ekanathi-bhagavata-chapter-Naū
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती ।
स्वानंदमदें भद्रजाती । उन्मत्तस्थितीं डुल्लत ॥१॥
हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं स्वतः अमरावतीचा अधिपति इंद्र असून अनुभव हाच ऐरावती होय. तो हत्ती स्वानंदमदाच्या उन्मत्त स्थितीने डुलत असतो १.
उपदेशाचें वज्र तिख । छेदी संकल्पविकल्पपांख ।
जडजीव ते पर्वत देख । निजस्थानीं सम्यक स्थापिसी ॥२॥
तुझ्या हातांत उपदेशरूपी जाज्वल्व वज्र आहे. त्याने तूं जडजीवरूपी जे पर्वत, त्यांचे संकल्पविकल्परूप पंख तोडून त्यांची पुन्हा नीट रीतीनें मूळपदावर स्थापना करतोस २.
विवेकाचे पारिजात । वैराग्यसुमनीं घमघमित ।
मुमुक्षभ्रमर रिघोनि तेथ । आमोद सेविती चित्सुख ॥३॥
विवेक हाच पारिजातक असून वैराग्यरूपी पुष्पांनी तो घमघमीत झाला आहे. मुमुक्षुरूपी अमर त्या पुष्पांत शिरून चित्सुखरूपी मकरंद सेवन करतात ३.
उपशम तोचि बृहस्पती । विश्वासें तुझा निकटवर्ती ।
त्यासी मानिसी अतिप्रीतीं । तो सभेप्रती सदस्य ॥४॥
उपशम हाच बृहस्पति ; तो तुझ्या विश्वासाने तुझ्या आदी संनिध असतो. त्याला तूंही मोठ्या प्रेमाने मान देतोस. तोच तुझ्या सभेतील मुख्य सभासद आहे ४.
कृपाकामधेनूंचीं खिल्लारें । श्रद्धावत्साचेनि हुंकारें ।
वोळल्या वोरसाचेनि भरें । तें दुभतें पुरे भागवतां ॥५॥
तुझ्या पदरी कृपारूप कामधेनूंची खिल्लारें आहेत; श्रद्धारूपी वत्सांच्या हुंबरण्याने त्यांच्या स्तनांमध्ये पान्हा भरून दूध वाहू लागते; तें भगवद्भक्तांना पुरतें ५.
सतेज चिंतामणीचे खडे । सभोंवतीं लोळती चहूंकडे ।
भक्त न पाहती तयांकडे । चरणसुरवाडें सुखावले ॥६॥
तेजस्वी चिंतामणीचे खडे तुझ्या सभोवतालच्या जमिनीवर पडलेले असतात, परंतु भक्त त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहात नाहीत. तुझ्या चरणाच्या आवडीनेंच ते तृप्त असतात ६.
स्वर्गांगना अष्टमा सिद्धी । तुजपुढें नाचती नाना छंदीं ।
त्यांतें दास न पाहती त्रिशुद्धी । मंदबुद्धि भाळले ॥७॥
स्वर्गातील अप्सरा म्हणजे अष्टमहासिद्धि तुझ्यापुढे नाना प्रकारांनी नृत्य करितात; पण खरोखर तुझे दास असतात ते त्यांच्याकडे वांकड्या नजरेनेसुद्धा पाहात नाहीत. मंदबुद्धि पुरुषच त्यांना भाळतात ७.
समसाम्यें समान । अढळ तुझें सिंहासन ।
सच्चिदानंदाची गादी जाण । तेथें सुखासन पैं तुझें ॥८॥
सर्वत्र समष्टीचे तुझे सिंहासन अढळ आहे. त्यावर सच्चिदानंदाची गादी आहे. तेथेच तुझे सुखासन असते ८.
पावावया तुझिया पदाप्रती । साधनचतुष्टयसंपत्ती ।
जोडोनियां याजक यजिती । प्रत्यगावृत्तीचेनि यागें ॥९॥
तुझे पद मिळविण्याकरितां साधनचतुष्टयाची संपत्ति मिळवून ‘सोऽहं’ (परब्रह्म तें मीच ) या ध्यासाने यज्ञकर्ते पुरुष यज्ञ करतात ९.
जे मन होमिताति सावधानीं । ऐसें भक्तभजन देखोनि ।
तेणें भावार्थयोगें संतोषोनी । निजपददानी तूं होशी ॥१०॥
जे सावधानपणाने मनाचा होम करतात, त्या भक्तजनांचे भजन पाहून व त्यांच्या भक्तिभावार्थावर संतुष्ट होऊन तूं आपलें पद त्यांना देतोस १०.
त्यांसी निजात्मता देऊनि । बैसविसी निजासनीं ।
मरणेंवीण अमर करूनी । अपतनीं स्थापिसी ॥११॥
त्यांना निजात्मता अर्पण करून आपल्या पदावर बसवितोस. मरणाशिवाय अमर करून जेथे पतन म्हणून नाही, अशा स्थानावर त्यांची तूं स्थापना करतोस ११.
इंद्रा अहल्येशीं व्यभिचारु । तुज वृंदेशीं दुराचारु ।
इंद्र जाहला सहस्रनेत्रु । तूं सर्वांगे सर्वत्रु देखणा ॥१२॥
इंद्राने अहल्येशी व्यभिचार केला; आणि तूं वृंदेशी व्यभिचार फेलास, इंद्र फक्त सहस्रनेत्र झाला आणि तूं सर्वांगाने सर्व पाहणारा झालास १२.
इंद्रासी दैत्य करिती दीन । त्याचें पद घेती हिरोन ।
तुज भक्त करिती प्रसन्न । पद चिद्घन ते घेती ॥१३॥
इंद्राला दैत्य दीन करितात व त्याचे पद हिरावून घेतात; तुलाही भक्त प्रसन्न करून घेतात व तुझे चिद्घनपद बळकावतात १३.
ककुत्स्थ बैसला इंद्राचे स्कंधीं । दुर्वास बैसला तुझ्या खांदीं ।
इंद्र वर्ते विष्णूचे बुद्धीं । तूं भक्तच्छंदीं वर्तसी ॥१४॥
ककुत्स्थ इंद्राच्या खांद्यावर बसला. (सूर्यवंशी इक्ष्वाकुराजाचा पौत्र इंद्राला वृषभ करून त्याच्या खांद्यावर बसून दैत्यांना युद्धांत जिंकता झाला); तुझ्या खांद्यावर दुर्वास बसला. इंद्र विष्णूच्या बुद्धीने चालतो व तूं भक्तांच्या छंदाने वागतोस १४.
रावणें बंदीं घातलें इंद्रासी । तुज बळीनें राखिलें द्वारासी ।
इंद्र याची यागअवदानासी । तूं भूमिदानासी याचिता ॥१५॥
रावणाने इंद्राला बंदीत घातलें ; तुला बळीने द्वारपाळ करून ठेवलें. इंद्र यज्ञांतील हविर्भाग मागतो; तूं (बळीकडे) भूमिदान मागता झालास १५.
इंद्रासी अग्निमुखें प्राप्ती । तुज विश्वतोमुखीं तृप्ती ।
ऐसा सद्गुरु तूं कृपामूर्तीं । अमरचक्रवर्ती गुरुराया ॥१६॥
इंद्राला अग्नीच्या मुखाने तृप्ति आणि तूं विश्वतोमुखानें तृप्त. हे गुरुया ! असा तूं कृपेची केवळ मूर्ति आहेस; आणि अमरांचा सार्वभौम आहेस १६.
तुझी करावी विनवणी । तंव तेथें न रिघे वाणी ।
वाणीप्रकाश तुझेनी । वक्ता वदनीं तूं सत्य ॥१७॥
आतां तुझी विनवणी करावी, तर तेथे वाणीचा रिघाव होत नाही. कारण, तुझ्यामुळेच वाणी प्राट होते. खरोखर मुखाने बोलणारा तूंच आहेस १७.
एका एक जनार्दनीं । तो जनार्दन वक्ता वदनीं ।
ऐसा वचनामाजीं प्रवेशोनी । ग्रंथकरणी करविता ॥१८॥
हा एका (एकनाथ) जनार्दनामध्ये एकरूप होऊन गेला, त्यामुळे तो जनार्दनच खरा वक्ता होय. तोच अशा रीतीने मुखामध्ये व शब्दामध्ये प्रवेश करून ग्रंथाचे कार्य करवीत आहे १८.
तेथें मूळीं निमाली अहंता । अहं दवडूनि तूं कवि कर्ता ।
एका जनार्दनु अभंगी सूता । अभंगता गुरुचरणीं ॥१९॥
येथे अहंता समूळ नाश पावली. अर्थात् ‘मी’ नष्ट झाल्यामुळे तूंच कवि-कर्ता झालास. तूंच जनार्दन अभंगामध्ये म्ह. कवितेमध्ये एकनाथाचें नांव घालतोस. एकनाथाची गुरूच्या चरणी अभंगता म्ह. तादात्म्यभाव झाला आहे १९.
त्या गुरुचरणप्रसादें । गुरूचीं लक्षणें विनोदें ।
वाखाणिलीं यथाबोधें । यदुसंवादें अवधूतें ॥२०॥
त्या गुरुचरणाच्या प्रसादानेच अवधूताने यदूला सांगितलेली गुरूंची लक्षणे यथातथ्य रीतीनें विशद करून वर्णन केली २०.
मागें अष्टमाध्यायाच्या अंतीं । असतां पिंगलेसी एकांतीं ।
विवेक-वैराग्य-निवृत्तीं । निजसुखप्राप्ती पावली ॥२१॥
मागे आठव्या अध्यायाच्या शेवटी पिंगला ही एकटी असतांना विवेकाने आणि वैराग्याने तिची वृत्ति पालटून ती आत्मसुखाला पात्र झाली (असें वर्णन आहे) २१.
जंव जंव अपरिग्रह होणें । तंव तंव निजसुख पावणें ।
हेंचि प्रस्तुत बोलणें । तेणें ब्राह्मणें बोलिजे ॥२२॥
तात्पर्य, जो जो परिग्रहशून्य (उपाधिशून्य ) होत जावें, तो तों आत्मसुख प्राप्त होत जाते. हेच त्या भाषणांतील सार त्या ब्राह्मणाने सांगितले २२.
श्रीब्राह्मण उवाच
परिग्रहो हि दुःखाय यद् यत्प्रियतमं नृणाम् ।
अनन्तं सुखमाप्नोति तद्विद्वान् यस्त्वकिञ्चनः ॥ १ ॥
[श्लोक १] अवधूत म्हणाले – माणासाना जी वस्तू आवडते, तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करत नाही, तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. (१)
ब्राह्मण म्हणे रायासी । परिग्रहो जयापाशीं ।
वाढतें दुःख तयासी । अहर्निशीं चढोवढी ॥२३॥
ब्राह्मण राजाला म्हणाला, “ज्याच्यापाशी परिग्रह म्ह. कसला तरी संग्रह असतो, त्याला रात्रंदिवस चढाओढीने वाढते दुःख भोगावे लागते २३.
कुटुंबपरिग्रहाचे आसक्ती । कपोता निमाला दुर्मती ।
आतां एकाकी परिग्रहो करिती । तेही पावती दुःखातें ॥२४॥
कुटुंबपरिग्रहाच्या आसक्तीनेंच दुर्बुद्धि कपोतपक्षी नाश पावला. एकटे असूनही परिग्रहाच्या नादाला जे लागतात, तेही पण दुःख पावतात २४.
गृहपरिग्रहें गृहस्था । पाषाणमृत्तिकेची ममता ।
काडीकारणें कलहो करितां । सुहृदता सांडिती ॥२५॥
गृहाचा परिग्रह केला, की त्याला दगडमातीचासुद्धा लोभ वाटतो. एका काडीकरितांसुद्धा ते स्नेहसंबंध सोडून कलहाला उद्युक्त होतात २५.
निःसंगा परिग्रहो लागला कैसा । शिष्यसंप्रदायें घाली फांसा ।
शास्त्रपुस्तकसंग्रहवशा । वाढवी आशा मठाची ॥२६॥
पण विरक्त पुरुषांनासुद्धां परिग्रह कसा कागतो तो पाहा. त्यांना शिष्यसंप्रदाय पाशांत पाडतो. शास्त्राच्या पुस्तकाच्या संग्रहाची आवड लागून, त्यामुळे मठ करण्याचा लोभ सुटतो २६.
त्या मठशिष्यांचें सांत्वन । करितां अत्यंत होय दीन ।
मग परिग्रहाचें उपशमन । अपरिग्रही जाण करिताति ॥२७॥
आणि मग त्या मठांतील शिष्यांची समजूत घालता घालतां विचारा अगदी बेजार होऊन जातो. मग ते त्या परिवाराला कटाळून साराच परिवार सोडून देतात २७.
त्या मठाचिया आशा । शिष्यसंप्रदायवशा ।
कलहो लागे आपैसा । विरोधु संन्यासा परिग्रहें ॥२८॥
मठाची आशा लागली, त्यासाठी शिष्यसंप्रदाय जमवावा लागतो. शिष्यसमुदाय जमला की, त्यांचा परस्परांत आपोआपच कलह उत्पन्न होतो. अशा प्रकारे परिग्रहामुळे संन्याशाला विरोध मात्र होतो २८.
परिग्रहो जिणोनि गाढा । लंगोटी त्यजूनि जाहला उघडा ।
नागवे माथां घेऊनि घडा । लाविल्या झाडा शिंपित ॥२९॥
पूर्वीचा बायकोमुलांचा परिग्रह सोडून देऊन लंगोटीसुद्धा टाकून उघडा झाला होता; परंतु आता उघडाबोडकाच डोक्यावर घागर घेऊन मठासभोवती लावलेल्या झाडांना पाणी शिंपीत असतो २९.
त्या वृक्षाचें कोणी पान तोडी । त्यासी आक्रोशें कलह मांडी ।
थोर परिग्रहाची सांकडी । दुःखें पीडी सर्वांतें ॥३०॥
त्या वृक्षाचे कोणी पान तोडले, की आकाशपाताळ एक करून भांडण सुरू करतो. अशा प्रकारे परिग्रहाचे संकट मोठे कठिण असते. ते साऱ्यांनाच दुःखाने भंडावते ३०.
आवडीं केला जो परिग्रहो । तो तो उपजवी दुःखकलहो ।
हा होतांही अनुभवो । वैराग्य पहा हो उपजेना ॥३१॥
आवडीनें म्हणून जो परिग्रह करावा, तो तो दुःख आणि कलहच उत्पन्न करतो. हा प्रत्यक्ष अनुभव येत असूनही वैराग्य उत्पन्न होत नाही ३१.
ऐशी परिग्रहाची कथा । देखोनि देखणा जो ज्ञाता ।
आसक्ती सांडोनि सर्वथा । अकिंचनपंथा लागला ॥३२॥
परिग्रहाची दशा ही अशी आहे. हे पाहूनच जो देखणा म्ह. ज्ञाता असतो, तो त्याजवरची आसकि सर्वथैव सोडून देऊन सर्वस्वाचा त्याग करून अकिंचन मार्गालाच लागतो ३२.
प्रपंच अनित्य नाशवंत । तेथील संग्रह काय शाश्वत ।
ऐसें विवंचूनि समस्त । अकिंचनचित्त ते जाहले ॥३३॥
प्रपंच हाच मुळी क्षणभंगुर म्हणजे नाशवंत आहे. त्यांतला परिग्रह शाश्वत कसा असणार ? याप्रमाणे साऱ्याचा विचार करूनच ते अकिंचन होऊन बसतात ३३.
परिग्रहामाजीं गाढा । देहपरिग्रहाचा खोडा ।
मिथ्यात्वें फोडी रोकडा । तो विवेकें गाढा ज्ञाता पैं ॥३४॥
सर्व परिग्रहांमध्ये देहपरिग्रहाचा खोडा मोठा दांडगा असतो, तो मिथ्या समजून तात्काळ जो फोडून टाकतो तोच खरा विचारी व ज्ञाता होय ३४.
जेथ देहपरिग्रह मिथ्या जाहला । तो अनंत सुखाच्या घरा आला ।
ज्या सुखासी अंत न वचे केला । त्या पावला निजसुखा ॥३५॥
ज्याचा देहपरिग्रह मिथ्या होतो, तो अनंतसुखाच्या मंदिरांत येतो; ज्या सुखाचा अंत करता येत नाही, त्या निजसुखाला तो प्राप्त होतो ३५.
परिग्रहो दुःखवंतु । हा ‘कुररी’ गुरुत्वें वृत्तांतु ।
तुज सांगेन साद्यंतु । उपहासें अवधूतु बोलिला ॥३६॥
असे सांगून अवधूत विनोदाने म्हणाला, “परिग्रह हा दुःखदायक असल्याचा वृत्तांत तुला टिटवीच्या गुरुत्वावरून साद्यंत सांगून देतो” ३६.
तंव राजा मनीं चमत्कारला । म्हणे मी राज्यपरिग्रहें गुंतला ।
देहपरिग्रहें बंदी पडला । पाहिजे केला हा त्यागु ॥३७॥
तेव्हां राजाच्या मनाला दचका बसला. तो मनांत म्हणाला, मीही राज्यपरिग्रहांत गुंतून पडलों असून देहपरिग्रहानेंही बंदीत पडलों आहे. तेव्हां यांचा मला आतां त्याग केला पाहिजे ३७.
ऐसा राजा सवैराग्यु । करूं पाहे सर्वत्यागु ।
श्रवणें जाहला तो सभाग्यु । होय योग्यु निजज्ञाना ॥३८॥
याप्रमाणे राजाला वैराग्य उत्पन्न होऊन तो सर्वस्वत्याग करण्याला तयार झाला. श्रवणाचे भाग्य त्याला लाभल्यामुळे तो आत्मज्ञानाला पात्र झाला ३८.
कुररी-गुरुत्वें जाणा । परिग्रहत्यागविवंचना ।
आणावया जी मना । सादर श्रवणा करीतसे ॥३९॥
कुररी-पक्ष्याच्या गुरुत्वाने परिग्रहत्यागाचा विचार करण्यासाठी तो नीट लक्ष लावून श्रवण करूं लागला ३९.
सामिषं कुररं जघ्नुर्बलिनो ये निरामिषाः ।
तदामिषं परित्यज्य स सुखं समविन्दत ॥ २ ॥
[श्लोक २] मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुररपक्ष्यावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला, तेव्हा तो सुखी झाला. (संग्रह करणे, हे संकटाचे मूळ आहे, ही शिकवण कुरराकडून घ्यावी). (२)
‘कुरर’ बोलिजे टिटवा । पावला आमिषकवळु बरवा ।
तेणें तेथेंची भक्षवा । तो लोभस्वभावा ठेविला ॥४०॥
कोणी एक कुरर म्हणजे टिटवा पक्षी होता. त्याला एक चांगलासा मांसाचा तुकडा मिळाला. त्याने तो तेथल्या तेथेच खाऊन टाकावा, पण तो न खातां लोभस्वभावाने बाळगून ठेविला ४०.
तें आमिष देखोनियां फार । बळी जे निरामिष कुरर ।
ते धांविन्नले अतिसत्वर । लहान थोर मिळोनि ॥४१॥
तेव्हा तो मांसाचा मोठा तुकडा पाहून ज्या टिटव्यांपाशी तसला तुकडा नव्हता, ते याच्यापेक्षा बलवान् लहानमोठे टिटवे मिळून लौकर लौकर त्याच्याकडे धावत आले ४१.
हिरोनि घेऊं पाहती बळें । हें जाणोनियां तो पुढें पळे ।
पळतां देखोनि एक वेळे । त्वरें तत्काळें वेढिला ॥४२॥
ते आतां बळजबरीनें तो तुकडा आपल्यापासून हिरावून घेतील हे जाणून तो पुढे पुढे पळूं लागला. तो पळतो आहे असे पाहून सर्वांनी एकदम लगट करून त्याला घेरला ४२.
त्या आमिषाचिया चाडा । थोर मांडला झगडा ।
मारूं लागले फडफडां । चहूंकडा निष्ठुर ॥४३॥
त्या मांसाच्या लालचीने सर्वांचा मोठा झगडा सुरू झाला. ते निष्ठुर होऊन चहूंकडून त्याला फडाफड मारू लागले ४३.
एक झडपिती पांखीं । एक चपेटे हाणिती नखीं ।
एक विदारिती मुखीं । परम दुःखी होतसे ॥४४॥
कोणी पंखाने झडपूं लागले; कोणी नखाने चपेटे हाणूं लागले, कोणी तोंडाने ओरबाडूं लागले. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले ४४.
आमिष-कवळें गुंतलें मुख । मारितां देऊं न शके हाक ।
खस्तावेस्त करितां देख । बोलावया मुख त्या नाहीं ॥४५॥
मांसाच्या तुकड्याने तोंड गुंतलेलें असल्यामुळे, मारले तरी ओरडायला येत नव्हतें. कितीही धक्काबुक्की केली तरी त्याला बोलावयाला तोंड नव्हते ४५.
हे माझे स्वजाती पहा हो । सांडोनियां सुहृदभावो ।
मज कां करूं आले अपावो । तो अभिप्रावो विवंची ॥४६॥
तो मनांत विचार करूं लागला की, हे माझे खरोखर स्वजातीय बांधव असून स्नेहभाव सोडून मला कां बरें पीडा देतात ! ४६.
म्हणे माझिया दुःखासी मूळ । मजपाशील आमिष-कवळ ।
तो त्यजोनियां तत्काळ । सुखी सुनिश्चळ बैसला ॥४७॥
तो म्हणाला, माझ्या जवळचा मांसाचा तुकडा हेच माझ्या दुःखाचें मूळ आहे. असें म्हणून त्याने तो लागलाच टाकून दिला आणि सुखानें स्वस्थ बसला ४७.
जेथ आमिषकवळु पडे । तेथ कलहाचा गोंधळ मांडे ।
परस्परें फुटती मुंडें । ठेंचिती तोंडे येरयेरां ॥४८॥
पण जेथें तो मांसाचा तुकडा पडला, तेथे तंट्याचा मोठा गोंधळच माजून राहिला. एकमेकांची डोकी फोडून परस्पर परस्परांची तोंडे ठेचू लागले ४८.
आमिष त्यजोनि बैसला देख । तो पाहे कलहाचें कौतुक ।
मूळ परिग्रहो तेथें दुःख । परम सुख त्यागितां ॥४९॥
पहिला टिटवा मांसाचा तुकडा टाकून बसला होता, तो या तंट्याची मौज पहात राहिला. तात्पर्य, मूळ परिग्रह जेथे असतो तेथे दुःख असते; आणि तो टाकला की मोठे सुख होते ४९.
माड्या गोपुरें धवळारा । धनधान्य नाना अंबरा ।
रत्नें प्रवाल धन-पुत्र-दारा । हा समुदायो खरा परिग्रहो ॥५०॥
माड्या, गोपुरे, वाडे, धन, धान्य, परोपरीची वस्त्रे, रत्ने, पोवळीं, द्रव्य, बायकामुले, इत्यादि जो समुदाय तोच खरा परिग्रह होय ५०.
या समस्त परिग्रहाचें मूळ । देहबुद्धि गा केवळ ।
तेहीं अभिमानें सबळ । एवं सर्वांस मूळ अभिमानु ॥५१॥
या साऱ्या परिग्रहाचें मूळ पाहावयास गेले तर केवळ देहवुद्धि, म्हणजे ‘देह हाच मी’ अशी भावना, तीही अभिमानाने जोरावलेली. म्हणजे एकंदरीत सर्वांचे मूळ अभिमान ५१.
तो अभिमानु जैं सांडे । तैं प्रपंचाचें मूळ खंडे ।
मूळ छेदिल्या जेवीं उलंडे । अतिप्रचंडे तरुवर ॥५२॥
तो अभिमानच जेव्हां सोडून द्यावा, तेव्हांच प्रपंचाचें मूळ खुंटते. मूळच तोंडून टाकलें म्हणजे प्रचंड वृक्षही उलथून पडतो, तसेंच हें आहे ५२.
अभिमान देहबुद्धिजीवन । देहबुद्धि संगास्तव गहन ।
उभयसंगु तो आयतन । निवासस्थान परिग्रहो ॥५३॥
अभिमानाला देहबुद्धि हें जीवन असते, आणि देहबुद्धिही संगाने दृढतर होते. या दोघांच्या संगतीचे परिग्रह हे निवासस्थान होय ५३.
एवं अन्योन्य सापेक्षक । येरयेरा आवश्यक ।
याचे त्यागीं परम सुख । अतिदुःख तो परिग्रहो ॥५४॥
अशा प्रकारे ही परस्पर साहाय्यकारी असून परस्परांना ती चिकटून राहतात. ह्याकरिता त्यांचा त्याग केला असता मोठे सुख होते, आणि त्यांचा परिग्रह म्ह. संग्रह केला असतां, तो दुःखास कारणीभूत होतो ५४.
परिग्रहत्यागाचें मूळ जाण । आधीं त्यजावा अभिमान ।
तेणेंवीण त्यागु तो विटंबन । केल्या जाण होईल ॥५५॥
परिग्रहत्यागाचे मूळ म्हणशील तर आधी अभिमान सोडावा. त्याशिवाय त्याग करावयाला गेले तर ती विटंबना मात्र होईल ५५.
अभिमानसहित सकळ सांडे । तैं पडती सुखाचे पायमांडे ।
तें सुख न बोलवे तोंडें । शब्द मुरडे लाजोनि ॥५६॥
अभिमानासहित सर्व सोडावें, तेव्हांच सुखाच्या पायघड्या पडतील. तें सुख तोंडाने सांगता येत नाही. शब्द लाजून मागे परततो ५६.
अभिमान जाऊन वर्तन । कैसें राया म्हणसी जाण ।
तें अर्भक-गुरुत्वलक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥५७॥
हे राजा ! आता अभिमान सोडून कसें वागतां येईल ? असें म्हणशील, तर त्याविषयी बालकाच्या गुरुत्वाचें साद्यंत लक्षण तुला सांगतों ५७.
न मे मानापमानौ स्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् ।
आत्मक्रीड आत्मरतिः विचरामीह बालवत् ॥ ३ ॥
[श्लोक ३] ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममाण होते, त्याला कोणतीही काळजी नसते, त्याचप्रमाणे मीसुद्धा आत्मानंदात मग्न असतो मान मिळो की अपमान होवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घरपरिवार यांचीही मला काळजी नाही. (३)
बाल माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांही नेणे ।
यालागीं मानापमान तेणें । सुखें साहणें सर्वथा ॥५८॥
हें माझे व हें तुझे असें मूल कधी म्हणत नाही. हे उंच व हें नीच असे त्याला समजत नाही. म्हणून तें मानापमान सुखाने सहन करून राहातें ५८.
तिमासांचेनि बाळकें । मानु कोण हें नोळखे ।
अपमानु तोही न देखे । आपुलेनि सुखें क्रीडत ॥५९॥
तीन महिन्यांच्या मुलाला मान हणजे काय साची ओळख नसते, तसेंच अपमानही त्याला माहीत नसतो. आपल्याच आनंदांत तें खेळत असतें ५९.
दुजेपणातें नातळे । बालक आपुलियाचि लीळें ।
आपआपणियाशींच खेळें । आपुलेनि मेळें आपण ॥६०॥
दुसरेपणाला ते शिवतच नाही; मूल आपल्याच लीलेने आपल्याशीच खेळत असते. आपली आपणच करमणूक करतें. ६०.
देहगेहांची चिंता । बाळासि नातळे सर्वथा ।
स्वभावेंचि निश्चिंतता । चिंताकथा त्या नाहीं ॥६१॥
मुलाला घरादाराची काळजी कधींच शिवत नाही. ते स्वभावतःच निष्काळजी असते. चिंतेची वा त्याला माहीत नसते ६१. र्ता
न देखतां दुजी स्थिती । बाळका आपुली आपणिया प्रीती ।
आपुली आपणिया अतिरती । तैसी गती योगिया ॥६२॥
दुसरी स्थितिच पाहिलेली नसल्यामुळे मूल आपली आपल्यावरच प्रीति करते. ते आपले आपल्यामध्येच रममाण होते. त्याप्रमाणेच योग्याची स्थिति आहे ६२.
योगियासी प्रपंचाचें भान । सत्यत्वें नाहीं जाण ।
यालागीं मानापमान । दोन्ही समान तयासी ॥६३॥
योग्याला प्रपंचाचे भान सत्यत्वाने नसते; त्यामुळे त्याला मान व अपमान दोन्ही सारखीच असतात ६३.
चित्रींचेनि सापें खादला । तो चित्रींचेनि अमृतें वांचला ।
तेवीं जिण्या मरण्या मुकला । निश्चळ ठेला निर्द्वंद्वें ॥६४॥
चित्रांतल्या सापाने खाल्ला होता, तो चित्रांतल्या अमृतानेच वांचला; त्याप्रमाणे योगी, जन्ममरणापासून सुटून द्वंद्वापासून मुक्त होऊन निश्चळ राहिलेला असतो ६४.
गृहदारापुत्रचिंता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
स्वदेहो सत्यत्वें असता । तरी करूं लाहता चिंतेतें ॥६५॥
घरदार, बायकामुले ह्यांची चिंता वाहणे ही सारीच गोष्ट मिथ्या होय. आपला देहच जर त्याला खरा वाटला असता, तर त्याने बायकामुलांची चिंता केली असती ६५.
भवमूळ कल्पना जाण । ते कल्पना मनाआधीन ।
तें मन स्वरूपीं जाहलिया लीन । तेव्हां वस्तु-चिद्घन सर्वत्र ॥६६॥
संसाराचे मूळ म्हटलें म्हणजे कल्पना. ती कल्पना मनाच्या अधीन असते. तें मनच स्वस्वरूपामध्ये लीन झाले म्हणजे सर्वत्र चिद्घन वस्तुच होऊन जाते ६६.
तेणें स्वरूपानुसंधानें । सुखें क्रीडतु चिद्धनें ।
क्रीडा दैवयोगें करणें । देहाभिमानें विरहित ॥६७॥
त्या स्वरूपाच्या अनुसंधानाने तो चिद्घन स्वरूपांत आनंदानें क्रीडा करीत असतो. ती क्रीडा अभिमानविरहित दैवयोगाने चालत असते ६७.
पावोनि निजसुखप्राप्ती । मनआदि इंद्रियें उपरमती ।
अणुभरी स्फुरेना वृत्ती । ‘समाधि’ बोलती या नांव ॥६८॥
आत्मसुखाची प्राप्ति होऊन मनादि इंद्रिये शांत झाली, अणुमात्रही वृत्ति स्फुरण पावेनाशी झाली, म्हणजे त्याला ‘समाधि’ असे म्हणतात ६८.
तेचि स्वरूपीं ठेवूनि मन । बाह्यस्फूर्तीचें स्फुरे भान ।
ते दशा गा ‘व्युत्थान’ । साधुजन बोलती ॥६९॥
त्याच स्वरूपामध्ये मन ठेऊन बाह्यस्फूर्तीचें भान स्फुरत असले, म्हणजे त्या स्थितीला साधु लोक ‘व्युत्थान’ असे म्हणतात ६९.
उंबर्यावरी ठेविला दिवा । तो जेवीं देखे दोंही सवा ।
तैसी व्युत्थानदशा जीवभावा । उभय स्वभावा देखणी ॥७०॥
उंबऱ्यावर दिवा ठेवला म्हणजे दोन्हीकडच्या बाजूचेही पदार्थ दिसतात, त्याप्रमाणे व्युत्थानदशा जीवभावनेला व शिवस्वरूपाला दोहोंलाही जाणणारी असते ७०.
लवण-जळा समरसता । तेवीं स्वरूपीं विरवूनि चित्ता ।
समाधिव्युत्थाना हाणी लाथा । निजीं निजस्वरूपता पावोनि ॥७१॥
मिठाचा आणि पाण्याचा ज्याप्रमाणे एकजीव होऊन जातो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपांत मन विरवून टाकून, आत्मस्वरूपाशी तादात्य होऊन तो समाधि व व्युत्थान दोन्हीही लाथेनें झुगारून देतो ७१.
त्यासी कोणाचा मानापमान । गृहपुत्रचिंता करी कोण ।
स्वरूपीं हारपलें मन । निजसमाधान पावला ॥७२॥
त्याला मग कोणाचा मानही नाही व अपमानही नाही. घरादाराची आणि पुत्राची चिंता तरी कोण करणार ? मन स्वरूपात हरपून गेल्यामुळे तो आत्मसमाधानाला प्राप्त होतो ७२.
मनेंवीण जें विहरण । तें बालकाच्या ऐसें जाण ।
दैवयोगें चलनवलन । वृत्तिशून्य वर्तत ॥७३॥
मनावांचून होणारे शरीरव्यापार म्हणजे अगदी मुलासारखे होत. त्याची हालचाल म्हणजे दैवयोगाने होईल ती. अर्थात् नेहमी वृत्तिशून्यतेनेंच वागावयाचे ७३.
द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ ।
Wयो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥ ४ ॥
[श्लोक ४] जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजाण व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परम आनंदात मग्न असतात. (मानापमान इत्यादींची चिंता न करणे, हा गुण बालकाकडून घ्यावा). (४)
थोर चिंतेचा आवर्त । जेथ ब्रह्मादिक बुडत ।
ते आवर्तीं दोघे मुक्त । परीस निश्चित यदुवीरा ॥७४॥
चिंतेचा भोंवरा मोठा दांडगा आहे. त्यांत ब्रह्मदेवादिकांसारखेसुद्धा बुडून जातात. पण हे यदुवीरा (यदुराजा) त्यांतून दोघेच काय ते खरोखर सुटतात. [एक योगी आणि एक मूल ] ७४.
दोघां नाहीं द्वैतभान । दोघे नेणती मानापमान ।
दोघे सुखें सुखसंपन्न । दोघे मनेंवीण वर्तती ॥७५॥
त्या दोघांना द्वैताचे भान नसते ; दोघेही मानापमान जाणत नाहीत; दोघेही सुखाने सुखी असतात; आणि दोघेही मनावांचून वर्तन करतात ७५.
एकासी पुढे भेटेल दुःख । दुजेनि जिंतिलें सुखदुःख ।
एकासी मुग्धतेचें सुख । दुज्या देख निजज्ञान ॥७६॥
पण एकाला पुढे दुःख प्राप्त होते आणि दुसऱ्याने सुख आणि दुःख दोन्ही जिंकलेली असतात. एकाला मुग्धतेचे ( अजाणतेपणाचे) सुख असते आणि दुसऱ्याला आत्मज्ञानाचे सुख असते ७६.
पाहतां बाळकाचे ठायीं । गुप्तवासना असे देहीं ।
ते अंकुरीजोनि पाही । अवश्य अपायीं घालील ॥७७॥
मुलाच्या ठिकाणी पाहिले तर त्याच्या देहांत गुप्त वासना असते, तिलाच पुढे अंकुर फुटून तीच त्याला हटकून गोत्यांत घालते ७७.
तैसा नव्हे योगिया गुणातीत । जो पूर्णानंदें पूर्णभरित ।
त्यासी सुखदुःखाची मात । नाहीं जगांत सर्वथा ॥७८॥
योगी मात्र त्याप्रमाणे नव्हे. तो गुणातीत असतो. त्याला जगामध्ये सुखदुःखाचा संपर्क कधीच नसतो. ७८.
देहीं दिसे जीव वर्तत । तो केवीं झाला गुणातीत ।
ऐसे म्हणसी तो वृत्तांत । ऐक साद्यंत सांगेन ॥७९॥
देहामध्ये जीव तर वागत असलेला दिसतो, मग तो गुणातीत कसा काय होतो ? असें म्हणशील तर तोही वृत्तांत साद्यंत सांगतों ऐक ७९.
साधकें सेवूनि साधुजन । वाढविला सत्त्वगुण ।
वाढलेनि सत्त्वें जाण । ज्ञानसाधन साधिलें ॥८०॥
साधक हा साधुजनांची सेवा करून आपला सत्त्वगुण वाढवीत असतो. अशा प्रकारे सत्वगुण वाढला म्हणजे ज्ञानाचे साधन साध्य होते ८.
साधिलेनि ज्ञानसाधनें । छेदी रजतमांचीं विंदानें ।
जें मोहममतेचीं दारुणें । उभय भोगजन्यें कर्मठां ॥८१॥
त्या साधलेल्या ज्ञानसाधनाच्या योगानें, इहलोकांत कर्मठांना भोगावयास लागणारी मोहममतेची रजतमात्मक लक्षणे ते छेदून टाकतात ८१.
एवं वाढलेनि सत्त्वोत्तमें । निर्दळलीं रजतमें ।
सत्त्व एकलेपणें निमे । स्वयें उपशमें तें जाणा ॥८२॥
तात्पर्य शुद्ध-सत्त्वाच्या वाढीने रज आणि तम यांचा संहार होतो व सत्त्व एकटेच राहते, तेंही मग आपोआपच शांत होते ८२.
जंव जंव काष्ठसंभार असे । तंव तंव अग्नि जाळी उल्हासें ।
सरलेनि काष्ठलेशें । अग्नि प्रवेशे निजतेजीं ॥८३॥
लाकडाचे जों जों भारे येऊन पडत असतात, तों तो अग्नि मोठ्या उल्हासाने ते जाळून टाकीत असतो; पण लाकडाचा तुकडासुद्धा जेव्हां शिल्लक राहात नाही, तेव्हां तोच अग्नि आपल्या मूळ तेजांत लीन होतो ८३.
ऐसी जिणोनि गुणावस्था । योगी पावला गुणातीतता ।
त्यासी न बाधी भवव्यथा । प्रलयकल्पता झालिया ॥८४॥
अशाच रीतीने गुणावस्थेला जिंकून योगी गुणातीत अवस्थेला पोचतो. त्यामुळे कल्पांत झाला तरी, त्याला संसारव्यथा बाधत नाहीं ८४.
ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख स्वरूपें झालें प्राप्त ।
ते देहीं वर्ततां देहातीत । चिंताआवर्त त्यां नाहीं ॥८५॥
ज्या सुखाला अंत नाही, ते सुख त्यांना आत्मस्वरूपानेच प्राप्त झालेले असते. ते देहामध्ये वागत असले तरी देहातीत असतात, त्यामुळे त्यांना चिंतारूप भोंवरा त्रास देत नाही ८५.
एकाकी जाहल्यावीण तत्त्वतां । ते अवस्था न चढे हाता ।
येचिविशीं नृपनाथा । ‘कुमारी’ गुरुकथा सांगेन ॥८६॥
खरोखर एकीएक झाल्याशिवाय ही अवस्था हाती लागत नाही. याचसाठी, हे राजेश्वरा ! मी कुमारीला गुरु केल्याची गोष्ट तुला सांगतों ८६.
क्वचित् कुमारी त्वात्मानं वृणानान् गृहमागतान् ।
स्वयं तानर्हयामास क्वापि यातेषु बन्धुषु ॥ ५ ॥
[श्लोक ५] एके दिवशी कुण्या कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कोठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे आदरातिथ्य करण्याचे ठरविले. (५)
कोणी एके कुमारीसी । घरीं राखण ठेवूनि तिसी ।
पिता माता स्वगोत्रेसीं । गेली यात्रेसी कुळदेवा ॥८७॥
कोणी एक कुमारिका होती, तिला घरामध्ये राखण ठेवून तिचे आईबाप आपल्या आप्तइष्टांसह कुलस्वामीच्या यात्रेला गेली ८७.
ते कुमारीचें विवाहलग्न । पूर्वीं नेमिलें होतें जाण ।
त्या निश्चयालागीं ब्राह्मण । घरा संपन्न पैं आले ॥८८॥
त्या कन्येच्या विवाहाचा विचार पूर्वीच करून ठेवलेला होता. त्यासंबंधानें वाङ्गनिश्चय करण्याकरितां वरपक्षाकडील थोर ब्राह्मण त्या घरी आले ८८.
पुसती घरीं आहे कोण । लाजे नोवरी धरी मौन ।
त्यांसी न देतां दर्शन । पूजाविधान ते मांडी ॥८९॥
त्यांनी ‘घरांत कोण आहे ?’ असे विचारले. परंतु लज्जेमुळे नवरीने मौन धारण केले, पण त्यांच्या दृष्टीस न पडतां तिने त्यांच्या सत्काराच्या साहित्याची सर्व तयारी केली ८९.
वातायनद्वारा आसनें । दिधलीं समस्तांकारणें ।
गंधाक्षता सुमनें पानें । दिधले मौनें उपचार ॥९०॥
खिडकीतून सर्वांना बसावयासाठी आसने दिली. गंधाक्षता, फुलें, पाने, सर्व काही न बोलतांच आणून दिले ९०.
देखोनि पूजेचें विधान । जाणों सरले ते ब्राह्मण ।
घरीं नोवरीचि आहे जाण । हें चतुरलक्षण तियेचें ॥९१॥
पूजेचे सर्व साहित्य समोर आलेले पाहून ब्राह्मणांनी जाणले की, घरामध्ये फक्त नवरीच आहे व तिचेच हे चातुर्य दिसतें ९१.
त्यांच्या पाहुणेराची चिंता । उशिरां येईल माझी माता ।
ते काळीं साळीं सडितां । विलंबु सर्वथा होईल ॥९२॥
तिला त्यांच्या पाहुणचाराची काळजी पडली. ती मनांत म्हणाली, ‘माझ्या आईला यावयाला उशीर होईल; आणि घरामध्ये तर तांदूळ सडलेले नाहीत ; ती येऊन सडूं लागल्यास जेवणास फारच उशीर होईल’ ९२.
तेषामभ्यवहारार्थं शालीन् रहसि पार्थिव ।
अवघ्नन्त्याः प्रकोष्ठस्थाश्चक्रुः शङ्खाः स्वनं महत् ॥ ६ ॥
[श्लोक ६] राजन ! त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एक कोपर्यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या. (६)
ऐसें विचारूनि जाण । साळी कांडूं रिघे आपण ।
ते कंडणकाळींचे विंदान । चतुरलक्षण परियेसीं ॥९३॥
असा विचार करून ती आपणच तांदूळ सडू लागली. पण तें कांडण कांडतांना तिने मोठे शहाणपणाचें काम केले. ती गोष्ट श्रवण कर ९३.
घावो घालितां कांडणा । उठी झणत्कार करकंकणा ।
तेणें नादें लाजोनि जाणा । विचारु मनामाजीं करी ॥९४॥
कांडणाचा घाव घालतांच हातांतील कांकणाचा आवाज होऊ लागला. तेव्हां त्या नादाची तिची तिलाच लाज वाटून ती मनांत विचार करू लागली की ९४.
सा तज्जुगुप्सितं मत्वा महती व्रीडिता ततः ।
बभञ्जैकैकशः शङ्खान् द्वौ द्वौ पाण्योरशेषयत् ॥ ७ ॥
[श्लोक ७] [श्लोक ७] या आवाजावरून घरात धान्य नाही, हे पाहुण्यांना कळेल, हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एकएक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन बांगड्या राहू दिल्या. (७)
या शंखवलयांचा ध्वनि । पडेल पाहुण्यांचें कानीं ।
ते अत्यंत लाज मजलागुनि । नववधु कांडणीं बैसली ॥९५॥
ह्या कंकणाचा ध्वनि पाहुण्यांच्या कानांवर गेला, तर मला अतिशय लाज वाटेल ; कारण, ते म्हणतील की, ही नवी नवरी कांडण कांडावयाला बसली आहे ! ९५.
त्यांच्या कानीं ध्वनि न पडे । कांडण तरी चाले पुढे ।
ऐसें विचारोनि रोकडें । कंकणाकडे पाहिलें ॥९६॥
ह्याकरितां त्यांच्या कानांवर माझ्या कांकणाचा आवाज तर जाऊं नये व माझें कांडण तर चालत रहावे, असा विचार करून तिने कांकणाकडे पाहिले ९६.
पाहतां दिसे ते अबला । विचार वृद्धाहोनि आगळा ।
करीचा कंकणखळाळा । युक्तीं वेल्हाळा विभागी ॥९७॥
पाहावयाला गेले तर ती दिसण्यांत मुलगीच होती, पण तिचा विचार मात्र पोक्त मनुष्यापेक्षाही अधिक होता. त्या शहाण्या मुलीने तो कांकणाचा नाद मोठ्या युक्तीने विभागून टाकण्याचा निश्चय केला ९७.
जरी कंकण फोडूं आतां । तरी ते मुहूर्तींच अशुभता ।
शतायु हो माझा भर्ता । न फोडी सर्वथा या हेतु ॥९८॥
ती मनांत म्हणाली, ह्या वेळी जर कांकणे पिचवावीत तर ह्या शुभमुहूर्तावरच अपशकुन केल्यासारखे होईल. माझ्या पतीला शंभर वर्षे आयुष्य होवो, असे म्हणून तिने कांकणे पिचविली नाहीत ९८.
अति बुद्धिमंत ते कुमारी । हळूचि कंकणें उतरी ।
ते ठेवी जतनेवरी । राखे दों करीं दोनी ॥९९॥
ती मुलगी मोठी बुद्धिमान् होती. तिने आपल्या हातांतील कांकणे हळूच उतरून जपून ठेविली. दोन्ही हातांत फक्त दोन दोन राखली ९९.
दोनी कंकणें उरवूनी । कांडूं बैसली कांडणीं ।
दोंहीमाजीं उठे ध्वनी । ऐकोनि कानीं लाजिली ॥१००॥
दोन दोन कांकण ठेवून ती कांडण कांहू लागली, पण त्या दोन दोन कांकणांचाही नाद होऊ लागलाच. तो कानांनी ऐकताच तिला पुन्हा लाज वाटू लागली १००.
उभयोरप्यभूद् घोषो ह्यवघ्नन्त्याः स्वशङ्खयोः ।
तत्राप्येकं निरभिददेकस्मान्नाभवद्ध्वनिः ॥ ८ ॥
[श्लोक ८] ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोनदोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या, तेव्हा तिने आणखी एकएक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटांध्ये जेव्हा एक एक बांगडी शिल्लक राहिली, तेव्हा आवाज बंद झाला. (८)
म्हणे दोघांचा संगु एके स्थानीं । तेथें सर्वथा न राहे ध्वनी ।
दोंतील एक वेगळें काढोनी । बसे कांडणीं कुमारी ॥१॥
तेव्हां ती म्हणाली की, हेही उपयोगी नाही. दोघांची गांठ एके ठिकाणी असली, की तेथे शब्द हा उत्पन्न व्हावयाचाच; म्हणून त्या दोहोंतीलही आणखी एक एक कांकण काढून ती मुलगी कांडावयाला बसली. १०१
एकपणीं कांडितां । ध्वनि नुठेचि तत्त्वतां ।
तो उपदेशु नृपनाथा । झालों शिकता मी तेथ ॥२॥
तेव्हां एका कांकणाचा नाद मुळीच उठेनासा झाला. हे राजवर्या ! तोच उपदेश मी तेथे शिकून घेतला २.
अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिन्दम ।
लोकाननुचरन्नेतान् लोकतत्त्वविवित्सया ॥ ९ ॥
[श्लोक ९] हे शत्रूंचे दमन करणार्या ! त्या वेळी लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मीसुद्धा तेथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की, जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहातात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो; (९)
जिणोनि प्रतिस्पर्धी भूपाळ । किंकर केले राजे सकळ ।
तूं अरिमर्दन सबळ । मिथ्या केवळ तो गर्व ॥३॥
तूं आपले प्रतिस्पर्धी असलेले सारे राजे जिंकून, त्यांना आपले दास करून ठेवलेस, त्यामुळे मी मोठा समर्थ, शत्रूंना अजिंक्य, असा गर्व मानीत असशील तर तो व्यर्थ होय ३.
कामक्रोधादि अरिवर्ग । न जिणतां सकळ साङ्ग ।
‘अरिमर्दन’ हा बोल व्यंग । होईल चांग ये अर्थी ॥४॥
कारण, कामक्रोधादिक शत्रूंचा सगळा वर्ग यथासांग जिंकल्याशिवाय, ‘अरिमर्दन’ हा शब्द योग्य होणार नाही. त्या शब्दाला कमीपणा मात्र येईल ४.
कामादिक सहा वैरी । येणें उपदेशशस्त्रधारीं ।
जिणोनि घालितां तोडरीं । मग संसारी अरि नाहीं ॥५॥
कामादिक जे षडरिपु आहेत ते या उपदेशरूप शस्त्राच्या धारेनें हतवीर्य करून त्यांना वठणीस आणशील, तेव्हांच तुला संसारांत शत्रु नाहीं असे म्हणता येईल. असो ६.
लोकांवेगळा अवधूतु । म्हणसी कुमारी ते घरांआंतु ।
तो एकांतींचा वृत्तांतु । कैसेनि प्राप्तु तुज झाला ॥६॥
आतां तूं म्हणशील की, तूं अवधूत केवळ लोकविरहित राहतोस आणि ती कन्या तर घराच्या आंत असणारी, तिचा एकांतांतील वृत्तांत तुला कसा कळला ? ६.
राहोनियां विजनस्थानीं । विश्वासोनि गुरुवचनीं ।
दृढ बैसोनि आसनीं । निजतत्त्व ध्यानीं आकळिलें ॥७॥
तर (सांगतों ऐक) मी निर्जन अरण्यांत राहन गुरुवचनावर विश्वास ठेवून आसनावर अढळ बसून ध्यानामध्ये निजतत्त्वाचे आकलन केले आहे. ७.
त्याचि तत्त्वनिश्चयालागुनी । मी विचरतसें ये मेदिनी ।
निजात्मभावो जनीं वनीं । दृढ करोनि पाहतसें ॥८॥
त्याच तत्त्वनिश्चयाकरितां मी या पृथ्वीवर फिरत असतो आणि जनांत असो की वनांत असो, निजात्मभावच दृध करून मी पाहात असतों ८.
होतां दृश्येंसीं भेटी । दृश्य दृश्यत्वें न पडे मिठी ।
द्रष्टेपणही घालोनि पोटीं । ऐशिया दृष्टीं विचरत ॥९॥
दृश्य पदार्थाची भेट झाली तरी दृश्य हे दृश्यत्वाने दिसतच नाही. इतकेच नव्हे, तर द्रष्टेपणही नाहीसे होते. अशा दृष्टीनें मी फिरत असतों ९.
अंगीकारितां गुरुत्वगुण । देखतां जगाचें दर्शन ।
मज होतसे चैतन्यभान । ऐसेन जाण मी विचरत ॥११०॥
याप्रमाणे गुरुत्वाचे गुण स्वीकारून जगाकडे पाहात असतां मला चैतन्यभावच स्फुरूं लागतो. अशा रीतीनें मी फिरत असतो ११०,
ऐशिया निजदृष्टीं वीरा । मज विचरतां चराचरा ।
अवचटें कुमारीमंदिरा । त्याचि अवसरा मी आलों ॥११॥
अशा आत्मदृष्टीनं चराचर सृष्टीत फिरत असतां, अकस्मात त्याच वेळी मी त्या मुलीच्या घरीं पोचलों ११.
करितां कंकणविवंचना । निजस्वार्थाचिया खुणा ।
पाहोनि घेतलें ज्या लक्षणा । ते विचक्षणा परियेसीं ॥१२॥
हे चतुरा ! आपला हेतु सिद्धीस नेण्याकरितां या मुलीनें कांकणाची युक्ति कशा काढली याचा विचार करून त्यापासून मी कोणता बोध घेतला ते ऐक १२.
वासे बहूनां कलहो भवेद् वार्ता द्वयोरपि ।
एक एव चरेत्तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ॥ १० ॥
[श्लोक १०] आणि जेव्हा दोघेजण राहतात तेव्हा सुद्धा गप्पागोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारिकेच्या बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे. (या प्रसंगातून ‘मुनीने एकट्याने राहावे’ हे कळते). (१०)
जेथ होय बहुतांची वस्ती । तेथ अनिवार कलहप्राप्ती ।
दोघे बैसल्या एकांतीं । वार्ता करिती बहुविधा ॥१३॥
ज्या ठिकाणी पुष्कळ लोक वास करतात, तेथें अनिवार कलह माजून राहतो. इतकेच नव्हे, तर दोघेच असामी जरी एकांतांत बसले, तरीसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करूं लागतात १३.
जेथें गोष्टीखालीं काळु जाये । तेथें निजस्वार्थु हों न लाहे ।
यालागीं मी पाहें । विचरत आहें एकाकी ॥१४॥
जेथे गोष्टींमध्येच वेळ जातो, तेथे आपला स्वार्थ असा कांहीच साधत नाही. म्हणूनच पाहा ! मी हा एकटाएकच फिरत असतो १४.
एकाकी एकाग्रता । साधिल्या थोर लाभु ये हाता ।
येचविषयीं शरकर्ता । गुरु तत्त्वतां म्यां केला ॥१५॥
एकटाच असतां एकाग्रता साधली, तर मोठा लाभ हाताला चढतो; आणि त्याकरितांच खरोखर मी एका बाण करणाऱ्या मनुष्याला गुरु करून घेतले १५.
मन एकत्र संयुज्याज्जितश्वासो जितासनः ।
वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणमतन्द्रितः ॥ ११ ॥
[श्लोक ११] आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे. (११)
वैराग्येंवीण अभ्यासु घडे । तेथ विषयचोर उठती गाढे ।
कामाचा घाला पडे । मुद्दल बुडे निजज्ञान ॥१६॥
वैराग्याशिवायच अभ्यास सुरू केला, तर तेथें विषयरूप दांडगे चोर उठतात ; काम दरवडा घालतो; आगि मुद्दल जे आत्मज्ञान तेच नाहींसें होतें १६.
विवेकदीप करूनि धुरे । निरसी अज्ञानाचें अंधारें ।
वैराग्याचें बळ पुरें । महामुद्रेचेनि योगें ॥१७॥
ह्याकरितां विवेकरूप दिवा पुढे करून अज्ञानरूप अंधार आधीं नाहींसा करावा आणि (भूचरी, खेचरी, अगोचरी व अलक्ष्य अशा) महामुद्रेच्या योगानें वैराग्याचंही पुरे पाठबळ घ्यावें १७.
प्राणापानाची चुकामुकी । झाली होती बहुकाळ कीं ।
ते अभ्यासबळें एकाएकीं । केली वोळखी दोघांसी ॥१८॥
प्राणाची आणि अपानाची फार दिवस चुकामुक झालेली होती; ती अभ्यासाच्या बळाने दोघांची एकदम भेट करून दिली १८.
वोळाखीसवेंचि जाण । पावली जुनाट पहिली खूण ।
दोघां पडिलें आलिंगन । समाधान समसाम्यें ॥१९॥
ती ओळख झाल्याबरोबर पूर्वीची जुनी खूण पटली. तेव्हां त्या दोघांनी एकमेकांस मिठी मारली आणि समसाम्याने त्यांचे समाधान झालें १९.
दृढ बैसोनि आसनीं । ऐशी प्राणापान मिळणी ।
करूनि लाविली निशाणी । ब्रह्मस्थानीं रिघावया ॥१२०॥
अशा प्रकार आसनावर दृढ बसून प्राणाचें आणि अपानाचे ऐक्य करून सोडले आणि ब्रह्मस्थानामध्ये घुसण्याकरितां बाहुटा चढविला २०.
ब्रह्मगिरीचिया कडा । शमदमें घालोनियां वेढा ।
प्रत्याहाराचा झगडा । पुढिले कडां लाविला ॥२१॥
ब्रह्मगिरीच्या कड्याला शमदमाने वेढा घालून पुढच्या तोंडाला प्रत्याहाराचे युद्ध सुरू केले (प्रत्याहार म्ह. इंद्रियांची अंतर्मुखता) २१.
प्राणापानांच्या विवरीं । पहिली ओळखी होती खरी ।
माळ लाविली अभेदकरीं । मन एकाग्रीं राखोनि ॥२२॥
प्राणापानाच्या विवरामध्ये पूर्वीची ओळख होती तरी, मन एकाग्र राखून त्यांची माळ लावून दिली २२.
एकाग्रतेचेनि कल्लोळें । पुढारें न ढळवे चालिले बळें ।
उल्हाटयंत्राचेनि मेळें । षट्चक्रपाळें भेदिलें ॥२३॥
एकाग्रतेच्या हल्ल्यामुळे पुढे चाललेले प्राण न ढळतां तसेच जोराने पुढे घुसले आणि त्यांनी कुंडलिनीच्याद्वारे धडाक्याचा तोफांचा मारा सुरू करून षट्चक्रांचे बुरूज फोडून टाकले २३.
वैराग्याचीं वज्रकवचें । निधडे वीर लेऊनि साचे ।
एकाग्रताबळें बळाचें । झळके ध्यानाचें करीं खड्ग ॥२४॥
त्या शूरवीरांनी वैगग्याची चिलखतें अंगामध्ये घातली आणि एकाग्रतेच्या बळाने ध्यानरूपी तरवारी त्यांच्या हातांत चमकू लागल्या २४.
नवल खड्गांचा वाहो । लहान थोर निवटी पहा हो ।
संमुख आलिया संदेहो । न लगतां घावो छेदित ॥२५॥
त्या तरवारीचा चमत्कार काय सांगावा ? ती लहानथोरांसकट सर्वांना सारखी छाटून टाकीत असे. तिच्यासमोर एखादा संशय येऊन उभा राहिला पुरे, की त्याला पुरता घाव लागला न लागला तोच त्याचे तुकडे उडवून देत असे २५.
निर्दाळूनि आळसासी । दासी केलें निद्रेसी ।
ऐसें सावधान अहर्निशीं । योगदुर्गासी झोंबती ॥२६॥
आळसाला रसातळाला घालवून, निद्रेला आपली दासी करून सोडलं. अशा रीतीने रात्रंदिवस सावध राहून योगरूपी किल्ला सर करण्याकरितां ते झटत असतात २६.
रणरंगींचे वीर गाढे । निजबळें चालिले पुढें ।
सत्रावीचें पाणीयाडें । जिंतिलें रोकडें महावीरीं ॥२७॥
समरांगणांतील वीर मोठे रणधुरंधर होते. ते आपल्याच जोरावर पुढे पुढे चाल करू लागले. आणि सत्रावी जीवनकला जो ब्रह्मरंध्रांतील अमृतस्रावाचा साठा (तलाव) तो त्या महावीरांनी काबीज केला २७.
तेथ युद्ध झालें चांग । कामादिक अरिषड्वर्ग ।
रणीं पाडिले अमोघ । सतेज खड्ग झळकत ॥२८॥
तेथे मोठे भयंकर युद्ध झाले. युद्धांत कामादिक सहा शत्रु मारून टाकले व ते अमोघ आणि दिव्य खड्ग झळकत राहिले २८.
ऐसे वैरी पाडूनि रणीं । प्राशिलें सत्रावीचें पाणी ।
तंव अनुहताची सुडावणी । दुर्गामधोनि ऊठली ॥२९॥
अशा प्रकारे शबूंना रणांगणांत पाडून सत्रावीचे पाणी म्हणजे अमृत प्राशन केलें. तो त्या किल्ल्यामधून अनुहताचा ध्वनि एकदम ऐकू येऊ लागला २९.
तेथ सोहंवीराची एकाग्रता । होतां भीतरील भेदु आला हाता ।
दुर्गराखती । अहंममता । मरों सर्वथा टेंकली ॥१३०॥
सोहंवीराची एकाग्रता होतांच आंतील सर्व भेद हाती आला. किल्ला राखणारी अहंममता अगदी मरावयास टेंकली १३०.
यस्मिन्मनो लब्धपदं यदेत
च्छनैः शनैर्मुञ्चति कर्मरेणून् ।
सत्त्वेन वृद्धेन रजस्तमश्च
विधूय निर्वाणमुपैत्यनिन्धनम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते, तेव्हा ते हळू हळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्त्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे मन शांत होते. (१२)
कामक्रोधादि महाशूर । पुत्र रणीं पडले थोर ।
तेणें दुःखें अतिजर्जर । मरणतत्पर दिसताति ॥३१॥
कामक्रोधादि मोठमोठाले शूर पुत्र रणांत पडले, त्या दुःखाने अहंता व ममता अत्यंत विव्हल होऊन मरणाच्या अगदी दारी बसल्या ३१.
ऐसी ऐकोनि दुर्गाची वार्ता । उल्हासु वीरांचिया चित्ता ।
उठावा दीधला मागुता । दुर्ग सर्वथा घ्यावया ॥३२॥
अशी किल्ल्यांतील बातमी ऐकतांच त्या (शमदमादि ) वीरांच्या मनाला अधिकच स्फुरण चढलें, आणि त्यांनी तो किल्ला पुरता घेण्यासाठी पुन्हा उठावणी केली ३२.
निजधैर्ये वीर अदट । निजसत्त्वें अतिउद्भट ।
पुढें निर्धारितां वाट । थोर अचाट देखिलें ॥३३॥
त्या वीरांचे धैर्य मोठे अचाट होते. पराक्रमाने तर ते प्रसिद्धच होते. त्यांनी पुढील मार्ग पाहिला, तो त्यामध्ये मोठे विकट संकट दिसले ३३.
कर्मरेणूंचे दुर्धर घाट । विधिवादें अवघड वाट ।
हळूहळू उल्लंघितां अचाट । समूळ सपाट तो केला ॥३४॥
कमरेणूंचे (वासनांचे) घाट दुर्धर होते. त्यांतील विधिवादाची वाट अतिशय दुर्गम होती. परंतु हळुहळू चढून जाऊन तो सारा घाट सपाट करून सोडला ३४.
पुढां रजतमाचें आगड । खोलपणें अत्यंत गूढ ।
घालूनि निवृत्तीचे दगड । सत्त्वें सुदृढ बूजिलें ॥३५॥
त्यापुढे रजतमाचा खंदक लागला. तो अपरंपार खोल असल्यामुळे त्यांत निवृत्तीचे दगड घालून सत्त्वाने निखालस बुजवून टाकला ३५.
सांचलू नव्हतां बाहेरी । जिणोनि मनकर्णिकावोवरी ।
माळ* न चढविली ब्रह्मगिरी । ब्रह्मरंध्रीं उसळले ॥३६॥ [*दोराची शीडी]
बाहेर चाहूल न लागू देतां, ‘मनकर्णिकावोवरी’-आज्ञाचक्र काबीज करून ब्रह्मगिरीवर माळ (दोराची शिडी) चढविली, आणि ब्रह्मरंध्रांत घुसले ३६.
तेथ जैताची एक घायी । अनुहत निशाण लागलें पाहीं ।
शोधितां पारखें कोणी नाहीं । केलें ठायीं स्ववश ॥३७॥
तेव्हां दिग्विजयाची एकच घाई उडून राहिली. अनुहताचा बाहुटा लागला, शोध केला तो किल्यावर शत्रु कोणीच नाही. सारे आपलेंच राज्य ३७.
तेथ रजतमाच्या वाटा । सहजें झाल्या सपाटा ।
हरिखें रामराज्याचा चोहटा । धेंडे दारवंटा पीटिले ॥३८॥
तेव्हां रजतमाच्या वाटा आपोआपच सपाट होऊन गेल्या आणि आनंदाने चव्हाट्यावर रामराज्याची द्वाही-दौंडी पिटली गेली ३८.
पारिखें कोणी न पडे दृष्टी । ध्यानखड्गाची सोडिली मुष्टी ।
वैराग्यकवचाचिया गांठी । समदृष्टीं सोडिल्या ॥३९॥
परकी कोणीच तेथे दृष्टीस पडेना, तेव्हां ध्यानरूप खड्गाची मूठ सोडली. समदृष्टीनें वैराग्यकवचाच्या गांठीही मोकळ्या केल्या ३९.
ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी न दिसे पाहतां ।
ध्यानखड्ग तत्त्वतां । न धरी सर्वथा या हेतू ॥१४०॥
ध्येय, ध्यान, आणि ध्याता ही त्रिपुटीच पाहावयास गेले असतां दिसेना; त्यामुळे ध्यानखनाचे कारण राहिले नाही १४०.
दारुण युद्धसामग्री । सत्त्वें केली होती भारी ।
ते साधने सांडिलीं दुरी । कोणी वैरी असेना ॥४१॥
सत्त्वाने युद्धाची सामग्री फारच प्रचंड जमविलेली होती, तीही लांब टाकून दिली; कारण पुढे कोणी शत्रु म्हणून दिसेचना ४१.
तन्मयतेचें छत्र धरूनी । समसाम्यसिंहासनीं ।
बैसला सहज समाधानी । त्यागी वोंवाळुनी जीवभावो ॥४२॥
तेव्हां तन्मयतारूपी छत्र धरून समसाम्याच्या सिंहासनावर जीव ही भावना ओवाळून टाकून सहज समाधानाने (तो योगी) बसला ४२.
शोधित वाढला सत्त्वगुण । तेणें सर्वस्वें केलें निंबलोण ।
पायां लागोनि आपण । स्वयें जाण उपरमला ॥४३॥
नंतर शुद्ध सत्त्वगुण वाढला व त्याने सर्वस्वाचे निंबलोण केले व आपण चरणीं लागून आत्मस्वरूपांत स्वत:च लय पावला ४३.
जैसा अग्नि असे काष्ठांच्या मेळीं । मंथिल्या काष्ठाची करी होळी ।
काष्ठ नाशूनि तत्काळीं । त्यजूनि इंगळीं उपशमे ॥४४॥
ज्याप्रमाणे मंथन करून काढलेल्या काष्ठांतील अग्नि त्या काष्ठांची होळी करतो, व आपण शांत होतो ४४.
तैसें वाढोनि सत्त्व उत्तम । नाशूनि सांडी रजतम ।
पाठीं सत्त्वाचाही संभ्रम । स्वयें उपरम पावला ॥४५॥
त्याप्रमाणे उत्तम (म्ह. रजतमलेशरहित ) सत्त्व काढले म्हणजे रज आणि तम यांचा नाश करून टाकतें व नंतर त्या सत्त्वाचा संभ्रम आपोआपच लयास जातो ४५,
तेथें निमालें जीवाचें जीवपण । ज्ञातृत्वेंसीं निमालें ज्ञान ।
निमालें प्रपंचाचें भान । चिन्मात्र पूर्ण कोंदलें ॥४६॥
तेव्हां जिवाचे जीवपण नाहीसे होते, ज्ञातृत्वासहवर्तमान ज्ञान लयास जाते, प्रपंचाचे भानही शिल्लक न राहतां चिन्मात्र स्वरूप पूर्णपणे भरून राहते ४६.
तदैवमात्मन्यवरुद्धचित्तो
न वेद किञ्चिद् बहिरन्तरं वा ।
यथेषुकारो नृपतिं व्रजन्त
इषौ गतात्मा न ददर्श पार्श्वे ॥ १३ ॥
[श्लोक १३] अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्येच स्थिर होते, तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही पदार्थांचे भान राहात नाही मी असे पाहिले होते की, बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की, त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली, तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही. (बाणकर्त्याकडून ‘एकाग्रता’ हा गुण घ्यावा). (१३)
ऐसी चिन्मात्र परिपूर्णता । तेथ निरोधूनि आणितां चित्ता ।
चित्त पावे चैतन्यता । जाण सर्वथा नरवीरा ॥४७॥
असे परिपूर्ण भरलेल्या चिन्मात्र स्वरूपांत चित्ताला निरोध करून आणले म्हणजे हे राजेन्द्रा ! त्या चित्तालाही तेथे चैतन्यस्वरूपच प्राप्त होते असें तूं समज ४७.
तेव्हां अंतरीं चैतन्यघन । बाह्य चिन्मात्र परिपूर्ण ।
आणिक न दिसे गा जाण । वृत्तीनें आण वाहिली ॥४८॥
तेव्हां हृदयांत चैतन्यघन, आणि बाहेरही परिपूर्ण शुद्ध चैतन्य भरून जाते; तेथे दुसरे काही दिसतच नाही. वृत्तीने जणू शपथच घेतलेली असते ४८.
पाहतां ध्येय ध्याता ध्यान । जेथ उल्हासें विगुंतलें मन ।
ते ‘संप्रज्ञातसमाधी’ जाण । गुणेंवीण भोगिती ॥४९॥
ध्येय, ध्याता आणि ध्यान ही तिन्ही एकच पाहिली म्हणजे मन हें उल्हासानेच त्यांत गुंतून पडते. तिलाच ‘सविकल्प समाधि’ असे म्हणतात. तिचा गुणावांचूनच उपभोग घेतात ४९.
तेथ निःषेष समरसे मन । झाला सुखरूप चिद्घन ।
ते समाधी परम कारण । विचक्षण बोलती ॥१५०॥
तेथे मन हे निखालस समरस होऊन राहते आणि तो सुखरूप चिद्धनस्वरूपच होऊन राहतो. ज्ञानी लोक ह्याच समाधीला अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात १५०.
ब्रह्म इंद्रियां गोचर नसे । गुण गेलिया डोळां दिसे ।
हे अनुभव्यासीचि भासे । बोलावें ऐसें तें नव्हे ॥५१॥
ब्रह्म हें इंद्रियांना गोचर होत नाही. गुण नाहीसे झाल्यानंतरच ते डोळ्यांना दिसू लागते. जो अनुभव घेईल, त्यालाच ह्याची प्रतीति येते. ते बोलून दाखविण्यासारखे नाही ५१.
येथ शास्त्रें विषम झालीं वादें । ‘नेति नेति’ म्हणितलें वेदें ।
थोटावलीं योगिवृंदें । अनुभवी निजबोधें जाणती ॥५२॥
त्याचा वाद करता करतां शास्त्रेंही परस्परविरुद्ध होऊन बसली आहेत. वेदानें तर ‘नेति’ ‘नेति’ (असे नव्हे, असे नव्हे) असे म्हटलें आहे. योग्यांचे समुदाय तर हात टेंकून स्वस्थ बसतात. अनुभवी लोक मात्र आत्मज्ञानाने त्याला जाणतात ५२.
तेथ हेतु-मातु-दृष्टांतु । समूळ बुडाला समस्तु ।
अद्वैतवादाची मातु । ज्या ठायांतु लाजिली ॥५३॥
त्या ठिकाणी हेतु-मातु-दृष्टांत वगैरे सफै बुडून जातात आणि अद्वैतवादही त्या ठिकाणी लाजून जातो ५३.
सबाह्य समदर्शन । हे अनुभवाची निर्वाणखूण ।
‘शरकार’ गुरु केला जाण । हेंचि लक्षण लक्षूनि ॥५४॥
अंतर्बाह्य समदृष्टि होणे, हीच अनुभवाच्या निर्वाणींची खूण आहे. हीच गोष्ट लक्षात आणून मी बाण करणाराला गुरु केले ५४.
तावूनि उजू करितां बाण । दृढ लागलें अनुसंधान ।
इतुकेन प्रपंचाचें भान । खुंटलें जाण तयाचें ॥५५॥
तो बाणाचे टोक तापवून सरळ (अणकुचीदार ) करूं लागला असता त्याचे सारे लक्ष तिकडेच लागून राहिले. तेवढ्यानेच त्याचे बाह्य प्रपंचाकडील लक्ष नाहीसे झाले ५५.
निशाण भेरी वाजंतरें । रथ गज सैन्य संभारें ।
राजा गेला अतिगजरें । नेणिजे शरकारें शरदृष्टीं ॥५६॥
मग जरीपटका, डंका, नौबती, वाजंत्री, गाड्या, घोडे, हत्ती, शिपाई, प्यादे वगैरे घेऊन राजा वाजत गाजत मोठ्या समारंभाने त्याच्या दारावरून गेला, तरी त्या बाण करणाराची दृष्टि बाणाकडेच वेधून राहिल्यामुळे त्याची त्याला दादही लागली नाहीं ५६.
मागूनि रायाचा हडपी आला । तो पुसे ये मार्गी राजा गेला ।
येरु म्हणे नाहीं देखिला । गेला कीं न गेला कोण जाणे ॥५७॥
इतक्यांत राजाचा हडपी ( एक चाकर ) पाठीमागून आला, त्याने त्याला विचारले की, ‘या वाटेने सरकारस्वारी गेली काय ?’ पण त्याने त्याला उत्तर दिले की, पाहिली नाही बुवा. कोण जाणे गेली का नाही ती ! ५७.
तो शरकारू देखिला दृष्टीं । हे ऐकोनि तयाची गोष्टी ।
जगीं एकाग्रता मोठी । प्रपंच दृष्टीं येवों नेदी ॥५८॥
( अवधूत म्हणतात ) त्या बाण करणाराला मी डोळ्यांनी पाहिले आणि त्याचे ते भाषण ऐकून मी मनांत बोध घेतला की, जगामध्ये एकाग्रता ही मोठी श्रेष्ठ आहे. ती प्रपंचाला डोळ्यांपुढेच येऊ येत नाही ५८.
हेंचि साधावया साधन । गृहारंभेंवीण एकपण ।
‘सर्प’ गुरु केला जाण । हेंचि लक्षण देखोनि ॥५९॥
हेच साधन साध्य करण्याकरितां घरादाराचा आरंभ केल्यावांचून एकटेच राहणे योग्य आहे. हेंच लक्षण सर्पामध्ये दृष्टीस पडल्यावरून सर्पाला मी गुरु केले ५९.
एकचार्यनिकेतः स्याद् अप्रमत्तो गुहाशयः ।
अलक्ष्यमाण आचारैर्मुनिरेकोऽल्पभाषणः ॥ १४ ॥
[श्लोक १४] मुनीने एकटेच राहावे राहाण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावे एकांतात किंवा गुहेत राहावे बाह्य वेषावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावे. (१४)
सर्प सांघातु न साहे । एकाकी सुखें विचरत जाये ।
सदा सावधान राहे । श्वासु वाये जावों नेदी ॥१६०॥
सर्पाला कोणाची सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखाने फिरत असतो. तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छ्वासही व्यर्थ दवडीत नाही १६०.
तैसीच योगियाची गती । न साहे द्वैताची संगती ।
एकाकी वसे एकांतीं । जनाप्रती अलक्ष्य ॥६१॥
योग्याची स्थितिही तशीच असते. त्यालाही दुसऱ्याचा उपसर्ग खपत नाही, लोकांच्या दृष्टीस न पडेल अशा ठिकाणी तो एकांतांत एकटाच राहत असतो ६१.
विषमाचा संगु न करी । परी समाचाही संगु न धरी ।
निघे देह संगाबाहेरी । त्वचेचे परी सर्पाचे ॥६२॥
तो वाइटाची संगत धरीत नाही, पण चांगल्याचीही करीत नाही. सर्पाने कांत टाकल्याप्रमाणे तोही देहसंगाच्या बाहेर पडतो ६२.
सदा सावधानबुद्धी । लवनिमेष वायां जावों नेदी ।
अनुसंधान त्रिशुद्धी । तुटों नेदी सर्वथा ॥६३॥
बुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून तो एक क्षणही फुकट जाऊं देत नाही. तो खरोखर आपलें स्वरूपानुसंधान कधीही तुटू देत नाही ६३.
सर्प बिळामाजीं रिघें बळें । मार्गीं मागू देखती सकळें ।
धाला भुकेला हें त्यां न कळे । गेला कळे सर्वांसी ॥६४॥
सर्प आपणहून बिळामध्ये शिरतो तो त्याचा माग पडलेला मार्गावर सारे लोक पाहातात; पण तो तेथून गेला आहे एवढेच त्यांना कळते; तो भुकेलेला आहे की तृप्त झालेला आहे, हे काही त्यांना कळत नसते ! ६४.
तैसाचि योगियाही योगबळें । न राहे जनांमाजीं जनमेळें ।
गुहेमाजीं पडिला लोळे । एकला खेळे एकपणीं ॥६५॥
त्याप्रमाणेच योगीही योगसामर्थ्याने लोकांच्या संसर्गात न राहतां गुहेमध्येच लोळत पडतो; आणि एकटाच आपआपल्याशी क्रीडत असतो ६५.
हो का योगियांचा आचार । करितां देखती लहान थोर ।
सविकल्पनिर्विकल्प विचार । न कळे साचार कोणासी ॥६६॥
योगी वागत असता त्याचा आचार लहानथोर सारे पाहातात, पण तो खरोखर सविकल्प आहे की निर्विकल्प आहे, हे कोणासच काही कळत नाही ६६.
एक म्हणती कर्मठ । एक म्हणती कर्मभ्रष्ठ ।
एक म्हणती आत्मनिष्ठ । कळेना स्पष्ट कोणासी ॥६७॥
कोणी म्हणतात तो कर्मठ आहे; कोणी म्हणतात, तो कर्मभ्रष्ट आहे. कोणी म्हणतात, तो आत्मनिष्ठ आहे. पण स्पष्ट असें कोणासच काही त्याचे कळत नाही ६७.
सर्पास बोलणेंचि नाहीं । बोले तरी अल्प कांहीं ।
तैसाच योगिया पाहीं । वाग्वादीं नाहीं सादर ॥६८॥
सर्पाला बोलतां मुळीच येत नाहीं; तो काहीं थोडासा शब्द मात्र करतो; त्याप्रमाणेच योगीही वादविवादामध्ये कधी पडत नाही ६८.
आंतुले कृपेचेनि बळें । बोले मृदु मंजुळ कोंवळें ।
श्रवणासी दोंदें एकवेळे । तेणें वचनमेळें निघालीं ॥६९॥
अंत:करणांतील कृपेच्या बळाने थोडेसे पण मृदु, मंजुळ आणि कोमळ असेंच बोलतो. त्यामुळे त्याचे ते भाषण एक वेळ ऐकलें तरी कान अगदी तृप्त होऊन जातात ६९,
बोलणें तरी अतिअल्प । परी छेदी संकल्पविकल्प ।
त्याच्या बोलाचे स्वरूप । सत्यसंकल्प जाणती ॥१७०॥
त्याचे बोलणे पाहूं गेलें तर अतिशय थोडे असते; पण ते संकल्पविकल्पाचा नाश करून सोडते. त्याच्या शब्दाचे स्वरूप जे कोणी सत्यसंकल्पी असतात त्यांसच कळतें १७०.
जो एकाकी उदास । ज्याचें परमार्थीं मानस ।
तेणें गृहारंभाची आस । वृथा प्रयास न करावे ॥७१॥
जो एकटा व उदासीन असतो, ज्याचे मन परमार्थाकडेच लागून राहिले आहे, त्याने घरदार करण्याची आशा धरून व्यर्थ यातायातीत पडूं नये ७१.
गृहारम्भोऽति दुःखाय विफलश्चाध्रुवात्मनः ।
सर्पः परकृतं वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥ १५ ॥
[श्लोक १५] या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहातो. (सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये, हा धडा घ्यावा). (१५)
मूळीं गृहारंभ तें दुःख । कष्ट करितां दुःखकारक ।
निपजविलें त्रिमाळिक । तें अध्रुव देख सर्वथा ॥७२॥
घर करणें हेंच मुळी दुःखास कारण आहे. कारण, जिवापाड कष्ट सोसून तीन मजली वाडा बांधावयाचा, पण तो सर्वथैव अशाश्वतच असतो ७२.
जेथें संसारचि नाशवंत । देह प्रत्यक्षाकारें असंत ।
तेथींचें गृह काय शाश्वत । मूर्ख मानित सत्यत्वें ॥७३॥
जेथे संसारच मुळी नाशवंत आहे; देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे; तेथचे घरच तेवढे शाश्वत काय ? पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात ७३.
जें गर्भीच निमालें । तें उपजतां जातक केलें ।
मृताचें जन्मनांव ठेविलें । तैसें गृह केलें असंत ॥७४॥
जे गर्भामध्येच मरण पावलें, तें उपजतांच त्याचे म्हणे जातक केलें आणि मृताचेंच जन्मनांव ठेवले, त्याप्रमाणेच अशाश्वत गृहाची स्थापना करणे आहे ७४.
तोही असंतु आरंभ कुडा । मृत्तिकेसाठीं लावी झगडा ।
भांडवी दगडासाठीं कां लांकुडा । सुहृदभिडा सांडोनि ॥७५॥
अशा गृहाचा हा आरंभ सुद्धा खोटाच; कारण, तो मातीसाठी तंटा लावतो. दगडासाठी किंवा लाकडासाठी आप्तसंबंध बाजूस ठेवून भांडण करवितो ! ७५,
वोळंबा घर करी सायासें । त्यामाजीं सर्प राहे सावकाशें ।
न शिणतां अप्रयासें । परघरवासें संतुष्ट ॥७६॥
वाळवी मोठ्या प्रयत्नाने वारुळ तयार करिते, आणि त्यांत सर्प जाऊन खुशाल राहतो; कांहीं एक कष्ट न करता आयताच दुसर्याच्या घरांत राहून मौज मारतो ७६.
तैसाचि योगियाही जाण । न धरी देहगेह अभिमान ।
परगृहीं वसे निरभिमान । सुखसंपन्न सर्वदा ॥७७॥
त्याचप्रमाणे योगी सुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगीत नाही. निरभिमानपणाने दुसऱ्याच्या घरांत राहून सदासर्वदा आनंदांत असतो ७७.
एकही गृह न करावें । हें सत्य मानिलें जीवें ।
एवढी सृष्टि केली देवें । बाधूं न पवे त्या केवीं ॥७८॥
एकही घर करावयाचे नाही, हाच निश्चय मी केला. परंतु देवाने एवढी सृष्टि केली असता, तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाहीं ? ( असा प्रश्न येतो) ७८.
सृष्टि रचिली कैसेनी । निपजली कोणापासूनी ।
येचि अर्थी गुरु कांतिणी । लक्षण लक्षुनी म्यां केली ॥७९॥
तर सृष्टि कशी रचली गेली ? ती कोणापासून उत्पन्न झाली ? ह्याचकरितां मी कांतिणीला तिच्या लक्षणाकडे लक्ष देऊन गुरु केले ७९.
एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया ।
संहृत्य कालकलया कल्पान्त इदमीश्वरः ॥ १६ ॥
[श्लोक १६] आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून; (१६)
नरांचे आश्रयस्थान । यालागीं बोलिजे ‘नारायण’ ।
जीवाचें तोचि जीवन । स्वामी नारायण सर्वांचा ॥१८०॥
नरांचे आश्रयस्थान, म्हणूनच त्याला ‘नारायण’ असे म्हणतात. साऱ्या जीवांचे जीवन तोच नारायण सर्वांचा स्वामी होय १८०.
ऐसा एक नारायण । तेणें पूर्वी जग सृजिलें जाण ।
उपकरणसामग्रीवीण । केलें निर्माण जगांचे ॥८१॥
असा जो एक नारायण, त्याने हे जग पूर्वी उत्पन्न केलें. कोणतीही बाह्य सामुग्री न घेतां या विश्वाची त्याने उत्पत्ति केली ८१.
एकलेनि सामग्रीवीण । केवीं केलें जग संपूर्ण ।
स्वमायाक्षोभवूनि जाण । करी निर्माण जगाचें ॥८२॥
एकट्याने आणि सामुग्रीशिवायच सारे जग केले कसे ? तर त्याने आपल्याच मायेला क्षुब्ध करून हे जग निर्माण केले ८२.
ते निजमायेच्या पोटीं । असंख्य जीवसामग्रीच्या कोटी ।
ते माया अवलोकिली दृष्टीं । तोचि उठाउठी निजकाळु ॥८३॥
त्याला त्याच्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या असतात. ती माया त्याने दृष्टीने अवलोकन केली. या ‘ईक्षणा’ लाच ‘काळ’ असे म्हणतात ८३.
ऐसी निजमाया अवलोकिली । ते निजांगावरी नांदविली ।
परी अंगीं लागों नाहीं दिधली । हे अलिप्तता केली तो जाणे ॥८४॥
अशा प्रकारे त्याने आपल्या मायेकडे पाहिले; आणि तिला आपल्या अंगावर खेळूं दिलें, पण आपल्या अंगाला लागूं दिली नाही. इतक्या अलिप्सतेचा खेळ तो करणाराच एक जाणत असतो ८४.
धुई दाटली आकाशीं । आकाश नातळे धुईसी ।
तैसी निजांगे वाढवूनि मायेसी । अलिप्त तियेसी वर्ततु ॥८५॥
आकाशामध्ये धुकें भरते. परंतु आकाश कांहीं धुक्याला स्पर्शत नाही. त्याप्रमाणे तो आपल्या अंगाने मायेला वाढवितो, पण तिच्याशी अलिप्तपणेच राहतो ८५.
उदकें कमळिणी वाढविली । ते जळ आवरी निजदळीं ।
तैसी माया आनंद आकळी । चित्सत्ता मोकळी सदंशेंसीं ॥८६॥
उदकानेंच कमळिणीला वाढविलें, पण तेच उदक ती आपल्या पानाने झाकून टाकते. त्याप्रमाणे माया ही सत्-चित्-आनंद ह्यांपैकी आनंदांशाला आवरण घालते; परंतु सत्-अंशासह चित्-सत्ता ही मोकळीच असते ८६.
स्वमायेसी जो अधिष्ठान । मायेसी नांदावया तोचि भुवन ।
एवं मायानियंता नारायण । सत्य जाण सर्वथा ॥८७॥
जो आपल्या मायेला अधिष्ठान, तोच त्या मायेचें नांदावयाचें घर. याप्रमाणे खरोखर मायेचा नियंता नारायणच होय ८७.
रजोगुण सृजी सृष्टीसी । सत्त्वगुण प्रतिपाळी तिसी ।
कल्पांतीं क्षोभवोनि तमोगुणासी । काळरूपेंसीं संहारी ॥८८॥
रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो; सत्त्वगुण तिचा प्रतिपाळ करतो; आणि तमोगुण कल्पांताच्या वेळी क्षुब्ध होऊन काळाच्या रूपाने तिचा संहार करतो ८८.
हे मायेची क्षोभक शक्ती । असे नारायणाचे हातीं ।
यालागीं संहारिता अंतीं । ईश्वरु म्हणती या हेतू ॥८९॥
परंतु ही मायेची क्षोभक शक्ति नारायणाच्या हातांत असते; याच दृष्टीने अंती संहार करणारा ईश्वर असें म्हणतात ८९.
एक एवाद्वितीयोऽभूदात्माधारोऽखिलाश्रयः ।
कालेनात्मानुभावेन साम्यं नीतासु शक्तिषु ।
सत्त्वादिष्वादिपुरुषः प्रधानपुरुषेश्वरः ॥ १७ ॥
परावराणां परम आस्ते कैवल्यसंज्ञितः ।
केवलानुभवानन्द सन्दोहो निरुपाधिकः ॥ १८ ॥
[श्लोक १७-१८] सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवाद्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरूष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदिपुरूष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्त्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात, तेव्हा सर्व कार्यकारणांचे परम कारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही. (१७-१८)
एवं संहारोनि कार्यकारण । एक अद्वितीय नारायण ।
एकपणें परिपूर्ण । गुणागुण निरसोनि ॥१९०॥
अशा प्रकारे कार्यकारण नाहीसे केल्यानंतर एकटा एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच गुणागुण सोडून देऊन शिल्लक राहतो १९०.
एकला एकु नारायण । हेंही तेथ म्हणे कोण ।
हें अद्वितीय लक्षण । भेदशून्य अवस्था ॥९१॥
पण तेथे एकटा एक नारायण राहतो, असें म्हणणारे तरी कोण ? लक्षण केवळ अद्वितीय आहे. भेदशून्य अवस्था ती हीच ९१.
‘विजातीयभेद’ ते ठायीं । नसे ‘सजातीयभेद’ कांहीं ।
‘स्वगतभेदु’ तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं ॥९२॥
तेथे ‘सजातीय’ भेद नाहीं; ‘विजातीय’ भेदही नाहीं; आणि ‘स्वगत’ भेदही पण तेथें नाहीं; अशा रीतीनें तो भेदरहितच असतो (झाडाशी झाड ‘सजातीय’, झाडाची पाने, फुले, फळे ‘स्वगत’ व झाडाशी ‘पाषाण’ विजातीय,; ह्याप्रमाणे परमात्म्यांत-आत्मा, जीव व जगत्-असे विविध भेद नाहीत) ९२.
ऐसा अभेदु जो साचारु । तोचि प्रकृतिपुरुषांचा ईश्वरु ।
नियंता तो परावरु । तोही निर्धारु परियेसीं ॥९३॥
असा जो खरोखर अभेद तोच प्रकृतिपुरुषांचा ईश्वर होय. तोच सर्वांचा श्रेष्ठ नियंता व ‘पर’ आणि ‘अवर ‘ आहे. त्याचाही निर्णय ऐक ९३.
प्रकृति पुरुष हे दोन्ही । कल्पिलीं जेणें अमन-मनीं ।
तो ईश्वर होय भरंवसेनी । त्याचे सामर्थ्येंकरूनि वर्तती ॥९४॥
मनरहित संकल्पाने ज्याने प्रकृति आणि पुरुष दोन्ही उत्पन्न केली, तोच खरोखर ईश्वर होय. त्याच्याच सामर्थ्यानें ती वागतात ९४.
प्रकृतीतें चेतविती सत्ता । तेचि याची पुरुषता ।
यालागीं प्रकृतीचा भर्ता । होय सर्वथा हाचि एकु ॥९५॥
प्रकृतीला सत्ता चेतविते तेंच याचे पुरुषत्व होय. म्हणून प्रकृतीचा पति सर्वतोपरी हाच एक होय ९५.
‘पर’ जे अज-प्रमुख । ‘अवर’ मनुमुख्य स्थावरांतक ।
यांचा नियंता तो देख । सर्वचाळक सर्वांचा ॥९६॥
ब्रह्मदेवादिक देव ‘पर’, आणि मनूपासून स्थावरापर्यंत सर्व जीव ते ‘अवर’ होत. यांचा नियंता व चालक तोच होय ९६.
ज्याचे आज्ञेवरी पाहें । सैरा वायु जाऊं न लाहे ।
समुद्र वेळेमाजीं राहे । सूर्य वाहे दिनमान ॥९७॥
ज्याच्या आज्ञेबाहेर वायुसुद्धा पाऊल टाकीत नाहीं; समुद्र आपल्या मर्यादेत राहतो; आणि सूर्य दिनमान चालवितो ९७.
ज्याची आज्ञा करूनि प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ।
परता जाऊं न शके जाण । आज्ञेभेणें सर्वथा ॥९८॥
ज्याची आज्ञा शिरसावंद्य करून प्राणसुद्धा (नाकांतून) बारा अंगुलेंच फिरत राहतो. आज्ञेच्या धाकानें त्याच्या पुढे जाऊ शकत नाही ९८.
आज्ञा जाणोनि धडफुडी । मेरु बैसका न सोडी ।
चेतना आज्ञा करी गाढी । अचेतन कुडी चेतवी ॥९९॥
सक्तीची आज्ञा लक्षात आणून मेरूही आपले स्थान सोडीत नाहीं. चेतनशक्तीला आज्ञा होतांच ती अचेतन देहाला सचेतन करून सोडते ९९.
तो स्वयें तंव निराधार । परी झाला विश्वासी आधार ।
जेवीं सर्पाभासा दोर । दिसे साचार आश्रयो ॥२००॥
तो स्वतः निराधार असून साऱ्या विश्वाला आधार होऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे सर्पाभासाला आश्रय दोराचाच दिसतो २००.
सत्त्वादिका ज्या गुणशक्ती । आवरूनि निजकाळगती ।
समत्वा आणिल्या स्थिती । निजप्रकृतीमाझारीं ॥१॥
सत्त्वादिक ज्या गुणशक्ति आहेत, त्यांना आत्मकालगतीने आवरून धरून आत्मप्रकृतीमध्येच समत्वाला आणून ठेवल्या आहेत १
तेहि प्रकृती उपरमोनी । राहिली असे निर्गुणस्थानीं ।
जेवीं वट बीजीं सामावोनि । केवळपणीं राहिला ॥२॥
पण ती प्रकृतिही उपरम पावून निर्गुणाच्या ठिकाणी राहिली आहे. ज्याप्रमाणे वडाचे झाड आपल्या बीजांत सामावून केवलपणाने राहते २.
तैसा उपाधि गिळूनि सकळ । निरुपाधिक केवळ ।
जेवीं काढिलिया मंदराचळ । राहे निश्चळ क्षीराब्धी ॥३॥
त्याप्रमाणे सर्व उपाधींना गिळून ब्रह्म केवळ निरुपाधिक स्वरूपानें राहते. ज्याप्रमाणे मंदराचल काढून घेतला असता, क्षीरसागर निश्चल राहतो ३.
नाना अलंकार ठसे । घातलिया जेवीं मुसे ।
पूर्वरूप सोनें जैसें । होय तैसें केवळ ॥४॥
किंवा निरनिराळ्या आकाराचे दागिने मुशीत घातले असतां मूळचे जसे सोने असते, तसेंच तें हुबेहुब होते ४.
नाना नक्षत्रावलोकु । निजतेजें लोपी अर्कु ।
तैसा उपाधि गिळूनि एकु । निरुपाधिकु उरलासे ॥५॥
किंवा आकाशांत दिसणारी नक्षत्रे सूर्य ज्याप्रमाणे आपल्या तेजाने लोपवून टाकतो; त्याप्रमाणे मायेनें आकारास आणलेली सर्व सृष्टि गिळून टाकून निरुपाधिक असा एक परमात्माच राहतो ५.
हो कां ग्रीष्माच्या अंतीं । बीजें लीन होतीं क्षितीं ।
तैशी लीन होऊनि प्रकृति । केवळ सुखमूर्ती उरलासे ॥६॥
किंवा ग्रीष्म ऋतूच्या अखेरीला सर्व प्रकारची बीजें पृथ्वीत लीन होऊन असतात; त्याप्रमाणे प्रकृति त्याच्यामध्ये लीन होऊन तो केवळ सुखस्वरूपाने बाकी राहतो ६.
ऐसा निरुपाधिक केवळ । सुखस्वरूपानंदकल्लोळ ।
चिन्मात्रतेजें बहळ । नित्यनिर्मळ सदंशें ॥७॥
असा केवळ निरुपाधिक, सुखस्वरूपानंदाचा कल्लोळ, चिन्मात्र तेजानें तेजःपुंज, आणि सद्-अंशामुळे निरंतर निर्मळ ७.
तेणें ज्ञानस्वरूपें अनंतें । सृजनकाळ अवस्थेतें ।
सृजिता झाला सृष्टीतें । तेंही निरुतें अवधारीं ॥८॥
त्या ज्ञानस्वरूप अनंतानें उत्पत्तिकाळी सृष्टि कशी निर्माण केली, तेही नीट श्रवण कर ८.
केवलात्मानुभावेन स्वमायां त्रिगुणात्मिकाम् ।
सङ्क्षोभयन्सृजत्यादौ तया सूत्रमरिन्दम ॥ १९ ॥
तामाहुस्त्रिगुणव्यक्तिं सृजन्तीं विश्वतोमुखम् ।
यस्मिन्प्रोतमिदं विश्वं येन संसरते पुमान् ॥ २० ॥
[श्लोक १९-२०] केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रुसूदना ! त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तिप्रधान महत्तत्त्वाची निर्मिती करतात. हे सूत्रच तीन गुणांचे कार्य आहे तेच सार्या विश्वाची अहंकारद्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आतबाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्ममृत्यूचक्रात फिरत राहातो. (१९-२०)
तेणें निजात्मकाळसत्तें । अवलोकिलें निजमायेतें ।
ते क्षोभोनियां तेथें । निजसूत्रातें उपजवी ॥९॥
त्याने आपल्या काळसत्तेने आपल्या मायेकडे पाहिले, तेव्हा ती क्षुब्ध होऊन तिने निजसूत्र म्ह० वायुरूप सूत्रात्म्याला उत्पन्न केले ९,
तेचि बोलिली ‘क्रियाशक्ती’ । करिती झाली त्रिगुणव्यक्ती ।
अहंकारद्वारा सृतिजी । जगउत्पत्तीतें मूळ ॥२१०॥
त्यालाच ‘क्रियाशक्ति’ असे म्हणतात. त्याच क्रियाशक्तीने तीन गुण व्यक्त केले, आणि अहंकाराच्या द्वाराने जगाच्या उत्पत्तीचे मूळ निर्माण केले २१०.
तेथें गुणागुणविभाग । सुर नर आणि पन्नग ।
अध ऊर्ध्व मध्यभाग । रचिलें जग तत्काल ॥११॥
तेव्हां गुणागुणाच्या विभागाप्रमाणे देव, मनुष्य आणि नाग उत्पन्न होऊन, ‘अध’ म्ह. पाताल लोक, ‘ऊर्ध्व ‘ म्ह. स्वर्गलोक, व ‘मध्य ‘ म्ह. मृत्युलोक ह्याप्रमाणे तत्काल त्रिभुवनाची रचना झाली ११.
ब्रह्मांडीं सूत्र जाण । पिंडू वर्तवी प्राण ।
पिंडब्रह्मांडविंदान । कर्त्री जाण ‘क्रियाशक्ति’ ॥१२॥
ब्रह्मांडांतील तेच वायुरूप सूत्र प्राणरूपाने पिंडाला वागवू लागले. पिंडाची आणि ब्रह्मांडांची रचना करणारी तीच ‘क्रियाशक्ति’ होय असें तूं समज १२.
जीव करावया संसारी । षड्विकार वाढवी शरीरीं ।
षडूर्मी त्यामाझारीं । जीव संसारीं संचरवी ॥१३॥
जीवाला संसारी करण्याकरितांच हिने शरीरामध्ये षड्विकार ( उपजणे, असणे, वाढणे, परिणाम पावणे, क्षीण होणे व नाश पावणे) ह्यांचा फैलाव केला. तशाच सहा उर्मी म्ह. जन्म-मरण-क्षुधा-तृषा-शोक-मोह उत्पन्न केले १३.
एवढी संसारउत्पत्ती । करावया इची व्युत्पत्ती ।
यालागीं नांवें ‘क्रियाशक्ती’ । सांख्यसंमतीं बोलिजे ॥१४॥
ह्याप्रमाणे संसाराची वाढ करण्याकरितांच हिचा खटाटोप आहे. म्हणूनच सांख्यशास्त्रांत हिचा ‘क्रियाशक्ति’ या नावाने उल्लेख केला आहे १४.
या क्रियाशक्तिसूत्राचे ठायीं । जग ओतिलें असे पाहीं ।
आडवेतिडवे ठायींचे ठायीं । गोंवून लवलाहीं वाढत ॥१५॥
ह्या क्रियाशक्तीच्या सूत्रामध्येंच हें सर्व जग ओतलेले आहे. ते वाकडेतिकडे जसें असेल तसेंच जेथल्या तेथे त्यांत गुंतून वाढीस लागते १५.
दृढबंध देहाभिमाना । देऊन संसारी करी जना ।
उपजवी अनिवार वासना । योनीं नाना जन्मवी ॥१६॥
ती क्रियाशक्तिच देहाभिमानाची घट्ट गांठ मारून जनाला संसारी करून सोडते. आणि अनिवार वासना उत्पन्न करून अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्मास घालते १६.
पित्याचेनि रेतमेळें । रजस्वलेचेनि रुधिरबळें ।
उकडतां जठराग्निज्वाळें । बहुकाळें गोठलें ॥१७॥
पित्याच्या रेतामध्ये मातेच्या रुधिराचे मिश्रण होऊन तें मिश्रण बराच कालपर्यंत जठराग्नीच्या ज्वालेमध्ये उकडलें म्हणजे गोठलें जाते १७.
तेथ निघाले अवयवांकुर । करचरणादिक लहान थोर ।
देह झाला जी साकार । तरी अपार यातना ॥१८॥
तेथे मग त्याला अवयवरूपी लहान मोठे अंकुर फुटून हस्तपादादि अवयव तयार होतात. आणि मग देहाला आकार येतो. तरी सुद्धा यातना चुकत नाहीत. त्या अपार असतात. १८.
जठरीं गर्भाची उकडतां उंडी । नाना दुःखांची होय पेंडी ।
रिघे विष्ठा कृमी नाकींतोंडी । तेणें मस्तक झाडी पुरे पुरे ॥१९॥
पोटामध्ये गर्भाची उंडी म्ह. गोळा उकडत असतांना अनेक प्रकारची दुःखें येऊन आदळतात. नाकातोंडामध्ये विष्टा, जंत वगैरे शिरत असल्यामुळे पुरे पुरे म्हणून मस्तक झाडू लागतो १९.
थोर गर्भींची वेदना । आठवितां थरकांपु मना ।
भगद्वारें जन्म जाणा । परम यातना जीवासी ॥२२०॥
गर्भातील वेदना मोठी भयंकर असते. त्याची आठवण होतांच मनाचा थरकाप होतो. योनीच्या द्वाराने जन्म होतो, त्या वेळेसही जिवाला अतिशय यातना होतात २२०.
ऐसें जन्मवूनि जनीं । घाली स्वर्गाच्या बंदीखानीं ।
कां पचती अधःपतनीं । देहाभिमानेंकरूनियां ॥२१॥
अशा प्रकारे माया जगांत जन्म देऊन कधी स्वर्गाच्या बंदिखान्यांत घालते, किंवा देहाभिमानाने नरकामध्ये कुचंबत ठेवते ! २१.
ऐसी सुखदुःखांची कडी । घालोनि त्रिगुणीं दृढ बेडी ।
भोगवी दुःखांच्या कोडी । तरी न सोडी अविद्या ॥२२॥
अशा प्रकारें सुखदुःखांच्या कड्यांनी बनविलेली त्रिगुणाची घट्ट बेडी ठोकून दुःखांच्या राशी भोगावयास लावते, तरी अविद्या सोडीत नाहींच २२.
हा थोर मायेचा खटाटोपु । राया तुज नाहीं भयकंपु ।
तुवां दृढ धरोनि अनुतापु । अभिमानदर्पु छेदिला ॥२३॥
हा मायेचा खटाटोप महाभयंकर आहे. पण राजा ! तुला मात्र त्याच्यापासून भय नाही. कारण, तूं दृढतर अनुताप धारण करून अभिमान व दर्प अगदी छेदन करून टाकला आहेस २३.
तुझी पालटली दिसे स्थिती । हृदयीं प्रगटली चिच्छक्ती ।
मावळली अविद्येची राती । बोधगभस्ति उगवला ॥२४॥
तुझी स्थितिच पालटलेली दिसत आहे. तुझ्या हृदयांत चिच्छक्ति प्रगट होऊन अविद्येची रात्र संपून ज्ञानरूप सूर्याचा उदय झाला आहे २४.
जेथ छेदिला अभिमान । तेथें कामादि वैरी निमाले जाण ।
जेवीं शिर छेदिल्या करचरण । सहजें जाण निमाले ॥२५॥
जेथे अभिमानच छाटला जातो, तेथे कामादिक शत्रुही नाश पावतातच. ज्याप्रमाणे शिरच्छेद केला की, हातपाय आपोआपच नाश पावतात २५.
यापरी तूं ‘अरिमर्दन’ । बोलिलों तें सत्य जाण ।
ऐकोनि अवधूतवचन । सुखसंपन्न नृप झाला ॥२६॥
याप्रमाणे मी तुला ‘अरिमर्दन’ असें जे म्हटले ते अगदी बरोबर आहे. हे अवधूताचे भाषण ऐकून राजाला फार संतोष झाला २६.
म्हणे धन्य धन्य मी सनाथ । मस्तकीं ठेविला हस्त ।
प्रेमें वोसंडला अवधूत । हृदयीं हृदयांत आलिंगी ॥२७॥
अवधूतालाही प्रेमाचा गहिवर दाटून आला, आणि त्याने राजाच्या मस्तकावर हात ठेवून हृदयाशी धरून आलिंगन दिले. तेव्हां राजाला मोठी धन्यता वाटली २७.
दोघां निजात्मबोधें जाहली भेटी । यालागीं खेवा पडली मिठी ।
तेणें आनंदें वोसंडे सृष्टी । सभाग्यां भेटी सद्गुरूसी ॥२८॥
निजात्मबोधाने दोघांचे तादात्म्य झाले, त्यामुळे मिठी घट्ट पडली. त्यांचा आनंद विश्वांत मावेनासा झाला. खऱ्या भाग्यवंतालाच ह्याप्रमाणे सद्गुरूची भेट होत असते २८.
बालका कीजेति सोहळे । तेणें निवती जननीचे डोळे ।
शिष्यासी निजबोधु आकळे । ते सुखसोहळे सद्गुरूसी ॥२९॥
मुलाचे कौतुक केलेले पाहून आईचे डोळे तृप्त होतात, त्याप्रमाणे शिष्याला आत्मबोध झाला की सद्गुरूलाही अत्यानंद होतो २९.
करितां दोघांसी संवादु । वोसंडला परमानंदु ।
पुढील कथेचा संवादु । अतिविशदु सांगत ॥२३०॥
याप्रमाणे उभयतांचा संवाद चालला असतां परमानंद भरून वाहू लागला. त्या आनंदाच्या भरांत पुढील कथेचा संवाद अवधूत अधिकच स्पष्ट करून सांगू लागला २३०.
यथोर्णनाभिर्हृदयाद् ऊर्णां सन्तत्य वक्त्रतः ।
तया विहृत्य भूयस्तां ग्रसत्येवं महेश्वरः ॥ २१ ॥
[श्लोक २१] ज्याप्रमाणे कोळीकीटक आपल्या हृदयातून तोंडाच्याद्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो, त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात, जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात. (विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे, हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टान्ताने स्पष्ट केले आहे). (२१)
‘ऊर्णनाभि’ म्हणजे कांतिणी । हृदयतंतु मुखेंकरूनी ।
विस्तारी बाहेर काढूनी । निजगुणीं स्वभावे ॥३१॥
‘ऊर्णनाभि’ म्हणजे कोळी किंवा कांतीण. हा कोळी आपल्या अंगस्वभावाप्रमाणे आपल्या पोटांतील तंतु तोडांतून बाहेर काढून त्याचे जाळें करतो ३१.
त्या विस्तारिल्या तंतूंवरी । तळीं आणि उपरी ।
आपणचि क्रीडा करी । नानापरी स्वलीला ॥३२॥
आणि त्या पसरलेल्या तंतूंवर खाली आणि वरती आपणच आपल्या इच्छेप्रमाणे क्रीडा करीत असतो ३२.
तंतुविस्तारें खेळती लीला । प्रत्यक्ष देखतांचि डोळां ।
ग्रासूनि ने हृदयकमळा । अद्वैतकळा दाखवी ॥३३॥
त्या तंतूंच्या जाळ्याने तो खेळता खेळतांच प्रत्यक्ष डोळ्यांदेखतच ते सारे तंतु खाऊन टाकून पोटांत भरतो आणि अद्वैतकळा दाखवितो ३३.
याचि रीतीं सर्वेश्वरु । एकला रची संसारु ।
अंतीं करूनि संहारु । उरे निर्विकारु निजात्मा ॥३४॥
याच रीतीने सर्वेश्वरही आपण एकटाच संसाराची रचना करून, अखेर त्या सर्वांचा संहार करून निर्विकार अशा आत्मस्वरूपानेच शिल्लक उरतो ३४.
या लक्षणाचा निर्धारु । धरूनि ऊर्णनाभी केला गुरु ।
आतां सारूप्यतेचा विचारु । पेशस्कारु गुरु म्यां केला ॥३५॥
ह्याच लक्षणाचा निर्धार धरून मी त्या ऊर्णनाभीला गुरु केले. आतां सारूप्यतेचा विचार करण्यासठी मी कुंभारणीला गुरु करून घेतले, (ती गोष्ट सांगतों ऐक) ३५.
यत्र यत्र मनो देही धारयेत्सकलं धिया ।
स्नेहाद् द्वेषाद् भयाद् वापि याति तत्तत्स्वरूपताम् ॥ २२ ॥
[श्लोक २२] जर एखादा स्नेहाने, द्वेषाने किंवा भीतीनेसुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करील, तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते. (२२)
काया वाचा आणि मन । पुरुषें एकाग्र करून ।
जे जे वस्तूचें करी ध्यान । तद्रूप जाण तो होय ॥३६॥
पुरुषाने काया, वाचा व मन एकाग्र करून ज्या ज्या वस्तूचें ध्यान करावे, त्या त्या वस्तूचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते, असें तूं समज ३६.
स्नेहें द्वेषें अथवा भयें । दृढ ध्यान जेणें होय ।
तेणेंचि तद्रूपता लाहे । उभवूनि बाहे सांगतु ॥३७॥
स्नेहाने, द्वेषाने किंवा भयाने ज्या ज्या वस्तूचा दृढतर ध्यास लागून राहतो, त्या ध्यासानेच त्याला तद्रूपता प्राप्त होते, हे मी अगदी बाहु उभारून सांगतों ३७.
देह गेलिया तद्रूपता । होईल हें वचन वृथा ।
येणेंचि देहें येथ असतां । तद्रूपता पाविजे ॥३८॥
देह गेल्यानंतर तद्रूपता होईल, हें म्हणणें वृथा आहे. ह्याच देहाने आणि येथे असतांच तद्रूपता प्राप्त होते ३८.
कीटः पेशस्कृतं ध्यायन् कुड्यां तेन प्रवेशितः ।
याति तत्सात्मतां राजन् पूर्वरूपमसन्त्यजन् ॥ २३ ॥
[श्लोक २३] कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार येऊन त्याला भूंभूं करून घाबरविते तिच्या भीतीने तिचेच चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो. (याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना, परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो, हे ज्ञान किड्याकडून घ्यावे). (२३)
भिगुरटी कीटकीतें धरी । कोंडी भिंतीमाजिले घरीं ।
ते मरणभयें ध्यान करी । निरंतरीं भ्रमरीचें ॥३९॥
भिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशी ती एक आळी (कीड) धरून आणते, आणि तिला एका भिंतीशी बांधलेल्या घरट्यांत कोंडून ठेवते. त्यामुळे ती मरणाच्या भयाने त्या कुंभारणीचाच रात्रंदिवस ध्यास करीत राहाते ३९.
तेणें तीव्रध्यानें ती कीटी । होऊनि ठाके भिंगुरटी ।
गगनीं चढे उठाउठी । प्रत्यक्ष दृष्टीं देखिजे ॥२४०॥
त्या तिच्या तीव्र ध्यानानेच ती आळी स्वत: कुंभारीण बनते. आणि तत्काल आकाशात उडून जाते, हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहातों २४०.
भिंगुरटी जड असंत । मूढ कीटी तिचें ध्यान करीत ।
तेणें तद्रूपता प्राप्त । तैसा भगवंत तंव नव्हे ॥४१॥
कुंभारीण ही जड आणि क्षुद्रकीट; तिचे ध्यान करणारी आळीही जडमूड ; पण तिला सुद्धा तीव्र ध्यानाने कुंभारणीचे स्वरूप प्राप्त होते. पण भगवान् कांही तसा नाही ४१.
तो अजड चिद्रूप सुखदाता । ज्ञाता अधिकारी ध्यान करिता ।
तेथ तद्रूपता पावतां । विलंबू सर्वथा पैं नाहीं ॥४२॥
तो अजड आहे; तो चिद्रूप आहे; तो सौख्यदाता आहे. त्याचे ध्यान करणाराही ज्ञाता व अधिकारी आहे ; अशाने ध्यान केले, तर तेथें तप होण्याला मुळींच विलंब लागावयाचा नाही ४२.
कीटकीस भ्रमरत्व जोडे । हें ‘तीव्रध्यानें’ न घडतें घडे ।
विचारितां दोन्ही मूढें । जड जडें वेधिलें ॥४३॥
आळीला कुंभारणीचा आकार प्राप्त होतो; अर्थात् केवळ तीव्र ध्यानाने न घडणारी गोष्टसुद्धा घडून येते. विचार केला तर ती दोघेही अज्ञानच असतात; अर्थात् जडानेच जड वेधले जाते ४३.
भगवद्ध्यान नव्हे तैसें । ध्याता भगवद्रूपचि असे ।
ध्याने भ्रममात्र नासे । अनायासें तद्रूप ॥४४॥
भगवंताच्या ध्यानाची गोष्ट तशी नाही. कारण, ध्यान करणारा हा मूळचा भगवद्रूपच असतो; ध्यानाने ‘मी देही’ हा त्याचा भ्रम तेवढा नाहीसा होतो. त्यामुळे तो अनायासेंच तद्रूप होतो ४४.
येणें देहें याचि वृत्तीं । आपुली आपण न जाणे मुक्ती ।
नेघवे भगवत्पदप्राप्ती । तैं वृथा व्युत्पती नरदेहीं ॥ ४५ ॥
ह्याच देहांत आणि ह्याच वृत्तीने आपली मुक्ति ज्याला कळत नाही, आणि भगवत्पदप्राप्ति करून घेववत नाही, तर नरदेहांतील विद्वत्ता व्यर्थ होय ४५.
वृथा त्याचें ज्ञान ध्यान । वृथा त्याचें यजन याजन ।
वृथा त्याचें धर्माचरण । चैतन्यघन जरी नोहे ॥४६॥
तो जर चैतन्यघन होणार नाही, तर त्याचे ज्ञान, ध्यान, यजन, याजन आणि धर्माचरण सारे व्यर्थ आहे ४६.
एवं गुरुभ्य एतेभ्य एषा मे शिक्षिता मतिः ।
स्वात्मोपशिक्षितां बुद्धिं श्रृणु मे वदतः प्रभो ॥ २४ ॥
[श्लोक २४] राजन ! अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतले आता, मी आपल्या शरीराकडून जे शिकलो, ते तुला सांगतो नीट ऐक. (२४)
अवधूत म्हणे यदूसी । इतुकिया गुरूंपाशी ।
मी शिकलों जें जें मतीशीं । तें तुजपाशीं सांगितलें ॥४७॥
अवधूत यदूला म्हणाला-इतक्या गुरूंपाशी मी जें जें काय स्वबुद्धीने शिकलो, ते तुला सांगितले ४७.
निजबुद्धीचिया व्युत्पत्ती । कांहींएक शिकलों युक्ती ।
तेंही सांगेन तुजप्रती । अनन्यप्रीती-स्वभावे ॥४८॥
मी आपल्याच बुद्धीच्या धोरणाने व युक्तीने आणखी कितीएक गुण शिकलो आहे, तेही तुला अनन्य प्रीतीमुळे सांगतो ४८.
चोवीस गुरूंचाही गुरु । विवेकवैराग्यविचारु ।
हा नरदेहीं लाधे सधरु । यालागीं मुख्य गुरु नरदेहो ॥४९॥
चोवीस गुरुंचाही गुरु असा जो समर्थ विवेकवैराग्यविचार, तो या नरदेहांतच प्राप्त होत असतो; ह्याकरितां नरदेह हाच मुख्य गुरु होय ४९.
देहो गुरुर्मम विरक्तिविवेकहेतुः
बिभ्रत्स्म सत्त्वनिधनं सततार्त्युदर्कम् ।
तत्त्वान्यनेन विमृशामि यथा तथापि
पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्गः ॥ २५ ॥
[श्लोक २५] माझा हा देहसुद्धा माझा गुरूच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे या देहामुळेच मी तत्त्वचिंतन करत असलो तरी हा देह हिंस्त्र प्राणी, अग्नी इत्यादी दुसर्यांचाच आहे, असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो. (२५)
देहासी जें गुरुत्व जाणा । तें दों प्रकारीं विचक्षणा ।
सांगेन त्याच्या लक्षणा । संरक्षणा परमार्था ॥२५०॥
हे चतुरश्रेष्ठा ! देहाला जें गुरुत्व आले आहे, ते दोन प्रकारांनी आलेले आहे. परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी त्याचीही लक्षणे तुला सांगतो २५०.
देहाऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें ।
देहाऐसें गोमटें । पाहतां न भेटे त्रिलोकीं ॥५१॥
देहाइतकें वाईट पृथ्वीमध्ये दुसरें कोठेंच कांहीं नाहीं; पण तसेंच देहाइतकें चांगलेही पण त्रिभुवनांत काही मिळावयाचे नाही ५१.
वोखटें म्हणोनि त्यागावें । तैं मोक्षसुखासी नागवावें ।
हो कां गोमटें म्हणोनि भोगावें । तैं अवश्य जावें नरकासी ॥५२॥
वाईट म्हणून त्याचा त्याग करावा, तर मोक्षसुख अंतरतें ; बरें, तो चांगला म्हणून त्याचा उपभोग घ्यावा तर हटकून नरकांत पडावे लागते ५२.
तरी हें त्यागावें ना भोगावें । मध्यभागें विभागावें ।
आत्मसाधनीं राखावें । निजस्वभावें हितालागीं ॥५३॥
याकरिता त्याचा त्यागही करूं नये आणि त्याचा भोगही घेऊ नये. त्याला दोन्ही अवस्थांच्या मधोमधच राखून ठेवावें. अर्थात् आपल्या हिताकरितां त्याला आत्मसाधनांतच राखावें ५३.
जैसें भाडियाचें घोडें । आसक्ति सांडोनि पुढें ।
पेणेंवरी नेणें घडे । स्वार्थचाडेलागूनि ॥५४॥
ज्याप्रमाणे आपले कार्य साधून घेण्यासाठी भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत नेणे भाग पडते, पुढे त्याची आपण काळजी घेत नाही ५४.
हेतू ठेवूनि परमार्था । गेहीं वस्तीकरू जेवीं उखिता ।
देहआसक्तीची कथा । बुद्धीच्या पंथा येवों नेदी ॥५५॥
त्याप्रमाणे परमार्थावर हेतु ठेवून घरामध्ये वस्ती करावयाची ती अगदी उदासीन वाटसराप्रमाणे करावी. देहाच्या आसक्तीची गोष्ट, बुद्धीच्या टप्प्यापर्यंत येऊ देऊ नये ५५.
देहाची नश्वर गती । नश्वरत्वें उपजे विरक्ती ।
नाशवंताची आसक्ती । मुमुक्षु न करिती सर्वथा ॥५६॥
देहाची स्थिति नश्वर आहे; आणि नश्वरत्वामुळेच विरक्ति उत्पन्न होते. मुमुक्षु असतात ते कोणत्याच नाशवंत वस्तूवर आसक्ति ठेवीत नाहीत . ५६.
जेणें उपजे विरक्ती । तो विवेक जाणावा निश्चितीं ।
एवं विवेकवैराग्यप्राप्ती । निजयुक्तीं नरदेहीं ॥५७॥
आणि ज्याने विरक्ति उत्पन्न होते, तोच खरोखर विवेक होय. मिळून विवेकाची आणि वैराग्याची प्राप्ति आपल्याच विचाराने नरदेहामध्ये होते ५७.
इतर देहांच्या ठायीं । हा विचारूचि नाहीं ।
केवळ शिश्नोदर पाहीं । व्यवसावो देहीं करिताति ॥५८॥
इतर देहांमध्ये हा विचारच मुळी असत नाही. कारण इतर देह धारण करणारे प्राणी केवळ शिस्नोदराचाच व्यवसाय करीत असतात ५८.
यालागीं नरदेह निधान । जेणें ब्रह्मसायुज्यीं घडे गमन ।
देव वांच्छिती मनुष्यपण । देवाचें स्तवन नरदेहा ॥५९॥
म्हणून नरदेह हा एक अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यांत जाता येते, म्हणून देवसुद्धा नरदेहाचे वर्णन करून मनुष्यपणाची इच्छा करतात ५९.
म्हणसी नरदेह पावन । परी तो अत्यंत निंद्य जाण ।
योनिद्वारें ज्याचें जनन । पाठींच मरण लागलेंसे ॥२६०॥
म्हणून नरदेह हा मोठा पवित्र आहे असें तूं म्हणशील, पण तो अत्यंत निंद्य आहे असे समज. कारण त्याचे जन्म योनीच्या द्वाराने असून मरण हें त्याच्या अगदी पाठीशींच लागलेले आहे २६०.
जंव जन्मलेंचि नाहीं । तंव मरण लागलें पाहीं ।
गर्भाच्याचि ठायीं । मरणघायीं धाकती ॥६१॥
प्राणी पुरता जन्माला सुद्धा आलेला नसतो, तोच त्याच्या पाठीला मरण लागते. गर्भातसुद्धां मरणाचा धक्का बसेल म्हणून भितात ! ६१.
एवं या देहासरिसा । नित्य मृत्यु लागला कैसा ।
पोषूनियां बालवयसा । तारुण्यसरिसा लागला ॥६२॥
तात्पर्य, ह्या देहाबरोबरच मृत्यु कसा चिकटलेला आहे पहा. तो बाल्याबरोबर असून तारुण्यांतही अगदीं मांडीशी मांडी लावून बसतो ६२.
विसरोनियां आत्ममरण । तारुण्य चढलें जी दारुण ।
चतुर शाहणा सज्ञान । बळें संपूर्ण मी एकु ॥६३॥
असे असतांही आपल्या मरणाचा विसर पडून तारुण्याचा भयंकर ताठा चढतो. चतुर, शहाणा, ज्ञाता, बलवान् सारा काय तो मीच एक, असें म्हणत असतो ६३.
त्या तारुण्याची नवाळी । देंठ न फेडितां काळ गिळी ।
मग जरा जर्जरित मेळी । मरणकाळीं पातली ॥६४॥
तोंच त्या ‘तारुण्याची नवाळी’ म्ह. तारुण्यऋतूंतील नवें फळ, देठ न फेडतांच काळ गिळून टाकतो. मग म्हातारपणाने जर्जर होऊन मरणकाळ प्राप्त होतो. ६४.
धवलचामरेंसीं आलें जाण । जरा मृत्यूचें प्रस्थान ।
मागूनि यावया आपण । वेळा निरीक्षण करीतसे ॥६५॥
पांढऱ्या शुभ्र चवरीसहवर्तमान जरेच्या रूपाने मृत्यूचे प्रस्थान पुढे येते व पाठीमागून आपण केव्हां जावयाचे, त्या वेळाची वाट मृत्यु पहात असतो ६५.
सर्वांगीं कंपायमान । तो आला मृत्युव्यजन ।
मान कांपे तो जाण । डोल्हारा पूर्ण मृत्यूचा ॥६६॥
सारे अंग लटलटां कांपूं लागले, म्हणजे तोच मृत्यूचा पंखा आला म्हणून समजावें. आणि मान कांपते तोच मृत्यूचा डोल्हारा समजावा ६६.
दांत पाडूनि सपाट । काळें मोकळी केली वाट ।
मृत्युसेनेचा घडघडाट । वेगीं उद्भट रिघावया ॥६७॥
मृत्यूचे सैन्य भराभर आंत शिरावे म्हणून काळ हा सर्व दांत पाडून सारा रस्ता सपाट करून सोडतो ६७.
पाठी झाली दुणी । तेचि मृत्यूची निशाणी ।
दोनी कानीं खिळे देउनी । सुबद्ध करूनि बांधिली ॥६८॥
पाठीला पोक येऊन तिची घडी होते, तेच मृत्यूचे निशाण; ते दोन्ही कानांत दोन खिळे मारून गच्च बांधून टाकलेले असते ६८.
येतिया मृत्यूसी पुढारें । नयनतेज धांवे सामोरें ।
मग न्याहाळतीना अक्षरें । अंजनोपचारें शिणतांही ॥६९॥
मृत्यु पुढे येणार म्हणून नेत्रांचे तेज त्याला आधीच सामोरे धावते, मग त्याला तुम्ही अंजन घाला की कांही घाला, अक्षरेंसुद्धा दिसेनाशी होतात ! ६९.
उभळीचा उजगरा । उबगु सेजारिल्या घरा ।
म्हणती न मरे हा म्हातारा । बाळाची निद्रा मोडितो ॥२७०॥
रात्रभर खोकल्याच्या जागरणाने शेजारच्या घरवाल्यांनासुद्धा कंटाळा येतो. आणि ते म्हणतात, ‘मरत का नाहीं एकदाचा हा म्हातारा, आमच्या पोराबाळांची झोंप मोडतो !’ २७०.
देखोनि मृत्यूची धाडी । पायां वळतसे वेंगडी ।
जिव्हेसी चालली बोबडी । तुटल्या नाडी सर्वांगीं ॥७१॥
मृत्यूची धाड आलेली पाहिली की, पायांत पाय अडखळू लागतात, जिभेची बोबडी वळते, आणि साऱ्या अंगांतील नाड्या तुटून जातात ७१.
मरण न येतां जाण । थोर जरेचें विटंबन ।
विमुख स्त्रीपुत्रजन । अतिदीन ते करी ॥७२॥
मरण लवकर आले नाही तर, म्हातारपणाची विटंबना फारच कठीण असते. आपली बायकामुलें व इतर माणसेंही जवळ येईनातशी होतात. तेव्हां जिणें निखालस केविलवाणें होते ७२.
जन्मवरी सायासीं । प्रतिपाळिंले जयांसी ।
तींचि उबगलीं त्यासी । जरेनें देहासी कवळिल्या ॥७३॥
देहाला म्हातारपणानें गांठले की, आपण ज्यांना जन्मभर यातायात करून पोसलेली असतात, तीच जवळ यायला कंटाळतात ! ७३.
जरा लागलिया पाठीं । कोणी नाइके त्याची गोष्टी ।
विटावों लागलीं धाकुटीं । कुतरीं पाठीं भुंकती ॥७४॥
देहाला म्हातारपण पाठीस लागले की, त्याचे बोलणेसुद्धा कोणी ऐकत नाही; मुले त्याला वेडावून दाखवितात; आणि कुत्री पाठीमागे लागतात ७४.
शाहणीं सांगती अबलांसी । ‘बागुल’ आला म्हणती वृद्धासी ।
निसुर पडों नेदी ढांसी । कासाविसी होतसे ॥७५॥
जाणती माणसें मुलांना ‘हा पहा बागुलबोवा आला’ असे सांगू लागतात. खोकल्याची ढांस तर क्षणभर स्वस्थ बसू देत नाही. आणि त्यामुळे जीव कासावीस होतो ७५.
‘म्हातारा हो’ हा आशीर्वाद । दीधला तेहीं केलें द्वंद्व ।
जरेएवढें विरुद्ध । आणि द्वंद्व तें नाहीं ॥७६॥
‘म्हातारा हो’ असा लहानपणी ज्यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी खरोखर तो शापच दिला म्हणण्यास हरकत नाही. कारण, म्हातारपणासारखे दुःखदायक असे दुसरे कोणतेच नाही ७६.
ऐसी जरेची जाचणी । देखोनियां तरुणपणीं ।
हेचि दशा मजलागूनी । हात धरूनि येईल ॥७७॥
म्हातारपणचें दुःख अशा तर्हेचे असते हें तरुणपणी पाहून हीच दशा पुढे मलाही हात धरून येईल, असे समजले पाहिजे ७७.
देहो तितुका षड्विकारी । कोटि अनर्थ एकेके विकारीं ।
षडूर्मी लागल्या त्या भीतरी । जेवीं अग्नीवरी घृतधारा ॥७८॥
देह तितका षड्विकारांनी भरलेला आहे. त्या एक एका विकारामध्यें आणखी कोट्यवधि अनर्थ आहेत. शिवाय अग्नीवर तुपाच्या धारा लागान्यात त्याप्रमाणे त्यांच्यात पुन्हा सहा ऊर्मी लागून राहिलेल्या आहेत ७८.
या दुःखाचें जें मूळ । तें देहाचें आळवाळ ।
देहो वाढवितां दुःख प्रबळ । उत्तरफळ महादुःख ॥७९॥
देहरूप आळे हे ह्या दुःखाचें मूळ होय. ह्यामुळे तो देह वाढविला तर दुःख वाढून अखेर महादुःख हेंच फळ येते ७९.
एवं देहाची जे संगती । ते निरंतर दुःखप्राप्ती ।
यापरी सांडावी आसक्ती । या हेतु विरक्ती देहगुरु ॥२८०॥
तात्पर्य, देहाची संगति ही निरंतर दुःखदायक आहे, हे मनांत आणून त्याची आसक्ति सोडून द्यावी. विरक्ति मनांत बिंबण्याच्या हेतूनें देह हा गुरु आहे २८०.
या देहाचेनि साधनें । अविनाश पद पावणें ।
याहीपरी येणें गुणें । गुरुत्व म्हणणे देहासी ॥८१॥
ह्या देहाच्या साहाय्यानेंच अविनाशपदाची प्राप्ति होते. ह्या गुणामुळेही देहाला गुरु म्हटले पाहिजे ८१.
देह उपकारी अपकारी । यासी गुरुत्व दोन्हीपरी ।
येथ विवंचूनिं चतुरीं । निजहित करी तो धन्य ॥८२॥
देह हा उपकार करणारा आहे, आणि अपकार करणाराही आहे. त्याला दोन्ही बाजूंनी गुरुपणा आहे. याचा विचार करून जो चतुर आपले हित साधील तोच धन्य होय ८२.
करितां तत्त्वविवंचन । देहाचें मूळ तें अज्ञान ।
निजरूपाचें अदर्शन । तेंचि भान प्रकृतीचें ॥८३॥
तत्त्वविचार करून पाहिले असतां अज्ञान हेच देहाचे मूळ आहे. आणि आत्मस्वरूप न दिसणें तेंच प्रकृतीचे भासणे होय ८३.
प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र । त्रिगुणीं त्रिविध अहंकार ।
येथूनि महद्भूतविकार । इंद्रियव्यापार देहेंसी ॥८४॥
प्रकृतीपासूनच तीन गुणांचें पेंढें उत्पन्न होते, तीन गुणांपासून तीन प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात आणि तेथून महद्भूतांचा विकार उत्पन्न होऊन देहासहवर्तमान इंद्रियांचे व्यापार चालतात ८४.
एवं पिंडब्रह्मांडखटाटोप । हा अवघाचि ‘आरोप’ ।
दोरु जाहला नाहीं साप । भ्रमें सर्प तो म्हणती ॥८५॥
तात्पर्य, दोरामध्ये सर्प झालाच नाही ; भ्रमाने त्याला सर्प म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूवर पिंड-ब्रह्मांड हा आरोप आहे ८५.
पाहतां देहाचें मूळ । भासे जैसें मृगजळ ।
भ्रमाची राणीव प्रबळ । हा आरोपचि केवळ वस्तूचे ठायीं ॥८६॥
देहाचे मूळ पहावयास गेले तर, तें मृगजळासारखेच वाटते. सर्व भ्रमाचेंच राज्य पसरलेले आहे. परब्रह्माच्या ठिकाणी हा केवळ आरोप आहे ८६.
नसतें देह आभासे जेथें । ‘आरोपु’ म्हणणें घडे त्यातें ।
आतां सांगेन ‘अपवादाते’ । सावचित्ते परियेसीं ॥८७॥
देह नसताही त्याचा भास होतो, त्याला ‘आरोप’ असे म्हणतात. आता ‘ अपवाद’ कशाला म्हणतात तें सांगतों, एकाग्रचित्ताने श्रवण कर ८७.
देह पांचभौतिक प्रसिद्ध । तो ‘मी’ म्हणणें हें अबद्ध ।
देहो मलिन मी शुद्ध । अतिविरुद्ध या आम्हां ॥८८॥
देह हा पंचभूतात्मक असल्याचे प्रसिद्ध आहे. तो मी म्हणणे केवळ अबद्ध होय. कारण देह हा मलिन आहे, आणि मी शुद्ध आहे. देहाला व आम्हांला याप्रमाणे अतिशय विरुद्ध आहे ८८.
पृथ्वी मी नव्हे जडत्वें । जळ मी नव्हे द्रवत्वें ।
तेज मी नव्हें दाहकत्वें । चंचलत्वें नव्हें वायु ॥८९॥
मी पृथ्वी नव्हे, कारण ती जड आहे. मी जळ नव्हें कारण ते द्रवरूप आहे. मी तेज नव्हें कारण त्याला दाहकत्व आहे. तसाच मी वायुही नव्हें, कारण तो चंचळ आहे ८९.
नभ मी नव्हे शून्यत्वें । अहं मी नव्हें दृश्यत्वें ।
जीव नव्हें मी परिच्छिन्नत्वें । माया मिथ्यात्वें मी नव्हें ॥२९०॥
मी आकाश नव्हे, कारण ते शून्य आहे. ‘अहं’ ही मी नव्हें, कारण तें दृश्य आहे. मी जीव नव्हे, कारण तो परिच्छिन्न म्ह. एकदेशी आहे. तसाच मी मायाही नव्हें, कारण ती मिथ्या आहे २९०.
देह नव्हें मी नश्वरत्वें । विषय नव्हे मी बाधकत्वें ।
या तत्त्वां आणि मातें । संबंधू येथें असेना ॥९१॥
नश्वरत्वाच्या योगाने मी देह नव्हें; बाधकत्वाच्या योगाने मी विषय नव्हें. तात्पर्य, ह्या तत्त्वांचा आणि माझा येथे संबंध नाही ९१.
‘ब्रह्माहमस्मि’ अभिमान । हंसपरमहंसांसी मान्य ।
तें सत्त्वावस्थेचें साधन । तोही अभिमान मी नव्हें ॥९२॥
‘मी ब्रह्म आहे’ हा अभिमान हंसांना आणि परमहंसांना संमत असतो; पण ते एक सत्त्वावस्थेचे साधन आहे. तो अभिमानही मी नव्हें ९२.
जितुका तत्त्वांचा अनुवादु । तितुका मजवरी ‘अपवादु’ ।
हा माझा बुद्धीचा बोधु । तुज म्यां यदु सांगितला ॥९३॥
ज्या तत्त्वांचा वर अनुवाद केला, त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी ‘अपवाद’ म्ह. अभाव आहे. हे यदू ! हा माझ्या बुद्धीला झालेला बोध मी तुला सांगितला ९३.
हें माझें गुप्त ज्ञान । तुझें देखोनि अनन्यपण ।
केलें गा निरूपण । भावें संपूर्ण तूं भावार्थी ॥९४॥
तुझी अनन्यभक्ति व भावार्थ पाहून हें माझे सारे गुह्य ज्ञान मी तुला सांगितले ९४.
येरवीं करावया हे कथा । मज चाड नाहीं सर्वथा ।
परी बोलवीतसे तुझी आस्था । नृपनाथा सभाग्या ॥९५॥
नाही तर हे सांगण्याची मला मुळीच गरज नव्हती; परंतु हे भाग्यवान् राजा ! तुझी आस्थाच मला बोलविते ९५.
ऐशिया संवादाच्या मेळीं । अद्वैतबोधें पिटिली टाळी ।
दोघे आनंदकल्लोळीं । ब्रह्मसुकाळीं मातले ॥९६॥
ह्याप्रमाणे संवादसुखाच्या एकतानतेत त्यांनी अद्वैतबोधाने टाळी दिली आणि दोघेही आनंदातिशयाने ब्रह्मस्वरूपांत तन्मय झाले ९६.
ऐसा उपकारी देखा । या देहासारिखा नाहीं सखा ।
म्हणसी राखावा नेटका । तंव तो पारका मुळींचि ॥९७॥
अवधूत म्हणाले, या देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही; म्हणून तो नीट राखावा म्हणशील, तर तो मुळांतच परक्याचा आहे ९७.
यासी अत्यंत करितां जतन । दिसे विपरीत निदान ।
श्वानशृगालांचें भोजन । कां होय भक्षण अग्नीचें ॥९८॥
ह्याचे अत्यंत जतन करूं म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो. तो कोल्ह्याकुत्र्यांचे भक्ष्य होतो. किंवा अग्नीचे भक्ष्य होऊन राहतो ९८.
या दोंही गतींवेगळें पडे । तरी सुळबुळीत होती किडे ।
चौथी अवस्था यासी न घडे । हें तूंही रोकडें जाणशी ॥९९॥
ह्या दोन्ही अवस्थांतून सुटला तर, किड्यांचा बुजबुजाट होतो. (देहाला, ‘कृमिविभस्मसंज्ञकः ‘ म्हटले आहे. जाळला तर त्याचे ‘भस्म’ होते, पुरला तर त्याचे ‘कृमी’ होतात व कोल्ह्याकुत्र्यांनी खाल्ला तर त्याची ‘विष्ठा होते. ) ह्या तिहींखेरीज देहाला चौथी अवस्था नाही. हे तुलाही चांगले माहीत आहेच ९९.
यालागीं देहाची आसक्ती । मी न धरींच गा नृपती ।
निःसंगु विचरतसें क्षितीं । आत्मस्थितीचेनि बोधें ॥३००॥
म्हणून हे राजा ! मी देहाची आसक्तीच धरीत नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी निःसंगपणाने पृथ्वीवर फिरतों ३००.
देहासी उपभोगसाधनें । तितुकीं जाण पां बंधनें ।
दृढ वासना तेणें । अनिवारपणें वाढते ॥१॥
देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत, तितकी सारी बंधने आहेत, हें तूं लक्षात ठेव, त्यांच्या योगानें वासना प्रबळ होऊन अनिवार वाढते १.
जायात्मजार्थपशुभृत्यगृहाप्तवर्गान्
पुष्णाति यत्प्रियचिकीर्षया वितन्वन् ।
स्वान्ते सकृच्छ्रमवरुद्धधनः स देहः
सृष्ट्वास्य बीजमवसीदति वृक्षधर्मः ॥ २६ ॥
[श्लोक २६] जो मनुष्य पत्नी, पुत्र, धनदौलत, पशू, सेवक, घर, आप्तेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल, अशी इच्छा बाळगून त्यांचे पालनपोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो, तोच देह शेवटी, बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे, त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो. (२६)
देहभोगीं मुख्य गोडी । स्त्रीभोगाची अतिआवडी ।
सर्वस्व वेंचोनि जोडी । आणी रोकडी योषिता ॥२॥
देहभोगांतील मुख्य गोडी म्हटली म्हणजे स्त्रीभोगाची. सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतात २.
स्त्री हातीं धरितां देख । वाढे प्रपंचाचें थोर दुःख ।
गृह पाहिजे आवश्यक । भोगार्थ देख स्त्रियेच्या ॥३॥
परंतु स्त्रीचे पाणिग्रहण केलें की, प्रपंचाचे दुःख वाढू लागते. त्या स्त्रियेच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडतें ३.
त्या गृहाचे गृहसिद्धीं । पाहिजे धनधान्यसमृद्धी ।
झाली प्रजांची वृद्धी । तेणें अतिआधी अनिवार ॥४॥
ते घर नीट चालावयाका धनधान्याची समृद्धि पाहिजे. पुढे मुलेबाळे होऊन प्रपंच वाढला, म्हणजे अनिवार चिंता उत्पन्न होते ४.
त्या प्रजांचा अतिलालसु । दासदासी मेळवी पशु ।
थोर कष्टांचा पडे सोसु । सुखलेशु पैं नाहीं ॥५॥
त्या मुलाबाळांचा अतिशय लळा लागून राहतो. त्यांच्याकरितां गडीमाणसे, दासदासी, गुरेढोरे बाळगावी लागतात. त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते. सुखाचा एक क्षणही मिळत नाही ५.
व्याही जांवयांच्या वोढी । आप्तवर्गाचिया कोडी ।
पडे उचिताचिया सांकडीं । सोशितां कोरडी देहाची ॥६॥
व्याह्यांची आणि जावयांची ओढ लागते; आप्तइष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. त्यांचा यथायोग्य सत्कार करावयाचे महासंकट पडते आणि तें सारे सहन करता करतां देहाची अगदी रेवडी वळून जाते ६.
पोसावया पोष्यांसी । रची नाना उपायराशी ।
हिंडे स्वदेशीं परदेशीं । अहर्निशीं व्याकुळ ॥७॥
आश्रित जनांचे पोषण करण्याकरिता नाही नाही तितके उपाय करतो, स्वदेशांत परदेशांत हिंडू लागतो व रात्रंदिवस दगदग करून हैराण होतो ७.
देहासी द्यावया सुख । शतधा वाढवी दुःख ।
देहाभिमानें जन मूर्ख । वृथाभिलाख वाढविती ॥८॥
देहाला सुख देण्याकरितां शेंकडोंपट दुःखच वाढवीत असतो. मूर्ख लोकांची अशी चालच आहे की, ते देहाभिमानाने फुकट अभिलाषा वाढवितात ८.
देहसुखाचिया चाडा । पडे परिग्रहाचे खोडां ।
दारागृहलोभें केला वेडा । न देखे पुढां निजस्वार्थु ॥९॥
देहसुखाच्या इच्छेने म्ह. जमीनजुमला इत्यादिकांचा खोडा पायांत पडतो. घरदार, स्त्रीपुत्रांनी त्याला वेडे करून सोडल्यामुळे त्याचा निजस्वार्थ त्याला दिसत नाही ! ९.
देहें वाढविली प्रीती । गृह दारा पुत्र संपत्ती ।
तेचि वासना होय देहांतीं । देहांतराप्रती निजबीज ॥३१०॥
घरदार, मुलेबाळें, संपत्ति ह्यांचा लोभ देहाने वाढविलेला असतो. तीच वासना देहाच्या अंतकाली, दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीला बीजरूपाने कारणभूत होते ३१०.
जैसा जोंधळा कणिसा चढे । कणसींचा क्षितीवरी झडे ।
वाढी वाढलें झाड मोडे । तें बीज गाढें उरलेंसे ॥११॥
जोंधला ज्याप्रमाणे कणसाच्या शेंड्यावर चढतो, आणि मग त्या कणसापासून जमिनीवर झडून पडतो आणि वाढीने वाढलेले झाड मोडून जाते, परंतु मुख्य बीज जमिनींत शिल्लक राहिलेले असते ११.
तेंचि बीज जलभूमीचे संगतीं । सवेंचि झाड वाढे पुढतीं ।
तैसी वासना उरे देहांतीं । देहांतराप्रती न्यावया ॥१२॥
त्या बीजाला पाणी व जमीन सांपडली की, लागलेच पुढे त्याचे झाड वाढते. त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मांत घालण्याकरितां वासना ही उरत असते १२.
त्या वृक्षाचिया परी । वासनाबीज शरीरीं ।
उरवूनि स्वर्गसंसारीं । योनिद्वारीं जन्मवी ॥१३॥
त्या झाडाप्रमाणेच वासनाबीज लिंगदेहांत शिल्लक राहून योनिद्वारे जन्मास घालते व स्वर्गात किंवा संसारांत पाडतें १३.
देहीं वासना केवीं वाढे । तेंही सांगेन तुज पुढें ।
विषय सेवितां वाडेंकोडें । वासना वाढे अनिवार ॥१४॥
देहामध्ये वासना कशी वाढते तेही तुला सांगेन. आसक्तिपूर्वक विषयांचे सेवन केलें असतां वासना अनिवार वाढते १४.
जिह्वैकतोऽमुमपकर्षति कर्हि तर्षा
शिश्नोऽन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् ।
घ्राणोऽन्यतश्चपलदृक् क्व च कर्मशक्तिः
बह्व्यः सपत्न्य इव गेहपतिं लुनन्ति ॥ २७ ॥
[श्लोक २७] जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते, कधी एकीकडे जननेंद्रिय व्याकूळ करते, तर दुसरीकडे त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कम]द्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात. (२७)
जिव्हा रसाकडे वोढी । तृषा प्राशनालागीं तोडी ।
शिश्नासी रतिसुखाची गोडी । तें चरफडी रमावया ॥१५॥
जिव्हा रसाकडे ओढ घेत असते; तृषा प्राशन करण्यासाठी जीव तोडते; शिस्नाला रतिसुखाची गोडी असल्यामुळे, त्यांत रममाण होण्याकरिता ते धडपडत असते १५.
त्वचा पाहे मृदुपण । उदर वांछी पूर्ण अन्न ।
श्रवण मागती गायन । मधुरध्वन आलापु ॥१६॥
मऊ असेल तें त्वचा पहात असते. पोट भरपूर अन्न मिळण्याची इच्छा करीत असते. गायन, मंजुळ ध्वनि, आलाप हे कान मागत असतात १६.
घ्राण उद्यत परिमळा । रूप पहावया वोढी डोळा ।
हस्त वांछिती खेळा । नाना लीळा स्वभावें ॥१७॥
नाक सुगंधाकरितां उद्युक्त झालेले असते. सुस्वरूप पाहण्याकरितां डोळा ओढीत असतो. अनेक प्रकारचे खेळ खेळावेत, मनास वाटतील त्या नानाप्रकारच्या लीला कराव्या म्हणून हात धडपडत असतात १७.
पाय वांछिती गती । ऐशीं इंद्रियें वोढा वोढिती ।
जेवीं एका गेहपती । बहुतां सवती तोडिती ॥१८॥
पायांना इकडे तिकडे हिंडावेसे वाटते. ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सवती सक्ती तोडतोडून घेतात; त्याप्रमाणे इंद्रियें आपआपल्या आवडीप्रमाणे त्याला ओढीत असतात १८.
एवं इंद्रियांसी विषयासक्ती । तेणें वासना दृढ होती ।
त्या देहदेहांतराप्रती । पुरुषासी नेती सर्वथा ॥१९॥
ह्याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ति असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते. आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहांतून त्या देहांत घेऊन जात असतात १९.
यालागीं करावया विषयत्यागु । अवश्य छेदावा देहसंगु ।
इये अर्थी मनुष्यदेह चांगु । ज्ञानविभागु ये देहीं ॥३२०॥
यासाठी विषयांचा त्याग करण्याकरितां देहसंगच मुळी सोडून दिला पाहिजे. असें करण्याला मनुष्यदेहच उत्तम आहे. कारण ज्ञानप्राप्ति आहे ती याच देहांत आहे ३२०.
सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्त्या
वृक्षान् सरीसृपपशून् खगदन्दशूकान् ।
तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय
ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवः ॥ २८ ॥
[श्लोक २८] भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे, सरपटणारे प्राणी, पशू, पक्षी, डास, मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, परंतु त्यांपासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्यशरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणार्या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला. (२८)
हेचि जाणावया निजरूपातें । पूर्वीं तेणें श्रीअनंतें ।
निजमायेचेनि हातें । केलीं बहुतें शरीरें ॥२१॥
ह्याच आपल्या स्वरूपाला जाणतां यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्रीअनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरें निर्माण केली २१.
एकें केलीं भूचरें । एकें तें केलीं खेचरें ।
एकें केली जळचरें । चरें अचरें तीं एकें ॥२२॥
कांही जमिनीवरून चालणारी तयार केली, कांही आकाशांतून फिरणारी तयार केली, कांही पाण्यात विहार करणारी तयार केली व कांही स्थावर व कांही जंगम अशी शरीरें निर्माण केली २२.
वृक्ष सर्प पशु दंश । राक्षस पिशाच बक हंस ।
मत्स्यकच्छादि अशेष । सृजी बहुवस योनिंतें ॥२३॥
वृक्ष, सर्प, पशु, दंश करणारे प्राणी, राक्षस, पिशाच, बगळे, हंस, मासे, कांसव, इत्यादि झाडून सार्या योनी त्यानेच निर्माण केल्या २३.
ऐसा चौर्यांशीं लक्ष योनी । सृजूनि पाहे परतोनी ।
तंव निजप्राप्तीलागोनी । न देखे कोणी अधिकारी ॥२४॥
अशा चौर्यायशीं लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे त्याने नजर देऊन पाहिले, तो त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ति करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाहीं २४.
ऐशिये देखोनि सृष्टीतें । सुख न वाटेचि देवातें ।
मग मानवी प्रकृतीतें । आदरें बहुतें निर्मिलें ॥२५॥
अशी सृष्टि पाहून देवाला समाधान वाटले नाही. म्हणून त्याने मुद्दाम मोठ्या आस्थेनें मानवी देहाची रचना केली २५.
बाहुल्यें मनुष्यदेहीं । निजज्ञान घातलें पाहीं ।
जेणें ज्ञानें देहीं । विदेह पाहीं पावती ॥२६॥
आणि त्या मनुष्यामध्ये पुष्कळसें आपलें ज्ञान भरून ठेवलें, ज्या ज्ञानाने ते त्या देहांत असूनच विदेहस्थितीला पोचतात २६.
आहार-निद्रा-भय मैथुन । सर्वा योनींसी समसमान ।
मनुष्यदेहींचें ज्ञान । अधिक जाण सर्वांशीं ॥२७॥
आहार, निद्रा, भय आणि मैथुन ही साऱ्या योनींना सारखी आहेत. परंतु मनुष्यदेहांतील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे २७.
देखोनि मनुष्यदेहासी । सुख झालें भगवंतासी ।
अधिकार ब्रह्मज्ञानासी । येणें देहेंसीं मत्प्राप्ती ॥२८॥
अशा त्या मनुष्यदेहाला पाहून मात्र भगवंताला संतोष झाला. कारण या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असून याच देहाने माझी प्राप्ति होण्यासारखी आहे असे वाटले २८.
पावोनियां मनुष्यपणा । जो न साधी ब्रह्मज्ञाना ।
तो दाढीचा मेंढा जाणा । विषयाचरणा विचरतु ॥२९॥
मनुष्यजन्माला येऊनही जो ब्रह्मज्ञान संपादन करणार नाही. तो विषयाचरणांतच सर्वकाळ चूर असणारा दाढीवाला बोकडच समजला पाहिजे २९.
मनुष्यदेहींचेनि ज्ञानें । सच्चिदानंदपदवी घेणें ।
एवढा अधिकार नारायणें । कृपावलोकनें दीधला ॥३३०॥
मनुष्यदेहांतील ज्ञानाने सच्चिदानंदपदवी प्राप्त करून घेता येते, एवढा अधिकार नारायणाने कृपा करून दिला आहे ३३०.
मनुष्यदेहीं ब्रह्मज्ञान । पुढील जन्मीं मी करीन ।
म्हणे तो नागवला जाण । सोलींव अज्ञान त्यापासीं ॥३१॥
मनुष्यदेहांतच ब्रह्मज्ञान संपादन करावयाचे तर तें मी पुढच्या जन्मांत संपादन करीन; असें म्हणेल तो पर बुडाला समजावें, त्यांच्याजवळ असलेलें अस्सल अज्ञान ते हेंच ३.
लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते
मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः ।
तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन्
निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥ २९ ॥
[श्लोक २९] अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्यशरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे याच्यामुळे परम पुरूषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे, हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात. (२९)
चौर्यांशीं लक्षयोनींप्रती । जैं कोटिकोटी फेरे होती ।
तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें लाहती निजभाग्यें ॥३२॥
चौर्यायशीं लक्ष योनींचे जेव्हां कोटि कोटि फेरे होतात, तेव्हा मोठ्या भाग्याने अकस्मात् या नरदेहाची प्राप्ति होते ३२.
जो मनुष्यदेही जन्मला । तो परमार्थासी लिगटला ।
एवढा अलभ्य लाभ झाला । पितरीं मांडिला उत्साहो ॥३३॥
जो मनुष्यदेहांत जन्मतो, तो परमार्थाला मिठी घालतो. एवढा अलभ्य लाभ झालेला पाहून त्याचे पितरही मोठा उत्सव करूं लागतात ३३.
झालिया मनुष्यदेहप्राप्ती । परमार्थ साधूं भोगाअंतीं ।
एवढी येथ नाहीं निश्चिती । मृत्युप्राप्ति अनिवार ॥३४॥
मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर आधी सारे भोग भोगून घेऊ आणि मग सावकाश परमार्थाला लागू, असे म्हटल्यास तेवढी शाश्वती येथे खरोखर नाही; कारण मृत्यूचा तडाखा अनिवार आहे ३४.
मृत्यु न विचारी गुण-दोष । न म्हणे देश-विदेश ।
न पाहे रात्र-दिवस । करीत नाश तत्काळ ॥३५॥
मृत्यु हा कोणाच्या गुणांचाही विचार करीत नाही व दोषांचाही विचार करीत नाहीं; तो देश किंवा परदेश म्हणत नाहीं; हा दिवस आहे किंवा रात्र आहे हे पाहात नाहीं; तत्काल नाशच करतो ३५.
देह जैंपासोनि झाला । तैंपासूनि मृत्यु लागला ।
जेवीं सापें बेडूक धरिला । गिळूं लागला लवनिमिषें ॥३६॥
सापाने ज्याप्रमाणे बेडूक धरल्यावर त्यास भराभर गिळू लागावे, त्याप्रमाणे देह जेव्हांपासून झाला, तेव्हांपासून मृत्यु हा लागलेलाच आहे ३६.
साप बेडुकातें गिळी । बेडूक मुखें माशातें कवळी ।
तैशीं मृत्युमुखीं पडलीं । विषयभुलीं झोंबतीं ॥३७॥
साप बेडकाला गिळीत असतो, आणि बेडूक आपल्या तोंडाने माशा धरीत असतो; त्याप्रमाणे मृत्युमुखांत पडलेली मनुष्य़ॆम् विषयाच्या भुलीला झोंबतच असतात ! ३७.
येथ आळसु जेणें केला । तो सर्वस्वें नागवला ।
थिता परमार्थ हातींचा गेला । आवर्ती पडला भवचक्रीं ॥३८॥
यांत जो आळस करील तो सर्वस्वी बुडतो. त्याच्या हातात असलेला परमार्थ जाऊन तो संसारचक्राच्या भोवऱ्यांत गिरक्या खात पडतो ३८.
ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या ।
परमार्थ साधावया । ब्रह्मोपाया उद्यत व्हावें ॥३९॥
हे यदुराजा ! हे सर्व लक्षात आणून ह्याच देहाने लगबग करून परमार्थ साधावयाला म्हणजे ब्रह्मप्राप्ति करून घेण्याला नेहमी तयार असावें ३९.
छेदोनियां आळसासी । दवडूनियां निद्रेसी ।
आत्मचिंतन अहर्निशीं । अविश्रमेंसीं साधावें ॥३४०॥
आळसाला छाटून टाकून, झोपेला बाजूस सारून, रात्रंदिवस एकसारखें आत्मचिंतन करीत रहावें ३४०.
रणीं रिघालिया शूरासी । न जिणतां परचक्रासी ।
विसांवा नाहीं क्षत्रियांसी । तेणें वेगेंसीं साधावें ॥४१॥
शूर क्षत्रिय वीर युद्धाला निघाले म्हणजे परचक्राला जिंकल्याशिवाय जसा विसावा म्हणून घेत नाहीत, तितक्याच वेगाने परमार्थाच्या मागे लागले पाहिजे ४१.
साधावया आत्मलग्न । सावधान बिजवराचें मन ।
तेणें साक्षेपें आपण । सायुज्यलग्न साधावें ॥४२॥
आपले लग्न लागेपर्यंत बिजवराचे मन जितकें सावध असते, तितकें आपणही जीवशिवाचे लग्न लागेपर्यंत सावध असले पाहिजे ४२.
रायाचें एकुलतें एक । चुकल्या अवचटें बाळक ।
तो जेवीं शोधी सकळ लोक । तेवीं निजसुख साधावें ॥४३॥
राजाचे एकुलते एक मूल अकस्मात् चुकले, तर तो जसा सारा मुलुख शोधतो, त्याप्रमाणे आपण आपलें निजसुख साधून घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला पाहिजे ४३.
काळाचा चपेटघात । जंव वाजला नाहीं येथ ।
तंव साधावया परमार्थ । आयुष्य व्यर्थ न करावें ॥४४॥
काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य खर्च केले पाहिजे. फुकट दवडता कामा नये ४४.
नरदेहींचेनि आयुष्यें । प्रपंचाचेनि आवेशें ।
विषयाचेनि विलासें । भोगपिसे नर झाले ॥४५॥
परंतु नरदेहाच्या अमोल आयुष्यात, प्रपंचाच्या उमेदीमुळे, विषयाच्या लालसेनें सारे मनुष्य भोगवेडे झालेले आहेत ! १५,
पश्वादियोनींच्या ठायीं । विषयांवांचोनि आन नाहीं ।
तेचि विषयो नरदेहीं । वाढविल्या कायी हित झालें ॥४६॥
पशु आदिकरून योनींमध्ये विषयावांचून दुसरे काहीच नाही. तोच विषय नरदेहांतही वाढविला तर त्यापासून हित ते कोणतें झालें ? ४६.
विचारितां विवेकदृष्टीं । विषयांसी प्रारब्धें भेटी ।
वृथा करितां आटाटी । मुद्दलतुटी नरदेहा ॥४७॥
विवेकटष्टीने विचार केला तर, विषय हे प्रारब्धानुसारच मिळत असतात. त्यांच्यासाठी व्यर्थ यातायात करीत बसल्याने मूळ नरदेहाचाच नाश होतो ४७.
नरदेह परम पावन । पावोनि न साधी ब्रह्मज्ञान ।
तो लांडा गर्दभ जाण । पुच्छेंवीण दुपायी ॥४८॥
नरदेह हा मोठा पवित्र आहे. तो प्राप्त झाला असून जो ब्रह्मज्ञान साध्य करीत नाही, तो दोन पायांचा पुच्छविहीन लांडा गाढवच समजला पाहिजे ४८.
अपरोक्षज्ञानेंवीण वांझट । उदरार्थ दंभ खटपट ।
जेवीं मदिरापानी मर्कट । उडे उद्भट तडतडां ॥४९॥
अपरोक्षज्ञानाशिवाय केवळ पोटाकरितां ढोंगी ज्ञानाची खटपट करीत राहणे म्हणजे दारू प्यालेले माकड जसें जोराने तडातड उडत असते त्याप्रमाणेच होय ४९.
ब्रह्मज्ञानेंवीण शास्त्रज्ञ । ते अंधारींचे खद्योत जाण ।
अज्ञाननिशीमाजीं तेज गहन । सूर्योदयीं कोण त्यां देखे ॥३५०॥
ब्रह्मसाक्षात्काराशिवाय मोठे शास्त्रज्ञानी झाले, तरी ते अंधारातले काजवे म्हणून समजावे. अज्ञानरूप रात्रीमध्ये ते मोठे चकाकतात, पण सूर्योदय झाल्यावर त्यांना कोण विचारतो ? ३५०.
ब्रह्मज्ञानेंवीण संन्यासी । नटाच्या ऐसें मुंडण त्यांसी ।
सोकले मिष्टान्नभिक्षेसी । वृथा गेरूसी नाशिलें ॥५१॥
ब्रह्मज्ञानाशिवाय संन्यासी म्हणजे नाटकांतल्या पोर्यासारखे मिशा वगैरे बोडलेले व गोडगोड भिक्षेच्या अन्नाला सोकावलेले फुकट काव मात्र नासत असतात ! ५१.
मनीं विषयांचें अभिलाषण । धरूनि करिती वेदाध्ययन ।
ते वर्षाकाळींचे दर्दुर जाण । कर्दमपानें जल्पती ॥५२॥
मनांत विषयाचा अभिलाष धरून वेदाध्ययन करितात, ते पावसाळ्यांतले बेडूक म्हणून समजावे. बेडूक चिखल खाऊन ‘टरांव टरांव’ करीत असतात (त्याप्रमाणे ते !) ५२.
विषयप्राप्तीलागीं मौन । तें बकाचें बकध्यान ।
विषयबुद्धी जें गायन । तें खरी देखोन खर भुंके ॥५३॥
विषयप्राप्तीकरितां धरलेले मौन, तें बगळ्याचे ध्यान होय. आणि विषयबुद्धीने केलेले गायन म्हणजे गाढवीला पाहून गाढवाने खेकाळण्याप्रमाणे आहे ५३.
विषयालागीं उपन्यास । नाना युक्तींचे विलास ।
जेवीं पिंड देखोनि वायस । करिती बहुवस अतिशब्द ॥५४॥
विषयाकरिता उपन्यास म्ह. प्रवचनें इत्यादि करणे व अनेक प्रकारच्या युक्ति प्रयुक्ति लढविणे म्हणजे भाताची उंडी पाहून कावळे जसे काव काव करून अगदी कल्लोळ करून सोडतात त्यांतलाच प्रकार होय ५४.
पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड ।
तैसें विषयांलागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती ॥५५॥
भांड म्ह. नकले वगैरे लोक पोट भरण्यासाठी पाहिजे तसे अचावचा तोंड सोडतात, त्याप्रमाणे विषयासाठी शास्त्राचे भलभलते अर्थ सागून वितंडवाद घालतात ५५.
विषयवासना धरूनि थोर । बाह्य मिरविती आचार ।
जेवीं कागाचा शौचाचार । विष्ठातत्पर मानसीं ॥५६॥
मनामध्ये विषयाची दृढतर वासना धरून बाहेरून मात्र सदाचाराचा डौल आणतात, ते कावळ्याने बाहेरून शुद्धतेचा डौल आणून आंतून विष्ठेचे चिंतन करावें त्याप्रमाणे होत ५६.
हृदयीं धरूनि जीविका चांग । करिती अग्निहोत्रयाग ।
जेवीं वेश्या विकोनि अंग । चालवी साङ्ग संसारा ॥५७॥
ज्याप्रमाणे वेश्या आपला देह विकून आपला संसार यथास्थित चालविते, त्याप्रमाणे पोटामध्ये उपजीविकेचा हेतु धरून अग्निहोत्र, यज्ञयाग वगैरे करतात ५७.
नरदेहींचा हाचि स्वार्थ । साधावा चौथा पुरुषार्थ ।
तो न करितां जो का अर्थ । तो अनर्थ जाणावा ॥५८॥
परंतु चौथा पुरुषार्थ साधणे हाच नरदेहांतीळ खरा खरा स्वार्थ आहे. तो न साधतां भलताच अर्थ साधीत बसणें तो महाअनर्थ होय असें जाणावें ५८.
साधीना देहीं ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरांसमान ।
अथवा त्याहोनि हीन । तें विवेचन परियेसीं ॥५९॥
नरदेहांत येऊन ब्रह्मज्ञान साधीत नाही, तो कुत्र्यासारखा अथवा डुकरासारखा समजावा, किंवा त्याहूनही हीन प्रतीचा समजावा; त्यासंबंधींचा विचार ऐक ५९.
पशूसी हाणिल्या लाथा । द्वेष न धरी सर्वथा ।
मनुष्यासी ‘तूं’ म्हणतां । जीवघाता प्रवर्ते ॥३६०॥
पशूला लाथा मारल्या असता तो त्याचा कधींच द्वेष धरीत नाही; पण मनुष्याला ‘तू’ म्हटले की तो जीव घ्यावयाला उठतो ! ३६०.
पशूसी लोभ नाहीं संग्रहता । एक आहार होय भक्षिता ।
मग उरलिया अर्था । त्यागी सर्वथा तत्काळ ॥६१॥
पशूला साठवून ठेवण्याचा लोभ कधीच नसतो. फक्त खावयाचे तेवढे खातो; आणि बाकी राहिलेलें साफ सोडून देतो ६१.
मनुष्याचें लोभिष्ठपण । गांठीं असल्या कोटि धन ।
पोटा न खाय आपण । मा त्यागितां प्राण त्यजील ॥६२॥
पण मनुष्याचा लोभिष्टपणा किती पहा ! कोट्यवधि रुपये गांठीला असले तरी, आपण पोटाला सुद्धा खात नाही. मग ते द्यावयाचा प्रसंग आल्यास प्राणच टाकील ६२.
सायंप्रातर्चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।
मनुष्याची चिंता पाहतां । जन्मशतां न राहे ॥६३॥
पशूंना सकाळची किंवा संध्याकाळची चिंता म्हणून नसते ; पण मनुष्याची चिंता शेकडों जन्मही सुटत नाहीं ६३.
अमित धन असतां गांठीं । तरी चिंता अनिवार मोठी ।
नाथिलेंचि भय घे पोटीं । अविश्वासी सृष्टीं नरदेही ॥६४॥
अपरिमित द्रव्य गांठीला असले तरी चिंता ही अनिवार असतेच. नसतें भय पोटांत धरून बसतो. नरदेही प्राण्यास सारी सृष्टि अविश्वासाचीच वाटते ६४.
जरी मरों टेंकलें शरीर । तरी व्यवहारीं साधी वृत्तिक्षेत्र ।
पाया शोधोनि बांधी घर । पुत्रपौत्र नांदावया ॥६५॥
शरीर जरी मरावयाला टेकलें, तरी देवघेवी करून वतनवाडी घेतच असतो. आणि पाया खणून नातू पणतू नांदावे म्हणून घर बांधीत असतो ! ६५.
ऐसी दुस्तर चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।
आतां मैथुनाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥
अशी दुर्धर चिंता पशूना कधीच नसते. आतां मैथुनाची खरी स्थिति सांगतो ती ऐक ६६.
पशूसी ऋतुकाळीं मैथुन । मग स्त्रियेसी नातळे आपण ।
पुरुषासी नित्य स्त्रीसेवन । गरोदरही जाण न सोडी ॥६७॥
पशु हे ऋतुकालींच मैथुन करतात, आणि मग त्या स्त्रियेला शिवतही नाहीत, पण पुरुष हे दररोज स्त्रीसंग करीत असतात. गरोदरपणातही सोडीत नाहीत ! ६७.
काम क्रोध सलोभता । चिंता निंदा अतिगर्वता ।
हें मनुष्याचेचि माथां । पशूसी सर्वथा असेना ॥६८॥
काम, क्रोध, लोभ, किंवा निंदा आणि गर्विष्टपणा हे सारे मनुष्याच्याच माथ्यावर आहेत. पशुंना ते मुळीच नसतात ६८.
न साधितां आत्मज्ञान । केवळ जे विषयी जन ।
ते श्वानसूकरांपरीस हीन । माणुसपण त्यां नाहीं ॥६९॥
याकरितां आत्मज्ञान साध्य न करता जे लोक केवळ विषयी होऊन राहातात, ते कुत्र्यापेक्षा व डुकरापेक्षाही नीच होत. त्यांना मनुष्यपणाच नाही म्हणून समजावे ६९.
विषयाचें जें सुख जाण । तें स्वर्गी नरकीं समान ।
जें इहलोकीं भोगी श्वान । तें स्वर्गी जाण इंद्रासी ॥३७०॥
विषयाचे जें सुख आहे, ते स्वर्गात काय आणि नरकांत काय, सारखेच असते. या मृत्युलोकांत जे विषयसुख कुठे भोगते, तेंच सुख स्वर्गामध्ये इंद्र भोगतो ३७०.
मनुष्यदेहावांचोनी । पशुपक्ष्यादि नाना योनी ।
त्या विषयभोगालागोनी । विषयच्छेदनीं नरदेह ॥७१॥
मनुष्यदेहाशिवाय इतर ज्या पशुपक्ष्यादि अनेक प्रकारच्या योनी आहेत, त्या विषयोपभोगाकरितांच आहेत; परंतु नरदेह मात्र विषयत्यागाकरिता आहे ७१.
तो नरदेह कैसेनि जोडे । ते प्राप्तीचें कठिण गाढें ।
तें सांगेन तुजपुढें । परिस निवाडें विभागु ॥७२॥
तो नरदेह कसा मिळतो ? तर तो मिळणे फारच कठिण आहे. त्याचाही प्रकार तुला पुढे सांगतों तो नीट ऐकून घे ७२.
अत्यंत सुकृतें स्वर्गी चढे । अत्यंत पापें अधोगती घडे ।
पापपुण्य निःशेष झडे । तैं आतुडे निजमुक्ति ॥७३॥
पुण्य फार झाले म्हणजे जीव स्वर्गास चढतो, आणि पाप फार झाले म्हणजे तो नरकांत पडतो; पाप व पुण्य दोन्ही निखालस नाहीशी झाली म्हणजे मुक्ति प्राप्त होते ७३.
जैं पापपुण्य समान समीं । तैं मनुष्यदेह आक्रमी ।
जन्म पावे कर्मभूमीं । आश्रमधर्मी सुमेधा ॥७४॥
जेव्हां पापपुण्य समसमान होते तेव्हां मनुष्यदेह प्राप्त होतो व कर्मभूमीत आश्रमधर्मामध्ये बुद्धिवंत होऊन जन्मास येतो ७४.
साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तंव न घडे ।
अवचट हाता चढे । भाग्य चोखडें जयाचें ॥७५॥
मनुष्यदेह हटकून प्राप्त होईल, असे कांही करता येत नाही. तर ज्याचे भाग्यच उत्तम असते, त्याच्याच हाताला तो अकस्मात लागतो ७५,
मोलें अनर्घ्य रत्नें येती । तैसा चिंतामणी न ये हातीं ।
बहुत योनिये जन्म होती । परी मनुष्यदेहप्राप्ती दुर्लभ ॥७६॥
अमूल्य रलें मोल देऊन घेता येतात; तसा चिंतामणि कांहीं हाताला येत नाही. तद्वत् पुष्कळ योनींमध्ये जन्म येतो, पण मनुष्यदेह मिळणें परम दुर्लभ आहे ७६.
ऐसा नरदेह पावोनि देख । जो न साधीचि ब्रह्मसुख ।
तो जनांमाजीं परम मूर्ख । विश्वासघातक देवाचा ॥७७॥
असा नरदेह प्राप्त झाला असतां जो ब्रह्मसुखाचे साधन करीत नाही, तो जनामध्ये महामूर्ख व देवाचा विश्वासघातकी समजावा ७७.
निजात्मप्राप्तीलागोनी । देवें केली मनुष्ययोनी ।
तो देवाचा विश्वास बुडवूनी । विषयसेवनीं निजपतन ॥७८॥
निजात्मप्राप्तीसाठींच देवाने मनुष्ययोनी केलेली आहे; तो देवाचा विश्वास बुडविला असतां आपलें पतनच घडणार ७८.
होतें पितरांचें मनोगत । पुत्र होईल हरिभक्त ।
कुळ उद्धरील समस्त । विषयीं प्रतिहत तें केलें ॥७९॥
पितरांचा मोठा हेतु असतो की, आपला पुत्र मोठा हरिभक्त होईल, आणि सार्या कुळाचा उद्धार करील. पण विषयासक्तीने त्या सर्वांवरच पाणी ओतले ७९.
हो का सकळ भाग्याचें फळ । मनुष्यदेह गा केवळ ।
तें करावया सफळ । वैराग्य अढळ म्यां केलें ॥३८०॥
(अवधूत म्हणतात) मनुष्यदेह हा केवल सकळ भाग्याचे फळ आहे, हे वाक्य सफल करण्याकरितांच मी अढळ असें वैराग्य धारण केले आहे ३८०.
एवं सञ्जातवैराग्यो विज्ञानालोक आत्मनि ।
विचरामि महीमेतां मुक्तसङ्गोऽनहङ्कृतः ॥ ३० ॥
[श्लोक ३०] अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो. (३०)
देहो निजात्मसाधनीं साधक । तोचि विषयभोगीं बाधक ।
ऐसें देखोनियां देख । केलें निष्टंक वैराग्य ॥८१॥
आत्मसाधन करण्याला देह हा साधक आहे ; पण तोच विषयभोगामुळे बाधक होतो. असें जाणून मी निश्चयाचे वैराग्यच धारण केले ८१.
त्या वैराग्याचेनि बळें । गुरुकृपावचनमेळें ।
विषयइंद्रियांचे पाळे । एकेचि वेळें विभांडिले ॥८२॥
त्या वैराग्याच्या बळाने आणि गुरुकृपावचनाच्या साहाय्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटातूट करून सोडली ८२.
अविद्या जंव घ्यावी जीवें । तंव ‘अविद्या’ येणें नांवें ।
स्वांगें मी विद्यमान नोहे । हेंही अनुभवें जाणितलें ॥८३॥
जीवाने जो अविद्येचा अंगीकार करावा तोंच ती ‘अविद्या’ ह्या नांवाने म्हणजे ‘मी मुळी विद्यमानच नाही’ असे म्हणते, हे मी अनुभवाने ओळखले ८३.
ऐशी मिथ्यात्वें अविद्या आतां । चित्प्रकाश पूर्ण लाभे हाता ।
तेणें स्वदेहस्थ अहंता । गेली सर्वथा निःशेष ॥८४॥
अशा प्रकारे मिथ्यात्वानें अविद्या नाहीशी झाल्यामुळे चिद्प्रकाशाचा पूर्ण लाभ पदरांत पडला व तो पडल्यामुळे या देहांत असलेली अहंताही निखालस निघून गेली ८४.
ज्ञानसाधन जो निजदेहो । तयाच्या ठायीं वैराग्य पहा हो ।
मा देहसंबंधाचा स्नेहो । कैसेनि राहों शकेल ॥८५॥
ज्ञानाचें साधन जो आपला देह, त्याच्याच ठिकाणी जर वैराग्य, तर मग देहासंबंधीयांचा स्नेह तरी कसा राहणार ? ८५.
ऐसेनि अनुभवें पाहीं । निःसंग मी विचरें मही ।
अहंता स्वदेहीं नाहीं । पुशिलें तें पाहीं सांगितलें राया ॥८६॥
अशाच अनुभवाने मी निःसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. स्वदेहामध्ये अहंता मुळीच कशी नाही, हे जे तूं विचारलेंस, त्याचे उत्तर हें मी तुला सांगितले ८६.
जैं पुरुषाची अहंता गळे । तैं देह अदृष्टयोगें चळे ।
जेवीं सुकलें पान वायुबळें । पडिलें लोळे सर्वत्र ॥८७॥
पुरुषाची अहंता जेव्हां नाहीशी होते, तेव्हां प्रारब्धयोगाप्रमाणे देह चालत असतो. सुकलेलें पान पडलेले असले, तर ते वाऱ्याच्या धक्क्याने चहूंकडे लोळत असते त्याप्रमाणेच हे ८७.
यालागीं ब्रह्मसाक्षात्कारा । वृत्ति लय पावे जंव वीरा ।
तंववरी जो वैराग्यें खरा । अभंग पुरा पुरुषार्थी तो ॥८८॥
याकरिता हे वीरा ! जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कारामध्ये वृत्ति लय पावली नाही, तोपर्यंत जो खर्याखुऱ्या वैराग्याने राहतो, तोच निर्व्यंगणि परिपूर्ण पुरुषार्थी होतो ८८.
म्हणसी एका गुरूचे ठायीं । तुज सर्वथा विश्वास नाहीं ।
ये अर्थीं सावध होईं । विशद पाहीं सांगेन ॥८९॥
आता तूं कदाचित् म्हणशील की, तुझाही एका गुरूवर असा असा कधींच विश्वास नव्हता, तर त्याकरिता आतां सावध होऊन ऐक. तेच तुला आतां विशद करून सांगतों ८९.
गुरूनें सांगतांचि कानीं । ज्याची वृत्ति जाय विरोनी ।
जेवीं मिळतां लवणपाणी । अभिन्नपणीं समरसे ॥३९०॥
मीठ आणि पाणी एकत्र होतांच ऐक्यरूपाने जसे समरसून जाते, त्याप्रमाणे गुरुवाक्य कानी पडतांच ज्याची वृत्ति विरून जाते ३९०,
केल्यासी साधकबाधकताबाध । हें बोलणें अतिअबद्ध ।
जेवीं निमालियासी वोखद । न पाजवे दुग्ध गर्भस्था ॥९१॥
त्याला साधकबाधकापासून पीडा होते असे म्हणणेच अगदी असंबद्ध आहे. जसें मेलेल्याला औषध किंवा गर्भाला दूध पाजतां येत नाही तसे ११.
यापरी त्यासी कर्तव्यता । नाहीं नाहीं गा सर्वथा ।
परी ऐसी हे अवस्था । ज्यासी तत्त्वतां न लभेचि ॥९२॥
ह्याप्रकारे त्याला खरोखर कर्तव्य म्हणून उरलेले नसते; पण अशी अवस्था सर्वांना प्राप्त होत नाहीं ९२.
गुरूनें सांगितलें कानीं । स्वरूपाबोध झाला मनीं ।
परी तें न राहेचि निश्चळपणीं । बाह्यदर्शनीं विक्षेपु ॥९३॥
गुरुने कानांत महावाक्य सांगितले व मनांत आत्मस्वरूपाचा बोध झाला; पण तो फार वेळ टिकत नाही. बाह्य पदार्थाकडे लक्ष गेलें की विक्षेप उत्पन्न झालाच ! ९३.
आसनीं बैसल्या स्वरूपस्थितीं । आसन सोडिल्या प्रपंचस्फूर्ती ।
ऐशी एकदेशी स्थिती । नातळती निजयोगी ॥९४॥
आसनावर बसले की स्वरूपस्थिति व आसन सोडले की संसारस्फूर्ति ! अशी एकदेशीय स्थिति खऱ्या योग्याला कधी शिवत नाहीं ९४.
देह आसनीं निश्चळ । अथवा कर्मीं हो चंचळ ।
परी वृत्ति सर्वदा निश्चळ । तेचि निर्मळ निजयोगी ॥९५॥
देह आसनावर स्थिर असो की कर्मामध्ये तो वावरत असो, पण ज्याची वृत्ति सर्वकाळ निश्चळ, तोच निर्मळ आत्मयोगी होय ९५.
परशुरामेंसीं रणांगणीं । भीष्म भिडला निर्वाणबाणीं ।
तोडरीं घातिला जिणोनी । वृत्ति समाधानीं अचंचळ ॥९६॥
समरांगणामध्ये परशुरामाच्या समोरासमोर येऊन भीष्माने त्याच्यावर निर्वाणींचे बाण सोडले, त्याला पैजेने जिंकले, तरी भीष्माच्या समान वृत्तींत अंतर पडले नाही. ती समाधानांत अगदी स्थिर होती ९६.
करितां निर्वाणयुद्धीं । ज्याची न मोडे समाधी ।
हेंचि साधावया त्रिशुद्धी । चोवीस गुरु विधीं वंदिलें म्यां ॥९७॥
निर्वाणयुद्धासारख्या घोर कर्मात सुद्धा समाधि मोडूं नये हेच खरोखर साधण्याकरिता मी चोवीस गुरूंना विधिपूर्वक वंदन केले ९७.
देहनिश्चळत्वें वृत्ति निश्चळ । देहचंचळत्वें वृत्ति चंचळ ।
तरी ते देहबुद्धीचि सबळ । नव्हे केवळ निजबोधु ॥९८॥
देह स्थिर असला की वृत्ति स्थिर असावयाची, आणि देह चंचळ झाला की वृत्ति चंचळ व्हावयाची; तर ती सबळ देहबुद्धिच समजावी. तो शुद्ध आत्मबोध नव्हे ९८.
होतां प्रपंचदर्शन । वृत्तीसी विक्षेप होय जाण ।
तो विक्षेप करावया छेदन । बहुगुरुसाधन म्यां केलें ॥९९॥
प्रपंच पाहिला की वृत्तीला विक्षेप होतो. असा विक्षेप काढून टाकण्यासाठीच मी बहुगुरु-साधन केलें. ९९.
निजगुरूंनीं सांगितल्या अर्था । त्या साधावया परमार्था ।
नाना प्रपंचपदार्था । गुरुसंस्था म्यां केली ॥४००॥
निजगुरूंनी सांगून दिलेला जो परमार्थ, तो साधण्यासाठींच प्रपंचांतीलच अनेक पदार्थांना मी गुरुपद दिले ४००.
जेथोनिया विक्षेपता । तेचि लाविली गुरुत्वपथा ।
ऐसेनि साधनें साधितां । जग स्वभावतां परब्रह्म ॥१॥
ज्याच्यापासून विक्षेप उत्पन्न व्हावयाचा, त्यालाच मी गुरुपणा दिला. अशा युक्तीने साधन केल्यामुळे, जग हे आपोआपच परब्रह्मस्वरूप झाले .१.
पूर्वी गुरूंनीं बोधिलें नाहीं । तरी पृथ्व्यादिकें बोधितील कायी ।
तोचि निजार्थ साधावया पाहीं । गुरूउपायीं प्रवर्तलों ॥२॥
पूर्वी गुरूनेच जर बोध केला नसता, तर पृथ्वी वगैरेंनी काय बोध दिला असता ! निजस्वार्थ साधण्यासाठी मी गुरूंच्या साधनांत पडलों २.
न ह्येकस्माद् गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात्सुपुष्कलम् ।
ब्रह्मैतदद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] म्हणून एकाच गुरूकडून पुष्कळ ज्ञान मिळाले, तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. (३१)
गुरूनें सांगितलें निजज्ञान । हृदयीं प्रकाशलें चिद्भान ।
तें विद्युत्प्राय चंचळ जाण । स्थैर्यपण त्या नाहीं ॥३॥
गुरूने आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयांत चिद्भान प्रकट होते; पण ते विद्तुल्लतेत्रमाणे चंचळ असते, त्याला स्थिरता नसते ३.
जें मूळींचि चंचळ । तें कदा नव्हे पुष्कळ ।
क्षणां भासे क्षणां चपळ । तेणें तळमळ साधका ॥४॥
मुळींच में चंचळ, ते कधींच दृढ होणे शक्य नाही. ते क्षणांत भासते, क्षणांत लुस्प्त होते. त्यामुळे साधकाला तळमळ लागून राहते ४.
जैसें मुखींचें आमिष जाये । तेणें सर्प डंवखाइला राहे ।
तैसी वेदना साधकां होये । वियोगु न साहे सर्वथा ॥५॥
सापाच्या तोंडांतलें आमिष सुटून गेलें म्हणजे तो जसा चरफडत राहतो, त्याप्रमाणे साधकांना वेदना लागून राहतात. आत्मभानाचा वियोग त्याला मुळीच सहन होत नाही ५,
येरवीं ब्रह्म अद्वितीय नित्य । हें सकळ ऋषींचें संमत ।
त्यांसीही पुसों जातां बहुत । विक्षेप तेथ उठती ॥६॥
बाकी ब्रह्म हें अद्वितीय व नित्य असल्याचे सर्व ऋषींना संमतच आहे; पण त्यांनाही विचारायला गेले असता त्यांतही अनेक विक्षेप उत्पन्न होतात ६.
एक म्हणती ब्रह्म सगुण । एक म्हणती तें निर्गुण ।
ऐसे वाद करिती दारुण । युक्तिखंडण अभिमानें ॥७॥
कोणी म्हणतात ब्रह्म हे सगुण आहे, कोणी म्हणतात तें निर्गुण आहे. याप्रमाणे विद्वत्तेच्या अभिमानाने एकमेकांच्या युक्तिवादाचे खंडन करून मोठा कडाक्याचा वादविवाद माजवितात ७.
एक म्हणती ब्रह्म सप्रपंच । एक म्हणती निष्प्रपंच ।
मिळोनियां पांचपांच । शब्दकचकच वाढविती ॥८॥
कोणी म्हणतात ब्रह्म सप्रपंच आहे; कोणी म्हणतात ते निष्प्रपंच आहे. असे पांचपांच जमून शब्दांची कचकच मात्र वाढवितात ८.
प्रपंचदर्शन विक्षेपता । तेथ साधावया निजऐक्यता ।
सुबुद्धीनें नाना पदार्था । गुणग्राहकता गुरुरूपें ॥९॥
प्रपंचदर्शनाने विक्षेपता उत्पन्न होते, त्या वेळी आत्मैक्य साधण्याकरितां सुबुद्धीने नाना पदार्थांच्या ठिकाणचे गुण गुरुरूपाने ग्रहण केले पाहिजेत ९.
तेथ साधकांचे प्रश्न । सहसा न पवती समाधान ।
यालागीं पुसावया मन । न रिघे जाण ते ठायीं ॥४१०॥
विद्वान् लोकांकडे साधकांच्या प्रश्नाचे समाधान व्हावयाचे नाही, म्हणून विचारावयाला त्या ठिकाणी मन धजत नाही ४१.
जेथूनि विक्षेपता वाढे । तेथेंचि ऐक्यता जोडे ।
तें नानागुरुत्वें रोकडें । साधन चोखडें योजिलें ॥११॥
याकरितां जेथून विक्षेप उत्पन्न होतो, तेथेच ऐक्य घडते; ह्याकरितां अनेक पदार्थांना गुरुत्व देणे हेच उत्तम साधन मी योजिले ११.
जीं जीं सांगितलीं गुरुलक्षणें । तीं तीं निजबुद्धीचीं साधनें ।
समूळ विक्षेपु तेणें । तीव्र धारणें छेदिला ॥१२॥
गुरूची जी जी लक्षणे सांगितली, ती ती आत्मबुद्धीचीच साधनें होत. तेव्हा त्याच्याच तीक्ष्ण धारणेनें विक्षेप सारा छेदून टाकला १२.
तेणें चंचलत्वें निश्चल । फावलें निजबोधाचें मूळ ।
दृश्य देखतां केवळ । भासे सकळ चिन्मात्र ॥१३॥
त्या चंचलपणानेच आत्मज्ञानाचे निश्चळ मूळ सांपडले. दृश्य पदार्थ पाहिला तरीसुद्धा सगळे चित्स्वरूपच भासू लागले १३.
जें माझ्या निजगुरूंनीं । पूर्वी दिधलें होतें बोधुनी ।
तेंचि नाना गुरुत्वें साधूनी । विक्षेप छेदुनी पावलों ॥१४॥
पूर्वी माझ्या गुरूंनी जे ज्ञान मला दिले होते, तेंच अनेक गुरु करून विक्षेपाचें छेदन केल्याने मला दृढ झालें १४.
निजगुरु तो एकुचि जाण । इतर गुरु साधकत्वें साधन ।
हें यथातथ्य लक्षण । तुज निरूपण म्यां केलें ॥१५॥
मोक्षगुरु हा एकच असतो; पण इतर गुरु त्याचेच ज्ञान दृढतर करण्यास साधनीभूत होतात. त्याचे यथातथ्य स्वरूप मी तुला पूर्वी सांगितलेच आहे १५.
येथ प्रपंचाचें भानाभान । कर्म करितां न कळे जाण ।
लाधली निजबोधाची खूण । समदर्शन सर्वदा ॥१६॥
आतां कर्म केले तरी प्रपंचाचे भानाभान मुळी कळत सुद्धा नाही. निजबोधाची खूण पटल्यामुळे सदासर्वदा समदृष्टीच होऊन राहिली आहे १६.
दृश्य देखतां दृष्टीं । नव्हे दृश्येंसीं भेटी ।
हारपली कर्मत्रिपुटी । बोधकसवटी अभिनव ॥१७॥
आतां दृश्य पदार्थ डोळ्यांनी जरी पाहिला, तरी तो दृश्यपणाने मुळीच दिसत नाही. कर्माची त्रिपुटी मुळीं नाहींशीच होऊन गेली. इतका ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे १७.
यथेष्ट करितां भोजन । उष्टेना निराहारलक्षण ।
जगेंसीं वागतां जाण । एकलेपण मोडेना ॥१८॥
यथेच्छ भोजन केले तरी निराहार लक्षण मोडत नाही, त्याप्रमाणेच जगाशी संबंध ठेवला तरी, आपला एकटेपणा मोडत नाहीं १८.
तरंग सागरामाजीं क्रीडतां । न मोडे उदकाची एकात्मता ।
तेवीं जगामाजीं वर्ततां । दुजी वार्ता मज नाहीं ॥१९॥
समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचे ऐक्य कांहीं मोडत नाही. त्याप्रमाणेच जगामध्ये वागत असताही मला दुजेपणाची वार्ता माहीत नाहीं १९.
नवल सद्गुरूची नवायी । सर्वी सर्व तोचि पाहीं ।
गुरूवेगळें रितें कांहीं । उरलें नाहीं सर्वथा ॥४२०॥
सद्गुरुचमत्कार मोठा अपूर्व आहे. सर्वांमध्ये सारा तोच भरून राहिला आहे. गुरूशिवाय रिकामें असें मुळींच काही उरलेले नाही ४२०.
आतां माझें जें मीपण । तें सद्गुरु झाला आपण ।
बोलतें तुझें जें तूंपण । तेंही जाण सद्गुरुचि ॥२१॥
आता माझे जे मीपण आहे, तेही गुरु आपणच होऊन राहिला आहे. आणि तुझे म्हणून बोलणारें जें तूंपण आहे, तेंही सद्गुरुच आहे, असें तूं समज २१.
याहीपरी पाहतां । माझा गुरु एक एकुलता ।
तेथें दुजेपणाची वार्ता । नाहीं सर्वथा यदुराया ॥२२॥
हे यदुराजा ! अशा रीतीनेही पाहिले असतां माझा गुरु एकुलता एकच आहे. त्याच्या दुसरेपणाची गोष्टच नाही २२.
ऐशी सद्गुरुकथा । तुज सांगिली परमार्था ।
हरिखें आलिंगिलें नृपनाथा । दोघां ऐक्यता निजबोधें ॥२३॥
अशी ही सद्गुरूची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली. असें म्हणून मोठ्या आनंदाने अवधूताने राजास आलिंगन दिले. निजबोधाच्या योगानें ते दोघे एकरूप होऊन गेले २३.
जीवीं जीवा पडली मिठी । आनंदें वोसंडली सृष्टी ।
तेणें वाचेसी पडली बेलवटी । बोलों उफराटी विसरली ॥२४॥
अंतरंगाला अंतरंग भिडले. सृष्टि आनंदाने ओसंडून आली. तेणेंकरून वाणीला खीळ बसली, उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली २४.
हरिखु न संठवे हृदयभवनी । बाहेर वोसंडे स्वेदेजोनी ।
आनंदघन वोळला नयनीं । स्वानंदजीवनीं वर्षतु ॥२५॥
तो हर्ष हृदयमंदिरांत मावेनासा होऊन घामाच्या रूपाने बाहेर पडला आणि आनंदरूपी मेघ डोळ्यांमध्ये भरून येऊन प्रेमाश्रूचा वर्षाव करूं लागला २५,
तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी ।
म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥
अहंकाराची बेडी तुटली; संसारसमुद्राच्या पैलतीराला पोंचलों आणि अभेद्य अविद्या जिंकली म्हणून रोमांनी आपली गुढी उभारली (सर्वांग रोमांचित झाले) २६.
समूळ देह भावो पळाला । यालागीं गात्रकंपु चळचळा ।
संकल्पविकल्प निमाला । मनेंसीं बुडाला मनोरथु ॥२७॥
देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले; संकल्पविकल्प मावळला; आणि मनासह मनोरथ बुडाला २७.
जीवभावो उखिता । यदूनें अर्पिला गुरुनाथा ।
तें चिह्न बाहेरीं तत्त्वतां । दावी सर्वथा निजांगीं ॥२८॥
यदूनें सारा जीवभाव गुरुनाथाला अर्पण केला. ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले २८.
तो अवधूत जाण दत्तात्रेया । तेणें आलिंगूनि यदुराया ।
निजरूपाचा बोधु तया । अनुभवावया दीधला ॥२९॥
तो अवधूत साक्षात् दत्तात्रेयच होता; त्यानें यदुराजाला आलिंगन दिले; आणि आत्मस्वरूपज्ञानाचा त्याला अनुभव आणून दिला २९.
दत्तात्रेयशिष्यपरंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा ।
तेणें जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कलियुगीं ॥४३०॥
दत्तात्रेयाची शिष्यपरंपरा म्हटली म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदु आणि ‘जनार्दन’ हा तिसरा शिष्य दत्ताने कलियुगामध्ये केला ४३०.
गुरुप्राप्तीलागीं सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता ।
विसरला तिन्ही अवस्था । सद्गुरु चिंतितां चिंतनीं ॥३१॥
आपल्याला गुरुप्राप्ति कशी होईल म्हणून जनार्दनाला अतिशय चिंता लागून राहिली होती. त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये त्याला तिन्ही अवस्थांचा विसर पडला ३१.
देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था ।
येणें जाहलें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥३२॥
परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे, त्याची ती खरीखरी तळमळ जाणून श्रीदत्तदेव त्याच्याकडे आले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला ३२.
हातु ठेवितांचि तत्काळ । बोधु आकळिला सकळ ।
मिथ्या प्रपंचाचे मूळ । स्वरूप केवळ स्वबोधें ॥३३॥
हात ठेवण्याबरोबर तत्काल जनार्दनाला आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचें मूळच मिथ्या करून सोडले ३३.
कर्म करूनि अकर्ता । तोचि अकर्तात्मबोधु जाहला देता ।
देहीं असोनि विदेहता । तेही तत्त्वतां आकळिली ॥३४॥
कर्म करून अकर्ता असणे तोच अकर्तेपणाचा बोध श्रीदत्तांनी त्याला दिला. देहांत असून विदेही राहण्याचा बोधही त्याने आकलन केला ३४.
गृहाश्रमु न सांडितां । कर्मरेखा नोलांडितां ।
निजव्यापारीं वर्ततां । बोधु सर्वथा न मैळे ॥३५॥
गृहस्थाश्रम न सोडतां, कर्ममर्यादेचे उल्लंघन न करता, आपल्या व्यवहारांत वागले तरी आत्मबोध केव्हाही मळत नाही ३५.
तो बोधु आकळतां मना । मन मुकलें मनपणा ।
अवस्था नावरेचि जनार्दना । मूर्च्छापन्न पडियेला ॥३६॥
असा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे मनाचा मनपणाच नाहीसा झाला. ती अवस्था जनार्दनाला न आवरता आल्यामुळे तो मूर्छा येऊन पडला ३६.
त्यासी सावध करूनि तत्त्वतां । म्हणे प्रेमा आहे सत्त्वावस्था ।
तोही गिळोनि सर्वथा । होयीं वर्तता निजबोधें ॥३७॥
तेव्हा त्याला तत्काळ सावध करून दत्तात्रेय म्हणाले की, “असा प्रेमा ही सत्त्वगुणाची अवस्था आहे; करितां तो गिळून टाकून निजबोधानेच वर्तत राहा” ३७.
पूजाविधी करोनियां । जंव जनार्दनु लागला पायां ।
तंव अदृश्य जाहला दत्तात्रेया । योगमायाचेनि योगें ॥३८॥
तेव्हां जनार्दन पूजाविधि करून पायांवर मस्तक ठेवतो आहे, तोच योगमायेच्या योगाने दत्तात्रेय अदृश्य झाले ३८.
कथेसी फांकलों सर्वथा । तो कोपु न मनावा श्रोतां ।
प्रसंगें गुरुविवंचना होतां । मीही गुरुकथा बोलिलों ॥३९॥
(एकनाथ श्रोत्यांना म्हणतात ) कथेमध्ये ही आडकथा झाली, याबद्दल श्रोत्यांनी राग मानू नये. प्रसंगानुसार गुरूसंबंधी विचार निघाला, म्हणून मीही गुरूचीच कथा सांगितली ३९.
मज तंव चुकी पडिली मोठी । चुकूनि सांगितली गुरुगोठी ।
तेही संस्कृत नव्हे मराठी । वृथा चावटी न म्हणावी ॥४४०॥
माझ्या हातून ही मोठीच चुकी झाली. माझ्या गुरूची कथा मी चुकून सांगितली. तीही संस्कृतांत नव्हे, तर मराठीत ! पण ही उगीच बडबड केली असें मात्र म्हणू नये ४४०.
जो असेल गुरुभक्त । तो हें जाणेल मनोगत ।
जो गुरुस्मरणीं सदोदित । त्यासी हें हृद्गत कळेल ॥४१॥
जो गुरूचा भक्त असेल, तो ह्यांतील हृद्गत ओळखील आणि जो निरंतर गुरूचे स्मरण करीत असेल, त्यालाच ह्यांतील मर्म कळेल ४४१ .
ज्यांसी गुरुचरणीं श्रद्धा गाढी । ज्यांसी गुरुभजनीं अतिआवडी ।
जिंहीं गुरुप्रेम जोडिलें जोडी । हे गोडी जाणती ॥४२॥
ज्यांची गुरुचरणावर दृढतर निष्ठा असेल; गुरुभजनाची ज्यांना अत्यंत आवड असेल, ज्यांनी गुरुप्रेम संपादन केले असेल, त्यांनाच यांतील गोडी समजेल ४२.
ज्या सद्गुरूचें नांव घेतां । चारी मुक्ती वोडविती माथा ।
मुक्ति नावडे गुरुभक्तां । नित्यमुक्तता गुरुचरणीं ॥४३॥
सद्गुरूचें नांव घेतले असतां चारीही मुक्ति मस्तक वांकवितात, परंतु गुरुभक्तांना मुक्ति मुळीच आवडत नाही. कारण, गुरुचरणाच्या ठिकाणी नित्यमुक्तता सहजच असते ४३.
ज्याचें घेतां चरणतीर्थ । चारी मुक्ती पवित्र होत ।
पायां लागती पुरुषार्थ । धन्य गुरुभक्त त्रिलोकीं ॥४४॥
ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असतां चारीही मुक्ति पवित्र होऊन जातात आणि सारे पुरुषार्थ पायाला लागतात, ते गुरुभक्त त्रैलोक्यांत धन्य होत ४४.
चैतन्य नित्य निराधार । निर्धर्मक निर्विकार ।
त्याचा केला जीर्णोद्धार । सत्य साचार जगद्गुरु ॥४५॥
नित्य, निराधार, निर्धर्म व निर्विकार अशा चैतन्याचा सद्गुरूंनीच खरोखर जीर्णोद्धार केला, म्हणून सद्गुरु हेच सत्स्वरूप होत ४५.
सद्गुरुकृपा नव्हतां । नव्हती देवाची कथावार्ता ।
देवासी देवपणीं स्थापिता । सत्य सर्वथा सद्गुरु ॥४६॥
सद्गुरूची कृपा नसती तर देवांची कोणी वास्तपुस्तसुद्धा केली नसती. देवाला देवपणा देणारा खरोखर एक सद्गुरुच ४६.
सद्गुरु कृपेवीण पाहीं । देवो असतुचि झाला होता नाहीं ।
त्यासी देवपणीं ठेवूनि ठायीं । भजविता पाहीं गुरुरावो ॥४७॥
खरोखर सद्गुरूच्या कृपेशिवाय, देव असूनही नाहींसारखा झाला होता. त्याला देवपणाने ठिकाणावर आणून त्याचे भजन करावयास लावणारा एक गुरुराजच होय ४७.
त्या सद्गुरूची कथा । चुकोनि झालों बोलता ।
थोर अपराधु हा माझे माथां । क्षमा श्रोतां करावी ॥४८॥
त्या सद्गुरूची कथा मी चुकून बोललो. हा फार मोठा अपराध झाला. श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा करावी ४८.
वृथा बोलिलों नाहीं जाण । झालें बोलावया कारण ।
दत्तात्रेयशिष्यकथन । करितां जनार्दन आठवला ॥४९॥
पण हे मी काही उगीच बोललों नाही. ते बोलावयाला एक कारण झाले ते असें की, दत्तात्रेयाचे शिष्य सांगतांना जनार्दनाचेही स्मरण झाले ४९.
मी जरी नाठवीं जनार्दनासी । परी तो विसरों नेदीच आपणासी ।
हटें देतुसे आठवणेंसी । अहर्निशीं सर्वदा ॥४५०॥
मी जरी जनार्दनाची आठवण करीत नाही म्हटले, तरी तो मला आपला विसर पडूंच देत नाही. तो हट्टानें निरंतर अहोरात्र मला आठवण देतच असतो ४५०.
जिकडे मी विसरों जायें । तिकडेचि तो येऊनि राहे ।
मी जरी त्याजकडे न पाहें । तें न पाहणें होये तो माझें ॥५१॥
मी जिकडे विसरावयाला जातो, तिकडेच तो येऊन उभा राहतो; मी जरी त्याच्याकडे न पाहिले तरी ते माझें न पाहणेंही तोच होतो ५१.
घटु सांडूं पाहे आकाशासी । तंव आकाश न सांडी घटासी ।
तेवीं जनार्दनु आम्हांसी । अहर्निशीं लागला ॥५२॥
घट आकाशाला सोडायला पहातो, पण आकाशच घटाला सोडीत नाही; त्याप्रमाणे जनार्दन हा रात्रंदिवस आमच्या मागे लागलेला आहे ५२.
मी न करीं त्याची कथा । तंव तोचि होये मुखीं वक्ता ।
ऐसेंनि बलात्कारें बोलविता । काय म्यां आतां करावें ॥५३॥
मी त्याची गोष्ट करीत नाही; पण तोच माझ्या मुखांत वक्ता होऊन राहातो. असें बळजबरीने तो बोलावयाला लावतो. तेव्हां आता मी करावे तरी काय ? ५३.
दृश्य मी देखावया बैसें । तंव दृश्या सबाह्य जनार्दनु दिसे ।
श्रवणीं ऐकतां सौरसें । शब्दीं प्रवेशे जनार्दनु ॥५४॥
मी एखादा दृश्य पदार्थ पहावयाला बसतो, तो त्या दृश्य पदार्थाच्या आंत बाहेर जनार्दनच दिसू लागतो. बरे, कानांनी काही ऐकावयाला जातो, तर त्या शब्दांमध्ये जनार्दनच शिरूर बसतो ५४.
आतां नाइकें न पाहें । म्हणौनि मी उगा राहें ।
तंव उगेपणाचेनि अन्वयें । जनार्दनु पाहे लागला ॥५५॥
आता मी ऐकूही नये आणि पाहूंही नये, असे म्हणून उगाच बसलों, तर त्या उोगेपणाच्या रूपानेही जनार्दनच दिसू लागतो ५५.
ऐसा अडकलों त्रिशुद्धी । जनार्दनु उगंडूं नेदी ।
श्रोता सांगावी जी बुद्धी । मी अपराधी सर्वथा ॥५६॥
असा खरोखर मी अडकून पडलों आहे. जनार्दन कांही विसरूं देत नाही. मी सर्वस्वी अपराधी आहे. श्रोत्यांनीच ह्यावर उपाय सांगावा ५६.
श्रोते म्हणती नवलावो । येथ न देखों अहंभावो ।
पाहतां बोलाचा अभिप्रावो । प्रेम पहा हो लोटत ॥५७॥
तेव्हां श्रोते म्हणाले, “हे मोठे आश्चर्य आहे; या बोलण्यांत अहंभाव असा मुळीच दिसत नाही ; याच्या बोलण्याचा अभिप्राय पाहिला तर प्रेमाचेंच भरतें येते ५७.
येथील विचारितां बोल । क्षीराब्धीहून सखोल ।
नवल प्रेमाची वोल । येताति डोल स्वानंदें ॥५८॥
तुझ्या शब्दांचा विचार केला तर ते क्षीरसागराहूनही खोल दिसतात. तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा कांही अपूर्व आहे ! आम्हांला स्वानंदाने डोलावेसे वाटते ५८.
जें त्वां केलें गुरुनिरूपण । तें सप्रेम ब्रह्मज्ञान ।
थोर निवविलों जाण । नाहीं दूषण निरूपणा ॥५९॥
तूं जें गुरूबद्दल निरूपण केलेंस ते प्रेमळ ब्रह्मज्ञानाचेंच स्वरूप आहे. त्यामुळे आम्ही फार समाधान पावलों. तुझ्या निरूपणाला दूषण ठेवण्याला जागाच नाही ५९.
नित्य करावें गुरुस्मरण । तें गुरूनें केलें निजकथन ।
करितां अमृताचें आरोगण । पुरे कोण म्हणेल ॥४६०॥
गुरूचे स्मरण नित्य करीत असावे, हे तत्त्व गुरूनेच आपले आपण सांगितले. अमृताची मेजवानी पुरे कोण म्हणणार ? ४६०.
जनार्दनीं दृढ भावो । हाही कळला अभिप्रावो ।
निरूपणाचा नवलावो । रसाळ पहा हो वोडवला ॥६१॥
आणखी ह्यावरून जनार्दनाच्या ठिकाणी तुझी भक्ति अलोट आहे, हीही गोष्ट आम्हांस कळून चुकली. निरूपण केवळ अपूर्व होऊन त्याला रसाळपणाही प्राप्त झाला ६१.
तूं मूळकथा निरूपिसी । अथवा आडकथा सांगसी ।
परी गोडी या निरूपणाऐसी । न देखों आणिकांसी सर्वथा ॥६२॥
तूं मूळकथा निरूपण केलीस किंवा आडकथा सांगितलीस, तरी तुझ्या निरूपणाची गोडी दुसर्या कशाला कधीच येणार नाही ६२.
शुद्ध निरूपणें गुरु वर्णिसी । वर्णूनि अपराधी म्हणविसी ।
ऐक्यें घोळली बुद्धी कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ॥६३॥
शुद्ध निरूपणानें तूं गुरूचे वर्णन करतोस, आणि ते करून आपल्याला अपराधी म्हणवून घेतोस , ह्यावरून तुझी बुद्धि किती एकरूप झाली आहे ते दिसून येते. (विनय धरून) श्रोत्यांचा मान मात्र अधिक वाढवितोस ६३.
तुझी जे अपराधबुद्धी । ते प्रवेशली भगवत्पदीं ।
जाहली अपराधाची शुद्धी । देखणा त्रिशुद्धी तूं होसी ॥६४॥
तुझी जी अपराधबुद्धि ती भगवत्पदींच लीन झालेली आहे. तेव्हां अपराधाचीही शुद्धी झालीच. खराखुरा ज्ञानी तूंच आहेस ६४.
गुरुस्तवनीं रतसी । तेव्हां मूळकथा विसरसी ।
प्रेमाची जाती ऐसी । कळलें आम्हांसी सर्वथा ॥६५॥
गुरूच्या स्तवनामध्ये तल्लीन होतोस तेव्हां मूळ कथा विसरतोस. प्रेमाचे लक्षण असेंच असतें हेही आम्हांस उत्कृष्ट रीतीने कळून चुकले.” ६५.
श्रोते म्हणती आतां । विस्मयो दाटला चित्ता ।
वेगीं चालवावें ग्रंथा । पूर्वकथा मूळींची ॥६६॥
आणखी श्रोते म्हणाले, “आमच्या मनाला मोठा विस्मय वाटत आहे. करितां पुढील ग्रंथास सुरवात करून मूळ कथा सांग” ६६.
हें संतवचन मानूनि माथां । चरण वंदूनि तत्त्वतां ।
सावधान व्हावें चित्ता । पुढील कथा सांगेन ॥६७॥
संतांच्या ह्या भाषणाला मान देऊन त्यांचे चरण शिरसावंदन करून पुढील कथा सांगतों, श्रोत्यांनी लक्ष द्यावें ६७.
यापरी तो अवधूतु । यदूसी सांगे परमार्थु ।
संवादें निवाला परमाद्भूतु । मग निवांतु राहिला ॥६८॥
ह्याप्रमाणे त्या अवधूतानें यदूला परमार्थ सांगितला. त्या भाषणाने अत्यंत समाधान झाले ; त्यानंतर तो स्वस्थ राहिला ६८.
श्रीभगवानुवाच ।
इत्युक्त्वा स यदुं विप्रस्तमामन्त्र्य गभीरधीः ।
वन्दितोऽभ्यर्चितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] श्रीकृष्ण म्हणाले – धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्रेय प्रसन्नचित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले; (३२)
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । रायासी सांगोनि ब्रह्मज्ञान ।
जाहलें देखोनि समाधान । मग पुसोन निघाला ॥६९॥
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, “ह्याप्रमाणे राजाला ब्रह्मज्ञान सांगून त्याचे समाधान झालेले पाहून तो (अवधूत) त्याला विचारून जावयास निघाला ६९.
राजा धांवोनि लागला चरणां । परम प्रेमें करीं पूजना ।
करोनियां प्रदक्षिणा । मागुता चरणां लागला ॥४७०॥
तेव्हां राजाने धावत जाऊन त्याचे पाय धरले. आणि मोठ्या प्रेमाने त्याची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायांवर मस्तक ठेवले ४७०.
‘जाय’ ऐसें न बोलवे सर्वथा । ‘राहे’ म्हणतां दिसे स्वामिता ।
वियोगु न साहवे तत्त्वतां । बोलु सर्वथा खुंटला ॥७१॥
‘जा’ असें त्याला मुळींच म्हणवेना. व ‘रहा’ म्हणावे तर स्वामित्व दाखविल्यासारखे होते, आणि वियोग तर दुःसह वाटू लागला. त्यामुळे बोलणे सर्वोपरी खुंटले ७१.
ते देखोनि अवस्था । कृपा उपजली श्रीदत्ता ।
हात ठेवूनि माथां । प्रसन्नता उपजली ॥७२॥
ती त्याची अवस्था पाहून श्रीदत्तात्रेयाला करुणा उत्पन्न झाली, आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुद्रेने सांगितले ७२,
‘येथून तुज मज आतां । वियोगु नाहीं सर्वथा’ ।
ऐसें आश्वासोनि नृपनाथा । होय निघता श्रीदत्त ॥७३॥
की आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही. असें त्या राजाधिराजाला आश्वासन देऊन श्रीदत्तात्रेय निघाले ७३.
जेणें सुखें होता आला । तेणेंचि सुखें निघता झाला ।
राजा अतिप्रीतीं निवाला । सुखी झाला निजबोधें ॥७४॥
जितक्या आनंदाने ते आले होते, तितक्याच आनंदाने ते निघून गेले. राजा अत्यंत प्रेमाने समाधान पावला आणि निजात्मबोधानें निरंतरचा सुखी झाला ७४.
अवधूतवचः श्रुत्वा पूर्वेषां नः स पूर्वजः ।
सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूव ह ॥ ३३ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
[श्लोक ३३] आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले. (३३)
पाहोनि उद्धवा उजू । बोलता जाला अधोक्षजु ।
म्हणे आमचे पूर्वजांचा पूर्वजु । राजध्वजु यदुवीरु ॥७५॥
उद्धवाला समोर पाहून श्रीकृष्ण म्हणाले, यदुराजा हा आमच्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणि होता ७५.
म्हणसी मी नेणें त्याचें नांव । तूं सांगतोसी हें अपूर्व ।
परी ज्याचेनि नामें आम्ही सर्व । वीर ‘यादव’ म्हणवितों ॥७६॥
तूं म्हणशील की, मला त्याचे नावही माहीत नाही, तेव्हां तूं सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते. पण बाबा, त्याच्याच नांवावरून आम्ही सारे वीर आपणाला ‘यादव’ असें म्हणवून घेतों, ७६.
हरिखें म्हणे नंदनंदु । तो आमचा पूर्वज यदु ।
ब्रह्मज्ञानाचा संवादु । दत्तात्रेयेंसीं पैं केला ॥७७॥
तो नंदाचा पुत्र श्रीकृष्ण आनंदाने पुन्हा म्हणाला, तोच यदु आमचा पूर्वज होय. त्यानेच दत्तात्रेयाबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला ७७.
श्रीदत्तात्रेयाच्या वचनार्था । विश्वासोनि जाहला घेता ।
तेणें सर्वसंगविनिर्मुक्तता । आली हाता यदूच्या ॥७८॥
श्रीदत्तात्रेयाच्या भाषणांतील हृद्तावर विश्वास ठेवल्यामुळेंच सर्वसंगपरित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली ७८.
जो संगु सांडूनि दूर गेला । तेणें ‘संगत्यागु’ चि केला ।
संगीं असोनि स्नेह सांडिला । ‘संगमुक्त’ झाला तो जाण ॥७९॥
जो संगाला सोडून दूर गेला त्याने फक्त ‘संगत्याग’ केला असे म्हणावें, पण संगांत असून जो स्नेह सोडून देतो, तोच ‘संगमुक्त’ झाला म्हणून समजावे ७९,
आकाश सर्व पदार्थासी । मिळालें असे सर्व देशीं ।
परी नातळेचि सर्वसंगासी । ‘संगमुक्तता’ त्यासी बोलिजे ॥४८०॥
आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून असते, पण ते कशालाच स्पर्श करीत नाही. असे असणे याचंच नाव ‘संगमुक्तता’ ४८०.
याहूनि विशेष संगमुक्तता । आली यदूचिया हाता ।
तेही सांगेन कथा । परिसें तत्त्वतां उद्धवा ॥८१॥
पण त्याहूनही विशेष संगमुक्तता यदूच्या हाती आली होती. उद्धवा ! तीही कथा आता सांगतों ऐक ८१.
दत्तात्रेयबोधें तत्त्वतां । सर्वसंगामाजी असतां ।
न देखे संगाची कथावार्ता । ‘विशेषमुक्तता’ या नांव ॥८२॥
खरोखर तो सर्व संगांत असतांही दत्तात्रेयाच्या बोधाने संगाची कथावार्तासुद्धा त्याला जाणवत नव्हती. आणि याचेच नांव ‘विशेषमुक्तता’ ८२.
‘मज पूर्वी द्वैतसंगु होता । तो जाऊनि निःसंग झालों आतां’ ।
या दोनी समूळ मिथ्या वार्ता । विनिर्मुक्तता पावलों ॥८३॥
मला पूर्वी द्वैताची संगति होती, ती जाऊन मी आतां निःसंग झालों,’ या दोन्ही गोष्टी मुळी खोट्या आहेत. मी सर्वातूनच ‘विनिर्मुक्त’ झालों आहे ८३.
दोर सापु नाहीं झाला । परी सापुपणाचा आळ आला ।
तोही दोरें नाहींसा केला । भ्रांतीं कल्पिला निजभ्रमु ॥८४॥
दोर कधी साप होत नाही; पण त्याच्यावर सापपणाचा आळ येतो. तोही दोरानेच नाहीसा होतो. हा आत्मभ्रम भ्रांतीमुळे कल्पिलेला असतो ८४.
दोरु दोरपणें असे । सर्पु तो भ्रांतामनीं वसे ।
ऐसें सांडूनि द्वैतपिसें । रायासी सावकाशें समाधी ॥८५॥
दोर तो दोराच्याच स्वरूपाने असतो. भ्रमिष्टांच्या मनामध्ये मात्र सर्प म्हणून भासतो. असें जें द्वैताचे वेड तें सुटल्यामुळे राजालाही सावकाश समाधि लागली ८५.
समसाम्यें समानबुद्धी । ते बोलिजे ‘निजसमाधी’ ।
ते समाधी पावोनी त्रिशुद्धी । राजा निजपदीं पावला ॥८६॥
ऐक्यभावानें समबुद्धि होणे तिलाच ‘निजसमाधि’ असे म्हणतात. तीच समाधि खरोखर राजाला प्राप्त झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपाला पोंचला ८६.
कृष्ण म्हणे उद्धवासी । ‘तूं जन्मूनि ऐशिये वंशीं ।
जरी ब्रह्मज्ञान न साधिशी । तरी उणें पूर्वजांसी येईल ॥८७॥
कृष्ण उद्धवाला म्हणाले, ‘तूंही अशाच्या वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन न करशील, तर तो पूर्वजांना कमीपणा येईल’ ! ८७.
यापरी हृषीकेशी । तिरस्कारोनि उद्धवासी ।
झोंबावया अद्वैतासी । पुट बुद्धीसी देतुसे ॥८८॥
ह्याप्रमाणे श्रीकृष्णांनी तिरस्काराने उद्धवाला बोलून अद्वैतावर झटून पडण्यासाठीं त्याच्या उत्कंठेवर आणखी एक पुट चढविलें ८८.
आधींचि विखारू काळियाणा । त्याचेंही पुच्छ रगडिल्या जाणा ।
मग झोंबिन्नल्या सत्राणा । नावरे कोणा सर्वथा ॥८९॥
आधींच विषारी काळा सर्प, त्यांत त्याच्या शेपटावर पाय दिला, तर तो रागाने दंश करायला धावतो, कोणालाच आवरत नाही ८९.
आधींचि अनुताप उद्धवासी । वरी तिरस्कारिला हृषीकेशीं ।
तो गिळावया चिद्ब्रह्मासी । निजमानसी खवळला ॥४९०॥
त्याप्रमाणे उद्धवाला आधीच अनुताप झालेला, त्यावर श्रीकृष्णांनी त्याचा तिरस्कार केला, तेव्हां तो परब्रह्माला गिळण्यासाठी मनांतून अगदी खवळून गेला ४९०.
पुढिले अध्यायीं निरूपण । कृष्णउद्धवसंवाद जाण ।
सांगेल गुरुशिष्यलक्षण । श्रोते विचक्षण परिसतु ॥९१॥
त्या कृष्णाचा आणि उद्धवाचा तो संवाद पुढील अध्यायांत आहे ; त्यांत गुरुशिष्याचे लक्षण सांगितले जाईल. चतुर श्रोत्यांनी ते श्रवण करावें ९१.
एका जनार्दनु म्हणे । अगाध कृष्णमुखींचें बोलणें ।
तें मी जरी निरोपूं नेणें । परी तें गोडपणें निववित ॥९२॥
एका जनार्दन म्हणतो, कृष्णमुखांतील भाषण फार गहन आहे. ते जरी मला नीट सांगता येत नाही, तरी त्याच्या स्वाभाविक गोडपणाने अंत:करणाची तृप्ति होते ९२.
साखरेचा बोळू केला । परी कडूपणा नाहीं आला ।
तैसा ग्रंथु प्राकृतभाषा झाला । असे संचला स्वानंदु ॥९३॥
साखरेचा बोळ केला, तरी त्यांत कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ जरी प्राकृत भाषेत झाला, तरी त्यांत स्वानंदच परिपूर्ण भरलेला आहे ९३.
जरी सोन्याचें पेंडुकें केलें । परी तें दगडमोला नाहीं आलें ।
तैसें भागवत प्राकृत झालें । परी नाहीं चुकलें निजज्ञाना ॥९४॥
सोन्याचा जरी गोटा बनविला तरी तो काही दगडाच्या मोलाने विकावयाचा नाही, त्याप्रमाणे भागवत जरी प्राकृतांत झाले, तरी ते आत्मज्ञानाला काही मुकले नाही ९४.
मुक्ताफळालागीं सागरीं । बुड्या देती नानापरी ।
तें सांपडलिया घरींच्या विहिरीं । जो अव्हेरी तो मूर्ख ॥९५॥
मोत्याकरितां समुद्रामध्ये बुड्या देतात, तेच मोती घरांतल्या विहिरींत सांपडले म्हणून कोणी फेंकून देईल, तर तो मूर्खच समजला पाहिजे ९५.
तैशी संस्कृत व्याख्यानआटाटी । अतिकष्टें परमार्थीं भेटी ।
तें जोडिल्या मराठीसाठीं । उपेक्षादृष्टि न करावी ॥९६॥
तद्वत् संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोठ्या माराकुटीनें परमार्थाची गांठ पडते; तोच परमार्थ जर मराठी भाषेमध्ये मिळाला तर त्याची उपेक्षा करूं नये ९६.
धनवंतु रत्नपारखी पुरा । तेणें धुळीमाजीं देखिल्या हिरा ।
गांठीं बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञानें ॥९७॥
श्रीमंत व पक्का रत्नपरीक्षक आहे, त्याने जर अकस्मात धुळीत पडलेला हिरा पाहिला तर तो गांठीला बांधून घरी आणल्याशिवाय राहात नाही. कारण, तो खऱ्या ज्ञानानें परीक्षक असतो ९७.
तैसें ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन ।
उपेक्षा न करितां करावा यत्न । पारखोनि चिद्रत्न साधावया ॥९८॥
त्याप्रमाणे जे कोणी ज्ञाते व विद्वान् लोक असतील, त्यांनी हा ग्रंथ मराठी असे पाहून त्याचा अव्हेर न करितां नीट परीक्षा करून चित्स्वरूपी रत्न मिळविण्याचा यत्न करावा ९८.
क्षुद्रदृष्टीं पाहणें पाहतां । बोलु लागेल व्यासाचे ग्रंथा ।
मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥९९॥
क्षुद्र दृष्टीनेच पाहावयास लागले तर साक्षात् व्यासाच्या ग्रंथालासुद्धा नांवें ठेवतां येतील ; मग ही तर काय मराठी कविता आहे. याकरिता कुटिलता सोडून देऊनच ती वाचावी ९९.
ज्यांसी निजसुखाची आवडी । ते प्राकृतीं न काढिती खोडी ।
घेतील ज्ञानगर्भाची गोडी । अवस्था गाढी परमार्थी ॥५००॥
ज्यांना आत्मसुखाची आवड आहे, ते प्राकृतांतील खोडी काढीत बसणार नाहीत; ते ज्ञानरहस्याची गोडीच ग्रहण करतील. कारण, त्यांना परमार्थाविषयी फार तळमळ असते. ५००.
जे साचार परमार्थी । ते अधिकारी ये ग्रंथीं ।
ज्यांसी भागवतीं भक्ती । ते पावती निजसुख ॥१॥
जे खरोखर परमार्थी आहेत, तेच या ग्रंथाचे अधिकारी होत. ज्याची भागवतावर भक्ति आहे त्यांना निजसुख प्राप्त होईल १.
ज्यासी भागवतीं नाहीं भक्ती । कोरडी व्युत्पत्ती मिरविती ।
तेही जरी निंदा न करिती । तरी पुढें पावती भक्तीतें ॥२॥
ज्यांची भागवतावरच भक्ति नाही, जे रिकामीच विद्वत्ता मिरवतात, तेही जर निंदा न करतील, तर पुढे त्यांनाही भक्ति प्राप्त होईल २.
निंदा वसे ज्याचे चित्ता । त्यास गति नाहीं सर्वथा ।
निंदा सकळ पापांचे माथां । दोष ईपरता असेना ॥३॥
ज्यांच्या मनामध्ये नेहमी निंदाच असते, त्यांना कधीच सद्गति मिळत नाही. निंदा हे सर्व पातकांत श्रेष्ठ पातक आहे. हिच्याएवढा दोष दुसरा कोणताच नाही ३.
निंदकाचें नांव घेतां । दोष वाचेसी होय लागता ।
तिशीं द्यावया प्रायश्चित्ता । ‘रामराम’ सर्वथा म्हणावें ॥४॥
निंदकाचे नांव घेतले तरी सुद्धा वाणीला दोष लागतो; याकरितां तिला प्रायश्चित्त देण्यासाठी ‘रामराम’ म्हणावें ४.
निंदेमाजीं देखिलें स्वार्था । निंदक प्रवर्तले भक्तहिता ।
बुडवूनि आपुले स्वार्था । परदोष सर्वथा क्षाळिले ॥५॥
परंतु निंदेमध्ये सुद्धा स्वार्थच दिसून येतो. कारण निंदक हे भक्ताचे हितच करीत असतात. कारण, ते आपले नुकसान करून घेऊन दुसऱ्याचे सारे दोष धुऊन काढतात ५.
सांडूनियां गुणदोष । श्रोतां होआवें सावकाश ।
जेथ वक्ता हृषीकेश । अतिसुरस तें ज्ञान ॥६॥
ह्याकरितां श्रोत्यांनी गुण आणि दोष दोन्ही सोडून देऊन स्वस्थ असावे. ज्यांतील वक्ता स्वतः श्रीकृष्ण आहे, त्यांतील ज्ञान अत्यंत सुरस असेल हे काय सांगावयास पाहिजे ? ६.
कृष्ण-उद्धवांचे ज्ञान । तत्काळ निरसी अज्ञान ।
एका विनवी जनार्दन । सावधान परियेसा ॥५०७॥
हे श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे ज्ञान अज्ञानाचे तात्काळ निरसन करते. म्हणून एका जनार्दन विनंति करतो की, चित्त देऊन श्रवण करावें ५०७.
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकारटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे नवमोऽध्यायः ॥९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३३॥ ओव्या ॥५०७॥
श्रीकृष्णोद्धव-संवादातील (यदु-अवधूताचा) याप्रमाणे श्रीमद्भागवतमहापुराणांतील एकादशस्कंधामधील एकनाथकृत टीकेचा नववा अध्याय संपूर्ण झाला ॥९॥
ॐ तत्सत्-श्रीकृष्णार्पणमस्तु.