संत एकनाथ

ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभव भावना ।
न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया ॥ १ ॥
ओंकारस्वरूप श्रीजनार्दनस्वामींना नमस्कार असो. हे  जनार्दना ! तुमच्या स्वरूपांत आदि-अंताची कल्पनाच संभवत नाही. अशा आपल्या श्रीचरणाला ‘मीतूंपणा’चा भाव सोडून (तरंग-सागरवत्) नमस्कार करतों १.

नमन श्री‍एकदन्ता । एकपणें तूंचि आतां ।
एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥ २ ॥
श्रीएकदंता गजानना ! तुलाही मी नमस्कार करतो. सांप्रत तूंच एकात्मतेने एकामध्येच अनेकता दाखवीत आहेस, तरीही अद्वैत मोडत नाहीं ! २.

तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा ।
यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥ ३ ॥
तुझ्यामध्ये सर्व चराचरांचा वास आहे, म्हणूनच तुला ‘लंबोदर’ म्हणतात; याकरितां सर्वांचा खराखुरा सोयरा तूंच आहेस ३.

तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु ।
यालागीं ‘विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥ ४ ॥
जो पुरुष तुझें दर्शन घेतो, त्याचा संसार सुखाचा होतो. आणि म्हणूनच तुला ‘विघ्नहर्ता’ हे उत्कृष्ट नांव शोभते ४.

हरुष तें वदन गणराजा । चार्‍ही पुरुषार्थ त्याचि चार्‍ही भुजा ।
प्रकाशिया अप्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥ ५ ॥
हे गणराजा ! आनंद हेच तुझें मुख ; चारी पुरुषार्थ हेच चार हात ; आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दांत झळकत असतो ५.

पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं ।
निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥ ६ ॥
पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ह्या दोन्ही तुझ्या कर्णांच्या ठिकाणी लागल्या आहेत. मुखामध्ये परा-पश्यंती-मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात ६.

एकेचि काळी सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी ।
तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥ ७ ॥
हे विनायका ! सर्व सृष्टि एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते, तीच तुझी दिव्य व सुखसंतुष्ट करणारी दृष्टि होय ७.

सुखाचें पेललें दोंद । नाभीं आवर्तला आनंद ।
बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥ ८ ॥
सुखाचें दोंद वाढलेले आहे ; नाभीमध्ये आनंद भरला आहे; आणि बोधाचा नागबंद (कडदोऱ्याप्रमाणे) नाभीखाली शोभा देत असलेला दिसतो ८.

शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर ।
सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभति ॥ ९ ॥
शुद्ध सत्त्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तूं नेसला आहेस. अंगावरील सोन्याच्या अलंकारांना तुझ्या अंगामुळेच शोभा आली आहे ९.

प्रकृति पुरुष चरण दोनी । तळीं घालिसी वोजावुनी ।
तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥ १० ॥
प्रकृति आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत; ते दुमडून खाली घालून त्यावर सहजासनामध्यें तूं पूर्णत्वाने शोभतोस १०.

तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी ।
तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥ ११ ॥
तुझे क्षणमात्र दर्शन झाले तरी पुरे, मग शोधावयास गेलें तरी विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाराचा पाश तोडून टाकणारा तोच तुझ्या मुठींतील परशु होय ११.

भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें ।
वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥ १२ ॥
अनन्यभावाचा जो भक्त तुला आवडतो, त्याला तूं भवसंकटांतून मुक्त करतोस. तूं आपण होऊन त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून घेतोस १२.

साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख ।
दे‍ऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥ १३ ॥
जो खरोखरीचा निरपेक्ष असतो, त्याचे सुख तूंच वाढवितोस. त्याला तूं आपल्या हातानें हर्षाचे मोदक देऊन तृप्त करतोस १३.

सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान ।
यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥ १४ ॥
सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म वस्तूमध्येंही तुझे अधिष्ठान असते, म्हणून ‘मूषकवाहन’ हे नांव तुला शोभते १४.

पाहता नरु ना कुंजरु । व्यक्ताव्यक्तासी परु ।
ऐसा जाणोनि निर्विकारू । नमनादरु ग्रंथार्थीं ॥ १५ ॥
पहावयास गेले तर तूं धड मनुष्यही नव्हेस आणि धड हत्तीही नव्हेस. व्यक्त व अव्यक्त यांच्या पलीकडचा तूं आहेस. असा जो निर्विकार तूं, त्या तुला हा ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटास जाण्याकरितां मी परमादराने नमन करतों १५.

ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैंचा नमिता ।
अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥ १६ ॥
अशा श्रीगजाननाला ‘मी’ म्हणून नमस्कार करणारा तरी कोठचा ! कारण जो मूळचा अकर्ता, तोच या ग्रंथकथेचा विस्तारकर्ता झाला आहे. १६.

आतां नमूं सरस्वती । जे सारासारविवेकमूर्तीं ।
चेतनारूपें इंद्रियवृत्ती । जे चाळीती सर्वदा ॥ १७ ॥
आतां सारासारविचाराची केवळ मूर्तिच व चैतन्यरूपाने सदासर्वदा इंद्रियवृत्तीला चालना देणारी अशी जी सरस्वती, तिलाही नमस्कार करूं १७.

जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक ।
जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभ ॥ १८ ॥
जी वाचेला वदविणारी, बुद्धीला बोधविणारी आणि प्रकाशाला प्रकाश देणारी अशी स्वतः स्वयंप्रकाशरूप असणारी १८,

जे शिवांगीं शक्ती उठी । जैसी डोळ्यामाजीं दिठी ।
किंवा सुरसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाच्या ॥ १९ ॥
तीच, डोळ्यांमध्ये ज्याप्रमाणे दृष्टि असते, किंवा फळामध्ये ज्याप्रमाणे फळपणाची रसपुष्टि असते, त्याप्रमाणे शिवाच्या अंगांत शक्तिरूपानें आहे १९.

जैसा साखरेअंगी स्वादु । किं सुमनामाजीं मकरंदु ।
तैसा शिवशक्ती संबंधू । अनादिसिद्ध अतर्क्य ॥ २० ॥
त्याचप्रमाणे साखरेच्या अंगी जशी गोडी, किंवा पुष्पामध्यें जसा मकरंद असतो, त्याप्रमाणे शिवाचा आणि शक्तीचा संबंधही अनादिसिद्ध आणि अतर्क्य असा आहे २०.

ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजीं वाडी ।
म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥ २१ ॥
वाचेनें वर्णन करता येणे शक्य नाही, अशी ती आत्मस्वरूपाची गोडी, चहूं वाणींमध्यें श्रेष्ठत्वानें भरून आहे. म्हणून वाणीची देवता जी सरस्वती, ती ग्रंथार्थाची उत्तम रुचि दाखवून देते २१.

सारासार निवडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी ।
बैसली सहजासनीं । अगम्यपणीं अगोचरु ॥ २२ ॥
जगामध्यें सारासार निवडणारे जे हंस आहेत, त्या हंसावरच ही हंसवाहिनी देवता अतर्क्य व अगम्य असें सहजासन घालून बसलेली आहे २२.

ते परमहंसीं आरूढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ ।
जवळी असतां न देखती गूढ । अभाग्य मूढ अतिमंद ॥ २३ ॥
परमहंसावर आरूढ झालेल्या तिला विवेकहंसच पक्केपणी जाणतात. पण जे मूर्ख, अत्यंत जड व अभागी असतात, त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाहीं २३.

तिचें निर्धारितां रूप । अरूपाचें विश्वरूप ।
तें आपुलेपणें अमूप । कथा अनुरूप बोलवी ॥ २४ ॥
तिच्या स्वरूपाचा विचार केला असतां निराकार व विश्वाकारही तीच आहे असे दिसून येते. तीच आपलेपणानें अनुपम कथानुसंधान बोलविते २४.

हा बोलु भला झाला । म्हणोनि बोलेंचि स्तविला ।
तैसा स्तुतिभावो उपजला । बोलीं बोला गौरवी ॥ २५ ॥
‘हा बोल बरा झाला’ असें बोलानेंच ज्याप्रमाणे म्हणावें, त्याप्रमाणे मनांत उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव, तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समजावें २५.

ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी ।
राहोनि सबाह्यअभ्यंतरीं । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥ २६ ॥
ती वाग्विलासरूप परमेश्वरी, सर्वांगसुंदरी सरस्वती देवी, अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलविते २६.

ते सदा संतुष्ट सहज । म्हणोनि निरूपणा चढलें भोज ।
परी वक्तेपणाचा फुंज । मीपणें मज येवों नेदी ॥ २७ ॥
ती सदासर्वदा स्वभावसिद्ध प्रसन्नच असते, म्हणून या निरूपणाला रंग चढला आहे. तरीही तिनें वक्तेपणाचा अभिमान मला वाढू दिला नाहीं २७.

वाग्देवतेची स्तुती । वाचाचि जाहली वदती ।
तेथें द्वैताचिये संपत्ती । उमस चित्तीं उमजेना ॥ २८ ॥
ही वाग्देवतेची स्तुति वाणीनेच केलेली आहे. म्हणून द्वैताची सामग्री चित्तांत येण्याला वावच राहिला नाहीं २८.

तिणें बोल बोलणें मोडिलें । समूळ मौनातें तोडिलें ।
त्यावरी निरूपण घडिलें । न बोलणें बोलें बोलवी ॥ २९ ॥
तिनें बोल व बोलणें मोडून टाकलें व मौनही समूळ तोडून टाकलें, पण त्यानंतरही निरूपण घडविलेंच, आणि जें बोलावयाला अशक्य ते बोलानें म्हणजे शब्दांनी बोलविले २९.

तिसी सेवकपणें दुसरा । हो‍ऊनि निघे नमस्कारा ।
तंव मीपणेंसीं परा । निजनिर्धारा पारुषे ॥ ३० ॥
अशी जी सरस्वती देवी, तिला सेवकपणानें निराळा होऊन नमस्कार करावयाला गेलों, तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली ३०.

जेथें मीपणाचा अभावो । तेथें तूंपणा कैंचा ठावो ।
याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरूपणीं ॥ ३१ ॥
जेथे मीपणाचाच अभाव, तेथें तूंपणाला कोठचा ठाव ? असे असले तरी या विषयप्रतिपादनामध्यें काही अतर्क्य प्रसाद ती भरून टाकीत आहे ३१.

जैशा सागरावरी सागरीं । चालती लहरींचिया लहरी ।
तैसे शब्द स्वरूपाकारीं । स्वरूपावरी शोभती ॥ ३२ ॥
जशा समुद्रामध्यें लाटांवर लाटा उसळतात, त्याप्रमाणे येथें आत्मस्वरूपावरच स्वरूपाकार शब्दांच्या लहरींवर लहरी शोभत आहेत ३२.

जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा ।
तैसें निरूपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसें देखा समवृत्ति ॥ ३३ ॥
ज्याप्रमाणें साखरेचे रवे गोडीहून भिन्न नसतात. त्याप्रमाणें निरूपणाचे शब्द ब्रह्मरसानें भरलेले असल्यामुळें ब्रह्म भिन्न नाहीत ३३.

तेथें मीपणेंशीं सरस्वती । बैसविलें एका ताटें रसवृत्ती ।
तेणें अभिन्नशेष दे‍ऊनि तृप्ती । ते हे उद्‍गार येती कथेचे ॥ ३४ ॥
तेथे ब्रह्मानंदरसवृत्तीनें मीपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटांत बसविले आहे. त्यायोगें अभिन्नभावाच्या शेषानें तृतीची ढेकर आल्यामुळेच या कथेचे उद्वार बाहेर येत आहेत ३४.

आतां वंदू ते सज्जन । जे कां आनंदचिद्‍घन ।
वर्षताती स्वानन्दजीवन । संतप्त जन निववावया ॥ ३५ ॥
आतां संतप्त जनांस निवविण्याकरितां स्वानंदजीवनाचा वर्षाव करणारे, चिदानंदाचे केवळ मेघच, असे जे सज्जन त्यांना वंदन करूं ३५.

ते चैतन्याचे अळंकार । कीं ब्रह्मविद्येचे शृंगार ।
कीं ईश्वराचें मनोहर । निजमंदीर निवासा ॥ ३६ ॥
ते चैतन्याचे अलंकार, किंवा ब्रह्मविद्येचे शृंगार, किंवा ईश्वराचे रहावयाचे मनोहर मंदिरच होत ३६.

ते अधिष्ठाना अधिवासु । कीं सुखासही सोल्हासु ।
विश्रांतीसी विश्वासू । निजरहिवासू करावया ॥ ३७ ॥
ते ब्रह्मवस्तूचे निवासस्थान, अथवा सुखाचा पूर्णोल्हास, किंवा विश्रांतीला रहावयाची पूर्ण भरंवशाची जागा आहेत ३७.

कीं ते भूतदयार्णव । कीं माहेरा आली कणव ।
ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानंदा ॥ ३८ ॥
किंवा ते भूतदयेचे सागर, करुणेचे माहेरघर किंवा ते स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयवच होत ३८.

ना ते डोळ्यातील दृष्टी । कीं तिचीही देखणी पुष्टी ।
कीं संतुष्टीसी तुष्टी । चरणांगुष्ठीं जयांचे ॥ ३९ ॥
किंवा ते डोळ्यांतील दृष्टि, किंवा तिचीही देखणी पुष्टि, किंवा ज्यांच्या चरणांगुष्ठामध्यें संतुष्टीलाही तुष्टि मिळते ३९,

ते पाहती जयांकडे । त्यांचें उगवे भवसांकडें ।
परब्रह्म डोळियांपुढें । निजनिवाडें उल्हासे ॥ ४० ॥
असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होत असते, आणि त्यांच्या डोळ्यांपुढे परब्रह्म आपोआप प्रगट होते ४०.

तेथें साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलास ।
एका धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥ ४१ ॥
ते साधनचतुष्टयाचे सायास किंवा शास्त्रचातुर्याचे विलास पहात नाहींत. एक विश्वास धरला की पुरे, ते आपण होऊन ज्ञानप्रकाश करतात ४१.

ते जगामाजीं सदा असती । जीवमात्रातें दिसती ।
परी विकल्पेंचि ठकिजती । नाहीं म्हणती नास्तिक्यें ॥ ४२ ॥
ते सदोदित जगामध्येच असतात, प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीस पडतात, पण विकल्पामुळेंच मनुष्य फसतात आणि नास्तिकपणानें ‘ते नाहीत’ असे म्हणतात ४२.

मातियेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला ।
म्हणौनि विश्वासेंवीण नाडला । जगु ठकला विकल्पें ॥ ४३ ॥
द्रोणाचार्यांची मूर्ति मृत्तिकेची बनविली, (त्या मूर्तीलाच गुरु कल्पून भिल्लाचा ‘एकलव्य’ नावाचा मुलगा संपूर्ण धनुर्विद्या शिकला व अर्जुनादिकांनाहीं तो भारी झाला अशी कथा महाभारतांत आहे.) तो गुरुभावच त्या कोळ्याला फलद्रूप झाला. तात्पर्य, जग हें विश्वास नसल्यामुळें नाडले व फक विकल्पानें फशी पडले आहे ४३.

एका‍एकीं विश्वासतां । तरी वाणी नाहीं निजसत्ता ।
त्यांचे चरणी भावार्थता । ठेविला माथां विश्वासें ॥ ४४ ॥
निर्विकल्प मनानें त्यांचेवर एकदम विश्वास ठेवला व भक्तिभावानें आणि निश्चयानें त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले, तर आत्मसत्तेला म्हणजे आत्मानुभवाला उणें पडणार नाहीं ४४.

ते नमस्कारितां आवश्यक । करून ठाकती एक ।
परी एकपणें सेवक । त्यांचाचि देख स्वयें हो‍आवें ॥ ४५ ॥
त्यांना अगत्यपूर्वक नमस्कार केला असतां ते आपल्याशी ऐक्य करून सोडतात; पण ऐक्यरूपानें त्यांचेच स्वतः सेवक बनून राहिले पाहिजे ४५.

त्यांचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी ।
जे भजती अनन्य आवडीं । ते जाणती गाढी निजचवी ॥ ४६ ॥
त्यांच्या सेवेच्या गोडीला ब्रह्मसुखाची उपमासुद्धां कमीच आहे. जे कोणी अनन्यभक्तीनें त्यांची उपासना करतात, ते त्या आत्मस्वरूपाची खरी गोडी चाखतात ४६.

ते प्रकृतीसी पर । प्रकृतिरूपीं ते अविकार ।
आकार-विकार-व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥ ४७ ॥
ते प्रकृतीच्या पलीकडे असतात, प्रकृतिरूपामध्यें राहूनही ते अविकृत असतात, प्रकृतीचे आकार, विकार व व्यवहार यांची बाधा त्यांच्यामुळेच होत नाहीं ४७.

ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती ।
आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ॥ ४८ ॥
ते भोगाचा वीट मानीत नाहीत किंवा त्यागाचें स्तोम माजवीत नाहीत; आपल्या सहजस्थितीतच ते निरंतर वागत असतात ४८.

ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेपण न दाविती ।
स्वरूपफुंजुविस्मृती । गिळूनि वर्तती निजांगें ॥ ४९ ॥
ते ज्ञातेपणा मिरवीत नाहीत किंवा वेडेपणाही दाखवीत नाहीत. ते स्वरूपप्राप्तीचा गर्व किंवा विस्मरण गिळून सहजपणानें वागतात ४९.

प्रेमा अंगींचि जिराला । विस्मयो येवोंचि विसरला ।
प्रपंचुपरमार्थु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥ ५० ॥
आत्मसाक्षात्काराच्या वेळी उद्‌भवणाच्या प्रेमाच्या लहरी अंगांतच जिरून गेल्या, तसेच त्या वेळच्या विलक्षण आनंदानें वाटणारा विस्मयही विसरून गेला, प्रपंच व परमार्थ एक झाला, पण असें झालें हेही त्यांच्या लक्षात राहिले नाहीं ५०.

स्मरण विस्मरणेंशीं गेलें । देह देहींच हारपलें ।
आंतुबाहेरपण गेलें । गेलें ठेलें स्मरेना ॥ ५१ ॥
स्मरण विस्मरणाबरोबरच निघून गेलें, देह देहामध्येच हरपून गेला, आंतबाहेरपणा मोडून गेला, पण गेला किंवा राहिला हेही त्यांच्या स्मरणांत नाहीं ५१.

स्वप्न जागृती जागतां गेली । सुषुप्ती साक्षित्वेंसीं बुडाली ।
उन्मनीही वेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥ ५२ ॥
स्वरूपजागृतीमुळें त्यांचे स्वप्न आणि जागृति हीं नाहींशी झाली, साक्षित्वासह सुषुप्ती बुडून गेली, उन्मनी अवस्था वेडावून जाऊन तुर्यावस्था तटस्थ झाली ५२,

दृश्य द्रष्टेनशीं गेलें । दर्शन एकलेपणें निमालें ।
तें निमणेंपणही विरालें । विरवितें नेलें विरणेनी ॥ ५३ ॥

दृश्य हे द्रष्ट्यासह निघून गेलें, एकलेपणामुळें दर्शनही नाहींसें झालें, आणि अखेर त्यांचा नसणेपणाही विरून जाऊन त्या विरण्यासह विरविणारें ज्ञानही लय पावले ५३.

ज्ञान अज्ञानातें घे‍ऊनि गेलें । तंव ज्ञातेपणही बुडालें ।
विज्ञान अंगी जडलें । परी नवें जडलें हें न मनी ॥ ५४ ॥

ज्ञान अज्ञानाला घेऊन गेले, तेव्हां ज्ञातेपणही बुडाले आणि विज्ञान अंगांत जडले. पण ते नवें जडलें पण ते नवें जडलें असें मात्र नाहीं ५४.

यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावें सावधान ।
द्यावें मज अवधान । हें विज्ञापन बाळत्वें ॥ ५५ ॥

अशा प्रकारचे जे संतजन, त्यांनी आतां सावध होऊन मला अवधान द्यावे, ही माझी लेंकुरपणाची विज्ञप्ति आहे ५५.

सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान ।
तैसे संत सदा सावधान । द्यावें अवधान हें बालत्व माझें ॥ ५६ ॥

पण सूर्य हा सदासर्वदा प्रकाशाचा लोलच आहे, अग्नि हा सदासर्वदा तेजस्वीच आहे; त्याप्रमाणें संत हे सदासर्वदा सावधानच आहेत. त्यांनी आतां अवधान म्हणजे लक्ष द्यावे, हे माझे बोल बालिशत्वाचेच होत ५६.

तंव संतसज्जनीं एक वेळां । थोर करूनियां सोहळा ।
आज्ञापिलें वेळोवेळां । ग्रंथ करविला प्राकृत ॥ ५७ ॥

हे ऐकून संतसज्जनांनी एकदम गौरव करून पुनःपुनः आज्ञा केली व हा ग्रंथ प्राकृतांत करविला ५७.

एकांतीं आणि लोकांतीं । थोर आक्षेप केला संतीं ।
तरी सांगा जी मजप्रती । कोण ग्रंथीं प्रवर्तों ॥ ५८ ॥

एकांती आणि लोकांतींही ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला, तेव्हां मी म्हटले, महाराज ! कोणत्या ग्रंथाला आरंभ करूं ते सांगावें ५८.

पुराणीं श्रेष्ठ  भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत ।
तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥ ५९ ॥
त्या वेळी संत म्हणाले, पुराणांमध्यें  भागवत हें श्रेष्ठ होय, त्यांतील ‘उद्धवगीत’ हे अत्यंत श्रेष्ठ होय, याकरितां त्याचा तूं आरंभ कर. वक्ता भगवान् तुला साह्य आहे ५९.

आम्हांसी पाहिजे ज्ञानकथा । वरी तुजसारिखा रसाळ वक्ता ।
तरी स्तुति सांडूनि आतां । निरूपण तत्त्वतां चालवी ॥ ६० ॥

आम्हांला ज्ञानकथेची आवड, त्यावर तुझ्यासारखा रसाळ वक्ता, तेव्हां आणखी काय पाहिजे ? तर आतां आमची स्तुति सोडून देऊन मुख्य विषयप्रतिपादनाला आरंभ कर ६०.

तुज संतस्तवनीं उत्साहो । हा तंव कळला भावो ।
तरी कथेचा लवलाहो । निजनिर्वाहो उपपादीं ॥ ६१ ॥

संतस्तवन करण्यामध्यें तुला स्फुरण येते, ही गोष्ट आम्हांला माहीत आहे. पण आता कथेला सुरुवात करून आपला विषय चालू कर ६१.

या संतांचे कृपावचनें । एका‍एकी आनंदलों मनें ।
तेणें वाक्यपसायदानें । स्वानंदघनें उल्हासे ॥ ६२ ॥

ह्या संतांच्या भाषणानें एकाएकी मनाला आनंद झाला. ह्या प्रसादवाणीनें अंतःकरण स्वानंदानें उचंबळले ६२.

जैसा मेघांचेनि गर्जनें । मयूर उपमों पाहे गगनें ।
नाना नवेनि जीवनें । जेवीं चातक मनें उल्हासे ॥ ६३ ॥

मेघांच्या गर्जनेनें मोराचा आनंद गगनात मावेनासा होतो, किंवा मेघांचे नवें जल पडतांना पाहून चातक मनांत आनंदित होतो ६३,

कां देखोनि चंद्रकर । डोलों लागे चकोर ।
तैसें संतवदनींचें उत्तर । आले थोर सुखावित ॥ ६४ ॥

किंवा चंद्राचे किरण पाहून चकोरपक्षी जसा आनंदानें डोलू लागतो, त्याप्रमाणें संतमुखींचें उत्तर मला अत्यंत सुखच देत आले ६४.

थोर सुखाचा केलों स्वामी । तुमचें पुरतें कराल तुम्ही ।
तरी वायांचि कां मीपणें मी । मनोधर्मीं वळंगेजों ॥ ६५ ॥

हे स्वामींनो ! तुम्ही खरोखरच मला आनंदित केले. कारण, हे तुमचे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहां. तेव्हां ‘मी’ पणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वश व्हावें ? ६५.

परी समर्थांचि आज्ञा । दासां न करवे अवज्ञा ।
तरी सांगितली जे संज्ञा । ते करीन आज्ञा स्वामींची ॥ ६६ ॥

पण समर्थाची आज्ञा दासाला उल्लंघन करवत नाही. ह्याकरितां हें काम आपण दाखवून दिले आहे, ती स्वामींची आज्ञा मी पाळीन ६६.

परी तुम्हीं एक करावें । अखंड अवधान मज द्यावें ।
तेणें दिठिवेनि आघवें । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥ ६७ ॥

परंतु आपण एक मात्र करावें की, माझ्याकडे एकसारखें लक्ष द्यावे, म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीनें आपोआपच कार्य शेवटास जाईल ६७.

अगा तुझिया मनामाजीं मन । शब्दीं ठेविलेंसे अनुसंधान ।
यालागीं निजनिरूपण । चालवीं जाण सवेगें ॥ ६८

तेव्हां संत म्हणाले, अरे ! आम्ही आतां तुझ्या मनामध्यें मन घालून शब्दांत अनुसंधान ठेवले आहे ; ह्याकरितां तुझा विषय तूं लवकर सुरू कर ६८.

आतां वंदूं कुळदेवता । जे एका‍एकी एकनाथा ।
ते एकीवांचून सर्वथा । आणिक कथा करूं नेदी ॥ ६९ ॥

आतां कुलदेवतेला नमस्कार करूं. ती ऐक्यरूपानें एकनाथामध्येच राहिलेली असल्याकारणाने ऐक्यावाचून दुसरी गोष्टच काढू देत नाहीं ६९.

एक रूप दाविलें मनीं । तंव एकचि दिसे जनीं वनीं ।
एकचि कानीं वदनीं । एकपणीं ‘एकवीरा’ ॥ ७० ॥
तिनें मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे, त्यामुळें जनीं वनीं सर्व एकच दिसूं लागले आहे. कानांमध्यें आणि मुखामध्यें एकपणानें ती ‘एकवीरा’ (श्रीरेणुका) देवीच एकत्वानें वास करीत आहे ७०.

ते शिवशक्तिरूपें दोनी । ने‍ऊन मिरवे एकपणीं ।
एकपणें जाली गुर्विणी । प्रसवे एकपणीं एकवीरा ॥ ७१ ॥

तीच शिव आणि शक्ति अशी दोन्ही स्वरूपें घेऊन एकपणानेच मिरवत आहे. एकपणानेच ती एकवीरा गरोदर होऊन एकत्वांतच एका वीराला प्रसवली ७१.

तें एकरूपें एकवीरा । प्रसवली बोधफरशधरा ।
जयाचा कां दरारा । महावीरां अभिमानियां ॥ ७२ ॥

मोठमोठ्या मी मी म्हणविणार्‍या वीरांनासुद्धा ज्याचा दरारा, त्या बोधरूप परशुरामाला ती एकपणानेच प्रसवली ७२.

तेणे उपजोनि निवटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया ।
म्हणोनि तो जाहला विजया । लवलाह्या दिग्मंडलीं ॥ ७३ ॥

त्यानें जन्मास येऊन मायेचा (मातेचा) वध केला व आज्ञा मान्य करून पित्यास संतोष दिला, आणि म्हणूनच तो ह्या भूमंडळावर एकसारखा विजयी होत गेला ७३.

जो वासनासहस्रबाहो । छेदिला सहस्रार्जुन अहंभावो ।
स्वराज्य करूनियां पहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ॥ ७४ ॥

वासनारूप सहस्रबाहु असलेला अहंकाररूप जो सहस्रार्जुन त्याचा त्यानें वध केला, आणि त्याचे राज्य स्वाधीन करून घेऊन ते आपल्या स्वजातीयांना म्हणजे ब्राह्मणांना अर्पण केले ७४.

तेणें मारूनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आम्हां जाहली ।
परी स्वनांवें ख्याति केली । एकात्मबोली एकनाथा ॥ ७५ ॥

त्यानें मातेला मारून ती पुन्हा जिवंत करून घेतली, तीच आमची कुलदेवता झाली. परंतु तिनें आपल्याच नांवानें आमची प्रसिद्धी केली. कारण एकवीरा व एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द होत ७५.

ते जैंपासोनि निवटिली । तैंपासोनि प्रकृति पालटली ।
रागत्यागें शांत झाली । निजमा‍उली जगदंबा ॥ ७६ ॥

ती जेव्हां मारली गेली तेव्हांपासून तिच्या प्रकृतींत पालट झाला व ती माउली जगदंबा रागत्याग करून शांत झाली ७६.

तया वोसगा घे‍ऊन । थोर दिधलें आश्वासन ।
विषमसंकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ॥ ७७ ॥

तिनें मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिलें कीं, केवढ्याही संकटांत आपले नामस्मरण केले असतां समाधान होईल ७७.

ते जय जय जगदंबा । ‘उदो’ म्हणे ग्रंथारंभा ।
मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥ ७८ ॥

त्या जगदंबेचा जयजयकार करण्याकरितां ग्रंथाच्या आरंभालाच ‘उदो’ ‘उदो’ (‘उदयोऽस्तु ‘ म्हणजे उदय होवो) असें म्हणतों. तीच माझ्या बुद्धीमध्यें योगरूप गर्भ ठेवून स्वतः प्रगट झाली आहे ७८.

आतां वंदूं जनार्दनु । जो भवगजपंचाननु ।
जनीं विजनीं समानु । सदा संपूर्णु समत्वें ॥ ७९ ॥

आतां जो संसाररूप हत्तीचा सिंह, एकांतांत व लोकांतांत समान, समदृष्टीनें सदासर्वदा जो संपूर्ण, त्या गुरु जनार्दनाला नमस्कार करू ७९.

ज्याचेनि कृपापांगें । देहीं न देखती देहांगें ।
संसार टवाळ वेगें । केलें वा‍उगें भवस्वप्न ॥ ८० ॥

ज्याच्या कृपाप्रसादानें साधकाला देहांत असून देहांगें दिसत नाहीत आणि संसाराचे वावटळ हां हां म्हणतां स्वप्नवत् होऊन जाते ८०,

जयाचेनि कृपाकटाक्षें । अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे ।
साक्षी विसरली साक्षें । निजपक्षें गुरुत्वें ॥ ८१ ॥

ज्याच्या कृपाकटाक्षाच्या योगानें अलक्ष्य वस्तु लक्ष्याशिवाय लक्षिली जाते व गुरुत्वाच्या निजपक्षानें साक्षीपणाही विसरला जातो ८१,

नेणें जीवेंवीण जीवविलें । मृत्युवीण मरणचि मारिलें ।
दृष्टि घे‍ऊनि दाखविलें । देखणें केलें सर्वांग ॥ ८२ ॥

त्यांनी जिवाशिवायच जगविलें; मृत्यूशिवायच मरणाला मारून टाकलें ; दृष्टि घेऊन अदृश्य दाखविलें; सारे अंगच देखणें म्हणजे पाहणारे केलें ८२,

देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें ।
नेलेपणही हारपलें । उरीं उरलें उर्वरित ॥ ८३

देहामध्येंच देहाला विदेही करून टाकलें ; आणि शेवटी ते विदेहपणही नेलें आणि अखेरीस नेलेंपणही जाऊन अवशिष्ट तेवढेच शिल्लक राहिले ८३.

अभावों भावेंशीं गेला । संदेह निःसंदेहेंशीं निमाला ।
विस्मयो विस्मयीं बुडाला । वेडावला स्वानंदु ॥ ८४ ॥

भावासह अभाव नाहीसा झाला; निःसंदेहासह संदेह निघून गेला, विस्मय विस्मयामध्यें बुडाला व स्वानंद वेडावून गेला ८४.

तेथ आवडीं होय भक्तु । तंव देवोचि भक्तपणा‍आंतु ।
मग भज्यभजनांचा अंतूं । दावी उप्रांतू स्वलीला ॥ ८५ ॥

तेथे आवडीनेंच भक्त बनलों, तो भक्तपणाच्या आंत देवच असल्याचें दिसून आले. तेव्हां भज्य-भजक आणि भजन ह्यांचा निखालस अंत झालेलाच दिसू लागला ८५.

नमन नमनेंशीं नेलें । नमितें नेणो काय जाहलें ।
नम्यचि अंगीं घडलें । घडले मोडलें मोडूनि ॥ ८६ ॥

नमनानेंच नमन नेलें, नमस्कार करणारे कोठे गेलें हेही समजेनासे झाले, ज्याला नमस्कार करावयाचा ती वस्तु होणें न होणें नाहींसें होऊन आपण स्वत:च झाला ८६.

दृश्य द्रष्टा जाण । दोहींस एकचि मरण ।
दर्शनही जाहलें क्षीण । देखणेपण गिळूनी ॥ ८७ ॥

दृश्य आणि द्रष्टा सा दोघांनाहीं एकदाच मरण आले आणि देखणेंपणा गिळून दर्शनही नाहीसे झाले ८७.

आतां देवोचि आघवा । तेथें भक्तु न ये भक्तभावा ।
तंव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनी ॥ ८८ ॥

आतां जिकडे तिकडे देवमयच होऊन गेले. त्यामुळें भक्त हा भक्तभावाला विसरला, तेव्हां देवही देवस्वभावाला विसरून देवत्वाला मुकला ८८.

देवो देवपणे दाटला । भक्तु भक्तपणें आटला ।
दोहींचाही अंतु आला । अभेदें जाहला अनंतु ॥ ८९ ॥

देवपणानें सर्वत्र देवच भरून राहिला, त्यामुळें भक्तपणानें भक्त नाहींसा झाला. दोन्ही भाव नाहींसे होऊन अमेदभावामध्यें अनंतस्वरूप मात्र शिल्लक राहिले ८९,

अत्यागु त्यागेंशीं विराला । अभोगु भोगेंशीं उडाला ।
अयोगु योगेंशीं बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥ ९० ॥

त्यागासहित अत्याग लयास गेला, भोगाबरोबर अभोगही उडाला, योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहंभाव नाहीसा झाला ९०.

ऐशियाहीवरी अधिक सोसु । सायुज्यामाजीं होतसे दासू ।
तेथील सुखाचा सौरसु । अति अविनाशु अगोचरू ॥ ९१ ॥

यांतही पुनः विशेष हें की सायुज्य स्थितीमध्यें तो दास होऊन राहतो. तेथचा आनंदरस अत्यंत अविनाशी व अतर्क्य असा आहे ९१.

शिवें शिवूचि यजिजे । हें ऐशिये अवस्थेचि साजे ।
एर्‍हवीं बोलचि बोलिजे । परि न पविजे निजभजन ॥ ९२

‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी हे या अवस्थेलाच शोभते; एर्‍हवीं बोलणे हे नुसते बोलणेच आहे. त्या योगानें स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाहीं ९२.

ये अभिन्न सुखसेवेआंतु । नारद आनंदें नाचत गातु ।
शुकसनकादिक समस्तु । जाले निजभक्तु येणेंचि सुखें ॥ ९३ ॥

ह्या अभेदभावाच्या सेवासुखामध्यें नारद आनंदानें गातो व नाचतो. शुकसनकादिक जे सारे स्वस्वरूपाचे भक्त झाले, ते ह्याच सुखामुळें झाले ९३.

सागरीं भरे भरतें । तें भरतें भरे तरियांतें ।
तैसें देवेंचि देवपणें येथें । केलें मातें निजभक्तु ॥ ९४ ॥

सागराला भरती चढली म्हणजे त्याच पाण्यानें खाड्याही भरतात; त्याप्रमाणें देवानेंच मला आपला देवपणा देऊन निजभक्त करून ठेवले ९४.

सागर सरिता जीवन एक । परी मिळणीं भजन दिसे अधिक ।
तैसें एकपणेंचि देख । भजनसुख उल्हासे ॥ ९५ ॥

समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहूं गेलें तर एकच आहे, पण त्यांचा संगम होतो तेथची शोभा कांही विशेष असते. त्याप्रमाणें परमेश्वराशी ऐक्यरूपानें भजन केले असतां भजनाचे सुख अधिक दुणावतें ९५.

वाम सव्य दोनी भाग । परी दों नामी एकचि आंग ।
तैसा देवभक्तविभाग । देवपणीं साङ्ग आभासे ॥ ९६

डावें आणि उजवें असे शरीराचे दोन भाग आहेत, पण ह्या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो. त्याप्रमाणें देव आणि भक्त असा भेद भासला तरी देवपणांत दोघांचे ऐक्यच अनुभवास येते ९६.

तेवीं आपुलेपणाचेनि मानें । भक्तु केलों जनार्दनें ।
परी कायावाचामनें । वर्तविजे तेणें सर्वार्थीं ॥ ९७

त्याप्रमाणें गुरु जनार्दनांनी मला आपलेपणाचा मान देऊन तसा अद्वैत भक्त करून ठेवले आहे, तथापि कायावाचामनाला प्रेरणा करून सर्वतोपरी मला तेच वागवीत असतात ९७.

दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व ।
वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥ २०२ ॥ते दुष्ट दैत्य आणि दानव व पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे ह्यांचा श्रीकृष्णदेवांनी वध केला. हा मागील कथेतील सारांश श्रीशुक पुढे सांगत आहेत २.

श्रीशुक उवाच –
कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।

भुवोऽवतारयद्‌भारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥ १ ॥श्रीशुकाचार्य म्हणतात – भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरवपांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. (१)

पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळि बळिराम लोकरमण ।
निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्णें केलें ॥ २०३ ॥

स्वतः पूर्णब्रह्म अशा श्रीकृष्णाने, लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बळराम याला घेऊन व शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्यांचा संहार केला ३.

जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि ।
सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥ २०४ ॥

यादवांना जे मारतां येण्यासारखे नव्हते, त्यांच्या बाबतींत श्रीकृष्णानें निराळीच युक्ति केली. ती अशी की, त्यांचेच मित्र, आप्त, भाऊबंद, सोयरेधायरे, ह्यांच्यामध्यें घोर कलह उपस्थित केला ४,

उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर ।
मारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥ २०५ ॥आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरितां पांडवांनाहीं क्षोभवून कलहाच्या निमित्तानें कौरवांचा भार नाहींसा करून टाकला ५.

ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नै-
र्दुद्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान्

हत्वा नृपान्निरहरत्क्षितिभारमीशः ॥ २ ॥कौरवांनी कपटाने द्यूत खेळून, निरनिराळ्या प्रकारे अपमान करून, तसेच द्रोपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून, पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून, भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. (२)

दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार ।
ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण ॥ २०६ ॥

जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत, त्यांचा संहार करण्याकरिता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून कृष्णानें कलहाचे निमित्त उपस्थित केले ६.

येणें श्रीकृष्णसंकल्पोद्देशें । हों सरले कपटफांसे ।
तेणें कपटें बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥ २०७ ॥

श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटाचे फांसे निर्माण झाले. त्याच कपटानें कौरवांचा समुदाय कसा अनायासें मारला गेला ! ७.

जगीं द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें ।
धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥ २०८ ॥

जगामध्यें जुवा दुष्टच लोक खेळत असतात. त्यांतून ह्या जुव्याचा आरंभ कपटानें झाला. त्या दुष्टबुद्धि कौरवांनी जाणूनबुजून धर्मावर कपटाचे फांसे टाकले ८.

बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्‍नी ।
ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजीं ॥ २०९ ॥

साधेभोळे, अडाणी लोक देखील धर्मपत्नीचा छळ करीत नाहीत आणि द्रौपदी ही तर खरोखरी धर्माची पत्नी, तिला यांनी सभेमध्यें बांधून आणिली ! ९.

दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढिली कचकच ।
तें कर्म त्याचें त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥ २१० ॥

इतकेच नव्हे, तर दुःशासनानें तिच्या वेणीचे ‘कच’ (म्हणजे केस) हिसकले आणि त्यामुळेच येवढी कचकच वाढली. खरोखर तेच त्याचे कर्म त्याला भोंवले २१०.

वनी कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी ।
सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्यूची पदवी मस्तका आली ॥ २११ ॥

अरण्यामध्यें कोणी कोणाला नागवतो, त्या चोरीचा शोध राजा लावतो, पण भरसभेत जर राजाच लुटू लागला तर त्याचे मरणच ओढवलें म्हणावयाचे ११.

अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो ।
द्रौपदीवस्त्रहरण पाहाहो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥ २१२ ॥

अन्यायाशिवाय जर राजाच लुटू लागला, तर तेथें देव धांव घेतो. द्रौपदीवस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता १२.

अग्निदानें गरदानें । धनदारा अपहारणें ।
घाला घालूनि मारणें । शस्त्रपाणी होणें वधार्थ ॥ २१३ ॥

आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरितां हातांत शस्त्र धारण करणे १३.

अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण ।
हेंचि निमित्तासी कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥ २१४ ॥

अवज्ञा आणि उपहास, दुरूक्ति, धर्माचा छळ, हेच श्रीकृष्णानें निमित्ताला कारण केले १४.

पतिव्रतेचे वस्त्रहरण । तेणें तत्काळ पावे मरण ।
हेंचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणें कर्में ॥ २१५ ॥

पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडलें या योगें मरण हे तत्काळ ठेवलेलेंच. हेंच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्मानें साऱ्या कुळाचा विध्वंस झाला १५.

ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी ।
यालागी पाण्डवांचिये बुद्धि । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपू ॥ २१६ ॥

असा जो धर्माचा विरोधी असतो, त्याचा देव हटकून वध करतो. खरोखर त्यासाठींच पांडवांच्या मनामध्यें अत्यंत भयंकर क्रोध त्यानें उत्पन्न केला १६.

भूभारहरणचरित्र । सखे स्वजन सुहृद स्वगोत्र ।
शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजीं विचित्र उपजवी कलहो ॥ २१७ ॥

पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूनें आप्त, इष्ट, सखे, सोयरे, भाऊबंद, शास्त्रज्ञ, व अत्यंत पवित्र, अशांमध्येंसुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला १७.

धराभार हरावया गोविंदू । कळवळियाचे सखे बंधू ।
करविला तेथ गोत्रवधू । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥ २१८ ॥पृथ्वीचा भार उतरण्यासाठी श्रीकृष्णानें कळवळ्याचे सखे बंधु ह्यांचा, साह्यास आलेल्या राजसेनेसह, फडशा पाडून गोत्रवध केला १८.

भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य
गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं

यद्यादवं कुलमहो ह्यविषह्यमास्ते ॥ ३ ॥आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशियांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणार्‍या श्रीकृष्णांनी विचार केला की, एकापरीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे, तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही, असेच मला वाटते. (३)

ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार ।
मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥ २१९ ॥

अशा दुष्टांचे कैवार घेणारे, व अधर्माचरण करणारे, भूमीला केवळ भारभूत, असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना मारून ठार केले. कलहाचे फक्त निमित्त १९.

पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार ।
तर्‍ही उतरला धराभार । हे शारंगधर न मनीचि ॥ २२० ॥

पृथ्वीतील अधर्म करणारे राजे आणि त्यांच्या सेना शोधशोधून इतक्या मारल्या की, त्याला गणित नाही. तरीसुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असें श्रीकृष्णाला वाटेना २२०

यादव करूनि अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ ।
परी यादव झाले अतिप्रबळ । हें न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥ २२१ ॥

याचे कारण, यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले, पण ते यादवच आतां शिरजोर झाले हें श्रीकृष्णाला योग्य वाटले नाहीं २१.

नव्हतां यादवांचें निदान । नुतरे धराभार संपूर्ण ।
ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥ २२२ ॥

तेव्हां यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हावयाचा नाहीं हें श्रीकृष्णाच्या मनांत आले, व हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला. २२.

अग्नि कर्पूर खा‍ऊनि वाढे । कापुरांतीं अग्निही उडे ।
तैसें यादवांचें अतिगाढें । आले रोकडें निदान ॥ २२३ ॥

कापूर खाऊन अग्नि वाढतो, पण कापूर संपला की अग्निही विझून जातो, त्याप्रमाणें यादवांनी सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्याच संहाराची गोष्ट येऊन ठेपली २३.

केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी ।
तैसी यादवकुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥ २२४ ॥
केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो. त्याप्रमाणें यादवकुळांची एवढी वाढ झाली ती पुढच्या मरणाकरतांच झाली होती २४.

फळ परिपाकें परमळी । तें घे‍ऊन जाय माळी ।
तैशीं स्वकुळफळें वनमाळी । न्यावया तत्काळीं स्वयें इच्छी ॥ २२५ ॥

फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो, त्याप्रमाणें आपल्याच कुळांतील फळे आपणच आतां घेऊन जावी, असें श्रीकृष्णांनी आपणहूनच मनांत आणले २५.

अनंतबाहुप्रतापें । यादव वाढलें श्रीकृष्णकृपें ।
तोचि निधनाचेनि संकल्पें । काळरूपें क्षोभला ॥ २२६ ॥

श्रीकृष्णाच्या कृपेनें यादव हे बाहुबळानें पराक्रम करून वाढले होते, पण तोच श्रीकृष्ण त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळस्वरूपानें क्षुब्ध झाला २६.

अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ ।
ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥ २२७ ॥यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले. त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढेल वीरांची स्थिति श्रीकृष्णाला दुःसह झाली २७.

नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत्कथञ्चि-
न्मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।
अन्तःकलिं यदुकुलस्य विधाय वेणु

स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे याचा दुसर्‍या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणार्‍या अग्नीप्रमाणे या यदुवंशामध्येसुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन. (४)

मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा ।
श्रियोन्नत अतिगर्वमहिमा । मुख्य अकर्मा निजहेतु ॥ २२८ ॥

मी निजधामाला गेलो, तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील. कारण, कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात २८.

हे मद्‌बळें अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ ।
यांसि अप्रतिमल्लु दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥ २२९ ॥

हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत. ह्यांच्याशी सामना करणारा भूमंडळांत कोणी उरला नाही. ह्यांचा गर्व उतरावा तर तो मीच २९.

हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य राक्षसां कां दानवां ।
शेखीं निर्दाळावया यादवां । मागुतें मज तेव्हां पडेल येणें ॥ २३० ॥

इंद्रादि देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाहीं हे आटपावयाचे नाहीत; आणि हे असेच पाठीमागे राहिले तर अखेर ह्या यादवांचा संहार करण्याकरितां पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल २३०.

तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधूं काळगांठीं ।
ऐसा विचार जगजेठी । निश्चये पोटीं दृढ केला ॥ २३१ ॥

ह्याकरिता आता आपल्या डोळ्यांदेखतच आपले सारे कुळ काळाच्या तोंडांत द्यावे, असा श्रीकृष्णानें मनामध्यें विचार करून तोच निश्चय कायम केला ३१.

यदुवंश वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं ।
तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥ २३२ ॥

यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्णकृपाजळानें वाढलेले होते, त्यांत कपटाच्या मिषानें ऋषींच्या शापाच्या स्वरूपानें अवकृपेची इंगळी पडली ३२.

ते मुळी पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्मशापें ।
ते स्वजनविरोधरूपें । काळाग्निकोपें नाशील ॥ २३३ ॥

ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पानें पेटली आणि ब्रह्मशापानें धडाडली. ती आतां स्वजनांच्या विरोधरूपानें आणि काळाग्नीच्या कोपानें सर्वांच्या नाशास कारण होईल ३३.

ऐसें यादवकुळनिर्दळण । करूनियां स्वयें श्रीकृष्ण ।
निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करूं इच्छी ॥ २३४ ॥ह्याप्रमाणें यादवांच्या कुलाचें निर्दळण करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेनें आपण निजधामास जावें असें श्रीकृष्णांनी योजिले ३४.

एवं व्यवसितो राजन्सत्यसङ्कल्प ईश्वरः ।
शापव्याजेन विप्राणां सञ्जह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥राजन ! सर्वशक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राम्हणांच्या शापाचे निमित्त करून, आपल्याच वंशाचा संहार केला. (५)

यापरी आपुले कुळ । नासूं आदरिलें तत्काळ ।
हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥ २३५ ॥

ह्याप्रमाणें आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्यानें मनांत आणले व समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला ३५.

हेंचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें ।
ब्रह्मशापाचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥ २३६ ॥

आतां हें कार्य होते कसे ? ह्याबद्दल जगदीशानें विचार केला की, ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्तानें कुळाचा अनायासेंच नाश होईल ३६.

इतकें हें जैं सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य ।
मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥ २३७ ॥

हे इतके सिद्धीस गेले म्हणजे अवतारांतील इतिकर्तव्यता आटोपली; नंतरच स्वलीलेनें निजधामास जाऊं असा यदुवीरानें विचार केला ३७.

लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन
जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥ २३८ ॥श्रीकृष्ण हा ‘लीलाविग्रही’ म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा (जीवांप्रमाणें कर्मानुसार देह धारण करणारा नव्हे) व अतिशय सुंदर होता. त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र. तो परिपूर्ण ब्रह्म, पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता ३८.

स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनं नृणाम् ।
गीर्भिस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तानीक्षतां क्रियाः ॥ ६ ॥
आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ ।

तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥ ७ ॥त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणार्‍या आपल्या सौंदर्यसंपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणार्‍यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहाणार्‍यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक, कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. (६-७)

जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामिनीरमण ।
मोक्षाचें तारूं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥ २३९ ॥

जो सर्व मंगलांचा पूर्ण. मंगल व जो गोकुळांतील स्त्रियांची मनें रमविणारा; तो श्रीकृष्ण स्वतः मोक्षाचे जणूं तारूंच होता. त्याचे सौंदर्य केवळ अलौकिक होतें ३९.

जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम ।
ज्याचें त्रिलोकीं दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥ २४० ॥

जो भक्तकामकल्पदुम, मेघासारखा नीलकांतीनें मनोहर दिसणारा, ज्याचें नाम त्रैलोक्यात प्रसिद्ध, असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वभावतःच त्या नांवाला शोभणारा होता २४०.

श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडें ।
मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥ २४१ ॥

श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली, बिचारा मदनसुद्धा पोटी जन्माला आला, तेथें इंद्रचंद्रांची कथा काय ? ४१.

ज्याचें त्रैलोक्य पावन नाम । जो करी असुरांचे भस्म ।
तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥ २४२ ॥

ज्याचें नाम त्रैलोक्याला पावन करणारे, राक्षसांचे जो भस्म करून टाकणारा, ज्याला ‘पूर्णकाम’ असे म्हणतात, तो भक्तांना सदासर्वदा सुगम आहे ४२.

त्रिलोकींचे बरवेपण । भुलोनि कृष्णापाशीं आले जाण ।
नाम कृष्णलेशें बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥ २४३ ॥

त्रैलोक्यांत जेवढे म्हणून सौंदर्य आहे, तेवढें सारें भुलून श्रीकृष्णाजवळ आलेले होते. किंवा असे समजा की, कृष्णाच्या सौंदर्यांशानेंच सर्व त्रैलोक्यांतील सौंदर्य शोभत असते ४३.

जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा ।
ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥ २४४ ॥

जो सर्व सौंदर्याची शोभा, लावण्याची केवळ रास, ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेनें जगाला शोभा आणली ४४,

जो हरिखाचा सोलींव हरिख । कीं सुख सुखावतें परमसुख ।
ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥ २४५ ॥

जो हर्षाचाही सोलींव हर्ष, किंवा जो सुखालाच अत्यंत सुख देणारे परमसुख, ज्याच्या योगानें विश्रांतीलाही अत्यंत विसांवा मिळतो ४५,

तो अमूर्त मूर्तिधारण । कीं सकललोकलावण्य ।
शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्यसंपूर्ण साजिरा ॥ २४६ ॥

तो निराकारच आकारास आलेला, किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मुसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण, शोभेलाही शोभा आणणारा होता ४६.

घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें ।
तेवीं अमूर्त मूर्तीं मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥ २४७ ॥

थिजलेले तूप विरघळले, तरी त्याचा तूपपणा काही नाहीसा होत नाही, त्याप्रमाणें निराकारस्वरूप साकार झाले तरी ते पूर्ण परब्रह्मच होते ४७.

तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे ।
पहाणें पाहतेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥ २४८ ॥

त्याला पाहिले की पुरे, पाहता पाहताच पाहणे संपते, पाहणारा म्हणजे दृष्टा याच्यासह दर्शनक्रिया लाजून आपल्या स्वरूपात माघारी फिरते ४८,

दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुले शेजार ।
होवोनियां परात्पर । सुखाचे साचार श्रीकृष्णरूपीं ॥ २४९ ॥

दृष्टि तृप्त होऊन ढेंकर देते, आणि आपण आपले शेजार होऊन कृष्णस्वरूपामध्यें आनंद भोगते ४९.

श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी ।
जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥ २५० ॥

श्रीकृष्णाची गोडी एकदा चाखली, की जिव्हा प्राकृत रसास्वादाला सोडून देते. कारण की, मग तिच्या चाखणेपणाची गोडीच जाते. चाखणार्‍याला चाखून सोडून देते २५०.

नवल तेथींचें गोडपण । अमृतही फिकें केलें जाण ।
यापरी रसना आपण । हरिरसीं संपूर्ण सुखावे ॥ २५१ ॥

त्याचे माधुर्य विलक्षण आहे. त्या गोडीनें अमृतही फिके करून सोडले. याप्रमाणें जिव्हा हरिरसामध्यें पूर्णपणें सुखावते ५१.

लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुंचि होय वावो ।
सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहावो आन नावडे ॥ २५२ ॥

श्रीकृष्णाचा वारा लागला म्हणजे सारा संसारच निरस होऊन जातो. श्रीकृष्णाच्या सुगंधवायूशिवाय, नाकाला दुसरा कसला वास आवडतच नाहीं ५२.

वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता घ्राण ।
कृष्णमकरंदे जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥ २५३ ॥

वास, सुवास, पुष्प, घ्रेय, घ्राता आणि घ्राण ही कृष्णाच्या मकरंदानें सारी आपण होऊनच विश्रांतीला येतात ५३.

जयाचेनि अंगस्पर्शें । देह देही देहपण नासे ।
अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसें देहबुद्धि ॥ २५४ ॥

ज्याच्या अंगस्पर्शाच्या योगानें देह, देही देहपण हे सर्व नाहीसें होऊन जाते. अंगच स्वतः आपली देहबुद्धि कसें विसरतें पहा ! ५४.

कठिणाचें कठिणपण गेलें । मृदुचें मृदुपणही नेलें ।
कृष्णस्पर्शें ऐसें केलें । स्पर्शाचें ठेलें स्पर्शत्व ॥ २५५ ॥

कठिणाचे कठिणपण गेले, मृदूचें मृदुपण गेले, याप्रमाणें स्पर्शाचे स्पर्शत्वच नाहीसें झालें असे श्रीकृष्णांनी करून टाकिले ५५.

तयाचेनि पठणें वाचा । ठावो वाच्यवाचकांचा ।
नेतिशब्दें पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥ २५६ ॥

त्याच्या पठणानें वाय-वाचकाचा ठाव जी वाणी, तिनें ‘नेति’ शब्द पुसून टाकून शब्दाचा निःशब्द करून टाकला ५६.

बोलु बोलपणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें ।
कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्यानें नेलें वाचिक ॥ २५७ ॥

शब्द बोलणेच बंद पडले. बोलणारे काय झाले हेच समजेनासे झाले. कृष्णनामानें वाच्य-वाचक हा भेद नाहींसा केला ५७.

चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये ।
मग निश्चितपणे पाहे । कृष्णचरणी राहे निवांत ॥ २५८ ॥

चित्तानें पायांचें चिंत्तन केले की, तें चित्तपणाच विसरून जाते. आणि मग निश्चितपणे कृष्णचरणींच निवांत राहते ५८.

चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण ।
चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥ २५९ ॥

चित्त, चिंता आणि चिंतन ह्या तिहींची आठवणच राहात नाही. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केलें की चित्त परिपूर्ण ब्रह्मच होऊन जातें ५९.

नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म ।
मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥ २६० ॥

त्याची भूमीवर उमटलेली पावलट आश्चर्यकारक आहे. ती पाहतांच कर्माकर्म लयास जाते, आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया हा भ्रम, त्याच्या पदरजानें निर्भ्रमच होऊन जातो २६०.

पाहतां पा‍उलांचा माग । तुटती कर्माकर्मांचे लाग ।
कर्माचें मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥ २६१ ॥

त्याच्या पावलाचे ठसे पाहिले की, कर्माकर्माचे बंध तुटून जातात. कारण, कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया, तिचा अल्पांशसुद्धा राहू देत नाहीं ६१.

गायीमागील कृष्ण पा‍उले । पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें ।
अकर्म म्हणणें नाहीं उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥ २६२ ॥

गाईंच्या मागे उमटलेली कृष्णाची पावलं पाहिली असतां कर्त्यासह कर्म नाहींसें होतें, अकर्म असे म्हणणेसुद्धां उरत नाही. याप्रमाणें कर्माचे निष्कर्म होऊन जाते ६२.

जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें
वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणें पावणें परब्रह्म ॥ २६३ ॥ज्याची कीर्ति श्रवण केली असतां श्रोत्याचें श्रोतेंपणच राहत नाहीं, वक्त्याचें वक्तेपण उरत नाही; तर फक्त श्रवणानेंच परब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते ६३.

यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती ।
जेणें जडजीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥ २६४ ॥

ह्याप्रमाणें उदारकीर्ति कृष्णानें अवताराची थोर ख्याति करून सोडली. जिच्या योगानें जड जीवांचा उद्धार होतो. आणि श्रवणानेंच त्रैलोक्य पावन होते ६४.

स्वधामा गेलिया चक्रधरू । मागां तरावया संसारू ।
कृष्णकीर्ति सुगम तारूं । ठेवूनि श्रीधरू स्वयें गेला ॥ २६५ ॥
आपण निजधामास गेल्यानंतर आपल्या पाठीमागे संसारसागरांतून तरून जाण्यासाठी भगवान् स्वतःच कृष्णकीर्तिरूप तारूं ठेवून गेले ६५.

नवल या तारुवाची स्थिती । बुडवूं नेणे कल्पांतीं ।
श्रवणें तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥ २६६ ॥

ह्या तारवाची स्थिति चमत्कारिक आहे. त्याला कल्पांतीही कोणाला बुडवावयाला येतच नाही. त्याच्या श्रवणानें श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढें किती तरतील, हे कांही समजत नाहीं ६६.

श्रीकृष्णकीर्तीचें तारूं । घालितां आटे भवसागरू ।
तेथें कोरड्या पा‍उलीं उतारू । श्रवणार्थी नरू स्वयें लाहे ॥ २६७ ॥

श्रीकृष्णाचें कीर्तिरूप तारूं भवसागरांत घातले पुरे, की तो आटूनच जातो. तेव्हां श्रवणार्थी पुरुष जो उतारू, तो मग कोरड्या पावलानेंच पार पडतो ६७.

जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य ।
कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥ २६८ ॥

जे कृष्णाची कीर्ति पठण करतात, त्यांच्या जन्ममरणरूप संसाराला शून्य पडते, ते अतिपावन व कीर्तिमान होतात व सुरगण त्यांना वंदन करतात ६८.

आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लगती चारी मुक्ति ।
त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिर्वृत्ति हरिनामें ॥ २६९ ॥

श्रीकृष्णकीर्तीचें आदरानें पठण केले असतां चारही मुक्ति पायीं लागतात. त्यांच्या योगानें त्रिभुवन पावन होते; हरिनामानें परम निर्वृति म्हणजे परमानंद प्राप्त होतो ६९.

श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें ।
भीतरील तम एकसरें । निघे बाहेरें गजबजोनी ॥ २७० ॥

श्रीकृष्णकीर्तीची नामाक्षरें श्रवणद्वारे अंतरांत शिरली की, अंतःकरणांत असलेले सारें अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडतें २७०.

तंव कृष्णकीर्तिकथा गजरीं । तमासि ठावो नुरेचि बाहेरी ।
धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु । २७१ ॥

तसेंच कृष्णकीर्तिकथेच्या गजरामुळें अज्ञानाला बाहेरही कोठे थारा मिळत नाही, तेव्हां तें भीतीनें सपरिवार लयाला जाते. कृष्णकीर्तीमध्यें अशा रीतीनें परमानंद प्राप्त होतो ७१.

कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे ।
कीर्ति कीर्तिमंता‍ऐसें । दे अनायासें निजसुख ॥ २७२ ॥
कृष्णकीर्तिप्रतापाच्या प्रकाशानें सारा संसार कृष्णमयच दिसू लागतो. त्यामुळें ती कीर्ति त्याला कीर्तिमंतासारखेच अनायासें निजसुख देते. ७२.

जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणें पुरे ।
जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥ २७३ ॥

ज्याला पाहिले असतां पहाणे संपते, ज्याला चाखले असतां चाखणे पूर्ण होते, ज्याला श्रवण केले असतां श्रवण समाप्त होते, ज्याचे चिंतन केले असतां चित्तवृत्तिच थिजून जाते ७३,

ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी ।
ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थीं ॥ २७४ ॥

ज्याची भेट झाली असतां भेटीची तूट म्हणून कधी पडतच नाही, ज्याच्याबरोबर बोलले असतां परमार्थालाच मिठी पडते ७४,

ज्यासि दिधलिया खेंव । खेंवाची पुरे हांव ।
ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥ २७५ ॥

ज्याला आलिंगन दिले असतां आलिंगनाची हांवच पुरते, आणि ज्याचें नांव घेतले असतां सारें महाभय नाश पावतें ७५,

तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु ।
स्वपदासि शारङ्गधरु । अतिसत्वरु निघाला ॥ २७६ ॥असा तो सत्यसंकल्प ईश्वर, तो सर्वेश्वर, शार्ङ्गधर स्वलीलेनें म्हणजे स्वइच्छेने, मोठ्या त्वरेनें निजधामाला जाण्यास तयार झाला ७६.

श्रीराजोवाच –
ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम् ।

विप्रशापः कथमभूद्‌वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥ ८ ॥परीक्षिताने विचारले भगवन ! यदुवंशी तर ब्राम्ह्मणभक्त होते, उदार होते, तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांचे ठायी जडलेले होते असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला ? (८)

आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं ।
त्यांसि शापु घडे कैशिया रितीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥ २७७ ॥

तेव्हां परीक्षितीनें मोठ्या आदरानें विचारलें की, हे शुकयोगींद्रा ! यादव हे ब्राह्मणभक्तीत विनम्र होते, असे असता त्यांना शाप कसा झाला ते मला सांगावें ७७.

यादव दानें अति‍उदार । राजे हो‍ऊनि परम पवित्र ।
ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥ २७८ ॥

यादव दानशूर होते, राजे असून परम पवित्र होते, ते ब्राह्मणांच्या सेवेत निरंतर तत्पर असून कृष्णाचे आज्ञाधारक होते ७८.

यादव सदा कृष्णयोगेंसी । नित्य साधु यादवांपासी ।
तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २७९ ॥

यादवांना निरंतर कृष्णाचा सहवास असल्यानें यादवांजवळ निरंतर साधुसंत असत. नारदऋषि तर तेथेंच नेहमी राही, असे असतां यादवांना शाप कसा मिळाला ? ७९.

दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी
तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २८० ॥दक्षानें दिलेला शाप, कृष्णापाशी राहिल्यानें बाधावयाचा नाही, म्हणून नारदही द्वारकेंतच राहत होता, मग असा तो श्रीकृष्ण स्वतःच तेथें असतां यादवांना शाप कसा झाला ? २८०.

यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम ।
कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥ ९ ॥हे विप्रवर ! त्या शापाचे कारण काय होते ? तसेच त्याचे स्वरूप काय होते ? सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली ? हे सर्व आपण मला सांगावे. (९)

शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु ।
कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरूपु सांगावा ॥ २८१

शापाला मूळ कारण म्हटलें म्हणजे संताप. तेव्हां ब्राह्मणांना राग कसा आला ? शाप तरी कसला दिला ? ते थोडक्यात सांगावें. ८१.

यादव समस्त सखे बंधू । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदू ।
एकात्मता स्वगोत्रसंबंधू । त्यांमाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥ २८२ ॥

यादव म्हणजे सगळे भाऊबंद, एकमेकांचे आवडते, आणि त्यांचा प्रतिपाळ करणारा खुद्द श्रीकृष्ण, असा त्यांच्यामध्यें ऐक्यभाव व सर्वांचा एकच गोतावळा असता त्यांच्यामध्यें असलेली एकी मोडून मारामारी होण्याचा प्रसंग कशानें आला ? ८२.

“आत्मा वै पुत्रनामासि” । हे श्रुति प्रमाण सर्वांसी ।
तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥ २८३ ॥

‘आत्मा वै पुत्रनामासि’ (आत्माच पुत्र आहे) ही श्रुति सर्वांना प्रमाण आहे. असे असतां श्रीकृष्णाच्याच मुलांना शाप कसा बाधला ? त्या शापाला सत्यत्व तरी कसे आले ? ८३.

कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण ।
यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥ २८४ ॥

‘कुळाचा नाश करावयाचा हा कृष्णाचाच संकल्प; तोच ब्राह्मणांच्या शापास कारण झाला, आणि म्हणूनच तो सर्व यादवांना बाधक झाला, हे लक्षात ठेव ८४.

सृष्टि स्रजी पाळी संहारी । हें कृष्ण संकल्पमात्रें करी ।
तो यदुकुळनिधान निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥ २८५ ॥सृष्टीची उत्पत्ति, पालन, आणि संहार हें संकल्पमात्रानेंच कृष्ण करतो. त्यानेंच यादवकुळाचा संहार करण्याचा निश्चय केला’ असे सांगून त्याच्या अवताराची थोरवी शुक वर्णन करितात २८५.
श्रीबादरायणिरुवाच ।
बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेशं
कर्माचरन्भुवि सुमङ्गलमाप्तकामः ।
आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः

संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥ १० ॥श्रीशुक म्हणाले – ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता, असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदारकीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरविले कारण पृथ्वीवरील भार उतरविण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते. (१०)

रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु ।
तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥ २८६ ॥

परीक्षिती राजाला शुकाचार्य म्हणाले, कर्ता करविता काय तो एक श्रीकृष्ण, त्यानेंच आपल्या मुलांना शाप मिळावा म्हणून त्यांच्या मनांत अत्यंत अविचार उत्पन्न केला ८६.

स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा ।
यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥ २८७ ॥

आपण निजधामाला जावे अशी श्रीकृष्णाला उत्कंठा लागून राहिलेली होती. ह्याकरितां बाकी राहिलेले कार्यही लवकर शेवटास नेण्याची त्याला त्वरा झाली ८७.

केव्हां हो‍ईल कुलक्षयो । हेंचि मनीं धरी देवो ।
तो देवाचाचि भावो । शापासि पहा वो दृढमूळ ॥ २८८ ॥

आतां आपला कुलक्षय केव्हां होतो हीच देवाच्या मनाला चिंता लागून राहिली. हा देवाचाच हेतु शापाला मुख्य कारण झाला असे समज ८८.

जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति ।
शुक सांगे परीक्षितीप्रती । स्वानंदस्थिति उल्हासे ॥ २८९ ॥

ज्या कृष्णानें कुलक्षयाचा विचार मनांत आणला होता, त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन मनाच्या उल्हासवृत्तीनें परीक्षितीला शुक सांगू लागले ८९.

सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु ।
लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु निजांगे ॥ २९० ॥

सकल सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असा मनोहर सुशोभित वेष त्यानें धारण केला होता. त्या जगदीशानें आपल्या अंगांत सर्व लावण्याचा संग्रह केला होता २९०.

नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगीं गुंतल्या जनदिठी ।
कृष्णस्वरूपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥ २९१ ॥

काय चमत्कार सांगावा ! त्याच्या सौंदर्याला असें कांहीं तेज चढले होते की, त्याच्या प्रत्येक अवयवावर लोकांची दृष्टि खिळून राही. कृष्णाचे स्वरूप इतके चित्ताकर्षक होते की, ते पाहात असतां डोळ्यांची अगदी लटपट उडून जात असे ९१.

जैशी गुळीं माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णरूपासी ।
सर्वांगी वेढोनि चौपासीं । अहर्निशीं नोसंडिती ॥ २९२ ॥

गुळावर जशा माश्यांवर माश्या येऊन बसाव्या, त्याप्रमाणें कृष्णाच्या स्वरूपावर लोकांच्या दृष्टींवर दृष्टि बसून त्या चारही बाजूंनी सर्वांगाला वेढा देऊन रात्रंदिवस सोडीत नसत ९२.

नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा ।
यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥ २९३ ॥

डोळे त्या दर्शनलोभासाठी लांचावले होते. डोळ्यांना जणूं जिभा फुटल्या होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्णमूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभाच होती ९३.

तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी ।
अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥ २९४ ॥
तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला, ते डोळे तेथून माघारे म्हणून फिरत नसत. ते अधिकाधिक त्याला मिठी मारीत. त्यामुळें सर्व सृष्टि त्यांना कृष्णरूप दिसत असे ९४.

ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी ।
यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥ २९५ ॥

अशी डोळ्यांना त्याची आवड होती; म्हणून स्त्रिया त्यावर तुटून पडत. आणि म्हणूनच गोपींना त्या गोविंदाची अत्यंत गोडी लागलेली होती ९५.

कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासी विषयधर्म ।
तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ २९६

कृष्ण असा अति सुंदर होता, म्हणून त्याला विषयाभिलाष असेल असे म्हणाल, तर तसे नव्हे; कारण तो पूर्णकाम म्हणजे निरिच्छ व केवळ आत्मस्वरूपींच रममाण होणारा होता ९६.

कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम ।
स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम कां भोगी ॥ २९७ ॥
कृष्ण जर पूर्णकाम होता, तर तो द्वारकेमध्यें घरदार करून स्त्रीपुत्रांमध्यें राजकीय डामडौलानें राहून विषयांचा उपभोग कां घेत होता असें म्हणाल, तर तसे नव्हे ९७.

चहुं आश्रमां प्रकाशकु । त्रिलोकीं कृष्ण गृहस्थ एकु ।
तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥ २९८ ॥

श्रीकृष्ण हा चारही आश्रमांचा प्रकाशक असून त्रैलोक्यामध्यें खराखुरा ‘गृहस्थ’ असा एक श्रीकृष्णच ; कडकडीत ‘ब्रह्मचारी’ असाही तोच, आणि खराखुरा ‘संन्यासी’ पण तोच ९८.

कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ ।
त्याची सर्व कर्में पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणें कथनें ॥ २९९ ॥

कृष्णदेहामध्यें दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते. तो ‘लीलाविग्रही’ म्हणजे स्वेच्छेनें देह धारण करणारा (जीवाप्रमाणें कर्मानें-कर्मपरतंत्रपणें देह धारण करणारा नव्हे) असा असून शुद्ध चैतन्यसागरावरील एक लाट असा त्याचा दिव्य देह होता. त्याची सर्व कर्में पावनशीळ होती. ती श्रवण आणि कथन केल्यानेंच सर्वांचा उद्धार होतो ९९.

कृष्णकर्मांचे करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन ।
ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥ ३०० ॥

कृष्णाच्या कर्माचें जो स्मरण करतो, त्याचें तें कर्मच जीवाचें कर्मबंधन तोडून टाकतें. दीनांचा उद्धार करण्याकरितां असें उदार (उत्कृष्ट) कर्माचरण श्रीकृष्णांनी केलें होतें ३००.

श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागीं आचरे कर्म ।
ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥ ३०१ ॥

श्रीकृष्ण सकाम असेल म्हणूनच त्यानें कर्माचरण केले असे म्हणाल तर, ज्याचे नाम दुसऱ्याला निष्काम करूं शकते, तो स्वतः सकाम कसा असू शकेल ? १.

श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम ।
सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥ ३०२ ॥

श्रीकृष्णाच्या विषयभोगलीलांचे स्मरण केले असतां संन्यासीही आपोआप निष्काम होतात. विषयी लोकांचीही विषयेच्छा नाहींशी व्हावी असेंच त्यानें उदार कर्माचरण केले २.

तेणें अवाप्तसकळकामें । ऐशीं आचरला अगाध कर्में ।
मानव तारावया मनोधर्में । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥ ३०३ ॥

तो सर्वतोपरी पूर्णकाम असता, त्यानें अचाट कर्में केली. मनुष्यांनी स्मरणानेंच तरून जावे म्हणून भगवंतानें आपली कीर्ति पसरून ठेवली ३.

कैसें कर्म सुमंगळु । कानीं पडतांचि अळुमाळु ।
नासोनियां कर्ममळु । जाती तत्काळु श्रवणादारे ॥ ३०४ ॥

तें कर्म तरी किती मंगलदायक पहा ! की, यत्किंचितही कानीं पडलें असतां, तितक्या त्या श्रवणादरानेंच कर्माचे मळ तत्काल नाश पावतात ४.

श्रवणें उपजे सद्‍भावो । सद्‍भावें प्रकटे देवो ।
तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥ ३०५ ॥

श्रवणानें सद्‌भाव उत्पन्न होतो, सद्‌भावानें देव प्रगट होतो, आणि तेणेंकरून अहंभाव नाहीसा होतो. अशी ही हरीची कीर्ति उदार आहे ५.

श्रीकृष्णकीर्तीचें स्मरण । कां करितां श्रवणपठण ।
मागें उद्धरले बहुसाल जन । पुढें भविष्यमाण उद्धरती ॥ ३०६ ॥

श्रीकृष्णाच्या कीर्तीचें स्मरण, श्रवण किंवा पठण करून पुष्कळ लोक उद्धरले, आणि पुढेही उद्धरतील ६.

जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी ।
येर्‍हवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासीं अतिनिद्रा ॥ ३०७ ॥

पूर्वजन्मीं पुण्यराशी केलेल्या असतील, तरच हरिकथेकडे लक्ष लागते; नाहीतर इतरांना ऐकतांना अनायासे गाढ झोप लागते ७.

जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार ।
कृष्णें सुगमोपाव केला थोर । दिनोद्धार हरिकीर्तनें ॥ ३०८ ॥

जे हरिकथेला तत्पर असतात, त्यांच्या पुण्याला पार नाही, कीर्तनानें दीनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णानें हा सुलभ उपाय करून ठेवला आहे ८.

कृष्णकीर्तनें गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी ।
उतरल्या तीर्थांचिया उठी । नामासाठी निजमोक्षु ॥ ३०९ ॥

हरिकीर्तनाच्या गोष्टी गर्जना करून सांगू लागले असतां प्रायश्चित्तांचे समुदाय लाजून जातात, आणि तीर्थांचाही बडेजाव मागे पडतो. केवळ नामानेंच मुक्ति प्राप्त होते ९.

ऐसा निजकीर्ति‍उदारू । पूर्णब्रह्म शारंगधरू ।
लीलाविग्रही सर्वेश्वरू । पूर्णावतारू यदुवंशी ॥ ३१० ॥

असा आपल्या कीर्तीनें उदार, पूर्णब्रह्म शार्ङ्गधर, सर्वव्यापक-सर्वेश्वर असून व लीलादेहानें यदुवंशांत पूर्णावतार धारण केलेला होता ३१०.

उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ ।
यादव उरले अति अद्‌भुत । तेही समस्त निर्दळावे ॥ ३११ ॥

त्याला आतापर्यंत पृथ्वीचा भार उतरला असे वाटेचना. कारण अत्यंत प्रबळ असे यादव राहिले, तेही सर्व निर्दाळून टाकले पाहिजेत असे त्याला वाटें. ११.

ये अवतारीं हृषीकेशी । म्हणें हेंच कृत्य उरलें आम्हांसी ।
निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥ ३१२ ॥

श्रीकृष्ण म्हणाला, ह्या अवतारामध्यें आतां येवढेच कृत्य आपल्याला उरलेले आहे, तेवढा आपला वंश खलास करून मग निजधामास जावें १२.

तो यादवांमाजी माधव । कालात्मा देवाधिदेव ।
जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥ ३१३ ॥

त्या यादवांतील कालस्वरूपी देवाधिदेवानें पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका १३.

नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारूनि आपण ।
करूं सांगे शीघ्रगमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥ ३१४ ॥

नारदादि मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णानें बोलावून आणून आग्रहपूर्वक सांगितले की, तुम्ही आतां येथून निघून जावें १४.

ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले ।
हें यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णें ॥ ३१५ ॥

कारण जेथून संत दूर जातात त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते. तेव्हां यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णानें आधीं तेंच अवश्य आहे असे समजून ही युक्ति केली १५.

भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाही अनर्थासी ।
जाणे हें स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥ ३१६ ॥

भक्त, संत, साधु ज्याच्याजवळ असतील तेथें अनर्थाला रीघ नसते. हे वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत. इतर कोणास ते माहीत नाहीं १६.

जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो ।
हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥ ३१७ ॥

जेथे संतांचा समुदाय असतो, तेथें जन्ममरणाचासुद्धा अभावच. ही गोष्ट श्रीकृष्णासच माहीत असल्यामुळे, ब्रह्मशापाकरितां त्यानें तोच उपाय योजिला १७.

जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं ।
हें जाणोनियां श्रीहरी । द्वारकाबाहेरी ऋषी घाली ॥ ३१८ ॥
जेथून संत दूर जातात, तेथे अनर्थ तत्काळ मस्तकावर आदळतो. हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णानें सारे ऋषि द्वारकेच्या बाहेर घालविले १८.

ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांते लाघवी हृषीकेशी ।
तीर्थमिषें समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥ ३१९ ॥

ऋषि आपआपल्या आश्रमालाच जाणार होते, पण ह्या कपटनाटकी श्रीकृष्णानें तीर्थाचें निमित्त सांगून त्यांना आपणच ‘पिंडारका’ ला पाठवून दिले १९.

पिंडारका मुनिगण । श्रीकृष्णें धाडिले कोण कोण ।
ज्यांचे करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥ ३२० ॥ज्यांचे स्मरण करतांच कळिकाळ भयानें कापूं लागतो, असे कोण कोण ऋषि श्रीकृष्णानें पिंडारकाला पाठविले तें ऐक ३२०.

कर्मानि पुण्यनिवहानि सुमङ्गलानि
गायज्जगत्कलिमलापहराणि कृत्वा ।
कालात्मना निवसता यदुदेवगेहे
पिण्डारकं समगमन्मुनयो निसृष्टाः ॥ ११ ॥
विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरङ्‌गिराः

कश्यपो वामदेवोऽत्रिर्वसिष्ठो नारदादयः ॥ १२ ॥श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणार्‍या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी, काळरूपाने निवास करणार्‍या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले. (११-१२)

जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन ।
ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥ ३२१ ॥

जे तपस्तेजानें देदीप्यमान, जे पूर्ण ज्ञानाच्या योगानें चैतन्यघन, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे, असे ते मोठमोठे ऋषि पिंडारकास जाण्यास निघाले २१.

जे गायत्रीमंत्रासाठी । करूं शके प्रतिसृष्टी ।
जो विश्वामित्र महाहटी । तोही उठा‍उठी निघाला ॥ ३२२ ॥

गायत्री मंत्रामुळें प्रतिसृष्टि करण्यास समर्थ झाला असा जो महाआग्रही विश्वामित्र, तोही लागलाच निघाला २२.

जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमीं वसे असित ।
ज्याचेनि नामें द्वंद्वें पळत । तोही त्वरीत निघाला ॥ ३२३ ॥

जेथें शीत उष्ण बाधत नाहीं अशा आश्रमामध्यें राहणारा व ज्याच्या नांवानें द्वंद्वे पळत सुटतात, असा असित मुनीही तत्काळ निघाला २३.

जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णीं बैसोन आपण ।
पूर्ण केले वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥ ३२४ ॥

ज्यानें सूर्याला शरण जाऊन त्याच्या घोड्याच्या कानांत बसून पूर्ण वेदपठण केलें, तो कण्वऋषिही निघाला २४.

जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी ।
तोही द्वारकेबाहेरी । त्वरेंकरूनि निघाला ॥ ३२५ ॥

अत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुर्वासऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरेनें निघाला २५.

भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण ।
मिरवी वत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥ ३२६ ॥

ज्या भृगुनें मारलेली लाथ, श्रीकृष्ण हृदयावर धरून ते ‘श्रीवत्स’ भूषण म्हणून मिरवितो, तो भृगुऋषीही निघाला २६.

अंगिरा स्वयें सद्‌बुद्धी सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटी ।
जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥ ३२७ ॥

अंगिराऋषि तर स्वतः सृष्टीमध्यें बुद्धिमान्, ज्याच्या पोटीं देवगुरु बृहस्पती जन्माला आला, तोही जावयास निघाला २७.

कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं ।
यालागी हे काश्यपी सृष्टी । तोही उठाउठी निघाला ॥ ३२८ ॥

कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय. त्याच्या पोटी सुर, नर, किन्नर जन्मास आले, ह्याकरितांच या सृष्टीला ‘काश्यपसृष्टि’ असे म्हणतात, तो कश्यपऋषीही जाण्याकरिता उठला २८.

मुक्तांमाजी श्रेष्ठ भावो । वेदीं वाखाणिला वामदेवो ।
तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥ ३२९ ॥

सर्व मुक्तांमध्यें ज्याची योग्यता मोठी, ज्याचें वेदामध्येंसुद्धा वर्णन केले आहे, तो वामदेवऋषिसुद्धां जावयास निघाला २९.

अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं ।
श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥ ३३० ॥

अत्रीचाही एक चमत्कारच आहे. त्याच्या पोटी तिन्ही देव जन्मास आले. त्या श्रीदत्ताला मोठमोठे योगीही वंदन करतात. हे अनुसूयेचे केवढे भाग्य बर ! ३३०.

तो स्वयें अत्री ऋषीश्वर । श्रीकृष्ण आज्ञातत्पर ।
पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥ ३३१ ॥
तो अत्रि सर्व ऋषींत श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज्ञेला तत्पर असे. म्हणून त्यानें पिंडारकाला जाण्याची फारच जलदी केली ३१.

जो रामाचा सद्‌गुरू । ब्रह्मज्ञाने अति‍उदारू ।
ज्याचे शाटीचा प्रताप थोरू । जिंकिला दिनकरू तपस्तेजें ॥ ३३२ ॥

जो श्रीरामाचा सद्गुरु; ब्रह्मज्ञानानें अत्यंत उदार; ज्याच्या छाटीचा महिमा असा की, जिनें आपल्या तेजानें सूर्यालाही मागे टाकलें ३२.

ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी ।
निघाला द्वारकेहूनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥ ३३३ ॥

असा जो वसिष्ठ ऋषि, तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तत्काल पिंडारकाला निघाला ३३.

आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु ।
ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकिर्तनी ३३४ ॥

तसाच देवर्षि नारद. त्याचे ज्ञानही अगाध, जो सदासर्वदा परमानंदांत असून हरिकीर्तनामध्येंच निरंतर ज्याची उत्सुकता ३४.

ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु ।
ब्रह्मानंदे नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥ ३३५ ॥

तो खांद्यावर वीणा टाकून ब्रह्मपदें गात गात ब्रह्मानंदानें नाचन डुलत पिंडारकाला निघाला ३५.

इत्यादि हे मुनिवरू । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरू ।
शिष्यसमुदायें सहपरिवारू । मीनले अपारू पिंडारकीं ॥ ३३६ ॥

असे सर्व मुनिश्रेष्ठ आणि मोठमोठे ऋषिवर्य सहपरिवार, शिष्यसमुदायासह पिंडारकामध्यें अपरंपार गोळा झाले ३६.

एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।
मीनले कृष्णवैभव । अति‍अपूर्व वर्णिती ॥ ३३७ ॥

अशा प्रकारे पिंडारकामध्यें शाप देण्यास व अनुग्रह करण्यासही समर्थ असे सारे ऋषि जमा झाले, आणि कृष्णाच्या अपूर्व वैभवाचे वर्णन करूं लागले ३७.

बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळीं ।
कुमरीं ऋषीश्वरांसी रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥ ३३८ ॥

कपटनाटकी अशा श्रीकृष्णानें लागलाच कुलक्षय होण्याकरितां आपल्या मुलांकडून कपटमेळा जमवून मोठमोठ्या ऋषींची कुचेष्टा करविली ३८.

निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण ।
जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥ ३३९ ॥

निंदा, अपमान, टवाळकी केली म्हणजे ब्राह्मणांचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला की त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावें ३९.

ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडे ।
महादेवाचें लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥ ३४० ॥

ब्राह्मणांच्या रागापुढें कुल बिचारे ते काय ? महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ति समुद्रांत पडली. ४०.

तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर ।
हें एका‍एकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥ ३४१ ॥

सारा समुद्रही खारा करून सोडला असा ब्राह्मणांचा राग अनिवार ! असें ज्या एकएकाचे चरित्र, ते सारेच ऋषि तेथे जमले होते. ४१.

धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्यांचें वचन परम प्रमाण ।
हें सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वये दावी ॥ ३४२ ॥पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वचन परमप्रमाण होय व हे खरे करून दाखविण्याकरितांच श्रीकृष्णानें कुळाचा संहार करून दाखविला ४२.

क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः ।
उपसङ्गृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥ १३ ॥एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळतखेळत त्यांच्याजवळ गेले त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले. (१३)

यदुनंदन समस्त । क्रीडाकंदुक झेलित ।
एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥ ३४३ ॥

सारे यादवांचे पुत्र चेंडूनें खेळू लागले. चेंडू वरचेवर झेलीत असत व एकमेकांना मारीत असतांना अंग चुकवून पळत असत ४३.

ऐसा नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमर ।
अंगीं श्रीमद अपार । औद्धत्यें थोर उन्मत्त ॥ ३४४ ॥

अशा रीतीनें नानाप्रकारें मजा करीत ती यादवांची मुले पिंडारकास आली. त्यांच्या आंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता. ते सारे मदोन्मत्त असून मोठे उद्धट झाले होते ४४.

अतीत अनागत ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त ।
ज्यांचें वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकूं म्हणती ॥ ३४५ ॥

त्यांनी विचार केला की, येथे भूतभविष्य जाणणारे अनेक महर्षि जमले आहेत. ह्यांचे बोलणें अगदी खरें ठरतें असे म्हणतात. पण आम्ही ह्यांना खचित चकवूं ४५.

जैं अघडतें ये‍ऊनि पडे । तैं यांचें वचन कैसें घडे
म्हणोनि ऋषीश्वरांपुढें । मांडिलें कुडें यदुकुमरीं ॥ ३४६ ॥कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाहीं अशी गोष्ट असेल, तेव्हां ती यांच्या वचनानें तरी कशी घडेल ? असें म्हणून त्या मोठमोठ्या ऋषींपुढे यादववंशांतील मुलांनी एक कपट मांडले ४६.

ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् ।
एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्‍न्यसितेक्षणा ॥ १४ ॥
प्रष्टुं विलज्जती साक्षात्प्रब्रूतमोघदर्शनाः ।

प्रसोष्यन्ती पुत्रकामा किंस्वित्सञ्जनयिष्यति ॥ १५ ॥जांबवतीनंदन सांबाला स्त्रीचा वेष देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले, “ब्राह्मणांनो ! ही डोळ्यांत काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान, अबाधित आहे पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल, हे आपण सांगावे”. (१४-१५)

पहिलेच श्रीमतें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट ।
साम्बास दे‍ऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥ ३४७ ॥
आधींच लक्ष्मीच्या मदानें धुंद झालेले; त्यावर कपटाची युक्ति उभारली. त्यांनी (जांबवतीचा पुत्र) ‘सांब’ याला स्त्रीचा वेष देऊन सजविला. ४७.

तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु ।
प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥ ३४८ ॥

तो सांवळा व सुंदर होता. त्याचे डोळे पाणीदार होते. त्याला तो स्त्रीवेष फारच शोभू लागला व तो अभिनय करण्यांतही पटाईत असल्यामुळे, स्त्रियांची लाज, लज्जा, नेत्रकटाक्षादि हावभाव इत्यादि उत्तम रीतीनें दाखवू लागला ४८.

नयनी सोगयाचें काजळ । व्यंकटा कटाक्षे अतिचपल ।
सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥ ३४९ ॥

त्यानें डोळ्यांत काजळ घातले होते. तो डोळे तर असे मोडू लागला की त्यांच्यावर नजरसुद्धा ठरू नये. तो जात्याच सुंदर व नाजूक होता. त्यांत हंसगतीनें हळू हळू चालू लागला. ४९.

वस्त्रें बांधोनिया उदर । नावेक केलें थोर ।
तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥ ३५० ॥

बाकीच्या चावट पोरांनी त्याच्या पोटावर चिरगुटें बांधून त्याचे पोट मोठे केले, त्यामुळें ती गरोदर स्त्री आहे असेंच इतरांस वाटे ३५०.

हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी ॥
विसावा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदीं देखिली ॥ ३५१ ॥

तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालतांना पोट हालूं देत नसे. याप्रमाणें पावलागणिक विसांवा घेत घेत येत असलेली ती स्त्री ऋषींनी पाहिली ५१.

ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि ।
इतर ऋषींजवळी ये‍ऊनि । लोटांगणें घालिती ॥ ३५२ ॥

स्त्रियांचा मर्यादशीलपणा दाखवून ऋषींपासून थोड्या अंतरावर ती उभी राहिली. आणि तिच्याबरोबरच्या इतर मुलांचा घोळका ऋषींच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. ५२,

पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त ।
यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥ ३५३ ॥

पूर्वीच्या श्लोकांतील श्लोकार्धाची व्याख्या त्या ठिकाणी संपूर्ण झाली नाही, ह्याकरिता तो अर्थ येथे कथेच्या संदर्भाप्रमाणें वर्णन करतो. ५३.

छळाचेनि मिषें जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा ।
आत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्हीं आलों ॥ ३५४ ॥

छळाचा हेतु धरून आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यादरानें त्यांचे पाय धरले, आणि म्हणाले, आम्ही दर्शनाकरितां आलो आहों ५५.

ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत ।
कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥ ३५५ ॥

ह्याप्रमाणें ते सारे यदुकुमार पोटांतून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आव आणून तेथे हात जोडून उभे राहिले, आणि मोठ्या लीनतेनें त्या ऋषींना त्यांनी अशी विनंति केली की ५५,

स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर ।
आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥ ३५६ ॥महाराज ! ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे. ती गरोदर असून तिचे दिवस अगदी भरले आहेत. त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते ५६.

स्वयें ये‍ऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं ।
यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥ ३५७ ॥

तिला स्वतःच तुमच्यापुढे येऊन ही गोष्ट विचारण्याचे धारिष्ट होत नाही. ह्याकरितां आमच्या द्वारें तिनें सेवेसी विनंती केलेली आहे ५७.

तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचें उत्तर ।
शिरीं वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥ ३५८ ॥

आपण खरोखर सत्यदर्शी आहांत, आपले वचन कधीहीं असत्य होत नाही, तें हरिहरही शिरसावंद्य करतात. आपण सर्वजण ज्ञानानें उदार आहांत ५८.

यालागी हे गर्भवती । सादरें असे पुसती ।
पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥ ३५९ ॥

याकरितां ही गर्भवती स्त्री आपल्यास सविनय असे विचारीत आहे की, खरोखर आपणास काय होईल ? तिला तर पुत्राची इच्छा आहे ५९.

ऐसे कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे ।
तैशींच फलें भावगर्भें । छळणलोभें पावती ॥ ३६० ॥

ते अशा कपटभक्तीनें नम्र होऊन हात जोडून उभे राहिले. त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळें त्यांच्या भावनेप्रमाणेंच फळे मिळाली ३६०

कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढें ।
मुनि म्हणे यादवांचें गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥ ३६१ ॥

त्यांचे हे खोटें कर्म ओळखून नारद तर ऋषींपुढे नाचूंच लागले. ते मनांत म्हणाले, यादवांचा मृत्यु आतां अगदी जवळ आला ६१.

मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक ।
तेवीं ब्राह्मणछळणें देख । आवश्यक कुळनाश ॥ ३६२ ॥

मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण यावयाचें. त्याप्रमाणें ब्राह्मणांचा छळ केला की कुळाचा नाश हटकून व्हावयाचा ६२.

शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्‍भांवें करावें नमन ।
मारूं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥ ३६३ ॥

ब्राह्मण जरी शिव्याशाप देत आला, तरी त्याला भक्तिपुरःसर नमन करावे, ब्राह्मण मारावयाला आला, तरी आपण त्याच्यापुढे मस्तक वांकवावें ६३.

त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण ।
विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥ ३६४ ॥

त्या ब्राह्मणांचा छळ करणे म्हणजे विषभक्षण करणे आहे. पुनः असे की, विषानें फक्त खाणाराचाच प्राण जातो, पण ब्राह्मणांच्या छळानें साऱ्या कुळाचा नाश होतो ६४.

अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळीं ब्रह्म ब्राह्मण ।
त्याचें करूं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥ ३६५ ॥विद्वान् किंवा अविद्वान् हे मनांतही न आणतां, ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्रह्माचाच अवतार आहे असे समजले पाहिजे. त्याचा छळ करावयास लागले, तर करणार्‍याचा कुलक्षय निश्चित आहे म्हणून समजावें ६५.

एवं प्रलब्धा मुनयस्तानूचुः कुपिता नृप
जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥ १६ ॥परीक्षिता ! त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली, तेव्हा रागावून ते म्हणाले, “मुर्खांनो ! याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल”. (१६)

ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां ।
निधनाचा भरला वारा । तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले ॥ ३६६

हे राजाधिराजा परीक्षिती ! ऐक. ह्याप्रमाणें त्या यादवांच्या अंगांत मृत्यूचा जणू वाराच भरला होता, म्हणून ते त्या ऋषिवर्यांना छळावयाला गेले ६६.

कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर ।
मग तिंहीं काय वाग्वज्र । अति‍अनिवार सोडिलें ॥ ३६७ ॥

त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळें त्यांना अतिशय राग आला. मग काय ? त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असें वाग्वज्र सोडले ६७.

अरे हे प्रसवेल जें बाळ । तें हो‍ईल सकळकुळा काळ
निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्यें ॥ ३६८ ॥ते म्हणाले, अरे ! हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल. तुम्ही सारे दुर्दैवी आहांत. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल ! ६८

तच्छ्रुत्वा तेऽतिसन्त्रस्ता विमुच्य सहसोदरम् ।
साम्बस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं खल्वयस्मयम् ॥ १७ ॥मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले, तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले. (१७)

ऐकूनि शापाचें उत्तर । भयभीत झाले कुमर ।
सोडूनि सांबाचें उदर । अतिसत्वर पाहती ॥ ३६९ ॥

हें शापवचन ऐकून ते यादवांचे पोर घाबरले. त्यांनी तत्काळ त्या सांबाचें पोट सोडून पाहिलें ६९.

तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ ।
मग भयभीत विव्हळ । एका‍एकीं सकळ दचकोनि ठेले ॥ ३७० ॥

तो तेथल्या तेथेंच लोखंडाचें मुसळ निघालेले त्यांना दिसले. त्याबरोबर सर्वजण भयानें विव्हल होऊन, एकदम दचकून गेले व चकित होऊन राहिले ३७०.

नासावें यादव कुळ । ऐसा श्रीकृष्ण संकल्प सबळ ।
तोचि झाला लोहाचें मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥ ३७१ ॥

यादवांचें कुल नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा जो दृढ संकल्प, तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तत्काळ मुसळ झाला ७१.

जें जें ब्राह्मणाचें वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण ।
ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥ ३७२

ब्राह्मण जें जें वचन उच्चारतात, तें तें श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही. ब्राह्मणाच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरा करून दाखवितो ७२.

देखोनि ऋषिश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप ।
यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥ ३७३ ॥त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला व भयानें त्यांना कंप सुटला ७३.

किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः ।
इति विह्वलिता गेहानादाय मुसलं ययुः ॥ १८ ॥ते म्हणू लागले, “आम्ही अभागी हे काय करून बसलो ? आता लोक आम्हांला काय म्हणतील ?” याप्रमाणे व्याकूळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले. (१८)

आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविलें शठें ।
निजघाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥ ३७४ ॥

आम्ही करंट्या कपाळाचे, कपटानें त्या ऋषिवर्यांना विनाकारण चिडविले व आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळें कुलक्षय घरांत आणला ७४.

काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण ।
चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घे‍ऊन घरा आले ॥ ३७५ ॥आतां नगरवासी लोक आम्हांला काय म्हणतील ? हे ब्राह्मणांचा छळ करावयाला काय म्हणून गेले, असा शब्द ठेवतील. म्हणून चिंताक्रांत होऊन म्लानमुखानें ते सारे जण तें मुसळ घेऊन घरी आले ७५.

तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः ।
राज्ञ आवेदयांचक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥ १९ ॥यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली. (१९)

सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न ।
यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथें नाहीं ॥ ३७६ ॥

सभेत वसुदेव, उग्रसेन, बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर सारे यादव बसले होते, एकटा श्रीकृष्ण मात्र तेथे नव्हता ७६.

सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ ।
शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥ ३७७ ॥अशा त्या सभेमध्यें सांब वगैरे सर्व कुमार आले आणि लोखडांचे मुसळ पुढे ठेवून चिमणीसारखी तोंडे करून शापाची इत्थंभूत हकीगत सांगते झाले ७७.

श्रुत्वामोघं विप्रशापं दृष्ट्वा च मुसलं नृप ।
विस्मिता भयसन्त्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥ २० ॥राजन ! जेव्हा द्वारकेतील लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचे वृत्त ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले, तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले कारण ब्राह्मणांचा शाप कधी व्यर्थ जात नाही, हे त्यांना माहीत होते. (२०)

ऐकून द्विजांचा परमकोपू । यादवां सुटला भयकंपू ।
मिथ्या नव्हे ब्रह्मशापू । भयें संतापु सर्वांसी ॥ ३७८ ॥

ब्राह्मणांचा आपणांवर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगांतही भयानें कांपरें भरले. ब्राह्मणांचा शाप कधींच मिथ्या व्हावयाचा नाहीं अशी त्यांची खात्री असल्यामुळें भयानें त्या सर्वांना काही सुचेनासे झाले ७८.

प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ ।
नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥ ३७९ ॥

प्रत्यक्ष मुसळ पाहून तर सर्वांची अगदी खळबळ उडून गेली. नागरिकांत एकच हलकल्लोळ माजून राहिला की, आता यादवांचें कुल राहते कसे ? ७९.

ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती ।
वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥ ३८० ॥राजा परीक्षिती ! ऐक, भविष्याची गति फार कठीण आहे ! कारण, तो वृत्तांत त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही. त्यांनी आपल्याच मतानें विचार चालविला ३८०.

तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः ।
समुद्रसलिले प्रास्यल्लोहं चास्यावशेषितम् ॥ २१ ॥यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देवविला. (२१)

आहुक राजा उग्रसेन । तेणें लावूनि लोहघण ।
मुसळ करोनियां चूर्ण । समुद्रीं जाण घालविलें ॥ ३८१ ॥

यादवांचा राजा जो उग्रसेन, त्यानें लोखंडाच्या घणानें त्या मुसळाचे चूर्ण करवून ते समुद्रात फेंकून देवविले ८१.

त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ ।
उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला ॥ ३८२ ॥पण त्या मुसळाचा मध्यभाग अतिशयच कठीण होता. त्याचे काही केल्यानें चूर्ण होईना. तो निखालस वज्रासारखा कठीण होता. ह्याकरितां तोही लागलाच जशाचा तसा समुद्रात दूर झुगारून दिला ८२.

कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः ।
उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥ २२ ॥
मत्स्यो गृहीतो मत्स्यघ्नैः जालेनान्यैः सहार्णवे ।

तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥ २३ ॥तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहात वाहात समुद्राच्या किनार्‍यापर्यंत आला. थोड्याच दिवसात तो लव्हाळ्यांच्या रूपाने उगवला. (२२) मासे पकडण्यार्‍या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडले त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता, तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला. (२३)

समुद्र लाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ ।
प्रभासीं लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारूपें ॥ ३८३ ॥

समुद्राच्या लाटांच्या कल्लोळानें ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभासतीर्थाच्या तीराला लागून तेथे लव्हाळ्यांच्या रूपानें उगवलें ८३,

लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं ।
अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥ ३८४ ॥

आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशानें गिळला. त्याला समुद्रांत जाळें टाकून कोळ्यानें मोठ्या चातुर्यानें इतर मत्स्यांबरोबर जाळ्यांत धरून बाहेर काढले ८४.

तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं ।
देखोनि हरिखला तो भारी । हें आंतुडे करीं तो सभाग्य ॥ ३८५ ॥

नंतर त्या कोळ्यानें तो मासा चिरला, तो त्याच्या पोटांतून लोखंड निघाले. ते पाहून त्या कोळ्याला फारच आनंद झाला. कारण, हे ज्याला सांपडेल तो भाग्यशाली होय ८५.

मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचें अचूक संधान ।
अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥ ३८६ ॥माशाच्या पोटांतील लोखंडाचे निशाण बिनचूक लागते, आणि त्यायोगानें असाध्य शिकारही साधता येते. ह्याकरिता त्याचा त्या कोळ्यानें बाण केला ८६.

भगवान्ज्ञातसर्वार्थ ईश्वरोऽपि तदन्यथा ।
कर्तुं नैच्छत् विप्रशापं कालरूप्यन्वमोदत ॥ २४ ॥
इति श्रीमद्‍भा्गवते महापुराणे परमहंसायां संहितायां

एकादशस्कन्धे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥भगवंतांना सर्व काही माहीत होते हा शाप ते उलटवू शकत होते परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. (२४)

कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञें श्रीकृष्णें ।
परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥ ३८७ ॥

लोखंडाचे पीठ केल्याचें व समुद्रात फेंकल्याचें वृत्त कोणी न सांगतां सर्वज्ञ श्रीकृष्णाला कळले. पण ब्राह्मणांचा शाप खोटा पाडण्याचे त्याच्या मनांतसुद्धा येईना ८७.

म्हणाल हें नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी ।
जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥ ३८८ ॥

कोणी म्हणेल हे त्याला होण्यासारखेच नसेल, ब्राह्मणांचा शाप त्याच्यानें खोटा करवणारच नसेल. तर पहा, ज्यानें गुरूच्या मृतपुत्राला उठवून आणले, तो श्रीकृष्ण कळिकाळाचाही नियंता होता ८८.

पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत ।
ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥ ३८९ ॥

कळिकाळाचे दांत पाडून देवकीचे नेलेले गर्भ ज्यानें परत आणले, तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय. मनात येईल ते घडवून आणण्याचे आपल्या आंगी सामर्थ्य असल्याचे तो जाणून होता ८९.

निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी ।
श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥ ३९० ॥

तिळभरही झोपेचा भंग न करता ज्यानें सर्व मथुरा द्वारकेंत आणून ठेविली, तो श्रीकृष्ण काय करूं शकणार नाहीं ? पण त्यानेंसुद्धा आपल्या कुळाची ममता धरिली नाहीं ३९०.

निजकुळक्षयो जर्‍ही न आला । तर्‍ही अन्यथा न करी ब्राह्मणबोला ।
ब्राह्मणें पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकू ॥ ३९१ ॥

आपल्या कुलक्षयाचा प्रसंग आला, तरी ब्राह्मणांचा शब्द त्यानें खोटा केला नाही. ब्राह्मणानें जरी लाथ मारली, तरी ती पायाची खूण एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली ९१.

तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण ।
हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागी पूर्ण ब्रह्मण्यदेवो ॥ ३९२

त्यालाच ‘श्रीवत्सलांछन’ असे म्हणतात. त्यालाच तो सर्व भूषणांत श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिरवीत असे. म्हणूनच तो पूर्ण ‘ब्रह्मण्यदेव’ होय ९२.

श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मण । अन्यथा न करी ब्राह्मणवचन ।
यालागीं ‘ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥ ३९३ ॥

श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे. तो ब्राह्मणाचे वचन कधीच खोटें करीत नसे. याकरिता ‘पूर्ण ब्रह्मण्यदेव’ असें वेद स्तुतिपाठक होऊन वर्णन करतात ९३.

ब्राह्मणरूप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी ।
कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥ ३९४ ॥

स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मणरूपच होता, म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे. कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवर रागावला नाहीं ९४.

ऐकोनि ब्राह्मणांचा शापू । न धरी मोहाचा खटाटोपु ।
म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पू । कुलक्षयानुरूपु संतोषे ॥ ३९५ ॥

ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहांत पडला नाहींच; उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धीस गेला हें ठीक झाले असे तो म्हणाला ९५.

यापरी श्रीगोविंदु । काळरूपी मानी आनंदु ।
कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥ ३९६ ॥

ह्याप्रमाणें कालरूपी जो श्रीकृष्ण त्यानें ह्यांत आनंदच मानला. कुलक्षयाची क्षिती किंवा दुःख ह्यांचा लेशभरही संबंध त्यानें ठेवला नाहीं ९६.

पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा ।
अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥ ३९७ ॥

उलट श्रीकृष्णाला परम संतोष झाला. ज्ञानमय कथा पुढील अध्यायांत आहे. ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे. ह्याकरितां श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे ९७.

जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद हो‍ईल सुहावा ।
जनक आणी आर्षभदेवां । प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे ॥ ३९८ ॥

त्यांत नारद आणि वसुदेव ह्यांचा मोठा गोड संवाद होईल. जनकाची आणि आर्षभदेवांची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्यें अगदी पोहत राहील ९८.

हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमार्थु ।
एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधें ॥ ३९९ ॥

ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे. शुद्ध परमार्थ आहे. त्याची तुम्हांला गोडी लावून देईन. ह्याकरिता एकनाथ हा गुरु जनार्दनाची, आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरितां श्रोत्यांची प्रार्थना करीत आहे ३९९.

इति श्रीमद्‍भावगवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां
एकाकार टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु
.

तोच (जनार्दन) माझ्या मुखाचे मुख झाला आहे, माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत येऊन तोच उभा राहात आहे, आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या अर्थाचे लेखन करीत आहे ९८.

परी नवल त्याचें लाघव । अभंगीं घातलें माझें नांव ।
शेखीं नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच ॥ ९९ ॥

पण त्याचे कौतुक विलक्षण आहे. कारण, त्यानें माझें नांव अभंगामध्यें घालून ठेवले आहे. शेवटीं नांवाचा अभिमानही उरावयाला जागा ठेवली नाहीं ९९.

या वचनार्था संतोषला । म्हणे भला रे भला भला ।
निजभाविकु तूंचि संचला । प्रगट केला गुह्यार्थु ॥ १०० ॥

हे भाषण ऐकून त्याला संतोष झाला, आणि तो म्हणाला, भले शाबास ! खरोखर निजभक्तीचा तूं पुतळाच आहेस, आणि म्हणून हा गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला १००.

हे स्तुति कीं निरूपण । ग्रंथपीठ कीं ब्रह्मज्ञान ।
साहित्य कीं समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥ १०१ ॥

ही स्तुति की विषयप्रतिपादन ? ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान ? हे साहित्यशास्त्र कीं समाधान ! हैं काय आहे हेंच समजत नाहीं १.

तुझा बोलुचि एकएकु । सोलीव विवेकाचा विवेकु ।
तो संतोषासी संतोखू । आत्यंतिकू उपजवी ॥ १०२ ॥

तुझा एक एक शब्द म्हणजे सोलींव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो २.

तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे ।
मुमुक्षुसारंगांचीं पालिंगें । रुंजी निजांगें करितील ॥ १०३ ॥

तुझ्या मुखांतून जें जें निघते, ते ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते. मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजारवरच करीत राहतील ३.

ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक ।
श्रवणामात्रेंचि देख । निजात्मसुख पावती ॥ १०४ ॥
ग्रंथाचा आरंभ सुंदर वठल्यामुळें मुक्त, मुमुक्षु, साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वरूपसुखाचा अनुभव घेतील ४.

येणें वचनामृत तुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें ।
अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥ १०५ ॥

ह्या वचनामृताच्या तुषारानें ग्रंथरूप भूमि विवेकांच्या अंकुरांनी एकसारखी भरून गेली, आणि तीस फळे येऊन ती सुफलित झाली ५;

कीं निर्जीवा जीवु आला । नातरी सिद्धा सिद्धिलाभु जाला ।
कीं निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥ १०६ ॥

किंवा निर्जीवालाच जीव आला; अथवा सिद्धाला सिद्धीची प्राप्ती झाली; अगर पतिव्रतेला पति आपल्या वैभवासहवर्तमान प्राप्त झाला ६;

तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें ।
तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थू ॥ १०७ ॥

अशा रीतीच्या हर्षभरानें मोठ्या आनंदानें मी म्हटले की महाराज ! ठीक आहे. तुमच्या चरणकृपाप्रसादेंकरून ग्रंथाचा अर्थ सहज रीतीनें आनंदानें करीन ७.

श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं ।
कीं वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥ १०८ ॥

सेतुबंधनसमयीं श्रीरामचंद्राच्या दृष्टिप्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या, किंवा वसिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली ८,

कीं याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता ।
कीं धर्में श्वानु सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥ १०९ ॥

किंवा याज्ञवल्क्य ऋषीच्या मंत्राक्षतांनी सुकलेल्या काष्ठालाही उत्तम पल्लव फुटले, किंवा श्वानासही धर्मराजानें स्वर्गवासास पात्र केले ९,

तैसे माझेनि नांवें । ग्रंथ होती सुहावे ।
आज्ञाप्रतापगौरवें । गुरुवैभवें सार्थकु ॥ ११० ॥

त्याप्रमाणें माझ्या नांवानें ग्रंथ प्रसिद्ध होणे हें गुरूच्या आज्ञाप्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे ११०.

घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे ।
त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांशें चढे अधिक ॥ १११ ॥

एका (एकनाथ) व एकादश यांच्या आद्याक्षरांवरून घटित पाहिले असतां राशि-नक्षत्र एकच असते. पण त्या एकामध्येच जेव्हां पूर्ण दिसते, तेव्हां त्याची किंमत दसपटीनें अधिक चढते. ११.

मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे ।
तरी एका एकपणचि सहजें । आलें निजबोधें ग्रंथार्थें ॥ ११२ ॥

एकावर एक ठेवला म्हणजे त्याला अकरा म्हणतात. म्हणून एकालाही एकपणानें सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे. १२.

तेथें देखणेंचि करूनि देखणें । अवघेंचि निर्धारूनि मनें ।
त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥ ११३ ॥

तेथे देखणे आहे तेच देखणे करून सारेंच मनानें एक समजतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे १३.

पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदया‍आंतु ।
एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥ ११४ ॥

दशमस्कंधांतील भाग पाहून एकादशस्कंधाच्या प्रारंभापूर्वी एकादशस्कंधावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे १४.

म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका ।
ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वें ॥ ११५ ॥
म्हणून एकादश स्कंधावरची ही टीका, एकादशीलाच एका म्हणजे एकनाथ करीत आहे. त्यामुळें ती एकपणाच्या सुखाला एकत्वानें पात्र होईल १५.

आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी ।
जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥ ११६ ॥

आतां व्यास, वाल्मीकि, भार्गव — ज्याचा पुराणांतरीं ‘उशना’ कवि म्हणून गौरव केला आहे – त्या महाकवींना वंदन करतों १६.

तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती ।
हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥ ११७ ॥

त्यांनी आपल्या ज्ञानानें माझ्या बुद्धीची वृद्धि करावी, अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतों १७.

वंदूं आचार्य शंकरू । जो ग्रंथार्थविवेकचतुरू ।
सारूनि कर्मठतेचा विचारू । प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥ ११८ ॥

तसेंच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा श्रीशंकराचार्यांनाहीं नमस्कार करतो. कारण, त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा (ज्ञानमार्गाचा) पृथ्वीवर प्रकाश पाडला १८.

आतां वंदूं श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधर ।
जयाची टीका पाहतां अपार । अर्थ साचार पैं लाभे ॥ ११९ ॥

आतां भागवतटीकाकार श्रेष्ठ श्रीधर, ज्याच्या टीकेमध्यें अपार अर्थ भरला आहे, त्याला नमस्कार करतों १९.

इतरही टीकाकार । काव्यकर्ते विवेकचतुर ।
त्यांचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं हो‍आवें ॥ १२० ॥
याशिवाय इतर टीकाकार, काव्यकर्ते व विवेकचतुर असतील, त्यांच्या चरणींही नमस्कार करून ग्रंथश्रवण करण्याला सादर होण्याविषयी विनंती करतों १२०,

वंदूं प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर ।
नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचें भाग्य थोर गुरुकृपा ॥ १२१ ॥

आतां निवृत्तिनाथप्रमुख ज्ञानेश्वर, नामदेव, वटेश्वर – ज्यांचे गुरुकृपेचे भाग्य थोर आहे – अशा प्राकृत कविश्रेष्ठांनाहीं वंदन करूं. २१.

जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां ।
तयांचें चरणी माथा । निजात्मता निजभावें ॥ १२२ ॥

ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असतां प्राकृत जनांनासुद्धा ज्ञानप्राप्ती होते, त्यांच्या चरणांवरही एकात्मभावानें व अनन्य भक्तीनें मस्तक ठेवितों. २२.

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी ।
नवीं जुनीं म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥ १२३ ॥

संस्कृत ग्रंथकर्ते ते ‘महाकवि’ म्हणावे, आणि प्राकृत ग्रंथकर्ते ‘लघुकवि’ गणावे असें कां बरें ? सोन्याच्या फुलांमध्यें अमुक नवीं व अमुक जुनी असे कसें म्हणता येईल ? २३.

कपिलेचें म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर ।
वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥ १२४ ॥

कपिला गाईचे तें दूध; आणि इतर गाईंचे काय पाणी ? वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगानें व रुचीनें सारखेच मधुर असते २४.

जें पाविजे संस्कृत अर्थें । तेंचि लाभे प्राकृतें ।
तरी न मनावया येथें । विषमचि तें कायी ॥ १२५ ॥

त्याप्रमाणें संस्कृत अर्थानें जें समजते, तेंच मराठी भाषेनेंही कळते, मग ही मराठी भाषाच न मानण्याजोगी अडचण काय आहे ? २५.

कां निरंजनीं बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो ।
तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥ १२६

राजा जाऊन अरण्यांत बसला, तर त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय. तेथें सेवक त्याच्या सेवेला जर न जातील, तर तो त्यांना दंड करील २६.

कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात ।
तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥ १२७ ॥

किंवा एक गरिबाची मुलगी आणि एक श्रीमंताची मुलगी अशा दोन मुलींशी राजाने लग्न केले तर सहजच दोघींची तेथे बरोबरीच होते २७.

देशभाषावैभवें । प्रपंच पदार्थीं पालटलीं नांवें ।
परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटू ॥ १२८ ॥

देशभाषापरत्वे प्रपंचांतील पदार्थांची नांचे पालटतात; परंतु राम-कृष्णादि जी विशेषनामें आहेत, ती काही भाषाभिन्नत्वामुळें पालटत नाहीत २८.

संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली ।
असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥ १२९ ॥

संस्कृत भाषा मात्र देवानें केली, आणि मराठी भाषा काय चोरांपासून निघाली ? हे सारे अभिमानाचे भ्रम एका बाजूस राहू द्यात. उगीच वायफळ बोलण्यांत काय हशील ? २९.

आतां संस्कृता किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा ।
ते पावनचि तत्त्वता । सत्य सर्वथा मानली ॥ १३० ॥

तात्पर्य, संस्कृत भाषेत असो, किंवा मराठी भाषेत असो, हरिकथा ही पावनच आहे अशी सर्वजण मान्यता देतील १३०.

वंदूं ‘भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता ।
ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥ १३१ ॥

आता माझ्या पितामहाचा पिता असा जो भानुदास त्याला वंदन करू या. कारण, त्याच्या योगानेच हा आमचा वंश त्या भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे ३१.

जेणें बाळपणीं आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्‍भानु ।
जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥ १३२ ॥

ज्यानें लहानपणीच सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वतः चित्सूर्य बनला, तसेच मानाभिमान सोडून स्वत: भगवंताकडून पावन झाला ३२,

जयाचि पदबंध प्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति ।
कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां रातीं देखिला ॥ १३३ ॥

ज्याची पदबंधप्राप्ति पहावयाला प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाची मूर्ति आली होती, ती देदीप्यमान कुंडलें कानांत झळकल्यामुळें रात्री दृष्टीस पडली ३३.

तया भानुदासाचा ‘चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी ।
तया ‘सूर्य’ नाम ठेवूनि । निजीं निज हो‍ऊनि भानुदास ठेला ॥ १३४ ॥

त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणि, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला, त्याचे नांव ‘सूर्य’ ठेवून भानुदास निवर्तला ३४.

तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी ।
म्हणौनि रखुमा‍ई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥ १३५ ॥

त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी मला रुक्मिणी प्रसवली, म्हणून ‘रखुमाई’ ही आमची खरोखरीची माता होय ३५.

हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा ।
धन्य निजभाग्याचि लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥ १३६ ॥

ग्रंथारंभकाली पूर्वजांच्या मालिकेला मी अभिवंदन केले. अशा वैष्णवकुलांत मी जन्मास आलों, हे माझे मोठे भाग्य होय ३६.

ते वैष्णवकुळीं कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक ।
उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥ १३७ ॥

ह्या वैष्णवकुळामध्येच नारद, प्रल्हाद, सनकादिक, उद्धव, अक्रूर, श्रीशुक, वसिष्ठ, इत्यादि परमेश्वराचे मोटमोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले आहेत ३७.

ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थीं अवधानशीळ ।
म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थीं ॥ १३८ ॥

ते सारे वैष्णव ग्रंथार्थाकडे अवधान देणारे आहेत, म्हणून साऱ्या वैष्पाववंशांतील मालिकेलाही मी ग्रंथारंभी वंदन केले ३८.

उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा ।
जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥ १३९ ॥

आतां ज्याच्या गोत्रामध्यें मी उत्पच झालों, त्या विश्वामित्रालाही नमस्कार करतो. तो प्रतिसृष्टि करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्रीमंत्राला त्याच्या योगानें महत्त्व प्राप्त झाले आहे ३९.

जो उपनिषद्‌विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की ।
जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनी ॥ १४० ॥

उपनिषदांचे विवेचन करणारा जो याज्ञवल्क्यऋषि, त्यालाही वंदन करतों-जो कृपामृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टि देतो १४०.

मन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरू जाहला सखा ।
म्हणौनि ग्रंथारंभू देखा । आला नेटका संमता ॥ १४१ ॥

आतां यच्चयावत् प्राणिमात्रांनाहीं नमस्कार करतों. कारण, त्यांच्यामुळेच परमेश्वराशी सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथारंभ उत्तम रीतीनें पार पडला ४१.

आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या ।
तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥ १४२ ॥

आतां जो गुरूंचाही गुरु, ज्यानें आपला बोध विशद करण्यासाठी ग्रंथ करावयाची स्फूर्ति दिली, त्या दत्तात्रेयाला नमस्कार करतों ४२.

तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु ।
मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥ १४३ ॥

तोच शब्द दाखवून देतो, अर्थानें अर्थ मनांत भरवितो, आणि मग वक्तेपणाही स्वत:च देऊन बोलवितो ४३.

तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृद्‌गत ।
त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥ १४४ ॥

तो म्हणतो की,  श्रीमद्‌भागवत हे भगवंताचें हृद्‌गत आहे. ज्याचे चित्त निरंतर भगवंताच्या ठायीं असेल, त्यासच ते प्राप्त होईल ४४.

तें तें हें ज्ञान कल्पादी । ‘चतुःश्लोक’ पदबंधीं ।
उपदेशिला सद्‍बुद्धी । निजात्मबोधीं विधाता ॥ १४५ ॥

हैं कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान, चार श्लोकांनी भगवंतानें निजात्मबोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले ४५.

नवल तयाचा सद्‌भावो । शब्दमात्रें झाला अनुभवो ।
बाप सद्‌गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥ १४६ ॥

त्याचा सद्‌भाव आश्चर्य करण्यासारखाच आहे. कारण, शब्दमात्रानेच (एकदा सांगतांक्षणींच) त्याला अनुभव आला. सद्‌गुरुकृपेची थोरवी काय हो सांगावी ! तिनें ब्रह्मदेवाला तत्काल निःसंदेह करून टाकले ४६.

तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गें आला शुद्धु ।
तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्धु भावार्थीं ॥ १४७ ॥

तोच चार श्लोकात्मक उपदेश, गुरुपरंपरेनें जशाचा तसा चालत आला. ब्रह्मदेवानें अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान् मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला ४७.

तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला ।
पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधें ॥ १४८ ॥

तेणेंकरून नारद तृप्त होऊन तो नखशिखान्त अर्थमयच होऊन गेला व पूर्ण परमानंदानें तृप्त होऊन नाचूं लागला ४८.

तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु ।
तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥ १४९ ॥

तो ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुलक्षुन गीत गात गात त्या ब्रह्मानंदाच्या भरांत नाचत डुलत भूमंडळावर आला ४९,

तो आला सरस्वती तीरा । तंव देखिलें व्यास ऋषीश्वरा ।
जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजीं पडिला ॥ १५० ॥

आणि सरस्वतीच्या तीरावर उतरला. तों तेथें व्यास ऋषीश्वर त्याच्या दृष्टीस पडले. ते अत्यंत दुर्धर अशा संशयाच्या पुरामध्यें गटकळ्या खात होते १५०.

वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण ।
परी तो न पवेंचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥ १५१ ॥

व्यासांनी वेदार्थयुक्त सारी पुराणे रचली. पण त्यांचे स्वतःचे व्हावे तसे समाधान म्हणून झाले नाही. ५१

तो संशयसमुद्रा आंतु । पडोनि होता बुडतु ।
तेथें पावला ब्रह्मसुतु । ‘नाभी’ म्हणतु कृपाळू ॥ १५२ ॥

ते संशयसमुद्रांत पडून बुडत होते, इतक्यांत तेथे कृपाळु नारदमुनि जाऊन त्यांनी त्यांस ‘आपण मुळीच भिऊ नका’ असे आश्वासन दिले ५२.

तेणें एकांतीं ने‍ऊनि देख । व्यासासि केला एकमुख ।
मग दाविले चार्‍ही श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥ १५३ ॥

त्यांनी व्यासांना एकांतांत नेऊन एकमुख केले, आणि मग संसारच्छेदक असे ते उत्तम चार श्लोक त्यांना दाखविले ५३.

ते सूर्याते न दाखवुनी । गगनातेंही चोरूनी ।
कानातें परते सारूनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥ १५४ ॥

ते सूर्याला न दाखवितां, आकाशालासुद्धां चोरून, कानापासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला ५४.

तें नारदाचें वचन । करीत संशयाचें दहन ।
तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥ १५५ ॥

त्या नारदाच्या भाषणानें व्यासांच्या संशयाचे छेदन झाले, तेव्हां त्यांच्या मनास पूर्व स्वसुखाचे समाधान प्राप्त झाले ५५.

मग श्रीव्यासें आपण ।  भागवत दशलक्षण ।
शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधें पूर्ण सार्थक ॥ १५६ ॥

त्यानंतर स्वतः श्रीव्यासांनी दशलक्षण* भागवताचा शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले ५६.
इतर पुराणें पंचलक्षणात्मक व  भागवत दशलक्षणात्मक आहे ती लक्षणे अशी – सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊति, मन्वंतरे, ईशानुकथन, निरोध, मुक्ति, आश्रय.

तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला ।
मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥ १५७ ॥

तेणेंकरून शुकालाही आनंद झाला. तोही परमानंदानें तृप्त झाला. मा तो समाधिस्थ राहून आत्मशांतिमध्येच निश्चळ होऊन बसला ५७.

तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना ।
मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥ १५८ ॥

त्यामुळें समाधीलाच साहजिक समाधान प्राप्त झाले. मग तशा स्थितीत परीक्षितीला ब्रह्मज्ञान सांगण्याकरितां तो अकस्मात त्याच्या येथे आला ५८.

पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारू ।
तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकारु पैं याचा ॥ १५९ ॥

परिक्षितीचा अधिकार पहावा, तर त्यानें कलीलाच बांधून ठेविलेले होते. त्याचा अधिकार धर्माहूनही थोर आहे असे प्रत्ययास येत होतें ५९.

कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिभेणें तो पळाला ।
परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्यें अधिक ॥ १६० ॥

कारण, श्रीकृष्ण भूलोकावर असेपर्यंत धर्मराजा राहिला होता, व कृष्ण निजधामाला गेल्यानंतर तो कलीच्या भयानें पळाला; पण परीक्षिती कलीलाही दाबांत ठेवून राज्य करीत असे. अर्थात् धर्माहूनही तो अधिक धैर्यवान् होता १६०.

अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग ।
तो अधिकाररत्‍न उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भीं झाला ॥ १६१ ॥

तो अर्जुनाच्या निर्व्यंग अशा वीर्यपरंपरेनें उत्पन्न झालेला होता. कृष्णभगिनी सुभद्रा-आजीबाईंचा तो नातू. (सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु व अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती.) त्याचा पिंड म्हणजे अधिकाराचे केवळ रत्न होय. कारण, त्याचे रक्षण गर्भामध्येंही साक्षात श्रीकृष्णांनी केले होते ६१.

गर्भींच असता ज्याच्या भेणें । स्पर्शूं न शके शस्त्र द्रौण्य ।
त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥ १६२ ॥

जो गर्भांत असतांनाच ज्याच्या भयानें अश्वत्थाम्याचे शस्त्र आंत शिरू शकले नाही, त्याचा पूर्ण अधिकार सांगावयाला कोण समर्थ आहे ? ६२.

जेणें रक्षिले गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं ।
यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिती नांवाची ॥ १६३ ॥

ज्यानें गर्भामध्यें आपले संरक्षण केले, तो परमेश्वर प्रत्येक प्राणिमात्रामध्यें आहे, असें तो परीक्षण करीत होता, म्हणूनच त्याचे नांव परीक्षिती असें ठेविले होते. हा नांवाचा महिमा किती अगाध आहे पाहा ! ६३.

तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती ।
ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥ १६४ ॥

तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती, पृथ्वीचा उद्धार करण्याकरितांच जन्माला आला होता. त्याच्यामुळेंच त्रिभुवनाला श्रीमद्‌भागवताची परमार्थरूप पाणपोई निर्माण झालेली प्रसिद्ध आहे ६४.

अंगीं वैराग्यविवेकू । ब्रह्मालागीं त्यक्तोदकू ।
तया देखोनि श्रीशुकू । आत्यंतिकू सुखावला ॥ १६५ ॥

अंगामध्यें वैराग्य आणि विवेक; ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेलें; अशा त्या परीक्षितीला पाहून श्रीशुकाला अत्यंत आनंद झाला ६५.

बाप कोपु ब्राह्मणाचा । शापें अधिकारू ब्रह्मज्ञानाचा ।
तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावा नमस्कारू ॥ १६६ ॥

ब्राह्मणांचा राग फार विचित्र ! त्यांनी शापाच्या योगें ब्रह्मज्ञानाचा अधिकार परीक्षितीला दिला. अशांच्या चरणीं कायावाचामनेंकरून भक्तिभावानें नमस्कार असो ६६.

ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरू । हें मीच काय फार करूं ।
परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारू मिरवितु ॥ १६७ ॥

ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, याविषयी मीच फार काय सांगावें ! पण साक्षात श्रीविष्णुही हृदयावर श्रीवत्सलांच्छन अद्यापि मिरवितात ! ६७.

म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु ।
यालागीं वेदरूपें नारायणु । उदरा ये‍ऊनि वाढविला ॥ १६८ ॥

म्हणून ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव होय हा माझा सिद्धान्त अगदी खरा खरा आहे. म्हणूनच नारायण वेदरूपानें ब्राह्मणाच्या पोटी येउन वृद्धिंगत झाला ६८.

म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हें ब्रह्मींचे निजावेव ।
येथें न भजती ते मंददैव । अति निर्दैव अभाग्य ॥ १६९ ॥

म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव होत. ते साक्षात् परब्रह्माचे अवयव आहेत. असे असतां त्यांना भजत नाहीत ते दुर्दैवी व अत्यंत कपाळकरंटे होत ! ६९.

ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकू केला देवो ।
प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो । प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रें ॥ १७० ॥

ब्राह्मणांचे सामर्थ्य काही विलक्षण आहे ! त्यांनी देवाला आपला आज्ञाधारक करून ठेवले आहे. अहो ! मूर्तीची प्रतिष्ठा करतांना त्यांच्या केवळ मंत्रानेच तिच्या ठायीं देवांश प्रगट होतो १७०.

तंव संत म्हणती काय पहावें । जें स्तवनीं रचिसी भावें ।
तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥ १७१

तेव्हां संत म्हणाले, काय सांगावे ! तूं भक्तीनें जें जें स्तवत करतोस, त्यामध्यें खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धान्त काढतोस ७१.

गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती ।
तैशींच संतस्तवनीं स्तुतीं । ऐक्यवृत्ती वदलासी ॥ १७२ ॥

गणपति आणि सरस्वती ही तू एका ब्रह्मपंक्तीलाच बसविलींस. त्याचप्रमाणें संतवर्णनामध्यें स्तुतीच्या रूपानें एकात्मता प्रगट केलीस ७२.

पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा ।
ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥ १७३॥

नंतर कुल आणि कुलदेवता ह्यांच्या वर्णनामध्यें जी कथा सांगितलीस ती ऐकून तिच्या श्रवणानेच चित्ताला चिंतेचा निखालस विसर पडला ७३.

जो सद्‍भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं ।
सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥ १७४ ॥

जो सद्‌भाव संतचरणी, तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी. गुरुस्तवनानेंही संतांना तूं संतुष्ट केलेस. तेव्हां तुझी वाणी धन्य होय ७४.

तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण ।
हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥ १७५

तुझ्या मुखानें तुझा गुरु जनार्दन स्वत: आपणच बोलत आहे. तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतांच ही सारी खूण आम्हाला पटली ७५.

चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें ।
पुढील कथानिरूपणातें । करी निश्चितें आरोहण ॥ १७६ ॥

तुला प्रेमाचे भरते आलें आहे, पण तें विवेकानें थोडे आवरून धरून पुढील कथा सांगावयाचा निश्चय करून सुरुवात कर ७६.

विसरलों होतों हा भावो । परी भला दिधला आठवो ।
याचिलागीं सद्‍भावो । तुमचे चरणीं पहाहो ठेविला ॥ १७७ ॥

ही गोष्ट मी विसरलोंच होतो; पण बरी आठवण केलीत. ह्याकरितांच मी तुमच्या चरणांवर पूर्ण भरंवसा ठेवलेला आहे ७७.

उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें ।
सज्जनांमाजीं सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥ १७८ ॥

जेथे काही कमी आहे असें वाटेल, तेथे ते आपण पूर्ण करावें. ग्रंथार्थाची सिद्धि करून सज्जनांमध्यें मला मान्यता द्यावी ७८.

ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका ।
आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥ १७९ ॥

ते म्हणाले, शाबास रे शाबास ! ठीक बोलतोस. तर हे कविपोषका ! तुझ्या ग्रंथाचा संदर्भ नीट लागण्याकरितां आतां संस्कृतावर टीका करावयाला सुरुवात कर पाहू” ७९.

याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो ।
तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥ १८० ॥

ह्याच भाषणावर भक्ति ठेवून मी चरणी लागलों आहे. अहो ! आता आपल्या आज्ञेप्रमाणें कथेचा प्रस्ताव करतो पाहा १८०.

तरी नैमिषारण्या‍आंतु । शौनकादिकांप्रति मातु ।
सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥ १८१ ॥

तर नैमिषारण्यामध्यें सूत शौनकादिकांना मागील कथासंदर्भ येणेंप्रमाणें सांगत आहेत ८१.

मागें दहावें स्कन्धीं जाण । कथा जाली नवलक्षण ।
आतां मोक्षाचें उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥ १८२ ॥

मागे दहाव्या स्कंधामध्यें (सर्ग-विर्सग-स्थान इत्यादि) नऊ लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली. आतां एकादशस्कंधामध्यें श्रीकृष्ण मोक्षाचे उपलक्षण सांगतात ८२.

जो चिदाकाशींचा पूर्ण चंद्र । जो योगज्ञाननरेंद्र ।
तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥ १८३

जो चिदाकाशांतील पूर्णचंद्र, जो योगज्ञानाचा केवळ मुकुटमणि, तो शुकयोगींद्र बोलूं लागला व ते श्रवणकर्ता परीक्षिती राजा ८३.

तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी ।
तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥ १८४ ॥

तो म्हणाला, महाराज ! यासाठी मी सर्वस्वावर पाणी सोडले आहे, तें प्राप्त करून देण्यासाठी आपण कृपा केली. माझ्या भाग्यास आतां पारावार नाहीं ८४.

अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था ।
तिहीं पाव दे‍ऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥ १८५ ॥

खरोखर ही मोक्षाची कथा अगाध आहे. ज्यांना मोक्षाची आस्था असेल, त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय देऊन अत्यंत आदरानें श्रवण करण्यास तयार व्हावें ८५.

भीतरी ने‍ऊनियां कान । कानीं द्यावें निजमन ।
अवधाना करूनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥ १८६ ॥

कान अंतर्मुख करून त्या कानांत आपले मन ठेवावे, आणि लक्षाला सावध करून कथेचें अनुसंधान धरावें ८६.

बहुतीं अवतारीं अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो ।
देवां न कळे अभिप्रावो । अगम्य पहाहो हरिलीला ॥ १८७

देवानें अनेक युगांमध्यें अनेक अवतार धारण केले; पण ह्या (श्रीकृष्ण) अवतारांतील चमत्कार काही विशेष आहे. अहो ! ह्या हरीची लीला अतर्क्य आहे. तिच्यांतील रहस्य देवांनासुद्धा कळत नाहीं ८७.

उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा ।
बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥ १८८ ॥

जो उपजतांच मायेपासून (आईपासून) निराळा होऊन आपणहून आपल्याच लीलेनें वाढला, ज्यानें लहानपणांतच पूतनादिकांना स्वतःच मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला ८८,

मायेसि दाविलें विश्वरूप । गोवळां दाविलें वैकुंठदीप ।
परी गोवळेपणाचें रूप । नेदीच अल्प पालटों ॥ १८९ ॥

आईला विश्वरूप दाखविले, गोपाळांना वैकुंठभेट करून दिली, आणि तरीसुद्धा गवळीपणाचे स्वरूप यत्किंचितही पालटूं दिले नाहीं ८९.

बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्यें जगादेखतां करी ।
परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥ १९० ॥

बाळ असतांच बलाढ्य लोकांना मारले, जगासमक्ष अचाट कर्मे केली, पण बाळपणाच्या बाहेर तिळमात्र गेला नाहीं १९०,

ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी ।
पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥ १९१ ॥

आपण साक्षात् परब्रह्म असतां चोरी केली, देव असून व्यभिचार केला, बायका-मुले असून ब्रह्मचारी हाही नमुना दाखविला ९१.

अधर्में वाढविला धर्म । अकर्में तारिलें कर्म ।
अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥ १९२ ॥

अधर्मानें धर्म वाढविला, अकर्मानेंच कर्म तारले, अनियमितपणानेंच अत्यंत दुर्धर नियमांचे पालन केले ९२.

तेणें संगेंचि सोडिला संगू । भोगें वाढविला योगु ।
त्यागेंवीण केला त्यागू । अति अव्यंगु निर्दोष ॥ १९३ ॥

त्यानें संगानेंच निःसंगता संपादन केली, भोगानेंच योग वाढविला, त्यागाशिवायच अत्यंत अव्यंग व निर्दोष असा त्याग केला ९३.

कर्मठां हो‍आवया बोधू । कर्मजाड्याचे तोडिले भेदू ।
भोगामाजीं मोक्षपदू । दाविलें विशदू प्रकट करूनि ॥ १९४ ॥

कर्मठ लोकांना बोध व्हावा म्हणूनच कर्मजाड्याचे भेद तोडून टाकले आणि भोगामध्येंही मोक्षपद असू शकतें हें उघड करून दाखविले ९४.

भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केलीं एके पंक्ती ।
काय वानूं याची ख्याति । खा‍ऊनि माति विश्वरूप दावी ॥ १९५ ॥

भक्ति, भुक्ति आणि मुक्ति, या तिहींनाहीं एकाच पंक्तीला बसविलें. अहो ! ह्याची ख्याति काय सांगावी ? यानें माती खाऊन विश्वरूप दाखविलें ! ९५.

त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा ।
परी निजबोधाचा खरा । या अवतारीं पुरा पवाडा केला ॥ १९६ ॥

त्या श्रीकृष्णाचे उत्तम व परमपवित्र चरित्र मी तुला सांगेन. खरोखरच ह्या अवतारामध्यें आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे ह्यांत संशय नाहीं ९६.

एकादशाच्या तात्पर्यार्थीं । संक्षेपें विस्तरे मुक्ति ।
बोललीसे आद्यंतीं । परमात्मस्थिति निजबोधें ॥ १९७ ॥

एकादश स्कंधाच्या तात्पर्यार्थामध्यें आदि आणि अंती निजबोधानें कोठे विस्तारानें व कोठे संक्षेपानें परमात्मस्थिति म्हणजे मुक्तिच सांगितलेली आहे ९७.

तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादू निमिजायंती ।
सांगितली कथासंगती । ‘संक्षेपस्थिति’ या नाम ॥ १९८ ॥
तेथें नारदानें वसुदेवाला निमि-जायंत यांच्या संवादरूपानें कथासंगति सांगितली, ती ‘संक्षेपस्थिति’ होय ९८.

तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति ।
स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ‘सविस्तर’ ॥ १९९ ॥

आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळें अनेक प्रकारच्या दृष्टान्तांनी विशद करून श्रीकृष्णांनी स्वमुखानें जी ज्ञानकथा सांगितली ती ‘विस्तारस्थिति’ होय ९९.

दशमीं ‘निरोध’ लक्षण । मागां केलें निरूपण ।
जेथें धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥ २०० ॥

दशमस्कंधामध्यें पूर्वी निरोधनलक्षण सांगितले, त्यांत श्रीकृष्णांनी अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला २००.

ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति । सदा आक्रंदत होती । जिच्या साह्यालागीं श्रीपति । पूर्णब्रह्मस्थिति अवतरला ॥ २०१ ॥
ज्यांच्या अधर्माच्या भारानें पृथ्वी सदा आक्रोश करीत होती. म्हणून जिच्या साह्याकरितां पूर्णब्रह्म भगवान श्रीकृष्णरूपानें अवतरला

दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व ।
वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥ २०२ ॥ते दुष्ट दैत्य आणि दानव व पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे ह्यांचा श्रीकृष्णदेवांनी वध केला. हा मागील कथेतील सारांश श्रीशुक पुढे सांगत आहेत २.

श्रीशुक उवाच –
कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।

भुवोऽवतारयद्‌भारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥ १ ॥श्रीशुकाचार्य म्हणतात – भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरवपांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. (१)

पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळि बळिराम लोकरमण ।
निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्णें केलें ॥ २०३ ॥

स्वतः पूर्णब्रह्म अशा श्रीकृष्णाने, लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बळराम याला घेऊन व शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्यांचा संहार केला ३.

जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि ।
सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥ २०४ ॥

यादवांना जे मारतां येण्यासारखे नव्हते, त्यांच्या बाबतींत श्रीकृष्णानें निराळीच युक्ति केली. ती अशी की, त्यांचेच मित्र, आप्त, भाऊबंद, सोयरेधायरे, ह्यांच्यामध्यें घोर कलह उपस्थित केला ४,

उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर ।
मारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥ २०५ ॥आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरितां पांडवांनाहीं क्षोभवून कलहाच्या निमित्तानें कौरवांचा भार नाहींसा करून टाकला ५.

ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नै-
र्दुद्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान्

हत्वा नृपान्निरहरत्क्षितिभारमीशः ॥ २ ॥कौरवांनी कपटाने द्यूत खेळून, निरनिराळ्या प्रकारे अपमान करून, तसेच द्रोपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून, पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून, भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. (२)

दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार ।
ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण ॥ २०६

जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत, त्यांचा संहार करण्याकरिता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून कृष्णानें कलहाचे निमित्त उपस्थित केले ६.

येणें श्रीकृष्णसंकल्पोद्देशें । हों सरले कपटफांसे ।
तेणें कपटें बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥ २०७ ॥

श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटाचे फांसे निर्माण झाले. त्याच कपटानें कौरवांचा समुदाय कसा अनायासें मारला गेला ! ७.

जगीं द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें ।
धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥ २०८ ॥

जगामध्यें जुवा दुष्टच लोक खेळत असतात. त्यांतून ह्या जुव्याचा आरंभ कपटानें झाला. त्या दुष्टबुद्धि कौरवांनी जाणूनबुजून धर्मावर कपटाचे फांसे टाकले ८.

बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्‍नी ।
ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजीं ॥ २०९ ॥

साधेभोळे, अडाणी लोक देखील धर्मपत्नीचा छळ करीत नाहीत आणि द्रौपदी ही तर खरोखरी धर्माची पत्नी, तिला यांनी सभेमध्यें बांधून आणिली ! ९.

दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढिली कचकच ।
तें कर्म त्याचें त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥ २१० ॥
इतकेच नव्हे, तर दुःशासनानें तिच्या वेणीचे ‘कच’ (म्हणजे केस) हिसकले आणि त्यामुळेच येवढी कचकच वाढली. खरोखर तेच त्याचे कर्म त्याला भोंवले २१०.

वनी कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी ।
सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्यूची पदवी मस्तका आली ॥ २११ ॥

अरण्यामध्यें कोणी कोणाला नागवतो, त्या चोरीचा शोध राजा लावतो, पण भरसभेत जर राजाच लुटू लागला तर त्याचे मरणच ओढवलें म्हणावयाचे ११.

अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो ।
द्रौपदीवस्त्रहरण पाहाहो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥ २१२ ॥

अन्यायाशिवाय जर राजाच लुटू लागला, तर तेथें देव धांव घेतो. द्रौपदीवस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता १२.

अग्निदानें गरदानें । धनदारा अपहारणें ।
घाला घालूनि मारणें । शस्त्रपाणी होणें वधार्थ ॥ २१३ ॥

आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरितां हातांत शस्त्र धारण करणे १३.

अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण ।
हेंचि निमित्तासी कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥ २१४ ॥

अवज्ञा आणि उपहास, दुरूक्ति, धर्माचा छळ, हेच श्रीकृष्णानें निमित्ताला कारण केले १४.

पतिव्रतेचे वस्त्रहरण । तेणें तत्काळ पावे मरण ।
हेंचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणें कर्में ॥ २१५ ॥

पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडलें या योगें मरण हे तत्काळ ठेवलेलेंच. हेंच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्मानें साऱ्या कुळाचा विध्वंस झाला १५.

ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी ।
यालागी पाण्डवांचिये बुद्धि । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपू ॥ २१६ ॥

असा जो धर्माचा विरोधी असतो, त्याचा देव हटकून वध करतो. खरोखर त्यासाठींच पांडवांच्या मनामध्यें अत्यंत भयंकर क्रोध त्यानें उत्पन्न केला १६.

भूभारहरणचरित्र । सखे स्वजन सुहृद स्वगोत्र ।
शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजीं विचित्र उपजवी कलहो ॥ २१७ ॥

पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूनें आप्त, इष्ट, सखे, सोयरे, भाऊबंद, शास्त्रज्ञ, व अत्यंत पवित्र, अशांमध्येंसुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला १७.

धराभार हरावया गोविंदू । कळवळियाचे सखे बंधू ।
करविला तेथ गोत्रवधू । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥ २१८ ॥पृथ्वीचा भार उतरण्यासाठी श्रीकृष्णानें कळवळ्याचे सखे बंधु ह्यांचा, साह्यास आलेल्या राजसेनेसह, फडशा पाडून गोत्रवध केला १८.

भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य
गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं

यद्यादवं कुलमहो ह्यविषह्यमास्ते ॥ ३ ॥आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशियांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणार्‍या श्रीकृष्णांनी विचार केला की, एकापरीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे, तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही, असेच मला वाटते. (३)

ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार ।
मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥ २१९ ॥

अशा दुष्टांचे कैवार घेणारे, व अधर्माचरण करणारे, भूमीला केवळ भारभूत, असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना मारून ठार केले. कलहाचे फक्त निमित्त १९.

पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार ।
तर्‍ही उतरला धराभार । हे शारंगधर न मनीचि ॥ २२० ॥

पृथ्वीतील अधर्म करणारे राजे आणि त्यांच्या सेना शोधशोधून इतक्या मारल्या की, त्याला गणित नाही. तरीसुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असें श्रीकृष्णाला वाटेना २२०

यादव करूनि अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ ।
परी यादव झाले अतिप्रबळ । हें न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥ २२१ ॥

याचे कारण, यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले, पण ते यादवच आतां शिरजोर झाले हें श्रीकृष्णाला योग्य वाटले नाहीं २१.

नव्हतां यादवांचें निदान । नुतरे धराभार संपूर्ण ।
ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥ २२२ ॥

तेव्हां यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हावयाचा नाहीं हें श्रीकृष्णाच्या मनांत आले, व हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला. २२.

अग्नि कर्पूर खा‍ऊनि वाढे । कापुरांतीं अग्निही उडे ।
तैसें यादवांचें अतिगाढें । आले रोकडें निदान ॥ २२३ ॥

कापूर खाऊन अग्नि वाढतो, पण कापूर संपला की अग्निही विझून जातो, त्याप्रमाणें यादवांनी सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्याच संहाराची गोष्ट येऊन ठेपली २३.

केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी ।
तैसी यादवकुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥ २२४ ॥

केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो. त्याप्रमाणें यादवकुळांची एवढी वाढ झाली ती पुढच्या मरणाकरतांच झाली होती २४.

फळ परिपाकें परमळी । तें घे‍ऊन जाय माळी ।
तैशीं स्वकुळफळें वनमाळी । न्यावया तत्काळीं स्वयें इच्छी ॥ २२५ ॥

फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो, त्याप्रमाणें आपल्याच कुळांतील फळे आपणच आतां घेऊन जावी, असें श्रीकृष्णांनी आपणहूनच मनांत आणले २५.

अनंतबाहुप्रतापें । यादव वाढलें श्रीकृष्णकृपें ।
तोचि निधनाचेनि संकल्पें । काळरूपें क्षोभला ॥ २२६ ॥

श्रीकृष्णाच्या कृपेनें यादव हे बाहुबळानें पराक्रम करून वाढले होते, पण तोच श्रीकृष्ण त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळस्वरूपानें क्षुब्ध झाला २६.

अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ ।
ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥ २२७ ॥यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले. त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढेल वीरांची स्थिति श्रीकृष्णाला दुःसह झाली २७.

नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत्कथञ्चि-
न्मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।
अन्तःकलिं यदुकुलस्य विधाय वेणु

स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे याचा दुसर्‍या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणार्‍या अग्नीप्रमाणे या यदुवंशामध्येसुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन. (४)

मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा ।
श्रियोन्नत अतिगर्वमहिमा । मुख्य अकर्मा निजहेतु ॥ २२८ ॥

मी निजधामाला गेलो, तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील. कारण, कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात २८.

हे मद्‌बळें अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ ।
यांसि अप्रतिमल्लु दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥ २२९ ॥

हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत. ह्यांच्याशी सामना करणारा भूमंडळांत कोणी उरला नाही. ह्यांचा गर्व उतरावा तर तो मीच २९.

हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य राक्षसां कां दानवां ।
शेखीं निर्दाळावया यादवां । मागुतें मज तेव्हां पडेल येणें ॥ २३० ॥

इंद्रादि देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाहीं हे आटपावयाचे नाहीत; आणि हे असेच पाठीमागे राहिले तर अखेर ह्या यादवांचा संहार करण्याकरितां पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल २३०.

तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधूं काळगांठीं ।
ऐसा विचार जगजेठी । निश्चये पोटीं दृढ केला ॥ २३१ ॥

ह्याकरिता आता आपल्या डोळ्यांदेखतच आपले सारे कुळ काळाच्या तोंडांत द्यावे, असा श्रीकृष्णानें मनामध्यें विचार करून तोच निश्चय कायम केला ३१.

यदुवंश वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं ।
तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥ २३२ ॥

यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्णकृपाजळानें वाढलेले होते, त्यांत कपटाच्या मिषानें ऋषींच्या शापाच्या स्वरूपानें अवकृपेची इंगळी पडली ३२.

ते मुळी पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्मशापें ।
ते स्वजनविरोधरूपें । काळाग्निकोपें नाशील ॥ २३३ ॥

ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पानें पेटली आणि ब्रह्मशापानें धडाडली. ती आतां स्वजनांच्या विरोधरूपानें आणि काळाग्नीच्या कोपानें सर्वांच्या नाशास कारण होईल ३३.

ऐसें यादवकुळनिर्दळण । करूनियां स्वयें श्रीकृष्ण ।
निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करूं इच्छी ॥ २३४ ॥ह्याप्रमाणें यादवांच्या कुलाचें निर्दळण करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेनें आपण निजधामास जावें असें श्रीकृष्णांनी योजिले ३४.

एवं व्यवसितो राजन्सत्यसङ्कल्प ईश्वरः ।
शापव्याजेन विप्राणां सञ्जह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥राजन ! सर्वशक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राम्हणांच्या शापाचे निमित्त करून, आपल्याच वंशाचा संहार केला. (५)

यापरी आपुले कुळ । नासूं आदरिलें तत्काळ ।
हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥ २३५ ॥

ह्याप्रमाणें आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्यानें मनांत आणले व समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला ३५.

हेंचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें ।
ब्रह्मशापाचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥ २३६ ॥

आतां हें कार्य होते कसे ? ह्याबद्दल जगदीशानें विचार केला की, ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्तानें कुळाचा अनायासेंच नाश होईल ३६.

इतकें हें जैं सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य ।
मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥ २३७ ॥

हे इतके सिद्धीस गेले म्हणजे अवतारांतील इतिकर्तव्यता आटोपली; नंतरच स्वलीलेनें निजधामास जाऊं असा यदुवीरानें विचार केला ३७.

लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन ।
जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥ २३८ ॥श्रीकृष्ण हा ‘लीलाविग्रही’ म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा (जीवांप्रमाणें कर्मानुसार देह धारण करणारा नव्हे) व अतिशय सुंदर होता. त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र. तो परिपूर्ण ब्रह्म, पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता ३८.

स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनं नृणाम् ।
गीर्भिस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तानीक्षतां क्रियाः ॥ ६ ॥
आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ ।

तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥ ७ ॥त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणार्‍या आपल्या सौंदर्यसंपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणार्‍यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहाणार्‍यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक, कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. (६-७)

जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामिनीरमण ।
मोक्षाचें तारूं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥ २३९ ॥

जो सर्व मंगलांचा पूर्ण. मंगल व जो गोकुळांतील स्त्रियांची मनें रमविणारा; तो श्रीकृष्ण स्वतः मोक्षाचे जणूं तारूंच होता. त्याचे सौंदर्य केवळ अलौकिक होतें ३९.

जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम ।
ज्याचें त्रिलोकीं दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥ २४०

जो भक्तकामकल्पदुम, मेघासारखा नीलकांतीनें मनोहर दिसणारा, ज्याचें नाम त्रैलोक्यात प्रसिद्ध, असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वभावतःच त्या नांवाला शोभणारा होता २४०.

श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडें ।
मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥ २४१ ॥

श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली, बिचारा मदनसुद्धा पोटी जन्माला आला, तेथें इंद्रचंद्रांची कथा काय ? ४१.

ज्याचें त्रैलोक्य पावन नाम । जो करी असुरांचे भस्म ।
तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥ २४२ ॥

ज्याचें नाम त्रैलोक्याला पावन करणारे, राक्षसांचे जो भस्म करून टाकणारा, ज्याला ‘पूर्णकाम’ असे म्हणतात, तो भक्तांना सदासर्वदा सुगम आहे ४२.

त्रिलोकींचे बरवेपण । भुलोनि कृष्णापाशीं आले जाण ।
नाम कृष्णलेशें बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥ २४३ ॥

त्रैलोक्यांत जेवढे म्हणून सौंदर्य आहे, तेवढें सारें भुलून श्रीकृष्णाजवळ आलेले होते. किंवा असे समजा की, कृष्णाच्या सौंदर्यांशानेंच सर्व त्रैलोक्यांतील सौंदर्य शोभत असते ४३.

जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा ।
ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥ २४४ ॥

जो सर्व सौंदर्याची शोभा, लावण्याची केवळ रास, ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेनें जगाला शोभा आणली ४४,

जो हरिखाचा सोलींव हरिख । कीं सुख सुखावतें परमसुख ।
ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥ २४५ ॥

जो हर्षाचाही सोलींव हर्ष, किंवा जो सुखालाच अत्यंत सुख देणारे परमसुख, ज्याच्या योगानें विश्रांतीलाही अत्यंत विसांवा मिळतो ४५,

तो अमूर्त मूर्तिधारण । कीं सकललोकलावण्य ।
शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्यसंपूर्ण साजिरा ॥ २४६ ॥

तो निराकारच आकारास आलेला, किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मुसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण, शोभेलाही शोभा आणणारा होता ४६.

घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें ।
तेवीं अमूर्त मूर्तीं मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥ २४७ ॥

थिजलेले तूप विरघळले, तरी त्याचा तूपपणा काही नाहीसा होत नाही, त्याप्रमाणें निराकारस्वरूप साकार झाले तरी ते पूर्ण परब्रह्मच होते ४७.

तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे ।
पहाणें पाहतेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥ २४८ ॥

त्याला पाहिले की पुरे, पाहता पाहताच पाहणे संपते, पाहणारा म्हणजे दृष्टा याच्यासह दर्शनक्रिया लाजून आपल्या स्वरूपात माघारी फिरते ४८,

दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुले शेजार ।
होवोनियां परात्पर । सुखाचे साचार श्रीकृष्णरूपीं ॥ २४९ ॥

दृष्टि तृप्त होऊन ढेंकर देते, आणि आपण आपले शेजार होऊन कृष्णस्वरूपामध्यें आनंद भोगते ४९.

श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी ।
जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥ २५० ॥

श्रीकृष्णाची गोडी एकदा चाखली, की जिव्हा प्राकृत रसास्वादाला सोडून देते. कारण की, मग तिच्या चाखणेपणाची गोडीच जाते. चाखणार्‍याला चाखून सोडून देते २५०.

वल तेथींचें गोडपण । अमृतही फिकें केलें जाण ।
यापरी रसना आपण । हरिरसीं संपूर्ण सुखावे ॥ २५१ ॥
त्याचे माधुर्य विलक्षण आहे. त्या गोडीनें अमृतही फिके करून सोडले. याप्रमाणें जिव्हा हरिरसामध्यें पूर्णपणें सुखावते ५१.

लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुंचि होय वावो ।
सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहावो आन नावडे ॥ २५२ ॥

श्रीकृष्णाचा वारा लागला म्हणजे सारा संसारच निरस होऊन जातो. श्रीकृष्णाच्या सुगंधवायूशिवाय, नाकाला दुसरा कसला वास आवडतच नाहीं ५२.

वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता घ्राण ।
कृष्णमकरंदे जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥ २५३ ॥

वास, सुवास, पुष्प, घ्रेय, घ्राता आणि घ्राण ही कृष्णाच्या मकरंदानें सारी आपण होऊनच विश्रांतीला येतात ५३.

जयाचेनि अंगस्पर्शें । देह देही देहपण नासे ।
अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसें देहबुद्धि ॥ २५४ ॥

ज्याच्या अंगस्पर्शाच्या योगानें देह, देही देहपण हे सर्व नाहीसें होऊन जाते. अंगच स्वतः आपली देहबुद्धि कसें विसरतें पहा ! ५४.

कठिणाचें कठिणपण गेलें । मृदुचें मृदुपणही नेलें ।
कृष्णस्पर्शें ऐसें केलें । स्पर्शाचें ठेलें स्पर्शत्व ॥ २५५ ॥

कठिणाचे कठिणपण गेले, मृदूचें मृदुपण गेले, याप्रमाणें स्पर्शाचे स्पर्शत्वच नाहीसें झालें असे श्रीकृष्णांनी करून टाकिले ५५.

तयाचेनि पठणें वाचा । ठावो वाच्यवाचकांचा ।
नेतिशब्दें पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥ २५६

त्याच्या पठणानें वाय-वाचकाचा ठाव जी वाणी, तिनें ‘नेति’ शब्द पुसून टाकून शब्दाचा निःशब्द करून टाकला ५६.

बोलु बोलपणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें ।
कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्यानें नेलें वाचिक ॥ २५७ ॥

शब्द बोलणेच बंद पडले. बोलणारे काय झाले हेच समजेनासे झाले. कृष्णनामानें वाच्य-वाचक हा भेद नाहींसा केला ५७.

चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये ।
मग निश्चितपणे पाहे । कृष्णचरणी राहे निवांत ॥ २५८ ॥

चित्तानें पायांचें चिंत्तन केले की, तें चित्तपणाच विसरून जाते. आणि मग निश्चितपणे कृष्णचरणींच निवांत राहते ५८.

चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण ।
चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥ २५९ ॥

चित्त, चिंता आणि चिंतन ह्या तिहींची आठवणच राहात नाही. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केलें की चित्त परिपूर्ण ब्रह्मच होऊन जातें ५९.

नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म ।
मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥ २६० ॥

त्याची भूमीवर उमटलेली पावलट आश्चर्यकारक आहे. ती पाहतांच कर्माकर्म लयास जाते, आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया हा भ्रम, त्याच्या पदरजानें निर्भ्रमच होऊन जातो २६०.

पाहतां पा‍उलांचा माग । तुटती कर्माकर्मांचे लाग ।
कर्माचें मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥ २६१ ॥

त्याच्या पावलाचे ठसे पाहिले की, कर्माकर्माचे बंध तुटून जातात. कारण, कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया, तिचा अल्पांशसुद्धा राहू देत नाहीं ६१.

गायीमागील कृष्ण पा‍उले । पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें ।
अकर्म म्हणणें नाहीं उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥ २६२ ॥

गाईंच्या मागे उमटलेली कृष्णाची पावलं पाहिली असतां कर्त्यासह कर्म नाहींसें होतें, अकर्म असे म्हणणेसुद्धां उरत नाही. याप्रमाणें कर्माचे निष्कर्म होऊन जाते ६२.

जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें ।
वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणें पावणें परब्रह्म ॥ २६३ ॥ज्याची कीर्ति श्रवण केली असतां श्रोत्याचें श्रोतेंपणच राहत नाहीं, वक्त्याचें वक्तेपण उरत नाही; तर फक्त श्रवणानेंच परब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते ६३.

यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती ।
जेणें जडजीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥ २६४ ॥

ह्याप्रमाणें उदारकीर्ति कृष्णानें अवताराची थोर ख्याति करून सोडली. जिच्या योगानें जड जीवांचा उद्धार होतो. आणि श्रवणानेंच त्रैलोक्य पावन होते ६४.

स्वधामा गेलिया चक्रधरू । मागां तरावया संसारू ।
कृष्णकीर्ति सुगम तारूं । ठेवूनि श्रीधरू स्वयें गेला ॥ २६५ ॥

आपण निजधामास गेल्यानंतर आपल्या पाठीमागे संसारसागरांतून तरून जाण्यासाठी भगवान् स्वतःच कृष्णकीर्तिरूप तारूं ठेवून गेले ६५.

नवल या तारुवाची स्थिती । बुडवूं नेणे कल्पांतीं ।
श्रवणें तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥ २६६ ॥

ह्या तारवाची स्थिति चमत्कारिक आहे. त्याला कल्पांतीही कोणाला बुडवावयाला येतच नाही. त्याच्या श्रवणानें श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढें किती तरतील, हे कांही समजत नाहीं ६६.

श्रीकृष्णकीर्तीचें तारूं । घालितां आटे भवसागरू ।
तेथें कोरड्या पा‍उलीं उतारू । श्रवणार्थी नरू स्वयें लाहे ॥ २६७ ॥

श्रीकृष्णाचें कीर्तिरूप तारूं भवसागरांत घातले पुरे, की तो आटूनच जातो. तेव्हां श्रवणार्थी पुरुष जो उतारू, तो मग कोरड्या पावलानेंच पार पडतो ६७.

जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य ।
कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥ २६८ ॥

जे कृष्णाची कीर्ति पठण करतात, त्यांच्या जन्ममरणरूप संसाराला शून्य पडते, ते अतिपावन व कीर्तिमान होतात व सुरगण त्यांना वंदन करतात ६८.

आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लगती चारी मुक्ति ।
त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिर्वृत्ति हरिनामें ॥ २६९ ॥

श्रीकृष्णकीर्तीचें आदरानें पठण केले असतां चारही मुक्ति पायीं लागतात. त्यांच्या योगानें त्रिभुवन पावन होते; हरिनामानें परम निर्वृति म्हणजे परमानंद प्राप्त होतो ६९.

श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें ।
भीतरील तम एकसरें । निघे बाहेरें गजबजोनी ॥ २७० ॥

श्रीकृष्णकीर्तीची नामाक्षरें श्रवणद्वारे अंतरांत शिरली की, अंतःकरणांत असलेले सारें अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडतें २७०.

तंव कृष्णकीर्तिकथा गजरीं । तमासि ठावो नुरेचि बाहेरी ।
धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु । २७१ ॥

तसेंच कृष्णकीर्तिकथेच्या गजरामुळें अज्ञानाला बाहेरही कोठे थारा मिळत नाही, तेव्हां तें भीतीनें सपरिवार लयाला जाते. कृष्णकीर्तीमध्यें अशा रीतीनें परमानंद प्राप्त होतो ७१.

कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे ।
कीर्ति कीर्तिमंता‍ऐसें । दे अनायासें निजसुख ॥ २७२ ॥

कृष्णकीर्तिप्रतापाच्या प्रकाशानें सारा संसार कृष्णमयच दिसू लागतो. त्यामुळें ती कीर्ति त्याला कीर्तिमंतासारखेच अनायासें निजसुख देते. ७२.

जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणें पुरे ।
जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥ २७३ ॥

ज्याला पाहिले असतां पहाणे संपते, ज्याला चाखले असतां चाखणे पूर्ण होते, ज्याला श्रवण केले असतां श्रवण समाप्त होते, ज्याचे चिंतन केले असतां चित्तवृत्तिच थिजून जाते ७३,

ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी ।
ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थीं ॥ २७४ ॥

ज्याची भेट झाली असतां भेटीची तूट म्हणून कधी पडतच नाही, ज्याच्याबरोबर बोलले असतां परमार्थालाच मिठी पडते ७४,

ज्यासि दिधलिया खेंव । खेंवाची पुरे हांव ।
ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥ २७५ ॥

ज्याला आलिंगन दिले असतां आलिंगनाची हांवच पुरते, आणि ज्याचें नांव घेतले असतां सारें महाभय नाश पावतें ७५,

तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु
स्वपदासि शारङ्गधरु । अतिसत्वरु निघाला ॥ २७६ ॥असा तो सत्यसंकल्प ईश्वर, तो सर्वेश्वर, शार्ङ्गधर स्वलीलेनें म्हणजे स्वइच्छेने, मोठ्या त्वरेनें निजधामाला जाण्यास तयार झाला ७६.

श्रीराजोवाच –
ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम्

विप्रशापः कथमभूद्‌वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥ ८ ॥परीक्षिताने विचारले भगवन ! यदुवंशी तर ब्राम्ह्मणभक्त होते, उदार होते, तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांचे ठायी जडलेले होते असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला ? (८)

आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं ।
त्यांसि शापु घडे कैशिया रितीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥ २७७ ॥

तेव्हां परीक्षितीनें मोठ्या आदरानें विचारलें की, हे शुकयोगींद्रा ! यादव हे ब्राह्मणभक्तीत विनम्र होते, असे असता त्यांना शाप कसा झाला ते मला सांगावें ७७.

यादव दानें अति‍उदार । राजे हो‍ऊनि परम पवित्र ।
ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥ २७८ ॥

यादव दानशूर होते, राजे असून परम पवित्र होते, ते ब्राह्मणांच्या सेवेत निरंतर तत्पर असून कृष्णाचे आज्ञाधारक होते ७८.

यादव सदा कृष्णयोगेंसी । नित्य साधु यादवांपासी ।
तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २७९ ॥

यादवांना निरंतर कृष्णाचा सहवास असल्यानें यादवांजवळ निरंतर साधुसंत असत. नारदऋषि तर तेथेंच नेहमी राही, असे असतां यादवांना शाप कसा मिळाला ? ७९.

दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी ।
तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २८० ॥दक्षानें दिलेला शाप, कृष्णापाशी राहिल्यानें बाधावयाचा नाही, म्हणून नारदही द्वारकेंतच राहत होता, मग असा तो श्रीकृष्ण स्वतःच तेथें असतां यादवांना शाप कसा झाला ? २८०.

यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम ।
कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥ ९ ॥हे विप्रवर ! त्या शापाचे कारण काय होते ? तसेच त्याचे स्वरूप काय होते ? सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली ? हे सर्व आपण मला सांगावे. (९)

शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु ।
कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरूपु सांगावा ॥ २८१ ॥

शापाला मूळ कारण म्हटलें म्हणजे संताप. तेव्हां ब्राह्मणांना राग कसा आला ? शाप तरी कसला दिला ? ते थोडक्यात सांगावें. ८१.

यादव समस्त सखे बंधू । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदू ।
एकात्मता स्वगोत्रसंबंधू । त्यांमाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥ २८२ ॥

यादव म्हणजे सगळे भाऊबंद, एकमेकांचे आवडते, आणि त्यांचा प्रतिपाळ करणारा खुद्द श्रीकृष्ण, असा त्यांच्यामध्यें ऐक्यभाव व सर्वांचा एकच गोतावळा असता त्यांच्यामध्यें असलेली एकी मोडून मारामारी होण्याचा प्रसंग कशानें आला ? ८२.

“आत्मा वै पुत्रनामासि” । हे श्रुति प्रमाण सर्वांसी ।
तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥ २८३ ॥

‘आत्मा वै पुत्रनामासि’ (आत्माच पुत्र आहे) ही श्रुति सर्वांना प्रमाण आहे. असे असतां श्रीकृष्णाच्याच मुलांना शाप कसा बाधला ? त्या शापाला सत्यत्व तरी कसे आले ? ८३.

कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण ।
यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥ २८४ ॥

‘कुळाचा नाश करावयाचा हा कृष्णाचाच संकल्प; तोच ब्राह्मणांच्या शापास कारण झाला, आणि म्हणूनच तो सर्व यादवांना बाधक झाला, हे लक्षात ठेव ८४.

सृष्टि स्रजी पाळी संहारी । हें कृष्ण संकल्पमात्रें करी ।
तो यदुकुळनिधान निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥ २८५ ॥सृष्टीची उत्पत्ति, पालन, आणि संहार हें संकल्पमात्रानेंच कृष्ण करतो. त्यानेंच यादवकुळाचा संहार करण्याचा निश्चय केला’ असे सांगून त्याच्या अवताराची थोरवी शुक वर्णन करितात २८५.
श्रीबादरायणिरुवाच ।
बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेशं
कर्माचरन्भुवि सुमङ्गलमाप्तकामः ।
आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः

संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥ १० ॥श्रीशुक म्हणाले – ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता, असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदारकीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरविले कारण पृथ्वीवरील भार उतरविण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते. (१०)

रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु ।
तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥ २८६ ॥

परीक्षिती राजाला शुकाचार्य म्हणाले, कर्ता करविता काय तो एक श्रीकृष्ण, त्यानेंच आपल्या मुलांना शाप मिळावा म्हणून त्यांच्या मनांत अत्यंत अविचार उत्पन्न केला ८६.

स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा ।
यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥ २८७ ॥

आपण निजधामाला जावे अशी श्रीकृष्णाला उत्कंठा लागून राहिलेली होती. ह्याकरितां बाकी राहिलेले कार्यही लवकर शेवटास नेण्याची त्याला त्वरा झाली ८७.

केव्हां हो‍ईल कुलक्षयो । हेंचि मनीं धरी देवो ।
तो देवाचाचि भावो । शापासि पहा वो दृढमूळ ॥ २८८ ॥

आतां आपला कुलक्षय केव्हां होतो हीच देवाच्या मनाला चिंता लागून राहिली. हा देवाचाच हेतु शापाला मुख्य कारण झाला असे समज ८८.

जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति ।
शुक सांगे परीक्षितीप्रती । स्वानंदस्थिति उल्हासे ॥ २८९ ॥

ज्या कृष्णानें कुलक्षयाचा विचार मनांत आणला होता, त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन मनाच्या उल्हासवृत्तीनें परीक्षितीला शुक सांगू लागले ८९.

सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु ।
लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु निजांगे ॥ २९०

सकल सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असा मनोहर सुशोभित वेष त्यानें धारण केला होता. त्या जगदीशानें आपल्या अंगांत सर्व लावण्याचा संग्रह केला होता २९०.

नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगीं गुंतल्या जनदिठी ।
कृष्णस्वरूपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥ २९१ ॥

काय चमत्कार सांगावा ! त्याच्या सौंदर्याला असें कांहीं तेज चढले होते की, त्याच्या प्रत्येक अवयवावर लोकांची दृष्टि खिळून राही. कृष्णाचे स्वरूप इतके चित्ताकर्षक होते की, ते पाहात असतां डोळ्यांची अगदी लटपट उडून जात असे ९१.

जैशी गुळीं माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णरूपासी ।
सर्वांगी वेढोनि चौपासीं । अहर्निशीं नोसंडिती ॥ २९२ ॥

गुळावर जशा माश्यांवर माश्या येऊन बसाव्या, त्याप्रमाणें कृष्णाच्या स्वरूपावर लोकांच्या दृष्टींवर दृष्टि बसून त्या चारही बाजूंनी सर्वांगाला वेढा देऊन रात्रंदिवस सोडीत नसत ९२.

नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा ।
यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥ २९३ ॥

डोळे त्या दर्शनलोभासाठी लांचावले होते. डोळ्यांना जणूं जिभा फुटल्या होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्णमूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभाच होती ९३.

तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी ।
अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥ २९४ ॥

तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला, ते डोळे तेथून माघारे म्हणून फिरत नसत. ते अधिकाधिक त्याला मिठी मारीत. त्यामुळें सर्व सृष्टि त्यांना कृष्णरूप दिसत असे ९४.

ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी ।
यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥ २९५ ॥

अशी डोळ्यांना त्याची आवड होती; म्हणून स्त्रिया त्यावर तुटून पडत. आणि म्हणूनच गोपींना त्या गोविंदाची अत्यंत गोडी लागलेली होती ९५.

कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासी विषयधर्म ।
तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ २९६ ॥

कृष्ण असा अति सुंदर होता, म्हणून त्याला विषयाभिलाष असेल असे म्हणाल, तर तसे नव्हे; कारण तो पूर्णकाम म्हणजे निरिच्छ व केवळ आत्मस्वरूपींच रममाण होणारा होता ९६.

कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम ।
स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम कां भोगी ॥ २९७ ॥

कृष्ण जर पूर्णकाम होता, तर तो द्वारकेमध्यें घरदार करून स्त्रीपुत्रांमध्यें राजकीय डामडौलानें राहून विषयांचा उपभोग कां घेत होता असें म्हणाल, तर तसे नव्हे ९७.

चहुं आश्रमां प्रकाशकु । त्रिलोकीं कृष्ण गृहस्थ एकु ।
तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥ २९८ ॥

श्रीकृष्ण हा चारही आश्रमांचा प्रकाशक असून त्रैलोक्यामध्यें खराखुरा ‘गृहस्थ’ असा एक श्रीकृष्णच ; कडकडीत ‘ब्रह्मचारी’ असाही तोच, आणि खराखुरा ‘संन्यासी’ पण तोच ९८.

कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ ।
त्याची सर्व कर्में पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणें कथनें ॥ २९९

कृष्णदेहामध्यें दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते. तो ‘लीलाविग्रही’ म्हणजे स्वेच्छेनें देह धारण करणारा (जीवाप्रमाणें कर्मानें-कर्मपरतंत्रपणें देह धारण करणारा नव्हे) असा असून शुद्ध चैतन्यसागरावरील एक लाट असा त्याचा दिव्य देह होता. त्याची सर्व कर्में पावनशीळ होती. ती श्रवण आणि कथन केल्यानेंच सर्वांचा उद्धार होतो ९९.

कृष्णकर्मांचे करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन ।
ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥ ३०० ॥

कृष्णाच्या कर्माचें जो स्मरण करतो, त्याचें तें कर्मच जीवाचें कर्मबंधन तोडून टाकतें. दीनांचा उद्धार करण्याकरितां असें उदार (उत्कृष्ट) कर्माचरण श्रीकृष्णांनी केलें होतें ३००.

श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागीं आचरे कर्म ।
ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥ ३०१ ॥

श्रीकृष्ण सकाम असेल म्हणूनच त्यानें कर्माचरण केले असे म्हणाल तर, ज्याचे नाम दुसऱ्याला निष्काम करूं शकते, तो स्वतः सकाम कसा असू शकेल ? १.

श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम ।
सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥ ३०२ ॥

श्रीकृष्णाच्या विषयभोगलीलांचे स्मरण केले असतां संन्यासीही आपोआप निष्काम होतात. विषयी लोकांचीही विषयेच्छा नाहींशी व्हावी असेंच त्यानें उदार कर्माचरण केले २.

तेणें अवाप्तसकळकामें । ऐशीं आचरला अगाध कर्में ।
मानव तारावया मनोधर्में । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥ ३०३ ॥

तो सर्वतोपरी पूर्णकाम असता, त्यानें अचाट कर्में केली. मनुष्यांनी स्मरणानेंच तरून जावे म्हणून भगवंतानें आपली कीर्ति पसरून ठेवली ३.

कैसें कर्म सुमंगळु । कानीं पडतांचि अळुमाळु ।
नासोनियां कर्ममळु । जाती तत्काळु श्रवणादारे ॥ ३०४ ॥

तें कर्म तरी किती मंगलदायक पहा ! की, यत्किंचितही कानीं पडलें असतां, तितक्या त्या श्रवणादरानेंच कर्माचे मळ तत्काल नाश पावतात ४.

श्रवणें उपजे सद्‍भावो । सद्‍भावें प्रकटे देवो ।
तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥ ३०५ ॥

श्रवणानें सद्‌भाव उत्पन्न होतो, सद्‌भावानें देव प्रगट होतो, आणि तेणेंकरून अहंभाव नाहीसा होतो. अशी ही हरीची कीर्ति उदार आहे ५.

श्रीकृष्णकीर्तीचें स्मरण । कां करितां श्रवणपठण ।
मागें उद्धरले बहुसाल जन । पुढें भविष्यमाण उद्धरती ॥ ३०६ ॥

श्रीकृष्णाच्या कीर्तीचें स्मरण, श्रवण किंवा पठण करून पुष्कळ लोक उद्धरले, आणि पुढेही उद्धरतील ६.

जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी ।
येर्‍हवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासीं अतिनिद्रा ॥ ३०७ ॥

पूर्वजन्मीं पुण्यराशी केलेल्या असतील, तरच हरिकथेकडे लक्ष लागते; नाहीतर इतरांना ऐकतांना अनायासे गाढ झोप लागते ७.

जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार ।
कृष्णें सुगमोपाव केला थोर । दिनोद्धार हरिकीर्तनें ॥ ३०८ ॥

जे हरिकथेला तत्पर असतात, त्यांच्या पुण्याला पार नाही, कीर्तनानें दीनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णानें हा सुलभ उपाय करून ठेवला आहे ८.

कृष्णकीर्तनें गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी ।
उतरल्या तीर्थांचिया उठी । नामासाठी निजमोक्षु ॥ ३०९ ॥

हरिकीर्तनाच्या गोष्टी गर्जना करून सांगू लागले असतां प्रायश्चित्तांचे समुदाय लाजून जातात, आणि तीर्थांचाही बडेजाव मागे पडतो. केवळ नामानेंच मुक्ति प्राप्त होते ९.

ऐसा निजकीर्ति‍उदारू । पूर्णब्रह्म शारंगधरू ।
लीलाविग्रही सर्वेश्वरू । पूर्णावतारू यदुवंशी ॥ ३१० ॥

असा आपल्या कीर्तीनें उदार, पूर्णब्रह्म शार्ङ्गधर, सर्वव्यापक-सर्वेश्वर असून व लीलादेहानें यदुवंशांत पूर्णावतार धारण केलेला होता ३१०.

उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ ।
यादव उरले अति अद्‌भुत । तेही समस्त निर्दळावे ॥ ३११ ॥

त्याला आतापर्यंत पृथ्वीचा भार उतरला असे वाटेचना. कारण अत्यंत प्रबळ असे यादव राहिले, तेही सर्व निर्दाळून टाकले पाहिजेत असे त्याला वाटें. ११.

ये अवतारीं हृषीकेशी । म्हणें हेंच कृत्य उरलें आम्हांसी ।
निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥ ३१२ ॥

श्रीकृष्ण म्हणाला, ह्या अवतारामध्यें आतां येवढेच कृत्य आपल्याला उरलेले आहे, तेवढा आपला वंश खलास करून मग निजधामास जावें १२.

तो यादवांमाजी माधव । कालात्मा देवाधिदेव ।
जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥ ३१३ ॥

त्या यादवांतील कालस्वरूपी देवाधिदेवानें पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका १३.

नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारूनि आपण ।
करूं सांगे शीघ्रगमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥ ३१४ ॥

नारदादि मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णानें बोलावून आणून आग्रहपूर्वक सांगितले की, तुम्ही आतां येथून निघून जावें १४.

ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले ।
हें यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णें ॥ ३१५ ॥

कारण जेथून संत दूर जातात त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते. तेव्हां यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णानें आधीं तेंच अवश्य आहे असे समजून ही युक्ति केली १५.

भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाही अनर्थासी ।
जाणे हें स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥ ३१६ ॥

भक्त, संत, साधु ज्याच्याजवळ असतील तेथें अनर्थाला रीघ नसते. हे वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत. इतर कोणास ते माहीत नाहीं १६.

जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो ।
हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥ ३१७ ॥

जेथे संतांचा समुदाय असतो, तेथें जन्ममरणाचासुद्धा अभावच. ही गोष्ट श्रीकृष्णासच माहीत असल्यामुळे, ब्रह्मशापाकरितां त्यानें तोच उपाय योजिला १७.

जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं ।
हें जाणोनियां श्रीहरी । द्वारकाबाहेरी ऋषी घाली ॥ ३१८ ॥

जेथून संत दूर जातात, तेथे अनर्थ तत्काळ मस्तकावर आदळतो. हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णानें सारे ऋषि द्वारकेच्या बाहेर घालविले १८.

ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांते लाघवी हृषीकेशी ।
तीर्थमिषें समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥ ३१९ ॥

ऋषि आपआपल्या आश्रमालाच जाणार होते, पण ह्या कपटनाटकी श्रीकृष्णानें तीर्थाचें निमित्त सांगून त्यांना आपणच ‘पिंडारका’ ला पाठवून दिले १९.

पिंडारका मुनिगण । श्रीकृष्णें धाडिले कोण कोण
ज्यांचे करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥ ३२० ॥ज्यांचे स्मरण करतांच कळिकाळ भयानें कापूं लागतो, असे कोण कोण ऋषि श्रीकृष्णानें पिंडारकाला पाठविले तें ऐक ३२०.

कर्मानि पुण्यनिवहानि सुमङ्गलानि
गायज्जगत्कलिमलापहराणि कृत्वा ।
कालात्मना निवसता यदुदेवगेहे
पिण्डारकं समगमन्मुनयो निसृष्टाः ॥ ११ ॥
विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरङ्‌गिराः ।

कश्यपो वामदेवोऽत्रिर्वसिष्ठो नारदादयः ॥ १२ ॥श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणार्‍या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी, काळरूपाने निवास करणार्‍या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले. (११-१२)

जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन ।
ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥ ३२१ ॥

जे तपस्तेजानें देदीप्यमान, जे पूर्ण ज्ञानाच्या योगानें चैतन्यघन, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे, असे ते मोठमोठे ऋषि पिंडारकास जाण्यास निघाले २१.

जे गायत्रीमंत्रासाठी । करूं शके प्रतिसृष्टी ।
जो विश्वामित्र महाहटी । तोही उठा‍उठी निघाला ॥ ३२२ ॥

गायत्री मंत्रामुळें प्रतिसृष्टि करण्यास समर्थ झाला असा जो महाआग्रही विश्वामित्र, तोही लागलाच निघाला २२.

जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमीं वसे असित ।
ज्याचेनि नामें द्वंद्वें पळत । तोही त्वरीत निघाला ॥ ३२३ ॥

जेथें शीत उष्ण बाधत नाहीं अशा आश्रमामध्यें राहणारा व ज्याच्या नांवानें द्वंद्वे पळत सुटतात, असा असित मुनीही तत्काळ निघाला २३.

जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णीं बैसोन आपण ।
पूर्ण केले वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥ ३२४ ॥

ज्यानें सूर्याला शरण जाऊन त्याच्या घोड्याच्या कानांत बसून पूर्ण वेदपठण केलें, तो कण्वऋषिही निघाला २४.

जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी ।
तोही द्वारकेबाहेरी । त्वरेंकरूनि निघाला ॥ ३२५ ॥

अत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुर्वासऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरेनें निघाला २५.

भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण ।
मिरवी वत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥ ३२६ ॥

ज्या भृगुनें मारलेली लाथ, श्रीकृष्ण हृदयावर धरून ते ‘श्रीवत्स’ भूषण म्हणून मिरवितो, तो भृगुऋषीही निघाला २६.

अंगिरा स्वयें सद्‌बुद्धी सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटी ।
जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥ ३२७ ॥

अंगिराऋषि तर स्वतः सृष्टीमध्यें बुद्धिमान्, ज्याच्या पोटीं देवगुरु बृहस्पती जन्माला आला, तोही जावयास निघाला २७.

कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं ।
यालागी हे काश्यपी सृष्टी । तोही उठाउठी निघाला ॥ ३२८ ॥

कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय. त्याच्या पोटी सुर, नर, किन्नर जन्मास आले, ह्याकरितांच या सृष्टीला ‘काश्यपसृष्टि’ असे म्हणतात, तो कश्यपऋषीही जाण्याकरिता उठला २८.

मुक्तांमाजी श्रेष्ठ भावो । वेदीं वाखाणिला वामदेवो ।
तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥ ३२९ ॥

सर्व मुक्तांमध्यें ज्याची योग्यता मोठी, ज्याचें वेदामध्येंसुद्धा वर्णन केले आहे, तो वामदेवऋषिसुद्धां जावयास निघाला २९.

अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं ।
श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥ ३३० ॥

अत्रीचाही एक चमत्कारच आहे. त्याच्या पोटी तिन्ही देव जन्मास आले. त्या श्रीदत्ताला मोठमोठे योगीही वंदन करतात. हे अनुसूयेचे केवढे भाग्य बर ! ३३०.

तो स्वयें अत्री ऋषीश्वर । श्रीकृष्ण आज्ञातत्पर ।
पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥ ३३१ ॥

तो अत्रि सर्व ऋषींत श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज्ञेला तत्पर असे. म्हणून त्यानें पिंडारकाला जाण्याची फारच जलदी केली ३१.

जो रामाचा सद्‌गुरू । ब्रह्मज्ञाने अति‍उदारू ।
ज्याचे शाटीचा प्रताप थोरू । जिंकिला दिनकरू तपस्तेजें ॥ ३३२ ॥

जो श्रीरामाचा सद्गुरु; ब्रह्मज्ञानानें अत्यंत उदार; ज्याच्या छाटीचा महिमा असा की, जिनें आपल्या तेजानें सूर्यालाही मागे टाकलें ३२.

ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी ।
निघाला द्वारकेहूनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥ ३३३ ॥

असा जो वसिष्ठ ऋषि, तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तत्काल पिंडारकाला निघाला ३३.

आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु ।
ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकिर्तनी ३३४ ॥

तसाच देवर्षि नारद. त्याचे ज्ञानही अगाध, जो सदासर्वदा परमानंदांत असून हरिकीर्तनामध्येंच निरंतर ज्याची उत्सुकता ३४.

ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु ।
ब्रह्मानंदे नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥ ३३५ ॥

तो खांद्यावर वीणा टाकून ब्रह्मपदें गात गात ब्रह्मानंदानें नाचन डुलत पिंडारकाला निघाला ३५.

इत्यादि हे मुनिवरू । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरू ।
शिष्यसमुदायें सहपरिवारू । मीनले अपारू पिंडारकीं ॥ ३३६ ॥

असे सर्व मुनिश्रेष्ठ आणि मोठमोठे ऋषिवर्य सहपरिवार, शिष्यसमुदायासह पिंडारकामध्यें अपरंपार गोळा झाले ३६.

एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।
मीनले कृष्णवैभव । अति‍अपूर्व वर्णिती ॥ ३३७ ॥

अशा प्रकारे पिंडारकामध्यें शाप देण्यास व अनुग्रह करण्यासही समर्थ असे सारे ऋषि जमा झाले, आणि कृष्णाच्या अपूर्व वैभवाचे वर्णन करूं लागले ३७.

बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळीं ।
कुमरीं ऋषीश्वरांसी रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥ ३३८ ॥

कपटनाटकी अशा श्रीकृष्णानें लागलाच कुलक्षय होण्याकरितां आपल्या मुलांकडून कपटमेळा जमवून मोठमोठ्या ऋषींची कुचेष्टा करविली ३८.

निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण ।
जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥ ३३९ ॥

निंदा, अपमान, टवाळकी केली म्हणजे ब्राह्मणांचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला की त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावें ३९.

ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडे ।
महादेवाचें लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥ ३४० ॥

ब्राह्मणांच्या रागापुढें कुल बिचारे ते काय ? महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ति समुद्रांत पडली. ४०.

तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर ।
हें एका‍एकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥ ३४१ ॥

सारा समुद्रही खारा करून सोडला असा ब्राह्मणांचा राग अनिवार ! असें ज्या एकएकाचे चरित्र, ते सारेच ऋषि तेथे जमले होते. ४१.

धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्यांचें वचन परम प्रमाण ।
हें सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वये दावी ॥ ३४२ ॥पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वचन परमप्रमाण होय व हे खरे करून दाखविण्याकरितांच श्रीकृष्णानें कुळाचा संहार करून दाखविला ४२.

क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः
उपसङ्गृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥ १३ ॥एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळतखेळत त्यांच्याजवळ गेले त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले. (१३)

यदुनंदन समस्त । क्रीडाकंदुक झेलित ।
एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥ ३४३ ॥

सारे यादवांचे पुत्र चेंडूनें खेळू लागले. चेंडू वरचेवर झेलीत असत व एकमेकांना मारीत असतांना अंग चुकवून पळत असत ४३.

ऐसा नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमर ।
अंगीं श्रीमद अपार । औद्धत्यें थोर उन्मत्त ॥ ३४४ ॥

अशा रीतीनें नानाप्रकारें मजा करीत ती यादवांची मुले पिंडारकास आली. त्यांच्या आंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता. ते सारे मदोन्मत्त असून मोठे उद्धट झाले होते ४४.

अतीत अनागत ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त ।
ज्यांचें वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकूं म्हणती ॥ ३४५ ॥

त्यांनी विचार केला की, येथे भूतभविष्य जाणणारे अनेक महर्षि जमले आहेत. ह्यांचे बोलणें अगदी खरें ठरतें असे म्हणतात. पण आम्ही ह्यांना खचित चकवूं ४५.

जैं अघडतें ये‍ऊनि पडे । तैं यांचें वचन कैसें घडे ।
म्हणोनि ऋषीश्वरांपुढें । मांडिलें कुडें यदुकुमरीं ॥ ३४६ ॥कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाहीं अशी गोष्ट असेल, तेव्हां ती यांच्या वचनानें तरी कशी घडेल ? असें म्हणून त्या मोठमोठ्या ऋषींपुढे यादववंशांतील मुलांनी एक कपट मांडले ४६.

ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् ।
एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्‍न्यसितेक्षणा ॥ १४ ॥
प्रष्टुं विलज्जती साक्षात्प्रब्रूतमोघदर्शनाः

प्रसोष्यन्ती पुत्रकामा किंस्वित्सञ्जनयिष्यति ॥ १५ ॥जांबवतीनंदन सांबाला स्त्रीचा वेष देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले, “ब्राह्मणांनो ! ही डोळ्यांत काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान, अबाधित आहे पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल, हे आपण सांगावे”. (१४-१५)

पहिलेच श्रीमतें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट ।
साम्बास दे‍ऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥ ३४७ ॥

आधींच लक्ष्मीच्या मदानें धुंद झालेले; त्यावर कपटाची युक्ति उभारली. त्यांनी (जांबवतीचा पुत्र) ‘सांब’ याला स्त्रीचा वेष देऊन सजविला. ४७.

तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु ।
प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥ ३४८ ॥

तो सांवळा व सुंदर होता. त्याचे डोळे पाणीदार होते. त्याला तो स्त्रीवेष फारच शोभू लागला व तो अभिनय करण्यांतही पटाईत असल्यामुळे, स्त्रियांची लाज, लज्जा, नेत्रकटाक्षादि हावभाव इत्यादि उत्तम रीतीनें दाखवू लागला ४८.

नयनी सोगयाचें काजळ । व्यंकटा कटाक्षे अतिचपल ।
सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥ ३४९ ॥

त्यानें डोळ्यांत काजळ घातले होते. तो डोळे तर असे मोडू लागला की त्यांच्यावर नजरसुद्धा ठरू नये. तो जात्याच सुंदर व नाजूक होता. त्यांत हंसगतीनें हळू हळू चालू लागला. ४९.

वस्त्रें बांधोनिया उदर । नावेक केलें थोर ।
तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥ ३५० ॥

बाकीच्या चावट पोरांनी त्याच्या पोटावर चिरगुटें बांधून त्याचे पोट मोठे केले, त्यामुळें ती गरोदर स्त्री आहे असेंच इतरांस वाटे ३५०.

हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी ॥
विसावा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदीं देखिली ॥ ३५१ ॥

तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालतांना पोट हालूं देत नसे. याप्रमाणें पावलागणिक विसांवा घेत घेत येत असलेली ती स्त्री ऋषींनी पाहिली ५१.

ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि ।
इतर ऋषींजवळी ये‍ऊनि । लोटांगणें घालिती ॥ ३५२ ॥

स्त्रियांचा मर्यादशीलपणा दाखवून ऋषींपासून थोड्या अंतरावर ती उभी राहिली. आणि तिच्याबरोबरच्या इतर मुलांचा घोळका ऋषींच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. ५२,

पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त ।
यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥ ३५३ ॥

पूर्वीच्या श्लोकांतील श्लोकार्धाची व्याख्या त्या ठिकाणी संपूर्ण झाली नाही, ह्याकरिता तो अर्थ येथे कथेच्या संदर्भाप्रमाणें वर्णन करतो. ५३.

छळाचेनि मिषें जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा ।
आत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्हीं आलों ॥ ३५४ ॥

छळाचा हेतु धरून आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यादरानें त्यांचे पाय धरले, आणि म्हणाले, आम्ही दर्शनाकरितां आलो आहों ५५.

ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत ।
कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥ ३५५ ॥

ह्याप्रमाणें ते सारे यदुकुमार पोटांतून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आव आणून तेथे हात जोडून उभे राहिले, आणि मोठ्या लीनतेनें त्या ऋषींना त्यांनी अशी विनंति केली की ५५,

स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर ।
आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥ ३५६ ॥महाराज ! ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे. ती गरोदर असून तिचे दिवस अगदी भरले आहेत. त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते ५६.

स्वयें ये‍ऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं ।
यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥ ३५७ ॥

तिला स्वतःच तुमच्यापुढे येऊन ही गोष्ट विचारण्याचे धारिष्ट होत नाही. ह्याकरितां आमच्या द्वारें तिनें सेवेसी विनंती केलेली आहे ५७.

तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचें उत्तर ।
शिरीं वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥ ३५८

आपण खरोखर सत्यदर्शी आहांत, आपले वचन कधीहीं असत्य होत नाही, तें हरिहरही शिरसावंद्य करतात. आपण सर्वजण ज्ञानानें उदार आहांत ५८.

यालागी हे गर्भवती । सादरें असे पुसती ।
पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥ ३५९ ॥

याकरितां ही गर्भवती स्त्री आपल्यास सविनय असे विचारीत आहे की, खरोखर आपणास काय होईल ? तिला तर पुत्राची इच्छा आहे ५९.

से कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे ।
तैशींच फलें भावगर्भें । छळणलोभें पावती ॥ ३६० ॥

ते अशा कपटभक्तीनें नम्र होऊन हात जोडून उभे राहिले. त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळें त्यांच्या भावनेप्रमाणेंच फळे मिळाली ३६०

कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढें ।
मुनि म्हणे यादवांचें गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥ ३६१ ॥

त्यांचे हे खोटें कर्म ओळखून नारद तर ऋषींपुढे नाचूंच लागले. ते मनांत म्हणाले, यादवांचा मृत्यु आतां अगदी जवळ आला ६१.

मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक ।
तेवीं ब्राह्मणछळणें देख । आवश्यक कुळनाश ॥ ३६२ ॥

मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण यावयाचें. त्याप्रमाणें ब्राह्मणांचा छळ केला की कुळाचा नाश हटकून व्हावयाचा ६२.

शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्‍भांवें करावें नमन ।
मारूं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥ ३६३ ॥

ब्राह्मण जरी शिव्याशाप देत आला, तरी त्याला भक्तिपुरःसर नमन करावे, ब्राह्मण मारावयाला आला, तरी आपण त्याच्यापुढे मस्तक वांकवावें ६३.

त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण ।
विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥ ३६४ ॥

त्या ब्राह्मणांचा छळ करणे म्हणजे विषभक्षण करणे आहे. पुनः असे की, विषानें फक्त खाणाराचाच प्राण जातो, पण ब्राह्मणांच्या छळानें साऱ्या कुळाचा नाश होतो ६४.

अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळीं ब्रह्म ब्राह्मण ।
त्याचें करूं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥ ३६५ ॥

विद्वान् किंवा अविद्वान् हे मनांतही न आणतां, ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्रह्माचाच अवतार आहे असे समजले पाहिजे. त्याचा छळ करावयास लागले, तर करणार्‍याचा कुलक्षय निश्चित आहे म्हणून समजावें ६५.

एवं प्रलब्धा मुनयस्तानूचुः कुपिता नृप ।
जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥ १६ ॥

परीक्षिता ! त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली, तेव्हा रागावून ते म्हणाले, “मुर्खांनो ! याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल”. (१६)

ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां ।
निधनाचा भरला वारा । तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले ॥ ३६६ ॥

हे राजाधिराजा परीक्षिती ! ऐक. ह्याप्रमाणें त्या यादवांच्या अंगांत मृत्यूचा जणू वाराच भरला होता, म्हणून ते त्या ऋषिवर्यांना छळावयाला गेले ६६.

कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर ।
मग तिंहीं काय वाग्वज्र । अति‍अनिवार सोडिलें ॥ ३६७ ॥

त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळें त्यांना अतिशय राग आला. मग काय ? त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असें वाग्वज्र सोडले ६७.

अरे हे प्रसवेल जें बाळ । तें हो‍ईल सकळकुळा काळ ।
निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्यें ॥ ३६८ ॥

ते म्हणाले, अरे ! हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल. तुम्ही सारे दुर्दैवी आहांत. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल ! ६८

तच्छ्रुत्वा तेऽतिसन्त्रस्ता विमुच्य सहसोदरम् ।
साम्बस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं खल्वयस्मयम् ॥ १७ ॥

मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले, तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले. (१७)

ऐकूनि शापाचें उत्तर । भयभीत झाले कुमर ।
सोडूनि सांबाचें उदर । अतिसत्वर पाहती ॥ ३६९ ॥

हें शापवचन ऐकून ते यादवांचे पोर घाबरले. त्यांनी तत्काळ त्या सांबाचें पोट सोडून पाहिलें ६९.

तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ ।
मग भयभीत विव्हळ । एका‍एकीं सकळ दचकोनि ठेले ॥ ३७० ॥

तो तेथल्या तेथेंच लोखंडाचें मुसळ निघालेले त्यांना दिसले. त्याबरोबर सर्वजण भयानें विव्हल होऊन, एकदम दचकून गेले व चकित होऊन राहिले ३७०.

नासावें यादव कुळ । ऐसा श्रीकृष्ण संकल्प सबळ ।
तोचि झाला लोहाचें मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥ ३७१ ॥

यादवांचें कुल नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा जो दृढ संकल्प, तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तत्काळ मुसळ झाला ७१.

जें जें ब्राह्मणाचें वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण ।
ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥ ३७२ ॥

ब्राह्मण जें जें वचन उच्चारतात, तें तें श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही. ब्राह्मणाच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरा करून दाखवितो ७२.

देखोनि ऋषिश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप ।
यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥ ३७३ ॥

त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला व भयानें त्यांना कंप सुटला ७३.

किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः ।
इति विह्वलिता गेहानादाय मुसलं ययुः ॥ १८ ॥

ते म्हणू लागले, “आम्ही अभागी हे काय करून बसलो ? आता लोक आम्हांला काय म्हणतील ?” याप्रमाणे व्याकूळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले. (१८)

आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविलें शठें ।
निजघाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥ ३७४ ॥

आम्ही करंट्या कपाळाचे, कपटानें त्या ऋषिवर्यांना विनाकारण चिडविले व आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळें कुलक्षय घरांत आणला ७४.

काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण ।
चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घे‍ऊन घरा आले ॥ ३७५ ॥

आतां नगरवासी लोक आम्हांला काय म्हणतील ? हे ब्राह्मणांचा छळ करावयाला काय म्हणून गेले, असा शब्द ठेवतील. म्हणून चिंताक्रांत होऊन म्लानमुखानें ते सारे जण तें मुसळ घेऊन घरी आले ७५.

तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः ।
राज्ञ आवेदयांचक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥ १९

यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली. (१९)

सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न ।
यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथें नाहीं ॥ ३७६ ॥
सभेत वसुदेव, उग्रसेन, बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर सारे यादव बसले होते, एकटा श्रीकृष्ण मात्र तेथे नव्हता ७६.

सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ ।
शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥ ३७७ ॥अशा त्या सभेमध्यें सांब वगैरे सर्व कुमार आले आणि लोखडांचे मुसळ पुढे ठेवून चिमणीसारखी तोंडे करून शापाची इत्थंभूत हकीगत सांगते झाले ७७.

श्रुत्वामोघं विप्रशापं दृष्ट्वा च मुसलं नृप ।
विस्मिता भयसन्त्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥ २० ॥राजन ! जेव्हा द्वारकेतील लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचे वृत्त ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले, तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले कारण ब्राह्मणांचा शाप कधी व्यर्थ जात नाही, हे त्यांना माहीत होते. (२०)

ऐकून द्विजांचा परमकोपू । यादवां सुटला भयकंपू ।
मिथ्या नव्हे ब्रह्मशापू । भयें संतापु सर्वांसी ॥ ३७८ ॥

ब्राह्मणांचा आपणांवर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगांतही भयानें कांपरें भरले. ब्राह्मणांचा शाप कधींच मिथ्या व्हावयाचा नाहीं अशी त्यांची खात्री असल्यामुळें भयानें त्या सर्वांना काही सुचेनासे झाले ७८.

प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ ।
नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥ ३७९ ॥

प्रत्यक्ष मुसळ पाहून तर सर्वांची अगदी खळबळ उडून गेली. नागरिकांत एकच हलकल्लोळ माजून राहिला की, आता यादवांचें कुल राहते कसे ? ७९.

ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती ।
वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥ ३८० ॥राजा परीक्षिती ! ऐक, भविष्याची गति फार कठीण आहे ! कारण, तो वृत्तांत त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही. त्यांनी आपल्याच मतानें विचार चालविला ३८०.

तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः ।
समुद्रसलिले प्रास्यल्लोहं चास्यावशेषितम् ॥ २१ ॥यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देवविला. (२१)

आहुक राजा उग्रसेन । तेणें लावूनि लोहघण ।
मुसळ करोनियां चूर्ण । समुद्रीं जाण घालविलें ॥ ३८१ ॥

यादवांचा राजा जो उग्रसेन, त्यानें लोखंडाच्या घणानें त्या मुसळाचे चूर्ण करवून ते समुद्रात फेंकून देवविले ८१.

त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ ।
उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला ॥ ३८२ ॥पण त्या मुसळाचा मध्यभाग अतिशयच कठीण होता. त्याचे काही केल्यानें चूर्ण होईना. तो निखालस वज्रासारखा कठीण होता. ह्याकरितां तोही लागलाच जशाचा तसा समुद्रात दूर झुगारून दिला ८२.

कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः ।
उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥ २२ ॥
मत्स्यो गृहीतो मत्स्यघ्नैः जालेनान्यैः सहार्णवे ।

तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥ २३ ॥तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहात वाहात समुद्राच्या किनार्‍यापर्यंत आला. थोड्याच दिवसात तो लव्हाळ्यांच्या रूपाने उगवला. (२२) मासे पकडण्यार्‍या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडले त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता, तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला. (२३)

समुद्र लाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ ।
प्रभासीं लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारूपें ॥ ३८३ ॥
समुद्राच्या लाटांच्या कल्लोळानें ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभासतीर्थाच्या तीराला लागून तेथे लव्हाळ्यांच्या रूपानें उगवलें ८३,

लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं ।
अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥ ३८४ ॥

आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशानें गिळला. त्याला समुद्रांत जाळें टाकून कोळ्यानें मोठ्या चातुर्यानें इतर मत्स्यांबरोबर जाळ्यांत धरून बाहेर काढले ८४.

तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं ।
देखोनि हरिखला तो भारी । हें आंतुडे करीं तो सभाग्य ॥ ३८५ ॥

नंतर त्या कोळ्यानें तो मासा चिरला, तो त्याच्या पोटांतून लोखंड निघाले. ते पाहून त्या कोळ्याला फारच आनंद झाला. कारण, हे ज्याला सांपडेल तो भाग्यशाली होय ८५.

मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचें अचूक संधान ।
अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥ ३८६ ॥माशाच्या पोटांतील लोखंडाचे निशाण बिनचूक लागते, आणि त्यायोगानें असाध्य शिकारही साधता येते. ह्याकरिता त्याचा त्या कोळ्यानें बाण केला ८६.

भगवान्ज्ञातसर्वार्थ ईश्वरोऽपि तदन्यथा ।
कर्तुं नैच्छत् विप्रशापं कालरूप्यन्वमोदत ॥ २४ ॥
इति श्रीमद्‍भा्गवते महापुराणे परमहंसायां संहितायां

एकादशस्कन्धे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥भगवंतांना सर्व काही माहीत होते हा शाप ते उलटवू शकत होते परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. (२४)

कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञें श्रीकृष्णें ।
परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥ ३८७ ॥

लोखंडाचे पीठ केल्याचें व समुद्रात फेंकल्याचें वृत्त कोणी न सांगतां सर्वज्ञ श्रीकृष्णाला कळले. पण ब्राह्मणांचा शाप खोटा पाडण्याचे त्याच्या मनांतसुद्धा येईना ८७.

म्हणाल हें नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी ।
जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥ ३८८ ॥

कोणी म्हणेल हे त्याला होण्यासारखेच नसेल, ब्राह्मणांचा शाप त्याच्यानें खोटा करवणारच नसेल. तर पहा, ज्यानें गुरूच्या मृतपुत्राला उठवून आणले, तो श्रीकृष्ण कळिकाळाचाही नियंता होता ८८.

पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत ।
ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥ ३८९ ॥

कळिकाळाचे दांत पाडून देवकीचे नेलेले गर्भ ज्यानें परत आणले, तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय. मनात येईल ते घडवून आणण्याचे आपल्या आंगी सामर्थ्य असल्याचे तो जाणून होता ८९.

निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी ।
श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥ ३९० ॥

तिळभरही झोपेचा भंग न करता ज्यानें सर्व मथुरा द्वारकेंत आणून ठेविली, तो श्रीकृष्ण काय करूं शकणार नाहीं ? पण त्यानेंसुद्धा आपल्या कुळाची ममता धरिली नाहीं ३९०.

निजकुळक्षयो जर्‍ही न आला । तर्‍ही अन्यथा न करी ब्राह्मणबोला ।
ब्राह्मणें पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकू ॥ ३९१ ॥

आपल्या कुलक्षयाचा प्रसंग आला, तरी ब्राह्मणांचा शब्द त्यानें खोटा केला नाही. ब्राह्मणानें जरी लाथ मारली, तरी ती पायाची खूण एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली ९१.

तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण ।
हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागी पूर्ण ब्रह्मण्यदेवो ॥ ३९२ ॥
त्यालाच ‘श्रीवत्सलांछन’ असे म्हणतात. त्यालाच तो सर्व भूषणांत श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिरवीत असे. म्हणूनच तो पूर्ण ‘ब्रह्मण्यदेव’ होय ९२.

श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मण । अन्यथा न करी ब्राह्मणवचन ।
यालागीं ‘ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥ ३९३ ॥

श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे. तो ब्राह्मणाचे वचन कधीच खोटें करीत नसे. याकरिता ‘पूर्ण ब्रह्मण्यदेव’ असें वेद स्तुतिपाठक होऊन वर्णन करतात ९३.

ब्राह्मणरूप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी ।
कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥ ३९४ ॥

स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मणरूपच होता, म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे. कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवर रागावला नाहीं ९४.

ऐकोनि ब्राह्मणांचा शापू । न धरी मोहाचा खटाटोपु ।
म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पू । कुलक्षयानुरूपु संतोषे ॥ ३९५ ॥

ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहांत पडला नाहींच; उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धीस गेला हें ठीक झाले असे तो म्हणाला ९५.

यापरी श्रीगोविंदु । काळरूपी मानी आनंदु ।
कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥ ३९६

ह्याप्रमाणें कालरूपी जो श्रीकृष्ण त्यानें ह्यांत आनंदच मानला. कुलक्षयाची क्षिती किंवा दुःख ह्यांचा लेशभरही संबंध त्यानें ठेवला नाहीं ९६.

पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा ।
अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥ ३९७ ॥

उलट श्रीकृष्णाला परम संतोष झाला. ज्ञानमय कथा पुढील अध्यायांत आहे. ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे. ह्याकरितां श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे ९७.

जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद हो‍ईल सुहावा ।
जनक आणी आर्षभदेवां । प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे ॥ ३९८ ॥

त्यांत नारद आणि वसुदेव ह्यांचा मोठा गोड संवाद होईल. जनकाची आणि आर्षभदेवांची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्यें अगदी पोहत राहील ९८.

हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमार्थु ।
एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधें ॥ ३९९ ॥

ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे. शुद्ध परमार्थ आहे. त्याची तुम्हांला गोडी लावून देईन. ह्याकरिता एकनाथ हा गुरु जनार्दनाची, आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरितां श्रोत्यांची प्रार्थना करीत आहे ३९९.

इति श्रीमद्‍भावगवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां
एकाकार टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु.