अभंग,संत जनाबाई-ज्ञानेश्वरस्तुतिपर
sant-janabai-abhang-dnyaneshwarstutipara
|| संत जनाबाई-ज्ञानेश्वरस्तुतिपर ||
२६७
भाव अक्षराची गांठी । ब्रह्मज्ञानानें गोमटी।। १।।
ते हे माया ज्ञानेश्वरी संतजनां माहेश्वरी ||२||
ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी ||३|
२६८
गीतेवरी आन टीका त्यांनी वाढियेली लोकां।।१।।
रानताटामाजी त्यानं योगरिले कांजी ॥२॥
या ज्ञानेशावांचोनी म्हणे नामयाची जनी ॥३॥
२६९
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ।।१।।
मरोनियां जायें। वा माझ्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ||३||
जावे वोवाळुनी जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
२७०
मायेहूनि माय मानी। करी जिवाची ओवाळणी ।।१।।
परलोकींचें तारूं । म्हणे माझा ज्ञानेश्वरू||२||
वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ||३||
पतिव्रते जैसा पती जनी म्हणे सांगों किती ॥४॥
२७१
संत राउळा चालिले ज्ञानेश्वर तंव बोले।। १॥
केवढे नवल सांगावें। दासी जनीचें पद ल्याहावें ||२||
पाय जोडुनी विटेवरी कटी हात उभा हरी ॥३॥
रूप सांवळें सुंदर कानी कुंडल मनोहर ||४||
सोनसळा वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥५॥
गरुडपारी सन्मुख उभा जनी म्हणे धन्य शोभा ॥ ६ ॥
२७२
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें। मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ||२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार परमानंद खेचर लिहिता होता।।३।।
सांगे पूर्णानंद लिही परमानंद भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव कार्याचा वसुदेव का होता।।५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ।।६।।
२७३
सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दातार ।।१।।
महाविष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ २ ॥
ब्रह्मा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ||३||
आदि शक्ति मुक्ताबाई। दासी जनी लागे पायीं ॥ ४ ॥
२७४
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रह्म म्हणती ॥१॥
ऐसे बोले पुराणांत । सृष्टिकर्ता जो भगवंत ॥२॥
जनी म्हणे हा सोपान ब्रह्मा अवतरला पूर्ण ॥३॥
२७५
नामयाचा गुरु। तो हा सोपान सद्गुरु ॥१॥
कन्हेवरी करुनी वस्ती ब्रह्मपुरी तिशीं म्हणती ||२||
माझ्या जिवींच्या जीवना हृदयीं राहें तूं सोपाना||३||
चित्त उद्धव ज्याची सत्ता जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥
२७६
वाचें म्हणतां सोपान प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥
सोपानदेव करितां जप समूळ नासे त्रिविधताप ॥२॥
सोपानदेव धरितां ध्यानें पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥
दासी जनी तल्लिन झाली सोपानचरणीं विनटली ॥४॥
२७७
शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥
त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत || २ ||
नव्याण्णवाच्या सालीं मुक्ताई देखिली। जनी म्हणे केली मात त्यांनीं ||३||