अभंग,संत कान्होपात्रा-


दीन पतित अन्यायी ।
शरण आले विठाबाई ।। १ ।।
मी तो आहे यातीहीन ।
न कळे काही आचरण ।। २ ।।
मज अधिकार नाही ।
शरण आले विठाबाई ।। ३ ।।
ठाव देई चरणापाशी |
तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।


sant-kanhopatra-abhang


वर्म वैरियाचे हाती ।
देऊ नको श्रीपती ।।१।।
तू तो अनाथाचा नाथ ।
दीन दयाळ कृपावंत ।।२।।
वेद पुराणे गर्जती ।
साही शास्त्रे विवादती ।।३।।
चरणी ब्रिद वागविसी ।
तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।



जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ।
सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ।। १ ।।
आला अपवाद याती संबंध लौकिक पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही || २ ||
दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ॥३॥
शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।४।।



माझे माहेर पंढरी ।
सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
येथे आहे मायबाप ।
हरे ताप दरुशने ।।२।।
निवारिली तळमळ चिंता ।
गेली व्यथा अंतरीची ।।३।।
केशी विटेवरी शोभली ।
पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।


नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।१।।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ।। २ ।।
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ।।३।।
मोकलोनी आस जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ।।४।।



घ्या रे घ्या मुखी नाम ।
अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
माझा आहे भोळा बाप ।
घेतो ताप हरोनि ।।२।।
आपुलिया नामासाठी ।
धावे संकटी लवलाहे ।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव ।
कान्होपात्रेचा माधव ।।४।।



योग याग तपे करिता भागली ।
तीच ही माऊली विटेवरी ।।१।।
न येई ध्यानी साधिता साधनी ।
भक्तासी निर्वाणी धावतसे ।।२।।
चारी वेद साही शास्त्रे शिणली ।
कान्होपात्रा लाधली प्रेमसुखे ।।३।।



आलंकापुरी पुण्यठाव ।
तेथ समाधी ज्ञानदेव ।।१।।
पांडुरंगें दीधला वर ।
भेटी निर्धार कृष्णपक्षीं ।।२।।
नित्य स्नानालागीं जाणा ।
भागीरथी दिधली ज्ञाना ।।३।।
सरस्वती मणिकर्णिका ।
त्रिसंगमीं वाहती देखा ।।४।।
येथें स्नान करितां ।
वास वैकुंठीं तत्त्वतां ।। ५ ।।
ऐसे देव सांगता ।
कान्होपात्रा आनंदता ।।६।।



शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही ।
सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥
धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया ।
धन्य ज्ञानदेव सोपान सखया ।।२।।
प्रत्यक्ष पैठणीं भटां दाविली प्रचिती ।
रेडियाचे मुखें वदविली वेदश्रुती ||३||
चौदाशे वरुषचे तप्ती तीर रहिवाशी ।
गर्व हरविला चालविले भिंतीशी ।।४।।
धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची ।
भेटी झाली ज्ञानदेवाची ह्मणुनिया ।। ५ ।।


१०

सकळही सुरवर येथेंची लाधले ।
देवचें देखिले चरणांबुज ।। १ ।।
हरली ती भूक तहान निमाली ।
संतांची देखिलीं चरणांबुजें ।।२।।
किर्तनाचे रंगी आनंदें नाचतां ।
कान्होपात्र चित्ता समाधान ।।३।।


११


अगावैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ।।१।।
अगानारायणा ।
अगा वसुदेवनंदना ।।२।।
अगापुंडलीक वरदा ।
अगा विष्णु तूं गोविंदा ।।३।।
अगारखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आतां ।।४।।


१२


पतित तूं पावना ।
म्हणविसी नारायणा ।। १ ।।
तरी सांभाळीं वचना ।
ब्रीद वागविसी जाणा ।। २ ।।
याती शुद्ध नाही भाव।
दुष्ट आचरण स्वभाव ।।३।।
मुखीं नाम नाहीं ।
कान्होपात्रा शरण पायी ।।४।।


१३


माझ्या जीवींचे जीवन ।
तो विठ्ठल निधान ।।१।।
उभा असे विठेवरी ।
वांटी प्रेमाची सीदोरी ।।२।।
आलीयाची धनी ।
निवारितो चक्रपाणी ।।३।।
भेटा दयेच्या सागरा ।
विनवितसे कान्होपात्रा ।।४।।


१४


अंबऋषीसाठी ।
जन्म घेतलें जगजेठी ।। १ ।।
वागदी भक्तांचा आभार ।
ऋणी झाला निरंतर ।। २ ।।
अर्जुनाचे रथीं बैसे ।
त्याचे घोडे धुतसे ।।३।।
लाज सांडी ऋषीकेषी ।
कान्होपात्रा तुझी दासी ।।४।।


१५

ज्यांचे घेतां मुखीं नाम ।
धाकीं पडे काळ यम ।।१।।
ऐशी नामाची थोरी ।
उद्धारिले दुराचारी ।। २ ।।
नष्ट गणिका आजामेळा ।
वाल्मिकी झाला तो सोज्वळ ।। ३ ।।
ऐशी नाम माळा ।
कान्होपात्रा ल्याली गळा।।४।।


१६


विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणें पडों नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।


१७


कनवाळू कृपाळू तूं माय माऊली ।
धावुनियां भेटली विठाबाई ।।१।।
निवारिलीं विघ्नें दुरी तें पळालीं ।
जोडुनियां कर विठाई विनविली ।।२।।
शरण कान्होपात्रा चरणीं निमाली।
बांधोनियां भेटली विठाबाई।। ३ ।।


१८


ज्ञान वैराग्य भजलीं न तुमतें ।
आमुतें पंढरीनाथें न विसरीजे ।।१।।
दंभ प्रपंच भजली न तुमतें ।
आमुतें पंढरीनाथें न विसरीजे || २ ||
विनवी कान्होपात्रा पंढरीरायातें ।
आमुतें पंढरीनाथे विसरीजे ।।३।।


१९


हरीहर बह्मादिक ।
जयालागीं करिती तप ।।१।।
तो हा पंढरीचा राणा ।
न ये अनुमाना श्रुतीसी ।। २ ।।
शास्त्रे पुराणें आंबावली ।
चारीं मौन्यची राहिलीं ।।३।।
पुंडलीक वरदायिणी ।
कान्होपात्रेचा जो धनी ।।४।।


२०

विषयाचे संगतीं ।
नाश पावलें निश्चिती ।। १ ।।
भगें पडली इंद्राला ।
भस्मासूर भस्म झाला ।। २ ।।
चंद्रा लागला कलंक ।
गुरुपत्नीसी रतला देख ||३||
रावण मुकला प्राणासी ।
कान्होपात्रा ह्मणे दासी ।।४।।


२१


जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें ।
ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।
धन्यभाग आजी डोळिया लाधलें ।
म्हणुनी देखिले विठ्ठलचरण ।। २ ।।
धन्य चरण माझे या पंथ चालिले ।
म्हणुनी देखिले विठ्ठल चरण ।।३।।
येऊनिया देहासी धन्य झाले ।
म्हणुनि देखिले विठ्ठलचरण ।। ४ ।।
घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे ।
जन्मोजन्मीं देखेन विठ्ठलचरण ।। ५ ।।


२२


सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय ।
तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।।
सकळ साराचें सार गे माय ।
तो हा पंढरिराय विटेवरी ।।२।।
सर्व साधनाचें जें कां निजसाधन ।
गे माय तो हा पंढरिराय विटेवरी ।।३।।
जे कां जीवांचे जीवन कान्होपात्राचे ।
निजघन ते माय तो हा पंढरीराय विटेवरी ॥४॥


२३


पतित पावन ह्मणविसी आधी ।
तरी का उपाधि भक्तांमागें ।।१।।
तुझे म्हणवितां दुर्जे अगसंग ।
उणेपणा सांग कोणाकडे ।।२।।
सिंव्हाचें भातुकें जंबुक पे नेतां ।
थोराचिया माथां लाज वाटे ।।३।।
ह्मणे कान्होपात्रा देह समर्पण करवा ।
जतन ब्रिदासाठी ॥४॥


२४


नामें दोष जळती ।
नामें पापी उद्धरती ।। १ ।।
हें आलें अनुभवा ।
सत्यजीवा प्रत्यया ।।२।।
नामें अपार तारिलें ।
नामें जीवनमुक्त केले ।।३।।
कान्होपात्रा नाम घेतां ।
पायीं जडली तत्त्वतां ।। ४ ।।