sant-bhojaling-kaka-sutar-charitra
संत भोजलिंग काका सुतार-
वारकरी संप्रदायातील संत परंपरा ही एका अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा आधारस्तंभ आहे. या परंपरेत संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्या काव्याने, विचारांनी आणि कृतींनी समाजाला दिशा दिली. या संतांचे जीवन दोन बाजूंनी समजून घ्यावे लागते – एक म्हणजे त्यांचे धार्मिक योगदान आणि दुसरे म्हणजे त्यांचे सामाजिक कार्य.
धार्मिक बाजू ही नेहमीच लोकप्रिय राहिली आहे, कारण त्यात संतांचे अभंग, कथा, चमत्कार आणि अध्यात्म यांचा समावेश होतो. या गोष्टी सामान्य माणसाच्या मनावर खोल परिणाम करतात. पण हे अध्यात्म कधीच आकाशातून अवतरलेले नसते.
भक्तांना ते तसे वाटले तरी प्रत्यक्षात संतांचे विचार आणि आध्यात्मिक दृष्टी ही त्यांच्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतूनच आकाराला येते.
म्हणजेच, कोणत्याही धर्माची आणि त्यातील संकल्पनांची मुळे ही भौतिक वास्तवात रुजलेली असतात. संतांचे अध्यात्म हे त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अनुभवांचे प्रतिबिंब असते, जे त्यांना महामानव बनवते.
वारकरी संप्रदायाच्या इतिहासाकडे पाहिले तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यासह अनेक संतांनी आपल्या साहित्यातून आणि कार्यातून अलुते-बलुतेदार समाजातील लोकांचा जीवनसंघर्ष आणि त्यांचे बहुजनांसाठीचे कार्य डोळ्यासमोर उभे केले आहे.
या संतांच्या प्रत्येक चळवळीमागे एक ठोस सामाजिक आणि राजकीय संदर्भ होता. वारकरी संप्रदाय ही केवळ आध्यात्मिक चळवळ नव्हती, तर ती बहुजनांच्या उद्धारासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी उभी राहिलेली लोकचळवळ होती. काळानुसार आणि व्यक्तीनुसार या चळवळीचे स्वरूप बदलत गेले आणि त्यात अनेक वर्गीकरणेही झाली.

या प्रक्रियेत काही महान संतांची खरी ओळख दुर्लक्षित राहिली, किंवा त्यांचे योगदान उपेक्षित झाले. हा प्रभाव संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ते वारकरी संप्रदायातील पहिले अभंगकार आणि कीर्तनकार असलेल्या संत नामदेवांपर्यंत सर्वत्र दिसून येतो.
याच संदर्भात, विठ्ठलपंतांना आधार देणारे, धर्ममार्तंडांच्या रागाचा सामना करत बहिष्कृत ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांचे संगोपन करणारे, त्यांच्या प्रतिभेचे संवर्धन करणारे आद्यसंत श्री भोजलिंग काका यांचे जीवनकथनही मर्यादित राहिले. त्यांचा उल्लेख आळंदीच्या समाधी मंदिरातील एका साळुंका आणि फलकापुरताच मर्यादित आहे.
संत परंपरेत अनेक संतांचा उल्लेख त्यांच्या जाती आणि व्यवसायासह होतो – शिंप्यांचे नामदेव, कुणब्यांचे तुकोबा, माळ्यांचे सावता, चांभारांचे रोहिदास, सोनारांचे नरहरी, कुंभारांचे गोरोबा, आणि चोखामेळा यांच्यासारखे अनेक संत प्रसिद्ध आहेत. पण सुतारांचे भोजलिंग यांचा उल्लेख फक्त “व्यवसायाने सुतार” असाच केला गेला.
वर्णाने शूद्र, व्यवसायाने बलुतेदार आणि जातीने सुतार असलेल्या भोजलिंगांना आजच्या सुतार समाजानेही स्वीकारण्यास बराच वेळ लागला. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो नवीन इतिहास घडवू शकत नाही.
शिवाय, धर्माच्या नावाखाली दांभिकता आणि मिथ्या अहंकार स्वीकारणारा समाज आपले खरे संचित सोडून बनावट इतिहासाकडे आकर्षित होतो. संत भोजलिंग काकांचे आध्यात्मिक आणि सामाजिक स्थान समजून घेतले तरच समाज परिवर्तनाचे निकष आणि आध्यात्मिक दिशा सार्थकी लागू शकते.
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून, मला भोजलिंग काकांना माझ्या समाजासाठी “आयकॉन” म्हणून मिरवण्यात रस नाही. माझा उद्देश आहे, त्यांना प्रस्थापित धर्मसत्तेविरुद्ध लढणारा आणि संत ज्ञानदेवांसारख्या अलौकिक संताला “ज्ञानप्रकाश” देणारा महामानव म्हणून ओळख करून देणे. भोजलिंग काका हे आपल्यासारखेच सामान्य माणूस होते, पण त्यांनी मानवतेच्या लढाईला आपल्या ध्यासाने जपले आणि उभारले.
हा संदर्भ इतिहासाच्या पानांवर कोरलेला आहे. त्यांच्या नावाने समाज एकत्र येईल, कदाचित “सोशियल अजेंडा” ठरवून त्यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित केले जाईल. पण पुढे काय? त्याकाळच्या धर्ममार्तंडांना धाडसाने सामोरे गेलेले भोजलिंग फक्त “सुतार” होते का? त्यांची लढाई केवळ त्या काळापुरती नव्हती, तर गेल्या नऊशे वर्षांपासून महाराष्ट्रात समता आणि सामाजिक चैतन्य जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची होती. भोजलिंग काकांना वारकरी संप्रदायाचे महासमन्वयक आणि संघटक म्हणून स्वीकारताना, संत नामदेव, संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या जीवनसंघर्षाचा विचार करावा लागेल.
आज, आठशे-नऊशे वर्षांनंतर भोजलिंग काकांचा परिचय पुन्हा होत आहे आणि एका नव्या पर्वाची सुरुवातही होत आहे. भविष्यात त्यांच्या नावाने सोशल मीडियावर चर्चा होईल, बहुउद्देशीय संस्था आणि संघटना स्थापन होतील, सामाजिक कार्याच्या नावाखाली वधू-वर परिचय मेळावे होतील आणि “समाजभूषण” पुरस्कारांचे वाटप होईल.
पण जर असे झाले तर समाजकार्याच्या नावाखाली समाजावर अन्यायच होईल. बाह्य दिखाऊपणा जपणारी ही मंडळीच समाजाला नव्या गुलामगिरीकडे नेईल. समाजबाह्य शक्तींसमोर कमकुवत ठरणारे पुन्हा मनाने शूरवीर ठरतील. त्यापेक्षा भोजलिंग काकांसारखा महामानव पुन्हा दुर्लक्षित राहिलेलाच बरा.
भोजलिंग काकांचा विद्रोह आणि समकालीन धर्म-राजसत्ता:
संत भोजलिंग काकांचे जीवन हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुमारे चारशे वर्षे आधीचे आहे. त्यांचा जन्म बाराव्या शतकात, शके ११४७ च्या आसपास झाला असावा, म्हणजेच संत नामदेवांपेक्षा ४५-५० वर्षे आधीचा. संत नामदेवांचा जन्म इसवी सन १२७० च्या आसपास झाला होता, तर ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यातील वयाचे अंतर फक्त पाच वर्षांचे होते.
आपेगावचे विठ्ठलपंत, पांचाळेश्वरचे भोजलिंग आणि नरसीचे नामदेव हे सर्व मराठवाड्यातील, तत्कालीन देवगिरीच्या यादव राजवटीतील होते. यादव घराण्याचा उदय बाराव्या शतकात झाला होता, जेव्हा कल्याणीचे चालुक्य आणि चोल साम्राज्यांचा ऱ्हास झाला.
यादव शासक स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानत होते आणि राष्ट्रकूट व चालुक्यांचे सामंत म्हणून त्यांचा उदय झाला होता. रामदेवराय यादवाने आपल्या चुलतभावाला, आमणदेवाला, डोळे काढून कारावासात टाकून देवगिरीचे राज्य ताब्यात घेतले होते. हा शासक कर्तबगार होता.
त्याने दक्षिणेत अधिराज्य स्थापन केले आणि त्याच्या सैन्याने बनारसपर्यंत विजय मिळवला होता. यादवकालीन राजवटीवर राष्ट्रकूट आणि चालुक्यांच्या राजकीय पद्धतीचा प्रभाव होता. यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, चक्रवर्ती अशा मोठ्या पदव्या धारण केल्या होत्या.
यादवांच्या काळात कृषी, उद्योग आणि व्यापार यांचा विकास झाला होता. पैठण, ब्रह्मपुरी, तेर, चौल, दौलताबाद ही प्रमुख व्यापारी आणि उत्पादन केंद्रे होती. शेती व्यक्तिगत मालकीची असली तरी गावपातळीवर तिचे नियंत्रण असे. अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे उत्तर भारताशी संपर्क वाढला होता. देवगिरी, पैठण आणि नाशिक ही शिक्षणाची केंद्रे होती आणि संस्कृत हे शिक्षणाचे माध्यम होते.
समाजात कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते. यादव काळात हेमाडपंथी बांधकाम पद्धतीला सुरुवात झाली होती. परळीचे महादेव मंदिर, फलटणचे जबरेश्वर, सिन्नरचे गोंडेश्वर आणि झोडगे येथील महादेव मंदिर यात हेमाडपंथी तंत्राचा वापर दिसतो.
या मंदिरांच्या बांधकामात चुना किंवा मातीचा वापर झाला नव्हता. यादव राजवट वैभवाच्या शिखरावर होती, पण या वैभवात सामाजिक विषमता आणि धर्मसत्तेचा प्रभावही वाढत होता, ज्याचा परिणाम संत भोजलिंग काकांच्या जीवनावर आणि कार्यावर झाला.