हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीभावाने पाळले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. प्रत्येक चंद्र महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असे संबोधले जाते. ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असून, या दिवशी विष्णूभक्त आणि विठ्ठलभक्त उपवास करतात.

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हा उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ किंवा ‘मोक्षदायिनी एकादशी’ म्हणून साजरे केले जाते. या एकादशीला पितरांना मोक्ष मिळवून देणारी तिथी म्हणून विशेष मानले जाते. असे मानले जाते की, जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो, त्याच्या पूर्वजांसाठी मोक्षाचे मार्ग खुले होतात. यंदा, 8 डिसेंबर रोजी ही पवित्र एकादशी साजरी होणार आहे. या दिवशी उपवास केल्याने मोठ्या प्रमाणात पुण्य मिळते आणि आत्म्याला शांती लाभते.

महाभारताच्या युद्धकाळात अर्जुन मनाने खचला होता आणि मोहाच्या बंधनात अडकला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेच्या रूपाने जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवले आणि त्याला या संकटातून बाहेर काढले. हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी घडला होता. तेव्हापासून या एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ असे नाव पडले. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि उपवास केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे वारकरी संप्रदायात या एकादशीला फार मोठे स्थान आहे. असेही सांगितले जाते की, या व्रतामुळे केवळ स्वतःचेच नव्हे तर पितरांचेही पाप नष्ट होऊन त्यांना मुक्ती मिळते.

mokshada-ekadashi

या पवित्र दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करावी. पूजेसाठी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्याची ज्योत श्रीकृष्णासमोर ठेवावी. त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी संपूर्ण उपवास करणे श्रेयस्कर मानले जाते, परंतु ज्यांना ते शक्य नसेल ते फळे किंवा हलके सात्त्विक अन्न घेऊ शकतात. व्रत पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी श्रीकृष्णाची पुन्हा पूजा करावी, त्यानंतर ब्राह्मणांना भोजन घालावे आणि दान देऊन त्यांचा सन्मान करावा. असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते.

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादश्या येतात, त्यानुसार वर्षभरात 24 एकादश्या साजऱ्या होतात. या एकादश्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात विभागल्या जातात. शुक्ल पक्षातील एकादश्या म्हणजे चैत्र महिन्यापासून फाल्गुनापर्यंतच्या कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा आणि आमलकी या होत.

तर कृष्ण पक्षातील एकादश्या म्हणजे पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला आणि विजया या आहेत. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि कथा आहेत, ज्या भक्तांना जीवनात मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उन्नती देतात.