तीर्थक्षेत्र
dagadi-matha-pathardi
|| तीर्थक्षेत्र ||
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा संत महात्म्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथांची आणि श्री कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे वसलेली आहे. तसेच राष्ट्रसंत वे. ह. भ. प. तनपुरे महाराजांची जन्मभूमी दगडवाडी येथे स्थित आहे.
या तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये श्री क्षेत्र भगवानगड, श्री मोहटादेवी, आणि श्री कानिफनाथ महाराज यांच्या भव्य मंदिरांचा समावेश होतो, त्याचप्रमाणे दगडी मठ, खोलेश्वर आणि तपनेश्वर ही प्राचीन मंदिरे देखील पाथर्डीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात.
पाथर्डी या नावाच्या उत्पत्तीविषयी एक लोककथा सांगितली जाते. महाभारताच्या काळात अर्जुनाने आपल्या पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर या ठिकाणी वास्तव्यास राहिले, त्यामुळे ‘पार्थ राही’ या शब्दावरून गावाचे नाव पाथर्डी झाले असे मानले जाते. पाथर्डी शहराच्या पूर्वेकडील भागात एका अरुंद गल्लीत दगडी मठ नावाची एक प्राचीन वास्तू आहे, जी आजही आपले ऐतिहासिक महत्त्व जपून आहे.

दगडी मठाची वास्तुकला आणि यावरील शिल्पे पाहिल्यास ही चालुक्यकालीन वास्तू असल्याचे दिसते. या ठिकाणी पूर्वी शिक्षण आणि अध्यापनासाठी या मठाचा वापर केला जात असे.
सध्या येथे शिवलिंग स्थापित केलेले आहे. जरी ही वास्तू भग्नावस्थेत असली तरी तिचे जतन आणि पुनर्बांधणी केल्यास ती अभ्यासासाठी एक महत्त्वाचे उदाहरण ठरू शकते.
दगडी मठाजवळच एका उंच जोत्यावर सुंदर मारुती मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या मागील बाजूस भग्नावस्थेत काही मूर्ती दिसतात, ज्यात चामुंडा, भैरव, आणि जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या मूर्तींचा समावेश आहे.
मारुती मंदिराच्या समोरील भव्य दगडी वेस आणि शेजारी असलेल्या वीरगळी आणि भग्न मूर्ती हे गावाच्या पुरातन ऐतिहासिक वारशाचे अवशेष आहेत, ज्यांचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे.