kartiki-ekadashi
|| कार्तिकी एकादशी ||
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणून संबोधलं जातं. ही एकादशी मोठी एकादशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या दिवशी वारकरी संप्रदायातील भक्त तसेच वैष्णव पंथाचे अनुयायी एक दिवसाचा उपवास करतात. चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या कालावधीचा हा शेवटचा दिवस मानला जातो.
कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असंही म्हणतात. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा विश्वाच्या पालनाचं कार्य हाती घेतात. त्यामुळे या एकादशीला देवोत्थनी किंवा देव उठी एकादशी असंही नाव पडलं आहे.
या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि कार्तिक पौर्णिमेला त्याची सांगता होते. यानंतर लग्नसराईचे शुभ दिवस सुरू होतात. हा दिवस पंढरपूरच्या विठुरायाचं स्मरण करून, त्याच्या नावाने उपवास करण्याचा आहे. या रात्री भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करतात आणि भगवान शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला ‘हरिहर भेट’ किंवा ‘हरिहर अद्वैत’ असं म्हणतात. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णू आणि शिव यांच्यातील एकत्वाचा अनुभव घेण्याचा पवित्र दिवस आहे.
कार्तिकी एकादशीचं महत्त्व :
कार्तिकी एकादशीचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी श्रीविष्णूंना बेलपत्र आणि शिवाला तुळशीपत्र अर्पण करण्याची परंपरा. हे का बरं? यामागे दोन कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे हे ‘हरि आणि हर’ म्हणजेच श्रीविष्णू आणि शिव यांच्यातील अभेदत्व दर्शवतं. दुसरं कारण अध्यात्मिक आहे – या दिवसाच्या कालमहिम्यामुळे बेलपत्रात श्रीविष्णूंची पवित्र शक्ती आणि तुळशीत शिवाची पवित्र शक्ती आकर्षित होण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या खास दिवशी ही परंपरा पाळली जाते.
ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या भक्तांनी शैव आणि वैष्णव भेदामुळे एकमेकांना विरोध करणं हे त्यांच्या मर्यादित विचारांचं आणि ईश्वराविषयीच्या अज्ञानाचं लक्षण आहे. हा भेदभाव दूर व्हावा आणि भक्तांनी संकुचित वृत्ती सोडून श्रीविष्णू आणि शिव यांच्यातील एकता अनुभवावी, हा या व्रताचा एक महत्त्वाचा हेतू आहे. कारण ईश्वर हा संप्रदायांच्या पलीकडचा आणि सर्व बंधनांपासून मुक्त आहे. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांमध्ये सात्त्विकता वाढते, त्यामुळे या दिवशी व्रत करणं अधिक फलदायी ठरतं. शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांत एकादशीचं व्रत श्रद्धेने पाळलं जातं.
कार्तिक पौर्णिमेला काही खास गोष्टी केल्याने धन, आरोग्य आणि मान-सन्मान मिळतो, असं मानलं जातं. यात दीपदान, दानधर्म, तुळशी पूजन, शिव-विष्णू स्मरण आणि पवित्र नदीत स्नान यांचा समावेश आहे. या कृतींमुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात, असा विश्वास आहे.

विष्णुप्रबोधोत्सव :
दक्षिणायन हा देवांचा रात्र काल मानला जातो, तर उत्तरायन हा त्यांचा दिवस. कर्क संक्रांती आषाढ महिन्यात येते, त्यामुळे आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू विश्रांतीसाठी शयन करतात, असं मानलं जातं. कार्तिकी एकादशीला ते जागृत होतात, म्हणून तिला ‘प्रबोधिनी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ म्हणतात. नवीन सृष्टीच्या निर्मितीचं कार्य ब्रह्मदेव करत असताना पालनकर्ता विष्णू निष्क्रिय असतो. चातुर्मासात विष्णू क्षीरसागरात शयन करतात, असं पुराणात सांगितलं आहे. आषाढी एकादशीपासून विष्णुशयन सुरू होतं आणि कार्तिकी एकादशी नंतर द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा होतो.
तुळशी विवाह :
कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य मिळतं आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, असं मानलं जातं. भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण स्थान आहे. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. तुळशीशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण राहते, असं पद्मपुराणात नमूद आहे. समुद्र मंथनातून अमृताचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली, अशी कथा सांगितली जाते. तुळशी विवाहानंतर चातुर्मासातील सर्व व्रतांचं उद्यापन केलं जातं.