अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा
sant-dnyaneshwar-gatha-dona
|| संत ज्ञानेश्वर||
२०१
आधी चरे पाठी प्रसवे ।
कैसी प्रतिदिनी गाभास जायेरे ।
विउनियां वांझ जालीरे ।
ती उन्हाळा मासां वोळलीरे कान्हो ॥१॥
दुहतां पान्हा न संवरेरे ।
पैल पर्वता सुटले झरेरे कान्हो ॥२॥
मोहें वाटायाच्या चा़डेरे ।
दोहीं तयावरि पडेरे ।
वत्स देखोनि उफ़राटी उडेरे ।
तया केलीया तिन्ही बाडेरे कान्हो ॥३॥
तिहीं त्रिपुटी हे चरतां दिसेरे ।
तिहीं वाडियां वेगळी बैसेरे ।
ज्ञानदेव म्हणे गुरुतें पुसारे ।
ते वोळतां लयलक्ष कैसेरे कान्हो ॥४॥
अर्थ:-
या अभंगामध्ये मनरूपी गाय असून ती अगोदर चरते, म्हणजे मनोरथ करते नंतर ती प्रसवते. म्हणजे त्या संकल्पाप्रमाणे जीवाला क्रिया करण्यास प्रवृत्त करते. अशा रितीने ती दररोज गाभाला जाते. परंतु जीवाचे ते संकल्प तृप्त न झाल्यामुळे शेवटी ती मनरूपी गाय वांझ असल्याप्रमाणे होते. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरूची भेट होऊन त्यांनी मनाला उपदेश केला म्हणजे निर्विषय जे ब्रह्म त्याठिकाणी ती लठ्ठ होते. म्हणजे तद्रुप होते. ब्रह्म सर्वात मोठे आहे. ती तद्रुप झाल्यामुळे लठ्ठ झाली. अज्ञानदशेत तिचा पान्हा दोहन करू लागले असता म्हणजे संकल्पाचा विचार करू लागले असता ते आकलन न होता जणू काय पर्वताला धारा सुटल्याप्रमाणे ते प्रतितीला येतात. मोहाने तिला चाटावयास गेले तर ती दोही म्हणजे दोहन करणाऱ्यावर पडते म्हणजे अधिकच संकल्प रचते. मात्र गुरूकृपेने मनांचे ठिकाणी बोध झाला तर त्याला पाहून नाहीसी होते. म्हणजे मनरूपाने राहात नाही. अज्ञानदशेत तिला राहण्याकरिता भोग्य, ती उलट भोग, भोक्ता ही त्रिपुटीरूपी वाडे केली आहे. ती या त्रिपुटीरूप तीन वाड्यामध्ये चरताना दिसते. परंतु बोध झाल्यामुळे या त्रिपुटीहून लांब जे ब्रह्म तेथे बसते. ती गाय कोणती हे श्रीगुरूंना जाऊन विचारा.व ती प्रसन्न झाली म्हणजे सर्वदोषविवर्जित झाली असता जीवाचे लक्ष्य जे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणीच तिचा लय होतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२०२
गावी तिचें निरंजनीं वाडेरे ।
तीसवें पाडेरे ।
तिनें दैत्य मारिले कुवाडेरे गाईचें
सांगतां बहुत कुवाडेरे कान्हो ॥१॥
ते सांग पा धेनु कवण रे ।
तिसी नाहीं तिन्हीं गुणरे कान्हो ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे ।
ते उभी पुंडलिकाचे द्वारीरे कान्हो ॥३॥
एक परमात्मरूपी गाय निरूपाधिक निरंजन स्थितित आहे. तिची व्याप्ति विश्वरूपी वाड्यामध्ये असून तिला देव, दैत्य, व मानव अशी तीन पाडे म्हणजे पोरे आहेत. त्या तीन पोरातील असुर संपत्तीमान दैत्य सहज तिने मारून टाकले. त्या परमात्मरूपी गायीचे पवाडे सांगावे तेवढे थोडेच आहेत. ती गाय कोण आहे सांग पाहू तिला तिन्ही गुण नाहीत.माझे पिता व रखुमाईचे पती जे विठ्ठल, ती गाय असून ती पुंडलिकाचे द्वारी उभी आहे. असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२०३
तिही त्रिपुटीचे वाडेरे ।
सवालक्ष चरावया जायरे ।
ते दैत्यापाठी हुंबरत लागेरे ।
भक्ता घरीं दुभे सानुरागेरे कान्हो ॥१॥
तिचें नाम शांभवी आहेरे ।
तिची रुपरेखा कायरे कान्हो ॥२॥
येकी चौमुखी गाय पाहेरे ।
तिचा विस्तार बहु आहेरे ।
तिच्या नाभिकमळीं जन्म वासु सांगेरे ।
तिसी आदि पुरुषु बापमायेरे कान्हो ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु पाहीरे ।
ते भक्ता ओळली आहेरे ।
ते दोहतां भरणा पाहेरे ।
चारी धारा वर्षत आहेरे कान्हो ॥४॥
अर्थ:-
भोक्ता, भोग्य, भोग इत्यादि त्रिपुटीचा व्यवहार चालणारे तिन्ही लोक हे तिचे वाडे आहेत. व जी आपण ‘सवालक्ष चरावया जाये रे’ म्हणजे तिच्याकडून दररोज सवालक्षाची घडामोड होते. व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते. आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते. तिचे नाव शांभवी असे आहे. तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती? एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे. ती तूं पहा. जिचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे. तिच्या नाभिकमळी जन्म असून,आदिपुरूष परमात्मा तिचे आईबाप आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहा. त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार धारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२०४
काळी कोसी कपिला धेनुरे ।
तिचें दुभतें काय वानुरे ।
तिसी बापमाय दोन्ही नाहींरे ।
ते असक्रिया वेगळी पाहेरे कान्हो ॥१॥
ते अखरीं चरेरे ।
सर्वसाक्षी वरती जायरे कान्हो ॥२॥
पैल येकी सहस्त्रमुखीरे ।
तिहीहुनि येकी आहेरे ।
तिचीं नावें अनंत पाहेरे ।
तिसी बापमाय कोणरे कान्हो ॥३॥
बापरखुमादेविवरी विठ्ठली पाहेरे ।
ते पुंडलिकाचे द्वारीं जायेरे ।
तिचें दुभतें अपरंपाररे ।
तें दुभतें सहस्त्रधारीरे कान्हो ॥४॥
अर्थ:-
एक काळी कपिला गाय आहे. तिचे दुभते काय वर्णन करावे?तिला आईबाप दोन्हीही नाही. (अजन्मा असल्यामुळे) आणि असक्रिया म्हणजे ती सर्वाहून वेगळी आहे. ती आपल्या अखरी म्हणजे चरणाच्या जागी चरत आहे. व ती सर्वांची साक्षी आहे. दुसरी जी एक सहस्रमुखी गाय आहे. व आणखी एक तीन गुणांच्या पलीकडची गाय निर्गुण अशी आहे. तिला अनंत नावे आहेत. तिचे आईबाप कोण आहेत सांग पाहू. ती गाय म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे असून पुंडलिकाचे द्वारांकडे गेलेले आहेत. तिचे दुभते अपरंपार म्हणजे हजारोधारांनी ती दूध देत आहे.असे माऊली सांगतात.
२०५
आगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे ।
दोहों जाणे त्याचे दुभतें जेवित्याची मेलि मायरे ॥१॥
कान्हो पाहालेरे कान्हो पाहालेरे नवल विपरित कैसें ।
जाणत्या नेणत्या झांसा पै चतुरा लागलें पिसें ॥२॥
पाणियानें विस्तव पेटविला ।
वारियानें लाविली वाती ।
आपें आप दीप प्रकाशला ।
तेथें न दिसे दिवस रातीरे ॥३॥
खोकरीं आधन ठेविलें ।
तेथें न दिसे माझी भाक ।
इंधनाविण पेटविले ।
तेथें चुलि नाहीं राख ॥४॥
जाणत्या नेणत्या झांसा ।
पैल चतुरा बोलिजे ह्याळीं ।
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले ढिवर पडिले जाळीं ॥५॥
अर्थ:-
सर्वांत श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या क्षीरसागराच्या पलीकडे मायारूपी डोंगरावर एक परमात्मरूपी गाय आहे. त्या गाईचे दोहन करणारा अत्यंत तीव्र मुमुक्षु आहे. तो मुमुक्षु श्रीगुरूंच्या सहाय्याने त्या गाईचे दूध काढतो. ही दूध काढण्याची हातोटी ज्या मुमुक्षुला साधली असेल त्यालाच तिच्या दूधाचा म्हणजे परमानंदाचा लाभ होतो. शिवाय ते दूध प्यायल्यामुळे अनिर्वचनीय मिथ्या जगताची उत्पत्ति करणारी माया नष्ट होऊन जाते. हे काय विचित्र नवल आहे हे कळले. त्या गायीने शहाण्यांना, वेड्याला त्याच्याही पलीकडच्या चतुरांना आपला ध्यास लावून पिसे लावलेले आहे. काय मायेचा चमत्कार पहा. जणू पाण्यानेच विस्तव पेटवावा, वाऱ्याने दिवा लावावा, असा प्रकार केला आहे. आत्मप्रकाशाकडे पाहिले तर त्यांचे ठिकाणी दिवस रात्र नसून तो स्वयंप्रकाशाने प्रकाशीत आहे. अशा परमात्म्यांवर जगत निर्माण केले. म्हणजे जसे काय मोडक्या चुलीवर आदण ठेवावे असे केले. किवा लाकडावाचून विस्तव पेटावा असे केलं. तात्त्विक दृष्टीने पाहिल तर मूळांत चूल ही नाही व राख ही नाही म्हणजे जगत व जगत्कारणही काहीच नाही. अशा तऱ्हेचा माया व ब्रह्माचा विचार मोठमोठ्या शहाण्यांनाही कळला नाही. शहाणे वेडे सर्वच या विचाराच्या घोटाळ्यात पडले आहे. ताप्तर्य या परमात्मरूप गायीचा विचार आतापर्यंत यथार्थत्वाने कोणालाही कळला नाही. हा प्रकार म्हणजे मांसे जाळ्यांत सापडण्याऐवजी कोळीच जाळ्यांत सापडल्याप्रमाणे आहे. मी हे गाईचे वर्णन निवृत्तीनाथांच्या कृपेने केले.माऊली ज्ञानदेव सांगतात
२०६
साई खडियातें घेवोनिया माते ।
तैसा संसारातें येत रया ॥१॥
सोय ध्यान उन्मनि पांचांची मिळणी ।
सत्रावीचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥
दुभोनिया खडाणि नैश्वर्य ध्याय गगन ।
चेतलिया मन क्षीर देत ॥३॥
ज्ञानदेवीं समभाव त्रिगुणी नाहीं ठाव ।
आपेआप राणिव साई खडिया ॥४॥
अर्थ:-
कटपुतळीच्या लाकडांच्या बाहुल्या करून त्यांना नाचवून दाखविणारा तो जसा जड बाहुल्या नाचवून दाखवितो. पण पहाणाऱ्याला त्या बाहूल्या खऱ्याच वाटतात. वास्तविक त्या मिथ्या आहेत. त्याप्रमाणे तात्त्विक संसार मिथ्या असला तरी. पंचमहाभूतांचे कार्य जो देह त्यांत ध्यानाच्या द्वाराने उन्मनी साधली असता सतरावी जी आत्मकला त्यांची गोष्ट कानांत सांगितल्यासारखी होते. लाथा मारणारी गाय दूध देत असली तरी तें जसे फुकट, कारण तिच्या लाथा झाडण्याने ते सांडले जाते. त्याप्रमाणे अनित्य असा जो संसार त्याच्या चिंतनाचा उपयोग नाही. असे जाणून या नश्वर संसारात जर आत्मचिंतन केले तर मनाला आनंदरूप दूध प्राप्त होते. आत्मसमभाव झाला असता या त्रिगुणरूप प्रपंचाचा ठाव ठिकाणा नाहीसा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचे जे राजऐश्वर्य प्राप्त होते. ते सुद्धा कठपुतळीतील बाहुल्याप्रमाणेच होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२०७
काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास ।
माझिया स्वामीविण ते अवघे उदास रया ॥१॥
तपन त्या कमळा कमळीं विकाशु ।
सुकवि मयंकुरा करिसी अरे बा सुधांशु ॥२॥
साताही वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे ।
तैसें सर्वा सर्वपण माजीयेन श्रीराजे ॥३॥
सर्वज्ञ सुंदर देव होतुकां भलतैसे ।
परि जडातें चेष्टविते आणिकां पै नसे ॥४॥
जया नांव नाहीं रुप चिन्ह काहीं ।
नामरुप चिन्ह स्वयेंचि पाहीं ॥४॥
बापरखुमादेविवरु आहे तैसाचि पुरे ।
काय करिसी आणिका देवांचीं गोवरें रया ॥५॥
अर्थ:-
एका पंढरीरायाव्यतिरिक्त इतर इंद्रादिक देवांचे वैभव मोठे असले तरी त्याला घेऊन काय करावयाचे? माझा स्वामी जो पंढरीराय त्याच्यावाचून हे सगळे देव व्यर्थ आहेत. सूर्विकासिनी कमळाला तप्त करणारा सूर्योदय झाला तरच त्याचा विकास होतो. चंद्रोदय झाला तरी ती मिटतात. मग तो चंद्र अमृतांश जरी असला तरी त्याचा काय उपयोग. वारांचे दिवस सात असले तरी त्या सर्वांमध्ये सूर्य जसा एक तेजस्वी असतो. बाकीचे सोम, मंगळ, बुध,गुरू, शुक्र, शनि यांचे वार असूनही प्रकाशनामध्ये त्यांचा काही उपयोग नाही. आदित्यवाराच्या पुढे ते निस्तेज आहेत. त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये सर्व पदार्थरूप होऊन असणारा पंढरीराय मुख्य आहे. बाकीच्या देवता त्याच्यापुढे तुच्छ आहेत. परमात्मव्यतिरिक्त बाकीचे देव कितीही सुंदर असोत किंवा सर्वज्ञ असोत पण जगाला चेष्टविण्याचे सामर्थ्य परमात्म्याव्यतिरिक्त दुसऱ्याजवळ नाही. परमात्म्याला तात्त्विक दृष्टीने नांव नाही, रुप चिन्ह काही नाही. परंतु नामरूप चिन्ह स्वरूपांत सर्वप्रकारे त्याचीच व्याप्ती आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, तो जसा आहे तसाच आम्हाला पूरे. बाकीच्या देवांची भरती आम्हाला काय करायची असे माऊली सांगतात.
२०८
पूर्वदिशे भानु उगवला नळनी कमळणी
विकासु केला ।
उष्णकरु अस्तु जाला सीतकरु
प्रवर्तला कमळणी संकोचु केलाग बाईये ॥१॥
पढियंते मानसीं बहुवसे ।
असे दुरी तें जवळीच वसे रया ॥२॥
दोलक्षीं सोम अंबरी ।
त्याचे गुण उमटती सागरीं ।
अंवसे कळाहीनु येरु दिसे अंधारीं ।
तैसा समंधु ये शरीरीं रया ॥३॥
गगनीं वोळली घनुचरें तेणें
क्षितिवरी नाचती मयूरें ।
सोम शीतळपणें कळा मिरवी अमृत घेवों
जाणती ते चकोर रया ॥४॥
वोळलीं स्वातीचीं अंबुटें तें
तत्त्व झेलिती शुक्तिका संपुष्टें ।
येरें नक्षत्रें वरुषती निकटें
काय जळ तयाचें वोखटें रया ॥५॥
चातकु चंद्रातें चिंतितु ।
तो तयाचे मनोरथ पुरवितु ।
बापरखुमादेविवरुविठ्ठलु तो मी सदां
असे ह्रदयीं ध्यातु रया ॥६॥
अर्थ:-
पूर्वदिशेस सूर्योदय झाल्याबरोबर नीलकमळे उमलतात व सूर्यास्त होऊन चंद्रोदय झाला म्हणजे ती कमळे मिटतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय याला असता मनरूपी कमळ प्रफुल्लित होते. अज्ञानकाली तो परमात्मा फार दूर आहे असे वाटते. ज्ञानोदय झाला असता तो जवळच आहे असे अनुभवाला येते. शद्ध किंवा कृष्ण पक्षात चंद्र आकाशातच असतो पण त्याचे गुणभरती ओहोटीरुपाने समुद्रात उमटतात तो चंद्र अमावस्येला कलाहीन असतो. आणि पौर्णिमेला अंधाराचे प्रकाशन करतो. त्याप्रमाणे या शरीरांत परमात्म्याचा संबंध आहे. त्याचे योगाने प्रारब्ध कर्मानुसार अंतःकरणाच्या ठिकाणी कधी सुखाची भरती येते.व कधी ओहोटी होते. आत्मरूपाच्या अज्ञानदशेमध्ये आत्मा प्रकाशशून्य असल्यासारख दिसतो श्रवणाने अंतःकरणात त्याच्या ज्ञानाचा कमी अधिक प्रमाणात उदय होतो पण हेही होणे अज्ञानातीलच आहे. आकांशात संचार करणारे मेघ वर्षाव करण्याच्या तयारीत असले म्हणजे पृथ्वीवरील मोर नाचू लागतात. त्याप्रमाणे जात्मज्ञानाचा उदय होणार असे समजून मुमुक्षु सात्त्विक भावाने आनंदित होतात. चंद्र आपल्या शितळ कळांनी परिपूर्ण असता ते चंद्रांमृत सेवन करण्याची हातवटी चकोराला आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता त्याचा आनद भोगण्याची योग्यता अधिकारी पुरूषांनाच असते. स्वातीचे नक्षत्रांचे पाणी पडू लागले असता मोती उत्पन्न करणाऱ्या शिपी आपल्यामध्ये थेब वरच्यावर धारण करितात. बाकीची नक्षत्रे वर्षाव करू लागले तरी त्यांच्यापासून मोती उत्पन्न होत नाही. म्हणुन ते पाणी वाईट म्हणावे काय? वरील दृष्टांताप्रमाणे अधिकारी पुरूषाला आत्मज्ञानाचे श्रवण घडले म्हणजे त्याच्या अंतःकरणरूपी शिंपल्यात मुक्तिरूपी मोती तयार होतात बाकीचे पदार्थ निरूपयोगी म्हणून अधिकाऱ्याचे अंतःकरण ग्रहण करित नाही. चातक पक्षाला चद्रोदय केव्हा होईल याचे चिंतन लागलेले असते.म्हणुन चंद्र उदयाला येऊन चंद्रामृत देऊन चातक पक्षाचे मनोरथ पूर्ण करतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे मी अंतःकरणांत नेहमी ध्यान माझे मनोरथ पूर्ण करतो. असे माऊली सांगतात.
२०९
पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्याचे साहिजे ।
येर्हवीं वाहिजे चामाची मोट ॥१॥
न पाहे वास न धरी मनीं आस ।
वायां निकण भुस काय उपणिसी ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे ॥
चाड नाहीं आम्हां दुजेविण ॥३॥
ज्ञानेश्वरमहाराजांचा बुध्दिरुपी
अर्थ:-
लग्न झालेली स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाकरिता सासुसासऱ्यांचा जाच सहन करते. तसे जर नसेल तर एऱ्हवी कातड्यांची मोट म्हणजे नुसते शरीर रक्षण करून करावयाचे काय? या विचाराने नुसत्या शरीराचे रक्षण करावे अशी माझी दृष्टी नाही. व अन्य कोणत्याही प्रापंचिक विषयाविषयी आशा नाही. कारण ज्यामध्ये कण नाही. म्हणजे धान्य नाही असे नुसते भूस वाऱ्यावर कोण उपणीत बसेल? एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना सोडून इतर दुसऱ्या कशाचीही आम्हाला इच्छा नाही आम्हाला तो एकच पुरे. असे माऊली सांगतात.
सखींशीं संवाद – अभंग २१० ते २१५
२१०
ममता पुसे सये जिवशिवा ठाव ।
पूर्णता पान्हाये कोणे घरीं ॥१॥
ऐके सखिये पुससी बाईये ।
परब्रह्म सामाये पुंडलिका ॥२॥
नाहीं यासी ठावो संसार पै वावो ।
एकतत्त्वीं रावो घरीं वसे ॥३॥
बापरखुमादेविवरु उदार वोळला ।
विश्वजनपाळा ब्रीद साजे ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्णाच्या ठिकाणी अत्यंत ममता म्हणजे प्रीती असलेली एक सखी आपल्या सखीला विचारते. सये जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन परमानंद अभिव्यक्त होतो. असे घर कोणते? म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या अवस्थेत ही स्थिति प्राप्त होते. हे बाई तूं पुसत असेल तर सखे ऐक पुंडलिकाचे घरी ते सगुण ब्रह्म सर्व सामावलेले आहे. वस्तुतः निर्गुण ब्रह्माला ठाव म्हणजे आश्रय मुळीच नाही. कारण ते आपल्या महिम्यातच असते. त्याला आश्रय संसार मानला तर वस्तुतः संसार मिथ्या असल्यामुळे तोही आश्रय होऊ शकत नाही. म्हणून तो एकतत्त्वरुप चक्रवर्ति परमात्मा स्वतःच्या घरी आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्री विठ्ठलांनी उदार होऊन मजवर कृपा केली म्हणजे विश्वजनक, पालक हे जे त्याचे ब्रीद तें त्यांनी खरे केले असे माऊली सांगतात.
२११
चित्तींचें चैतन्य रुपीचे अनुकार ।
रुप असे साचार नयनांमाजी ।
तेजाचें तेज दीपीं कळिका सामावे ।
दीपक माल्हावे तेज तेजीं ॥१॥
काय सांगो सखिये तेज पै अढळ ।
इंद्रियें बरळ देखतांची ॥२॥
घनदाट रुपीं एकरुप तत्त्व ।
दीपीं दीपसमत्व आप दिसे ।
निराकार वस्तु आकार पै अपार ।
विश्वीं चराचर बिंबलीसे ॥३॥
प्राण प्रिया गेली पुसे आत्मनाथा ।
कैसेनि उलथा गुरुखुणे ॥
बापरखुमादेवीवर विठ्ठलीं उपरति ।
रुपीं दीपदीप्ति एक जाली ॥४॥
अर्थ:-
चित्तामध्ये असणारे चैतन्यच नानारुपांनी आकारास आलेले आहे. हेच रुप खरोखर सावयव होऊन डोळ्यांत साठविले आहे. तेजाचे तेज दीपज्योतीच असते. दिवा मालविल्यावर ते मूळच्या तेजतत्त्वात विलीन होते. सखे, काय सांगू ग? हे मूळचे तेज म्हणजे परमात्मस्वरुपाचे ज्ञान अत्यंत अढळ आहे. इंद्रियाचे ज्ञान मिथ्या पदार्थ दाखविते. हे विचाराने पटते. ते घनदाटपणे सर्वत्र एकरुपाने आहे. दिव्यांत तेज समत्वाने असते. ही तेजरुप वस्तु निराकार असून तीच आकारास आलेली आहे. व तीच चराचर विश्वांत प्रतिबिंबीत झाली आहे. प्राणप्रिया म्हणज बुद्धि आत्मनाथाविषयी म्हणजे आत्मस्वरुपां विषयी विचारावयाला गेली असता श्रीगुरुंनी च तिला अंतर्मुख केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते स्वयंप्रकाशमान असून त्यांच्याठिकाणी बुद्धि एकरुप झाली. असे माऊली सांगतात.
२१२
प्राणासवें सखि आत्मा हा बिंबला ।
सवेगुणी निमाला याच्या वृत्ति ॥
ध्यान गेलें ठायां मन गेलें सुखा ।
नयनीं नयनसुखा अवलोकीं ॥
तेंचि सखि रुप वोळखे स्वरुप ।
विश्वीं विश्वरुप एका तेजें ॥२॥
द्वैत पै नाहीं दिसे अद्वैत सुरवाडु ।
एक दीपें उजेडु सर्वां घटीं ।
विराल्या कामना अमूर्त परिपाठीं ॥
चैतन्याची दृष्टी उघडली रया ॥३॥
सखी ह्मणे सुख प्राणासि भुललें ।
आत्मपणें मुकलें काय करुं ।
बापरखुमादेवीवर विठ्ठलें रुप ।
दाऊनि स्वरुप एक केलें ॥४॥
अर्थ:-
प्राणासहवर्तमान सखी म्हणजे बुद्धि त्यांत प्रतिबिंबित झालेल्या आभासासह वर्तमान आत्मस्वरुपांच्या ठिकाणी गेली त्या वृत्तिद्वारा तिला लागलेले ध्यान, मन डोळा यांनी त्या परमात्मसुखाला पाहिले. विश्वरुपाने जे एक तेज नटले आहे. तेच तुझे खरे स्वरुप आहे. असे तूं ओळख. त्याठिकाणी द्वैतभाव न दिसता अद्वैताच्या सुखाचाच सर्व जीवामध्ये दीपासारखा प्रकाश होतो. त्यावेळी सर्व कामना अमूर्त असतांना द्वैत दिसेनासे होऊन आत्मस्वरुप चैतन्याची दृष्टि उघडली आहे. असा तुला अनुभव येईल.दुसरी सखी म्हणते तूं सांगितलेल्या परमसुखास आत्मपणाने भुलून मी प्राणास मुकले. याला मी आतां काय करुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी आपले रुप दाखवून आपल्यांशी माझ्या स्वरुपांचे ऐक्य करुन घेतले. असे माऊली सांगतात.
२१३
प्राणाची पै सखी पुसे आत्मयासी ।
ईश्वरीं ध्यानाची वृत्ति गेली ॥
पांगुळल्या वृत्ति हरपली भावना ।
निमाली कल्पना ब्रह्मीं रया ॥१॥
हें सुख साचार सांगे कां विचार ।
आत्मयाचें घर गुरुखुणें ॥२॥
चेतवितें कोठें गुंफ़लें सगुण ।
निर्गुणी पै गुण समरस ॥
तें सुख अपार निळिये वेधलें ।
कृष्णरुप देखिले सर्वांरुपीं ॥३॥
या ध्यानीं गुंफ़लें मनामाजि वेख ।
द्वैतभानसुख नाठवे मज ॥
अद्वैत घरकुलें गुणाचें पै रुप ।
मनामाजि स्वरुप बिंबलें रया ॥४॥
विस्मृति गुणाची स्मृति पै भजन ।
दृष्टादृष्ट जन ब्रह्मरुप ॥
याचेनि सुलभे नाठवे संसारु ।
ब्रह्मींचा आकारु दिसत असे ॥५॥
वेगी सांग ठसा कोण हें रुपडें ।
कृष्णचि चहूंकडे बिंबलासे ।
बापरखुमादेवीवरु विठ्ठल सखी ।
कृष्णरुपीं सुखी तनु जाली ॥६॥
अर्थ:-
प्राणाची मैत्रिण जी बुद्धी तिला आत्मविचार प्रगट झाला म्हणजे ईश्वरानुग्रहांकरिता पूर्वी जी ध्यानाची वृत्ति असते ती नाहीसी झाली. व त्यामुळे द्वैतविषयक भावना किंवा कल्पना ह्या सर्व ईश्वराधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी लय पावतात. त्या आत्म्याचा सत्य सुखाचा विचार गुरुंनी दाखविला तर फलद्रूप होणारी जी वृत्ति सगुणांत गुंतून राहिली असते तीच निर्गुणांत एकरुप होते. हे ऐक्याचे अपार सुख शामसुंदर श्रीकृष्णांच्या ठिकाणी प्रेम लागल्यामुळे सर्व रुपाच्या ठिकाणी त्याच्या सुखाचा अनुभव येतो. या श्रीकृष्णवेषरुपाचा मनामध्ये आकार गुंफुन राहिला आहे. त्याच स्थितित द्वैताच्या सुखांची आठवणही होत नाही. अद्वैत स्वरुपांत घरकुल करुन असलेले शामसुंदररुप बिंबून राहिले आहे. गुणांची विस्मृति असली तरी पूर्वसंस्काराने भजन चालतेच. त्यांतही दृष्टादृष्ट सर्व जगाला ब्रह्मरुपत्व दिसते. या सगुणस्वरुपांच्या भजनाने संसार आठवत नाही. पण सर्व संसार ब्रह्मरुपच दिसतो. याचा ठसा कुठे नाही. याचे रुप सांग, सर्वत्र हा श्रीकृष्णच प्रतिबिंबित झालेला दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या कृपेने माझे सर्व शरीरच सुखी होऊन गेले. असे माऊली सांगतात.
२१४
तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां ।
मग ममतेची चिंता तयासि पुसे ॥१॥
बाई कोणे घरीं सांगे वो जिवित्व ।
परेचें परतत्व कोणे घरीं ॥२॥
सखी सांगे गोष्ठी बाईये रुप वो धरीं ।
आपणचि घरीं सांपडेल ॥३॥
निवृत्तीनें खुणें सांगितलें ज्ञान ।
रखुमादेविवर ध्यान विठ्ठल वरदा ॥४॥
अर्थ:-
एक सखी, आपल्या मैत्रिणीस परमात्मा कोणाच्या घरी आहे ग अशी विचारते. कारण परमतत्त्वांचा विचार केला तर ते तत्त्व हातांस येत नाही. आणि परमतत्त्वांच्या प्राप्तीची चिंता तर सारखी लागून राहिलेली आहे. ते परावाणीहून पलीकडे असणारे परमतत्त्व जें सर्वजीवांचे जीव ते कोणाच्या घरी आहे. सखी तिला उत्तर सांगते. बाई श्रीगुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे विचार केला तर तुमच्या घरांत तें सांपडेल. कारण तुझा जीवच लक्षांशाने परमतत्त्व आहे. ही खूण निवृत्तिरायांनी मला दिल्यामुळे त्या परमतत्त्वाचे ज्ञान होऊन रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ध्यान मला लागले आहे. असे माऊली सांगतात.
२१५
येऊनि वर्हाडिणी बैसल्या टेकी ।
कोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥
मी कवणाची मज सांगा कोण्ही ।
वर्हाड आलिया वर्हाडणी ॥२॥
कवळ ते वरमाय कवण तो वरबाप ।
कवण तो नोवरा कवण तो मंडप ॥३॥
वर्हाड नव्हे स्वप्नगे माये ।
बापरखमादेविवराचे वेगी धरावे पाये ॥४॥
अर्थ:-
माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये लग्न व लग्नाकरिता जमलेले वऱ्हाड असे रुपक सांगतात. याठिकाणी वऱ्हाडीणी कोण आहेत याचा प्रथम विचार करणे अवश्य असल्यामुळे याठिकाणी बुद्धिवादात्म्यापत्र असलेला चिदाभासरूपी जीवदशा ह्याच कोणी वऱ्हाडणी आहेत व त्या ऴऱ्हाडणी योग याग तप दान व तीर्थादि साधनांत अभिमानाने नवरा कोण हे पाहण्याची खटपट करता करता मेटाकुटीस आल्या. कारण मूळ नवरा कोण याची त्यांना ओळख पटली नाही. यद्यपि हे वऱ्हाड व वऱ्हाडणी लग्नाला आल्या आहेत याचा अर्थ भगवत्प्राप्ती करताच भगवंताने मनुष्ययोनी निर्माण केली ‘निजात्म प्राप्तीलांगोनी । देवे केली मनुष्ययोनी’ परंतु माऊलीने म्हटल्या प्रमाणे ‘जे प्राणीया कामी भरू । देहाचिवरी आदरू च । म्हणोनी पडिला विसरू आत्मबोधाचा ॥अशी त्यांची स्थिती झाली असताना त्यातील एकीच्या पूर्वपुण्याईने असा विचार उत्पन्न झाला की मी कोणाची आहे किंवा कोणाच्या लग्ना करिता आलेली आहे. असे मला कोणीतरी सांगा. बरे या वऱ्हाडामध्ये वरमाय कोण आहे ? याचे उत्तर बुद्धिरूपी वरमाय आहे. कारण आत्मबोध रूपी नवरा हा बुद्धिनिष्ठ असल्यामुळे बुद्धितच उत्पन्न होत असल्यामुळे ती वरमाय आहे. तसेच बोध हा आत्मस्वरूपविषयक असल्यामुळे आत्मा हा वरबाप होय. व बोधरूपी हाच नवरा आहे. व तो बोध या मनुष्यदेहांतच होत असल्यामुळे नरदेह हाच कोणी मंडप आहे.परमात्मदृष्टीने विचार केला तर आत्मभिन्न हे वहाड वगैरे काही एक नाही तर स्वप्नाप्रमाणे सर्व मिथ्या आहे. याचकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याचे पाय लवकर धरा. असे माऊली सांगतात.
संतपर – अभंग २१६ ते २२९
२१६
अखंड हरि वाचेसी ।
जरी सुकॄताची राशी ।
तरीच हरि ये मुखासी ।
धन्य जन्मासी तो आला ॥१॥
देखता ज्याचे चरण ।
यम जातसे शरण ।
ऐसें सुकृताचें वर्णन ।
कवणे करावें तयाचें ॥२॥
तोचि एक साधु देखा ।
नित्य पुसावें त्या विवेका ।
तो कांहीं न धरी शंका ।
हरिनाम म्हणतसे ॥३॥
ज्ञानदेवी निजसूत्र ।
तोचि धन्य शुध्द पवित्र ।
हरिवांचूनि त्याचें वक्र ।
नेणें आणिक दुसरें ॥४॥
अर्थ:-
जर अनंत जन्माच्या पुण्याईच्या राशी असतील तरच श्रीहरिचे नाम मुखावाटे येईल. असे नामस्मरण करणाऱ्या पुरूषाचा जन्मही धन्य आहे. त्याचे चरणाचे दर्शन झाले तर साक्षात् यमसुद्धा त्याला लोटंगण घालतो.ज्या पूर्व जन्मार्जित सत्कर्माचे एवढे फल आहे. त्याचे वर्णन कोणी करावे ते धन्य आहेत. आत्मज्ञान संपन्न जे असतील ते खरे साधु आहेत. त्यांना शरण जाऊन आत्मानात्म विवेक विचारावा ते हरिनामस्मरण करणारे, संत आहेत किंवा नाहीत अशी शंका मनांत धरू नये. आत्मकल्याणाची सूत्र म्हणजे मार्ग तोच पवित्र पुरूष जाणत असून त्याची वाणी हरिनाम उच्चारावाचून दुसरे काही जाणत नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२१७
आनंदलें वैष्णव गर्जती नामें ।
चौदाही भुवनें भरलीं परब्रह्में ॥१॥
नरोहरि हरि हरि नारायणा ।
सनकसनंदनमुनिजनवंदन ॥२॥
गातां गातां नाचतां । प्रेमें उल्हासें ।
चराचरींचे दोष नाशियलें अनायासें ॥३॥
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरी ।
तयातें देखोनि हरि चार्ही बाह्या पसरी ॥४॥
अंघ्रिरुणु ज्याचा उध्दरितो पतिता ।
प्राकृत वाणी केविं वानूं हरिभक्ता ॥५॥
तीर्थे पावन जिहीं धर्म लेला घडौती ।
कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥
मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले ।
धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहालें ॥७॥
बापरखुमादेविवरा पढियंती जीया तनु ।
तया संताचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥
अर्थ:-
ज्याला सनक सनंदन वगैरे मुनी वंदन करतात. तो जो चवदाही भुवनांमध्ये परिपूर्ण भरला आहे. अशा परमात्म्याच्या हरि, नारायण,नरहरि, वगैरे नामाचा घोष वैष्णव आनंदाने करतात.या त्यांच्या प्रेमाच्या व आनंदाच्या गाण्यांने, नाचण्यांने, चराचरीचे दोष सहज नाहीसे होतात.वैष्णवांच्या मनांत हरि, चित्तात हरि, अंगावर माळा मुद्रादि हरिचीच चिन्हे धारण केली आहे. अशा लोकांना पाहून त्यांना अलिंगन देण्याकरता देव चारी हात पसरतो. ज्या हरिभक्तांच्या पायांच्या धुलीकणाने पापी लोक उद्धरून जातात.अशा भक्तांचे वर्णन मला प्राकृत वाणीने कसे करता येईल. ज्यांनी तीर्थात स्नान केलें असतां तीर्थेदेखील पावन होतात. ज्यांच्या योगाने धर्माला पूर्णपणा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर ते या त्रिभुवनांतील मोक्ष देणारे कल्पवृक्षच होत. ज्यांच्या रक्षणाकरिता परमात्म्याला मत्स्य कूर्म वगैरे अवतार घ्यावे लागले.त्याच्या तेजाची स्तुती काय करावी. त्यांनी चंद्र सूर्यालाही लाजविले.ज्या संताच्या विभूति माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांना आवडतात.त्यांच्या पायी माझे चित्त स्थिर होवो असे माऊली सांगतात.
२१८
श्रवणें कीर्तनें जाले ते पावन ।
सनकादिक जाण परम भक्त ॥१॥
जाली ते विश्रांति याचकां सकळां ।
जीवीं जीवनकळा श्रीमूर्तिरया ॥२॥
पादसेवनें आक्रूर जाला ब्रम्हरुप ।
प्रत्यक्ष स्वरुप गोविंदाचें ॥३॥
सख्यपणें अर्जुन नरनारायणीं ।
सृष्टि जनार्दनीं एकरुप ॥४॥
दास्यत्त्व निकट हनुमंते केलें ।
म्हणोनि देखिले रामचरण ॥५॥
बळि आणि भीष्म प्रल्हाद नारद ।
बिभीषणावरद चंद्रार्क ॥६॥
व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक ।
आणिक पुंडलिकादि शिरोमणी ॥७॥
शुकादिक योगी रंगले श्रीरंगी ।
परिक्षितीचा अंगीं ठसावलें ॥८॥
उध्दव यादव आणि ते गोपाळ ।
गोपिकांचा मेळ ब्रम्हरुप ॥९॥
अनंत भक्त राशी तरले ते वानर ।
ज्ञानदेवा घर चिदानंदीं ॥१०
अर्थ:-
या अभंगामध्ये नवविधा भक्ति करून कोण कोणते भक्त उद्धरून गेले ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत श्रवण, कीर्तन करून सनकादिक परम भक्त पवित्र झाले.जीवांचे जीवन असणारा जो पंढरीराय त्यांनी या याचक भक्तांना समाधान दिले.पादसेवन भक्ती करून अक्रूर नावांचा भक्त परब्रह्मरूप झाला.सख्य भक्तीने नर जो अर्जुन तो नारायणस्वरूप झाला याचा अर्थ सर्वसृष्टि हे ज्याचे स्वरूप आहे. असा जो जनार्दन त्याचे स्वरूपांत मिळाला.हनुमंताने एकनिष्टपणाने दास्यत्व भक्ति केल्यामुळे त्याला रामचरण प्राप्त झाले. तसेच बळी, भीष्म, प्रल्हाद, नारद, बिभीषण, व्यास वसिष्ठ वाल्मीक, चंद्र सूर्यासमान असणारे भक्त त्याच प्रमाणे भक्त शिरोमणी पुंडलिक, तसेच शुकादिक योगी हे सर्व भक्त श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तिमध्ये रंगुन गेले. त्याचप्रमाणे उद्धव, यादव, गोपाळ आणि गोपी इत्यादि भक्तही भगवत्स्वरूप होऊन गेले.तसेच असंख्य भगवत्भक्त वानरही सच्चिदानंदरूप परमात्म्याच्या नामाने उद्धरून गेले. ते सच्चिदानंदस्वरूपच माझे घर आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२१९
संत भेटती आजि मज ।
तेणें जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थुळीं सहज ।
दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥
आलिंगनीं सुख वाटे ।
प्रेम चिदानंदीं घोटे ।
हर्षे ब्रह्मांड उतटे ।
समुळ उठे मीपण ॥२॥
या संतासी भेटतां ।
हरे संसाराची व्यथा ।
पुढता पुढती माथां ।
अखंडित ठेवीन ॥३॥
या संतांचे देणें । कल्पतरुहूनि दुणें ।
परिसा परीस अगाध देणें ।
चिंतामणि ठेंगणा ॥४॥
या संतापरीस उदार ।
त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर ।
इष्टमित्र सोईरे ॥५॥
कृपाकटाक्षें न्याहाळिलें ।
आपुल्यापदीं बैसविलें ।
बापरखमादेविवरे विठ्ठलें ।
भक्तां दिधलें वरदान ॥६॥
अर्थ:-
आज मला संताची भेट झाली. त्यामुळे मी चतुर्भुज झालो. त्या चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ या चार भुजापैकी अर्थ व काम दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत व धर्म आणि मोक्ष या दोन भुजा वाढल्या.अशा ह्या चारी भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. संतांना आलिंगन देण्यात अतिशय सुख वाटते. त्याच्या ठिकाणी असलेले प्रेम चिदानंदरूप होते आनंद तर ब्रह्मांडाबाहेर जातो आणि शरीरावरचा अहंभाव समूळ नाहीसा होतो. या संतांच्या भेटीत संसाराची व्यथा नाहीसी होते. त्यांच्या चरणावर मी वारंवार मस्तक ठेवीन. या संताचे देणे कल्पतरूपेक्षा जास्त आहे. परिसापेक्षाही अधिक आहे. चिंतामणी तर त्यांच्या दानापुढे अगदी ठेंगणा आहे. आई, बाप, सहोदर किंवा इष्टमित्र यांच्याही पेक्षा माझे कल्याण करणारे संत आहेत. काय काय सांगावे त्रिभुवनांतही संताच्या इतके औदार्य कोणामध्ये नाही. ते ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला आपल्या योग्यतेला आणून बसवितात. ह्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी आपल्या भक्ताला वरदान दिले आहे.असे माऊली सांगतात.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
२२०
भाग्याचा उदयो किं दैवाचि गति ।
मज जोडली संगती संताची ॥१॥
माझें मीच भांडवल घेउनिया निगुती ।
लाभाची गति श्री विठ्ठलु ॥२॥
देशदेशाउरा न लगेची जाणें ।
ठाईच जोडणें एक्या भावें ॥३॥
खेपखेपांतर अनेक सोशिलें ।
मुदल उरलें लेखा चारी ॥४॥
मुदल देउनि वाणेरा फ़ेडिला ।
उत्तीर्ण जाला दोही पक्षी ॥५॥
चौघे साक्ष देवउनि अंतरीं ।
वेव्हारा ज्ञानेश्वरी खंडियला ॥६॥
अर्थ:-
आज मला संताची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गति म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्रीविठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्य भावाने जागचे जागीच याचा लाभ झाला.अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे चार वेदाने वर्णन केलेले परमात्मस्वरुप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे मी दोन्ही कुळांत उर्तीर्ण झालो. चारी, वेदाची साक्ष मनांत घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२२१
आकार उकार मकार करिती हा विचार ।
परिविठ्ठलु अपरंपर न कळे रया ॥१॥
संताचे संगति प्रेमाच्या कल्लोळा ।
आनंदें गोपाळामाजिं खेळे ॥२॥
बाळे भोळे भक्त गाताती साबडें ।
त्यांचें प्रेम आवडे विठोबासी ॥३॥
बापरखुमादेविवरु परब्रह्मपुतळा ।
तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मवाचकप्रणव हा अकार, उकार, मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण’अमात्र’ परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही. म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संताच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळांत आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भाळे भोळे भक्त प्रेमाने भगवन्नाम साबडे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात.
२२२
शर्करेची गोडी निवडावया भले ।
साधु निवडिले सत्संगती ॥१॥
सत्संगे प्रमाण जाणावया हरी ।
येर ते निर्धारी प्रपंचजात ॥२॥
भानुबिंब पाहा निर्मळ निराळा ।
अलिप्त सकळ तैसे साधु ॥३॥
ज्ञानदेव हरि जपोनि निर्मळ ।
सदा असे सोज्वळ निवृत्तिसंगें ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याची गोडी निवडण्याचा अधिकार महान महान संतांनाच आहे. म्हणून हरिला ओळखण्यांला एक सत्संगतीच पाहीजे. इतर लोंक असले तरी त्यांना प्रपंचाची माहिती असेल. पण श्रीहरिची ओळख करून देणारे एक साधुच आहेत. जसे पाण्यांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलें तरी सूर्य त्याहून अलिप्त आहे. त्याप्रमाणे साधुसंत प्रपंचात वागत असूनही अलिप्त असतात. श्रीहरीच्या जपाने मी निर्मळ होऊन अत्यंत पवित्र अशा निवृत्तीरांयाच्या संगतीत सदा आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२२३
सोळा कळि चंद्र पूर्णिमे पूर्ण बोधु ।
संतजना उद्वोधु सागरन्यायें ॥१॥
नित्यता पूर्णिमा ह्रदयीं चंद्रमा ।
आलिंगन मेघश्यामा देतु आहे ॥२॥
ज्ञानदेवा मोहो नि:शेष निर्वाहो ।
रुपीं रुप सोहं एका तेजें ॥३॥
अर्थ:-
पौणीमेच्या दिवसी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण झाला असता सागराला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे श्रीहरिस पाहता संतांच्या हृदयरुपी सागरास भरती येते. नित्य परिपूर्ण परमात्मा जो मेघश्याम श्रीहरि तो ज्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य उदित आहे त्यास अंतःकरणवृत्ति अलिंगन देण्याकरिता सागराप्रमाणे उचंबळुन येते. माझ्या ठिकाणचा देह अहंकार व मोह निःशेष जाऊन परमात्मस्वरुपाचा सोहं भावाचा उदय झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
२२४
खळें दान देसी भोक्तया सांपडे ।
ऐसें तुवां चौखडें रुप केलें ॥१॥
ज्ञान तेंचि धन ज्ञान तेंचि धान्य ।
जालेरें कारण ज्ञानदेवा ॥२॥
तळवटीं पाहे तंव रचिलें दान अपार ।
वेदवक्ते साचार बुझावले ॥३॥
सा चार आठरे भासासी ।
उपरति भूसि निवडली ॥४॥
मोक्ष मुक्ति फ़ुका लाविली
तुंवा दिठि ।
तुझा तूं शेवटीं निवडलासी ॥५॥
निवृत्ति केलें तुवां ज्ञाना ।
ब्रह्मीब्रह्म अगम्या रातलासी ॥६॥
अर्थ:-
खळेदान (खळ्यात सांडलेले धान्य गरिहांना उचलायला देतात)दिल्यावर शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांत विशेष कांही नसले तरी गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढून आपला चरितार्थ सुखाने चालवितात. त्याप्रमाणे मी सहज केलेल्या उपदेशातील वाच्यभाग टाकून लक्ष्यभाग जो शुद्ध आत्मस्वरूप ते प्राप्त करून घेतले.अरे आत्मतत्त्वाच्या दृष्टीने विचार केला तर तुझ्या ठिकाणी धन धान्य सर्व आत्मरूपच झाले आहे. तळवटी म्हणजे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान परमात्मस्वरूपाचे ठिकाणी, परमात्म दृष्टीने पाहीले तर त्याचे ज्ञान लोकांना देणे हे अपार दान आहे. ही गोष्ट सत्यत्वाने वेदवेत्त्यांनाच पटणार. प्रपंचरूप भुसामध्ये षट्शास्त्रे चार वेद व अठरा पुराणे यांच्यातील कर्म उपासना भाग हे भूसकट टाकून देऊन त्यातील मुक्ती हे धान्य आमच्या सांगण्याप्रमाणे तुझे तुच निवडुन घेतलेस व ते लोकांना फुकटच दिली. निवृत्तिनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा, असे हे सर्व शास्त्रांचे मंथन करून तु ज्ञान संपादन केलेस.त्यामुळे माझ्या सांगण्याला प्रामाण्य लाभले. असा तूं अगम्य ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी रममाण झालास हे तूं फार चांगले केलेस. असे माऊली सांगतात.
२२५
आवेगे ज्ञानजननी ज्ञाना आईगे ।
ज्ञाननाथेगे ज्ञानें कामधेनु तूं माझीयेगे ॥१॥
ज्ञानई तूं माय माझीगे ।
ज्ञानाई तूं बाप माझागे ॥२॥
ज्ञानाई गुरुदेव ज्ञान ध्यान ।
साधन परत्रपावन ॥३॥
इह तुजवांचून आन मज कोणगे ।
बाई नुपेक्षीगे ज्ञानबहिणी ॥४॥
राउळीचे कर्हे हारपले हाटीं ।
माणुसप्रति झाडा घेताती वोठी ॥५॥
नवल विपरीत देखिलें सृष्टीं ।
माणुसप्रति झाडा येतातिवोटी ॥६॥
२२६
उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥
आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट ।
भेणें जाहले दिप्पट । पळति थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा कंठी । गोपीचंदनाच्या उटी ।
सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रदयकमळीं ।
शांति क्षमा तया जवळी । जीवेंभावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचे हातियेर । शंख चक्राचे श्रृंगार ।
अतिबळ वैराग्याचे थोर ।केला मार षड्रवर्गां ॥५॥
ऐसें एकांग वीर । विठ्ठल रायाचें डिंगर ।
बाप रखुमादेवीवर । तींही निर्धारी जोडिला ॥६॥
अर्थ:-
या अभंगांत भगवत् भक्तांची लक्षणे सांगतात ज्यांच्या खांद्यावर उंच पताका झळकतात. टाळ मृदंग वाजतात असे ते पवित्र विठ्ठलाचे भक्त आनंदाने भगवन्नामाची गर्जना करतात. हरिच्या भक्तिने नटलेले विठ्ठलाचे वीर आलेले पाहून दोषांचे समुदाय दशदिशेला पळून गेले. ज्यांच्या गळ्यांत तुळशीच्या माळा शोभतात. ज्याच्या अंगाला गोपीचंदनाची उटी आहे. अशा वैष्णवाला पाहून कोट्यवधी विघ्ने बारा वाटा पळून जातात. त्या वैष्णवांच्या हृदयरुपी कमलांत भगवान श्रीकृष्णाची सांवळी मूर्ति खेळत असल्यामुळे शांति क्षमा आपल्या जीवभावाने त्याच्या जवळ येऊन राहिल्या. वैष्णव वीरांच्या हातातली शस्त्रे म्हणजे भगवन्नामाची सहस्रनामे असून त्यांचे शंख चक्र हे शृंगार तसेच वैराग्याचे बळ त्यांच्या अंगात असल्यामुळे काम क्रोधादि षड्वर्गाचा त्यांनी नाश केला आहे. वैष्णववीरांनी आपले शरीर फक्त परमात्म्याकरिताच अर्पण केले आहे. असे विठ्ठलरायाचे आवडते शूर भक्त त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना निर्धाराने आपलासे करुन घेतले. असे असे माऊली सांगतात.
२२७
कुंचे पताकाचे भार । आले वैष्णव डिंगर ।
भेणें पळती यमकिंकर । नामें अंबर गर्जतसे ॥१॥
आले हरिदासांचे थाट । कळिकाळा नाहीं वाट ।
विठ्ठलनामें करिती बोभाट । भक्तां वाट सांपडली ॥२॥
टाळ घोळ चिपळिया नाद । दिंडि पताका मकरंद ।
नाना बागडियाचे छंद । कवच अभेद नामाचें ॥३॥
वैष्णव चालिले गर्जत । महावीर ते अद्रुत ।
पुढें यमदूत पळत । पुरला अंत महादोषा ॥४॥
निवृत्ति संत हा सोपान । महा वैष्णव कठीण ।
मुक्ताबाई तेथें आपण । नारायण जपतसे ॥५॥
ज्ञानदेव वैष्णव मोठा । विठ्ठल नामें मुक्तपेठा ।
स्त्रान दान घडे श्रेष्ठा । वैकुंठ वाटा संत गेले ॥६॥
२२८
पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं ।
तें मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं ।
भेटी जाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरें ।
यांते भेटावया मन न धरे ॥३॥
एक एका तीर्थाहूनि आगळे ।
तयामाजि परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासि धनलाभु जाला ।
जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स विघडलिया धेनु भेटली ।
जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥६॥
हें पियुष्या परतें गोड वाटत ।
पंढरिरायाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
संत भेटतां भवदु:ख फ़ीटलें ॥८॥
अर्थ:-
मी मागील अनंत जन्मामध्ये थोर पुण्यकर्मे केली होती. ती आज मला फलद्रूप झाली? कशाहून म्हणाल तर संताची भेट होऊन त्यांच्या कृपाप्रसादाने माझ्या अंतकरणांत परमानंदाचा लाभ झाला. त्यामुळे व्यवहारांत आई, बाप, इष्ट मित्रयांच्या भेटी व्हाव्यात असे माझ्या मनांतसुद्धा येत नाही कारण त्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद क्षणिक असतो. संताचा अधिकार काय सांगावा? तो गंगा, यमुनादि तीर्थाहूनही मोठा आहे. कारण संतांच्या समुदायांत भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष असतो. त्या परमात्म्याचा आनंद किती विलक्षण आहे म्हणून सांगावे. एका दरिद्रयाला एकाएकी धन मिळावे, किंवा मेलेल्याच्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रगट व्हावा, या गोष्टी न घडणाऱ्या तरं खऱ्याच पण जर घडून आल्यातर त्यास काय आनंद वाटेल. ज्याप्रमाणे आपल्या आईची ताटातूट झालेल्या वासराला आई भेटावी किंवा हरणीस चुकलल आपले पोर भेटावे म्हणजे त्यांना जसा आनंद होतो. त्या प्रमाणे मला आनंद प्राप्त झाला आहे. या पारमार्थिक आनंदाचे माधुर्य अमृतापेक्षाही जास्त आहे. माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे भक्त जे संत त्यांची आज मला भेट झाली. त्या भेटीनेच माझे संसारदुःख निवृत्त झाले. म्हणूनच म्हणतो की. आजपर्यंत अनेक जन्मांत जी मोठमोठी पुण्य कमें केली ती आज मला फलद्रूप झाली. असे माऊली सांगतात.
२२९
आजी सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरी पाहिलारे हरी पाहिलारे।
सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळीं ।
विराजीत वनमाळी ॥३॥
बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥
कृपासिंधु करुणा कर ।
बापरखुमादेविवर ॥५॥
सदगुरु निवृत्तीनाथाचे प्रसादानें प्राप्त।
झालेल्या स्थितीचा विचार।
अर्थ:-
आजचा दिवस सोन्याचा आहे. आज अमृताचा पाऊस बरसला असे मला वाटते. कारण आज, मला हरिचा साक्षात्कार झाला आहे. तो अंतरबाह्य सर्वव्यापी आहे. त्याची मूर्ति विटेवर आहे. असा वनमाळी सुशोभित दिसतो. धन्य आहे तो संतसमागम कि ज्या संताच्या संगतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रगट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते दयेचासमुद्रच असून भक्तावर कृपा करणारे आहेत. असे माऊली सांगतात.
२३०
कापुराचे कळीवर अनळाचा मरगळा ।
भेदोन द्वैताचा सोहळा केविं निवडों पाहे ॥१॥
बोलु अखरीच वळला भीतरी नाहीं आला ।
तो केविं विठ्ठला पावेजी तुम्हां ॥१॥
मन बुध्दीसी जें आद्य तयासी जें वेद्य ।
कळिकाळा कवळेना संधि जडोनि जाये ॥३॥
वाचाळपणें परा येवो न ल्हाये दातारा ।
अनुभवो भीतरा बाहेजु वेडावला ॥४॥
निरयदृष्टी ती खोली येऊनी राहे बुबुळीं ।
लवण ठाव घेऊनी जळीं केवि निवडों पाहे ॥५॥
निवृत्तिदासु तेथें निवृत्ति करुनी पातें ।
श्रीगुरुनिवृत्तिनाथें पुढें केलें ॥६॥
अर्थ:-
कापुराचे शरीर करुन जर त्याला अग्नी लावला तर ते शरीर अग्नीशी एकरुप होते. मग हा कापूर व हा अग्नी असा भेदभाव कसा निवडावा. शब्द हे केवळ अक्षररुपच असतात. ते केवळ अक्षराच्या योगाने अंतःकरणांत प्रगट होत नसतात. मग अशा विठ्ठलाला तुम्ही कसे पोहोचाल. मन बुद्धीला आद्य असून त्याचेकडून जे प्रकाशले जाणार ते कळीकाळालासुद्धा आकलन न होता त्यालाही सोडून पलीकडे जाते. तो परमात्मा केवळ शब्दाच्या वाचाळपणाने प्राप्त होत नाही. अनुभव झाला तरच तो अनुभव अंतर्बाह्य व्यापून साधक वेडावून जातो. स्वच्छ झालेली दृष्टी ती खोल ज्ञानरुपी बुडांत येऊन राहते. मिठाच्या खड्याने जर जळाचा ठाव घेतला तर त्याला वेगळा कसा निवडून काढावा कारण तो पाणीरुपच होतो. त्या प्रमाणे परमात्माचा अनुभव व घेण्याला निघालेला मुमुक्ष परमात्मरूप होतो. तो त्याच्याहून भिन्न राहत नाही. श्रीनिवृत्ति प्रसादानें प्राप्त झालेली स्थिति, माझ्या निवृत्तिनाथांनी माझ्यावर कृपादृष्टी करुन वरील दृष्टांताप्रमाणे निःसंशय परमात्मरुप केले. असे माऊली सांगतात.
२३१
व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता
कल्पना नुरोचि तेथें आतां ॥१॥
पाहाणियाचा प्रपंचु पाहता ।
निमाला कवणा बोलु ठेऊं आतां ॥२॥
दुजें ह्मणो जाय तंव मी माजी हारपे ।
नवर्णवे तुझी सत्ता रया ॥
गोडियेचें गोडपण गोडि केविं मिरवे ।
तुजमाजी असतां ते वेगळीक रया ॥३॥
निशीं जागरणीं निमाला कीं तंतुचि तंतीं आटला ।
रसीं रसु दुणावला तुझ्या ठाई ॥४॥
तेथें कल्पनेसि मूळ विरोनियां पाल्हाळ ।
तैसें उभय संदीं तूं विदेहीरया ॥५॥
या लागीं बापरखुमादेविवरु विठ्ठलु
उदारु दिठीचे दिठीं माजी अंजन ।
सुखीं सुख दुणावलें चौघा पडिले मौन्य ।
येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनियां सकळ ।
डोळ्यांविण दिठी प्रबळ रया ॥६॥
अर्थ:-
व्यक्ताव्यक्त अशा परमात्मस्वरुपावर पुष्कळ वेळ दृष्टि ठेवली असता त्याठिकाणी कल्पनाच उरत नाही? विचार करता करता पाहाणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा. परमात्मा आपल्याहून निराळा आहे. असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथें हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेच वर्णन करता येत नाही. आनंदरुप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरुप आहे असे कसे सांगता येईल? अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करु शकेल. ज्याप्रमाणे पटांत तंतू आटतात. त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ति आदि भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरुप तुझ्या ठिकाणी रसरुप आनंद दुणावला आहे.कल्पनेचे पाल्हाळ तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्य बोधांत तूं विदेही आहेस? माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यांत घातले. तर ब्रह्मसुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुखस्वरुप स्थिती होईल. ज्याच्या स्वरुपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मस्वरूपाविषयी निवृत्तिरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वांचून माझी ज्ञानदृष्टि प्रबल केली.असे माऊली सांगतात.
२३२
अनुभव खुण मी बोले साजणी ।
निरंजन अंजन लेईलें अंजनी ॥१॥
गुरुमुखें साधन जालें पै निवृत्ति ।
तत्त्वसार आपणचि जाली निवॄत्ति ॥२॥
बापरखुमादेंविवरा विठ्ठल कृपाचित्तें ।
पुंडलिका साधलें प्रेम तत्त्वार्थे ॥३॥
अर्थ:-
परमात्मसुखाचा अनुभव मला आला आहे. त्याची खूण मी सांगते. ती अशी निरंजन जो परमात्मा हेच एक अंजन मी आपल्या डोळ्यांत घातले. त्याला श्रीगुरुनिवृत्तिरांयाच्या मुखांतून आलेल्या उपदेशाचे सहाय्य झाले. म्हणजे त्यांच्या उपदेशाने सारभूत परमात्मतत्त्व मीच झाले. व सर्व अनात्म धर्मापासूनही निवृत्त झाले.माझ्याचप्रमाणे माझे पिता व रखुमाईचा पती जे दयाघन श्रीविठ्ठल ते प्रेमामुळे तत्त्वार्थाने पुंडलिकासही प्राप्त झाले असे माऊली सांगतात.
२३३
पदोपदीं निजपद गेलें वो ।
कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥
तेथें आपुलें नाठवे कांहीं वो ।
आपाआपणा न संपडे डाईवो ॥२॥
श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो ।
नव्हे तें ठाउकें पडिलें माय वो ॥३॥
अर्थ:-
क्षणोक्षणी परमात्मचिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे. मी परमात्मपदाला प्राप्त झाले. व त्या बोधाने माझे बरेवाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले.त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्मभाव नाहीसा होऊन गेला. इतकेच काय देहात्मभाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही.याला कारण श्रीगुरु निवृत्तिरांयाची कृपा त्या कृपेनेच मला ब्रह्मात्मबोध झाला. त्यामुळे आतापर्यंत माहित नसलेला परमात्मा मला कळला. असे माऊली सांगतात.
२३४
इवलेंसें रोप लाविलें द्वारीं ।
त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला ॥
फ़ुलें वेंचिता अतिभारुकळियांसि आला ॥२॥
मनाचिये गुंती गुंफ़ियेला शेला ॥
बापरखुमादेविवर विठ्ठलीं अर्पिला ॥३॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाच्या दारांत इवलेसे रोप म्हणजे कल्पित मायेचा अंगीकार केला. हेच कोणी एक मोगऱ्याचे रोप लावले. अशी कल्पना करुन त्या रोपाचा वेल जी गगनादि सृष्टि ती अति वाढली? त्या मोगऱ्याच्या वेलाची फुले म्हणजे सुखदुःखे हे वेचित असता म्हणजे भोगीत असता मागिल संचिताच्या जोराने नवीन कोट्यवधी देहाच्या कळ्या त्याला आल्या.असा बाई विस्तार करुन श्रीगुरुंच्या सहाय्याने व मनाच्या युक्तिने त्या सर्व फुलांचा एक शेला करुन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना अर्पण केला.
दुसरा अर्थ असा की.परमार्थाला लागल्यानंतर नामस्मरणाचे लहानसे रोप परमात्म्याच्या दारांत लावले. पण त्याचा विस्तार एवढा झाला की. तो वेल चिदाकाशा पर्यंत वाढत गेला. त्याला ब्रह्मसुखाची फुले आली. ती ब्रह्मसुखाची फुलें जितकी घ्यावी तितकी अधिकच येऊ लागली. सदानाम घोष करु हरिकथा’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सर्वसुख ल्यालो सर्व अलंकार’ अशी सुखाची फुले त्या मोगऱ्याच्या लहानशा रोपाला म्हणजे नामस्मरणाला आली ती फुले मनाच्या दोऱ्यांत गुंफुन त्याचा सुंदर असा शेला तयार करुन माझे पिता व रखुमादेवीवर श्रीविठ्ठलाला मी अर्पण केला. असे माऊली सांगतात.
२३५
प्रकृतीचें पूजन प्राप्तिविण जाण ।
प्राप्ति सिंचन दोन्हीं वायां गेलीं ॥१॥
पूजन कवणा करुं सिंचन कवणा करुं ।
नाहीं नव्हे तें धरुं गुरुमुखें ॥२॥
रखुमादेविवर गुरुमुखा भ्याला ॥
होता तो लपाला नाहीं ते ठाई ॥३॥
अर्थ:-
प्रकृति पूजन म्हणजे माया कार्य जो प्रपंच त्याचा सत्यत्वबुद्धीने आजपर्यत केलेला आदर फळावांचून फुकट गेला त्या प्रपंचाची प्राप्ती आणि त्याच्याविषयी केलेला आदर परमार्थदृष्टिच्या विचाराने दोन्ही फुकट गेली. परमात्मदृष्टिच्या विचारांत द्वैत प्रपंचाचा स्वीकार किंवा त्याच्या विषयी आदर करण्याला जागाच नाही. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रंपचाचा अभाव होतो. ते परमात्मस्वरुप गुरुमुखाने प्राप्त झालेले मनांत धरु. रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल. ते गुरुमुखाने सांगितलेल्या निर्गुण स्वरुपाला भिऊन सगुण झाले. ते पुन्हा निर्गुण झाले असे माऊली सांगतात.
२३६
जन्मा आवर्ती येरझारी फ़िटली ।
ब्रह्मसमदृष्टी जाली गुरुमुखें ॥१॥
भागल्याचा सिणु भागल्यानें नेला ।
भाग्योदय जाला भाग्येविण ॥२॥
रखुमादेविवरु भाग्यें जोडला ।
जोडोनी मोडला कांहीं नव्हतेपणें ॥३॥
अर्थ:-
जन्ममरणाच्या भोवऱ्यात होणारी माझी येरझार फिटली. कारण श्रीगुरूमुखाने ब्रह्मस्वरूपामध्ये समदृष्टि झाली. जन्ममरणाच्या फेऱ्यांत ज्याला श्रम झाल्याचा सीण झाला होता.त्याच्याकडूनच तो नाहीसा झाला. व्यवहारांत ज्याला भाग्य म्हणतात. त्याहून निराळ्या पारमार्थिक भाग्याचा उदय झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते भाग्याने जोडले व त्या जोडण्याने तात्विक नसलेला संसारधर्म नाहीसा झाला असे माऊली सांगतात.
२३७
दृश्यादृश्य नातळे स्थूळ प्रपंचभान ।
तेथें मायेचें कारण हेत नाहीं ॥
म्हणोनि ज्ञानविज्ञान कल्पना लक्षण ।
तेथें सुखासि सुख जाण भोगिताहे ॥१॥
नामावांचुनि संवादे निवृत्ति अभेदपदें ।
निज भजनीं स्वानंदें नवल पाहे ॥२॥
तेथें दिवस ना रात्री सर्वहेतुविवर्जितु ।
स्वयंभासक तूं नवल त्यांचें ॥
चिन्मय ना चिन्मात्र वेद्य सर्वगत ।
स्वसंवेद्य साक्षभूत ।
आपणवासीं ॥४॥
स्वसंवेद्य सन्मुखता भेदु नाहीं आतां ।
भक्ति आणि परमार्था हेंचि रुप ॥५॥
निवृत्तिप्रसादें संपर्केसि बोध ।
नीत नवा आनंद ज्ञानदेवा ॥६॥
अर्थ:-
दृश्य, अदृश्य स्थूल प्रपंच ज्याठिकाणी (परमात्म) भान होत नाही. तेथें माया मानण्याचे तरी कारण काय? मग ज्ञान विज्ञान लक्षण ही कल्पना कोठून आणावी? सर्व सुखाचा सुख परमात्मा त्याचाच उपभोग भोगणारा जीव होतो. नाम व नामी यांचा अभेद सर्वत्र आहे. त्या नामाचा संवाद निवृत्तिनाथ करीत आहे. त्या आत्मचिंतनरूपी भजनाचा आनंद श्रीगुरू निवृत्तीनाथ आम्हाला देत आहेत हेच मोठे नवल आहे. दुसरे नवल असे की त्या स्थितित दिवस किंवा रात्र किंवा कोणाचाही हेतु नसून तेच पद तूं केवळ स्वयंप्रकाश असल्यामुळे चिन्मय किंवा चिन्मात्र हे धर्म तुझ्या ठिकाणी नाही सर्वगत असणारे वेद्य जे परमात्मतत्त्व स्वसंवेद्य साक्षीभूत ही आपणच आहे. स्वसंवेद्य सन्मुख असता भेद शिल्लक राहात नाही. अशा तऱ्हेचा अद्वैत बोध होणे, हीच भक्ति असून खरा परमार्थ हाच आहे. निवृत्तीरायांच्या कृपेमुळे हा बोध आम्हाला प्राप्त झाला आणित्यामुळे आम्ही नित्यनवा असा ब्रह्मानंद भोगित आहोत असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२३८
अंतरींच्या सुखा नाहीं पै मर्यादा ।
यापरि अगाधा होऊनि खोल ॥१॥
तेथें गोविंदु आवघाचि जाला ।
विश्व व्यापुनिया उरला असे ॥२॥
बाह्यअभ्यंतरी नाहीं आपपार ।
सर्व निरंतर नारायण ॥३॥
मी पण माझें न देखे दुजे ।
ज्ञानदेवो म्हणे ऐसें केलें निवृत्तिराजे ॥४॥
अर्थ:-
मन बुद्धि आदि च्या आंत असणारा जो आत्मा त्याच्या सुखाला मर्यादा नाही. याप्रमाणे जो समजण्यास अत्यंत कठीण तो गोविंदरूप होऊन विश्व व्यापूनही उरला. आता त्याचे ठिकाणी बाह्य नाही व अंतरही नाही आपपरभाव नसून निरंतर नारायण स्वरूप आहे. माझ्या निवृत्तिरायांनी माझ्याठिकाणचा आपपरभाव नाहीसा करून टाकला. त्यामुळे मला या जगांत त्या परमात्म्याशिवाय दुसरे काही एक दिसत नाही. असे माऊली सांगतात
२३९
लेउनि अंजन दाविलें निधान ।
देखतांचि मन मावळलें ॥१॥
ऐसिया सुखाचे करुनियां आळें ।
बीज तें निर्मळ पेरी आतां ॥२॥
ज्ञानाचा हा वाफ़ा भरुनियां कमळीं ।
सतरावी निराळी तिंबतसे ॥३॥
निवृत्ति प्रसादें पावलों या सुखा ।
उजळलीया रेखा ज्ञानाचिया ॥४॥
अर्थ:-
श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझ्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून परमात्मतत्त्वरूपी निधान दाखवले. ते पाहाताच मनाचा मनपणा गेला. आणि परमानंद झाला. त्या परमानंदाचे आळे करून आता त्यांत निर्मळ बीज पेरू. हा ज्ञानाचा वाफा हृदयकमळांत भरून निरालंब आत्मस्थिति जिला सतरावी कला म्हणतात ती तुडुंब भरू.मी या सुखाला श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने प्राप्त झालो. आणि जवळच असलेले ज्ञान उजळले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२४०
मी माझें द्वैत अद्वैत होउनि ठेलें ।
सदगुरु एका बोलें ठेविलें ठायीं ॥१॥
द्वैत गिळी अद्वैत मेळीं ।
चित्ताची काजळी तोडी वेगीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदार ।
दीपीं दीप स्थिर केला सोयी ॥३॥
अर्थ:-
एका सद्गुरूच्या महावाक्यउपदेशाने माझ्या ठिकाणचे मी व माझे द्वैत नाहीसे होऊन मला अद्वैत स्थिति प्राप्त झाली. माझ्या चित्तातील ही द्वैताचे अज्ञान त्या गुरुवचनाने तोडून टाकले. असे माझे श्रीगुरू निवृत्तिराय फार उदार आहेत. त्यांनी माझ्या ठिकाणची आत्मज्योति परमात्मरूप ज्योतिमध्ये एकरूप केली. माऊली ज्ञानदेव सांगतात.
२४१
अनंत अनंता परी देखतां अंतरीं ।
ह्रदयाभींतरीं मज निववितो माये ॥१॥
चाळवी चक्रचाळ अलमट गोपाळ ।
यानें केला सुकाळ सहज सुखाचा वो माये ॥२॥
सांगवी ते सांगणी उमगूनि चक्रपाणी ।
त्या निर्गुणाचे रहणी मी रिघालें वो माये ॥३॥
भ्रांतिभुली फ़ेडूनियां निवृत्ति ।
रखुमादेविवरु विठ्ठलीं गती जाली वो माये ॥४॥
अर्थ:-
जगांत अनंतरूपाने नटलेला श्रीहरि अंतःकरणांत पाहिला असता तो हृदयांतील संसाराची तळमळ शांत करतो. हे जगत चक्र चालविणारा पोरकट स्वभावाचा श्रीगोपाळकृष्ण याने सहज असणाऱ्या आत्मानंदाचा सुकाळ केला. जीवांच्या आत्यंतिक कल्याणाचा जो योग्य उपदेश केला पाहिजे तोच उपदेश हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण करतो. त्या उपदेशाने मी निर्गुण परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी रिघाले व त्याने संसाराची सत्यत्व भ्रांती नाहीसी होऊन श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपेने माझे पिता व रखुमादेवी पती जे श्रीविठ्ठल, त्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी माझी गति सहज झाली. असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२४२
पंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे ।
तें मज अंगविजे ऐसें निवृत्तीं केलें वो माये ॥१॥
सहज बोधें बोधलें न विचारीं आपुलें ।
म्हणोनियां मुकलें अवघ्यांसी वो माय ॥२॥
पांचाहूनी परती मी जाहालिये निवृत्ति ।
चिदानंदीं सरती स्वरुपीं वो माये ॥३॥
ऐसें जाहलें चांग अचिर देवांग ।
रखुमादेवीवरें पांग फ़ेडिला वो माये ॥४॥
अर्थ:-
सांख्य शास्त्रामध्ये चोवीस तत्त्वे मानतात त्या चोवीस तत्त्वाहून जो पंचविसावा पुरूष म्हणजे वेदांतमतांत आत्मा हेच मुख्य तत्त्व आहे. ते मला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी अंतःकरणांत जाणून दिले.आणि ते परमतत्त्व सहज व अखंड बोधरूप आहे. असा बोध मला सहज झाला. म्हणून माझ्याहून भिन्न आपले असे म्हणण्यास अवकाशच नसल्यामुळे मी सर्वास मुकलो. मी पंचमहाभूताच्या कार्यापासून निवृत्त होऊन सच्चिदानंदरूपी एकरूप होऊन गेलो. श्रीगुरूनी कृपा केल्यावर व माझी पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी कृृपा केल्यावर अचिर म्हणजे ताबडतोब मी देहभाव, परमात्मरूप होऊन गेलो. अशा रितीने माझ्या अनेक जन्माचा पांग फिटला. असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२४३
साध्यसाधनकाज निवृत्तिचें गुज ।
केशव सहज सर्वंभूतीं ॥१॥
रामकृष्ण मंत्रें प्रोक्षियेलीं गात्रें ।
हरिरुप सर्वत्र क्षर दिसे ॥२॥
गुरुगम्य चित्त जालें माझें हित ।
दिनदिशीं प्राप्त हरि आम्हां ॥३॥
पूर्णिमाप्रकाशचंद्र निराभास ।
हरि हा दिवस उगवला ॥४॥
चकोरें सेवीति आळीउळें पाहाती ।
घटघटा घेती अमृतपान ॥५॥
ऐसें हें पठण ज्ञानदेवा जालें ।
निवृत्तीनें केलें आपणा ऐसें ॥६॥
अर्थ:-
निवृत्तिरायांनी जे गुह्यज्ञान मला दिले ते ज्ञान मी माझे साध्य व साधन ठरविले. त्या योगाने परमात्मा सर्वाभूती भरला आहे. असे मला सहज कळले. त्या गुह्यज्ञानरूप मंत्राच्या योगाने माझी गात्रे अभिमंत्रित होऊन डोळ्यांना जिकडे तिकडे हरीचे रूपच दिसू लागले. गुरूपासूनच केवळ प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा मला लाभ झाल्यामुळे हरि रात्रंदिवस माझ्या जवळच राहिला. पूर्णिमेच्या चंद्राला जसा अत्यंत निर्मळ प्रकाश असतो. त्याप्रमाणे हरीचे रूप माझ्या अंतःकरणांत स्पष्ट दिसू लागले. ज्याप्रमाणे चकोर पक्षी मोठ्या प्रेमाने चंद्रकिरणातील अमृत घटघटा पितात. त्याप्रमाणे निवृत्तिरायांनी मला ज्ञान देऊन आत्मसात केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२४४
अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी ।
शांति दया सिध्दि प्रगटल्या ॥१॥
वोळली हे कृपा निवृत्ति दयाळा ।
सर्व रोम पाल्हाळा प्रेमांकुर ॥२॥
दिवसाचें चांदिणें रात्रीचें उष्ण ।
सागितला प्रश्न निवृत्तिराजें ॥३॥
सोहंसिध्दमंत्रें प्रोक्षिलासंसार ॥
मरणाचि येरझार कुंठीयेली ॥४॥
चित्तवित्तगोत आपण पैं जाला ।
देहीं देहभाव गेला माझा ॥५॥
ज्ञानदेवा रसिं स्त्रान दान गंगे ।
प्रपंचेसी भंगे विषयजात ॥६॥
अर्थ:-
अवयवासी व्याप्त होऊन सावयव दिसणारा परमात्मा बुद्धीत साम्यरूपाने प्रगट झाल्यामुळे शांति,दया, अष्टसिद्धी माझ्या ठिकाणी आपोआप प्रगट झाल्या सर्वांग रोमांचित झाले. आणि किंचित् धर्मबिंदही आले. हे सर्व निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने झाले. दिवसाचे चांदणे व रात्रीचे ऊन या चमत्कारिक पद्धतीने निवृत्तीरायांनी मला प्रश्न प्रतिवचन रूपाने उपदेश केला. सोहं सिद्धी मंत्राने संसार शुद्ध केला. त्यामुळे माझी जन्ममरणाची येरझार खुटींत झाली. काय चमत्कार सांगावा माझे चित्त वित्त गोत निवत्तीराय आपणच झाला त्यामुळे देहाच्या ठिकाणचा देहभावही नाहीसा झाला. ब्रह्मरसाच्या गंगेत स्नान दान घडल्यामुळे माझा सर्व प्रपंच विषयासह वर्तमान पर होऊन गेला.असे माऊली सांगतात.
२४५
अरे अरे ज्ञाना झालासि पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासि चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति आपणासकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥
निवृत्ति परमअनुभव नेमा ।
शांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा तुझे तुलाच ब्रह्मरूपाने ध्यान कसे करावे हे कळले म्हणून तू फार पवित्र झाला आहेस. तुझा देव व तुझा भाव तुझा तूंच आहेस. तुझा सर्व संदेह जाऊन अद्वैततत्त्वाविषयीचा तुझा सर्व संदेहनष्ट झाला आहे.मनाला मरड घातल्यामळे तझ्या चित्तांत बोध उत्पन्न झाला. आता तुला परमात्मव्यतिरिक्त रिते असे काही दिसत नाही.दिव्यांत जसे दिव्यातले तेज मावळावे त्याप्रमाणे सर्व वृत्ति मनातल्या मनात नाहीशा होऊन परमात्म तत्त्वाच्या ज्ञानावर अंतःकरणवृत्ती उत्पन्न होऊन सर्व प्रपंच्यांत गेल्या. परमात्म तत्वाच्या ज्ञानावर अंतकरण वृत्ती उत्पन्न होऊन वावरणारी वृत्ती ज्ञानशून्य होऊन गेली. अंतःकरणाची वृत्ति जीवभावासकट नाहीशी झाल्यामुळे सर्व त्रैलोक परमात्मरुप झाले.निवृत्तीरायांच्या या परम अनुभवाच्या शिकवणीने मला शांती क्षमा दी पूर्ण प्राप्त झाल्या असे माऊली सांगतात
२४६
परेसी जंव पाहे तंव दिसे हें अरुतें ।
तळीं तळाखालतें विश्वरुप ॥१॥
दिव्य चक्षूदृष्टि निवृत्तीनें दिधली ।
अवघीच बुझाली विष्णुमाया ॥२॥
शम दम कळा दांत उदांत ।
शंतित्तत्त्व मावळत उपरमेसी ॥३॥
रयनि दिनमणी गगनासकट ।
अवघेची वैकुंठ तया घरीं ॥४॥
उध्दट कारण केलें हो ऐसें ।
तुष्टोनि सौरसें केलें तुम्हीं ॥५॥
ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा ।
कांसवीचा पान्हा पाजीयेला ॥६॥
अर्थ:-
परा म्हणजे ज्ञानरूप वाणी तिच्या सहायाने विश्वाचा विचार करू गेले तर हे विश्वरूप निकृष्ट दिसते. कारण तळी म्हणजे परमात्मस्वरूपावरील माया तिच्यावर हे विश्वरूप दिसते. परम भाग्याने श्रीगुरू निवृत्तीरायांनी मला दिव्य दृष्टी दिली म्हणून ही परमात्मस्वरूपांवर असलेली माया सर्व नष्ट होऊन गेली. त्याबरोबरच शमदमादि कला आणि उदात्त अनुदातादिकांनी युक्त जो वेद ते शांतीतत्त्व म्हणजे परमात्मतत्त्वांत उपरमासह मावळले आकाशासह सूर्य मावळून माझ्या घरी तुम्ही सर्व वैकुंठच केले. हे श्रीगुरू निवत्तीराया आपण माझ्यावर संतुष्ट होऊन केवढे मोठ हे महत् कार्य केले. त्याचे वर्णनच करता येत नाही. कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे प्रेमपान्हा पाजणारे जे श्रीगुरूनिवृत्तिराय त्याच्या चरणाच्या ठिकाणी मी अनन्य भावाने शरण आलो आहे. असे माऊली सांगतात.
२४७
ऐसें हें अंडज सांगितलें देवें ।
सांगोनिया भावें गिळियेलें ॥१॥
गिळिला प्रपंच समाप्ति इंद्रियां
वैष्णवी हे माया बिंबाकार ॥२॥
निरशून्य शून्य साधूनि उपरम ।
वैकुंठीचे धाम ह्रदय केलें ॥३॥
जिव शिव शेजे पंक्तीस बैसली ।
पंचतत्वांची बोली नाहीं तेथें ॥४॥
तत्त्वीं तत्त्व गेलें बोलणें वैखरी
वेदवक्ते चारी मान्य झाले ॥५॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति तुष्टला ।
सर्वागें दीधला समबोध ॥६॥
अर्थ:-
देवानी ब्रह्मांड उत्पतीचा प्रकार सांगितल्यानंतर आत्मभावाने ते सर्व ब्रह्मांड गिळून टाकले म्हणजे बाधित केले. अर्थात ब्रह्मांडांतर्गत जीवांचा प्रपंच व त्याची इंद्रिये सर्वही गिळून टाकली. याचे मुख्य कारण हे आहे की चतुर्भुज परमात्म्याच्या ठिकाणी ज्या मायेने हे अध्यस्त ब्रह्मांड दाखविले ती माया ही परमात्मबाधा परमात्म स्वरूप झाली. कारण मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. शून्य म्हणजे जी माया तिला नाश करून ती नाहीशी झाला असता, सर्व माया कार्याचाच उपरम होतो.आणि वैकंठीचे परमात्मस्वरूपाचे निवासस्थान सहजच हृदय केले जाते. ज्याठिकाणी पंचतत्वाची भाषाच नाही त्या ठिकाणी पंचतत्वाचे कार्य के जीवेश्वर हे एकाच पक्तीला देऊन बसले मग जे त्यांच्या ठिकाणाची जीवभाव व शिवभाव जाऊन ते एक परमात्मरूप झाले हे काय सांगावयाला हवे. जीवतत्व परमात्मतत्वात एकरूप झाले हे वैखरीचे बोलणे चारी वेदाचे अध्ययन करणाऱ्या वेदवेत्त्यांनाही मान्य आहे. मला हा बोध श्रीगुरू निवृत्तीरायांनी संतुष्ट होऊन दिला त्यामुळे माझे पूर्ण समाधान झाले.असे माऊली सांगतात.
२४८
सत्त्व रज तम प्रकृती अपारा ।
याहि भिन्न प्रकारा हरी रया ॥१॥
दिसोनि न दिसे लोकीं व्यापारी ।
घटमठ चार्ही हरी व्याप्त ॥२॥
स्वानुभवें धरी अनुभवें वाट ।
तंव अवचित बोभाट पुढें मागें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची लीला ।
ते निवृत्तीनें डोळां दाविली मज ॥४॥
अर्थ:-
सत्त्व, रज तम या गुणांनी युक्त अशी जी प्रकृति ती सर्व जगाला उपादान धरण आहे. त्या प्रकृतिहून वेगळा श्रीहरि आहे. हरि घटमठात व्यापक उलट असल्यामुळे तो सर्व जगांत भासमान आहे. पण आश्चर्य हे आहे की तो कोणास कोणत्याही व्यवहारांत दिसत नाही. त्याकरिता आत्मस्वरूपाच्या विचाराची वाट धर म्हणजे सहजगत्या कसलीही अडचण न येता तुझ्या मागेपुढे असा सर्वत्र तोच तुला दिसेल. या श्रीहरिची लीला कोणालाही कळणार नाही. पण माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी मात्र ती लीला माझ्या डोळ्याला प्रत्यक्ष दाखविली. माऊली ज्ञानदेव सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२४९
देखिले तुमचे चरण । निवांत राहिलें मन ।
कासया त्यजीन प्राण आपुलागे माये ॥१॥
असेन धणी वरी आपुले माहेरी ।
मग तो श्रीहरी गीती गाईनगे माये ॥२॥
सकळही गोत माझें पंढरिसी जाण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥३॥
अर्थ:-
जिला भगवद्दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे. अशी गोपिका आपल्या मैत्रीणीला म्हणाली हे सखे, जर भगवद्दर्शन झाले नाही तर मला आपला जीव ठेवावयाचा नाही. अशा स्थितित तिला भगवंत चरणाचे दर्शन झाले तेंव्हा ती देवास म्हणते. हे श्रीकृष्णा ! तुमच्या चरणाचे दर्शन मला आज झाले. त्यामुळे माझे मन फार स्वस्थ झाले. जोपर्यंत तुमच्या चरणाचे दर्शन होत नव्हते. तोपर्यंत मी आपुला प्राण त्यागाचा विचार करीत होते. परंतु आता मी आपला प्राण काय म्हणून टाकणार. आतां मी स्वस्थ आनंदाने आपल्या माहेरी म्हणजे परमात्मा श्रीविठ्ठल याच्या स्वरूपी राहून त्या श्रीहरिच्या गुणाचे गीत गायन करीन. आता माझे सर्व गोत पंढरपुरवासी विठोबाराय एवढाच आहे असे समजा. या माझ्या बोलण्याला प्रमाण म्हणून विचाराल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची शपथ वाहून मी सांगत आहे असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२५०
तृप्ति भुकेली काय करुं माये ।
जीवनीं जीवन कैसें तान्हेजत आहे ॥१॥
मन धालें परि न धाये ।
पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥
निरंजनीं अंजन लेइजत आहे ।
आपुलें निधान कैसें आपणची पाहे ॥३॥
निवृत्ति गार्हस्थ्य मांडले आहे ।
निष्काम आपत्य प्रसवत जाये ॥४॥
त्रिभुवनीं आनंदु न मायेगे माये ।
आपेआपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुगे माये ।
देहभाव सांडूनि भोगिजत आहे ॥६॥
अर्थ:-
यथार्थ ब्रह्मज्ञानानंतरही पूर्वी असलेली सगुण भक्तिची सवय राहातेच त्याप्रमाणे या अभंगामध्ये ती सखी म्हणते मला प्राप्त झालेली परमानंदाची जी तृप्ति तिलाच सगुण परमात्म्याच्या उपासनेची भूक लागली. याला आता मी काय करणार? तहान लागली म्हणजे मनुष्य पाणी पितो. पण आता पाण्याला तहान लागली असा प्रकार आहे. माझ्या मनाला बोधाने तृप्ति झाली खरी पण उपासना करण्याविषयी अजून तृप्ति झाली नाही. म्हणून वारंवार सर्व देवादि देव विठ्ठल पुन्हा पहावा असे वाटतेच.निरंजन जो परमात्मा त्याच्या ठिकाणी भक्तिचे अंजन घालून पुन्हा आपले निधान आपणच पाहावे. काय चमत्कार हा आमच्या श्रीगुरू निवृत्तिनाथांनी ग्रहस्थाश्रम मांडला आहे ते निष्काम अपत्याला प्रसवतात. असे यथार्थ जाणले तर त्या गृहस्थाश्रमाचा आनंद त्रिभुवनांत मावत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंद परिपूर्ण भरून ओसंडत आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आत्मा असल्यामुळे त्याचा आनंद मी देहभान विसरून भोगित आहे. असे माऊली सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२५१
सांवळा सकुमार लावण्य त्रिभुवनीं ।
अवचितां आंगणीं देखिला रया ॥१॥
आळवितां नयेचि सचेतनीं अचेत ।
भावेंचि तृप्त माझा हरी ॥२॥
अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनि उभा ।
विज्ञानेसी शोभा दावी रया ॥३॥
ज्ञानदेवा सार सावळीये मूर्ति ।
निवृत्तीनें गुंति उगविली ॥४॥
अर्थ:-
सर्व त्रिभुवनांत अत्यंत सुंदर सुकुमार असा श्रीकृष्ण माझ्या अंगणांत खेळतांना मी पाहिला. त्याला जवळ येण्याबद्दल मी काकुळतीस येऊन बोलाविले. पण तो येत नाही. परमात्मस्वरूपाविषयी विचार केला तर सचेतन जीवांत असून तो अचेतनच असतो. पण त्याला एकच आवड आहे ती ही की भक्ताच्या निष्कपट भावाने तो तृप्त होऊन तो माझा श्रीकृष्ण प्राप्त होतो. अज्ञानी जीवामध्ये तो असून दिसत नाही. आणि ज्ञानी लोकांच्या अंतःकरणांत सहज येऊन अंतःकरणाच्या ज्ञानाने शोभा दाखवितो. माझ्या निवृत्तीरायांनी ज्ञान अज्ञान व विज्ञान हा गुंता उकलुन त्या श्री कृष्ण मूर्तीचे मला दर्शन घडवले असे ज्ञानदेव सांगतात.
२५२
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिध्दि पावे ॥२॥
कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजोजी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उध्दरलों गुरुकृपें ॥४॥
अर्थ:-
जीवब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीगुरूचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरूषास काय कमी आहे. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून मी संसार समुद्रांतून पार पडलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात
२५३
ब्रह्मीं ब्रह्म होणें हें तो कठीण सांगता ।
आब्रह्मीता जयाचिया सत्ता विस्तारले ॥१॥
सांगतां नये सांगावें तें काय ।
तेथील हे सोय गुरुखुणा ॥२॥
मन हें अमोलिक जरि गुंपे अमूपा ।
तरिच हा सोपा मार्ग रया ॥३॥
बापरखुमादेविवरु ब्रह्मविद्येचा पुतळा ।
तेथील हे कळा निवृत्तिप्रसादें ॥४॥
अर्थ:-
तृणकाष्टापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जग ज्याच्या सत्तेने विस्तारले आहे म्हणजे व्यापलेले आहे. अशा व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आपणच ब्रह्म कसे व्हावे. ते शब्दाने सांगता येणे कठीण आहे. तथापि जे शब्दाने सांगता येत नाही. ते सांगवे तरी कसे? तथापि ते सांगण्याला सोय फक्त श्रीगुरूकृपेचीच आहे. त्याला एकच मोठा उपाय आहे. तो हा की अमोलिक मन व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी जर गुंतले तर परमात्मस्वरूपाला पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते साक्षात् ब्रह्मविद्येचा पुतळा आहेत. त्याच्या प्राप्तीची कळा श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपाप्रसादानेच कळणार आहे. असे माऊली सांगतात.
२५४
परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी ।
आवडी गिळुनियां आतां जिवे नाहीं तुटी ॥१॥
सांगिजे बोलिजे तैसे नव्हेगे माये ।
सुमर मारिलें येणें श्रीगुरुराये ॥२॥
निवृत्ति दासास निधान दुरी ।
आवडी गिळुनि आतां जिवे नाहीं उरि ॥३॥
अर्थ:-
ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते. व वैखरीही चालत नाही. त्याच्या विषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मस्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी’ म्हणजे स्मरणही त्या श्रीगुरूरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तिरायांसी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्रीगुरूनिवृत्तिरायांचे सन्निधानही दूर गेले. म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीसी झाली. आणि जीवभावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२५५
समसुख शेजे निमोनियां काय ।
साधिलेंसे बीज निवृत्तिरायें ॥१॥
पृथ्वीतळ शय्या आकाश प्रावरण ।
भूतदया जीवन जीव भूत ॥२॥
निजीं निज आली हरपल्या कळा ।
ब्रह्मानंद सोहळा गुरुशिष्यीं ॥३॥
ज्ञानदेवी काज निरालंबी रुप ।
तळिवरी दीप सतेजला ॥४॥
अर्थ:-
श्री निवृत्तिरायांनी जे बीज प्राप्त केले, तेच साम्यसुख असून त्या शेजेवर मी निजलो आहे. शय्या पृथ्वी आहे, आकाश पांघरूण आहे. भूतदया हे जीवाचे जीवन आहे. अशा आत्मस्वरूपावर मला झोप लागली असून त्या झोपेत असणारा ब्रह्मानंदाचा सोहळा मी भोगित आहे. आपल्या स्वरूप महिमेवर प्रतिष्ठित असणे यातच माझे सार्थक आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचा प्रकाश चहूकडे व्याप्त आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२५६
रवितेजकिरण फ़ांकलिया तेज ।
उडेरे सहज तिमिर रया ॥१॥
तैसा तूं गभस्ति निवृत्ति उदारा ।
उगवोनि चराचरा तेज केलें ॥२॥
तेजीं तेज दिसे अव्यक्ताचा ठसा ।
उमजोनि प्रकाशा न मोडे तुझा ॥३॥
चंद्रोदयीं कमळें प्रकासिलितें ।
तैसें तुझें भरतें करी आह्मां ॥४॥
वृत्तीची निवृत्ति देखिली म्यां तुझी ।
हरपली माझी चित्तवृत्ति ॥५॥
ज्ञान ऐसें नांव ज्ञानदेवा देसी ।
शेखी तुवां रुपासी मेळविलें ॥६॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे श्रीगुरू निवृत्तीराया सूर्योदयानंतर जसा जगताचा अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे तुमचा अवतार या भूतलांवर झाल्यामुळे जगातील अज्ञान नष्ट करून ते तेजोमय केलेस. सूर्याप्रमाणे जे ज्ञान तुम्ही दिलेत ते मुळचे अव्यक्त ज्ञान, त्यावर विशेष ज्ञानाचा ठसा उठविला तरीही तुमचा स्वप्रकाश मोडत नाही. सूर्योदय झाला असता जशी कमळे प्रफुल्लित होतात. त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानोपदेशाने आम्हा सर्व मुमुक्षुना ज्ञानाने आनंदाचे भरते येते. हे श्रीगुरूनिवृत्तिराया ! तुमच्या स्वरूपाचा विचार केला तर वृत्तीची निवृत्तीच झाली आहे असे दिसते. म्हणूनच तुमचे नांव निवृत्ति आहे. त्या अनुभवाने माझीही चित्तवृत्ति निवृत्त झाली. आणि माझे ज्ञानदेव हे नांव ठेऊन त्या ज्ञानदेवाला आत्मस्वरूपाचे ज्ञान देऊन, शेवटी तुम्ही आपल्या स्वरूपांत मला मिळवून घेतले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२५७
अरे स्वरुपाकारणें विश्वरुप घेतलें ।
सगुणें झाकिलें निर्गुण रया ॥१॥
तत्त्वीं तत्त्व कवळी उगवे रवीमंडळी ।
अवघीच झांकोळी अपल्या तेजें ॥२॥
द्रष्टाचिये दीप्तीं दृश्यचि न दिसे ।
समरसीं भासे तेज त्याचें ॥३॥
चित्स्वरुपीं नांदे चित्स्वरुपीं भासे ।
ॐकारासरिसें तदाकार ॥४॥
प्रेमकळीं ओतले सप्रमळीत तेज ।
तेथें तूं विराजे ज्ञानदेवा ॥५॥
अर्थ:-
आपल्या भक्तांकरिता भगवंतानी विश्वरूप धारण केले व त्यामुळे निर्गुण स्वरूप झांकून गेले. मूळच्या निर्गुण स्वरूपाची कळा ज्यावेळी सूर्य तेजाप्रमाणे अंतःकरणांत उगवते. त्यावेळी बाकीची वैषयीक अनात्मज्ञाने सर्व लोपून जातात. सूर्य तेजापुढे सचंद्र नक्षत्रे लुप्त होतात. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानवान द्रष्टा त्याच्या यथार्थ प्रकाशापुढे दृश्य म्हणून दिसतच नाही. सर्व द्रष्टा होऊन जातो. हा सर्व व्यवहार परमात्म्याच्या सत्स्वरूपावर भासतो चित् स्वरूपांवर नादतो आणि सत् चित् आनंद स्वरूपांचे प्रतिक जो ॐकार तोही तद्रूपच होऊन जातो. त्या प्रेम कळीत म्हणजे आनंद स्वरूपांत ओतलेले जे निर्दोष ज्ञान त्याच स्वरुपाचे ठिकाणी तूं विराजमान हो असे निवृतीरायांनी उत्तर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२५८
स्वामीचे कृपेनें चिदघन ओळलें ।
रसा तळ पाल्हेलें ब्रह्मतेजें ॥१॥
कृपाळु श्रीगुरु ओळला सर्वत्र ।
आपेआप चरित्र दृष्टी दावी ॥२॥
ॐ काराचें बीज समूळ मातृकीं ।
दिसे लोकांलोकीं एकतत्त्वीं ॥३॥
विकारीं साकार अरुपीं रुपस ।
दावी आपला भास आपणासहित ॥४॥
सर्वांग सम तेज ऐसा हा चोखडा ।
पाहतां चहूंकडा दिव्य तेज ॥५॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तिशीं पुशिलें ।
सत्रावी दोहिल पूर्ण अंशीं ॥६॥
अर्थ:-
स्वामी श्रीगुरू निवृत्तीरायांच्या कृपेने ज्ञानस्वरूप ब्रह्माची मला प्राप्ती झाली. त्यामुळे पाताळादि चतुर्दशभुवने एका ब्रह्मस्वरूपानेच व्यापून टाकली आहेत असे मला दिसले. तो दयाळु श्रीगुरू त्याने आमच्यावर कृपादृष्टी केल्यामुळे आम्हाला आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य दृष्टीस पडलें. व त्यामुळे ‘अ उ म’ ह्या तीन मात्रेसहित ॐकार स्वरूप परमात्मा सर्व लोकांत एकरूपाने दिसतो. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी आकार नसतांना आकार कसा प्राप्त झाला? रूप नसताना रूप कसे प्राप्त झाले? त्याचे कारण नामरूपात्मक मिथ्या वस्तु ब्रह्मावरच भासते. व हेच सोळा कलांनी युक्त अशा लिंगशरीरास आश्रयभूत आहे म्हणून त्याला सत्रावी कला म्हणतात त्याचेच चहूंकडे दिव्य तेज प्रकाशते. मी माझ्या निवृत्तीरायांना विनंती करून त्या सत्राव्या जीवनकलेचे दूध मागितले. तेंव्हा माझ्या त्या विनंतीला मान देऊन निवृत्तीरायांनी त्या सतराव्या जीवनकलेचे दूध काढून मला पोटभर दिले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२५९
अरे अरे ज्ञाना ज्ञान उघडे बोलसी ।
तुझा तूंचि होशी हरि ऐसा ॥१॥
आपुलें तें झाकी पर तें दावी ।
पंश्यतिये भावीं मध्यमे राहे ॥२॥
तत्त्व तेंचि धरी रजो गुण चारी ।
पंचमा आचारी सांपडती ॥३॥
षड्रसीं भोक्ता हरिरुप करी ।
सप्तमा जिव्हारीं कळा धरी ॥४॥
अष्टमा अष्टसिध्दि अष्टांग नेमेशीं ।
तें जीवेंभावेंसी तूंचि होसी ॥५॥
नवमा नवमी दशमावृत्ती ।
एकादशीं तृप्ती करी ज्ञाना ॥६॥
ऐसा तूं एकादश होई तूंरे ज्ञाना ।
द्वादशीच्या चिन्हा सांगों तुज ॥७॥
निवृत्ति द्वादशगुरुवचनीं भाष्य
एकविध कास घाली ज्ञाना ॥८॥
अर्थ:-
अरे ज्ञाना आत्मस्वरूपज्ञानाविषयी तूं इतका निःसंदेह आहेस की ते ज्ञान तूं स्पष्ट सांगत आहेस. तो तुझा आत्मा परमात्मरूप आहे. शरीरादिकाच्या ठिकाणी दिसणारे कर्म उपासनेचे सहज व्यवहार तेही परमात्मरूपच आहेत. तुला झालेले आत्मज्ञान लोकसंग्रहाकरिता म्हणजे मूढ जनांना मार्गी लावण्याकरिता तू आपले यथार्थ स्वरूप झांकून परमात्म उपासना साध्य आहे असे दाखवून पश्यंतीमध्ये भावना धरून, मध्यमेमध्ये जप करीत राहा. पण या करण्यांत तत्त्वमात्र सोडू नकोस. शरीरादिकाच्या ठिकाणी रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या चार प्राणाहून मुख्य जो पांचवा प्राण, तो प्राणायाम करून स्वाधीन ठेवला जातो. ते सर्व प्राण परमात्मरूपच आहेत. तसेच षड्रसाचा भोक्ता जीवही परमात्म स्वरूपच आहे. पंचप्राण, मन व बुद्धी या सातांना जीवन देणारी आत्मकलां बळकट कर. आठ प्रकारच्या अष्ट सिद्धी, अष्टांग योगाने प्राप्त होणाऱ्या त्याही निश्चय करून परमात्मस्वरूपच आहेत.५नवविधा भक्तीचे लक्ष जे दशम् त्या दोघांचे ऐक्य ही एकादशी करून (म्हणजे जीवब्रह्मैक्य करून) त्या ज्ञानाने तृप्त हो. व तृप्त झाल्यानंतर सद्गुरू सेवा ही जी बारावी कला तिची लक्षणे मी तूला सांगितली आहे.त्या गुरूसेवेची कास धरून राहा हे ज्ञान माझ्या श्रीगुरूरायांनी शांकरभाष्यानुरूप मला सांगितले असे माऊली सांगतात.
२६०
अरे अरे ज्ञाना ज्ञान हे निवृत्ति ।
देहीं देहा उपरती तुज प्राप्त ॥१॥
अर्थावबोध अर्थुनि दाविला ।
ज्ञानियां तूं भला ज्ञानदेवा ॥२॥
सोहं तत्त्वसाधनें प्रमाण सर्वत्रीं ।
उभयतां गात्रीं प्रेम तनू ॥३॥
बिंबी बिंबरसीं उपरम देखिला ।
प्रपंच शोखिला तुवां एकें ॥४॥
विष्णुनाम मंत्र सोहं तेज दिवटा ।
उजळून चोहटा शुध्द केला ॥५॥
निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेवीं भावी ।
शांति समरस बोध उतरे ॥६॥
अर्थ:-
हे ज्ञानदेवा ज्या आत्मज्ञानाने देहातच देहाचा उपरम होतो ते निवृत्ती ज्ञान तुला प्राप्त आहेच. महावाक्यार्थाचा विचार करून ते ज्ञान तुला प्राप्त झाले म्हणुन ज्ञानोबा तुं फार धन्य आहेस. सर्व प्रमाणांनी सिद्ध केलेले जे सोहंतत्व ते तुला प्राप्त झाले म्हणुन तुझी व माझी अशी दोघांची तनु म्हणजे देह यांत आनंद भरुन राहिला. अखंड एकरस बिबरूप जो परमात्मा त्यांत प्रतिबिंबरूप तुझाआत्मा उगम पावला.ऐक्य झाल्याने तूं एकट्यानेच सर्व प्रपंच शोसुन टाकलास व बाधीत केलास. तूं सोहरूपी आत्मतेजाचा दिवटा घेऊन विष्णनामाचा मंत्र उजळून भक्तीमार्गाचा चोहटा स्वच्छ केलास.निवृत्तीरायांचा शिष्य जो मी माझ्याठिकाणी निवृत्तीरायांनी शांकरभाष्यानुरूप अद्वैतशांतिचा जो बोध केला त्यामुळे सर्वत्र समभाव मला प्राप्त झाला. असे माऊली सांगतात.
२६१
सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी ।
धृति धारणा क्षमीं हारपल्या ॥१॥
सूक्ष्म सख्य नेलें विश्वरुप देहीं आलें ।
प्रपंचेसि मावळलें तिमिर रया ॥२॥
विशेषेंसि मिठी दिधलि शरिरें ।
इंद्रियें बाहिरें नाईकती ॥३॥
ऐसें हें साधन साधकां कळलें ।
चेतवितां बुझालें मन माजें ॥४॥
उतावेळ पिंड ब्रह्मांडा सहित ।
नेत्रीं विकाशत ब्रह्मतेज ॥५॥
ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज ।
हरपली लाज संदेहेसीं ॥६॥
अर्थ:-
बुद्धीला कळण्यास फार कठीण असे जे अत्यंत सूक्ष्म परमात्मतत्त्व समजून घेणे, हे जिज्ञासूचे मुख्य काज म्हणजे कर्तव्य आहे. आणि ते समजावून दण हे काम श्रीगुरूचे आहे. त्याप्रमाणे स्वामी निवत्तीरायांनी मला परमतत्त्व समजून दिलेत्यामुळे दुसरी सारी साधने धैर्य धारण, क्षमा वगैरे मावळून गेली. त्या सूक्ष्म तत्वाचा अंतकरणांत उदय झाल्या बरोबर सर्व विश्व नाहीसे झाले. ते गेले कोठेे त्याचे उत्तर ज्या देहांत परमात्मज्ञानाचा उदय झाला त्याच देहाचेे आंत परमात्मस्वरूपात परमात्मरूप झाले आणि सर्व प्रपंच व त्याचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान तेही नाहीसे झाले.अंतकरणात मानाचा विशेष भाव होतो त्यातील बाधसमानाधिकरणाने विशेषभाव सामान्य चैतन्याशी एकरूप झाला ही स्थिती ज्या शरीरात झाली ते शरीर व इंद्रिये ही परमात्मरूप झाली. अर्थात् बाहा इंद्रिये आपआपले विषय घेईनाशी झाली असे साधन जो मी साधक त्या मला समजले आणि श्रीगुरुनी त्या ज्ञानाला जागे करून माझ्या मनाची समजूत घातली. अशा ज्ञानाचा उदय झाल्यावर पिंड ब्रह्मांड सर्व परमात्मरूप होऊन जाण्यास उशीर काय ? मी माझ्या श्रीगुरूनिवृतीरायांच्या जवळ विनंती करून ज्ञानसंपादन केले. त्यामुळे माझे सर्व संशय दूर होऊन पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची लाज नाहीसी होऊन गेली.
२६२
पहातें पाहाता निरुतें ।
पाहिलिया तेथें तेंचि होय ॥१॥
तोचि तो आपण श्रीमुखे आण ।
आणिक साधन नलगे कांहीं ॥२॥
भानुबिंबेवीण निरसलें तम ।
ज्ञानदेवी वर्म सांगितलें ॥३॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ब्रह्मस्वरूपाकडे पहा. तेच तुझे लक्ष्य असू दे. म्हणजे त्याच्या दर्शनाने तुही तद्रूप होशील. तो परमात्मा तूंच आहेस अशी खात्री तूं करून घे.या खात्रीला दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. याप्रमाणे माझ्या श्रीगुरू निवृत्तीरायांनी सूर्योदयावाचून माझ्या ठिकाणच्या अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश केला. असे माउली ज्ञानदेव सांगतात.
२६३
अनुपम्य तेजें धवळलें ब्रह्मांड ।
विश्वरुपीं अखंड तदाकार ॥१॥
रसी रस मुरे प्रेमाचें स्फ़ुंदन ।
एकरुपी घन हरि माझा ॥२॥
नाद आणि ज्योति परिपूर्ण आत्मा ।
परेसि परमात्मा उजेडला ॥३॥
जाला अरुणोदयो उजळलें सूर्यतेज ।
त्याहुनि सतेज तेज आलें ॥४॥
हरपल्या रश्मि देहभाव हरी ।
रिध्दि सिध्दि कामारी जाल्या कैंशा ॥५॥
निवृत्ती उपदेश ज्ञानियां लाधला ।
तत्त्वीं तत्त्व बोधला ज्ञानदेव ॥६॥
अर्थ:-
परमात्म्याच्या अगाध तेजाने सर्व ब्रह्मांड शुद्ध झाले आहे. सर्व जगांत एक परमात्माच भरला आहे. अशी तदाकार रूपाने अखंड प्रतिती आली. आनंदरस व प्रेमाचे स्फुंदन ही दोन्ही परमात्मप्रेमात ऐक्य पावल्यामुळे तो एक श्रीहरिच एक रुपाने त्रैलोक्यात व्यापला आहे. अशी प्रतिती आली अशी स्थिती झाली असता बाकीच्या गोष्टीची काय कथा. परिपूर्ण नाद आणि ज्योती हा परा म्हणजे ज्ञान त्यासह वर्तमान माझ्या अंतःकरणात शिरती झाली. सूर्योदय झाला असता सूर्याच्या तेजाने विश्व उजळले जाते.त्या सूर्यतेजाहूनही अधिक सतेज परमात्मतत्त्व आहे. या परमात्म तेजामुळे सर्व वृत्ती हरपून गेल्या आणि रिद्धीसिद्धी या दासी मला निवृत्तीरायांनी उपदेश केल्यामुळे झाल्या व परमात्मतत्त्वाचा बोध झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२६४
भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक ।
त्याहुनी एथें सुख अधिक दिसे ॥१॥
जंववरि भुली तंववरी बोली ।
समुद्रींचि खोली विरळा जाणे ॥२॥
आशापाश परि निवृत्ति तटाक ।
पडियेले ठक चिद्रूप रुपीं ॥३॥
प्रकाश हरीचा प्रकाशला देहीं ।
नेणतीच कांही मूढजन ॥४॥
ऐलतीरीं ठाके पैलतिरीं ठाके ।
तेथें कैसेनि सामर्थे पाहों आतां ॥५॥
जाणिव शाहाणिव तूंचि निवृत्ति देवा ।
हरि उभय भावा ज्ञान देसी ॥६॥
ज्ञानदेवा शांति उन्मनि रहस्य ।
हरिरुप भाष्य करविलें ॥७॥
बापरखुमादेविवरविठ्ठल ह्रदयीं ।
आलिंगितां बाही भ्रमर जाला ॥८॥
अर्थ:-
जीवरूपी भ्रमराला ब्रह्मानंद मिळाल्यामुळे विषयरूपी द्वंद्वातील सुखाच्या भुकेला तो विसरतो. त्याला या इंद्रियसुखापेक्षा येथेच गोडी वाटते. विषयसुखाच्या भोगाची इच्छा जोपर्यंत प्रपंच सत्यत्व भ्रम आहे तोपर्यंतच असते. त्या विषय सौख्याचे खोल मूळ ब्रह्मानंदच आहे. हे संसारात जाणणारा अत्यंत विरळा. आशापाशांचा शेवट आशेची निवृत्ति होणे हा आहे. आणि त्या आशेची अत्यंत निवृत्ती चैतन्यरूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ति चिकटुन राहीली तरच होते. सर्व देहामध्ये परमात्म्याचाच प्रकाश आहे. हे मंदबद्धीला कळत नाही. प्रपंचाच्या अलीकडच्या व पलीकडच्या म्हणजे प्रवृत्ति निवृत्तिच्या तटाकाला सर्वत्र परमात्माच भरला असल्या मुळे आता तो अमुकच ठिकाणी आहे. असे कसे पाहावे. कारण सर्वत्र तोच आहे. हे निवृत्तिराय परोक्ष अपरोक्ष दोन्हीभावामध्ये हरीच व्याप्त आहे. हे ज्ञान तुम्हीच मला देऊन उन्मनी किंवा शांति याचे रहस्य जो परमात्मा तोच सर्वत्र असल्याचे माझ्याकडून वदविले. माझ्या हृदयामध्ये असलेल्या श्रीविठ्ठलाच्या स्वरूपावर रममाण होणारा मी तुमच्या व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने भ्रमर झालो.
२६५
साकारु निराकारु वस्तु सदगुरु आमुचा ।
तेणें या देहाचा केला उगऊ ॥१॥
उगविलें मायेतें निरशिलें ।
एकतत्त्व दाविलें त्रिभुवन रया ॥२॥
सत्रावी दोहोनी इंद्रिया सौरसु ।
गुरुमुखें उल्हासु भक्ति महिमें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे मी नेणतां प्रपंच ।
तोडली मोहाची पदवी आम्हीं ॥४॥
अर्थ:-
आमचा श्रीगुरू हे सगुण व निर्गुण परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांनी आमच्या तिन्ही देहाचा उलगडा करून दाखविला. सत्रावी जी जीवनकला हीच कोणी कामधेनु तिचे गुरूमुखाने धार काढून भक्तिप्रेमानंदाचा महीमा सर्व इंद्रियांना प्राप्त करून दिला. आम्ही गुरूकृपेने प्रपंचाच्या मोहाची बेडी तोडून टाकून परमानंद स्थितिला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात
२६६
अमित्य भुवनीं भरलें शेखीं जें उरलें ।
तें रुप आपुले मज दावियलें वो माय ॥१॥
आतां मी नये आपुलिया आस ।
तुटले सायास भ्रांतीचे वो माय ॥२॥
मंजुळ मंजुळ वायो गती झळकती ।
तापत्रयें निवृत्ति निर्वाळिलें वो माय ॥३॥
वेडावलें एकाएकीं निजधाम रुपीं ।
रखुमादेविवरु दीपीं दिव्य तेज वो माय ॥४॥
अर्थ:-
अमित्य म्हणजे अनंत निरतिशय आनंदरूप जे ब्रह्म ते चतुर्दश भुवनांत भरून पुन्हा उरले आहे. तेच ब्रह्म माझा आत्मा असून तो मला श्रीगुरू निवृत्तींनी दाखविला. आता आत्म ज्ञानोदयानंतर पुन्हा मी संसाराची आशा करणार नाही. कारण संसारभ्रांतीमुळे होणारे सायास सर्व निवृत्त झाले.आत्मसुखाच्या शांतीचा वारा शीतल झुळु, झुळु येऊ लागल्यामुळे तापत्रयापासून मी अगदी दूर झालो. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल म्हणजे परमात्मा त्या अद्वितीय स्वप्रकाश तेजामध्ये म्हणजे आनंदामध्ये मी अगदी वेडावून गेलो.असे माऊली सांगतात.
२६७
शुध्दमतीगती मज वोळला निवृत्ती ।
त्यानें पदीं पदीं प्रीति स्वरुपीं वो माय ॥१॥
आतां मी जाईन आपुलिया गांवा ।
होईल विसावा सुखसागरीं वो माय ॥२॥
पाहातां न देखे आपुलें कोणी नाहीं ।
निजरुप पाहीं अनंता नयनीं वो माय ॥३॥
हा रखुमादेविवरु गुरुगम्य सागरु ।
न करीच अव्हेरु माझा वो माय ॥४॥
अर्थ:-
माझी बुद्धी शुद्ध आणि आचरण ही शुद्ध असल्यामुळे माझेवर श्रीनिवृत्तिरायांनी ‘पदोपदी’ म्हणजे पावलो पावली आत्मज्ञानाचा उपदेश करून आत्मस्वरूपावर प्रीति उत्पन्न केली.आता मी आपल्या गांवाला म्हणजे परमात्म स्वरूपाला जाईन म्हणजे सुखाच्या सागरांतच मला विसावा प्राप्त होईल. सर्वात्म भाव झाल्यावर विचार करून पाहिले तर जगत म्हणून सत्यत्वाने पदार्थ दिसत नाही. मग माझे आप्तइष्ट कोणी दिसत नाही हे निराळे सांगण्याची जरूरीच नाही. कारण ज्या अंतःकरणाच्या डोळ्याने मी अद्वैत पाहणार त्या अंतःकरणात माझे निजरूप जो अविनाश परमात्मा तोच येऊन बसला आहेना. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते कृपेचा सागर असून श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या मुळे ते माझा केंव्हाही अव्हेर करणार नाहीत. असे माऊली सांगतात.
२६८
आपुलें कांही न विचारितां धन ।
निगुणासी ऋण देऊं गेलें ॥१॥
थिवें होतें तें निध सांठविलें ।
विश्वासें घेतलें लक्ष वित्त ॥२॥
ऐसा हा निवृत्तिप्रसादु फ़ळासि आला ।
निर्फ़ळ केला मज निर्गुणाकारें ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु
साच म्हणोनि निघालों ।
तेणें नेऊनि घातलों निरंजनी ॥४॥
अर्थ:-
माझी काय स्थिती होईल याचा कांही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मज जवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्मरूप माझ्या ठिकाणी साठवलें आणि विश्वासाने तत्पद लक्ष्य हेच धन मी घेतले. या रितीने हा श्रीगुरूनिवृत्तिरायांचा प्रसाद फलद्रूप झाला. आणि मी मानीत होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्मरूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हेच खरे आहेच. म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकरता म्हणून निघालो. तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोहोचते केले असे माऊली सांगतात.
२६९
चौदा भुवनीं चौघां भुलविलें ।
वेव्हार नासिले स्मृति व्यालीगे माये ॥१॥
अवघे धन देऊनी मज निधन केलें ।
ऋण मागावया धाडिलें नये ते ठायीं ॥२॥
ऐसें श्रीनिवृत्ति शब्दें ।
अगाध जालें ।
माझें मीपण गेलें धन देखा ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु साक्षी ।
तो मज पारखी घेऊनी गेला ॥४॥
अर्थ:-
चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्यानी भुलवून टाकले. म्हणजे परमात्मस्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेंव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृति झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्मरूप करून देहात्मभावनहे जे माझे पूर्वीचे धन होते. ते सगळे निधन केले म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असतां पुन्हा देहभावावर येणे होत नाही. तर तद्रुपस्थिति होते. अशी श्रीगुरू निवृत्तिरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्मरूप झाले. आणि अनात्मपदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते. ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत. त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात.
२७०
अवघड तें एक घडलें माझ्या अंगी ।
तीही ऋण चौघी मज देवविलें ॥१॥
ज्यासि दिधलें त्यासी नांव पैं नाहीं ।
जया रुप नाहीं त्यासी ऋण देवविलें ॥२॥
निवृत्ति गुरुनें अधिक केलें ।
निमिष्यमात्रीं दाविलें धन माझें ॥३॥
येणें रखुमादेविवरु विठ्ठलें होतें तें आटिलें ।
सेखी निहाटिलें निरळारंभी ॥४॥
अर्थ:-
मनुष्यशरीरांत परमात्मप्राप्ती होणे हे अत्यंत अवघड आहे. परंतु ते आज माझ्या शरीराच्या ठिकाणी घडून आले. संचित क्रियमाण प्रारब्ध या तिघांच्या प्रेरणेने चित्त चत्तुष्टयाने पत्करलेला देहात्मभाव हेच कोणी ऋण परमात्म्याला देवविले. पण चमत्कार असा झाला की ज्या परमात्म्याला ऋण देवविले त्याला नाव नाही, रूप नाही, कांही एक नाही. त्याला ऋण देवविले. असे माझे सर्वस्व धन देहात्मभाव तो परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दिला. वस्तुतः ते परमात्मस्वरूपच खरे धन होते. तें विसरून मी देहात्मभावालाच माझे धन मानीत होतो. परंतु माझे खरे धन जें आत्मस्वरूप ते एका क्षणांत निवृत्तिनाथांनी मला दाखविले. त्यांच्या प्रसादाने रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठलांनी माझे देहात्मभावाचे धन नाहीसे करून निरालंब परमात्मस्वरुपाचे ठिकाणी मला पोहोचते केले. असे माऊली सांगतात.
२७१
मायाविवर्जित जालें वो ।
माझें गोत पंढरिये राहिलें वो ॥१॥
पतिव्रता मी परद्वारिणी ।
परपुरुषेंसी व्यभिचारिणी ॥२॥
सा चारि चौदा जाली वो ।
सेखीं अठरा घोकुनी राहिलें वो ।
निवृत्ति प्रसादें मी गोवळी वो ॥३॥
माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळीवो ॥४॥
अर्थ:-
एक स्त्री आपल्या मैत्रीणीजवळ म्हणते. हे सखे, माझ्या मागचा मायामोह टाकून मी पंढरपूरास जाऊन राहिले. कारण माझा सर्व गोतावळा तेथे आहे. तसे पाहिले तर ‘पर’ म्हणजे परमात्मा त्याच्याशी रत झाल्यामुळे परद्वारिणी म्हणजे व्यभिचारीणी आहे. असे असले तरी त्या परमात्म्याला सोडून इतर ठिकाणी माझे मन कोठेही जात नाही. अशी मी एकनिष्ठ आहे. म्हणजे पतिव्रता आहे. सहा शास्त्रे, चार वेद, चौदा विद्या, अठरा पुराणे ही सर्व घोकून शेवटी त्या परमात्म्यालाच चित्तांत धरून मी राहिले. निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने मी त्या श्रीकृष्णाशी एकरूप झाले. माझ्या मनातील हे सर्व भाव तो परमात्मा श्रीविठ्ठल जाणत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२७२
प्राण जाये प्रेत न बोले
चित्रीचे लेप न हाले ।
तैसें दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी वो
करी हे शब्दची वाउगे ठेले रया ॥१॥
आतां आपणया आपणचि विचारी ।
शेखीं प्रकृति ना पुरुष निर्धारी ॥२॥
आतां प्रेताचे अळंकार सोहळुले ।
कां शब्दज्ञानें जे डौरले
दीपने देखती कांहीं केलें ।
ऐसे जाणोनिया सिण मनी तीं
प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल देखतांचि जे बोधले ।
ते तेणें सुखें होऊनी सर्वात्मक जे
असतांचि देहीं विस्तारलें ।
येणें निवृत्तिरायें खुणा दाउनी सकळ ।
बोलतां सिण झणे होईल रया ॥४॥
अर्थ:-
प्राण गेलेले प्रेत बोलत नाही भितीवरील चित्र हलत नाही. त्याप्रमाणेपरमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आहे. असे म्हणणे खोटे आहे असे समज. याकरता तूं आपल्या स्वरूपाविषयी विचार कर. विचार केला म्हणजे शेवटी प्रकृति पुरूषादि भाव आत्म्याचे नाहीत असा तुझा निर्धार होईल. अशी स्थिती झाली असता प्रपंच्याविषयी कौतुक करणाऱ्या लोकांकडे पाहिले म्हणजे त्यांचे शब्दजाळ प्रेतावर घातलेल्या अलंकाराच्या सोहळ्यासारखे त्यांना दिसतात त्याचप्रमाणे शब्दज्ञानाने जे जें कांही प्रकाशित केले ते सर्व फुकट असे न समजता व्यवहारांत कष्ट व प्रतिष्ठा भोगून अन्यता मानतात काय चमत्कार पहा. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाल तत्वतः जाणून जे बोधवान झाले तेच सुखी झाले व या देहांत असतानाच सर्वरूप झाले ह्या खुणा मला निवृत्तिरायांनी दाखविल्या हे म्हणणे देखील निवृत्तिरायांना कष्टकर होईल असे माऊली सांगतात.
२७३
पृथ्वी आडणी आकाश हें ताट ।
अमृत घनवट आप तेज ॥
नित्य हें जेवितां तेज प्रकाशत ।
सर्वलि गोमटी ब्रह्मद्वारें ॥१॥
जेवणार भला जेउनिया धाला ।
योगि जो निवाला परमहंस ॥२॥
चांदिणा वोगरु दिसे परिकरु ।
नवनित घातलें व्योमी बरवें ॥
निळिये परवडि शाक जालें निकें ।
अंबट घाला तिखें प्रेम तेथें ॥३॥
गंगा यमुना तिसरिये सागरीं ।
म्हणौनि प्रकारी क्षीर जाली ॥
सोज्वळ ब्रह्मतेजें साकर सोजोरी ।
जेवितो हे गोडी तोचि जाणे ॥४॥
इडा क्षीर घारी पिंगळा गुळवरी ।
त्या माजि तिसरी तेल वरी ॥
सुषुम्नेचे रुची तुर्या अतुडली ।
अहिर्निशि जाली जेवावया ॥५॥
सितळ भिनला चंद्र अंबवडा ।
सूर्य जो कुरवडा खुसखुसित ॥
तया दोहीं संगें भाव हेचि मांडे ।
मग जेवा उदंडे एक चित्तें ॥६॥
पवित्र पापडु मस्तकिं गुरुहस्त ।
म्हणउनि अंकित तयातळी ॥
सोरसाचि गोडी जयासी लाधलीसे ।
उपदेशितां जालीं अमृतफ़ळें ॥७॥
कपट वासनेचि करुनिया सांडई ।
शेवा कुरवडई गोमटी किजे ॥
गुरुचरणीं लाडू करुनियां गोडु ।
मग जेवी परवडी योगिराजु ॥८॥
गुरुपरमार्थे ग्रासुनिया भूतें ।
क्षेम अवकाशातें आच्छादुनि ॥
जेवणें जेवितां ध्वनि उठे अंबरीं ।
तें सुख अंतरीं प्रेम वाढे ॥९॥
षड्रसाचि उपमा देऊं म्हणो जर ।
ब्रह्म रसापरते गोड नाहीं ॥
येणें दहिभातें जेवणें हे जाले ।
तिखटही आलें प्रेम तेथें ॥१०॥
अमृत जेविला अमृतें आंचवला ।
सेजे विसावला निरालंबीं ॥
मन हें तांबूल रंगलें सुरंग ।
नव जाये अभंग कव्हणीकडे ॥११॥
कापुर कस्तुरी शुध्द परिमळु ।
गोडियेसि गुळु मिळोनि गेला ।
सुमनाचि मूर्ति सुमनीं पूजिली ।
सुमनीं अर्चिलि कनकपुष्पीं ॥१२॥
ऐसें नानापरिचें जेवण जालें ।
बापनिवृत्तियोगियानें वाढिलें ॥
ज्ञानदेव म्हणे धणिवरि जेविलें ।
बापरखुमादेविवरें विठ्ठलें सुखिया केलें ॥१३॥
अर्थ:-
पृथ्वीची आडणी करून त्यावर आकाशाचे ताट ठेवले आणि सारभूत आप, तेज हे अमृत वाढले. असे दिव्य जेवण जेवित असता तेज प्रकाशून ब्रह्मप्राप्तीची द्वारे जी सर्व इंद्रिये ती प्रसन्न झाली. या प्रकाराने जो परमहंस योगी जेवणारा तो जेऊन तृप्त झाला. ज्या योगाच्या ताटांत सुंदर चांदणे हेच कोणी लोणी असून त्या आकाशाच्या निळा रंग हेच कोणी रूचकर भाजी, लोणची आहे. आणि त्यांत अंबट तिखटाच्या जागी प्रेम आहे. गंगा यमुना व सरस्वती या एकत्र होऊन क्षीर झाल्या आहेत. शुद्ध ब्रह्मस्वरूप ते ज्याची साखर आहे. त्यामुळे जेवण्याची गोडी त्याला विशेष लागते. इडा नाडी हीच कोणी क्षीर किंवा धारणा, पिंगळा नाडी ही त्यावरील गुळ सुषुम्ना ही वेलची, त्या सुषुम्नेच्या रूचीची तूर्या सापडली.त्यामुळे रात्रंदिवस आनंदाचे जेवण झाले. शीतल चंद्र हाच वडा, व सूर्य हा खुसखुसीत कुरूडया या दोन्हीच्या बरोबर भाव भक्तीचे मांडे, एवढी भोजनाची तयारी झाल्यावर एकचित्ताने मनसोक्त जेवा. श्रीगुरूच्या कृपेचा मस्तकावरील हात हाच कोणी पवित्र पापड प्राप्त झाला. म्हणून त्याच्या चरणाचा मी अंकीत झालो. ही प्रेमाची गोडी ज्याला प्राप्त झाली आहे. त्याला गुरूनी उपदेश केला तर अमृतासारखे फळ प्राप्त होते. कपट वासनेचा परित्याग करून जीवभावाने गुरूंची सेवा करावी. श्रीगुरूचरणाच्या लाडूची गोडी करून तो योगीराज आवडीने जेवण जेवतो. श्रीगुरू परमात्मविचाराने भूतांचा ग्रास करून क्षमा अवकाशाने त्याला आच्छादन करून जेवण करणारा जेवित असता अंतर आकाशांत सोहं असा ध्वनी उत्पन्न होतो.त्यामुळे अंतःकरणात प्रेम वाढते. तर या जेवणाला षड्रसाची उपमा देऊ म्हटले तर ते ब्रह्मरसापेक्षा गोड नाही. च अशा रितीने दहिभाताचे जेवण झाले असता रूचकर म्हणजे अत्यंत प्रेमाचे तिखट तेथे प्राप्त झाले.अमृत जेवला म्हणजे परमात्मा प्राप्त झाला व त्या अमृतरूपी परमात्म प्राप्तीने अनात्मपदार्थ नष्ट झाले.आणि निरालंब जो परमात्मा त्याच्या शेजेवर विसावा घेतला. मन रूपी विडा तो परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी चांगला रंगून गेल्यामुळे त्याचा तो रंग केंव्हाही नाहीसा होत नाही. त्या विड्यांत अंगाला लावलेला कापूर कस्तुरीचा परिमळ गुळासारखा मिळून गेला म्हणजे एकरूप झाला अशा त-हेची सुमनाची मुर्ति सुमनाने पुजिली व सुमनरूपी कनकपुष्पाने अर्चन केली. बाप योगी जो निवृत्तिराय याने वाढलेले नाना प्रकारचे जेवण जेऊन मी तृप्त झालो. परंतु ही सर्व कृपा माझे पिता व रखुमाईचे पती पांडुरंगाची आहे. असे माऊली सांगतात.
२७४
अनुभव अनुभव बोधा बोध आथिला ।
निशब्दीं निशब्द नादावला ॥१॥
माझा श्रीगुरु ब्रह्म बोलणी बोलवील ।
तेथील संकेतु कोण्ही नेणें ॥२॥
निवृत्ति प्रसादें म्यां ब्रह्मचि जेविलें ।
ब्रह्म ढेंकरी पाल्हाईलें नेणोनियां ॥३॥
अर्थ:-
अनुभवाचा जो अनुभव, ज्ञानाचे ही ज्ञान, निःशब्दाचे शब्द, असलेला जो माझा श्रीगुरू निवृत्तिराय तो अशा प्रकारचा ब्रह्मस्वरूपाच्या गोष्टी सांगत आहे. या श्रीगुरूंच्या उपदेशाचे वर्म, अधिकारी, मुमुक्षुशिवाय कळणार नाही. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने मी सर्व जेवण ब्रह्मरसाचेच जेवलो आणि ब्रह्माचीच ढेकर देऊन तृप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२७५
रुप सामावलें दर्शन ठाकलें ।
अंग हारपलें तेचि भावीं ॥
पाहों जाय तंव पाहाणया वेगळें ।
ते सुखसोहळें कोण बोले ॥१॥
जेथें जाय तेथें मौनाचि पडिलें ।
बोलवेना पुढें काय करुं ॥२॥
सरिता ना संगम ओघ ना
भ्रम नाहीं क्रिया कर्म तैसें झालें ॥
जाणों जाय तंव जाणण्या सारिखें ।
नवल विस्मय कवणा सांगों ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि अंगीं ।
निवृत्तिरायें वेगीं दाखविला ॥
तोचि सबरा भरितु ।
रुपनामरहितु निच नवा ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मात्मसाक्षात्कार अंतःकरणांत ठसावला म्हणजे त्या अद्वैत स्थितिमध्ये ज्ञानाचा व्यवहार थांबतो व देहभाव नष्ट होऊन परमात्मस्वरूप होतो. विचार करू गेले तर पाहणारा हाही भाव त्याठिकाणी वेगळा राहात नाही. त्या परमात्मसुखाचा सोहळा कोण सांगेल. कोणत्याही रितीने बोलले तरी मौनची पडते. म्हणजे शब्द मावळून जातो या अडचणीमुळे परमात्मसुखाचे कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही.याला काय करू. नदी समुद्राला मिळून समुद्ररूप झाल्यानंतर, ‘सरिता संगम ओघ’ इत्यादी म्हणणे भ्रम आहे. त्या प्रमाणे त्या अद्वैत आत्मस्थितीमध्ये क्रिया, कर्मादिकाचा काही संबंध नाही. जाणावयास जावे तर जाणण्या सारखी ती वस्तु नाही. अशा आत्मस्थितिचा विलक्षण अनुभव मी घेतला. काय आश्चर्च आहे. ते कोणाला सांगावे. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल ते माझ्या अंगी निवृत्तिरायांने दाखविले. आतां त्यांची स्थिति काय सांगू ! ते नित्य नूतन, नामरूप,आदि अंतरहित सभराभरित म्हणजे अंतर्बाह्य तोच आहे. असे माऊली सांगतात.
२७६
मीतूंपणा विकल्प मावळला मूळीं ।
दोहीं माजी बळी कवणा पाहो ।
पाहतां पाहणें द्रष्टत्त्व ग्रासिलें ।
स्वरुप़चि उरलें कवणा पाहों ॥१॥
बोलों नये ऐसें केलें वो माय येणें ।
बोलतांचि गुणें आठऊ नाहीं ॥२॥
आठवितां विसरु संसार नाठवे ।
हे खुण स्वभावें बोलत्याचा ॥
बोलतां बोलणें ठकचि पडलें मुळीं ।
स्थूळींचा स्थूळीं प्रकाश झालागे माये ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलु उघडा ।
निजबोधीं निवाडा ऐसा झाला ॥
निवृत्तिराये खुण लेऊनि अंजन ।
दाऊनि निधान प्रकट केलें ॥४॥
अर्थ:-
शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी तात्विक द्वैत नाही. परंतु मी किं तूं अशा द्वैताची प्रतिती येते. म्हणजे ती जीवाच्या विकल्पाने होते.परंतु परमात्मस्वरूपाच्या यथार्थ विचाराने तो विकल्प मावळून गेला असल्यामुळे, मी किंवा तूं यामध्ये कोण मोठा म्हणजे श्रेष्ठ आहे असे म्हणून कोणाला पाहावे. अद्वैत स्थितिमध्ये द्वैताचा अभाव असल्यामुळे द्रष्टा, दृश्य, दर्शन यांचा लोप होऊन केवळ परमात्म स्वरूप अवशेष असल्यामुळे कोणास पहावयाचे आहे. असे अद्वैत अवस्थान झाल्यामुळे बोलणेच शक्य नाही. कारण बोलणाऱ्या मुळी देहात्मभावच नाही कारण परमात्मस्वरूपाचा अविर्भाव झाला असता त्याला द्वैताचा विसर होतो. म्हणून संसार आठवत नाही. हे त्या अद्वैत स्थितिचे वर्म आहे. त्याचा अनुवाद करावयाचा तर द्वैत असावे लागते. पण अद्वैत बोधांत, बोलणाऱ्या, बोलणे हे द्वैतच मूळांत नष्ट होऊन जाते असा हा देहातले देहांतच अनुभव येतो. ही खूण निवृत्तिरायांनी डोळ्यांत अंजन घालून दाखविली म्हणजे स्वरूपनिधान प्रगट केले, या प्रमाणे आत्मस्वरूप माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी स्वकीय आत्मबोधाने असा निवाडा झाला. असे माऊली सांगतात.
२७७
मजमाजी पांहतां मीपण हारपलें ।
ठकलेंचि ठेलें सये मन माझें ॥१॥
आंत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु ।
मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥२॥
मीपण माझें नुरेचि कांहीं दुजें ।
ऐसें नाहीं केलें निवृत्तिराजें म्हणे ज्ञानदेवो ॥३॥
अर्थ:-
मी आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असतां विचार करणाऱ्याचा मीपणाच नाहीसा होऊन जातो. त्यामुळे आंत बाहेर मीही सर्वत्र एक विठ्ठलच आहे असे ज्ञान होते. त्याठिकाणी त्या परमात्म्याहून मी वेगळा आहे ही द्वैत बुद्धी राहात नाही. अशी माझी स्थिति श्रीगुरूानवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२७८
देखोनि पुजावया गेलें द्वैतभावें ।
तेथें एक उपदेशी श्रीगुरुरावो ॥१॥
द्वैतभावो नाशिला माझा द्वैतभावो नाशिला ।
पूजा उध्दंस केला तें ब्रह्ममय ॥२॥
रखुमादेविवरु देखण्या वेगळा देखिला ।
सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥
अर्थ:-
जेंव्हा मी पूज्य पूजक भाव धरून ईश्वराचे पूजन करावयास निघालो तेंव्हा वाटेत श्रीगुरू भेटले. त्यांनी भेटल्याबरोबर मला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तेंव्हा माझा द्वैतभाव नाहीसा होऊन गेला. त्यामुळे पूजा करण्याच्या दृष्टीने जी काही सामुग्री मी जमवली होती. तिचा विध्वंस होऊन ती सर्व ब्रह्मरूप झाली. याप्रमाणे दृश्य, द्रष्टाभावातीत असणारे रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल तेच सगुण व निर्गुण झाला आहेत. असे माऊली सांगतात.
२७९
दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके
सामावाली ज्योति ।
ज्योति सामावोनि बिंब हारपलें
तैसी जाली सहज स्थिति ।
संचित प्रारब्ध दग्ध पटन्यायें हे
दृश्यभ्रांति देहो जावो अथवा राहो
फ़िटला संदेहो मृतिकेचि कायासि खंति ॥१॥
रुप पाहोनिया दर्पण ठेलें शेखीं
अभास दृष्टि राहिला ।
न पाहतां मुख जाणें तो आपण
तैसा अनुभव जाला रया ॥२॥
या प्रपंचाचे कवच सांडुनि बाहेरि ।
अविद्या दृश्य संहारी ।
पदीं पद ग्रासुनि ठेलें जें
बुडोनि राहिलें अंतरी ।
चैतन्याचें मुसें हेलावत दिसे
जेवि तरंगुसागरीं ।
कूर्माचिये परि आंगचि आवरि तो
स्थिर जाला चंद्र करि रया ॥३॥
तेथें जाणणें निमालें बोलणें खुंटलें
जेवि जीवनीं जीवन मिळाले ।
दश दिशा भरुनि दाटलें किं
सुख सुखासि भेटो आले ।
ज्ञानदेव म्हणे आम्हा जितांचि मरणें ।
कीं कोटी विकल्प जिणें ऐसें
निवृत्तीनें केलें रया ॥४॥
अर्थ:-
दीपाचा प्रकाश जसा दीपांत सामावतो किंवा दीपज्योती कळिकेत सामावते. प्रतिबिंबाचा बिंबात लोप झाल्यावर ज्या प्रमाणे बिंब हा धर्म लय पावतो त्या प्रमाणे माझी स्थिति झाली आहे. संचितातून भोगास निघालेला प्रारब्धरूप पट जळून गेला तरी तो आकाराने जसाचा तसा दिसतो. त्यातील सत्व मात्र जळून जाते.त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे भ्रांतिरूप दृश्याची प्रतिती येते. (दृश्यांतर्गत) स्वतःचा देह जावो अथवा राहो. त्या देहरूप मृतिकेच्या नाशाची खंती करावी काय.रूप पाहून आरसा बाजुला केला तर काही वेळ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास जसा डोळ्यांत राहतो. त्याप्रमाणे प्रारब्ध असेपर्यंत हा दृश्य भाग दिसणारच वस्तुतः आरशांत मुख नसतांना आरशाशी दृष्टीचा संबंध होऊन आरशाच्या पासून ती दृष्टी परत फिरून आपल्या मुखालाच पाहते. तसाच माझे स्वरूपाविषयी मला अनुभव झाला. प्रपंचाचे कवच टाकल्यामुळे अविद्या कार्य दृश्याचा नाश होतो. आणि आत्मपद ब्रह्मपदाशी एकरूप होते. यानंतर दिसणारे दृश्य ते समुद्रावरील तरंगाच्या हेलकाव्या प्रमाणे दिसत आहे. कासव ज्याप्रमाणे स्वेच्छेने आपले अवयव आवरतो. त्याप्रमाणे सर्व वासनांना आवरून बोधरूपी चंद्रकिरणाने तो स्थिर होतो. अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाची गोष्टच नाहीशी झाली.अर्थात बोलणेही संपले ही स्थिति पाण्यांत पाणी मिळून एकरूप होते तशी झाली. आतां ते स्वरूप परिछिन्न भाव टाकून दशदिशेला व्यापले असे म्हणावे. किंवा आत्मसुख परमात्मसुखाला भेटावयास आले असे म्हणावे. अशी स्थिति झाली असतां. आम्हाला जीवंत असतांनाच शरीरभावाने मरण प्राप्त झाले आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टिने अनंत कल्पकोटी जीवित प्राप्त झाले. अशी स्थिति श्रीगुरूनिवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२८०
निरंजन वना गेलिया साजणी ।
तेथें निर्गुणें माझा मनीं वेधियेलें ॥१॥
सुखाची अति प्रीति जाहालीगे ब्रम्हीं ।
श्रीगुरु निवृत्ति मुनीं जाहालेंगे माये ॥२॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलुसह जावला ।
निर्गुणा दाविला विसुरागे माये ॥३॥
अर्थ:-
मी निरंजन वनामध्ये गेलें. तो तेथे त्या निर्गुणाने माझे मन वेधून टाकले. त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या ठिकाणी फार प्रेम जडले आणि तो परमात्मा श्रीगुरू निवृत्तीमुनी, मीच होऊन बसले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला. आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात.
२८१
चातकाची तृषा मेघें पुरविली ।
ब्रह्मस्तनीं पान्हईली बाईये वो ॥१॥
निवृत्तिप्रसादे माझ्या मुखीं सूदला ।
प्रेमरसें धारा फ़ुटल्या दोहीं पक्षीं ॥२॥
बाप श्रीगुरु तेणें मज आफ़विले ।
अवघें ब्रह्म दाविलें ज्ञानदेवा ॥३॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे चातकाची तृषा मेघ पूर्ण करतो. त्याप्रमाणे ब्रह्मरूपीस्तनांच्या ठिकाणी पान्हावलेली. माझी श्रीगुरूनिवृत्तिमाऊली तिने पान्हावलेल्या ब्रह्मस्तनाचा पान्हा माझ्या मुखांत घातला. त्या स्तनातून प्रेमरसाच्या धारा दोन्ही बाजुला फुटल्या. धन्य धन्य श्रीगुरू निवृत्तिराय त्याने मला आनंदीत करून, परिपूर्ण ब्रह्मज्ञान करून दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२८२
ऋणाचेनि मिसें निर्गुण आलें आपैसें ।
तेणें मज सर्वस्वें ठकियेलें ॥१॥
घेऊनि गेला माझें धन ।
केलें पै निर्वाण मना देखा ॥२॥
त्यासि वोळखिना अनोळखी ।
दृश्य ना अदृश्य ऋण म्यां
सादृश्य दिधलें देखा ॥३॥
निवृत्ति प्रसादें इतुकें पै जालें ।
रखुमादेविवरु विठ्ठलें मज
गोवियेलेगे माये ॥४॥
अर्थ:-
सगुण भक्तिच्या ऋणाने निर्गुण माझ्या हातांत आपोआप आले. आणि निर्गुण स्वरूपाच्या योगाने माझा देहभाव नाहीसा करुन मला ठकवले. माझे भक्तिचे धन घेऊन गेला. म्हणजे परमात्मस्वरूपासी ऐक्य झाल्यावर कोणी व कोणाची भक्ति करावयाची? अशा रितीने निर्वाण म्हणजे मोक्ष सौख्य मनाला प्राप्त झाले. आतां त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ओळखही नाही व अनोळखही नाही. म्हणजे त्याच्याविषयी ज्ञानही नाही व अज्ञानही नाही.दृश्य, अदृश्य, साम्य, ऋण हे सर्वभाव त्याच्या ठिकाणी नाहीसे झाले. श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी मला आपल्या निर्गुण स्वरूपांत गोवून टाकले असे माऊली सांगतात.
संवाद – अभंग २८३ ते २८९
२८३
स्वरुप पाहे तंव सभोंवतें रुपडें ।
पाहे चहूंकडे तोचि दिसे ॥१॥
काय करूं सये कैसा हा देव ।
माझा मज भाव एकतत्त्वीं ॥२॥
सम तेज पाहे तंव एकचि वो तेज ।
ओंकार सहज निमाला तेथें ॥३॥
मूळीचि मुळ खुण न संपडे सर्वथा ।
व्यापिलें चित्ता तेजें येणें ॥४॥
स्वानुभव ते दिवटी उजळूनि जव पाहे ।
तव एक बिंब दाहे दिशा दिसे ॥५॥
ज्ञानदेव निवृत्ति हे खूण पुसत ।
सांगावें त्वरित गुरुराजें ॥६॥
अर्थ:-
सर्व जगांत जिकडे पहावे तिकडे एक परमात्मा दिसतो. हे सखे काय करू? हा देवतरी पहा कसा आहे आता माझे स्वरूपही तो परमात्माच झाला आहे. त्या परमात्मस्वरूपामध्ये ॐकारही मावळून गेला आहे. त्या मूळ परमात्म-स्वरूपाच्या तेजाने माझ चित्त व्यापून टाकले आहे. स्वानुभवाचा दिवा लावून जेंव्हा मी त्या परमात्म्याला पाहू गेलो. तेंव्हा तो ज्ञानस्वरूप परमात्माच सर्वत्र दशदिशेस भरला आहे. असे मला दिसले. श्रीगुरू निवृत्तीरायांना ती परमात्मज्ञानाची खूण मला लवकर सांगावीअशी विनंती माऊली ज्ञानदेव करीत आहेत.
२८४
परब्रम्हीं वस्ति कोण्या रुपें करुं ।
सकळ हें भरुं आत्मतत्त्वें ॥
देहाचा दीप कीं समत्वें पै ज्योती ।
एकरुपे वाती सर्वारुपीं ॥१॥
तें रुप सांगा निवृत्ति उदारा ।
संसारा एकसरा तया माजी ॥२॥
समान निघोटे मोक्षत्वें पैं अवीट ।
श्रीगुरुनें वाट सांगितली ॥३॥
ज्ञानदेवीं घरवस्तीसी बिढार ।
तळींवरी साचार एक तत्त्व ॥४॥
अर्थ:-
मी परब्रह्माचे ठिकाणी कोण्यारूपाने म्हणजे उपायाने वस्ती करू? सर्वत्र आत्मतत्त्व भरून राहिले आहे. असा अनुभव कोणत्या उपायाने घेऊ? व सर्व देहामध्ये एकरूपाने प्रकाशित असणारी आत्मज्योति त्या आत्मज्योतीने सर्व त्रैलोक्य व्याप्त करून परमात्म स्वरूपाचे ठिकाणी मी कशी वस्ती करावी. हे उदार, श्रीगुरूनिवृत्तिराया सर्व संसार एकदम ज्या परमात्म स्वरूपामध्ये सामावतो ते रूप मला सांगा. परमात्मतत्त्व निघोट म्हणजे निष्पतिबंध सर्वात क्षेमत्वाने समान असून कोणालाही त्याच्या विषयी वीट येणे शक्य नाही. अशा परमतत्त्वाच्या प्राप्तीची वाट श्रीगुरू निवृत्तिरायांनी सांगितली. त्यामुळे त्या परमात्मतत्त्वाचे घरांत बिऱ्हाड ठेऊन वस्ती केली. म्हणजे मी परमात्मस्वरूपच झालो. आता वर,खाली सर्व परमात्मतत्त्वच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२८५
सोंग संपादणी एका रुपें करी ।
आत्मा घरोघरीं वर्ततसे ॥१॥
माय सांग आम्हां कोण सुख ब्रह्म ।
तुम्हा आम्हा समा कोण्या रुपें ॥२॥
चेतनें चेतवी बुध्दिते पाचारी ।
कल्पना मापारीया निवृत्ति ठायीं ॥३॥
ज्ञानदेव दिवटा विठ्ठलीं रमला ।
संसार अबोला एक तत्त्वें ॥४॥
अर्थ:-
एक परमात्मतत्त्व घरोघरी म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या जीवात्मरूपाने प्रवेश त्या त्या जीवांच्या कर्मानुसार सोंगसंपादणी करून राहात आहे. हे माऊली श्रीगुरूराया तुमच्या आमच्यामध्ये ते समानरूपाने कसे राहाते व त्या परब्रह्माचे आम्हाला कसे प्राप्त होईल ते सांगा. चिदाभासाला ज्ञान देणारा बुद्धिला चालना देऊन कल्पनेची भरोवरी करून त्याचा मापारी श्रीगुरू निवृत्तीरायच आहेत. जो श्रीगुरू निवृत्तिराय त्याच्या कृपेने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहून संसारा विषयीचे मौन मी धारण केले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२८६
विश्रांतीचें स्थान कोण रुप आह्मां ।
ऐसा हा महिमा सांगा स्वामी ॥१॥
चित्त नेई चिंता चेतनी नेई तत्त्वता ।
कर्म परतत्त्वा हारवी रया ॥२॥
हें तत्त्व ज्ञानदेवा निवृत्ति ।
संसार पुढती नाहीं बापा ॥३॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूनिवृत्तिरायांना विचारतात. हे श्रीगुरूनिवृत्तिराय आम्हांला विश्रांतीचे कोणत्या रूपाचे स्थान आहे. त्याचा महिमा काय आहे हे कपा करून सांगा. निवत्तिनाथ सांगतात की हे ज्ञानदेवा, चित्त नेहमी विषयाकडे जात असते. ते चित्त परमात्म्याकडे नेत जा त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कमें लय पावतात. मी सांगितलेल्या परमतत्त्वाच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला तर पन्ना संसारप्राप्ती होणार नाही. असे निवृत्तीनाथानी सांगितले हे माऊली ज्ञानदेव सांगतात.
२८७
निजाचें तेज कीं तेजाचें निज ।
तेथील तें गुज सांग मज ॥१॥
ब्रह्म तें कायी ब्रह्म तें कायी ।
ब्रह्म तें कायी सांगा गोसावी ॥२॥
ब्रह्म सदोदित असे सर्वंभूतीं ॥
म्हणौनि सांगे जनाप्रती ॥३॥
ब्रह्म ऐसें नामयानें जाणितलें ।
ह्रदयीं धरिलें प्राणलिंग ॥४॥
बापरखुमादेविवरु ह्रदयीं प्रगटला ।
निवांत राहिला ज्ञानदेवो ॥५॥
अर्थ:-
आत्म्याचे ज्ञान किंवा ज्ञानाचा आत्मा यांत काय गुह्य आहे ते मला सांगा. तसेच हे गुरूनाथा ब्रह्म म्हणजे काय हेही मला सांगाना. ब्रह्म सदोदित, सर्व भूतमात्रामध्ये आहे. असे जे आपण लोकांना सांगत असता. ब्रह्म म्हणून काय पदार्थ आहे. तो नामदेवाने जाणून ते आपले जीव की प्राण आहे असे समजून हृदयांत धरले. किंवा ब्रह्म म्हणून जे काही म्हणतात. ते भगवंताचेच नाम हेच ब्रह्म असे आपण समजून हृदयांत जीव की प्राण असा धरला. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल तो माझ्या हृदयांत प्रगट झाल्यामुळे मी निवांत राहिलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.(संत ज्ञानेश्वर गाथा २०१ ते २९७)
२८८
आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं ।
निराकारीं राही शून्याशून्य ॥१॥
जेथें शून्यचि मावळलें तेथें काय उरलें ॥
हेचि सांगे एके बोलें मजपासीं ॥२॥
शून्य कासय पासाव जालें
शून्य तें कवणें केलें ।
हें सांगिजोजि एक्या बोलें गुरुराया ॥३॥
आपण शून्याकार कीं आपण निराकार ।
आकार निराकार मूर्तिमंत दाऊं ॥
आकार निराकार ये दोन्हीं नाहीं ।
तेंचि तूं पाही आपणापें ॥४॥
जेथें अनुभवचि नाहीं तेंचि तूं पाही ।
स्वानुभवीं राही तुझा तूंचि ॥५॥
जेथें चंद्र सूर्य एक होती तेथें
कैचि दिनराती ।
ऐसें जे जाणती ते योगेश्वर ॥६॥
कर्माकर्म पारुषलें देवधर्म लोपले ।
गुरुशिष्या निमाले जाले क्षीरसिंधु ॥७॥
तेथें गोडीवीण चाखणे ।
जिव्हेवीण बोलणे नेत्रेंविण पाहणें
तेंचि ब्रह्मा ॥८॥
हातीं घेऊनियां दिवटी
लागिजे अंधारापाठीं ।
अंधार न देखे दृष्टी उजियेडु तो ॥९॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु देखणा ।
दृष्टयद्रष्टेपणा माल्हावले ॥१०॥
अर्थ:-
निवृत्तिनाथ महाराज म्हणतात आकाराला आलेल्या विश्वामध्ये स्थूल दृष्टीने सच्चिदानंदादि कांही दिसत नाही.ते सच्चिदानंदादि निराकार परमात्मवस्तुच्या ठिकाणी पहा. आकाराच्या उत्पत्तीला कारण म्हणून एक माया मानली आहे. बोधाने त्या मायेचा लय परमात्मवस्तु मध्ये होतो. म्हणून त्या ब्रह्माला शून्यरुप मायेचेही शून्य असे म्हणतात. वास्तविक त्या निराकार परमात्मवस्तुच्या ठिकाणी शून्याशून्य असे धर्म नाही. त्या परमात्मवाच्या ठिकाणी तूं आत्मत्वाने राहा.असे पुष्कळ शास्त्रे सांगतात. हे श्रीगुरुराया, ज्या ठिकाणी शून्यच मावळून गेले. तेथे खाली काय उरले. हे मला थोडक्यात सांगा मला आपणा पासून समजून घ्यावयाचे ते असे की. ज्या मायेला शून्य असे म्हणतात. ती कोणापासून झाली? तिला कोणी केले? हीच पहिली शंका हे श्रीगुरुराया याचे प्रथम समाधान सांगा. श्रीगुरु म्हणाले आपण शून्याकार आहोत की निराकार आहेत, हे तुला कळण्याकरिता अगोदर आकार आणि निराकार यांचे स्वरुप दाखवितो. मायेचे कार्य नामरुपांदिक त्याला आकार असे म्हणतात. त्या परमात्मवस्तूच्या ठिकाणी, नामरुपादिकनाहीत म्हणून त्या परमात्म्याला आकाराच्या सापेक्षेने निराकार म्हणतात. माया ही अनिर्वचनीयनमिथ्या असल्यामुळे तिच्या ठिकाणी आकार हा धर्म नाही. अर्थात या धर्माच्या अपेक्षेने परमात्म्यावरती आलेला निराकारता धर्म ही पण नाही. ज्याच्या ठिकाणी दोन्ही धर्म नाहीत. असा परमात्मा स्वतः तुझा आत्मा आहे असा असा तु अनुभव घे. असे म्हटल्याने अनुभव घेणे हाही धर्म आत्म्यावरती राहील. पण तसे समजणे बरोबर नाही. कारण आत्मा अनुभवरुपच आहे. असे अनुभवरूप परमातत्व तुच आहेस. असा तूं आपल्याठिकाणी अनुभवाने राहा. अरे ज्या परमात्मतत्वाच्या ठिकाणी चंद्र, सूर्य एक होतात तेथे दिवस कसला? आणि रात्र कसली? तेथे काहीच राहत नाही. याचा अर्थ माया कार्य प्रपंच्यात ज्ञानाज्ञानाचा व्यवहार चालतो. ती ज्ञानाज्ञाने परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी लय पावली. म्हणजे निरपेक्ष ज्ञानस्वरुप परमात्माच अवशेष राहातो असे जे निःसंशय जाणतात. तेच खरे योगेश्वर अरे, ज्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी कर्म व अकर्म दोन्हीही दुरावले.देवा धर्माचा लोप झाला गुरु शिष्यही मावळून गेले. अशा परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी म्हणजे आनंद समुद्रात आपले ऐक्य झाले असता द्वैताचा अभाव असल्यामुळे त्या परमात्मरुपाची गोडी या धर्मावांचून चाखावयाची असते. जिभेवांचून बोलणे आणि डोळ्यावांचून पाहाणे असते. अशी स्थिती जेथे असते. सेन नाव ब्रह्म त्या ब्रह्मदृष्टिने पाहिले असता. माया हा पदार्थ दिसतच नाही ज्याप्रमाणे हातात मोठी दिवटी घेऊन अंधार धरण्याकरिता पाठीस लागलेल्या मनुष्याच्या हातांत दिवटी असल्यामुळे अंधार न दिसता तो अंधारच उजेड होतो. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, सर्वत्र हाच देखणा म्हणजे ज्ञानरुपाने असल्यामुळे त्याच्या अद्वैत बोधापुढे दृश्य द्रष्टेपणाचा भाव मावळून जातो. असे माऊली सांगतात.
२८९
देहभाव ठेवावे योगभाव सेवावे ।
हें बोलणें जाणणें सोय नव्हेगेमाये ॥१॥
जिजे मरिजे ऐसें नाहीं आमुतें ।
सांगों कोणातें तुज वांचुनि ॥२॥
देठीहुनि सुटलें जीवनासी आलें ।
बापरखुमादेविवरें ऐसें केलेंगे माये ॥३॥
अर्थ:-
देहात्मबुद्धी बाजुला ठेऊन योगाभ्यास करावा हे बोलणे किंवा तसे करणे ही परमात्मप्राप्तीची सोय नव्हे. ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरण धर्म नाहीत. हे श्रीकृष्णा अशा तुझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीचा उपाय तुझ्यावांचून आम्हास किंवा आणखी कोणास कोण सांगणार? कारण तूं सर्वांचा देव म्हणजे आदि आहेस त्या तुझ्याकडून उपदेश आम्हाला मिळाला असता आम्ही आपल्या जीवनाला म्हणजे परमात्मस्वरूपाला प्राप्त झालो. अशी स्थिती माझे पिता रखुमाईचे पति श्रीविठ्ठल त्यांनी केली.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
उपासनापर – अभंग २९० ते २९७
२९०
देहाचेनि दीपकें पाहे जों सभोंवतें ।
तंव अवचितेंची ध्यान केलें ॥१॥
निराकारींची वस्तु आकारा आणिली ।
कृष्णी कृष्ण केली सकळ सृष्टी ॥२॥
लय गेलें ध्यानीं ध्यान गेलें उन्मनी ।
नित्य हरिपर्वणी सर्वांरुपें ॥३॥
आनंद सोहळा हरिरुपीं आवडी ।
कृष्ण अर्धघडी न सोडी आम्हां ॥४॥
बापरखुमादेविवरविठ्ठल अभय ।
भयांचें पैं भय हरपे कृष्णीं ॥५॥
अर्थ:-
देहाला दिपक करुन सभोवताली पाहु लागला तेंव्हा त्याला अवचित ध्यान लाभले. व त्या ध्यानात त्याला निराकार ब्रह्म दिसले जे कृष्णाने कृष्ण होऊन विश्वरुपाने आकाराला आणले. ती समाधी अवस्था प्राप्त झाल्याने ते ध्यान ही गेले व तो उन्मनी अवस्थेत गेला. व नित्य त्या हरिपर्वणीला भोगु लागला. असा तो हरिरुपी आनंद सोहळा त्याला आवडला व त्या कृष्णाने अर्धघडी ही तिथे संगत सोडली नाही. असे अभय त्या रखुमाईच्या पतीने व माझ्या पित्याने दिल्याने भयाचे भयच निवृत झाले असे माऊली सांगतात.
२९१
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईनगे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा अपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचे फ़ळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन परब्रह्मीं ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी ।
आपुलिये संवसाटी घेऊनि राहे ॥३॥
अर्थ:-
संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.
२९६
विठ्ठलयात्रे जाति वो माये ।
त्याचे धरीन मी पायें ॥१॥
विठोबा माझें माहेर ।
भेटेन बुध्दि परिकर ॥२॥
रखुमादेविवर विठ्ठलें ।
मन ठेउनि राहि निर्धारें ॥३॥
अर्थ:-
श्री विठ्ठलाची यात्रा करणारे वारकरी त्यांचे पाय मी धरिन. विठोबा माझे माहेरच आहे.त्यामुळे त्या माझा माहेरच्या लोकांच्या दर्शनाला मी मनापासुन जाईन. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी माझे मन बांधुन मी निवांत राहिन असे माऊली सांगतात.
२९७
या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे
तरी तो ठावो ठाकितां अतिदुस्तरु ।
भूमंडळीचे राज्य वोळगों म्हणे
तव तेथें न लभे अवसरु ।
नि:संग होऊनि यतिधर्म चाळूं
म्हणे तरी भिक्षेसी पडे विचारु ।
नि:प्रपंच हातीं टाळ दिंडी घेऊनियां
वोळगे तो हरिहरुरेरे ॥१॥
हरीचे विद्यावंत जालोरे आम्ही
जाऊनि पंढरपुरीं राहिलों ।
कळिकाळाच्या माथां पाय देऊनियां
वैकुंठ भुवनासि गेलोरेरे ॥ध्रु०॥
अष्टांगयोगे शरीर दंडूं पाहे तंव
येवढें कैचें कष्टसाधन ।
लय लक्ष लावूनि गुरुमंत्र जपों
म्हणो तरी स्थिर नव्हे अंत:करण ।
तल्लीन होऊन हरिकथा आयिको
म्हणो तरी ठायींचेच बधिर श्रवण ।
उदंड वाचे हरिहरि म्हणतां
फ़ुकासाठीं चुके पतनरेरे ॥२॥
चहुं वेदांचे गव्हर धांडोळितां
वेडावलीं साही दर्शनें ।
शून्य स्थावर जंगम सर्वत्र
व्यापून असणें ।
जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं सरिसें
या दृष्टी पाहाणें ।
ऐसियातें सेवितां अविद्या लोपे
मा विश्वास मानिला मनें ॥३॥
जयाचिये वोळगे जातां आडकाठीच
नाहीं भीतरी गेलिया भान पाविजे ।
अरोधे विरोधें समतुल्य देणें न
मगतां अभरि देइजे ।
तो क्षणमाजीं दे तें नसरे कल्पकोटि
ऐसिये धुरे कां दुर्हाविजे ।
ऐसियाचे गांवींची सुखवस्तीची पुरे
मा बहुत काय अनुवादिजेरेरे ॥४॥
ऐसा वैकुंठपुरपति पुंडलिकाचिये भक्ती
अमूर्त मूर्तीस आला ।
भक्तां अमरपद देतुसें अवळीला
नामें यमलोक विभांडिला ।
जिहीं जैसा भाविला त्या तैसा पालटु
दाविला परि अणु एक नाहीं वेंचला ।
बापरखुमादेविवराविठ्ठलु आम्हां गीतीं
गातां जोडलारेरे ॥५॥
अर्थ:-
स्वर्गातील अमरांना ही त्याची प्राप्ती होणे दुस्तर आहे.पृथ्वीवरिल राजेराजवाड्याना शक्य नाही कारण विषयभोगातुन त्यांना तसा वेळ मिळत नाही.संन्यास घेतला तरी भिक्षेची चिंता असते ते फक्त टाळ दिंडी घेऊनच साधता येते. त्यामुळे तसे आम्ही पंढरीस गेल्याने आम्ही विद्यावंत झालो व कळिकाळाच्या माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला पोहचलो.अष्टांग योगाचा थकवणारा अटापिटा करुन शरिर दंडित केले. लक्ष लाऊन गुरुमंत्र जपु लागलो तरी अंतःकरण स्थिर झाले नाही. हरिकथा ऐकायला गेलो तर कान बधिर झाले मात्र वाचेने उदंड हरि म्हंटले फुकटात पतन चुकले. स्थावर जंगम व्यापुन असलेल्या जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्याला पाहियला वेद व सहा शास्त्र ढुंडाळली त्यामुळे दृष्टी मिळाली व अविद्या गेली हा मनाला विश्वास दिला. पण त्याला ओळखायला कसली आडकाठी नाही.विरोधाला समत्युल्य करुन मोठे पद मिळवले. चक्क अमर झालो. ते त्याने क्षणभरात न संपणारे सगळे दिले कल्पकोटी देणाऱ्या गांवात सुखवस्ती केली. ह्या पेक्षा जास्त काय सांगु. असा तो वैकुंठपती पुंडलिकासाठी सगुण साकार झाला. त्याने यमलोकाला डावलुन भक्तांना अमरपद दिले. ज्या जसा भावला तसा त्याला मिळाला.व त्यासाठी एक अणु ही खर्च झाला नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आम्ही गीत गात जोडले असे माऊली सांगतात.