sant-namdev-gatha-atmasvarup-stiti
sant-namdev-gatha-atmasvarupastatus
|| संत नामदेव ||
||१.||
सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥४॥
||२.||
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥
||३.||
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
ह्रदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडजुढी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥
||४||
दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं । एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रम्हा होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥३॥
||५.||
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं म्हणती आम्ही । सांगसी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥
||६.||
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । म्हणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥
संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥
नामरूपा आदि दळियेलें सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥
नवल हा देव बैसला दळणीं । नाहीं केली जनी नामयाची ॥४॥
||७.||
भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥
बापें बोधिलें बापें बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥
निजध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरूपीं देखिलां बाईयांनो ॥३॥
नामयाची जनी स्वयंबोध झाला । अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥
||८.||
संतमाहनुभाव येती दिंगबर । नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥
निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं । सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥
पाहतां हा कोण दावितां हा कोण । पाहतां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥
नामयाची जनी वस्तु झाली । अवध्यांसी बुडालि परब्रम्हीं ॥४॥
||९.||
त्या वैष्णवांच्या माता । तो नेणे देवताता ॥१॥
तिहीं कर्में हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीसें केलें ॥२॥
कानाचा हो कान । झालें धरूनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा हो डोळा । करुनी झालें प्रेम सोहळा ॥४॥
तोही वसे नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥
||१०.||
देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥
तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाहीं आलें ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥३॥
तेथें सर्वांग सुखी झालें । लिंगदेह विस्रलें ॥४॥
त्या एकी एक होता । दासी जनी नाहीं आतां ॥५॥
||११.||
जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥
आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी । ब्रम्हानंद गिळिला पोटीं ॥३॥
एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ॥४॥
ऐसी सद्रुरुची करणी । दासी जनी विठ्ठल चरणीं ॥५॥
||१२.||
बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रम्हीं झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढें ओंकाराची रेख । तूर्य़ा म्हणावें तिसी ॥१॥
माया महतत्त्वाचें सुभर । तीन पांचाचा प्रकार ।
पुढें पंचविसांचा भार । गणती केली छत्तीसीं ॥२॥
बारा सोळा एकविस हजार । आणीक सहाशांचा उबार ।
माप चालें सोहंकार । ओळखिले बावन्न मात्नेसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं । चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वांशी अंतरीं । राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ॥५॥
एक बीजाचा अंकूर । होय वृक्षाशीं विस्तार ।
शाखापत्रें फळ फुलभार । बीजापोटीं सामावे ॥६॥
कांतीण तंतूशीं काढून । वरी क्रोडी करिती जाण ।
शेवटीं तंतूशीं गिळून । एकटी राहे आपैसी ॥७॥
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आनीतां मना ।
कनकीं नगाच्या भूषणा । अनुभव वाटे जीवासीं ॥८॥
नामदेवाच्या प्रतापांत । शिरीं विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात । पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥
||१३.||
नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख ॥१॥
लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥
एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥३॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥
सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥
नामयाची जनी निर्गुणीं बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥
||१४.||
शब्दाचें ब्रम्हा लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥
स्वयें सुखें धाला आपणातें विसरला । तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली । परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥
||१५.||
अखंडित ध्यानीं । पांडुरंग जपे वाणी ॥१॥
पांडुरंग नाम जपे । हेंचि माझें महा तप ॥२॥
ऐसें आलें प्रत्ययासी । सहज तेणें तत्त्वमसी ॥३॥
पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥४॥
संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥
||१६.||
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथें । देवाणिणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई । भरूनि उरलें अंतरबाही ॥४॥
||१७.||
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥
तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्ठल उभा आहे ॥४॥
||१८.||
जनी द्दष्टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥
||१९.||
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥
ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥
पूर्णपदीं जो स्थापिला । जनीं म्हणे धन्य झाला ॥३॥
||२०.||
नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरूपाचा पूर । आला आसे नेत्नावर ॥२॥
स्वरूपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥
||२१.||
गगन सर्वत्र तत्वता । त्यसी चिखल लावूं जातां ॥१॥
तैसा जाण पांडूरंग । भोग भोगुनी नि:संग ॥२॥
सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥३॥
जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथें कैंचें धरिसी ध्यान । दासी जनी ब्रम्हा पूर्ण ॥५॥
||२२.||
काळाचिये लेख । नाहीं ब्रम्हाविष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे । तोहीन सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ॥३॥
महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकलीं बापुडीं । दासी जनी । विठ्ठल जोडी ॥५॥
||२३.||
रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥१॥
शामवर्ण तें गोलाट । निळबिंदु औट पीट ॥२॥
वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ॥३॥
नव द्वारातें भेदुनी । दशमद्वारीं गेली जनी ॥४॥
||२४.||
शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥१॥
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अध:शून्य ॥२॥
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण । मध्य शून्य शामवर्ण ॥३॥
मह शून्य वर्ण नीळ । त्यांत स्वरूप केवळ ॥४॥
अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥
||२५.||
ज्योत पहा झमकली । काय सांगूं त्याची बोली ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
परापश्यंती मध्यना । वैखरेची झाली सीमा ॥३॥
चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥४॥
ज्योत परब्रम्हीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥५॥
||२६.||
ज्योत परब्रम्हीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥
ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रदयभूवना ॥२॥
हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रदय अंतरीं ॥३॥
हदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥४॥
||२७.||
नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरूपाची खाणी ॥१॥
स्वरूप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥
गोचर करिताती जाणा । द्दष्टि दिसे निरंजना ॥३॥
नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥
||२८.||
माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥
देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥
मूळ नेलें हें क्रोधाचें । ठाणें केलें विवेकाचें ॥३॥
निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥४॥