोलती ह्मा गुरूसी ॥१२॥
तो जरी सांगे खरें । त्यासी बोलती बरें बरें ।
सभाजनांसी नेत्रद्वारें । अशुद्धता दाविती ॥१३॥
आपण न सांगती आपुलें गुज । पुढल्यासी म्हणती नकळे तुज ।
ऐसें संदेह करणीचें मोज । वाटे तया ॥१४॥
शिष्य करितां उल्हासती । शिष्य होई म्हणोनि उपदेशिती ।
नानापरी बोधिती । सेवेलागीं ॥१५॥
शिष्य करिती बहुवसा । त्यांच्या सेवेची करिती आस ।
जो न भजे त्यास । शिव्याशाप देताती ॥१६॥
तंत्र मंत्र उपदेशिती । ध्यान आसनीं गोविती ।
देवा ब्राह्मणा न भजती । आचारभ्रष्ट जे ॥१७॥
धातु विद्येची धरिती गोडी । जारणमारणाची अति आवडी ।
विषयवासनेची हुंडी । अखंड जीवीं ॥१८॥
ज्ञान गर्वाचा महिमा बरवा । श्रीगुरु ऐशा अखंड भावा ।
शिष्यसमुदाय देखोनि गर्वा । थोरीवेचा मानिती ॥१९॥
असो बहु ऐसें कथान । परी सद्गुरु कृपाधन ।
त्याचें ऐक महिमान । सावध चित्तें ॥२०॥
ज्यासी गुरूत्वाचे नाहीं काज । शिष्य भजतां वाटे लाज ।
उदास वृत्ति सहज । निर्मळ भोळा ॥२१॥
निंदा स्तुति समान । बोलती भेदिती कठिण वचन ।
कधीं न होती क्रोधायमान । कवणाहीवरी ॥२२॥
जे नेणती खरें खोटें । समान वाटे सान मोठें ।
सुखदुःखाचे चपेटे । न शिवती कदाकाळीं ॥२३॥
शिष्य करितां आळस चित्तीं । केलिया सर्वस्व निरोपिती ।
कांहीं थोरीव नाहींच चितीं । महत्त्वाची ॥२४॥
सज्जन देखोनी आनंदती । त्याचे गुणागुण न विचारिती ।
जीवें भावें इच्छिती । साधुसंग ॥२५॥
आपुला कष्टवुनी देहो । ज्ञान कर्काचा कलहो ।
साधुसेवेचा मनीं लाहो । करी सदा ॥२६॥
जे आंत बाहेरी भरोनी उरले । अंतरीं निवोन विरालें ।
परब्रह्मीं सहजाविले । नेणोंज काय ॥२७॥
ऐसें साधुचें महिमान । साधतां कैचें उरेल मन ।
कल्पा अवधीं करितां कथन । नव्हे पूर्ण पूर्णता ॥२८॥
ऐसा साधु भेटेल तुज । तरी मीच होवोनि पावसी मजा ।
जाईल सर्व संदेह आज । आपेंआप नाम्या ॥२९॥
मग नामदेव म्हणे देवा । ऐसा साधु भेटेल जेव्हां ।
तरी कैशापरी सेवावा । कृपानिधी तो ॥३०॥
मगा बोलिले श्रीरंग । दैवत बुद्धीचा होईल त्याग ।
तना मन अर्पोन चांग । शुद्ध सेवा करावी ॥३१॥
तर्क वितर्क बाह्ममुद्रा । तेथें न चले गा भक्तनरेंद्रा ।
तारीं तारीं या भवसमुद्रां । म्हणोनि शरण रिघावें ॥३२॥
ते अंतर्बाह्य व्यापक । जाणतां सर्व लीला कवतुक ।
जैसे त्यासी देखती देख । तैसे तयासी आज्ञापिती ॥३३॥
भाग्यें जरी जोडती त्याचे चरण । तरी वर्तणूक आहे कठीण ।
तें तुज सांगतों गुप्त खूण । सावधान ऐक पां ॥३४॥
शरीर वेंचिलें तरी वेंचिजे । परी सद्गुरुवचन नुल्लंघिजे ।
रात्रंदिवस राहिजे । आज्ञा संकेतीं ॥३५॥
ज्यावरी गुरुची प्रीति । त्याची अनन्य भावें कीजें भक्ती ।
आज्ञेवांचोनि कल्पांतीं । विरोध कोणासी न करावा ॥३६॥
कां जरी तो सर्वांतरीं आहे । विरोध कोणाचा न साहे ।
विशेष सद्गुरु जरी होये । तरी खेद न कीजे ॥३७॥
अरे विरोधभाव असतां । तें चढे सद्गुरुच्या माथा ।
जैसा घटभंग होतां । अमृत सांडे ॥३८॥
ज्याशीं सद्गुरूची कृपा असे । त्यासि मानावें आम्ही ऐसें ।
सर्वस्व जातां मानसें । न करिजे अंतर ॥३९॥
देखे त्याचे ह्रदयांतरीं । सद्गुरु वसे निरंतरीं ।
त्यासि खेद होतां भारी । अंतरे सद्गुरु ॥४०॥
क्रोध ह्रदयीं भरला । तो आत्मस्थितीसी अंतरलाअ ।
तोच गुरूचाअ घात केला । शिष्याहातीं ॥४१॥
गुरुशिष्य तोचि निजबंधु । त्यासि स्वप्नीं न कीजे विरोधु ।
करितां घडे गुरुवधु । शास्त्रवाक्य ॥४२॥
तरी गा कार्याकारणें । बोलिजे तेंची घडावें वर्तणें ।
एक होतां कोपायमानें । एक समाधान त्यास द्यावें ॥४३॥
जो आपुल्या गुरूची स्तुती करी । त्याचे चरणा वंदावे शिरीं ।
निंदा बोलतीये अवसरीं । निघिजे तेथोनी ॥४४॥
गुरूसमीप न बैसिजे । गुरूसी वचना न बोलिजे ।
आज्ञा मागोनी वंदिजे । कार्याकाराणें ॥४५॥
देशीं आहे सद्गुरु । तिकडे कीजे नमस्कारू ।
चंद्रकारणें चकोरू । तैसा भेटी इच्छिजे ॥४६॥
गुरूसी अर्पिजे तन मन । गुरूसी अर्पिजे वित्त धन ।
गुरूसी अर्पिजे चैतन्य । आनंदरूप ॥४७॥
गुरुचे दोष गुण । मनें न कीजे उच्चारण ।
जें जें गुरूचें आज्ञापन । मेरू ऐसें मानिजे ॥४८॥
सज्जनाची संगती धरिजे । गुरूरूप विश्व मानिजे ।
चित्तानुसार अर्पिजे । साधुजनांसी ॥४९॥
ज्यासि सद्गुरु कोपला । तो साधु असतां खर वागाला ।
ईश्वर जरी साह्म जाला । तरी काढों न शके ॥५०॥
सद्गुरु आधीन सकळ देव । गुरु आधीन पितर मानव ।
सद्गुरु पूजितां सर्व । आनंदातें पावती ॥५१॥
ऐसें सद्गुरुचें महिमान । म्हणोनि ब्रह्म त्या आधीन ।
तो जरी पतितासी देईल मान । तरी ब्रह्मपूर्ण तो होय ॥५२॥
ऐसें जेणें आचारावें । तरी सद्गुरूसी शरण जावें ।
नाहीं तरी करावें । नामस्मरण माझें पैं ॥५३॥
तेणेंकरून कांहीं एक । निवारूं शकेल जन्मदुःख ।
कोणें एक जन्मीं सद्गुरु देख । भक्ति करोनि पाविजे ॥५४॥
चढाओढी ग्रुरु करिती । मग सुबुद्धिहि टाकिती ।
त्यासी यमाघरीं प्राप्ति । खरत्वाची ॥५५॥
सद्गुरुसेवा तें मोक्षपद । सद्गुरुसेवा तें आनंदपद ।
सद्गुरुसेवा तो ब्रह्मावबोध । कैवल्यप्राप्ती ॥५६॥
असो ऐसिया परी । जो सद्गुरु वाक्य वाहे शिरीं ।
तोचि ब्रह्मविद्येचा अधिकारी । हरिहरां वंद्य तो ॥५७॥
ऐसें नामदेवाप्रति श्रीहरी । स्नेह साक्षेपें निरूपण करी ।
ऐकोनियां चराणावरी । सद्गदित होउनि लोटला ॥५८॥
देवा तूं होवोनि माझी दिवटी । गुरुनिधान दाखवी दृष्टी ।
जेणें करूनी भवबंध गांठी । सुटेल सर्वथा ॥५९॥
मग कळवळोनी श्रीहरी । नामदेवातें पोटासी धरी ।
जाय पावशील झडकरी । हस्त विसा खेचराचा ॥६०॥
तेणे नाम्यासी समाधान । देवही जाला सुखासंपन्न ।
नामा पावोनी ब्रह्मज्ञान । मिळशील माझ्य़ा स्वरूपीं ॥६१॥
ऐसें हें देवभक्त निरूपण । प्रथम शिष्यासी करवी श्रवण ।
मग दीजे पूर्णपण । म्हणे नामा ॥६२॥
||११२||
देव आणि नामा उभे भीमातीरा । प्रेमें येरयेरा आळविती ॥१॥
देव म्हणे नाम्या ऐकें गुह्य गोष्टी । संसाराची तुटी जेणें होये ॥२॥
श्रीगुरुवांचुनी मुक्ति तुज नाहीं । भवनदी डोहीं नुतरसी ॥३॥
शरण गुरुसी जालिया सप्रेमें । संसाराचा श्रम उतरेल ॥४॥
गुरुवांचुनियां कैंचा मुक्तिठाव । संसारा हा वाव कैसा होय ॥५॥
म्हणूनि नाम्या तुवां गुरुसि जावें शरण । तेणें भवबंधनें मुक्त होती ॥६॥
ऐसें ऐकोनियां नामा थरारिला । मूर्च्छागता जाला भूमीवरी ॥७॥
भूमि लोळे नामा कंठ सद्गदित । डोळियां स्त्रवत अश्रुजळ ॥८॥
इतुकें देखोनियां द्रवला पुरुषोत्तम । नाम्यासी सप्रेमें उचलिलें ॥९॥
नाम्या तुज काय वाटतसे दुःख । संसाराचें सुख तुज जालें ॥१०॥
नामा म्हणे देवा तुज ऐसा दाता । मज भवव्यथा कवणेपरी ।११॥
||११३||
अनाथांचा नाथ तुझी ब्रीदावली । मज कांरे जाळी भावव्यथा ॥१॥
देव म्हणे नाम्या गुरुवांचुनियां । मुक्ति पावावया आन नाहीं ॥२॥
आना नेणें कांहीं करिसी वित्पत्ती । नव्हे माझी प्राप्ती गुरुविण ॥३॥
जाई नाम्या जाई गुरूसी शरण । तुटे भवबंधन तुझें वेगीं ॥४॥
नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊं । कोणा मी होऊं शरणागत ॥५॥
||११४||
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥
इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥
चिंताग्रस्त नामा आला आंवढयासी । पुढें देऊळासी देखियेलें ॥३॥
नामा तये काळीं गेला देऊळासीं । देउळीं कौतुकासी देखियेलें ॥४॥
||११५||
देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि ॥१॥
देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणें ॥२॥
उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ॥३॥
विसोबा खेचर बोले नामदेवाअ । उठविले जिवा कांरे माझ्या ॥४॥
देवाविण ठाव रिता कोठें आहे । विचारुनि पाहे नामदेवा ॥५॥
जेथें देव नसे तेथें माझे पाय । ठेवीं पां अन्वय विचारुनी ॥६॥
नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव । कोठें रिता ठाव न देखेची ॥७॥
||११६||
इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव ॥१॥
तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी । आनंदें कोंडोनि राहियेला ॥२॥
श्रीगुरुचे पाय जीवें न विसंबत । मनोवृत्तिसहित ओंवाळिलें ॥३॥
डोळियांचे डोळे उघडिलें जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥४॥
जन्ममरणांचें तोडिले सांकडें । कैवल्यचि पुढें दावियेलें ॥५॥
कैवल्याचा गाभा विटेवरी उभा । दिसे दिव्या शोभा पांडुरंग ॥६॥
नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । कृपेची साउली केली मज ॥७॥
||११७||
सर्वा कालीं परमात्मा आहे सर्व देशीं । भावना हे अहर्निशीं दृढ धरी ॥१॥
संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जाये तेथें तेथें लोटांगणीं ॥२॥
चिंताअ न करी नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥३॥
||११८||
खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा ॥१॥
नामा तेथें आला देव नमस्कारिला । देखोन बोलला वचन त्यासी ॥२॥
लिंगावरोनि चरण काढाजी वहिले । दिसतां वरी भले करणीं न कळे ॥३॥
तंव येरू बोलिला नाम्या तूं भला । मज नाहीं कळला देव तुझा ॥४॥
जेथें नाहीं देव तेथें ठेवी पाव । सर्वज्ञ सदैव तूंची अससी ॥५॥
मीपणें भुललों मज नकळेची कांहीं । देव नसे ते ठायीं पाय ठेवीं ॥६॥
तंव नामा होय विचारिता शब्दांची कुसरी । पाहतां निर्धारीं सान नोहे ॥७॥
देवाविण ठाव हें बोलणेंची वाव । परतोनि संदेह पडला मज ॥८॥
आपुलें उमाणें आपण उमगावें । मजसी तारावें भवसागरीं ॥९॥
नामा धरी चरण अगाध तुमचें ज्ञान । आपुलें नाम कोण सांगा स्वामी ॥१०॥
येरु म्हणे खेचर विसा पैं जाण । लौकिका मिरविणें अरे नाम्या ॥११॥
नाम आणि रूप दोन्ही जया नाहीं । तोचि देव पाही येर मिथ्या ॥१२॥
जळ स्थळ आणि काष्ट हे पाषाण । पिंड ब्रह्मांड व्यापुन अपुरेणु। ॥१३॥
सर्वत्र साक्षभूत हें जाणोनि पाहो । खेचर म्हणे नाम्यातें अवघा देवो ॥१४॥
||११९||
नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥
भुका कागा मरसी जेथिंचा तेथें । केशवराज तूतें आतुडेना ॥२॥
नाहीं दया ध्यान ईश्वरीं भजन । वायांविण प्राण कां करितीसी ॥३॥
हरिभक्तिविण जन्मालासी नरू । म्हणे विसोबा खेचरू अरे नाम्या ॥४॥
||१२०||
तुझें निजसुख तुजपाशीं आहे । विचारूनि पाहे मनामाजीं ॥१॥
विवेक वैराग्य शोधुनियां पाहे । तेणें तुज होय ब्रह्मप्राप्ती ॥२॥
ज्ञानाचा प्रकार सहजची जाला । अहंभाव गेला गळोनियां ॥३॥
खेचर विसा म्हणे जेथें ओंकार निमाला । सहजचि जाला ब्रह्ममूर्ती ॥४॥
||१२१||
जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥
जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥
खेचर साह्यानें मीं कांहीं नेणें । जीवा या जीव इतुलें मी जाणें ॥३॥
||१२२||
मेघेंविण जळ कीं जळेंविण पूर । नख न बुडे परी नाहीं उतार ॥१॥
येथें आहे तो बुडे नाहीं तरे । लटिक्याचे खरें मानिसी काई ॥२॥
म्हणे खेचर विसा तूं जालासी पिसा । दृश्याची हे आशा सांडी नाम्या ॥३॥
||१२३||
सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक ॥१॥
आशापाश याही वासना पोखी । विठ्ठलनामा शेखीं घेऊनी राहे ॥२॥
न लगती सायास करणें काया क्लेश । आपण वैकुंठ येईल सवें ॥३॥
नाठवी संसार नाठवी देहभाव । रोहिणीची माव नकळे काय ॥४॥
कुल्लाळकुसरीं भ्रमत चक्र । आयुष्या आवर्त मापा करीं ॥५॥
खेचर विसा म्हणे येथुनी काढिलें । तें तुज दिधलें जा रे नाम्या ॥६॥
||१२४||
भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपूर चंद्रभागा ॥१॥
तारूं पंढरिनाथ मोलेंविण उतरितु । उगला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥
बुडतयाचें भय नाहीं संसारीं । कलिमाजीं पंढरी नाव थोर ॥३॥
राव रंक दोन्हीं बैसवुनी वरी । उतरी पैलतीरीं भरंवसेनी ॥४॥
आठराही आवले जे नावेसि लागले । साही खण भरले मिरवताती ॥५॥
चौमुखीं वर्णितां नकळे याचा पार । वेदां अगोचर सहस्त्रमुखा ॥५॥
सडियातें कांसे लावित आपण । कुटुंबिये जाण नावेवारी ॥७॥
प्रेमाचे पेटे बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पैलपारु ॥८॥
आप आंगें उघाडी बुडत्यातें कडे काढी । ऐसे लक्षकोडी तारियले ॥९॥
सहस्त्र नाम पेटे बांधे मज मोटींज । तरी जगजेठी लावी कांसे ॥१०॥
आदि करोनी सर्वही तारिले । उतरूनि तारिले पैलतिरीं ॥११॥
ऐसे पक्षी कीट गुल्मल तारिले । खेचरा विसा म्हणे तारी मातें पुंडलिक ॥१२॥
||१२५||
श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा ॥१॥
खेचरु विसा प्रेमाचा पिसा । तेणें नामा कैसा उपदेशिला ॥२॥
तया सांगितलें गुज । आतां पाल्हाळीं तुज काय चाड ॥३॥
मग खेचरू म्हणे मज ज्ञान हेंचि गुरु । तेणें ओगचरु म्हणे केला नामा ॥४॥
||१२६||
सुखालागें मन तुझें गिवसित तळमळी । परि सुख आहे जवळी नकळे तुज ॥१॥
दर्पणीं दीप्ति कीं दुग्धीं घृतशक्ति । परि करणीविण हातीं न लभेची जाण ॥२॥
सुखालागीं सुखसोय दाखवीत पाहे । अनुभवोनी होय सुखरूप ॥३॥
सुख तें शांति सुख तें दया क्षमी । सुख तें उपदेश मी निर्विकारी ॥४॥
सुख तें नैराश्य सुख हरिदास्य । सुख तें विश्वास सदा वसे ॥५॥
सुख तें सत्संगतीं सुख तें नामीं प्रीति । सुख तें विकृति विषयभोगीं ॥६॥
सुख तें एकांतवास सुख तें लौकिक त्रास । सुख तें सौरस स्वस्वरूपीं ॥७॥
म्हणे खेचर विसा परियेसी विष्णुदासा । न घडे भरंवसा तरी अनुभवणें ॥८॥
||१२७||
भक्ति त्रिविधा षड्विध नवविधा । यजन याजनें जीवातें दंडिताती सदा ॥१॥
केशव परमात्मा नेणोनि याजी पतितें । पतनीं पडतां होती भूतें रया ॥२॥
नाहीं रूप स्थिति नाहीं शब्दस्थिति । नित्य तया वस्ती निरंजनीं ॥३॥
एकलें परब्रह्म गुरुमुखें जावावें । तरि चुकवावें पुनरावृत्ति रया ॥४॥
ऐसें रे नामया वचन ऐक पुढें । हे तो देवाविषयीं श्रुतीचे निवाडे ॥५॥
श्रुती नेती परतोनि आलिया । खेचर पुढें सांगे नामया ॥६॥
||१२८||
आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं ।
कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥
तुज पाठीं कवण धांवे । कवण टाकी कवण पावे ।
कामक्रोधें जग मोहावें । कासयासी खोवावें पोटीं पाय ॥२॥
माया मोहजाळ तुटेल । पळेल पां काळ व्याळ ।
कां रे स्मरसी ना गोपाळ । मिथ्या ब्याकुळ कांजेविण ॥३॥
बैराग्य दृढ होई निरुता । कासया भितोसी चपेटघाता ।
परस्त्री तितुकी मानी माता । विषयीं निमित्या आल्यासाठीं ॥४॥
धर्माचेनी मार्गें निघाला कर्ण । शिबी चक्रवर्ती जाला जीवित्वहीन ।
तयामाजीं सांग नाडला कोण । लटकी झकवण कां बोलती ॥५॥
इंद्रिया गोड तें आरोगिजे । मग धनीवरी धावा पोखरिजे ।
काय सांगूं शहाणपण तुझें । खेचर विसा म्हणे अरे नामया ॥६॥
||१२९||
पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥१॥
अच्युत श्रीहरी केशव नरहरी । माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥
नामाचें साधन करशील पूर्ण । तें प्रपंचाचें भान उरों नेदी ॥३॥
उदासीन वृत्ति आचरावें कर्म । नाहीं देहधर्म गुण माया ॥४॥
ऐसा हा अनकळित मार्ग साधेल तुज । खेचर विसा गुज सांगे नाम्या ॥५॥
||१३०||
आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥
आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥
जिताची मरण आलेंसें हातां । मरण बोलतां लाज नये ॥३॥
खेचर विसा म्हणे आम्हां मरण नाहीं । कैसें मरण पाही आलें नाम्या ॥४॥
||१३१||
मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं ॥१॥
आम्हां मरण नाहीं मेलें होतें काई । श्रीगुरुच्या पायीं राहे मना ॥२॥
मरणें हें काया मरणें हें माया । मरे हे छाया कवण्या गुणें ॥३॥
भक्ति अमरकंदु रामनाम वंदूं । नामयासी छंदू विठोबाचा ॥४॥
||१३२||
नामा स्वयेंपाक करुं बैसला । केशव श्वानरूपें आला ।
रोटी घेऊनि पळाला । सर्वांभूतीं केशव ॥१॥
हातीं घेऊनि तुपाची वाटी । नामा लागला श्वानापाठीं ।
तूप घे गा जगजेठी । कोरडी रोटी कां खाशी ॥२॥
तंव श्वान हांसोनी बोलिले । नामया तुज कैसें कळलें ।
येरू म्हणे खेचरें उपदेशिलें । सर्वांभूतीं विठठल ॥३॥
||१३३||
सद्गुरुनायकें पूर्ण कृपा केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्म नाहीं येणें ऐसें केलें ॥३॥
नामा म्हणे निकीज दावियेली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥
||१३४||
पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥
दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥
दगडाचा देव इच्छा पुरवीत । तरि कां भंगत आघातानें ॥३॥
पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणें ॥४॥
प्रस्तराचा देव बोलत भक्तांतें । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥५॥
ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती । आणिज म्हणविती तेणें भक्त ॥६॥
परंतु ने नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥७॥
धोंडा घडोणियां देव त्याचा केला । आदरें पूजिला वर्षें बहु ॥८॥
तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवें ह्र्दयीं विचारा हें ॥९॥
धोंडापाण्याविण नाहीं देव कोठें । होतां सान मोठें तीर्थ क्षेत्र ॥१०॥
बाराशीचे गांवीं जाहला उपदेश । देवाविण ओस स्थळ नाहीं ॥११॥
तो देव नामया ह्रदयीं दाविला । खेचरानें केला उपकारु हा ॥१२॥
||१३५||
कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया ॥१॥
आतां मज भय नाहीं पैं कोणाचें । जन्ममरणाचें दुःख गेलें ॥२॥
बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी ॥३॥
नामा म्हणे माझें सर्वही साधन । खेचर चरण न विसंबे ॥४॥
||१३६||
भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें ॥१॥
अनुभव भात लयालक्ष कढी । जेवणारा गोडी घेत असे ॥२॥
सुखशांति शाखा भावर्थ हा वडा । जेवणार गाढा आत्माराम ॥३॥
दया क्षीरधारी शांती पूर्णपोळी । घृत हें कल्होळी प्रेम माझें ॥४॥
विषयाचा गुरळा थुंकोनी सांडिला । नामा आंचवला संसारासी ॥५॥
||१३७||
स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥
तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥
डोळियांचीं बुबुळें फुटोनियां जाती । न संडी वासना हालवितो पातीं ॥३॥
ढोराचें पुच्छ मोडोनियं चांगा । पुढती पुढती हालविती पैं गा ॥४॥
वोढाळ ढोरा बांधियेलें काष्ट । पुढती पुढती धरी तीच वाट ॥५॥
नामा म्हणे माझी मुळीं वासनाच खोटी । खेचर विसा चरणीं घातलिले मिठी ॥६॥
||१३८||
सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी । धन्य तो अंतरीं सर्वकाळ ॥१॥
स्वर्गादि पाताळ सर्व पूर्ण जळें । चातका न मिळे मेघाविण ॥२॥
नारायय्न पूर्ण सर्वभूतां ठायीं । अभाग्यासी नाहीं तिहीं लोकीं ॥३॥
नामा म्हणे गुरुकृपेचें अंजन । पायाळासी धन दिसें जैसें ॥४
||१३९||
सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥
सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥
वाचे उपरम मन जालें तन्मय । लागलासे लय पर लक्षीं ॥३॥
शांति क्षमा दया देती आलिंगन । चित्त समाधान पावविलें ॥४॥
परतलिया दृष्टी इंद्रियांच्या वृत्ती । पावली विश्रांति ठाईंच्या ठाईं ॥५॥
विष्णुदास नामा निजबोधें निवाला । खेचरें दिधला अभयकर ॥६॥
||१४०||
सद्गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित ॥१॥
डोळियाचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥२॥
जन्ममरणाचें फेडिलें सांकडें । कैवल्यचि पुढें दाखविलें ॥३॥
मोहरले तरु पुष्पफळभारें । तेचि निर्विकार सनकादिक ॥४॥
नामा म्हणे स्वामी खेचर माउली । कृपेची साउली केली मज ॥५॥
||१४१||
वेदांसी न कळे शास्त्रें पैं भांडती । श्रुति विवादती ब्रह्मालागीं ॥१॥
आवघेचि कर्मामुक्त उपदेश धर्म । हारपती पैं कर्में गुरुसेवा ॥२॥
सेवेपरतें साधन नाहीं पैं उपदेश । हरीसि सौरस आपेंआप ॥३॥
नामा म्हणे हरि गुरु आज्ञा काम । भजन निष्काम गुरुसेवा ॥४॥
||१४२||
उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥
सांडोनि मीपणास सद्गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥
तयाचें जें कांहीं सर्व मज वोझें । नाहीं मज दुजें त्यासि कांहीं ॥३॥
तयाचे ह्रदयीं संतपण प्रगटे । द्वैतपण तुटे क्षणामाजीं ॥४॥
नामा म्हणे आम्हां विठोबाचे बोल । सांपडली वोल तरावया ॥५॥
||१४३||
सुखाचा सद्गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला ॥१॥
विठ्ठल पहातां मावळलें मन । ध्यानीं भरले नयन तन्मय जालें ॥२॥
मी माझें होतें तें मजमाजि निमालें । जळें जळ गिळिलें जयापरी ॥३॥
तेथें आनंदीं आनंदु वोळला परमानंदु । नाम्या जाला बोधु विठ्ठलनामें ॥४॥
||१४४||
नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥
सद्गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥
माया देऊनियां ब्रह्म घ्यावें हातीं । ऐशा गुरूप्रति कां भजाना ॥३॥
नामा म्हणे गुरूपायीं लाभ आहे । मोक्ष तोही पाहे दास होतो ॥४॥
||१४५||
चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला ॥१॥
तेणें माझ्या चित्ता बहु जाले क्लेश । व्यर्थ म्यां आयुष्य गमाविलें ॥२॥
जाऊनि राऊळा विठोसी विनविलें । वाल्मिकानें केलें रामायण ॥३॥
असेन मी खरा तुझा भक्त देवा । सिद्धीस हा न्यावा पण माझा ॥४॥
शतकोटी तुझे करीन अभंग । म्हणे पांडुरंग ऐक नाम्या ॥५॥
तये वेळीं होती आयुष्याची वृद्धि । आतांची अवधि थोडी असे ॥६॥
नामा म्हणे जरी न होतां संपूर्ण । जिव्हा उतरीन तुज पुढें ॥७॥
||१४६||
निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥
सारजेसी सांगे भीमातीरीं हरी । बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥
लाडकें लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविण कोण आहे ॥३॥
मजवरी त्याचें बहु असे ऋण । होईन उत्तीर्ण एवढयानें ॥४॥
नामा म्हणे हातीं बांधोनियां वह्या । बैसे लिहावया पांडुरंग ॥५॥
||१४७||
अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥
अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥
सहा साडेतीन चरण जाणावेअ । अक्षरें मोजावीं चौकचारी ॥३॥
पहिल्यापासोनि तिसर्यापर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥४॥
चौकचारी आधीं बोलिलों मातृका । बाविसावी संख्या शेवटील ॥५॥
दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्षु विचार बोध केला ॥६॥
नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरीं आज्ञा केली ॥७॥
||१४८||
खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥
आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥
साठ लक्ष संख्या चौर्यांसी कोटि । त्यांत मी कवडी सोडूं काय ॥३॥
आणिक याहून असेल वेगळें । घेईन तें बळें जाण आतां ॥४॥
तुझें थोरपण ऐक हें देवा । दुर्बळाचा ठेवा अभिलाषी ॥५॥
म्हणूनि पोरटा नामा खेचराचा । काया मनें वाचा सत्य करी ॥६॥
||१४९||
ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥
देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥
ऐसें बोलोनियां हातें लोटी धोंटी धोंडा । तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥
देवें मज दिलें तुम्ही कां मागतां । अलंकार आतां घडीन मी ॥४॥
नामा म्हणे धन ज्याचें त्यासी द्यावें । आपुलें तें घ्यावें आपणची ॥५॥
||१५०||
वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥
कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥
विषयाचें गरळ पाजिसी केवळ । ह्रदया कोवळें कैसें तुझें ॥३॥
नामा म्हणे मज आदिअंतीं एकु । जननी आणि जनकु पांडुरंग ॥४॥