Bhimrupi Stotra
संत रामदास
श्री रामदासस्वामिकृत्
॥ भीमरूपी स्तोत्रेे ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. १ – वृत्त अनुष्टुप् ।।
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ॥
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥
महाबली प्राणदाता सळां ऊठवी बळें ॥
सौख्यकारी शोकहर्ता दूत वैष्णव गायका ॥ २ ॥
दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा ॥
पातालदेवता-हंता भव्यसिंदुरलेपना ॥ ३ ॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ॥
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४ ॥
ध्वजांगें ऊचली बाहो आवेशे लोटला पुढें ॥
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥ ५ ॥
ब्रह्मांडें माइली नेणों आवळे दंतपंगती ॥
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥
पुच्छ तें मुर्डिलें माथां किरीटी कुंडलें वरी ॥
सुवर्णकटिं कासोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ॥
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥
कोटिच्या कोटि उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ॥
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ॥
मनासी टाकिलें मागे गतीसी तुळना नसे ॥ १० ॥
अणूपासूनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ॥
तयासी तुळणा कैशी ! मेरु मंदार धाकुटे ॥ ११ ॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छे करू शके ॥
तयासी तुळणा कैची ? ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ॥
वाढता वाढता वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥
धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठे करूनिया ॥ १४ ॥
भूत प्रेत समंधादी रोगव्याधी समस्तही ॥
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली ॥
दृढ देहोनिसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥ १६ ॥
राम दासी अग्रगणू कपिकुळासि मंडणू ॥
रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥
इति श्रीरामदासकृतं संकटनिर्शन मारुतिस्तोत्रं संपूर्णम्
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. २ ।।
जनीं ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू ॥
तनू मनू तो पवनू एकची पाहतां दिसे ॥ १ ॥
त्रैलोक्यी पाहतां बाळें ऐसें तो पाहतां नसे ॥
अतूळ तूळना नाहीं मारुती वातनंदनू ॥ २ ॥
चळे तें चंचळे मेटें बाळ मोवाळ साजिरें ॥
चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरें ॥ ३ ॥
हात की पाय की सांगों नखें बोटें परोपरी ॥
दृष्टीचे देखणे मोठे लांमूळ लळलळीतसे ॥ ४ ॥
खडी खारी दडे तैसा पीळ पेंच परोपरी ॥
उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा ॥ ५ ॥
बाळाने गिळिला बाळू स्वभावें खेळतां पहा ॥
आरक्त पीत वाटोळें देखिलें धरणीवरी ॥ ६ ॥
अपूर्व बाळलीला हे रामदास्य करी पुढें ॥ ११ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ३ ।।
कोपला रुद्र जे काळी ते काळी पाहवेचि ना ॥
बोलणे चालणें कैंचें? ब्रह्मकल्पांत मांडला ! ॥ १ ॥
ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ उंच भयानकु ॥
पुच्छ तें मुर्डिलें माथां पाऊल शून्यमंडळा ॥ २ ॥
त्याहून उंच वज्रांचा सव्य बाहो उभारिला ॥
त्यापुढे दुसरा कैंचा अद्भूत तुळणा नसे ॥ ३ ॥
मार्तंडमंडळाऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले ॥
कर्करा घर्डिल्या दाढा उभे रोमांच ऊठिले ॥ ४ ॥
अद्भुत गर्जना केली मेघची वोळले भुमीं ॥
फुटले गिरिचे गाभे तुटले सिंधु आटले ॥ ५ ॥
अद्भूत वेश आवेशे कोपला रणकर्कशू ॥
धर्मसंस्थापनेसाठी दास तो ऊठिला बळें ॥ ६ ॥
। भीमरूपी स्तोत्रे क्र. ४ वृत्त प्रमाणिका ।।
अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ कालदंड ॥
शक्ति पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड ॥ १ ॥
धगधगी तसी कळा वितंड शक्ति चंचळा ॥
चळचळीतसे लिळा प्रचंड भीम आगळा ॥ २ ॥
उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे ॥
त्यजूनि सूर्यमंडळा नभांत भीम आगळा ॥ ३ ॥
लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा ॥
बहूत पोळतांक्षणीं थुंकिलाचि तत्क्षणीं ॥ ४ ॥
धग्धगीत बुबुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा ॥
कराळ काळमूख तो रिपूकुळासि दुःख तो ॥ ५ ॥
रुपें कपी अचाट हा सुवर्णकट्टचास तो ॥
फिरे उदास दास तो खळास काळ भासतो ॥ ६ ॥
झळक झळक दामिनी वितंट काळकामिनी ॥
तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ॥ ७ ॥
समस्तप्राणनाथ रे करी जना सनाथ रे ॥
अतूळ तूळणा नसे अतूळशक्ति वीलसे ॥ ८ ॥
रुपें रसाळ बाळकू समस्तचित्तचाळकू ॥
कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ॥ ९ ॥
स्वरूद्र क्षोभल्यावरी तयासि कोण सावरी ॥
गुणागळा परोपरी सतेजरूप ईश्वरी ॥ १० ॥
समर्थदास हा भला कपीकुळांत शोभला ॥
सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला ॥ ११ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ५ – अनुष्टुप् ।।
हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ॥
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥ १ ॥
कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ॥
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥ २ ॥
वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ॥
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥ ३ ॥
स्थितिरूपे तूंचि विष्णू संहारक पशूपती ॥
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातिता ॥ ४ ॥
सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ॥
शेष तो शिणला भारी ‘नेति नेति’ परा श्रुती ॥ ५ ॥
धन्यावतार कैसा हा भक्तांलागि परोपरी ॥
रामकाजी उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥ ६ ॥
वारितो दुर्घटे मोठी संकटी धांवतो त्वरें ॥
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेताच पावतो ॥ ७ ॥
धीर वीर कपी मोठा मागे नव्हेचि सर्वथा ॥
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥ ८ ॥
देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ॥
वाचितां सौमित्र अंगें राम सूखे सुखावला ॥ ९ ॥
गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ॥
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकासि नाकळे ॥ १० ॥
अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळीं ॥
फांकडे तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥ ११ ॥
देखता रूप पै ज्याचे उड्डाण अद्भुत शोभलें ॥
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥ १२ ॥
कसिली हेमकासोटी घंटा किंकिणि भोंवत्या ॥
मेखळे जडली मुक्ते दिव्य रत्ने परोपरी ॥ १३ ॥
माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ॥
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥ १४ ॥
केशर रेखिलें भाळी मुख सूहास्य चांगलें ॥
मुद्रिका शोभती बोटी कंकणे कर मंडित ॥ १५ ॥
चरणी वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ॥
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥ १६ ॥
स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ॥
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिया बळें ॥ १७ ॥
पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ॥
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥ १८ ॥
दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्वाळिले ॥
सोडिलें रामचंद्रा कीर्ति हे भुवनत्रयीं ॥ १९ ॥
विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ॥
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥ २० ॥
सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ॥
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥ २१ ॥
संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्यनाशका ॥
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥ २२ ॥
पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ॥
त्रिकाळी पठता स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥ २३ ॥
परंतु पाहिजे भक्ती संधे काही धरूं नका ॥
रामदासा सहाकारी सांभाळीतो पदोपदीं ॥ २४ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ६ वृत्त मालिनी ।।
फणिवर उठवीला वेग अद्भूत केला ॥ त्रिभुवनजनलोकी कीर्तिचा वोघ गेला ॥
रघुपतिउपकारें दाटले थोर भारें ॥ परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥ १ ॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें ॥ कपिकटक निमाले पाहतां येश गेलें ॥
परदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतें ॥ अभिनवरणपातें दुःख बीभीषणातें ॥ २ ॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर आटी ॥ म्हणउनि जगजेठी धांवणे चारि कोटी ॥
मृतिविरहित ठेले मोकळे सिद्ध झाले ॥ सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥ ३ ॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा ॥ उठवि मज अनाथा दूर सारूनि वेथा ॥
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया ॥ रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥ ४ ॥
तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे ॥ म्हणउनि मन माझें रे? तुझी वाट पाहे ॥
मज तुज निरवीले पाहिजे आठवीलें ॥ सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ॥ ५ ॥
उचित हित करावें उद्धरावें धरावें ॥ अनहित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ॥
अघटित घडवावें सेवकां सोडवावें ॥ हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥ ६ ॥
प्रभुवर विरराया! जाहली वज्र काया ॥ परदळ निवटाया दैत्यकुळे कुटाया ॥
गिरिवर उतटाया रम्यवेषे नटाया ॥ तुजचि अलगठाया ठेविलें मुख्य ठाया ॥ ७ ॥
बहुत सबळ सांठा मागतों अल्प वाटा ॥ न करित हित कांटा थोर होईल ताठा ॥
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें ॥ अनुदिन करुणेचे चिन्ह पोटीं वसावें ॥ ८ ॥
जळधर करुणेचा अंतरामाजि राहे ॥ तरि तुज करुणा हे का नये सांग पा हे ॥
कठिण हृदय जालें? काय कारुण्य गेलें? ॥ न पवसि मज का रे म्यां तुझे काय केलें ॥ ९ ॥
वडिलपण करावें सेवकां सांवरावें ॥ अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ॥
निपटचि हटवादे प्रार्थिला शब्दभेदें ॥ कपि घन करुणेचा वोळला रामवेधे ॥ १० ॥
बहुतचि करुणा या लोटली देवराया ॥ सहजचि कफकेतें जाहली वज्र काया ॥
परम सुख विलासे सर्वदासानुदासें ॥ पवनतनुज तोषे वंदिला सावकाशे ॥ ११ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ७ वृत्त चामर ।।
रुद्र हा समुद्र देखताक्षणीं उठावला ॥ शिराणिचें किराण सज्ज त्रीकुटास पावला ॥
वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला ॥ वावरोनि वीवरोनि तो त्रिकूट पाहिला ॥ १ ॥
हीन देव दीनरूप देखतांचि पावला ॥ गड्गडीत घड्घडीत कड्कडीत कोपला ॥
लाटि कूटि पाडि फोटि झोडि झोडि झोडला ॥ दैत्यलोक एक हाक सर्वगर्व मोडिला ॥ २ ॥
सानरूप तें स्वरूप गुप्तरूप बैसला ॥ पुच्छकेत शोध घेत त्रीकुटांत बैसला ॥
गड्गडी दिसेचिना बुझेल कोण कैसला ॥ वळवळी चळचळी विशाळ ज्वाळ जैसला ॥ ३ ॥
काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे ॥ भारभार राजभार पुच्छमार होतसे ॥
पाडिले पछाडिले रुधीरपूर व्हातसे ॥ दैत्य बोलती बळें पळोन काय घ्यातसे ॥ ४ ॥
काळकूट ते त्रिकूट धूट धूट ऊठिलें ॥ दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिलें ॥
घोर मार ते सुमार लूट लूट लूटिले ॥ चिर्डिलेचि घर्डिलेचि फूट फूट फूटिले ॥ ५ ॥
दाट थाट आट घाट ते कपाट घातले ॥ सर्व रोध तो निरोध थोर दुःख पावले ॥
सैन्य कट्ट त्यासि घट्ट कर्करून बांधिलें ॥ थोर घात त्यास पात चर्फडीत चेंदलें ॥ ६ ॥
वज्र पुच्छ त्यासि तुच्छ मानिले निशाचरीं ॥ सर्वही खण्खणाट ऊठिले घरोघरीं ॥
फुटेचिना तुटेचिना समस्त भागले करीं ॥ लट्लटीत कांपती बहूत धाक अंतरीं ॥ ७ ॥
थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले ॥ कोण मस्त तंग बस्त थाट थाट थाटले ॥
मंदिरीं घरोघरीं अचाट पुच्छ वाढलें ॥ दैत्यनास तो घसास काट काट काटले ॥ ८ ॥
हात पाय मान माज वोढिते पछाडितें ॥ अडचणींत अड्कवूनि पीळ पेंच काढितें ॥
लोहदंडसें अखंड राक्षसांसि ताडितें ॥ मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकूळ नाडितें ॥ ९ ॥
थोर धाक एक हाक त्रीकुटासि पूरले ॥ घरोघरींच चळ्वळी पुढे उदंड ऊरले ॥
बैसले उदंड दैत्य तें सभेत घूसले ॥ सभा विटंबिली बळेंचि कोणसें न सूचलें ॥ १० ॥
देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हालिलें ॥ पुरोनि ऊरले बळें सभेमधेचि चालिलें ॥
रत्नदीप तेलदीप तेज सर्व काढिलें ॥ लाटि कुटि धामधूम पाडिले पछाडिले ॥ ११ ॥
गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे ॥ मुगूट पाडिला शिरीं कठोर वज्र ठोसरे ॥
सभा विटंबिली बळेंचि गर्गरीत वावरे ॥ बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ॥ १२ ॥
हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे ॥ लंडसे कलंडले उलंडलेचि मंडसे ॥
येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती ॥ गळीत बैसले भुमी न बोलती न चालती ॥ १३ ॥
स्वप्नहेत सौख्य देत दैत्यघात भावला ॥ रुद्र हा उठावला कुढावयासि पावला ॥
जाळिलें त्रिकूट नीट आपटून रावणी ॥ राक्षसांसि थोर दुःख ऊसिणे ततक्षणीं ॥ १४ ॥
दीनरूप देव सर्व हास्यरूप पाहिलें ॥ कळ्वळून अंतरी रघूत्तमासि बाहिलें ॥
एक वीर तो सधीर! थोर धीर ऊठला ॥ तोष तोष तो विशेष अंतरीच दाटला ॥ १५ ॥
उदंड देव आटिले तयांसि भीम आटितो ॥ रामदूत वातसूत लाटि लाटि लाटितो ॥
ऊठ आमुचे समस्तं कूट कूट कूटितो ॥ धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो ॥ १६ ॥
समस्त दैत्य आळितो बळे त्रिकूट जाळितो ॥ पुरांत गोपुरे बरी निशाचरांसि वाळितो ॥
उदंड अग्निं लाविला बहू बळें उठावला ॥ कडाडिला तडाडिला भडाडिला धडाडिला ॥ १७ ॥
वितंड दैत्य धांवडी तयांत पुच्छ भोवडी ॥ कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ॥ १८ ॥
बळे चपेट मारिला उदंड दैत्य हारिला ॥ तरारिला थरारिला भयंकरू भरारिला ॥
गद्गदी तनू वितंड सागरी सरारिला ॥ जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला ॥ १९ ॥
काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला भरे ॥ थोर धाक एक हाक काळचक्र वावरे ॥
शक्ति शोधिली बळेचि भव्य देखिले धुरे ॥ वानरांसहीत रामदास भेटले त्वरें ॥ २० ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ८ – वृत्त मालिनी ।।
भुवनदहनकाळी काळ विक्राळ जैसा ॥ सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ॥
दुपटत कपि झोंके झोकिली मेदिनी हे ॥ तळवट धरि धाकें धोकली जाउं पाहे ॥ २ ॥
गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ॥ घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ॥
उडति झडझडाटे वृक्ष हे नेटपाटें ॥ पडति कडकडाडे अंग घातें धुधाटें ॥ २ ॥
थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ॥ गरगरित गरारी सप्तपाताळ तेव्हां ॥
फणिवर कमठाचे पृष्ठिशी आंग घाली ॥ तगटित पवनाची झेप लंकेसि गेली ॥ ३ ॥
थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छे ॥ रगडित रणरंगी राक्षसे तृणतुच्छे ॥
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ॥ अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥ ४ ॥
सहज करतळे जो मेरुमांदार पाडी ॥ दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ॥
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ॥ पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥ ५ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे- ९ वृत्त भुजंगप्रयात ।।
लघूशी परी मूर्ति हे हाटकाची ॥ करावी तथा मारुतीनाटकाची ॥
असावी सदा ताइतामाजि दंडी ॥ समारंगणी पाठ दीजे उदंडीं ॥ १ ॥
ठसा हेमधातूवरी वायुसुतू ॥ तथा ताइताचेपरी रौप्यधातू ॥
तयाची पुजा मंदवारी करावी ॥ बरी आवडी आर्त पोटीं धरावी ॥ २ ॥
स्वधामासि जातां प्रभू रामराजा ॥ हनुमंत तो ठेविला याच काजा ॥
सदा सर्वदा राम दासासि पावे ॥ खळी गांजितां ध्यान सोडून धांवे ॥ ३ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. १० ।।
चपळ ठाण विराजतसे बरें ॥ परम सुंदर तें रुप साजिरें ॥
धगधगीत बरी उटि सिंदुरें ॥ निकट दास कपी विर हे खरें ॥ १ ॥
कपीवीर जेठी उडे चारि कोटी ॥ गिरी द्रोण दाटी तळाथें उपाटी ॥
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी ॥ त्रिकूटाचळीं ऊठवी वीर कोटी ॥ २ ॥
रघुविरा समिरात्मज भेटला ॥ हरिजनां भजनांकुर फूटला ॥
कपिकुळे सकळे मिनली बळें ॥ रिपुदळे विकळे वडवानळे ॥ ३ ॥
कपीवीर तो लीन तल्लीन जाला ॥ प्रसंगेचि पाहोनि सन्मूख आला ॥
हनुमंत हे पावला नाम तेथें ॥ महीमंडळी चालिले सर्व येथें ॥ ४ ॥
नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी ॥ देहो अचळातुल्य हा काळरूपी ॥
पुढें देखता दैत्यकूळे दरारा ॥ भुतें कांपती नाम घेतां थरारां ॥ ५ ॥
सिमा सांडिली भीमराजें विशाळें ॥ बळें रेटिले दैत्य कृत्तांतकाळें ॥
गजामस्तकी केसरीचा चपेटा ॥ महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा ॥ ६ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. ११ मारुति ।।
नमन गा तुज भिमराया ॥ निजमती मज दे तुज गाया ॥
तडकितां तडका तडकाया ॥ भडकितां भडका भडकाया ॥ १ ॥
हरुषला हर हा वरदानी ॥ प्रगटला नटला मज मानीं ॥
वदवितां वदनीं वदवीतो ॥ पुरवितो सदनी पदवी तो ॥ २ ॥
अवचितां चढला गड लंका ॥ पळभरी न धरी मन शंका ॥
तडकितां तडके तडकीतो ॥ भडकित्ता भडके भडकीतो ॥ ३ ॥
खवळले रजनीचरभारें ॥ भडकिता तडके भडमारें ॥
अवचिता गरजे भुभुकारें ॥ रगडिजे गमकें दळ सारें ॥ ४ ॥
कितिका खरडी खुरडीतो ॥ कितेका नरडी मुरडीतो ॥
कितेकां चरडी चिरडीतो ॥ कितेका आरडी दरडीतो ॥ ५ ॥
महाबळी रजनीचर आले ॥ भीम भयानकसेचि मिळाले ॥
रपटितां रपटी रपटेना ॥ आपटितां आपटी आपटेना ॥ ६ ॥
खिजवितां खिजवी खिजवेना ॥ झिजविता झिजवी झिजवेना ॥
रिझवितां रिझवी रिझवेना ॥ विझविता विझवी विझवेना ॥ ७ ॥
झिडकितां झिडकी झिडकेना ॥ तडकिता तडकी तडकेना ॥
फडकितां फडकी फडकेना ॥ कडकितां कडकी कडकेना ॥ ८ ॥
दपटितां दपटी दपटेना ॥ झपटितां झपटी झपटेना ॥
लपटितां लपटी लपटेना ॥ चपटितां चपटी चपटेना ॥ ९ ॥
दडवितां दडवी दडवेना ॥ घडवितां घडवी घडवेना ॥
बडवितां बडवी बडवेना ॥ रडविता रडवी रडवेना ॥ १० ॥
कवळितां कवळी कवळेना ॥ खवळितां खवळी खवळेना ॥
जवळितां जवळी जवळेना ॥ मवळितां मवळी मवळेना ॥ ११ ॥
चढवितां चढवी चढवेना ॥ झडवितां झडवी झडवेना ॥
तडवितां तडवी तडवेना ॥ गडवितां गडवी गडवेना ॥ १२ ॥
तगटितां तगटी तगटेना ॥ झगटितां झगटी झगटेना ॥
लगटितां लगटी लगटेना ॥ झुगटितां झुगटी झुगटेना ॥ १३ ॥
टणकिता टणकी टणकेना ॥ ठणकितां ठणकी ठणकेना ॥
दणगितां दणगी दणगेना ॥ फुणगितां फुणगी फुणगेना ॥ १२ ॥
चळवितां चळवी चळवेना ॥ छेळविता छळवी छळवेना ॥
जळवितां जळवी जळवेना ॥ टळवितां टळवी टळवेना ॥ १५ ॥
घसरितां घसरी घसरेना ॥ विसरितां विसरी विसरेना ॥
मरवितां मरवी मरवेना ॥ हरवितां हरवी हरवेना ॥ १६ ॥
उलथितां उलथी उलथेना ॥ कलथितां कलथी कलथेना ॥
उडवितां उडवी उडवेना ॥ बुडवितां बुडवी बुडवेना ॥ १७ ॥
बुकलितां बुकली बुकलेना ॥ धुमसितां धुमसी धुमसेना ॥
धरवितां धरवी धरवेना ॥ सरविता सरवी सरवेना ॥ १८ ॥
झडपितां झडपी झडपेना ॥ दडपितां दडपी दडपेना ॥
तटवितां तटवी तटवेना ॥ फटवितां फटवी फटवेना ॥ १९ ॥
वळवितां वळवी वळवेना ॥ पळविता पळवी पळवेना ॥
ढळवितां ढळवी ढळवेना ॥ लळविता लळवी लळवेना ॥ २० ॥
घुरकितां घुरके घुरकावी ॥ थरकिता थरके थरकाबी ॥
भरकितां भरके भरकावी ॥ झरकिरकितां झरके झरकावी ॥ २१ ॥
परम दास हटी हटवादी ॥ लिगटला उतटी तटवादी ॥
सिकवितां सिकवी सिक लावी ॥ दपटितां दपटून दटावी ॥ २२ ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. १२ ।।
बळे सर्व संहारिलें रावणाला ॥ दिलें अक्षयी राज्य बीभीषणाला ॥
रघूनायके देव ते मुक्त केले ॥ अयोध्यापुरी जावया सिद्ध जाले ॥ १ ॥
पथामाजि कृष्णातिरी रामराया ॥ घडे राहणें स्नानसंध्या कराया ॥
सिता राहिली शीरटें गांव जेथें ॥ रघुराज तो पश्चिमेचेनि पंथें ॥ २ ॥
जप ध्यान पूजा करी रामराजा ॥ तयाचेपरी वीर सीमित्र वोजा ॥
स्मरेना देहें चित्त ध्यानस्थ जालें ॥ अकस्मात तें तोय अद्भूत आलें ॥ ३ ॥
बळें चालिला ओघ नेटें भडाडां ॥ नभी धांवती लोट लाटा धडाडां ॥
नदी चालली राम ध्यानस्थ जेथें ॥ बळें बिक्रमें पावला भीम तेथे ॥ ४ ॥
उभा राहिला भीमरूपी स्वभावें ॥ बळें तुंब तो तुंबिला दोन गांवें ॥
नदी एक वीभागली दोन्हि बाहें ॥ म्हणोनी तया नांव हे गांव बाहें ॥ ५ ॥
सुखें लोटती देखता रामलिंगा ॥ बळें चालिली भोवती कृष्णगंगा ॥
परी पाहतां भीम तेथें दिसेना ॥ उदासीन हे चित्त कोठे वसेना ॥ ६ ॥
हनूमंत पाहावयालागि आलों ॥ दिसेना सखा थोर विस्मीत जालों ॥
तयावीण देवालये ती उदासे ॥ जळांतून बोभाइला दास दासें ॥ ७ ॥
मनांतील जाणोनि केला कुढावा ॥ दिले भेटिचा जाहला थोर यावा ॥
बळे हांक देतांचि तैसा गडाडी ॥ महामेघ गंभीर जैसा घडाडी ॥ ८ ॥
रघुराज वैकुंठधामासि गेले ॥ तधी मारुती दास हे नीरवीले ॥
रघूनाथ ऊपासकाला प्रसंगें ॥ सख्या मारुती पाव रे लागवेगें ॥ ९ ॥
प्रभूचे महावाक्य त्वां साच केलें ॥ म्हणे दास हे प्रत्यया सत्य आलें ॥
जनामाजि हे सांगतां पूरवेना ॥ अवस्था मनी लागली ते सरेना ॥ १० ॥
।। भीमरूपी स्तोत्रे क्र. १३ ।।
भिम भयानक तो शिक लावी ॥ भडकला सकळा भडकावी ॥
वरतरू वरता तडकावी ॥ बळकटा सकळां धडकावी ॥ १ ॥
सकळ ते रजनीचरभारे ॥ सकट बांधत पुच्छ उभारे ॥
रडत बोलति वीरच सारे ॥ न दिसतांचि बळें भुभुःकारे ॥ २ ॥
जळतसे त्रिकूटाचळ लंका ॥ धरितसे रजनीचर शंका ॥
उमजती उमजे वरघाला ॥ अवचितां वुडबी सकळांला ॥ ३ ॥
कठिण मार विरांस न साहे ॥ रुधिरपूर महीवरि वाहे ॥
बहुत भूत भुतावळि आली ॥ रणभुमीवरि येउनि घाली ॥ ४ ॥
अमर ते म्हणती विर आला ॥ नवल हे पुरले सकळांला ॥
उदित काळ बरा दिसताहे ॥ विधिविधान विधी मग पाहे ॥ ५ ॥
॥ भीमरूपी स्तोत्रेे समाप्त ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥