bhairavanath-mandir-kikli
|| तीर्थक्षेत्र ||
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या किकली गावात हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे एक प्राचीन भैरवनाथ मंदिर आहे. हे मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून साधारणतः ६ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मंदिराच्या परिसरातून चंदनगड आणि वंदनगड या किल्ल्यांचे सुंदर दृश्य नजरेस पडते.
किकली गावात प्रवेश करताच उंचावर भव्य प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेते, ज्याला साधारणतः १८ ते २० पायऱ्या चढून जाता येते. प्रवेशद्वार ओलांडताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते.
या मंदिर संकुलात एक मंदिर चांगल्या स्थितीत आहे, तर उर्वरित दोन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. मुख्य मंदिर हे भैरवनाथाचे असून, त्यावरील नक्षीकाम अतिशय उत्कृष्ट आहे. मंदिराच्या मुखमंडपातच नंदीची प्रतिष्ठापना आहे. वेदिकेवरील व्यालपट्टी, मुखमंडपाच्या छतावर कोरलेली विविध प्रकारची सुंदर झुंबरे पाहण्यासारखी आहेत.
प्रवेशद्वारावरील शिल्पकला अद्वितीय असून, त्यात प्रतिहारी, गज शरभ, व्याल, देवीशक्ती आणि कीर्तिमुख यांसारखी नक्षीदार कलाकुसर आहे. उबऱ्यावर शंखावर्त अर्धचंद्र यांची शिल्पे पाहायला मिळतात.
सभामंडपातील रंगशिळेवर चार सुंदर कोरीव खांब असून त्यांवर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. या मंदिरातील काही शिल्पे शिवतांडव, वामनावतार, सुरसुंदरी आणि क्षेत्रपाल अशा विविध रूपात आहेत.
मंदिराचा गाभारा त्रिदल पद्धतीचा असून, भैरवनाथाच्या समोरील अंतराळगृह अतिशय रेखीव आहे. या गृहात दोन देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि मच्छिंद्रनाथ यांची मूर्ती दिसते. गाभाऱ्यात उग्र स्वरूपाची भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग प्रतिष्ठित आहे.
किकली हे साधारणतः पाचशे ते सहाशे घरांचे गाव असून, या गावात मंदिरासोबतच शंभर ते दीडशे वीरगळी पाहायला मिळतात. या वीरगळ्या विविध प्रकारच्या आहेत; काही साधारण व्यक्तींच्या तर काही राजे-राजवाड्यांच्या असून त्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे किकली गावाला “वीरगळीचे गाव” हे नाव खऱ्या अर्थाने शोभून दिसते.