ग्रंथ : बारा ओव्या शतके – संत रामदास

नमन योगिराया स्वामी दत्तात्रेया । गाईन वोविया संसारीच्या ॥ १ ॥
संसारीचें दुःख आठवलें मनीं । मागें नाना योनी भोगियेल्या ॥ २ ॥
भोगियेल्या परी नाहीं आठवण । दुःख तें ठीण विसरलों ॥ ३ ॥


विसरलों राम चित्तीं दृढकाम । तेणें गुणें श्रम थोर जाला ॥ ४ ॥
जालों कासावीस थोर गर्भवासीं । नको त्या दुःखासी सांगवेना ॥ ५ ॥
सांगवेना शीण अत्यंत कठीण । रामा तुजवीण दुःख जालें ॥ ६ ॥

bara-ovya-shatke-sant-ramdas


दुःख जालें भारीं मातेच्या उदरीं । नवमासवरि कोंडियेले ॥ ७ ॥
कोंडियेले मज अत्यंत सांकडीं । रामा कोण सोडी तुजवीण ॥ ८ ॥
तुजविणें मज जाहलें बंधन । जठरीं शयन जननीचे ॥ ९ ॥


जननीजठर संकोचित थोर । विष्टा आणी मूत्र नाकीं तोंडीं ॥ १० ॥
नाकीं तोंडीं जंत वांति आणी पित्त । निर्बुजलें चित्त वायो नाहीं ॥ ११ ॥
वायो नाहीं तेथें वन्हीचा उबारा । तेणें या शरीरा दुःख होय ॥ १२ ॥


दुःख होय थोर सर्वांग आहाळे । तेणें गुणें पोळे अस्थिमांस ॥ १३ ॥
अस्थीचा पंजर शिरीं वेटाळिला । नाडीं गुंडाळिला मेदमांसें ॥ १४ ॥
मेदमांस कृमी कुश्चिळ कातडीं । गळती आंतडीं लवथवित ॥ १५ ॥


ऐसें अमंगळ अत्यंत कुश्चीळ । प्राण हा व्याकूळ होय दुःखें ॥ १६ ॥
दुःखें आला त्रास तेणें कोंडे श्वास । कोंडिलें उमस घेतां न ये ॥ १७ ॥
नये नये येतां सर्वथा बाहेरी । ऐसीये दाथरीं उकडीलें ॥ १८ ॥


उकडीतां प्राणी करी तळमळ । तंव जन्मकाळ आलें पुढें ॥ १९ ॥
आलें पुढें अंतकाळाचें संकट । कष्टांवरी कष्ट थोर जाले ॥ २० ॥
थोर जाले कष्ट मातेच्या उदरीं । शिणलों श्रीहरी दास तुझा ॥ २१ ॥


दास्य मी करीन ऐसें होतें ध्यान । जन्मकाळीं प्राण
गेला माझा ॥ २२ ॥
गेला माझा प्राण जालें विस्मरण । स्वामीचें चरण विसरलों ॥ २३ ॥
विसरलों सोहं मग म्हणे कोहं । जन्मकाळीं बहु दुःख जालें ॥ २४ ॥


दुःखें दुखवलों मग म्हणे आहा । जन म्हणे टाहा फोडियेला ॥ २५ ॥
फोडियेला टाहो पडतां भूमीवरी । दिवसेंदिवस हरी विसरलों ॥ २६ ॥
विसरलों बुद्धि स्वहिताची शुद्धि । अज्ञानाची वृद्धि होत आहे ॥ २७ ॥


होत आहे वृद्धी दृढ देहबुद्धि । तुज कृपानिधी अंतरलों ॥ २८ ॥
अंतरलों सुख तुज विसरतां । विषयो भोगितां दुःख जालें ॥ २९ ॥
दुःख जालें फार ऐसा हा संसार । पुढे षड्‌विकार उद्‌भवले ॥ ३० ॥


उद्‌भवले तेणें सुखदुःख कळे । प्राण हा आंदोळे दुःख होतां ॥ ३१ ॥
दुःख होय देहीं माता नेंणे कांहीं । मज वाचा नाहीं काय करूं ॥ ३२ ॥
काय करूं दुःखें पोळे अभ्यंतर । मातेसी अंतर जाणवेना ॥ ३३ ॥


जाणवेना माझें दुःख मी अज्ञान । मग मी रुदन करीं देवा ॥ ३४ ॥
करीं देवा आतां माझी सोडवण । दुःख हें दारुण भोगवेना ॥ ३५ ॥
भोगवेना दुःख संसारीचें आतां । धांवें बा अनंता पावें वेगीं ॥ ३६ ॥


पावें वेगीं दास सोडवीं आपुले । लोभें वाहवले मायाजाळीं ॥ ३७ ॥
मायाजाळीं दृढ जालें माझें माझें । रामा नाम तुझें आठवेना ॥ ३८ ॥
आठवेना चित्तीं स्वहितांचें ज्ञान । मायबापीं लग्न केलें लोभें ॥ ३९ ॥


लोभें लग्न केलें मानिली आवडी । पांई वोली बेडी बंधनाची ॥ ४० ॥
बंधनाची बेडी प्रबळला काम । मग कैचा राम आठवेल ॥ ४१ ॥
आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा । जालों कुटुंबाचा भार वाही ॥ ४२ ॥


भारवाही जालों रामा अंतरलों । बंधनीं पडिलों काय करूं ॥ ४३ ॥
काय करूं मज कामाचें सांकडें । संसाराचें कोडें उगवेना ॥ ४४ ॥
उगवेना मन आठवे कांचन । सर्वकाळ ध्यान प्रपंचाचें ॥ ४५ ॥


प्रपंचाचें ध्यान लागलें मानसीं । चित्त अहर्निशी दुश्चंचळ ॥ ४६ ॥
चंचळ मानस संसार‌उद्वेगें । क्षणक्षणा भंगे चित्तवृत्ती ॥ ४७ ॥
वृत्ति कांता धन पाहे जनमान । इच्छेचें बंधन दृढावलें ॥ ४८ ॥


दृढावलें वोझें प्रपंचाचें माथां । तेणें गुणें व्यथा थोर होय ॥ ४९ ॥
थोर होय व्यथा तारुण्याच्या भरें । कामाचें काविरें आवरेना ॥ ५० ॥
आवरेना क्रोध तेणें होय खेद । वृत्तीचा उच्छेद करूं पाहे ॥ ५१ ॥


करूं पाहे घात थोर पुढिलांचा । मार्ग स्वहिताचा अंतरलों ॥ ५२ ॥
अंतरलों भक्ती ठाकेना विरक्ती । देवा तुझी प्राप्ती केवी घडे ॥ ५३ ॥
केवी घडे प्राप्ती मज पतितासी । जाल्या पापरासी सांगों कीती ॥ ५४ ॥


सांगों किती दोष जाले लक्षकोटी । पुण्य माझे गांठी आडळेना ॥ ५५ ॥
आडळेना पुण्य पापाचे डोंगर । करीतां संसार माझें माझें ॥ ५६ ॥
माझी माता पिता माझे बंधुजन । पुत्र कांता धन सर्व माझें ॥ ५७ ॥


सर्व माझें ऐसें मानिला भर्वसा । तुज जगदीशा विसरलों ॥ ५८ ॥
विसरलों तुज वैभवाकरितां । शेखीं माता पिता राम जाली ॥ ५९ ॥
राम जाली माता देखत देखतां । तर्‍ही म्हणे कांता पुत्र माझें ॥ ६० ॥


माझे पुत्र माझे स्वजन सोईरे । दृढ देहीं भरे अहंभाव ॥ ६१ ॥
अहंभाव मनीं दुःख आच्छादुनी । वर्ततसे जनीं अभिमानें ॥ ६२ ॥

अभिमान माथां वाहे कुटुंबाचा । अंतरीं सुखाचा लेश नाहीं ॥ ६३ ॥


नाहीं नाहीं सुख संसारीं पाहातां । पुरे देवा आतां जन्म नको ॥ ६४ ॥
नको नको आतां घालूं या संसारीं । पोळलों अंतरीं काय करूं ॥ ६५ ॥
काय करूं माझें नेणती स्वहित । आपुलालें हित पाहतील ॥ ६६ ॥


पाहतील हित वैभवाचीं सखीं । कोण्ही मज सेखीं कामा न ये ॥ ६७ ॥
कामा न ये कोण्ही तुजवीणें रामा । नेईं निजधामा माहियेरा ॥ ६८ ॥
माहियेर माझें अंतरलें दूरी । लोभें दुराचारी गोवियेलें ॥ ६९ ॥


गोवियेलें मज आपुलाल्या हिता । माझी कोण्ही चिंतां केली नाहीं ॥ ७० ॥
केली नाहीं चिंता लोभें गुंडाळिलें । पिळून घेतलें सर्व माझें ॥ ७१ ॥
सर्व माझें गेलें जालों निःकारण । स्वामीचें चरण अंतरलों ॥ ७२ ॥


अंतरलो देवा आयुष्य वेंचलें । अंतर पडिलें कायकरूं ॥ ७३ ॥
काय करूं आतां शरीर खंगलें । मज वोसंडिलें जिवलगीं ॥ ७४ ॥
जिवलगीं मज वोसंडिलें देवा । काय करूं ठेवा प्रारब्धाचा ॥ ७५ ॥


प्रारब्धाचा ठेवा प्रपंचीं रंगला । देहे ही खंगला वृद्धपणीं ॥ ७६ ॥
वृद्धपणीं माझें चळलें शरीर । श्रवण बधीर नेत्र गेले ॥ ७७ ॥
नेत्र गेले मज पाहातां दिसेना । स्वयें उठवेना पाय गेले ॥ ७८ ॥


पाय गेले तेणें दुःख होये भारीं । तेथेंचि बाहेरी जाववेना ॥ ७९ ॥
जाववेना तेणें जालें अमंगळ । अत्यंत कुश्चीळ वांती पित्त ॥ ८० ॥
वांति पित्त जन देखोनि पळती । दुर्गंधीं गळती नवनाळीं ॥ ८१ ॥


नवनाळीं वाहे दुर्गंधी न साहे । वांति होऊं पाहे देखतांची ॥ ८२ ॥
देखती सकळ सुटले पाझर । मळमूत्रीं धर धरवेना ॥ ८३ ॥
धरवेना तृषा क्षुधा आणि दिशा । पराधीन आशा प्रबळली ॥ ८४ ॥


प्रबळली आशा जाली अनावर । चित्तीं तृष्णातुर सर्वकाळ ॥ ८५ ॥
सर्वकाळ चित्तीं थोर लोलंगता । खायासी मागतां नेंदी कोण्ही ॥ ८६ ॥
नेंदी कोण्ही कांहीं क्षीण जालों देहीं । जिवलगीं तेहीं वोसंडीलें ॥ ८७ ॥


वोसंडीलें मज वैभव गेलियां । देहे खंगलियां दुःख जालें ॥ ८८ ॥
दुःख जाले थोर क्षुधा आवरेना । अन्नही जिरेना वांती होय ॥ ८९ ॥
वांती होय तेणें निर्बुजे वासना । स्वादिष्ट चाववेना दांत गेले ॥ ९० ॥


दांत गेले तेणें जिव्हेची बोबडी । कंठ गडगडी बोलवेना ॥ ९१ ॥
बोलवेना अंतकाळींच्या विपत्ती । सर्वही म्हणती मरेना कां ॥ ९२ ॥
मरेना कां आतां कासया वांचला । देव विसरला नेणों यासी ॥ ९३ ॥


नेणों याची नाहीं मर्यादा खुंटली । सकळां लागली चिंता मनीं ॥ ९४ ॥
चिंता मनीं वाटे मृत्यूची सकळां । सर्वांसी कंटाळा आला थोर ॥ ९५ ॥
आला थोर त्रास जिवलग बोलती । देवा याची माती उचलावी ॥ ९६ ॥


उचलावी माती सर्वांचे अंतरीं । सुखाचीं सोईरीं दूरी ठेलीं ॥ ९७ ॥
दूरी ठेलीं सर्व सुखाचीं चोरटीं । कोण्हीच सेवटीं सोडवीना ॥ ९८ ॥
सोडवीना कोण्ही श्रीरामावांचूनि । संकटीं धांवणी राम करी ॥ ९९ ॥
राम करीतसे दासांचा सांभाळ । भक्तांचा स्नेहाळ राम येक ॥ १०० ॥


संसाराची कथा आतां सांगईन । सुखासाठी लग्न आरंभीलें ॥ १ ॥
आरंभिलें लग्न आणिली नोवरी । रिणें घरोघरीं मागतसे ॥ २ ॥
मागतसे त्यासी कोण्हीच देईना । अन्नही मिळेना खावयासी ॥ ३ ॥


खावयासी नाहीं लेवयासी नाहीं । अन्न वस्त्र नाहीं सर्वकाळ ॥ ४ ॥
सर्वकाळ गेला चिंताचि करितां । अखंड दुश्चिता श्वास सांडी ॥ ५ ॥
सांडी स्नानसंध्या सांडी नित्यनेम । रात्रंदिवस काम संसाराचे ॥ ६ ॥


संसाराचें काम पुरेना उदंड । दीसेंदीस भंड आरंभलें ॥ ७ ॥
आरंभीं नोवरी म्हणे आणा आणा । रात्रदिस आणा आरंभिल्या ॥ ८ ॥
आरंभलें घर मांडला संसार । नित्य करकर भांडणाची ॥ ९ ॥


तेलमीठ आणा भाजीपालें आणा । धान्य घरा आणा कांहीं तरी ॥ १० ॥
कांहीं तर्‍हीं शेणी सर्पण जळण । पात्र सांठवण करावया ॥ ११ ॥
करावया स्वयंपाक सांठवणी । गाडगे वेळणी परियेळ ॥ १२ ॥


घालावया धुण पाहिजे मांदण । फुटके रांजण धड आणा ॥ १३ ॥
धड आणा डेरे भाचरी मडकीं । कुंडाले आणिखी घागरी त्या ॥ १४ ॥
घागरी दुधाणी सेंदावया पाणी । आणी चिंचवणी घालावया ॥ १५ ॥


घालावया सुठी हिंग जीरें मीरें । सेणेरें पोतेरें पाहिजे कीं ॥ १६ ॥
गोठे दारवठे चौकटी आर्गळा । कड्या कोंड्या खिळा ठांई ठांई ॥ १७ ॥
ठांई पडे अन्न तरी हा भाग्याचा । धोका संसाराचा रात्रंदीस ॥ १८ ॥


दिसा धोका करी रात्रीं चिंता करी । दुःख परोपरीं संसारीचें ॥ १९ ॥
संसारीचें दुःख कांहीं येक सुख । सर्वकाळ धाक वाहातसे ॥ २० ॥
वाहातसे धाका धाकतसे लोका । तोंडावरी थुंका पडेना कीं ॥ २१ ॥


पडेना कीं घर मोडलेंसें आढें । रोडकेसें घोडें हारपलें ॥ २२ ॥
हारपलें आतां पाहों कोणे वाटे । मोडताती कांटे आणी ठेंचा ॥ २३ ॥
ठेंचा तिडका द्याव्या मुमळीं सोसाव्या । रात्रंदिस शिव्या देती लोक ॥ २४ ॥


लोक लाता देती चुकतां मारिती । रिणकरी घेती वेंटाळूनि ॥ २५ ॥
वेंटाळूनी घेती मुलें घरभरी । अन्न पोटभरी मिळेना कीं ॥ २६ ॥
मिळेना कीं आन कोरडें भोजन । पोरें वणवण करिताती ॥ २७ ॥


करिताती चिंता तें अस्त्रीपुरुषें । आहा जगदीशें काय केलें ॥ २८ ॥
केलें थोर पाप सीणावरी सीण । संसार कठीण कळों आला ॥ २९ ॥
आला गेला लोक पाहेना विचार । पाहुण्यांनीं घर बुडविलें ॥ ३० ॥


बुडविलें घर ते आणा घालिती । येती काकुळती दोघेजणें ॥ ३१ ॥
दोघेंजणें होतीं बहुजणें जालीं । भीकेसी लागलीं दारोदारीं ॥ ३२ ॥
दारोदारीं दोघें मागती उसणें । रिणें केलें दुणें द्याया नाही ॥ ३३ ॥


नाहीं सूप पांटी पाळीं काथवटी । कांहीं हाटवटी मागतसे ॥ ३४ ॥
मागतसे मालें नागवणेसाठीं । म्हणे देशा कांठी घेउनी जावें ॥ ३५ ॥
जावें आतां देशीं कामा नये कदा । भोगाव्या आपदा किती म्हणूं ॥ ३६ ॥


किती म्हणूं सीण कराया हव्यास । चित्ता कासावीस रात्रंदिस ॥ ३७ ॥
करीतसे यत्‍न हो‍उनी येईना । आहा रे प्राक्तना काय करूं ॥ ३८ ॥
काय करूं आतां कर्म बळवंत । आम्हां भगवंत कोठें गेला ॥ ३९ ॥


गेला हा लौकीक आतां राहे कैसा । ऐसा दाही दिशा येकवटी ॥ ४० ॥
येकवटी सेण गोवर्‍या कराया । आणी पेटवाया शेणकाड्या ॥ ४१ ॥
शेणकाड्या तृण पानें पत्रावळी । कोण्ही नाहीं वळी गुरे खासा ॥ ४२ ॥


खासा वेगा ताणी खासा आणी पाणी । मागुती आइणी बोलतसे ॥ ४३ ॥
बोलतसे येक चालतसे येक । मागें पुढें लोक हांसताती ॥ ४४ ॥
हांसताती त्यांसी भांडावया उठतो । भांडतां तुटतो ठांई ठांई ॥ ४५ ॥


ठांई ठांई पोरें हागती मुतती । खोकिती वोकिती चहूंकडे ॥ ४६ ॥
चहूंकडे केर दाटला उकीर । नित्य करकर भांडणाची ॥ ४७ ॥
भांडतां भांडतां निघोनियां गेला । जाउनियां आला किती वेळ ॥ ४८ ॥


कितीवेळ व्यथा वांचला मागुता । व्यथेवरी व्यथा उद्‌भवल्या ॥ ४९ ॥
उद्‌भवल्या व्यथा रोग परोपरीं । तेथेंचे बाहेरी बैसतसे ॥ ५० ॥
बैसतसे चोर पोर जाला थोर । मारमारूं बुर काढीतसे ॥ ५१ ॥


काढीतसे बुर त्या दोघां जणांचा । पाळिला पोरांचा पोरवडा ॥ ५२ ॥
पोरवडा जाला कामा नाहीं आला । अदृष्ट-पोराला काय बोल ॥ ५३ ॥
बोलतां बोलतां लाविला गळफांस । अस्त्री कासावीस होत असे ॥ ५४ ॥


होत असे भंड त्या दोघां जणाचें । सुख संसाराचें बरें पाहा ॥ ५५ ॥
बरें पाहा मनीं जाणते लोकहो । वायांवीण मोहो धरीतसा ॥ ५६ ॥

धरीतसी मोहों देवेंवीण वायां । अंतीं आया बाया चावळतां ॥ ५७ ॥


चावळता कां रे देव वोळखाना । धुंडूनि काढाना कोठें तर्‍ही ॥ ५८ ॥
कोठें तर्‍ही देव पावेल निर्वाणी । नित्यनिरूपणीं संतसंगें ॥ ५९ ॥
संतसंगें दोष नासती विशेष । आणी जगदीश ठांई पडे ॥ ६० ॥


ठांई पडे तेव्हां जिणें धन्य जालें । सार्थकचि केलें संसाराचें ॥ ६१ ॥
संसाराचेंकोण शाश्वत मानावें । म्हणोनि जाणावें परब्रह्म ॥ ६२ ॥
निरंजनीं जन जनीं निरंजन । जाणती सज्जन विवेकाचे ॥ ६३ ॥


विवेकाचे जन मिळतां संकट । व्यर्थ खटपट ठांई ठांई ॥ ६४ ॥
ठांई ठांई बंडें मांडलीं पाषांडें । सांगती उदंडें पोटासाठी ॥ ६५ ॥
पोटासाठी रडे कष्टती बापुडे । त्यासी कोणेकडे परलोक ॥ ६६ ॥


परलोक घडे बहुत सायासें । तेथें ऐसें कैसें बाह्याकारें ॥ ६७ ॥
बाह्याकारें वांयां व्यर्थचि सीणावें । म्हणोनि जाणावें परब्रह्म ॥ ६८ ॥
परब्रह्म येक तें नव्हे आनेक । पाहातां विवेक नित्यानित्य ॥ ६९ ॥


नित्यानित्य जाणे तो साधु जाणावा । उगवील गोवा बहुतांचा ॥ ७० ॥
बहुतांचा बंद सोडी निरूपणें । उत्तमें लक्षणें विवेकाचीं ॥ ७१ ॥
विवेकाचें वाक्य विवेकी जाणई । ज्ञानी वोळखती पूर्ण ब्रह्म ॥ ७२ ॥


पूर्ण ब्रह्म येक निर्मळ निश्चळ । भ्रांतीचें आभाळ तेथें नाही ॥ ७३ ॥
तेथें नाहीं जन्ममरण यातना । पूर्ण सनातन वोळखतां ॥ ७४ ॥
वोळखतां देव वोळखतां भक्त । वोळखतां मुक्त होत असे ॥ ७५ ॥


होत असे मुक्त संसारापासूनि । देह विवरूनि तत्त्वज्ञानी ॥ ७६ ॥
तत्त्वज्ञानीं जरी तत्त्वें तत्व झडे । तरी ठांई पडे परब्रह्म ॥ ७७ ॥
परब्रह्म येक नित्य निराकार । धरिजे जोजार मूळमाया ॥ ७८ ॥


मूळमाया देव चंचळ ईश्वर । विधीहरीहर तेथूनियां ॥ ७९ ॥
तेथूनियां पंचभूतें हें निर्माण । उत्पत्तिलक्षण इच्छारूप ॥ ८० ॥
इच्छारूप वृत्ती कल्पना कामना । जया पुनः पुन्हा गर्भवास ॥ ८१ ॥


गर्भवास जाण विवेकें नासती । विवेकी आसती जन्म नाहीं ॥ ८२ ॥
जन्म नाहीं ऐसें कैसेंनि जाणावें । विवेकें बाणावें समाधान ॥ ८३ ॥
समाधान जालें मीपण शोधीतां । वस्तूसी बोधितां वस्तुरूप ॥ ८४ ॥


वस्तु रूप नाहीं वस्तु नाम नाहीं । आकारचि नाहीं विवंचिता ॥ ८५ ॥
विवंचावें महावाक्याचें अंतर । नित्य निरंतर जैसें तैसें ॥ ८६ ॥
तैसेंचि असावें मीपण सांडूनी । पाहों जातां मनीं मन नाहीं ॥ ८७ ॥


मन नाहीं तेथें उन्मनही नाहीं । आतां कांहीं कांहीं उमजलें ॥ ८८ ॥
उमजलें मज मीच आडळेना । मीपणें कळेना सर्व कांहीं ॥ ८९ ॥

सर्व कांहीं मिथ्या मीपणही गेलें । आपण राहिलें पूर्णपणें ॥ ९० ॥


पूर्ण बोध जाला संदेह तुटला । संसारी सुटला येणें रीती ॥ ९१ ॥
येणें रीती आतां समाधान जालें । शरीर लागलें भजनासी ॥ ९२ ॥
भजन रामाचें त्रैलोक्य पावन । करितो चिंतन शूळपाणी ॥ ९३ ॥


शूळपाणी चिंती तें करा चिंतन । माझें तनमन दाशरथी ॥ ९४ ॥
दाशरथी देव देवांचा कैपक्षी । सर्व काळ रक्षी भक्तजना ॥ ९५ ॥
भक्तजन लीन जाले रामपदीं । सज्जन संवादीं विवरतां ॥ ९६ ॥


विवरतां जड चंचळ निश्चळ । तुटे खळखळ मीपणाची ॥ ९७ ॥
मीपण हें रामपदीं निवेदिलें । समाधान जालें रामदासीं ॥ ९८ ॥


संताचे संगती काय प्राप्त होतें । तें आतां निरुतें सांगईन ॥ १ ॥
सांगईन परी मानसीं धरावें । मग उद्धरावें संवसारीं ॥ २ ॥
संवसारीं सार जया नाश नाहीं । तेंचि पडे ठांई संतसंगें ॥ ३ ॥


संतसंगें तुटे जननीजठर । दुस्तर संसार मायाजाळ ॥ ४ ॥
मायाजाळ तुटे तरी देव भेटे । संतसंगें आटे भवसिंधु ॥ ५ ॥
भव भयानक बुडवी सकळां । त्याहूनी वेगळा संतसंग ॥ ६ ॥


संतसंगें साधीं असाध्य वस्तूसी । जेथें अहंतेसी ठाव नाहीं ॥ ७ ॥
ठाव नाहीं जेथें जावया इतरां । अभाविकां नरां पापबुद्धी ॥ ८ ॥
पापबुद्धि झडे संतांचे संगती । नाहीं अधोगती गर्भवास ॥ ९ ॥


गर्भवास संतसंगें मुक्त होय । वेगीं धरीं सोय आलया रे ॥ १० ॥
आलया संसारीं स्वहित विचारीं । येकभावें धरें संतसंग ॥ ११ ॥
संतसंग धरी धन्य तो संसारीं । बोलिले श्रीहरि भागवतीं ॥ १२ ॥


भागवतगीतासार निरूपण । त्याचें विवरण संतसंगें ॥ १३ ॥
संतसंगें कळे सर्व शास्त्रभाग । आणी ज्ञानयोग अप्रयासें ॥ १४ ॥
प्रयासें साधितां कदा नये हाता । तें लाभे तत्वता साधुसंगें ॥ १५ ॥


साधूचेनि संगें अलभ्याचा लाभ । मुक्ति हे सुल्लभ होत आहे ॥ १६ ॥
आहे येक देव परी तो कळेना । जयासी मिळेना संतसंग ॥ १७ ॥
संतसंग नाहीं जयालागीं जनीं । तया कां जननी प्रसवली ॥ १८ ॥


प्रसवली माता शीणचि उरला । पुत्र नाहीं जाला हरिभक्त ॥ १९ ॥
हरिभक्त नर वंशाचें मंडण । दोषाचें खंडण करीतसे ॥ २० ॥
करितसे भक्ती संताचे संगती । सायुज्यता मुक्ती पावावया ॥ २१ ॥


पावावया मुक्ती हरीचें भजन । श्रवण मनन सर्वकाळ ॥ २२ ॥
सर्वकाळ होय सार्थक श्रवणें । ब्रह्मनिरूपणें संतसंगें ॥ २३

संतसंगें ब्रह्मपद वोळखावें । विवेकें पावावें निरंजना ॥ २४ ॥


निरंजना जातां नाहीं जन वन । अंतराळीं गमन येकायेकी ॥ २५ ॥
येकायेकी देव निर्मळ निश्चळ । आतुडे प्रांजळ दुजेंवीण ॥ २६ ॥
दुजेंवीण देव येकला येकट । उभा घनदाट मागें पुढें ॥ २७ ॥


मागें पुढें सर्व देवांचा नायक । सांपडे विवेक जालियानें ॥ २८ ॥
जालियानें कृपा संतसज्जनाची । मग विवेकाची वाट फुटे ॥ २९ ॥
वाट अवघड पाहातां दिसेना । जेथें नाहीं मना समागम ॥ ३० ॥


समागमें जातां वाटचि फुटेना । संशयो तुटेना बहुविध ॥ ३१ ॥
बहुबिध पंथ कोण तो धरावा । दुजेपणें देवा पाविजेना ॥ ३२ ॥
पाविजेना देव संतसंगेंवीण । मार्ग हा कठीण विवेकाचा ॥ ३३ ॥


विवेकाचा मार्ग विवेकें चालावा । मनाचा त्यागावा सर्वसंग ॥ ३४ ॥
संगत्याग करी पावसी श्रीहरी । परी येक धरी संतसंग ॥ ३५ ॥
संतसंगेंवीण त्याग हा घडेना । श्रीहरी पडेना कदा ठांई ॥ ३६ ॥


ठाव सज्जनाचा सज्जन जाणती । तेथें नाही गती मीपणाची ॥ ३७ ॥
मीपणाची गती संगाचें लक्षण । ठाउकी हे खूण सज्जनासी ॥ ३८ ॥
सज्जनाचें वर्म सज्जना आतुडे । इतरां कुवाडें मायाजाळ ॥ ३९ ॥


मायाजाळ पाहों जातां आडळेना । सर्वथा कळेना न पाहतां ॥ ४० ॥
पाहातां संसार मायिक वेव्हार । परी निरंतर लागलासे ॥ ४१ ॥
लागला दिसेना परी निरसेना । मायिक वासना साच जाली ॥ ४२ ॥


साच जाली असे विवेकें निरसे । निरसोनि वसे जवळीच ॥ ४३ ॥
जवळीच आहे अंतरीं चोरटा । आतां कोणें वाटा धांवसील ॥ ४४ ॥
धांवसील परी वासना सरेना । सर्वहा मरेना साधुवीण ॥ ४५ ॥


साधुविणें प्राणी पडती आटणीं । तपीं तीर्थाटणी नानाकर्मी ॥ ४६ ॥
नानाकर्मी देव चुकोनी राहिला । सज्जनीं पाहिला अनुभवें ॥ ४७ ॥
अनुभव सर्व देहीं वेगळाले । कोण जाणे भले संतजन ॥ ४८ ॥


संतजन कोणे परी वोळखावे । कैसे ते जाणावे संतजन ॥ ४९ ॥
संतांची वोळखी साधु वोळखेल । येर भांबावेल मायाधारी ॥ ५० ॥
मायाधारी प्राणी जवळी चुकले । नाहीं वोळखिले संतजन ॥ ५१ ॥


संतजन कोण कैसी वोळखण । तेंचि निरूपण सांगितलें ॥ ५२ ॥
सांगितलें आहे मागें थोरथोरीं । तेंचि अवधारी आलया रे ॥ ५३ ॥
आलया रे साधु जाणावा कवणें । तयाचीं लक्षणें असंख्यातें ॥ ५४ ॥


असंख्यातें परी वोळखीकारणें । साधु धूर्तपणें सारिखाची ॥ ५५ ॥
सारिखाची दिसे जनाचियेपरी । परी तो अंतरीं वेगळाची ॥ ५६ ॥
वेगळाची ज्ञानें पूर्ण समाधानें । स्वस्वरूपीं मनें वस्ती केली ॥ ५७ ॥


वस्ती केली मनें निर्गुणें सर्वदा । मीपणें आपदा तया नाहीं ॥ ५८ ॥
तया नाहीं काम तया नाहीं क्रोध । तया नाहीं खेद स्वार्थबुद्धी ॥ ५९ ॥
बुद्धि निश्चयाची स्वरूपीं जयाची । कल्पना ठांईची निर्विकल्प ॥ ६० ॥


निर्विकल्प मदमत्सर सारिला । आणि संहारिला लोभदंभ ॥ ६१ ॥
दंभ हा लौकिकीं विवेकें सारिला । दूरी वोसंडिला अहंकार ॥ ६२ ॥
अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता हे दुरी मोकलीली ॥ ६३ ॥


मोकलिली भ्रांती शरीरसंपत्ती । वैभव संतती लोलंगता ॥ ६४ ॥
लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनाचीं ॥ ६५ ॥
सज्जनलक्षणें सांगेन पुढती । अथीं चित्तवृत्ती लंचावली ॥ ६६ ॥


लांचावली वृत्ती सज्जन सांगतां । होय सार्थकता जयाचेनी ॥ ६७ ॥
जयाचेनि ज्ञानें तरती अज्ञानें । साधु समाधानें समाधानी ॥ ६८ ॥
समाधान शांती क्षमा आणी दया । रंका आणि राया सारिखाचि ॥ ६९ ॥


सारिखाचि बोध तेथें नाही खेद । सर्वांसी अभेद सर्वकाळ ॥ ७० ॥
सर्वकाळ गेला श्रवणमननें । सत्क्रियाभजनें हरिभक्ती ॥ ७१ ॥
हरिभक्ती करी जन तरावया । स्वधर्म विलया जाऊं नेदी ॥ ७२ ॥


जाऊं नेदि भक्ती जाऊं नेदी ज्ञान । अनुतापीं मन निरंतर ॥ ७३ ॥
निरंतर भाव सगुणभजन । येणें बहुजन उद्धरती ॥ ७४ ॥
उद्धरती जन करितां साधन । क्रियेचें बंधन आचरतां ॥ ७५ ॥


आचरतां साधुजना होय बोधु । लागतसे वेधु भक्तिभावें ॥ ७६ ॥
भक्तिभावें देव प्रतिष्ठापूजन । कथानिरूपण महोत्साव ॥ ७७ ॥
महोत्साव साधु भक्तीचें लक्षण । करी तीर्थाटन आदरेंसीं ॥ ७८ ॥


आदरेंसीं विधी करणें उपाधी । लोकिकीं सुबुद्धी लागावया ॥ ७९ ॥
लागावया भावें सत्क्रियाभजन । करितो सज्जन मुक्तिदाता ॥ ८० ॥
मुक्तिदाता साधु तोचि तो जाणावा । जेणें संपादावा लोकाचार ॥ ८१ ॥


लोकाचार करी तो जना उद्धरी । ज्ञाता अनाचारी कामा नये ॥ ८२ ॥
नये नये निंदूं जनीजनार्दन । म्हणोनि सज्जन क्रियावंत ॥ ८३ ॥
क्रियावंत साधु विरक्त विवेकी । तोचि तो लौकिकीं मान्य आहे ॥ ८४ ॥


मान्यता सत्क्रिया लौकिक सोडील । तोचि उद्धरेल जन नाहीं ॥ ८५ ॥
जना नाहीं मान्य तो सर्व अमान्य । म्हणोनियां धन्य क्रियावंत ॥ ८६ ॥
क्रियाभ्रष्ट तेणें लौकिकां सोडावें । आणी वसवावें ब्रह्मारण्य ॥ ८७ ॥


ब्रह्मारण्य सेवी तो साधु येकला । जना नाहीं आला उपेगासी ॥ ८८ ॥
उपेगासी येणें जना पूर्णपणें । तयाचीं लक्षणें निरोपीलीं ॥ ८९ ॥
निरोपीलें येणें लक्षणें जाणावा । साधु वोळखावा मुमुक्षूनें ॥ ९० ॥


मुमुक्षूनें गुरु क्रियाभ्रष्ट केला । तरी अंतरला दोहीं पक्षीं ॥ ९१ ॥
दोहीं पक्षीं शुद्ध तया ज्ञानबोध । येर ते अबद्ध अनाचारी ॥ ९२ ॥
अनाचार करी कोण आहे जनीं । परी निरूपणीं बोलिजेतें ॥ ९३ ॥


बोलिजे साचार सत्य निरूपणीं । घडे ते करणीं सुखें करूं ॥ ९४ ॥
करूं नये कदा मिथ्यानिरूपण । करिता दूषण लागों पाहे ॥ ९५ ॥
पाहें पाहें बापा सत्य ते शोधूनी । ठाकेना म्हणोनि निंदूं नको ॥ ९६ ॥


निंदूं नको शास्त्र निंदूं नको वेद । तरीच स्वानंद पावसील ॥ ९७ ॥
पावसील राम जीवांचा विश्राम । अहंतेचा श्रम सांडितांची ॥ ९८ ॥
सांडितां विवेकें मिथ्या अभिमान । तरी समाधान पावसील ॥ ९९ ॥
पावसील गती शुद्धनिरूपणें । रामदास म्हणे क्षमा करीं ॥ १०० ॥


उपदेशपद्धती आतां सांगईन । होईं सावधान आलया रे ॥ १ ॥
आलया रे सांग तूं कोण आहेसी । वेगें आपणासी ठांई पाडी ॥ २ ॥
ठांई पाडी तुज तूंचि चुकलासी । देहाचा धरिसी अभिमान ॥ ३ ॥


अभिमान देहीं कोण्या आवेवाचा । पांचा पंचकांचा स्थूळ देह ॥ ४ ॥
स्थूळ देह दृश्य याचा तूं जाणता । देह मी म्हणतां जीवदशा ॥ ५ ॥
जीवदशा गेली साक्षत्वें वर्ततां । ईश्वरु तत्वता याचें नांव ॥ ६ ॥


नांवरूप देहीं साक्षी तो विदेही । या विवेकें नाहीं देहबुद्धी ॥ ७ ॥
देहबुद्धी गेली या स्थूळ देहाची । उरी संदेहाची लिंगदेह ॥ ८ ॥
लिंगदेहीं मन वासनेची वृत्ती । होतसे निवृत्ती साक्षरूपें ॥ ९ ॥
साक्षरूपें पांच पंचकें राहिलीं । जाणोनि सांडिलीं कर्णादिकें ॥ १० ॥


कर्ण प्राण आणी विषयपंचक । इंद्रियदशक पंचवीस ॥ ११ ॥
पंचवीस तत्वें या लिंगदेहाचीं । साक्षी वेगळाचि अनुभवें ॥ १२ ॥
अनुभवें साक्षी स्थूळसूक्ष्माचा । जागृतीस्वप्नाचा जाणता तूं ॥ १३ ॥


जाणता तूं कोण सांग वोळखण । नेणें मी आपण आपणासी ॥ १४ ॥
आपणासी नेणें स्वामीनें सांगवें । अज्ञान जाणावें रूप तुझें ॥ १५ ॥
तुझें तूंचि बा रे नेणें म्हणतोसी । तेंचि निश्चयेंसी रूप तुझें ॥ १६ ॥


तुझें रूप तुज दृश्य होत आहे । नेणपण पाहे साक्षरूप ॥ १७ ॥
साक्षरूप मज कळेना म्हणसी । तो तूं निश्चयेंसी वेगळाची ॥ १८ ॥
वेगळाचि तींही देहाविलक्षण । वर्ततो आपण साक्षरूपें ॥ १९ ॥


साक्षरूप सर्व पदार्थ जाणता । तो कांहीं तत्वता आत्मा नव्हे ॥ २० ॥

आत्मा नव्हे जाण जाणे अंतःकर्ण । नाहीं जाणपण आत्मरूपीं ॥ २१ ॥
आत्मरूप मन बुद्धी अगोचर । आठव विसर जेथें नाही ॥ २२ ॥


जेथें नाही वृत्ति सर्वहि निवृत्ती । जाणती नेणती वृत्ति बापा ॥ २३ ॥
वृत्तिरूप आत्मा हें कई घडावें । तेव्हां विघडावें निवृत्तीसी ॥ २४ ॥
निवृत्ती उन्मनी निःशब्द विज्ञान । ऐसें समाधान अनिर्वाच्य ॥ २५ ॥


अनिर्वाच्य तेथें नाहीं जाणपण । आपुलें आपण पुरातन ॥ २६ ॥
पुरातन येक प्रपंच मायिक । मिथ्याचि अनेक भासमात्र ॥ २७ ॥
भासमात्र कांहीं नसोनियां आहे । विचारुनि पाहें अनुभवें ॥ २८ ॥


अनुभवेंवीण उठे जाणपण । जाणपणें शीण वाउगाची ॥ २९ ॥
वाउगाची शीण करीतसे मन । आत्मा ज्ञानघन म्हणोनियां ॥ ३० ॥
म्हणोनियां मुळीं अज्ञानची नाहीं । तेथें ज्ञान काई वाउगेंची ॥ ३१ ॥


वाउगेंची ज्ञान मनाची कल्पना । निर्विकल्प जाणा कल्पूं पाहे ॥ ३२ ॥
कल्पूं पाहे मन कल्पनाविषय । तरी आत्मा काय विषयांऐसा ? ॥ ३३ ॥
ऐसा नव्हे आत्मा मनासी नाकळे । मनचि मावळे पाहों जातां ॥ ३४ ॥


पाहोंजातां त्यासी क्षयो पाहत्यासी । म्हणोनि मनासी अगोचर ॥ ३५ ॥
अगोचर मना तें कैसें पाहावें । मीपणासी ठावें कदा नव्हे ॥ ३६ ॥
नव्हे जाणीजेसें ऐसेंचि जाणावें । मग होय ठावें समाधान ॥ ३७ ॥


समाधान तें तूं वाक्य तत्वमसी । सोहं हंसा ऐसी मात आहे ॥ ३८ ॥
पाहे अहं ब्रह्म ऐसेंचि वचन । ब्रह्म सनातन तूंचि बापा ॥ ३९ ॥
तूंचि येक ब्रह्म येर सर्व भ्रम । दृढ धरीं वर्म अंतरींचें ॥ ४० ॥


अंतरींचें वर्म अंतरीं धरावें । विचारें करावें दृढोत्तर ॥ ४१ ॥
दृढोत्तर होय श्रवणमननें । अद्वैतचि मनें विवरावें ॥ ४२ ॥
विवरावें जरी भक्तीचें लक्षण । वैराग्य तें कोण कैसें आहे ॥ ४३ ॥


आहे भक्ती ऐसी विवेकें जाणावी । आवडी धरावी शाश्वताची ॥ ४४ ॥
शाश्वताची प्रीति विषयीं विरक्ति । नाशिवंत चित्तीं जाणोनियां ॥ ४५ ॥
जाणोनियां सर्व नाशवंत ऐसें । शाश्वतीं विश्वासे मन बुद्धी ॥ ४६ ॥


बुद्धीचा निश्चयो स्वरूप जाहाला । प्राणी विश्वासला स्वस्वरूपीं ॥ ४७ ॥
स्वरूपीं आसक्ति याचें नांव भक्ति । पाहातां विभक्ति जेथें नाहीं ॥ ४८ ॥
जेथें नाहीं देहबुद्धीचें अज्ञान । तया नांव ज्ञान बोलिजेतें ॥ ४९ ॥


बोलिजेतें ज्ञान सर्वसाक्षभूत । जाणावें अद्वैत तेंचि ज्ञान ॥ ५० ॥
ज्ञान आणि भक्ति येकचि असती । वैराग्याची स्थिती बोलिजेल ॥ ५१ ॥
बोलिजे वैराग्य त्यागाचें लक्षण । साक्षी विलक्षण जाणोनियां ॥ ५२ ॥


जाणोनी मायिक सर्वहि त्यागिलें । मन सुखावलें संगत्यागें ॥ ५३ ॥
संगत्याग केला निःसंग राहिला । सर्वहि येकला येकरूप ॥ ५४ ॥
येकरूप जाले भक्ति आणि ज्ञान । वैराग्यहि जाण येकरूप ॥ ५५ ॥


येकरूप जाले भक्ति आणि ज्ञान । बुडालें साधन वैराग्याचें ॥ ५६ ॥
वैराग्यावांचूनि सर्व खंडे ज्ञान । त्यागाचें लक्षण तेथें नाही ॥ ५७ ॥
नाही भक्ति भाव सगुणाच्या ठाईं । शब्दज्ञान काई बोलोनियां ॥ ५८ ॥


बोलोनियां मुखें तैसी क्रिया करी । धन्य तो संसारीं ब्रह्मज्ञानी ॥ ५९ ॥
ब्रह्मज्ञानी भला वर्तणुकेपासीं । कोरड्या शब्दासी कोण पुसे ॥६० ॥
कोण पुसे बापा ज्ञान हें शाब्दिक । क्रिया अलोलीक सत्य जाण ॥ ६१ ॥


सत्य जाण भक्ति शरीरें करावी । आवडी धरावी सगुणाची ॥ ६२ ॥

सगुणीं आदरें देह झिजवावें । भजन करावें नवविधा ॥ ६३ ॥
नवविधा खूण श्रवणकीर्तन । नामाचें स्मरण सर्वकाळ ॥ ६४ ॥


सर्वांचे जीवन तें पादसेवन । करावें पूजन यथासांग ॥ ६५ ॥
यथासांग पूजा देवाब्राह्मणांची । प्रीती वंदनाची सर्वकाळ ॥ ६६ ॥
सर्वकाळ दास्य मानसीं आवडे । सख्यचि रोकडें सर्वांभूतीं ॥ ६७ ॥


सर्वांभूतीं मन आत्मनिवेदन । ऐसें हें भजन नवविधा ॥ ६८ ॥
नवविधा भक्ति हा देह चालतां । करावी सर्वथा सर्वभावें ॥ ६९ ॥
सर्वभावें सदा सगुणीं भजावें । कोरडें त्यागावें शब्दज्ञान ॥ ७० ॥


शब्दज्ञान भक्ति संसारीं आसक्ती । त्या नांव विभक्ती सत्य जाण ॥ ७१ ॥
सत्य जाण मनें आधार घेतला । सुखें सुखविला विषयांच्या ॥ ७२ ॥
विषयांचें सुख चोरूनि अंतरीं । त्याग दुराचारी उच्छेदीतो ॥ ७३ ॥


उच्छेदित आहे भक्ति सगुणाची । वाट साधनाची मोडतसे ॥ ७४ ॥
मोडतो आचार कर्मकुळाचार । करी भ्रष्टाकार पापरूपी ॥ ७५ ॥
पापरूपी नर जाणावा साचार । करी येकंकार शब्दज्ञानें ॥ ७६ ॥


शब्दज्ञानगाथा अहंतेच्या माथा । तेणें तो सर्वथा आवरेना ॥ ७७ ॥
आवरेना तोंडीं धरितां पाषांडी । वेदाज्ञाहि मोडी अंगबळें ॥ ७८ ॥
तोडबळें बापा क्रिया न संडावी । आसक्ति दंडावी वीतरागें ॥ ७९ ॥


वीतरागें मन मोकळें करावें । सुख न धरावें संसाराचें ॥ ८० ॥
संसारांचें सुख नाशवंत आहे । जाईजणें पाहे विचारूनी ॥ ८१ ॥
विचारूनि पाहीं आसक्ती मनाची । दुर्दशा ज्ञानाची करूं नको ॥ ८२ ॥


करूं नये मुक्तक्रियेचा निश्चयो । तेणें होतो क्षयो साधनाचा ॥ ८३ ॥
साधन सांडितां सिद्धपण गेलें । साधनेंसीं भलें सिद्धपण ॥ ८४ ॥
सिद्धपण अंगीं आदळों नेदावें । जाणपण द्यावें सोडूनियां ॥ ८५ ॥


सोडूनी जाणीव जाणोनि नेणता । सिद्धपणें स्वता साधक तो ॥ ८६ ॥
साधक तो आहे ब्रह्माविष्णुहर । साधनीं तत्पर सर्वकाळ ॥ ८७ ॥
सर्वकाळ त्याग करूनि उदास । योगीये तापस दिगंबर ॥ ८८ ॥


दिगंबर हर साधनीं तत्पर । त्याहूनि हे थोर जीव काय ? ॥ ८९ ॥
काय ते चुकले उदासीन जाले । त्याहूनि हे भले शब्दज्ञानी ? ॥ ९० ॥
शब्दज्ञानी भला तोचि तो जाणावा । स्वयें पालटावा जालेपणें ॥ ९१ ॥


जालेपणें भावें भजावें सगुणा । भक्ति उपासना जपध्यान ॥ ९२ ॥
जपध्यान मन भोगीं उदासीन । स्वधर्मरक्षण यथाशक्ति ॥ ९३ ॥
शक्तीहूनी वाड ज्ञान बोलों जये । सांडूं नये सोय सगुणाची ॥ ९४ ॥


सगुणाची सोय सांडूं नये कदा । तीर्थक्षेत्रें सदा आवडावीं ॥ ९५ ॥
आवडावें सदा स्वयें निरूपण । श्रवणमनन निजध्यास ॥ ९६ ॥
निजध्यासें होय अंतरीचा त्याग । बाह्य वीतराग उदासीन ॥ ९७ ॥


उदासीन वृत्ति कोठें गुंडाळेना । उपाधी जडेना बाह्याकारें ॥ ९८ ॥
बाह्य‍अभ्यंतरीं त्याग निरंतरीं । वैराग्य यापरी आचरावें ॥ ९९ ॥
आचरावें कर्म ज्याचा जो स्वधर्म । आणि नित्यनेम साधनाचा ॥ १०० ॥
साधनाची वाट वोस पाडूं नये । बोलावी हे सोय निरूपणीं ॥ १०१ ॥


निरूपणीं सत्य तेंचि प्रतिष्ठावें । मग आचरावें यथाशक्ति ॥ १०२ ॥
शक्तिसार स्वयें जैसा आचरतो । तेचि प्रतिष्ठीतो मूढ जन ॥ १०३ ॥
मूढ जन तरे साधनीं लागतां । पाविजे अनंता भक्तिपंथें ॥ १०४ ॥
भक्तिपंथें जातां होय सायुज्यता । निश्चयो तत्वता दास म्हणे ॥ १०५ ॥



पृथ्वी आप तेज वायु तें आकाश । ऐसें सर्व दृश्य नासिवंत ॥ १ ॥
नासिवंत सृष्टि पाहे ज्ञानदृष्टी । सांगतो मी गोष्टी शास्त्रमतें ॥ २ ॥
शात्रमतीं सृष्टि प्रळय बोलिला । विचारें पाहिला संतजनीं ॥ ३ ॥


संतजन नित्यानित्य विचारूनी । सत्य वोळखोनि सुखी जाले ॥ ४ ॥
सुखी जाले संत शोधितां अनंत । कल्पनेचा प्रांत परब्रह्म ॥ ५ ॥
परब्रह्म संतसंगें वोळखावें । बोधें विवरावें स्वस्वरूपीं ॥ ६ ॥


स्वस्वरूपीं पंचभूतें नासिवंत । देव तो शाश्वत सत्य जाण ॥ ७ ॥
सत्य मिथ्या ऐसा करावा विचार । सत्याचा निर्धार निःसंदेह ॥ ८ ॥
निसंदेह भक्ति केल्या होय मुक्ति । दास म्हणे युक्ति सावधान ॥ ९ ॥


सावधान आतां हे वृत्ति करावी । भक्ति वोळखावी नवविधा ॥ १० ॥
नवविधा भक्ति सांगईन आतां । श्रवणीं दुश्चिता राहों नको ॥ ११ ॥
राहों नको कदा श्रवणावांचूनी । सर्वकाळ मनीं विचारणा ॥ १२ ॥


विचारणा करीं श्रवणमनन । ध्यासें समाधान पाविजेतें ॥ १३ ॥
पाविजेतें सर्व केलिया श्रवण । भक्तीचें लक्षण हेंचि बापा ॥ १४ ॥
हेचि बापा भक्ति प्रथम जाणावी । दुजी वोळखावी हरीकथा ॥ १५ ॥


हरीकथा भक्ति थोर कलीयुगीं । कीर्तनाचे रंगीं देव आहे ॥ १६ ॥
देव आहे सदा तिष्ठत कीर्तनीं भक्ति श्रेष्ठ जनीं हरिकथा ॥ १७ ॥
करीकथा भक्ति श्रवण कीर्तन । येणें बहुजन उद्धरती ॥ १८ ॥
उद्धरले श्रोते वक्ते नेणों किती । दृढ धरा चित्तीं हरिकथा ॥ १९ ॥


कथानिरूपण श्रवण करावें । येणें उद्धरावें संवसारीं ॥ २० ॥
संसारीं सुटिजे केल्यानें श्रवण । कदा विस्मरण पडों नये ॥ २१ ॥
पडों नये भ्रांति नामस्मरणाची । त्रितीय भक्तीची वोळखण ॥ २२ ॥
वोळखण होय नाम उच्चारितां । उद्धार बहुतां रामनामें ॥ २३ ॥


रामनामें गती प्राणियांसी अंतीं । सांगे उमापती महादेव ॥ २४ ॥
महादेव स्वयें निवाला अंतरीं । म्हणोनियां धरा रामनाम ॥ २५ ॥
रामनामें मुक्त क्षेत्र वाराणसी । शिव उपदेशी रामनाम ॥ २६ ॥


रामनाम वाणी त्या नाहीं जाचणी । नामें बहु प्राणी उद्धरले ॥ २७ ॥
उद्धरले संत सज्जन शोधितां । हेंचि जाण आतां चौथी भक्ति ॥ २८ ॥
भक्ति सज्जनाची हे वाट मुक्तीची । येथें संदेहाची उरी नाहीं ॥ २९ ॥


उरी नाहीं दोषा सज्जन सेवितां । मुक्ति सायुज्यता पाठीं लागे ॥ ३० ॥
पाठी लागे मुक्ति संतांचे संगतीं । उद्धरले किती सांगों आतां ॥ ३१ ॥
सांगों आतां भक्ति पांचवी अर्चन । तें पूजाविधान विधियुक्त ॥ ३२ ॥


विधियुक्त पूजा देवांब्राह्मणाची । संतसज्जनांची सर्वकाळ ॥ ३३ ॥
सर्वकाळ गोडी अर्चनीं आवडी । येणें होय जोडी ईश्वराची ॥ ३४ ॥
ईश्वराची जोडी अर्चनें होतसे । बहु जन ऐसे उद्धरले ॥ ३५ ॥


उद्धरले देवांब्राह्मणा वंदितां । साहवी ते आतां भक्ति जाण ॥ ३६ ॥
भक्ति जाण सर सर्वां नमस्कार । घाली अधिकार पाहोनियां ॥ ३७ ॥
पाहोनियां सर्व आचरतां सुख । मूर्खपणें दुःख होत आहे ॥ ३८ ॥


आहे आतां भक्ति सातवी ते कैसी । सेवा सर्वस्वेसीं दास्य जाण ॥ ३९ ॥
दास्य करूनियां देवासी पावले । ऐसे उद्धरले नेणों किती ॥ ४० ॥
नेणों किती जन या रिती तरले । दास्यें उतरले भवसिंधु ॥ ४१ ॥


भवसिंधु नाहीं हरीच्या दासांसी । दासा हृषीकेशी उपेक्षीना ॥ ४२ ॥
उपेक्षीना देव हें सत्यवचन । अष्टमी ते जाण सख्य भक्ति ॥ ४३ ॥
सख्यत्व देवाचें भाग्येंवीण कैचें । सांगावें जीवीचें देवापासीं ॥ ४४ ॥


देवापासीं सुखदुःख तें सांगावें । कैवारी करावें ईश्वरासी ॥ ४५ ॥
ईश्वरें टाकितां संसारीचा भार । मग हा संसार सुखरूप ॥ ४६ ॥
सुखरूप भक्ति आठवी बोलिली । ऐसी गती जाली बहुतांसीं ॥ ४७ ॥


बहुतांचे भक्ति पावे नारायेण । नववें लक्षण सांगईन ॥ ४८ ॥
सांगईन भक्ति सर्वांमध्यें सार । पावती साचार मुक्ति जेणें ॥ ४९ ॥
मुक्ति जेणें होय ते भक्ति नवमी । जेथें नाना उर्मी मावळई ॥ ५० ॥


मावळे अज्ञान होय शुद्ध ज्ञान । आत्मनिवेदन भक्ति सार ॥ ५१ ॥
भक्ति सार आहे जेथें द्वैत राहे । संतसंगें लाहे निजभक्ति ॥ ५२ ॥
निजभक्ति जेथें विभक्ति नाढळे । ऐक्यरूपें कळे ज्ञान होतां ॥ ५३ ॥


ज्ञान होतां तुटे संसार बंधन । नाहीं समाधान ज्ञानेंवीण ॥ ५४ ॥
ज्ञानेवीण शीण सर्वथा नाथिला । नाहीं वोळखिला साच देव ॥ ५५ ॥
साच देव कळे संतांचे संगती । चुके अधोगती गर्भवास ॥ ५६ ॥


गर्भवास चुके यातना यमाची । जरी शाश्वताची सोय लागे ॥ ५७ ॥
सोय लागे मनीं तोचि धन्य जनीं । आत्मनिवेदनीं तदाकार ॥ ५८ ॥
तदाकार होणें आत्मनिवेदनें । मग येणें जाणें निरसलें ॥ ५९ ॥


निरसलें दृश्य विवेकें पाहतां । स्वरूपीं राहतां स्वरूपचि ॥ ६० ॥
स्वरूपाचि असे येर सर्व नासे । ऐसें हें विश्वासे गुरुमुखें ॥ ६१ ॥

गुरुवाक्यें ज्ञान होय समाधान । आत्मनिवेदन याचें नांव ॥ ६२ ॥


नांवरूप धरी ते मायासुंदरी । तये अभ्यंतरीं स्वस्वरूप ॥ ६३ ॥
स्वरूपाची प्राप्ती संताचे संगतीं । बोलिली हे भक्ति नवविधा ॥ ६४ ॥
नवविधा भक्ति केल्या होय मुक्ति । चळेना कल्पांतीं सायुज्यता ॥ ६५ ॥


सायुज्यता मुक्ती चिरंजीव आहे । येरी सर्व पाहे नासिवंत ॥ ६६ ॥
नासिवंत मुक्ति जाण चतुर्विधा । तया अनुवादा चित्त देई ॥ ६७ ॥
चित्त देईं येकी मुक्ति सलोकता । दुजी समीपता सत्य जाण ॥ ६८ ॥


सत्य जाण मुक्ति तिजी स्वरूपता । चौथी सायुज्यता मुक्ती जाण ॥ ६९ ॥
मुक्ती जाण बापा सर्व नासिवंत । मांडतां कल्पांत भस्म होती ॥ ७० ॥
भस्म होई मुक्ती सर्व कोणेपरी । तेही अवधारीं सांगईन ॥ ७१ ॥


सांगईन बापा तेथें चित्त द्यावें । मग तूं स्वभावें बुझसील ॥ ७२ ॥
बुझसिल आतां मुक्ति सलोकता । वैकुंठीं तत्वता ठाव होय ॥ ७३ ॥
ठाव हा स्वलोकीं तेचि मुक्ति येकी । दुजी समीप कीं समीपता ॥ ७४ ॥


समीपता मुक्ति समीप असावें । स्वरूपता व्हावें स्वरूपचि ॥ ७५ ॥
स्वरूप सगुण होइजे आपण । श्रीवत्सलांछन तेथें नाहीं ॥ ७६ ॥
नाहीं मुख्य रमा तेचि स्वरूपता । आतां सायुज्यता सांगईन ॥ ७७ ॥


सायुज्यता मुक्ति ज्ञानाचेनि द्वारें । आपण निर्धारें स्वस्वरूप ॥ ७८ ॥
स्वस्वरूपीं नाहीं पूर्वेंचें बंधन । तेथें मुक्ति कोण कासयासी ॥ ७९ ॥
कासयासी मुक्ति बंधनावांचूनि । मुक्तिदाता जनीं आपणची ॥ ८० ॥


आपणचि स्वयें अचळ अढळ । निर्मळ निश्चळ आपणची ॥ ८१ ॥
आपणचि होणें मुक्ति द्यावी कोणें । मुक्ति येंएं गुणें नासिवंत ॥ ८२ ॥
नासिवंत मुक्ति सज्जन जाणती । स्वरूपाची स्थिती अनिर्वाच्य ॥ ८३ ॥


अनिर्वाच्य ब्रह्मीं मुक्ति नासिवंता । प्रळयहि आतां सांगईन ॥ ८४ ॥
सांगईन आतां सृष्टीचा संव्हार । तेणें तूं निर्धार पावसील ॥ ८५ ॥
पावसील खूण निखळ निर्गुण । तेंचि निरूपण प्रळयाचें ॥ ८६ ॥


प्रळयाचे काळीं शत संवत्सर । अनावृष्टी थोर वोढवेल ॥ ८७ ॥
वोढवे प्रळय सूर्य बारा कळी । तेणें होय होळी वसुंधरा ॥ ८८ ॥
वसुंधरा बुडे प्रळय‍उदकीं । जालें येकायेकी जळमय ॥ ८९ ॥


जळमय जालें तें तेजें सोरखिलें । तेजे झोडपीलें समीरानें ॥ ९० ॥
समीर आकाशीं सर्व वितुळला । त्याचा नाश केला तमोगुणें ॥ ९१ ॥
तमोगुणा रज ग्रासूनियां जाय । रजोगुणा खाय सत्वगुणा ॥ ९२ ॥


सत्वगुणा माया माये मूळमाया । गुणसाम्य तिया निर्दाळील ॥ ९३ ॥
निर्दाळील गुणसाम्य तेंनिर्गुणीं ।ऐसी संहारणी विवेकाची ॥ ९४ ॥
विवेकें पाहातां सर्व सृष्टी नासे । तेथें लोक कैसे वांचतील ॥ ९५ ॥


वांचती ना लोक ते महाप्रळयीं । तेथें मुक्ती कायी साच होती ॥ ९६ ॥
साच होती मुक्ती हें कईं घडावें । सर्व विभडावें प्रळयानें ॥ ९७ ॥
प्रळयाचे अंतीं देवचि नासती । तेथें कैंच्या मुक्ती राहतील ॥ ९८ ॥


राहतील ज्ञानी आत्मनिवेदनीं । पूर्ण समाधानी स्वस्वरूपीं ॥ ९९ ॥
स्वस्वरूपीं ऐक्यरूप चिरंजीवी । जाणे अनुभवी अनुभवें ॥ १०० ॥
अनुभवी ज्ञानी तेचि समाधानी । आत्मनिवेदनी रामदास ॥ १०१ ॥


देवासी सांडूनि देऊळ पूजिती । लौकिकाची रीती काये सांगा ॥ १ ॥
काय सांगों आतां देखतदेखतां । देव पाहों जातां जेथें तेथें ॥ २ ॥
जेथें तेथें देव लोक वोळखेना । विचार पाहीना कांहीं केल्या ॥ ३ ॥


कांहीं केल्यां तरी देव सांपडेना । संसारें घडेना समाधान ॥ ४ ॥
समाधान नाहीं देवावांचूनियां । सर्व कर्म वाया निरर्थक ॥ ५ ॥
निरर्थक तीर्थें व्रतें तपें दानें । एका ब्रह्मज्ञानेंवांचूनियां ॥ ६ ॥


वांचूनियां ज्ञान तें पशुसमान । अज्ञानें पतन पाविजेतें ॥ ७ ॥
पाविजेतें दुःख विचार नसतां । कर्म करूं जातां कासाविस ॥ ८ ॥
कासाविस कर्में होइजे भ्रमिष्ट । देव सर्व श्रेष्ठ अंतरला ॥ ९ ॥


अंतरला देव सर्वांचें कारण । सर्व निःकारण सहजचि ॥ १० ॥
सहजचि जालें कर्मभोगें केलें । वाताहात जालें सर्व कांहीं ॥ ११ ॥
सर्वकांहीं नाहीं एका देवेंवीण । शाश्वताची खूण वेगळीच ॥ १२ ॥


वेगळीच खूण सज्जन जाणती । खुणेसी बाणती संतजन ॥ १३ ॥
संतजन बोधीं जाहले सज्जन । त्यांचा अनुमान दुरावला ॥ १४ ॥
दुरावला देव दुरी सांडूं नये । धरावा उपाय साधुसंग ॥ १५ ॥


साधुसंगें साधा सद्वस्तु विवेकें । तुम्हासी लौकिकें काय काज ॥ १६ ॥
काय काज आहे परलोकां जातां । लौकिक तत्वता इह लोकीं ॥ १७ ॥
इह लोकीं करा लोकसंपादणी । त्रैलोक्याचा धणी वोळखावा ॥ १८ ॥


वोळखावा देव नित्यनिरंजन । तया जन वन सारिखेंचि ॥ १९ ॥
सारिखेंचि ब्रह्म आहे सर्वां ठाईं । संतां शरण जाईं आलया रे ॥ २० ॥
आलया रे तुज देवचि कळेना । जेणें केले नाना सृष्टिभाव ॥ २१ ॥


सृष्टिभाव कोणें केले हें पाहावें । पाहोनि राहावें समाधानें ॥ २२ ॥
समाधान केलें संसार करितां । देवासी नेणतां जन्म गेला ॥ २३ ॥
जन्म गेला सर्व केला खटाटोप । उदंड आटोप आटोपिला ॥ २४ ॥


आटोपिला परें देव अंतरला । अभाग्या काशाला जन्मलासी ॥ २५ ॥
जन्मलासी वाया जननी कष्टली । नाहीं उद्धरीली कुळवल्ली ॥ २६ ॥
कुळाचें मंडण ब्रह्मज्ञानी जन । जया सनातन प्रगटला ॥ २७ ॥


प्रगटला देव जयाचे अंतरीं । धन्य सृष्टीवरी तोचि येक ॥ २८ ॥
तोचि येक धन्य ब्रह्मादिकां मान्य । निर्गुणीं अनन्य सर्वकाळ ॥ २९ ॥
सर्वकाळ गेला कथानिरूपणें । अध्यात्मश्रवणें निजध्यासें ॥ ३० ॥


निजध्यास जया लागला स्वरूपीं । जाले ब्रह्मरूपीं ब्रह्मरूप ॥ ३१ ॥
ब्रह्मरूप तेथें ब्रह्मचि नाडळे । विवेकानें गळे अहंभाव ॥ ३२ ॥
अहंभाव गळे ब्रह्म-अनुसंधानें । आत्मनिवेदनें अनन्यता ॥ ३३ ॥


अनन्यता जोडे ऐसे ज्ञाते थोडे । ज्यांचेनि निवडे सारासार ॥ ३४ ॥
सारासार पाहे तो साधु पुरता । जाणे अनन्यता भक्ती करूं ॥ ३५ ॥
भक्ति करूनियां मुक्ति पाविजेते । विवेकें आइतें ब्रह्मरूप ॥ ३६ ॥


ब्रह्मरूप जाले लौकिकीं वर्तले । साधु वोळखिले साधुजनीं ॥ ३७ ॥
साधुजनीं साधु ऐसा जाणिजेतो । इतराजनां तो चोजवेना ॥ ३८ ॥
चोजवेना लीळा कैसी अंतर्कळा । असोनि निराळा जनांमध्ये ॥ ३९ ॥


जनांमध्यें आहे जनांसी कळेना । जैसा आकळेना निरंजन ॥ ४० ॥
निरंजन जनीं कळेना असोनी । तैसा साधु जनीं निरंजन ॥ ४१ ॥
निरंजन नाहीं आणिला प्रचीती । तया जना गती कोण म्हणे ॥ ४२ ॥


कोण म्हणे धन्य ते प्राणी जघन्य । जयासी अनन्यभक्ती नाहीं ॥ ४३ ॥
भक्ती नाहीं मनीं त्या नांव अभक्त । संसारीं आसक्त जन्मवरी ॥ ४४ ॥
जन्मवरी लोभें सर्व स्वार्थ केला । अंतीं प्राणी गेला येकलाची ॥ ४५ ॥


येकलाचि गेला दुःख भोगूनियां । कन्यापुत्रजाया सांडूनियां ॥ ४६ ॥
सांडूनी स्वजन गेला जन्मोजन्मीं । अज्ञानाची उर्मी निरसेना ॥ ४७ ॥
निरसेना उर्मी अंतर्देहधर्मी । प्राणी परब्रह्मीं अंतरला ॥ ४८ ॥


अंतरला दूरी असोनि अंतरीं । तया कोण करी सावधान ॥ ४९ ॥
सावधान व्हावें आपलें आपण । सृष्टीचें कारण वोळखावें ॥ ५० ॥
वोळखावें ब्रह्म तेणें तुटे भ्रम । आणी मुख्य वर्म अज्ञानाचें ॥ ५१ ॥


अज्ञानाचें वर्म अंतरीं निरसे । जरी मनीं वसे विचारणा ॥ ५२ ॥
विचारें पाहातां सर्वत्रांचें मूळ । तेणें तें निर्मूळ ब्रह्म भासे ॥ ५३ ॥
ब्रह्म भासे ऐसें कदा म्हणों नये । परंतु उपाय श्रवणाचा ॥ ५४ ॥


श्रवणाचा अर्थ यथातथ्य काढी । ऐसा कोण गडी सावधान ॥ ५५ ॥
सावधान मन करूनी मनन । मनाचें उन्मन होत आहे ॥ ५६ ॥
होत आहे परी केलेंचि पाहिजे । विचारें लाहिजे मोक्षपद ॥ ५७ ॥


मोक्षपद कैसें कोणासी म्हणावें । विवेकें जाणावें हेंचि येक ॥ ५८ ॥
हेंचि येक बरें पाहातां सुटका । संसार लटिका बंधनाचा ॥ ५९ ॥
बंधनाचा भाव ज्ञानें केला वाव । मोक्षाचा उपाव विचारणा ॥ ६० ॥


विचारणा करी धन्य तो संसारीं । संदेह अंतरीं आडळेना ॥ ६१ ॥
आडळेना देहो कायसा संदेहो । नित्य निःसंदेहो संतजन ॥ ६२ ॥
संतजन जेथें धन्य जन तेथें । सार्थकचि होतें अकस्मात ॥ ६३ ॥


अकस्मात देव सांपडे उदंड । दृश्याचें थोतांड नाशिवंत ॥ ६४ ॥
नाशिवंत काय विचारें पाहावें । तें सर्व राहावें सांडूनियां ॥ ६५ ॥
सांडूनियां दृश्य आणि मनोभास । मग जगदीश वोळखावा ॥ ६६ ॥


वोळखावें तया असावें अनन्य । तरी संतमान्य होइजेतें ॥ ६७ ॥
होइजेतें कैसें ज्याचें त्यास कळे । जो कोण्ही निवळे मनामधें ॥ ६८ ॥
मनामधें मन जनांमधें जन । निर्गुणीं अनन्य निर्गुणचि ॥ ६९ ॥


निर्गुणचि नव्हे जो कोण्ही चांडाळ । त्यासी सर्वकाळ जन्ममृत्यु ॥ ७० ॥
जन्ममृत्ययमयातना दारुण । चुकवील कोण ज्ञानेंवीण ॥ ७१ ॥
ज्ञानेंवीण जिणें व्यर्थ दैन्यवाणें । वाचितो पुराणें पोटासाठी ॥ ७२ ॥


पोटासाठी लोकां करी नमस्कार । होतसे किंकर किंकराचा ॥ ७३ ॥
किंकराचा दास भूषण मिरवी । सृष्टीचा गोसावी वोळखेना ॥ ७४ ॥
वोळखेना देव वोळखेना भक्त । वोळखेना संत महानुभाव ॥ ७५ ॥


महानुभाव देव कांहींच कळेना । मन ही वळेना पुण्यमार्गे ॥ ७६ ॥
पुण्यमार्ग कैसा पाप आहे कैसें । कळेना विश्वासेंवीण कांहीं ॥ ७७ ॥
कांहीं तरी येक पाहावा विचार । कैसा पैलपार पाविजेतो ॥ ७८ ॥


पाविजेतो पार होतसे उद्धार । सर्व ही ईश्वर सन्निधानें ॥ ७९ ॥
संन्निधान ज्याचें ईश्वरीं सर्वदा । संसार आपदा तया नाहीं ॥ ८० ॥
तया नाहीं जन्ममरणाची बाधा । मिळाले संवादा संतांचिया ॥ ८१ ॥


संतांचिया गुणा जे गुणग्राहक । तया बाहीं नरक येरां बाधी ॥ ८२ ॥
बाधीतसे येरा सर्वहि संसार । ज्ञानी पैलपार उतरले ॥ ८३ ॥
उतरले पार सर्व मायिकाचा । धन्य विवेकाचा उपकार ॥ ८४ ॥


उपकार जाला थोर या शब्दांचा । मार्ग निर्गुणाचा सांपडला ॥ ८५ ॥
सांपडला मार्ग धन्य सांख्ययोग । फळासी विहंग पावे जैसा ॥ ८६ ॥
पावे जैसा पक्षी फळी अकस्मात । तैसा अकल्पित ज्ञानमार्ग ॥ ८७ ॥


ज्ञानमार्ग सर्व मार्गामधें श्रेष्ठ । बोलिले वरिष्ठ ठाईं ठाईं ॥ ८८ ॥
ठाईं ठाईं कर्म मांडूनि बैसती । तेणें कांहीं मुक्ती पाविजेना ॥ ८९ ॥
पाविजेना मुक्ती भक्तिवांचुनीयां । भक्तीवीण वायां गेले लोक ॥ ९० ॥


लोक गेले वायां भक्ती न करितां । देवासी नेणतां जाणपणें ॥ ९१ ॥
जाणपणें मूर्खें आणिलें जायाचें । जैसें भांडें कांचें मृत्तिकेचें ॥ ९२ ॥
मृत्तिकेचें भांडें वळेना वाकेना । सेवटीं तगेना कांहीं केल्या ॥ ९३ ॥


कांही केल्यां लोक करेना सार्थक । होय निरर्थक सर्व कांहीं ॥ ९४ ॥
सर्व कांहीं जातें प्रचीतेस येतें । भ्रमलें मागुतें मायाजाळीं ॥ ९५ ॥
मायाजाळ तुटे जरी देव भेटे । परिसेंसीं झगटे लोहो जैसा ॥ ९६ ॥


लोहो जैसा रूपें पालटे सर्वांगीं । तैसा जाण योगी योगीसंगें ॥ ९७ ॥
योग्याचे संगती सर्वकाळ योग । कैचा मा वियोग परब्रह्मीं ॥ ९८ ॥
परब्रह्मी लोक प्रत्यक्ष वागती । परी त्याची गती चोजवेना ॥ ९९ ॥
चोजवेना गती गुरुमुखेंवीण । रामदास खूण सांगतसे ॥ १०० ॥


अहो जना तुम्ही भजा निरंतर ।चुकती यातना संसारीच्या ॥ १ ॥
संसारीची माया सर्व वोरंगेल । देहे हा खंगेल अंतकाळीं ॥ २ ॥
अंतकाळीं करी कोण सोडवण । सोइरे पिशुन दुरावले ॥ ३ ॥


दुरावले सर्व आपुले पारिखे । तेथें कोण राखे जिवलग ॥ ४ ॥
जिवलगें जाती फिरोनिया घरा । मग तुज दारा पुत्र कैंचे ॥ ५ ॥
कैचे पुत्र जन आपुले पारिखे । सर्वहि सारिखे कळों आले ॥ ६ ॥


कळों आले परि आयुष्य वेचलें । चुकोनियां गेलें सर्व कांहीं ॥ ७ ॥
सर्व कांहीं होतें संचिलें वैभव । रात्रंदिस जीव लाउनियां ॥ ८ ॥
लाउनियां जीव जीवें मेळविलें । तें घरीं राहिंलें कांहीं ॥ ९ ॥


सर्व कांही नये तुज समागमें म्हणोनियां भ्रमें भुलों नको ॥ १० ॥
भुलों नको भ्रमें संसारीं आलया । कैसी आहे माया वोळखावी ॥ ११ ॥
वोळखावी माया आणि परब्रह्म । तेणें तुझा भ्रम नासईल ॥ १२ ॥


नासईल भ्रम श्रवण करितां । विचारें पाहतां सारासार ॥ १३ ॥
सारासार जंव नाहीं विचारणा । तंव तूं कारणा चुकलासी ॥ १४ ॥
चुकलासी देव देखतदेखतां । मुक्ती सायुज्यता अंतरली ॥ १५ ॥


अंतरली मुक्ती जाली अधोगती । निरंजन चित्तीं न धरितां ॥ १६ ॥
न धरितां दृढ सोय शाश्वताची । शीण वाउगाचि नाना कर्मीं ॥ १७ ॥
नानाकर्मी तुज काय प्राप्त जालें । उगवे पेरिलें निश्चयेंसीं ॥ १८ ॥


निश्चयेंसीं देव धुंडितां पाविजे । येर सर्व कीजे निरर्थक ॥ १९ ॥
निरर्थक देव नेणतां सर्वही । येथें कांहीं नाहीं अनुमान ॥ २० ॥
अनुमानें केलें तें तें व्यर्थ गेलें । प्रचीतीनें जालें समाधान ॥ २१ ॥


समाधान घडे सज्जनसंगतीं । चुके अधोगती गर्भवास ॥ २२ ॥
गर्भवास चुके सद्गुरु करितां । विवेकें धरितां नित्यानित्य ॥ २३ ॥
नित्यानित्य जंव नाहीं विचारीलें । तंव काय केलें आलया रे ॥ २४ ॥


आलया रे पुन्हां कासया सिणावें । विवेकें पाहावें मोक्षपद ॥ २५

मोक्षपद कैसें हेंचि विचारावें । श्रवण करावें निरंतर ॥ २६ ॥
निरंतर जेथें श्रवणमनन । निजध्यासें जाण साक्षात्कार ॥ २७ ॥


साक्षात्कार जंव सिद्ध पाविजेना । तरी हे यातना चुके केवीं ॥ २८ ॥
केवीं चुके जन्ममृत्यु अनुमानें । केलें संदेहानें कासावीस ॥ २९ ॥
कासावीस होतें समाधान जातें ।तें जोडे मागुतें विवरतां ॥ ३० ॥


विवरतां ब्रह्म जीव माया भ्रम । देवभक्त वर्म वोळखावें ॥ ३१ ॥
वोळखावें वर्म हें मीतूंपणाचें । नित्य निर्गुणाचें निरूपण ॥ ३२ ॥
निरूपणेंवीण जें कांहीं साधन । तेंचि तें बंधन निश्चयेंसीं ॥ ३३ ॥


निश्चयेंसी बरा करावा निवाडा । तत्वें तत्वझाडा । सप्रचीत ॥ ३४ ॥
सप्रचीत झाडा होतां मायिकांचा । मग कोण कैचा आपण तो ॥ ३५ ॥
आपण तो जाला विवेकानें केला । भ्रमचि उडाला सर्व कांहीं ॥ ३६ ॥


सर्व कांहीं कळे विवेकें निवळे । आपेंआप गळे मींतूंपण ॥ ३७ ॥
मीतूंपण कैचें कोठें आपणासी । होतें येके दिसीं हारपलें ॥ ३८ ॥
हारपलें जैसें आकाशीं आभाळ । तैसें तें केवळ सर्वकांहीं ॥ ३९ ॥


सर्व कांही मिथ्या प्रचीतीस येतें । निर्गुणानें होतें समाधान ॥ ४० ॥
समाधान जालें मीपण बुडालें । प्रबोधें उडालें सर्व कांहीं ॥ ४१ ॥
सर्वकांहीं नाहीं विवेकें पाहातां । बाणलें तें आतां पालटेना ॥ ४२ ॥


पालटेना ब्रह्मस्थिती हे आपुली । जरी कांहीं केली उठाठेवी ॥ ४३ ॥
उठाठेवी गेली शरीराच्या माथां । आपण तत्वता वस्तुरूप ॥ ४४ ॥
वस्तुरूप तो मी सज्जन सांगती । तीन्हि ही प्रचिती आणूनियां ॥ ४५ ॥


आणूनियां केला वस्तुचा निश्चय । आतां हा संशय कोण धरी ॥ ४६ ॥
कोण धरी मिथ्या साच सांगती । तीन्हि ही प्रचिती आणूनियां ॥ ४७ ॥
मीपणाचें मूळ शोधितां सुटलें । विवेकें तुटलें मायाजळ ॥ ४८ ॥


मायाजाळ जालें पांचाजणीं केलें । तें मज लाविलें कोणेपरी ॥ ४९ ॥
कोणेपरी कैसें येतें अनुमाना । साधकु दिसेना साध्य जाला ॥ ५० ॥
साध्य जाला बोधें जाहला साधक । तयासी बाधक कोण करी ॥ ५१ ॥


कोण करी सर्व तें तरी पाहावें । पाहोनि राहावें समाधानें ॥ ५२ ॥
समाधानकर्ता कोण सर्वधर्ता । कर्तृत्वाची वार्ता कोठें लागे ॥ ५३ ॥
कोठें लागे वार्ता कर्ता जगदीश । तया केवि दोष लागों शके ॥ ५४ ॥


लागों शके दोष हें कईं घडावें । सर्व केलें देवें हें तों खरें ॥ ५५ ॥
खरें आलें केलें देवाचिया माथां । मज काय आतां संबंधु हा ॥ ५६ ॥
संबंधु हा जाला या पांचा भूतांचा । अष्टधा मायेचा खेळ जाला ॥ ५७ ॥


खेळ ऐसा जाला प्रकृतीनें केला । लावितां मजला कोणेपरी ॥ ५८ ॥
कोण परी न्याय अन्याय सारिखा । म्हणोनियां देहा गुप्त जालों ॥ ५९ ॥
गुप्त जालों आतां पाहतां दिसेना । नये अनुमाना ब्रह्मादिकां ॥ ६० ॥


ब्रह्मादिकां माझा पडिला संदेहो । तुम्हीं कां वेडीं हो वोळखाना ॥ ६१ ॥
वोळखाना कर्ता कोणाला लाविता । शाहाणें दिसता ऐसे कैसे ॥ ६२ ॥
ऐसे कैसे तुम्ही येकाचें येकासी । लावितां कोणासी कर्तेपण ॥ ६३ ॥


कर्तेपण बरें शोधूनी पहारे । मग तुम्ही व्हारे कासावीस ॥ ६४ ॥
कासावीस जाले किती येक गेले । । कर्तृत्व बोलिलें निर्गुणासी ॥ ६५ ॥
निर्गुणासी गुण हें कईं घडावें । संदेहीं पडावें मीपणाचे ॥ ६६ ॥


तयावीण शीण कासया करिता । संदेह धरिता निर्गुणाचा ॥ ६७ ॥
निर्गुणाचा अंत पाहतां अनंत । तेथें अंतवंत लाऊं नका ॥ ६८ ॥
नका नका तुम्ही बोलों अनुमानें । तत्वें थानमानें बरीं शोधा ॥ ६९ ॥


बरें शोधूं जातां देव माया जीव । या तिघां कर्तृत्व आडळेना ॥ ७० ॥
आडळेना भूतीं कर्तृत्व पाहातां । कोणीकडे आतां धुंडाळावें ॥ ७१ ॥
धुंडाळावें परी कोठेंचि लागेना । कासावीस मना होत आहे ॥ ७२ ॥


होत असे परी तें पिंडीं पाहावें । देहें प्राणें जीवें किंवा ब्रह्में ॥ ७३ ॥
ब्रह्म निर्विकार त्या नाहीं आकार । जीव तो साचार अंश त्याचा ॥ ७४ ॥
त्याचा अंश देहेसमंध कल्पिलें । ब्रह्मांशानें केलें हें घडेना ॥ ७५ ॥


घडेना कीं प्राण कर्ता अप्रमाण । श्वासोच्छास जाण करणें त्याचें ॥ ७६ ॥
त्याचें करणें नव्हे स्थूल अचेतन । अंतःकरण मन जाणतेंचि ॥ ७७ ॥
जाणतेंचि परी तें काहीं करीना । वायो तो जाणेना कांहीं केल्या ॥ ७८ ॥


कांहीं केल्यां कर्ता ठांईंच न पडे । आतां कोणेकडे कर्तेपण ॥ ७९ ॥
कर्तेपण नाहीं येकाचे मस्तकीं । हें बरें विवेकीं वोळखावें ॥ ८० ॥
वोळखावें करणें आहे समस्तांचें । त्रिगुण भूतांचें विचारावें ॥ ८१ ॥


विचारावें जालें बहुतांचें केलें । तें मज लाविलें कोणेपरी ॥ ८२ ॥
कोणेपरी येकावीण येक घडे । कांहींच न घडे सर्वेविण ॥ ८३ ॥
सर्वत्रांचें केलें सर्वांस लागलें । तें तुम्ही लाविलें मज कैसें ॥ ८४ ॥


कैसें माझें रूप मज सांपडेना । कांहींच घडेना माझ्या ठाईं ॥ ८५ ॥
माझ्या ठाईं मज ठावचि नाडळे । रूप हें नाकळे माझें मज ॥ ८६ ॥
माझें मज नाहीं पाहातां मीपण । तेथें कर्तेपण वाव जालें ॥ ८७ ॥


वाव जालें बरें हिशेबीं पाहातां । विवेकें राहतां समाधान ॥ ८८ ॥
समाधान देहीं असोनि विदेही । कर्तृत्वाचा नाहीं अभिमान ॥ ८९ ॥
साभिमान कैचा मेळ हा भूतांचा । भूतें त्रिगुणाचा सृष्टिभाव ॥ ९० ॥


सृष्टिभाव जाला भूतांचा उद्भव । देव निरावेव जैसा तैसा ॥ ९१ ॥
जैसा तैसा देव जाण अनुभवें । दृश्य हें स्वभावें होत जाएं ॥ ९२ ॥
होत जात जीव सर्व भावाभाव । कळों आली माव मायिकाची ॥ ९३ ॥


मायिकांची माव संती निरोपिली । प्रत्ययासी आली जेथें तेथें ॥ ९४ ॥
जेथें तेथें राम आत्मा पूर्ण काम । योगियांचें धाम निरंतर ॥ ९५ ॥
निरंतर देव अंतरेना कदा । तुटली आपदा मीपणाची ॥ ९६ ॥


मीपणाची बुंथी बोधें उगवली । जन्माची जाहली सार्थकता ॥ ९७ ॥
सार्थकता जाली रामासी भजतां । दृढ धरूं आतां उपासना ॥ ९८ ॥


उपासना भक्त होऊनि करीन । ज्ञानें उद्धरीन अज्ञानासी ॥ ९९ ॥
अज्ञानासी ज्ञान रामाचें करणें । शीघ्र उद्धरणें रामदासी ॥ १०० ॥


करीं चापबाण माहेश्वरी ठाण । रूप हें सगुण राघवाचें ॥ १ ॥
राघवाचें रूप निर्गुण जाणावें । सगुण स्वभावें नाशिवंत ॥ २ ॥
नाशिवंत देव कदा म्हणों नये । निर्गुणासी काय पाहासील ॥ ३ ॥


पाहातां निर्गुण देवासी दुल्लभ । याचा होय लाभ पूर्वपुण्यें ॥ ४ ॥
पूर्वपुण्यें लाभ ब्रह्मादिकां जाला । कैवारी जोडला रामचंद्र ॥ ५ ॥
रामचंद्र रूप नाम हें मायिक । बोलिला विवेक वेदशास्त्रीं ॥ ६ ॥


वेदशास्त्रीं भक्ती राघवाची सार । तेणें पैलपार पाविजेतो ॥ ७ ॥
पाविजेतो पार आत्मनिवेदनें । भक्तीचीं लक्षणें नवविधा ॥ ८ ॥
नवविधा भक्ति करितां तरले । जीव उद्धरले नेणों किती ॥ ९ ॥


नेणोनिया देव मायिक भजतां । मुक्ति सायुज्यता अंतरली ॥ १० ॥
अंतरली भक्ति मुक्ति मागें धांवे । राघवाच्या नावें निरंतर ॥ ११ ॥
निरंतर देव अंतरों नेदावा । विवेक पाहावा सज्जानाचा ॥ १२ ॥


सज्जन संगती चुके अधोगती । राम सीतापतीचेनि नामें ॥ १३ ॥
नाम ज्याचें घ्यावें त्यासी वोळखावें । देवासी धुंडावें आदरेंसी ॥ १४ ॥
आदरेंसी जपे रामनाम वाणी । स्वयें शूळपाणी महादेव ॥ १५ ॥


महादेवें गुरुगीता निरोपिली । तेथें मन घाली आलया रे ॥ १६ ॥
आलया संसारी रामनाम तारी । दुजें पृथ्वीवरी आडळेना ॥ १७ ॥
आडळेना परी संतसंग धरीं । तेणें तूं अंतरीं निवसील ॥ १८ ॥


निवालें अंतर रामासी भजतां । दुजें कांहीं आतां आडळेना ॥ १९ ॥
आडळेना जया संतांची संगती । तया अधोगती गर्भवास ॥ २० ॥
गर्भवास माझे राम चुकवील । मज सोडवील अनाथासी ॥ २१ ॥


अनाथांचा नाथ पतीतपावन । तया संतजन दाखविती ॥ २२ ॥
दाखविती वाट संत निजधामी । माझें मन रामीं विश्वासलें ॥ २३ ॥
विश्वासलें परी रामासी नेणवे । तो राम जाणवे संतसंगें ॥ २४ ॥


संतसंगें करी निःसंग होईजे । मग तो जाणिजे राम केवी ॥ २५ ॥
रामासी मिळतां संतांचे मिळणी । मग दुजेपणी उरी नाहीं ॥ २६ ॥
उरी या रामाची जन्मोजन्मी असो । मन हें विश्वासो रामपायीं ॥ २७ ॥


रामपायीं मन होतसे उन्मन । तेथें भिन्नाभिन्न ऐक्यरूप ॥ २८ ॥
ऐक्यरूप ज्ञान तें मज नावडे । गाईन पवाडे राघवाचे ॥ २९ ॥
राघवासी गुण नाहीं तो निर्गुण । ठांईं पडे खुण संतसंगें ॥ ३० ॥


संतसंगतीचा निर्गुण पवाड । मज वाटे गोड रामकथा ॥ ३१ ॥
कथानिरूपण श्रवण मनन । होय समाधान संतसंगें ॥ ३२ ॥
संतसंगें बोध होय निर्गुणाचा । मोडे सगुणाचा भक्तिभाव ॥ ३३ ॥


भक्तिभावें करी निर्गुण पावावें । मग काय व्हावें सांग बापा ॥ ३४ ॥
बापमाय राम विश्वाचा आधार । भक्तां निरंतर सांभाळितो ॥ ३५ ॥
सांभाळीतो काय प्रारब्ध वेगळें । होणार न टळे ब्रह्मादिकां ॥ ३६ ॥


ब्रह्मादिकां मान्य तो नव्हे सामान्य । असावें अनन्य सगुणासीं ॥ ३७ ॥
सगुणासी उरी उरेना कल्पांतीं । म्हणोनि सांगती संतजन ॥ ३८ ॥
संतजन ज्ञानी पूर्ण समाधानी । तेही जपध्यानी सर्वकाळ ॥ ३९ ॥


सर्वकाळ ध्यान करिती सज्जन । परी तें निर्गुण ध्यान त्यांचें ॥ ४० ॥
ध्यानीं आकळेना मनासी कळेना । तयासी कल्पना केवी धरी ॥ ४१ ॥
धरिला विश्वास साधुचे वचनीं । अवस्था उन्मनी तेणें गुणें ॥ ४२ ॥


गुणेंचि निर्गुण कळे सर्व खूण । म्हणोनी सगुण
देव धरीं ॥ ४३ ॥
धरावा सगुण निर्गुणाकारणें तयावीण येणें चाड नाहीं ॥ ४४ ॥
चाड नाहीं ऐसें कासया म्हणावें । सगुण पावावें निर्गुणासी ॥ ४५ ॥


निर्गुणासी पावे सगुणाकरितां । सगुण पाहातां तेथें नाहीं ॥ ४६ ॥
नाहीं कां म्हणसी सद्गुरु सगुण । आणि निरूपण बहुविधा ॥ ४७ ॥
बहुविध रूप नव्हे सद्गुरुचें । निर्गुण ठांईंचे जाण बापा ॥ ४८ ॥
जाण बापा आतां तूं तरी सगुण । जालासी शरण सद्गुरुसी ॥ ४९ ॥


सद्गुरुसी गेला जो कोण्ही शरण । तयासी सगुण कोण म्हणे ॥ ५० ॥
म्हणसील काय सगुणांवाचुनी । सर्वही करणी सगुणाची ॥ ५१ ॥
सगुणाची नव्हे निर्गुणाची सत्ता । निर्गुणाकरितां सर्व जालें ॥ ५२ ॥
सर्व जालें जेव्हां निर्गुणाकरितां । तेव्हां सगुणता निर्गुणासी ॥ ५३ ॥


निर्गुण हें सर्व करूनि वेगळा । ऐसी आहे लीळा निर्गुणाची ॥ ५४ ॥
निर्गुणाची लीळा वांजेची कुमरी । बोलतां चतुरी मानिजेना ॥ ५५ ॥
मानिजेना तरी सृष्टीसी रचिलें । सर्व कोणे केलें तयाविण ॥ ५६ ॥


तयाविणें दुजें काय सत्य आहे । अनुभवें पाहे आलया रे ॥ ५७ ॥
आपुला विचार निर्गुणी सर्वदा । निर्गुणासी कदा विसंभेना ॥ ५८ ॥
विसंभणें घडे सत्संग नसतां । संग विचारितां सगुण कीं ॥ ५९ ॥


सगुणाचा संग ज्ञानियांसी नाहीं । ज्ञानिया विदेही पुरातन ॥ ६० ॥
पुरातन देहीं तरीच विदेही । देहाविण नाहीं विदेहता ॥ ६१ ॥
विदेहता बोली स्वभावें लागली । निर्गुणाची खोली कोण जाणे ॥ ६२ ॥
जाणे सुखदुःख जाणे गुणागुण । तयासी निर्गुण बोलवेना ॥ ६३ ॥


बोलवेना परी निर्गुण कळावें । विवेकें मिळावे निर्गुणासी ॥ ६४ ॥
निर्गुणासी गुण मिळतां संकट । व्यर्थ खटपट कां करीसी ॥ ६५ ॥
कां करीसी भक्ती सगुणदेवाची । तुज निर्गुणाची शुद्धि नाहीं ॥ ६६ ॥


शुद्धि नाहीं जाली जया आनंदाची । तया विवादाची उरी नाही ॥ ६७ ॥
उरी नाहीं कदा निर्गुणी भजतां । निर्गुण सर्वथा सार आहे ॥ ६८ ॥
सार तें आकार भक्तीचा निर्धार । भक्ति पूर्वापार सगुणाची ॥ ६९ ॥


सगुणाची भक्ती अज्ञानें करावी । सज्ञानें करावी निर्गुणाची ॥ ७० ॥
निर्गुणाची भक्ती या नांव अभक्ती । अव्यक्तासी व्यक्ती लाऊं नये ॥ ७१ ॥
लाऊं नये भाव सगुणदेवासी । व्यर्थ पाषाणासी काय काज ॥॥ ७२ ॥


कार्य कारण हा विवेक पाहिजे । भावार्थें लाहिजे सर्व कांहीं ॥ ७३ ॥
सर्व कांही नाहीं जैसें मृगजळ । वाया खळखळ कां करीसी ॥ ७४ ॥
कां करीसी सर्व देहाचा समंध । जरी जाला बोध निर्गुणाचा ॥ ७५ ॥


निर्गुणाचा बोध संसार निरसी । तेथें अज्ञानासी रीग नाहीं ॥ ७६ ॥
रीग नाहीं जया भावार्थभजनीं । तया हृदयसुनी शून्याकार ॥ ७७ ॥
शून्याकार होय विवेकें वासना । मग समाधाना काय उणें ॥ ७८ ॥


उणें जालें दुणें निर्गुणाच्या गुणें । अभाविकां कोणें उद्धरावें ॥ ७९ ॥
उद्धरावें येका सज्जनसंगती । ऐसें वेदश्रुती बोलताती ॥ ८० ॥
बोलताती परी नाहीं आठवण । म्हणोनि सगुण आवडेना ॥ ८१ ॥


आवडेना मिथ्या मायिक भजन । असत्यासी मन विश्वासेना ॥ ८२ ॥
विश्वासेना मन सगुणासी जरी । तयासी कैवारी देव कैचा ॥ ८३ ॥
कैचा देवभक्त कल्पना आपुली । ते सर्व नाथिली ज्ञानियांसी ॥ ८४ ॥


ज्ञानियांसी देव दूरी अंतरला । संदेह पडिला अंतकाळीं ॥ ८५ ॥
अंतकाळ कैसा अनंत ठायीचा । संदेह देहाचा मिथ्याभूत ॥ ८६ ॥
मिथ्या शब्दज्ञानें माया वोसरेना । अभक्त तरेना मायापुरीं ॥ ८७ ॥


माया मोहपुर दुस्तर संसार । अद्वैतविचार जंव नाही ॥ ८८ ॥
जंव नाहीं भावें श्रीहरी अर्चिला । तंव नव्हे भला ज्ञानगर्वी ॥ ८९ ॥
ज्ञानगर्वी नव्हे ज्ञानियां सुल्लभ । जयाचेनि लाभ स्वरूपाचा ॥ ९० ॥


स्वरूप रामाचें मनीं आठवावें । नाम उच्चारावें रात्रंदिस ॥ ९१ ॥
दिस ना रजनी मन ना उन्मनी । ज्ञाता जनीं वनीं सारिखाचि ॥ ९२ ॥
सारिखाचि भाव तया भेटे देव । येर सर्व वाव शब्दज्ञान ॥ ९३ ॥


ज्ञानेंवीण सर्व व्यर्थची जाणावें । जंव नाहीं ठावें आत्मज्ञान ॥ ९४ ॥
ज्ञानदाता हरी मनीं दृढ धरी । तोचि यमपुरी चुकवील ॥ ९५ ॥
चुकवील ज्ञान सर्वही अज्ञान । पाविजे विज्ञान संतसंगें ॥ ९६ ॥


संतसंगें धरी सगुणभजन । स्वधर्मसाधन क्रियाकर्म ॥ ९७ ॥
क्रियाकर्म कैचें ज्ञानियाचे आंगीं । मुक्त ज्ञानी जगीं विचारितां ॥ ९८ ॥
विचारितां देही तो कीजे सर्वही । क्रिया कर्म कांहीं सांडूं नये ॥ ९९ ॥


सांडूं नये भक्ती स्वधर्म विरक्ती । ब्रह्मज्ञानप्राप्ती रामदासीं ॥ १०० ॥
रामदास म्हणे रामउपासका । भक्ती सांडूं नका राघवाची ॥ १०१ ॥


जें जें कांहीं दिसे तें तें सर्व नासे । सर्वांतीत असे परब्रह्म ॥ १ ॥
परब्रह्म आहे सर्व विस्तारलें । आकारासी आलें तेंचि येक ॥ २ ॥
तेंचि येक कैसें आकारा येईल । कल्पांतीं नासेल सर्व कांहीं ॥ ३ ॥


सर्व कांही जीव आणी किडा मुंगी । ब्रह्म राजयोगी बोलताती ॥ ४ ॥
बोलताती ब्रह्म कल्पनेवेगळें । श्रुतीसी नाकडे पार ज्याचा ॥ ५ ॥
पार ज्याचा कळे सज्जनसंगती । सर्व ब्रह्म श्रुती बोलतसे ॥ ६ ॥


बोलतसे श्रुती दृश्य नाशिवंत । स्वरूप तें संत सर्वकाळ ॥ ७ ॥
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां । दृश्य सांडूं जातां सांडवेना ॥ ८ ॥
सांडवेना कदा द्वैताच्या संबंधें । अद्वैताच्या बोधें सर्व मिथ्या ॥ ९ ॥


सर्व मिथ्या नव्हे ब्रह्मचि साचार । ब्रह्म चराचर नांदतसे ॥ १० ॥
नांदतसे तया काळ संहारील । नाहींसें होईल चराचर ॥ ११ ॥
चराचर ऐक्यारूपा आलें जेथें । काळ कैचा तेथें भिन्नपणें ॥ १२ ॥


भिन्नपणें भिन्न नांदे सर्व लोक । तया कैसें येक म्हणतोसी ॥ १३ ॥
म्हणतोसी भिन्न परी तो अभिन्न । ’सर्व ब्रह्म’ ज्ञान तुज नाहीं ॥ १४ ॥
तुज नाहीं जालें ज्ञान शाश्वताचें । ध्यान या भूतांचें करितोसी ॥ १५ ॥


करितोसी वाद वाउगा विवाद । सांडवेना भेद अंतरीचा ॥ १६ ॥
अंतरीचा भेद नाहींसा होईल । जरी तो जाईल भासभ्रम ॥ १७ ॥
भास भ्रम नव्हे वस्तुचि केवळ । जीव हे सकळ ब्र्ह्मरूप ॥ १८ ॥


ब्रह्म रूप नव्हे अरूप ठाईंचें । रूप तेथें कैसें लावितोसी ॥ १९ ॥
लावितोसी वाया कासया वाचाळी । पडावें सुकाळीं सर्वब्रह्मीं ॥ २० ॥
सर्व ब्रह्मीं बुद्धी तया कैची शुद्धी । कुबुद्धी सुबुद्धी सारिखीच ॥ २१ ॥


सारिखीच बुद्धी जालीयां अंतरीं । मग लोकाचारी काय काज ॥ २२ ॥
काय काज ऐसें म्हणतोसी आतां ।माता आणि कांता येक होती ॥ २३ ॥
येक होती काय पूर्वींच आहेती । भेद तयाप्रती काय आहे ॥ २४ ॥


काय आहे भेद ऐसें बोलों जातां । दोषचि तत्वता वाढतसे ॥ २५ ॥
वाढतसे दोष सुंदरी ते माता । येक पुत्र होतां वेद बोले ॥ २६ ॥
वेद बोले ज्ञान तें कांहीं पाहावें । देहाचेनि व्हावें कासावीस ॥ २७ ॥


कासावीस कैचें देह ब्रह्म साचें । ब्रह्मेवीण कैचें दुजेपण ॥ २८ ॥
दुजेपणें माया आकारासि आली । तें हें विस्तारलें पाहातोसी ॥ २९ ॥
पाहतोसी माया ते तुज दिसते । येरवीं हें सत्य सर्वब्रह्म ॥ ३० ॥


सर्वब्रह्म कैचें रूप हें मायेचें । दिसे तया साचें कोण मानी ॥ ३१ ॥
कोण मानी तुझें ज्ञान येकदेसी । दिसेना तयासी काय पाहों ॥ ३२ ॥
काये पाहों ऐसें वाउगें बोलणें । दृष्टीचें देखणे नाशिवंत ॥ ३३ ॥
नाशिवंत आहे कल्पना आपुली । ते हे सांपडली सर्वब्रह्मीं ॥ ३४ ॥


सर्वब्रह्मीं मन कैसें विश्वासलें । अंतवंत गेलें हारपोनी ॥ ३५ ॥
हारपोनि गेलें तूप हें थिजलें । जरें विघुरलें तर्हीं तूप ॥ ३६ ॥
तूप हें चळोन जाहाले पातळ । ब्रह्म हें अचळ चळेना कीं ॥ ३७ ॥


चळेना कीं तूपपण त्या तुपाचें । तैसें जाण साचें सर्व ब्रह्म ॥ ३८ ॥
सर्व नाशिवंत बोलिला वेदांत । तेथें हा दृष्टांत कोणेकडे ॥ ३९ ॥
कोणेकडे गेलें सांग सोनेंपण । आटितां कंकण सोनें आहे ॥ ४० ॥


सोनें आहे जड आणी येकदेसी । वस्तूसी कायसी उपमा हे ॥ ४१ ॥
उपमा हे सर्व ब्रह्मचि तत्वता । आटितां नाटितां सोनें जैसें ॥ ४२ ॥
हेम हेंची आहे मुळीं नाशिवंत । पीतवर्ण जात निघोनियां ॥ ४३ ॥


निघोनीयां भ्रांती येकीकडे गेली । मृत्तिका संचली पालटेना ॥ ४४ ॥
पालटेना तुझे मातीस बोलणें । माती मिथ्या कोणें जाणीजेना ॥ ४५ ॥
जाणीजेना तरी होईं सावधान । गारेचें जीवन गार जाली ॥ ४६ ॥


गार जाली तुझी माती हे सकळ । अचळासी चळ भावितोसी ॥ ४७ ॥
भावितां तरंग कोणेकडे गेला । सागरु संचला जैसा तैसा ॥॥ ४८ ॥
तैसा हा विस्तार तरंगाचे परी । साच हा चतुरीं मानिजेना ॥ ४९ ॥


मानिजेना परी येकचि साचार । वृक्षाचा विस्तार मूळ येक ॥ ५० ॥
मूळ एक ब्रह्म नित्यनिराकार । वृक्षाचा विस्तार तेथें कैचा ॥ ५१ ॥
कैचा हा म्हणसी तोचि आकारला । सविता बिंबला जळीं जेवीं ॥ ५२ ॥


जळीं जेवीं दिसे जळीं प्रतिबिंब । तैसें नाहीं बिंब स्वस्वरूपीं ॥ ५३ ॥
स्वस्वरूपीं आहे सर्वही साकार । असेना आकार तयावीण ॥ ५४ ॥
तयावीण बापा सर्वही मायिक । जाण हा विवेक योगियांचा ॥ ५५ ॥


योगियांचा भाव योगीच जाणती । सर्वही देखती ब्रह्मरूप ॥ ५६ ॥
ब्रह्मरूप होतां भावचि मोडला । आत्मा हा जोडला आत्मरूपें ॥ ५७ ॥

रूपें ब्रह्म जाला तया सर्व ब्रह्म । भ्रमिष्टासी भ्रम भासतसे ॥ ५८ ॥


भासतसे भास तया आहे नाश । धरें हा विश्वास शास्त्रमत्तें ॥ ५९ ॥
शास्त्रमत्तें सर्व ब्रह्मचि बोलिलें । दृष्टीसी पडीलें जें जें कांहीं ॥ ६० ॥
जें जें कांहीं आहे दृष्टीचें देखणें । तें तें मिथ्या कोणें जाणिजेना ॥ ६१ ॥


जाणिजेना सर्व ब्रह्म ऐसी खूण । तयासी संपूर्ण ज्ञान कैचें ॥ ६२ ॥
ज्ञान कैचें आतां सर्व ब्रह्म जालें । साधन बुडालें साधकाचें ॥ ६३ ॥
साधक साधन कैचें दुजेंपण । ऐक्यरूप जाण सर्व कांहीं ॥ ६४ ॥


सर्व कांहीं भिन्न भिन्न आकारलें । ऐक्यरूप जालें कोणेपरी ॥ ६५ ॥
कोणेपरी कार्यकारणभिन्नत्व । सिद्धचि येकत्व भिन्नपणें ॥ ६६ ॥
भिन्नपणें येक हें कईं घडावें । संदेहीं पडावें वाउगेंची ॥ ६७ ॥


वाउगा संदेह कासया धरावा । कासवा अवेवा भेद नाहीं ॥ ६८ ॥
भेद नाहीं जया तेंचि नाशिवंत । दृढत्वाचा हेत लागों नेदी ॥ ६९ ॥
लागेना विवेक पूर्ण ब्रह्मस्थिति । येकदेसी किती सांगतील ॥ ७० ॥


सांगतील सदा सर्वब्रह्म ऐसा । स्वर्ग नर्क कैसा ऐक्यरूप ॥ ७१ ॥
ऐक्यरूपें जया बाणला विश्वास । तया भेदभास आडळेना ॥ ७२ ॥
आडळेना भास तेहें सर्व कैंचे । वाउगें केव्हांचें बोलतोसी ॥ ७३ ॥


बोलतोसी परी नाहीं समाधान । तुज हें अज्ञान मागें पुढें ॥ ७४ ॥
मागें पुढें मज ब्रह्मचि आघवें । भासाचिया नावें शून्याकार ॥ ७५ ॥
शून्याकार जालें तुझें अभ्यंतर । नव्हे तें साचार पूर्णब्रह्म ॥ ७६ ॥


पूर्णब्रह्म दृश्य पदार्थ जाणसी । वांयां वोसणसी जाणपणें ॥ ७७ ॥
जाणपणें सर्व मायिक म्हणावें । दृश्य हें जाणावें कोणेपरी ॥ ७८ ॥
कोणेपरी तुझें जालें समाधान । मिथ्या सावपण लावितोसी ॥ ७९ ॥


लावितोसी कैसी अद्वैतीं कल्पना । द्वैत हे तुटेना जन्मवरी ॥ ८० ॥
जन्मवरी सर्व अभेद म्हणसी । भेदची लाविसी सर्वकाळ ॥ ८१ ॥
सर्वकाळ गेला मिथ्या म्हणतांची । दृश्य असतांची जैसें तैसें ॥ ८२ ॥


जैसें तैसें आहे विवेकें जाणसी । वायांची म्हणसी ’सर्व ब्रह्म’ ॥ ८३ ॥
सर्व ब्रह्म ऐसें वेद बोलियेला । नेणसी कां तुला ठावें नाहीं ॥ ८४ ॥
ठावें नाहीं तुज वेदाचें वचन । सर्व मिथ्याभान नेति नेति ॥ ८५ ॥


नेति नेति श्रुति वेदा अगोचर । तें हें विश्वाकार विस्तारलें ॥ ८६ ॥
विस्तारलें सर्व मायेचें स्वरूप । माया मिथ्यारूप जाण बापा ॥ ८७ ॥
जाण बापा सर्वब्रह्माचें स्वरूप । माया मिथ्यारूप कल्पना हे ॥ ८८ ॥


कल्पनेची सृष्टी दिसताहे दृष्टी । सांडीं माझी गोष्टी वायकोळ ॥ ८९ ॥
वायकोळ नव्हे सर्व तेंची पाहे । दुजें कोण आहे तयावीण ॥ ९० ॥
तयावीण नाहीं तें दिसों लागलें । तेंची ब्रह्म जालें मंदमती ॥ ९१ ॥


मंदमती नव्हे सर्वांभूतीं भाव । भूतें आणी देव भिन्न नाहीं ॥ ९२ ॥
भिन्न नाहीं जरी भूतें आणी देव । तरी भावाभाव कासयासी ॥ ९३ ॥
कासयासी माया मिथ्या हे म्हणावी । ब्रह्मची जाणावी सर्व कांहीं ॥ ९४ ॥


सर्व कांहीं मिथ्या मग सर्व ब्रह्म । दृश्यातीत वर्म अनिर्वाच्य ॥ ९५ ॥
अनिर्वाच्य ब्रह्म व्यतिरेकें जाण । अन्वयाची खूण सर्वब्रह्म ॥ ९६ ॥
सर्व ब्रह्म पूर्वपक्षाचें बोलणें । सिद्धांतासी येणें चाड नाहीं ॥ ९७ ॥


चाड नाहीं तेथें सिद्धांत अलक्ष । तेथें दोन्ही पक्ष आटतील ॥ ९८ ॥
आटतील परी सारासार आहे । दृश्य हें न साहे निर्मळासी ॥ ९९ ॥
निर्मळासीं तेथें कांहींच न लागे । शब्द तोहि भंगे निःशब्देंसीं ॥ १०० ॥


निःशब्देंसीं शब्द जे ठायीं आटला । ’सर्वब्रह्म’ बोला कोण पूसे ॥ १०१ ॥
कोण पूसे तेथें तुझ्या निर्मळासी । कैंचा मा शब्दासी ठाव आधीं ॥ १०२ ॥
आधीं सर्व मिथ्या होऊनीयां गेलें । मग पुढें जालें अनिर्वाच्य ॥ १०३ ॥


अनिर्वाच्य जालें ब्रह्म बोलों नये । न्यून पूर्ण काय पाहासील ॥ १०४ ॥
पाहाणें खुंटलें बोलणें तुटलें । स्वस्वरूपीं जालें ऐक्यरूप ॥ १०५ ॥
ऐक्यरूपें रामी रामदासीं जालें । बोलणें खुंटलें तेथूंनियां ॥ १०६ ॥


पृथ्वी आप तेज वायु तें आकाश । ऐसें सर्व दृश्य कोणें केलें ॥ १ ॥
केलें हें देवानें सर्व चराचर । आपण ईश्वर वेगळाचि ॥ २ ॥
वेगळाचि आहे त्याचें रूप कैसें । हें आम्ही कळेसें निरोपावें ॥ ३ ॥


निरोपावें काय बोलिलें न जाये । अनुमाना न ये पूर्ण ब्रह्म ॥ ४ ॥
पूर्ण ब्रह्म जरी तुम्ही निरोपांना । तरी काय जना पुसावें हें ॥ ५ ॥
पुसावें हें सर्व आपुल्या गुरूसी । व्यर्थ कासावीसी जेथें तेथें ॥ ६ ॥


जेथें तेथें नाहीं संतासी पुसावें । पुसतां सांगावें संतजनीं ॥ ७ ॥
संतजनी काय कोणासी सांगावें । लोक कुडभावें पुसताती ॥ ८ ॥
पुसताती लोक कळेना म्हणोनी । तया संतजनी निरोपावें ॥ ९ ॥


निरोपावें जैसें ते तया मानेना । वेवाद सरेना जन्मवरी ॥ १० ॥
जन्मवरी आम्हां कोण्हीच सांगेना । नये अनुमाना सर्व कांहीं ॥ ११ ॥
सर्व कांही बापा उमजेना तुला । तरी गुरु केला कासयासी ॥ १२ ॥


कासयासी केला ऐसें न म्हणावें । पुसतां सांगावें साधुजनीं ॥ १३ ॥
साधुजनीं काय म्हणोनि सांगावें । प्रत्ययाच्या नांवें शून्याकार ॥ १४ ॥
शून्याकार सर्व साधूनें मोडावें । विवेकें जोडावें परब्रह्म ॥ १५ ॥


परब्रह्म कैसें निरोपिलें तुज । सांग गुह्य गुज अंतरीचे ॥ १६ ॥
अंतरीचे गुज शाश्वत जाणावें । संतांसीं भजावें गुरुरूपें ॥ १७ ॥
गुरुचिया रूपें कोणासी भजावें । संदेहीं पडावें जन्मवरी ॥ १८ ॥


जन्मवरी संत साधूसी भजतां । मग संदेहता कोठें राहे ॥ १९ ॥
कोठें राहे भाव भिन्न समाधानें । साधूचीं वचनें वेगळालीं ॥ २० ॥
वेगळालीं परी अनुभवीं येक । पूर्व पक्ष लोक पाहताती ॥ २१ ॥


पाहताती लोक बहुधा निश्चयें । तेणें गुणें होय कासावीस ॥ २२ ॥
कासावीस कैच संताचे संगती । संतसंगें गती शीघ्र काळें ॥ २३ ॥
शीघ्र काळें गती हें कैसी प्रचीति । समाधान चित्तीं कोण कैसें ॥ २४ ॥


कैसें समाधान ज्याचें तोचि जाणे । गुज तें सांगणें कोणेपरी ॥ २५ ॥
कोणेपरी कळे खरें किंवा खोटें । खोटें तेचि मोठें वाटतसे ॥ २६ ॥
वाटतसें मनीं संतांसी पुसावें । स्दर्वही त्यजावें वाग्‌जाळ ॥ २७ ॥


वाग्जाळ जनीं त्यागणेंचि तुज । तरी गुह्य गुज अंतरलें ॥ २८ ॥
अंतरलें गुज हातासी चढेल । जरी ते घडेल संतसेवा ॥ २९ ॥
संतसेवा करी विवेक अंतरीं । पाहतां संसारीं तरिजेल ॥ ३० ॥


तरिजेल सर्व कांहीं न करितां । संतांसीं भजतां सर्व काळ ॥ ३१ ॥
सर्वकाळ तुवां भजनचि केलें । परी नाहीं जालें समाधान ॥ ३२ ॥
समाधान माझें सज्जनांचे पायीं । माझे मनीं नाहीं दुजाभाव ॥ ३३ ॥


दुजाभाव नाहीं संतांचे चरणीं । तरी कां वचनीं अविश्वास ॥ ३४ ॥
अविश्वासें कदा भजन घडेना । प्रत्ययोचि येना कदा काळीं ॥ ३५ ॥
कदाकाळीं प्राणी जरी विवरेना । तरी तें घडेना समाधान ॥ ३६ ॥


समाधान धरे हें तुम्हीं करावें । मज विवरावें ज्ञानमार्गी ॥ ३७ ॥
ज्ञानमार्गीं तुझें मनचि निघेना । तेथें विवंचना पाहिजे ते ॥ ३८ ॥
पाहिजे ते परी मज निरोपावी । चिंताचि असावी अनाथांची ॥ ३९ ॥


अनाथांची चिंता श्रीराम करील । विचार देईल सेवकांसी ॥ ४० ॥
सेवक मी सेवा अल्प करूं जाणें । सर्व कांहीं नेणें ज्ञानमार्ग ॥ ४१ ॥
ज्ञानमार्गें वीण सर्वकाळ शीण । संसार कठीण चुकेना कीं ॥ ४२ ॥


चुकेना संसार हे लज्या तुम्हांसी । मज पतितासी कोण पुसे ॥ ४३ ॥
कोण पुसे तुज माझी लज्या मज । म्हणोनियां गुज सांगतसें ॥ ४४ ॥
सांगतसें माझा सर्व अभिप्राव । आतां अंतर्भाव वोळखावा ॥ ४५ ॥


वोळखावा ऐसा जरी म्हणतोसी । तरी तूं मानसीं सावधान ॥ ४६ ॥
सावधानपणें म्यां काय करावें । हें मज सांगावें निश्चयेसीं ॥ ४७ ॥
निश्चयेंसीं देव आधीं वोळखावा । निश्चयो राखावा मनामधें ॥ ४८ ॥


मनामधें कोण करावा निश्चय । आणी मनोजय कैसा घडे ॥ ४९ ॥
घडे मनोजय मनासी जाणतां । निश्चय तत्वता परब्रह्म ॥ ५० ॥
परब्रह्म कोणेपरी वोळखावें । मनांत राखावें कोणे रीती ॥ ५१ ॥


रीती या ब्रह्माची निरूपणीं कळे । सर्वही निवळे समाधान ॥ ५२ ॥
समाधान जनीं कैसे वोळखावें । जीवेंसीं धरावें काय आतां ॥ ५३ ॥
काय आहे ऐसें हें मज कळेना । नये अनुमाना माझें मज ॥ ५४ ॥


माझें मज कळे हें कांहीं पहावें । स्वरूपीं राहावें निरंतर ॥ ५५ ॥
निरंतर कैसे स्वरूपीं राहावें । निर्गुणीं पहावें काय आतां ॥ ५६ ॥
आतां येक करी तत्वविचारणा । तेणें निज खुणा पावसील ॥ ५७ ॥


पावसील खूण ऐसें ही म्हणतां । तत्वें पाहों जातां वेगळालीं ॥ ५८ ॥
वेगळालीं तत्वें परी तोतूं कोण । पाहें वोळखण निश्चयाची ॥ ५९ ॥
निश्चयाची गोष्टी तत्वरूप सृष्टी । जनांलागी वेष्टी तत्वें तत्व ॥ ६० ॥


तत्व झाडा होतां उरतें तें काय । वेगी धरीं सोय मीपणाची ॥ ६१ ॥
मीपणाची सोय पाहतां दिसेना । तत्वीं आडळेना कांहीं केल्यां ॥ ६२ ॥
कांहीं केल्या तुज दिसेना मीपण । तरी कर्ता कोण सांग आतां ॥ ६३ ॥


आतां काय सांगों मीपण नाडळे । विचारितां गळे तत्वें तत्व ॥ ६४ ॥
तत्वें तत्व झाडा करूनी पाहावें । मीपणा नावेंशून्याकार ॥ ६५ ॥
शून्याकार जालें हें माझें मीपण । आतां मी ते कोण निरोपावें ॥ ६६ ॥


निरोपावें तरी तूं वस्तु आहेसी । वेगी आपणासी विभांडावें ॥ ६७ ॥
विभांडावें कोण तेंचि तें मीपण । तरी आतां खूण कैसी पावों ॥ ६८ ॥
कैसी पावों ऐसें जरी म्हणतोसी । तरी त्या हेतूसी वोळखावें ॥ ६९ ॥


वोळखतां हेतु अंतःकरण आहे । विचारितां राहे तत्वांमधें ॥ ७० ॥
तत्वांमधें राहे पाहे सर्व कांहीं । तरी तुज नाहीं मीतूंपण ॥ ७१ ॥
मीतूपण नाहीं विचारें पाहातां । मज वाटे आतां समाधान ॥ ७२ ॥


समाधान आहे संगत्याग होतां । हेतूनें दुश्चिता होऊं नको ॥ ७३ ॥
नको देवा आतां हेतूची संगती । व्यर्थ अधोगती हेतुसंगें ॥ ७४ ॥
हेतुसंग सदा लागला हेतूसी । तो तूं निश्चयेंसीं वस्तुरूप ॥ ७५ ॥


वस्तुरूप होतां कृत्याकृत्य जालों । प्रत्ययें पावलों समाधान ॥ ७६ ॥
समाधान पाहे आहे तैसें आहे । निश्चय न राहे सर्वकाळ ॥ ७७ ॥
सर्वकाळ मज साधूची संगती । विचारानें गती पावईन ॥ ७८ ॥


पावईन गती हा तुझा उधार । गतीचा निर्धार हो‌उनी पाहें ॥ ७९ ॥
हो‍उनियां गेला प्रचीतीस येतें । संशय धरीतें पुन्हा मन ! ॥ ८० ॥

मनाचा संशयो मनाचा निश्चयो। मनें मनजयो कामा नये ॥ ८१ ॥


काया न ये तरी मनेंवीण कैसें । मनेंची विश्वासें पाविजेतें ॥ ८२ ॥
पाविजेतें परी वृत्ति शून्य होतां । हेतु आठवितां असमाधान ॥ ८३ ॥
असमाधान घडे ऐसें न करावें । देवें उद्धरावें भक्तजना ॥ ८४ ॥


भक्तजन मुळीं विभक्त नाहींत । असमाधान तेथ आडळेना ॥ ८५ ॥
आडळेना कांहिं स्वरूपीं पाहातां । संसारीं राहातां दिसों लागे ॥ ८६ ॥
दिसों लागे कोण तूं तरी निर्गुण । निर्गुणासी गुण लाऊं नको ॥ ८७ ॥


लाऊं नको गुण हें तुम्ही म्हणता । देहसंगें व्यथा बाधीतसे ॥ ८८ ॥
बाधीतसे व्यथा देहाच्या संबंधें । विचारप्रबोधें समाधान ॥ ८९ ॥
समाधान माझें मीपण सांडीतां । हें तों मज आतां कळों आलें ॥ ९० ॥


कळों आलें तुज तत्वविवरण महावाक्यखूण पवसील ॥ ९१ ॥
पावसील मज देवा दीनानाथा । संसाराची व्यथा दुरी केली ॥ ९२ ॥
दुरी केली व्यथा ब्रह्मनिरूपणें । आतां विवरण सर्व काळ ॥ ९३ ॥


सर्व काळ आतां सार्थक जाहला । भला कळों आला नरदेह ॥ ९४ ॥
नरदेहीं ज्ञान पाहातां सुटिजे । येर सर्व कीजे निरर्थक ॥ ९५ ॥
निरर्थक काया कारणीं लागली । विवेकें भंगली देहबुद्धी ॥ ९६ ॥


देहबुद्धी गेली आत्मबुद्धी होतां । कर्त्यासी धुंडीतां कार्य नाहीं ॥ ९७ ॥
कार्य नाहीं खरें कारणीं पाहातां । तद्‌रूप हें आतां समाधान ॥ ९८ ॥
समाधान रामी रामदासीं जालें । विचारानें केलें संगातीत ॥ ९९ ॥


वैराग्यापरतें अन्य नाहीं भाग्य । धन्य तें वैराग्य ज्ञानियासी ॥ १ ॥
ज्ञानीयासी काय करावें वैराग्य । ज्ञानीयास भाग्य तत्त्वबोधें ॥ २ ॥
तत्त्वबोधें होय शब्दज्ञान सोपें । परी अनुतापें त्याग घडे ॥ ३ ॥


त्यागावें तें काय सर्व तेंचि आहे । विचारूनि पाहे आलया रे ॥ ४ ॥
आलया संसारीं अनुतापेंवीण । शब्दज्ञान शीण वाउगाची ॥ ५ ॥
वाउगाची बापा कासया शीणसी । जाण निश्चयेसीं सर्व सार ॥ ६ ॥


सार जाणोनियां असार त्यागावें । तरीच भोगावें मुक्तिपद ॥ ७ ॥
पद ये मुक्तीचें तत्त्वज्ञानें जोडे । बोडके उघडे कासयासी ॥ ८ ॥
कासया करावें वैराग्याचें डंभ । सुखाचें स्वयंभ मोक्षपद ॥ ९ ॥


मोक्षपदीं काय सांडावें मांडावें । व्यर्थचि हिंडावें वनांतरीं ॥ १० ॥
वनांतरी हिंडे तोचि येक भला । येक तो बांधला मायाजाळीं ॥ ११ ॥
मायाजाळीं कैचें कोण्हासी बंधन । ज्ञानी समाधान आत्मज्ञानें ॥ १२ ॥


आत्मज्ञानें त्याग सर्वांचा करावा । मग उद्धरावा विश्व जन ॥ १३ ॥
विश्वजनीं भोग तोचि राजयोग । भोगितांचि त्याग ज्ञानीयासी ॥ १४ ॥
ज्ञानियांसी भोग तोचि भवरोग । नव्हे राजयोग विटंबणा ! ॥ १५ ॥


विटंबणा भ्रमें होय मूढजना । ज्ञानी तो लिंपेना करूनीयां ॥ १६ ॥
करूनीयां काय मिथ्या शब्दज्ञान । नाहीं समाधान त्यागेंवीण ॥ १७ ॥
त्यागितांचि भोग भोगितांचि त्याग । ऐसा ज्ञानयोग जाण बापा ॥ १८ ॥


जाणतील सर्व त्याग करवेना । मनीं धरवेना अनुताप ॥ १९ ॥
अनुताप आहे संतापाचें फळ । वायां तळमळ कां करावी ॥ २० ॥


करावी आदरें वृत्ती उदासीन । तेणें तुटे ध्यान विषयांचें ॥ २१ ॥
विषयांचें ध्यान देहाचें जीवन । सोडी ऐसा कोण सांग बापा ॥ २२ ॥
सांग बापा कोण विषयी तरला । कोण उद्धरला भोगितांचि ॥ २३ ॥


भोगितांचि सर्व सज्जन तरले विषय भोगिले पंचविधा ॥ २४ ॥
पंचही विषय त्यातुनी बाधक । शुद्ध तो साधक सेविताती ॥ २५ ॥
सेविताती सर्व त्यागी कोण आहे । विचारूनि पाहें आलया रे ॥ २६ ॥


आलया रे त्यागी तयासी म्हणावें । जेणें हें जिणावें शिश्नोदर ॥ २७ ॥
उदर सुटेना कामाची कल्पना । आता त्याग जना कोठें आहे ॥ २८ ॥
आहे त्याग बापा रसना जिंकावी । कल्पना मोडावी संतसंगें ॥ २९ ॥


संतसंगें त्याग अंतरींचा होय बाह्याकार काय करूनियां ॥ ३० ॥
करूनियां त्याग देहाचें दंडण । होतसे खंडण महा दोषा ॥ ३१ ॥
महा दोष कैचे संतांचे संगती । पतितांसी गती संतसंगें ॥ ३२ ॥


संतसंगें बाणे विवेक वैराग्य । योगियांचें भाग्य पाठीं लागे ॥ ३३ ॥
लागतो विवेक अंतरीं धरावा । संसार करावा सुखेनैव ॥ ३४ ॥
नावडे संसार दुःखाचे डोंगर । वासनाविस्तार आवरेना ॥ ३५ ॥


आवरेना तरी श्रवण करावें । परी न फिरावें दारोदारीं ॥ ३६ ॥
दारोदार थोर थोर पूर्वापार । योगी ऋषीश्वर भिक्षाटणें ॥ ३७ ॥
भिक्षाटण वायां कासया करावें । आश्रमीं भजावें अतीतांसी ॥ ३८ ॥


अतीतांसी भजे हें कहीं घडावें । आश्रमीं पडावें मायाजाळीं ॥ ३९ ॥

मायाजाळीं धर्म कांहीं तरी घडे । फिरे चहूंकडे उदासीन ॥ ४० ॥
उदासीन रूप देवाचें स्वरूप । होईजे निःपाप तयाचेनि ॥ ४१ ॥


तयाचेनि काय होणार होईल । तो काय देईल दातयासी ॥ ४२ ॥
दातयाचा दाता तो येक मागता । नेणिजे अतीता संवसारी ॥ ४३ ॥
संवसारीं आतां सर्व कांहीं घडे । शिणती बापुडे उदासीन ॥ ४४ ॥


उदासीन ज्ञाता नाहीं पराधीन । विचारें स्वाधीन तीर्थाटण ॥ ४५ ॥
तीर्थाटण काय पाहसील मूढा । पाणी आणि धोंडा जेथें तेथें ॥ ४६ ॥
तेथें होत आहे पापाची बोहरी । केली थोरथोरीं तीर्थाटणें ॥ ४७ ॥


तीर्थाटणें सदा इच्छिती साधूंसी । तीर्थें साधूंपासीं शुद्ध होती ॥ ४८ ॥
होती परी साधु कोण्हासी दिसेना । साधु तो असेना मायाधारी ॥ ४९ ॥
मायाधारी साधु जनांसी दिसतो । परी जाणावा तो पद्मपत्र ॥ ५० ॥


पद्मपत्राऐसें संसारीं असती । हें कदा कल्पांतीं सत्य नव्हे ॥ ५१ ॥
सत्य नव्हे कैसे दुर्वास श्रीपती । आणी चक्रवर्ती जनक येक ॥ ५२ ॥
जनक येकला दृष्टांतासी आला । नवलाव जाला येक दोनी ॥ ५३ ॥


येक दोनी नव्हे भक्त थोरथोर । तरले संसार करूनीयां ॥ ५४ ॥
करूनी संसार सुखें देशधडी । भक्तिसुखें गुढी उभारिली ॥ ५५ ॥
उभारिली गुढी संसार करितां । तया निस्पृहता कोठें होती ॥ ५६ ॥


होती निस्पृहता तेचि जाले मान्य । येर ते जगन्य लोलंगता ॥ ५७ ॥
लोलंगता नाहीं ऐसा कोण असे । कांहीं तरी असे मनामध्यें ॥ ५८ ॥
मनामधें बसे जैसें संसारिकां । तैसा नाहीं लेखा तापसाचा ॥ ५९ ॥


तापसांचा वास वनामधें घडे । विषयांचे सडे कामबुद्धी ॥ ६० ॥
कामबुद्धी ज्याची तया वाटे तेची । दोषिया दोषचि दिसतसे ॥ ६१ ॥
दिसताहे तैसें बोलावें लागतें । मन हें मागतें विषयांसी ॥ ६२ ॥


विषयांसी मागे मन हें चंचळ । देईल तो खळ पापरूपी ॥ ६३ ॥
पापरूपी मनीं परस्त्री चिंतितो । संसारीं भोगितो आपुलीच ॥ ६४ ॥
आपुलेंची शस्त्र उरीं हाणों जातां । मरेल तत्त्वता निश्चयेंसीं ॥ ६५ ॥


निश्चयो चळतो योगितापसांचा । मग तया कैचा परलोक ॥ ६६ ॥
परलोकीं योगी पावोनी राहिले । मिथ्या देह चाले प्रारब्धानें ॥ ६७ ॥
प्रारब्धानें देह सर्वांचा चालतो । तेथें योगिया तो सारिखाचि ॥ ६८ ॥


सारिखाचि योगी आणी संवसारी । बोलतां अंतरीं लाज नाहीं ॥ ६९ ॥
नाहीं तो आश्रमी साक्ष सर्वकर्मीं । तया नाही उर्मी अज्ञानाची ॥ ७० ॥
अज्ञानाची उर्मी लोभाचें गुंडाळें । आसक्तीच्या बळें शब्दब्रह्म ॥ ७१ ॥


ब्रह्मचि होऊनी संसारीं असावें । परी न लिंपावें कर्ममेळीं ॥ ७२ ॥
कर्माचा मेळावा पातकांचें फळ । तरी मायाजाळ गोड वाटे ॥ ७३ ॥
गोड वाटे जया सर्व ब्रह्म माया । जन वन तया सारिखेंची ॥ ७४ ॥


सारिखेंचि नव्हे सारासार आहे । अनुभवें पाहे गुरुमुखें ॥ ७५ ॥
गुरुमुखें जालें ज्याचें समाधान । त्यासी वणवण कदा नाहीं ॥ ७६ ॥
नाहीं जया आला संसाराचा वीट । तया मोक्षवाट सांपडेना ॥ ७७ ॥


सांपडेना मोक्ष जें मन चंचळ । यालागीं निश्चळ मन करीं ॥ ७८ ॥
करीं बापा आतां संसाराची सोडी । धरूं नको गोडी आश्रमाची ॥ ७९ ॥
आश्रमाची गोडी कासया सांडावी । उपाधी मोडावी कासयासी ॥ ८० ॥


शिकवितां ने घे तया कोण सांगे । सांगतां न लागे वीतराग ॥ ८१ ॥
वीतराग ऐसें कासया म्हणावें । हें येक जाणावें निश्चयेंसीं ॥ ८२ ॥
निश्चयो कळला तो कदा राहेना । वैभव पाहेना कदाकाळीं ॥ ८३ ॥
कदाकाळीं प्राप्त भोगावें सुटेना । देहाची भावना वेगळाली ॥ ८४ ॥


वेगळालें प्राप्त तैसेंचि भोगावें । परी निरोपावें वीतरागा ॥ ८५ ॥
वीतरागें देहसंबंध घडेना । वैभव सोडीना कांही केल्या ॥ ८६ ॥
केलियानें होतें केलेंचि पाहिजे । जें मनीं धरिजे तेंची होतें ॥ ८७ ॥


होतो प्रेत्‍न खरा प्रारब्धासारिखा । कांहीं पूर्वरेखा पाहिजेते ॥ ८८ ॥
पाहिजे तो यत्‍न आदरेंसीं केला । मग प्राप्तव्याला शब्द घडे ॥ ८९ ॥
घडे तो प्रेत्‍न होणारासारिखा । नाहीं तरी देखा आठवेना ॥ ९० ॥
आठवेना तरी आलस्य नसावा । आलस्याचा हेवा करूं नये ॥ ९१ ॥
कऊं नये ऐसें बोलणें बोलावें । होणार स्वभावें होत जातें ॥ ९२ ॥


होत जात परी प्रेत्‍नेंवीण नाहीं । आधीं प्रेत्‍न कांहीं पाहिजेतो ॥ ९३ ॥
पाहिजेतो परी घडोनी येईना । मनाची वासना पूर्ण नव्हे ॥ ९४ ॥
नव्हे समाधान साधनावांचूनी । वायां शब्दज्ञान वाउगेंची ॥ ९५ ॥


वाउगें साधन कासया करावें । स्वरूप स्वभावें सिद्ध आहे ॥ ९६ ॥
सिद्ध आहे तरी अंतरीं बाणेना । संशयो जाणेना निश्चयेसीं ॥ ९७ ॥
निश्चयाचें ज्ञान विवेकें संपन्न । तया हें अज्ञान बाधी केवीं ॥ ९८ ॥


केवीं बाधिजेना आसक्तीच्यामुळें । मायाजाळें काळें वोढीयेलें ॥ ९९ ॥
वोढीयेलें काळें अभक्त नरासी । नाहीं जयापासीं भक्तिभाव ॥ १०० ॥

भक्तिभाव क्रिया मोक्षाचें साधन । वीतरागी मन सर्व काळ ॥ १०१ ॥


सर्वकाळ जेथें कथानिरूपण । श्रवणमनन निजध्यास ॥ १०२ ॥
निजध्यास मन वृत्ती उदासीन । नावडे कांचन आणि कांता ॥ १०३ ॥
कांता पुत्र धन वैभव स्वजन । रामेंवीण अन्य आवडेना ॥ १०४ ॥
आवडेना भार नाथिला संसार । रामदासीं सार रामदास्य ॥ १०५ ॥


प्रेत्‍न आहे थोर पाहावा विचार । येणें पैलपार पाविजेतो ॥ १ ॥
पाविजेतो पार प्रारब्धेंकरुनी । येत्‍न केल्या जनीं होत नाहीं ॥ २ ॥
होत नाहीं प्रेत्‍नें ऐसें काय आहे । विचारूनी पाहें आलया रे ॥ ३ ॥


आलया रे प्रेत्‍न करितां फळेना । होणार टळेना कांहीं केल्यां ॥ ४ ॥
कांहीं तरी केलें पाहिजे संसारीं । कांहींच न करी ऐसा कोण ॥ ५ ॥
ऐसा कोण आहे प्रारब्धावेगळा । होणाराची कळा वेगळी ते ॥ ६ ॥


वेगळीच कळा जाण जाणत्याची । केल्याहि होतेचि विवंचना ॥ ७ ॥
विवंचना नानाप्रकारें धांवती । होणाराची गती भिन्न आहे ॥ ८ ॥
भिन्न आहे कळा धूर्त मनुष्याची । तूर्त प्रेत्‍नाची फळश्रुती ॥ ९ ॥


फलश्रुती कैची पूर्वदत्तावीण । वाउगाची शीण होत असे ॥ १० ॥
व्यर्थ होतो शीण शोधिल्यावांचुनी । कांहीं केल्या जनीं होत नाहीं ॥ ११ ॥
होत नाहीं परी अदृष्ट पाहिजे । तरीच लाहिजे सर्व कांहीं ॥ १२ ॥


सर्वकांहीं प्रेत्‍न केलियानें होतो । आळसी पडतो सावकास ॥ १३ ॥
सावकास जरी आळसी पडिला । होणार तें त्याला होत आहे ॥ १४ ॥
होत आहे परी प्रेत्‍नेवीण नसे । केल्यावीण कैसे भोग होती ॥ १५ ॥


भोग हे होताती पाठीं लागताती । येत्‍नेंवीण होती अकस्मात ॥ १६ ॥
अकस्मात तरी प्रेत्‍नीच भोगील । आळसी पडेल सावकास ॥ १७ ॥
सावकास पडे तेहेंचि होईल । होणारें येईल पूर्वदत्तें ॥ १८ ॥


पूर्वदत्त केलें प्रेत्‍न करूनियां वाउगेंचि वांयां बोलतोसी ॥ १९ ॥
बोलतोसी परी प्रारब्ध सोडीना । धांवतीनें जना होत नाहीं ॥ २० ॥
होत नाहीं जरी कां ये‍त्‍न करिसी । खातो जेवितोसि कासयासी ॥ २१ ॥


कासयासी आतां वाउगें बोलणें । खाणें हो जेवणें पूर्वरेखा ॥ २२ ॥
पूर्वरेखा कोणें लिहिली अदृष्टीं । हेंचि येक गोष्टी बरी पाहें ॥ २३ ॥
पाहील कवण संचितावांचून । देहे कर्माधीन चालतसे ॥ २४ ॥


चालतसे परी चालवावें लागे । कांहीं तरी मागे कोणी येक ॥ २५ ॥
कोणीयेक मागे तो कैचें देईल । होणार होईल निश्चयेंसी ॥ २६ ॥
निश्चयेंसी आतां होणार म्हणसी । कांहींच येत्‍नासी करूं नको ॥ २७ ॥


करूं नको ऐसे व्यर्थचि उत्तर । पूर्वींच होनार हौनी गेलें ॥ २८ ॥
हो‌उनी गेलें आतां तरी कां करावें । उगेंचि रहावें पडोनियां ॥ २९ ॥
पडावें मरावें कपाळासारिखें । कपाळीचें चुके ऐसें नाहीं ॥ ३० ॥


नाहीं नाहीं ऐसें त्वां तरी देखिलें । कपाळ वाचिलें कोणेपरी ॥ ३१ ॥
कोणेपरी आतां नवें होईना कीं । निर्मिलें लौकिकीं होत आहे ॥ ३२ ॥
होत आहे तो गे तोचि प्रेत्‍न जाण । प्रेत्‍नेंवीण कोण जन्मा आला ॥ ३३ ॥


जन्मा आला नादाबिंदा भेटी जाली । विधीनें लिहिली वोळी तेव्हां ॥ ३४ ॥
तेव्हां विधी कोने स्थळीं उभा होता । काशानें लिहिता होय तेथें ॥ ३५ ॥

तेथें काय होतें हें कळे कोणासी । मानवी जिवांसी काय ठावें ॥ ३६ ॥


ठावें नाहीं तरी ऐकेनासी कैसा । नेणोनि वळसा करितोसी ॥ ३७ ॥
करितोसी वांया व्यर्थ खटपट । लिहिलें अदृष्ट पालटेना ॥ ३८ ॥
पालटेना तरी करंटें जाणावें । पापी पालटावें कोणेपरी ॥ ३९ ॥


कोणेपरी आतां अदृष्ट चुकतें । न पेरितां होतें धान्य कैसें ॥ ४० ॥
कैसें होतें आतां पेरिल्यावांचून । बोलिलें वचन सांडूं नको ॥ ४१ ॥
सांडूं नको ऐसें पालटतें कैसें । सांगतां तें कैसें कोणेपरी ॥ ४२ ॥


कोणेपरी आतां तुजसी बोलावें । निश्चयाच्या नांवें शून्याकार ॥ ४३ ॥
शून्याकार जाला प्रारब्धानें केला । पालटितो याला कोण आतां ॥ ४४ ॥
कोण आतां करी सुदैव दुर्दैव । ब्रह्मादिक देव जोपारिले ॥ ४५ ॥


जोपारिले कैसे आहे तें बोलतों । कर्में पालटितो ऐसा कोण ॥ ४६ ॥
ऐसा कोण आहे जे वर्ते विचारें । मूर्ख अविचारें वर्तताती ॥ ४७ ॥
वर्तताती काय करिती प्रारब्धा । त्यासी बोल कदा ठेऊं नये ॥ ४८ ॥


ठेऊं नये ऐसें कोणासी म्हणावें । मूढ लोक देवें निंदियेंलें ॥ ४९ ॥
निंद्य आणि वंद्य प्रारब्धाचा ठेवा । बोल काय देवा ठेउनीयां ॥ ५० ॥
ठेउनीयां बोल देवासी भजावें । पाषांड त्यजावें विषयांचें ॥ ५१ ॥


विषयो सांडूनी भजावें देवाला । देव होणाराला पालटीना ॥ ५२ ॥
पालटीना देव ऐसें म्हणों नये । देवचि उपाय भक्तजना ॥ ५३ ॥
भक्तजन कष्टी हो‍उनीयां गेले । देवें सोडविले नाहींत कीं ॥ ५४ ॥


नाहीं तें बोलतां अभक्त होइजे । यातना भोगिजे परोपरीं ॥ ५५ ॥
परोपरीं मज का भय सांगतां । कर्में विघडितां देव कैचा ॥ ५६ ॥
कैचा देव ऐसें आम्हां ऐकों नये । प्राप्त होती ठाव रौरवाचे ॥ ५७ ॥


रौरवाचे ठाय आपुली करणी । कर्म‍‌आचरणीं ब्रह्मप्राप्ती ॥ ५८ ॥
ब्रह्म प्राप्त होतें संतांचें संगती । येरां अधोगती गर्भवास ॥ ५९ ॥
गर्भवास होती पूर्वींच्या संचितें । आतां कांहीं येथें यत्‍न नाहीं ॥ ६० ॥


येत्‍न नाहीं कोणा ज्या नाहीं कैपक्षी । भक्तजना रक्षी देवराणा ॥ ६१ ॥
देवराणा रक्षी हें कई घडावें । संचीत जाणावें आपुलेंचि ॥ ६२ ॥
आपुलालें पाप देव सोडविता । जाण हें तत्वता निश्चयेसीं ॥ ६३ ॥


निश्चयेसीं देव प्रारब्धा-आधीन । येथें भक्तजन काय करी ॥ ६४ ॥
काय करितोसी भक्ताचा कंटाळा । अहा रे चांडाळा कर्मबद्धा ॥ ६५ ॥
कर्माचे बांधले हरिहरादिक । मानवी हें रंक केवीं सुटे ॥ ६६ ॥


केवीं सुटे मूढ अभाविक जन । अपार पावन देवें केले ॥ ६७ ॥
देवासी बंधन तें कर्मा लागले । बंद सोडविले देवें कैसे ॥ ६८ ॥
कैसें बोलतोसी मर्यादा सांडूनी । रावण मारूनि मुक्त देव ॥ ६९ ॥


देव मुक्त केले या रघुनायकें । रावण कौतुकें रक्षियेलें ॥ ७० ॥

रक्षियेलें तेणें दोषेंचि बुडाला । पुरुषार्थ गेला येकायेकी ॥ ७१ ॥
येकायेकी जातो उपजला प्राणी । कर्माची करणी ऐसी आहे ॥ ७२ ॥


आहे ये‍त्‍न कर्म तोडावयालागी । मुक्तीचे विभागी भक्तजन ॥ ७३ ॥
भक्तजन दोनी प्रारव्धापासूनी । प्रारब्धावांचूनी थोर नाहीं ॥ ७४ ॥
थोर नाहीं ऐसें कैसेनि जाणावें । रूप वोळखावें उभयांचें ॥ ७५ ॥


उभयता कोण प्रारब्ध प्रयत्‍न । आधीं जे निर्माण तेंचि थोर ॥ ७६ ॥
थोर मूळमाया निराकारीं जालीं । प्रारब्धीची वोळी तेथें नाहीं ॥ ७७ ॥
नाहीं क्रियमाण तै शब्दस्फुरण । जें महाकारण ब्रह्मांडीचें ॥ ७८ ॥


ब्रह्मांडीचें महाकारण शरीर । मूळ निराकार परब्रह्म ॥ ७९ ॥
परब्रह्मीं जाली मूळी मूळमाया । पुढें गुणमाया गुण करी ॥ ८० ॥
गुण सत्त्व रज तम हें जाणावें । तेथुनी स्वभावें पंचभूत ॥ ८१ ॥


आकाशीं पवन पवनी तो अग्न । आपोनारायण तेथूनियां ॥ ८२ ॥
तेथूनियां पुढें अवनी जाहाली । पुढें नाना वल्ली भूमिपोटीं ॥ ८३ ॥
भूमिपोटीं जाल्या औषधी निर्माण । तेथूनियां अन्न प्रगटलें ॥ ८४ ॥


प्रगटलें अन्न प्रगटलें रेत । तेथुनी जीवित्व पुरुषाचें ॥ ८५ ॥
पुरुषापासूनी उत्पत्ती वाढली । वेदशास्त्रीं बोली ऐसी आहे ॥ ८६ ॥
ऐसी बोली सत्य वेदशास्त्रवाणी । पुढें चारी खाणी प्रगटल्या ॥ ८७ ॥


प्रगटल्या वाणी तयांची प्रारब्धें । पुढें नानाभेदें जीवसृष्टी ॥ ८८ ॥
जीवसृष्टी जाली उत्पत्ती संव्हार । प्रारब्ध वेव्हार ऐलीकडे ॥ ८९ ॥
ऐलीकडे कर्म मूळीचा तो प्रेत्‍न । श्रोतीं सावधान विवरावें ॥ ९० ॥


विवरावें आधीं प्रेत्‍न कीं प्रारब्ध । शास्त्रांतरीं भेद ऐसा आहे ॥ ९१ ॥
आहे निराकार निर्मळ निश्चळ । तेथुनी चंचळ प्रेत्‍न जाला ॥ ९२ ॥
प्रेत्‍न जाला आधीं म्हणोनियां थोर । प्रारब्धविचार ऐलीकडे ॥ ९३ ॥


ऐलीकडे कर्म पाहतां भूतळीं । प्रेत्‍न अंतराळीं मूळारंभ ॥ ९४ ॥
आरंभापासुनी सर्वही शोधावें । कर्म पडे ठावें विवरतां ॥ ९५ ॥
विवरतां सर्व आशंका फिटली । जाण तया भली विवंचना ॥ ९६ ॥


विवंचना अष्टदेहांची करितां । होय सार्थकता ज्ञानबोधें ॥ ९७ ॥
ज्ञानबोधें स्थूळ सूक्ष्म कारण । तो महाकारण चौथा देह ॥ ९८ ॥
विराट हिरण्य अव्याकृती जाण । मूळमाया खूण अष्टदेह ॥ ९९ ॥


अष्ट देहे ऐसे पिंडब्रह्मांडीचे । निरसितां विवंचे दृश्य माया ॥ १०० ॥
दृश्य माया मिथ्या साच परब्रह्म । दास म्हणे भ्रम मावळला ॥ १०१ ॥
मावळला भ्रम रामगुण गातां । उपासना आतां सोडूं नये ॥ १०२ ॥