अभंग ,संत चोखामेळा


अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥
आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥


अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥


अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखामेळा ॥३॥


अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥


sant-chokhamela-abhang-ek


आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥


आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥


उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥


करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥
काम चरणींचा तोडरू । परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥
दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥
विठेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥


गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीट कुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥


१०
चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥
महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥

११
ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणें उभवोनी हात । उदारपणें देत भक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री क्षूद्र चांडाळ सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥५॥

१२
ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमागें । भक्ताचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥

१३
दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभ उभी कोड पुरवितो ॥५॥

१४
देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा । नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥

१५
निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन । संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥

१६
पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं । चोखामेळा दंडवत करी ॥४॥

१७
बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥
जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥
न मागतां आभारी आपेंआप होती । भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरूशने ॥४॥

१८
बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रम्हादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरूशनें उद्धरी जडजीवां ॥४॥

१९
भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरी । जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥
बांधियेलें ब्रीद तोडर चरणीं । त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल । नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥

२०
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड । भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥

२१
मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥

२२
मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥

२३
विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

२४
व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

२५
सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥


२६
सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥

२७
सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ । देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरूडवाहन हरी देखियला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥

२८
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन तेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥

२९
श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥
तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धावणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥

३०
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥
कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥
वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

३१
अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें । तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे । सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवलें कर दोनीं कटावरी । ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनी । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥

३२
इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट । संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी । घेत पायवणी संतांची ॥४॥

३३
जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर । तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥

३४
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

३५
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

३६
पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥

३७
पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं । नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं । जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥

३८
बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥

३९
विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


४०
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥

४१
सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥
अवघाचि लाभ होईल तेथींचा । न बोलावे वाचा मौनावली ॥२॥
अवघिया उद्धार एकाचि दरूशनें । भुक्तिमुक्ति केणें मिळे फुका ॥३॥
प्रत्यक्ष चंद्रभागा अमृतमय साचार । जडजीवा उद्धार पहातां दृष्टी ॥४॥
चोखा म्हणे आनंदें नाचा महाद्वारीं । वाचे हरि हरि म्हणे मुखें ॥५॥


४२
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
यातीहीन मी महार । पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥


४३
नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें । उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी । गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥


४४
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥

४५
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला एव आम्हां ॥४॥

४६
देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे । ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥


४७
अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥
हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥
धरणें घेऊनि तुमचे द्वारीं । बैसेन उगाच मी गा हरी । कांही न करीं भरोवरी । नाम हरी गाईन ॥३॥
तुमची लाज तुम्हांसी । आपुलिया थोरपणासी । ब्रीद बांधिलें चरणासी । तें चोख्यासी दाखवीं ॥४॥

४८
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथें ती पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥

४९
अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥
अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥
कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरीं । तरीच मज हरी सुख होय ॥४॥

५०
अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
या परतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥

५१
असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥

५२
अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥
नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥
पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद । तेणें सर्व बाध हरे माझा ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नवस । पुरवी सावकाश देवराया ॥४॥

५३
अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार । न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥

५४
अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥

५५
आतां नकां भरोवरी । तूं तों उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशीं । अहर्निशी राखावें ॥२॥
ब्रीद गाजे चराचरीं । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥

५६
आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ । भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥

५७
आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें ते झालें असो कां उदास । धरोनिया आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥

५८
आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥

५९
आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि ॥१॥
दार राखीत बैंसलों । तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥
ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलों । आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥

६०
आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥
सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥
नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥

६१
आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥
हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥
जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥
नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥

६२
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥

६३
आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥
केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर । तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा । भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥

६४
इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥

६५
करोनियां दया । सांभाळा जी देवराया ॥१॥
मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥
लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षितां देवा ॥३॥
आपुलें जतन । करा अभय देवोन ॥४॥
चोखा म्हणे हरि । आतां भीड न धरीं ॥५॥

६६
कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥
गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥
गुंतला हरिण जळाचिया आशा । तो गळां पडे फांसा काळपाश ॥३॥
वारितां वारेना सारितां सारेना । कितीसा उगाणा करूं आतां ॥४॥
चोखा म्हणे ऐसा पडलों प्रवाहीं । बुडतसों डोहीं भवाचिया ॥५॥

६७
कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥
आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥
आमुचा तों येथें खुंटलासे लाग । न दिसे मारग मोकळाचि ॥३॥
चोखा म्हणे काय करूं आतां । तुमची हे सत्ता अनावर ॥४॥


६८
कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥
काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारूं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥

६९
काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥
जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥

७०
काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥
तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥
तेचि आजी दिसे वोखटें कां झालें । संचिताचें बळें दिसे ऐसें ॥३॥
चोखा म्हणे हा तो तुम्हां नाहीं बोल । आमुचें सखोल कर्म दिसे ॥४॥

७१
कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासीं वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं । चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥

७२
कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥
मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
बोलोनी उत्तरें करी समाधान । ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करी उदास माझे माये ॥४॥

७३
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥
दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥

७४
कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करूं देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥

७५
जगामध्यें दिसे बरें की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं । त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणें न ये उणेपण । तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥

७६
जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये ॥१॥
कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥
जन्म जरा मरण आम्हां सुख दु:ख । पाहासी कौतुक काय देवा ॥३॥
गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥

७७
जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥
शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥
तुम्हांविण माझें कोडें । कोण निवारी सांकडें । मी तों झालों असे वेडे । उपाय पुढें सुचेना ॥३॥
चोखा म्हणे दीनानाथा । आतां निवारीं हे भवव्यथा । म्हणोनी ठेवितसें माथा । चरणांवरी विठूच्या ॥४॥

७८
जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥
जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥
जयाचिया भेणें घेतिलें कपाट । तो तेणें वाट निरोधिली ॥३॥
जयाचिया भेणें त्यागियेलें जग । तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥
चोखा म्हणे नको होऊं परदेशी । चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥

७९
जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥
परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥
एका पुढें एक पडती आघात । सारितां न सरत काय करूं ॥३॥
चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥

८०
तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥
सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥
सर्वांभूती दया संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥
चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं । जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥


८१
तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥

८२
तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥
तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥
तुम्हांसी तों भीड कासयाची देवा । हेचि केशवा सांगा मज ॥३॥
चोखा म्हणे काय बोलूं येयावरी । माझा तूं कैवारी देवराया ॥४॥

८३
देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥
समर्थे आपुल्या नामासी पाहावें । मनीं उमजावें आपुलिया ॥२॥
यातिहीन आम्हां कोण अधिकार । अवघे दूरदूर करिताती ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह । पडिला संदेह काय करूं ॥४॥

८४
धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥

८५
धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥
कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥
मी तंव धरणें घेवोनी बैसलों । आतां बोलों येयापरी ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नेम आतां । तुम्ही कृपावंत सिद्धि न्यावा ॥४॥

८६
धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥
तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥
कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥

८७
धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥
बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥
भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥
भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥
दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥

८८
नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥
करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥
वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धि:कारिती जन सर्व मज ॥३॥
अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥

८९
नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करूं । तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण । मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करूं तें आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥


९०
नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥
कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥

९१
बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥
मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर ते ही केले देशधडी ॥४॥

९२
बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥
आतां कोणावरी रूसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥

९३
बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥
लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥
तुमचें लिगाड तुम्हींच वारावें । आम्हांसी काढावें यांतोनियां ॥३॥
चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख । नका आतां दु:ख दाऊं देवा ॥४॥

९४
भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥
पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥
कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥
गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥

९५
भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥
लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥
सांपडलों वैरियाचे भांडवली । न कळे चिखलीं रोवियेलों ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । तुम्हाविण फांसा उगवी कोण ॥४॥

९६
मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥
कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥
चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥

९७
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥

९८
माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥
करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥
लिगाडाची माशी तैसी झाली परी । जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥
चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा । पाळा कळवळा माझा देवा ॥४॥

९९
माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥


१००
मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥
अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥

१०१
यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥

१०२
वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे । हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥

१०३
श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥

१०४
समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥

१०५
साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥
तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥
विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं । तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥

१०६
सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥

१०७
संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥
आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥
कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी । आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥
आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी । चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥

१०८
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥