हिंदू धर्मामध्ये एकादशी उपवासाला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात साधारणपणे २४ एकादश्या येतात, परंतु जेव्हा अधिकमास किंवा मलमास येतो, तेव्हा त्यांची संख्या २७ पर्यंत वाढते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही ‘अपरा एकादशी’ म्हणून ओळखली जाते. या व्रतादरम्यान संपूर्ण दिवस उपवास करून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला दुपारच्या वेळी भोजन करून उपवास सोडला जातो.

या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि जाणते-अजाणते झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रज्ञ जयंत साळगांवकर यांनी ‘धर्मबोध’ या ग्रंथात या एकादशीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून वैद्याने गरीब आणि गरजूंना मोफत औषधे द्यावीत, विद्वानांनी अनाथ आणि गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यावे, तर राजाने आपल्या प्रजेचे पालनपोषण आणि संरक्षण करावे.

त्याचप्रमाणे, श्रीमंतांनी दीन-दुबळ्यांना मदतीचा हात द्यावा. जे लोक हे कर्तव्य पार पाडत नाहीत, त्यांच्यासाठी अपरा एकादशीचे व्रत हे मृत्यूनंतर नरकयातना टाळण्याचा एक मार्ग आहे, कारण हे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते.

अपरा एकादशीशी संबंधित दोन प्राचीन कथा प्रसिद्ध आहेत. पहिली कथा अशी आहे की, प्राचीन काळी एक ब्राह्मण आपल्या धर्मापासून भ्रष्ट झाला होता. त्याच्या वाईट वर्तनामुळे समाजाने त्याला बहिष्कृत केले. त्यामुळे तो जंगलात निघून गेला आणि तिथे राहू लागला. काही काळानंतर तो आजारी पडला.

एकदा आजारपणातच भटकत असताना तो देवल ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तिथे देवल ऋषींची कठोर तपश्चर्या आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून तो थक्क झाला. त्याने आपली संपूर्ण कहाणी सांगत देवलांना उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी त्याला अपरा एकादशीचे व्रत सुचवले. त्याने त्या सूचनेनुसार व्रत केले आणि कालांतराने त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झाल्या. समाजाने त्याला पुन्हा स्वीकारले आणि पुढे तो सुखी जीवन जगून विष्णुलोकात स्थान मिळवू शकला.

दुसरी कथा महीध्वज नावाच्या राजाची आहे. हा राजा अत्यंत सदाचारी होता, परंतु त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज हा दुष्ट स्वभावाचा होता. वज्रध्वजाने महीध्वजाची हत्या करून त्याचे प्रेत एका पिंपळाच्या झाडाखाली पुरले. त्यानंतर महीध्वज पिशाच बनला आणि लोकांना त्रास देऊ लागला. एकदा धौम्य ऋषी त्या झाडाखाली ध्यानाला बसले असता त्यांना हे पिशाच दिसले.

apara-ekadashi

दयाळू स्वभावामुळे त्यांनी महीध्वजाला मुक्ती मिळावी म्हणून स्वतः अपरा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने महीध्वजाला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली आणि त्याला सद्गती प्राप्त झाली.

या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीने आपले वर्तन नीतिमान ठेवावे. अपरा एकादशी ही पापांचा नाश करते, हे खरे असले तरी पाप घडूच नये यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, असा संदेश या व्रतातून मिळतो. प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार इतरांना मदत करावी, हा विचार या व्रतामागे आहे. हिंदू धर्मात समाजवादी दृष्टिकोन दडलेला आहे, परंतु हा पैलू जगासमोर फारसा आला नाही. परोपकार आणि उच्च नैतिक तत्त्वे यावर अधिक भर देणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही, ही खेदाची बाब आहे. संकटात सापडलेल्यांना स्वतःहून मदत करणे हे अपरा एकादशीचे व्रत पाळण्यासारखेच पुण्यकारक आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की, अपरा एकादशी हे व्रत पुण्य मिळवून देणारे आणि मोठमोठ्या पापांचा नाश करणारे आहे. गर्भातील शिशुची हत्या करणे, निंदा करणे, परस्त्रीगमन यांसारखी पापे करणाऱ्यांनाही हे व्रत केल्यास पापमुक्ती मिळते आणि ते विष्णुलोकात मानाचे स्थान प्राप्त करतात.


धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. पद्म पुराणात असे सांगितले आहे की, या व्रतामुळे आर्थिक संकटे दूर होतात आणि व्यक्तीला संपत्ती प्राप्त होते. असा विश्वास आहे की, या जन्मात हे व्रत केल्याने पुढील जन्मात समृद्धी मिळते.


या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंचे ध्यान करून व्रताचा संकल्प घ्यावा. उपवासादरम्यान फक्त फळांचे सेवन करावे आणि धान्य टाळावे. संध्याकाळी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून ‘विष्णु सहस्रनाम’ पठण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास संपवून ब्राह्मणांना भोजन आणि दान द्यावे.