जनार्दन स्वामी-आरती

जयदेव जयदेव जय जनार्दना ।
परमार्थी आरती अभिन्न भावना ॥ धृ.॥

अवलोकितां जन दिसे जनार्दन ।
भिन्नाभिन्न कैचे दाखवि अभिन्न ।
अनेक एकत्त्वें दिसे परिपूर्ण ।
ठकली मन-बुद्धि कैचे अवगूण ॥ १॥

ज्योति चारी दीप्ती उजळुनिया दीप्ती ।
तेणें तेजस केली तेज आरती ।
पाहातां पहाणेपण पहावया स्थिती ।
नुरेचि पैं वेगळी देह आणि दीप्ती ॥ २॥

उजळी ते उजळणे उजळाया लागी ।
वेगळेपण कैचे नुरेचि भवभागीं ।
आंगीं अभिप्रायले आंगींच्या आंगीं ।
जिव शिवपण गेलें हरपुनि वेगीं ॥ ३॥

पाठी ना पोटी अवघा निघोटी।
सर्वांगे देख गा सर्वी वरिष्ठी ।
इष्ट ना निष्ट गुप्त ना प्रगट ।
अहं सोहं सगट भरियेला घोट ॥ ४॥

सर्वदा दिसे परि न कळे ना मना ।
जे जे दिसे ते ते दर्शन जाणा ।
अभाव भावेंसी हरपलि भावना अभिनव ।
आरती एका जनार्दना ॥ ५॥