nimbadaitya-mandir-daityanandur
|| तीर्थक्षेत्र ||
महाराष्ट्रातील अनेक गावं त्यांच्या अनोख्या परंपरांसाठी प्रसिद्ध आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले नांदूर हे गाव देखील त्याच्या अद्वितीय परंपरांसाठी ओळखले जाते. या गावात दैत्य निबाची पूजा केली जाते, आणि विशेष म्हणजे दैत्याच्या पूजेचे एक मंदिर देखील आहे.
पाथर्डीपासून २३ किलोमीटर पूर्वेला, श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी वसलेले नांदूर गाव, दैत्य निबाच्या पूजेची विशेषता म्हणून प्रसिद्ध आहे. हा दैत्य नवसालाही पावतो आणि त्याच्या व्रताचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तीन दिवसीय उत्सव.
मंदिराच्या संदर्भात श्री. भुजंगराव काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन कथा अशी आहे की प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात पंचवटी येथून केदारेश्वराकडे जात असताना गावातील जंगलात त्यांचा मुक्काम झाला. त्या काळात, निबादेत्य राक्षसाने प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि त्यांचा भक्त झाला.

प्रभू रामचंद्राने त्याला आशीर्वाद दिला की त्याच्या वास्तव्याने या गावात त्याची पूजा केली जाईल आणि गावात हनुमानाचे मंदिर नसेल. त्या काळापासून, नांदूर गावकऱ्यांनी निबादेत्याची पूजा मनोभावे केली आहे. गावात हनुमानाचे एकही मंदिर नसून, हनुमानाच्या नावाचा उच्चार करणे देखील अपशकून मानले जाते.
मंदिराच्या स्थापत्याची दगडी रचना आहे आणि हे मंदिर १५ ते १६ व्या शतकाचे असावे असे मानले जाते. मंदिराच्या रचनेत सभामंडप व गर्भगृह यांचा समावेश आहे. मंदिर नदीच्या किनाऱ्यावर स्थित असून दुमजली आहे, गावात याशिवाय दुसरी दुमजली इमारत नाही.
मंदिराच्या आवारात एक छोटेसे महादेव मंदिर देखील आहे. मंदिराच्या समोर एक वापरात नसलेली छोटी विहीर आहे, जिच्या आजूबाजूला संरक्षक दगडांवर काही वीरगळ असलेल्या दिसून येतात. याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
या देवस्थानचा नुकताच तिर्थक्षेत्रात समावेश झाला आहे. मंदिराचे अध्यक्ष डॉ. सुभाष देशमुख, विश्वस्त श्री. भुजंगराव काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर व गावासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे.
श्री. भुजंगराव काकडे यांनी दिलेल्या माहितीचा व सहकार्याचा आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. आधुनिक युगात भले ही ही कथा भाकडकथा वाटत असली तरी निबादेत्याची श्रद्धा नांदूरच्या गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.