श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी होणारी एकादशी ‘अजा एकादशी’ म्हणून ओळखली जाते. हे व्रत कठोर नियमांचे आणि विशेष महत्त्वाचे मानले जाते. या एकादशीची वेगळी ओळख आणि तिच्यामागील मान्यता यांमुळे ती श्रद्धाळूंमध्ये प्रसिद्ध आहे. अजा एकादशीचे व्रत कसे करावे, त्याची पूजा पद्धती, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि त्यामागील कथा याबद्दल सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

चातुर्मास हा संपूर्ण काळ व्रत-उपवास, सण-उत्सव आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या काळातील पहिला महिना म्हणजे श्रावण, जो सणांचा आणि व्रतांचा सर्वोत्तम काळ मानला जातो. श्रावण महिना आता अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या शुक्ल पक्षात ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ साजरी होते, तर कृष्ण पक्षात येणारी एकादशी म्हणजे ‘अजा एकादशी’.

प्रत्येक मराठी महिन्यात शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्ही पक्षांमध्ये एकादशी येते आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी ओळख, महत्त्व आणि श्रद्धा असते. अधिक महिन्यातील एकादशीला अतिरिक्त पुण्यप्राप्तीचे महत्त्व आहे, अशी मान्यता आहे. श्रावणाच्या कृष्ण पक्षातील अजा एकादशी कठीण असूनही तिचे फळ आणि महत्त्व वेगळे आहे.

aja-ekadashi

शास्त्रांनुसार, अजा एकादशीचे व्रत पाळणे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. हे व्रत यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना पापमुक्ती आणि मोठे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. हे व्रत कठोर असून ते दशमीपासूनच सुरू होते. दशमीच्या दिवशी सात्त्विक भोजन घ्यावे आणि दुपारनंतर शक्यतो उपवास सुरू करावा. अजा एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करणे श्रेयस्कर मानले जाते. ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जळी व्रत करावे, अन्यथा फक्त फलाहार घ्यावा. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होऊन आत्मिक शुद्धी आणि पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

अजा एकादशी पाळणाऱ्यांनी पहाटे उठून रोजची स्नानादी कर्मे उरकून व्रताचा संकल्प करावा. श्रीविष्णूंना मनोभावे आवाहन करून त्यांची मूर्ती किंवा चित्र चौकीवर स्थापित करावे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे आणि तोच पंचामृत नैवेद्यासाठी अर्पण करावा. मग मुख्य अभिषेक करून श्रीविष्णूंना चंदन, अक्षता, तुळशीची पाने, हंगामी फुले आणि फळे वाहावीत. धूप आणि दीप लावून नैवेद्य दाखवावा, त्यानंतर श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून प्रणाम करून प्रसाद सर्वांना वाटावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान करावे. हे सर्व विधी श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करणे आवश्यक आहे.

व्रत पाळताना मनात कोणतीही शंका ठेवू नये. एकादशीच्या दिवशी फक्त फलाहार किंवा सात्त्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण किंवा उग्र पदार्थ टाळावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून व्रताची सांगता करण्याचा संकल्प करावा. यावेळी श्रीविष्णूंची पूजा करून त्यांचे आभार मानावेत. व्रताच्या काळात कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा मनात ईर्ष्या बाळगणे टाळावे. जर चुकून काही चुका झाल्या तर श्रीविष्णूंकडे क्षमा मागावी. अशा प्रकारे हे व्रत पूर्ण केल्याने मनाला शांती आणि आत्म्याला पवित्रता प्राप्त होते.

अजा एकादशीची कथा सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांच्याशी जोडली जाते. राजा हरिश्चंद्र हे केवळ पराक्रमी आणि शूर नव्हते, तर उदार आणि दानशीलही होते. एकदा दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी आणि पुत्राचा त्याग केला आणि स्वतः चांडाळाच्या घरी नोकर म्हणून राहिले. या संकटातून मुक्त होण्यासाठी ते गौतम ऋषींकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा सांगितली. गौतम ऋषींनी त्यांना अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला.

राजाने सर्व नियमांचे पालन करून हे व्रत केले आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. या व्रतामुळे त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले आणि कुटुंबाची पुनर्भेट झाली. अजा एकादशीचा उपवास हा सर्व उपवासांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. हे व्रत मन, आहार, इंद्रिये आणि वर्तनावर संयम ठेवण्यासाठी केले जाते. श्रीकृष्णानेही अर्जुनाला या व्रताचे महत्त्व समजावून सांगितले होते, अशी मान्यता आहे.