kankaleshwar-mandir-beed
|| तीर्थक्षेत्र ||
मराठवाडा हा महाराष्ट्रातील एक समृद्ध, पण काहीसा दुर्लक्षित प्रदेश मानला जातो. या भागाची खास ओळख म्हणजे त्याचा ऐतिहासिक वारसा, पौराणिक महत्त्व, आणि प्राचीन वास्तू. या वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर. या मंदिराला ऐतिहासिक, धार्मिक, आणि कलात्मक दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
कंकालेश्वर मंदिराच्या बांधकामाबाबत असे मानले जाते की, हे मंदिर चालुक्य राजवटीतील राजा विक्रमादित्य सहावा यांच्या काळात, अंदाजे १० ते ११व्या शतकात बांधले गेले. चालुक्य काळात स्त्रिया लढाईत सामील होत असत, आणि याच परंपरेचे प्रतिबिंब या मंदिरातील शिल्पांमध्ये दिसते.

या मंदिराच्या स्तंभांवर आणि शिल्पांमध्ये ग्रीक शैलीचा प्रभावही दिसून येतो, जो त्या काळातील कला आणि स्थापत्यशास्त्राची वैशिष्ट्ये दाखवतो. कंकालेश्वर मंदिर दशावतारी असून बीड शहराची ग्रामदेवता म्हणून येथे पूजली जाते.
भारतीय प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले कंकालेश्वर मंदिर पाण्याने चारही बाजूंनी वेढलेले आहे. मंदिराच्या मध्यभागी असलेला ८४ मीटर चौकोनी तलाव आणि बिंदुसरा नदीच्या काठावर उभे असलेले हे मंदिर भक्तांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. मंदिरात प्रवेश करताना तलावातील दगडी पुलावरून जावे लागते, आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातही तलावाचे पाणी पूर्णतः आटत नाही. मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत आणि नक्षीदार खांब या वास्तूचे मुख्य आकर्षण आहेत.
कंकालेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि याचा स्थापत्य रचना मुखमंडप, अर्धमंडप, आणि तीन गर्भगृहे अशा तीन भागांत विभागलेली आहे. प्रत्येक गर्भगृह तारकाकृती रचनेत असून ते समान आकाराचे आहेत. मंदिराचा मंडप अष्टकोनी आहे, जो या वास्तूला विशेष आकर्षण प्राप्त करतो.
मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या शिल्पांमध्ये अनेक स्तर दिसतात. खालच्या स्तरात चौकट नक्षीदार आहे, तर वरच्या स्तरात कीर्तिमुखांनी अलंकृत भाग आहे.
भद्रावर देवकोष्ठांत शक्ती, ब्रह्मदेव, आणि शिवसंप्रदायाशी संबंधित देवता शिल्पांकित केल्या आहेत. मंडोवरावर विष्णूच्या दहा दशावतारांसह अष्टदिक्पालांचीही शिल्पे आहेत, जी या वास्तूची धार्मिक महत्ता दाखवतात.
मुख्य गाभाऱ्यात भगवान महादेवाची भव्य पिंडी आहे, आणि प्रवेश करताच नंदीची भव्य मूर्ती दिसून येते. उजव्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती आहेत, तर डाव्या गाभाऱ्यात संकटमोचक हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे, जी भक्तांचे लक्ष वेधून घेते.
मंदिराचे संपूर्ण रचनाकृती एक स्टार फिशच्या आकारासारखी असून, मंडपाच्या खालच्या भागात आणखी एक गर्भगृह आहे, जे अनेक वर्षांपासून बंद आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, कंकालेश्वर मंदिर अनेक वर्षे बंद होते, आणि निझामांनी महाशिवरात्रीच्या यात्रेलाही बंदी घातली होती.
मात्र, १९१५ मध्ये क्रांतिकारी पुरुषोत्तम गोडसे यांनी निझामाच्या बंदीचे उल्लंघन करून या मंदिरातील शिवपिंडीला अभिषेक केला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी, हैदराबाद राज्याच्या मुक्तीनंतर, कंकालेश्वर मंदिरही पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात आले, आणि मंदिराच्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची घोषणा झाली.
या इतिहासाची साक्ष देणारे कंकालेश्वर मंदिर आजही बीडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिन्न भाग आहे.