तीर्थक्षेत्र
prachin-shiv-mandir-bilwadi
|| तीर्थक्षेत्र ||
नाशिक जिल्ह्यातील कळवणपासून पश्चिमेला सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बिलवाडी हे एक लहानसे आदिवासी बहुल गाव आहे. या गावात एक प्राचीन, साधे पण अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. या मंदिराची माहिती स्थानिक लोकांपलीकडे फारशी उपलब्ध नाही आणि प्रशासन व पुरातत्व विभागाने या मंदिराकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंदिराचे काही भाग आज ढासळत आहेत.
गावातील काही लोकांच्या मते, पूर्वी या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे होती. या मंदीरांच्या अवशेषांची, शिल्पांची आणि शिवलिंगांची दगडांवर व जंगलात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीत, हे मंदिर एकमेव उर्वरित प्राचीन मंदिर आहे.
अहिवंतगडाच्या मागील बाजूस असलेल्या बिलवाडी गावात शेतात स्थित हे मंदिर अत्यंत साधे असून त्यावर खूपच कलाकुसर नाही. मात्र, मंदिराच्या अंतर्गत भागात अत्यंत सुंदर आणि तपशीलवार नक्षीकाम आहे. शिल्पे कमी पण खूपच देखणी आहेत. मंदिराच्या परिसरात काही विशेष वीरगळी देखील आहेत.
या मंदिराचे बांधकाम अंदाजे बाराव्या शतकाच्या सुमारास झाले असावे. गर्भगृहात सध्या शिवलिंग नाही, तरीही मंदिराची पूजा नियमितपणे केली जाते.
मंदिराच्या काही भागाचे भयानक दुरवस्था व पावसाळ्यात पाण्यामुळे अडचणी येतात, कारण पाणी मंदिरात शिरून तिथे कमरभर पोहोचते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर पूजा आणि उत्सव साजरे केले जातात, ज्यात आदिवासी लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात.