चातुर्मासात विशेष महत्त्व असलेला पितृपक्ष सध्या सुरू आहे. या काळात येणाऱ्या एकादशीला खूपच खास स्थान प्राप्त झालं आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी ‘इंदिरा एकादशी’ म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा कालावधी हा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो.

या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचं श्रद्धेने स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पणाचे विधी केले जातात. पितृदोष दूर करून पूर्वजांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी या काळात श्राद्धाचे महत्त्व अनन्य आहे. या पितृपक्षातच येणारी इंदिरा एकादशी विशेष मानली जाते. विशेष म्हणजे, हा दिवस महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यांच्याशीही जोडला गेला आहे.

प्राचीन कथेनुसार, एकदा राजा इंद्रसेनाला स्वप्नात आपले वडील नरकात कठोर यातना भोगत असल्याचं दिसलं. त्यांना असह्य त्रास सहन करावा लागत होता. स्वप्नातच वडिलांनी त्याला सांगितलं की, “मला या नरकयातनेतून मुक्त करण्याचा मार्ग शोध.” हे स्वप्न पाहून राजा इंद्रसेन चिंताग्रस्त झाला. त्याने याबाबत देवऋषी नारद यांच्याशी चर्चा केली. तेव्हा नारदांनी त्याला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचं व्रत करण्याचा सल्ला दिला.

नारद म्हणाले, “या व्रताचं पुण्य तुझ्या पूर्वजांच्या नावाने दान कर.” राजा इंद्रसेनाने नारदांच्या सांगण्यानुसार श्रद्धेने व्रताचं पालन केलं आणि मिळालेलं पुण्य आपल्या वडिलांना अर्पण केलं. या व्रताच्या प्रभावाने त्याचे वडील नरकातून मुक्त होऊन थेट वैकुंठलोकात पोहोचले, अशी ही कथा पुराणात नमूद आहे.

indira-ekadashi

प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे. इंदिरा एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग मिळतो, असा विश्वास आहे. पंचांगानुसार, हे व्रत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केलं जातं. या व्रताचं पालन करणाऱ्यांनी काही नियमांचं काटेकोरपणे आचरण करावं. व्रताच्या दिवशी सात्त्विक भोजन करावं आणि कांदा, लसूण किंवा तिखट-उग्र पदार्थ टाळावेत.

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशीला, सकाळी स्नान करून नित्यकर्मं उरकावीत आणि व्रताच्या समाप्तीचा संकल्प करावा. या वेळी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. व्रतादरम्यान कोणाबद्दलही वाईट बोलणं टाळावं आणि अनावधानाने झालेल्या चुका असतील तर श्रीविष्णूंकडे क्षमा मागावी.

इंदिरा एकादशीचं व्रत पितृपक्षात येत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या व्रतामुळे केवळ स्वतःचं जीवन पवित्र होत नाही, तर पूर्वजांचंही कल्याण होतं. भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष हा आपल्या पितरांचं स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा काळ आहे. या काळात इंदिरा एकादशीचं व्रत करून त्याचं पुण्य पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांना नरकातून मुक्ती मिळून स्वर्गलोकात स्थान मिळतं, असा विश्वास आहे. या व्रताचं पालन करताना मन शांत ठेवून भगवान विष्णूंचं स्मरण करणं आवश्यक आहे. पितृपक्षातील ही एकादशी भक्ती आणि श्राद्ध यांचा सुंदर संगम मानली जाते.