महादेवाची-आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥



mahadevachi-aarti

जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।। धृ ।।

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंभर विरुदे हैं नम संकट धारीं ॥ जय ॥ १ ॥

भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ।।
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा।
अभिनव कृपाकटाक्षै मतिउत्सव द्यावा ॥ जय ॥ २ ॥

शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ।।
कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा || जय || ३ ||



जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।
त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ।।
वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ।
विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ।। धृ ॥

पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो ।
त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो ।।
प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।
औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।। जय ।। १ ।।

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।
आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ।।
वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो ।
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्ती पावती हो ।। जय ।। २ ।।

ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो ।
तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो ।
केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ जय ॥ ३ ॥

लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो ।
संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ।
शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो । जय ।। ४ ।।