तीर्थक्षेत्र

नाशिकमधील सिन्नर हे ठिकाण दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये यादव काळातील गोंदेश्वर मंदिर हे एक अप्रतिम पंचायतन प्रकारातील शिवमंदिर आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी, यादव वंशाच्या राव गोविंद या राजाने सिन्नरमध्ये शासन केले.

राजाच्या नावावरून या मंदिराचे नाव गोविंदेश्वर ठेवण्यात आले आणि त्यानंतर ‘गोंदेश्वर’ असे नाव पडले असावे. तज्ज्ञांच्या मते, हे मंदिर इ. स. 1160 च्या सुमारास बांधले गेले असावे. मात्र, हे केवळ एकल मंदिर नसून, शैवपंचायतन प्रकारातील पाच मंदिरांचा समूह आहे. त्यामुळे गोंदेश्वर मंदिराचे महत्त्व केवळ सिन्नर किंवा नाशिकपुरते मर्यादित न राहता, महाराष्ट्रातील स्थापत्यशास्त्राच्या वारशातही त्याचा विशेष ठसा उमटलेला आहे.

सिन्नरमधील हे गोंदेश्वर मंदिर प्राचीन भूमिज स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. पाच प्रमुख मंदिरांचा समूह असलेल्या या स्थानाला ‘शैवपंचायतन’ असे म्हटले जाते. मध्यभागी मुख्य शिवमंदिर असून त्याच्या चारही दिशांना पार्वती, गणपती, सूर्य, आणि विष्णू यांच्या उपमंदिरांचा समावेश आहे. या मंदिराची रचना साधी असूनही अत्यंत आकर्षक आहे.

gondeshwar-mandira-sinnar

मंदिराच्या पूर्वेस मुख्य प्रवेशद्वार आहे, तर दक्षिण आणि उत्तर दिशेलाही प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या संरचनेत स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, आणि गर्भगृह अशा भागांचा समावेश आहे. गर्भगृहाच्या शिखरावर उठावदार आणि नक्षीदार पटईचे शिखर बांधलेले आहे, जे आकाशाकडे झेपावणारे दिसते.

शिवाय, या शिखरावर केलेले कोरीवकाम अतिशय देखणे असून त्याची कलात्मकता पाहून आपल्याला शिल्पकारांच्या कुशलतेचा प्रत्यय येतो. गर्भगृहातील शिवपिंडही आकर्षक असून मंदिराचे विस्तृत आवार भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.

संपूर्ण मंदिरसंघाची वास्तू संरचना भव्य आणि सुंदर असून, स्थापत्यशास्त्रातील गोंदेश्वर मंदिराचे महत्त्व महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशात विशेष स्थान मिळवून देते.

सुमारे पाचशे वर्षे महाराष्ट्रात यादव राजवंशाने आपल्या सामर्थ्याने राज्य केले. यादव राजवटीच्या काळात मराठी भाषेचा विशेष विकास झाला आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात विविध साहित्यकृतींनी मोठा ठसा उमटवला. हे यादव राजघराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानत होते, त्यामुळे त्यांचा शासन कालखंड धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध मानला जातो.

यादवांनी उभारलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते आणि बारव आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभे आहेत, त्यातून यादवांच्या स्थापत्यशास्त्रातील कौशल्याची झलक पाहायला मिळते. यादव राजवटीच्या काळात स्थापत्य आणि शिल्पकला बहरात आली होती. त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिन्नरमधील शिवपंचायतन शैलीचे गोंदेश्वर मंदिर होय.

गोंदेश्वर मंदिरातील शिल्पकला त्रिमितीय स्वरूपाची असून, त्यावर पडणारा सूर्यप्रकाश आणि त्यातून निर्माण होणारी सावली मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालते.

मंदिराच्या सभामंडपातील खांब विविध नक्षीकामांनी सुशोभित केलेले असून, या खांबांवर आणि मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, देव-देवता, गंधर्व, तसेच पौराणिक कथा आणि रामायणातील प्रसंग अत्यंत कुशलतेने कोरलेले आहेत. या नक्षीकामामुळे मंदिराचे शिल्प वैभव अधिकच उठून दिसते, आणि यामुळे यादव काळातील स्थापत्यकलेच्या उत्कृष्टतेचा अनुभव येतो.