संत एकनाथ

श्रीकृष्णाय नमः ॥
श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्‍गुरु चित्समुद्‍रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा ।
ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥ १ ॥
हे ओंकाररूपा चित्समुद्रा, सद्गुरुराया ! तुला नमस्कार असो. मुक्तरूपी मोत्यांना तुझ्यामध्येच आश्रय मिळतो आणि ज्ञानवैराग्यरूप शिंपीच्या द्वाराने भाग्यवान् पुरुषांना तूंच ती देतोस १.

तुझी खोली अमर्याद । माजीं चिद्‍रत्‍नें अतिविविध ।
देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥ २ ॥
तुझी खोली तर अमर्याद आहे. तिच्यांत नानाप्रकारची चिद्रत्नें भरलेली आहेत. निजबोधरूपी चंद्र पाहिला की तुला अचाट भरती येते २.

ekanathi-bhagavata-chapter-vis

लथल्या स्वानंदभरत्यासी । गुरुआज्ञा-मर्यादा नुल्लंघिसी ।
स्वानंदलहरी चढोवढीसीं । तुजमाजीं अहर्निशीं उसळती ॥ ३ ॥
त्यायोगें स्वानंदाचा भर उसळला, तरी गुरुआज्ञामर्यादेचें तूं उल्लंघन करीत नाहीस. स्वानंदाच्या लाटांवर लाटा एकसारख्या तुझ्यामध्ये रात्रंदिवस उसळत असतात ३
.

ब्रह्मविद्या महाबंदर । तेथ निजभक्ति हें तारूं थोर ।
त्यासी वागवितां तूं कर्णधार । प्रेमाचें साचार चढविशी शीड ॥ ४ ॥
ब्रह्मविद्या हेच मोठे बंदर असून त्यांत निजभक्ति हे एक थोर तारूं आहे. त्याला चालविणारा नावाडी तू . त्याला संच प्रेमाचे शीड चढवितोस ४.

तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।
त्यांची मागुती येरझार । सत्य साचार खुंटली ॥ ५ ॥
आणि भक्त, संत व ज्ञानसंपन्न लोकांना तूं पलीकडे नेऊन पोचवितोस. त्यांचे पुन्हा येणे जाणे खरोखरी खुंटून जाते ५.

एक लावूनि कासेसी । भवसागरीं वागविशी ।
बुडण्याचें भय त्यासी । महाकल्पेंसीं बाधीना ॥ ६ ॥
कोणाला कासेला लावून भवसागरांत वागवतोस. त्याला महाकल्पांतीही बुडण्याचे भय बाधत नाहीं ६
.

एक बुडाले भक्तिसमरसीं । ते घातले शेषशयनापाशीं ।
एक बैसविले अढळतेसी । ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥ ७ ॥
कोणी भक्तीच्या सामरस्यांत बुडून गेले, त्यांना शेषशायीपाशी नेऊन ठेवतोस. कोणाला अढळपदावर नेऊन बसवितोस, ते ब्रह्मदेवादिकांनाही हालत नाहीत
७ .

तुझ्या सागरत्वाची परी । विजातीय तिळभरी ।
राहों नेदिसी भीतरीं । हे अगाध थोरी पैं तुझी ॥ ८ ॥
तुझ्या सागरत्वाचा गुण असा आहे की, आपल्यांत तिळभरही विजातीय म्हणून राहूंच देत नाहीस. ही तुझी गोष्ट मोठी अद्भुत आहे
८.

अत्यंतप्रळयीं जैं हा चढे । तैं ‘संसार’ हें नांवहि बुडे ।
वैकुंठकैलासावरता वाढे । मागें पुढें हाचि हा ॥ ९ ॥
हा जेव्हां आत्यंतिक प्रळयाच्या वेळी चढत जातो, तेव्हां संसार हें नावही बुडून जाते. वैकुंठकैलासाच्यावरही हा वाढतो. मागे पुढे सर्वत्र हाच हा होऊन जातो ९.

ऐशिया सद्‍गुरुसमुद्रोदकीं । एका एकपणें हरीत कीं ।
भीतरीं पडतां आवश्यकीं । अंगीकारी कीं जनार्दन ॥ १० ॥
अशा या सद्रुरूप समुद्रोदकामध्ये एकनाथ एकपणानें हरवला. आंत पडताक्षणीच जनार्दनाने त्याचा अंगीकार केला १०.

तो जनार्दन स्वयें देखा । एकादशाची करी टीका ।
तेणें अभंगीं घालूनि एका । कवित्व लोकां ऐकवी ॥ ११ ॥
त्या जनार्दनानेच स्वतः ही एकादशस्कंधावरील टीका केली. त्याने एकनाथाचे अभंगांत नांव घालून लोकांना कवित्वप्रकार ऐकविला ११.

जनार्दना आवडे एक । तो मी एका भेटतांचि देख ।
निजात्मभावें पडिलें ऐक्य । आपुलें निजसुख भोगवी ॥ १२ ॥
जनार्दनाला एकत्व आवडते. त्याला मी एका भेटल्यामुळे, निजात्मभावाने दोघांचे ऐक्य झाले व त्यांनी आपले निजसुख मला भोगविले १२.

बोलवी निजसुखाचि कथा । त्यासी आपणचि होय श्रोता ।
मग अर्थाच्या यथार्थतां । समाधानता देतसे ॥ १३ ॥
ती निजसुखाची कथा बोलवितो व ऐकावयाला श्रोताही आपणच होतो, मग त्यांतील अर्थाच्या यथार्थतेने समाधानताही तोच देतो १३.

यापरी गा जनार्दनें । एकादश मर्‍हाटा करणें ।
नव्हे माझे युक्तिचें बोलणें । हें स्वयें सज्ञानें जाणिजेल ॥ १४ ॥
ह्याप्रमाणे त्या जनार्दनानेच एकादश स्कंध सुलभ करून दिला. माझे पदरचे बोलणे नव्हे. सज्ञान असतील त्यांनाच हे समजेल १४.

त्या एकादशाची गतकथा । एकोणिसावा संपतां ।
गुणदोषांची कांहीं वार्ता । उद्धवासी तत्त्वतां सांगीतली ॥ १५ ॥
असो. अशा त्या एकादश स्कंधांतील मागील कथा म्हटली तर एकोणिसाव्या अध्यायाच्या शेवटीं गुणदोषांची काही गोष्ट उद्धवाला सांगितली १५.

गुणदोष जो देखणें । तोचि महादोष जाणणें ।
गुणदोष स्वयें न देखणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें मानिजे ॥ १६ ॥
ती ही की, गुणदोष पाहाणे हाच मोठा ‘दोष’ समजावा आणि गुणदोष न पाहाणे हाच मोठा ‘गुण’ मला श्रीकृष्णाला मान्य आहे
१६.

हें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर ।
काय गुणदोषांचा विचार । घरोघर लोकीं केला ॥ १७ ॥
हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाला मोठा चमत्कार वाटला. तो म्हणाला, घरोघर गुणदोषांचा विचार काय लोकांनी केला आहे ? १७.

तुम्हींच वेदमुखें आपण । प्रकटिलें गुणदोषलक्षण ।
तें तुमचें वेदवचन । केवीं अमान्य करावें ॥ १८ ॥
तुम्हीच आपण होऊन वेदमुखानें गुणदोषांचे लक्षण सांगितले आहे. ते तुमचें वेदांतील बोलणे अमान्य कसे करावे? १८.

ऐसें विधिनिषेधलक्षण । विचारितां तें वेदवचन ।
कां पां निषेधी श्रीकृष्ण । उद्धव तो प्रश्न स्वयें पुसे ॥ १९ ॥
विधिनिषेधलक्षणाचा विचार केला असतां तें वेदाचेंच वचन दिसून येते. असे असतां श्रीकृष्ण त्याचा निषेध का करतात? हाच प्रश्न उद्धव स्वतः विचारीत आहे १९.

विसावे अध्यायीं निरूपण । सांगावया गुणदोषलक्षण ।
भक्ति ज्ञान कर्म जाण । तिन्ही अधिकार भिन्न सांगेल ॥ २० ॥
विसाव्या अध्यायांतील गुणदोषलक्षण सांगण्याकरितां भक्ति, ज्ञान आणि कर्म हे तिन्ही भिन्न भिन्न अधिकार भगवान् सांगतील २०.

उद्धव म्हणे हे श्रीकृष्ण । तूं वेदरूपें आपण ।
बोलिलासी दोषगुण । तें परम प्रमाण आम्ही मानूं ॥ २१ ॥
उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा ! तूंच स्वतः वेदरूपाने गुणदोषांचे विवेचन केलें आहेस. तेच आम्ही अगदी प्रमाण मानून चालत आहों २१.

हा विधि हा निषेध । हें दाविताहे तुझा वेद ।
तो वेदानुवाद विशद । ऐक प्रसिद्ध सांगेन ॥ २२ ॥
हा विधि आणि हा निषेध, हे तुझा वेदच दाखवून देत आहे. तो वेदानुवाद तुला मी स्पष्ट करून सांगतों ऐक २२.
उद्धव उवाच-

विधिश्च प्रतिषेधश्च निगमो हीश्वरस्य ते ।
अवेक्षतेऽरविन्दाक्ष गुणं दोषं च कर्मणाम् ॥ १ ॥
[श्लोक १] उद्धव म्हणाला – हे कमलनयन श्रीकृष्णा ! कर्मांचे गुणदोष पाहूनच वेदांनी विधिनिषेध सांगितले आहेत आणि शिवाय वेद ही आपलीच ईश्वराची वाणी आहे. (१)

कमलनयना श्रीकृष्णा । विधिनिषेधलक्षणा ।
दाखवीतसे दोषगुणां । तुझी वेदाज्ञा प्रसिद्ध ॥ २३ ॥
उद्धव म्हणाला, हे कमलनयना श्रीकृष्णा ! वेदाची आज्ञा म्हणजे तुझी आज्ञा असल्याचे प्रसिद्ध आहे. तिनेच विधिनिषेधलक्षण म्हणजे हा गुण व हा दोष असे दाखविले आहे २३.

तुझिया वेदाचे वेदविधीं । गुणदोषीं जडली बुद्धी ।
ते मी सांगेन प्रसिद्धी । कृपानिधी अवधारीं ॥ २४ ॥
तुझ्याच वेदांतील जे विधि आहेत, त्यामुळेच गुणदोषांमध्ये बुद्धि दृढ झाली. हे कृपानिधे! तेच मी उघड उघड दाखवून देतो. श्रवण करावें २४.
वर्णाश्रमविकल्पं च प्रतिलोमानुलोमजम् ।
द्रव्यदेशवयःकालान् स्वर्गं नरकमेव च ॥ २ ॥
[ श्लोक २] वेदांनीच वर्णाश्रमांचे भेद, प्रतिलोम. (कनिष्ठ वर्णाच्या व्यक्तीने उच्चवर्णीय कन्येशी विवाह करणे) आणि अनुलोम. (उच्च वर्णाच्या व्यक्तीने कनिष्ठ वर्णाच्या कन्येशी विवाह करणे) यांमुळे होणारा वर्णसंकर, द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक हे सर्व सांगितले आहे. (२
)


तुझी जे का वेदवाणी । उघडी गुणदोषांची खाणी ।
अधममध्यमोत्तम मांडणी । वर्णाश्रमपणीं भेद दावी ॥ २५ ॥
अहो, तुमचीच जी वेदवाणी आहे, तीच मुळी गुणदोषांची उघडलेली खाण आहे. तिनेच उत्तम, मध्यम व अधम अशी मांडणी करून वर्णाश्रमांतील भेद दाखविला आहे २५.


द्रव्य विहित अविहित । हेंही वेद असे दावित ।
देश पुनित अपुनीत । काळही दावीत सुष्टुदुष्टत्वें ॥ २६ ॥
द्रव्यसुद्धा योग्य कोणतें व अयोग्य कोणते हा भेदही वेदानेच दाखविला आहे. तसेंच पवित्र स्थळ कोणते व अपवित्र कोणते ? उचित काल कोणता व अनुचित काल कोणता ? हेही त्यानेच दाखविलें आहे २६

.
पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त ।
वार्धक्यीं तें अतिकुश्चित । तेवीं शुद्धीं उपजवित गुणदोष वेदु ॥ २७ ॥
पूर्ववयामध्ये चित्त स्थिर असते, तारुण्यामध्ये तेंच कामलोलुप होते, आणि वार्धक्यामध्ये तेंच अत्यंत कुश्चित होते. याप्रमाणे शुद्धामध्ये तुझ्या वेदानेंच गुणदोष उत्पन्न केले आहेत! २७.


तुझाचि गा वेद देख । सूचिताहे स्वर्ग नरक ।
तेणें कर्माचें आवश्यक । साधक बाधक तो दावी ॥ २८ ॥
देवा! पाहा! तुझाच वेद स्वर्ग आणि नरक असल्याचे सांगतो. आणि त्याकरितां कमाची आवश्यकता सांगून साधकबाधक कर्मे कोणती तेही दाखवून देतो २८.
वर्णाश्रमांमाजील गुज । प्रतिलोमानुलोमज ।
ऐसे नाना भेदें भोज । वेदेंचि सहजा नाचविजे ॥ २९ ॥


वर्णाश्रमामध्ये सुद्धा ‘प्रतिलोमज’, ‘अनुलोमज’ अशा नानाप्रकारच्या भेदांना वेदच नाचवितो २९.
उत्तम वर्णाची जे नारी । हीन वर्णाचा गर्भ धरी ।
तेचि संतती संसारीं । अभिधान धरी ‘प्रतिलोमज’ ॥ ३० ॥


उच्चवर्णातील स्त्री असून ती जर हीनवर्णाचा गर्भ धारण करील, तर तिच्या त्या संततीला व्यवहारामध्ये ‘प्रतिलोमज’ असें नांव देतात ३०.
तेचि संतती प्रसिद्ध । सूत वैदेह मागध ।
ऐशिया नामाचें जें पद । तें जाण शुद्ध प्रतिलोमज ॥ ३१ ॥
तशांचीच संतति सूत, वैदेह आणि मागध म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाति होत. ते शुद्ध ‘प्रतिलोमज’ म्हणून समजावे ३१.


हीन वर्णाची जे नारी । उत्तम पुरूषाचा गर्भ धरी ।
ते ‘अनुलोमज’ संसारीं । शास्त्रकारीं बोलिजे ॥ ३२ ॥
आणि हीनजातीच्या स्त्रीला उच्चवर्णाचा गर्भ राहन जी संतति उत्पन्न होते, तिला व्यवहारांत शास्त्रवेत्ते पुरुष ‘अनुलोमज’ असे म्हणतात ३२.


अंबष्ट आणि मूर्धावसिक्त । पारशव आणि सात्वत ।
इत्यादि नांवें जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ॥ ३३ ॥
अंबष्ट, मूर्धावसिक्त, पारशव आणि सात्वत इत्यादि नांवाने जे प्रसिद्ध आहेत ते सारे अनुलोमज x समजावे ३३.


ऐसे नाना भेदप्रकार । अविधिविधींचा विचार ।
वेद प्रकाशितो साचार । गुणदोषां माहेर वेद तुझा ॥ ३४ ॥
असे जे नानाप्रकारचे भेद आहेत त्यांतील विधि-अविधींचा प्रकारही खरोखर वेदानेच सांगितलेला आहे. म्हणून तुझा वेदच गुणदोषांचे माहेर होय ३४.


गुणदोषभिदादृष्टिमन्तरेण वचस्तव ।
निःश्रेयसं कथं नॄणां निषेधविधिलक्षणम् ॥ ३ ॥
[श्लोक ३] अशाप्रकारे विधिनिषेध सांगणारे आपलेच वेदवाणीरूप वचन गुणदोषांमधील भेद पाहून आचरल्याशिवाय माणसांचे परमकल्याण कसे करणार ? (३)
हे गुण आणि हे दोष । उभयतां वैर लावी देख ।
तुझा वेद गा आवश्यक । होय प्रकाशक गुणदोषां ॥ ३५ ॥
हे गुण आणि हे दोष असे म्हटले की, त्या उभयतांत वैर लागते आणि ते गुणदोष स्पष्ट करून दाखविणारा खरा असा तुझा वेदच आहे ३५.


वैर लावूनि वेदवाणी । वाढवी गुणदोषमांडणी ।
तेथ मोक्ष पाविजे प्राणी । वेदवचनीं घडे केवीं ॥ ३६ ॥
वेदवाणीनेच हे वैर लावून देऊन गुणदोषांचे बंड माजविले आहे. तेव्हां वेदवचनाने प्राण्याला मोक्ष तो कसा मिळणार? ३६.


राऊळ बोलिलें आपण । जे न देखावे दोषगुण ।
तूंचि म्हणसी वेद प्रमाण । तैं दोषगुण देखावे ॥ ३७ ॥
आपण भगवंतांनी स्वतः सांगितले की, गुणदोषांकडे मुळी पाहूच नये आणि तूंच वेद हे प्रमाण असल्याचे सांगतोस. तें खरें मानले तर गुणदोष पाहात राहिले पाहिजे ३७.


एवं ऐकतां तुझें वचन । उभयतां आली नागवण ।
वेद प्रमाण कीं अप्रमाण । हे समूळ जाण कळेना ॥ ३८ ॥
मिळून तुझे भाषण ऐकल्याने दोहींकडूनही अडचणच उत्पन्न होते. तेव्हां वेद हे प्रमाणभूत मानावे किंवा नाहीत हे मुळीच कळत नाहीं ३८.
तुझ्या वचना विश्वासावें । तैं गुणदोषां न देखावें ।
तुझें वेदवचन मानावें । तैं देखावें गुणदोषां ॥ ३९ ॥
तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा तर गुणदोष पाहाता कामा नये; तुझें वेदवचन मानावें तर गुणदोष पाहात बसले पाहिजे ३
९.


ऐसे तुझेनि बोलें जाण । संशयीं पडले सज्ञान ।
मा इतर साधारण जन । त्यांची कथा कोण ये ठायीं ॥ ४० ॥
असल्या तुझ्या भाषणाने मोठे ज्ञानीसुद्धा संशयांत पडतात. मग इतर यःकश्चित् मनुष्यांची या ठिकाणी काय कथा? ४० .


(आशंका) माझें वचन वेदवचन । दोनी एकरूपें म्हणसी प्रमाण ।
तरी गुणदोषदर्शन । कां पां विलक्षण परस्परें ॥ ४१ ॥
(आशंका) माझे भाषण व वेदवचन ही दोन्ही सारखी प्रमाणच आहेत असें म्हणतोस, तर मग गुणदोषदर्शनांत परस्परविरुद्ध मत का असावें ? ४१.
माझें वेदाचें विधिविधान । नव्हतां वेदार्थाचें ज्ञान ।
म्हणशी मोक्ष न घडे जाण । वेद प्रमाण या हेतू ॥ ४२ ॥


माझ्या वेदाचे विधान हाताने न घडले, आणि वेदार्थाचे ज्ञानही झाले नाही, तर काहीं मोक्ष मिळत नाही; म्हणूनच वेद हा प्रमाण असें तूं म्हणतोस. ४२.
त्या मोक्षामाजीं काय कठिण । सकळ कर्में सांडिता जाण ।
घरा मोक्ष ये आपण । सहजचि जाण न प्रार्थितां ॥ ४३ ॥
पण तो मोक्ष मिळविण्याला कठिण ते काय ? सारी कर्मेच सोडून दिली, तर मोक्ष हा मिनतवार्‍या न करता आपण होऊनच घरी चालत येईल ४३.


म्हणसी वेदार्थ न कळतां । कर्म करितां कां त्यागितां ।
कदा मोक्ष न ये हाता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ४४ ॥
आतां कदाचित तूं असें म्हणशील की, वेदाचा अर्थ कळला नाही, तर कर्म केले किंवा टाकलें तरी खरोखर मोक्ष कधीही हाताला यावयाचा नाही ४४.


भासला दोराचा सर्प थोर । तेथ जपतां नाना मंत्रभार ।
करितां वाजंत्र्यांचा गजर । मारितां तिळभर ढळेना ॥ ४५ ॥
दोराचाच मोठा थोरला सर्प आहे असा भास झाला, तर तेथे हजारों मंत्र जपून किंवा वाजंत्र्यांचा कडकडाट करून किंवा थोपटूनही तो केसभर सुद्धा तिकडून ढळणार नाही ४५.


तो सादरें निरीक्षितां जाण । होय त्या सर्पाचें निरसन ।
तेवीं निर्धारितां वेदवचन । भवभय जाण निरसे ॥ ४६ ॥
तोच नीट निरखून पाहिला की पुरे, तो सर्प नाहींसाच होतो. त्याप्रमाणे वेदवचनांचा यथायोग्य विचार केला म्हणजे संसाराचे भय नाहींसें होतें ४६.


भवभयाची निर्मुक्तता । त्या नांव ‘मोक्ष’ जाण तत्त्वतां ।
तो वेदार्थावीण हाता । न ये सर्वथा आणिकें ॥ ४७ ॥
भवभयाचे निरसन होणे याचंच नांव ‘मोक्ष’. तो वेदार्थज्ञानावांचून दुसऱ्या कशानेही हाती यावयाचा नाही ४७.


वेदविधान न करितां । कर्म त्यागिलें उद्धततां ।
तेणें निजमोक्ष न ये हाता । परी पाखंडता अंगीं वाजे ॥ ४८ ॥
वेदांत सांगीतलेला कर्मत्यागाचा विधि न करता केवळ उन्मत्तपणानेच कर्म टाकून दिले, तर त्यायोगें मोक्ष तर मिळणारच नाही, पण उलट पाखांडीपणा मात्र पदरांत पडेल ४८.


विधियुक्त जो कर्मत्यागु । करूनि संन्यास घेतल्या साङ्गु ।
तैं म्हणसी न पडे वेदपांगु । हाहीं व्यंगु विचारु ॥ ४९ ॥
ह्याकरितां वेदांत सांगितलेल्या विधीप्रमाणेच कर्मत्याग करून यथोचित संन्यासग्रहण केले, तर मग वेदाचा पांग पडणार नाही असेंही कदाचित् तूं म्हणशील, तर तोही विचार योग्य नव्हे ४९.


श्रवणांग संन्यासग्रहण । तेथही असे विधिविधान ।
गुरुमुखें जें महावाक्य-श्रवण । तोही जाण वेदार्थ ॥ ५० ॥
कारण गुरुवाक्य श्रवण करण्यासाठी संन्यास घ्यावयाचा असतो. त्या श्रवणालाही विधिविधान असतें. गुरुमुखाने महावाक्य श्रवण करणे हा सुद्धा वेदार्थच आहे ५०.


(आशंका) । करितां देवांपितरांचें यजन । ते होऊनियां प्रसन्न ।
मोक्ष देतील आपण । हेंही वेदेंवीण घडेना ॥ ५१ ॥
[आशंका] आतां देवपितरार्थ यज्ञ केले, तर तेही प्रसन्न होऊन मोक्ष देतील; पण तेसुद्धा वेदाशिवाय होत नसते ५१.


स्वाहाकारें तृप्त सुर । स्वधाकारें तृप्त पितर ।
वेदविनियोगेंवीण देवपितर । प्रसन्नाकार कदा नव्हती ॥ ५२ ॥
स्वाहाकाराने देव तृप्त होतात आणि स्वधाकाराने पितर तृप्त होतात. सारांश, वेदविधीशिवाय देव किंवा पितर कधीच प्रसन्न होणार नाहींत ५२.


पितृदेवमनुष्याणां वेदश्चक्षुस्तवेश्वर ।
श्रेयस्त्वनुपलब्धेऽर्थे साध्यसाधनयोरपि ॥ ४ ॥
[श्लोक ४] हे सर्वशक्तीमान परमेश्वरा ! आपले वेदच पितर, देव, माणसे यांना कल्याणाचा मार्ग दाखविणारे डोळे आहेत कारण या डोळ्यांनीच स्वर्ग, मोक्ष, जगाचे कारण इत्यादी अन्य प्रमाणांनी न कळणार्‍या वस्तू व त्यांची साधने दिसतात. (४)


नाथिलेंचि चराचर । देव मनुष्य आणि पितर ।
वेदें प्रकाशूनि साचार । पूज्यत्वें थोर प्रतिपादी ॥ ५३ ॥
मिथ्यारूप असलेले स्थावर व जंगम ; तसेंच देव, मनुष्य आणि पितर ह्या सर्वाना वेदच दाखवून देतो, व ते पूज्यत्वाने थोर आहेत असेंही प्रतिपादन करतो ५३.


त्याहीमाजीं अतिविषम । उत्तम मध्यम आणि अधम ।
हा त्रिविध भेदसंभ्रम । वेद उपक्रम करूनि दावी ॥ ५४ ॥
पण त्यांच्यांतसुद्धा परस्परांना अत्यंत विरुद्ध असे उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा प्रकारचे तीन भेद करून दाखविण्याचा खटाटोपही वेदाचाच होय ५४.


यापरी गुणदोषलक्षण । तुवांचि वाढविलें आपण ।
या नांव म्हणसी मोक्षसाधन । तरी कां गुणदोष निवारिसी ॥ ५५ ॥
अशा रीतीने गुणदोषांच्या लक्षणांचा विस्तार तूंच केला आहेस, त्यालाच मोक्षाचे साधन म्हटले आहेस. त्या गुणदोषांचे निवारण आतां का करतोस बरें? ५५.


ऐशिया निरूपण घडामोडी । तुझेनि बोलें पडे आडी ।
तेणें गुणदोषांची परवडी । बाधा रोकडी अंगीं वाजे ॥ ५६ ॥
तुझ्या अशा भाषणाच्या उलटसुलट प्रकाराने तुझ्या बोलण्यांतच विरोध उत्पन्न होतो आणि त्यामळेच गुणदोषांचा प्रकार वाढून त्याची बाधा तत्काळ जाणवते ५६.


अवघा संसार काल्पनिक । तेथ एक स्वर्ग एक नरक ।
हा मोक्ष हा अतिबंधक । येणें वेदवादें लोक भ्रमविले तुवां ॥ ५७ ॥
संसार पाहूं गेलें तर सगळा काल्पनिक आहे. त्यांत एक स्वर्ग, एक नरक हा मोक्ष व हा बंध; अशी वेदवचनें सांगून लोकांना तूंच भ्रमात पाडले आहेस ५७.


पूर्वीं पुरुषाचे पोटीं । नव्हती गुणदोषांची गोठी ।
तुझ्या वेदानुवादपरिपाठीं । गुणदोषीं दृष्टी दृढ झाली ॥ ५८ ॥
पूर्वी पुरुषाच्या मनात गुणदोषांचा गंधही नव्हता; पण तुझ्या वेदवचनाच्या प्रकारामुळे गुणदोषांत दृष्टि दृढ होऊन गेली ५८.


एवं तुझेनि बोलें जाण । लोकांसी आली नागवण ।
भोगावया नरक दारुण । भ्रामक जाण वेदोक्ति तुझी ॥ ५९ ॥
तात्पर्य, तुझ्या ह्या भाषणाने लोकांची नागवणच होते. दारुण नरक भोगावयास कारण तुझी ही भ्रामक वेदोक्तिच झाली आहे ५९.


गुणदोषभिदादृष्टिर्निगमात्ते न हि स्वतः ।
निगमे नापवादश्च भिदाया इति ह भ्रमः ॥ ५ ॥
[श्लोक ५] गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीच आहे कोणा माणसाची नव्हे आणि वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केला आहे यामुळेच माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. (५)


एवं नानागुणदोषदृष्टीं । तुझेनि वेदें वाढविली सृष्टी ।
स्वतां पुरुषाचे पोटीं । गुणदोषदृष्टि असेना ॥ ६० ॥
तात्पर्य, अनेक गुणदोषांच्या दृष्टीची सृष्टि तुझ्या वेदानेच वाढविलेली आहे ! एरवीं पुरुषाच्या पोटांत गणदोषदृष्टि मुळीच नव्हती ६०


तुझ्या वेदानुवादविस्तरें । गुणदोष झाले खरे ।
ते तुझेनिही बलात्कारें । चित्ताबाहेरें न निघती ॥ ६१ ॥
खरोखर तुझ्या वेदाज्ञेनुसारच हे गुणदोष झालेले असल्यामुळे ते तूं स्वतः जोरावारीनें काढू म्हणशील तरी ते चित्तांतून बाहेर निघावयाचे नाहीत! ६१.


अनादि वेद प्रमाण । हें तुझें मुख्य वेदवचन ।
आतां न देखावे दोषगुण । हें नवें वचन मानेना ॥ ६२ ॥
वेद हे अनादि असून प्रमाणभूत आहेत, हे तुझेच मुख्य वेदवचन आहे. यास्तव आतां दोष व गुण पाहूं नयेत हे तुझें नवें भाषण मान्य करवत नाहीं ६२.


पहिले प्रकाशिले दोषगुण । आतां निवारावया काय कारण ।
हें न कळतां संपूर्ण । भ्रमित मन होतसे ॥ ६३ ॥
गुणदोष हे प्रथम दाखवून दिले आहेस, आणि आतांच ते नको म्हणण्याचे कारण काय ? हे नीटसें न कळल्यामुळे मन भ्रमात पडते ६३.


या भ्रमाची भ्रमनिवृत्ती । कृपेनें करावी कृपामूर्ती ।
ऐकोनि उद्धवाची वचनोक्ती । काय श्रीपती बोलिला ॥ ६४ ॥
म्हणून हे कृपामूर्ते ! कृपा करून हा भ्रम नाहीसा करून सोड. हे उद्धवाचे भाषण श्रवण करून श्रीकृष्ण काय म्हणाले ? ६४.


ऐकोनि उद्धवाची विनंती । योगत्रयाची उपपत्ती ।
अधिकारभेदें वेदार्थप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६५ ॥
ही उद्धवाची विनंती ऐकून तीन योगांची उपपत्ति अर्थात अधिकारभेदाप्रमाणे वेदार्थाची प्राप्ति कशी कशी होते, हे स्वतः श्रीकृष्ण सांगू लागले ६५.


श्रीभगवानुवाच-
योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयोविधित्सया ।
ज्ञानं कर्म च भक्तिश्च नोपायोऽन्योऽस्ति कुत्रचित् ॥ ६ ॥
[श्लोक ६] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – मीच मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन योगांचा उपदेश केला आहे याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कोठेही नाही. (६)


तेथ मेघगंभीरा वाणी । गर्जोनि बोले शार्ङ्गपाणी ।
माझे परम कृपेवांचूनी । माझी वेदवाणी कळेना ॥ ६६ ॥
मेघगर्जनेसारख्या गंभीर वाणीने श्रीभगवान् म्हणाले, माझ्या पूर्ण कृपेशिवाय माझी वेदवाणी कळत नाही ६६.


वेदशास्त्रार्थे अतिसंपन्न । जरी झाले अतिसज्ञान ।
परी माझ्या अनुग्रहेंवीण । माझा वेदार्थ जाण कळेना ॥ ६७ ॥
वेदशास्त्रार्थामध्ये निष्णात होऊन केवढेही ज्ञानी झाले तरी, माझ्या प्रसादावांचून माझ्या वेदाचा अर्थ मात्र कळावयाचा नाही, हे लक्षात ठेव ६७.


ब्रह्मा चहूं मुखीं वेद पढे । त्यासीही वेदार्थाचें चोखडें ।
वर्म नातुडेचि धडफुडें । मा इतर बापुडे ते किती ॥ ६८ ॥
ब्रह्मदेव चारही मुखाने वेद पढतो, पण त्यालासुद्धा वेदार्थांतील खरे रहस्य स्पष्टपणे समजत नाही, मग इतर बिचाऱ्यांची काय कथा ? ६८.


ब्रह्मा वेदार्थ आकळिता । तैं शंखासुर वेद कां नेता ।
ब्रह्मा वेदार्थीं लीन होता । तैं नाभिलाषिता सरस्वती ॥ ६९ ॥
ब्रह्मदेवाला जर वेदाचा अर्थ कळला असता, तर शंखासुराने वेद का नेले असते ? ब्रह्मदेवाला वेदार्थातील मर्म समजले असते, तर तो सरस्वतीचा अभिलाष करता ना ६९
.


माझा वेदाचा वेद्य निर्धार । तुज मी सांगेन साचार ।
ऐक उद्धवा सादर । वेदविचार तो ऐसा ॥ ७० ॥
आतां खरोखर माझ्या वेदाचाही वेद्य निर्धार तुला मी सांगून देतो. उद्धवा, नीट लक्ष देऊन श्रवण कर. वेदाचा विचार असा आहे ७०.


माझ्या वेदासी नाहीं बहु बंड । वृथा न बोले उदंड ।
ज्ञान-भक्ति-कर्मकांड । वेद त्रिकांड नेमस्त ॥ ७१ ॥
माझ्या वेदाला बहु बडबड करणे माहीत नाही. तो वायफळ कधीही बोलत नाही. ज्ञान, भक्ति आणि कर्म ही तीन कांडेंच काय ती वेदानें सांगितलेली आहेत ७१.


माझिया वेदांची वेदोक्ती । या तिंही योगांतें प्रतिपादिती ।
या वेगळी उपायस्थिती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ७२ ॥
माझ्या वेदाची जी वाणी आहे, ती ह्या तीन योगांचंच प्रतिपादन करते. म्हणून उद्धवा ! मोक्ष मिळण्याला दुसरा मार्गच नाही हे पक्के लक्षात ठेव ७२.


कोण ते तिनी योग । कैसे अधिकाराचे भाग ।
तेही पुसशी जरी चांग । तरी ऐक साङ्ग सांगेन ॥ ७३ ॥
तर ते तीन योग कोणते ? त्यांच्या अधिकाराचे विभाग कसे केलेले आहेत ? तेही तूं नीट विचारीत असशील तर सविस्तर सांगतों ऐक ७३.


निर्विण्णानां ज्ञानयोगो न्यासिनामिह कर्मसु ।
तेष्वनिर्विण्णचित्तानां कर्मयोगस्तु कामिनाम् ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] ज्यांनी कर्मे आणि त्यांची फळे यांपासून विरक्त होऊन त्यांचा त्याग केला आहे, ते ज्ञानयोगाचे अधिकारी होत याउलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसते, उलट त्यांची कामना असते, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला आहे. (७)


जे कां ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवींहूनि विरक्त ।
जे विधिपूर्वक संकल्पयुक्त । कर्म त्यागित संन्यासी ॥ ७४ ॥
जे कोणी खरोखरच अंतःकरणापासून ब्रह्मलोकींच्या भोगापर्यंत विरक्त असतात ; जे कोणी विधिपूर्वक व संकल्पयुक्त संन्यास घेऊन कर्माचा त्याग करतात ७४ ;


ऐशिया अधिकार्‍यांकारणे । म्यां ‘ज्ञानयोग’ प्रकट करणें ।
जेणें कां निजज्ञानसाधनें । माझी पावणें सायुज्यता ॥ ७५ ॥
अशा अधिकाऱ्यांकरिता मी ‘ज्ञानयोग’ प्रकट केला आहे. त्या आत्मज्ञानाच्या साधनाने माझी सायुज्यता म्ह. मद्रूपता प्राप्त होते ७५.


आतां जे कां केवळ अविरक्त । विषयालागीं कामासक्त ।
त्यांलागीं म्यां प्रस्तुत । ‘कर्मयोग’ येथ प्रकाशिला ॥ ७६ ॥
आता ह्या लोकांत जे केवळ अविरक्त असतात, विषयासाठी कामासक्त झालेले असतात, त्यांच्यासाठी मी कर्मयोग प्रगट केला आहे ७६.


उंच नीच अधिकारी देख । दोनी सांगितले सविशेख ।
आतां तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारीं ॥ ७७ ॥
ह्याप्रमाणे उच्च आणि नीच म्हणजे श्रेष्ठ व कनिष्ठ असे दोन्ही अधिकारी मी तुला सुस्पष्ट सांगून दिले. आतां उत्कृष्ट व अलौकिक असा तिसरा एक अधिकारी आहे, तोही ऐक ७७.


यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धस्तु यः पुमान् ।
न निर्विण्णो नातिसक्तो भक्तियोगोऽस्य सिद्धिदः ॥ ८ ॥
[श्लोक ८] पण जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही, तसेच ज्याला पूर्वपुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादींमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते, त्याला भक्तीयोगाने सिद्धी प्राप्त होते. (८)


हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्तीं ।
कोणा एका अभिनवगती । श्रद्धाउत्पत्ती श्रवणेंचि होय ॥ ७८ ॥
हरीची कथा सारेच ऐकतात, पण मजविषयीं श्रद्धा त्यांच्या मनांत उत्पन्न होत नाही; पण एखाद्याला कथाश्रवणानेंच विलक्षण श्रद्धा उत्पन्न होते ७८.


आईक श्रद्धेचें लक्षण । जें जें करी कथाश्रवण ।
तें हृदयीं वाढे अनुसंधान । सप्रेम मनन उल्हासे ॥ ७९ ॥
त्या श्रद्धेचे लक्षण ऐक. तो जें जें कांही श्रवण करतो, त्याचे अनुसंधान त्याच्या हृदयांत चालत असते. आणि त्यामुळे मननही उत्साहयुक्त प्रेमाने होऊ लागते ७९.
नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी ।
हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थीं ॥ ८० ॥
कथेची आवड अशी विलक्षण की, तिच्यामुळे मनामध्ये हर्ष अगदी दाटून येतो; आणि हृदयांत स्वानंदाची गुढीच उभारली जाते. इतकी त्याला श्रवणाची गोडी लागते ८०.


विषयांचें दोषदर्शन । मुख्यत्वें बाधक स्त्री आणि धन ।
आवरावीं रसना-शिश्न । हे आठवण अहर्निशीं ॥ ८१ ॥
त्यायोगें विषय हे दोषयुक्त असल्याचे दिसतात. त्यात मुख्यत्वेकरून स्त्री आणि धन हीच फार बाधक आहेत. याकरितां जिव्हेला आणि जननेंद्रियाला आवरावें, हीच आठवण रात्रंदिवस मनांत असावी ८१.


घायीं आडकलें फळें । तें पानपेना उपचारबळें ।
तेवीं विषयदोष भोगमेळें । कदाकाळें शमेना ॥ ८२ ॥
पायांत बाणाचे टोकं अडकून बसले, तर ते उपटून काढल्याखेरीज ती जखम नुसत्या उपचाराने बरी होत नाही; त्याप्रमाणे विषयांतील दोष विषय भोगून कधींच नष्ट व्हावयाचे नाहीत ८२.


येतां देखोनियां मरण । स्वयें होय कंपायमान ।
तेवीं विषयभोगदर्शन । देखोनि आपण चळीं कांपे ॥ ८३ ॥
मरण येत असलेले दिसले, की मनुष्य जसा थरथर कांपू लागतो; त्याप्रमाणे विषयभोग पाहिले की, तो (खरा साधक) थरथर कापूंच लागतो ८३.


एवं विषयीं दोषदर्शन । सर्वदा देखे आपण ।
परी त्यागालागीं जाण । सामर्थ्य पूर्ण आथीना ॥ ८४ ॥
ह्याप्रमाणे विषयांत असलेले दोष तो निरंतर पाहात असतो; पण ते पूर्णपणे टाकून देण्याचेही सामर्थ्य त्याच्या अंगांत नसते ८४.


सेवकीं राजा बंदीं धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दीधला ।
परी तो त्यासी विषप्राय जाहला । भोगीं उबगला अगत्यता ॥ ८५ ॥
सेवकांनी राजाला बंदीत घातले आणि त्याला स्त्रीचंदनादिक विलास दिले, परंतु ते त्याला विषासारखे वाटतात. त्या भोगांत तो उद्विग्नच राहातो ८५.


एवं भोगितां त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी ।
तेवीं भोगितां हा विषयासी । अहर्निशीं अनुतापी ॥ ८६ ॥
तात्पर्य, भोग भोगीत असतांना तो आपली सुटका कधी होईल म्हणून वाट पाहात असतो; त्याप्रमाणे हाही विषय भोगीत असतां रात्रंदिवस कंटाळलेला असतो ८६.


यापरी जो नव्हे विषयासक्त । ना निधडा नव्हे विरक्त ।
त्यालागीं माझा भक्तिपंथ । मी बोलिलों निश्चित वेदवाक्यें ॥ ८७ ॥
ह्याप्रमाणे जो विषयासक्तही नव्हे आणि खरोखर विरक्तही नव्हे, अशा मधल्या स्थितीतला असेल, त्याच्याकरितांच मी वेदमुखानें भक्तिमार्ग दाखवून दिला आहे ८७.


येहींकरितां माझी भक्ती । माझ्या स्वरूपीं लागे प्रीती ।
सहजें होय विषयविरक्ती । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥ ८८ ॥
अशांनी माझी भक्ति केली असता माझ्या स्वरूपावर त्यांचे प्रेम जडते, आणि आपोआपच विरक्ति प्राप्त होते. अशी ही माझी भक्ति सिद्धि देणारी आहे ८८.


मी वेदोक्त बोलिलों आपण । ते हे त्रिविध योग संपूर्ण ।
ज्ञान-कर्म-उपासन । वेदोक्त लक्षणविभाग ॥ ८९ ॥
मी स्वतः काय वेदांत सांगितले आहे, ते हे सारे तीन योगच होत. या तीन योगांच्या योगानेच वेदवाणीचे ज्ञान, कर्म व उपासना असे तीन विभाग झाले आहेत ८९.


तेथ कोण देखे दोषगुण । कोणासी दोंहीचें अदर्शन ।
मध्यम भागें वर्ते कोण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ९० ॥
त्यांत कोणाला गुणदोष दिसतात; कोणाला दोन्ही दिसत नाहीत. यांत मध्यम रीतीने कोण राहातो त्याचेही लक्षण ऐक ९०.


जो आसक्त विषयांवरी । तो कर्ममार्गींचा अधिकारी ।
त्यासी गुणदोषांहातीं नाही उरी । हें सांगेल श्रीहरि पुढिले अध्यायीं ॥ ९१ ॥
जो विषयावर आसक्त असतो तोच कर्ममार्गाचा अधिकारी होय; त्याची गुणदोषाच्या हातून सुटका होत नाही. हे पुढच्या अध्यायांत श्रीकृष्ण सांगणार आहेत ९१.


जो कां विरक्त ज्ञानाधिकारी । तो गुणदोषांहूनि बाहेरी ।
तो पाहतां अवघे संसारीं । न देखे तिळभरी गुणदोष ॥ ९२ ॥
पण जो खरोखर विरक्त असून ज्ञानाचा अधिकारी असतो, तो गुणदोषांपासून अगदी निराळा राहातो; साऱ्या जगांत पाहात असता त्याला तिळभरसुद्धा गुणदोष दिसत नाहीत ९२.


जग अवघें ब्रह्म पूर्ण । तेथ कैंचे दोषगुण ।
ऐसे कां जे ज्ञानसंपन्न । त्यां दोषदर्शन असेना ॥ ९३ ॥
जग जें पूर्ण ब्रह्मरूप आहे. त्यांत गुण कशाचे आणि दोष तरी कशाचे? असे जे ज्ञानसंपन्न असतात, त्यांना दोष म्हणून दिसतच नाहींत ९३.


अतिआसक्त ना विरक्त । ऐसे कां जे माझे भक्त ।
ते पूर्वीं गुणदोष देखत । परी सांडित विवेकें ॥ ९४ ॥
अतिशय आसक्तही नव्हेत व अतिशय विरक्तही नव्हेत , असे जे माझे भक्त असतात, ते प्रथमतः गुणदोष पाहातात; परंतु मागाहून विवेकाने सोडून देतात ९४.


भूतीं भूतात्मा मी परेश । तेथ देखों नये गुणदोष ।
ऐसे भजननिष्ठ राजहंस । ते गुणदोष सांडिती ॥ ९५ ॥
मी परमात्मा प्रत्येक प्राण्यांत आत्मस्वरूपाने राहिलों आहे. त्यांत गुणदोष पाहूं नयेत. असे जे भजननिष्ठ राजहंस असतात ते गुणदोष पाहाणे सोडून देतात ९५.


मी वेदार्थीं बोलिलों दोषगुण । ते दोषत्यागालागीं जाण ।
पराचे देखावे दोषगुण । हें वेदवचन असेना ॥ ९६ ॥
मी वेदार्थामध्ये जे गुणदोष सांगितले आहेत, ते दोष टाकावेत म्हणून. दुसऱ्याचे दोष पाहावेत असे काही वेदांत वचन नाही ९६.


ऐसे करावें वेदार्थश्रवण । दोष त्यजूनि घ्यावा गुण ।
परी पुढिलांचे दोषगुण । सर्वथा आपण न देखावे ॥ ९७ ॥
वेदार्थांचे श्रवण असे करावयाचें की, दोष टाकून गुण तेवढे घ्यावेत. परंतु दुसऱ्याचे दोष-गुण आपण कधीच पाहूं नयेत ९७,


जो ज्याचा गुणदोष पाहे । तो त्याचा पापविभागी होये ।
जो पुढिलांचे गुणदोष गाये । तो निरया जाये तेणें दोषें ॥ ९८ ॥
जो दुसऱ्याचे दोष पाहातो, तो त्याच्या पातकाचा विभागी होतो. जो दुसऱ्याचे दोष वर्णन करतो, तो त्याच दोषाने नरकाला जातो ९८.


आतां कर्माचा अधिकारु । सांगताहे शारंगधरु ।
तो जाणोनियां विचारु । कर्मादरु करावा ॥ ९९ ॥
आतां श्रीकृष्ण कर्माचा अधिकार (कोणाला व कुठपर्यंत असतो ) सांगत आहेत. तो विचार लक्षात आणून कर्माचा आदर करावा ९९.


तावत्कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता ।
मत्कथाश्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते ॥ ९ ॥
[श्लोक ९] जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही किंवा जोपर्यंत माझ्या कथांचे श्रवणकीर्तन इत्यादींविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कर्मे करावीत. (९)


तंवचि करावा कर्मादर । जंव विरक्ति नुपजे साचार ।
ठाकल्या विरक्तीचें घर । स्वर्ग संसार मळप्राय ॥ १०० ॥
खरी खरी विरक्ति उत्पन्न झाली नाही, तोपर्यंत कर्म करावें विरक्तीचें घर सांपडले की स्वर्ग आणि संसार हे दोन्ही त्याज्य होतात १००.

हो कां वमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना ।
तेवीं विषयभोगीं जाणा । साचार मना चिळशी उपजे ॥ १ ॥
ओकून टाकलेल्या मिष्टान्नावर ज्याप्रमाणे जिव्हा पुन्हा वासना ठेवीत नाही; त्याप्रमाणेच खरोखर विषयोपभोगाविषयी जेव्हा मनाला चिळस उत्पन्न होते १ ;


तेथ कर्माची परिपाठी । समूळ खुंटली गा गोठी ।
कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥ २ ॥
तेव्हां कर्माचा मार्ग म्ह. त्याविषयींचा विचार समूळ बंद पडतो; किंवा दैवयोगाने अंत:करणांत उल्हास उत्पन्न होऊन माझी कथा ऐकण्याविषयी अत्यंत आदर उत्पन्न होतो (तेव्हाही कर्ममार्ग संपतो) २.


करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसंडे अंतःकरण ।
विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥ ३ ॥
माझी कथा श्रवण करीत असतां प्रेमाने अंत:करण उचंबळून येते, घरादाराची आठवण बुजून जाते, तेव्हां कर्मत्यागाचा प्रत्यवाय दोष बाधत नाही ३.


जैसें माझे कथेचें श्रवण । तैसेंचि माझे हृदयीं स्मरण ।
तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥ ४ ॥
माझ्या कथेचे जसे श्रवण, तसेंच हृदयांत माझे स्मरणही चालते. अशा अवस्थेत प्रत्यवाय दोष शिरत नाही. त्याची बोळवणच झाली म्हणून समजावें ४.


करितां मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण ।
प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥ ५ ॥
माझी कथा श्रवण करीत असतां कोट्यवधि कर्माचा लोप होऊन गेला तरी, कर्मलोपाचा दोष बाधत नाही. एवढा माझ्या कथेचा प्रभाव आहे ५.


(संमतिश्लोक) मत्कर्म कुर्वतां पुंसां कर्मलोपो भवेद्यदि ।
तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्रः कोट्यो महर्षयः ॥ १ ॥
(संमति श्लोक)- मदर्थ कर्म करणार्‍यापुरुषांच्या विहित कर्मांचा जर लोप झाला तर त्याचें तें कर्म तीन कोटी महर्षि करतात.
(अर्थ) माझी करितां सप्रेम भक्ती । भक्तांचीं नित्यकर्में जैं राहती ।
तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥ ६ ॥
माझी प्रेमपुरस्सर भक्ति करीत असतां जेव्हा माझ्या भक्तांकडून नित्यकर्मे होणेची राहातात, तेव्हां ती त्यांची कर्में तेहतीस कोटी ऋषि महंत पूर्ण करीत असतात ६.


एवढें मत्कथेचें महिमान । माझें करितां कीर्तन पूजन ।
तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥ ७ ॥
एवढा माझ्या कथेचा महिमा आहे. माझे पूजन व कीर्तन चालू असतां तेथें विघ्नांची येण्याची बिशाद काय? समोर तोंडसुद्धा दाखविण्याचे त्यांना सामर्थ्य नाही ७.


हो कां पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर ।
तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥ ८ ॥
किंवा एखादा पुरुष पूर्ण विरक्त झाला, अथवा माझ्या सेवेत तत्पर होऊन राहिला, तर त्याच्या ठिकाणी कर्म बिचारें दास बनून राहाते. असें स्वत:च श्रीकृष्णांनी सांगितले ८.


कर्में करितां स्वधर्मस्थितीं । उद्धवा आहे माझी प्राप्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥ ९ ॥
उद्धवा ! स्वधर्मानुरूप कर्मे केली असता माझी प्राप्ति होते. तेही मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों ऐक ९.


स्वधर्मस्थो यजन्यज्ञैरनाशीः काम उद्धव ।
न याति स्वर्गनरकौ यद्यन्यत्र समाचरेत् ॥ १० ॥
[श्लोक १० ] उद्धवा ! आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत, तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही. (१०)


गृहस्थाश्रमी स्वधर्मस्थिती । जरी विचरेना ‘अन्यगती’ ।
तरी येथेंचि लाहे विरक्ति । सुनिश्चितीं उद्धवा ॥ ११० ॥
उद्धवा! गृहस्थाश्रमामध्ये स्वधर्मानुरूपच राहिले, अन्यथा मार्गाने चाललें नाही, तर येथेच निश्चयेंकरून विरक्ति प्राप्त होते १०.
अन्यगतींचें विचरण । तें तूं म्हणशील कोण ।
ऐक त्याचेंही लक्षण । समूळ खूण सांगेन ॥ ११ ॥
आतां अन्यथा मार्गाचरण म्हणजे काय ? असें विचारशील तर त्याचेही साद्यन्त लक्षण सांगतों ” ११.


परद्रव्य-परदारा-रती । परापवादाची वंदती ।
ही नांव गा ‘नारकी गती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥
परद्रव्य आणि परदारा ह्यांचा अभिलाष व परनिंदेचा हव्यास, यालाच उध्दवा ! ‘नरकाचा मार्ग’ म्हणतात १२.


दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचें बैसे धरणें ।
कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥ १३ ॥
स्वर्गातील सुख ऐकून तेच पाहिजे म्हणून ज्याचें मन धरणे घेते, आणि जो तदनुकूल कर्मे करितो, त्याला अचूक स्वर्गभोग प्राप्त होतो १३.


या जाण दोन्ही ‘अन्यगती’ । यांतूनि काढूनियां वृत्ती ।
यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥ १४ ॥
ह्या दोन्ही ‘अन्यगति’ म्ह० विपरीत स्थिति आहेत. यांतून वृत्ति काढून यज्ञादिक कर्मानी माझे यजन केले असतां, नित्यनैमित्तिक कर्मानींच वैराग्यस्थिति म्ह. नैराश्य प्राप्त होतें १४.


तैं न पडे स्वर्गीचें पेणें । न घडे नरकासी जाणें ।
येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥ १५ ॥
तेव्हां स्वर्गामध्ये वस्ती करावी लागत नाही, किंवा नरकालाही जावे लागत नाही. इहलोकींच विरक्तता प्राप्त होते. हीच गोष्ट श्रीकृष्ण सांगतात १५.


अस्मिंल्लोके वर्तमानः स्वधर्मस्थोऽनघः शुचिः ।
ज्ञान विशुद्धमाप्नोति मद्‍भक्तिं वा यदृच्छया ॥ ११ ॥
[श्लोक ११ ] आपल्या धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्मे न करण्याने पवित्र होतो त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते किंवा त्याचे भाग्य असल्यास त्याला माझी भक्ती प्राप्त होते. (११)


असतां ये लोकीं वर्तमान । ऐसें करितां स्वधर्माचरण ।
होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥ १६ ॥
ह्या लोकांत वागत असतांना अशा प्रकारे स्वधर्माचरण करीत राहिले म्हणजे पुण्य आणि पाप ह्या दोहोंचेही क्षालन होऊन तो निर्मलत्वाने अत्यंत पवित्र होतो १६.


तेथ निरसोनि भवभान । प्रकाशे माझें शुद्ध ज्ञान ।
कां सप्रेम माझें भजन । ‘पराभक्ति’ जाण तो लाहे ॥ १७ ॥
तेव्हां संसाराचे भान नाहीसे होऊन त्याला माझें ‘शुद्ध ज्ञान’ प्राप्त होते, किंवा माझे सप्रेम भजन म्ह• ‘पराभक्ति’ त्याला प्राप्त होते १७.


जे भक्तीमाजीं मी आपण । सदा होय भक्ताअधीन ।
तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पायां लागे ॥ १८ ॥
अशा भक्तीमध्ये मी स्वतः निरंतर भक्ताच्या अधीन होऊन राहातो. तेव्हा ज्ञान हे मोक्षासहवर्तमान आपणच येऊन भक्ताच्या पायाला लागते १८.


ऐक ज्ञानाचा परिपाक । संसारा नांव ‘महादुःख’ ।
मोक्ष तो म्हणे ‘परमसुख’ । मद्‍भक्त देख दोनी न मानी ॥ १९ ॥
आता त्या ज्ञानाचा परिणाम ऐक. ते संसाराला ‘महादुःख’ व मोक्षाला ‘परमसुख’ असें नांव देते. परंतु माझा भक्त असतो तो ही दोन्हीही मानीत नाही १९.


सप्रेम करितां माझें भजन । नाठवे भवभयबंधन ।
तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्‍भक्तां भक्तिचा पूर्ण उल्हास ॥ १२० ॥
प्रेमाने माझे भजन करीत असतां संसारभयाचे बंधन मुळीच आठवत नाहीं. तिकडे मोक्षाला कोण विचारतो ? माझ्या भक्तांना भक्तीचाच पूर्ण उल्हास असतो १२०.


ज्यातें म्हणती ‘महादुःख’ । तें भक्तांसी भगवद्‌रूप देख ।
ज्यातें म्हणती ‘परमसुख’ । तेंही आवश्यक भगवंत ॥ २१ ॥
ज्याला ‘महादुःख’ असे म्हणतात’ तें भक्तांना भगवद्रूपच असते; तसेच ज्याला ‘महासुख’ असे म्हणतात, तेही त्यांना भगवद्रूपच असते २१.


यापरी भक्त माझ्या भजनीं । विसरला सुखदुःखें दोनी ।
मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥ २२ ॥
अशा प्रकारे माझा भक्त माझ्या भजनामध्ये सुख व दुःखें दोन्ही विसरतो . मी जो भगवंत त्या एकाशिवाय त्रिभुवनांत दुसरे काही त्याला दिसतच नाही २२.


ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितां न ये जाण ।
जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥ २३ ॥
पण अशा प्रकारची माझी जी पूर्ण भक्ति ती कधी आणून येत नाही हे लक्षात ठेव. तर जेव्हा मी भगवंत प्रसन्न होतो, तेव्हांच दैवयोगाने ती प्राप्त होते २३.


मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसें कल्पील तुझें मन ।
तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥ २४ ॥
आता मी कशाने प्रसन्न होतो असें तुझ्या मनात येईल, तर (सांगतों की) मला प्रसन्न करून घ्यावयाला हा नरदेहच एक कारण आहे २४.


स्वर्गिणोऽप्येतमिच्छन्ति लोकं निरयिणस्तथा ।
साधकं ज्ञानभक्तिभ्यामुभयं तदसाधकम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] स्वर्गातील देव आणि नरकातील लोकसुद्धा या मनुष्यदेहाची इच्छा करतात कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे स्वर्गीय किंवा नारकीय शरीरे फक्त भोगसाधने आहेत. (१२)


ज्यांसी स्वर्गभोगाची अति गोडी । जिंहीं अमरत्वाची उभविली गुढी ।
जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥ २५ ॥
ज्यांना स्वर्गभोगाची अतिशय गोडी आहे, ज्यांनी अमरत्वाची गुढी उभारली आहे, असे जे स्वर्गाच्या बंदीखान्यांत पडले आहेत, ते सुद्धा मोठ्या आवडीनें नरदेहाचीच इच्छा करतात २५

.
नरकयातना महाघोर । जिंहीं भोगिला भोग थोर ।
ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥ २६ ॥
तसेच ज्यांनी भयंकर नरकयातना भोगलेल्या असतात, ते प्राणीही मोठ्या आवडीने नरदेहाची इच्छा करतात २६.


नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचें आयतन ।
जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥ २७ ॥
नरदेह हा अत्यंत पवित्र असून भक्तीचे आणि ज्ञानाचें तो आश्रयस्थान आहे. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते, तो नरदेह केवळ धन्य होय २७.


जेणें नरदेहें जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।
जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥ २८ ॥
ह्या नरदेहामुळेच जन्ममरण निखालस खुंटून जातें, जीव समाधान पावतो, आणि स्वतः स्वानंदघन होतो २८.


ज्या नरदेहाचे संगतीं । होय अविद्येची निवृत्ती ।
लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥ २९ ॥
ज्या नरदेहाच्या संगतीने अविद्येची निवृत्ति होते व भगवत्पदाची प्राप्ति होते, त्या नरदेहाची ही कीर्ति प्रसिद्धच आहे २९


ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती ।
प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछि ॥ १३० ॥
सर्व प्राणिमात्र नरदेहाचीच इच्छा करतात; पण प्राणी ते बिचारे काय होत? प्रत्यक्ष ब्रह्मदेवही नरदेहाची इच्छा करतो १३०.


ऐसें नरदेहाचें श्रेष्ठपण । येथ साधे भक्तिविज्ञान ।
परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥ ३१ ॥
इतका नरदेह श्रेष्ठ आहे. कारण यांत भक्ति आणि ज्ञान ही प्राप्त होतात; पण भक्तिज्ञानाने मात्र मनुष्यदेह प्राप्त होत नाही ३१
.


न नरः स्वर्गतिं काङ्क्षेन्नारकीं वा विचक्षणः ।
नेमं लोकं च काङ्क्षेत देहावेशात्प्रमाद्यति ॥ १३ ॥
[श्लोक १३] विचारवंताने स्वर्ग, नरक किंवा या देह यांपैकी कशाचीही कामना करू नये कारण देहात अहंबुद्धी बाळगल्यामुळेच त्याच्याकडून प्रमाद घडतात. (१३)


झालिया नरदेहाची प्राप्ती । अधर्में होय नरकागती ।
कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥ ३२ ॥
नरदेहाची प्राप्ति झाली तरी, अधर्माने वागल्यास नरकासच जावे लागते : किंवा पुण्यसंपत्तीचा संग्रह केल्यास त्यामुळे अचूक स्वर्गाची प्राप्ति होते ३२.
स्वर्गे होय पुनरावृत्ती । नरकीं घोर दुःखप्राप्ती ।
म्हणूनि साण्डोनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरूं म्हणती ॥ ३३ ॥
स्वर्ग मिळाल्याने पुनर्जन्माच्या फेऱ्यांत पडावे लागते; आणि नरकामध्ये तर दुःसह दुःख भोगावे लागते. याकरितां या दोहींचेही प्रेम सोडून नरदेहाची प्रीति धरावी म्हणतात ३
३.


मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी ।
जेथ कामक्रोधांची जोडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥ ३४ ॥
(त्यांतही असा विचार आहे की,) मनुष्यदेहाची आवड झाली तरी ती देहबुद्धिच होय. हिच्यामुळे कामक्रोधांची जोड होते. आणि क्षणोक्षणी असंख्य प्रमाद घडतात ३४.


स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख ।
साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥ ३५ ॥
ह्याकरितां स्वर्ग, नरक किंवा मृत्युलोक ह्यांचीही प्रीति सोडून देऊन ज्ञान किंवा भक्तिच अवश्यमेव संपादन करावी ३५,


ज्ञान साधावयालागीं जाण । कष्टावें न लगे गा आपण ।
सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥ ३६ ॥
ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्याला विशेष कष्ट सोसण्याचे कारण नाही. प्रेमाने माझे भजन केले असतां ज्ञानाला ढकलून घातले तरी ते घरांत शिरतच ३६.


गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्कान्नें त्याचीं होतीं ।
तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥ ३७ ॥
गव्हांच्या राशी हातांत आल्या म्हणजे त्यापासून पाहिजे ती पक्वान्ने करता येतात. त्याप्रमाणे माझी भक्ति हाती आली की, ज्ञानसंपत्ति घरांत शिरते ३७.


द्रव्य झालिया आपुले हातीं । सकळ पदार्थ घरास येती ।
तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥ ३८ ॥
आपल्या हातांत पैसा असला म्हणजे सारे पदार्थ घरबसल्या चालत येतात, त्याप्रमाणे माझी भक्ति साध्य केली म्हणजे भुक्ति आणि मुक्ति दोन्ही दासी होऊन राहातात ३८.


म्हणती करितां भगवद्‍भक्ती । विघ्नें छळावया आड येती ।
तेथें मी सुदर्शन घेऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥ ३९ ॥
हे ऐकून कदाचित तूं म्हणशील की, माझी भक्ति करू लागले असतां छळ करण्याकरितां विघ्ने आड येतील. तर सांगतों की, मी हातामध्ये सुदर्शन घेऊन माझ्या भक्तांचे रात्रंदिवस संरक्षण करीत असतों ३९.


पक्ष्याचेनि नामोच्चारें । म्यां वेश्या तारिली चमत्कारें ।
पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥ १४० ॥
पक्ष्याच्या निमित्ताने नामस्मरण केल्यावरून मी वेश्येचाही चमत्काराने उद्धार केला आहे. विघ्नांचे दात पाडून मी त्या व्यभिचारिणीचाही उद्धार केला १४०.


यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन ।
तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥ ४१ ॥
ह्याकरितां नरदेह प्राप्त झाला असतां जो माझें भजन करतो, तोच खरोखर उद्धृवा! ह्या संसारामध्ये धन्य होतो, हे लक्षात ठेव ४१
.


भावें करितां माझे भक्तीसी । भाविका उद्धरीं मी हृषीकेशी ।
जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥ ४२ ॥
मनोभावाने माझी भक्ति केली असता मी श्रीकृष्ण त्या भाविकाचा उद्धार करतो आणि जे कोणी ज्ञानाभिमानाने चढून जातात, त्यांना मी यमाच्या हातांत देतों ४२.


साधितां माझी भक्ति कां ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान ।
तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥ ४३ ॥
माझी भक्ति किंवा ज्ञान संपादन करतांना ज्यांना ज्ञानाभिमान चढतो, त्यांना मी आपल्या हातानेच दोषांना आंदण देतों ४३


उद्धवा तूं ऐसें म्हणशी । ‘ते कां दीधले यमहातेशी’ ।
तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥ ४४ ॥
आतां उद्धवा! तूं कदाचित् असें म्हणशील की, त्यांना यमाच्या हातांत का देतां ? तर ते एवढ्याचकरितां की, त्या महादोषी जनांचा छळ करून तो ज्ञानाभिमानापासून त्यांना सोडवितो ४४.


यालागीं सांडूनि देहाभिमान । भावें करितां माझें भजन ।
पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥ ४५ ॥
ह्याकरितां देहाभिमान सोडून भक्तिभावानें माझें भजन करूनच पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु नरदेहानेंच माझ्याप्रत येऊन पोचले आहेत ४५.


एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेत सः ।
अप्रमत्त इदं ज्ञात्वा मर्त्यमप्यर्थसिद्धिदम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] या शरीराला मरण असूनही ते परमात्मप्राप्ती करून देणारे आहे, असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्‍न करावा. (१४)


केवल अस्थि चर्म मूत्र मळ । पाहतां देहो अतिकश्मळ ।
परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥ ४६ ॥
देह पाहूं गेले तर तो केवळ अस्थि, चर्म व मळमूत्र ह्यांचाच झालेला असल्यामुळे अत्यंत अमंगल होय; परंतु त्याने परिपूर्ण व निश्चळ असें जें ब्रह्म, तें निर्मळ फल प्राप्त होते ४६.


ऐसे नरदेहांचे कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान ।
सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ ४७ ॥
पूर्वीच्या ज्ञानसंपन्न लोकांनी नरदेहाचे कारण लक्षात आणून देहाभिमान सोडून ते ब्रह्मसुखाला पोचले ४७.


देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हारवावा ।
वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं नेईल रौरवा निश्चित ॥ ४८ ॥
देह हा निंद्य आहे म्हणून सोडून द्यावा, तर एवढा लाभ हातचा दवडावा; बरें तो वंद्य म्हणून त्याचा प्रतिपाळ करावा, तर निश्चयेंकरून रौरव नरकाला जावें ४८.


देह सांडावा न मांडावा । येणें परमार्थचि साधावा ।
तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥ ४९ ॥
ह्याकरितां देहाचा तिरस्कारही करूं नये व फारसा आदरही करूं नये. तर त्याच्याकडून परमार्थसाधन करून घ्यावे. उद्धवा ! ते कसे साध्य करावें ह्यांतील गुप्त रहस्य तुला सांगतो. नीट लक्ष देऊन श्रवण कर ४९.


जेणें देहें वाढे भवभावो । तेणेंचि देहेंकरीं पहा हो ।
होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥ १५० ॥
ज्या देहाच्या योगानें संसारभाव वाढतो, त्याच देहामुळे संसाराचाच अभावही होऊन जातो, मात्र अहंभाव सोडला पाहिजे १५०.


सांडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान ।
होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्‌रूपें ॥ ५१ ॥
पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु देहाभिमान सोडण्याकरितां नित्य जागृति ठेवूनच मत्स्वरूप पावून ब्रह्मरूप होऊन गेले ५१.


नरदेहें ब्रह्मप्राप्ती । ऐसें मानूनि निश्चितीं ।
म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥ ५२ ॥
‘नरदेहानें ब्रह्मप्राप्ति होते हें जर निश्चित आहे, तर मग अगोदर विषयभोग भोगून घेऊन, नंतरच ब्रह्मस्थिति साधीन ‘ असे कदाचित तूं म्हणशील ५२;


ऐसें विश्वासतां आपण । रोकडी आली नागवण ।
देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥ ५३ ॥
पण असा भरंवसा धरून राहिल्यास आपली आपण नागवण करून घेतल्यासारखे होईल! कारण, देहाबरोबरच मृत्यु पाठीस लागलेला असतो. तो हरिहरांनासुद्धा टाळतां येत नाही ५३
.


एवं देहाचें अनिवार्य मरण । तें केव्हां येईल न कळे जाण ।
यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥ ५४ ॥
तात्पर्य, देहाचे मरण हें अपरिहार्य आहे. ते केव्हां येईल हें कळावयाचे नाही. ह्याकरितां तें येण्यापूर्वीच आपला स्वार्थ आपण साधून घ्यावा ५४.


धरितां निजदेहाची गोडी । अवचितां आदळे यमधाडी ।
बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥ ५५ ॥
आपल्या देहावर आपण लुब्ध झालों, तर यम अवचित येऊन त्याच्यावर धाड घालतो; आणि त्यांत आपला स्वार्थ बुडतो. याविषयींचा निर्णय श्रीकृष्ण सांगतात ५५.


छिद्यमानं यमैरेतैः कृतनीडं वनस्पतिम् ।
खगः स्वकेतमुत्सृज्य क्षेमं याति ह्यलम्पट: ॥ १५ ॥
[श्लोक १५ ] हे शरीर एक वृक्ष आहे यावर घरटे तयार करून जीवरूपी पक्षी त्यात राहातो पक्षी जसा तुटणारे झाड सोडून सुरक्षित जागी उडून जातो, त्याप्रमाणेच या शरीरवृक्षाला सुद्धा यमासारखे निर्दय पुरूष रात्रंदिवस तोडतच असलेले पाहून; (१५)


जेवीं कां वृक्षाचे अग्रीं नीड । पक्षी करूनि वसे अतिगूढ ।
तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर घरटे करून पक्षी अगदी लपून राहतो; त्या वृक्षाचे सदृढ असलेले मूळ निर्दय लोक खालून तोडू लागतात ५६.


तें देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्यें सांडोनि गृहाभिमान ।
पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥ ५७ ॥
तो वृक्ष तोडला जात आहे असे पाहतांच त्या पक्ष्याने आपल्या घरट्याचा अभिमान सोडून पलायन केले तरच त्याचे कल्याण होते. आणि तसाच राहिला तर त्याचे मरण अचूक आहे ५७.


त्या वृक्षाचिया ऐसें जाण । देहासवें लागलें मरण ।
तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥ ५८ ॥
त्या वृक्षाप्रमाणेच देहाबरोबर मरण हें लागलेले आहे ; त्यांत जीव राहिला असता त्याला भयंकर दुःख भोगावे लागते; ते कधीच चुकणार नाही ५८.


अहोरात्रैश्छिद्यमानं बुद्धाऽऽयुर्भयवेपथुः ।
मुक्तसङ्गः परं बुद्ध्वा निरीह उपशाम्यति ॥ १६ ॥
[श्लोक १६ ] व त्यामुळे आपले आयुष्य क्षीण होत असलेले जाणून विषयलंपट नसलेला जीव भयकंपित होऊन शरीराची आसक्ती सोडून देतो व परमात्मतत्त्व जाणून घेऊन शांत होतो. (१६)


अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग ।
हा जाण नीच नवा रोग । अंगीं साङ्ग लागला ॥ ५९ ॥
रात्रंदिवस आयुष्य कमी कमी होत असते. कलिकाळाचा वेग तर महाभयंकर असतो. हा एक नित्य नवा रोगच अंगाला अगदी जडून गेला आहे ५९.


काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु ।
जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥ १६० ॥
काळ हा कालमानाप्रमाणे वय खातच असतो. यांत आयुष्याचा घात होतो, हें लक्षात आणून व नरदेह हा पतन पावणार हे जाणून तो घरादाराविषयी उदासीन होतो १६०.


जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान ।
साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥ ६१ ॥
देहाचा क्षणभंगुरपणा लक्षात आणून देहाभिमान सोडून देण्याला व भक्ति ज्ञान संपादन करण्याला तो अत्यंत जागृत असतो ६१.


न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण ।
तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥ ६२ ॥
देहाभिमान सोडला नाही तर मरण येऊन अंगावर कोसळेल ह्या भीतीने अंगांत कांपरें भरून तो स्वतःच पूर्ण वैराग्य धारण करतो ६२.


वैराग्ययुक्त करितां भक्ति । होय देहाभिमानाची निवृत्ती ।
तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥ ६३ ॥
वैराग्ययुक्त भक्ति केली म्हणजे देहाभिमानाची निवृत्ति होते. तेव्हां ज्ञानसंपत्ति घरांत शिरते व मग चारही मुक्ति पायांला लागतात ६३.


ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती ।
निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥ ६४ ॥
ह्याप्रमाणे निजात्मप्राप्ति झाली म्हणजे प्रवृत्ति आपोआपच बंद पडते व निवृत्तीचीही निवृत्ति होते. आणि मग संसाराची आपोआपच शांति होते ६४.


ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले ‘परमसुख’ ।
हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥ ६५ ॥
असे नरदेहाला येऊन पुष्कळ लोक आत्मानंदसुखाला पात्र झाले. असें असतां जे मूर्ख लोक हें सुख साध्य करीत नाहीत, त्यांची देव (पुढील श्लोकांत) निंदा करीत आहे ६५.


नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।
मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १७ ॥
[श्लोक १७] सर्व फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळण्यास अत्यंत कठीण असे मानवशरीर ही एक सुदृढ नाव आहे गुरूंना तिचे कर्णधार करून आणि मलाच अनुकूल वायू करून जो मनुष्य या संसारसागरातून पार होत नाही, तो आत्मघातकीच होय. (१७)


चौर्‍यायशीं लक्ष जीवयोनी । त्यांत मनुष्यदेहावांचूनी ।
अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥ ६६ ॥
चौऱ्यायशी लक्ष जीवयोनी आहेत. त्यांत मनुष्यदेहाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यास कोणीच अधिकारी नाहीं ६६.


जेणें देहें होय माझी प्राप्ती । यालागीं ‘आद्य देहो’ यातें म्हणती ।
याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥ ६७ ॥
नरदेहाने माझी प्राप्ति होते, म्हणून या देहाला ‘आद्य’ असे म्हटले आहे. याची प्राप्ति होणे फार कठिण आहे. मोठ्या भाग्यानेंच नरदेह प्राप्त होत असतो ६७.


‘सदृढ’ म्हणजे अव्यंग । ‘अविकळ’ म्हणजे सकळ भाग ।
नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङ्ग संपूर्ण ॥ ६८ ॥
सुदृढ म्हणजे सर्व अवयवांनी युक्त; कोठेही व्यंग नाहीं; बहिरा नाहीं, अंध नाहीं, पंगु नाही की मुका नाही ह्याप्रमाणे सर्वांगांनी संपूर्ण असा आहे ६८.


भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ।
तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥ ६९ ॥
आणि तोही भरतखंडांत प्राप्त होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण होय. आणि त्यांतून अंत:करणांत परमार्थाविषयींचा विवेक असेल, तर त्याचा मी परमात्मा आज्ञाधारक होऊन असतों ६९.


मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती ।
परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥ १७० ॥
प्रत्यक्ष मी परमात्माच त्याचा आज्ञाधारक, तेथे इतर देवांचा व मनुष्याचा पाड काय ? पण हा नरदेह पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण नरदेह मिळणे परम कठिण असते १७०.


जोखितां पुण्यपाप समान । तैं नरदेहाची प्राप्ती जाण ।
तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥ ७१ ॥
पुण्य आणि पाप तोलले असतां जेव्हां समसमान भरतें तेव्हांच नरदेह प्राप्त होतो हे लक्षात ठेव. असा नरदेहच पुन्हा आपल्याला मिळावा, म्हणून कोणीही जोखून कर्माचरण करूं शकत नाही ७१.


पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणें आवश्यक ।
पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥ ७२ ॥
पुण्य अधिक झाले तर स्वर्ग भोगणें अवश्य पडते, आणि पातकाचे माप अधिक भरल्यास अनिवार नरक भोगावा लागतो ७२.


ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण ।
अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं ॥ ७३ ॥
अशी कर्माची गति मोठी गहन आहे. ह्यांत काकतालीय न्यायानेच संसारसमुद्र तरून जाण्याचे महान् तारूं असें जें मनुष्यपण, ते एखाद्या वेळी चुकून वांट्यास येते ७३.


‘सुलभ’ म्हणिजे अविकळ । ‘सुकल्प’ म्हणिजे विवेकशीळ ।
यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥ ७४ ॥
‘सुलभ’ म्हणजे अविकल व ‘सुकल्प ‘ म्हणजे विचार-शील ह्याला पैलतीरास नेणारा कुशल नावाडी असा एक गुरुच आहे ७४
.


कानीं निजगुज उपदेशिता । यालागीं गुरु ‘कर्णधार’ म्हणती तत्त्वतां ।
कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥ ७५ ॥
गुरु हा निजगुज कानांत सांगतो म्हणूनच त्याला ‘कर्णधार’ असे म्हणतात. कानाला धरतांच (कानांत महावाक्याचा उपदेश करतांच) भक्तांचा उद्धार करीत असल्यामुळे गुरु हाच सर्वथैव ‘कर्णधार ‘ होय ७५.


भवाब्धीमाजीं नरदेह तारूं । तेथ सद्‍गुरु तोचि कर्णधारु ।
त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥ ७६ ॥
संसारसमुद्रामध्ये नरदेह हेंच तारूं आहे. तेथे सद्गुरु तोच कर्णधार म्ह० सुकाणूवाला आहे. तसेंच पैलथडीला पोचवावयाला मी श्रीहरि हा अनुकूल वाहणारा वायु आहे ७६.
कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळ ।
चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥ ७७ ॥
गुरु कर्णधार हा किती कुशल असतो म्हणून सांगू? भोवरे, धबधबे, खळाळाचे पाणी, हेलकावे, विकल्पाचे कल्लोळ व पाण्याचे एकामागून एक येत असलेले लोंढे या सर्वांस चुकवून तो आपली नौका झपाट्याने पुढे काढतो ७७
.


लावूनि विवेकाचें आवलें । तोडिती कर्माकर्मांचीं जळें ।
भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥ ७८ ॥
विवेकाची वल्ही लावून कर्माकर्माचे पाणी तोडले जाते व भजनरूप शिडाच्या बळावर नौका मोठ्या वेगाने चालत असते ७८
.


कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिषें ।
त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारूं उल्हासें चालवी ॥ ७९ ॥
कामक्रोधादि थोर थोर मासे आमिष मिळविण्याकरितां टपत बसलेले असतात. त्यांवर शांतीचे जाळे टाकून तो आपले तारूं मोठ्या शिताफीने चालवीत असतो ७९.


ठाकतां सारूप्यादि बंदरें । तारुवामाजीं अतिगजरें ।
लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥ १८० ॥
वाटेत सारूप्यादि मुक्तींची बंदरें लागतात, तेव्हां त्या तारवामध्ये अनुहत वाद्यांच्या तुताऱ्या जयजयकारानें गर्जू लागतात १८०.


नेतां सलोकतेचे पेठे । तारूं उलथेल अवचटें ।
लावितां समीपतेचे वाटे । तारूं दाटे दोंही सवां ॥ ८१ ॥
सलोकतेच्या पेठेला तारूं नेले तर ते कदाचित् उलथून पडेल, किंवा समीपतेच्या मार्गाला लावलें तर ते दोन्ही बाजूला कलंडूं लागेल ८१.


करावें सरूपतेमाजीं स्थिरु । तंव तो दाटणीचा उतारु ।
ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारूं सायुज्यामाजीं ॥ ८२ ॥
ह्याकरितां सरूपतेमध्ये तारूं स्थिर करावे, तर तिकडे दाटी फार असते, हे सर्व लक्षात आणून तारूं सायुज्यबंदरांत ढकलतात ८२.


ते धार्मिकाची धर्मपेंठ । नाहीं सुखसारा खटपट ।
वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥ ८३ ॥
तेथे धार्मिक लोकांची निर्मळधर्मपेठच असते. तिच्यांत सुखसारा व खटपट नाही. वस्तु सगळीच निर्मळ ; पाहिजे तो माल एकदम द्यावा घ्यावा ८३.


ऐसें दुर्लभ नरदेहाचें तारूं । जेथ मी श्रीगुरुरूपें कर्णधारु ।
येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥ ८४ ॥
असें हें दुर्लभ नरदेहाचे तारूं असून त्यांत श्रीगुरुरूपानें मीच कर्णधार म्ह० नावाडी आहे. या तारवाच्या साहाय्याने जो कोणी संसार तरून जाणार नाही, तो पुरुष आत्मघातकी समजला पाहिजे ८४.


नरदेह वेंचिलें विषयांसाठीं । पुढें नरक भोगावया कल्पकोटी ।
तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥ ८५ ॥
पुढे कोटिकल्प नरकयातना भोगण्यासाठीच विषयांमध्ये हा नरदेह खर्च केला, तर आपल्या हातानेच आपल्या उरांत शस्त्र खुपसून घेण्यासारखे आहे ८५.


परपारा अवश्य आहे जाणें । तेणें नाव फोडूनि भाजिजे चणें ।
कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥ ८६ ॥
पलीकडच्या कांठाला जाणे अवश्य असल्याने नौका फोडून जाळून त्यावर चणे फुटाणे भाजून खावेत, किंवा शहाण्यांनी थंडीच्या भयाने पांघरुणे जाळून तापत बसावें ८६,


तैसें येथ झाले गा साचार । थित्या नरदेहा नागवले नर ।
पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥ ८७ ॥
तसेंच खरोखर येथें होतें. फुकटच्या नरदेहालाच लोक मुकतात. त्यामुळे पुढे दुःखाचे दुर्धर डोंगर येऊन पडतात! ८७.


सकळ योनीं विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चितीं ।
नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८८ ॥
खरोखर साऱ्या योनीमध्ये विषयासक्ति ही सर्वांनाच लागलेली आहे. नरदेहांतही विषयसंबंधानें तशीच स्थिति राहिली, तर त्याच्या तोंडांत मातीच पडली म्हणून समजावें ८८.


पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसारपार ।
तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ ८९ ॥
अशा प्रकारचे श्रेष्ठ नरशरीर प्राप्त झाले असूनही जो संसाराच्या पैलथडीला जाणार नाहीं, तो उद्धवा ! खरोखर आत्महत्याच करणारा पुरुष होय ८९.


कोटी ब्रह्महत्या-गोहत्यांसी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेंसीं ।
परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित त्यासी असेना ॥ १९० ॥
कोट्यवधि ब्रह्महत्या किंवा गोहत्या केल्या तरी त्याला शास्त्रार्थाने प्रायश्चित्त आहे; पण जो आत्महत्याच करून घेतो, त्याला काही प्रायश्चित्त असत नाहीं ९० .


जो आत्महत्या करूनि निमाला । तो मरतांचि नरकासी गेला ।
प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शास्त्रार्थें बोला बोलावें ॥ ९१ ॥
कारण, जो आत्महत्या करून मरण पावतो, तो मरतांच नरकाला जातो. मग प्रायश्चित्त घ्यावयाला उरले कोण ? आणि शास्त्रार्थ तरी सांगावयाचा कोणाला ? ९१.


अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेहीं भोगु भोगविला ।
हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥ ९२ ॥
अमृत विकून टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणे नरदेहांत येऊन विषयभोगच भोगले, तर जीवाचा खरा स्वार्थ बुडून तो अधिक नाडला मात्र जातो ९२.


लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्तीं नर ।
नरकीं बुडाले अपार । हें शारङ्गधर बोलिला ॥ ९३ ॥
उत्तम शरीर प्राप्त होऊन विषयासक्तीमुळे असंख्य लोक बुडतात, हेच श्रीकृष्णांनी सांगितले ९३.


असोत या मूर्खांचिया गोठी । ऐक उत्तमांची हातवटी ।
जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥ ९४ ॥
पण ह्या मूर्खाच्या गोष्टी राहू द्यात. आता वेदार्थाला अनुसरून आपल्या हितावर दृष्टि ठेवून सावध असणाऱ्या उत्तम लोकांची पद्धत ऐक ९४.


अतिविरक्त जे स्वभावें । तिंहीं काय कर्तव्य करावें ।
कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥ ९५ ॥
जे स्वभावानेच अत्यंत विरक्त असतात, त्यांनी कोणते कर्तव्य करावें? कोणती गोष्ट टाकून द्यावी हेच देव सांगतात ९५


यदाऽऽरम्भेषु निर्विण्णो विरक्तः संयतेंद्रियः ।
अभ्यासेनात्मनो योगी धारयेदचलं मनः ॥ १८ ॥
[श्लोक १८] कर्मामध्ये दोष पाहून त्यांचा उबग आल्यामुळे विरक्त झालेल्या योग्याने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करावे. (१८)


जो कर्मारंभींच विरक्त । फळाशा नातळे ज्याचें चित्त ।
मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥ ९६ ॥
जो कर्मारंभींच विरक्त असतो; फलाच्या आशेला ज्याचे चित्त शिवतही नाहीं; ‘मला मोक्ष मिळावा’ असेंही ज्याच्या अंत:करणाला आठवत नाही ९६,


खडतर वैराग्याची दृष्टी । इंद्रियांसी विषयांची गोष्टी ।
करूंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥ ९७ ॥
वैराग्याची दृष्टि खडतर असल्याने तो इंद्रियांना विषयाची गोष्टसुद्धा काढू देत नाही. इतका कडकडीत मनोनिग्रही असतो. आणि स्वरूपाची धारणा नेटाने दृढ राखतो ९७.


करूनियां श्रवण मनन । माझ्या स्वरूपाचें अनुसंधान ।
अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥ ९८ ॥
श्रवण व मनन करून माझ्या स्वरूपाचे नेहमीं अनुसंधान ठेवतो. अखंड माझाच निदिध्यास करीत राहातो. मन तिळभरसुद्धा ढळू देत नाही ९८.


धरोनि धारणेचें बळ । स्वरूपीं मन अचंचळ ।
अणुभरी होऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥ ९९ ॥
धारणेच्या बळाने आत्मस्वरूपामध्येच मन स्थिर ठेवतो; यत्किंचितही ढळू देत नाही. निजबोधाने ते निश्चळ राखतो ९९.


एकाकी मन पाहें । स्वरूपीं कैसें निश्चळ होये ।
त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥ २०० ॥
परंतु मन एकदम आत्मस्वरूपामध्ये निश्चळ कसे होते? त्या अभ्यासाचा उपायही स्वतः श्रीकृष्ण सांगतात २००.

धार्यमाणं मनो यर्हि भ्राम्यदाश्वनवस्थितम् ।
अतंद्रितोऽनुरोधेन मार्गेणात्मशं नयेत् ॥ १९ ॥
[श्लोक १९] स्थिर करताना जर मन चंचल होऊन इकडेतिकडे भटकू लागले, तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणावे. (१९)


स्वरूपीं लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन ।
न सांडी आपुला गुण । चंचळपण स्वभावे ॥ १ ॥
आत्मस्वरूपामध्येच लक्ष लावून बसले असतां मन जर स्थिर न राहील, ते आपल्या चंचल स्वभावाप्रमाणे आपले गुण न सोडील १,


साधक आळसें विकळे । कां आठवी विषयसोहळे ।
तैं स्वरूपींहूनि मन पळे । निज चंचळे स्वभावें ॥ २ ॥
किंवा साधक आळसाने विकल होईल किंवा विषयाचे सुख आठवू लागेल, तर त्यामुळे मन हे आपल्या चंचल स्वभावाप्रमाणे स्वरूपांतून पळून जातें २.


तेथें नेहटूनि आसन । स्वयें होऊनि सावधान ।
स्मरोनि सद्‍गुरुचे चरण । स्वरूपीं मन राखावें ॥ ३ ॥
अशा वेळी आपण आसन अढळ करून स्वत: सावधान राहून सगुरूचे चरण स्मरून स्वरूपांतच मनाला ठेवीत जावें ३.


नेदीतां विषयदान । हटावलें क्षोभे मन ।
तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥ ४ ॥
मनाला विषयदान दिले नाही, तर हट्टानें अधिकच क्षुब्ध होते. अशा वेळी स्वरूपानुसंधान न सोडता त्याला विध्युक्त अन्नपाणी देत जावें ४.


(आशंका) ॥ ‘सर्पा पाजिलें पीयूष । तेंचि परतोनि होय विष ।
तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल’ ॥ ५ ॥
(आशंका) ‘सर्पाला अमृत पाजलें, तर तेच पुन्हा विष होते; त्याप्रमाणे मनालाही विषयसुख दिले तर तेंही पहिल्यापेक्षा अधिकच खवळेल.’ ५.


तरी ऐसें द्यावें विषयदान । जेणें आकळलें राहे मन ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें नारायण सांगता ॥ ६ ॥
याकरितां मनाला जे विषयभोग द्यावयाचे ते असे द्यावेत की, त्याच्या योगानें तें स्वाधीनच राहील. ह्याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण (पुढील श्लोकांत ) सांगतात ६.


मनोगतिं न विसृजेज्जितप्राणो जितेंद्रियः ।
सत्त्वसंपन्नया बुद्धया मन आत्मवशं नयेत् ॥ २० ॥
[श्लोक २० ] इंद्रिये आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नये नंतर सत्त्वसंपन्न बुद्धीने मनाला आपल्या ताब्यात घ्यावे. (२०)


मोकळें न सोडून मन । न सोडूनि अनुसंधान ।
करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥ ७ ॥
मनाला मोकळे न सोडता, स्वरूपानुसंधानही न टाकतां, अन्नपाणी व निद्रा हे विषय मनाला देणे निजहिताचे असते ७

.
साधकें साधूनि आपण । जरी जिंतिले इंद्रियप्राण ।
तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरूपीं नेहटून राखावें ॥ ८ ॥
साधकानें साधन करून जरी स्वतः इंद्रियांना आणि प्राणांना जिंकले, तरी मनाला मोकळे सोडूंच नये. स्वरूपांतच नेटाने राखावें ८.


जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधीं नागवला ।
संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥ ९ ॥
मनावर जो विश्वास ठेवतो, त्याला कामक्रोध नागवून सोडतात; संकल्पविकल्प त्याला लुटतात; आणि महामोह त्याला ग्रासून टाकतो ९.


जाणोनि मनाचें महाबळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ ।
तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥ २१० ॥
मनाचे बळ मोठे आहे, हे लक्षात आणून विवेकाचा साखळदंड त्याच्या पायास बांधावा; म्हणजे तो त्याला इकडे की तिकडे हिचमिचू देत नाही. आपोआपच स्थिर करून सोडतो २१०.


मनाविवेकाचे उभयसंधीं । सत्त्वसंपन्न होय बुद्धी ।
ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥ ११ ॥
मन आणि विवेक या दोहोंचे ऐक्य झाले की, बुद्धि सत्त्वगुणाने युक्त होऊन ती विषयाचे मूळच उपटून टाकते; आणि सविकार उपाधि तोडून टाकते ११.


मन जेथ जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे ।
मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥ १२ ॥
मन जिकडे जिकडे पळून जाते; तिकडे तिकडे विवेक हा दत्त म्हणून उभाच असतो. आणि मग तो सत्त्वशील बुद्धीच्या साहाय्याने मनाचे पायच मोडून टाकतो १२.


ऐसें मनाचें खुंटलिया बळ । मग स्वरूपीं होय निश्चळ ।
जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥ १३ ॥
अशा प्रकारे मनाचे बळ खुटले म्हणजे, पाण्याची गार ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यांतच वस्तीला राहाते, त्याप्रमाणे मनही स्थिर होते १३.


यापरी स्वरूपीं मन । स्वयें पावे समाधान ।
तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥ १४ ॥
याप्रकारे मन जें स्वत: स्वरूपामध्ये समाधान पावते, तोच योग अत्यंत श्रेष्ठ असून त्याच्या योगानें जीवाला आणि शिवालाही समाधान होते १४.


जीवपरमात्म्याची एकात्मता । तोच ‘परमयोग’ तत्त्वतां ।
येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥ १५ ॥
जीवाची आणि परमात्म्याची एकात्मता करणे तोच खरोखर ‘श्रेष्ठ योग’ होय. याचविषयींचे निरूपण अश्वाच्या दृष्टांताने श्रीहरि सांगतात १५.


एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः ।
हृरदयज्ञत्वमन्विच्छन् दम्भस्येवार्वतो मुहुः ॥ २१ ॥
[ श्लोक २१] घोडेस्वार जसा प्रथम घोड्याच्या कलाने घेऊन नंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे चालवतो, त्याचप्रमाणे मनाचे भाव जाणून घेऊन मनाला आपल्या ताब्यात ठेवणे हाच खरा योग होय. (२१)
जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी ।
मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥ १६ ॥
खोगीर न घातलेल्या घोड्याला चाबुकस्वार जसा आपल्या हुकमांत चालवितो; त्याला मागच्या बाजूने कोरडे लगावतो व पुढे नीट चाल लावण्यासाठी वांकडेतिकडे पाऊल पडू नये म्हणून दोऱ्यानी रेटून धरतो १६,


तेथ जें जें पाऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारीं ।
जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥ १७ ॥
त्या वेळी तो जें जें पाऊल योग्य रीतीने टाकतो, त्याबद्दल तो त्याला शाबासकी देतो; व ‘भले भले’ म्हणून चुचकारतो. पण जेथे त्याचे पाउल वाकडे पडते, तेथें तो वर्मावर फटकारा मारतो १७.


जेथ हटावला न सांडी खोडी । ते ठायीं दे मोकळवाडी ।
परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥ १८ ॥
तो जेव्हा अडून हट्टाने आपली खोड टाकीतच नाहीं, तेव्हा त्याला तो थोडीशी मोकळीक देतो; परंतु त्याला अगदीच सोडीतही नाही व पीडीतही नाहीं; अशा युक्तिप्रयुक्तीने तो त्याला आपल्या कबजांत आणतो १८.


दमनीं देखोनि अत्यादरु । स्वामीहृदय जाणे वारु ।
आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥ १९ ॥
आपल्या अगदीं कह्यांत ठेवण्याची धन्याची तीव इच्छा घोडा जागतो, आणि घोड्याचं मन धनी जाणतो १९.


ऐसें उभयहृदय ऐक्ययोगें । वारू न धरितां रागबागें ।
अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥ २२० ॥
असें उभयतांचे मन एक झाल्यामुळे घोडा देखील लगामावांचूनही हुकमांत वागू लागतो. अडणे, उडणें हां हां म्हणता सोडून देतो. आणि मग मोकळाच धन्याने शिकविल्याप्रमाणे नाचू लागतो २२०.


ऐसें वश्य केलिया अश्वातें । मग कर्त्याचिया मनोगतें ।
वारू नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥ २१ ॥
ह्याप्रमाणे घोड्याला आपल्या कह्यांत आणलें म्हणजे मग तो धन्याच्या मर्जीप्रमाणे कच्च्या सुतानेही हवा तसा नाचूं लागतो. अशाच प्रकारे मनाचेही दमन करावें २१.


मनोजयो कीजे आपण । तोचि ‘परमयोग’-कारण ।
हेंचि मागिले श्लोकीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २२ ॥
मुख्यतः आपण मनोजय करावा, हेच ‘परमयोगा’ चे साधन आहे. हेंच मी तुला मागच्या श्लोकामध्ये सगळे निरूपण सांगितले आहे २२.


‘नृदेहमाद्यं’ या श्लोकाचे अंतीं । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती ।
आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥ २३ ॥
‘नृदेहमा०’ या श्लोकाच्या अखेरीला कर्मवैराग्याच्या द्वारे मुक्ति मिळत असल्याचे सांगितले. आतां म्ह० या श्लोकांत उत्तम गति अभ्यासानेच प्राप्त होते, ती स्थितीही सांगितली २३.


मुख्यतः सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती ।
मिथ्या संसाराची स्फूर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥ २४ ॥
पण मुख्यत्वेकरून सांख्ययोगानेंच माझी प्राप्ति होते, हे मी तुला आता सांगणार आहे. त्याचे तात्पर्य असे की, संसाराची स्फूर्ति ही मिथ्या असून ब्रह्मसंविति हीच सत्य आहे २४.


हें ज्ञानगहन निरूपण । तुज मी सांगेन गुह्य ज्ञान ।
जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥ २५ ॥
हे निरूपण गहनज्ञानात्मक आहे. तरी तें गुह्यज्ञान तुला मी सांगेन. जें त्रिगुणांत विद्यमान असूनही गुणकार्याला अलिप्त असते २५.


‘तुज मी सांगेन गुह्य ज्ञान’ । हें ऐकोनि देवाचें वचन ।
उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थीं ॥ २६ ॥
‘तुला मी गुह्यज्ञान सांगेन’ हे देवाचे भाषण ऐकून उद्धव स्वतः कानरूप झाला व श्रवणार्थ अत्यंत सावधान होऊन बसला २६
.


देखोनि उद्धवाचा अत्यादरु । आर्तचित्तचकोरचंद्रु ।
निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥ २७ ॥
इतकी उद्धवाची आवड पाहून व्याकुळचित्तरूप चकोराला तृप्त करणारा केवळ चंद्र व आत्मज्ञानरूप गुणाचा केवळ समुद्र, असा जो यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण तो काय म्हणाला ? २७.


सांख्येन सर्वभावानां प्रतिलोमानुलोमतः ।
भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥ २२ ॥
[श्लोक २२] सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितला आहे आणि ज्या क्रमाने त्यांचा प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे, त्यांचे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावे. (२२)


जें सृष्टिपूर्वीं अलिप्त । तेंचि सृष्टिउदयीं सृष्टिआंत ।
महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥ २८ ॥
सृष्टीच्या पूर्वी जें अलिप्त असतें तेंच सृष्टीच्या उत्पत्तींत व सृष्टीच्या स्थितीत म्हणजे सृष्टीमध्ये महत्तत्त्वादिकांपासून तो देहापर्यंत व्यापून राहणारें जें तत्त्व तेच ब्रह्म होय २८.


आणि सृष्टीच्या स्थितिविशेषीं । गुणकार्यातें तेंचि प्रकाशी ।
शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥ २९ ॥
आणि सृष्टीच्या विशेष स्थितीमध्ये गुणकार्याला तेच प्रकाशित करते, आणि शेवटीं गुणकार्याला ग्रासून टाकतें व अवशेषही तेच राहते २९.


नग न घडतां सोनेंचि साचें । नग घडवितां सोनेंपण न वचे ।
नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥ २३० ॥
दागिने घडविले नसतांनाही खरोखर तें सोनेच असते, आणि दागिने घडविले तरी त्याचा सोनेपणा कांहीं नाहीसा होत नाहीं; किंवा ते दागिने मोडले तरी सोनेपणाला घडण्यामोडण्याचे भय नाहीं २३०.


मेघापूर्वीं शुद्ध गगन । मेघा सबाह्य गगन जाण ।
मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥ ३१ ॥
ढग यावयाच्या आधी आकाश हे शुद्धच असते, आणि ढगाच्या आंत बाहेरही आकाशच असते; ढग वितळून गेले तरी, आकाशामध्ये आकाश अलिप्तपणाने सांठलेले असतेच ३१.


तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । वस्तु संचली अलिप्तस्थितीं ।
तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
त्याप्रमाणेच उत्पत्ति, स्थिति व प्रलय ह्यांच्या शेवटीं परब्रह्म हे अलिप्तपणाने सांठलेले असते. उद्धवा! त्याच्याबद्दलचा विचारही मी तुला सांगेन ३२.


कुलाल जें जें भांडें घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ।
तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥ ३३ ॥
कुंभार जें जें मडकें तयार करतो, त्याला त्याला मृत्तिका ही व्यापूनच असते, त्याप्रमाणे जें जें तत्त्व उत्पन्न होते, तें तें परब्रह्माने व्यापलेलेच असते ३३.


सागरीं जे जे उपजे लहरी । तिसी जळचि सबाह्यांतरीं ।
तेवीं महत्तत्त्वादी देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥ ३४ ॥
समुद्रामध्ये जी जी लाट उत्पन्न होते, तिच्या आंतबाहेर पाणीच असते; त्याप्रमाणे महत्तत्त्वापासून तो देहापर्यंत आंतबाहेर केवळ चित्स्वरूपच व्यापलेले असते ३४.


हो कां जो जो पदार्थ निफजे । तो आकाशें व्यापिजे सहजें ।
तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापीजे चैतन्यें ॥ ३५ ॥
किंवा जो जो पदार्थ उत्पन्न होतो, तो अर्थातच आकाशाने व्यापलेला असतो; तद्वत् जें जें तत्त्व म्हणून उत्पन्न होते, ते ते चैतन्यस्वरूपानेच व्यापलेले असते ३५.


अनुलोमें पाहतां यापरी । वस्तूवेगळें तिळभरी ।
कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥ ३६ ॥
अशा प्रकारे अनुलोमरीतीने पाहिले म्हणजे विचाराअंती परब्रह्माहून भिन्न असें तिळभरही कांहीं दिसत नाही ३६.


पृथ्वीपासूनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेंकरीं ।
जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥ ३७ ॥
तसेंच प्रतिलोमरीतीने पृथ्वीपासून तो प्रकृतीपर्यंत लय पाहूं लागले, तर जळाच्या गारांचा लय जसा पाण्यातच होतो, त्याप्रमाणे सर्व तत्त्वांचा लयही त्या चित्स्वरूपांतच होतो ३७.


प्रकृत्यादि तत्त्वें प्रबळलीं । विकरोनि लया गेलीं ।
वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥ ३८ ॥
प्रकृति आदिकरून तत्वं प्रबळ होतात, ती विकार पावून लयास जातात. परंतु परब्रह्मवस्तु अलिप्त असते तशीच असते. तिला अणुभरसुद्धा लेप म्हणून लागत नाही ३८.


एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । वस्तु अविनाशी अलिप्त ।
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ ३९ ॥
उद्धवा ! तात्पर्य काय की, उत्पत्ति, स्थिति व प्रळय झाला तरी परब्रह्म हे अविनाशी असून अलिप्सच असते. तें नित्य-शुद्ध-बुद्धमुक्त-स्वभावाचेच असते हे लक्षात ठेव ३९.


ऐशा वस्तूच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप ।
जेवीं दोराअंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥ २४० ॥
अशा परब्रह्माच्या ठिकाणी संसाराची कल्पना हा केवळ मिथ्या आरोप होय. ज्याप्रमाणे भ्रांत मनुष्याला दोराच्या अंगी सर्पाचा भास होऊन अंगाचा फुकटच थरकाप होतो २४०.


सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाहीं बाध ।
एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥ ४१ ॥
त्या सर्पाला बाहेर घालवून दोर शुद्ध करावा असा कांहीं हा बाध नसतो. (ब्रह्मरूप रज्जूच्या ठिकाणी जगद्रूपी सर्प कधी झालाच नाही असें तात्पर्य.) त्याप्रमाणे जिकडे तिकडे एक परमानंदच भरलेला आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले ४१.


ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण ।
येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥ ४२ ॥
अशा वस्तूच्या ठिकाणी मनही मनपणा विसरते आणि याच साधनाने साधकही पूर्ण ब्रह्मस्वरूप होतो ४२.


हें परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण ।
त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥ ४३ ॥
आतां हे श्रेष्ठ परंतु अत्यंत कठिण साधन ज्याला झेपणार नाही, त्याचे मन निश्चळ व्हावयाला दुसरें एक सुलभ साधन देव सांगतात ४३.
निर्विण्णस्य विरक्तस्य पुरुषस्योक्तवेदिनः ।
मनस्त्यजति दौरात्म्यं चिन्तितस्यानुचिन्तया ॥ २३ ॥


[श्लोक २३] जो मनुष्य विषयांचा उबग आल्याने संसारातून विरक्त झाला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनात मग्न राहातो, त्याचे मन चंचलता सोडून देते. (२३)
जन्ममरणांचें महाआवर्त । भोगितां वैराग्यें अतिसंतप्त ।
अतएव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥ ४४ ॥
जन्ममरणाच्या भयंकर भोवऱ्यांत गिरक्या खातां खातां साधक वैराग्याने अत्यंत संतप्त होतो. आणि त्यामुळे विष घातलेल्या पक्कान्नाप्रमाणे विषयांत त्याला विरक्ति प्राप्त होते ४४.


मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्पें घातली गरळ ।
तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥ ४५ ॥
घमघमीत अमृतफळ असावे आणि त्यावर सर्पाने गरळ टाकावी, त्याप्रमाणे सर्व विषयांत त्याला अत्यंत बाधा दिसत असते ४५.


ऐसेनि विवेकें विवेकवंत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त ।
गुरूनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥ ४६ ॥
अशा विवेकानें तो विवेकशील झालेला असतो; तसाच श्रद्धायुक्त गुरुभक्त, गुरूने सांगितलेला अर्थ हृदयांतून विसरतच नाही ४६.


गुरूनें बोधिला जो अर्थ । तो सदा हृदयीं असे ध्यात ।
चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनः पुनः ॥ ४७ ॥
गुरुनें जो उपदेश सांगितला, तो निरंतर हृदयामध्ये ध्यात असतो; आणि चित्तामध्ये ज्या अर्थाचा विचार केलेला असतो त्याच अर्थाचे पुनः पुन्हा तो मनन करतो ४
७.


करितां प्रत्यग्‌वृत्तीं चिंतन । संकल्प विकल्प सांडी मन ।
त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥ ४८ ॥
प्रत्यगात्म्याचे अखंड चिंतन करीत राहिले म्हणजे मन संकल्प विकल्प सोडून देते. मग तो देहाभिमान सोडून स्वतः ब्रह्मसंपन्न होतो ४८.


झालिया ब्रह्मसंपन्न । स्वरूपीं लीन होय मन ।
हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥ ४९ ॥
असा ब्रह्मसंपन्न झाला म्हणजे मन स्वरूपांत लीन होते. हाही एक उपाय आहे हे लक्षात ठेव. पण हाही झेपत नसेल तर दुसरा एक निराळा ऐकून ठेव ४९
.


यमादिभिर्योगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया ।
ममार्चोपासनाभिर्वा नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥ २४ ॥
[श्लोक २४ ] यम, इत्यादी योगमार्गांनी, आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचे चिंतन करू लागते याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. (२४)


त्यजोनियां सकळ भोग । यमनियमेंसीं योगमार्ग ।
आसनस्थ होऊनि चांग । दे मुद्रा साङ्ग ‘आधारीं’ ॥ २५० ॥
सारे विषयभोग टाकून देऊन यमनियमांसह योगमार्गाचा आश्रय करावा. चांगल्या रीतीने आसनावर बसून (गुदस्थानाकडील) ‘मूलाधार’ चक्रावर लक्ष ठेवून मुद्रा साधावी २५०.


तेव्हां अपान ऊर्ध्वमुखें वाढे । जों वरता ‘स्वाधिष्ठाना’ चढे ।
प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥ ५१ ॥
त्या वेळी अपानवायुं ऊर्ध्वमुखाने (लिंगस्थानाकडील) ‘स्वाधिष्ठान’ चक्राला पोचेपर्यंत वाढत जातो. आणि प्राणवायु प्राणायामाने अडला म्हणजे पुन्हा नाभिस्थानाकडे मुरडतो ५१.


सम होतां प्राणापान । पिंडब्रह्मांडाचें शोधन ।
स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥ ५२ ॥
तेव्हा प्राण आणि अपान हे दोन्ही सम झाले म्हणजे स्वतः वायु शरीरांतील मलक्षालन करून पिंडब्रह्मांडाचे शोधन म्ह• शुद्धि करितो ५२.


कफ पित्त दोन्ही खाये । नाडींतें शोधीत जाये ।
जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥ ५३ ॥
कफ आणि पित्त दोन्ही खाऊन टाकून शरीरांतील नाड्या शुद्ध करूं लागतो. जुने सांचलेले मळ असतात तेही तो तत्काल नाहीसे करून टाकतो ५३.


नवल वायूचें प्रबळ बळ । पिंडब्रह्मांडींचे सकळ मळ ।
धोऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महायोगें ॥ ५४ ॥
वायूचें सामर्थ्य फार मोठे व विलक्षण आहे. तो पिंडांतील व ब्रह्मांडांतील सारे मळ धुऊन टाकून निर्मळ करून सोडतो. इतकी पवित्रता केवळ ह्या ‘महायोगाने’ होते ५४.


तेथें प्रगटे रोगाची परवडी । महाविघ्नांची पडे उडी ।
धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥ ५५ ॥
पण त्या वेळी अनेक रोग प्रकट होतात. मोठमोठ्या विघ्नांची उडी येऊन पडते. नाना विकल्प मनांत उद्भवतात आणि सिद्धींची नागवण तर रोकडी येऊन पडते ५५.


इतुकीं अंगीं आदळतां जाण । साधक न सांडी जैं आंगवण ।
तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥
उद्धवा! इतकी विघ्नं अंगावर येऊन आदळली तरी साधक जर धैर्य सोडणार नाही, तरच खरोखर प्राणापान सम होतील, हे तूं सत्य समज ५६.


प्राणापानांच्या मिळणीं । शक्ति चेतवे कुंडलिनी ।
ते प्राणापानांतें घेउनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥ ५७ ॥
प्राणापानांची मिळणी झाली म्हणजे ‘कुंडलिनी’ शक्ति जागृत होते. आणि ती त्या प्राणापानांना घेऊन सुषुम्ना नाडीमध्ये शिरते ५७
.


ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट ।
तेथें षड्चक्रांचा कडकडाट । पूर्वींच सपाट पवनें केला ॥ ५८ ॥
ती अचाट असलेली आदिशक्ति पश्चिमेचा मोठा घाट (पाठीच्या कण्यांतून) चढू लागते. तेथील षट्चक्रांचा कडकडाट मोडून वायु अगोदरच तिचा मार्ग सपाट करून ठेवतो ५८.


कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या लाटा ।
बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥ ५९ ॥
त्या मार्गानें कुंडलिनी जाऊ लागली म्हणजे आधिव्याधींच्या लाटा बंद पडतात. विकल्पाच्या वाटा मोडून जातात आणि मोठमोठ्या विघ्नांच्या झडीही बाधत नाहीत ५९.


साधितां उल्हाटशक्तिचे उलट । उघडे ब्रह्मरंध्रींचें कपाट ।
तंव लोटले सहस्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥ २६० ॥
उल्हाटशक्ति ओलांडून गेलें की, ब्रह्मरंध्राचे कवाड उघडते. आणि सहस्रदल कमलांतून अत्यंत शुद्ध व मधुर चंद्रामृताचे झरे वाहू लागतात २६०.


तें प्राशूनि कुंडलिनी बाळा । संतोषें सांडी गरळा ।
ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥ ६१ ॥
तें अमृत सकुमारी कुंडलिनी प्राशन करून संतोषानें गरळा (गुळणा) टाकते. त्यामुळे शरीरावर कांति चई लागते; आणि तेणेंकरून देहभावच पालटून जातो ६१.


शरीराकारें वोतिली कळा । तेणें देहो दिसे अतिसोज्ज्वळा ।
ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥ ६२ ॥
शरीराकाराने ती कळा ओतली गेल्यामुळे त्याचे शरीर अत्यंत सोज्ज्वळ दिसू लागते; इतकें कीं, तो जणूं काय ब्रह्मरसाचा पुतळाच आहे, किंवा शांतिसुखाचा कळाच उमलला आहे असे वाटते ६२.


जीवाचें जीवन मुसावलें । कीं ब्रह्मविद्येसी फळ आलें ।
ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥ ६३ ॥
त्याचे अवयव तर काय ? जीवाचे जीवन मुसावलें जावें, किंवा ब्रह्मविद्येला फळ यावें किंवा चैतन्यालाच कोंब फुटावे, त्याप्रमाणे शोभू लागतात ६३.


त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळां सामावे ।
जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥ ६४ ॥
त्या देहाच्या सूक्ष्मत्वामुळे तो जगाच्या डोळ्यांतही शिरतो. आणि जीवामध्ये संचार करून आपल्या स्वभावाप्रमाणे तो वावरू शकतो ६४.


तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी ।
या नांव परम ‘खेचरी’ । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥ ६५ ॥
तो वायूची पायरी करून खुशाल आकाशांतून चालतो. यालाच श्रेष्ठ ‘खेचरी’ मुद्रा असें सिद्ध पुरुष म्हणतात ६५.


त्याचिया अंगींचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती ।
त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥ ६६ ॥
त्याच्या अंगच्या तेजापुढे सूर्यसुद्धा काजव्याप्रमाणे दिसू लागतो; अमरपति इंद्रचंद्रादि देवसुद्धा त्याच्या चरणामृताची इच्छा करतात ६६.


क्रमूनी औटपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट ।
भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥ ६७ ॥
तो औटपीठ,गोल्हाट ओलांडून, भ्रमरगुंफा इत्यादिकांच्या शेवटास जाऊन, सोहंहंसाचे पीठ भेदून प्रगट परमात्माच होऊन बसतो ६७


हा योगाभ्यासें योग गहन । अवचटें कोणा साधे जाण ।
हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ ६८ ॥
अशा ह्या अभ्यासामुळे हा योग फारच कठिण आहे. हा क्वचित् एखाद्याला साधतो. हा मार्ग अत्यंत कठिण असल्याचे स्वतः श्रीकृष्णांनीच सांगितले ६८.


हेंचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सांगता ।
हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥ ६९ ॥
हाच मार्ग जर श्रीकृष्णाला मान्य असता, तर त्याने दुसरे साधन सांगितलेच नसते. मूळश्लोकार्थं पाहिला तर हे सज्जनांना समजून येईल ६९.


हा ऐकतां अतिगोड वाटे । परी करितां काळीज फाटे ।
तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥ २७० ॥
हा ऐकतांना अत्यंत गोड वाटतो; पण करतांना काळीज फाटते. मोठ्या हट्टाने साधूम्हटले तर साधत नाही. मोठमोठे देव व ऋषिही ह्यांत फसले आहेत २७०.


असो हें अत्यंत कठिण । तुज मी सांगेन गा आन ।
‘आन्वीक्षिकी’ विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥ ७१ ॥
हें कठिण साधन असूं द्या एका बाजूस. तुला मी आता दुसरेंच सांगतो. ते म्हणजे ‘आन्वीक्षिकी’ विद्या होय. हीत ‘त्वंपद-शोधनाचा ‘ विवेक आहे ७१.


तत्पदाहूनि वेगळा । पांचभौतिक तत्त्वांचा गोळा ।
चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥ ७२ ॥
पंचभूतात्मक तत्वांचा गोळा तत्पदाहून भिन्न आहे. तो सर्वव्यापकाला चुकवून कोठें एकदेशी निपजलेला आहे ७२.


अनादि मायाप्रवाहयोगें । तन्मात्राविषयसंगें ।
मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥ ७३ ॥
अनादि मायेच्या प्रवाहामुळे तन्मात्रारूप विषयाच्या संगतीने मनाच्या संकल्पावांचून त्याने आपणास भिन्न मानलें आहे ७३.


मनें मानिला जो भेदु । त्यासी करावा अभेदबोधु ।
येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥ ७४ ॥
भेद मनानेच मानला आहे, करितां त्यालाच अभेदाचा उपदेश करावा. याच अर्थाचा विवेक स्वतः श्रीकृष्ण विशद करून दाखवितात ७४.


पांचभौतिक शरीर खरें । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळीं विरे ।
पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥ ७५ ॥
शरीर हे पंचभूतात्मकच आहे हे खरे; पण त्यांतील ‘पृथ्वी’ ही प्रत्यक्ष पाण्यामध्ये विरून जाते; पृथ्वीचा गुण ‘गंध’ हा जळांत भरून पृथ्वी मुळीच नाहीशी होऊन जाते ७५.


त्या जळाचा जळरसु । शोधुनि जैं घे हुताशु ।
तैं जळाचा होयर्‍हासु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥ ७६ ॥
जळांतील ‘जलरस’ जेव्हां ‘अग्नि’ शोषून घेतो, तेव्हां जळाचाही ऱ्हास होतो. ते जळ तेजतत्त्वांत निःशेष आटून जातें ७६.


त्या तेजाचें कारणरूप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप ।
तेव्हां तेजाचें मावळे स्वरूप । वायूची झडप लागतां ॥ ७७ ॥
पण ‘वायूचा’ प्रताप तें ‘तेज’ व त्याचे कारण ‘रूप’ ही दोन्ही ग्रासून टाकतो. वायूची झडप लागतांच तेजाचे स्वरूपही मावळून जातें ७७.


त्या वायूचा स्पर्शगुण । नेतां गगनें हिरून ।
तेव्हां वायूचें नुरे भान । राहे मुसावोन गगनचि ॥ ७८ ॥
त्या वायूचा स्पर्श’ गुण आकाशाने हिरून घेतला म्हणजे वायूचेही भान राहात नाही. ‘वायु’ आकाशांत लीन होऊन आकाशच फक्त शिल्लक राहाते ७८.


केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्येंसीं रिघे अहंकारीं ।
अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥ ७९ ॥
एकट्या आकाशाला काही रूपच राहात नाही. तें गुणकार्यानिशी अहंकारांत शिरते. आकार मायेंत शिरतो, आणि माया परमेश्वरांत लीन झाली म्हणजे मिथ्या होते ७९.


रात्रि आपुलिया प्रौढीं । आंधारातें वाढवी वाढी ।
तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरवती गाढीं निजतेजें ॥ २८० ॥
रात्र ही आपल्याच प्रौढीने अंधारच अंधार पसरून देते. तेव्हा कोट्यवधि नक्षत्रे व काजवे आपआपली तेजें मोठ्या डौलानें मिरवितात २८०.


ते रात्रि येतां सूर्यापुढें । स्वकार्येंसीं सगळी उडे ।
पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥ ८१ ॥
पण ती रात्र सूर्यापुढे आली की आपल्या कार्यासकट पार नाहीशी होऊन जाते. मागेपुढे पाहूं लागळे तर कोठेच दृष्टीस पडत नाही ८१.


तेवीं परमेश्वरीं माया । कार्यकारणेंसीं गेली वायां ।
मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥ ८२ ॥
त्याप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी माया ही कार्यकारणासहवर्तमान लोपून जाते. ती मिथ्याच असल्यामुळे तिला दिसावयाला काही स्वरूपच राहात नाही. त्यामुळे तिचा मागमूसही उरत नाहीं ८२.


मायाप्रतिबिंबित चैतन्या । आणी ‘जीव’ या अभिधाना ।
ते माया गेलिया जाणा । होय जीवपणार्‍हासु ॥ ८३ ॥
मायाप्रतिबिंबित चैतन्याला ‘जीव’ हें नांव प्राप्त होते. ती मायाच नाहीशी झाली की जीवपणाही नाहीसा होतो ८३.


बुडालें जीवशिवांचें भान । उडालें मनाचें मनपण ।
कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥ ८४ ॥
जीवशिवाचे भान राहात नाही. मनाचे मनपणच उडून जाते आणि सारें चैतन्यच भरून राहातें व साधकांना अत्यंत समाधान वाटते ८४.


करितां त्वंपदाचें शोधन । होय तत्पदीं समाधान ।
हे ‘आन्वीक्षिकी विद्या’ जाण । विवेकसंपन्न पावती ॥ ८५ ॥
अशा रीतीने त्वंपदाचे शोधन केलें म्हणजे तत्पदांत समाधान होते. हिचें नांव ‘आन्वीक्षिकी विद्या’ असें तूं जाण. ही विवेकशील लोकांनाच साध्य होते ८५.


न करितां योगसाधन । न लगे त्वंपदाचें शोधन ।
याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥ ८६ ॥
आतां योगसाधनही नको व त्वंपदाचे शोधनही नको. ह्याच्याहीपेक्षा सुलभ असें दुसरेंच साधन तुला मी सांगतों ८६.


जेथ कष्ट करितां तरी थोडे । परी योगाचे सकळ फळ जोडे ।
त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥ ८७ ॥
ज्यांत कष्ट पाहूं गेले तर फार थोडे, पण त्यांत योगाचे सारे फळ जोडते. त्वंपदशोधन त्याच्यापुढे लाजून बापुडवाणे होऊन बसते ८७.


ते माझी गा निजभक्ति । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्तीं ।
पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषे ॥ ८८ ॥
ते कोणते? तर माझी भक्ति. माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ति आहेत त्या अत्यंत प्रीतीनें पूजिल्या असतां मी श्रीपती अत्यंत संतोष पावतों ८८.


तेथें माझें श्रवण माझें कीर्तन । माझें नाम माझें स्मरण ।
माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥ ८९ ॥
तेथे माझे गुणानुवाद श्रवण करावेत, माझे कीर्तन करावें, माझे नामस्मरण करावें, माझेच ध्यान, माझेच भजन, असें सदासर्वदा माझेच चिंतन करीत असावें ८९.


हृदयीं माझें सदा ध्यान । मुखीं माझें नाम माझें स्तवन ।
श्रवणीं माझी कथा माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥ २९० ॥
अंत:करणांत सदासर्वकाळ माझेच ध्यान; तोंडाने माझंच नाम व माझेंच स्तवन; कानांत माझीच कथा व माझेच कीर्तन; आणि हातानें सदासर्वदा माझेंच पूजन करावयाचे २९०.


चरणीं प्रदक्षिणा यात्रागमन । अष्टांगीं सर्वदा माझें नमन ।
ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्‍भक्तिं ॥ ९१ ॥
पायांनी प्रदक्षिणा घालावयाच्या किंवा यात्रेला जावयाचें. अष्टांगांनी सर्वकाल मलाच नमन करावयाचे. अशा रीतीने अनन्यभावानें माझें भजन करून, माझ्याच भक्तीमध्ये गढून जावयाचें ९१.


ऐसे विनटले जे माझे भजनीं । त्यांसी मी विकलों चक्रपाणी ।
त्यांवेगळे पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥ ९२ ॥
असे माझ्या भक्तीमध्ये जे निमग्न होतात, त्यांना मी चक्रपाणि विकला जातो. त्याच्याहून दुसरे कोणी आवडते असे मला त्रिभुवनातही नाही ९२.


यापरी करितां माझें भजन । न लगे योगादिकांचें स्मरण ।
मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥ ९३ ॥
अशा रीतीने माझें भजन केलें तर, योगादिकांची आठवणसुद्धा करावयाला नको. उद्धवा! मी श्रीकृष्ण भक्तीशिवाय दुसऱ्या कशानेच सांपडावायाचा नाहीं ९३.


अवचटें दैवगतीं येथ । योगियासी जैं घडे दुरित ।
तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥ ९४ ॥
असो. दैवगतीनें कदाचित् योग्यांच्या हातून जर पातक घडेल, तर त्याला कर्मप्रायश्चित्त घ्यावयाला नको. तेच श्रीकृष्ण सांगतात ९४.


यदि कुर्यात् प्रमादेन योगी कर्म विगर्हितम् ।
योगेनैव दहेदंहो नान्यत्तत्र कदाचन ॥ २५ ॥
[श्लोक २५] जर एखादेवेळेस योग्याकडून एखादा प्रमाद घडलाच, तर त्याने ते पाप योगसाधनेनेच जाळून टाकावे यासाठी त्याला दुसर्‍या प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही. (२५
)


भक्तासी निंद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागें पुढें ।
हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥ ९५ ॥
भक्ताच्या हातून निंद्य कर्म घडत नाही. कारण, त्याचे मागेंपुढें रक्षण करणारा मी असतो. तेव्हां तें (निंद्यकर्म ) योगाकडे येते. योगांत मात्र चुकून एखाद्या वेळी तसे घडते ९५.


प्रमादें घडलें जें पाप । त्याचा तीव्र अनुताप ।
जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा सकंप पापासी ॥ ९६ ॥
असें चुकून जें पातक घडते, त्याचा त्याला अतिशय पश्चात्ताप होतो. ज्याप्रमाणे वणव्यामध्ये सर्प पोळावा, त्याप्रमाणे तो पातकाला भीत असतो ९६.


गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी ।
तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥ ९७ ॥
सिंहावर गोमाशी बसली असता तो जसें सारें अंग झाडतो, त्याप्रमाणे योगीही पातकाला पाहून रात्रंदिवस अनुताप करीत राहतो ९७.


तेणें होऊनि सावचित्त । योगबळें निजयोगयुक्त ।
पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥ ९८ ॥
अशा वेळी त्याने सावध मन करून योगयुक्त होऊन योगबळानेंच साऱ्या पातकांचे क्षालन करावे. हेंच योग्याला प्रायश्चित्त होय ९८

.
हे सांडोनियां योगस्थिती । जैं लावूं धांवे शेणमाती ।
तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥ ९९ ॥
ही योगस्थिति सोडून तो जर अंगाला शेणमाती लावावयाला धावू लागेल, तर तो खरोखर नागवला म्हणून समजावें. त्याने पातकाची निष्कृति होणार नाही ९९.


हृदयीं नाहीं अनुतापवृत्ती । वरिवरी गा शास्त्रोक्तीं ।
लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥ ३०० ॥
हृदयांत जर अनुताप झालेला नसेल, आणि वर वर मात्र शास्त्रांत -सांगितल्याप्रमाणे शेणमाती लावावयाला जाईल, तर पातकांची निवृत्ति होणार नाही ३००
.

माझें क्षणार्ध अनुसंधान । कोटि कल्मषां करी दहन ।
तेथ इतरांचा केवा कोण । हें स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ १ ॥
लक्ष लावून माझें एक अर्ध क्षण ध्यान केले, तर कोट्यवधि पातकांचे भस्म होऊन जाते. तेथे इतरांची काय कथा ? असें स्वतः श्रीकृष्ण म्हणाले १.


ज्याचे अधिकारीं माझें ध्यान । सांडोनियां जाण ।
प्रायश्चित्त सांगतां आन । लागे दूषण सांगत्यासी ॥ २ ॥
ज्याचा अधिकार माझे ध्यान करण्यासारखा आहे, त्याला ते सोडून दुसरे काही प्रायश्चित्त सांगितल्यास, त्या सांगणारालाच दूषण लागेल २.


यालागीं मुख्यत्वें जाण । येथ अधिकारचि प्रमाण ।
येचिविखींचें निरूपण । श्रीनारायण सांगत ॥ ३ ॥
म्हणून ह्या ठिकाणी मुख्यत्वेकरून अधिकार हाच प्रमाणभूत होय. ह्याचविषयींचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगतात ३
.


स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः ।
कर्मणां जात्यशुद्धानामनेन नियमः कृतः ।
गुणदोषविधानेन सङ्गानां त्याजनेच्छया ॥ २६ ॥
[श्लोक २६] स्वधर्माचे निष्ठेने आचरण करणे, हाच गुण आहे स्वभावतःच अशुद्ध असणार्‍या कर्मांच्या आसक्तीचा त्याग करण्यासाठीच त्यांच्यातील गुणदोष दाखवून त्यांचे नियमन केले आहे. (२६)


न प्रेरितां शास्त्रें श्रुतीं । विषयीं स्वाभाविक प्रवृत्ती ।
तिची करावया निवृत्ती । माझि वेदोक्ती प्रवर्तली ॥ ४ ॥
वेदांनी किंवा शास्त्रांनी प्रेरणा केल्याशिवायच मनुष्यांची स्वाभाविकपणेच विषयांत प्रवृत्ति असते. तिची निवृत्ति करण्यासाठीच माझी वेदोक्ति प्रगट झाली आहे ४.


एकाएकीं विषयत्यजन । करावया अशक्त जन ।
त्यासी वेद दावी दोषगुण । त्यागावया जाण विषयांसी ॥ ५ ॥
विषय एकदम टाकून देण्याला लोक असमर्थ असतात, त्यांना विषय सोडण्यासाठीच वेद त्यांच्यांतील गुणदोष दाखवून देतो ५.


हे माता हे सहोदर । येथ करूं नये व्यभिचार ।
हे वेद न बोलता अधिकार । तैं यथेष्टाचार विषयांचा ॥ ६ ॥
ही आई, ही बहीण, ह्यांच्याशी व्यभिचार करूं नये. हे अधिकार वेदाने जर सांगून दिले नसते, तर विषयाच्या संबंधांत हवा तसा व्यवहार झाला असता ६
.


जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी कामासक्ती ।
मी नेमितों ना वेदोक्ती । तैं व्यभिचारप्राप्ती अनिवार ॥ ७ ॥
कारण समाजांत जोपर्यंत स्त्री-पुरुष व्यक्ति आहेत, तोपर्यंत कामसंचार हा असणारच ; ह्यासाठी मी जर वेदोक्तीनें नेम करून न देतों तर अतोनात व्यभिचार माजला असता ७.


सकळ स्त्रिया सांडून । त्यजूनियां इतर वर्ण ।
सवर्ण स्त्री वरावी आपण । अष्टवर्षा जाण नेमस्त ॥ ८ ॥
ह्याकरितां साऱ्या स्त्रिया सोडून इतर वर्णाच्या वर्ज्य करून आठ वर्षांची व आपल्याच जातीची स्त्री असेल, तीच विवाहास योग्य समजावी ८.


तिचें वेदोक्त पाणिग्रहण । तेथ साक्षी अग्नि आणि ब्राह्मण ।
इतर स्त्रीयांची वाहूनि आण । स्वदारागमन विध्युक्त ॥ ९ ॥
तेथें अग्नि व ब्राह्मण साक्षी ठेवून तिचे वेदोक्त रीतीने पाणिग्रहण करावे आणि मग इतर स्त्रियांविषयीं शपथ वाहून यथाविधीने स्वपत्नीशींच रममाण व्हावे ९.


यापरी म्यां सकळ लोक । स्त्रीकामें अतिकामुक ।
स्वदारागमनें देख । केले एकमुख वेदोक्तीं ॥ ३१० ॥
ह्याप्रमाणे सारे लोक स्त्रीभोगाविषयीं अत्यंत आसक्त असलेले पाहून वेदोक्तीने स्वदारागमन हेच सर्वांना योग्य असें ठरवून एकनिष्ठ करून ठेवले ३१०.


याचिपरी म्यां अन्नसंपर्क । वेदवादें नेमिले लोक ।
येरवीं वर्णसंकर देख । होता आवश्यक वेदेंवीण ॥ ११ ॥
ह्याचप्रमाणे मी अन्नसंपर्क कसा करावा, कोणाशी करावा, ह्याचाही वेदमुखाने लोकांना नियम लावून दिला. नाही तर वेदाशिवाय सारा वर्णसंकरच माजून राहिला असता ११.


तो चुकवावया वर्णसंकर । वर्णाश्रमांचा प्रकार ।
वेद बोलिला साचार । विषयसंचार त्यागावया ॥ १२ ॥
तो वर्णसंकर चुकविण्यासाठी व विषयप्रवृत्ति टाळण्यासाठीच खरोखर वर्णाश्रमाचा प्रकार वेदाने सांगितला १२.


विषयांची जे प्रवृत्ती । तेचि ‘अविद्या’ बाधा निश्चितीं ।
जे विषयांची अतिनिवृत्ती । ती नांव ‘मुक्ति’ उद्धवा ॥ १३ ॥
उद्धवा ! विषयांची जी प्रवृत्ति तीच खरोखर ‘अविद्याबाधा’ आणि विषयांची अत्यंत निवृत्ति तीच ‘मुक्ति’ होय १३.


करावया विषयनिवृत्ती । वेदें द्योतिली कर्मप्रवृत्ती ।
वर्णाश्रमाचारस्थिती । विषयासक्तिच्छेदक ॥ १४ ॥
वेदानें विषयांची निवृत्ति करण्याकरितांच कर्मप्रवृत्ति दाखवून दिली. वर्णाश्रमाच्या आचाराची स्थितिही विषयासक्ति नाहींशी करणारीच आहे १४.


नित्य नैमित्तिक कर्मतंत्र । नाना गुणदोषप्रकार ।
वेदें द्योतिले स्वाधिकार । विरक्त नर व्हावया ॥ १५ ॥
नित्य नैमित्तिक इत्यादि कर्मतंत्र व गुणदोषांचे नाना प्रकार हे अधिकारपरत्वं वेदाने जे वर्णन केले आहेत, ते मनुष्याला विरक्ति प्राप्त व्हावी म्हणून केले आहेत १५.


स्वकर्में होय चित्तशुद्धी । तेणें वैराग्य उपजे त्रिशुद्धी ।
वैराग्य विषयावस्था छेदि । गुणकार्याउपाधी रजतम हे ॥ १६ ॥
स्वकर्मानें चित्तशुद्धि होते व त्यामुळे खरेखुरे वैराग्य प्राप्त होते आणि ते विषयेच्छेचा नाश करून गुणकार्याची उपाधि जे रज-तम त्यांनाही आळा घालतें १६.


तेव्हां उरे शुद्ध-सत्त्वगुण । तेथें प्रकटे गुरुभजन ।
गुरुभजनास्तव जाण । ज्ञान विज्ञान घर रिघे ॥ १७ ॥
तेव्हां शुद्ध सत्त्वगुणच शिल्लक राहतो आणि त्यामुळे गुरुभजनाचा छंद लागून ज्ञान-विज्ञान घरांत शिरतें १७.


पूर्ण करितां भगवद्‍भक्ति । तै गुरुभजनीं अधिकारप्राप्ती ।
सद्‍गुरुमहिमा सांगों किति । मी आज्ञावर्ती गुरुचा ॥ १८ ॥
पूर्ण भगवद्भक्ति करावी, तेव्हांच गुरुभजनाचा अधिकार प्राप्त होतो. सद्गुरूचा महिमा किती सांगावा ? मी गुरूचा आज्ञाधारक आहे १८.


गुरु ज्यावरी अनुग्रहो करी । त्यासी मी भगवंत उद्धरीं ।
आदरें वाऊनियां शिरीं । निज‍ऐश्वर्यावरी बैसवीं ॥ १९ ॥
गुरु ज्याच्यावर अनुग्रह करतो, त्याचा मी भगवंत उद्धार करतो. त्याला मोठ्या आवडीनें मस्तकावर घेऊन आपल्या ऐश्वर्यावर बसवितों १९.


गुरु परमात्मा परेशु । ऐसा जयाचा विश्वासु ।
त्याचा अंकिला मी हृषीकेशु । जो जगदीशु जगाचा ॥ ३२० ॥
गुरु हाच परमात्मा व परमेश्वर आहे असा ज्याचा विश्वास असतो, त्याचा, जगाचा जगदीश जो मी श्रीकृष्ण, तो अंकित होऊन राहतों ३२०.


जेथ मी अंकित झालों आपण । तेथ समाधीसीं ज्ञानविज्ञान ।
वोळंगे गुरुभक्ताचें अंगण । तेथ केवा कोण सिद्धींचा ॥ २१ ॥
मीच जेव्हां स्वतः अंकित होतो, तेव्हां समाधीसहवर्तमान ज्ञान विज्ञान हीही गुरुभक्तांच्या घरांत येतात. त्यापुढे सिद्धींचा पाड काय ? २१.


त्या गुरुचें करूनि हेळण । जो करी माझें भजन ।
तेणें विखेंसीं मिष्टान्न । मज भोजन घातलें ॥ २२ ॥
त्या गुरूची हेलना करून जो माझें भजन करील, त्याने विष घातलेल्या पक्वान्नाचे मला भोजन घातले म्हणून समजावें २२
.


तोंडीं घास डोईं टोला । ऐसा भजनार्थ तो झाला ।
तो जाण सर्वस्वें नागवला । वैरी आपला आपणचि ॥ २३ ॥
तोडांत घास आणि कपाळावर टोला, अशांतलाच तो भजनाचा प्रकार होय. तो सर्वस्वी बुडून आपला आपणच वैरी होतो म्हणून समजावें २३.


येथवरी गुरूचें महिमान । माझेनि वेदें द्योतिलें जाण ।
करूनि विषयनिर्दळण । स्वाधिकारें जन तरावया ॥ २४ ॥
विषयांचा त्याग करून आपल्या अधिकारबळानेच लोकांनी तरून जावे म्हणून गुरूचे इतके माहात्म्य माझ्या वेदाने सांगितले आहे हे लक्षात ठेव २४.


यालागीं ज्यासी जो अधिकार । तो तेणें नुल्लंघावा अणुमात्र ।
हा वेदें केला निजनिर्धार । स्वकर्में नर तरावया ॥ २५ ॥
याकरितां ज्याचा जो अधिकार असेल, तो त्याने अणुरेणूइतकाही उलंघन करूं नये. लोकांनी स्वकर्मेच करावीत म्हणून वेदानेही हाच निश्चय सांगितला आहे २५.


तरी म्हणशी कर्मचि पावन । हेंही सर्वथा न घडे जाण ।
स्वाधिकारेंवीण कर्माचरण । तें अतिदारुण बाधक ॥ २६ ॥
तर मग कर्म हेंच पावन करणारे आहे असें तूं म्हणशील, तर तसेंही कधीच घडत नाही, हे लक्षात ठेव. आपल्या अधिकाराशिवाय कर्माचरण करणे हे अत्यंत घातक आहे २६.


संन्यास करी गृहस्थधर्म । तें त्यासी वोडवलें अकर्म ।
गृहस्थ करी करपात्रकर्म । तोचि अधर्म तयासी ॥ २७ ॥
संन्याशानें गृहस्थधर्माचे आचरण केले, तर तेंच त्याला पापाला कारण होते. गृहस्थाने करतल भिक्षा मागितली, तर तोच त्याचा अधर्म होतो २७.


हितासी वोखद घेतां जाण । त्याचें चुकलिया अनुपान ।
तेंचि अन्यथा होय आपण । पीडी दारुण मरणांत ॥ २८ ॥
हितासाठी औषध घेतांना त्याचे अनुपान चुकले, तर तेच उलट होऊन दुःख देते कदाचित मरणापर्यंतही मजल येऊन ठेपते २८.


तैसें अनाधिकारें करितां कर्म । तेंचि बाधक होय परम ।
हें वेदें जाणोनियां वर्म । स्वधर्म सुगम नेमिले ॥ २९ ॥
तद्वत् अधिकार नसतां कर्म केले, तर तेच अतिशय बाधक होते. हे वर्म जाणून वेदाने ज्याला त्याला सुगम असे धर्म लावून दिले आहेत २९.


स्वाधिकारें स्वधर्मनिष्ठा । हाचि पुरुषाचा गुण मोठा ।
तेणें फिटे गुणकर्ममळकटा । प्रिय वैकुंठा तो होय ॥ ३३० ॥
आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्या धर्मावर निष्ठा ठेवणे हाच पुरुषाचा मोठा गुण होय. ह्याच्या योगाने गुणकर्माचा मळ धुऊन जाऊन तो विष्णूला प्रिय होतो ३३०.


वेदें बोलिला जो गुण । तो अंगीकारावा आपण ।
वेदें ठेविलें ज्यासी दूषण । तें सर्वथा जाण त्यजावें ॥ ३१ ॥
ह्याकरितां वेदानें जो गुण म्हणून सांगितला आहे, त्याचाच आपण स्वीकार करावा. आणि वेदाने ज्याला दूषण दिले आहे, ते सर्वोपरी आपण सोडून द्यावे ३१.


हेंचि गुणदोषलक्षण । करितां वेदविवंचन ।
गुंतले गा अतिसज्ञान । माझे कृपेवीण वेदार्थ न कळे ॥ ३२ ॥
हेच गुणदोषांचे लक्षण आहे. वेदानुरोधाने ह्याचा विचार करतांना मोठमोठे ज्ञानीही घोटाळ्यांत पडतात. कारण, वेदाचा अर्थ माझ्या कृपेशिवाय कळत नसतो ३२.


निषेधमुखेंकरितां त्यागु । वेद त्यागवी विषयसंगु ।
हें वर्म जाणोनि जो चांगु । तो होय निःसंगु महायोगी ॥ ३३ ॥
निषेधमुखानें त्याग सांगून वेद हा विषयाच्या संगापासून सोडवितो. हे वर्म लक्षात आणून सुज्ञ असतो तो सर्वसंगपरित्याग करून महायोगी होतो ३३.


उद्धवा हें वेदतत्त्वसार । तुज म्यां सांगितलें साचार ।
ज्यालागीं शिणताति सुरनर । ऋषीश्वर तपस्वी ॥ ३४ ॥
उद्धवा ! ज्याच्यासाठी मोठमोठे देव, मनुष्य, ऋषीश्वर व तपस्वीही झळ्या खात असतात, ते वेदांतील सार मी तुला यथार्थ रीतीने सांगितले ३४.


परी माझे कृपेवीण सर्वथा । हें न ये कोणाचिये हाता ।
तें तुज म्यां सांगितलें आतां । तुझे हितार्था निजगुह्य ॥ ३५ ॥
माझ्या कृपेशिवाय हे कोणाच्याच हाती येत नाही; पण मी हे केवळ तुझ्या हितासाठी आपले गुह्य आज तुला सांगून दिले ३५.


मागें म्यां केलें निरूपण । गुणदोष देखणें तो दोष जाण ।
त्याचेंही विशद विवेचन । तुज मीं संपूर्ण सांगितलें ॥ ३६ ॥
गुणदोष पाहात बसणे हाच एक दोष आहे, असें जें पूर्वी मी तुला सांगितले होते, त्याचेही स्पष्ट विवेचन आतां तुला सांगितले ३६.


पराचा देखावा दोषगुण । हें नाहीं नाहीं माझें वेदवचन ।
दोष त्यजोनियां आपण । घ्यावा गुण हा वेदार्थ ॥ ३७ ॥
दुसऱ्याचे गुणदोष पाहावेत, असें माझें वेदवचन मुळीच नाही. आपण दोष असेल तो टाकून, गुण असेल तोच घ्यावा, हाच वेदाचा अर्थ म्ह० हेतु आहे ३७.


त्यजोनि पराचे दोषगुण । स्वयें गुण घ्यावा आपण ।
हेंही माझे कृपेवीण । नव्हे जाण उद्धवा ॥ ३८ ॥
दुसऱ्याचे दोष टाकून आपण स्वतः त्याचा गुण घ्यावा, हेही उद्धवा ! माझ्या कृपेशिवाय होत नाही ३८.


न देखोनि पराचे दोषगुण । स्वयें होइजे ब्रह्मसंपन्न ।
म्हणशी ऐशी कृपा परिपूर्ण । केवीं आपण लाहिजे ॥ ३९ ॥
दुसऱ्याचे गुणदोष न पाहातां आपण स्वतःच ब्रह्मासंपन्न होण्याइतकी परिपूर्ण कृपा संपादन कशी करावी? असें म्हणशील ३९,


तेचिविखींचें निरूपण । कृपेनें सांगताहे श्रीकृष्ण ।
माझे कृपेचें आयतन । उद्धवा जाण मद्‍भक्ती ॥ ३४० ॥
तर त्याचविषयींचे निरूपण कृपा करून श्रीकृष्ण सांगत आहेत. उद्धवा ! माझ्या कृपेचे आश्रयस्थान माझी भक्ति होय ३४०.


जातश्रद्धो मत्कथासु निर्विण्णः सर्वकर्मसु ।
वेद दुःखात्मकान् कामान् परित्यागेऽप्यनीश्वरः ॥ २७ ॥
[श्लोक २७] माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे आणि ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झाले आहे, तसेच ज्याला सर्व विषय दुःखरूप आहेत, हेही माहीत आहे, पण तो ते सोडू शकत नसला, (२७)


माझे कथेचेनि श्रवणें । उठी संसाराचें धरणें ।
ऐसा विश्वासु धरिला ज्याणें । जीवेंप्राणें निश्चितीं ॥ ४१ ॥
माझी कथा श्रवण केल्याने संसाराचे धरणे उठते, असा जीवाभावापासून ज्याचा विश्वास असतो, पाण्यात अर्धा बुडून प्राण जात असतांना ४१,


म्हणे अर्धोदकीं प्राणांतीं । जैं हरिकथा आठवे चित्तीं ।
तैं उठे जन्ममरणपंक्ती । येथवरी भक्ति मत्कथेची ॥ ४२ ॥
जर मनाला हरिकथेची आठवण होईल, तर जन्ममरणाचा फेरा चुकेल असें जो म्हणतो, इतकी ज्याची कथेवर भक्ति असते ४२,


ऐशिया भावार्थाचे स्थिती । अनिवार उपजे विरक्ती ।
नावडे कर्माची प्रवृत्ती । विषयासक्ती नावडे ॥ ४३ ॥
इतका ज्याचा भाव दृढ होतो, त्याच्या ठिकाणी अनिवार विरक्ति उत्पन्न होते. त्याला कर्माची प्रवृत्ति रुचत नाही व विषयाची आसक्तीही आवडत नाही ४३.


नावडे इतर कथावदंती । नावडे लौकिकाची प्रीती ।
परी निःशेष त्यागाप्रती । सामर्थ्यशक्ति ज्या नाहीं ॥ ४४ ॥
त्याला प्रपंचांतील भाकडकथा आवडत नाहीत; लौकिकावरही प्रेम बसत नाही; पण निखालस सर्व सोडून देण्याइतकेंही अंगांत धैर्य नसते ४४.


तेणें अनन्यभावें जाण । अत्यादरें करावें भजन ।
येचिविखींचें निरुपण । स्वमुखे श्रीकृष्ण सांगत ॥ ४५ ॥
असे असेल त्याने एकनिष्ठेने व आवडीने भजनच करीत जावें. ह्याचविषयींचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतात ४५.


ततो भजेत मां प्रीतः श्रद्धालुर्दृढनिश्चयः ।
जुषमाणश्च तान्कामान्दुःखोदर्कांश्च गर्हयन् ॥ २८ ॥
[श्लोक २८] तरी त्याने दृढनिश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझे भजन करावेच मात्र विषयसेवन करताना परिणामी ते दुःख देणारे आहेत, असे मानून त्यांच्यात दोषच पाहावेत. (२८)


त्यागावया नाहीं सामर्थ्यशक्ती । त्यासी विषयभोग जेव्हां येती ।
ते भोगी ऐशिया रीतीं । जेवीं श्रृंगारिती सुळीं द्यावया ॥ ४६ ॥
सारेच सोडून देण्याइतकें ज्याच्या अंगी सामर्थ्य नसते, त्याला विषयोपभोग घेण्याचा जेव्हां प्रसंग येतो, तेव्हां तो असा उपभोग घेतो की, जणूं काय सुळी देण्याकरितांच त्याला शृंगारलें आहे ४६.


त्यांसी केळें साखर चोखटी । दूधतूप लावितां ओठीं ।
शूळ भरेल या भोगापाठीं । तो धाक पोटीं धुकधुकीं ॥ ४७ ॥
सुळावर देण्यासाठी काढलेल्या मनुष्याला उत्तमोत्तम केळी किंवा साखर आणून दिली, किंवा दूधतूप नेऊन ओठाला लावले, तर त्या खाण्याच्या पाठीमागून शूळ येण्याचा धाक असल्यामुळे त्याच्या पोटांत धस्स होत असते ४७.


तेवीं विषय भोगितां जाण । पुढें निरय अतिदारुण ।
मज कां विसरला नारायण । मधुसूदन माधव ॥ ४८ ॥
त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेत असतां पुढे अत्यंत भयंकर नरक त्याला दिसतो व तो म्हणतो मला नारायण, मधुसूदन, माधव कां बरें विसरला ? ४८.


मी पडिलों विषयबंदिखानीं । वेगीं पावें गरुडा वळंघोनी ।
कृपाळुवा चक्रपाणी । मजलागोनी सोडवीं ॥ ४९ ॥
हे कृपाळुवा श्रीकृष्णा! मी विषयरूप बंदिखान्यांत पडलों आहे, आपण गरुडावर बसून लौकर या, आणि मला सोडवा हो ! ४९.


विषयमहाग्रहाचे तोंडीं । मी सांपडलों बडिशपिंडी ।
गजेंद्राचेपरी तांतडीं । घालीं उडी मजलागी ॥ ३५० ॥
मी विषयरूप विशाल नक्राच्या जबड्यांत सांपडलों आहे, याकरितां गजेंद्रासाठी जशी उडी घालून धावून आलांत, त्याप्रमाणे माझ्यासाठीही उडी घाला ३५०.


धांव पाव गा गोविंदा । निवारीं माझी विषयबाधा ।
उपेक्षूं नको मुकुंदा । घेऊनि गदा धांव वेगीं ॥ ५१ ॥
हे गोविंदा! धाव धाव आणि मला पाव. माझी विषयबाधा दूर कर. हे मुकंदा! गदा घेऊन लौकर धाव. माझी उपेक्षा करूं नको ५१.


तूं अडलियांचा सहाकारी । भक्तकाजकैवारी ।
मज बुडतां विषयसागरीं । वेगे उद्धरीं गोविंदा ॥ ५२ ॥
गोविंदा ! तूं अडलेल्याचा साहाय्यकर्ता असून भक्तकाऱ्यांचा कैवारी आहेस. मी विषयसागरांत बुडतों आहे; ह्याकरितां लौकर माझा उद्धार कर ५२.


मी पडिलों विषयसागरीं । बुडविलों कामलोभलहरीं ।
क्रोधें विसंचिलों भारी । अभिमानसुसरीं गिळियेलों ॥ ५३ ॥
मी विषयसागरांत बुडालों आहे; कामलोभाच्या लहरींत गटकळ्या खातों आहे; क्रोधानें तर माझी पुरी दुर्दशा उडविली आहे ; आणि अभिमानरूप सुसरीने मला गिळलें आहे ५३.


तूं दीनदयाळ श्रीहरी । हें आपुलें बिरुद साच करीं ।
मज दीनातें उद्धरीं । निजबोधकरीं धरोनियां ॥ ५४ ॥
हे श्रीहरी! तूं दीनदयाळ आहेस. तें तुझें ब्रीद तूं खरें कर, निजबोधाच्या हाताने धरून मज दीनाचा उद्धार कर ५४.


हे विषयबाधा अतिगहन । कां पां न पवे जनार्दन ।
येणें अट्टहासें जाण । करी स्मरण हरीचें ॥ ५५ ॥
ही विषयाची बाधा फार कठीण आहे. मला श्रीहरि कां बरें पावत नाही? असा आक्रोश करून तो श्रीहरीचे स्मरण करतो ५५.


न सुटे विषयवज्रमिठी । पडिलों कामदंष्ट्रांचिये पोटीं ।
कांहीं केलिया न सुटे मिठी । आतां जगजेठी धांव वेगीं ॥ ५६ ॥
विषयाची ही मगरमिठी सुटत नाही. कामाच्या दाढेत अडकलों. कांहीं केलें तरी ही मिठी म्हणून सुटत नाही. ह्याकरितां आतां श्रीकृष्णा ! लवकर धाव हो ५६.


ऐसा निजभक्तांचा धांवा । क्षणही मज न साहवे उद्धवा ।
माझी कृपा होय तेव्हां । पूर्ण स्वभावा अनुतापें ॥ ५७ ॥
उद्धवा ! असा आपल्या भक्ताचा धावा मला एक क्षणभरही सोसवत नाही. असा स्वाभाविक पूर्णपणे अनुताप व्हावा, तेव्हांच माझी कृपा होते ५७.


उद्धवा जेथ अनुताप नाहीं । तेथ माझी कृपा नव्हे कहीं ।
कृपेचें वर्म हेंच पाहीं । जैं अनुताप देहीं अनिवार ॥ ५८ ॥
उद्धवा ! ज्या ठिकाणी खराखुरा अनुताप नाही, तेथे माझी कृपाही कधी होत नाही. देहांत अनिवार अनुताप होणे, हेच माझ्या कृपेचें वर्म म्ह• लक्षण आहे, असें तूं समज ५८.


माझे कृपेवीण निश्चितीं । कदा नुपजे माझी भक्ती ।
माझी झालिया कृपाप्राप्ती । अनन्यभक्ती तो करी ॥ ५९ ॥
खरोखर माझ्या कृपेशिवाय माझी भक्तीही पण कधी उत्पन्न होत नाही. माझ्या कृपेची ज्याला प्राप्ति होते, तोच माझी अनन्य भक्ति करितो ५९.


माझे कृपेचें लक्षण । प्राप्त विषय भोगितां जाण ।
न तुटे माझें अनन्य भजन । ‘पूर्ण कृपा’ जाय या नांव ॥ ३६० ॥
माझ्या कृपेचे लक्षण हेच की, प्राप्त झालेले विषय भोगीत असतां माझ्या अनन्य भजनांत तूट पडत नाही. ह्याचंच नांव माझी ‘पूर्ण कृपा’ ३६०.


मग चढत्या वाढत्यां प्रीतीं । नीच नवी करी माझी भक्ती ।
देह गेह स्त्री पुत्र संपत्ती । वेंची माझे प्रीतीं धनधान्य ॥ ६१ ॥
असा माझा कृपांकित भक्त चढत्या वाढत्या प्रेमाने माझी नित्य नवी भक्ति करीत असतो. माझ्या प्रीतीखातर तो आपले घर, दार, स्त्री, पुत्र, संपत्ति व धनधान्य खर्ची घालतो ६१
.


माझे भक्तिलागीं आपण । सर्वस्व वेंची हें नवल कोण ।
स्वयें वंचीना जीवप्राण । ऐसें अनन्यभजन सर्वदा ॥ ६२ ॥
माझ्या भक्तीसाठी तो सर्वस्व खर्ची घालतो, ह्यांत कसले आश्चर्य ? स्वतःचा जीवप्राणही खर्ची घालण्यास तो मागे घेत नाही. असें सदासर्वदा त्याचे अनन्य भजन असते ६२.


माझ्या भजनाची अतिप्रीती । स्मरण न सांडी अहोरातीं ।
माझा विसर न पडे चित्तीं । त्याची फळप्राप्ती हरि सांगे ॥ ६३ ॥
माझ्या भजनावर त्याचे अतिशयच प्रेम असतें. अहोरात्र माझें स्मरण म्हणून तो सोडीत नाही. त्याच्या चित्ताला विसर म्हणून पडतच नाही. त्यापासून फल काय प्राप्त होते, ते आतां श्रीकृष्ण सांगतात ६३.


प्रोक्तेन भक्तियोगेन भजतो माऽसकृन्मुनेः ।
कामा हृदय्या नश्यन्ति सर्वे मयि हृदि स्थिते ॥ २९ ॥
[श्लोक २९] अशा प्रकारे मी सांगितलेल्या भक्तियोगाने निरंतर माझे भजन करण्यामुळे मी त्या साधकाच्या हृदयात येऊन बसतो त्यामुळे हृदयातील सर्व वासना नष्ट होतात. (२९)


माझी जे कां निजभक्ती । मागां सांगितली तुजप्रती ।
त्या हातवटिया मीं श्रीपती । यजिलों अतिप्रीतीं वारंवार ॥ ६४ ॥
माझी निज भक्ति म्हणून जी मी तुला मागे सांगितली, त्याच पद्धतीने ते भक्त माझें अत्यंत प्रीतीने वारंवार यजन करतात ६४.


पळपळ क्षणक्षण । माझें न विसरत स्मरण ।
करिती अनन्य भजन । मदर्पण तें मीचि ॥ ६५ ॥
क्षणोक्षणी व पळोपळी न विसरतां माझें स्मरण करीत एकनिष्ठेने माझें भजन करून आपल्यालाच मदर्पण करून मीच होतात ६५.


दिवसदिवसां चढोवढी । अनिवार प्रीति वाढे गाढी ।
लागतां नीच नवी गोडी । भजे आवडीं पुनः पुनः ॥ ६६ ॥
दिवसेंदिवस चढाओढीने त्याचे प्रेम अनिवार वाढतच जातें. नित्य नवी गोडी लागत असल्यामुळे आवडीने पुनः पुन्हा भजनच करीत राहातात ६६.


केलीचि भक्ती करितां । उबगु न ये सर्वथा ।
अधिक हर्ष वाटे चित्ता । उल्हासता मद्‍भजनीं ॥ ६७ ॥
केलेलीच भक्ति पुनः पुन्हा केली तरी त्याला कधी कंटाळाच येत नाही, इतकेच नव्हे, तर अधिक हर्षच वाटत असल्याने माझ्या भजनाचा उल्हासच वाटतो ६७.


मज आकळूनि आपले मनीं । मनींहोनि प्रीति भजनीं ।
तेथ सकळ काम जाती नासोनी । जेवीं कां तरणीं खद्योत ॥ ६८ ॥
मला आपल्या हृदयांत सांठवून भजनावर मनापासून प्रेम असले म्हणजे सूर्यापुढे काजवा जसा निस्तेज होतो. त्याप्रमाणे साऱ्या इच्छा नाहीशा होऊन जातात ६८.


जेवीं कां केसरी देखोनी । मदगजां होय भंगणी ।
तेवीं काम जाती हृदयींहूनी । मी चक्रपाणी प्रकटल्या ॥ ६९ ॥
सिंहाला पाहिले म्हणजे माजलेल्या हत्तीला जशी पळतां भुई थोडी होते, त्याप्रमाणे मी परमात्मा प्रगट झालों की, हृदयांतून सगळ्या विषयेच्छा दूर पळून जातात ६९.


‘मी प्रकटलों’ ऐसें म्हणतां । लाज लागेल या वचनार्था ।
मजवीण ठावो नाहीं रिता । ‘प्रकटलों’ आतां म्हणे कोण ॥ ३७० ॥
परंतु ‘मी प्रगट झालों’ असे म्हटले असतां त्या म्हणण्याला बट्टा लागेल ; कारण, माझ्याशिवाय जागाच जर रिकामी नाही, तर मी आतां ‘प्रगट झालों’ असे कोण म्हणणार? ३७०.


उद्धवा जाण तत्त्वतां । मी सदा हृदयीं वसता ।
भक्तांची भ्रांती जातां । मी स्वभावतां प्रकटचि ॥ ७१ ॥
कारण उद्धवा! मी खरोखर सदासर्वदा हृदयांतच असतों. भक्तांची भ्रांति दूर झाली की मी स्वभावतः प्रगटच आहे हे तूं लक्षात ठेव ७१.


भक्तीं करूनि माझी भक्ती । नाशिली गा निजभ्रांती ।
तेथ स्वयंभ मी श्रीपती । सहजस्थितीं प्रकटचि ॥ ७२ ॥
भक्तांनी माझी भक्ति करून आपली भ्रांति नाहींशी केलेली असते. तेव्हां तेथे मी श्रीकृष्ण स्वयंभू सहज रीतीने प्रगटच आहे ७२.


मी हृदयीं प्रकटल्यापुढें । भक्तांसी अलभ्य लाभ जोडे ।
फिटे संसाराचें सांकडें । ऐक पां फाडोवाडें सांगेन ॥ ७३ ॥
मी हृदयांत प्रगट होताक्षणी भक्तांना अलभ्य लाभ प्राप्त होतो आणि संसाररूप संकट दूर होतें. तेच आतां सविस्तर सांगतों ऐक ७३.


भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि मयि दृष्टेऽखिलात्मनि ॥ ३० ॥
[श्लोक ३०] अशा तर्‍हेने जेव्हा त्याला माझ्या सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होते त्याचे सर्व संशय छिन्नविच्छिन्न होतात आणि कर्मवासना सर्वथैव क्षीण होऊन जातात. (३०)


उद्धवा मी ज्यासी हृदयीं भेटें । तो मी हृदयमाजीं न संठें ।
सर्वात्मा सर्वरूपें प्रकटें । नव्हे धाकुटें स्वरूप माझें ॥ ७४ ॥
उद्धवा ! मी ज्याला हृदयामध्ये भेटतों, तो मी त्याच्या हृदयांत सांठत नाही; तर सर्वात्मा सर्वरूपानेच प्रगटतो. माझे स्वरूप काही लहानसहान नाही ७४.


ऐसा मी प्रकटलियापाठिं । संसारुचि न पडे दिठीं ।
मावळे गुणेंसी भेदत्रिपुटी । पळे उठाउठी भवभय ॥ ७५ ॥
अशा रीतीने मी प्रगट झालों म्हणजे मग संसार म्हणून डोळ्यांना दिसतच नाही. गुणांसहवर्तमान भेदाची त्रिपुटी मावळते, आणि भवभय तत्काळ पळून जाते ७५.


लागतां सूर्याचे किरण । घृताचें नासे कठिणपण ।
तेवीं मी प्रकटल्या नारायण । न फोडितां जाण लिंगदेह नाशे ॥ ७६ ॥
सूर्याचे किरण लागले की, तुपाचा कठिणपणा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे मी नारायण प्रगटल्याबरोबर न फोडतांच लिंगदेह नाश पावतो, हें तूं लक्षात ठेव ७६.


धुई दाटली चहूंकडे । ते चंडवातें तत्काळ उडे ।
तेवीं माझ्या स्वप्रकाशापुढें । वासनेचें उपडे समूळ जाळ ॥ ७७ ॥
चहूंकडे धुकें पसरले, तर ते जोराच्या वाऱ्याने लागलेच उडून जाते, त्याप्रमाणे माझ्या स्वप्रकाशापुढे वासनेचे जाळें समूळ नाहींसें होतें ७७.


समूळ उपडितां वासनेसी । संशय निमे जीवेंभावेंसीं ।
तेथ क्षयो झाला कर्मासी । जेवीं रवीपाशीं अंधारें ॥ ७८ ॥
वासनेला समूळ उपटून काढली की, जीवाभावासह संशय ठार होतो. तेव्हां सूर्यापुढे अंधार नाहीसा व्हावा त्याप्रमाणे कर्माचाही क्षय होऊन जातो ७८.


तेवीं गुण नासती स्वकार्येंसीं । अविद्या नासे अज्ञानेंसीं ।
जीव नासे शिवपणेंसीं । चिदचिद्‍ग्रंथीसीं अहंकारु ॥ ७९ ॥
त्याचप्रमाणे आपल्या कार्यासहवर्तमान गुणही नाश पावतात ; अज्ञानासहवर्तमान अविद्या नाश पावते; शिवपणासहवर्तमान जीव नाश पावतो; व चिदचिद्ग्रंथीसहवर्तमान अहंकारही नाश पावतो ७९.


तेथ सोहंहंसाची बोळवण । न करितांचि जाहली जाण ।
भेणें पळाले जन्ममरण । पडलें शून्य संसारा ॥ ३८० ॥
तेव्हां ‘सोहं-हंसाची’ न करतांच बोळवण होते, हे लक्षात ठेव. जन्ममरण भीतीनेच पळून जातें व संसारावर पाणी पडतें ३८०
.


यापरी भक्तियोगें गहन । माझें करूनियां भजन ।
भक्त पावले समाधान । ऐसेनि जाण निजभजनें ॥ ८१ ॥
ह्याप्रमाणे गहन भक्तियोगाने माझें भजन करितात व अशा निजभजनानेच भक्त समाधान पावतात ८१.


एवं भक्ति-ज्ञान-कर्मयोग । या तिहीं योगांचा विभाग ।
तुज म्यां सांगितला साङ्ग । हें वर्म चांग मत्प्राप्ती ॥ ८२ ॥
अशा प्रकारें भक्ति, ज्ञान व कर्मयोग, ह्या तिन्ही योगांचे भेद तुला मी सांगोपांग सांगितले. माझ्या प्राप्तीचें हेच चांगले वर्म आहे ८२
.


येथ विशेषें माझी भक्ति । न पाहे साह्य सांगाती ।
नव्हे आणिकांची पंगिस्ती । साधी मत्प्राप्ती अंगोवांगीं ॥ ८३ ॥
यामध्ये विशेषेकरून माझी भक्तिच श्रेष्ठ होय. ती दुसऱ्या कोणाच्याच साहाय्याची अथवा सोबत्याची अपेक्षा करीत नाहीं; किंवा दुसऱ्याची ती पंगिस्तही राहात नाही. ती स्वतः आपल्या सामर्थ्याने माझी प्राप्ति साधून देते ८३.


न करितां माझें भजन । सर्वथा नुपजे माझें ज्ञान ।
कर्म न करितां मदर्पण । तेंचि जाण अकर्म ॥ ८४ ॥
माझें भजन केले नाही तर माझे ज्ञान कधींच उत्पन्न होणार नाही. कर्म जर मला अर्पण केले नाही, तर तेंच अकर्म होते ८४.


यालागीं मुख्य जें निजज्ञान । तें अपेक्षी माझें भजन ।
तेथ कर्म बापुडें रंक जाण । भजनेंवीण सरेना ॥ ८५ ॥
म्हणून मुख्यतः जे आत्मज्ञान, ते माझ्याच भजनाची अपेक्षा करते. तिकडे कर्म तर काय बिचारे, केवळ रंक होय. ते माझ्या भजनावांचून पुढेच येऊ शकत नाही ८५.


एवं ज्ञान कर्में परमार्थीं । माझे भक्तिस्तव होती सरतीं ।
ते भक्तिची निजख्याती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ८६ ॥
तात्पर्य, ज्ञान व कर्म ही परमार्थात भक्तीमुळेच श्रेष्ठत्वाला पोचतात. त्या भक्तीचे खरे माहात्म्य आतां तुला सांगतों ऐक ८६.


तस्मान्मद्‍भक्तियुक्तस्य योगिनो वै मदात्मनः ।
न ज्ञानं न च वैराग्यं प्रायः श्रेयो भवेदिह ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] असा माझ्या भक्तीने युक्त असलेला जो योगी माझ्याच चिंतनात मग्न राहातो, त्याला ज्ञान किंवा वैराग्य नसले, तरी इहलोकी त्याचे कल्याण निश्चितपणे होते. (३१)


करूं नेणे कर्माचरण । न साधितां वैराग्यज्ञान ।
भावें करितां माझें भजन । माझ्या स्वरूपीं मन ठेवूनी ॥ ८७ ॥
कर्माचरण करावयाचे समजत नाही. वैराग्यज्ञान संपादन केलेले नाही, तरी माझ्या स्वरूपावर लक्ष ठेवून भक्तिभावाने माझे भजन केलें ८७,


तेथ ज्ञानकर्मादिकें जाण । मुख्य वैराग्यही आपण ।
मद्‍भक्तीसी येती लोटांगण । चरणां शरण पैं येती ॥ ८८ ॥
तर ज्ञानकर्मादिक इतकेच नव्हे, तर मुख्य वैराग्यही स्वतः, भक्तीच्या चरणी, शरण येऊन लोटांगण घालतात ८८.


शरण येणें हें कायशी गोठी । केवळ जन्मती भक्तीच्या पोटीं ।
मग लडेवाळें घालूनि मिठी । स्वानंदाची गोमटी मागती गोडी ॥ ८९ ॥
शरण येतात ही कसली मोठी गोष्ट ? पण ती तिच्या पोटी जन्मच घेतात; आणि मग लाडाने तिला मिठी मारून आत्मानंदाची सुंदर गोडी तिच्यापाशी मागतात ८९.


एवं भक्ति आपुले अंकीं जाण । करी ज्ञानादिकांचे लालन ।
परमानंद पाजूनि पूर्ण । करी पालन निजांगें ॥ ३९० ॥
तात्पर्य काय की, भक्ति ही ज्ञान, वैराग्य व कर्म ह्यांना आपल्या मांडीवरच खेळविते आणि परमानंद पूर्णपणे पाजून स्वतः त्यांचे पालन करते ३९०.


ते आतुडल्या माझी भक्ति । ज्ञानादिकें कामारी होती ।
तेचिविखींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ९१ ॥
ती माझी भक्ति साध्य झाली की, ज्ञानादिक हे सेवक बनतात. ह्याविषयींचेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात ९१.


यत्कर्मभिर्यत्तपसा ज्ञानवैराग्यतश्च यत् ।
योगेन दानधर्मेण श्रेयोभिरितरैरपि ॥ ३२ ॥
सर्वं मद्‍भक्तियोगेन मद्‍भक्तो लभतेऽञ्जसा
स्वर्गापवर्गं मद्धाम कथाञ्चिद्यदि वाञ्छति ॥ ३३ ॥


[ श्लोक ३२-३३] कर्म, तपश्चर्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास, दानधर्म आणि अन्य कल्याणसाधनांनी जे प्राप्त होऊ शकते, ते सर्व, माझा भक्त माझ्या भक्तियोगाने स्वर्ग, मोक्ष किंवा माझे वैकुंठधाम यांपैकी ज्याची इच्छा करतो, ते सहजासहजी मिळवितो. (३२-३३)
जें पाविजे स्वधर्मकर्मादरें । जें पाविजे निर्बंध तपाचारें ।
जें सांख्यज्ञानविचारें । पाविजे निर्धारें जें वस्तु ॥ ९२ ॥
स्वधर्मकर्मैकरून जें प्राप्त होते; कडकडीत तप आचरण केल्याने जे साध्य होते; किंवा सांख्यज्ञानाच्या विचाराने निश्चयेंकरून जी वस्तु हाती लागते ९२;


जें पाविजे विषयत्यागे । जें पाविजे अष्टांगयोगें ।
जें वातांबुपर्णाशनभोगें । जें दानप्रसंगें पाविजे ॥ ९३ ॥
तसेंच विषयत्यागाने जें प्राप्त होते; अष्टांगयोगानें जें साध्य होतें, वायु, जल, पानें सेवन करून शेवटीं जें फल प्राप्त होते ९३ :


जें साधें वेदाध्ययनें । जें साधे सत्यवचनें ।
जें साधे अनेकीं साधनें । तें मद्‍भजनें पाविजे ॥ ९४ ॥
त्याचप्रमाणे वेदाध्ययनाने जे मिळतें : सत्य भाषणानें जें साध्य होते; अनेक साधनांनीं जें प्राप्त होते; तें सारें माझ्या एका भजनाने मिळत असते ९४.


हें न सोशितां साधनसांकडें । नुल्लंघितां गिरिकपाटकडे ।
हीं सकळ फळें येती दारापुढें । जैं माझी आतुडे निजभक्ति ॥ ९५ ॥
इतक्या साधनांची संकटें न सोसतां, गिरिगुहा शोधीत न बसतां, माझी भक्ति जर साध्य होईल, तर ही सारी फळे आपल्या दारापुढे येऊन उभी राहातात ९५.


उद्धवा तूं म्हणसी जाण । ऐशी ते तुझी भक्ति कोण ।
ब्रह्मभावें जें गुरुभजन । ते भक्तिचा पूर्ण हा प्रतापु ॥ ९६ ॥
आतां उद्धवा ! तूं म्हणशील की, अशी तुझी भक्ति तरी कोणती? तर ब्रह्मभावनेने जें गुरूचे भजन, त्याच भक्तीचा हा पूर्ण प्रताप होय ९६.


सद्‍गुरुभजनापरती । साधकांसी नाहीं प्राप्ती ।
मी भगवंत करीं गुरुभक्ति । इतरांचा किती पवाडु ॥ ९७ ॥
साधकांना सद्गुरुभजनाहून दुसरा श्रेष्ठ लाभच नाही. मी साक्षात् भगवान् गुरूची भक्ति करतो. मग इतरांची काय कथा ? ९७.


मीही सद्‍गुरुचेनि धर्में । पावलों एवढिये महिमे ।
त्या सद्‍गुरूचे गुरु गरिमे । कोणे उपमे उपमावें ॥ ९८ ॥
मीसुद्धा सद्गुरूच्याच कृपेनें एवढ्या थोरपणाला चढलों आहे. तेव्हां अशा सद्गुरूच्या थोरवीला कशाची उपमा द्यावी बरें? ९८.


जे गुरुब्रह्म अभेदभक्त । अवचटें अणुमात्र वांछित ।
तैं वैकुंठादि समस्त । मी त्यांसी देत स्वर्गापवर्ग ॥ ९९ ॥
जे कोणी गुरूलाच परब्रह्म मानून अभेद भावनेनें भक्ति करतात, त्यांना अकस्मात् कसली तरी इच्छा झाली, तर त्यांना मी स्वर्ग, मोक्ष, वैकुंठ, इत्यादि सर्व काही देतों ९९.


हेंही बोलतां अत्यंत थोडें । मी त्यांच्या भजनसुरवाडें ।
भुललों गा वाडेंकोडें । त्यां मागेंपुढें सदा तिष्ठें ॥ ४०० ॥
हें सुद्धा सांगितलेले थोडेच आहे. त्यांच्या भजनाच्या आवडीने मी अगदी भुलून जातो व त्यांच्या मागेंपुढे सदासर्वकाल उभा राहुन खडा पाहरा करतों ४००.


मद्‍भक्त नैराश्यें अतिगाढे । ते मागतील हें कदा न घडे ।
तेंही लक्षण तुजपुढें । अतिनिवाडें सांगेन ॥ १ ॥
पण माझे भक्त असतात ते अत्यंत निःस्पृह असतात. ते काही मागतील हे कधींच घडावयाचे नाही. त्याचेही निरूपण मी तुला मोठ्या कसोशीने सांगेन, तें लक्ष देऊन ऐक १.


न किञ्चित्साधवो धीरा भक्ता ह्येकान्तिनो मम ।
वाच्छन्त्यपि मया दत्तं कैवल्यमपुनर्भवम् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४ ] माझे अनन्य प्रेमी, धीर, साधू भक्त स्वतः तर कशाचीच इच्छा करीत नाहीत किंबहुना मी त्यांना कैवल्य, किंवा पुनर्जन्माचा अभाव जरी देऊ केला, तरी तोसुद्धा ते घेऊ इच्छित नाहीत. (३४)


ज्यासी नघेणेंपणाचा प्रबोधु । साचार झाला अतिविशदु ।
ऐसा निरपेक्ष जो शुद्धु । तो सत्य साधु मज मान्य ॥ २ ॥
काहीएक घ्यावयाचे नाही असाच बोध शुद्ध रीतीने ज्याच्या मनावर ठसला, असा जो खरोखरीचा निरपेक्ष असतो, तोच मला मान्य असलेला खरा साधु होय २.


ज्याच्या ठायीं निरपेक्षता । धैर्य त्याचे चरण वंदी माथां ।
ज्याच्या ठायीं अधीरता । तेथ निरपेक्षता असेना ॥ ३ ॥
ज्याच्या ठिकाणी निरपेक्षता असते, त्याचे चरण धैर्य वंदन करतें. ज्याच्या ठिकाणी अधीरता वसते, त्याच्या ठिकाणी निरपेक्षता असतच नाहीं ३.


कोटिजन्में बोधु जोडे । तैं हे निरपेक्षता आतुडे ।
निरपेक्षतेवरुतें चढे । ऐसें नाहीं फुडें साधन ॥ ४ ॥
कोट्यवधि जन्म घ्यावेत, तेव्हांच हे ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतरच निरपेक्षता मिळत असते. निरपेक्षतेहून श्रेष्ठ असें दुसरे काही साधनच नाही ४.


ऐशिये निरपेक्षताप्राप्तीं । माझ्या भजनीं अतिप्रीती ।
ती लाभे माझी चौथी भक्ती । जीसी ‘एकांती’ म्हणे वेदु ॥ ५ ॥
अशी निरपेक्षता प्राप्त झाली म्हणजेच माझ्या भजनावर अतिशय प्रेम जडते. मग त्याला माझी चौथी भक्ति, जिला वेदामध्ये ‘एकान्तभक्ति.’ असे म्हणतात, ती साध्य होते ५.


ऐक एकान्तभक्तीची मातु । देवाभक्तांसी होय एकांतु ।
भक्त रिघे देवाआंतु । देव भक्तांतु सबाह्य ॥ ६ ॥
एकान्तभक्तीची गोष्ट ऐक. तींत देवाचा आणि भक्ताचा एकान्त होतो. भक्त देवाच्या आत शिरतो, आणि देव भक्तामध्ये सबाह्य शिरतो ६.


ऐसें अभेद माझें भजन । या नांव ‘एकान्तभक्ति’ जाण ।
मजवेगळें कांहीं भिन्न । न देखे आन जगामाजीं ॥ ७ ॥
असें अभेदभावाचे जे माझे भजन, याचे नांव ‘एकान्तभक्ति’ तींत भक्ताला माझ्याहून भिन्न असें जगामध्ये काही दिसतच नाहीं ७.


त्यांसी चहूं पुरुषार्थेंसीं मुक्ति । मी स्वयें देताहें श्रीपती ।
ते दुरोनि दृष्टीं न पाहती । मा धरिती हातीं हें कदा न घडे ॥ ८ ॥
त्याला स्वतः मी श्रीकृष्ण चारही पुरुषार्थासहवर्तमान मुक्ति देतो. पण ते त्यांना दुरूनसुद्धा पाहात नाहीत. मग हातात धरतील हें नांव कशाला? ८.


ते स्वमुखें कांहीं मागती । हें न घडे कदा कल्पांतीं ।
सांडुनि माझी एकांतभक्ति । कैवल्य न घेती ते निजभक्त ॥ ९ ॥
बरें, ते आपल्या मुखाने काही मागतील म्हणावें, तर तें कल्पांतीही शक्य नाही. माझी एकाम्तभक्ति सोडून माझे भक्त मोक्ष कधीच घेत नाहीत ! ९ .


मोक्षही न घ्यावया कोण भावो । त्याचाही मथित अभिप्रावो ।
स्वयें सांगे देवाधिदेवो । अगम्य पहा हो श्रुतिशास्त्रां ॥ ४१० ॥
मोक्षही न घेण्याचे कारण काय? हा श्रुतिशास्त्रालाही अगम्य असणारा भाव देवाधिदेव श्रीकृष्ण सारांशरूरूपाने सांगत आहेत ४१०.


नैरपेक्ष्यं परं प्राहुर्निःश्रेयसमनल्पकम् ।
तस्मान्निराशिषो भक्तिर्निरपेक्षस्य मे भवेत् ॥ ३५ ॥
[ श्लोक ३५] कशाचीही अपेक्षा न करणे यालाच श्रेष्ठ निःश्रेयस म्हणतात म्हणून ज्याला कोणतीही कामना किंवा अपेक्षा नाही, त्याचीच माझे ठिकाणी भक्ती निर्माण होते. (३५)


जो निरपेक्ष निर्विशेष । तो मज पूज्य महापुरुष ।
मोक्ष त्याचे दृष्टीं भूस । धन्य नैराश्य तिहीं लोकीं ॥ ११ ॥
जो नितान्त निरपेक्ष असतो, तो महापुरुष मला पूज्य असतो. त्याच्या दृष्टीला मोक्ष हा केवळ भुसासमान वाटतो. असें नैराश्य ग्रैलोक्यांतही धन्य होय ११.


ऐक निरपेक्षतेचा उत्कृष्ट । तेथ चारी पुरुषार्थ फळकट ।
वैकुंठकैलासादि श्रेष्ठ । ते पायवाट निरपेक्षा ॥ १२ ॥
निरपेक्षतेची थोरवी ऐक. तशा पुरुषाला चारी पुरुषार्थ फोल वाटतात. वैकुंठ, कैलास आदिकरून जी स्थाने केवळ श्रेष्ठ म्हणून समजतात, ती तर त्यांची पायवाट असते १२.


निरपेक्षापाशीं जाण । वोळंगे येती सुरगण ।
तेथ ऋद्धिसिद्धींचा पाड कोण । वोळंगे अंगण कळिकाळ ॥ १३ ॥
निरपेक्ष मनुष्यापाशी देवसुद्धा चालत येतात. मग ऋद्धिसिद्धींची कथा काय? प्रत्यक्ष कलिकाळसुद्धा दाराशी उभा असतो १३.


स्वयें महादेव आपण । सर्वस्वें करी निंबलोण ।
श्रियेसहित मी आपण । अंकित जाण तयाचा ॥ १४ ॥
स्वतः महादेवही सर्वस्वी लिंबलोण करतो, आणि मीही लक्ष्मीसहवर्तमान त्याचा अंकित होऊन राहातों हे लक्षात ठेव १४.


निरपेक्ष जो माझा भक्त । जो मजसमान समर्थ ।
हेंही बोलणें अहाच येथ । तो मीचि निश्चित चिद्‌रूपें ॥ १५ ॥
माझा जो भक्त निरपेक्ष असतो, तो माझ्यासारखाच समर्थ असतो. पण हे बोलणेसुद्धा औपचारिकच आहे. कारण, तो चिद्रूपत्वाने खरोखर मीच असतो १५.


मी परमात्मा परमानंद । भक्त मद्‍भजनें शुद्ध स्वानंद ।
दोघे अभेदें स्वानंदकंद । सच्चिदानंद निजरूपें ॥ १६ ॥
मी परमात्मा परमानंदस्वरूप आहे म्हणून भक्तही माझ्या भजनानें शुद्ध स्वानंदस्वरूपच बनतो. दोघेही अभेदपणाने स्वानंदकंद व सच्चिदानंदस्वरूपच आहोत १६.


ऐसे मद्‍भावें भक्त संपन्न । ते न देखती दोषगुण ।
तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १७ ॥
असे माझ्या भक्तीनें संपन्न झालेले माझे भक्त गुणदोष पाहात नाहीत. त्याचविषयींचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतात १७.


न मय्येकान्तभक्तानां गुणदोषोद्‍भवा गुणाः ।
साधूनां समचित्तानां बुद्धेः परमुपेयुषाम् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६ ] जे बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या परमात्मतत्त्वाला प्राप्त झाले आहेत, त्या माझ्या समदर्शी महात्म्यांचा आणि माझ्या अनन्यप्रेमी भक्तांचा, या विधिनिषेधांद्वारे होणार्‍या पुण्यपापांशी काहीही संबंध असत नाही. (३६)


जो न देखे विषयभेदु । ज्यासी समत्वाचा निजबोधु ।
तोचि बोलिजे ‘ शुद्ध साधू ‘ । परमानंदु मद्‍भजनें ॥ १८ ॥
जो विषमभेद पाहात नाही, ज्याला समत्वाचा निजबोध झालेला आहे, त्यालाच शुद्ध ‘साधु’ असें म्हणतात. त्यालाच माझ्या भजनानें परमानंदाचा लाभ होतो १८.


मी एक परमात्मा सर्व भूतीं । न देखे द्वैताची प्रतीती ।
ऐशी ज्याची भजनस्थिती । ‘एकांतभक्ति’ त्या नांव ॥ १९ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये एक मीच परमात्मा भरलेला आहे, अशी त्याची दृष्टि झाल्यामुळे द्वैताची प्रतीति त्याला दिसतच नाही. अशी ज्याची भजनस्थिति असते, तिलाच ‘ एकांतभक्ति’ असे म्हणतात १९.


सदा समभावें एकाग्र । माझ्या भजनीं अतितत्पर ।
ते प्रकृतीचे परपार । पावले साचार मद्‌रूपीं ॥ ४२० ॥
निरंतर सर्वत्र समभाव ठेवून एकाग्रमनाने माझ्या भजनांत अति तत्पर राहातात, ते प्रकृतीच्या पलीकडे जाऊन खरोखर मत्स्वरूपच होतात ४२०.


ऐसे मद्‍भावें भक्त परिपूर्ण । ते न देखती दोषगुण ।
उद्धवा म्यां हे निजखूण । पूर्वी तुज जाण सांगितली ॥ २१ ॥
असे जे मद्भावाने परिपूर्ण असतात ते गुणदोष पाहात नाहीत. उद्धवा ! ही माझी खूण तुला मी पूर्वी सांगितलीच आहे २१.


साकरेची साली फेडणें । कीं कापुराचा कोंडा काढणें ।
रत्‍नदीपाची काजळी फेडणें । तेवीं गुणदोष देखणें सृष्टीमाजीं ॥ २२ ॥
साखरेची जर साल काढतां येईल, कापराचा जर कोंडा निघेल, रत्नाच्या तेजाची जर काजळी धरेल, तरच माझे भक्त सृष्टीत गुणदोष पाहातील २२.


ज्याचा घ्यावा अवगुण । मुख्य अवगुणी मी आपण ।
ज्याचा घ्यावा उत्तम गुण । तोही जाण मद्‌रूप ॥ २३ ॥
ज्याचा अवगुण घ्यावा, तो अवगुणही मुख्यत्वेकरून मीच आहे. आणि ज्याचा उत्तम गुण घ्यावा तोही मद्रूपच आहे २३.


यापरी भक्तजगजेठी । मद्‌रूपें देखे सकळ सृष्टी ।
त्यासी गुणदोषांची गोष्टी । न पडे दृष्टीं सर्वथा ॥ २४ ॥
अशा प्रकारे भक्तशिरोमणि मत्स्वरूपानेच सारी सृष्टि पाहात असतो. गुणदोषाची गोष्ट त्याच्या कधी दृष्टीसच पडत नाही २४.


गुणदोष न देखावे जाण । हेंचि साधनीं मुख्य साधन ।
येचि अर्थींचें निरूपण । आदरें श्रीकृष्ण सांगत ॥ २५ ॥
गुणदोष पाहूंच नयेत हेच सर्व साधनांत मुख्य साधन आहे. ह्याविषयींचेच निरूपण आदरपूर्वक श्रीकृष्ण सांगत आहेत २५.


एवमेतान्मयाऽऽदिष्टाननुतिष्ठन्ति मे पथः ।
क्षेमं विन्दति मत्स्थानं यद्‍ब्रह्म परमं विदुः ॥ ३७ ॥
इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे विंशोऽध्यायः ॥ २० ॥
[श्लोक ३७] अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या या ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचा आश्रय घेतात, ते माझ्या परमकल्याणस्वरूप अशा धामाला प्राप्त होतात कारण परब्रह्मतत्त्व त्यांनी जाणलेले असते. (३७)
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे विंशोऽध्यायः ॥ २० ॥ अध्याय विसावा समाप्त


उद्धवा यापरी जाण । म्यां वेदवादें आपण ।
उपदेशिले गा जन । भक्तिज्ञानकर्मयोगें ॥ २६ ॥
उद्धवा ! अशा रीतीने मी वेदवाणीने स्वतः भक्ति, ज्ञान आणि कर्मयोग यांच्या द्वारे लोकांना उपदेश केला आहे २६.


कर्मेंचि कर्मे छेदिजेती । ऐशी ‘कर्मयोगाची’ गती ।
स्वधर्मकर्में माझी प्राप्ती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥ २७ ॥
कर्मानेच कर्में नाहीशी करावीत हेच कर्मयोगांतील रहस्य आहे, आणि स्वधर्मकर्माने माझी प्राप्ति होते, हेही मी तुला सांगितले आहे २७.


नित्यानित्यविवंचन । करूनि अनित्यनिर्दळण ।
हें ‘ज्ञानयोगाचें’ लक्षण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २८ ॥
तसेंच, नित्य कोणतें व अनित्य कोणते, याचा विचार करून अनित्य असेल तें नाहींसें करून टाकणे, हे ज्ञानयोगाचे लक्षण होय. तेंही सारे मी तुला सांगितले २८
.


तैशीच करितां ‘माझी भक्ती’ । सकळ फळें पायां लागती ।
भक्तांसी अनायासें माझी प्राप्ती । हेंही तुजप्रती सांगितलें ॥ २९ ॥
तसेंच, माझी भक्ति केली असतां सारी फळे येऊन पायीं लागतात, आणि भक्तांना अनायासेंच माझी प्राप्ति होते, हेही तुला मी सांगितले २९.


अधिकारभेदेंसीं साङ्ग । त्रिकांड त्रिविध वेदमार्ग ।
माझे प्राप्तीलागीं चांग । विशद विभाग म्यां केले ॥ ४३० ॥
अधिकारभेदाप्रमाणे त्रिकांडांतील तीन प्रकारचे वेदमार्ग हेही माझ्या प्राप्तीला उत्तम साधन आहेत, म्हणून तोही भाग मी तुला स्पष्ट करून सांगितला ४३०.


म्यां सांगितल्याऐसें जाण । जो वेदमार्गें करी अनुष्ठान ।
तो माझी प्राप्ती पावे संपूर्ण । सगुण निर्गुण यथारुची ॥ ३१ ॥
ह्या मी सांगितलेल्या वेदमार्गाचें जो अनुष्ठान करील, त्याला आपल्या आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा पाहिजे त्या स्वरूपाची प्राप्ति होते ३१.


सगुणसाक्षात्कार जो येथ । तें पंचरात्रागम-मत ।
वैकुंठचि मुख्य म्हणत । हें मत निश्चित तयांचें ॥ ३२ ॥
परंतु सगुणसाक्षात्कार म्हणून जो ह्यांत आहे, ते पंचरात्रागमाचे मत होय. ते लोक वैकुंठालाच मुख्य म्हणतात. ते त्यांचे निश्चयाचे मत आहे ३२.


सप्तावरणांबाहेरी । मायावरणाभीतरीं ।
वैकुंठ रचिलें श्रीहरीं । हें बोलिजे निर्धारीं वेदान्ती ॥ ३३ ॥
सात आवरणांच्या बाहेर आणि मायावरणाच्या आंत श्रीहरीने वैकुंठाची रचना केली आहे, असें वेदान्तात म्हटले आहे ३३.


तेथ आगमाचें मनोगत । माया ते ‘भगवल्लीला’ म्हणत ।
स्वलीला वैकुंठ रची भगवंत । क्षयो तेथ असेना ॥ ३४ ॥
त्यांत आगमशास्त्राच्या मताप्रमाणे माया ही भगवंताची ‘लीला’ असे म्हणणे आहे. भगवंताने आपल्या लीलेने वैकुंठ रचलेले आहे, म्हणून त्याला नाश नाही ३४.


जेथ लीलाविग्रही मेघश्याम । स्वयें वसे पुरुषोत्तम ।
तेथ नाहीं गुण काळ कर्म । मायादि भ्रम रिघेना ॥ ३५ ॥
जेथें लीलामात्रेकरून इच्छित देह धारण करणारा मेघकांतियुक्त प्रत्यक्ष पुरुषोत्तमच राहात असतो, तेथे गुण, काळ, कर्म, किंवा माया इत्यादि भ्रम राहात नाही ३५.


एवं जन्मक्षयातीत । वैकुंठ अक्षयी निज नित्य ।
तेथ पावले ते नित्यमुक्त । हें ‘आगम-मत’ उद्धवा ॥ ३६ ॥
अशा रीतीचे जन्म व मरणरहित वैकुंठ हें अक्षयी व नित्यच असते. उद्धवा ! तेथे जे जाऊन पोचतात ते नित्यमुक्त होत, असें आगमाचे मत आहे ३६.


मंत्रें आराध्यदैवतें प्रसन्नें । हें वेदार्थियांचें बोलणें ।
तें म्यां तुजप्रती अनुसंधानें । बोलिलों जाणें उद्धवा ॥ ३७ ॥
उद्धवा ! मंत्रांच्या योगेंकरून आपले आराध्य दैवत प्रसन्न करून घेता येते, असें वेदवेत्त्यांचे म्हणणे आहे. तेंही ओघानुसार मी तुला सांगून दिले ३७.


भावार्थभक्तींचे लक्षण । ते प्रसन्नतेची खूण ।
हें पूर्वीं केलें निरूपण । निरुतें जाण उद्धवा ॥ ३८ ॥
तसेच उद्धवा ! भावार्थ भक्ति हीच प्रसन्नतेची खूण होय, हे मी तुला पूर्वी नीट रीतीने सांगितलेच आहे ३८.


ते अर्थीं वेदांती म्हणत । अत्यंतप्रळयींचा जो आघात ।
तो वैकुंठकैलासादि समस्त । साकारवंत निर्दाळी ॥ ३९ ॥
पण वेदान्तशास्त्रज्ञ ह्यांविषयी असे म्हणतात की, अत्यंत प्रळयाचा आघात हा वैकुंठकैलासादि सारे लोक अर्थात् जेवढे साकार म्हणून आहेत तेवढे नाहीसे करून टाकतो ३९.

ते काळींचें उर्वरित । केवळ जें गुणातीत ।
तें पूर्ण ब्रह्म सदोदित । जाण निश्चित उद्धवा ॥ ४४० ॥
त्या वेळी गुणातीत असते तेवढेच काय तें अवशिष्ट राहाते. उद्धवा ! तेच खरोखर सदा सर्वकाल नित्य असणारे पूर्णब्रह्म’ होय ४४०.
जेथ काळ ना कर्म । जेथ गुण ना धर्म ।
जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥ ४१ ॥
जेथे काळही नाही आणि कर्मही नाहीं; जेथें गुणही नाही आणि धर्मही नाहीं; माया ही जेथें उपरम पावते ; उद्धवा ! तेच परब्रह्म होय ४१.

माझें स्थान वैकुंठ जाण । तेथील प्राप्ति सायुज्य सगुण ।
‘पूर्ण-सायुज्यता’ संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥ ४२ ॥
माझें स्थान वैकुंठ हे होय; तेथें ‘सगुण-सायुज्याचा’ लाभ होतो; पण निरंतर परिपूर्ण ब्रह्म हीच ‘पूर्ण-सायुज्यता’ होय ४२.


पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गीं क्षेम ।
वेदोक्त मद्‍भक्ति सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥ ४३ ॥
असें पूर्ण परब्रह्मस्वरूप होण्याला साधकांना बिनधोक मार्ग कोणता ? तर वेदांत सांगितल्याप्रमाणे माझी भक्ति करणे हाच सुगम आणि उत्तमोत्तम मार्ग होय ४३.


आणिके मार्गीं जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न ।
कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥ ४४ ॥
दुसऱ्या मार्गाने गेलें तर कामलोभादि विघ्ने उत्पन्न होतात. किंवा ज्ञानाभिमान खड्डयांत घालतो, व वेदोक्तकर्मत्यागाचा दोष मात्र पदरांत पडतो ४४.


तैसें नाहीं भक्तिपंथीं । सवें नवविध सांगती ।
चढता पाउलीं अतिविश्रांती । भजनयुक्ती मद्‍भावें ॥ ४५ ॥
तसें भक्तिमार्गात नाही. त्यात आपल्याला नवविधाभक्तिरूप नऊजण सोबतीला असतात. मद्भावयुक्त भक्तीच्या युक्तीमुळे प्रत्येक पावलाला अत्यंत विश्रांति मिळते ४५.


येथील मुख्यत्वें साधन । गेलियाही जीवप्राण ।
कदा न देखावे दोषगुण । तैं ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥ ४६ ॥
ह्यांतील मुख्य साधन हेच की, जीवप्राण गेला तरी गुणदोष म्हणून कधी पाहावयाचे नाहीत. त्याच वेळेस परिपूर्ण ब्रह्माची प्राप्ति होते ४६.


जेथ नाहीं भयभ्रांती । जेथ नाहीं दिवसराती ।
जेथ नाहीं जीवशिवस्थिती । तें ब्रह्म पावती मद्‍भक्त ॥ ४७ ॥
जेथें भय भ्रांति कांहीं नाहीं; जेथे दिवस आणि रात्र नाहीं; जेथें जीव अणि शिव हा भेद नाही; त्याच ब्रह्माला माझे भक्त पावतात ४७
.


जेथ नाहीं रूपनाम । जेथ नाहीं काळकर्म ।
जेथ नाहीं मरणजन्म । तें परब्रह्म पावती ॥ ४८ ॥
जेथे रूप नाही, नाम नाही; जेथें काळ नाही, कर्म नाहीं; जेथे जन्म नाही व मरणही नाही; त्या परब्रह्माला ते पोंचतात ४८.


जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाहीं ज्ञेयज्ञान ।
जेथ नाहीं मीतूंपण । तें ब्रह्म परिपूर्ण पावती ॥ ४९ ॥
जेथे ध्येय नाहीं, ध्यान नाही; जेथें ज्ञेय नाही, ज्ञान नाहीं; जेथे मीपण नाही व तूंपण नाही; त्याच परिपूर्ण ब्रह्माला पोचतात ४९
.


ज्यासी नाहीं मातापिता । जें नव्हे देवोदेवता ।
जें बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वतां पावती ॥ ४५० ॥
ज्याला आई नाही आणि बापही नाहीं; जें देवही नव्हे आणि देवताही नव्हे; जें एकही नव्हे आणि अनेकही नव्हे; त्या परब्रह्मालाच खरोखर ते पोचतात ४५०.


जेथ नाहीं वर्णाभ्रम । जेथ नाहीं क्रियाकर्म ।
जेथ नाहीं मायाश्रम । तें परब्रह्म पावती ॥ ५१ ॥
ज्यांत वर्ण नाहीं व आश्रमही नाहीं; ज्यांत क्रिया नाही व कर्मही नाहीं; आणि ज्यांत मायेचा भ्रमही नाहीं; त्या ब्रह्माला ते पोचतात ५१.


जें गुणागुणीं अतीत । जें लक्ष्यलक्षणारहित ।
जें स्वानंदें सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्‍भक्तां ॥ ५२ ॥
जें गुणागुणांच्या पलीकडे असते ; जें लक्ष्यलक्षणारहित असते; जें सदोदित स्वानंदाने परिपूर्ण असते; तें ब्रह्म माझ्या भक्तांना प्राप्त होतें ५२
.


पूर्णकृपेचा हेलावा । न संठेचि देवाधिदेवा ।
तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५३ ॥
उद्धवा! पूर्ण कृपेचे आलेले भरतें मला देवाधिदेवाला आवरेना. तोच हा एकादश स्कंधांतील विसावा मी तुला दिला आहे ५३.


जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ सामरस्य जीवशिवां ।
तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५४ ॥
उद्धवा ! जेथे देहभानाला ठिकाण नाहीं; जेथें जीवशिवाचे तादात्म्य घडते; तो हा एकादशस्कंधांतील विसावा (अध्याय) मी तुला दिला आहे ५४.


जेथ उगाणा होय अहंभावा । जेथ शून्य पडे मायेच्या नांवा ।
तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५५ ॥
उद्धवा! जेथे अहंभावाचा नाश होतो; मायेच्या नांवावर शून्य पडते ; तो हा एकादशस्कंधांतील विसावा तुला दिला आहे ५५.


जेथ देवभक्तांचा कालोवा । एकत्र होय आघवा ।
तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५६ ॥
जेथे देवभक्तांचे पूर्णपणे मिश्रण होऊन जाते, तो हा एकादशस्कंधांतील विसावा मी तुला दिला आहे ५६.


कष्टीं स्वानंद स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा ।
तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५७ ॥
स्वानंद मिळवावयाचा तर तो कष्टाने मिळवावा लागतो; त्या स्वानंदाचा आयता ठेवा असा हा एकादशस्कंधांतील विसावा (अध्याय) मी तुला दिला आहे ५७


करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा ।
तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५८ ॥
उद्धवा! भेदाचा झाडा करून अभेदाचा प्रवेश होतो, असा हा एकादशस्कंधांतील विसावा मी तुला दिला आहे ५८.


काढोनि भावार्थाचा भावो । सोलीव सोलिवांचा सोलावो ।
गाळुनी गाळिवांचा भक्तिभावो । उद्धवासी देवो देतसे ॥ ५९ ॥
अशा प्रकारें भावार्थाचा भाव काढून, सोलीवांतील सोलीव गाभा, गाळीवांतील भक्तिभाव गाळून देव उद्धवाला देत आहेत ५९.


यापरी श्रीकृष्णनाथ । होऊनियां स्वानंदभरित ।
विसाव्या अध्यायींची मात । हरिखें सांगत उद्धवा ॥ ४६० ॥
अशा प्रकारे स्वानंदनिर्भर होऊन श्रीकृष्णांनी विसाव्या अध्यायाची कथा आनंदाने उद्ध्वाला सांगितली ४६०.


अतां विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा ।
तो मी सांगेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥ ६१ ॥
उद्धवा! आता विसाव्याचाही विसावा, स्वानंदसुखाचा पूर असा एकविसावा अध्याय तुला सांगतों, तोही ऐक ६१.


वेदीं शुद्धाशुद्धलक्षण । हें पुढिले अध्यायीं निरूपण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ६२ ॥
वेदांतील शुद्धाशुद्धाचे लक्षण हेंच पुढील अध्यायांत निरूपण आहे. याकरिता एकाजनार्दन विनंति करतो की, श्रोत्यांनीही माझ्याकडे अवधान द्यावे ६२.


इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंथे भगवदुद्धवसंवादे
एकाकार-टीकायां वेदत्रयीविभागयोगो नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ३७ ॥ ओंव्या ॥ ४६२ ॥
याप्रमाणे श्रीभागवतमहापुराणांतील एकादशस्कंधामधील भगवदुद्धवसंवादाचा एकनाथकृत टीकेचा ‘वेदत्रयी-विभागयोग’ नावाचा विसावा अध्याय संपूर्ण झाला.