ekanathi-bhagavata-chappter-ekatisa
|| श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो श्रीसद्गुरु अच्युता । तूं देहीं असोनि देहातीता ।
गुणीं निर्गुणत्वें वर्तता । देहममता तुज नाहीं ॥ १ ॥
देहममता नाहीं निःशेख । तानेपणीं प्यालासी विख ।
पूतना शोषिली प्रत्यक्ष । दावाग्नि देख प्राशिला ॥ २ ॥
जो तूं वैकुंठपीठविराजमान । त्या तुज नाहीं देहाभिमान ।
होऊनि गोवळांसमान । हुंबरी जाण घालिशी स्वयें ॥ ३ ॥
तुज पावावया कर्मबळें । सदा सोशिती सोंवळें ओंवळें ।
तो तूं मेळवूनि गोवळे । जेवणें खेळेंमेळें स्वयें करिसी ॥ ४ ॥
ज्यातें म्हणती दुराचार । तो तुवां करूनि व्यभिचार ।
केला गोपिकांचा उद्धार । हें अगम्य चरित्र वेदशास्त्रां ॥ ५ ॥
घरीं सोळा सहस्र नारी । नांदसी एकलक्ष साठी सहस्र कुमरीं ।
तरीं तूं बाळब्रह्मचारी । तुज सनत्कुमारीं वंदिजे ॥ ६ ॥
तुझे ब्रह्मचर्याची थोरी । शुक नारद वंदिती शिरीं ।
हनुमंत लोळे पायांवरी । तूं ब्रह्मचारी नैष्ठिक ॥ ७ ॥
व्रतबंध नव्हतां आधीं । तुवां भोगिलीं गोवळीं पेंधीं ।
तो तूं ऊर्ध्वरेता त्रिशुद्धीं । तुज भीष्म वंदी सर्वदा ॥ ८ ॥
नवलक्ष गोकंठपाशीं । तुज बांधवेना हृषीकेशी ।
तो तूं भावार्थें बांधिलासी । रासक्रीडेसी गोपिकीं ॥ ९ ॥
जैसे जैसे त्यांचे मनोरथ । तैसतैसा तूं क्रीडा करित ।
सहामास रात्रि करूनि तेथ । तत्प्रेमयुक्त विचरसी ॥ १० ॥
तो तूं कामासी नातळत । कामिनीकाम पूर्ण करित ।
लाजवूनि विधिवेदार्थ । गोपिका समस्त तारिल्या ॥ ११ ॥
गोपी तारिल्या प्रेमाद्भुतें । गायी तारिल्या वेणुगीतें ।
गौळिये तारिले समस्तें । श्रीकृष्णनाथें निजयोगें ॥ १२ ॥
कंस तारिला दुष्टबुद्धी । व्याध तारिला अपराधी ।
ऐसा कृपाळु तूं त्रिशुद्धी । संसारअवधी श्रीकृष्णा ॥ १३ ॥
नुल्लंघवे श्रीकृष्णाच्या बोला । यमें गुरुपुत्र आणूनि दिधला ।
तो श्रीकृष्ण निजतनु त्यागिता जाहला । जो नव्हे अंकिला कळिकाळा ॥ १४ ॥
भागवतीं कळसाध्यावो । जेथें निजधामा जाईल देवो ।
तो अतिगहन अभिप्रावो । सांगे शुकदेवो परीक्षितीसी ॥ १५ ॥
कळसावरतें न चढे काम । तेवीं देवें ठाकिल्या निजधाम ।
राहिला निरूपणसंभ्रम । ‘कळसोपक्रम’ या हेतु ॥ १६ ॥
वेदशास्त्रार्थनिजनिर्वाहो । देहीं नुपजे अहंभावो ।
तो हा एकतिसावा अध्यावो । जेथ निजधामा देवो स्वेच्छा निघे ॥ १७ ॥
श्रीकृष्णाचें निजधामगमन । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।
एका जनार्दनकृपा पूर्ण । विशद व्याख्यान सांगेन ॥ १८ ॥
दारुकें द्वारका प्रयाण । केलिया निजधामा निघे श्रीकृष्ण ।
तें निर्याणकाळींचें दर्शन । पाहों देवगण स्वयें आले ॥ १९ ॥
तेचि अर्थींचें निरूपण । श्रीशुक सांगे आपण ।
श्रोता परीक्षिती सावधान । श्रीकृष्णनिर्याणश्रवणार्थी ॥ २० ॥
श्रीशुक उवाच –
अथ तत्रागमद्ब्रह्मा भवान्या च समं भवः ।
महेन्द्रप्रमुखा देवा मुनयः सप्रजेश्वराः ॥ १ ॥
पितरः सिद्धगन्धर्वा विद्याधरमहोरगाः ।
चारणा यक्षरक्षांसी किन्नराप्सरसो द्विजाः ॥ २ ॥
जो व्यासाचें निजजीवन । जो योगियांचें चूडारत्न ।
तो श्रीशुक स्वयें आपण । श्रीकृष्णनिर्याण निरूपी ॥ २१ ॥
शुक म्हणे परीक्षिती । निजाधामा निघतां श्रीपती ।
सकळ देव दर्शनार्थ येती । विमानपंक्तीं सवेग ॥ २२ ॥
ब्रह्मा सत्वर आला तेथ । भव भवानीसमवेत ।
इंद्रमुख्य देव समस्त । स्वगणयुक्त ते आले ॥ २३ ॥
सनकादिक मुनिपंक्ती । आले दक्षादि प्रजापती ।
अर्यमादि पितर येती । कपिलादि धांवती महासिद्ध ॥ २४ ॥
आले गंधर्व विद्याधर । यक्ष चारण किन्नर ।
बिभीषणादि राक्षस थोर । वेगीं श्रीधर पाहों येती ॥ २५ ॥
पहावया श्रीरंग । आले पाताळींचें प्रन्नग ।
ज्यांतें म्हणती महोरग । तेही सवेग पैं आले ॥ २६ ॥
द्विज आले दत्तात्रेयादिक । नारद पाहों आला कौतुक ।
द्विज-पक्षी गरुडप्रमुख । सत्वर देख ते आले ॥ २७ ॥
रंभा उर्वशी मेनका । अप्सरा ज्या अष्टनायिका ।
श्रीकृष्णदर्शना आवांका । धरोनि देखा त्या आला ॥ २८ ॥
श्रीकृष्णस्वरूप पहावया । नयनीं थोर घेतला थाया ।
यालागीं देंवसमुदाया । येणें लवलाह्यां जाहलें एथें ॥ २९ ॥
द्रष्टुकामा भगवतो निर्याणं परमोत्सुकाः ।
गायन्तश्च गृणन्तश्च शौरेः कर्माणि जन्म च ॥ ३ ॥
कृष्ण पाहावया आवडीं । दृष्टी धांवे लवडसवडी ।
होत डोळ्यां आडाडी । अभिनव गोडी कृष्णाची ॥ ३० ॥
श्रीकृष्णनिर्याणदर्शन । पाहावया उत्साहपूर्ण ।
सत्वर आले सुरगण । पुढती श्रीकृष्णदर्शन आम्हां कैंचें ॥ ३१ ॥
सौंदर्याची निजसीमा । घनश्याम सुंदर प्रतिमा ।
तो कृष्ण गेलिया निजधामा । दर्शन आम्हां मग कैंचें ॥ ३२ ॥
यालागीं तें अतितांतडी । आले आवडीं दर्शनार्थ ॥ ३३ ॥
श्रीकृष्णकर्में स्वयें वर्णित । कृष्णचरित्रें गीतीं गात ।
मिळोनि सुरवर समस्त । आले दर्शनार्थ सत्वर ॥ ३४ ॥
ववर्षुः पुष्पवर्षाणि विमानावलिभिर्नभः ।
कुर्वन्तः सङ्कुलं राजन् भक्त्या परमया युताः ॥ ४ ॥
विमानश्रेणी आकाशीं । तेथ दाटलिया चौपाशीं ।
संमुख देखोनि हृषीकेशी । जयजयकारासी तिहीं केलें ॥ ३५ ॥
देखोनि श्रीकृष्णनाथ । भक्तिउद्रेक जाहलें चित्त ।
दिव्य सुमनांतें वर्षत । मिळूनि समस्त समकाळें ॥ ३६ ॥
दिव्य सुमनांचा रोळा । कृष्णा-चौपाशीं विखुरला ।
तेणें श्रीकृष्ण शोभला त्या काळां । घनश्यामलीळा साजिरी ॥ ३७ ॥
भगवान् पितामहं वीक्ष्य विभूतीरात्मनो विभुः ।
संयोज्यात्मनि चात्मानं पद्मनेत्रे न्यमीलयत् ॥ ५ ॥
देव पावले शीघ्रगतीं । ब्रह्मा देखिला संमुखस्थिती ।
सदाशिवसम विभूती । त्यांतेंही श्रीपती देखता जाहला ॥ ३८ ॥
इंद्रादिक निजविभूती । त्यांतें देखोनि श्रीपती ।
स्वनेत्र पद्मदलाकृती । ते सहजस्थितीं झांकिले ॥ ३९ ॥
झांकिले अथवा उघडे नयन । परी स्थिति नाहीं अधिक न्यून ।
तो आत्मा आत्मत्वें परिपूर्ण । तरी कां श्रीकृष्ण नयन झांकी ॥ ४० ॥
देखोनि देवसमुदावो । कांहीं न बोलतां देवो ।
नेत्र झांकावया कोण भावो । तो अभिप्रावो अवधारा ॥ ४१ ॥
द्वारके असतां श्रीकृष्णनाथ । सुरवर प्रार्थूं आले तेथ ।
तिहीं विनविला देवकीसुत । दास समस्त कृपा पाही ॥ ४२ ॥
स्वर्लोकादि लोकपाळ । आम्ही तुझे दास सकळ ।
निजधामा जातां एक वेळ । आश्रम सकळ पुनीत कीजे ॥ ४३ ॥
त्या समस्त देवांप्रती । स्वमुखें बोलिला श्रीपती ।
यदुकुळक्षयाचे अंतीं । येईन निश्चितीं तेणें मार्गें ॥ ४४ ॥
ऐकोनि श्रीकृष्णवदंती । सुरवर संतोषले चित्तीं ।
आम्हांसी वश्य जाहला श्रीपती । वचनोक्ती नुल्लंघी ॥ ४५ ॥
ते संधीचा ठाकुन ठावो । आला सुरवरसमुदावो ।
त्यांचा छळावया अहंभावो । निजनेत्र पहा हो हरि झांकी ॥ ४६ ॥
देवांचा बहु समुदावो । तेथ मी कोठकोठें जावों ।
त्यासी ठकावया पहा हो । नेत्र झांकोनि देवो समाधि दावी ॥ ४७ ॥
नाहीं समाधि आणि व्युत्थान । कृष्ण परब्रह्म परिपूर्ण ।
तोही निजनेत्र झांकून । समाधिलक्षण मृषा दावी ॥ ४८ ॥
स्वच्छंदमृत्यु योगियांसी । ते स्थिति नाहीं श्रीकृष्णापाशीं ।
अतर्क्यगति शिवादिकांसी । ते परीक्षितीसी शुक सांगे ॥ ४९ ॥
लोकाभिरामां स्वतनुं धारणाध्यानमङ्गलम् ।
योगधारणयाऽऽग्नेय्यादग्ध्वा धामाविशत्स्वकम् ॥ ६ ॥
कळिकाळ जिणोनि जाण । स्वच्छंदमृत्यु योगिजन ।
ते अग्निधारणाकरूनि पूर्ण । स्वदेह जाळून स्वरूप होती ॥ ५० ॥
घृत थिजलें तें विघुरलें । तैसें सगुण निर्गुणत्वा आलें ।
या नांव योगाग्निधारण बोलिलें । श्रीकृष्णें देह दाहिलें हें कदा न घडे ॥ ५१ ॥
कृष्णस्वरूप परिपूर्ण । तो कां करील योगधारण ।
त्याचा लीलाविग्रही देह जाण । करावें दहन कशाचें ॥ ५२ ॥
देखतां डोळ्यां लागे ध्यान । संपूर्ण जेथें विगुंते मन ।
एवढें श्रीकृष्णसौंदर्य संपूर्ण । निजमोहन जगाचें ॥ ५३ ॥
ज्याचें देखतां बरवेंपण । मदन पोटा आला आपण ।
लक्ष्मी भुलली देखोन चरण । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ ५४ ॥
ज्याचें योगियां सदा ध्यान । शिवादिकां नित्य चिंतन ।
सकल मंगलाचें आयतन । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ ५५ ॥
श्रीकृष्ण स्वयें आत्माराम । यालागीं तो जगाचा आराम ।
लीलाविग्रही घनश्याम । ध्यानगम्य चिद्रूप ॥ ५६ ॥
जैशी घृताची पुतळी । थिजोनि जाहली एके काळीं ।
तैसी चैतन्याची मुसावली । स्वलीला जाहली श्रीकृष्णमूर्ती ॥ ५७ ॥
दावाग्नि प्राशिला प्रत्यक्ष । न चढेचि काळियाचें विख ।
तो देहचि नव्हे देख । मा मरणात्मक तेथ कैंचें ॥ ५८ ॥
कृष्ण प्रकटे ज्याचे हृदयीं । तो देहींच होय विदेही ।
मा त्या कृष्णाच्या ठायीं । देहत्व कायी असेल ॥ ५९ ॥
कृष्णदेहो नाहीं निमाला । तो आभासचि सहजत्वा आला ।
जैसा दर्पणींचा लोपला । प्रतिबिंब आपुला आपुले ठायीं ॥ ६० ॥
ज्याचें करितां नामस्मरण । भक्तांचें निरसे जन्म मरण ।
तो कृष्ण पावे जैं निधन । तैं भक्तांसी कोण उद्धरी ॥ ६१ ॥
आत्ममायेचे स्वलीला । कृष्ण कृष्णरूपें प्रगट जाहला ।
ते लीला त्यागोनि संचला । निजरूपीं ठेला निजत्वें ॥ ६२ ॥
कृष्णें देहो नेला ना त्यागिला । तो लीलाविग्रहें संचला ।
भक्तध्यानीं प्रतिष्ठिला । स्वयें गेला निजधामा ॥ ६३ ॥
जैसजैसा भक्ताचा भावो । तैसतैसा होय देवो ।
तो भक्तध्यानीं स्थापूनि देहो । निजधामा पहा हो न वचोनि गेला ॥ ६४ ॥
हो कां कृष्णमूर्ति जरी सगुण । तरी देहा दाह न घडे जाण ।
कृष्णाश्रयें जग संपूर्ण । तेव्हां होईल दहन जगाचें ॥ ६५ ॥
जेणें मायेसी निजपोटीं । दाविल्या ब्रह्मांडांच्या कोटी ।
त्या श्रीकृष्णदेहदाहापाठीं । जगाची गोठी नुरावी ॥ ६६ ॥
ऐशियाही युक्ती विचारितां । अतिस्थूळ ते योग्यता ।
श्रीकृष्णदेहचि विदेहता । तेथ दाहकता ते कैची ॥ ६७ ॥
कृष्णाचें असणें जाणें । हेंही श्रीकृष्णचि स्वयें जाणे ।
तेथ वेदांचेंही बोलणें । जाणपणें सरेना ॥ ६८ ॥
हे कृष्णाची अगम्य गती । शिवविरिंच्यादि नेणती ।
त्यांची कल्पना ऐशी चित्तीं । आम्हांसवें श्रीपती येईल ॥ ६९ ॥
ऐसेनि अभिप्रायें पूर्ण । आनंदले सुरगण ।
अवघे होऊनि सावधान । उल्हास पूर्ण मांडिला ॥ ७० ॥
दिवि दुन्दुभयो नेदुः पेतुः सुमनसश्च खात् ।
सत्यं धर्मो धृतिर्भूमेः कीर्तिः श्रीश्चानु तं ययुः ॥ ७ ॥
उल्हासले सुरगण । दिवि दुंदुभि त्राहाटिल्या जाण ।
दिव्य सुमनें गगनींहून । वर्षले पूर्ण श्रीकृष्णावरी ॥ ७१ ॥
वैकुंठादि स्वर्ग संपत्ती । भूलोका आणील्या श्रीपतीं ।
तो येतां निजधामाप्रति । आमुच्या आम्हां हातीं देईल वेगीं ॥ ७२ ॥
ऐसेनि देव उल्हासोनि । पुनः पुनः वर्षती सुमनीं ।
शिवादि पाहती सावधानीं । अतर्क्य गमनीं हरि गेला ॥ ७३ ॥
आम्ही सकळ मायेचे नियंते । आम्ही सर्वद्रष्टे सर्वज्ञाते ।
ऐसा अभिमान होता देवांतें । त्यासी श्रीकृष्णनाथें लाजविलें ॥ ७४ ॥
अलक्ष्य श्रीकृष्णाची निजगती । शंभु स्वयंभू स्वयें नेणती ।
तेणें विस्मित ते होती । आश्चर्य मानिती सुरवर ॥ ७५ ॥
देव परमाश्चर्य जंव मानिती । तंव सत्य-धर्म-श्री-धृति-कीर्ती ।
श्रीयेसमवेत निघती । सांडूनि क्षिती कृष्णलक्षीं ॥ ७६ ॥
सत्य-धर्म-श्री-धृती-कीर्ती । यांची श्रीकृष्णचरणीं नित्य वस्ती ।
यालागीं कृष्णासवें त्याही निघती । सांडोनि क्षिती तत्काळ ॥ ७७ ॥
तूं ऐसें मानिशी परीक्षिती । जे सत्य धर्म श्री धृति कीर्ती ।
निःशेष सांडूनि गेलीं क्षिती । ऐक ते अर्थीं विचार ॥ ७८ ॥
मज पाहतां श्रीकृष्णमूर्तीं । स्थिरावली ज्याचे चित्तीं ।
तेथ सत्य धर्म श्री धृति कीर्ती । साम्राज्यें वसती कुरुराया ॥ ७९ ॥
केवळ भक्तानुग्रही । कृष्ण स्वयें लीलाविग्रही ।
त्या कृष्णाची गती पाहीं । न पडे ठायीं ब्रह्मादिकां ॥ ८० ॥
देवादयो ब्रह्ममुख्या न विशन्तं स्वधामनि ।
अविज्ञातगतिं कृष्णं ददृशुश्चातिविस्मिताः ॥ ८ ॥
इंद्र बृहस्पती मुख्यत्वें ब्रह्मा । देव पाडूनि परम भ्रमा ।
श्रीकृष्ण प्रवेशला निजधामा । अतर्क्य महिमा हरीचा ॥ ८१ ॥
अतर्क्य श्रीकृष्णाची गती । देवांसी लक्षेना निजशक्तीं ।
अतिविस्मय पावोनि चित्तीं । स्वधामाप्रती निघाले ॥ ८२ ॥
देव जातां स्वधामाप्रती । क्षणक्षणा आश्चर्य करिती ।
अलक्ष्य लक्षेना कृष्णगती । अतर्क्य स्थिती शिवादिकां ॥ ८३ ॥
तेचि श्रीकृष्णाची अतर्क्य गती । देवांसी लक्षेना दैवी शक्तीं ।
तेचि विशद दृष्टांतीं । परीक्षितीप्रती शुक सांगे ॥ ८४ ॥
सौदामन्या यथाऽऽकाशो यान्त्या हित्वाभ्रमण्डलम् ।
गतिर्न लक्ष्यते मर्त्यैस्तथा कृष्णस्य दैवतैः ॥ ९ ॥
वीज तळपें अभ्रमंडळी । ते कोठोनि आली कोठें गेली ।
गति नरां न लक्षे भूतळीं । तैशी श्रीकृष्णगति जाहली दुर्गम देवां ॥ ८५ ॥
वीज सकळ मनुष्यें देखती । परी न कळे येती जाती गती ।
तेवीं श्रीकृष्णाची अवतारशक्ती । न कळे निश्चितीं देवांसी ॥ ८६ ॥
तेथूनिया येथें येणें । कां येथूनिया तेथें जाणें ।
हें नाहीं श्रीकृष्णास करणें । तो सर्वत्र पूर्णपणें परिपूर्ण सदा ॥ ८७ ॥
द्यावया आकाशासी बिढार । सर्वथा रितें न मिळे घर ।
तेवीं श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र । गत्यंतर त्या नाहीं ॥ ८८ ॥
ऐसा श्रीकृष्ण गेला निजधामा । परमाद्भुत ज्याचा महिमा ।
अलक्ष्य लक्षेना कृष्णगरिमा । जाणोनि स्वाश्रमा निघाले देव ॥ ८९ ॥
ब्रह्मरुद्रादयस्ते तु दृष्ट्वा योगगतीं हरेः ।
विस्मितास्तां प्रशंसन्तः स्वं स्वं लोकं ययुस्तदा ॥ १० ॥
आम्ही मायानियंते निजशक्तीं । आम्ही जाणों दुर्गमा योगगती ।
आम्ही सर्वद्रष्टे त्रिजगतीं । हा अभिमान चित्तीं देवांसीं ॥ ९० ॥
तिंहीं देखोनि कृष्णगती । गळाली जाणिवेची वृत्ती ।
लाजें पळाली अभिमानस्थिती । तिंहीं मांडिली स्तुती श्रीकृष्णाची ॥ ९१ ॥
रुद्र पंचमुखीं करी स्तुती । ब्रह्मा चहूं मुखीं वर्णी कीर्ती ।
देव विस्मयातें पावती । अगाध गती श्रीकृष्णाची ॥ ९२ ॥
करितां श्रीकृष्णाची स्तुती । देवांसी न बाणे तृप्ती ।
वर्णित श्रीकृष्णकीर्ति । स्वलोकाप्रती सुर गेले ॥ ९३ ॥
पूर्वीं सांगितली कृष्णगती । तेचि सांगावया विशद स्थिती ।
परतोनि परीक्षितीप्रती । अतिप्रीतीं शुक सांगे ॥ ९४ ॥
राजन्परस्य तनुभृज्जननाप्ययेहा
मायाविडम्बनमवेही यथा नटस्य ।
सृष्ट्वाऽऽत्मनेदमनुविश्य विहृत्य चान्ते
संहृत्य चात्ममहिमोपरतः स आस्ते ॥ ११ ॥
ऐके राया परीक्षिती । सकळ कारणां कारण श्रीपती ।
मायेचीही चेतनाशक्ती । जाण निश्चितीं श्रीकृष्ण ॥ ९५ ॥
ज्यासी नाहीं व्यक्ती वर्ण । ज्यासी नाहीं रूप गुण ।
तो स्वलीला श्रीकृष्ण । यदुवंशीं जाण अवतरला ॥ ९६ ॥
जो सकळवंशवंशज जाण । जो सकळ गोत्र गोत्रज पूर्ण ।
जो सकळ जातींची जाती जाण । स्वयें श्रीकृष्ण सर्वादि ॥ ९७ ॥
त्यासी यदुवंशीं जें जन्म । गोवर्धनोद्धारणादि कर्म ।
कुलक्षयो निधनधर्म । हें स्वलीलाकर्म योगमाया ॥ ९८ ॥
योगमायेचिया सत्ता । मत्स्यकूर्मादि अवतारता ।
शेखीं धरी श्वेतवराहता । ते अतर्क्य योग्यता कृष्णाची ॥ ९९ ॥
श्रीकृष्ण नव्हे नव्हे अवतार । हा अवतारी पूर्ण चिन्मात्र ।
त्याचें अतिअतर्क्य चरित्र । ब्रह्मादि रुद्र नेणती ॥ १०० ॥
जैसे आरिसां प्रतिबिंब बिंबले । तैसें यदुवंशीं कृष्णजन्म जाहलें ।
आरिसां हावभाव पाहिले । तैसें कर्म केलें श्रीकृष्णें ॥ १०१ ॥
तो आरिसा हातींचा त्यागितां । हारपे पुढील प्रतिबिंबता ।
त्या नांव कृष्णनिधनता । मिथ्या वार्ता मायिक ॥ १०२ ॥
जैसा नट धरी नाना वेष । सवेंचि सांडी त्या वेषांस ।
परी नटासी नाहीं नाश । तैसा पैं हृषीकेश अवतारी ॥ १०३ ॥
यदुवंशीं श्रीकृष्णनाथ । सर्व कर्मीं सदा अलिप्त ।
सृष्टिस्थित्यंतीं नित्यमुक्त । त्यासी परमाद्भुत तें कायी ॥ १०४ ॥
न मेळवितां साह्य संगें । कृष्ण सृष्टी सृजी निजांगें ।
ते प्रतिपाळूनि यथाभागें । सहारूनि वेगें स्वयें उरे ॥ १०५ ॥
श्रीकृष्ण सृजी पाळी संहारी । हे प्रत्यक्ष जगीं दिसे थोरी ।
कर्में करूनि तो अविकारी । कदा विकारी नव्हे कृष्ण ॥ १०६ ॥
श्रीकृष्ण अंतर्यामी सर्व भूतां । जगकर्मांचा कृष्ण कर्ता ।
कर्म करूनि तो अकर्ता । विदेहता निजरूपें ॥ १०७ ॥
ऐसा अगाध श्रीकृष्णमहिमा । मर्यादा न पवे शिव शक्र ब्रह्मा ।
त्याचा देहचि विदेहात्मा । गेला निजधामा तेणें योगें ॥ १०८ ॥
येचि अवतारीं श्रीकृष्णनाथें । देहीं दाविलें विदेहकर्मातें ।
तें मागें परिसविलें तूतें । ऐक मागुतें सांगेन ॥ १०९ ॥
सात दिवस गोवर्धन । निजकरी धरूनि जाण ।
इंद्राचा हरिला मान । विदेही पूर्ण श्रीकृष्ण ॥ ११० ॥
दावाग्नि प्राशूनि आपण । लाजविला हुताशन ।
रासक्रीडा करूनि जाण । हरिला मान मदनाचा ॥ १११ ॥
समुद्र सारूनि माघारां । वसविलें निजनगरा ।
निद्रा न मोडितां मथुरा । द्वारकापुरा आणिली ॥ ११२ ॥
सेवूनि भाजीचे पान । तृप्त केले ऋषिजन ।
श्रीकृष्ण अंतर्यामी आपण । हें निजलक्षण दाविलें ॥ ११३ ॥
येणेंचि देहें श्रीकृष्णनाथ । जाहला वत्सें वत्सप समस्त ।
ब्रह्मा लाजवूनि तेथ । गर्वहत तो केला ॥ ११४ ॥
मर्त्येन यो गुरुसुतं यमलोकनीतं
त्वां चानयच्छरणदः परमास्त्रदग्धम् ।
जिग्येऽन्तकान्तकमपीशमसावनीशः
किं स्वावने स्वरनयन्मृगयुं सदेहम् ॥ १२ ॥
श्रीकृष्णें येणेंचि देहेसीं । जाऊनियां यमलोकासी ।
निग्रहूनि यमकाळासी । निमाल्या गुरुसुतासी आणिलें ॥ ११५ ॥
उत्तरेचिये गर्भस्थितीं । जळतां ब्रह्मास्त्रमहाशक्तीं ।
तुज राखिलें आकांतीं । स्वचक्र श्रीपती प्रेरोनी ॥ ११६ ॥
तुज राखावया हेंचि कारण । तुझी माता रिघाली शरण ।
श्रीकृष्ण शरणागतां शरण्य । संकटहरण निजभक्तां ॥ ११७ ॥
यादवांदेखतां द्वारकापुरीं । द्विजसुत राखितां सटीचे रात्रीं ।
अर्जुन नेमेंसीं प्रतिज्ञा करी । तंव तो सशरीरीं हारपला ॥ ११८ ॥
ब्राह्मणें निर्भ्रर्त्सिलें त्यासी । थोर लाज जाहली अर्जुनासी ।
तेणें कळवळला हृषीकेशी । भक्तसाह्यासी पावला ॥ ११९ ॥
अर्जुनासहित हृषीकेशी । रथेंसीं रिघे क्षीरसागरासी ।
द्विजसुत होते नारायणापाशीं । ते द्वारकेसी आणिले ॥ १२० ॥
एवं भक्तसंकटनिवारण । निजांगें करी श्रीकृष्ण ।
कृष्णप्रतापाचें महिमान । ऐक सांगेन अलौकिक ॥ १२१ ॥
बाणासुराचा कैवारु । करूँ आला महारुद्रु ।
सवें नंदी भृंगी वीरभद्रु । स्वामिकार्तिकेंसीं हरु जिंतिला कृष्णें ॥ १२२ ॥
उग्रासीही अतिउग्र । भयंकराही भयंकर ।
तो जिणोनि काळाग्निरुद्र । बाणभुजाभार छेदिला ॥ १२३ ॥
श्रीकृष्णवचन अतिअगाध । जेणें केला अपराध ।
तो स्वदेहेंसीं जराव्याध । स्वर्गा प्रसिद्ध धाडिला ॥ १२४ ॥
एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापाशीं । तो काय राखूं न शके स्वदेहासी ।
देहीं देहत्व नाहीं त्यासी । गेला निजधामासी निजात्मता ॥ १२५ ॥
एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापाशीं । तरी कां गेला निजधामासी ।
ये लोकीं तेणें देहेंसीं । राहतां त्यासी भय काय ॥ १२६ ॥
ऐसा पोटींचा आवांका । धरुन धरिशी आशंका ।
लोकाभिमान नाहीं यदुनायका । स्वेच्छा देखा स्थिति त्याची ॥ १२७ ॥
तथाप्यशेषस्थितिसम्भवाप्य-
येष्वनन्यहेतुर्यदशेषशक्तिधृक् ।
नैच्छत्प्रणेतुं वपुरत्र शोषितं
मर्त्येन किं स्वस्थगतिं प्रदर्शयन् ॥ १३ ॥
मायादि तीन्ही गुण । इत्यादि कारणां कारण ।
निजांगें श्रीकृष्ण आपण । स्वयें अकारण अनादित्वें ॥ १२८ ॥
ब्रह्मांडें कोटी अनंत । उत्पत्तिस्थितिप्रलयावर्त ।
करूनि श्रीकृष्णु अलिप्त । सामर्थ्यें अद्भुत श्रीकृष्णीं ॥ १२९ ॥
अशेषांही परम शक्ती । श्रीकृष्णलेशें सामर्थ्यवंती ।
कृष्णुदेह तो विदेहस्थिती । स्वेच्छाशक्तीं स्वधामा गेला ॥ १३० ॥
इहलोकींची आसक्ती । श्रीकृष्णासी नाहीं चित्तीं ।
निजधामाची अतिप्रीती । तेही निश्चितीं असेना ॥ १३१ ॥
निजदेहेंही इहलोकीं वस्ती । स्वेच्छा न मानीच श्रीपती ।
माझ्या देहाची अगम्य गती । तेणें साधकस्थिती भ्रंशेल ॥ १३२ ॥
माझा देह चैतन्यघन । तेथें बाधीना विषयसेवन ।
हें देख्नोनि साधक जन । देहसाधन मांडिती ॥ १३३ ॥
वायो साधूनियां पूर्ण । दृढ करूनि देहधारण ।
माझ्याऐसें विषयसेवन । करावया अभिमान वाढेल ॥ १३४ ॥
ऐसा वाढल्या देहाभिमान । माझें मावळेल निजात्मज्ञान ।
यालागीं विदेह श्रीकृष्ण । गेला निघोन निजधामा ॥ १३५ ॥
माझें नाकळतां निजात्मज्ञान । परी माझ्याऐसें विषयसेवन ।
करूं लागती योगी जन । यालागीं श्रीकृष्ण निजधामा गेला ॥ १३६ ॥
माझ्या देहाची स्थिति गती । शंभु स्वयंभू कदा नेणती ।
मा इतरांसीं ते गती । कैशा रीतीं कळेल ॥ १३७ ॥
परी माझेऐसा देहाभिमान । वाढवितील योगी जन ।
हें जाणोनियां श्रीकृष्ण । विदेहें आपण निजधामा गेला ॥ १३८ ॥
ज्याचे देहाचें दर्शन । देखतां सबाह्य निवे मन ।
त्याही देहाचें मिथ्यात्व पूर्ण । दावूनि श्रीकृष्ण निजधामा गेला ॥ १३९ ॥
एवं त्यागावया देहाभिमान । कृष्ण निजधामा करी गमन ।
तरावया साधक जन । कृपाळु पूर्ण दीक्षा दावी ॥ १४० ॥
एथवरी वैराग्यदृढस्थिती । देहाभिमानाच्या विरक्तीं ।
साधावी निजात्मप्राप्ती । हे दीक्षा श्रीपती दावूनि गेला ॥ १४१ ॥
जेणें देहें स्वयें श्रीकृष्ण । आचरला अनेक विंदान ।
परी ज्ञात्यासी न लगे दूषण । हें पूर्णत्व पूर्ण प्रकाशलें ॥ १४२ ॥
जैत अथवा आल्या हारी । ज्ञान मैळेना दोंहीपरी ।
ज्यासी मिथ्या भास नरनारी । तो सदा ब्रह्मचारी व्यभिचारामाजीं ॥ १४३ ॥
स्त्रीपुत्रादि गृहवासी । असोनि नित्य संन्यासी ।
हेंही लक्षण हृषीकेशीं । येणें अवतारेंसीं दाविलें ॥ १४४ ॥
अंगीं बाणलें गोवळेपण । सवेंचि स्वामित्व आलें पूर्ण ।
शेखीं सेवकही जाहला आपण । तरी पूर्णपण मैळेना ॥ १४५ ॥
एकाचे घरीं उच्छिष्टें काढी । एकाचीं अंगें धूतसे घोडीं ।
तरी पूर्णत्वाचिये जोडी । उणी कवडी नव्हेचि ॥ १४६ ॥
एकाचीं निमालीं आणिलीं बाळें । एकाचीं समूळ निर्दाळिलीं कुळें ।
इंहीं दोंही परी ज्ञान न मैळे । हेंही प्रांजळें प्रकाशिलें ॥ १४७ ॥
एकाचा पूर्ण जाहला कैवारी । एकाचा जाहला पूर्ण वैरी ।
परी एकात्मता चराचरीं । अणुभरी ढळेना ॥ १४८ ॥
एकीं उद्धरिलीं चरणीं लागतां । तोही एकाचे चरणीं ठेवी माथा ।
बाप ज्ञानाची उदारता । न्यूनपूर्णता तरी न घडे ॥ १४९ ॥
इतर ज्ञाते ज्ञानस्थिती । बोल बोलोनि दाविती ।
तैशी नव्हे श्रीकृष्णमूर्ति । आचरोनि स्थिती दाविली अंगें ॥ १५० ॥
अतिगुह्य ज्ञानलक्षणें । आचरोनि दाविलीं श्रीकृष्णें ।
परी अणुमात्रही उणें । नेदीच पूर्णपणें अंगीं लागों ॥ १५१ ॥
एवढी ज्या देहाची ख्याती । जेणें देहें दीन उद्धरती ।
ज्या देहातें सुरनर वंदिती । ज्या देहाची कीर्ती त्रैलोक्य वर्णी ॥ १५२ ॥
त्या देहाची अहंकृती । निःशेष सांडूनि श्रीपती ।
गेला निजधामाप्रती । ठेवूनि निजमूर्ति स्वभक्तध्यानीं ॥ १५३ ॥
श्रीकृष्णें देह नेला ना त्यागिला । तो लीलाविग्रहें संचला ।
निजभक्तध्यानीं प्रतिष्ठिला । स्वयें निजधामा गेला निजात्मयोगें ॥ १५४ ॥
य एतां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवीं परम् ।
प्रयतः कीर्तयेद्भक्त्या तामेवाप्नोत्यनुत्तमाम् ॥ १४ ॥
श्रीकृष्णावताराचे अंतीं । कृष्णाची जे परम गती ।
अति उत्कृष्ट योगस्थिती । अतर्क्य निश्चितीं सुरश्रेष्ठां ॥ १५५ ॥
जे गतीहूनि वरती । चढेना अधिक गती ।
तीतें ‘परा पदवी’ म्हणती । वेदशास्त्रोक्तीं सज्ञान ॥ १५६ ॥
हे ‘श्रीकृष्णपरमपदवी’ । जो कोणी भक्तियुक्त सद्भावीं ।
नित्य नेमस्त धरूनि जीवीं । पढे निजभावीं प्रातःकाळीं ॥ १५७ ॥
भक्तियुक्त हृदयकमळीं । या चौदा श्लोकांची जपमाळी ।
जिह्वाग्रें अनुदिनीं चाळी । नित्य प्रातःकाळीं नेमस्त ॥ १५८ ॥
केलिया या नेमासी । सांडणें नाहीं प्राणांतेंसीं ।
ऐशी निष्ठा जयापाशीं । उत्तमत्वासी तो पावे ॥ १५९ ॥
श्रीकृष्णपदवी गातां गीतीं । पाया लागती चारी मुक्ती ।
त्यांचीही उपेक्षूनि स्थिती । कृष्णपदवी निश्चितीं स्वयें पावे ॥ १६० ॥
हे चौदाही श्लोक जाण । चौदा विद्यांचें जन्मस्थान ।
जो प्रातःकाळीं करी पठण । कृष्णपदवी पूर्ण तो पावे ॥ १६१ ॥
हे चौदाही श्लोक जाण । चौदा भुवनांचें निजजीवन ।
कृष्णपदवी पाविजे पूर्ण । नेमस्त पठण केलिया ॥ १६२ ॥
हे चौदाही श्लोक जाण । चौदा पदें गयावर्जन ।
पदीं पिंडा समाधान । नेमस्त पठण केलिया ॥ १६३ ॥
हे चौदाही श्लोक जाण । चौदा इंद्रांच्या जीवां जीवन ।
इंद्रांचा इंद्र होइजे आपण । नेमस्त पठण केलिया ॥ १६४ ॥
हे चौदाही श्लोक जाण । चौदा कांडें वेद संपूर्ण ।
वेदवादां समाधान । नेमस्त पठण केलिया ॥ १६५ ॥
हे चौदाही श्लोक जाण । संसाराचे गुणकर्मवर्ण ।
मोडूनि करी ब्रह्म पूर्ण । नेमस्त पठण केलिया ॥ १६६ ॥
प्रातःकाळीं नेमस्त पठण । करितां पाविजे ब्रह्म परिपूर्ण ।
मा त्रिकाळीं जो करे पठण । तो स्वदेहें श्रीकृष्ण स्वयें होय ॥ १६७ ॥
एथ पढोनि जो अर्थ पाहे । तो स्वयें स्वयंभ श्रीकृष्ण होये ।
श्रीकृष्णाची पूर्ण पदवी पाहे । आंदणी होये तयाची ॥ १६८ ॥
श्रीकृष्णपदवी निजनिर्याण । श्रवणें पठणें अर्थें जाण ।
साधकां करी ब्रह्म परिपूर्ण । हें गुह्य निरूपण परमार्थसिद्धीं ॥ १६९ ॥
एथ न करितां अतिसाधन । अनायासें ब्रह्मज्ञान ।
कृष्णपदवीं पाविजे पूर्ण । श्रद्धायुक्त पठण नेमस्त करितां ॥ १७० ॥
तक्षकभयाची निवृत्ती । देहीं पावावया विदेहप्राप्ती ।
हे सुगमोपायस्थिती । कृपेनें परीक्षितीप्रती शुक सांगे ॥ १७१ ॥
हे कृष्णपदवी निजनिर्याण । श्रद्धायुक्त नेमस्त पठण ।
करितां पाविजे ब्रह्म पूर्ण । हे प्रतिज्ञा पूर्ण श्रीशुकाची ॥ १७२ ॥
ऐशी हे सुगम परी । असतां जो श्रद्धा न धरी ।
तो बुडाला संसारसागरीं । अविद्येघरीं घरजांवयी तो ॥ १७३ ॥
तो अविद्येचा पोसणा । विषयीं प्रतिपाळिला सुणा ।
अहंथारोळां बैसणा । सर्वदा जाणा वसवसित ॥ १७४ ॥
असोत या मूढ गोष्टी । रचल्या सुखा पडेल तुटी ।
या श्लोकपठणासाठीं । होय भेटी परब्रह्मीं ॥ १७५ ॥
कृष्णनिजपदवीव्याख्यान । करावया मी अपुरतें दीन ।
जनार्दनें कृपा करून । हें निरूपण बोलविलें ॥ १७६ ॥
एका जनार्दना शरण । श्रीकृष्णपदवीनिरूपण ।
तो हा ‘एकादशाचा कळस’ पूर्ण । व्यासें जाणोन वायिला ॥ १७७ ॥
श्रीकृष्णपदवीपरतें । निरूपण न चढे एथें ।
तो हा ‘कळस’ एकादशातें । व्यासें निश्चितें निर्वाळिला ॥ १७८ ॥
निर्वाळिलें निरूपण । हे जनार्दनकृपा पूर्ण ।
एका जनार्दना शरण । यापरी श्रीकृष्ण निजधामा गेला ॥ १७९ ॥
येरीकडे द्वारकेसी । दारुक पावला विव्हळतेसीं ।
तेथील वर्तले कथेसी । परीक्षितीसी शुक सांगे ॥ १८० ॥
दारुको द्वारकामेत्य वसुदेवोग्रसेनयोः ।
पतित्वा चरणावस्त्रैर्न्यषिञ्चत्कृष्णविच्युतः ॥ १५ ॥
दारुक द्वारका देखत । जैसें का प्राणेंवीण प्रेत ।
का राजा जैसा दैवहत । तैशी दिसत कळाहीन ॥ १८१ ॥
जेवीं का वनिता पतिवीण । सर्वार्थीं दिसे दीन ।
तैशी द्वारावती जाण । कळाहीन आभासे ॥ १८२ ॥
रस पिळिल्या जैसा ऊंस । कणेवीण फळकट भूस ।
तैशी श्रीकृष्णेवीण उद्वस । दिसे चौपास द्वारका ॥ १८३ ॥
दारुक प्रवेशे राजभुवन । देखोनि वसुदेव उग्रसेन ।
अश्रुधारा स्रवती नयन । आक्रंदोनि चरण धरिले त्यांचे ॥ १८४ ॥
कृष्णवियोगें तापला पूर्ण । जैसें अतिसंतप्त जीवन ।
तैसे अश्रुधारा स्रवती नयन । तेणें पोळती चरण वसुदेवाचे ॥ १८५ ॥
उकसाबुकसीं फुंदे पोट । दुःखें होऊं पाहे हृदयस्फोट ।
जिव्हेसी बोबडी वाळले ओंंठ । सद्गदें कंठ दाटला ॥ १८६ ॥
बोल न बोलवे सर्वथा । देखोनि दारुकाची व्यथा ।
द्वारकेच्या जनां समस्तां । अतिव्याकुलता वोढवली ॥ १८७ ॥
देवकी आणि रोहिणी । आल्या अत्यंत हडबडोनी ।
अतिव्याकुलता देखोनि । कृष्णपत्नी तेथें आल्या ॥ १८८ ॥
राणीवसाचिया नरनारी । धांवल्या सभामंडपाभीतरीं ।
तंव दारुकाची अवस्था भारी । देखोनि जिव्हारीं दचकल्या ॥ १८९ ॥
स्फुंदतां उकसाबुकसीं । श्वास परतेना दारुकासी ।
सांगतां कृष्णवियोगासी । मूर्छा त्यासीं पैं आली ॥ १९० ॥
तेथें वसुदेव उग्रसेन । करूनि त्याचें सांतवन ।
वृत्तांत पुसतां सावधान । काय तो वचन बोलिला ॥ १९१ ॥
कथयामास निधनं वृष्णीनां कृत्स्नशो नृप ।
तच्छ्रुत्वोद्विग्नहृदया जनाः शोकविमूर्च्छिताः ॥ १६ ॥
दारुक म्हणे तुम्ही समस्त । पळा पळा अर्जुनासमवेत ।
अर्ध क्षण न रहावें एथ । यादव समस्त निमाले ॥ १९२ ॥
यादवीं जाऊनि प्रभासासी । केला तीर्थविधि विधानेंसीं ।
दान भोजनें देऊनि द्विजांसी । मद्यपानासी मांडिलें ॥ १९३ ॥
चढला मद्याचा उन्मादु । यादव सखे सगोत्र बंधु ।
परस्परें युद्धसंबंधु । गोत्रवधु तेथ घडला ॥ १९४ ॥
शस्त्रेंकरूनि स्वयमेव । कोणी न मरतीच यादव ।
तेथ घडलें एक अपूर्व । एरिकेनें सर्व निमाले ॥ १९५ ॥
बळिभद्रें त्यागिलें देहासी । श्रीकृष्णही गेला निजधामासी ।
मज धाडिलें तुम्हांपाशीं । क्षण द्वारकेसी न रहावें ॥ १९६ ॥
हरीनें त्यागिलें द्वारकेसी । समुद्र बुडवील शीघ्रतेशीं ।
हें कृष्णें सांगितलें तुम्हांसी । एथूनि त्वरेंसीं निघावें ॥ १९७ ॥
ऐकूनि दारुकाची गोठी । द्वारकेसी एक बोंब उठी ।
उग्रसेन कपाळ पिटी । मस्तक आपटी वसुदेव ॥ १९८ ॥
एक कुस्करिती दोनी हात । एक अत्यंत चरफडत ।
एक आक्रोशें आक्रंदत । एकें मूर्छित पैं पडली ॥ १९९ ॥
एका रडतां शोषले कंठ । एकाचे दोनी फुटले ओंठ ।
एकाचा होऊं पाहे हृदयस्फोट । दुःख अचाट सर्वांसी ॥ २०० ॥
एक स्फुंदती उकसाबुकशीं । एक पिटिती हृदयासी ।
एक तोडिती कान-केशीं । एकें दुःखें पिशीं पैं जाहलीं ॥ २०१ ॥
एक देती दीर्घ हाक । एकें पडलीं अधोमुख ।
एके मीनाच्या ऐसें देख । अत्यंतिक तळमळती ॥ २०२ ॥
बोंब सुटली नरनारी । शंख करिती घरोघरीं ।
कोण कोणातें निवारी । समस्तां सरी समदुःख ॥ २०३ ॥
देवकी आणि रोहिणी । मूर्छित पडल्या धरणीं ।
सवेंचि उठती आक्रंदोनी । दीर्घस्वरीं विलपती ॥ २०४ ॥
कृष्णा विसाविया निजाचिया । वेगीं भेटी देईं कां रे कान्हया ।
का रुसलासी रे तान्हया । तुझिया पायां लागेन ॥ २०५ ॥
श्रीकृष्ण तूं माझा कैवारी । श्रीकृष्ण तूं माझा सहाकारी ।
शेखीं मज सांडोनि दुरंधरी । तूं दूरचे दूरी गेलासी ॥ २०६ ॥
जिणोनि कंसकेशियातें । बंदीं सोडविलें आमुतें ।
शेखीं तुवां सांडिलें एथें । निष्ठुर चित्तें झालासी ॥ २०७ ॥
आणूनि निमाल्या पुत्रांतें । तुवां मज सुखी केलें येथें ।
अंतीं ठकिलें मातें । श्रीकृष्णनाथें नाडिलें ॥ २०८ ॥
कृष्णा निरसूनि माझें दुःख । तुवा दिधलें परम सुख ।
तो तूं निष्ठुर जाहलासी देख । अंतीं निःशेख सांडिलें ॥ २०९ ॥
माझिया पुत्रा कृष्णराया । वेगीं ये का रे कान्हया ।
माझ्या नाहीं प्राशिलें पान्हया । म्हणोनि तान्हया रुसलासी ॥ २१० ॥
जिचें केलें स्तनपान । ते यशोदाही जाहली दीन ।
तुझें न देखतां वदन । कैसेनि प्राण राहतील ॥ २११ ॥
कृष्णा ये रे ये रे धांवोन । चौभुजीं मज दे आलिंगन ।
तुझें चुंबीन रे वदन । मी अतिदीन तुजलागीं ॥ २१२ ॥
माझिया श्यामसुंदरा । राजीवलोचना सुकुमारा ।
चतुर्भुजा शार्ङ्गधरा । ये का रे उदारा श्रीकृष्णा ॥ २१३ ॥
तुझे पद्मांकित पाये । मज आठवती पाहें ।
तेणें हृदय फुटताहे । करूं मी काये श्रीकृष्णा ॥ २१४ ॥
कृष्णा तुजहूनि वेगळी । मी जाहलें रे आंधळी ।
माझी धरावया आंगोळी । धांव वनमाळी श्रीकृष्णा ॥ २१५ ॥
मज अंधाची कृष्ण काठी । कोणें घातली गे वैकुंठीं ।
आतां मी मार्ग केवीं कंठीं । पाव जगजेठी श्रीकृष्णा ॥ २१६ ॥
पुत्र नातू वंशावळी । एके वेळीं जाहली होळी ।
कोणी नुरेचि यदुकुळीं । वक्षःस्थळीं पिटिती ॥ २१७ ॥
यादव पडले रे केउते । तुज कोठूनि धाडिलें कृष्णनाथें ।
वेगीं न्या रे मज तेथें । पाहीन समस्तें तानुलीं ॥ २१८ ॥
ऐकोनि देवकीचें रुदन । वसुदेवादि उग्रसेन ।
आक्रंदोनि सकळ जन । प्रभासासी जाण निघाले ॥ २१९ ॥
तत्र स्म त्वरिता जग्मुः कृष्णविश्लेषविह्वलाः ।
व्यसवः शेरते यत्र ज्ञातयोघ्नन्त आननम् ॥ १७ ॥
स्त्रिया पुरुष सुहृज्जन । मिळोनि स्वगोत्रस्वजन ।
शीघ्र प्रभासा गमन । करीत रुदन निघाले ॥ २२० ॥
हाकाबोबांचे बंबाळ । स्त्रिया करिती कोल्हाळ ।
कृष्णवियोगें सकळ । दुःखविव्हळ निघालीं ॥ २२१ ॥
रणीं पडिले यादव । प्राणरहित निर्जीव ।
तेथ पावलीं ते सर्व । बोंबारव खंती करिती ॥ २२२ ॥
देवकी रोहिणी चैव वसुदेवस्तथा सुतौ ।
कृष्णरामावपश्यन्तः शोकार्ता विजहुः स्मृतिम् ॥ १८ ॥
प्राणांश्च विजहुस्तत्र भगवद्विरहातुराः ।
उपगुह्य पतींस्तात चितामारुरुहुः स्त्रियः ॥ १९ ॥
देवकी आणि रोहिणी । वसुदेव उग्रसेन दोनी ।
यादव निमाले रणांगणीं । ते स्थानीं पाहों येती ॥ २२३ ॥
दीर्घशयनें युद्धधरणीं । पडिल्या यादववीरश्रेणी ।
तेथें राम कृष्ण पुत्र दोनी । पाहतां नयनीं न देखती ॥ २२४ ॥
कृष्णविरहें शोकाकुलित । दुःख न संठेचि अतिअद्भुत ।
चौघे जणें आक्रंदत । पडिलीं मूर्च्छित अतिदुःखें ॥ २२५ ॥
निमाल्या रामकृष्णांचें मुख । आम्ही न देखों निःशेख ।
तेणें उथळलें परम दुःख । दुःखासवें देख निमाला प्राण ॥ २२६ ॥
प्राणें करावें उत्क्रमण । त्यांसीही श्रीकृष्णदुःख दारुण ।
दुःखें निमाले स्वयें प्राण । वांचवी कोण रडत्यांसी ॥ २२७ ॥
न देखतां राम कृष्ण । ते मूर्च्छेसवेंचि जाण ।
चौघीं जणीं त्यजिले प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥ २२८ ॥
समस्त यादवांच्या स्त्रिया । धरूनि आपुलाले प्रिया ।
अग्निप्रवेश करावया । चढल्या लवलाह्यां चितेमाजीं ॥ २९ ॥
यादवांचिया स्त्रिया बहुतीं । कोण प्रवेशल्या कैशा रीतीं ।
तेही अग्निप्रवेशाची स्थिती । परीक्षितीप्रती शुक सांगे ॥ २३० ॥
रामपत्न्यश्च तद्देहमुपगुह्याग्निमाविशन् ।
वसुदेवपत्न्यस्तद्गात्रं प्रद्युम्नादीन् हरेः स्नुषाः ।
कृष्णपत्न्योऽविशन्नग्नीं रुक्मिण्याद्यास्तदात्मिकाः ॥ २० ॥
बळरामाचिया पत्नी । रेवत्यादि मुख्य करूनी ।
स्वपतीचा देह मनीं धरूनी । प्रवेशल्या तद्ध्यानयुक्त ॥ २३१ ॥
निमाल्या देवकी रोहिणी । इतरा ज्या वसुदेवपत्नी ।
त्याही प्रवेशल्या अग्नीं । देह धरूनी स्वपतीचा ॥ २३२ ॥
प्रद्युम्नासवें रती । प्रवेशली महासती ।
सांबासवें रूपवती । प्रवेशे निश्चितीं दुर्योधनकन्या ॥ २३३ ॥
अनिरुद्धासवें देखा । प्रवेशे रोचना आणि उखा ।
एवं कृष्णसुना सकळिका । यादवनायिका प्रवेशल्या अग्नीं ॥ २३४ ॥
अग्निप्रवेश श्रीकृष्णपत्नी । त्यांची अलोलिक करणी ।
त्यांमाजीं मुख्य रुक्मिणी । सत्यांशिरोमणी जगन्माता ॥ २३५ ॥
कृष्णनिर्याणें रुक्मिणी । तद्रूप जाहली तत्क्षणीं ।
जेवीं ज्वाळा मिळे वन्हीं । तेवीं कृष्णपणीं तदात्मक ॥ २३६ ॥
कृष्ण गेला जाणोनि रुक्मिणी । तटस्थ ठेली ते तत्क्षणीं ।
सांडूनि देहाची गवसणी । कृष्णस्वरूपमिळणीं तदात्मक झाली ॥ २३७ ॥
रुक्मिणीचा देह दहन । करावया नुरेचि प्रेतपण ।
कृष्ण पूर्णत्वें स्वयंभ पूर्ण । गति समान दोहींची ॥ २३८ ॥
येरी पट्ट-मुख्या सातजणी । आणि सोळासहस्र कामिनी ।
सवें प्रवेशल्या अग्नीं । श्रीकृष्णचरणीं तदात्मक ॥ २३९ ॥
जिंहीं भोगिलें कृष्णसुरतसुख । त्यांसी गति न्यूनाधिक ।
बोलतां वाचेसी लागे दोख । जाहल्या तदात्मक कृष्णसंगें ॥ २४० ॥
जो वाचे स्मरे ‘कृष्ण कृष्ण’ । तो तदात्मता पावे पूर्ण ।
मा जिंहीं स्वयें भोगिला श्रीकृष्ण । त्यांची दशा न्यून कदा न घडे ॥ २४१ ॥
ज्यासी लागे कृष्णाचा अंगसंग । त्याच्या लिंगदेहा होय भंग ।
त्यासी पूर्ण पदवी अभंग । भोगितां भोग तादात्म्य नित्य ॥ २४२ ॥
ज्याच्या ध्यानीं वसे श्रीकृष्णमूर्ती । त्यासी चारी मुक्ति वंदिती ।
मा जिंहीं स्वयें भोगिला श्रीपती । त्यांसी अन्यगती असेना ॥ २४३ ॥
ज्यांसी इहलोकीं श्रीकृष्णसंगती । त्यांसी परलोकीं अन्य गती ।
बोलतां सज्ञान कोपती । त्यांसी पूर्ण प्राप्ती पूर्णत्वें ॥ २४४ ॥
जो अडखळोनि गंगेसी पडे । त्याचें पातक तत्काळ उडे ।
मा ज्यासी विध्युक्त स्नान घडे । त्याचें पाप न झडे मग कैसेनी ॥ २४५ ॥
तेवीं कृष्णव्यभिचारसंगती । गोपी उद्धरला नेणों किती ।
त्याच्या निजपत्न्यासी अन्य गती । कैश रीतीं घडेल ॥ २४६ ॥
तृण वल्ली मृग पाषाण । गायी गोपिका गौळीजन ।
कृष्णसंगें तरले पूर्ण । त्याच्या स्त्रियांसी अन्य गति कैशी ॥ ४७ ॥
यालागीं कृष्णसंगती । ज्यांसी घडे भलत्या रीतीं ।
ते उद्धरले गा निश्चितीं । जाण परीक्षिती कुरुराया ॥ ४८ ॥
अर्जुनः प्रेयसः सख्युः कृष्णस्य विरहातुरः ।
आत्मानं सान्त्वयामास कृष्णगीतैः सदुक्तिभिः ॥ २१ ॥
ज्याचा रथ वागवी आपण । ज्याचा सारथी श्रीकृष्ण ।
ऐसा प्रियसखा अर्जुन । कृष्णविरहें पूर्ण उद्विग्न जाहला ॥ २४९ ॥
तंव कृष्णगीता सदुक्ती । आठवल्या त्याच्या चित्तीं ।
मग आपण आपणाप्रती । बोलिला उपपत्ती त्या ऐका ॥ २५० ॥
कृष्ण माझ्या मनाचें ‘मन’ । कृष्ण ‘बुद्धिचें’ आयतन ।
कृष्णप्रभा हें प्रकाशे ‘ज्ञान’ । तेथ भिन्नपण मज कैंचें ॥ २५१ ॥
कृष्णप्रभा ‘दृष्टी’ देखे । कृष्णअवधानें ‘श्रवण’ ऐके ।
कृष्णानुवादें ‘बोल’ बोलकें । तेथें ‘मी’ वेगळिकें वृथा मानीं ॥ २५२ ॥
कृष्ण हृदयस्थ ‘आत्मा’ अव्यंग । कृष्ण माझ्या अंगाचें अंग ।
त्या कृष्णासीं मज वियोग । हा मिथ्या प्रयोग मायिक ॥ २५३ ॥
कृष्ण माझ्या जीवाचें जीवन । कृष्ण सबाह्य परिपूर्ण ।
कृष्णवियोग मानी जें मीपण । तेंही निमग्न श्रीकृष्णीं ॥ २५४ ॥
भिन्न भिन्न भूताकृती । त्यामाजीं अभिन्न कृष्णस्थिती ।
विषमीं समान श्रीपती । त्यासी वियोगप्राप्ती कदा न घडे ॥ २५५ ॥
घट मृत्तिकेसी नव्हे भिन्न । पट न निवडें तंतु त्यागून ।
तैसा श्रीकृष्णवेगळा अर्जुन । माझें मीपण निवडेना ॥ २५६ ॥
कृष्णवियोग मी मानीं जेथ । तेथेंही असे श्रीकृष्णनाथ ।
वियोग मानिती जे सत्य । ते केवळ भ्रांत अतिमूर्ख ॥ २५७ ॥
नित्य सर्वगत परिपूर्ण । कृष्ण अखंड दंडायमान ।
त्यासीं मजसीं वेगळेपण । सर्वथा जाण असेना ॥ २५८ ॥
‘न जायते म्रियते’ हें वचन । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण ।
त्या कृष्णासी जन्ममरण । मूर्खजन मानिती ॥ २५९ ॥
‘अक्षरं ब्रह्म परमं’ । स्वयें बोलिला पुरुषोत्तम ।
त्या कृष्णासी मरणजन्म । मूर्ख मनोधर्म कल्पिती ॥ २६० ॥
जो ‘क्षराक्षरातीत’ । ‘उत्तमपुरुष’ श्रीकृष्णनाथ ।
त्यासी जन्ममरणादि आवर्त । कल्पिती भ्रांत मनोधर्में ॥ २६१ ॥
त्या कृष्णासीं मज वेगळेपण । कल्पांतींही नाहीं जाण ।
करितां गीतार्थाचें स्मरण । आपुलें आपण पूर्णत्व देखे ॥ २६२ ॥
मी अज आद्य अचळ । मी निज नित्य निर्मळ ।
माझ्या स्वरूपा नाहीं चळ । त्रैलोक्य खेळ पैं माझा ॥ २६३ ॥
जगातें नेमिता वेद । तो निःश्वसित माझा बोध ।
मी आनंदा परमानंद । स्वानंदकंद निजांगें ॥ २६४ ॥
मी आपरूपें आप । मी प्रकृतिपुरुषांचा बाप ।
मी अवतारी अवतरें कृष्णरूप । हा सत्यसंकल्प पै माझा ॥ २६५ ॥
धरोनियां माझ्या स्वरूपाचा आधार । मीचि कृष्णीं कृष्णरूप अवतार ।
करूनि स्वलीला नानाचरित्र । अंतीं सामावें साचार मजमाजीं मीच ॥ २६६ ॥
माझ्या निजस्वरूपाचेनि बळें । मीच कृष्णरूपें खेळ खेळें ।
अंतीं मजमाजीं मी मिळें । निजात्ममेळें निजनिष्ठा ॥ २६७ ॥
एक नर एक नारायण । परस्परें तें जाण अभिन्न ।
यालागीं पूर्णत्वें अर्जुन । आपण्या आपण स्वयें देखे ॥ २६८ ॥
बाप कृपाळु कृपानिधि । उपदेशिला युद्धसंधीं ।
परी लाविली जे समाधी । ते न मोडे त्रिशुद्धी कल्पांतकाळीं ॥ २६९ ॥
नाहीं स्थानशुद्धी चोखट । सैंघ रथांचे घडघडाट ।
सुटतां शस्त्रांचे कडकडाट । लाविली निर्दुष्ट परमार्थानिष्ठा ॥ २७० ॥
कैशी लाविली समाधी । जी न मोडेच महायुद्धी ।
शेखीं कृष्णावसानावधीं । तोचि बोध उद्बोधी परिपूर्णत्वें ॥ २७१ ॥
ज्यासी गीता उपदेशी श्रीकृष्ण । त्यासी न बाणे पूर्णपण ।
ऐसें बोलतां वचन । परम दूषण वाचेसी ॥ २७२ ॥
ते वाचा गलितकुष्ठें झडे । तीसी विकल्पाचे पडती किडे ।
ते वाचाचि समूळ उडे । ‘कृष्णोक्तीं न घडे’ बोध म्हणतां ॥ २७३ ॥
‘गीताउपदेशें पूर्णपण । नव्हे’ ऐसें म्हणतां जाण ।
वाग्देवता कांपे आपण । इतरांचा कोण पडिपाडू ॥ २७४ ॥
गीता ऐके पाहे पढे । ज्यासी गीतास्मरण घडे ।
त्यासी परिपूर्णत्व स्वयें जोडे । मा उपदेशें नातुडे परिपूर्णत्व कैसें ॥ २७५ ॥
गीतार्थाचें पूर्णपण । वक्ता जाणे श्रीकृष्ण ।
कां श्रोता जाणे अर्जुन । त्यासी ते खूण बाणली ॥ २७६ ॥
सारांश काढूनि वेदार्था । श्रीकृष्णें प्रकट केली गीता ।
जेथील अभिप्रायो पाहतां । जोडे आइता निजमोक्ष ॥ २७७ ॥
परदेशी जाहला होता वेदान्त । त्यासी सहाय जाहला गीतार्थ ।
तेणें बळें मतें समस्त । जिणोनि समर्थ तो झाला ॥ २७८ ॥
कृष्णनिःश्वासीं जन्मले वेद । गीता श्रीकृष्णमुखें प्रगटली शुद्ध ।
यालागीं गीतार्थ अगाध । धडौते वेद तेणें जाहले ॥ २७९ ॥
वेदें आप्त केले तिनी वर्ण । दुरावले स्त्रीशूद्रादि जन ।
न शिवेचि त्यांचे कान । हें वेदांसी न्यूनपण पैं आलें ॥ २८० ॥
तें वेदाचें फेडावया उणें । गीता प्रगट केली श्रीकृष्णें ।
गीतेचेनि श्रवणें पठणें । उद्धरणें समस्तीं ॥ २८१ ॥
अर्जुनाचे प्रीतीकारणें । गीतार्थ प्रकाशिला श्रीकृष्णें ।
ते गीतेचेनि श्रवणें पठणें । उद्धरणें जडजीवीं ॥ २८२ ॥
असो अगाध गीतामहिमान । तेणें गीतार्थें तो अर्जुन ।
करूनि आपुलें सांत्वन । जाहला सावधान प्रकृतिस्थ ॥ २८३ ॥
बन्धूनां नष्टगोत्राणामर्जुनः सांपरायिकम् ।
हतानां कारयामास यथावदनुपूर्वशः ॥ २२ ॥
यादव निमाले कुळवंशेंसीं । गोत्रज नाहीं कर्मांतरासी ।
वज्र राहिला द्वारकेसी । ते विधी अर्जुनासी करणें पडली ॥ २८४ ॥
‘मी पावलों निष्कर्म ब्रह्म । तो मी न करीं अंत्येष्टीकर्म’ ।
ऐसा ज्ञानगर्वोपक्रम । तोही सूक्ष्म भ्रम अर्जुनीं नाहीं ॥ २८५ ॥
‘कर्मण्यकर्म यः पश्येत्’ । हा अर्जुनास बाणला पूर्णदंश ।
तेणें तो अंत्येष्टीकर्मास । स्वयें सावकाश करिता जाहला ॥ २८६ ॥
प्रथम ज्येष्ठांचें दहन । पाठीं कनिष्ठांचें जाण ।
तैसेंचि करी पिंडदान । तिळतर्पण सर्वांचें ॥ २८७ ॥
उत्तरक्रिया करूनि संपूर्ण । द्वारकेसी आला अर्जुन ।
तेथेंही वर्तलें आने आन । समुद्र दारुण क्षोभला ॥ २८८ ॥
द्वारकां हरिणा त्यक्तां समुद्रोऽप्लावयत्क्षणात् ।
वर्जयित्वा महाराज श्रीमद्भगवदालयम् ॥ २३ ॥
नित्यं सन्निहितस्तत्र भगवान् मधुसूदनः ।
स्मृत्याशेषशुभहरं सर्वमङ्गलम् ॥ २४ ॥
द्वारका सांडूनि गेला श्रीकृष्ण । तेथें समुद्र येऊनि आपण ।
बुडविली न लागतां क्षण । पळाले जन हाहाभूत ॥ २८९ ॥
द्वारका बुडविली संपूर्ण । राखिलें भगवंताचें स्थान ।
जो आला पाताळींहून । कुशनिर्दळण करावया ॥ २९० ॥
तें भगवंताचें स्थान । समुद्र न करीचि निमग्न ।
तेथें हरीचें सन्निधान । नित्य जाण स्फुरद्रूप ॥ २९१ ॥
ज्याचें करितांचि स्मरण । महापातकां निर्दळण ।
सकळ मंगळाचें आयतन । तें हरीचें स्थान उरलें असे ॥ २९२ ॥
ते द्वारकेमाजीं नित्यपूजा । अद्यापि होतसे गरुडध्वजा ।
ऐक परीक्षिती महाराजा । तें अधोक्षजाचें स्थान ॥ २९३ ॥
स्त्रीबालवृद्धानादाय हतशेषान् धनञ्जयः ।
इन्द्रप्रस्थं समावेश्य वज्रं तत्राभ्यषेचयत् ॥ २५ ॥
एवं द्वारका जालिया निमग्न । उरले बाल वृद्ध स्त्रीजन ।
त्यांसी घेऊनियां अर्जुन । निघाला आपण इंद्रप्रस्था ॥ २९४ ॥
यादव प्रभासापर्यंत । गेले ते निमाले समस्त ।
उरले जे द्वारकेआंत । वज्रादिकांसमवेत अर्जुन निघे ॥ २९५ ॥
एवं घेऊनियां समस्तांसी । पार्थ आला इंद्रप्रस्थासी ।
राज्यधर यादववंशीं । तेथ वज्रासी अभिषेकी ॥ २९६ ॥
अनिरुद्धाचा पुत्र वज्र । यादववंशीं राज्यधर ।
अभिषेकूनि अर्जुनवीर । निघे सत्वर धर्माप्रती ॥ २९७ ॥
श्रुत्वा सुहृद्वधं राजन्नर्जुनात्ते पितामहाः ।
त्वां तु वंशधरं कृत्वा जम्मुः सर्वे महापथम् ॥ २६ ॥
निजधामा गेला श्रीपती । अर्जुनें सांगतां धर्माप्रती ।
तुज राज्य देऊनि परीक्षिती । लागले महापंथीं तत्काळचि ॥ २९८ ॥
निजधामा गेला श्रीकृष्ण । ऐकतां कुंत्या वनीं सांडिला प्राण ।
द्रौपदीसहित पांचही जण । महांपथीं जाण निघाले ॥ २९९ ॥य एतद्देवदेवस्य विष्णोः कर्माणि जन्म च ।कीर्तयेत् श्रद्धयामर्त्यःसर्वपापैः प्रमुच्यते ॥ २७ ॥
देवाधिदेव सर्वेश्वर । त्याचे मत्स्यकूर्मादि अवतार ।
जन्मकर्मादि नाना चरित्र । गाती ते पवित्र पुण्यराशी ॥ ३०० ॥
तेंचि चरित्र तत्त्वतां । श्रद्धायुक्त गीतीं गातां ।
प्रयागादि समस्त तीर्थां । होय पवित्रता त्याचेनि ॥ ३०१ ॥
श्रद्धायुक्त हरिकीर्तन । त्याचे पवित्रतेसमान ।
आन नाहीं गा पावन । तुझी आण गा परीक्षिती ॥ ३०२ ॥
ते तूं ‘श्रद्धा’ कोण म्हणसी । जेवीं धनलोभी धनासी ।
गुळीं आवडी माकोड्यांसी । तैसी कीर्तनासी निज आवडी ॥ ३०३ ॥
जेवीं शिणतां काळें बहुतें । वंध्या प्रसवे एकोलतें ।
ते कळवळी जैशी त्यातें । तेवीं कीर्तनातें अतिप्रीती ॥ ३०४ ॥
जो कीर्तनाचेनि वैभवें । हरिचरित्र गावया सद्भावें ।
पतंगाच्या परी ऐसें व्हावें । ‘श्रद्धा’ त्या नांवें कुरुराया ॥ ३०५ ॥
ऐशिया श्रद्धासंपत्तीं । वर्णीतां भगवद्गुणकीर्ती ।
श्रद्धाळुवा परम प्राप्ती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ३०६ ॥
जरी आपण परमेश्वर । स्वलीला धरी नानावतार ।
तरी श्रीरामकृष्णचरित्र । अति गंभीर पावनत्वें ॥ ३०७ ॥
श्रीकृष्णाची चोरी गीतीं गातां । सुवर्णस्तेया पावनता ।
कृष्णव्यभिचार वर्णितां । गुरुतल्पगता हरी दोष ॥ ३०८ ॥
पूतनापयःपानशोषण । हें चरित्र करितां पठण ।
सुरापानादि दोष दारुण । हरती संपूर्ण विश्वासकांचे ॥ ३०९ ॥
राक्षसकुळींचा रावण । परी तो जातीचा शुद्ध ब्राह्मण ।
नित्य करी वेदपठण । ब्रह्मयाचा जाण तो पणतू ॥ ३१० ॥
त्याचें सकुळ निर्दळण । श्रीराम करी आपण ।
तें चरित्र करितां पठण । ब्रह्महत्या जाण नासती ॥ ३११ ॥
धर्मसाह्यकारी श्रीकृष्ण । केलें पांडवांचें रक्षण ।
त्या भारताचेनि श्रवणें जाण । निमाले ब्राह्मण वांचविले ॥ ३१२ ॥
अठरा ब्रह्महत्या जनमेजयासी । अठरा पर्वें सांगोनि त्यासी ।
निमाल्या उठविलें द्विजांसी । कृष्णकीर्ति ऐसी पावन ॥ ३१३ ॥
ऐकतां श्रीरामकृष्णकीर्ती । महापातकें बापुडीं किती ।
पायां लागती चारी मुक्ती । श्रद्धासंपत्ती कीर्ती गातां ॥ ३१४ ॥
श्रद्धेचिया अतिसंपत्ती । आवडीं गातां श्रीकृष्णकीर्ती ।
सहजें सायुज्यता पावती । देहस्थिती असतांही ॥ ३१५ ॥
हरिकीर्तिकीर्तन ज्याच्या ठायीं । तोही वर्ततां दिसे देहीं ।
परी देहीं ना तो हरिच्या ठायीं । हरि त्याचे हृदयीं अवघाचि ॥ ३१६ ॥
तोही अवघा हरीभीतरीं । हरि त्या सबाह्य अभ्यंतरीं ।
परीक्षिती ऐशियापरी । कीर्तिवंत संसारीं नांदती ॥ ३१७ ॥
यालागीं हरिकीर्तनापरतें । सुगम साधन नाहीं एथें ।
जे विनटले हरिकीर्तनातें । ते देहबंधातें नातळती ॥ ३१८ ॥
कृष्णकीर्तनें उजळली स्थिती । ते मैळेना कदा कल्पांतीं ।
जरी देहकर्में करिती । तरी जाहली स्थिती मैळेना ॥ ३१९ ॥
आकाश पर्जन्यें नव्हे वोलें । कां रविबिंब थिल्लरजळें ।
असोनियां तेणें मेळें । कदाकाळें तिंबेना ॥ ३२० ॥
तेवीं हरिकीर्तिकीर्तनकल्लोळें । जयाची निष्कामदशा उजळे ।
ते वर्ततां देहकर्ममेळें । देहविटाळें अलिप्त ॥ ३२१ ॥
निजभक्तांचें शरीरकर्म स्वयें चालवी पुरुषोत्तम ।
यालागीं भक्तांसी कर्मभ्रम । अधमोत्तम बाधीना ॥ ३२२ ॥
भक्तांअभक्तांची कर्मगती । भगवंत चालवी निश्चितीं ।
तेथ भक्तांची कां अलिप्तस्थिती । अभक्त कां होती अतिबद्ध ॥ ३२३ ॥
करितां श्रीकृष्णकीर्तिकीर्तन । भक्तांचा निरसे देहाभिमान ।
यालागीं ते अलिप्त जाण । अभक्तां बंधन अहंभावे ॥ ३२४ ॥
हे दशा मागितल्या पावती । ऐसें न घडे गा परीक्षिती ।
आवडीं गातां कृष्णकीर्ती । सहजें हे स्थिति ठसावे ॥ ३२५ ॥
श्रीकृष्णकीर्तिकीर्तनें । बहुतांचें संसारधरणें ।
उठविलें स्वयें श्रीकृष्णें । चरित्रपठणें तुष्टोनी ॥ ३२६ ॥
कृष्णकीर्तिकीर्तनगोडी । अहंकाराची बांदवडी फोडी ।
जीवाचें जीवबंधन तोडी । निःसीम आवडीं कीर्ति गातां ॥ ३२७ ॥
एवं कृष्णकीर्तिकीर्तनें । भक्ती ‘कृष्णपदवी’ स्वयें घेणें ।
जग उद्धरावयाकारणें । कीर्ति श्रीकृष्णें विस्तारिली ॥ ३२८ ॥
जन्मापासूनि अंतपर्यंत । श्रीकृष्णचरित्र परमाद्भुत ।
तुज म्यां सांगितले साद्यंत । परमामृत निजसार ॥ ३२९ ॥
इत्थं हरेर्भगवतो रुचिरावतार-
वीर्याणि बालचरितानि च शंतमानि ।
अन्यत्र चेह च श्रुतानि गृणन्मनुष्यो
भक्तिं परां परमहंसगतौ लभेत ॥ २८ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसाहस्त्र्यां
पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे एकत्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥
॥ समाप्त एकादशस्कंधः ॥
जन्मापासून ज्ञानघन । श्रीकृष्णचरित्र अतिपावन ।
ज्याचे संगतीं गोवळे जाण । अज्ञान जन उद्धरिले ॥ ३३० ॥
ज्याचिया व्यभिचारसंगतीं । गोपी उद्धरल्या नेणों किती ।
कृष्ण श्यामसुंदरमूर्ती । अभिलाष चित्तीं दृढ धरितां ॥ ३३१ ॥
देखोनि सुंदर कृष्ण मूर्ती । गायी वेधल्या तटस्थ ठाती ।
पशु उद्धरले कृष्णसंगतीं । मा गोपी नुद्धरती कैसेनि ॥ ३३२ ॥
गायीगोपिकांचें नवल कोण । वृंदावनींचे तृण तरुपाषाण ।
कृष्णसंगें तरले जाण । ऐसा ज्ञानघन श्रीकृष्ण ॥ ३३३ ॥
विषें भरोनियां निजस्तना । पूतना घेऊं आली प्राणा ।
तेही कृष्णसंगें जाणा । त्याच क्षणा उद्धरली ॥ ३३४ ॥
कंसशिशुपाळादिकांसी । द्वेषेंचि तारी हृषीकेशी ।
चंदन लावितां अंगासी । अंगसंगे कुब्जेसी तारिलें ॥ ३३५ ॥
उन्मत्त मदें अतिमूढ । मारूं आला कुवलयापीड ।
त्यासी मोक्षाचा सुरवाड । उद्धरिला सदृढ कृष्णाभिघातें ॥ ३३६ ॥
अरिष्ट करूं आला श्रीकृष्णालागीं । तो अरिष्ट तारिला धरूनि शिंगीं ।
अघासुरें गिळितां वेगीं । चिरोनि दो भागीं उद्धरी कृष्ण ॥ ३३७ ॥
कृष्णलक्षें लावूनि टाळी । बक ध्यानस्थ यमुनाजळीं ।
तोही श्रीकृष्णा सवेग गिळी । करूनि दोन फाळी तारिला कृष्णें ॥ ३३८ ॥
उडवूं आला तृणावर्त । त्यासी कृष्णें भवंडिला आवर्त ।
अंगसंगेंचि कृष्णनाथ । कृपावंत वैरियां ॥ ३३९ ॥
गोपाळ नेले चोरचोरूं । ठकूं आला व्योमासुरु ।
त्याचाही केला उद्धारु । मोक्षें उदारु श्रीकृष्ण ॥ ३४० ॥
केशिया कंसाचा घोडा । श्रीकृष्णें मारूनि तारिला फुडा ।
मल्ल मर्दूनि मालखडां । मोक्षाचा उघडा सुकाळ केला ॥ ३४१ ॥
काळिया नाथिला विखारु । वृक्षीं उपाडिला वत्सासुरु ।
भवाब्धीमाजीं श्रीकृष्ण तारूं । संगें उद्धारु जडमूढां ॥ ३४२ ॥
जिंहीं खेळविला चक्रपाणी । ज्यांचे घरींचें प्याला पाणी ।
ज्यांचें चोरूनि खादलें लोणी । त्याही गौळणी उद्धरिल्या ॥ ३४३ ॥
रुक्मया तारिला विटंबोनी । बाण तारिला भुजा छेदोनी ।
कुश तारिला निर्दळूनि । मोक्षदानी श्रीकृष्ण ॥ ३४४ ॥
जे जे मिनले सोयरिके । जे कां पाहूं आले कौतुके ।
ते ते तारियेले यदुनायकें । दर्शनसुखें निववूनि ॥ ३४५ ॥
पांडव तारिले पक्षपातें । वैरी तारिले शस्त्रघातें ।
यापरी श्रीकृष्णनाथें । उद्धरिलीं बहुतें निजसंगें ॥ ३४६ ॥
वैरी तारिले द्वेषभावें । भक्त पावले भजनभावें ।
गोपी तारिल्या संगानुभवें । ज्या जीवें भावें अनुसरल्या ॥ ३४७ ॥
गायी तारिल्या संरक्षणेंसीं । मयूर तारिले मोरविशीं ।
वृक्ष तारिलें तुरंबोनि घोसीं । तारक हृषीकेशी पूर्णब्रह्मत्वें ॥ ३४८ ॥
पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णावतार । ज्ञानप्राधान्य लीला विचित्र ।
त्यांत परम पावन बाळचरित्र । वंद्य सर्वत्र सज्ञानां ॥ ३४९ ॥
घेऊनि षड्गुणैश्वर्यसंपत्ती । अवतरली श्रीकृष्णमूर्ती ।
यश-श्री-औदार्य-कीर्ती । ज्ञान-वैराग्यस्थिती अभंग ॥ ३५० ॥
इतर अवतारीं अवतरण । तेथें गुप्त केले साही गुण ।
कृष्णावतार ब्रह्म परिपूर्ण । पूर्ण षड्गुण प्रकाशिले ॥ ३५१ ॥
यालागीं श्रीकृष्णावतारी जाण । अनवच्छिन्न साही गुण ।
त्याचेनि अंगसंगे उद्धरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥ ३५२ ॥
उद्धरले श्रीकृष्णसंगतीं । अथवा कृष्णाचिया अतिप्रीतीं ।
तरले देखतां श्रीकृष्णमूर्ती । हें नवल निश्चितीं नव्हे एथें ॥ ३५३ ॥
हेचि पैं गा श्रीकृष्णकीर्ती । अत्यावडीं गातां गीतीं ।
उद्धरले नेणों किती । अद्यपि उद्धरती श्रद्धाळू ॥ ३५४ ॥
आवडीं गातां श्रीकृष्णकीर्तीं । कीर्तिमंतां लाभे परम भक्ती ।
जीतें ‘परा’ ऐसें म्हणती । ते चौथी भक्ती घर रिघे ॥ ३५५ ॥
आर्तजिज्ञासु-अर्थार्थी । त्यांची सहजें राहे स्थिती ।
अखंड प्रकटे चौथी भक्ती । श्रीकृष्णकीर्ती स्वयें गातां ॥ ३५६ ॥
आवडीं गातां श्रीकृष्णकीर्ती । सहजें होय विषयविरक्ती ।
शमदमादि संपत्ती । पायां लागती सहजेंचि ॥ ३५७ ॥
श्रीकृष्णकीर्तीची जपमाळी । जो अखंड जपे जिव्हामूळीं ।
श्रीकृष्ण सर्वकाळीं । त्याजवळी सर्वदा ॥ ३५८ ॥
आदरें जपतां श्रीकृष्णकीर्ती । श्रीकृष्ण प्रकटे सर्वभूतीं ।
सहजें ठसावे चौथी भक्ती । परमात्मस्थितीसमवेत ॥ ३५९ ॥
जे भक्तीमाजीं जाण । पूज्य पूजक होय श्रीकृष्ण ।
मग पूजाविधिविधान । देवोचि आपण स्वयें होये ॥ ३६० ॥
‘अत्र गंध धूप दीप’ जाण । अवघेंचि होय श्रीकृष्ण ।
हें चौथे भक्तीचें लक्षण । आपणा आपण स्वयें भजे ॥ ३६१ ॥
चौथे भक्तीचें विंदान । भोग्य भोक्ता होय श्रीकृष्ण ।
कृष्णेंसीं वेगळेपण । भक्तां अर्धक्षण असेना ॥ ३६२ ॥
ते काळीं भक्तांसी जाण । देह गेह होय श्रीकृष्ण ।
जात गोत श्रीकृष्णचि आपण । संसार संपूर्ण श्रीकृष्ण होये ॥ ३६३ ॥
ऐशी लाहोनि चौथी भक्ती । परमहंसाची श्रीकृष्णगती ।
ते कृष्णस्वरूप स्वयें होती । श्रीकृष्णकीर्ती वर्णितां ॥ ३६४ ॥
जे स्वरूपीं नाहीं च्युती । तें कृष्णस्वरूप निश्चितीं ।
भक्त तद्रूप स्वयें होती । श्रीकृष्णकीर्ती वर्णितां ॥ ३६५ ॥
श्रीकृष्णकीर्तीचें एकेक अक्षर । चहूं वेदांचें निजजिव्हार ।
सकळ शास्त्रांचें परम सार । श्रीकृष्णचरित्र कुरुराया ॥ ३६६ ॥
जे वेदांचें जन्मस्थान । सकळ शास्त्रांचें समाधान ।
षड्दर्शनां बुझावण । तो आठवा श्रीकृष्ण पूर्णावतार ॥ ३६७ ॥
अनंत अवतार झाले जाण । परी श्रीकृष्णावतार ज्ञानघन ।
त्याचें चरित्र अतिपावन । भवबंधनच्छेदक ॥ ३६८ ॥
त्या श्रीकृष्णाची कृष्णकीर्ती । आदरें आठवितां चित्तीं ।
होय भवबंधनाची समाप्ती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ३६९ ॥
वैभव श्रीकृष्णकीर्तीसी । वैराग्य श्रीकृष्णकीर्तीपासीं ।
श्रीकृष्णकीर्ती वसे ज्यां मानसीं । ते कळिकाळासी नागवती ॥ ३७० ॥
आळसें स्मरतां कृष्णमूर्ति । सकळ पातकें भस्म होती ।
श्रीकृष्णकीर्ति जे सदा गाती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥ ३७१ ॥
श्रीकृष्णकीर्तीचें एकेक अक्षर । निर्दळी महापातकसंभार ।
मोक्ष देऊनि अतिउदार । जगदुद्धारकारक ॥ ३७२ ॥
बहु अवतारीं अवतरे देवो । परी ये अवतारींचा नवलावो ।
ज्ञानप्राधान्य लीला पहा हो । अगम्य अभिप्रावो ब्रह्मादि देवां ॥ ३७३ ॥
जन्मापासून जो जो देहाडा । तो तो नीच नवा पवाडा ।
ब्रह्मसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळ ॥ ३७४ ॥
अवतारांमाजीं श्रीकृष्ण । निजनिष्टंक ब्रह्म पूर्ण ।
त्याचें चरित्र ज्ञानघन । पठणें पावन जन होती ॥ ३७५ ॥
ऐशी पावन कृष्णकीर्ती । पढतां वाचक उद्धरती ।
श्रद्धेनें जे श्रवण करिती । तेही तरती भवसिंधु ॥ ३७६ ॥
कलियुगीं जन मंदमती । त्यांसी तरावया सुगमस्थितीं ।
श्रीकृष्ण पावन कीर्ती । कृपेनें निश्चितीं विस्तारली ॥ ३७७ ॥
ऐसि पावन भगवत्कीर्ती । विस्तारली श्रीभागवतीं ।
त्यांत दशमस्कंधाप्रती । श्रीकृष्णकीर्ती अतिगोड ॥ ३७८ ॥
उपजल्या दिवसापासूनी । चढोवढी प्रतिदिनीं ।
कीर्ती विस्तारी चक्रपाणी । दीनजनीं तरावया ॥ ३७९ ॥
धरूनी नर-नटाचा वेष । अवतरला हृषीकेश ।
तेथें नानाचरित्रविलास । दिवसेंदिवस विस्तारी ॥ ३८० ॥
त्याहिमाजीं बाळचरित्र । मधुर सुंदर अतिपवित्र ।
मालखडां जें केलें क्षात्र । परम पवित्र पावनत्वें ॥ ३८१ ॥
जरासंध पराभवून । काळयवनातें निर्दाळून ।
तें अतिविचित्र विंदान । लाघवी श्रीकृष्ण स्वयें दावी ॥ ३८२ ॥
रुक्मया रणीं विटंबून । शिशुपाळादि वीर गांजून ।
कृष्ण करी भीमकीहरण । ते परम पावन हरिलीला ॥ ३८३ ॥
पट्टमहिषींचें वरण । भौमासुराचें निर्दळण ।
पारिजाताचें हरण । पाणीग्रहण सोळासहस्रांचें ॥ ३८४ ॥
समुद्रीं वसवूनि द्वारावती । निद्रा न मोडतां निश्चितीं ।
मथुरा आणिली रातोरातीं । हे अभिनव कीर्ती कृष्णाची ॥ ३८५ ॥
वत्सें वत्सप होऊनि आपण । आपुलें दावी पूर्णपण ।
ब्रह्मदिकां न कळे जाण । अवतारी श्रीकृष्ण पूर्णांशें ॥ ३८६ ॥
खाऊनि भाजीचें पान । तृप्त केले ऋषिजन ।
ऐसीं चरित्रें ज्ञानप्राधान्य । परम पावन आचरला ॥ ३८७ ॥
ऐसी श्रीकृष्णलीला परमाद्भुत । पाठकां करी परम पुनीत ।
ते दशमामाजीं समस्त । कथा साद्यंत सांगितली ॥ ३८८ ॥
एकादशाची नवल स्थिति । मूळापासूनि परम प्राप्ती ।
ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती । स्वमुखें श्रीपती संवादला ॥ ३८९ ॥
प्रथमाध्यायीं वैराग्य पूर्ण । मुख्य अधिकाराचें लक्षण ।
नारदवसुदेवसंवाद जाण । भूमिशोधन साधकां ॥ ३९० ॥
तेथें निमिजायंतसंवादन । निर्भयाचें कोण स्थान ।
उत्तम भागवत ते कोण । मायातरण कर्म ब्रह्म ॥ ३९१ ॥
इत्यादि विदेहाचे नव प्रश्न । नवांचीं नवही उत्तरें पूर्ण ।
तेचि नव नांगरण । क्षेत्रकर्षण अतिशुद्ध ॥ ३९२ ॥
ते पंचाध्यायींच्या अंतीं । देवीं प्रार्थिला श्रीपती ।
कृष्ण कुलक्षयाच्या प्रांतीं । निजधामाप्रती निघेल ॥ ३९३ ॥
हें उद्धवें जाणोनि आपण । निर्वेद केला जो संपूर्ण ।
तेचि कल्पनाकाशाचें निर्दळण । पालव्या छेदन विकल्पांच्या ॥ ३९४ ॥
कामलोभांचे गुप्त खुंट । आडवूं लागले उद्भट ।
ते समूळ केले सपाट । अतितिखट अनुतापें ॥ ३९५ ॥
क्रोधाचिया अतिजाडी । समूळ उपडिल्या महापेडी ।
शांति निवडक चोखडी । समूळ उपडी मूळेंसीं ॥ ३९६ ॥
उद्धवचातकआर्तिहरण । वोळला श्रीकृष्ण कृपा-घन ।
क्षेत्र वोल्हावलें सबाह्य पूर्ण । लागली संपूर्ण निजबोधवाफ ॥ ३९७ ॥
तेथें पूर्णब्रह्म निजबीज । चाडें तंतु सर्व परित्यज्य ।
श्रवणनळें अधोक्षज । पेरिलेंचि सहज स्वयें पेरी ॥ ३९८ ॥
यदुअवधूतसंवादस्थिती । चोविसां गुरूंची उपपत्ती ।
आगडु खणविला क्षेत्राप्रती । वोढाल पुढती रिघों न शके ॥ ३९९ ॥
चिकभरित जाहल्या पिकातें । भोरड्या वोरबडिती तेथें ।
ते दशमाध्यायीं श्रीअनंतें । उडविलीं मतें भजनगोफणा ॥ ४०० ॥
अकरावे अध्यायीं जाणा । हुरडा ओंब्या आणि घोळाणा ।
तिळगुळेंसीं चाखविलें सुजाणां । मुक्तलक्षणांचेनि हातें ॥ ४०१ ॥
ते श्रीयेचे भोक्ते एथ । सत्संगतीं भगवद्भक्त ।
ते बारावे अध्यायीं साद्यंत । कृपायुक्त सांगितले ॥ ४०२ ॥
विषयांची विषयावस्था । बाधक नोहे साधकांच्या चित्ता ।
तेचि त्रयोदशीं कथा । जाण तत्त्वतां सांगितली ॥ ४०३ ॥
एवं तेराव्या अध्यायाप्रती । जाहली पिकाची पूर्ण निष्पत्ती ।
तेचि हंसगीतउपपत्ती । समाधि श्रीपती सांगोनि गेला ॥ ४०४ ॥
समाधीं सांठवलें जें पीक । तें कैसेनि पावती साधक ।
तदर्थीं भजनपूर्वक । चौदावा देख निरूपिला ॥ ४०५ ॥
पीक चढतचढतां हातीं । माझारीं ऋद्धिसिद्धी झडपोनि नेतीं ।
ते सिद्धित्यागाची उपपत्ती । पंधराव्याप्रती दाविली ॥ ४०६ ॥
पीक न माये त्रिजगतीं । तरी त्याच्या सांठवणा किती ।
त्या षोडशाध्यायीं विभूती । उद्देशें श्रीपती दावूनि गेला ॥ ४०७ ॥
क्षेत्र अधिकारी एथें जाण । चारी आश्रम चारी वर्ण ।
सतरावा अठरावा निरूपण । वांटे संपूर्ण विभागिले ॥ ४०८ ॥
एकूणिसाव्या अध्यायीं जाण । करूनि पिकाची संवगण ।
जेणें कोंडेनि वाढले कण । तो कोंडा सांडूनि जाण कण घ्यावे ॥ ४०९ ॥
ऐसे निवडिले जे शुद्ध कण । तेथें प्राप्यप्राप्तीचें लक्षण ।
त्रिविधविभागनिरूपण । विसावा जाण निरूपिला ॥ ४१० ॥
जे भागा आले शुद्ध कण । ते राखावे आपले आपण ।
गुणदोषांचे चोरटे जाण । खळें फोडून कण नेती ॥ ४११ ॥
सर्वांच्या भागा येताती कण । परी खावों न लाहती चोरा भेण ।
थोर थोर नागविले जाण । यालागीं संरक्षण दृढ कीजे ॥ ४१२ ॥
गुणदोषांचीं नवलकथा । मिळणीं मिळोनि आप्तता ।
ठकूनि नेति सर्वस्वतां । दाणाही हातां नेदिती येवों ॥ ४१३ ॥
गुणदोष आतुर्बळी । सज्ञानातें तत्काळ छळी ।
जो गुणदोषांतें निर्दळी । तो महाबळी तिहीं लोकीं ॥ ४१४ ॥
हे शिकवण उद्धवें ऐकतां । तो म्हणे चोरांचा प्रतिपाळिता ।
तुझा वेदचि गा तत्त्वतां । गुणदोषप्रबळता त्याचेनि अंगें ॥ ४१५ ॥
मुख्य चोरांचा कुरुठा । तुझा वेदचि महाखाटा ।
त्यामाजीं गुणदोषाचा घरटा । नाना चेष्टा तो शिकवी ॥ ४१६ ॥
एंव प्रतिपाळोनि गुणदोषांसी । वेद नागवी समस्तांसी ।
एवं उद्धवें वेदांच्या शिसीं । कुडेपणासी स्थापिलें ॥ ४१७ ॥
तो वेदानुवाद नव्हे कुडा । ऐसा प्रतिपदीं दिधला झाडा ।
ते निरूपणीं अति चोखडा । अध्याय रोकडा एकविसावा ॥ ४१८ ॥
चोर कोणे मार्गे येती । पिकलें पीक ज्या वाटां नेती ।
तो मार्ग बुजावया निश्चितीं । तत्त्वसंख्याउपपत्ती बाविसावा ॥ ४१९ ॥
मुख्यत्वें ज्ञानाचें संरक्षण । दृढ शांतीचें कारण ।
तें भिक्षुगीतनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगोनि गेला ॥ ४२० ॥
मुख्य चोरांचें चोरटेपण । मनापाशीं असे जाण ।
तें मनोजयाचें लक्षण । भिक्षुगीतनिरूपण तेविसावा ॥ ४२१ ॥
चोर जन्मती जिचे पोटीं । ते मुख्यत्वें प्रकृति खोटी ।
पिकल्या पिका करूनि लुटी । लपती शेवटीं तीमाजीं ॥ ४२२ ॥
आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें मिथ्या प्रकृतीसीं त्रिगुण ।
हें मुख्य पिकाचें संरक्षण । केलें निरूपण चोविसावा ॥ ४२३ ॥
मोकळें पीक असतां शेतीं । पशु पक्षी चोर रिघों ने शकती ।
ते सहज संरक्षणउपपत्ती । निर्गुणोक्तीं पंचविसावा ॥ ४२४ ॥
स्त्रीकामाची धाडी जाण । सकळ पिकासी नागवण ।
पुरूरवा नागवला आपण । इतरांचा कोण पडिपाडू ॥ ४२५ ॥
कामासक्ति करितां जाण । प्रमदाबंदीं पडिले पूर्ण ।
त्यांसी अनुताप करी सोडवण । हें केलें निरूपण सव्विसावां ॥ ४२६ ॥
निकोप पीक लागल्या हातीं । त्याची करावया निष्पत्ती ।
क्रियायोगाची निजस्थिती । सत्ताविसाव्याप्रती प्रकाशिली ॥ ४२७ ॥
एवं पीक भोगिलें सकळ । त्याचा परिपाक पक्वान्न सबळ ।
अठ्ठाविसावा अमृतफळ । अतिरसाळ निजगोड्या ॥ ४२८ ॥
मृदु मधुर अतिअरुवार । तेणें वासेंचि निवे जेवणार ।
त्याचा सेवितां ग्रासमात्र । सबाह्यअभ्यंतर नित्यतृप्ती ॥ ४२९ ॥
आकांक्षेसी निवाली भूक । सुखावरी लोळे तृप्तिसुख ।
तो हा अठ्ठाविसावा देख । अलोकिक निजगोड्या ॥ ४३० ॥
अठ्ठाविसाव्याची निजगोडी । चाखाया अतिआवडीं ।
ब्रह्मादिकां अवस्था गाढी । चवी चोखडी अनुपम ॥ ४३१ ॥
हें जीव्हेवीण जेवण । रसनेवीण गोडपण ।
अदंताचे दांत पाडूनि पूर्ण । आपुली आपण चवी चाखें ॥ ४३२ ॥
श्रीकृष्णें परवडी ऐशी । ताट केलें उद्धवासी ।
एका जनार्दनचरणींची माशी । सुखें त्या रसासी स्वयें सेवी ॥ ४३३ ॥
जेथ रिगमु नाहीं थोरथोरांसी । तेथें सुखेंचि रिघे माशी ।
एवं धाकुटे जे होती सर्वांशीं । कृष्णरस त्यांसी सुसेव्य ॥ ४३४ ॥
अगम्य योगें योगभांडार । गुह्यज्ञानें ज्ञानगंभीर ।
परम सुखाचें सुखसार । अतिगंभीर अठ्ठाविसावा ॥ ४३५ ॥
या जेवणीं जे धाले नर । त्यांचे तृप्तीचे सुखोद्गार ।
तो एकूणतिसावा सधर । अतिविचित्र निरूपण ॥ ४३६ ॥
एकूणतिसाव्याची स्थिती । दृढ आकळली होय हातीं ।
तैं सकळ भागवताची गती । ये धांवती तयापाशीं ॥ ४३७ ॥
एकूणतिसावा अध्यावो । साध्यसाधना एकात्मभावो ।
निर्दळोनि अहंभावो । परमानंदें पहा हो उद्गार देत ॥ ४३८ ॥
सकळ भोजनां मंडण । तांबूल आणि चंदन ।
तो तिसावा एकतिसावा जाण । श्रीकृष्णनिर्याण निजबोधु ॥ ४३९ ॥
येणें भोजनें जे नित्य तृप्त । त्यांसी ममताबाध नव्हे प्राप्त ।
सकळ कुळ निर्दळूनि एथ । निजधामा निश्चित हरि गेला ॥ ४४० ॥
पूर्ण ब्रह्मानुभव ज्यासी । एथवरी ममता नसावी त्यासी ।
हें स्वांगें दावूनि हृषीकेशी । निजधामासी स्वयें गेला ॥ ४४१ ॥
श्रीभागवत महाक्षेत्र । तेथें ब्रह्मा मुख्य बीजधर ।
नारद तेथें मिरासीकर । पेरणी विचित्र तेणें केली ॥ ४४२ ॥
तेथें श्रीव्यासें अतिशुद्ध । बांधारे घातले दशविध ।
पीक पिकलें अगाध । स्वानंदबोध निडारे ॥ ४४३ ॥
तेथ शुक बैसला सोंकारा । तेणें फोडिला हरिकथापागोरा ।
पापपक्ष्यांचा थारा । उडविला पुरा निःशेष ॥ ४४४ ॥
त्याची एकादशीं जाण । उद्धवें केली संवगण ।
काढिले निडाराचे कण । अतिसघन कृष्णोक्तीं ॥ ४४५ ॥
तेथ नानायुक्तिपडिपाडीं । उत्तमोत्तम प्रश्नपरवडी ।
केलीं पक्वान्नें चोखडीं । त्यांची नीच नवी गोडी अविनाशी ॥ ४४६ ॥
ते अविनाशी निजगोडी । पदोपदीं अतिचोखडी ।
एकादशामाजीं रोकडी । उद्धवाचिये जोडी उपकार जगा ॥ ४४७ ॥
त्या उद्धवाचे मागिले पंक्तीं । त्यक्तोदक श्रवणार्थीं ।
शुकमुखें परीक्षिती । निजात्मतृप्तीं निमाला ॥ ४४८ ॥
त्या समर्थाचिये पंक्तीं । भावार्थदीपिका धरोनि हातीं ।
श्रीधरें दावितां पदपदार्थीं । निजात्मस्थितीं निवाला ॥ ४४९ ॥
तेथ देशभाषा-पदपक्षेंसीं । एका जनार्दनकृपेची माशी ।
तृप्त होय अवघ्यासरशीं । निषेध तिशी असेना ॥ ४५० ॥
एका-जनार्दनी मांजर वेडें । भावार्थदीपिकाउजियेडें ।
हे रस देखोनि चोखडे । ताटापुढें पैं आलें ॥ ४५१ ॥
‘मीयों मीयों’ करितां स्मरण । कृपेनें तुष्टले सज्जन ।
शेष प्रसाद देऊनि जाण । संतृप्त पूर्ण मज केलें ॥ ४५२ ॥
एका जनार्दनाचें पोसणें । मी मांजर जाहलों नीचपणें ।
चाटितां संतांचें शेषभाणें । म्यां तृप्ती पावणें परिपूर्ण ॥ ४५३ ॥
हो कां त्या समर्थांच्या ताटीं । ब्रह्मरसें पूर्ण भरली वाटी ।
ते मी अत्यंत प्रेमें चाटीं । स्वानंदपुष्टीं संतोषें ॥ ४५४ ॥
जो काया मनें आणि वाचा । सद्भावें विनीत होय नीचा ।
तोचि अधिकारी एकादशाचा । हा जनार्दनाचा उपदेश ॥ ४५५ ॥
जंव जंव देहीं ज्ञानाभिमान । जंव जंव योग्यता सन्मान ।
तंव तंव एकादशाचें ज्ञान । सर्वथा जाण अनोळख ॥ ४५६ ॥
सर्वभूतीं भगवद्भजन । सद्भावें जंव नुपजे पूर्ण ।
तंववरी एकादशाचें ज्ञान । सर्वथा जाण कळेना ॥ ४५७ ॥
यापरी श्रीभागवतक्षेत्र । पीक पिकलें परम पवित्र ।
तेथें सुखी होती साधक नर । ज्यांसी अत्यादर सर्वभूतीं ॥ ४५८ ॥
एकादश क्षेत्र नव्हे जाण । हा चित्समुद्र परिपूर्ण ।
येथें जो जैसा होय निमग्न । तो तैसाचि आपण रत्नें लाभे ॥ ४५९ ॥
हा एकादश नव्हे निर्धारीं । जीवगजेंद्राच्या उद्धारीं ।
सवेगवेगें पावला श्रीहरी । ज्ञानचक्र करीं घेऊनी ॥ ४६० ॥
हेही नव्हे एकादशाची थोरी । अहं-हिरण्यकशिपू विदारी ।
तो हा प्रकाटला नरहरी । भक्तकैवारी कृपापूर्ण ॥ ४६१ ॥
गंगा यमुना दोनी साङ्ग । कृष्ण उद्धव उत्तम चांग ।
गुप्त सरस्वती ज्ञानवोघ । त्रिवेणी-प्रयाग एकादश ॥ ४६२ ॥
तेथ वैराग्य-माघमासीं जाण । श्रद्धाअरुणोदयीं नित्य स्नान ।
करितां होऊनि पावन । कृष्णपदवी पूर्ण पावती ॥ ४६३ ॥
हेही एकादशाची नव्हे कोटी । कृष्णउद्धवांची गुह्य गोष्टी ।
हे बहुकल्प कपिलाषष्ठी । पर्वणी गोमटी निजसाधकां ॥ ४६४ ॥
ते पर्वकाळीं जे निमग्न । ते तत्काळ पावती कल्याण ।
बाधूं न शके जन्ममरण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ ४६५ ॥
हा एकादश नव्हे जाण । एकतिसां खणांचें वृंदावन ।
एथ नित्य वसे श्रीकृष्ण । स्वानंदपूर्ण निजसत्ता ॥ ४६६ ॥
एथ पंध्राशतें श्लोक । तेचि पानें अत्यंत चोख ।
माजीं ज्ञानमंजरीचे घोख । अतिसुरेख शोभती ॥ ४६७ ॥
तेथ जे घालिती निजजीवन । ते होती परम पावन ।
स्वयें ठाकती कृष्णसदन । ब्रह्म परिपूर्ण स्वानंदें ॥ ४६८ ॥
जे वंदिती मुळींच्या उदका । जे लाविती मूळमृत्तिका ।
ते वंद्य होती तिहीं लोकां । नित्य निजसखा श्रीकृष्ण जोडे ॥ ४६९ ॥
जे पठणरूपें जाणा । प्रत्यगावृत्ति प्रदक्षिणा ।
सद्भावें करिती सुजाणा । ते श्रीकृष्णचरणां विनटती ॥ ४७० ॥
ये कथेच्या विचित्र लीला । जे नित्य घालिती रंगमाळा ।
ते नागवती कळिकाळा । सदा त्यांजवळा श्रीकृष्ण ॥ ४७१ ॥
हें एकादशाचें वृंदावन । जो श्रवणें करी नित्य पूजन ।
त्यासी प्रसन्न होऊनि श्रीकृष्ण । देहाभिमान निर्दळी ॥ ४७२ ॥
तेथ मननाची पुष्पांजळी । जो अनुदिनीं अर्पी त्रिकाळीं ।
तोही पावे हरिजवळी । निजात्ममेळीं निजनिष्ठा ॥ ४७३ ॥
हें श्रीभागवत-वृंदावन । मेळवूनि संत सज्जन ।
ये कथेचें करी जो व्याख्यान । तें महापूजन निरपेक्ष ॥ ४७४ ॥
हें देखूनि महापूजन । संतोषे श्रीजनार्दन ।
श्रोते वक्ते जे सावधन । त्यांसी निजात्मज्ञान स्वयें देत ॥ ४७५ ॥
श्रवणें पठणें मननें । अर्थावबोधव्याख्यानें ।
एकादशें समान देणें । जाणें तानें त्या नाहीं ॥ ४७६ ॥
श्रवण मनन नव्हे पठण । तरी एकादशाचें पुस्तक जाण ।
ब्राह्मणासी द्यावें दान । विवेकज्ञान तेणें उपजे ॥ ४७७ ॥
एकादश द्यावें दान । करावें एकादशाचें पूजन ।
करितां एकादशाचें स्मरण । पाप संपूर्ण निर्दळे ॥ ४७८ ॥
एकादशसंग्रह जो करी । श्रीकृष्ण तिष्ठे त्याचे घरीं ।
जो एकादशाची श्रद्धा धरी । ज्ञान त्यामाझारीं स्वयें रिघे ॥ ४७९ ॥
श्लोक श्लोकार्ध पादमात्र । नित्य स्मरे ज्याचें वक्त्र ।
तोही होय परम पवित्र । अतिउदार एकादश ॥ ४८० ॥
अवचटें जातां कार्यांतरीं । दृष्टी पडे एकादशावरी ।
तैं पातकां होय रानभरी । आपधाकें दूरी तीं पळती ॥ ४८१ ॥
तो एकादश ज्याचे करीं । देव वंदिती त्यातें शिरीं ।
तो निजांगें जग उद्धरी । एवढी थोरी एकादशा ॥ ४८२ ॥
सकळ पुराणांमाझारीं । हा एकादश वनकेसरी ।
भवगजातें विदारी । क्षणामाझारीं श्लोकार्धें ॥ ४८३ ॥
‘मामेकमेव शरणं’ । याचि श्लोकाचें करितां पठण ।
मायेचा गळा धरोनि जाण । अपधाकें पूर्ण संसार निमे ॥ ४८४ ॥
‘निरपेक्षं मुनिं शांतं’ । हा श्लोक चढे जैं हात ।
तैं सेवकां सेवी श्रीकृष्णनाथ । भवभय तेथ उरे कैंचें ॥ ४८५ ॥
एकादशाचा एकेक श्लोक । होय भवबंधच्छेदक ।
जेथ वक्ता यदुनायक । तेथ हा विशेख म्हणों नये ॥ ४८६ ॥
श्रीभागवतामाजीं जाण । एकादश मोक्षाचें स्थान ।
यालागीं श्लोकार्धमात्रें परिपूर्ण । भवबंधन निर्दळी ॥ ४८७ ॥
श्रीकृष्ण वेदांचें जन्मस्थान । त्याचे मुखींचें हें निरूपण ।
तेथें सकळ वेदार्थ जाण । माहेरा आपण स्वयें येती ॥ ४८८ ॥
यालागीं एकादशीं वेदार्थ । माहेरीं सुखावले समस्त ।
ते साधकासी परमार्थ । स्वानंद देत संपूर्ण ॥ ४८९ ॥
मंथोनि वेदशास्त्रार्थ । व्यासें केलें महाभारत ।
त्या भारताचा मथितार्थ । श्रीभागवत-हरिलीला ॥ ४९० ॥
त्या भागवताचा सारांश । तो हा जाण एकादश ।
तेथ वक्ता स्वयें हृषीकेश । परब्रह्मरस प्रबोधी ॥ ४९१ ॥
भागवतामाजीं एकादश । जैसा यतींमाजीं परमहंस ।
का देवांमाजीं जगन्निवास । तैसा एकादश अति वंद्य ॥ ४९२ ॥
पक्ष्यांमाजीं राजहंस । रसांमाजीं सिद्धरस ।
तैसा भागवतामाजीं एकादश । परम सुरस स्वानंदें ॥ ४९३ ॥
तीर्थ क्षेत्र वाराणसी । पावनत्वें गंगा जैशी ।
जीवोद्धारीं एकादशी । महिमा तैसी अनिर्वाच्या ॥ ४९४ ॥
त्या एकादशाची टीका ॥ जनार्दनकृपा करी एका ।
तो एकत्वाच्या निजसुखा । फळे भाविका सद्भावें ॥ ४९५ ॥
धरोनि बालकाचा हातु । बाप अक्षरें स्वयें लिहिवितु ।
तैसा एकादशांचा अर्थु । बोलविला परमार्थु जनार्दनें ॥ ४९६ ॥
कैसा चालवावा ग्रंथ । केवीं राखावा पदपदार्थ ।
ये व्युत्पत्तीची नेणें मी मात । बोलवी समर्थ जनार्दन ॥ ४९७ ॥
जनार्दनें नवल केलें । मज मूर्खाहातीं ज्ञान बोलविलें ।
ग्रंथीं परमार्थरूप आणिलें । वाखाणविलें एकादशा ॥ ४९८ ॥
एकादशाचा पदपदार्थ । शास्त्रवक्त्यां अतिगूढार्थ ।
तोही वाखाणविला परमार्थ । कृपाळु समर्थ जी जनार्दन ॥ ४९९ ॥
जनार्दनें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें ।
मग परमार्था अर्थविलें । बोलवूनि बोलें निजसत्ता ॥ ५०० ॥
खांबसूत्राचीं बाहुलीं । सूत्रधार नाचवी भलीं ।
तेवीं ग्रंथार्थाची बोली । बोलविली श्रीजनार्दनें ॥ ५०१ ॥
अवघा श्रीजनार्दनचि देखा । तोचि आडनांवें जाहला ‘एका’ ।
तेणें नांवें ग्रंथ नेटका । अर्थूनि सात्त्विकां तत्त्वार्थ दावी ॥ ५०२ ॥
कवित्वीं घातलें माझें नांव । शेखीं नांवाचा नुरवी ठाव ।
ऐसें जनार्दनवैभव । अतिअभिनव अलोलिक ॥ ५०३ ॥
ग्रंथ देखोनियां सज्ञान । म्हणती ज्ञाता एका जनार्दन ।
जवळीं जाहलिया दर्शन । मूर्ख संपूर्ण मानिती ॥ ५०४ ॥
एका जनार्दनाचा वृत्तांत । एक म्हणती ‘भला भक्त ।
एक म्हणती जीवन्मुक्त । प्रपंची निश्चित मानिती एक ॥ ५०५ ॥
अहो हा एका जनार्दन । नाहीं आसन न देखे ध्यान ।
मंत्र मुद्रा माळा जपन । उपासकलक्षण या नाहीं ॥ ५०६ ॥
कोण मंत्र असे यासी । काय उपदेशी शिष्यांसी ।
हें कळों नेदी कोणासी । भुललीं भाविकें त्यासी अतिभावार्थें ॥ ५०७ ॥
नुसत्या हरिनामाचे घोष । लावूनि भुलविले येणें लोक’ ।
ऐसें नाना विकल्प अनेक । जनार्दन देख उपजवी स्वयें ॥ ५०८ ॥
मी जेथ झाडा देऊं जायें । तें बोलणें जनार्दनचि होये ।
युक्तिप्रयुक्तीचें पाहें । मीपण न राहे मजमाजीं ॥ ५०९ ॥
एवं माझें मीपण समूळीं । श्रीजनार्दन स्वयें गिळी ।
आतां माझी हाले जे अंगुळी । ते ते क्रिया चाळी श्रीजनार्दन ॥ ५१० ॥
निमेषोन्मेषांचे संचार । श्वासोच्छ्वासांचें परिचार ।
सकळ इंद्रियांचा व्यापार । चाळिता साचार श्रीजनार्दन ॥ ५११ ॥
जेथ मी म्हणों जाये कविता । ते जनार्दनचि होय तत्त्वतां ।
माझें मीपण धरावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥ ५१२ ॥
माझें जें कां मीपण । जनार्दन जाहला आपण ।
एका जनार्दना शरण । ग्रंथ संपूर्ण तेणें केला ॥ ५१३ ॥
हेही बोल बोलतां जाण । खुणा वारी जनार्दन ।
झाडा सूचितां संपूर्ण । वेगळेंपण अंगीं लागे ॥ ५१४ ॥
आतां वेगळा अथवा एक । अवघा जनार्दन स्वयें देख ।
तेणें ग्रंथार्थाचे लेख । अत्यंत चोख विस्तारिले ॥ ५१५ ॥
ग्रंथ देशभाषा व्युत्पत्ती । म्हणोनि नुपेक्षावा पंडितीं ।
अर्थ पहावा यथार्थीं । परमात्मस्थिती निजनिष्ठा ॥ ५१६ ॥
जरी संस्कृत ग्रंथ पूर्ण । तरी देशभाषाव्याख्यान ।
मा हें आयतें निरूपण । साधक सज्ञान नुपेक्षिती ॥ ५१७ ॥
जे या ग्रंथा आदर करिती । अथवा जे कां उपेक्षिती ।
केवळ जे कोणी निंदिती । तेही आम्हां ब्रह्ममूर्ति सद्गुरुरूपें ॥ ५१८ ॥
हेंचि शिकविलें जनार्दनें । सर्व भूतीं मजचि पाहणें ।
प्रकृतिगुणांचीं लक्षणें । सर्वथा आपणें न मानावीं ॥ ५१९ ॥
शिष्याचे क्षोभ न साहवती । निंदकांची निंदा न जिरे चित्तीं ।
तैं तो कोरडाचि परमार्थीं । क्षोभें निश्चितीं नागविला ॥ ५२० ॥
एवं पराचे प्रकृतिगुण । पाहतां सर्वथा क्षोभे मन ।
ते न पहावे आपण । सर्वभूतीं चैतन्य समत्वें पहावें ॥ ५२१ ॥
येचि उपदेशीं अत्यादर । जनार्दनें केला थोर ।
यावेगळा भवाब्धिपार । सज्ञान नर पावों न शके ॥ ५२२ ॥
येणें निर्धारे गुरु तो गुरु । आम्हां शिष्य तोही संवादगुरु ।
निंदक तो परम गुरु । निपराद सद्गुरु जनार्दनकृपा ॥ ५२३ ॥
जनार्दनकृपा एथें । गुरूवेगळें नुरेचि रितें ।
मीपणासहित सकळ भूतें । गुरुत्वा निश्चितें आणिली तेणें ॥ ५२४ ॥
तेणेंचि हे ग्रंथकथा । सिद्धी पावविली परमार्था ।
माझे गांठीची नव्हे योग्यता । हें जाणितलें श्रोतां ग्रंथारंभीं ॥ ५२५ ॥
ग्रंथारंभ प्रतिष्ठानीं । तेथ पंचाध्यायी संपादूनि ।
उत्तर ग्रंथाची करणी । आनंदवनीं विस्तारिली ॥ ५२६ ॥
‘अविमुक्त’ ‘महाश्मशान’ । ‘वाराणसी’ ‘आनंदवन’ ।
एकासीचि नांवें जाण । ऐका लक्षण त्याचेंही ॥ ५२७ ॥
अतिशयें जेथें मुक्ती । अधमोत्तमां एकचि गति ।
पुढती नाहीं पुनरावृत्ती । ‘अविमुक्त’ म्हणती या हेतू ॥ ५२८ ॥
जे श्मशानीं सांडिल्या प्राण । प्राणी पुढें न देखे मसण ।
यालागीं हें ‘महाश्मशान’ । अंतीं ब्रह्मज्ञान शिव सांगे ॥ ५२९ ॥
मर्यादा श्वेत ‘वरुणा’ ‘अशी’ । मध्यें नांदे पंचक्रोशी ।
रिगम नाहीं पातकांसी । यालागीं ‘वाराणसी’ म्हणीपें इतें ॥ ५३० ॥
‘वरुणा’ पातकांतें वारी । ‘अशी’ महादोष संहारी ।
मध्यें विश्वेश्वराची नगरी । ‘वाराणसी’ खरी या हेतु ॥ ५३१ ॥
जें विश्वेश्वराचें क्रीडास्थान । जेथ स्वानंदें शिव क्रीडे आपण ।
यालागीं तें आनंदवन । ज्यालागीं मरण अमर वांछिती ॥ ५३२ ॥
जेथें जितां सदन्नें भुक्ती । मेल्यामागें अचुक मुक्ती ।
यालागीं ‘आनंदवन’ म्हणती । पार्वतीप्रती सदाशिव सांगे ॥ ५३३ ॥
तया वाराणसी मुक्तिक्षेत्रीं । मणिकर्णिकामहातीरीं ।
पंचमुद्रापीठामाझारीं । एकादशावरी टीका केली ॥ ५३४ ॥
ऐकतां संतोषले सज्जन । स्वानंदें तुष्टला जनार्दन ।
पंचाध्यायी संपतां जाण । स्वमुखें आपण वरद वदला ॥ ५३५ ॥
ग्रंथ सिद्धी पावेल यथार्थीं । येणें सज्ञानहीं सुखी होती ।
मुमुक्षु परमार्थ पावती । साधक तरती भवसिंधु ॥ ५३६ ॥
भाळेभोळे विषयी जन । याचें करितां श्रवण पठण ।
ते हरिभक्त होती जाण । सन्मार्गी पूर्ण बहुत होती ॥ ५३७ ॥
‘हे टीका तरी मराठी । परी ज्ञानदानें होईल लाठी’ ।
ऐसी निजमुखीं बोलोनि गोठी । कृपादृष्टीं पाहिलें ॥ ५३८ ॥
तेथ म्यां ही केली विनंती । ‘जे ये ग्रंथीं अर्थार्थी होती ।
त्यांसी ब्रह्मभावें ब्राह्मणीं भक्ती । नामीं प्रीतीं अखंड द्यावी ॥ ५३९ ॥
ते न व्हावे ब्रह्मद्वेषी । निंदा नातळावी त्यांसी ।
समूळ क्षय ब्रह्मद्वेषेंसीं । निंदेपासीं सकळ पापें’ ॥ ५४० ॥
ऐसी ऐकतां विनवण । कृपेनें तुष्टला श्रीजनार्दन ।
जें जें मागितलें तें तें संपूर्ण । वरद आपण स्वयें वदला ॥ ५४१ ॥
ये ग्रंथी ज्या अत्यंत भक्ती । निंदाद्वेष न रिघे त्याचे चित्तीं ।
श्रीरामनामीं अतिप्रीती । सुनिश्चितीं वाढेल ॥ ५४२ ॥
अविद्य सुविद्य व्युत्पत्ती । न करितां ब्राह्मणजातीं ।
ब्रह्मभावें होईल भक्ती । तेणें ब्रह्मप्राप्ती अचूक ॥ ५४३ ॥
नामापरता साधकां सद्भावो । नाहीं ब्राह्मणापरता आन देवो ।
तो ये ग्रंथीं भजनभावो । नीच नवा पहा हो वाढेल ॥ ५४४ ॥
ऐसें देवोनि वरदान । हृदयीं आलिंगी जनार्दन ।
म्हणे ये ग्रंथीं जया भजन । त्याचें भवबंधन मी छेदीं ॥ ५४५ ॥
हेही अलंकारपदवी । स्वयें जनार्दनचि वदवी ।
एवं कृपा केली जनार्दनदेवीं । हे ठेवाठेवी मी नेणें ॥ ५४६ ॥
थोर भाग्यें मी पुरता । पूर्ण कृपा केली समस्त श्रोतां ।
समूळ सांभाळिले ग्रंथार्था । अर्थपरमार्था समसाम्यें ॥ ५४७ ॥
पुढें या ग्रंथाचें व्याख्यान । जेथ होईल कथाकथन ।
तेथ द्यावें अवधान । हें प्रार्थन दीनाचें ॥ ५४८ ॥
हे ऐकोनि प्रार्थन । संतोषले श्रोतेसज्जन ।
हे कथा आमुचें निजजीवन । जेथ व्याख्यान तेथ आम्ही ॥ ५४९ ॥
ऐसे संतुष्टले श्रोतेजन । वरदें तुष्टला श्रीजनार्दन ।
एका जनार्दन शरण । ग्रंथ संपूर्ण तेणें जाहला ॥ ५५० ॥
वाराणसी महामुक्तिक्षेत्र । विक्रमशक ‘वृष’ संवत्सर ।
शके सोळाशें तीसोत्तर । टीका एकाकार जनार्दनकृपा ॥ ५५१ ॥
महामंगळ कार्तिकमासीं । शुक्ल पक्ष पौर्णीमेसी ।
सोमवारशिवयोगेंसी । टीका एकादशी समाप्त केली ॥ ५५२ ॥
स्वदेशींचा शक संवत्सर । दंडकारण्य श्रीरामक्षेत्र ।
प्रतिष्ठान गोदातीर । तेथील उच्चार तो ऐका ॥ ५५३ ॥
शालिवाहनशकवैभव । संख्या चौदाशें पंचाण्णव ।
‘श्रीमुख’ संवत्सराचें नांव । टीका अपूर्व तैं जाहली ॥ ५५४ ॥
एवं एकादशाची टीका । जनार्दनकृपा करी एका ।
ते हे उभयदेशाआवांका । लिहिला नेटका शकसंवत्सर ॥ ५५५ ॥
पंध्राशतें श्लोक सुरस । एकतीस अध्याय ज्ञानरहस्य ।
स्वमुखें बोलिला हृषीकेश । एकाकी एकादश दुजेनिवीण ॥ ५५६ ॥
एकादश म्हणजे एक एक । तेथ दुजेपणाचा न रिघे अंक ।
तेंचि एकादश इंद्रियीं सुख । एकत्वीं अलोलिक निडारलें पूर्ण ॥ ५५७ ॥
त्या एकादशाची टीका । एकरसें करी एका ।
त्या एकत्वाच्या निजसुखा । फळेल साधकां जनार्दनकृपा ॥ ५५८ ॥
हा ज्ञानग्रंथ चिद्रत्न । यथार्थ अर्थिला संपूर्ण ।
माझेनि नांवें श्रीजनार्दन । ग्रंथकर्ता आपण स्वयें जाहला ॥ ५५९ ॥
एका जनार्दना शरण । जनार्दना पढियें एकपण ।
जेवीं कां सूर्याचे किरण । सूर्यतेजें पूर्ण निरसी तम ॥ ५६० ॥
तेवीं श्रीजनार्दन तेजें जाण । प्रकाशलें एकपण ।
तेणें प्रकाशें ग्रंथ संपूर्ण । जनार्दनार्पण एकपणेंसीं ॥ ५६१ ॥
‘जन जनार्दन एक’ । जाणे तो सुटला निःशेख ।
हेंचि नेणोनियां लोक । गुंतले अनेक निजात्मभ्रमें ॥ ५६२ ॥
इति श्रीभागवते महापुराणे परमहंससंहितायां
एकादशस्कंधे श्रीकृष्णउद्धवसंवादे एकाकारटीकायां
‘मौसलोपाख्यानं’ नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥